Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विरोधकांकडून अल्टिमेटम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्तारूढ भाजपने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून सर्वपक्षीय नगरसेवकच आता टार्गेट झाल्याने विरोधी पक्षांनीही अविश्वास प्रस्तावास पाठिंबा देण्याची मानसिक तयारी केल्याचे चित्र आहे. मुंढे यांनी करवाढ सरसकट रद्द करून हेकेखोरपणा न सोडल्यास अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला जाईल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व काँग्रेस गटनेते शाहु खैरे यांनी मुंढे यांना अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मुंढे यांच्यावर दबाव वाढला आहे.

भाजप आणि तुकाराम मुंढे यांच्यात करवाढीवरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहिर केली आहे. सत्तारूढ भाजपकडून मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून हेतूपुरस्सर रित्या लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी ठरवले जात आहेत. त्यांना कर्तव्यदक्ष आयुक्त नकोत, अशा पद्धतीने सोशल मीडियावर नगरसेवकांच्या बदनामीचे सत्र आरंभले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. वास्तविक नाशिककरांवर अवाजवी करवाढ लादली जाऊ नये. आयुक्त मुंढे यांनी काढलेले करवाढीचे आदेश सरसकट रद्द करण्यात यावेत ही शिवसेना, कॉँग्रेस, मनसेची गेल्या अनेक दिवसांची मागणी असून, आयुक्त मुंढे यांनी त्याची दखल घेतलेली नाही. या करवाढीमुळे सर्वसामान्य नाशिककर, शेतकरी, शिक्षण संस्थाचालक, व्यापारी, उद्योजक सर्वच भरडले जाणार आहेत. त्यामुळेच या सर्वांकडूनच मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यात येत आहे. सामान्य नाशिककरांवरील अन्यायकारक करवाढ शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळेच शिवसेनेने सर्वपक्षीय लढा उभारला होता. आतातरी आयुक्त मुंढे यांनी हेकेखोरपणा, करवाढीचा बालहट्ट सोडून नाशिककर व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करून सरसकट करवाढ मागे घ्यावी अन्यथा आम्हीही अविश्वास प्रस्तावास पाठिंबा देऊ, असा इशारा बोरस्ते, खैरे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅप्टन पत्नीचे उपोषण सुरूच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्टेट बँकेकडून फॅमिली पेन्शनची माहिती मिळावी यासाठी सैन्य दलातील कॅप्टनच्या ६४ वर्षीय पत्नी मंदोधरा कापडणीस यांनी आपल्या मुलासह सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू होते. माहिती दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने कापडणीस परिवारासह माजी सैनिकांनीही संताप व्यक्त केला आहे.

कॅप्टन मनोहर कापडणीस यांच्या मृत्यूनंतर त्यांना अगोदर मिळालेली कमी पेन्शन व त्यानंतर दिलेली तफावत यामुळे त्यांनी पेन्शनसंबधी कागदपत्रांची मागणी केली आहे. पण, बँक ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची त्यांची तक्रार आहे. सातपूर येथील स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर मुलासह मंदोधरा कापडणीस यांनी सुरू केलेल्या उपोषणाला भारतीय माजी सैनिक संघ, विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी उपोषणापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली. पण, तीन दिवस उलटूनही त्यांची मागणी मान्य न केल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कापडणीस यांनी कायम ठेवला आहे. बँकेच्या आवारातच त्यांनी एका बाकड्यावर उपोषण सुरू केले तर याच ठिकाणी त्यांनी मंडप टाकला आहे. आता मंडप काढून टाकावा, उपोषण मागे घ्यावे, यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप कापडणीस कुटुंबीयांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींना खोटी माहिती पडली महागात!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खोटी माहिती भरून सरकारची दिशाभूल करणाऱ्या ९४ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दणका दिला आहे. या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे या शिक्षकांना आता बदलीसाठी पर्याय (विकल्प) भरता येणार नाही. त्यामुळे त्यांना अवघड क्षेत्रात काम करावे लागणार असल्यामुळे खोटी माहिती या शिक्षकांना चांगलीच महागात पडली आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांची ऑनलाइन प्रक्रियेद्वारे बदलीप्रक्रिया पूर्ण केली. मात्र, यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या आहेत अथवा बदलीतून सूट घेतली, अशा एकूण १९४ शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली होती. त्यात ९४ शिक्षकांचा खुलासा अमान्य करून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यात नमूद केले आहे, की शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीप्रक्रियेत जिल्ह्यातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती-पत्नी एकत्रीकरण याबाबत खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व १९४ शिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या. त्या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेविषयी, तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात आल्या होत्या. यापैकी १०० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी ९४ शिक्षकांचा खुलासा अमान्य करण्यात आला असून, त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

