Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निमित्त लेख

$
0
0

जैन पर्युषणपर्व!

जैन पर्युषण पर्व दरवर्षी १० दिवस पाळला जाते. आत्म्याच्या १० धर्मांना या १० दिवसांत प्रकट करून 'आत्मशुद्धी' करण्याची ही संधी असते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असते. आजपासून पुढील दहा दिवस हा पर्वकाळ सुरू राहील.

भरत जैन

कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होवून त्याची वैचारिक बैठक चांगली रहाते. शिवाय, यामुळे पुण्यार्जन होवून मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे १० दिवस गणेशोत्सव, ९ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा १० दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्वजण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. पर्युषण म्हणजे उपासना, जी स्व:कल्याणासाठी केली जाते. आत्मकल्याण म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जिवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रिय, द्विइंद्रिय त्रीइंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याक्षयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने 'मोक्ष' मिळवता येते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू.

उत्तमक्षमा

पहिल्या दिवसाचा धर्मास 'उत्तमक्षमा' म्हटले आहे. या दिवशी 'क्षमा' धर्माची पूजा चिंतन, सामायिक (रोजच होते) व ती पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले नाही तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांगून त्याला क्षमा करणे मग तो लहान असो वा मोठा. हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, 'क्षमा विरस्य भूषणम्'

उत्तम मार्दव

दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. मार्दव म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे. नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरपर्यंत सर्व अती मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपणा तर देतेच; शिवाय पुण्यही लाभते.

उत्तम आर्जव

तिसरा दिवस आर्जवचा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, मनात कुठलेही कपट नसणे, मायाचार न करणे.

उत्तम शौच

'शौच' म्हणजे निलोभता. अनाठायी भाव सोडून समाधानी राहाणे. यामुळे दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे पाहून आपल्याला दु:ख होत नाही. कारण ज्याला त्याला आपल्याच मागच्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळे हे सर्व मिळत असते. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार हा धर्म न अंगीकारण्यानेच आहे.

उत्तम सत्य

सत्य बोलणे वागणे, खोटे-लबाड न बोलणे, सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात 'सत्यमेव जयते'.

उत्तम सयंम

मनाविरूद्ध घडणाऱ्या घटनांनी मन विचलीत न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. थोडक्यात इंद्रियांना जिंकणे होय.

उत्तम तप

तप म्हणजे एक चित्ती ध्यान साधना, पूजापाठ, उपवास, सामाजिक स्वाध्याय. यामुळे आत्मशुद्धी होऊन पुण्यार्जन होते.

उत्तम त्याग

मिळाले त्यात समाधान, न मिळाल्याचे दु:ख न करणे, जास्तीचे आहे त्याचे दान गरजूंना मदत करणे, त्यागने हे होय.

उत्तम आकिंचन २२/०९/२०१८

'न किंचन' अपेक्षा मोह, म्हणजे अकिंचन. आलो रिकाम्या हाताने जाणार रिकाम्या हाताने मग जास्त हव्यास कशाला? जीवन जगण्यापुरते मिळविण्यात समाधान मानने म्हणजे अकिंचन धर्म!

बह्मचर्य

या पर्वात दहावा धर्म ब्रह्मचर्य म्हणजे 'अती कामवासना' न ठेवणे हा सांगितला आहे. आजचे स्त्री अत्याचार हा धर्म न पाळल्यामुळेच बोकाळला आहे. वासना अती नको. अतिप्राचीनकाळी माणूस जंगलात राहायचा. पेरण्या झाल्यावर पावसामुळे इतर कामे बंद असायची. मग या दहा दिवसांत तर भगवंताची पूजाअर्चा करून पुण्य कमवणे, यातून आत्मशुद्धीने पाप कमी करून पुण्य कमवणे व 'मोक्ष' मार्ग प्रशस्त करून घेणे हे या पर्युषण काळात होते. या पर्वाचा शेवट १० दिवसानंतर सर्वांनी लहान-मोठे एकमेकांची क्षमा मागून सांगता होते. वर्षभरात काही चुकले असल्यास लहानमोठे सर्व एकमेकांची क्षमा मागतात. 'क्षमावणी'ने या पर्वाची सांगता होते. असा हा पर्युषण पर्व आत्मशुद्धी करवतो, माणसाला माणूस घडवतो. जीवन सुखमय तर करतो पण 'मोक्षगामी'ही बनवतो. कारण यात आत्मचिंतन स्वाध्याय पूजापाठ, गुरुउपदेश, सामायिक हे सर्व येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाचा शहर बससेवेसाठी अट्टहास कशासाठी?

$
0
0

महापालिका शहर बससेवा घेणार असेल तर त्यात ठेकेदारांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे बस भाडे ठरविताना त्यांची भूमिका महत्त्वाची असणार हे उघड आहे. त्यात राजकीय नेत्यांच्याच हितसंबंधितांना बससेवेचे कंत्राट देणे, भ्रष्टाचार या गोष्टी घडणारच नाहीत, असे नाही. त्यामुळे अशा प्रकारचे खासगीकरण म्हणजे राजकीय नेत्यांचे चराऊ कुरण बनण्याचीच शक्यता जास्त आहे.

अॅड. कांतिलाल तातेड

नाशिक महापालिकेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा आपल्या ताब्यात घेऊन ती ठेकेदारांद्वारे सुरू करण्याचा निर्णय जवळपास घेतला असून, त्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. हा निर्णय शहराच्या, तसेच जनतेच्या हिताचा आहे काय, हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे.

