Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गरजला जास्त, बरसला कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात शहरात पावसाने हजेरी लावल्यानंतर सातत्याने हवामान बदल होत आहेत. शहरातील वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाणही वाढले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी अचानक हवामान मोठा बदल झाला. त्यामुळे संध्याकाळी सात वाजतासारखा अंधार दुपारी चार वाजताच पहायला मिळाला. यावेळी सोसाट्याचा वारा, ढगाळ हवामान आणि विजांच्या कडकडाटाने शहरवासियांना भयभीत केले. सातपूर, गंगापूररोड या परिसरात पाऊस झाला तर उर्वरित भागात हलक्या सरी कोसळल्या.

गेल्या काही दिवसापासून नाशिककर बदलत्या हवामानाला तोंड देत आहेत. दुपारी कडक ऊन पडत असल्याने ऑक्टोबर हिटचे चटके शहरवासियांना बसत आहेत. पहाटे धुके, रात्री गारवा आणि दुपारी कडक ऊन असे विचित्र वातावरण सध्या अनुभवास येत आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात मोठा बदल झाल्याचे दिसून आले. सर्वत्र काळे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट होत होता. तसेच सोसाट्याचा वारा शहरात सर्वत्र वाहू लागला. वाऱ्यामुळे झाडांचा पालापाचोळ्याचा खच शहरातील अनेक रस्त्यांवर बघायला मिळाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील काही भागात ढगांच्या गडगडाटासहीत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली. सातपूर, आनंदवल्ली यासह उपनगरातील इतर भागात पावसाच्या सरी बरसल्या. मुख्य शहर परिसर, नाशिकरोड भागात मात्र फक्त गडगडाट पहायला मिळाला.

विजेचा लंपडाव

शहरातील काही परिसरात पावसाच्या सरी बरसल्याने त्या भागात वीजेचा खोळंबा झाला. काही ठिकाणी सतत विजेचा लंपडाव सुरु होता. त्यामुळे शहरवासियांना शुक्रवारची संध्याकाळ बराचवेळ अंधारात काढावी लागली. शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पेठमध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसात पेठमधील एका घरावर झाड, तर एका घरावर विजेचा खांब कोसळला. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, घरांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन महान वैज्ञानिकांच्या भेटीचा रहस्य उलगडा

$
0
0

कुसुमाग्रज स्मारकात रंगला 'कोपनहेगन'चा प्रयोग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या फौजांनी युरोपचा बराच भाग काबीज केल्यानंतर अणुविज्ञानाचा उपयोग करून विजय मिळवण्यासाठी एखादे शस्त्र बनविता येईल असे वैज्ञानिकांना वाटत होते. या संदर्भात दोन महान वैज्ञानिकांच्या भेटीत झालेल्या चर्चेवर कोपनहेगन हे नाटक सादर करण्यात आले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रंगलाय योजनेंतर्गत प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र, कोल्हापूर या संस्थेने गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात शुक्रवारी हे नाटक सादर केले. यात नील्स बोर व वर्नर हायझेनबर्ग या दोन महान शास्त्रज्ञांच्या १९४१ मध्ये झालेल्या गोपनीय भेटीचा आधार घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या फौजांनी युरोपचा बराच भाग काबीज केला होता. त्यावेळी अणुविज्ञानाचा उपयोग करून विजय मिळवण्यासाठी एखादे शस्त्र बनविता येईल, असे महान वैज्ञानिकांना वाटत होते. या संदर्भात या दोन महान वैज्ञानिकांच्या भेटीत झालेल्या चर्चेवर हे नाटक आधारित असून. या भेटीत काय चर्चा झाली? तिचे अण्वस्त्र स्पर्धेवर काय परिणाम झाले? याची इतिहासात नोंद नाही. हे रहस्य या नाटकात उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची हाताळणी क्वांटम मेकॅनिक्सचा पाया असणाऱ्या हायझेनबर्ग प्रणित अनिश्चिततेच्या तत्त्वाची आठवण करून देते.

नाटकाचे मूळ लेखक मायकेल फ्राईन हे असून त्याचा मराठी अनुवाद डॉ. शरद नावरे यांनी केला आहे. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. शरद भुथाडिया यांचे तर प्रमुख भूमिका डॉ. शरद भुथाडिया (नील्स बोर), सागर तळाशीकर (हायझेनबर्ग), मेघना खरे-भागवत(मार्गारेथ) यांच्या होत्या. नेपथ्य विक्रांत कुंभार, सुहास लकडे, प्रकाशयोजना समीर पंडितराव, साहिल कल्लोळी, संगीत नरहर कुलकर्णी, रोहित पोतनीस यांची तर वेशभूषा स्वरूपा फडके, शर्वरी जोग, रंगमंच व्यवस्था प्रतीक गोरनाळे, अभिजित देसाई यांची होती.

अखेरच्या पुष्पाचे सादरीकरण

कुसुमाग्रज प्रतिष्ठान रंगलाय योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित महेश एलकुंचवार लिखित पार्टी, पू. शि. रेगे यांच्या गाजलेल्या कादंबरीवारील मिती चार कल्याण निर्मित, रवींद्र लाखे दिग्दर्शित सावित्री, नाशिकचे सुप्रसिद्ध लेखक प्राजक्त देशमुख लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित 'मून विदाउट स्काय' अशा अनेक नाटकांचे प्रयोग सादर झाले. रंगालयातील या वर्षाचे हे शेवटचे पुष्प सादर करण्यात आले.

