Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हरित क्षेत्रास ‘रेड सिग्नल’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत विकसीत करण्यात येणाऱ्या मखमलाबाद व हनुमानवाडी येथील साडेसातशे एकरांवर नगररचना परियोजना राबविण्यास स्मार्ट सिटीच्या बैठकीत भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संचालकांनी कडाडून विरोध केला. आधी जुनी कामे पूर्ण करा, मगच नव्या कामांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतरच परियोजनेला मंजुरी देण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सोबतच स्मार्ट सिटी योजनेचा निधी महा-आयटी कंपनीकडे वर्ग करण्याचा विषय नामंजूर करीत, त्याबाबत राज्यसरकारशी चर्चा करून निर्णय घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची नववी नियमित व दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सीताराम कुंटे याच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, आयुक्त तुकाराम मुंढे, संचालक व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, काँग्रेस गटनेता शाहु खैरे, गुरूमित बग्गा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आयुक्त मुंढे यांनी मखमलाबाद व हनुमानवाडीतल्या टीपी स्कीमचे सादरीकरण केले. परंतु, यावर भाजपसह, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संचालकांनी आक्षेप घेतला. लोकनियुक्त सात संचालकांपैकी महापौर रंजना भानसी यांच्यासह पाटील, बोरस्ते, खैरे, बग्गा या संचालकांनी याला तीव्र विरोध केला. हा विषय येथे सादर करणेच चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. आधी शेतकरी, नगरसेवकांची चर्चा होणे अपेक्षित असताना, तो थेट महासभेवर सादर केल्याबद्दलही संचालकांनी आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी टीपी स्कीम होणे अशक्यच असल्याची भूमिका काही संचालकांनी मांडली. कंपनीकडून गावातच सुरू असलेल्या कामांची बोंब आहे, त्यामुळे नवीन कामे घेताना नागरिकांना विश्वासात घ्या, असे काही सदस्यांनी सुचवले. दिनकर पाटील यांनी नेहरू गार्डनसह अन्य उदाहरणे देत स्मार्ट सिटीतील कामांची स्थितीच समजत नाही. नेहरू गार्डनचे काम तर उच्च न्यायालयाच्या आक्षेपामुळे थांबले आहे. जुनेच प्रकल्प पूर्ण होत नाहीत आणि हरित क्षेत्राचा बोजा शेतकऱ्यांवर टाकण्याची घाई केली जात असल्याची टीका केली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, तसेच हा विषय महासभेवर मंजुरीसाठी असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने अध्यक्ष कुंटे यांनी महासभा सर्वोच्च असल्याने महासभेच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे टीपी स्कीमचा निर्णय आता पूर्णत: महासभेच्या हाती गेला आहे.

'कालिदास'चे तुम्हीच बघा!

कालिदास कलामंदिराच्या अवाजवी भाडेवाढीसंदर्भात शाहु खैरे यांनी मुद्दा उपस्थित करीत भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली. परंतु, भाडेवाढीचे तुम्हीच बघा असे सांगत कुंटे यांनी भाडेवाढीच्या वादात हस्तक्षेप टाळला. स्थानिक पातळीवरचा हा विषय असल्याचे सांगत, त्याबाबत हात झटकले. स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेल्या निधी ठेवी स्वरुपात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे शाहु खैरे व गुरुमित बग्गा यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाणात सुरू असलेल्या कामांची माहिती स्थानिक नागरिकांना दिल्यास त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेऊन अंमलबजावणी करणे सोपे जाईल, असे सुचविले. त्यास संमती देत गावठाण भागातील लोकांना कामांची माहिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

संचालकांची पुनर्नियुक्ती

या बैठकीत तुषार पगार आणि भास्कर मुंढे यांच्या पुनर्नियुक्तीस मान्यता देण्यात आली. स्वतंत्र संचालक म्हणून तुषार पगार, भास्कर मुंढे यांच्या संचालकपदाची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव सभेत सादर करण्यात आला. त्याला एकमताने मान्यता देण्यात आली.

महा-आयटीचे प्रकल्प अडचणीत

शहरात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राज्यशासनाच्या महा-आयटीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीचा निधी या कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. परंतु, केंद्र सरकारनेच असा निधी वर्ग करता येत नसल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे हा निधी महा-आयटी विभागाकडे वर्ग करण्याच्या विषयालादेखील कडाडून विरोध करण्यात आला. त्यामुळे याबाबत राज्यसरकारशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. महा-आयटीकडून राबविण्यात येत असलेले सीसीटीव्ही व केबलचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवा!

स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्याकडून माहिती दिली जात नाही, त्यांना बोलावूनही ते येत नसल्याची खंत महापौर रंजना भानसी यांनी बैठकीत मांडली. अन्य संचालकांनी त्यांच्याकडून माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे कुंटे यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवत त्यांनी विचारलेली माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना केली. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध म्हणून काही संचालकांनी भोजनावर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मशिदीच्या भोंग्यातून मतदान नोंदणी जागृती

0
0

नाशिकमधील पहिलाच प्रयोग, नागरिकांचा प्रतिसाद

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणीसाठी सरकार व प्रशासन विविध उपक्रम राबवित असते. नाशिकमध्ये मात्र अभिनव उपक्रम रावबिण्यात आला. मतदारांनी मतदानासाठी नोंदणी करावी, यासाठी थेट मशिदीच्या भोंग्यातून आवाहन करण्यात आले. त्याला मतदारांनी प्रतिसाद देत या उपक्रमाचे कौतुकही केले.

