Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाट्य परिषदेचे निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालिदास कला मंदिराची झालेली दरवाढ रद्द करावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हौशी कलाकारांसाठी नाशिक महापालिका सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी हिमगौरी आहेर-आडके यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

या शिष्टमंडळात नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, उमेश गायकवाड यांच्यासह प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी सर्व गटनेते, महापौर, उपमहापौर यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी रवींद्र कदम आणि सुनील ढगे यांनी कलाकारांची बाजू मांडली. सुनील ढगे म्हणाले की, ही दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे नाशिकची सांस्कृतिक चळवळ थांबणार आहे. रवींद्र कदम यांनी हौशी कलाकारांची बाजू मांडली. ते म्हणाले की, हौशी कलाकारांना नाटक करणे मुष्कील होणार आहे. जातेगवकर म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याच नाट्यगृहाचे इतके दर नाहीत. तेव्हा पुन्हा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डिजिटल सुविधांचा वापर वाढवा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सद्य:स्थितीत घरपट्टी १५ तर, पाणीपट्टीची १४ टक्के वसुली ही डिजिटल पेमेंटद्वारे होत आहे. डिजिटल पेमेंटचा वापर वाढविण्यासाठी महापालिकेने ५२ सेवा ऑनलाइन केल्या असून, महापालिकेचे मोबाइल ॲप व वेबसाइटवरून या सेवांचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंट सुरक्षित असून, त्याची पावतीही मिळते. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल पेमेंटचा उपयोग करावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

महापालिका, प्रधान संचार लेखा कार्यालय आणि नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी डिजिटल पेमेंट मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीएसएनएलचे महाप्रबंधक महाजन, लेखाधिकारी सुहास शिंदे, संचार लेखाच्या विभा मिश्रा, दीप्ती अरोरा उपस्थित होत्या. तुकाराम मुंढे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या डिजिटल पेमेंट धोरणानुसार महानगरपालिकेने डिजिटल पेमेंटसाठी घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. केंद्र शासन व राज्य शासनाने डिजिटल पेमेंट वाढण्याच्या धोरणानुसार डिजिटल पेमेंटचा नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून शासनाच्या धोरणास वाव द्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा दिवाळीपूर्वीच बोनस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपने यंदा दिवाळीला अजून सव्वा महिन्याचा अवकाश असतानाच पालिकेतील सात हजार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची शुभवार्ता दिली आहे. गेल्या महासभेत झालेल्या ठरावावर महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी सह्या केल्या असून, तो ठराव मंजुरीसाठी नगरसचिवांमार्फत प्रशासनाकडे रवाना करण्यात आला आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त सानुग्रह अनुदान देण्यासह दिवाळीच्या पंधरा दिवस आधीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांवर सानुग्रह अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरवर्षी दिवाळीनिमित्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा घोळ सुरू होतो. सानुग्रह अनुदान किती द्यायचे यावरून वाद निर्माण होतात. त्यामुळे यंदा हे वाद टाळण्याची खबरदारी सत्ताधारी भाजपने घेतली आहे. गतवर्षी दिवाळीत प्रत्येकी १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वेध लागले होते. चालू वर्षी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १७ ते २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती. गेल्या महासभेत भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, शिवसेना प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण तिदमे व कॉँग्रेस नगरसेवक समीर कांबळे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. त्याला महासभेने मंजुरी दिल्यानंतर बुधवारी महापौर रंजना भानसी यांनी या ठरावावर स्वाक्षरी करत, प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी हा ठराव पाठवला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. सध्याच्या महागाईचा विचार करता गतवर्षीपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळीच्या १५ दिवस अगोदर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय या ठरावाद्वारे घेण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांशी व कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून सानुग्रह अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात येईल, असे महापौर भानसी यांनी सांगितले.

यांना मिळणार सानुग्रह अनुदान

महापालिकेतील स्थायी पदावरील सर्व अधिकारी व कर्मचारी, फिक्स पे वरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका, मदतनीस, अंशकालिन शिक्षिका व शिक्षण मंडळावरील सर्व कर्मचारी, शिक्षण मंडळावरील सुरक्षा रक्षक, खतप्रकल्पावरील कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मानधनावरील कर्मचारी, मनपा क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील सर्व कर्मचारी, आरसीएच प्रकल्पांतर्गत कार्यरत कर्मचारी, मनपा बुस्टर पंपीग स्टेशनवरील कर्मचारी, एनयुएचएमवरील १६२, एनयुएलएममधील सात कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वास्तवतावादी कथा, कवितांनी नटली कला संगिती

$
0
0

साहित्य, संस्कृतीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनाला भिडणाऱ्या कथा, समाज आणि व्यवस्थेबाबत सत्य परिस्थितीचे चित्रण करणाऱ्या कविता यांनी बोधी कला संगितीचा दुसरा दिवस रंगला. विविध विषयांच्या थेट मानवी वृत्तीचे दर्शन घडणाऱ्या साहित्यकृतींनी प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. सोबतच समानतेसाठी विद्रोही भूमिकाही ताकदीने मांडण्यात काव्यकार यशस्वी ठरल्याचे जाणवले.

साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई आयोजित तिसरी बोधी कला संगिती संपन्न होत आहे. या संगितीच्या माध्यमातून 'ज्ञानासाठी कला' ही संकल्पना घेऊन नाशिकच्या साहित्य, संस्कृती आणि अभिरुचीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुधवारी कै. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात काव्यकार संमेलन आणि कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर नाटककार आणि बोधी संगितीचे प्रेमानंद गज्वी, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्याचे सदस्य शशिकांत सावंत, बोधी संगितीचे भगवान हिरे, राज बाळवदकर, अशोक हंडोरे, डॉ. सुरेश मेश्राम आदी उपस्थित होते.

