Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ध्वनी प्रदुषणाला आवरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गणेशोत्सव हा आनंदोत्सव असला तरी त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचता कामा नये. उत्सव काळात कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण थांबवा,' असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. ध्वनीप्रदुषणाद्वारे पर्यावरण संवर्धनाला बाधा आणणारी गणेश मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सण आणि उत्सव हे मांगल्याचे प्रतिक असले तरी उत्साहाच्या भरात पर्यावरण संवर्धनाला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी देखील सुजान नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. परंतू ग्रामीण भागात उत्साहाला उधान आल्यानंतर गणेश भक्त पर्यावरण संवर्धनाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळते. म्हणूनच या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाची काळजी वाहण्याबाबत जिल्हा प्रशासन आग्रही आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांना ध्वनीमापक यंत्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तपासणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षकांना देण्यात आले आहे. ध्वनी प्रदुषणाचे निकष न पाळणाऱ्या मंडळावर दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

तीन दिवस वाजवा रे वाजवा

गणेशोत्सव काळात २१ ते २३ सप्टेंबर असे तीन दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास आणि देखावे सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. रविवारी २३ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे मिरवणुकांमध्ये रात्री १२ पर्यंत मर्यादीत आवाजात ध्वनीक्षेपके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज २१ आणि २२ सप्टेंबर रोजी देखील गणेश भक्तांना देखावे पहाता यावेत याकरीता रात्री १२ पर्यंत देखावे सुरू ठेवण्यास मंडळांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वीचे शेवटचे दोन दिवस गणेश भक्त रात्री १२ पर्यंत देखाव्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण शेतकऱ्याची दुगावमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विघ्न दूर होण्याची चिन्हे नाहीत. वैफल्यग्रस्त शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असून जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे.

लखन दत्तू दिवे (वय २५, रा. दुगाव, ता. नाशिक) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या नावे सामायिक क्षेत्र असून ओझरखेडे आदिवासी बिगर कार्यकारी सहकारी संस्थेचे कुठलेही कर्ज नसल्याचे संबंधित तलाठ्याने अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची ही चालू वर्षातील ७१ वी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता २

$
0
0

नाशिक- निधनवार्ता २ ( फोटो आहे)

सीताबाई इघे

नांदगाव : येथील सीताबाई किसनराव इघे (वय १०८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक भास्कर किसनराव इघे यांच्या त्या मातश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंदिरातील चोरीचा उलगडा

$
0
0

येवल्यातील तीन जणांना अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवला शहरातील मेनरोड परिसरातील सिद्धीविनायक गणेश मंदिरात झालेल्या चोरीचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून दानपेटी व इतर साहित्य जप्त केले. ऐन गणेशोत्सवात चोरी झाल्याने भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. तिघेही संशयित येवल्यातीलच आहेत.

मिलिंद उर्फ मन्या मगन खंडीझोड (२८), शंकर नामदेवव राखपसरे (२८, दोघे रा. आंगणगाव, ता. येवला) आणि सागर गुलाब पवार (२५, पारेगाव रोड, ता. येवला) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मागील आठवड्यात गणेश मंदिराच्या कंपाउंडच्या गेटचे कुलूप तोडून सभामंडपातील दानपेटी चोरून नेली होती. शहराच्या भरवस्तीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवल्यासह आजुबाजुचे तालुक्यांमधील संशयितांना रडारवर घेतले. पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी गुप्त माहिती मिळाल्याने तिघा संशयितांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दानपेटी तसेच गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची पल्सर (एमएच १५, डी. जे. ५६८७) जप्त करण्यात आली.

सागर गुलाब पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याने अलिकडेच टोळी तयार केली होती. पवारविरुद्ध यापूर्वी घरफोडी, वाहनचोरी असे नऊ गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या अटकेने मालमत्तेशी संबंधित आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार शांताराम घुगे, पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, भरत कांदळकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, इम्रान पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीकडेच

$
0
0

नगररचना-जि. प. बैठकीत सुटला पेच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावठाण क्षेत्राच्या आत बांधकाम करण्याच्या परवानगीचे अधिकार कोणाकडे, याबाबत असलेला पेच नगररचना विभाग व जिल्हा परिषदेच्या बैठकीत अखेर सोडविण्यात आला. ग्रामीण भागातील गावठाण हद्दीत बांधकाम करताना ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव नगररचना विभागास सादर होऊन त्यांची तांत्रिक पडताळणी व मान्यता प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायतीने परवानगी द्यावी, असा निर्णय झाला.

