Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धरणसाठ्यात १० टक्के घट

$
0
0

गतवर्षीच्या तुलनेत ७,१३७ दलघफू पाणी कमी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबरच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ७८ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. मान्सूनचा हंगाम संपला असून, या पाणीसाठ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, आहे त्या पाण्यावरच भागवावे लागणार आहे.

गंगापूर, दारणा आणि गिरणा धरण समूहांमध्ये एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी या धरणांमध्ये आजमितीस ५८ हजार २४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, यंदा केवळ ५१ हजार १०८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार १३७ दशलक्ष घनफूट पाणी कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गतवर्षी ८८ टक्क्यांवर असलेला सरासरी पाणीसाठा यंदा ७८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी नाशिककरांना पार पाडावी लागणार आहे.

-

गिरणात ४८ टक्केच पाणी

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले गिरणा धरण यंदा निम्मेही भरू शकलेले नाही. या धरणाची पाणी साठवण क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आहे. गतवर्षी धरणात १२ हजार १०७ दलघफू म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यामध्ये ८ हजार ८६० दलघफू म्हणजेच ४८ टक्के एवढाच पाणीसाठा आहे.

-

सहा धरणेच भरली १०० टक्के

गतवर्षी जिल्ह्यात २४ पैकी तब्बल १८ धरणे १०० टक्के भरली होती. त्यामध्ये गंगापूर धरण समूहातील चार, पालखेड धरण समूहातील नऊ, तर दारणा धरण समूहामधील पाच धरणांचा समावेश होता. परंतु, यंदा २४ पैकी केवळ सहाच धरणे १०० टक्के भरू शकली आहेत. त्यामध्ये गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी आणि हरणबारी या धरणांचा समावेश आहे.

-

धरण समूहांमधील तुलनात्मक पाणीसाठा टक्केवारीत

धरणसमूह २०१७ २०१८

गंगापूर १०० ९५

पालखेड ९५ ८६

गिरणा १०० ७९

एकूण ८८ ७८

-

धरणांमधील तुलनात्मक पाणीसाठा टक्क्यांत

धरण २०१७ २०१८

गंगापूर १०० ९१

काश्यपी १०० ९९

गौतमी गोदावरी १०० १००

आळंदी १०० १००

पालखेड ९९ ५२

करंजवण १०० ९४

वाघाड १०० १००

ओझरखेड १०० ९०

पुणेगाव ९९ ९२

तिसगाव १०० ९६

दारणा १०० ९३

भावली १०० १००

मुकणे ८७ ७४

वालदेवी १०० १००

कडवा १०० ८५

नांदूरमध्यमेश्वर १०० ५९

भोजापूर ९५ ७६

चणकापूर १०० ९७

हरणबारी १०० १००

केळझर १०० ९९

नागासाक्या ४५ ०

गिरणा ६५ ४८

पुनद १०० ९५

माणिकपुंज १०० १९

एकूण ८८ ७८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध कार्यक्रमांचा ब्रह्मोत्सवामध्ये बहर

$
0
0

१० ते २३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री बालाजी व्यंकटेश मंदिरात १० ते २३ ऑक्टोबर दरम्यान ब्रह्मोत्सव रंगणार असून त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम गंगापूर रोडवरील सोमेश्वरजवळील बालाजी मंदिरात होणार आहेत.

शंकराचार्य न्यासच्या श्री बालाजी व्यंकटेश मंदिरातर्फे आयोजित ब्रह्मोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. १०) पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेत ब्रह्मोत्वसाच्या शुभारंभाची महापूजा होणार आहे. महापूजा १० ते २३ ऑक्टोबर दरम्यान, पहाटे ५.३० वाजता होईल. बुधवारी (दि. १०) सकाळी ८.३० वाजता तुलसी अर्चना व सकाळी साडेनऊ वाजता ध्वजपूजन होईल. गुरुवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजता पुष्पार्चना आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मीना परुळकर यांचा गोविंद-कला-संगम कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी मंदिरात महावस्त्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. १३) सकाळी ८.३० वाजता कुंकम अर्चना, सकाळी ९.३० वाजता कुमारिका पूजन आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत दीपा मोनाक्षी व शिष्यवृंद यांचा रास कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि.१४) सकाळी साडेआठ वाजता हिरण्य अर्चना व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत तबला वादक नितीन वारे यांच्या शिष्यांचा तबला वादनाचा कार्यक्रम होईल.

सोमवारी (दि. १५) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत कल्याणम् (बालाजी विवाह) होणार आहे. मंगळवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजता फलार्चना होईल. गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेआठ वाजता लड्डूपेड अर्चना होईल. शुक्रवारी (दि. १९) दुपारी ४ ते ७ यावेळेत सुंदरकांड सत्संग समितीच्या वतीने गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता गोदातीरी अवभूत स्नान होणार असून रात्री ८ ते ९.३० यावेळेत अमृता रहाळकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. २१) सकाळी ८.३० वाजता अक्षदा अर्चना व दुपारी १२.३० ते २ यावेळेत ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने भंडारा (महाप्रसाद) होणार आहे. मंगळवारी (दि. २३) रोजी सकाळी ८.३० वाजता गरुड पूजन, सायंकाळी ६ वाजता दीपार्चना आणि रात्री ८ नंतर - दुग्धपानाचा कार्यक्रम होणार आहे. ब्रह्मोत्सवातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शंकराचार्य न्यासतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर मोबाइल चार्जिंग पॉइंट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्रवाशांची मोबाइल चार्जिंगची समस्या दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने विविध ठिकाणी मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारले आहेत. स्थानक प्रमुख आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, इलेक्ट्रिक इंजिनीअर प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली. या स्थानकात मोफत इंटरनेट सेवा (वाय-फाय) वर्षभरापूर्वीच सुरू झाली आहे.

नाशिकरोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्लॅटफार्म एक आणि दोनवर लिफ्ट सुरू केल्यानंतर सरकते जिने नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहेत. रांग लावून तिकीट काढण्यास वेळ नसेल तर तिकीट व्हेन्डिंग मशिनही बसविण्यात आले आहे. या मशिनमध्ये तिकिटाचे पैसे टाकल्यास त्वरित तिकीट मिळते. तसेच स्थानकात दोन ठिकाणी स्वस्तात मिनरल वाटर देणारी दोन वॉटर व्हेन्डिंग मशिन्स बसविण्यात आली आहेत. आता मोबाइल चार्जिंग पॉइंट लावण्यात आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहेत.

वेटिंग रुममध्ये सेवा

नाशिकरोड स्थानक हे मनमाड, भुसावळ सारखे जंक्शन नसले तरी दररोज शंभरावर रेल्वेगाड्या धावतात. तसेच दररोज सरासरी सोळा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत. रेल्वेगाडीला विलंब असेल तर प्रवाशांना मोबाइल चार्जिंग करावेच लागते. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना ही समस्या प्रकर्षाने जाणवते. नाशिकरोड स्थानकात चारही वेटिंग रुममध्ये तसेच प्लॅटफार्म क्रमांक एकवरील रिझर्व्हेशन चार्टच्या फलकाजवळ चार्जिंग पॉइंट बसवले आहेत. लेडीज वेटिंग रूम, एसी वेटिंग रूम, रिझर्वेशन आणि स्लीपर वेटिंग रुममध्ये असे चार ठिकाणी चार्जिंग पॉइंट आहेत.

चोवीस तास वीज

मोबाइल चार्जिंग पॉइंटचा वीज पुरवठा चोवीस तास सुरू राहील अशी व्यवस्था आहे. एका चार्जिंग पॉइंटला दहा यूएसबी पोर्टची सुविधा असून, एकावेळी दहा मोबाइल चार्ज होऊ शकतात. प्रत्येक पॉइंटवर मोबाइल स्टँडही देण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल चार्जिंग होईपर्यंत हातात ठेवण्याची वेळ येत नाही, अशी माहिती इंजिनीअर प्रवीण पाटील यांनी दिली. रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव यांनी नुकतीच या सुविधेची पाहणी केली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे चार्जिंग पॉइंट असून, यानंतर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बसविण्यात येणार आहेत.

नाशिकरोड स्थानकातील मोबाइल चार्जिंग पॉइंटमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. वेटिंग रूममध्ये मोबाइल पॉइंटशेजारीच स्टँड लावण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र चार्जिंग पॉइंट आहेत.

- प्रवीण पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरोगी जीवनशैलीसाठी योग अन् नॅचरोपॅथीची गरज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दगदगीच्या जीवनशैलीत शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा मेळ साधण्याचे आव्हान आजमितीस प्रत्येकासमोर आहे. निरोगी शरीर समाज आणि देशाचे कार्य अधिक क्षमतेने करू शकते. तुमचे मन आणि शरिर निरोगी ठेवण्यासाठी योग आणि नॅचरोपॅथी या तंत्राचा समावेश दैनंदिन जीवनशैलीत करायला हवा, असा सूर 'प्राकृतिक चिकित्सा आणि योग' या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेतून उमटला.

इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (आयएनओ) आणि शिवगोरक्ष योगपीठ यांच्यातर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 'प्राकृतिक चिकित्सा आणि योग' असा विषयावर परिषद झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली निर्माण करण्यासाठी योग आणि नॅचरोपॅथी यांची समाजाला गरज आहे. माणूस निरोगी राहिला तर देश निरोगी व सुदृढ होईल, असे खासदार चव्हाण म्हणाले.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, हिमगौरी आडके, कमल चव्हाण, शिवगोरक्ष योगपीठाचे अध्यक्ष भगवान महाराज ठाकरे, महामंडलेश्वर शिवानंद महाराज, आयएनओचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार, पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीच्या संचालिका डॉ. सत्यलक्ष्मी, श्यामसुंदर तिवारी, डॉ. सुशांत पिसे, डॉ. नितीन शिंपी, रमाकांत जाधव, जीवनलाल गांधी, डॉ. राजन पाटील, प्रज्ञा पाटील, मीनल शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेस महाराष्ट्रासह देशभरातील प्राकृतिक चिकित्सा आणि योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिवानंद महाराज यांनी सांगितले, की योग आणि नॅचरोपॅथीची समाजाला गरज आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. तसेच 'आयएनओ'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बिरादार यांनीही नॅचरोपॅथी विषयी देशभर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. केंद्र सरकारने १८ नोव्हेंबर हा नॅचरोपॅथी दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागतही त्यांनी केले. नॅचरोपॅथीविषयी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. नॅचरोपॅथीसाठी सरकारकडून २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यामध्ये २५ एकर जागेवर इंटनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी सुरू केल्याची माहिती यावेळी संचालिका डॉ. सत्यलक्ष्मी यांनी दिली.

हवी सल्लागार समिती

मान्यवरांच्या हस्ते नॅचरोपॅथी डे विषयीच्या फलकाचे अनावरण झाले. आयुष मंत्रालयाची स्थापना झाली असून पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम राज्यस्तरावर सुरू करण्याची गरज असल्याचा सूर राज्यस्तरीय परिषदेत व्यक्त करण्यात आला. निसर्गोपचारकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारने राज्यस्तरीय सल्लागार समितीचे गठण करावे, अशी मागणी बिरादार यांनी यावेळी केली.