वास्तविक लोककल्याणकारी राज्यात गरिबातील गरीब व्यक्तीला कोणताही नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता परिवहन सेवा उपलब्ध करून देणे ही राज्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळेच व्यावसायिक उपक्रम म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. आज शहराच्या विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवा सक्षम व बळकट करण्याची नितांत आवश्यकता असताना, त्याचप्रमाणे राज्यातील महापालिका चालवीत असलेल्या सर्व बससेवा अनेक वर्षांपासून तोट्यात आहेत हा अनुभव असताना, ही बससेवा महापालिका ताब्यात घेत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांचे खासगीकरण करण्याच्या धोरणाला अनुसरून ही बस वाहतूक ठेकेदारांकडे सुपूर्द करून ठेकेदारांना जनतेची लूट करण्याचा मुक्त परवाना देऊ इच्छित आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता सध्या ६०० बसची आवश्यकता आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात हे शक्य नसल्याने ४०० बस चालविण्याचा प्रस्ताव आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावानुसार, बस खरेदी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे वेतन, गणवेश, त्यांचे प्रशिक्षण, बसेसच्या दुरुस्ती व देखभालीचा खर्च हा ठेकेदाराने करायचा आहे, तर महापालिका केवळ मार्ग ठरविणे, बसथांबे, डेपो तयार करणे, तिकिटांचे दर ठरविणे, बससेवेचे उत्पन्न संकलित करणे या जबाबदाऱ्या पार पडणार आहे. यात ठेकेदारांना मोठी गुंतवणूक करावी लागणार असल्यामुळे बस भाडे ठरविताना त्यांची भूमिका महत्त्वाची असणार हे उघड आहे. ते बस भाडे सध्याच्या भाड्यापेक्षा जास्त असणार हेही निश्चित आहे. त्यात राजकीय नेत्यांच्याच हितसंबंधितांना बससेवेचे कंत्राट देणे, राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार या सर्व गोष्टी घडणारच नाहीत, असे नाही. थोडक्यात बससेवेचे अशा प्रकारचे खासगीकरण म्हणजे राजकीय नेत्यांचे चराऊ कुरण बनण्याचीच शक्यता जास्त आहे.

जनतेला दुहेरी फटका

सुरुवातीला महापालिकेलाही ६५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढे त्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. बससेवेमध्ये तोटा झाल्यास महापालिकेला त्याचीही भरपाई करून द्यावी लागेल. विविध करांच्या उत्पन्नातूनच महापालिकेला हा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे एका बाजूला बसभाड्यामध्ये वेगवेगळी कारणे दाखवून केली जाणारी सततची वाढ, तर दुसऱ्या बाजूला करांमध्ये भरमसाट वाढ असा दुहेरी फटका जनतेला बसणार आहे. महापालिकेने लादलेली अन्यायकारक करवाढ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे महापालिकेने बससेवा ताब्यात घेणे हे जनतेच्या फायद्याचे कसे आहे हे महापालिकेने, तसेच सरकारने जनतेला स्पष्ट करणे आवश्यक आहे. महापालिका बसभाडे ठरविणार असून, पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणार आहे, असे सांगून भाडे ठरविण्यामध्ये महापालिका नियंत्रकाची भूमिका पार पडणार असल्याचे भासविले जात आहे. मात्र, देशातील आरबीआय, आयआरडीआयए, सेबी आदी नियंत्रक संस्था सरकारच्या दबावाखाली (व सरकार उद्योगपतींच्या दबावाखाली )जनतेच्या हिताच्या विरुद्ध कसे निर्णय घेतात, हे आपण सतत अनुभवत आहोत. वास्तविक एसटी महामंडळ 'आपोआप भाडेवाढ' या सूत्राच्या आधारे मन मानेल त्या पद्धतीने जनतेची लूट करणारी अन्यायकारक भाडेवाढ सतत करीत असते. तरी ती तोट्यामध्ये का असते हा प्रश्नच आहे. मुळात शहर बस वाहतुकीसंबंधी एसटी महामंडळ देत असलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. महामंडळाने गेल्या सहा वर्षांमध्ये शहर बसच्या किमान भाड्यात जवळपास १०० टक्के वाढ केलेली आहे. आज महामंडळाने आर्थिक गळतीचे सर्व मार्ग बंद करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे, सवलतींचे राजकारण बंद करून आर्थिक शिस्तीच्या साह्याने महामंडळाच्या तोट्याची करणे दूर करणे आणि सरकारने हस्तक्षेप टाळणे आवश्यक आहे. महामंडळाला सरकारकडून जवळपास तीन हजार कोटी रुपये येणे आहेत. सरकारने ती रक्कम जरी महामंडळाला दिली तरी महामंडळ नफ्यात येईल व मोठ्या प्रमाणात भाडेकपातही करणेही शक्य होईल. केंद्र सरकार व राज्य सरकार विमान कंपन्यांना हजारो कोटी रुपयांच्या सवलती देत असते. राज्य सरकार पुतळे व स्मारके उभारण्यासाठी, तसेच स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करीत असते. असे सरकार वर्षाला होणाऱ्या तथाकथित १७-१८ कोटी रुपयांच्या तोट्यासाठी 'स्मार्ट सिटी' म्हणून निवड झालेल्या व नाशिकच्या जनतेची जीवनवाहिनी असणाऱ्या शहर बस वाहतुकीचे खासगीकरण का करीत आहे? तोट्याच्या नावाखाली नाशिकची शहर बस वाहतूक ठेकेदारांच्या हाती सोपविणे अयोग्य व अन्यायकारक आहे. सध्या महापालिकेच्याच तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी महापालिकेकडे पैसा नाही. सिंहस्थाचे कर्ज डोक्यावर आहे. विविध योजनांची देणी शिल्लक आहेत. स्मार्ट सिटीतला आपला हिस्सा देणे महापालिकेला परवडत नाही. सगळा कारभारच अनुदानावर सुरू आहे. अशा स्थितीत बससेवा ताब्यात घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा हा प्रकार असून, त्याने नाशिकचे नुकसान होणार आहे. नाशिकच्या जनतेने या प्रस्तावाला तीव्र विरोध करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्यातून खत निर्मिती करा