गावठाण हद्दीतील बांधकामांची परवानगी देण्याबाबत ही बैठक झाली. बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीकडे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम करण्यात येणार आहे. या परवानगीव्दारे विकास शुल्क ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधांच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, नगररचना विभागाच्या नाशिक विभागाच्या सहसंचालक प्रतीभा भदाणे, सहायक संचालक जयश्रीराणी सुर्वे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, नगररचनाकार किशोर पाटील, नंदकिशोर मोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यामध्ये गावठाण हद्दीतील बांधकामाच्या परवानग्या ग्रामपंचायतीने देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बांधकाम परवानगी नंतर यासाठी मिळणारे विकासशुल्क ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात येणार आहे.

भरारी पथक नेमणार

जगजागृती करण्यासाठी जिल्हा स्तरावर नगररचना विभाग व जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेतली जाणार आहे. तसेच बांधकामाची परवानगी न घेणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. बांधकाम कामासाठी तांत्रिक कर्मचारी आवश्यक असल्याने याबाबत पदनिर्मितीसाठी आकृतीबंध तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ग्रामविकास विभागास प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाचशेवर मूर्तींचे पाचव्या दिवशी संकलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी सोमवारी गोदाघाटावर विसर्जित करण्यासाठी आणलेल्या गणेशमूर्तींचे चोपडा पुलाजवळच्या भागात संकलन करण्यात आले. दिवसभरात येथे सुमारे ५५० दान केलेल्या गणेशमूर्तींचे संकलन झाले.

गणेशोत्सवात घरोघरी दीड दिवस, पाचव्या व सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. आतापर्यंत दहाव्या दिवशी अनंतचतुर्दशीला विसर्जनावेळी मूर्ती संकलन करण्यात येत होते. यंदा प्रथमच पाचव्या दिवशी मूर्ती संकलन करण्यात आले. गोदावरी गटारीकरणविरोधी मंच आणि एचपीटी व आरवायके महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविताना भाविकांकडील बाप्पांची मूर्ती कृत्रिम तलावात बुडवून तिचा स्वीकार करण्यात आला. या उपक्रमात गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाचे निशिकांत पगारे, अमित कुलकर्णी, प्रकाश बर्वे, संतोष इंगळे, नीलेश ठुबे, एचपीटी व आरवायके महाविद्यालयाचे एस. आर. वर्मा, सोमनाथ मुठाळ, बी. व्ही. सोनवणे, कांचन देसले, राधिका सानप आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

--

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पेट्रोल नव्वदीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीचा चटका सहन करणाऱ्या नाशिककरांना आता एक लिटर पेट्रोल खरेदीसाठी ९० रुपये मोजावे लागत आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागातील पंपावर पेट्रोलचे दर सोमवारी नव्वदी पार गेले आहे. डिझेलच्या दराची देखील ८० रुपयांकडे वाटचाल सुरू आहे. इंधनाचे रोजच दर वाढत असून, त्यामुळे सामान्य नागरिक बेहाल झाले आहेत. दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढच होते आहे. नाशिकमधील काही पंपांवर पेट्रोलचा दर ८९ रुपये ८५ पैसे तर काही पंपांवर ९० रुपये प्रति लिटर दराने विक्री केले जात होते. डिझेलची ७७ रुपये ५६ पैसे प्रति लिटर दराने विक्री सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह उद्घाटनाचीघाई न करण्याचे निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेरी परिसरात मराठा वसतिगृहासाठी दोन इमारती उपलब्ध करून देण्यात आल्या असून, तेथे अजूनही काही सुविधा उपलब्ध होणे बाकी आहे. हे वसतिगृह सुरू व्हावे यासाठी झटणाऱ्या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय वसतिगृहाच्या उदघाटनाची घाई करू नये, अशा आशयाचे निवेदन नाशिक महापालिकेचे सभागृह नेता दिनकर पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली. नाशिकमध्ये मेरी येथे आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०० विद्यार्थी राहू शकतील, अशा दोन इमारती त्यासाठी सज्ज करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत उद्घाटनाची घाई करू नका असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उद्घाटनासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह, सर्व जाती धर्मातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्ह्यातील मान्यवरांची बैठक होणार असून, मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणालाही विश्वासात न घेता जिल्हा प्रशासनाने या वसतिगृहाच्या उदघाटनाचे नियोजन केले तर होणाऱ्या परिणामांना प्रशासनातील अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा पाटील यांच्यासह उपमहापौर वसंत गिते, सतिश सोनवणे, पंडीत आवारे, मुकेश शहाणे, शरद काळे, जगदीश पाटील आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूमाफियाची शिरजोरी

$
0
0

तस्करीप्रकरणी कारवाई करणाऱ्या तहसीलदाराला धमकावले

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विनापरवाना वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना वाळूमाफियाने धक्काबुक्की करीत धमकावले. नाशिकरोडच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजजवळ रविवारी (दि. १६) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तुषार उत्तम सानप (रा. कऱ्हे, ता. सिन्नर) या वाळूमाफियाचा नाशिकरोड पोलिस शोध घेत आहेत.

