Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोसावी कॉलेजच्या खेळडूंची राज्यपातळीवर निवड

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये डॉ. एम. एस. गोसावी कॉलेजच्या खेळाडूंची राज्यपातळीवर निवड झाली आहे. सन २०१८-२०१९ मध्ये विविध पातळीवर झालेल्या स्पर्धेंत सर डॉ. एम. एस. गोसावी ज्यु. कॉलेजमधील खेळाडूंनी जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवर यश संपादन केले. २६ सप्टेंबर रोजी विभागीय क्रीडा संकूल येथे झालेल्या १९ वर्षाआतील विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विशाल बिस्ट याने प्राविण्य संपादन केले. २१ ते २४ ऑक्टोबर रोजी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण ( चिपळूण) या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेंसाठी त्याची निवड झाली. ४ ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा संकूल ,पंचवटी येथे झालेल्या १९ वर्षाआतील जिम्नॅस्टीक स्पर्धेत कल्याणी सातपुते हीने उत्कृष्ठ कामगिरी करीत यश संपादन केले. तिची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेंसाठी निवड झाली आहे. ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकूल, धुळे या ठिकाणी झालेल्या १७ वर्षाआतील विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत अमेरा शाह या खेळाडूने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. १३ ऑक्टोबरपासून सातारा येथे सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. किक बॉक्सिंग मध्ये मिहीर कुमावत या खेळाडूने जिल्हास्तरीय शालेय १९ वर्षाआतील किकबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार उपप्राचार्य प्रा. अशोक पवार यांच्या हस्ते गुच्छ देवून करण्यात आला. राज्यपातळीवर निवड झालेल्या खेळाडूंना मान्यवरांनी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेंसाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिपोर्ट कार्डने धडकी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आणि खासदारांच्या चार वर्षांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड आमदारांच्या हाती ठेवल्यानंतर नाशिकमधील तीनही आमदारांच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या तीनपैकी दोन आमदारांचे रिपोर्ट कार्ड समाधानकारक नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, ते दोन आमदार कोण, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे.

विकासाऐवजी आपसातील संघर्ष या आमदारांना महागात पडला असून, पक्षाकडून पर्यायी उमेदवारांचा शोध घेण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे रिपोर्ट कार्डने आमदारांमध्ये धडकी भरवली असून, अन्य पक्षांतर्गत इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. सोबतच पक्षाच्या १२१ आमदारांसह राज्यातील १६ खासदारांच्या कामगिरीचाही सर्वे केला आहे. दिल्लीस्थित एका खासगी संस्थेकडून प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्रयस्थपणे त्यांच्या कामगिरीचे अवलोकन करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार राज्यातील सहा खासदारांसह १२१ पैकी ४५ आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच या आमदारांच्या हातात हे रिपोर्ट कार्ड टेकवले असून, घरी जाऊन ते उघडण्याचे आदेश दिले होते. या रिपोर्ट कार्डमुळे भाजपच्या आमदारांमध्ये 'कही खुशीं कहीं गम' अशी स्थिती आहे. नाशिकमध्ये शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. या तीनही आमदारांचे रिपोर्ट कार्ड त्यांना प्राप्त झाले असून, तिघांपैकी दोन आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याची चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. नाशिकमधील तीन आमदारांपैकी एक आमदार काठावर पास झाले असून, दोन आमदार मात्र ४० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे 'डेंजर झोन'मध्ये आलेल्या दोन्ही आमदारांची धाकधूक वाढली असून, यावर आता पर्याय काय शोधायचा या विवंचनेत ते आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये आमदारांच्या या रिपोर्ड कार्डची चर्चा असून, त्यांना पर्याय कोण, असा विचार पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झाला आहे. रिपोर्ट कार्डात 'नापास' असलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अन्य पक्षांतर्गत विरोधकांसाठी हे रिपोर्ट कार्ड मोठे आधार ठरणार आहे. त्यामुळे या विरोधकांकडून आता हे रिपोर्ट कार्ड जाहीर होण्याची वाट पाहिली जात आहे.

--

पक्षांतर्गत संघर्षाचा परिणाम

शहरात भाजपचे तीन आमदार असले, तरी या आमदारांचे एकमेकांशी पटत नाही. महापालिकेतील वर्चस्वावरून या आमदारांमध्ये सत्तास्पर्धा असून, या स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या भांडणामुळे भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत आहे. महापालिकेत सुरू असलेल्या मुंढे विरुद्ध भाजप वादाचे परिणाम या रिपोर्ट कार्डमध्येही उमटले असल्याची चर्चा असून, त्याचाही फटका भाजपसह आमदारांना बसणार आहे. आपसातील वाद आणि संघर्षामुळे नाशिकमध्ये भाजपचे मोठे नुकसान होत असून, त्यामुळे दोन आमदारांचे काम चांगले असूनही त्यांना 'डेंजर झोन'मध्ये जावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक पिशव्या बाळगल्याने कारवाई

0
0

'एमपीसीबी'चे बाजार समितीसह 'आरके'वर छापासत्र

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. असे असतांनाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण

नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

'एमपीसीबी'कडून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व रविवार कारंजा येथील व्यापाऱ्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांबाबत शासनाकडून कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसल्याने संपूर्णपणे प्लास्टिक बंदी असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असताना किरणा दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात 'एमपीसीबी'कडून प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई केली जात असतांना त्याबाबत वृत्त देऊ नका, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्टोबर हिट’मध्ये अघोषित भारनियमन

0
0

नाशिक परिमंडळात दोनशे मेगावॅटची वीजटंचाई

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यभरातील वीजनिर्मिती केंद्रांना काही महिन्यांपासून कोळसा टंचाईचा सामना करावा लागत असून वीजनिर्मितीत घट आली आहे. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे वीज मागणीत अचानक वाढ झाल्याने राज्यभर वीजटंचाई निर्माण झाली आहे. नाशिक परिमंडळात सुमारे १५० ते २०० मेगावॅट विजेची टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम नाशिक व नगर या दोन्ही जिल्ह्यांतील २५७ फिडरवरील अघोषित भारनियमनात वाढ झाली आहे.