संगितीच्या पहिल्या सत्रात कथाकथनचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरुवातीला लेखक नंदकिशोर साळवे यांनी त्यांच्या 'डंका' या कथासंग्रहातील 'थुंकी' ही कथा सादर केली. राजकारणात कार्यरत तरुणाच्या शोकांतीकेचे विदारक चित्रण आणि समाजाची एकंदरीत सत्य परिस्थिती मांडणारी गोष्ट मनाला चटका लावून गेली. तृतीय पंथीयांच्या आयुष्याची लढाई आणि त्यांच्या लिंगभेदावर प्रकाश टाकणारी 'अस्तित्वाची लढाई' ही कथा जयश्री बागुल खरे यांनी सादर केली, तर वारसदाराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगत असतो, पण काहींच्या नशिबी हे सुख नसत, हे सुख मिळावं ही अपेक्षा घेऊन जगणाऱ्या माणसाची बेवारस ही कथा कथाकार रोहित पगारे यांनी सांगितली.

श्रोत्यांना मग्न करणाऱ्या आणि विद्रोहाचे पाणी तरुणांत ओतणाऱ्या कविता सादर झाल्याने संगितीला खरी रंगत आली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कपूर वासनीक (बिलासपुर, छत्तीसगड) होते. यावेळी काव्यकार काशीनाथ वेलदोडे, सी. टी. देवकर, पी. कुमार यांनी शाश्वत समानता, अशोक भालेराव यांनी विचारांचं खत, हिरामण पिंपरीकर, शिवाजी भालेराव यांनी दिंडी निघणार आहे, बुद्धभूषण साळवे, गौरव आठवले यांनी बुद्धा, अॅड. अशोक बनसोडे यांनी माझे मरण म्हणाले, स्मिता शिंपी यांनी पुष्प गुच्छ, प्रा. जयश्री बागुल - खरे यांनी युगे युगे हेच का?, अनिल पगारे यांनी शाश्वत मानवता तर विनायक पठारे यांनी बळीराजाच कुटुंब रडतंय रं या आपल्या कविता सादर केल्या.

आज सादर होणारे कार्यक्रम

ठिकाण : प. सा. नाट्यगृह, शालीमार. वेळ : संध्याकाळी साडेपाच वाजेपासून

गीत गायन : रोहित उन्हवणे, सार्थक खैरनार यांचा सहभाग

लोकहितवादी मंडळ, नाशिकचे भगवान हिरे लिखित आणि पूजा वेदविख्यात दिग्दर्शित 'काजवा' या एकांकिकेचे सादरीकरण,

चिंतनाचा कार्यक्रम : विषय :'मी का लिहितो!' सहभाग : गंगाधर आहिरे, किशोर पाठक, रा. शी. दोंदे, मधुकर जाधव, अशोक हंडोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीतून मतदार जागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचा वसा घेऊन उपनगरांमध्ये पोहचणारी घंटागाडी आता मतदार नोंदणीबाबतदेखील जनजागृती करणार आहे. अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने विविध स्तरावर जनजागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून घंटागाड्यांवरही मतदार नोंदणीबाबतची ऑडिओ क्लिप वाजविली जाणार आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही या उपक्रमास तत्वतः मान्यता दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून, नाशिक आणि मालेगावसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्दीतही घंटागाडीद्वारे मतदारांची जागृती केली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. तो ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्याचे काम निवडणूक शाखेने हाती घेतले आहे. याशिवाय मतदार यादीतील नावात दुरूस्ती, पत्ता बदल, छायाचित्रे गोळा करण्यासारखी कामेही केली जात आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओंच्या माध्यमातून हे काम सुरू असले तरी अजूनही लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. याचाच भाग म्हणून आता नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मतदार जागृतीसाठी घंटागाडीचीदेखील मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त मुंढे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे. शहरात सकाळच्या सुमारास कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत असतात. त्यांच्याद्वारे स्वच्छतेचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप वाजविली जाते. तशाच प्रकारची मतदार जनजागृतीची ऑडिओ क्लिपदेखील वाजविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार नवमतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज सादर केले आहेत. यापैकी १० हजार ४५८ मतदारांची डाटा एंट्री पूर्ण झाली आहे.

सहकार विभागाचीही घेणार मदत

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी आता सहकारी हाउसिंग सोसायट्यांकडे अधिक लक्ष पुरविले जाणार आहे. निवडणूक शाखेची यंत्रणा आणि सहकार विभाग एकत्रितरित्या प्रत्येक सोसायटीपर्यंत पोहोचून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील जिल्हा निवडणूक यंत्रणेचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेऊन याबाबतचे निर्देश दिले. सहकार व पणन विभागाने २२ ऑगस्ट २०१२ रोजी काढलेल्या आदेशानुसार हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांची मदत घेऊन निर्दोष मतदार यादीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७९ 'अ' नुसार सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ते बीएलओंना मदत करणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील सभासद सहकार्य करत नसल्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यात ४ हजार ५०० सोसायट्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख चारही मतदार संघांमध्ये या सोसायट्यांची यादी करून प्रत्येक सोसायटीपर्यंत निवडणूक यंत्रणा पोहोचणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझर एचएएलवरील बालंट टळणार