काळ्या यादीत समावेश

दोषी ठरलेल्या या शिक्षकांचा आता काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ९४ शिक्षकांव्यतिरिक्त अजून १५ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे खेळाडूंचा सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. गडकरी चौकातील कालिका माता मंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जिजामाता पुरस्कार प्राप्त श्रीमती शैलजा जैन, छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड, आनंद खरे, संतोष कडाळे, डॉ. महेंद्र महाजन, अंबादास तांबे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनिका आथरे, आदित्य आष्टेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते मान्यवर खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

आ्रंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू खंडू कोटकर, स्पेशल ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेला स्वयंम पाटील तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू किसन तडवी, कांतीलाल कुंभार, निकीता काळे, रोशनी मुर्तडक, विनायक वाडीले, रवी शिवलाल, अन्यय आत्रा, जागृती शहारे, मुकेश राजगुरे, तुषार कडवे, मृग्मई सालगावकर, मयंक धामणे, स्वानंदी वालझाडे, वेदांत अडसरे राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू जयश्री टोचे तसेच २०१८-१९ मधील ८७ पदक विजेता खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रीय यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप खिल्लारे यांनी मानले. या प्रसंगी क्रीडा मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे, शशांक वझे, मकरंद देव, नितीन हिंगमिरे, ‍सविता बुलंगे, दिलीप दिघे, आरती हळींगळी, क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, रेखा परदेशी, प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जागर

0
0

शहरात कार्यक्रमांची रेलचेल; स्वामीनारायण स्कूलतर्फे रॅली

……म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद सांभाळून अनेकदा विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी पंचवटीत क्रीडा रॅली काढण्यात आली. सकाळी नऊ वाजता या रॅलीला आडगाव नाक्यापासून सुरुवात करण्यात आली. पंचवटी कारंजापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत शाळेतील विद्यार्थांनी विविध खेळांचे प्रदर्शन केले.

स्वामीनारायण स्कूलमधून सकाळी नऊ वाजता निघालेल्या रॅलीला मुख्याध्यापिका अस्मिता पटेल यांनी हिरवा कंदील दाखवला. नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, निमाणीमार्गे पंचवटी कारंजापर्यंत ही रॅली काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, स्केटिंग, ढोल, झांज अशा विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन करून नागरिकांना खेळाची माहिती देत होते. रॅलीच्या प्रारंभी शौर्याचे प्रतीक असणारे घोडेस्वार ध्वज घेऊन सहभागी झाले होते. क्रीडा रॅली यशस्वी करण्यासाठी संस्थेचे स्वामी ज्ञानपुराणी महाराज, प्रशासक माधवस्वामी महाराज, मुख्याध्यापिका अस्मिता पटेल, क्रीडा शिक्षक, संदीप पाटील, अर्चना नाटकर, विनायक पारवे, आकाश आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.

शिक्षकांचा हॉकी सामना

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिला शिक्षकांचा हॉकीचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. याचबरोबर मुलांचा कबड्डी व डॉजबॉलचा सामना खेळविण्यात आला. रॅलीच्या मार्गात येणाऱ्या विनाहेल्मेट वाहनचालकांचे यावेळी प्रबोधन करण्यात आले. वृक्षसंवर्धनाबाबत जगजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात बॅनर घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांचा रस्त्यांना वेढा!