$
0
0

निर्माल्यातून खतनिर्मिती करा

पुणे विद्यापीठाची कॉलेजांना सूचना; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलन उपक्रमात कॉलेजांनी सहभागी करावे. या उपक्रमातून संकलित होणारे निर्माल्यापासून कॉलेज व्यवस्थापनाने कॅम्पसमध्ये सेंद्रीय खताची निर्मिती करावी. जेणेकरून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कॉलेजांचा महत्त्वपूर्ण हातभार लागेल, अशी सूचना पुणे विद्यापीठाने सर्व कॉलेजांना केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात समाज प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना राष्ट्रीय सेवा योजना विभाग कॉलेजांना करीत असते. त्यानुसारच यंदाच्या गणेशोत्सवात सर्व संलग्नित व स्वायत्त कॉलेजांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम शहरात राबवावेत. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करावे. विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शहरात गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावेत. त्यासोबतच स्वयंसेवकांकडून गणेश चतुर्दशीच्या निमित्ताने शहर परिसरात गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम राबवावा. या उपक्रमातून संकलित केलेल्या निर्माल्यापासून कॉलेजांनी कॅम्पसमध्येच सेंद्रीय खताची निर्मिती करावी. या खताचा वापर कॅम्पस सुशोभिकरणासाठी करावा, अशी सूचना पुणे विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांनी निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केल्याने निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण टळणार आहे. उत्सवांच्यानिमित्ताने पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ही सूचना करण्यात आली आहे.

-------

सामाजिक उपक्रमांचे आयोजन

गणेशोत्सवाच्या काळात पोलिस यंत्रणेच्या सहकार्यासाठी रायेसोच्या स्वयंसेवकांना 'पोलिस मित्र' उपक्रमात सहभागी होण्यासाठी कॉलेजांनी प्रोत्साहित करावे. या सर्व उपक्रमांचा आणि निर्माल्यापासून तयार झालेल्या सेंद्रीय खताचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुणे विद्यापीठातील कार्यालयात कॉलेजांच्या रासेयो विद्यार्थी अधिकाऱ्यांनी जमा करावा. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या नमूद करावी. निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे छायाचित्र अहवालासोबत पाठवावे, असेदेखील विद्यापीठाने सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कॉलेजेसकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाचा आनंद ‘द्विगुणित’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरातील समर्थनगर उद्यानाच्या जागेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवावर्गाच्या मंडळाने तयारी केली. पण, स्थानिक नागरिकांनी गणेश स्थापनेस पुढाकार घेत त्यांना विरोध केला. हा वाद पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी दोन्ही मंडळांना परवानगी दिल्याने बाप्पांच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

गेल्या पंधरा वर्षांपासून येथील मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. मात्र, त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारावी यासाठी स्थानिकांनी थेट आडगाव पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापालिकेची रीतसर परवानगी असल्यामुळे या युवकांच्या मंडळाला गणेशोत्सव साजरा करता येईल. स्थानिक नागरिकांनीही परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे सांगून या वादावर पडदा टाकला.

…असा होता मुद्दा

आडगाव शिवारातील समर्थनगर परिसरातील काही युवकांनी एकत्र येऊन काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या उद्यानाच्या जागेची परवानगी मिळविली. मात्र, या उद्यानाच्या जागेची स्वच्छता, वृक्षारोपण आणि देखभाल आम्ही करीत आहोत. या युवकांना आम्ही ओळखत नसून त्यांना या परिसरात गणेशोत्सव साजरा करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते.

वाद थेट पोलिसांत

स्थानिकांच्या भूमिकेमुळे हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. त्यावर आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांनी स्थानिक नागरिक आणि गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करणारे युवक यांची बैठक घेतली. त्यात दोघांना आपापली बाजू मांडण्याची संधी दिली. तेव्हा स्थानिक नागरिकांनी हे युवक पहिल्यांदाच आमच्या भागात गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आमची गेली कित्येक दिवसांची गणेशोत्सवाची परंपरा आहे. आमच्या भागात त्यांनी वर्गणी मागू नये. उद्यानाची जागा आम्ही स्वच्छ ठेवली आहे. त्या जागेत हे युवक त्याच जागेचा वापर करणार आहेत, त्याला आमचा विरोध असल्याचे मत मांडले.

पोलिसांनी घडविला समझोता

स्थानिकांच्या युक्तिवादावर युवकांनीदेखील आम्ही याच परिसरातील रहिवासी आहोत. काही महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, तर काही नोकरी व व्यवसायात आहेत. गणेशोत्सवात चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची आम्ही तयारी केली आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविलेल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत, असे सांगितल्यावर पोलिसांनी दोघांनाही सामंजस्याने व शांततेने गणेशोत्सव साजरा करण्याचे सांगून हा वाद मिटविला.

०००००००

राजकीय मंडळे 'अंतर्धान'

--

सिडकोत १४५ मंडळांकडूनच गणेशाची स्थापना

--

--

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको आणि इंदिरानगर या दोन्ही भागात आतापर्यंत शेकडो मंडळांची परंपरा असताना यंदा केवळ १४५ मंडळांनीच गणेशाची स्थापना केल्याचे दिसून आले. राजकीय मंडळांची संख्या घटल्याने ही स्थिती उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चाहूल आणि महापालिकेत आयुक्त मुंढे यांच्या कारभाराने त्रस्त झालेल्या राजकीय नेत्यांनी श्रीगणेशाची स्थापना करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दर वर्षी सिडको आणि इंदिरानगर परिसरात शेकडो गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना होत असते. त्यात अनेक मंडळे राजकीय नेते किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्यांचीच असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदा ही परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसत आहे.

सिडकोतून केवळ ९२ गणेश मंडळांनीच परवानगी घेतली असून, त्यातही अनेक मंडळे पारंपरिक आहेत. त्यामुळे राजकीय वरदहस्त असलेली मंडळे यात नसल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती इंदिरानगर परिसरात असून, इंदिरानगर परिसरातीलही अनेक राजकीय नेत्यांनी गणेशाची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. केवळ निवडणुका असल्या, तरच गणेशाची स्थापना करून, कार्यक्रम घेऊन किंवा स्पर्धा घेऊन नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हे राजकीय नेते करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिक निवडणुकीवर मदार!