राज्यातील एकलहरेसह कोराडी, चंद्रपूर, खापरखेडा, परळी, भुसावळ, पारस या वीज निर्मिती केंद्रांना काही महिन्यांपासून कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही वीजनिर्मिती केंद्रांवरील काही वीजनिर्मिती संच बंद तर काही संचांमधून कमी वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे राज्यातील वीज निर्मितीत घट आलेली होती. परंतु, पावसाळ्याचा कालावधी असल्याने वीज मागणीत घट झाली होती. मात्र, आता ऑक्टोबर हिटमुळे काही दिवसांपासून राज्यभर विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून राज्यातील वीजटंचाई २००० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. नाशिक परिमंडळातही विजेची मागणी १६०० मेगावॅटपेक्षा अधिक झाली असून प्रत्यक्षात १४०० ते १४५० मेगावॅट इतकीच वीज उपलब्ध होत आहे. परिणामी नाशिक परिमंडळातील नाशिक, मालेगाव आणि नगर या तिन्ही मंडळांतील २५७ फिडरवरील भारनियमन प्रभावित झाले आहे.

डीपी नादुरुस्ती प्रमाणात वाढ

नाशिक परिमंडळात वीजटंचाई निर्माण झाली असल्याने जी-१, जी-२ व जी-३ गटात अघोषित भारनियमन वाढले आहे. या गटांमध्ये वीज हानीचे प्रमाण ५६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महावितरणतर्फे या गटांतील फिडरवरील भारनियमन प्रत्यक्षात अजून वाढविले नसल्याचे सांगितले जात असले तरी या २५७ फिडरवरील भारनियमन प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फिडर व डीपी नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे.

शेतीपिकांवर संक्रांत

परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिकांना आता विहिरींमधील पाण्याचा आधार उरला आहे. नेमक्या याच वेळी वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने शेती पिकांवर संक्रांत आली आहे. येत्या काळात वीज टंचाई वाढल्यास भारनियमनाचा फटका औद्योगिक विभागालाही बसण्याची शक्यता वाढली आहे.

दोन महिन्यांपासून सुरू असलेली कोळसाटंचाई आजही कायम आहे. दररोज आवश्यक असणारा कोळसा उपलब्ध होत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारा साठा उपलब्ध नाही. दोन युनिटमधून प्रत्येकी १६० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. लवकरच कोळशाचा पुरवठा वाढण्याचे संकेत आहेत. त्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल.

- उमाकांत निखारे,

मुख्य अभियंता, एकलहरे वीज निर्मिती केंद्र

महावितरणच्या नाशिक परिमंडळात सध्या १६०० मेगावॅट विजेची मागणी असून सुमारे १५० मेगावॅट वीजटंचाई निर्माण झाली आहे. 'ऑक्टोबर हिट'मुळे सध्या वीज मागणीत काही अंशी वाढ झाली असली तरी मागणीतील वाढ दिवसभरातील फक्त काही तासांपुरतीच असते. त्यामुळे भारनियमनात जास्त वाढ झालेली नाही.

- ब्रिजपालसिंह जनवीर,

मुख्य अभियंता, महावितरण नाशिक परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमन रद्द करा अन्यथा अधिकाऱ्यांना काम करू देणार नाही

0
0

धुळ्यात शिवसेनेचा महावितरणला इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिंदूधर्मीयांच्या सणांमध्येच महावितरण कंपनीकडून वारंवार भारनियमन केले जात असल्याने शिवसेनेतर्फे गुरुवारी (दि. ११) महावितरणच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त शिवसैनिकांनी अधीक्षक अभियंता पवनीकर यांच्यावर रोष व्यक्त करीत भारनियमन रद्द झाले नाही तर कुठल्याच अधिकाऱ्याला कामकाज करू देणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.

या आंदोलनावेळी अधीक्षक अभियंता पवनीकर यांना शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले. ऐन नवरात्र उत्सवात महावितरणने धुळे शहरातील विविध भागांत काही ठिकाणी तीन तास तर काही ठिकाणी नऊ तासांचे भारनियमन केलेले आहे. धुळे शहरातील वडजाई रोड, आझादनगर पॉवर हाऊस साक्रीरोड, शिवाजीनगर मोहाडी उपनगर, पंचवटी परिसर, जुने धुळे या वस्तीत सर्वाधिक नऊ तासांचे भारनियमन केलेले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. त्यातच शहरात सध्या डेंग्यू व स्वाईन फ्लूच्या आजारांनी आधीच थैमान घातले असून, डासांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. नवरात्राची संपूर्ण शहरात धामधूम सुरू असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना याचा फटका बसणार आहे.