या प्रकरणी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निवडणुकीसंदर्भात रविवारी (दि. १६) कार्यालयात काम करीत असतांना आवळकंठे यांना कोपरगाव येथून सिन्नर मार्गे डंपरमध्ये (एमएच ०२ वायए ९७७९) चोरीची वाळू नाशिकच्या दिशेने वाहून आणली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एम. एस. शेख, आनंद मेश्राम आणि बाचकर या तीन कर्मचाऱ्यांना घेऊन (एमएच १५ ईबी ६८७९) या खासगी वाहनाने शिंदे गावाजवळील चांदगिरी चौफुलीवर सापळा लावला. ब्राह्मणवाडे गावाकडून सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास आलेला डंपर थेट जाखोरी चौफुलीच्या दिशेने वळाल्याने आवळकंठे यांनी पाठलाग सुरू केला. त्यांनी डंपरचालकास थांबण्यास सांगितले. परंतु, त्याने तहसीलदारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत डंपर कोटमगाव व सामनगाव मार्गे थेट शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजरोडने नाशिककडे आणला. या मार्गावरील रस्ता अरुंद असल्याने तहसीलदारांना डंपरला ओव्हरटेक करता आले नाही. मात्र, अश्विन कॉलनीजवळ डंपरचालकाने मुख्य रस्ता सोडल्याने तहसीलदार आवळकंठे यांनी आपले कार डंपरच्या पुढे नेऊन उभी केले. त्यांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान, डंपरचालकाने नाव व पत्ता सांगण्यास नकार दिला. चालकाने डंपरमालक तुषार सानप यास फोन करून बोलावून घेतले.

डंपरमालक आक्रमक

डंपरमालक तुषार उत्तम सानप पांढऱ्या स्कॉर्पिओमधून (एमएच ०४ एएस ६०९३) घटनास्थळी आला. यावेळी तहसीलदारांनी त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आणि गाडीच्या कागदत्रांची मागणी केली. परवाना नसल्याचे सांगून कागदपत्रे देण्यास सानपने नकार दिला. यावर वाळूसह डंपर नाशिकला तहसीलदार कार्यालयात घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. मात्र, संतपालेल्या सानपने डंपरमधील लोखंडी टॉमी काढून गाडीचे पाठीमागील हूक काढण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी विरोध करताच सानपने त्यांना शिवीगाळ करीत ढकलून दिले. 'येथून जा नाहीतर तुमचा बेत पाहीन', अशा शब्दांत तहसीलदार व त्यांच्या पथकाला त्याने धमकी दिली. तसेच डंपरमधील सर्व वाळू रस्त्यावर ओतून देत त्याने पळ काढला.

पोलिसांची मदत घ्या

वाळूमाफियांविरोधात कारवाईसाठी जाणाऱ्या पथकात पोलिसांचाही समावेश असावा, असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. तहसीलदार आवळकंठे यांच्यासोबत रविवारच्या कारवाईप्रसंगी पोलिस नव्हते. त्यांच्या जीवाला धोका होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कारवाईप्रसंगी पोलिसांची मदत घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यापुढेही वाळूमाफियांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार आवळकंठे यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांनी सर केला रामशेज

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चिल्ड्रन्स सायकलिंग क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाशिक ते रामशेज ही ३० किलोमीटरची राईड यशस्वीरित्या पार पडली. सकाळी ६.३० वाजता वाजता जेहान सर्कल येथून शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पाटील यांचे हस्ते राईडला सुरूवात करण्यात आली. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या राईड मध्ये जेहान सर्कल ते रामशेज व रामशेज वरून परत जेहान सर्कल असे एकूण ३० किलोमीटरचे अंतर मुलांनी यशस्वीरित्या पार केले. या राईड मध्ये ९ ते १८ वयोगटातील ५० च्या वर मुला-मुलींनी सहभाग घेतला. राईड पूर्ण केलेल्या मुलांना पदक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

चिल्ड्रन्स सायकलिंग क्लबचे अध्यक्ष अजय राहूडे, स्नेहल देव, माधुरी गडाख, दीपक चव्हाण, आर्किटेक्ट मोहन तौलाहुनासे, योगेश कोठावदे, संजय मोकळ, रमेश तिदमे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखाचा गुटखा भद्रकालीमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील खडकाळी भागात दोन घरांमध्ये दडवून ठेवलेला तब्बल पाच लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी सलीम हनीफ भिमानी (३२, रा. भद्रकाली) यास अटक करण्यात आली.