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : इंजिनातील बिघाडामुळे सुखोई विमान कोसळल्याची बाब पुढे आल्यामुळे ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कारखान्यावरील बालंट टळण्याची चिन्हे आहेत. विमानाच्या निर्मितीत जुळणीमध्ये कुठे गडबड झाली का, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, ओझर एचएएलचे कामकाज पारदर्शक आणि प्रभावी असल्याचे तपासात निष्पन्न होण्याची चिन्हे आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्यावतीने स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्मिती केली जात आहे. ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात 'मिग २१' आणि 'मिग २७' नंतर आता सुखोई विमानांची निर्मिती होत आहे. ओझर एचएएलमध्ये उत्पादीत झालेल्या आणि हवाई दलाच्या ताफ्यात समावेशास अनुकूल असलेल्या 'सुखोई ३० (एमकेआय)' विमानाची अंतिम चाचणी गेल्या जूनमध्ये ओझर एचएएलमध्ये घेतली गेली. मात्र, हे विमान कोसळून खाक झाले. विमानाच्या जुळणी प्रक्रियेत कुठे हलगर्जीपणा झाला का, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. किंबहुना ओझर एचएएल प्रशासनालाही याची अधिक भीती वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेच्या तपासाकडे सगळ्यांचेच अधिक लक्ष लागले आहे. मात्र, या दुर्घटनेस विमानातील इंजिनाचा बिघाड कारणीभूत असल्याची बाब तपासाद्वारे समोर आली आहे. परिणामी ओझर एचएएलच्या कारभारावरील संशयाचे मळभ आता हटण्याची शक्यता आहे. या तपासात ओझर एचएएलला क्लीन चीट मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ओझर एचएएलमध्ये चालणाऱ्या लढाऊ विमानांच्या निर्मितीक्षमता आणि कारकीर्दीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब होणार आहे. २०१९ मध्ये ओझर एचएएलकडील सुखोईची ऑर्डर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ओझर एचएएलचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच ही दुर्घटना घडली होती. त्यामुळे ओझर एचएएलच्या कारभाराला डाग लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.

एचएएलचे महत्त्व वाढणार

आता क्लीन चीट मिळणार असल्याने नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या एचएएल ओझर प्रकल्पाचे महत्त्व वाढणार आहे. किंबहुना यापुढील काळात लढाऊ विमानांच्या उत्पादन आणि संरक्षण सामग्रीच्या निर्मितीसाठी ओझर एचएएलचा विचार संरक्षण मंत्रालयाला करावा लागणार आहे. दरम्यान, याप्रकरणी एचएएल प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी न बोलणे पसंत केले. सध्या उच्चस्तरीय समिती तपास करीत असल्याने त्याविषयी बोलणे संयुक्तिक होणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारबाबतच्या निकालाचे सामान्यांकडून स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही खासगी संस्थेला नागरिकांकडून आधारकार्ड मागता येणार नाही. तसेच, शाळा आणि कॉलेजांनाही विद्यार्थ्यांकडे आधारसक्ती करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला. या निकालाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. आधारच्या गोपनीयतेसाठी कोर्टाने चांगले पाऊल उचलल्याचे मत नागरिकांनी मांडले आहे.

शाळा-कॉलेज, बँक येथे आधारकार्ड सक्तीने मागितले जात असल्याने अनेकदा त्रास व्हायचा. आधारकार्डासोबत सर्वच गोष्टी लिंक होत असल्याने आधारची प्रत एखाद्या संस्थेत जमा करणे भीतीदायक वाटायचे. कोर्टाच्या निर्णयामुळे माहिती गोपनीय राहील अशी खात्री वाटते आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

परीक्षा अर्ज सादर करताना आता आधारची सक्ती करता येणार नाही. हा निर्णय अतिशय चांगला आहे. आधार क्रमांकाशी सर्व गोष्टी जोडल्या जात असल्याने खासगी संस्थांना आधारकार्डची प्रत देणे धोकेदायक वाटते. परीक्षा अर्जावर आधार क्रमांक अनिवार्य असतो. त्यावरही कोर्टाने निर्णय द्यायला हवा.

- राकेश पाटील, विद्यार्थी

भारतीय नागरिकांची आधारकार्ड ही ओळख बनली आहे. सिमकार्ड घेताना कंपन्यांकडून ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आधारसक्ती केली जाते. त्यामुळे वैयक्तिक माहिती सुरक्षित राहिल का, याबाबत शंका असायची. कोर्टाच्या निर्णयामुळे समाधान झाले आहे.

- सर्वेश देवगिरे, नागरिक

विद्यार्थ्यांकडून आधारकार्ड सक्तीने मागितले जात नाही. जर विद्यार्थ्याकडे दुसरे कोणतेही शासकीय ओळखपत्र नसेल तरच आधारकार्ड मागितले जाते. विद्यार्थ्यांची माहिती गोपनीय राखण्यासाठी आधारसक्ती करता येणार नाही, या कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे.

- व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

$
0
0

मोटरसायकलच्या धडकेने पादचारी ठार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर औद्योगिक वसाहतीत मोटरसायकलच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २५) सकाळी हा अपघात झाला. अशोककुमार रामाश्रम सिंह (वय ५०, रा. श्रमिकनगर, सातपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अशोककुमार हे ज्योती स्ट्रक्चर कंपनी जवळून पायी चालले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या मोटरसायकलस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने अशोककुमार यांना धडक दिली. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलिसांनी मोटरसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राणेनगरमध्ये चेन स्नॅचिंग

शहरात चेन स्नॅचर्सने पुन्हा डोके वर काढले असून, राणेनगर परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. कंचन रमणलाल जाधव (वय ६५, रा. राजीवनगर) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. २४) सकाळी नऊच्या सुमारास जाधव राणे नगर परिसरातून पायी चालल्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर रंजना दत्तात्रय कडनोर यांच्या गळ्यातून एक तोळे वजनाचे २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्रही चोरट्यांनी हिसकावून नेले.