४ मिनिटांत ३२ योग प्रात्यक्षिके

परिषदेत विद्यार्थ्यांनी बासरीवादन, योगामधून कथकनृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी ४ मिनिटांमध्ये योगाचे ३२ प्रकार सादर केले. परिषदेत डॉ. जीवनलाल गांधी, डॉ. जितेंद्र, डॉ. कुमुद जोशी, डॉ. प्रवीण जैकब, डॉ. गोविंद जयस्वाल, डॉ. अमित सिंह सिसोदिया आदी तज्ज्ञांनी प्राकृतिक चिकित्सा या विषयावर विचार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यछटा हा एक आभासी कलाविष्कार

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाट्यछटा हा एक आभासी कलाविष्कार असून, जास्तीत जास्त लेखकांनी तो आत्मसात करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मानसी देशमुख यांनी केले.

अक्षर मानव नाशिक शाखेच्या वतीने आयोजित नाट्यछटा लेखन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. काळानुसार कालबाह्य होत असलेल्या नाट्यछटांबाबत तळमळ न बाळगता चळवळ उभी करावी यासाठी अक्षर मानवच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख यांनी नाट्य, नाटक, नाट्यछटा म्हणजे काय याची माहिती दिली. नाट्यछटा कशी लिहावी व लेखन कसे समृद्ध करावे, याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित लेखकांना विविध प्रकारची प्रात्यक्षिके करण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे विविध विषय देऊन नाट्यछटा लिहायला सांगण्यात आल्या. दहा वर्षांपासून ते पन्नास वर्षांपर्यंतचे पन्नासहून अधिक लेखक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. औरंगाबाद, अहमदनगर, कल्याण व नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमधून लेखकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कार्यशाळा यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा मेघा जाधव, साहित्य विभागप्रमुख नरेंद्र सोनवणे, गणेश शिंदे, दीपक देवळीकर, मनोहर आहिरे, गजानन अटाळकर यांनी प्रयत्न केले. लेखिका देशमुख म्हणाल्या, की नाटक, नाट्यछटा किंवा नाट्याविष्कार हा एक आभासी कलाविष्कार आहे. याचे स्वगत, एकपात्री, द्विपात्री असा प्रकार पडतात. या साहित्य प्रकारात छोटी छोटी वाक्य असतात. कथानकही छोटे असते. नाट्यछटा सादर करण्यासाठी ५ ते १२ मिनिटांचा कालावधी लागतो. यात कमी अवधीत जास्त मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असल्याने अभिनयाचा कस लागतो. यात वेगवेगळ्या घटना असतात, तसेच नाट्यछटेच्या विषयात वेगवेगळे प्रश्न विचारून ते पात्र रंगविले जाते. संस्थेची माहिती देताना अध्यक्षा मेघा जाधव म्हणाल्या, की अक्षर मानव ही संस्था साहित्य विषयावर काम करते. या संस्थेची सुरुवात राजन खान यांनी पुण्यात केली असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामंध्ये या संस्थेच्या शाखा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्री सराईतांची धरपकड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गुन्हेगारी आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून सराईत गुन्हेगारांची अचानक धरपकड केली. सर्वच भागात पोलिसांनी अचानक कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई हाती घेतल्याने राजकीय गुन्हेगारांवर कारवाई होणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जातो आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुका होणार असून, त्याचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारांकडे लक्ष वळविले असून, शनिवारी रात्री ११ वाजता पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच ६० पोलिस अधिकारी आणि २१७ पोलिस कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. पोलिसांनी शहरातील विविध झोपडपट्टी भागांना लक्ष केले. पोलिस रेकॉर्डवरील १८१ आरोपींची तपासणी करण्यात आली. यापैकी ५९ संशयित आरोपी सापडले. त्यांना लागलीच पोलिस स्टेशनला नेऊन प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यात घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी असे मालमत्तेशी संबंधीत आणि हत्या, हत्येचा प्रयत्न असे शरिराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपींचा समावेश होता.

नाकाबंदीत ३६१ वाहनांची तपासणी

याच दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. यात ३६१ वाहनांची तपासणी करीत १९ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ११ वाजता सुरू झालेली कारवाई मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू होती. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे संत कबीर नगर झोपडपट्टी, लेखानगर झोपडपट्टी यांसह फुलेनगर झोपडपट्टी भागात हजर होते. पोलिसांच्या हाती लागलेल्या आणि बेपत्ता असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करायची, याचे आदेशही आयुक्तांनी दिलेत. शहरात बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर सराईत आरोपींची धरपकड झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणाले आहे. आगामी काळात राजकीय गुन्हेगारांवरदेखील पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी २३ कोटींच्या निधीला मान्यता

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात तालुक्यातील ३६ किलोमीटर लांबीच्या एकूण १५ रस्त्यांचा समावेश असून, यासाठी २३.१६ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री भुसे बोलत होते. या वेळी समिती उपसभापती सुनील देवरे, शिवसेनेचे संजय दुसाने , रामा मिस्तरी आदी उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत याआधीदेखील २३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी १७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आता तालुक्यातील नव्याने १५ रस्त्यांसाठी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने संशोधन व विकास अंतर्गत विशिष्ट प्रमाणात प्लास्टिकचा वापर हे रस्ते बनवण्यात येतील. संबंधित ठेकेदारास ५ वर्षे या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक असेल. लवकरच या रस्त्यांचे एस्टिमेट, निविदा प्रक्रिया, कार्यादेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमुळे राष्ट्रीय, राज्य व जिल्हामार्गाशी ग्रामीण भाग जोडला जाणार असून, दळणवळण व वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांचा वरिष्ठांना ठेंगा!