लोगो : कल्चर वार्ता

फोट : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची पत्रकारांशी अरेरावी, कार्यक्रमावर बहिष्कार

$
0
0

नाशिक :

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याची नाशिक मधील सह्याद्रिफार्म हाउसला शेतकाऱ्यांसोबत भेट आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडियाच्या प्रतिनिधिना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी पत्रकाराना वार्ताकंन करण्यास मज्जाव केला. सोबत प्रतिनिधीशी अरेरावी केली. मुंख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत पत्रकारांचे व्हिडिओ चित्रीकरण केले.त्यामुळे पोलिस आणि पत्रकारांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी पत्रकारावर मुजोरी करत त्यांच्याशी प्रवेशद्वारावरच हुज्जत घातली. आमदार आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करूनही पोलिस अधीक्षकांची अरेरावी कायम राहिली. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0

पाचव्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच

...

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित बैठकीतून प्राध्यापकांच्या मागण्यांना ठोस आश्वासन न मिळाल्याने प्राध्यापकांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासह इतर प्रश्नात तोडगा काढण्याचा मुद्दा मांडला. येत्या दोन दिवसात प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नंदू पवार यांनी दिली.

प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षण मंत्र्यांकडून आजवर ठोस निर्णय न झाल्याची नाराजी प्राध्यापक संघटनांच्या मनात आहे. यातच शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राध्यापक संघटनांनी त्यांना निवेदन दिले. वारंवार आंदोलने करूनही शासन प्राध्यापकांना न्याय देत नसल्याने यावेळी मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेने घेतला आहे. ओझर येथे प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात नाशिक जिल्हा स्पुक्टोचे अध्यक्ष डॉ. सतीश ठाकरे, प्रा. विजय काकुळते, सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, प्रा. जे. एस. पाटील, डॉ. राजू सांगळे आदी सहभागी होते. प्राध्यापक महासंघातर्फे गत दोन महिन्यांच्या कालावधीत पाच वेळा राज्यस्तरीय आंदोलने करण्यात येऊनही मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील २५ हजारांहून अधिक प्राध्यापक पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन करीत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील हजारावर प्राध्यापकांचा सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी झुंबड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओझर येथे राज्यसरकारने घेतलेल्या रोजगार मेळाव्यात आठ हजारांवर तरुणांनी नोंदणी करीत खासगी कंपन्यांकडे मुलाखती दिल्या. या मेळाव्यात ५० खासगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यातील १४२२ उमेदवारांना कंपन्यांनी नोकरीसाठी आमंत्रित केले आहे.

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यास तरुण-तरुणींचा उदंड प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी सकाळी अगदी ७ वाजेपासूनच तरुण-तरुणी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत होते. संयोजकांनीही या ठिकाणी गर्दी होणार, अशा अपेक्षेने मोठा मंडप आणि इतर सुविधा केलेल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाला येण्यापूर्वी कम्युनिटी हॉल व किनो थिएटर बेरोजगार तरुणांनी फुलून गेलेले होते. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर या जिल्ह्यांसोबतच नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून मोठ्या संख्येने युवक-युवती बायोडाटासह उपस्थित होते. ३२०० जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, तर ५५०० उमेदवारांनी मेळाव्यास्थळी ऑफलाइन अर्ज केले. उपस्थित कंपन्यांनी ६७ अर्जदारांना निमंत्रित केले असून, त्यापैकी ५३ अर्जदारांनी नोकरीही स्वीकारली. सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा रोजगार मेळावा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. संयोजकांनी आलेल्या सर्व उमेदवारांसाठी नाश्ता, चहा-पाण्याची सोय केलेली होती.

या कंपन्यांचा सहभाग

मेळाव्यात अशोका मेडिकव्हर, बजाज अलायन्स अँड इशुरन्स, बजाज सन्स, बॉम्बे इंटेलिजन्स, सी. जी. पॉवर, कॅलिबर बिझिनेस, जाणकार स्टील, किऑन इंडिया, मेट्रो मॉल्स, रुबी लाला, जे. एफ. इंडिया चाकण, टपारिया टूल्स अशा सुमारे ५० मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दहावी, बारावी, आयटीआय, इंजिनीअरिंग, पदवीधर अशा सर्व स्तरांतील तरुण-तरुणी येथे आलेले होते. कंपनी प्रतिनिधीकडून आलेल्या उमेदवारांकडून बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रे जमा करून घेतली जात होती, तर इंजिनीअरिंगसारख्या शाखांतील काही उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या जात होत्या. इंजिनीअरिंगच्या काही उमेदवारांना तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