विवाहितेवर बलात्कार

विवाहितेचा संसार उध्वस्त करण्याच्या उद्देशाने तिची पतीपासून ताटातूट करीत फसवी आश्‍वासने देऊन एकाने वारंवार बलात्कार केला. राजीव नगर व सुचीता नगर परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी विवाहितेने संशयिताविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश श्रावण लोखंडे (वय ३२, रा. राजीव नगर, झोपडपट्टी) याच्याविरोधात फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. १७ जून ते ३० जुलै २०१८ या कालावधीत संशयिताने तुझ्या पत्नीसोबत माझे लग्नाच्या आधीपासून संबंध असल्याचे तिच्या पतीला सांगितले. त्यामुळे पतीने पत्नीसोबत संबंध तोडले. त्याचा गैरफायदा घेत संशयिताने पीडितेला आपण चांगला संसार करू, तुला नवीन घर, सोने, पैसे देतो असे आमिष दाखविले. तसेच, संशयिताने तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टेरेसवरून पडल्याने मृत्यू

पाइपफिटींगचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाला. इंदिरानगर येथील कमोदनगरमध्ये हा प्रकार घडला. संतोष रामा खंडारे (वय ४५, रा. गौराई अपार्टमेंट) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी (दि.२५) दुपारी तीनच्या सुमारास ते इमारतीवरून खाली पडले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. इंदिरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगणक परिचालकांचे मानधनासाठी ‘कामबंद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोचण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू असून, त्या ठिकाणी संगणक परिचालक काम करीत आहे. परंतु कंपनीच्या मनमानी व चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांना काम करूनही सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. संगणक परिचालकांनी निफाड येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देवून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

सीएससीएसपीव्ही या निमशासकीय कंपनीमार्फत हे काम केले जाते. निफाड तालुक्यात ८१ बेरोजगार तरुण-तरुणी यात काम करतात. त्यांना दरमहा सहा हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर केंद्रचालक म्हणून ग्रामपंचायतींमध्ये काम करावे लागत आहे. तसेच हे मानधनही वेळेवर मिळत नाही. कधी एक हजार, कधी दोन तर कधी तीन हजार रुपये बँक खात्यावर पाठवून बोळवण केली जाते. त्यामुळे संगणक परिचालक मेटाकुटीस आले आहेत. शासनाने २०१६ मध्ये आपले सरकार सेवा केंद्राची संकल्पना आमलात आणली त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत एक केंद्रचालक तर काही ठिकाणी एकाच चालकाला दोन-तीन ग्रामपंचायतचे काम करावे. पंरतु कामानुसार मोबदला दिला जात नाही.

एप्रिल, मे, जून २०१७ चे मानधनाचे पैसे कंपनीला जावून एक वर्ष पूर्ण झाले. तरी कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अजून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर महिन्यांचे मानधन व्याजसहीत ऑपरेटर यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष तुषार पानगव्हाणे, उपाध्यक्ष सुरेश जाधव, माजी सदस्य प्रवीण मोरे, वंसत क्षीरसागर, महेश कापसे, अक्षय सानप उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ गीते यांनी उचलला कचरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील अधिकारी वर्गाने घोटी येथे स्वच्छता मोहीम राबविली. घोटी ग्रामीण रुग्णालय आवारात स्वत: नरेश गीते यांनी जवळपास तासभर कचरा उचलून साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान तालुका पंचायत समिती प्रशासनाने तीन गट करून घोटी शहरात स्वच्छता मोहीम राबविली.

घोटी ग्रामीण रुग्णालय आवारात झालेल्या या स्वच्छता सर्वेक्षण अभियान प्रसंगी जिल्हा परिषद सीईओ नरेश गीते, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच मदन रुपवते, पं. स. सदस्य विठल लांगडे, अण्णासाहेब पवार, गटविकास अधिकारी किरण जाधव, पंचायत समिती प्रशासन, बांधकाम विभाग, सर्व ग्रामसेवक, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प, घोटी ग्रामपालिका, घोटी ग्रामीण रुग्णालय आदींनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. तालुक्यातील सर्व गावपातळीवर स्वच्छता मोहीम राबवा, स्वच्छतेबाबत प्रचार मोहीम राबवा अशा सूचना गीते यांनी तालुक्यातील सर्व यंत्रणांना दिल्या. तासभरात या ग्रामीण रुग्णालय परिसर व आवार चकाचक झाला. घोटी ग्रामपालिका पदाधिकारी रामदास शेलार, संतोष दगडे, धोंडीराम कौले, बाळासाहेब झोले, लताबाई जाधव, आशाबाई जाधव, मीराबाई आंबेकर यांच्यासह रघुनाथ तोकडे, संजय जाधव, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश कदम, प्रमोद ठाकरे आदींना या मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाअधिवेशनासाठी कळवणमध्ये ‘हितगूज’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