संशयित आरोपीने खडकाळी झोपडपट्टीतील घर क्रमांक १२२० आणि १२९७ येथे गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा केल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पाटील यांनी कारवाई आदेश दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सहायक निरीक्षक संतोष साबळे, विशाल गिरी, पीएसआय विशाल मुळे, पोलिस नाईक विष्णू गोसावी, खाडीलकर, निकम, नांदुर्डीकर यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दि. कृ. सोनवणे, कि. ह बाविस्कर, पी. एस. पाटील, सु. जी. मंडलिक, बी. सी. इंगळे, रा. द. सूर्यवंशी यांनी संयुक्त छापा मारला. यावेळी पथकाने दोन्ही घरांमधून तब्बल पाच लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्याचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी रा. द. सूर्यवंशी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’ मोडणार कलाकारांचे कंबरडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे प्रस्तावित दर स्थायी समितीवर ठेवण्यात आले असून, या दरांमुळे कलाकारांचे कंबरडे मोडणार आहे. 'कालिदास'साठी ३१ हजार रुपयांपर्यंत तर महात्मा फुले कलादालनासाठी २० हजार रुपयांपर्यंत जवळपास तिप्पट भाडेवाढ करण्यात आली असून, कलेची उपासना करणाऱ्यांना हे प्रचंड दर भरणे परवडणार नसल्याने कलावर्तुळामध्ये संतापाचे वातावरण आहे. महापालिका आयुक्तांकडे कलाकारांनी केलेली कोणतीच शिष्टाई सफल झाली नसल्याने आता कलाकारांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, एसी व सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधांसह सुसज्ज आरामदायक आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी १२.१३ कोटी रुपये खर्च झाला असून मेन्टेनन्ससाठी अधिक खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे प्रस्तावित दर स्थायी समितीवर ठेवण्यात आले आहे. हे दर पाहता आता कालिदास सामान्य कलाकारांचे राहणार नाही असे प्राथमिक चित्र आहे.

पूर्वी नाटकासाठी प्रथम सत्रात ३ हजार, द्वितीय सत्रासाठी ३५००, तर तृतीय सत्रासाठी ४ हजार रुपये आकारले जात होते. आता रंगीत तालीम, बालनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, हौशी नाटक, व्याख्यान, शासकीय कार्यालयांच्या कार्यशाळा यासाठी प्रथम सत्रास ६ हजार, द्वितीय सत्रासाठी ८ हजार तर तृतीय सत्रासाठी ११ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. शास्त्रीय गायनासाठी पूर्वी ३५०० ते ४५०० रुपये आकारण्यात येत होते, ते आता १५ हजार ते २१ हजार रुपये इतके वाढविण्यात आले आहेत. आर्केस्ट्रासाठी ५ ते ६ हजार रुपये होते, आता २५ ते ३१ हजार रुपयांपर्यंत दर वाढविण्यात आले आहेत. याशिवाय पूर्वी पाच हजार रुपये डिपॉझिट होते, ते आता १० ते ३० हजार रुपये इतके वाढविण्यात आले आहे. त्यावर १८ टक्के जीएसटी आणि सुटीच्या दिवशी तीन हजार रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार आहेत.

प्रॅक्टिस हॉलचे दर

प्रॅक्टिस हॉलसाठी पूर्वी १०० रुपये प्रतिसत्र होते, ते आता ५०० रुपये प्रतिसत्र, प्रदर्शनासाठी एक हजार रुपयांवरून पाच हजार रुपये तर व्यावसायिक प्रदर्शनासाठी २ हजार रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम वाढविण्यात आली आहे. डिपॉझिट एक हजारावरून १० हजारांवर नेण्यात आले असून, त्यावर १८ टक्के जीएसटी आहे.

महात्मा फुले कलादालनाचे दर

विवाहासाठी १२ तासांचे आरक्षण साडेचार हजार रुपयांवरून २० हजार रुपयांवर नेण्यात आले आहे. व्यावसायिक प्रदर्शनासाठी पाच हजार रुपये, चित्र-शिल्प-कला प्रदर्शनासाठी दोन हजार रुपये, अव्यावसायिक प्रदर्शनासाठी ३५००, तयारीसाठी ५००, तर साहित्य ठेवण्यासाठी २००० रुपये डिपॉझिट प्रत्येक दिवसासाठी २००० रुपये व जीएसटी १८ टक्के असे दर होते. ते आता चर्चासत्र, व्याख्यानासाठी १० हजार रुपये, तयारीसाठी २००० रुपये, साहित्य ठेवण्यासाठी ५००० रुपये तर वरचा मजला प्रदर्शनासाठी २० हजार रुपये, तयारीसाठी ५००० रुपये, त्यात प्रोजेक्टर हवे असल्यास तीन हजार रुपये अतिरिक्त अशी वाढ करण्यात आली आहे.

दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ

कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनाची ही दरवाढ कमी झाली म्हणून की काय या प्रस्तावित दरांमध्ये दरवर्षी ५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. तसेच जादा लाइट, प्रॅक्टिस हॉल, निवासस्थान, व्हीआयपी व व्हिडीओ शूटिंग शुल्क यांच्या भाडे आकारणीबाबात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ही वाढ होणारच असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनेटचा मर्यादित, सुरक्षित वापर गरजेचा

$
0
0

सायबर तज्ज्ञ रक्षित टंडन यांचा समाजाला सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेट ही दुधारी तलवार आहे. अतिशय क्षमतावान असणाऱ्या या आधुनिक संवादमाध्यमाचा उपयोग मर्यादेत आणि सुरक्षितरित्या करायला हवा, असा सल्ला सायबर तज्ज्ञ आणि केंद्राच्या कौन्सिल ऑफ इन्फॉर्मेशन अँड सिक्युरिटीचे कार्यकारी संचालक व सायबर तज्ज्ञ रक्षित टंडन यांनी दिला.