किनो थिएटरमधील उद्घाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट कम्युनिटी हॉलमध्ये मेळाव्याच्या मंडपात येऊन तेथे उपस्थित असणाऱ्या युवक-युवतींशी संवाद साधला. यावेळी रोजगार मेळाव्याबाबतच्या प्रतिक्रिया उपस्थित उमेदवारांनी व्यक्त करीत उपक्रम चांगला असल्याचे सांगितले. यावेळी मुलींनी मुख्यमंत्री आपल्याशी बोलत असल्याने आनंद व्यक्त केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अनिल कदम आणि उद्योग विभागाचे डॉ. कांबळे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराचा फटका बसूनही हम नहीं सुधरेंगे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या असताना शहरवासीयांनी अजूनही त्यातून फारसा बोध घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. नियम धाब्यावर बसवून अनेक नागरिकांना पूररेषेत घर बांधण्याचा उद्योग सुरूच ठेवला असून, त्यामुळे पुराचा धोका अधिक वाढला आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिकमध्ये गोदावरीला महापूर आला होता. या पुरामूळे अनेकांचे संसार उद्धस्त झाले. कुटुंबे रस्त्यावर आली. कित्येकांची वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. महापुराच्या तांडवाने निर्माण केलेली भीती अजूनही नाशिककरांच्या मनात धडकी भरविते. या पुराला शनिवारी १० वर्षे पूर्ण झाली. नाशिकसह, चांदोरी, सायखेडा या पूरप्रभावित गावांमध्ये पुरामूळे पुन्हा अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले होते. कार्यवाहीची दिशा आणि करावयाच्या उपाययोजना यांबाबतचे स्पष्ट निर्देश देऊन व त्याबाबत पाठपुरावा करूनही काही यंत्रणांना अंमलबजावणीमध्ये तितकेसे यश आले नसल्याचे खेदजनक वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. काझीगढी येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला जातो. परंतु, गेल्या १० वर्षांमध्ये ही परिस्थिती फारशी बदलू शकलेली नाही. गेल्या काही वर्षांत नदीकाठालगच्या परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. नदीपात्राला लागून घरे बांधण्यात आल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. ही अतिक्रमणे हटविणे आवश्यक असतानाही एक ना अनेक कारणांमुळे हा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. शहरातील आणि विशेषत: नदीपात्रालगतच्या ड्रेनेज सिस्टममध्ये सुधारणा झाल्या नसल्याकडेही प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे बॅकवाटॅरचा मोठा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता बळावते. या ड्रेनेज सिस्टमची रुंदी वाढविण्याची गरजही प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी या उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. चौकशी अहवालातून पुढे आलेल्या बाबी आणि त्या अनुषंगाने झालेल्या उपाययोजना यांबाबत चर्चा करण्यात येते. या उपाययोजना विहीत मुदतीत करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या जातात. परंतु, संबंधित यंत्रणा गांभीर्याने त्यावर कार्यवाही करीत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

सायखेडा, चांदोरीत सकारात्मक परिणाम

शहरामध्ये नदीपात्रालगतच्या अतिक्रमणांमुळे भयावह चित्र निर्माण झाले असताना सायखेडा आणि चांदोरी या दोन गावांमध्ये मात्र २००८ च्या पुरानंतर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येथील पुलाचे काम मार्गी लावण्यात आले असून, बंधाऱ्याला गेटही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे होणारे नुकसान टाळणे शक्य होऊ लागले आहे. याखेरीज धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास त्याबाबतचे अलर्ट मेसेजेस ग्रामस्थांपर्यंत वेळीच पोहोचत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती वाढू लागल्याचा दावाही जिल्हा प्रशासनाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेचा ठराव लांबला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शहर बससेवेचा प्रस्ताव मंजूर करणासाठी रात्री एक वाजेपर्यंत महासभा चालवणाऱ्या सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव पारित होऊन दहा दिवस लोटले तरी प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी ठराव न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाला तातडीने या ठरावाची प्रतीक्षा असताना, अद्याप नगरसचिव विभागाकडे हा प्रस्ताव न आल्याने भाजपच्या घाईवरच आता टीका होऊ लागली आहे. पंधरा दिवसांत ठराव प्राप्त न झाल्यास प्रशासनाकडून महासभेच्या ठरावाची वाट न पाहता त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा विरोध असतानाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने शहरात 'ग्रॉस क्रॉस कॉन्ट्रॅक्‍ट'च्या माध्यमातून चारशे बस सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेवर ठेवून तो मंजूर केला होता. बससेवेत परिवहन सेवेचा समावेश नसल्यावरून सत्ताधाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनीही त्याला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गेल्या १९ तारखेला रात्री एक वाजेपर्यंत महासभा चालवत या विषयाला मंजुरी दिली होती. महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ सभा चालल्याने भाजपच्या बससेवेच्या बाबतीतील घाई अधिक चर्चेत आली होती. बससेवेच्या विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने एक-दोन दिवसांत प्रशासनाला ठराव प्राप्त होऊन अंमलबजावणी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, दहा दिवस उलटूनही सत्ताधारी भाजपकडून ठराव प्राप्त झाला नाही. त्यामुळे विलंबाने ठराव द्यायचा होता तर रात्री उशिरापर्यंत महासभा का घेतली, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे. स्थायी आणि महासभेकडून एखादा प्रशासकीय ठराव पंधरा दिवसांत मंजूर होऊन मिळाला नाही तर थेट त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे हा ठराव वेळेत आला नाही तर थेट त्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