अजून किमान तीन वर्षे तरी महापालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार नाही. त्याचबरोबर सध्या महापालिका आयुक्तांच्या खाक्याने राजकीय नेते काहीसे मागे सरकल्याचे दिसून येत आहे. स्थानिक निवडणुका नसल्याने यंदा गणेशाची स्थापना करणारी मंडळे कमी प्रमाणात दिसून येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स कंपनी संचालकाला गंडा

$
0
0

हज यात्रेच्या तिकिटांचे पावणे दोन कोटी घेऊन पोबारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हज आणि उमराह यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या ७३९ मुस्लिम भाविकांसाठी विमान प्रवासाचे तिकिटे घेऊन त्याचे पैसेच संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीकडे न भरल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल पावणे दोन कोटींच्या फसवणूक झाल्याने संबंधित ट्रॅव्हल्स कंपनी संचालकांनी मुंबई नाका पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला असून तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल मतीन महम्मद अजिज मणियार, अजिज बनेमिया मणियार (दोघेही रा. ७०१, पॅरेडाईज हाईट्स, वडाळा रोड, नाशिक), जावेद हनिफ शेख (रा. बीएमसी बँकेसमोर, सेक्टर-२, वाशी, नवी मुंबई) आणि समीर मणियार (रा. आदमशाह दर्ग्यासमोर, जुने नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. अजिज आणि अब्दुल हे पिता-पुत्र असून संशयित समीर हा त्यांचा नातलग आहे. पूर्वनियोजित कट रचून फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा या सर्व संशयितांवर दाखल करण्यात आला आहे. अशफाक रमजान पठाण (वय ३२, रा. निराला बंगला, दीपालीनगर) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे कैफियत मांडली आहे. त्यांचा शर्मा मंगल कार्यालयाजवळ भागीदारीत अल खैर नावाने टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. हज आणि उमराह येथे मुस्लिम बांधवांना जाता यावे यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली. त्याअंतर्गत सुरुवातीला ३० हजार रुपये भरले की वर्षभराच्या आत विमानाद्वारे या यात्रेला घेऊन जाण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. संबंधित चार संशयितांनी पठाण व त्यांच्या भागीदारांचा विश्‍वास संपादन करून तब्बल ७३९ भाविकांसाठी त्यांच्याकडून तिकिटे घेतली. या तिकिटांचे एक कोटी ७५ लाख ११ हजार ३३८ रुपये अदा करण्यासाठी त्यांना धनादेश देण्यात आला. परंतु, तो बँकेत वटला नाही. तिकिटे देऊनही पैसे न मिळाल्याने पठाण यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी संबंधितांकडे पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला. परंतु, ही रक्कम घेऊन संशयितांना पोबारा केला आहे.

अन्यत्रही फसवणुकीचा अंदाज

मोठ्या रकमेचा अपहार असल्याने हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयितांना अटक केली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी गुरुवारी दिली. देशभरात या पद्धतीने अनेक मुस्लिम भाविकांची मोठी फसवणूक झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजत गाजत आले गणराय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात गुलालाची उधळण अन ढोल ताशांच्या गजरात नाशिककरांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. गणरायांचे स्वागताने नाशिककनगरी भारावून गेली. गणेशोत्साला सुरुवात झाल्याने वातावरणात चैतन्य संचारले असून, अवघे शहर गणेशमय झाले आहे. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पुढील १० दिवस गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.

लाडक्या गणपती बाप्पांची वाट पाहणाऱ्या भक्तांनी गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. सकाळी बाप्पांची स्वारी भक्तांसोबत घरोघरी विराजमान होण्यासाठी निघाली. गणरायांचे स्वागत करण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. गणेशमूर्ती घेतल्यावर गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पांच्या नामाचा जयघोष केला जात होता. शहरात सर्वत्र घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आली. नेहमीप्रमाणे यंदाही घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. 'आले आले हो गणराज आले' म्हणत प्रत्येक जण लाडक्या दैवताला घरी घेऊन गेले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे स्वागत दुपानंतर करण्यात आले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असल्याचे दिसले. सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील गणेश मंडळांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू होता. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणरायाच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पांच्या आगमनाने शहरात नवचैतन्य संचारले होते.

भक्तांची झुंबड

विघ्नहर्त्याला घरी नेताना आबालवृद्धांचा उत्साह अधिक होता. दुपारी गणेशमूर्ती नेण्यासाठी भक्तांची बाजारात झुंबड उडाली होती. शहरातील मिठाईच्या दुकानात बाप्पांसाठीचा नैवेद्य खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा, धूप, अगरबत्ती यासह पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी देखील भक्तांची गर्दी झाली होती. गणेशोत्सावाच्या खरेदीसाठी भक्तांच्या तुफान गर्दीने शहरातील बाजारपेठांचे रस्त फुलले होते.

पारंपारिक वाद्याला पसंती

डीजे वाजविल्यास कारवाई करण्यात येणार असल्याने यंदा गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. शहरातील महत्वाच्या गणेश मंडळांसह उपनगरातील गणेश मंडळांनीदेखील ढोलताशा पथकांना आमंत्रित करत श्रींची मिरवणूक काढली. त्यामुळे यंदा बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुकीत डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती देण्यात आल्याचे दिसले. दुपारनंतर मंडळांच्या मिरवणुकांनी शहरातील परिसर गजबजला होता. गणेश मंडळांनी केलेल्या रोषणाईमुळे संध्याकाळी शहरातील सर्व रस्ते उजळून निघाले होते. ढोलताशांचा गजरात बाप्पांचा जयघोष करण्यात विशेषतः तरुणाईचा उत्साह अधिक होता.

विलोभनीय गणेशमूर्ती

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा अधिक कल आहे. त्यामुळे शाडूच्या मातीच्या विलोभनीय गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अलंकारांसहित बाप्पांची मूर्ती खरेदी करण्याकडे भक्तांचा कल होता. त्यामुळे गणरायाचे रूप अधिक आकर्षक दिसत होते.