$
0
0

अशासकीय पत्रालाही केराची टोपली; माहिती देण्यास टाळाटाळ

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागातील कांदा लागवडीसह पीक विम्याची माहिती वारंवार मागवूनही टाळाटाळ केल्याने काही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना अशासकीय पत्र बजावण्याची नामुष्की विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर ओढावली आहे. कृषी विभागात कुणाचाच पायपोस कुणात राहिला नाही. जिल्हा पातळीवरील कृषी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना जुमानत नसल्याचे उघड झाले आहे.

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयास अद्यापही काही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून कांदा लागवड आणि पीक विम्याबाबतची माहिती मिळालेली नाही. कृषी सहसंचालक कार्यालयाने वारंवार पाठपुरावा करूनही काही जिल्हा कृषी अधिकारी आदेशांना जुमानत नसल्याची गंभीर बाब उजेडात आली. पीक विमा योजनेत शेतकरी सहभागाची माहिती अद्यापही नाशिक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. याशिवाय विभागातील धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनीही कांदा लागवडीची माहिती ऑनलाइन सादर केलेली नाही.

कांदा लागवड व पीक विमा योजनेची माहिती सादर करण्याच्या आदेशांना न जुमानणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने शेवटी अशासकीय पत्र बजावले आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे आदेश विभागातील काही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केल्याने कृषी विभागातील अनागोंदी उघड झाली आहे.

आकडेवारी फसवी?

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात नाशिक विभागात २९ हजार ४६६ हेक्टर कांदा लागवड झाल्याची कृषी सहसंचालक कार्यालयात नोंद आहे. गेल्या वर्षी विभागातील जळगाव जिल्ह्यात खरीप कांदा लागवड झालेली नव्हती. मात्र, यंदा विभागातील ५४ पैकी तब्बल १४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे वास्तव आहे. यंदा तब्बल ७३ हजार ८२ हेक्टर खरीप कांदा लागवड झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यात धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश नाही. तर जळगाव जिल्ह्यातही अवघी ६२ हेक्टर कांदा लागवड झाली आहे. यंदाच्या आकडेवारीनुसार तब्बल ४३ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीप कांदा लागवड वाढल्याची आकडेवारी फसवी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

विभागातील वर्षनिहाय कांदा लागवड (हेक्टर)

जिल्हा........खरीप (२०१७)........खरीप (२०१८)

नाशिक...........१६,७८२................३७,०९७

धुळे................१,३७२................००

नंदुरबार........१,२४२................००

जळगाव........००................६२

नगर........१०,०७०................३५,९२३

एकूण........२९,४६६................७३,०८२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूषित पाणीपुरवठा थांबवा

$
0
0

अशोक स्तंभ

दूषित पाणीपुरवठा थांबवा

गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील अशोक स्तंभ, घारपुरे घाट या अत्यंत मध्यवर्ती परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या गंभीर समस्येकडे महापालिकेने वेळीच लक्ष द्यावे.

-सोनल गुप्ता

पंचवटी

बंद पथदीपांमुळे गैरसोय

पंचवटी परिसरातील कमलानगररोड, शिवकृपारोड, हिरावाडी येथील रस्त्यांवरचे बहुतांश पथदीप अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आणि बंद आहेत. जे सुस्थितीत आहेत तेदेखील कधीच वेळेवर सुरू होत नाहीत. महापालिकेने याप्रश्नी लक्ष द्यावे आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी.

-राहुल गायकवाड

शहर परिसर

नदीत आढळल्या मूर्ती

महापालिकेच्या मूर्ती संकलनात यंदा घट झाली, याचे कारण लोकांनी घरी किंवा ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांत गणपती विसर्जित केले, असे महापालिकेचे म्हणणे आहे. पण, यंदाही नदीत 'पीओपी' मूर्तींचे विसर्जन केले गेले. नंदिनी (नासर्डी) नदीत अशा मूर्ती आढळून आल्या आहेत.

-गौरव देवरे

पंचवटी

नेटवर्कअभावी अडचणीत भर

वारंवार तक्रारी करूनही केतकीनगर, बोरगड परिसरात काही मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. किरकोळ कामांसाठी त्यांना अन्यत्र जाऊन मोबाइलचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी तातडीने येथे सुविधा उपलब्ध करून नागरिकांना आधार द्यावा.

-प्रा. बी. एस. महाले

उपनगर

खड्डे अद्याप जैसे थे

उपनगर नाक्यावरील सिग्नलजवळ सुरू असलेली पाण्याची गळती बंद झाली आहे. पण, या ठिकाणचे खड्डे मात्र अजूनदेखील बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी.

-अनिल सोमण

इंदिरानगर

जॉगिंग ट्रँकची दुरवस्था

हा फोटो आहे सिटी गार्डनजवळच्या जॉगिंग ट्रॅकच्या कंपाऊंडचा. या कंपाऊंडच्या जाळ्या बऱ्याच ठिकाणी चोरीला गेल्या आहेत. ग्रीन जिमचे साहित्यदेखील चोरीस गेले आहे. जे साहित्य आहे, त्याचीदेखील नासधूस झालेली आहे. ही नागरिकांच्या पैशाची नासाडी नाही का? नगरसेवकांनी याप्रश्नी लक्ष घालावे.

-अतुल कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सुरू; व्यायामशाळेची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पोलिस वसाहतीमध्ये व्यायामशाळा आणि वाचनालय सुरू होणार होते. यासाठी सात वर्षांपूर्वी दोन इमारतींचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून वसाहतीतील रहिवाशांना वाचनालय आणि व्यायामशाळेची प्रतीक्षा होती. गेल्या आठवड्यात वाचनालयाच्या इमारतीमध्ये अंगणवाडी सुरू करण्यात आली. वाचनालयाच्या जागी अंगणवाडी याचे रहिवाशांनी स्वागत केले. पण, व्यायामशाळेच्या साहित्याची प्रतीक्षा कधी संपणार असा प्रश्न रहिवाशांना कायम आहे.