मतदार नोंदणी अभियानासाठी नाशिकमध्ये प्रथमच मशिदीच्या भोंग्याचा वापर निवडणूक शाखेने केला. शहरातील सात मशिदीतून या अभियानाची माहिती देऊन मतदार नोंदणीसाठी नागरिकांना जागृत केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून नाशिक तहसीलदारांनी हे अभियान राबविले.

तहसीलदार शशिकांत आवळकंठे यांनी शुक्रवारी या अभियानाला सुरुवात केली. मतदारांनी त्यांच्या या अभिनव उपक्रमाला प्रतिसादही दिला. मतदार नोंदणीमध्ये नावाचा समावेश करणे, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे, स्थळ बदल यासारखी माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर फॉर्म वाटपाचेही आवाहन करण्यात आले. त्यानंतर काही वेळात मतदारांनी १५०० फॉर्म नेले. त्यात १२५ फॉर्म लोकांनी भरूनही दिले. मशिदीच्या लाउडस्पिकरमधून आतापर्यंत 'आजान' होत असे. पण, पहिल्यांदा निवडणुकीमध्ये मतदारांना जागृत करण्याचे काम करण्यात आल्यामुळे अनेकांना कुतूहल वाटले.

...

येथे राबविला उपक्रम

काजीनगर, खोडेनगर, गुलमोहर कॉलनी, फातेमानगर, साईनाथ नगर, जयदीप नगर आणि जुने नाशिक येथील मशिदीत हा उपक्रम राबविण्यात आला. नाशिक विधानसभा मतदारसंघ (मध्य) च्या परिसरात याची सुरुवात झाली. यानंतरही असे उपक्रम घेण्यात येणार असून, त्याद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींनी घटले स्मार्टचे बजेट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत समाविष्ट असलेले काही प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविण्यात येणार असल्याने कंपनीकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या सुधारित बजेटला स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्मार्ट पार्किंग आणि पालिकांच्या कार्यालयावरील सौर उर्जेचे प्रकल्प पीपीपी तत्वावर केले जाणार असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे बजेट एक हजार १२० कोटींवरून घटून, एक हजार २० कोटींपर्यंत आले आहे. या सुधारित बजेटला मंजुरी देण्यात आली.

बैठकीत स्मार्ट प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्यात कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, विद्युत दाहिनी व नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास आल्याची माहिती देण्यात आली. फुले कलादालनाच्या नूतनीकरणासाठी पूर्वी एक कोटी १२ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात खर्च तीन कोटी २१ लाखांपर्यत पोहचल्याचे बैठकीत सांगण्यात आले. नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद असताना, प्रत्यक्षात एक कोटी २१ लाखांचा खर्च झाल्याचे अहवालात मांडण्यात आले. कालिदास कलामंदिराचा खर्चही पाच कोटी ६४ लाखांवरून ९ कोटी ६७ लाखांपर्यंत गेला आहे. विद्युत दाहिनीच्या खर्चातही आठ लाखांची वाढ झाली आहे. पंचवटीतील पलुस्कर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी २५ लाख रुपये ग्राह्य धरण्यात आले होते. परंतु, या खर्चात १३ लाखांनी वाढ झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे एकूण बजेट हे एक हजार १२० कोटी इतके निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यातील स्मार्ट पार्किंग, सौर ऊर्जा पॅनल बसविणे आदी कामे पीपीपी तत्वावर केली जाणार आहेत. त्यामुळे कंपनीचे बजेट कमी होऊन एक हजार २० कोटींपर्यंत आले आहे. या बजेटलाही बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोड करणाऱ्यांना पाच तरुणांना जामीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेन येथील सरोवर गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसायाच्या संशयावरून पाच तरुणांनी तोडफोड केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

शिवा प्रकाश जाधव (वय २७), प्रथमेश मधुकर नाटकर (वय ३५), रविकिरण पद्माकर कपिले (वय ३८), अजिंक्य शरद विसे (वय २३, सर्व रा. गोरेराम लेन, रविवार कारंजा) आणि हर्षद शामराव मोरे (वय २६, रा. गायधनी गल्ली, रविवार कारंजा) अशी संशयितांची नावे आहेत. गोरेराम लेन परिसरातील सरोवर गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या संशयावरून परिसरातील संशयित तरुणांनी गेस्ट हाऊसमध्ये घुसून फिर्यादीस धमकावले. त्यानंतर गेस्ट हाऊसमधील वस्तूंची तोडफोड केली. गेस्ट हाऊस पुन्हा सुरू केले तर चांगले होणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. संशयितांनी लॉजचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे पोलिसांना दिसून आले. तोडफोड करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी लागलीच अटक केली. संशयितांच्या विरोधात गुरुवारी (दि. २७) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आमदारांची भेट