धुळे शहरात वीज बिल नियमित भरली जात असताना महावितरणकडून वीज चोरी आणि वीज गळतीचे कारण पुढे केले जाते. ही चोरी आणि गळती शोधण्याचे काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे. परंतु, हे अधिकारी विजेची चोरी आणि गळती रोखण्यास असमर्थ ठरत आहेत, असेही शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, जेव्हा विजेचा तुटवडा भासतो तेव्हाच अधिकारी जागे होतात. या वेळेस वीज गळतीचे आणि वीज चोरीचे कारण पुढे करतात. हा प्रकार ग्राहकांसाठी अन्यायकारक आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. उलट उत्सवाच्या काळात नागरिकांना वीज उपलब्ध करणे आवश्यक असताना नवरात्रीतच भारनियमन केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. हे जास्तीचे भारनियमन महावितरणने त्वरित रद्द करावे. अन्यथा विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाज करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. या आंदोलनात अतुल सोनवणे, हिलाल माळी, प्रा. शरद पाटील, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, विजय भट्टड, डॉ. सुशील महाजन, वैशाली लहामगे, हेमाताई हेमाडे, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बालकाचा डेंग्यूने मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात डेंग्यूच्या थैमानाने अखेर एका तेरावर्षीय मुलाचा बळी घेतला आहे. गुरुवारी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरातील साक्री रोड परिसरात राहणाऱ्या किसन राकेश रेलन या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला असून, त्याच्या वडिलांनाही लागण झाली आहे. धुळे शहरात १७६ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्यातील ३९ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतरही महापालिका प्रशासन ही परिस्थिती योग्यरित्या हाताळत नसल्याचेच या घटनेने दिसून आले. किसन गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. नागरिक डेंग्यूने भयभीत झाले असताना सत्ताधारी मात्र सर्वकाही आलबेल असल्याचा आव आणत आहेत. यामुळे धुळेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग. स. चे गटनेते देसले यांना अटक

0
0

आर्थिक घोटाळ्यातून धुळ्यात पोलिसांची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा ग. स. बँकेत तब्बल ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) बँकेचे गटनेते चंद्रकांत नारायण देसले (सी. एन. देसले) यांना अटक केली आहे.

बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने देसले यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिली. गेल्या महिन्यात धुळे शहर पोलिस ठाण्यात देसले यांच्यासह विद्यमान संचालक मंडळ आणि बँक अधिकाऱ्यांसह ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग. स. बँकेत सन २००८-०९, ०९-१० व २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपये तर दुसरा गैरव्यवहार १ कोटी ४ लाख ६५ हजार रुपयांचा करण्यात आला. सभासदांची व आरबीआयची फसवणूक तसेच एटीएमच्या खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी सरकारी ऑडिटर वसंत प्रभाकर राठोड (रा. आनंद नगर, देवपूर, धुळे) यांनी फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार पोलिस पथकाने गुरुवारी सकाळी अचानकपणे सी. एन. देसले यांना ताब्यात घेतले. दुपारी १ वाजेनंतर शहर पोलिस ठाण्यात आणून देसले यांची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. यामध्ये बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात चंद्रकांत देसले यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छगन भुजबळांभोवती चक्रव्यूह

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पराभवात मोलाचा वाटणाऱ्या त्यांच्या तथाकथित पक्षांतर्गत विरोधकांनी आता लोकसभेसाठी भुजबळ यांच्याच नावाचा आग्रह धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांसह स्वत: भुजबळही अचंबित झाले आहेत. मुंबईत पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत लोकसभेसाठी भुजबळांनाच रिंगणात उतरविण्याचे साकडे पवारांना घालण्यात आले. या चक्रव्यूहाची कुणकुण लागलेल्या भुजबळांनी आपले पत्ते उघड न करता तूर्तास निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय पवारांवर सोपवून वेळ मारून नेली आहे. असे असले तरी भ्रष्टाराचाराचे गंभीर असल्याने भुजबळांनी निवडणूक लढवावी की नाही आणि लढवायचीच असेल तर ती लोकसभा की विधानसभा याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात खमंग चर्चा होत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून, राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीस पक्षाने सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी स्वत: लोकसभा मतदारसंघांत लक्ष घालून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयातील बैठकीत नाशिकसह दिंडोरी लोकसभेचा आढावा सादर केला. माजी खासदार देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. संदीप गुळवे, तुकाराम दिघोळे यांच्यासह आठ ते दहा जणांनी नाशिक लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, या सर्वांनी भुजबळांनी लोकसभा लढवली तर आपली माघार असल्याचे स्पष्ट शब्दांत पवारांना सांगितले. काहींनी दोन पावले पुढे जात भुजबळांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. मागील लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ उमेदवार असताना पक्षातील तथाकथित विरोधकांनी त्यांच्या पानिपतात वाटा उचलला होता. तेव्हा तब्बल पावणे दोन लाख मतांनी भुजबळांचा पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा लोकसभेची निवडणूक नको अशी भुजबळांसह त्यांच्या समर्थकांची इच्छा असताना अचानक विरोधकांना पुन्हा त्यांच्या नावाचे उमाळे फुटल्याने भुजबळही चक्रावले आहेत. त्यामुळे नेमकी कोणती निवडणूक लढवावी याबाबत भुजबळ द्विधा मन:स्थितीत आहेत. भुजबळांना पुन्हा चक्रव्यूहात अडकविण्याचे कारस्थान तर रचले जात नाही ना, अशी चर्चा त्यांचे समर्थक करीत आहेत. मतदारसंघाची जातीय आणि राजकीय गणिते पाहता भुजबळांसाठी अजूनही लोकसभा मतदारसंघ अनुकूल नाही. मोदी लाट ओसरली असली तरी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि पुतणे समीर भुजबळ यांचे पुन्हा राजकारणात सक्रीय होणे या बाबी भुजबळांसाठी अजूनही अनुकूल नाहीत.