दि गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात 'करंट सायबर क्राइम्स अँड सेफ्टी' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. इंटरनेटच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. चुकीच्या वापरामुळे प्रत्येक माणसाचे खासगी जीवनही या माध्यमाच्या धोक्यात आले आहे. हे माध्यम वापरण्यास अजिबात नकार नाही. मात्र, पूर्णत: अंधपणे हे माध्यम हाताळही जोखमीचे ठरू शकते, असा इशाराही टंडन यांनी यावेळी दिला. सायबर फसवणुकींपासून तर विविध गुन्ह्यांची व्याप्ती त्यांनी यावेळी तपशीलवार मांडली. सायबर धोक्यातून घडणाऱ्या काही फसवणुकींबाबतही त्यांनी काही प्रातिनिधीक घटनाही स्लाइड शोद्वारे मांडल्या.

फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सामाजिक माध्यमांमध्ये वावरताना घ्यावयाची काळजी, गरजेची असणारी तांत्रिक माहिती याबाबत स्वत: जागरुक रहा आणि इतरांनाही जागृत करा, असे आवाहन टंडन यांनी केले. आपल्या देशामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सायबर गुन्हेगारीकडे वळते आहे. याकडेही कायदा आणि सुव्यवस्थेने गांभीर्याने बघायला हवे, असाही सल्ला टंडन यांनी दिला. मंचावर आर्किटेक्चर व जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, बँकेचे उपाध्यक्ष राजाराम बस्ते, मानद कार्यकारी संचालक प्रणव पवार, वसंतराव खैरनार, सुरेश पाटील, अॅड. दत्तात्रय पिंगळे, डॉ. तानाजी कानडे आदी उपस्थित होते.

कमीत कमी माहिती जाहीर करा

सोशल माध्यमांवरील वावर हा अनेक इंटरनेट उपभोक्त्यांसाठी व्यसनच बनले आहे. त्यापोटी अनेकजण स्वत:च्या तपशीलवार जन्मतारखेपासून तर कुटुंबातील सदस्यांच्या नावा-गावासह तपशीलवार माहिती, फोटो वारंवार जाहीर करतात. याचा फायदा सायबरवर सक्रिय असणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात. अशा वैयक्तिक माहितीस सार्वजनिक करण्याअगोदर सावध व्हा आणि संभाव्य सायबर फसवणूक टाळा, असाही सल्ला टंडन यांनी उपस्थितांना यावेळी दिला. सामाजिक माध्यमावर वावरताना अलिखित आचारसंहिता आणि नैतिकता या बाबींचे पालन केल्यास या माध्यमांवरील तुमचा वावर सुरक्षित होईल, असेही त्यांनी सांगितले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोगनीला आले पंधरा वर्षांनी फळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेली पंधरा वर्षे आमच्या अपार्टमेंटसमोर महोगनीचे झाड आहे. २००३ पासून या झाडाला एकही फळ लागले नाही. यंदा २०१८ मध्ये काही दिवसांपूर्वी झाडाच्या शेंड्याला एक टणकदार फळ आले, असा दावा जय गजानन अपार्टमेंटच्या रहिवाशांनी केला आहे.

गंगापूर रोडवरील सिद्धिविनायक कॉलनी लेन क्रमांक ४ मध्ये जय गजानन अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये २००३ पासून चार रहिवासी राहतात. अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास येण्यापूर्वीच महोगनीचे झाड येथे लावण्यात आले होते, असे रहिवासी सांगतात. महापालिकेच्या वतीने हे झाड तेथे लावण्यात आले आहे. निवृत्त तहसीलदार दत्तात्रेय चिंचणी आणि माजी मुख्याध्यापक मधुकर बिरारी या झाडाचे संगोपन करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या झाडाला फळ आल्याचे कधी दिसलेच नाही. काही दिवसांपूर्वी झाडाच्या शेंड्याला नारळाप्रमाणे टणकदार फळ आल्याचे दिसले, असे चिंचणी आणि बिरारी यांनी सांगितले. हे फळ जमिनीच्या दिशेने येण्याऐवजी आकाशाच्या दिशेने आले आहे. त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांना फळाबद्दल कुतूहल वाटत आहे.