0
0

सातपूर, अंबड परिसरात वाहनचालकांची कसरत; डागडुजीलाही वेळ नाही

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व सत्ताधारी एकमेकांच्या अगदी विरोधात आहेत. परंतु, यात सर्वसामान्य वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. सातपूर व अंबड परिसरातील मुख्य रस्त्यांना खड्डंयानी वेढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सहाजिकच खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून वाहनचालकांना कसरत करूनच वाहने चालवावी लागत आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी किमान खड्ड्यांच्या दुरूस्तीचे आदेश बांधकाम विभागाला द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, सातपूर व अंबड एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरून कामगारांना वाहने चालविणे जणू शिक्षाच झाली आहे. रोजच कामावर जाताना व कामावरून घरी परतताना याच खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

संघर्षामुळे कामे खोळंबली

महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे आल्यापासून अनेकविध गोष्टींना चाप लावला आहे. तसेच महापालिकेची कामे करणाऱ्या ठेकेदारांनादेखील केवळ काम असेल तरच महापालिकेत यावे असे आदेशित करण्यात आले होते. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणीच ठेकेदाराला पूर्णवेळ थांबावे लागत आहे. पर्यायाने महापालिकेने दिलेले कामही वेळेवर होत आहे. नगरसेवकांनी सुचविलेली कामे आयुक्त मुंढे करत नाहीत, असा आरोप सातत्याने केला गेला. तसेच नागरी कामे होत नसल्याने प्रभागातील मतदारांचा नगरसेवकांवर नाराजीचा सूर सभागृहात अनेक नगरसेवकांनी मांडला. यामुळे आयुक्त मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत पहायला मिळत असून, त्यामुळे कामेही खोळंबली आहे.

दरम्यान, महापालिकेत सुरू असलेल्या वादात सर्वसामान्य नागरिकांना खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. शिस्तबद्ध असलेले आयुक्त मुंढे यांनी शहरातील सर्वच रस्त्यांची पाहणी करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची किमान दुरुस्ती कामे करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातपूर व अंबड एमआयडीसीत सर्वाधिक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळा संपल्यावर रस्त्यांची नवीन कामे केली जाणार आहे. परंतु, यात किमान खड्डेमय झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती महापालिकेच्या बांधकाम विभागाने करावी, अशी मागणीही होत आहे.

याठिकाणी खड्डेमय रस्ते...

आयटीआय पुलापासून, खुटवडनगर ते थेट प्रणय टँपिंगपर्यंतचा रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची चाळणच झाली असल्याने खडतर प्रवास करण्याची वेळ येते. अंबड गावाला लागून अगदी बस थांब्याच्याच समोर मुख्य रस्त्याला खड्डे पडले आहेत. अंबड एमआयडीसीत लेअर कंपनीसमोर, एक्स्लो कंपनीला लागून, गॅस्को स्मितलाइन कंपनीसमोर असे अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांना वेढा घातला आहे.

शहरातील नागरिकांची अर्थवाहिनी असलेल्या सातपूर व अंबड एमआयडीसीतील प्रवास खडतर बनला आहे. खड्ड्यांनी रस्त्यांना वेढले असल्याने कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना जपून प्रवास करण्याची वेळ येते. महापालिकेने किमान खड्ड्यांची दुरूस्ती केली पाहिजे.