विधानसभाच बरी!
सध्याच्या राजकीय परिस्थितीत भुजबळांना लोकसभेच्या मतदारसंघापेक्षा विधानसभेची निवडणूक सोयीची आणि सुरक्षित वाटते आहे. लोकसभेचा संभाव्य अंदाज पाहता आघाडीसाठी केंद्राची स्थिती अजूनही अनुकूल दिसत नाही. परंतु, राज्यात याउलट चित्र असून सत्तापालटाची आशा आहे. राज्यात निवडून आल्यास किमान मंत्रिपदाचा तरी लाभ मिळू शकतो. अटीतटीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचता येईल. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभाच बरी या निर्णयापर्यंत भुजबळ पोहचल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विस्कळीत रेल्वेसेवेने प्रवासी त्रस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे रद्द होत असल्याने रेल्वेचेही नुकसान होत आहे. इगतपुरीजवळ शुक्रवारी ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.

रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे इगतपुरी स्टेशनवर ११ आणि १२ ऑक्टोबरला मेगा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही उशिराने धावल्या. मनमाड गोदावरी एक्सप्रेस (अप आणि डाउन) रद्द करण्यात आली. लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी शुक्रवारी सकाळी ११ ऐवजी दुपारी एकला तर लोकमान्य टिळक गोरखपूर सुपरफास्ट गाडी पावणेदोनला सुटली. मुंबई पाटणा गाडी मुंबईहून सकाळी ११ ऐवजी दुपारी दीडला, दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस दादरहून दुपारी दोनऐवजी २.५० वाजता सुटली. लोकमान्य टिळक काजीपेट गाडी साडे अकरा ऐवजी दुपारी दोनला, पनवेल गोरखपूर गाडी पनवेलहून सायंकाळी सहाऐवजी रात्री नऊला सुटली. लोकमान्य टिळक दरभंगा पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनवर दुपारी २.५५ पासून सायंकाळी ४.२० पर्यंत तर लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनपर दुपारी ३.२० पासून ४.४५ पर्यंत थांबलेली होती. गोदावरी मुंबई भुसावळ पॅसंजेर १६ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. कामायनी एलटीटी वारणसी एक तास उशिरा, पवन एक्स्प्रेस दीड तास, पुणे-भुसावळ हुतात्मा व मंगला एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावल्या. या सर्व गोष्टींमुळे प्रवाशी वैतागले होते. अनेकांनी टॅक्सी आणि एसटीने मुंबई, कल्याण, ठाण्याला जाणे पसंत केले.

शटल दोन दिवस रद्द

इगतपुरी रेल्वे स्टेशनवर मेगाब्लॉक असल्याने गाडी क्रमांक ५१४२४ आणि ५१४२३ अप-डाउन मनमाड-इगतपुरी मनमाड प्रवासी गाडी १३ आणि १४ ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोसावी कॉलेजच्या खेळाडूंची चुणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर डॉ. एम. एस. गोसावी ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सन २०१८-१९ मध्ये विविध पातळ्यांवर झालेल्या स्पर्धेंत सर डॉ. एम. एस. गोसावी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स नाशिक या कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवर विशेष नैपुण्य मिळवून यश संपादन केले. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या १९ वर्षांखालील विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विशाल बिस्ट याने प्रावीण्य संपादन केले. चिपळूणजवळील डेरवणमधील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट येथे दि. २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेंसाठी त्याची निवड झाली आहे. विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १९ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कल्याणी सातपुते हिने उत्कृष्ट कामगिरी करीत यश संपादन केले. तिची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेंसाठी निवड झाली आहे. देवपूर, धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षांखालील विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत अमेरा शाह याने थाळीफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. ती सातारा येथे आज (दि. १३)पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सहभागी होत आहे. किकबॉक्सिंगमध्ये मिहिर कुमावत याने जिल्हास्तरीय शालेय १९ वर्षांखालील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व गुणवंत खेळाडूंचा उपप्राचार्य प्रा. अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव कॉलेजचे सॅाफ्टबॉल स्पर्धेत यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा सॅाफ्टबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय सॅाफ्टबॉल स्पर्धेत शालेय १९ वर्षांखालील गटात क. का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले.

क. का. वाघ इंजिनीअरिंग महाविद्यालय, नाशिक येथे या शालेय सॅाफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संघाने महावीर विद्यालय, सटाणा व लासलगाव महाविद्यालय यांना पराभूत करीत विजेतेपद मिळविले. विजयी संघातील कर्णधार विजय गोसावी, पवन गोडे, देवीदास गोडे, मयूर मगर, प्रल्हाद शिंगाडे, प्रसाद सोनवणे, धनंजय सोनवणे, श्रेयस काळे, अमित जाधव, असरार सिद्दिकी यांनी उत्कृष्ट खेळ केला. विजयी संघाची जळगाव येथे होणाऱ्या विभागीय सॅाफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या शरीराला नियतीचे भोग चुकणार नाहीत, म्हणून हे शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. हरिनामाच्या माध्यमातून अनेकांचा उद्धार झाल्याचा अध्यात्मिक इतिहास आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे असे विवेचन प. पू. आनंदमूर्ती गुरू माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाचे प्रवचन पुष्प गुंफताना केले.