उशिरा फळ येतेच : पर्यावरणतज्ज्ञ

महोगनीच्या वृक्षाला सात ते आठ वर्षांनी फळ येतेच, तसेच शहरातील अनेक भागांत महोगनी वृक्ष लावण्यात आल्याचे पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांनी सांगितले. महोगनीचे लाकूड विशेषतः बांधकामात वापरण्यात येते. महोगनीची उंची ७० फुटांपर्यंत वाढते. या झाडाच्या आजूबाजूला समलिंगी झाडांची लागवड केली असल्यास या झाडाला बारीक हिरवट आणि पिवळ्या रंगांची फुलेदेखील येतात. महोगनीचे झाड शहरातील अनेक भागांत असून, या झाडाच्या फळाचा वेगळा प्रकार पाहता रहिवाशांना कुतूहल वाटत असेल, असे निवृत्त वन अधिकारी कुसुम दहिवेलकर यांनी सांगितले.

महोगनीची होते शेती

महोगनीचे खोड अतिशय कणखर असते. या झाडाची पाने गळाल्यानंतर अवघ्या काही तासांत नवी पालवी फुटते. झाडाच्या खोडाच्या सालीवर पडलेल्या भेगांमुळे सालीचे पापुद्रे निघतात. झाडाला आठ वर्षांनंतर गोल व टणक फळे येण्यास सुरुवात होते. फळातील पातळ पंख असलेल्या बियांपासून नवीन फळांची लागवड केली जाते. या झाडाच्या सालातून डिंक मिळतो, तसेच या झाडाच्या लाकडाचा वापर सध्या प्लायवूड बनविण्यासाठी आणि बांधकामासाठी केला जातो. सागाचे झाड तोडण्यावर अनेक निर्बंध केल्याने आता महोगनी वृक्षांची अनेक भागात शेती करीत लाकडाचा व्यवसाय केला जात असल्याचे पर्यावरणमित्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’च्या हस्ते बाप्पांची आरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चातुर्य आणि कलेच्या जोरावर 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेच्या नाशिकमधील फेरीत विजयी ठरलेल्या साक्षी गायकवाड, अनुजा माहेश्वरी आणि प्रीती पुरी यांनी नाशिकच्या चांदीच्या गणपतीची आरती करीत उज्ज्वल यशासाठी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली.

रविवार कारंजा मित्रमंडळ यंदा शतकपूर्ती महोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सवानिमित्त चांदीच्या गणपतीची आरती करण्याचा मान 'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन'च्या नाशिक फेरीतल्या विजेत्यांना देण्यात आला. रविवारी सायंकाळी ७.३० वाजता गणरायाच्या मंत्रोच्चारात आरतीला सुरुवात झाली. बाप्पांच्या आरतीनंतर मंत्रपुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी मंदिरात भक्तांची गर्दी उसळली होती. बाप्पांची आरती, घंटानाद आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषात यावेळी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. आरतीनंतर 'श्रावणक्वीन'कडून उज्ज्वल भविष्यासाठी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, उपाध्यक्ष सतीश आमले आणि कार्याध्यक्ष मोहन शिंदे यांच्या वतीने 'श्रावणक्वीन'ला मानाची शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

--

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड पाऊस चौकट

$
0
0

बाप्पाला साकडे

पूर्ण सोमवारी झालेल्या पावसाने नदीला फारसे पाणी न आल्याने मनमाडकरांची निराशा झाली आहे. संपूर्ण पावसाळ्यात मनमाड, चांदवड, नांदगाव परिसरावर रुसलेला पाऊस पुन्हा परतल्याने बाप्पाचा प्रसाद मिळाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कुठेतरी दडून बसलेला पाऊस निदान काही काळासाठी का असेना आल्यामुळे मनमाडकर सुखावले आहेत. परतीचा का असेना शहरासह नादगाव, चांदवड तालुक्यात चांगला पाऊस होऊ दे, वागदर्डी धरण भरू दे, असे साकडेच मनमाडकरांनी बाप्पाला घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबर, ‘सारथी’तर्फे चालकांचा सत्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रातील वाहनचालकांना जागतिक चालक दिवसानिमित्त 'आदर्श चालक पुरस्कार' महाराष्ट्र चेंबर व सारथी श्री फाऊंडेशनतर्फे देण्यात आला. या सोहळ्यात सन्मानार्थींनी आपल्याप्रमाणेच आणखी १० वाहनचालकांना प्रशिक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले.

सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे, चेंबरच्या टूरिझम समितीचे चेअरमन दिलीपसिंह बेनीवाल, चेंबरच्या ट्रान्सपोर्ट समितीचे चेअरमन अंजू सिंघल, सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष भरत परदेशी, चेंबरच्या सीएसआर व एचआर समितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे उपस्थित होते.

..

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, सर्व सेवा आता ऑनलाईन झाल्या आहेत. वाहनचालकांचा डेटाही अॅपद्वारे मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबरचे आयटी व नवउद्योजक समिती काम करेल. त्यासाठी वाहनचालकांनी आपली माहिती बेनीवाल यांच्याकडे द्यावी.