२४ व २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील समजबांधवांसाठी कळवणच्या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात सोमवारी हितगुज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाअधिवेशन कार्यकारिणीतील महाराष्ट्रासह गुजरातमधील बहुतांश मान्यवरांची या मेळाव्यात उपस्थिती होती. अतिथींचे स्वागत राष्ट्रीय सहखजिनदार अजय मालपुरे यांनी केले. प्रास्ताविक कळवण तालुका समन्वयक विलास शिरोरे यांनी केले. जाणकाई विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. महाअधिवेशनाच्या नियोजनाबाबत सचिव राजेश कोठावदे, जिल्हा समन्वयक सचिन बागड, खजिनदार शामकांत शेंडे, सुनील नेरकर, पुणे जिल्हा समन्वयक विवेक शिरोडे, जळगाव जिल्हा समन्वयक गजानन मालपुरे, उषा बागडे, अभय नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष आर. एल. वाणी यांनी दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाच्या कार्याचा आढावा घेत नाशिक जिल्ह्यातील समाजबांधव, युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. महाअधिवेशन संकल्पना, स्वरुप व उद्देश यावर आधारीत व्हिडीओ चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँगचा लिलाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चन्ट बँकेने थकीत कर्जामुळे पाच महिन्यांपूर्वी भुजबळांच्या शिलापूर येथील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा प्रतीकात्मक ताबा घेतल्यानंतर आता जाहीर लिलाव विक्री करण्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात हा लिलाव होणार आहे. या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपये १ एप्रिल २०१७ पासून थकले आहेत. त्यावरील व्याज व मूळ थकीत रक्कम आता या लिलावातून वसूल केली जाणार आहे.

मर्चन्ट बँकेडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह सत्यने आप्पा केसकर यांनी कर्ज घेतले होते. त्यांना जामीनदार व संमतीदार म्हणून नितीन राका, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ व शेफाली भुजबळ यांनी संमती दिली होती. त्यानंतर कर्ज मंजूर करण्यात आले होते. पण, हे कर्ज थकल्यामुळे बँकेने कारवाईचा बडगा उगाारला आहे. या कंपनीची राखीव किंमत आठ कोटी बाबीस लाख अठरा हजार ठेवण्यात आली आहे. दि सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अँसेटस अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या नियम ८ अन्वये हा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात जागेचे वर्णन दिले असून, पाच मिळकती असल्याचे म्हटले आहे. पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार २५० चौरस मीटर आहे. त्यावर ६००.४७ चौ.मी बांधीव क्षेत्र आहे.

भुजबळांना धक्का

विविध आरोपाखाली तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. त्यानंतर हा त्यांना मोठा धक्का आहे. भुजबळांच्या कंपनीचा प्रतीकात्मक ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ही रक्कम न भरल्यामुळे आता या कंपनीचा लिलाव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुंदर बायकोसाठी जादूटोणा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गुप्तधन, पैशांचा पाऊस आणि चांगली बायको मिळावी, यासाठी जादूटोणा व अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये मंगळवारी उघडकीस आला. यामध्ये पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पाच युवकांना पूजेसाठी बोलविण्यात आल्याने नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील गवळीवाडा येथील परेश राजेंद्र सोनार यास २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्याचा नातेवाईक असणारा अमोल प्रवीण सोनार (रा. जळका बाजार) याने पूजा करावयाची असल्याचे सांगितले. सदरची पूजा केल्याने धनप्राप्ती व लग्नासाठी चांगली बायको मिळेल, असे आमिष त्याला दाखविले. शहरातील एका घरात परेश सोनार याला घेऊन गेले. तेथे स्वरूपसिंग नाईक (रा. ढेकवद) हा मांत्रिक आला. त्यानेही परेशसह इतर दोघांना एका खोलीत बंद करून त्यांच्यावर मंत्रोपच्चार केले. या पूजेमुळे धनप्राप्तीसह मोठा लाभ होणार असून, वेळप्रसंगी नरबळीदेखील द्यावा लागेल, असे सांगितले. ही बाब लक्षात आल्यावर घडलेला प्रकार परेश सोनार याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानुसार नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्र नरबळी अमानुष अनैतिक व अघोरी प्रथा जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ (१)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार पोलिसांनी दोघांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
..
विवस्त्र तरुणाची पूजा
संशयितांनी मागील तीन-चार दिवसांपासून घरात अघोरी पूजेची तयारी केली होती. परिसरातील काही युवकांना त्यांनी पूजेसाठी बोलावले होते. पूजेसाठी गेल्यानंतर एका तरुणाला विवस्त्र करून त्याची पूजा करण्यात आली. फक्त सोनार समाजातील युवकांना या अघोरी पूजेसाठी बोलविण्यात आल्याची माहिती फिर्यादी तरुणाने दिली. पोलिसांनी अटक केलेला पुजारी ढेकवद गावचा रहिवासी असून, दुसरा संशयित युवकांना फूस लावून पूजेसाठी आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...
शहरात इतर ठिकाणीही असे प्रकार झाले का याचा तपास सुरू असून, फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार नरबळीच्या दृष्टीनेही आमचा तपास सुरू आहे. तपासातूनच नेमका काय प्रकार ते निष्पन्न होईल.
- किरण पवार, सहायक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटके विमुक्तांना हवी सुरक्षितेची भावना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

पारंपारिक व्यवसायात अडकलेल्या आणि मूलभूत गरजांनाही वंचित झालेल्या राज्यातील भटक्या विमुक्त समाजात सध्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या समाजातील विविध जाती-पोटजातींचे प्रश्न व मागण्यांकडे सरकारने संवेदनशिलतेने बघावे व या समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे गुरुवारी विभागीय महसूल आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार नरेंद्र दराडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत भटके विमुक्तांची रस्त्यावरची लढाई सभागृहात पोहचवून या समाजाचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन आंदोलकांना दिले.

भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने राज्याध्यक्ष धनंजय आनोसे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्तालयासमोर झालेल्या आंदोलनास उत्तर महाराष्ट्रातून भटके विमुक्त समाजातील विविध जाती-पोटजातींतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विभागीय महसूल उपायुक्त डॉ. दिलीप स्वामी यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले तसेच ओनासे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी कार्यध्यक्ष शंकर माटे, सहसचिव मंगेश सोळुंके, प्रदेश युवा चिटणीस प्रतिक गोसावी, विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, नवनाथ ढगे, संपर्कप्रमुख साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर, विभागीय सदस्य बापू बैरागी, अशोक गोसावी, ठाणे जिल्हाध्यक्ष भिमराव इंगोले, नाशिक जिल्हाध्यक्ष रतन सांगळे, नाशिक शहराध्यक्ष डॉ. चंद्रशेखर नामपुरकर आदी उपस्थित होते. आंदोलनाप्रसंगी भटके विमुक्त समाजातील मरिआई, गोंधळी अशा विविध प्रकारच्या पोटजातींतील नागरिकांनी आपल्या कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. आंदोलनात सहभागी झालेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले.

अशा आहेत मागण्या

ॲट्रॉसिटी कायदा भटके विमुक्तांनाही लागू करावा

क्रिमिलेयरची अट सरसकट रद्द करावी

शासन तुमच्या पालावर योजना राबवावी

भटके विमुक्तांच्या ओळख सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांचा विषय निकाली काढावा

दादा ईदाते घुमंतु-अर्ध घुमंतु जनजाती आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात

'बार्टी'च्या धर्तीवर भटके विमुक्त समाज संशोधन व संवर्धन संस्थेची निर्मिती करावी

एससी-एसटीच्या धर्तीवर स्वतंत्र तिसरी सूची व कायमस्वरुपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्रात गुजरात धर्म वाढवावा’

$
0
0

गरबा खेळत 'मनविसे'चे अनोखे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजरात वंदे या गुजराती चॅनलद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्याचा प्रकार म्हणजे 'मराठी ती तितुकी बुडवावी अन् महाराष्ट्रात गुजरात धर्म वाढवावा' अशा प्रकारचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) वतीने गुरुवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गुजराती गरबा नृत्य करून सरकारच्या या मराठी भाषाविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

इयत्ता पहिली व आठवीचे अभ्यासक्रमात यंदाच्या शैक्षणिक वर्षात बदल झाला आहे. गुजराती चॅनलद्वारे मराठी शिक्षकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन सरकारचे मराठी द्वेषाचे धोरणही उघड झाले आहे. मराठी भाषेवर गुजराती भाषेचे आक्रमण स्वतःहून ओढवून घेण्याच्या सरकारच्या धोरणात आपलीच मंडळी सामील असल्याचाही आरोप यावेळी 'मनविसे'च्या कार्यकर्त्यांनी केला.

'मनविसे'च्या वतीने शासनाच्या या मराठी भाषा विरोधी धोरणाचा निषेध म्हणून नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे शहराध्यक्ष शाम गोहाड यांच्या नेतृत्त्वाखाली मराठी गीतांवर गुजराती गरबा खेळून निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या मराठीद्वेषी धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी 'मनविसे'चे लोकसभा अध्यक्ष अतुल धोंगडे, कौशल पाटील, सौरभ सोनवणे, अमर जमधडे, संदीप आहेर, प्रशांत बारगळ, संदेश अडसुरे, प्रसाद घुमरे, सुयश पागेरे, नितीन धानापुणे, मंगेश रोहम, अतिष भोसले, रोशन आडके, गणेश लोहरे, स्वप्नील कातोरे, अविनाश खर्जुल, जयेश शिंदे, शरद ढमाले, गणेश झोमान, विशाल चौधरी आदी उपस्थित होते.

हा मोठा 'विनोद'च

राज्यातील सर्व शिक्षकांना या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सरकारने गुजरात वंदे या चॅनलद्वारे देण्याचा घाट घातला आहे. शैक्षणिक वर्षाचे सहा महिने उलटून गेले. सहामाही परीक्षा तोंडावर असताना शिक्षकांना बदलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात प्रशिक्षण देणे हा देखील मोठा 'विनोद'च असल्याचा आरोप 'मनविसे'ने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सक्षम इंजिनाच्या निर्मितीचे आव्हान

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक - मिग आणि सुखोई विमानांच्या अपघातास इंजिनातील बिघाड कारणीभूत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या इंजिन निर्मितीसाठी सखोल संशोधनाची गरज आहे. यासाठीच हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) गोरखपूर प्रकल्पात अमुलाग्र कायापालट करणे आवश्यक आहे, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या जून महिन्यात सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान पिंपळगाव बसवंतजवळील वावी ठुशी गावातील शेतात कोसळून खाक झाले. हा अपघात इंजिनातील बिघाडामुळे झाल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी 'मिग २७' आणि 'मिग २९' विमानांचेही अपघात झाले आहेत. त्यातील बहुतांश अपघातास इंजिनातील बिघाडच कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. लढाऊ विमानांचे इंजिन एचएएलच्या गोरखपूर कारखान्यात तयार केले जातात. रशियन सरकारकडून भारताने लढाऊ विमानांची खरेदी केली. ही विमाने सक्षम होती. मात्र, स्वदेशी बनावटीची विमाने तयार करण्याचा उपक्रम भारताने हाती घेतला. यात इंजिन वगळता अन्य उपकरणे देशांतर्गत भागात तयार करण्यात आली. तर, रशियाकडून इंजिन घेण्यात आले. या विमानांमध्येही मोठ्या समस्या आढळून आल्या नाहीत. त्यापुढच्या टप्प्यात इंजिनासह पूर्ण विमानाची स्वदेशी निर्मिती केली जात आहे.