नाशिकच्या ऋषी चैतन्य कथा समितीने आयोजित केलेल्या प. पू. आनंदमूर्ती गुरू माँ यांच्या अमृतवर्षा सत्संग सोहळ्यात गुरू माँ बोलत होत्या. त्यांनी आपल्या प्रवचनात पुढे म्हटले की, शिव-विष्णू यांच्यात कोणताही भेद नसून, दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. चांगले पेरले तर चांगलेच उगवेल, म्हणून चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी परमार्थाची कास धरावी लागेल. प्रवचनप्रसंगी रामभूमी नाशिकच्या पवित्र भूमीत हरिनामाचा गजर आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केला. उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. हरीनामाच्या गजराने सभागृहातील वातावरण भारावून गेले होते. नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात १४ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत अमृतवर्षा सत्संग सोहळा सुरू आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदमूर्ती गुरू माँ यांचे प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांनी कुटुंबियांसह हजेरी लावली. प्रवचनामध्ये अधूनमधून विविध मनमोहक संगीत भजने आणि जप यांचा बहार भाविकांना तल्लीनतेचा अनुभव देऊन गेला. स्वामी भोलाराम परमहंस, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. भाविकांनी कागदावर लिहून पाठवलेल्या विविध विषयांवर गुरू माँ यांनी समाधान केले. कार्यक्रमाप्रसंगी विविध धार्मिक ग्रंथ, पुस्तके, सीडी, उपयुक्त वस्तू यांची भाविकांनी खरेदी केली.

विद्यार्थ्यांशी संवाद

ध्येय साध्य करण्यासाठी चढाओढीच्या स्पर्धेने विद्यार्थी गुदमरतो आहे. अभ्यास करीत राहिल्याने ध्येय साध्यतेसाठी भरीव योगदान मिळेल. लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आ वासून उभ्या आहेत. त्या झटकण्यासाठी अभ्यासाला पारमार्थिक चिंतनाची जोड द्यावी असा आग्रह प. पू. आनंदमूर्ती गुरू माँ यांनी नाशिकच्या गुरू गोविंदसिंह विद्यालयात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रायुकाँ’ची कारवाई करण्याची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्य सरकारच्या सर्व शिक्षण विभागांतर्गत डॉ. शुभा साठेलिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर छापणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नाशिक विभागीय

शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.

शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर गेलेले असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध व्यक्त करण्यात आला. अशाप्रकारच्या बदनामीकारक मजकुरामुळे शिवप्रेमी व शंभूप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार शिक्षण विभागाने केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारतर्फे अशा वादग्रस्त व बदनामीकारक मजकूर असलेल्या पुस्तकाच्या वितरणाची मान्यता व या पुस्तकास मान्यता देणारे अधिकारी, सर्व शिक्षण विभागाचे प्रमुख, पुस्तकाचे प्रकाशक, लेखक यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा या विषयावर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ, तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, जयप्रकाश गायकवाड, गणेश गायधनी, कुंदन ढिकले, दिलीप कांबळे, चंद्रकांत साडे, समर सोनार, स्वप्निल फुले आदी उपस्थित होते.

---

गांगुर्डे यांना पुरस्कार

जेलरोड : भारतीय बौद्ध महासभाचे प्रदेश सचिव अनिल गांगुर्डे आणि उपजिल्हाध्यक्षा जयश्री गांगुर्डे यांनी धम्म प्रचार व प्रसारासाठी निःस्वार्थी योगदान दिल्याबदल धम्मविहार प्रचार बहुउदेशीय संस्थेने त्यांना धम्म पुरस्कार जाहीर केला आहे. धम्म पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल या दोघांचे एम. आर. गांगुर्डे, प्रकाश जगताप, शहाजी वानखेडे, रत्नाकर साळवे, डी. टी. जाधव आदींनी अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार सोनेरी येथे भिक्खू संघाचे भन्ते ज्ञानेश्‍वर महास्थवीर यांच्या हस्ते रविवारी (दि. १४) प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे ‘ठेकेदार हिताय’

0
0

एकाच निविदेचे काम चार ठेकेदारांना; स्थायीकडून चौकशीचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या विद्युत विभागाने ५२ विविध प्रकारचे साहित्य खरेदीसाठी काढलेल्या ९० लाख ६५ रुपयांचे एकाच निविदेतील साहित्य पुरवठ्याचे तब्बल चार तुकडे करीत चार ठेकेदारांना देण्याचा घाट घातला आहे. एकीकडे पारदर्शी कारभाराचा ढोल बडविणाऱ्या महापालिकेने अशा प्रकारचे चार ठेकेदारांना कामे देण्याच्या प्रयत्नांवरून भाजपच्या सदस्यांनी प्रशासनाला घेरत, चौकशीची मागणी केली. त्यामुळे सभापती हिमगौरी आडके-आहेर यांनी तांत्रिक बाबींच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला घेरल्याने विविध विकासकामांचे प्रस्ताव तहकूब करण्यात आले आहेत.