बाप्पांची 'सोशल' वारी

बाप्पांचे घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे स्वागत धूमधडाक्यात करण्यात आले. शहरातील या चैतन्यमय वातावरणात सोशल मीडियावरही बाप्पांची स्वारी ऐटीत असल्याचे दिसून आले. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होत होता. बाप्पांच्या विविध रुपांचे फोटो शेअर केले जात होते. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत क्लिक केलेले सेल्फी पोस्ट केले गेले. बाप्पांच्या नैवेद्यासाठीच्या रेसिपी देखील व्हॉटसअॅपवर शेअर केल्या गेल्या. यासह शहरातील मानाच्या गणेशमूर्तींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले गेले.

पोलिसांचे चोख नियोजन

गणेशमूर्ती खरेदीसाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्वत्र नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतरत्र पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रस्त्यावर मोठी वाहने लावण्यास मनाई करण्यात येत होती. गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात दंग असलेल्या नाशिककरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख नियोजन केल्याचे दिसले.

अधिक वृत्त- २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सव काळात बंदोबस्ताला ‘विघ्न’!

$
0
0

प्रलंबित मागण्यांवरून होमगार्ड समिती आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात गणपती, नवरात्र व इतर काळात कोणताही बंदोबस्त करणार नाही. आमच्या अनेक मागण्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार दरबारी आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे होमगार्डच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कोणताही होमगार्ड सणोत्सवात बंदोबस्तासाठी जाणार नाही, अशी भूमिका राज्याच्या होमगार्ड विकास समितीने जाहीर केली आहे.

सर्व सण उत्सवांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त शहरात असतो. यासाठी होमगार्ड कर्मचारी व अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य पोलिस यंत्रणेला असते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवासाठी होमगार्ड कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची संपू्र्ण धूरा फक्त पोलिस यंत्रणेकडेच आहे. अनेक वर्षांपासून राज्यभरातील सर्व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सरकारकडून या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे होमगार्ड कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. होमगार्डच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत कोणताही बंदोबस्त होमगार्ड करणार नाही, असे महाराष्ट्र राज्य होमगार्ड विकास समितीने जाहीर केले आहे.

होमगार्ड कर्मचारी व अधिकाऱ्यांना बंदोबस्ताचे वाटप करताना ऑनलाइन पद्धतीचा वापर होऊ नये. ऑफलाइन पद्धतीनेच बंदोबस्ताचे वाटप व्हावे, काही कारणास्तव कामावरून कमी केलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करावे, होमगार्ड कर्माचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी वय वर्षे ६० मर्यादा व्हावी तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमितपणे काम द्यावे. दर तीन वर्षांनी होणारी होमगार्डची पुनर्नोंदणी प्रक्रिया बंद व्हावी, एकदा होमगार्ड म्हणून नोंदणी झाल्यास त्या कर्मचाऱ्यास कायम सेवेत ठेवावे. तसेच पोलिसांप्रमाणे होमगार्डला वेतन लागू व्हावे, आदी मागण्यांचा प्रस्ताव होमगार्ड विकास समितीने सरकार दरबारी सादर केला आहे. दोन ते तीन वेळा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीला बोलावण्यात आले. पण, नियोजित तारखेस समितीसोबत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही. त्यामुळे बंदोबस्त न करण्याचा निर्णय होमगार्ड विकास समितीने घेतला आहे, अशी माहिती होमगार्ड विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद तेलंग यांनी दिली.

स्वयंसेवकांची घेणार मदत

नाशिक जिल्ह्यात सुमारे तीन हजार होमगार्ड आहेत. यामधून तेराशे होमगार्डची बंदोबस्तासाठी नाशिक पोलिस यंत्रणेकडून मागणी करण्यात आली. होमगार्ड कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बंदोबस्तासाठी नकार दिला. त्यामुळे गणेशोत्सावात नाशिक पोलिस आयुक्तालय, ग्रामीण पोलिस यांसह प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे. सोबतच सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत बंदोबस्तासाठी घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशस्वी उद्योजगतेच्या मिळाल्या तरुणाईला टिप्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'भावनिक व्यवस्थापन.... यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली' या विषयावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे 'आयमा'च्या सभागृहात कार्यशाळा झाली. यामध्ये प्रशिक्षक बी. जी. तुषार यांनी इफेक्टिव्ह पब्लिक स्पिकिंग, इंटरपर्सनल स्किल्स, निगोसिएशन स्किल्स, पर्सनल इफेक्टिव्हनेस याविषयाबाबत चित्रफितीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, कार्यकारिणी सदस्या दीपाली चांडक व 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार, जनरल सेक्रेटरी ललित बूब, 'आयमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, योगिता आहेर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर भूमिका स्पष्ट केली. प्रेमलता मिश्रा यांनी प्रशिक्षक तुषार यांचा परिचय करून दिला. आयमाचे अध्यक्ष तलवार यांनी तुषार यांचा सत्कार केला. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. दीपाली चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले चेंबरच्या सचिव विनी दत्ता यांनी सूत्रसंचालन केले. ललित बूब यांनी आभार मानले. कार्यशाळेत महाराष्ट्र चेंबर व आयमाचे सदस्य, संदीप फाऊंडेशनचे विद्यार्थी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेक्टर ऑफिसवर आज चर्मकार महासंघाचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी (दि. १४) मोर्चा काढण्यात येणार आहे. बी डी. भालेकर मैदान, शालीमार येथून सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा सीबीएस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संत रविदास महाराजांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची सर्व कर्जे माफ करावी, महामंडळाला नवीन भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, महामंडळाच्या वतीने दहा लाखपर्यंतची कर्जे विनाजामीन द्यावीत, चर्मकार आयोग स्थापन करावा, महाराष्ट्रात चर्मकार समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपीस कठोर शासन करावे, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे, नांदेड जिल्ह्यातील सरस्वतीबाई बनसोडे पानभोसी तसेच सांगली जिल्हातील सविता संतराम सोनवणे या दोन्ही खुनाच्या घटनांची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत. मोर्चात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे अवाहन प्रदेश सचिव दत्तात्रय गोतिसे, जिल्हाध्यक्ष खंडेराव गांगुर्डे, जिल्हासंपर्क प्रमुख आनंदा महाले, मनोज म्हैसधुणे, सिताराम जाधव, रेश्मा वाकचौरे, संगीता शेळके, प्रमोद नाथेकर, मंगला पवार, राज मोंढे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयीन सहकारी पतसंस्थेची सभा संपन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखेडकर सभागृहात पार पडली. सभेत जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख सूर्यकांत शिंदे, जिल्हा न्यायाधीश-१ पी. आर. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-३ यू. एम. नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एस. बुक्के, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, महाराष्ट्र-गोवा वकील परिषदेचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, वकील संघ नाशिकचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांसह इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. पतसंस्थेच्या सभासदांना कर्जावरील व्याजदर नऊ टक्कांवरून आठ टक्के करणे, मृत सभासदांच्या वारसदारांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत वाढ करणे तसेच गंभीर आजाराप्रसंगी देण्यात येणाऱ्या मदतनिधीतही वाढ करणे, असे निर्णय सभेत घेण्यात आले. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त सभासदांनाही पतसंस्थेतर्फे गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