शरणपूर रोड येथील स्नेहबंधन पार्क पोलिस वसाहतीत 'उडान' या अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच झाले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने ही अंगणवाडी सुरू करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वय वर्षे ६च्या आतील मुलामुलींना या अंगणवाडीत शिक्षण देण्यात येत आहे. ही अंगणवाडी ज्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आली आहे, त्या इमारतीमध्ये वसाहतीतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच्यादृष्टीने वाचनालय सुरू होणार होते. सन २०१२ मध्ये त्यासाठी इमारत बांधण्यात आली. वाचनालयासोबतच व्यायामशाळेसाठीही वसाहतीमध्ये इमारत बांधण्यात आली. तेव्हापासून वाचनालय आणि व्यायामशाळा साहित्याची प्रतीक्षा रहिवाशांना आहे. वसाहतीमध्ये वाचनालय आणि व्यायामशाळेच्या इमारती बांधून धूळ खात पडल्या आहेत. त्यामध्ये साहित्य टाकावे, अशी मागणी रहिवाशांकडून पोलिस आयुक्तांकडे अनेकदा करण्यात आली. लाइन सर्जंट आणि आरपीआय अधिकारी यांच्याकडून गेल्या दोन वर्षांत दोन ते तीन वेळा इमारतींची पाहणी करण्यात आली. त्यावेळी लवकरच वाचनालय आणि व्यायामशाळा सुरू होईल, असे रहिवाशांना आश्वासित करण्यात आले. अंगणवाडीची सुरुवात झाल्याने वाचनालय सुरू होणार नाही. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. मात्र, व्यायामशाळेच्या धूळ खात पडलेल्या इमारतीचा प्रश्न अजूनही कायम आहे. वाचनालयाच्या ऐवजी अंगणवाडी केली. किमान व्यायामशाळेच्या साहित्याची प्रतीक्षा संपवा, अशी मागणी आता पोलिस वसाहतीतील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत आज ज्येष्ठांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम व देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आज, सोमवारी (दि. १ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता सुमारास कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

वडनेररोडवरील डायमंड हॉल येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो कॅन्टोन्मेंट कार्यालयावर जाणार आहे. साठ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय सवलतींचा फायदा मिळावा, ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ च्या अंमलबजावणीकरिता लागणाऱ्या योग्य खर्चाची तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये सादर करावी, श्रावणबाळ निवृत्तिवेतनात सहाशेऐवजी दोन हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, ज्येष्ठांसाठी विनामूल्य आरोग्य विमा योजना सुरू करावी, स्वतंत्र विभाग किंवा आयुक्तालय सुरू करावे, स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री द्यावेत, शेतकरी व शेतमजूर, तसेच ६० वर्षावरील सर्व प्रकारच्या दारिद्र रेषेखालील मजुरांना शासनाने दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत निवृत्तिवेतन द्यावे अशा विविध मागण्यांप्रश्नी राज्यभरात सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्री, मुख्यमंत्री आदींना राज्यभरातून निवेदने सादर केली जाणार आहेत.

दिशादर्शक फलकाला रानवेलींचा विळखा

पंचवटी : म्हसरूळ येथील वरवंडीरोडवर असलेल्या दिशादर्शक फलकाला रानवेलींचा वेढा पडला आहे. त्यामुळे या फलकावर काय लिहिले आहे तेच दिसत नाही. संबंधित यंत्रमांकडून या फलकावर वाढलेल्या वेली काढण्याचीही तसदी घेतली जात नसल्यामुळे फलक लावण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कचऱ्याचा ढीग

पंचवटी : म्हसरूळ येथील सुलभ शौचालयासमोर कचऱ्याचा ढीग साचला आहे. विविध ठिकाणाचा कचरा येथे टाकला जात असल्यामुळे दिवसभरात हा ढीग वाढत जातो. या कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा उडून परिसरात पसरत असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे.

दुभाजकाची दुरवस्था

पंचवटी : पेठरोडला गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्याच्या उत्तरेच्या बाजूला रस्त्यावरील दुभाजकाला वाहनाने धडक दिल्याने या दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. हा दुभाजक उखडला गेला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी बँकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ही बँक शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असून, राज्य सहकारी फेडरेशनच्या वतीने कर्मचारी बँकेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र राज्य अर्बन फेडरेशनच्या वतीने शनिवारी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. माजी सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष दिलीप थेटे, उपाध्यक्ष दीपक आहीरे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी बँकेचे मार्गदर्शक रमेश राख, उत्तमराव देशमाने, संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, शिरीष भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी जवानांमुळेच भारतीय सुरक्षित

$
0
0

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य राखून आपल्या पाठीशी भक्कमपणे अहोरात्र उभ्या राहणाऱ्या सैनिकांचे आपल्यावर ऋण असते. देशरक्षणासाठी सीमेवर २४ तास तैनात सैनिकांमुळेच सर्व भारतीय नागरिक हे कुटुंबीयांसमवेत सुखाची झोप घेत असतात, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

धुळ्यात रविवारी (दि. ३०) आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन व प्रात्याक्षिकातून प्रत्येकाच्या मनात देशभावना जागृत झाली आहे. तरुणांना सैन्य दलाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले असून, आता यापुढे धुळे जिल्ह्यात सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सैन्य दलाच्या जवानांकडून सैन्य दलाच्या माध्यमातून ‘देश के लिए लढो, आगे बढो’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये रविवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, सैन्य दलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. जी. मेनन, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्या उपस्थितीत सैन्य दलाने युद्धाचे प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.