महापालिकेत सध्या त्रिसुत्रीनुसार कामकाज सुरू असून ठेकेदारांना कमी कमी दरात कामे देवून महापालिकेची आर्थिक बचत केली जात आहे. परंतु, विद्युत विभागाच्या एका निविदेवरून सत्ताधारी भाजपच्याच सदस्यांना संशय आला असून त्यांनी थेट या प्रस्तावालाच ब्रेक लावला आहे. पथदीप देखभाल दुरुस्तीकरीता महापालिका प्रशासनाने एक कोटी २७ लाख रुपये मंजूर केले. त्यानुसार जवळपास ५२ विविध प्रकारचे साहित्य एकाच निविदेतून खरेदीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाले. या स्पर्धत चार ठेकेदारांनी सहभाग घेतला. पारदर्शक कारभारानुसार चार ठेकेदारांनी स्वतंत्र दर भरले तरी, सर्वात कमी दर देणाऱ्या ठेकेदाराला काम मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, स्थायी समितीवर सादर निविदा मान्यतेच्या प्रस्तावात चार ठेकेदारांनी साहित्यनिहाय कमी दर पुरवठ्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यावर उद्धव निमसे यांनी आक्षेप घेतला. एका निविदेचे काम चार ठेकेदारांना कसे, असा प्रश्न त्यांनी केला. तर रिंग करून महापालिकेचे कामे घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. दिनकर पाटील पाटील यांनीही सदरील बाब ही आयुक्त मुंढे यांच्या पारदर्शी कारभाराला तडा देणारी असून आपला यावर विश्वास बसत नसल्याचा टोला लगावला. त्याप्रश्नी सभापतींनी तांत्रिक बाबींची चौकशी करून अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा प्रस्ताव तहकूब करण्यात आल्याने ठेकेदारांमधील रिंगला तुर्तास ब्रेक मिळाला आहे.

नासाडीसाठी दत्तक घेतले का?

स्थायी समितीत भाजपच्या कारभाराचा पक्षाच्याच भाजपच्या सदस्या शांता हिरे यांनी बुरखा फाडला. अधिकाऱ्यांना सांगूनही कामे होत नाही, तर वरिष्ठ अधिकारी ऐकूनही घेत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हिरेंनी मुख्यमंत्र्यानी नाशिक दत्तक हे विकासासाठी घेतली की नासाडी करण्यासाठी, याचे उत्तर मला द्या, असा सवाल अधिकाऱ्यांना केले. हिरे यांच्या प्रश्नामुळे विरोधकांनी बाके वाजवली; परंतु सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली.

निमसेंचे मुंढेंवर टीकास्र

एकाच विभागातले विकासकामांचे प्रस्ताव स्थायीवर येण्यावरून भाजपचे सदस्य उद्धव निमसे यांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टीकास्र सोडले. रामकुंडापासून खाली नागरिक राहत नाही का, असा सवाल केला. पंचवटीत एकही जॉगिंग ट्रॅक का नाही? आम्हीही कर भरतो. आयुक्त भेदभाव का करतात, असा सवाल केला. सोबतच शहर अपंग व्हावे, असे आयुक्तांना वाटते का? असमतोल विकास का करतात, असा जाब त्यांनी विचारला.

रुग्णालयांचा सर्वे करा

स्थायीत सर्व सदस्यांनी महापालिकेच्या रुग्णालयांच्या स्थितीबाबत जाब विचारत रुग्णालयांची स्थिती खराब असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभापतींनी रुग्णालयांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून देण्यासह बंद पडलेल्या रुग्णालयांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर स्थायी समिती स्वत:च या रुग्णालयांचा पाहणी दौरा सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नगरसेवक निधी मिळणार

नगरसेवक निधीच्या अडवणुकीबाबत दिनकर पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी शहर अभियंता संजय घुगे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. नगरसेवक निधीची अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला. त्यावर उपायुक्त सुहास शिंदे यांनी प्रत्येक नगरसेवकाला १२ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मिळणार असून त्यासंदर्भातील आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला आता १२ लाखांचा निधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आठ तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, आता आठ तालुक्यांमध्ये पीक कापणीचा प्रयोग केला जात आहे. सिन्नर, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांपाठोपाठ आता जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरीसह आणखी पाच तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग करण्याचे निर्देश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये सरासरीहूनही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिके हातून गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खरिपात घेण्यात आलेल्या पिकांच्या काढणीचे सत्यमापन करा, असे आदेश कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांमधील निवडक ३८ गावांमध्ये पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. बागलाण, इगतपुरी, चांदवड, देवळा आणि नाशिक हे तालुकेदेखील दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याने या तालुक्यांमध्ये देखील सत्यमापन करा, असे आदेश सरकारकडून शुक्रवारी प्राप्त झाले. त्यामुळे या तालुक्यांमध्ये देखील बांदावर जाऊन पीक कापणीची पाहणी केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळा तालुक्यात वाळूमाफियांनी केलेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत असून, याप्रकरणी तलाठी संघटनाही आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील ५१२ तलाठ्यांनी शुक्रवारी काम बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध नोंदविला. सर्व हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. हल्लेखोरांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पुरवणी एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लोहणेर येथे अवैध वाळू उपशाला विरोध करणारे तलाठी अंबादास पूरकर यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करीत मोबाइलही हिसकावून नेला. पूरकर हे माजी सैनिक असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी त्यांना उपचारासाठी नाशिक शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्याचा जिल्हा तलाठी संघटनेने निषेध नोंदविला आहे. जिल्ह्यातील ५१२ तलाठ्यांनी शुक्रवारी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला. या प्रकरणात मारहाण तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तलाठी संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ उगले यांनी दिली. ही अत्यंत गंभीर घटना असून, संशयितांवर पुरवणी एफआयआर दाखल करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Ravan Dahan: रावण दहनावरून रणकंदन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले, याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. त्यामुळे वाईट प्रवृत्तीचा नाश केला म्हणून देशभर विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची प्रथा सुरू आहे. परंतु, या प्रथेवरच आता आदिवासी बचाव संघटनेने आक्षेप घेतला असून, महात्मा रावण दहणाची प्रथा बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे केली आहे. संघटनेच्या विरोधानंतरही रावण दहन केले तर, अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रामाची नगरी असलेल्या नाशकातच रावण दहनावरून नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