संशयितांना कोर्टात शुक्रवारी हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी आमदार देवयानी फरांदे यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला भेट दिल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. तर, आमदार फरांदे या पोलिस स्टेशनमध्ये आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाडी लावण्यावरून हॉकर्समध्ये हाणामारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील महात्मा गांधी मार्केट चौकात हातगाडी लावण्यावरून दोन हॉकर्समध्ये वाद झाला. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाल्याने मारहाणीत एका तरुणाचे डोके फुटले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

गेल्या महिन्याभरापासून घाणेकर चौक ते सुभाष चौकापर्यंत हॉकर्सने आपले व्यवसाय थाटण्यास सुरूवात केली आहे. महात्मा गांधी मार्केटच्या चौकात दोन टोस्ट विक्रेते आपल्या हातगाड्या उभ्या करतात. शुक्रवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास दोघांमध्ये गाडी लावण्यावरून शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्याने दोन्ही विक्रेते आणि कुटुंबियांमध्ये हाणामारी सुरू झाली. वाद वाढल्याने हाणामारी होवून नारायण प्रकाश जगताप या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने त्याचे डोके फुटले. घटनास्थळी शनिपेठ आणि शहर पोलिसांनी धाव घेतली होती. याप्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक पंचायतीचा उद्या अभ्यासवर्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

ग्राहक पंचायतीच्या नाशिक जिल्ह्याचा अभ्यासवर्ग रविवारी (दि. ३०) खंबाळा (घोटी) येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत होणार आहे. विभागीय संघटक अरुण भार्गवे अध्यक्षस्थानी तर ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने उद्घाटक असतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे (अन्न आणि औषध कायद्यातील तरतूदी), अॅड. सिद्धार्थ सोनी (विद्युत कायदा), प्रशांत देशमुख (माहितीचा अधिकार), अॅड. राजेंद्र खंदारे (न्यायमंचात केस कशी दाखल करावी), विजय मोहरीर (ग्राहक पंचायत कार्यप्रणाली) हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. विभागीय अध्यक्ष बाबासाहेब जोशी समारोपाचे भाषण करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवार पेठेतील गंगावाडीत असलेल्या संभाजी राजे उद्यानाजवळ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू ऊर्फ भुप्या सुभाष साळुंके (वय २५, रा. मल्हारखाण झोपडपट्टी, गंगापूर रोड, नाशिक) असे पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित तरुणाचे नाव आहे. राजू हा गुरुवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजता रविवार पेठेतील गंगावाडीत असलेल्या संभाजी राजे उद्यानाजवळ पिस्तूल घेऊन आल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई हजारी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नारखेडे करीत आहेत.

इन्व्हर्टरच्या बॅटऱ्यांची कॉलेजरोडला चोरी

कॉलेज रोडवरील लुथरा डिझाइन शोरूमच्या ४० हजार रुपयांच्या चार इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील लोकमान्यनगर येथे असलेल्या एकता कॉटेजमध्ये आशी विनोद लुथरा या राहतात. त्यांचे कॉलेजरोड येथे लुथरा डिझाईन शोरूम असून, अज्ञात चोरट्यांनी २७ व २८ सप्टेंबर रोजी शोरूमच्या बेसमेंटमधून ४० हजार रुपयांच्या चार इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या चोरून नेल्या.

पत्नीच्या नावे असलेल्या

घराची पतीकडून विक्री

पत्नीला नांदविण्यास नकार देणाऱ्या पतीने तिच्या नावे असलेले घर बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाला परस्पर विकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित पतीसह घर खरेदी करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वडाळा नाक्यावरील नागसेननगरमध्ये शबाना फैयाद शेख या राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह गेल्या काही वर्षांपूर्वी फैयाद अब्दुल रज्जाक शेख (वय ४५, रा. परदेशपुरा, येवला, जि. नाशिक) याच्याशी झाला होता. दरम्यान, त्याने पत्नी शबाना यांना नांदविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शबानाचे आई, वडील व भाऊ यांनी त्यांना नाशिक-पुणे रोडवरील बजरंगवाडीत एक घर घेऊन दिले होते. फैयाद शेख याने पत्नी शबानाच्या या घराची बनावट कागदपत्रे बनवून शबाना यांच्या खोट्या सह्या करून त्यांचे घर बजरंगवाडीत राहणाऱ्या संशयित आसिफ फकीर शेख यांना परस्पर विकून टाकले. संशयित फैयाद शेख याने ३० ऑगस्ट २०१७ रोजी बजरंगवाडीतील सर्व्हे नंबर ८१४, इंडेक्स नंबर ८१५-३१८८-२-३५ हे घर पत्नीच्या नावे असतानाही तिनेच हे घर विकल्याची बनावट कागदपत्रे बनविली. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित पतीसह घर विकत घेणाऱ्या आसिफ शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस सतीश निरीक्षक घोटेकर करीत आहेत.