प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे यांनी महिला चालकांचा सन्मान होत असल्याने अभिमान आणि आनंद होत आहे. पूर्वी वाहन चालविणे अवघड होते. काळानुरुप वाहने अत्याधुनिक झाले असून सोपे झाले आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत रस्तेही चार पदरी व चांगले झाले असून वाहकचालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे सांगितले. टूरिझम समितीचे चेअरमन दिलीपसिंह बेनीवाल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ट्रान्सपोर्ट समितीचे चेअरमन अंजू सिंघल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तांच्या उत्साहावर ‘पाणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारी सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा परिणाम गणेशोत्सवावर झाला. दुपारपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे गणेश मंडळांनी देखावे खुले केले नाहीत. पाऊसधारा कोसळत असल्याने भाविकांनीही घराबाहेर पडणे टाळले. संध्याकाळी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेश मंडळातील धामधूम शांत होती. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांत शुकशुकाट पहायला मिळाला.

सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी ढग दाटून आल्याने गणेश मंडळांना पावसाचा अंदाज आला होता. त्यामुळे शहरातील काही भागातील मंडळांनी देखावे खुले केले नव्हते. मात्र, मुख्य गणेश मंडळांचे देखावे सकाळपासूनच खुले करण्यात आले होते. त्यामुळे जुने नाशिक, पंचवटी, भद्रकाली, बी. डी. भालेकर मैदान यांसह इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या गणेश मंडळांची पावसामुळे तारांबळ उडाली. काही गणेश मंडळांचे मंडप पावसाचा जोर वाढल्याने गळू लागले. पावसाच्या पाण्यापासून देखावे, आरास आणि बाप्पांची मूर्ती वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली. सायंकाळी अनेक गणेशभक्त सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. मंगळवारी दुपारीच पाऊस आल्याने भक्त देखावे पाहण्यासाठी आले नाहीत. दुपारपासून शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे गणेश मंडळातील गाण्यांचा आणि आरतीचा आवाज बंद झाला होता. वीज नसल्याने रोषणाईही बंद होती. अंधारातच बाप्पांची आरती करावी लागली.

नाशिकरोडला त्रेधा

महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर नाशिकरोडला आज सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ झाली. मंडप गळू लागल्याने गणेशमूर्ती व देखावे झाकण्यासाठी त्यांनी कसरत करावी लागली. उत्सवात हंगामी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, पथारीवाल्यांचीही तारांबळ उडाली. गणेशभक्तांनी देखावे पाहण्याऐवजी घरीच बसणे पसंत केले. दुपारपासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी चार-साडेचारला ढगांनी आकाश व्यापण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरु झाला. बिटको चौक, देवी चौक, जेलरोडचा माडेल कालनी चौक, उपनगर आदी सखल भागात तळी तयार झाली. त्यातच रस्त्यात खड्डे कायम असल्याने वाहनचालकांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईची अतिघाई

$
0
0

महावितरणला कायद्याचा विसर; वीजजोडणीसाठी प्रतीक्षाच

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकरी दशकभरापासून कृषिपंपासाठी अधिकृत वीज जोडणीसाठी महावितरणकडे खेटा घालत आहेत. मात्र, महावितरणने वीजजोडणी देण्याऐवजी वीजचोरीच्या नावाखाली कारवाईचा फतवा काढला आहे. वीज कायद्यातील तरतुदीनुसार, मागेल त्याला वीजपुरवठा देणे महावितरणवर बंधनकारक आहे. मात्र, शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे अधिकृत वीजजोडणीसाठी महावितरण प्रतीक्षा करायला लावत आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडळात ग्रामीण भागात अनधिकृत वीजजोडणी कृषिपंपधारक शेतकऱ्यांवर कारवाईसाठी महावितरणने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांना संबंधित शेतकऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय अनधिकृत कृषिपंपधारकांकडून होत असलेल्या वीज वापराबद्दल माहिती कळविण्याचे अधिकृत कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही महावितरण प्रशासनाने आवाहन केले आहे. अनधिकृतपणे वीज वापरामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावाही महावितरणने केला आहे. अनधिकृत वीजवापर असमर्थनीय असला तरी महावितरणचे धोरणच अनधिकृत वीज वापराला कारणीभूत ठरू लागले आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारतांना महावितरणकडून शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर विहिर नोंदीची सक्ती केली जाते. या विहिरीसाठी लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळत नाही. महावितरणने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वीज कायदा २००३ मधील तरतुदींनुसार अधिकृत वीजजोडणी वेळेत देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या परिमंडळातील मालेगाव मंडळात २० हजार ५४०, नाशिक मंडळात २६ हजार ५६४ तर नगर मंडळात ४१ हजार ३५६ विविध क्षमतेची रोहित्र कार्यरत आहेत. रोहित्रांची संख्याही वाढविण्याची गरज आहे.