आदिवासी समाजात रावणाला आदर्श मानले जाते. एकीकडे रावणाला वाईट प्रवृत्तीचे प्रतीक मानले जात असले तरी, आदिवासी समाज मात्र रावणाला महात्मा मानत असून, त्याची पूजा केली जाते. महात्मा रावण हा अनेक गुणांचा समुच्चय होता. महापराक्रमी योद्धा होता असा दावा आदिवासी संघटनांकडून केला जात आहे. अशा महान राजाला इथल्या षडयंत्रकारी वर्णाध व्यवस्थेने बदनाम करण्याचा विडा उचलला असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. मध्य प्रदेशात मदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची मूर्ती आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्रात रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान असताना न्यायप्रविष्ठ रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे या कृतीमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे यंदा रावण दहणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अशोक बागूल यांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेच्या या आक्षेपामुळे नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी निघते मिरवणूक

नाशिकमध्ये दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी एकीकडे सायंकाळी रावणाचे दहन केले जात असले तरी, आदिवासी संघटनांकडून या दिवशी रावणाची मिरवणूक काढून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रामकुंडावर रावणाच्या मंदिरापासून ही मिरवणूक काढली जाते. दरवर्षी धूमधुडाक्यात हा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमावर काही संघटनांकडून आक्षेपही घेतले जातात. परंतु, यंदा आदिवासी संघटनेने दोन पावले पुढे जात थेट रावणदहन न करण्याची मागणी केली आहे.

अॅट्रॉसिटीचा इशारा

यंदा रावण दहनाचा प्रयत्न केला, तर सर्व आदिवासी संघटनांकडून तीव्र स्वरुपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. बिगर आदिवासींकडून रावण दहन झाले, तर आदिवासींच्या भावना दुखावल्या म्हणून अशा लोकांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३(अ)२९५, मंबई पोलिस अॅक्ट १३१, १३४, १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार सिस्टर सिटी

0
0

रशियातील 'उलान-उडे'प्रमाणे साकारणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चीनच्या युंग-याँग व जर्मनीच्या हेब्रॉन शहरासोबत केला जाणार 'सिस्टर सिटी'चा करार केंद्र व राज्य सरकारच्या अनास्थेमुळेच लालफितीत अडकला असतांनाच, आता भाजपच्या सत्ताकाळात रशियातील रिपब्लिक ऑफ बुऱ्याटीआ मधील 'उलान-उडे' या शहराला नाशिकची सिस्टर बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने राज्य सरकारडे या कराराचा प्रारुप आराखडा पाठवला असून महापालिकेकडून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे. अंतर्गत दोन्ही शहरांच्या आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान व शिक्षण क्षेत्रात परस्पर विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

रशियातील 'उलान-उडे' या शहरासोबत नाशिकशी सिस्टर सिटीचा करार करण्याचा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार केला जाणार असून त्याअंतर्गत दोन्ही शहरांच्या आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान व शिक्षण क्षेत्रात परस्पर विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक राजकीय, तसेच बिगर राजकीय नेतृत्त्व विकास, पीपीपी तत्वावर योजनांची अंमलबजावणी, आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे आदी मुद्यांचा करारात अंतर्भाव राहणार आहे. तसेच शहर विकासाबाबत दोन्ही शहरांमधील अनुभव, तंत्रज्ञानाची देवघेव केली जाणार आहे. दोन्ही शहरांमध्ये तीन वर्षांकरीता हा करार असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने सिस्टर सिटीचा प्रारूप करारनामा राज्य सरकारच्या विचारार्थ पाठविला आहे. सरकारने यासंदर्भात नाशिक महापालिकेकडून वस्तुनिष्ठ अभिप्राय मागविला. राज्याच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार महापालिकेडून राज्याला लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.

दोन प्रस्ताव धुळखात

शहराच्या विकासासाठी चीनमधील युंग-यॉँग या शहराबरोबर माहिती व सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध निर्माण करण्यासाठी सिस्टर सिटीचा प्रस्ताव 'निमा' या उद्योजक संघटनेकडून पुढे आला होता. यासंदर्भात करारनामा करण्यासाठी चीनमधील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिकमध्ये येऊन करारही केला होता. परंतु, हा प्रस्ताव दोन वर्षांपासून धुळखात पडून आहे. तीन वर्षांपूर्वी जर्मनीच्या हेब्रॉन शहरासोबत वातावरणातील बदलांसंदर्भात सिस्टर सिटीचा प्रस्ताव पुढे आला होता. तोही पडूनच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेपक टकरॉ’चे ब्रह्मा व्हॅलीस विजेतेपद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित आंतरशालेय सेपक टकरा स्पर्धेत ब्रह्मा व्हॅली स्कूलने जिल्हा गटात विजेतेपद पटकावले. किशोर सूर्यवंशी आणि काकासाहेब देवधर स्कूलनेदेखील विविध गटांत अव्वलस्थान राखले.