-दीपक गहिवाल, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट दस्ताद्वारे २६ कोटींची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जमिनीचे बनावट दस्त तयार करून त्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का मारून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक वदीप्रसाद जैस्वाल, अखिलेश वदीप्रसाद जैस्वाल आणि श्रीमती संतोष वदीप्रसाद जैस्वाल अशी या संशयितांची नावे आहेत. याशिवाय बजाज फायनान्स लिमिटेडमधील अधिकारी आणि संबंधित संचालकांचाही संशयितांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनंत केशव राजेगावकर (वय ५३, रा. मॉडेल कॉलनी, नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ७ एप्रिल २०१० ते १३ मे २०१५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी राजेगावकर यांची भेट घेऊन सातपूर औद्योगिक वसाहतीमधील बॉटल सम्राट कंपनी खरेदी करण्याची तयारी दर्शविली. २५ कोटींना व्यवहार ठरला. संशयितांनी त्यांना पुढील तारखांचे आयसीआयसीआय बँकेचे धनादेश दिले. मात्र, ते बँकेत वटलेच नाहीत. त्यामुळे राजेगावकर यांनी कोर्टात धाव घेतली. तोपर्यंत संशयित जैस्वाल यांनी नमूद क्षेत्राचा बनावट दस्त तयार करून घेतला. एचडीएफसी बँकेत पूर्ण भरणा केल्याचा बनावट दस्त तयार करून त्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का मारून त्या दस्ताच्या आधारे बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कर्ज घेतले. २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांचे एकूण कर्ज घेऊन या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. के. गुंजाळ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माती-पाणी परीक्षण कमी खर्चात

0
0

शेतकी संघाच्या सभेचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शेतकऱ्यांच्या हितासाठी माती आणि पाणी परीक्षण गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी लागणार खर्च मोठा असल्यामुळे संस्थेच्या जागा खासगी लॅबसाठी देऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय नाशिक तालुका शेतकी संघाच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

जनार्दन स्वामी आश्रमात येथे शेतकी संघाचे अध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेस बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती मीरा लभडे, भाऊसाहेब भावले, दिनेश म्हस्के, उत्तमराव पेखळे, भाऊसाहेब शिंदे, भाऊसाहेब ढिकले, बाळकृष्ण हांडोरे आदी उपस्थित होते.

संघाचे बाजार समितीत केंद्रीय कार्यालय असून या कार्यालयामार्फत संघाच्या डेपोवर नियंत्रण ठेवले जाते. संघाचे पंचवटी, गिरणारे, भगूर, नांदूरनाका येथे विक्री केंद्र सुरू केलेले आहेत. नांदूर नाका येथे स्वमालकीची जागा घेऊन तेथे भाडेपट्टा कराराने असलेल्या विक्री डेपो स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्याचे ध्येय ठेवले आहे. तसेच संघाच्या केंद्र कार्यालयाचे हिशोब संगणकीकरण करण्याचे काम पूर्णतः झालेले आहे. त्याचप्रमाणे गिरणारे येथील संस्थेच्या मालकीची ३० गुंठे रिकामी जागा विकसित करण्याचे ध्येय आहे. त्र्यंबक विद्या मंदिर येथे संस्थेचा नवीन डेपो सुरू करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली. सभेत मागील वर्षाची प्रोसिडिंगचे वाचन करण्यात आले. अहवाल व आर्थिक पत्रके वाचून मंजूर करण्यात आले. मंजूर अंदाजापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देण्यात आली. २०१८ - १९ या वर्षासाठी बाहेरून कर्ज उभारण्याची मर्यादा ठरविण्यात आली.

संस्थेने लॅब सुरू करावी

महाराष्ट्रातील बहुताशी सहकारी संस्था डबघाईस आलेल्या असताना नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाने उत्कृष्ट काम केल्याने ही संस्था नफ्यात आहे. शेतात खतांची मात्रा देणे सोयीचे होत नसल्यामुळे संस्थेने माती व पाणी परीक्षणाची लॅब सुरू करावी, अशा सूचना सभेच्या मांडऱ्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राईम

0
0

मूर्तीची विटंबना

मनमाड : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे श्रीदत्ताच्या मूर्तीची विटंबना घडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. हनुमान मंदिर भागात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणलेल्या दत्ताच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे सकाळी सहा वाजता काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काही काळ संतापाचे वातावरण पसरले. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी नंदकुमार आहेर याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज असून मूर्ती विटंबना आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना हवे तुमचे पाठबळ