या मैदानावर सैन्य साहित्यांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते. मराठा रेजिमेंट जवानाच्या झांज पथकाने उपस्थितांचे स्वागतही केले. यानंतर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील गोळीबाराचा आवाज केल्याने उपस्थितांनी युद्धभूमीवरील थरार अनुभवला. शत्रू राष्ट्राचा बंकर ताब्यात घेतल्यानंतर जवानाने तिरंगा फडकविताच उपस्थितांचे जवानांनी लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या रणगाडा, तोफा व इतर साहित्यासोबत अनेकांनी आपले सेल्फी काढले.

अनुभवला युद्धाचा थरार
या वेळी सैन्य दलाच्या जवानांकडून सैनिकांना बचावासाठी छावणी, हेलिकॉप्टरमधून दोराच्या साहाय्याने उतरणारे सैनिक, बॉम्बसूट घालून युद्धभूमीवर स्फोटकांचा शोध घेणारे जवान, अश्रूधुरांचे नळकांडे फोडणे, रायफली, तोफा यासह विविध आकर्षक शस्त्रांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. तर हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या जवानांनी थेट शत्रूवर हल्ला कसा करतात हेदेखील सादर केले. यातून सर्जिकल स्ट्राइक कसे घडविले गेले, प्रत्यक्ष युद्धाचा थरार शहरवासीयांना यावेळी अनुभवायला मिळाला. जवानांनी पॅराशूट, अश्व, दुचाकीची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनीही ‘भारत माता की जय’चा नारा देत जवानांना प्रतिसाद दिला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची सहल आता एका क्लीकवर

$
0
0

लोगो- शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये भटकंतीसाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना आता घरबसल्याच पूर्ण सहलीचे नियोजन करता येणार आहे. हॉटेल बुकिंगसह 'ओला'सारख्या सुविधाही एका क्लीकवर मिळाव्यात याकरिता नाशिक जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वतंत्र वेबसाइट विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टाळतानाच नाशिकमध्ये पर्यटनवाढीला चालना मिळू शकणार आहे. देशभरातीलच नव्हे, तर अन्य देशांमधील पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी इतके नाशिक देखणे आहे. त्यामुळेच येथे पर्यटकांचा राबता असतो. धार्मिक स्थळांसह नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्यात गडकिल्ले आणि हेरिटेजही मोठ्या प्रमाणावर आहे. या पर्यटनस्थळांचे दर्शन अधिकाधिक पर्यटकांना घडावे, यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनही सरसावले आहे.

विविध संस्थांशी करार

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध संस्थांशी करार करण्यासदेखील जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 'यात्रा डॉट कॉम' या संस्थेशी नुकताच याबाबतचा करार केला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. पर्यटन क्षेत्राशी निगडित एअर बीएनबी, झूम कार, ओला या संस्थांसोबतदेखील करार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

असा होईल फायदा

जगभरातील कोणत्याही पर्यटकाला नाशिकमधील सहलीचे पूर्ण नियोजन घरबसल्या करता यावे, याकरिता www.unravelnashik.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. १२ ऑक्टोबर रोजी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध पर्यटनस्थळांचे पर्याय पर्यटकांना उपलब्ध असतील. नाशिकमधील लोकजीवनाचा अनुभव, कला-कौशल्यांची माहिती, तसेच खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठीचे पर्यायदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. पर्यटक माफक खर्चात कोठे राहू शकतात, यासह तेथे जाण्यासाठी वाहनांचे बुकिंगदेखील या संकेतस्थळावरूनच होऊ शकणार आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधांची माहिती मिळणार असल्याने केवळ एका क्लीकद्वारे पूर्ण सहलीचे नियोजन पर्यटक करू शकतील. हा पायलट प्रोजेक्ट ठरणार असून, त्यावर चार लाखांचा खर्च करण्यात आला आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्यासही त्यामुळे मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन मतदार यादीत देवांचे फोटो

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : शिर्डीमध्ये मतदार नोंदणीचा ऑनलाइन अर्ज भरताना एका मतदाराने स्वत:ऐवजी साईबाबांचा फोटो अपलोड केल्याचा प्रकार ताजा असतानाच नाशिक जिल्ह्यातही काही मतदारांनी स्वत:च्या फोटोऐवजी, हनुमान, भगवान शंकर या देवतांसह पक्षचिन्हाचा फोटो ऑनलाइन अपलोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. मतदारांचे असे अर्ज निवडणूक शाखेने रद्द ठरविले असून, यापुढे अशा प्रकारे सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्यास संबंधितांवर सायबर क्राइमअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असा इशाराही दिला आहे.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी किंवा मतदार यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना आता जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा अगदीच जवळच्या मतदान केंद्रावर जाण्याची गरज नाही. नागरिकांना नाव नोंदणीसह मतदार यादीमधील स्वत:च्या नावामधील त्रुटी, निवासाच्या पत्त्यामधील त्रुटी, फोटोमध्ये दुरुस्तीची सुविधा निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल अर्थात www.nvsp.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी शहरासह ग्रामीण भागात विविध प्रकारे जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जनजागृतीचे सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून, ऑनलाइन मतदार नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परंतु, या सुविधेचा गैरफायदा घेत तिचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जाऊ लागल्याचे प्रकार जिल्ह्यातही पुढे येऊ लागले आहेत. सिन्नर तालुक्यात काही मतदारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर स्वत:च्या फोटोऐवजी हनुमान तसेच भगवान शंकराचा फोटो अपलोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. एका मतदाराने तर स्वत:च्या फोटोऐवजी राजकीय पक्षचिन्हाचा फोटो वापरल्याचेही या ऑनलाइन अर्जांच्या पडताळणीतून निवडणूक शाखेच्या निदर्शनास आले आहे. संबंधित मतदाराचा फोटो अपलोड न केल्याने हे अर्ज रद्द करण्याची कार्यवाही निवडणूक शाखेने केली आहे. तसेच संबंधित मतदारांना नव्याने ऑनलाइन अर्ज भरून देण्यास सांगण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