मंगळवारी (दि. ९) सुरू झालेल्या या स्पर्धेत १९, १७ आणि १४ वर्षीय मुले-मुलींच्या तीन वयोगटांचा महानगर व जिल्हानिहाय समावेश होता. मंगळवारी १४ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी १७ व १९ वर्षे वयोगटांच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये मुलांच्या १७ वर्षे नाशिक महानगर गटात मुलांमध्ये देवधर स्कूल आणि नवजीवन डे स्कूल यांच्यातील अंतिम सामन्यात काकासाहेब देवधर संघाने विजेतेपद मिळविले. १७ वर्षे नाशिक जिल्हा गटात किशोर सूर्यवंशी संघाने अंतिम सामन्यात जोरदार खेळ करून दिंडोरीच्या जनता इंग्लिश स्कूलचा पराभव करून विजेतेपद मिळविले. १९ वर्षे नाशिक महानगर गटात काकासाहेब देवधर संघाने प्रथम, तर एन. बी. टी. कॉलेजच्या संघाने दुसरा क्रमांक मिळविला. जिल्हा गटात ब्रह्मा व्हॅलीने बाजी मारली. या दोन्ही गटांत विजयी ठरलेल्या संघांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापुढील नाशिक विभागाच्या स्पर्धा दि. १४ आणि १५ ऑक्टोबरदरम्यान नाशिक येथे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार आहेत.

स्पर्धेचा निकाल असा...

जिल्हा गट- १९ वर्षे मुले : ब्रह्मा व्हॅली- प्रथम, किशोर सूर्यवंशी स्कूल- द्वितीय, के. के. वाघ विद्याभवन, निफाड- तृतीय. मुली : किशोर सूर्यवंशी स्कूल- प्रथम, ब्रह्मा व्हॅली- द्वितीय, जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी- तृतीय.

महानगर गट- १९ वर्षे मुले : काकासाहेब देवधर स्कूल- प्रथम, एनबीटी कॉलेज- द्वितीय, स्वामिनारायण ज्युनिअर कॉलेज- तृतीय.

जिल्हा विभाग- १७ वर्षे मुले : किशोर सूर्यवंशी स्कूल- प्रथम, जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी- द्वितीय, के. के. वाघ विद्याभवन, निफाड- तृतीय. मुली : किड्स अॅकॅडमी, सिन्नर- प्रथम, जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी- द्वितीय, किशोर सूर्यवंशी स्कूल- तृतीय.

महानगर विभाग- १७ वर्षे मुले : काकासाहेब देवधर स्कूल, प्रथम, नवजीवन डे स्कूल- द्वितीय, सेंट फ्रान्सिस स्कूल- तृतीय. मुली : काकासाहेब देवधर स्कूल- प्रथम, बिटको स्कूल- द्वितीय, नवजीवन स्कूल- तृतीय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसाठी १२ नवीन गुदामे

0
0

- गुदामांसाठी लवकरच निविदा

- गुदामे आणि धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जीपीएस यंत्रणा

- रेशन दुकानांमधून टाटाचे मीठ

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात धान्य साठवणुकीसाठी तोकड्या ठरणाऱ्या गुदामांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. नाशिकमध्ये १२ नवीन गुदामांची उभारणी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, सरकारने ८८ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३५ हजार मेट्रिक टन इतके धान्य साठविता येऊ शकेल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली.

जिल्ह्यात धान्य साठवणुकीकरिता पुरेशी गुदामे नसल्याचा मुद्दा यापूर्वी अनेकदा ऐरणीवर आला होता. नवीन गुदामांची उभारणी केली जावी, अशी मागणीदेखील केली जात होती. जिल्ह्यात सद्यस्थितीत १३ हजार मेट्रिक टन धान्य साठविता येईल एवढीच गुदामांची क्षमता आहे. परंतु, जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांकरिता जेवढे धान्य लागते त्याच्या तीनपट धान्य साठविता येईल एवढी गुदामांची क्षमता असायला हवी. त्यामुळे नाबार्डच्या मदतीने जिल्ह्यात गुदामे उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. बारा गुदामांकरिता सरकारी जागा निश्चित करण्यात आल्या असून, ८८ कोटी १६ लाखांचा निधीही सरकारने मंजूर केला आहे. गुदामे उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. गुदामे मजबूत असणे आवश्यक असून, ते उभारण्याकरिता एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असेही ते म्हणाले. पुढील तीन महिन्यांत राज्यातील सर्व गुदामे आणि धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जीपीएस यंत्रणा बसविली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. रेशन दुकानांमधून टाटाचे मीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

कुत्त्यागोली ड्रग्जबाबत बैठक

मालेगावात कुत्त्यागोली नावाचे ड्रग्ज बनविले जात असून, अनेक तरुण या ड्रग्जच्या अधीन जात आहेत. पोलिसांनी कारवाई करूनही या ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे या ड्रग्जचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी सरकारी विश्रामगृहावर झालेल्या आढावा बैठकीत काही आमदारांनी केली. बापट यांनी या मागणीची दखल घेतली असून, लवकरच मंत्रालयात या ड्रग्जबाबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू अशी ग्वाही दिली.

...

आम्हीच सत्तेवर येऊ

राज्यात भाजपचे अनेक विद्यमान आमदार निवडून येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती असल्याकडे बापट यांचे लक्ष वेधण्यात आले. भाजप डॅमेज कंट्रोल कसे करणार असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी बापट म्हणाले, की राज्यात भाजप कोठेच डॅमेज नाही. निवडणुका टेक्निकने लढवायच्या असतात. रोज इश्यू बदलतात. त्यामुळे परिस्थिती बदलत असते. राजकारणात कोण कसा माल विकतो त्यावर किती माल खपणार हे अवलंबून असते. आमच्याकडे चांगले नेतृत्व आहे. चांगल्या कामांची शिदोरी आमच्यासोबत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही भाजपच सत्तेवर येईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images