0
0

दादा भुसे यांचे बँकांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकाकडून शेतकऱ्यांना मिळणारी कर्ज, अनुदान याबाबत बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे. येत्या १५ दिवसात बँक अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहावर शहर व तालुक्यातील विविध बँक अधिकारी, प्रतिनिधी व महसूल प्रशासन यांची बुधवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत भुसे बोलत होते. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कर्जमाफी, पीक कर्ज, मुद्रा योजना, महिला बचत गट खाती आदी विषयांवर भुसे यांनी आढावा घेतला. यावेळी प्रांत अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, सहकार उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, अग्रणी बँकेचे भरत बर्वे आदींसह बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत कर्जमाफी योजनेद्वारे किती शेतकऱ्यांना लाभ झाला, किती पिक कर्जाचे वाटप करण्यात आले याची आकडेवारी १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना भुसे यांनी केल्या. बैठकीस स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदाचे प्रतिनिधी नसल्याने भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शासनाच्या योजनांचे अनुदान कर्ज खात्यावर वर्ग न करता ते शेतकऱ्यांना रोख रकमेच्या स्वरुपात द्यावे, असे देखील आदेश त्यांनी दिले. शहर व तालुक्यातील महिला बचत गटांची खाती उघडण्यास बँक टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली. त्यावर येत्या आठवड्याभरात सर्व बचत गटांचे बँक खाते उघडण्याचे आदेश दिले. येत्या १५ दिवसात नव्याने बैठक घेवून झालेल्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचे भुसे यांनी पत्रकरांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव डेंग्यू आणि लीड जोड

0
0

दोन महिन्यांत १३ डेंग्यूसदृश्य रुग्ण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात डेंग्यूने डोके वर काढले असून, दोन महिन्यात १३ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले. यातील पाच रुग्णांच्या रक्त तपासणीनंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी दिली. शहरातील पूर्व भागात नेहमीच स्वच्छतेबाबत उदासीनता पाहायला मिळत असल्याने वर्षभर विविध साथीच्या आजाराने रुग्ण आढळून येतात. त्यात आता डेंग्यूच्या आजाराने देखील डोके वर काढले आहे. सध्या हे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे डांगे यांनी सांगितले. डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या १३पर्यंत गेली असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील सामान्य रुग्णालयात यासाठी सहा खाटांचे अती दक्षता विभाग आहे. त्यात तेरा रुग्णांचे रक्तनमुने धुळे, नाशिक व पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील ८ रुग्णांना मात्र डेंग्यू नसल्याचे निष्पन्न झाले. पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरात औषध फवारणी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वेळीच उपाय न झाल्यास डेंग्यूचा धोका वाढू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. पालिकेकडून याबाबत उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