सौर कृषिपंपासाठी समुपदेशन

राज्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेकडे पाठ फिरवली आहे. या योजनेतून मिळणाऱ्या कृषिपंपाची उपयुक्तता खात्रीशीर नसल्याने शेतकरी उत्सुक नाहीत. असे असूनही राज्यात लवकरच ५७ हजार सौर कृषिपंप लावण्याचा महावितरणने निर्धार केला आहे. आतापर्यंत ७ हजार ५०० सौर कृषिपंप बसविले गेले असून केंद्राच्या अटल सौर कृषिपंप योजनेतूनही राज्याला ७ हजार ५०० सौर कृषिपंप प्राप्त झाले आहेत. महावितरणही अजून ५० हजार सौर कृषिपंप खरेदी करणार आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत २ लाख २८ हजार शेतकऱ्यांना कृषिपंप देण्याचे महवितरणचे लक्ष्य आहे. एचव्हीडीएस योजनेतूनही ५ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लवकरच कृषिपंपाची जोडणी दिली जाणार आहे. सौर कृषिपंप योजनेबाबत शेतकऱ्यांचे महावितरण समुपदेशन करणार आहे.

शुल्क भरल्यानंतर वीजजोडणीचे इनलाइन जोडणी ३०, पोल उभारण्याची गरज असलेली जोडणी ६० तर डीपीची गरज असलेली जोडणी ९० दिवसांत देणे महावितरणवर बंधनकारक आहे. तसे न झाल्यास शेतकऱ्यांना महावितरणकडून प्रत्येक आठवड्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद आहे. परंतु, इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याचा महावितरणकडून बाऊ केला जातो.

- ॲड. सिद्धार्थ सोनी,

सचिव, वीज ग्राहक समिती

कृषिपंपासाठीची वीजजोडणी सरकारने निधी उपलब्ध करून दिला तरच देता येते. शेतकऱ्यांनी महावितरणकडे शुल्क भरणा केल्यानंतर त्यांना निश्चित कालावधीत अधिकृत वीजजोडणी देण्याची वीज कायद्यात तरतूद नाही. इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी मात्र अशी तरतूद आहे. एचडीव्हीएस योजनेसाठी मात्र शासनाने निधी दिला असून मार्च २०१८ पर्यंत शुल्क भरणा केलेल्या सर्व कृषिपंप ग्राहकांना अधिकृत वीजजोडणीसाठी निविदाप्रक्रिया सुरू आहे.

- जनबीर सिंह,

मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ

नाशिक परिमंडळातील कृषिपंप जोडणी

मंडळ..............कार्यरत जोडण्या.......प्रतिक्षेतील जोडण्या

नाशिक शहर.....१,७२,४८२...................५,११५

मालेगाव..........१,४५,९५३...................११,७१२

नगर...............३,६२,६८६....................१३,०४७

एकूण.............६,८१,१२१....................२९,८७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या मंगळवारी (दि. ११) इस्लाम धर्माच्या कालगणनेप्रमाणे मुस्लिम नूतन वर्ष हिजरी सन १४४० चा प्रारंभ झाला. या महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव मोहरम हा सण साजरा करतात. या सणासाठी आवश्यक असणाऱ्या ताजिया (ताबूत) व सवारींची स्थापना देवळालीसह नाशिक शहर परिसरात पूर्ण झाली असून, ताजिया अन् सवारींच्या ठिकाणी सर्वधर्मीय समाजबांधवांची गर्दी होत आहे.

देवळालीतील मशीदरोडवर हिंदू-मुस्लिम एकतेची प्रतीक व सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला मानाचा ताबूत हालोका ताजिया दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. जुने नाशिक परिसरातील इमामशाही परिसरात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत आहे. देवळालीत गेल्या दहा पिढ्यांपासून हैदरखान उस्मानखान, रईसखान उस्मानखान, मुजमिल खान यांचा एक चांदीचा ताजिया, तर शेख अब्दुल सत्तार यांचा सात पिढ्यांपासून असलेला लाकडी ताजिया आहे. नवाब हमीद खान यांची १२ इमाम ही मानाची मुख्य सवारी असलेली चांदीची सवारी आहे. दरम्यान, नवीन वर्षाचे पहिले दहा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शहीद-ए-करबला या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून शहरातील विविध मशिदींमध्ये इमाम प्रवचने देत आहेत.

शहरातून निघणार मिरवणूक

शहराच्या विविध भागात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या १४ सवारी स्थापन करण्यात आल्या आहेत. नवसाच्या ताजिया बनविण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. या ताजिया व सवारींच्या ठिकाणी मुस्लिम बांधव रोट (नानकटाई), खिचडा, चोंगे, भाजी आदींचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. गुरुवारी (दि. २०) मोहरम साजरा होत असून, यानिमित्ताने स्थापना करण्यात आलेल्या या ताजिया व सवारींची शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

--

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images