पहिवहन समितीचा वाद

सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून बससेवेत परिवहन विभागाऐवजी परिवहन समिती मंजूर करून घेतली होती. परंतु, या समितीबाबत काही लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत, समितीला विरोध केल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. समितीबाबत भाजपमध्येच मतमतांतरे असल्याने हा ठराव लटकल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांना मिळणार ऑनलाइन तंत्रज्ञानाचे धडे

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन व्यवहारांत फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि प्रोढ नागरिक मित्र मंडळ व साक्षर संस्था यांच्या वतीने डिजिटल साक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

बँकेचे व्यवहार, खरेदी यासह इतरही व्यवहार ऑनलाइन स्वरुपात होऊ लागले आहे. ऑनलाइन व्यवहारांचा वापर जितका अधिक होत आहे. तितक्याच स्वरुपात ऑनलाइन व्यवहारातून फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ होते आहे. ज्येष्ठ नागरिकदेखील काळानुरुप बदलत स्मार्टफोनचा वापर करताना दिसतात. अनेकदा ऑनलाइन व्यवहारांतील फसवणुकीत ज्येष्ठांना गंडा घातल्याचे समोर येते. मोबाइलवर येणारा ओटीपी, बक्षीस लागल्याचे मेसेज, एटीएमचा पीन हवा असल्याचा अनोळखी फोन, बँक खात्याची विचारली जाणारी माहिती, हयातीची ओळख पटविण्याचे सांगत मागविली जाणारी वैयक्तिक माहिती, पैशांचे व्यवहार करताना होणारा गोंधळ या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य माहिती नसल्याने बहुतांश वेळा ज्येष्ठ नागरिक अशा घटनेत फसतात. ज्येष्ठ नागरिकांसोबत या घटना घडू नयेत. यासाठी ज्येष्ठांना ऑनलाइन तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा सर्व ज्येठांसाठी मोफत असणार आहे. कार्यशाळेत 'साक्षर' संस्थेत कार्यरत तंत्रज्ञान तज्ज्ञ सहभागी प्रत्येक ज्येष्ठांना वैयक्तिक प्रशिक्षण देणार आहेत. कार्यशाळेत येताना प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. नावनोंदणीसाठी प्रितम संघवी ७७४४८८५०४३ व प्रणीत मुथा ८१४९४४५०७१ या क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधावा.

हे तंत्रज्ञान शिकता येणार

- स्मार्टफोनवर वॉलपेपर सेट करणे

- सुरक्षित इंटरनेट वापरण्याच्या क्लृप्त्या

- स्मार्टफोनच्या पासवर्डचे तंत्र

- बँकेचे ऑनलाइन व्यवहार

- पैसे ट्रान्सफर करण्याचे सुरक्षित तंत्र

- स्मार्टफोनमधील माहितीची गोपनीयता राखण्याचे तंत्र

- विविध अॅपचा सुरक्षित वापर

- फसवे मेसेज व कॉल ओळखण्याचे तंत्र

- ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास पोलिसांची मदत घेण्याचे तंत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगवतीचे दर्शन २४ तास

$
0
0

सप्तशृंगी देवीचा उत्सवासाठी प्रशासन सज्ज; भाविकांसाठी प्रथमच ट्रॉलीची सुविधा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव १० ते १८ ऑक्टोबर कालावधीत होणार आहे. त्याधर्तीवर कळवणच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या नियोजन बैठकीत सर्वच विभागांच्या कामांचा व नियोजनाचा आढावा घेत पुढील रूपरेषा आखण्यात आली. या नवरात्रीत प्रथमच ट्रॉली सुरू राहणार असल्यामुळे ज्येष्ठ भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच मंदिर देवस्थान २४ तास खुले असणार आहे.

बागलाणचे उपविभागीय अधिकारी व कळवणचे प्रभारी प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या नियोजन बैठकीत कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीचा ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. देवी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचे नियंत्रण दरवर्षीप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाकडे राहील. फनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात टप्प्या टप्प्याने सोडण्याची जबाबदारी ट्रॉली प्रकल्पाची असून, तासाला पाच ते सहा ट्रीपचे नियोजन केले जाणार आहे. बैठकीतील चर्चेत देवस्थानचे विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, तहसीलदार कैलास चावडे, बीडीओ डी. एम. बहिरम, ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, गड उपसरपंच राजेश गवळी यांनी सहभाग घेतला. बैठकीसाठी वन विभागाचे अधिकारी बशीर शेख, महावितरण चे ऋषिकेश खैरनार, बीएसएनएल, परिवहन व्यवस्थापक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, मालेगाव परिवहन अधिकारी, कळवण पंचायत समितीचे अधिकारी तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

घाटरस्ता बंद

यंदाही नवरात्रोत्सव काळात घाटरस्ता इतर वाहनांसाठी बंद राहणार आहे. मोफत अन्नदान सुविधा सालाबादप्रमाणे असून, भाविकांच्या आग्रहाखातर सशुल्क व्हीआयपी भोजनकक्ष चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० अतिरिक्त कर्मचारी देवस्थान ट्रस्ट कडून सेवेत राहतील. मंदिर देवस्थान २४ तास खुले असणार आहे.

'कोजागिरी'त फनिक्युलर ट्रॉली बंद

२३ व २४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या कोजागिरी उत्सवकाळात कावड धारकांची अभिषेक व दर्शन प्रक्रिया संपेपर्यंत रोपवे सुविधा सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध नसेल. त्या दोन दिवसानंतर फनिक्युलर ट्रॉली पूर्ववत सुरू होईल.