आयपी अॅड्रेसची घेणार मदत

निवडणूक आयोगाने नागरिकांच्या सोयीसाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, अशा सरकारी यंत्रणेचा खोडसाळपणे आणि चुकीच्या पद्धतीने वापर होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशाप्रकारे कुणी वेबसाइटवरील सुविधेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर संबंधितांवर सायबर क्राइमअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिला आहे. सायबर कॅफे, किंवा खासगी संगणकांवरील इंटरनेट कनेक्शनद्वारे ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. या संगणकाच्या आयपी अॅड्रेसद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. यापूर्वी मध्यप्रदेश, अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नाशिकमध्येही पुन्हा असे प्रकार घडल्यास गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्यपी चालकाची पोलिसांना दमदाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्यप्राशन करून कार चालविणाऱ्या चालकास थांबविले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना दमदाटी केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल दिलीप सूर्यवंशी (२६, रा. राजलक्ष्मी रो-हाऊस नंबर ६, वासननगर, पाथर्डी फाटा) असे संशयित चालकाचे नाव आहे. सूर्यवंशी याने रविवारी मध्यरात्री पाऊण वाजता आपल्या ताब्यातील कार (एमएच १५, जीए ५४७६) मद्यसेवन करून अंबड गावाकडून पाथर्डी फाट्याकडे भरधाव वेगाने चालवत नेली. अंबड पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला रोखले. यावर आम्हाला दारू पिण्याचा व मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सर्वांना कामाला लावतो आणि तुमची वर्दी उतरवतो, अशी दमदाटी पोलिसांना केली. याबाबत पोलिस शिपाई विजय जगताप यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास हवालदार वाघ करीत आहेत.

--

मद्यपी चालकावर गुन्हा

मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्निल पंढरीनाथ गोसावी (३०, रा. भगवती चौक, उत्तमनगर, सिडको) असे संशयित चालकाचे नाव आहे. पोलिस शिपाई तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गोसावी याने आपल्या ताब्यातील कार (एमएच १५, एसएफ ६९००) मद्यसेवन करून २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता अंबड गावाकडून पाथर्डी फाट्याकडे भरधाव चालवीत नेली. सिडको हॉस्पिटलजवळून जाणाऱ्या त्याच्या कारला कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अडविले, तसेच गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

--

तरुणाची आत्महत्या

अंबडच्या केवल पार्क येथे राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नसून, याबाबत अंबड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील अशोक संकेत (वय ३६) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संकेतने रविवारी सकाळी घरी असताना काही तरी अज्ञात कारणातून घरातील छताला अँगलला बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनेचा पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

--

इनोव्हा कारची चोरी

नाशिक : गंगापूररोडवरील सौभाग्यनगर परिसरातून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची इनोव्हा कार चोरून नेली आहे. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपिंग स्टेशनजवळ असलेल्या सौभाग्यनगर परिसरात राहणाऱ्या संजय भिकनराव आहिरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. २९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आहिरे यांनी घराच्या पार्किंगमध्ये कार (एमएच ४१, व्ही, ६८२९) पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा धार्मिक एकोपा देशासाठी आदर्शवत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना अजान ऐकू आल्याने गुलालवाडी व्यायामशाळेच्या पथकाने झांझ आणि ढोलवादन थांबवले. या पद्धतीचा नाशिकचा धार्मिक एकोपा हा इतर शहरांसाठीच नव्हे, तर देशासाठी आदर्श ठरायला हवा. या पथकाच्या समाजभानाची नोंद अधोरेखित व्हावी, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केले.

नाशिक मुस्लिम वेलफेअर कमिटीतर्फे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये सोमवारी राष्ट्रीय एकता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात आयुक्त बोलत होते. सोहळ्याचे अध्यक्ष शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दिन काझी, हिंदू धर्मगुरू सत्यप्रकाश ब्रह्मचारी, मुस्लिम धर्मगुरू सय्यद नदीम नूरी, शीख धर्मगुरू जगविंदरसिंग, ख्रिश्चन धर्मगुरू केन्नेथ डिसुझा, बौद्ध धर्मगुरू भन्ते धम्मरत्न, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष सतीश शुक्ल यावेळी व्यासपीठावर होते. या सोहळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालवाडी पथकाने धार्मिक एकोपा जपल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूक भद्रकाली परिसरातील हेलबावडी मशिदीजवळ दुपारी १ वाजता पोहोचली असता अजान सुरू झाल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी एकोप्याच्या भावनेने गुलालवाडी व्यायामशाळेने लागलीच झांज व ढोलवादन थांबविले. अजान संपेपर्यंत सर्व वाद्यवृंद स्तब्ध उभा होता. गुलालवाडी व्यायामशाळेच्या पथकाने जपलेला हे धार्मिक एकोपाच्या कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर झालेल्या व्हिडीओतून समोर आले. गुलालवाडी पथकाच्या या कार्याची दखल घेत मुस्लिम वेलफेअर कमिटीतर्फे या पथकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरींसह कासवाच्या पिल्लांची तस्करी

$
0
0

- आठ मगर, दोन कासवांच्या पिल्लांची सुटका

- दोन संशयितांना अटक

- वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मगर आणि दुर्मीळ कासवाच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या दोघा संशयितांना शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून अतिसंरक्षणाची गरज असलेल्या वर्ग एक गटातील मार्श जातीच्या आठ मगर आणि ब्लॅक पॉड जातीच्या दोन कासवांच्या पिल्लांची सुटका करण्यात आली. संशयितांविरुद्ध वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैय्याज गयासउद्दीने कोकणी (वय २०, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) आणि सौरभ रमेश गोलाईत (वय २०, रा. मराठानगर, जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयित तस्करांची नावे आहेत. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, नाशिक शहरात मगरीच्या पिलांची तसेच, कासवांची तस्करी होत असल्याची माहिती ठाणे येथील वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनकडून मिळाली होती. याबाबत क्राईम ब्रँचच्या युनिट दोनकडे चौकशी सोपवण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनकर बर्डेकर व त्यांच्या पथकाने गेली तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते.