श्री गणेशाचे आगमनाच्या आधीच येवला शहरातील बाजार तळानजीकच्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरातील बाप्पाच्या दानपेटीवरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरातील लोखंडी दानपेटी चोरून नेण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (दि.१२) सकाळी समोर आला.

मेनरोडवरील कै. केशवरावजी पटेल मार्केटसमोर जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर म्हणजे शहरातील असंख्य नागरिकांसाठीचे आराध्य दैवत. शहरातील अनेक नागरिकांसह व्यावसायिकही गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय दैनंदिन कामकाजाला सुरुवात करीत नाही. याच मंदिरातील दानपेटी बुधवारी चोरट्यांनी लंपास केली. मंदिराशेजारील रहिवाशी असलेले धान्य व्यापारी प्रदीप ठाकूर बुधवारी सकाळी नित्यनियमाप्रमाणे मंदिराचे गेट उघडण्यासाठी गेले असता त्यांना गेटचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम काबरा व इतरांशी संपर्क साधला. घटनेची परिसरातील नागरिकांसह शहर पोलिसांनी देखील मंदिराकडे धाव घेतली. लोखंडी दानपेटीच्या वरील कळसाचा पितळी भाग अज्ञात चोरट्यांनी मंदिरानजीक तोडून फेकून दिला. दानपेटी मात्र परिसरात कुठेही आढळून आली नाही. दानपेटी दरमहिन्यातील चतुर्थीनंतर उघडण्यात येते. या महिन्यातील चतुर्थी काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यामुळे दानपेटीत किती ऐवज होता हे समजू शकले नाही.

चोरट्यांकडून तिसऱ्यांदा मंदिर 'लक्ष्य'

श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरातील ऐवजावर चोरट्यांनी तिसऱ्यांदा हात मारल्याचे बोलले जात आहे. या गणपती मंदिरात सन १९८० ते ९० च्या दशकात चोरट्यांनी चक्क मंदिरातील बाप्पाच्या डोक्यावरील चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला होता. पुढे काही वर्षांपूर्वी मंदिरातील लाकडी दानपेटी चोरीचा प्रकार समोर आला होता. आता अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील लोखंडी दानपेटी चोरून नेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भांडी धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार महिलांचा बंधाऱ्यात बुडून करुण मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच बेळगाव ढगा येथील शिंदे कुटुंबावर विघ्न कोसळल्याने गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये मनीषा अरुण शिंदे (वय ४०), वृषाली अरुण शिंदे (१९), ऋतुजा अरुण शिंदे (१६), आरती नीलेश शिंदे (वय २८) यांचा समावेश आहे. या घटनेत पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूमुळे अरुण शिंदे यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गणेशाची स्थापना झाल्यावर घरात मुबलक पाणी नसल्याने अरुण शिंदे यांच्या पत्नी मनीषा, मुलगी ऋतुजा, वृषाली व मोठी वहिनी आरती भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. भांडी धूत असताना अचानक आरती नीलेश शिंदे यांचा पाय घसरून त्या बंधाऱ्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मनीषा व त्यांच्या दोन्ही मुली गेल्या असता त्यांचाही बुडून करुण मृत्यू झाल्याने बेळगाव व पिंपळगाव बहुला शिवारात हळहळ व्यक्त होत आहे. सातपूर पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

चिमुकलीच्या रडण्याने मिळाली माहिती

बेळगाव शिवारात सरकारने उभारलेल्या बंधाऱ्यात घरात भांडी धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह चार जणी पाण्यात बुडल्यानंतर तेथे गुंभाडे वस्तीवर राहणाऱ्या एका बालिकेने पाहिले. या बालिकेच्या रडण्याच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांना माहिती मिळाली. पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बंधाऱ्यातील गाळात अडकलेल्या चारही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात वाजतगाजत गणेशाचे स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘तुच सुखकर्ता....तुच दु:खहर्ता’ श्री गणेशाचे धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. महिला-युवती, बालकांसह वृद्धांनी वाजतगाजत मिरवणूक काढत गणेशाचे स्वागत केले. शहरातील ठिकठिकाणच्या चौकात लहान-मोठ्या आकाराच्या गणपती मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासून कुटुंबांसह बाजारपेठेत हजेरी लावली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून आपआपल्या मंडळाकडे जाताना दिसत होते. शहरासह जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे व अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला आहे.