बोकडबळी बंदच

बोकडबळीवरील बंदी कायम असून, तसा प्रयत्न कुणी केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.

सहा कोटींचा विमा

नवरात्रोत्सव काळात ६७ सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवून असतील १२५ सिक्युरीटी गार्ड, ५० आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, १७५ अनिरुद्ध अकॅडमीचे आपत्ती व्यवस्थापन टीम, सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टकडून ८०० कर्मचारी यात्राकाळात भाविकांच्या सेवेत असतील. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ६ कोटींचा जनसुरक्षा विमा काढण्यात येणार आहे.

१७ला ध्वजमिरवणूक

भक्तनिवास व्यवस्था, शिवालय तीर्थावर हायमास्क उभारणी करीत प्रकाशव्यवस्थापन करण्यात येणार आहे. ध्वज मिरवणूक १७ ऑक्टोबर सायंकाळी४ वाजता होईल. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या. त्यात रस्ता दुरुस्ती करणे, रस्त्यावर दगड पडू नयेत म्हणून सुरक्षितता म्हणून काळजी घेणे, आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावणे, कठडे व धोंड्या कोंड्याच्या विहिरीजवळची नाली बायपास करणे, गावांतर्गत भूमिगत गटारींसाठी रस्ते रिपेअर करणे यासारख्या सूचनाही देण्यात आल्या.

लालपरी सज्ज

भाविकांची ने-आण करण्यासाठी ६० एसटी बसेस नांदुरी ते गड धावतील तर ८० बसेस मालेगाव, नाशिकहून नांदुरीपर्यंत सेवेत असतील. रोपवेच्या माध्यमातून तासाला १२०० ऐवजी ३०० अथवा ३६० भाविकांची ने-आण करण्यात यावी, जेणेकरून धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्यावी अशी चर्चा बैठकीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येथे ओशाळला मृत्यू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी नातलगांनी त्याचा मृतदेह बेवारस अवस्थेत टाकल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात उघडकीस आला. भटक्या कुत्र्याने लचके तोडत हा मृतदेह पळविण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्ष वयाची गर्भवती महिला सोमवारी (दि. २४) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिला अपस्मारचा त्रास असल्याने सिझेरियन करण्यात आले. तिने मुलाला जन्म दिला. बाळाचे वजन किमान २५०० ग्रॅम असायला हवे. परंतु, ते प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच १७०० ग्रॅम वजनाचे होते. त्यामुळे त्याला उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने २५ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बाळाचा मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास बाळाचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी नातलगांकडे सुपूर्द केला. परंतु, बाळाचा अंत्यविधी करण्याऐवजी त्याचा मृतदेह हॉस्पिटलच्या आवारातील कँटिनच्या बाजूला गवतात टाकून नातलग निघून गेले. हा मृतदेह तेथेच पडून होता. शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास एका भटक्या कुत्र्याने बाळाचा मृतदेह हुंगला. त्याच्या हाताचा लचका तोडत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलच्या आवारातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी कुत्र्याच्या तोंडातील मृतदेह सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्यावर लाठ्या उगारल्यानंतर मृतदेह टाकून कुत्र्याने तेथून पळ काढला. त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह ताब्यात घेतला. बाळाला घेऊन जाण्याइतपत पैसे नातलगांकडे नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या कुटुंबाने बाळाच्या अंत्यविधीबाबत अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

मातेवर उपचार सुरूच

या महिलेला अपस्माराचा त्रास होता. त्यामुळे तिचे सिझेरियन करण्यात आले. बाळाचे वजन प्रमाणापेक्षा खूपच कमी होते. त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात होते. परंतु, ते वाचू शकले नाही. मातेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशाचा आलेख समाधानावर अवलंबून

$
0
0

आयुक्त तुकाराम मुंढेंकडून स्पर्धा परीक्षार्थींना ट्रिक्स

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

'अनेकदा माणसांकडून यशाच्या व्याख्येतच गल्लत होते. भौतिक समृद्धी, पैसा-अडका, पत-प्रतिष्ठा यासारख्या सुबत्तेलाच यश संबोधले जाते. मात्र, ही सुबत्ता म्हणजे खरे यश नाही. खरेखुरे यश हे समाधानावर अवलंबून असते. जीवनात भरपूर प्रगती करा पण बौद्धीक बुद्ध्यांकासोबत भावनिक बुद्ध्यांकाचाही समन्वय साधा', असा कानमंत्र महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पर्धा परिक्षार्थींना दिला. महाकवी कालिदास कलामंदिरात संदीप विद्यापीठातर्फे आयोजित करिअर मार्गदर्शनर व्याख्यानात ते बोलत होते.

या व्याख्यानादरम्यान मुंढे यांनी शब्दश: विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. व्याख्यानाचे स्वरूप केवळ भाषणापुरता मर्यादीत न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून दुहेरी संवाद साधला. विद्यार्थ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने व्याख्यानाचे सत्र रंगत आली.