रिक्षा प्रवासामध्ये

१२ हजार लांबविले

पंचवटीतील पेठ फाटा ते शनी मंदिर असा रिक्षाने प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेच्या हातातील पिशवीस ब्लेड मारून त्यातील १२ हजार रुपये चौघा महिलांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत चौघा महिलांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील पेठ रोडवर असलेल्या नवनाथनगरमधील पगारे रॉकेल केंद्राजवळ हिराबाई विश्‍वनाथ गांगुर्डे (वय ६५) या राहतात. त्या गुरुवारी दुपारी २ वाजता पेठ फाट्यावरील मारुती मंदिराजवळून शनी मंदिर, नवनाथनगर येथे जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्डवरून रिक्षात बसल्या होत्या. याच वेळी रिक्षाने प्रवास करताना रिक्षातील चार संशयित महिलांनी हिराबाई गांगुर्डे यांची नजर चुकवून त्यांच्या हातातील कापडी पिशवीला ब्लेड मारून त्यातील १२ हजार ५०० रुपयांची रक्कम व पासबुक चोरून नेले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. एस. वनवे करीत आहेत.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवकरच सर्वजातीय वधू-वर मेळावा

0
0

महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया व अनुपम शादी डॉट कॉमच्या वतीने आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. त्यासाठी मानवी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात. सुयोग्य जोडीदाराच्या निवडीचा क्षण हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. या क्षणांना अधिक आनंददायी बनविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया व अनुपमशादी डॉट कॉम यांच्या वतीने सर्वजातीय वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे येथील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे.

अनुपमशादी डॉट कॉमतर्फे आजपर्यंत विविध समाजाचे आठ वधू-वर मेळावे, वेडिंग स्वयंवर नाशिकला यशस्वीरित्या पार पडले आहेत. या सर्व वधू-वर मेळाव्यातून अनेकांचे विवाह जुळले आहेत. या पद्धतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०१३ पासून करीत आहे. आतापर्यंतच्या सर्वच वधू-वर मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. १४ ऑक्टोबर रोजी होणारा वधू-वर मेळावा ठाणे येथे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आयोजित केला असून, हा नववा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उपवर वधू यांना लग्न जमेपर्यंत मदत व वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाइन सेवा दिली जाणार आहे. या मेळाव्यात ब्राह्मण, मराठा, आगरी सोनार शिंपी, माळी, तेली, सुतार, चांभार, वंजारी, गुजराथी, जैन, पंजाबी, मराठी भाषिक व इतर सर्व भाषिक वधू-वर संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत. उपस्थित वधू-वरांपैकी काही निवडक वधूंना पैठणी देण्यात येणार आहे.

...

नोंदणी आवश्यक

या मेळाव्यामध्ये भाग घेण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी ठाणे येथे अनुपमशादी डॉट कॉम, ८, पहिला मजला, सिद्धार्थ डॉवर, टिपटॉप मिठाईसमोर, रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे पश्चिम या पत्त्यावर किंवा ७४४७७२७४४७, ७४४७७८७४४७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नाशिक येथे शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, नाशिक-पुना रोड, द्वारका येथे किंवा ८२७५०१६४९०, ८२७५०१६५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाइन मेळावा नोंदणी www.anupamshaadi.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडून निवडणूक तयारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण वर्गावर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकींच्या दृष्टीने महानगर पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि मंडल अध्यक्ष आणि मंडल पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. भाजपाने बूथ प्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखांची भक्कम फळी उभी केली असून, त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने प्रशिक्षित करणे हा प्रशिक्षणवर्गाचा प्रमुख हेतू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मंडलनिहाय हे प्रशिक्षण वर्ग होतील. प्रशिक्षण वर्गाच्या महानगर संयोजकपदाची जबाबदारी राष्ट्रीय परिषद सदस्य नंदकुमार देसाई यांच्यावर सोपवली आहे. प्रशिक्षण वर्गात सर्व बूथप्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे सानप यांनी सांगितले. आ. देवयानी फरांदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आ. सीमा हिरे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, उत्तम उगले, संभाजी मोरुस्कर, नंदकुमार देसाई, सुनील बच्छाव, गिरीश पालवे आदी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समितीकडे पालिकेची तक्रार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधी खर्चाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाची नगरसेवक प्रशांत दिवे यांनी अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये पाच टक्के राखीव असलेला मागासवर्गीय वस्ती विकास निधी गेल्या दोन वर्षापासून अखर्चित राहिल्याने विविध कल्याणकारी योजनांपासून मागासवर्गीय वंचित राहिले आहेत, अशी तक्रार दिवे यांच्यासह नगरसेविका नयना गांगुर्डे, आशा तडवी यांनी अध्यक्ष हरिश पिंपळे यांच्याकडे केली आहे.

दिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहावर समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली. महापालिकेला शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता तीन टक्के निधी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनासाठीचे दोन कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविण्याचे कळविण्यात आले होते. मनपाने या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली परंतु, नेमलेल्या मक्तेदारांना कार्यादेशच दिले नाहीत. त्यामुळे या कामांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. परिणामी मागासवर्गीय वस्ती विकासापासून वंचित राहिल्या, असा आरोप नगरसेवक दिवे यांनी केला आहे.

महापालिकेने पाच टक्के मागासवर्गीय वस्ती विकास निधी पूर्ण क्षमतेने खर्च करावा, मागासवर्गीय वस्ती विकासासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी, नगरसेवकांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात यावे, मागासवर्गीयांवर झालेल्या अन्यायास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी समितीकडे केली जाणार असल्याचे दिवे यांनी सांगितले. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन अध्यक्षांनी दिल्याचा दावा दिवे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे पुन्हा गैरहजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा कथित दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिले. त्यामुळे आता १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीस भिडे यांनी हजार रहावे, असे समन्स नाशिक न्यायालयाकडून बजावला जाणार आहे. त्या सुनावणीसही गैरहजर राहिल्यास भिडे यांना अटकेला सामोरे जावे लागू शकते.

नाशिकमध्ये जून महिन्यात झालेल्या कार्यक्रमात भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यास भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात भिडे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने भिडे यांना हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, ते हजर राहिले नाहीत. अखेर २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी हजर रहावे, असा समन्स न्यायलयाकडून बजावण्यात आला. पण, भिडे गैरहजर राहिल्याचे दिसून आले. आता या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी भिडे यांनी हजर रहावे, असे समन्स न्यायालयाकडून बजावला जाणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी भिडे हजर राहिले नाही तर त्यांच्या अटकेचे आदेश न्यायालयाकडून दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब्दांविना कळली विज्ञानाची भाषा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेथे शब्दांनी हार मानली पण जिद्दीने यश मिळवले, सर्जनशीलतेच्या आधाराने तेथे देशविकासाचे प्रकल्प उभे राहिले. सामान्यांना लाजवेल अशा कल्पना जेथे स्वहस्ताने प्रत्यक्षात उतरविण्यात आल्या व या कल्पना इतरांना सांगण्यासाठी शब्दांच्या अनुपस्थितीतही केवळ हातांचाच आधार आहे, असा परिपूर्ण विज्ञान मेळावा शहरात भरला आहे. हा मेळावा शब्द आणि श्रवण यापासून वंचित असलेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा मेळावा असल्याने याचे महत्त्व जास्त आहे. कर्णबधिरांचा राज्यातील हा पहिला मेळावा या व्यक्तींसाठी अतिशय प्रेरणादायी व प्रोत्साहनपर ठरत आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यातील अनेक प्रकल्प हे कर्णबधिरांनी त्यांच्यासारख्यांचे आयुष्य सहजसोपे करण्याच्या उद्देशाने तयार केले आहेत.

जन्मत:च आलेले व्यंग, समाजातील इतर सामान्य व्यक्तींपेक्षा आपण कमी असल्याची भावना दिव्यांग व्यक्तींना मनोमन खात असते. समाजात वावरताना यामुळेच मोठा न्यूनगंड त्यांच्यात निर्माण होतो. यामुळे क्षमता असूनदेखील त्या स्वविकासापासून दूर राहतात. अशा विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना आपल्या सर्जनशीलतेला वाव देता यावा, त्यांच्यात आत्मविश्वासाची रुजवण व्हावी, या उद्देशाने नाशिकमधील 'पडसाद' या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत संस्थेने दोन दिवसीय राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. गंगापूर रोडवरील गुप्ता गार्डन येथे मेळावा भरला आहे. ५० विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. आपला प्रकल्प सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत असलेल्या अडचणींचा डोंगर पार करण्याचा प्रयत्न येथील प्रत्येक विद्यार्थी करत होता. तरीही न थकता, कंटाळता येणाऱ्या प्रत्येकाचे प्रकल्पाविषयी असलेले कुतूहल आपल्या प्रयत्नातून हे विद्यार्थी यशस्वीपणे शमवत होते. राज्यातील या पहिल्या कर्णबधीर मेळाव्याच्या ओढीने पहिल्याच दिवशी शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला भेट देत येथील मुलामुलींना प्रोत्साहन दिले आहे.

सामान्य मुलांकडून विज्ञान प्रकल्प तयार करुन घेणे अतिशय सोपे, परंतु, कर्णबधीर विद्यार्थी, जे ऐकू शकत नाही व बोलूही शकत नाही, अशांकडून प्रकल्प तयार करणे अतिशय आव्हानाचे काम आहे. ते आव्हान राज्यातील कर्णबधीर शाळांच्या शिक्षकांनी स्वीकारून या मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे आपणही काही करू शकतो, हा आत्मविश्वास रुजवला आहे.