मानाचा खुनी गणपती मिरवणूक
जुने धुळे परिसरातील मानाच्या खुनी गणपतीचे फुल-हारांनी सजविलेलया पालखीत आगमन झाले. या वेळी भजनी मंडळांनी टाळ, मृंदगांच्या तालावर गणरायाचे नामस्मरण करीत स्थापना केली. शहरातील हजारो भाविकांनी या पालखीचे दर्शन घेतले. तसेच भगवे फेटे घालून लेझीमच्या तालावर गणरायाचे युवक-युवतींकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नंदुरबारमध्ये १३० वर्षाची परंपरा
नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून, येथील गणेशोत्सवाला सुमारे १३० वर्षांची परंपरा लाभली आहे. शहरातील प्रमुख चौकासह ठिकठिकाणी मानाचे गणपती आहेत. त्यात दादा, बाबा, काका, तात्या, मामा, भाऊ असे गणपती आहेत. यात नवसाचे व मानाचे दादा, बाबा, काका व तात्या गणपती हे मातीचे बनविण्याची परंपरा आजही मंडळांनी कायम राखली आहे. नंदुरबारचा गणेशोत्सव म्हटला म्हणजे विविध आरासांचे सादरीकरण केले जाते. तसेच ढोलताशांसह लेझीम नृत्याचा नजराणाही याठिकाणी वेगळा असतो. नंदुरबारला मानाच्या दादा व बाबा गणपतींची हरिहर भेटीने या गणेशोत्सवाला आणखी मोठे महत्त्व प्राप्त होते. शहरात आकर्षक गणपती मूर्ती मूर्तिकारांकडून बनविण्यात येत असल्याने दरवर्षी जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील गणेश मंडळांकडून गणपती मूर्तींची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येतो. गेल्या महिन्यांभरापासून प्रतीक्षा असलेल्या लाडक्या बाप्पाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात वाजतगाजत सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपतींचेही स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात काँग्रेसचा आज मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राफेल खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्यासंदर्भात आज (दि. १४) सकाळी ११ वाजता काँग्रेस भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या या मोर्चा आयोजनासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार निरीक्षक म्हणून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे. आज (दि. १४) सकाळी वाजता काँग्रेस भवन येथून मोर्चास सुरुवात होणार असून, हा मोर्चा जमनालाल बजाज रोड, आग्रा रोड, कराचीवाला खुंट, महापालिकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात येईल. या मोर्चात माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, डॉ. हेमंत देशमुख, आमदार डी. एस. अहिरे, आमदार काशीराम पावरा, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, किशोर पाटील, किसनराव खोपडे, देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, योगेश भोये, साबीर शेख, हाजी इस्माईल पठाण, शकील अन्सारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर व शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइस्क्रीमच्या काड्यांपासून बनविले मंदिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर येथील संजय क्षत्रिय या गणपतीवेड्या कलाकाराने या वर्षीही आइस्क्रीमच्या ५ हजार ५०० काड्यांचे ७ फूट बाय १० फूट उंचीचे गणेश मंदिर तयार केले आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी चार महिने अवधी लागला असून, रोज सहा ते सात तास काम करीत ते पूर्ण केले आहे. या मंदिराच्या कामासाठी पाच किलो फेविकॉल लागले आहे.

मुख्य मंदिराला पाच इंच आकाराचे गोलाकार खांब आहेत व दुसऱ्या दोन मंदिरांना ४ इंच आकाराचे चौरस खांब आहेत. या मंदिराचा घुमट अतिशय सुरेख असा तयार करण्यात आला असून, त्यावर षटकोन, चौकोन, गोल, चांदणी अशा प्रकारच्या आकारांची कलाकुसर करण्यात आली आहे. घुमट तयार करताना सात तासांत केवळ १ इंच काम होत असे. हे मंदिर पूर्णपणे ७४ पार्टमध्ये विभागले गेले आहे. याची महिरप व झुंबर आइस्क्रीमच्या काड्यांपासूनच तयार केली आहे. मंदिराला चारही बाजूंनी कोट तयार केला आहे. मंदिराला नऊ पायऱ्या आहेत. तीन मोठे घुमट व १५ कळस आहेत. हे मंदिर पूर्णपणे काड्यांवर उभे केले असून, पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा एकाही वस्तूचा वापर केलेला नाही. आइस्क्रीम काड्यांची दोन फूट गणेश मूर्ती चार दिवसांत तयार करण्यात आली आहे.

संजय क्षत्रिय यांनी २१ वर्षांत पाव इंच ते तीन इंचापर्यंत शाडू माती व डिंकापासून सुमारे ३० हजार गणेशमूर्ती हाताने तयार केल्या आहेत. नाचणारे, वाद्य वाजवणारे, फेटेवाले, पुस्तक वाचतानाचे असे गणपती तयार केले आहेत. ८१ गणपतीची दहीहंडी अशा विविध गणपतीच्या मूर्ती त्यांच्या संग्रही आहेत. या सर्व कलाकृतींना त्यांची पत्नी वंदना व मुलगी पूजा व अक्षदा यांचे सहकार्य मिळाल्याचे ते सांगतात.

काड्यांपासून गणपतीही

४ बाय ४ इंच आकाराच्या बॉक्समध्ये श्री गणेशाच्या ७२ मूर्ती चिकटविण्यात आल्या आहेत. तसेच एका बॉक्समध्ये ५१ गणपती ठेवण्यात आले आहेत. आइसक्रीम काड्यांचा वापर करून दोन फुटांचा गणपती तयार केला आहे. त्याच काड्यांपासून खुर्ची तयार केली आहे. हे मंदिर १४ ते १९ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. मंदिरासाठी राजेंद्र पगार यांच्याकडून आइस्क्रीम काड्या पुरविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस उत्पादकांचे पैसे घरपोच देणार

$
0
0

आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१७-१८मध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे पैसे धनादेशाद्वारे देण्यास प्रारंभ झाला असून, लवकरच सर्व ऊस उत्पादकांचे पैसे घरपोहोच दिले जातील, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