मुंढे म्हणाले, राज्यामध्ये मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकचा विचार केल्यास अद्याप नाशिक बरेच पिछाडीवर आहे. त्या शहरांचा जितका औद्योगिक विकास गेल्या कालखंडात झाला. त्याचा काही अंशही नाशिकच्या वाट्याला आलेला नाही. शहरात अद्यापही ग्रामीण भागाचा प्रभाव बऱ्याच अंशी दिसून येतो. या सर्व मुद्द्यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या करिअरशीही आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये नाशिकचेही विद्यार्थी या क्षेत्रात ठसा उमटवित असल्याचे चित्र भविष्यासाठी आशादायी आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलगुरू कर्नल एन. रामचंद्रन, प्राचार्य रवींद्र क्षीरसागर, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा. अरूणकुमार द्विवेदी उपस्थित होते.

शिट्ट्या थांबवा, नाहीतर मी जातो...

मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी मुंढे यांच्या भाषणास सुरुवात होण्याअगोदरच जोरदार टाळ्यांसोबत शिट्ट्यांही वाजविण्यास सुरुवात केल्याने सभागृहावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या शिस्तबद्ध प्रतिमेची वारंवार आठवण करून देत व्याख्यानातून मुंढेंनी माघारी परत जाण्याचा विद्यार्थ्यांना दम भरला. यानंतर संवादाची दिशा बदलत विद्यार्थ्यांच्याच पुढ्यात विविध प्रश्नांची सरबत्ती करीत अनपेक्षित यॉर्कर टाकत सभागृहातील वातावरण हलके-फुलके केले. या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सूत्र सांगताना किंवा स्व-व्यवस्थापनाच्या टीप्स देताना 'सन् १८५७ चा राष्ट्रीय उठाव', 'महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र' ते 'बॉलिवूडमधील आवडत्या सिनेनट-नट्यांची वैशिष्ट' आदी विषयांवर विद्यार्थ्यांना बोलते करीत त्यांचीच उलट फिरकी घेऊन यशाचे सूत्र मांडले. त्यांच्या या तंत्राला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

- - -

आयुष्यात समाधान गरजेचेच

यश म्हणजे केवळ पैसा, अधिकार-सत्ता नसून आयुष्यात तुमच्याजवळ किती समाधान आहे, यावर तुमचे यश ठरते. तुमचे यशाचे मापदंड हे आर्थिक समृद्धीचे असतील तर ही व्याख्या आता अन् इथेच बदला अशा कानपिचक्याही मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. बौद्धिक बुध्दयांकालाच आजवर जग श्रेष्ठ ठरवत आले आहे. मात्र जगात परिवर्तन घडविणारे महात्मे या बुध्दयांकाच्या स्पर्धेत कधीही नव्हते. बौद्धिक आणि भावनिक बुध्दयांक (इक्यु आणि आयक्यु) यांची सांगड घालता येणे म्हणजे यशाच्या जवळपास जाणे आहे, असे मुंढे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता

$
0
0

डॉ. इंदूमती अरकडी

नाशिक : डॉ. इंदूमती अरकडी (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बालसाहित्यात कथा, कवितांचे लेखन केले होते. पुणे येथील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यापिका महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. बालसाहित्यकार आणि आदर्श शिक्षक म्हणूत त्यांना गौरविण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील अनेक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा.

--

कृष्णाजी मोगल

दिंडोरी : दिंडोरी येथील लखमापूर गावात राहणारे कृष्णाजी मोगल (वय ८२) यांचे निधन झाले. जनलक्ष्मी बँकेचे शाखाधिकारी नितीन मोगल यांचे ते काका होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात वीरपत्नींचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शौर्य दिनाचे औचित्य साधून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. तसेच, शहीद जवान स्मारक प्रतिकृतीला अभिवादन करण्यात आले.

भारतीय जवानांनी पाकिस्तान हद्दीत घुसून २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामध्ये काही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. जवानांच्या पराक्रमाची ही शौर्यगाथा नागरिकांपर्यंत पोहोचावी, याकरिता राज्य सरकारने हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात वीरपत्नी कांचन नवगिरे, रेखा खैरनार, रुपाली बच्छाव आणि निर्मला ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार शरद घोरपडे, हेमंत बोंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या जिल्ह्यात ‘कालवा फुटी’चा धोका

$
0
0

१०० धरणांचे ५०० किलोमीटरहून अधिक कालवे

..

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet- @sanchetigMt

...

नाशिक : पुण्यातील मुठा कालवा फुटल्याच्या पार्श्वभूमीवर धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही कालव्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक छोटी-मोठी धरणे असून, ५०० कि.मी.हून अधिक अंतराचे कालवे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ही कालवाफुटी झाली, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाणी अनधिकृतपणे कालव्यातून नेण्यासाठी शेतकरी 'डोंगळे' टाकून कालव्याला भगदाड पाडत असल्यामुळे हे कालवेही कमकुवत झाले आहेत.