मात्र, पूर्णत: स्वदेशीकरणाच्या टप्प्यात सक्षम इंजिनची निर्मिती अद्यापही होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मिग २७ आणि मिग २९ या विमानांबरोबरच सुखोई विमानांच्या अपघातातून हे दिसून आले आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) माध्यमातून लढाऊ विमानांच्या इंजिनासाठी अधिक सखोल संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. हवाई दलातील अधिकारी आणि वैमानिक याबाबत खुलेपणाने बोलत नसले तरी सक्षम इंजिनासाठी अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत ते खासगीत बोलून दाखवित आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने एचएएल आणि डीआरडीओ या दोन्ही संस्थांना संशोधन आणि विकासासाठी अधिक वाव देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हस्तांतरातही इंजिनाचाच मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अनेक कंपन्या आणि सरकार इंजिन वगळता अन्य भागांचे तंत्रज्ञान हस्तांतर करीत आहेत. त्यामुळे स्वदेशी बनावटीचे सक्षम इंजिन तयार करण्याचे आव्हान असले तरी ते अवघड नक्कीच नाही, असे मत एका ज्येष्ठ वैमानिकाने व्यक्त केले आहे.

स्वदेशी बनावटीकडे हवे लक्ष

इस्त्रोच्या माध्यमातून आपण स्वदेशी बनावटीचे अनेक उपग्रह तयार केले आहेत. त्याशिवाय पोखरणची अणू चाचणीही आपण आपल्या ताकद आणि बौद्धिक क्षमतेच्या आधारावरच केली आहे. याच धर्तीवर लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीकडेही गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या तेजस या पूर्णत: स्वदेशी बनावटीच्या विमानाची निर्मिती एचएएलकडून केली जात आहे. पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांसाठीही सक्षम इंजिन आवश्यक आहे. त्याद्वारे विमानांचे अपघात रोखतानाच हवाई दल आणि देशाची सुरक्षा अभेद्य करता येणार आहे. हवाई दलातील वरिष्ठ अधिकारीही त्यास दुजोरा देत आहेत.

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिक दराची मागणी

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास सुरुवातील विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व 'समृद्धी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह ४० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत जमिनीला अधिक भाव द्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. पण, प्रशासनाने कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत दर देण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठीकीत 'समृद्धी'चे मुंबईहून अधिकारी आले होते. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघेल, असे सूतोवाच करण्यात आले. पण, या चर्चेतून तोडगा निघाला नसला तरी प्रशासनाने सकारत्मकता दाखवली. 'समृद्धी' महामार्गासाठी जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील १ हजार १०८ हेक्टर पैकी ९१७ जागा संपादित झालेली आहे. त्यातील काही जागा 'पेसा'खाली असून त्यानंतर शिवडे व काही ठिकाणी किरकोळ जमीन ताब्यात घेणे बाकी आहे. त्यामुळे ही चर्चा शेतकऱ्यांबरोबर करण्यात आली.

दराचा प्रश्न कायम

सिन्नर तालुक्यातील शिवडे गावाने सर्वप्रथम विरोध केल्यामुळे या महामार्गाच्या जमीन संपादनाचा विषय राज्यभर गाजला. त्यानंतर सरकारने इतर जागा संपादित करून शिवडे शिवारातील जागेचा विषय नंतर घेतला. पण, अद्याप तोडगा निघाला नसल्याने या शेतकऱ्यांचा दराचा प्रश्न कायम आहे.

आता तिसरा पर्याय

'समृद्धी'साठी जमिनीच्या किंमतीपैकी पाच पट पैसे देऊन जमीन संपादित करण्याचा पर्याय होता. पण, त्यानंतरही जमिनी दिल्या नसल्याने सरकारने थेट जमीन अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. त्यात चारपट किंमत ठरवण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा सरकारने तिसरा पर्याय दिला असून जमीन वादाशिवाय देण्यास तयार असेल तर पाच पट व जे देणार नसतील त्यांना चार पट दर दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाच्या कामाने कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई-आग्रा महामार्गावर नव्याने करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी या भागातील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या भागातून वळविताना पोलिसांना वाहतूक नियोजनाची मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. नियोजनाच्या चाचणीतच येथील वाहतुकीचा फज्जा उडाल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.

एरवी कायम कोंडी होणाऱ्या या भागात उड्डाणपुलाच्या भागाचे काम सुरू केल्यावर एक मार्ग बंद करावा लागणार आहे. त्यामुळे येथील कोंडी प्रचंड वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. के. के. वाघ महाविद्यालयाच्या समोरच्या भागापासून आडगाव शिवारापर्यंत हा उड्डाणपूल होणार आहे. या भागातील महामार्गावर ठिकठिकाणी रिंगरोड जोडलेले आहेत. त्यामुळे महामार्गाने सरळ जाणारी वाहने आणि महामार्ग ओलांडून पलीकडे जाणारी वाहने यांची ये-जा होत असताना अमृतधाम, हनुमाननगर, जत्रा चौफुली येथे हमखास कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळी ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते, लग्रसराईत दाट तिथी असतानाही ही समस्या गंभीर बनते. असे असताना उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गाचा अर्धा रस्ता बंद करावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.