वसाकाला मागील गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पदकांचे पैसे अदा करण्याचा कार्यक्रम गुरुवारी १३ रोजी वसाका कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ऊस उत्पादकांना धनादेश वाटप करण्यात आले. वसाकाचा सन २०१८-१९ चा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न आतापासून सुरू असून, ऊस उत्पादकांचे पैसे तत्काळ देण्याबरोबरच २५० ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी कामगारांना पैसे अदा करण्यात आले आहेत. अजून १५० ऊस वाहतूकदारांचा करार केला जाणार आहे तसेच वसाकाने गळीत हंगामासाठी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती धाराशिव साखर करण्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी यावेळी दिली. सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांना काट्यावरच तत्काळ पैसे उपलब्ध करून दिले जातील, अशीही ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

सध्यस्थितीत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ऊसपुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे धनादेश देण्यात आले असून पुढील ऊस उत्पादकांचे पैसे पंधरवाड्याच्या टप्प्याने तात्काळ अदा केले जातील, असेही अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले. वसाकाला पुनर्गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर कारखान्याशी निगडित असलेल्या सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून वसाका व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले. यावेळी संचालक धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, संतोष मोरे, अण्णा पाटील, महेंद्र हिरे, विलास निकम, बाळासाहेब बिरारी, राजेंद्र भामरे, यशवंतराव देशमुख, नंदकुमार खैरनार आदींसह ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट चावडी आज चित्रपट

$
0
0

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आज 'पेशन्स स्टोन'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत आज (१५ सप्टेंबर) सायंकाळी ६. ३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतिकी रहिमी यांचा 'पेशन्स स्टोन' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. २०१२ मध्ये अफगाणिस्तान येथे प्रदर्शित झालेल्या या पर्शियन चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कादवा गौरव पुरस्कार जाहीर

$
0
0

धनराज महाले यांचा राजकीय, तर विलास शिंदे कृषी उद्योजक पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि जनसामान्यांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यानिमित्ताने यथोचित गौरव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी विजयकुमार मिठे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सह्याद्री फार्मच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असलेले विलास शिंदे यांना कृषी उद्योजकता, राजकारणात सातत्याने सक्रीय राहून जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारे माजी आमदार धनराज महाले यांना राजकीय, व प्रा. डॉ. वेदश्री थिगळे (साहित्य), माधवराव पाचोरकर (कृषीपूरक व्यवसाय), प्रशांत कापसे (सांस्कृतिक), डॉ. विलास देशमुख (वैद्यकीय), भाऊसाहेब कांडेकर (प्रशासकीय), सुनील देशपांडे (सामाजिक), सचिन वडजे (शैक्षणिक), संतोष कथार (पत्रकारिता) यांना कादवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून, ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकरराव गायकवाड, सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता अभियानास आजपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रावसाहेब सभागृह येथे होणार आहे.यावेळी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थितीती राहणार आहे.

अभियानात जिल्हास्तरीय कार्यशाळा, सर्व तालुका स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, स्वच्छतेविषयक चित्ररथ, १७ सप्टेंबर रोजी सेवा दिवसपासून सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत श्रमदान मोहीम राबविणे, २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र स्वच्छता दिवस, तसेच स्वच्छतेची शपथ घेणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, कोरडा दिवस पाळणे, हातपंप स्वच्छता व दुरुस्ती, परिसर स्वच्छता, ग्राम स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, शाळा व अंगणवाडीमधील स्वच्छता, पर्यटन स्थळांची स्वच्छता, नाले सफाई, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छ भारत दिवस पाळणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींचा सहभाग

अभियानासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अभियानात सहभाग असणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावरून संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

८० गावात विशेष श्रमदान

राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर ८० गावात आयोजित असून स्वच्छ सर्वेक्षण १८ प्रमाणे स्वच्छता ही सेवा मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.

स्वाक्षरीचे परिपत्रक

स्वच्छतेबाबत व्यापक जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक सर्व विभागांना देण्यात आले आहे.या अभियानात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईसत्र कायम

$
0
0

कामचुकारपणी जिल्हा परिषदेतील पुन्हा पाच कर्मचाऱ्यांना दणका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक व नाशिक तालुक्याच्या आढावा बैठकीत आठ जणांवर निलंबनाची कारवाईनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा पाच कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. कर्तव्यात कसूर करणे, विविध कामात अनियमितता करणे, अनधिकृत गैरहजर राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळल्याने कारवाई केली जाणार आहे.

या कारवाईमध्ये लाडची (ता. नाशिक) येथील तत्कालीन ग्रामसेवकास सक्तीने सेवानिवृत्त, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकास सेवेतून बडतर्फीची नोटीस, इगतपुरी तालुक्यातील शिक्षकाची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद तर दोघा अन्य कर्मचाऱ्यांना खातेचौकशी करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

सक्तीची सेवानिवृत्ती

नाशिक तालुक्यातील लाडची ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक मोठाभाऊ भामरे यांच्यावर अनधिकृत रजेवर राहण्याची कारवाई केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या सभांचे इतिवृत्त न लिहिणे, बजावण्यात आलेल्या नोटिसीचा अशासकीय स्वरुपात खुलासा सादर करणे याबाबत विभागीय खातेनिहाय चौकशी अगोदर झाली होती. त्यात दोषी आढळून आल्याने जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नियमानुसार त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले.

वेतनवाढ बंद

अनधिकृत गैरहजर राहणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करणे अशा विविध बाबतीत खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन त्यात दोषी आढळलेल्या घोटी येथील उर्दू शाळेतील शिक्षक मोहम्मद इरफान मुख्तार अहमद यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. सुरगाणा येथील कहानडोळपाडा शाळेतील शिक्षक मनोहर गायकवाड यांनाही सेवेतून बडतर्फ करण्याबाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

खातेनिहाय चौकशी

ग्रामपंचायत तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून न देणे, प्राप्त अनुदानाचा तात्पुरत्या स्वरुपात अपहार व अनियमितता करणे, अपूर्ण घरकुल पूर्ण न करणे या कारणामुळे कळवण तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक सुनील यादव यांना खातेचौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अनधिकृत रजेवर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे आदी कारणांमुळे सुरगाणा तालुक्यातील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी मंदोदरी पाटील यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images