जलसंपदा मंत्र्यांकडेच पालकत्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात प्रशासनाचे कालव्याकडे असे दुर्लक्ष असल्यामुळे येथे उंदीर, घुशी व खेकड्यांनी कालवा फोडला असेही म्हणता येणार नाही. गेल्या मे मध्ये पालखेड डाव्या कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात १२०० डोंगळे काढण्यात आले होते. त्यानंतरही हे डोंगळे काही कमी झाले नाहीत. जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतर शहरात पाठवण्यासाठी नाशिकमधून मोठ्या प्रमाणात कालवे तयार करण्यात आले आहेत. यातील बहुतांश कालवे हे मातीचे असून, ते जमिनीत खोदले गेलेले आहेत. काही कालवे मात्र जमिनीवर आहेत. त्यामुळे हे कालवे कधीही धोकादायक होऊ शकतात. या कालव्याचे पाणी थांबवणे सोपे नाही. त्यामुळे प्रशासनाने या कालव्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातून जवळपास ८५१ कि. मी. अंतराचे कालवे जातात. त्यातील ५०० कि. मी. पेक्षाही जास्त कालवे हे जिल्ह्यात आहेत. उर्वरित कालवे हे अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात जातात. हे कालवे सुरक्षित नसल्यामुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर या कालव्यातून लाखो लिटर पाणी पळवले जाते. त्यासाठी डोंगळे हा प्रकार वापरला जातो.

....

काय आहेत हे डोंगळे?

कालव्यातून शेतात व शेततळयात पाणी नेण्यासाठी हा फंडा काही शेतकरी वापरतात. थेट कालव्यातून पाइप टाकून मोटारीच्या सहाय्याने हे पाणी शेतात नेले जाते. त्यासाठी डोंगळ्याचा वापर केला जातो. कालव्याला या चोरीसाठी ठिकठिकाणी खड्डे पाडले जातात ते अतिशय धोकादायक आहे.

...

शहरातील कालवे धोकादायक

नाशिक शहरासह छोट्या शहरातून वस्तीजवळ असलेले कालवे अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे या कालव्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यासारखी घटना घडल्यास त्यातून मोठे नुकसान होऊ शकते. नाशिकचे काही कालवे तर झोपडपट्टीजवळ आहेत.

...

जिल्ह्यातील कालवे

पालखेड डावा कालवा - १३० कि. मी. वैजापूरपर्यंत

पालखेड उजवा कालवा - ३६ कि. मी. रसलपूरपर्यंत

गंगापूर धरण डावा कालवा - ५४ कि. मी. निफाड कारखान्यापर्यंत

कडवा कॅनल - ८८ कि. मी. इगपुरीत ते सिन्नर

गोदावरी उजवा तट - ११० कि. मी. श्रीरामपूरपर्यंत (नांदूरमध्यमेश्वर धरणातून)

गोदावरी डावा तट - ९० कि. मी. वैजापूरपर्यंत (नांदूरमध्यमेश्वर धरणातून)

वैजापूर एक्स्प्रेस कालवा - ११० कि. मी. (नांदूरमध्यमेश्वर धरणातून)

वाघाड डावा कालवा - १५ कि. मी. अवनखेडा, दिंडोरी तालुका

वाघाड उजवा कालवा - ४५ कि. मी. ओझरपर्यंत

पुणेगाव - दरसवाडी - ६३ कि. मी.

ओझरखेड डावा कालवा - ६३ कि. मी. लासलगावपर्यंत

आळंदी डावा कालवा - ३२ कि. मी. आडगावपर्यंत

आळंदी उजवा कालवा - १५ कि. मी. गिरणारेपर्यंत

भोजापूर धरण व इतर छोटे कालवेही या व्यतिरिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेळावा आकडेवारी

$
0
0

दृष्टिपथात रोजगार मेळावा

ऑफलाइन नोंदणी - ३२०० पेक्षा अधिक

ऑनलाइन नोंदणी - ९६००

मेळाव्यातील प्रवेश - ५००१

निमंत्रित कंपन्या- ६७

उपस्थित कंपन्या- ५३

एकूण जागा- ८०००

घेतलेल्या मुलाखती- ४५२४

ऑफर लेटर देण्यात आले- १४२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरात शनिवारी ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था आणि त्र्यंबक नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शनिवारी सकाळी ९ वाजता शिवनेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून या अभियाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीक्षेत्र चाकारे बेझे येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थान पीठाधीश्वर महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. आलेल्या भाविकांना निर्मळ स्वच्छ त्र्यंबक नगरीचे दर्शन घडावे याकरिता आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्नाने श्रमदान करण्याचे आवाहन केले. स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संदेशदूत म्हणून घोषीत करण्यात आले आहे. यावेळेस श्रीराम शक्तीपीठाचे भक्त स्वच्छतेसाठी उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी यावेळेस मागर्दशन केले. भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शामराव गंगापुत्र, आरोग्य सभापती विष्णू दोबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर पालिका कार्यालय प्रमुख अरुण गरूड, संजय मिसर आदींनी यावेळेस उपस्थित स्वच्छताप्रेमींचे योग्य नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक, कळवणला नवीन प्रांताधिकारी

$
0
0

नाशिक : नाशिकच्या प्रांताधिकारीपदी केंद्र सरकारच्या औषध निर्माण विभागाचे सहायक सचिव कुमार आशिर्वाद यांची, तर कळवणच्या प्रांताधिकारीपदी केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सहायक सचिव डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढण्यात आले. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याला हे दोन अधिकारी मिळाले असून, गेल्या अनेक महिन्यांपासूनची पूर्णवेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा त्यामुळे संपुष्टात आली आहे.