- नलीनी काळकर, अध्यक्ष, पडसाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा नवा प्रताप

0
0

\Bघरपट्टी देयकासोबत जप्तीच्या नोटिसा\B

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने मंजूर केलेली १८ टक्के करवाढ छुप्या पद्धतीने ३६ टक्क्यांवर नेणाऱ्या प्रशासनाने नागरिकांना करवाढीनंतर आणखी एक धक्का दिला आहे. हजारो नागरिकांना सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाची घरपट्टीची देयके उशिराने देताना, देयकासोबतच मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा पाठविण्याचा प्रताप केला आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतप्त वातावरण पसरले असून, या प्रकारावरून नवीन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेल्या अवाजवी करवाढीवरून सुरू असलेले वातावरण काहीसे शांत झाले असतानाच विविध कर विभागाने जुन्या मालमत्तांसाठी मंजूर केलेल्या करवाढीच्या बिलांवरून नवीन वादळ घोंगावण्याची शक्यता आहे. महासभेने १८ टक्के करवाढ मंजूर केली असताना नागरिकांना प्रत्यक्षात ३५ ते ४० टक्के करवाढ करून बिले पाठवली जात आहेत. एकाचवेळी जुन्या मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात वाढ करण्यासह इतर करांमध्येही तितकीच वाढ केली आहे. विविध कर विभागाकडून नव्याने वाढीव करानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे घरपट्टीचे देयके नागरिकांना पाठविली जात आहेत. मात्र, ही देयके पाठवताना देयकासोबतच मालमत्ता कर तीन दिवसांत भरला नाही, तर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात असल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनी केला आहे. वास्तविक महापालिकेचे बिल मिळाल्यानंतर नागरिकांना बिल भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाते. विशेष म्हणजे देयके ही आर्थिक वर्ष सुरू होताच नागरिकांना वाटप करणे अपेक्षित असताना विविध कर विभागाकडून ती उशिराने वाटप केली जात आहेत. त्यासोबतच अंतिम सूचना पत्र देऊन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. वाढीव देयकासह मालमत्ता जप्तीच्या नोटिसा नागरिकांच्या हाती पडल्यानंतर त्यांनी आता थेट नगरसेवकांकडे धाव घेतली आहे. पालिकेच्या या अजब कारभारामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनीही यासंदर्भात पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी सुरू केल्या आहेत. महापालिका प्रशासनाचा हा सुलतानी कारभार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, यासंदर्भात येत्या स्थायी समिती आणि महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

..

मग शास्ती कशाला?

कलम ४१ (१) नुसार नागरिकांनी विहीत बिल मुदतीत भरले नाही, तर महापालिका त्यांच्या बिलावर दरमहा दोन टक्के शास्ती लावते. त्यामुळे या बिलांवर पालिकेकडून शास्ती लावणे अपेक्षित असताना थेट त्यांना जप्तीबाबत अंतिम सूचना पाठवून त्यांच्या हक्कांवरच गदा आणण्याचे काम करीत आहे. पालिकेकडे देयके वाटप करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे उशिराने देयके वाटप करण्यासोबतच अंतिम नोटिसा देऊन आपली जबाबदारी नागरिकांवर झटकण्याचे काम केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
0

अनुसूचित जाती कल्याण समितीकडून कामांचा आढावा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अनुसूचित जाती कल्याण समितीने विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या समितीचा रविवारपर्यंत हा दौरा असणार आहे. शनिवारी ते अनुसूचित जाती उपायोयोजनांतर्गत मागासवर्गीय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या तालुकानिहाय योजनांच्या कामाची पाहणी करणार आहेत.

गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत या समितीने आढावा घेतला. सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व आढळून येणाऱ्या त्रुटीबाबत अनौपचारीक चर्चा झाली. त्यानंतर नगरपालिका प्रशासन कार्यालयातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबींसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालय, कृषी विभाग, जलसंपदा, वनविभाग, पुरवठा अधिकारी, क्रीडा अधिकारी, समाजकल्याण कार्यालय, शालेय शिक्षण विभाग, आरोग्य सेवा विभाग, यासह १३ विभागाचा पहिल्या सत्रात आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला.

....

रविवारी आढावा

रविवारी ही समिती मुक्त विद्यापीठ येथे भेट देणार असून, येथे विविध बैठका घेणार आहे. त्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयात ही समिती भेट देणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनवर अतिक्रमणे

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर भागात हॉकर्स झोनच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण होताना दिसून येत आहे. त्यामुळे तेथे नियमाने व्यवसाय करणाऱ्यांना दादागिरी सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरू नये याकरिता न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी हॉकर्स झोनची नवीन जागा टपरीधारक व इतर व्यावसायिकांना दिली आहे. पण, महापालिकेने ठरवून दिलेल्या हॉकर्स झोनच्या जागा अनेक व्यावसायिकांना आवडल्या नसल्याने आहे त्या ठिकाणीच पुन्हा ते व्यवसाय करीत आहेत. महापालिकेकडून नेहमीच त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, तरीही हॉकर्स झोनच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण होत आहे. एक्स्लो कंपनीसमोर व व्हिक्टर गॅस्केट कंपनीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांसाठी हॉकर्स झोनची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी मात्र हॉकर्स झोनमध्ये नोंदणी न केलेल्या व्यावसायिकांनीच अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर चक्क दादागिरी करून बांबूंचे सांगाडे उभे करीत महापालिकेलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे नोंदणी असलेल्या व्यावसायिकांवरच हॉकर्स झोनमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानेच कारवाई करावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