..

अशी केली कारवाई

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तस्करांशी संपर्क साधला. तस्करांकडून प्रतिसाद मिळत गेल्याने व्यवहारासाठी सोमवारी दुपारी सारडा सर्कल परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. या ठिकाणी तस्कर आले असता, पोलिसांनी लागलीच त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याकडून दोन पिल्ले हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, उर्वरित पिल्ले गोलाईतच्या मराठनगर येथील बंगल्यात असल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी लागलीच पुढील कारवाई करीत सर्व पिल्लांची सुटका केली. या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षितांची हातसफाई!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेंडिंग फोटोग्राफीची ऑर्डर देत असल्याचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये बोलावलेल्या कॅमेरामनचे महागडे कॅमेरे पळविणाऱ्या दुकलीस सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. या उच्चशिक्षित संशयितांकडून तब्बल पन्नास लाख रुपये किमतीचे १० कॅमेरे हस्तगत करण्यात आले असून, या दोघांनी देशभरातील अनेक शहरांत 'हात की सफाई' केल्याचे समोर आले आहे.

उमर खान फैसल खान आणि अब्दुला मुस्तकीन अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मागील महिन्यात वकिलवाडीतील हॉटेलमधून मुंबईच्या एका फोटोग्राफरचे १३ लाख ८१ हजार रुपये किमतीचे कॅमेरे चोरून पळ काढला होता. या प्रकरणी पवई येथील निर्मल तेजपाल सिंह या फोटोग्राफरने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांनी फोटो आणि व्हिडीओ शूटिंगची मोठी ऑर्डर असल्याचे सांगून सिंह यांच्यासह त्यांच्या साथीदारांना शहरात बोलावले होते. रात्री हॉटेलमध्ये एकत्रित जेवणानंतर संशयितांनी शीतपेयात गुंगीचे औषध टाकून कॅमेरे पळविले होते. ही घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथेसुद्धा अशाच प्रकारे चोरी झाल्याचे समोर आले. डेहराडून पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याने, तसेच ही माहिती नाशिक पोलिसांना मिळाल्याने नाशिक पोलिसांनी तेथे पोहोचून दोघांना अटक केली. या दोघांचा आणखी एक साथीदार अमीर अली हादेखील डेहराडून पोलिसांच्या हाती लागला असून, या तिघांनी डेहराडूनसह मसुरी आणी अन्य राज्यांत चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून ५० लाख रुपये किमतीचे दहा कॅमेरे हस्तगत करण्यात आले असून, न्यायालयाने तिघांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

--

बी. कॉम. ते चोरीचा प्रवास...

पोलिसांनी अटक केलेले उमर खान आणि अब्दुला मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. आमीर हा दिल्ली येथे राहतो. या तिघांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉम.चे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्य सूत्रधार उमर खान याने भाडेतत्त्वावर कार चालविण्यासाठी घेतली. मात्र, महागडी कार चोरीला गेली. कारमालकाने पैशांसाठी तगादा सुरू केला. उमरकडे एक कॅमेरा होता. त्याने तो विकून कारमालकाला पैसे दिले. कॅमेरा विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याचे लक्षात आल्याने त्याने चोरीची ही पद्धत पुढे आणली. 'जस्ट डायल'च्या मदतीने फोटोग्राफर्सशी संपर्क करायचा आणि पुढे चोरी करायची, अशा कृप्तीने त्याने अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेम’च्या अध्यक्षपदी मोतीराम पिंगळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आंत्रप्रिनर्सच्या (फेम) अध्यक्षपदी नाशिकचे मोतीराम पिंगळे यांची निवड करण्यात आली. जनसंपर्कप्रमुख म्हणून दिलीप निकम यांची निवड करण्यात आली. 'फेम' ही जाहिरात व्यावसायिकांची राज्यस्तरीय संस्था आहे. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पुणे येथे झाली. सभेत नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे आणि जळगाव शहरातील संघटनेचे सभासद उपस्थित होते. सभेत सभासदांनी मांडलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 'फेम'चे माजी अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी कामांचा लेखाजोखा सभेत मांडला. खजिनदार मोहन कुलकर्णी यांनी आर्थिक ताळेबंद सभासदांना सांगितला. या वेळी 'फेम'च्या कार्यकारिणीची निवडप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सचिव राहुल शिलेदार (पुणे), सहसचिव प्रशांत कुलकर्णी (सांगली), खजिनदार मोहन कुलकर्णी (कोल्हापूर), उपाध्यक्ष विनीत कुबेर (पुणे), उपाध्यक्ष सुनील बुधवानी (नागपूर), कौस्तुभ नाबर (कोल्हापूर), किशोर गांधी (अहमदनगर), अजिंक्य उजळम्बकर (औरंगाबाद), डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सुभाष शेळके (औरंगाबाद) यांच्यासह कार्यकारिणी संचालकांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images