नाशिक हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने नाशिकसह कळवणचे प्रातांधिकारीपद हे भारतीय प्रशासकीय सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून या पदांवर पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध होत नव्हते. सन २०१६ मध्ये के. मंजुलक्ष्मी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. परंतु काही महिन्यांतच त्या वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्या.

त्यामुळे या पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यावर आली. त्यानंतर आयएएस अमोल येडगे यांना नाशिकचे प्रांताधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सव्वा वर्ष काम पाहिले. त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने पुन्हा हे पद रिक्त झाले. उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी १० महिने या पदाचा कारभार पाहिल्यानंतर अलीकडेच उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याने या पदाची जबाबदारी आता कुमार आशिर्वाद यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचाही पदभार असणार आहे. कळवण प्रांताधिकारी आणि कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची जबाबदारी डॉ. आशिया यांच्यावर सोपविण्यात आली असून, प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर निफाडमध्ये बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओळखीतल्या एका २५ वर्षीय तरुणाने घरात झोपलेल्या मुलीला (वय ११) बळजबरीने बाहेर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना निफाड येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी इयत्ता पाचवीत शिकत आहे. शहरात १५ दिवसाच्या आत बलात्काराची दुसरी घटना घडली आहे.

शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास रामनगर येथे घरात झोपलेल्या मुलीला संशयित आरोपी किरण लक्ष्मण गवळी (रा. जळगाव फाटा निफाड) याने कादवा नदी किनारी महादेव मंदिराच्या परिसरात उचलून नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांनी निफाड उपजिल्हारुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने ती प्रचंड घाबरली आहे. निफाड पोलिस स्टेशनमध्ये तिच्या मावशीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी किरण माळी याच्यावर भादवि कलम ३७६ (२), एफ ३६६ यानुसार गुन्हा नोंद केला अहो. आरोपी किरण हा फरार आहे. दोन आठवड्यांपूर्वी निफाड येथे उगाव रोडलगत मनोरुग्ण महिलेवर परप्रांतीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता या चिमुरडीवर बलात्कार झाल्याने निफाड शहरात खळबळ उडाली आहे.

मुलींची सुरक्षा ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपासून निफाड येथे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची निफाड बसस्थानकाजवळ काही टवाळखोर छेड काढतात, अशा तक्रारी येत आहेत. पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख देयकांची तपासणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नागरिकांकडून घरपट्टी वसुलीची घाई झालेल्या महापालिकेने नागरिकांना घरपट्टी देयकांसोबतच जप्तींची अंतिम सूचना पत्र दिल्याचे उघड झाल्यापाठोपाठ अनेक नागरिकाना घरपट्टीच्या देयकाऐवजी जप्तीच्या नोटिसाच मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भातील प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या विविध कर विभागाने काही ठिकाणी अशा चुका झाल्याचे मान्य करीत, सहा विभागीय अधिकाऱ्यांकडून सव्वा लाख देयके वाटपाची तपासणी सुरू केली आहे. मनपा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याबाबत विभागीय अधिकाऱ्यांकडून तातडीने खुलासा मागवण्यात आला आहे.

महासभेने १८ टक्के करवाढीची मुभा दिली असताना, पालिका प्रशासनाने छुप्या पद्धतीने करवाढ १८ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांवर नेल्यामुळे नागरिक संतप्त असतानाच, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाची घरपट्टीची देयके वाटताना गंभीर चुका केल्या आहेत. विविध कर विभागाकडून नव्याने वाढीव करानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे सव्वा लाख घरपट्टीचे देयके पाठवताना देयकासोबतच मालमत्ता कर तीन दिवसात भरला नाही, तर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. वास्तविक महापालिकेचे बिल मिळाल्यानंतर नागरिकांना १५ दिवसांची मुदत बिल भरण्यासाठी दिली जाते. विशेष म्हणजे देयके आर्थिक वर्ष सुरू होताच नागरिकांना वाटप करणे अपेक्षित असताना विविध कर विभागाकडून ती उशिराने वाटप केली जात आहेत. देयके उशिराने वाटप करीत असताना, त्यासोबतच अंतिम सूचनापत्र देऊन जप्तीची भाषा केल्याने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. एकीकडे देयके उशिरा भरल्यावर शास्तीही लावायची आणि दुसरीकडे वाढीव देयकासह मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठवण्याच्या प्रकाराने नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात नगरसेवक व पदाधिकारीही आक्रमक झाले असून, त्यांनी थेट महासभेतच हा विषय हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यासंदर्भातील चुकीच्या प्रकाराच्या नोटिसांच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विविध कर विभागाने या देयकांची तपासणी सुरू केली आहे. यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत असून, त्यासंदर्भातील पडताळणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देयके देण्यासाठीच मनुष्यबळ नसलेल्या विभागीय अधिकाऱ्यांना आता पडताळणीसाठी कर्मचारी वर्ग उभा करणे अवघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार शेख यांना मातृवियोग

$
0
0

मालेगाव : येथील महापौर रशीद शेख यांच्या पत्नी व आमदार असिफ शेख यांच्या मातोश्री सुरैया बी. शेख रशीद यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव नाशिक येथून मालेगावी आणण्यात आले. येथील आयशानगर कब्रस्थान येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images