महापालिकेने न्यायालयाच्या आदेशावरून रस्त्यांवर अतिक्रमण करणारे टपरीधारक व इतर व्यावसायिकांना हॉकर्स झोन ठरवून दिलेले आहेत. मात्र, सातपूर भागात या हॉकर्स झोनवरच अतिक्रमणे फोफावत असल्याचे चित्र आहे. सातपूर परिसरात मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या व्यावसायिकांना आयटीआयच्या पाठीमागे, एक्स्लो कंपनीसमोर, व्हिक्टर गॅस्केट कंपनीच्या बाजूला आदी ठिकाणी हॉकर्स झोनची उभारणी करीत जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु, महापालिकेने ठरविलेल्या हॉकर्स झोनच्या ठिकाणी नोंदणीच झालेली नसल्याने अनेकांनी अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात महापालिकेलाच असे अतिक्रमणे काढण्यासाठी झटावे लागणार आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आताच लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या जागेवर नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डासनिर्मितीला खत‘पाणी’!

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याच्या आजूबाजूला पेठरोड आणि दिंडोरीरोड या दोन्ही मुख्य रस्त्यांपर्यंत झोपडपट्टी फोफावली आहे. त्यामुळे येथे कालव्याचे कचराफेकीचे प्रमाण मोठे असून, याच भागात कालव्यात कायम पाणी साचत असल्याने त्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

शहर परिसरात विविध साथींच्या रोगांचा फैलाव झालेला असताना या साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील समस्या गंभीर बनत चालल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कालव्याला आवर्तन सोडलेले असताना पाणी वाहते असल्यावर येथे अशी समस्या नसते. मात्र, कालव्याला आवर्तन नसताना येथे पाणी साचलेले असते. त्यामुळे डेंग्यूसारख्या रोगांची प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असतानाही येथे पाणी साचू नये यासाठी काही उपाययोजना केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. झोपडपट्टीतील कचरा याच कालव्याच्या भागात फेकण्यात येत असल्याने येथे दलदलही तयार झाली आहे. येथे मोकाट कुत्री आणि डुकरांचाही सुळसुळाट दिसून येतो. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक बनलेल्या या भागातील समस्या पाणी साचणे थांबविल्याशिवाय सुटणार नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पाइपलाइन फोडण्याचे प्रकार

पंचवटीतील याच भागातून जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची पाइपलाइन मेरीच्या भागाकडे जाते. ही लोखंडी पाइपलाइन फोडण्याचे प्रकारही येथे कायम घडत असतात. येथे कायमच मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतो. येथील झोपडपट्टीतील नागरिक याच पाण्याचा वापर पिण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी करतात. पाइपलाइनमधील पाण्याच्या येथे होणाऱ्या गळतीमुळेच या भागातील कालव्यात कायम पाणी साचलेले अससते. या कायम साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्यामुळे येथे होणारी गळती थांबविण्यात यायला हवी. मात्र, ही गळती थांबविली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये खुनाचे पडसाद

0
0

जमावाकडून घरे, टपऱ्यांची तोडफोड; पोलिसांचे हातातवर हात

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील समीर शेख खून प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. एकता नगरात जमावाने टपरी, घरे यांची मोडतोड करून संशयितांच्या

घरातून हत्यारे बाहेर शोधून काढल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सायंकाळी मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी करीत पोलिस ठाण्यावर संतप्त जामावाने मोर्चा काढल्यामुळे दिवसभर शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती. दरम्यान, दोन दिवसांत मुख्य आरोपींना अटक करू, असे आश्वासन पोलिस उप अधीक्षक आर. रागसुधा यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.

समीर शेख यांच्या हत्येसाठी तसेच परिसरात दहशत माजविण्यासाठी संशयितांनी मोठा हत्यारसाठा जमा केल्याचे सांगत शुक्रवारी सकाळी शेख गटाने परिसरातील टपऱ्या आणि काही घरांमध्ये घुसून हल्ला केला. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर हत्यारे शोधून पोलिसांच्या हवाली केली. यात तलवारी, चॉपर, रॉड, लोखंडी गजचा समावेश होता. यावेळी हत्यारे सापडलेल्या टपऱ्यांचे, घरांचे जमावाने नुकसान केले. त्यामुळे परिसरात तणाव पसरला होता. मोठ्या प्रमाणावर पुरुष व महिलांचा जमाव आल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

मनमाड शहरात एकता नगर भागात मुंबईहून वाहनातून टोळ्या येऊन स्थानिकांसह दहशत निर्माण करतात. समीर शेख याची टोळीयुद्धात हत्या होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी एक गट दुसऱ्या गटाच्या घरांमध्ये शिरून हत्यारे काढून देतो. नुकसान करतो. शहरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न होतो तोपर्यंत पोलिस काय करीत होते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हत्येनंतर असा प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे गृहित धरून पोलिसांनी आधीच बंदोबस्त का मागवला नाही? हत्याराच्या साठ्याविषयी पोलिस अनाभिज्ञ कसे राहिले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलिस म्हणातात, यंत्रणा कमी

पोलिस यंत्रणा सक्षम असून, मुख्य आरोपीपर्यंत पोहचत आहे. पोलिसांची कुमक कमी आहे. दोषींवर कारवाई होईल. शुक्रवारच्या तोडफोडीत जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस अधिकारी रागसुधा यांनी सांगितले.