'बायपास'चा विचारच नाही!

या उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणाऱ्या मोठ्या मशिनरी महामार्गावरच्या भागात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई ते धुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी या मार्गाचा उत्तरेकडील भाग बंद करावा लागणार आहे. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागणार आहे. याचा विचार करून वाहतूक पोलिसांनी अगोदरच बायपास कसा करता येईल हे बघायला हवे होते. दोन तासांत केलेल्या चाचणीत वाहतुकीचा फज्जा उडाल्यामुळे आता वाहतुकीचे नव्याने नियोजन करताना अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

--

वाहने आणि नागरिकांच्या प्रचंड वर्दळीचा हा भाग असल्यामुळे येथे वाहतुकीचे नियोजन अत्यंत सावधगिरीने करावे लागणार आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडून जाणे या काळात अवघड होणार आहे. या भागात वाहनांची कोंडी नित्याची आहे. त्यात अर्धा महामार्ग बंद झाल्यावर वाहतुकीची कोंडी आणखीच वाढणार आहे.

-सुनील सूर्यवंशी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथरोगांच्या फैलावाकडे महापालिकेचेच दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यू, तसेच विविध साथरोगांच्या रुग्णांची संख्या पंचवटी वाढत आहे. खुद्द नगरसेविकेच्या चुलतसासऱ्यांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही महापालिकेकडून पाहिजे तशी उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार पंचवटी प्रभाग समितीत नगरसेविकांनी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

संपूर्ण पंचवटी परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. गुरुवारी पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. त्यात सर्वपक्षीय नगरसेविकांनी साथींचे रोग आणि विभागातील अस्वच्छतेप्रश्नी आक्रमक भूमिका घेत अधिकारीवर्गाला जाब विचारून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. विविध साथींच्या वाढलेल्या रुग्णांमुळे नागरिक हैराण झालेले असताना पाहिजे तशी खबरदारी घेतली जात नाही. औषधांची फवारणी केली जाते असे सांगितले जात असले, तरी त्याबाबत केवळ देखावा केला जातो. त्या फवारणीत औषधांचे प्रमाण किती असते, त्याने डासांची संख्या घटते की नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. पेस्ट कंट्रोलचे ठेके ज्यांच्याकडे आहेत, ते चुकीच्या पद्धतीने कामे करीत आहेत. त्यामुळेच रोगराई पसरल्याची तक्रार पूनम मोगरे आणि पूनम सोनवणे यांनी केली.

पंचवटी विभागात मोकाट कुत्र्यांचा आणि डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यांना पकडण्यासाठी व्यवस्था कमी पडते. त्यासाठी आवश्यक कुशल कर्मचाऱ्यांची उणीव आहे, असे कमलेश बोडके, प्रियंका माने यांनी सांगितले. प्रभाग चारमधील काही भागातील शौचालयांना नळ नाहीत. तेथे स्वच्छता होत नाही. आर. पी. विद्यालयाच्या भागात बेसमेंटला पाणी साचलेले आहे. फुलेनगर परिसरातील अंगणवाड्यांची दुरवस्था झालेली आहे, या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सरिता सोनवणे, शांता हिरे यांनी केली.

रस्ते, पथदीपांप्रश्नी जाब

प्रभाग दोनमधील आडगाव, नांदूर, मानूर या भागात रस्ते आणि विजेचे खांब बसविण्याची कामे अजेंड्यावर नाहीत, केवळ कॉलन्यांच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिक कर भरत नाही का, असा सवाल करीत या गावातील कामांचे टेंडर निघत नाही तोपर्यंत एकही रस्ता आणि एकही खांब उभा करू दिला जाणार नसल्याचा इशारा शीतल माळोदे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दो पल’मधून उलगडणार लतादीदींचा सुरेल प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त फेदर टच स्टुडिओजच्या वतीने शनिवारी (दि. २९) 'दो पल' या विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. स्वर्णिमा सभागृह, बापू बंगल्यासमोर, इंदिरानगर येथे सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्र टाइम्स कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

लता मंगेशकर यांनी सात दशकांत ९८० हिंदी चित्रपटांतून गाणी गायली असून, मदन मोहन आणि त्यांच्यातील सांगीतिक प्रवासाचे सुरेल रसग्रहण या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. लता मंगेशकर या ९० व्या वर्षात पदर्पण करीत असून, त्यांच्या ७५ वर्षांच्या सुरेल प्रवासाला नाशिककर कलावंतांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केवळ गाणी नाहीत तर संगीतकार मदनमोहन आणि लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाचे अनोखे रसग्रहण सादर केले जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे असून, संहिता आणि निवेदन रुपाली देशमुख यांचे आहे. रसिका नातू आणि शिवानी जोशी या लताजींची गाणी सादर करतील. प्रमोद पवार आणि कृपा परदेशी वादनाची साथ करतील. तांत्रिक सहाय्य आदित्य राहणे आणि शुभम जोशी यांचे आहे. या कार्यक्रमाला तन्वी अमित यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. स्वर्णिमा सभागृह यांचेही सहकार्य आहे. या कार्यक्रमासाठी शुभम जोशी, फेदर टच स्टुडिओज (मोबाइल नं. ८१४९४८६३९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images