शुक्रवारचा घटनाक्रम

शुक्रवारी सकाळी ११ वाजता एकता नगर मध्ये जमाव

परिसरात तणाव, घरे, टपऱ्यामधून हत्याऱ्यांचा शोध सुरू

दुपारी १२ वाजता शहरात अफवांना ऊत

दुपारी दोनपर्यंत हत्यारांचा शोध सुरू

हत्यारे सापडल्यावर टपरी, घरांची मोडतोड

तलवारी, चॉपर, लोखंडी गज पोलिसांकडून जप्त

सायंकाळी चार वाजता पोलिस ठाण्यावर मोर्चा

सायंकाळी पोलिसांचे जमावाला आश्वासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी आज स्वरक्षणाचे धडे

0
0

नाशिक : महिलांना व तरुणींना स्वरक्षा करता यावी म्हणून शनिवारी (दि. २९) दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा या वेळेत सेफ्टी अँड सिक्युरिटी कार्यशाळा होणार आहे. सुरक्षित भारत अभियानांतर्गत फायर अँड सिक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरतर्फे ही कार्यशाळा होईल. शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनजवळील वैराज कलादालनात ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत सेल्फ डिफेन्स एक्सपर्ट वीणा गुप्ता वुमन सेफ्टीचे धडे देणार असल्याची माहिती नाशिक चॅप्टरचे सहसचिव जितेंद्र कोतवाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजधानीत होणार नाशिकचा गौरव

0
0

स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहारात अग्रेसर

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत देशात सर्वाधिक ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा २ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे सन्मान होणार आहे. याचदिवशी पोषण आहार अभियानात देशात जिल्हा पहिला क्रमांक आल्याबद्दल मुंबई येथे गौरव होणार आहे. एकाचदिवशी देशाच्या व राज्याच्या राजधानीत हे दोन सन्मान जिल्हा परिषदेच्या वाट्याला येणार आहेत.

केंद्र शासनाने राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र पाठवून नाशिक, सोलापूर व सातारा जिल्ह्यास दिल्ली येथे निमंत्रित केले असल्याचे कळवले आहे. जिल्हा परिषदेने पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यापाठोपाठ आता जिल्ह्यास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियान यात चांगले काम केल्याबद्दल हा सन्मान होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येऊन स्वच्छतेविषयक मोठे काम करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्ह्यात कुटुंबसंपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी दिल्या. त्यामुळे जिल्ह्याला हे सन्मान मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांसाठी डिजिटल साक्षर कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स, प्रौढ नागरिक मित्र मंडळ व साक्षर संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंग‌ळवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

ही कार्यशाळा मोफत असून, यात ज्येष्ठ नागरिकांना संगणक व मोबाइलद्वारे ऑनलाइन व्यवहार कसे करायचे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोबाइलचा ओटीपी विचारून ज्येष्ठांची फसवणूक, तुम्हाला बक्षीस लागले आहे, त्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर टाकायचे असल्याने तुमचा अकाउंट नंबर द्या, असे सांगून पैसे गहाळ, एटीएमचा पीन नंबर विचारून फसवणूक अशा एक ना अनेक बातम्या रोज कानावर येतात. ऑनलाइनच्या व्यवहारातून अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक ज्येष्ठांकडे स्मार्टफोन असतो; परंतु, त्याद्वारे सुरक्षित व्यवहार कसे करायचे याची माहिती नसते. ही माहिती ज्येष्ठ नागरिकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र टाइम्सने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत वॉलपेपर कसा तयार करायचा, इंटरनेटचा वापर कसा करायचा, स्क्रीन लॉक कसा करायचा असे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार असून, अॅडव्हान्स प्रशिक्षणामध्ये ऑनलाइन बॅँकांचे व्यवहार कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन व्यवहार करताना गोपनियता कशी बाळगायची याचीदेखील माहिती देण्यात येणार आहे. कोणते अॅप वापरल्याने काय फायदा होतो, याचीदेखील माहिती देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 'साक्षर' संस्थेचे स्वयंसेवक देणार असून प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रशिक्षक असणार आहे. या कार्यशाळेत येताना प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. प्रवेश मोफत असला तरीही नोंदणी आवश्यक आहे. नोदणीसाठी प्रीतम संघवी (मो. ७७४४८८५०४३) व प्रणीत मुथा (८१४९४४५०७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images