00

लीड जोड

विकासासाठी हवेत मुंढे

मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहराचा विकासाचा अनुशेष कित्तेक वर्ष भरून निघालेला नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी मालेगावला न मिळणे हे देखील त्याचे एक कारण असल्याचा सूर या निमित्ताने सोशल मीडियावर उमटत आहे. गेल्या वर्षभरात मात्र शहराने हागणदारीमुक्त शहर, 'अमृत' शहरांच्या यादीत येण्याचा मान पटकावला आहे. शहर विकासाच्या प्रश्नी धडाडीने निर्णय घेण्याच्या मुंडेंच्या कार्यशैलीचे मालेगावच्या ग्रुपवर कौतुक होत असून मालेगावच्या विकासासाठी मुंढेसारखा कर्तव्य दक्ष अधिकारी हवा! अशा भावना व्यक्त करीत मुंढेना पाठिंबा दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८६ खेळाडूंचे रक्तदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान ही आपली सामाजिक जबाबदारी असून, प्रत्येक खेळाडूने व तंदुरुस्त नागरिकांनी स्वेच्छेने व नियमित रक्तदान करणे महत्वाचे आहे. मुलींनीही रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहावे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिरात डॉ. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या रक्तदान शिबिरात नाशिक शहर व जिल्ह्यातील सुमारे ३८६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार,अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी दरेकर, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलाने झाली. हॉकीचे जादूगार भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद आणि स्वर्गीय डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी प्रास्ताविक करताना क्रीडा आणि आरोग्य यांचं जवळच नातं असल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रात मविप्रच्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. आर. डी. दरेकर, प्रा. हेमंत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करीत क्रीडा दिन आणि मविप्रत क्रीडा विषयक सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील मविप्रच्या विविध महाविद्यालयातून आलेले खेळाडू, शिक्षक, क्रीडा शिक्षकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित रक्तदान केले. राष्ट्रीय क्रीडा दिन रक्तदान करून साजरा करण्याचा आदर्श मविप्रने उभा केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. मिलिंद देशपांडे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अर्चना पाटील यांनी करून दिला. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रीती बजाज, सर्व विभागप्रमुख आदींसह जिल्हाभरातील खेळाडू, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जागतिक नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला विद्यार्थी सुलतान देशमुख, रविंद्र कडाळे आणि क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ केला. क्रीडा संचालक प्रा. दिलीप गायकवाड, रक्तपेढीच्या डॉ. अर्चना पाटील, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, प्राचार्य. डॉ. जे. डी. सोनखासकर, वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा संचालक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण देणाऱ्यांनाच पाठिंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरक्षणाचे गणित गेल्या ७० वर्षात आघाडीच्या सरकारला सोडवता आले नाही. सध्याचे सरकारही यामध्ये अपयशी ठरताना दिसते. सत्ताधारी असो वा इतर राजकीय पक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीही ठाम भूमिका मांडत नाहीत. त्यामुळे समाजात प्रत्येक राजकीय पक्षावरील विश्वास कमी होऊ लागला आहे. मातंग समाजाकडे वेळोवेळी दुर्लक्ष झाल्याने मातंग समाज हक्काच्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरू लागला आहे. मागासवर्गीय आरक्षणात अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करावी या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. जो राजकीय पक्ष या आंदोलनाच्या समर्थनार्थ मातंग समाजाच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याच्यादृष्टीने आश्वासित करेल त्या पक्षाच्या बाजूने आगमी निवडणूकीत सकल मातंग समाज खंबीरपणे उभा राहिल, असे संकेत माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी दिले.

सकल मातंग समाजाच्या वतीने मागासवर्गीय आरक्षणात अ,ब,क आणि ड वर्गवारी करावी, क्रांतिवीर लहुजी साळवे आरोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२९ ऑगस्ट) रोजी गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे बोलत होते. ते म्हणाले, एक दिवस जातीसाठी म्हणत सकल मातंग समाज एकवटला आहे. समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी राज्यभरात आंदोलने उभारली जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मातंग समाजाला कायम दुर्लक्षित केले गेले आहे. आता मातंग समाज मागे हटणार नाही. फक्त आश्वासित करणारे राजकीय पक्ष आम्हाला नकोसे झाले आहेत. जो राजकीय पक्ष आमच्या मागण्या पूर्ण करेल त्याच्या बाजूने २०१९ च्या निवडणूकांमध्ये सकल मातंग समाज मतदान करेल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मातंग समाजाच्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघावे असे आवाहन ढोबळे यांनी केले.

समाजातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

माझ्या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या बी. एड, डी. एड आणि लॉ अभ्यासक्रमांसाठी मातंग समाजातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली फक्त ओळख सांगावी. समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यरत राहणार असल्याचे आश्वासन प्रा. ढोबळे यांनी समाज बांधवांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहेडीत भरदिवसा एक लाखाची घरफोडी

0
0

दागिन्यासह रोकड लंपास

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे ७५ हजाराचे दागिने आणि शेतीच्या कामासाठी ठेवलेली २५ हजाराची रोख रक्कम असा तब्बल एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार बुधवारी (दि. २९) सकाळी साडे दहा ते सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान घडला. घरफोडीचा हा प्रकार अत्यंत गजबजलेल्या परिसरात घडल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

घरफोडीबाबत दिगंबर दत्तू सातपुते (वय ३२, रा. विश्वेश्वराय अपार्टमेंट, म्हाडा वसाहतीजवळ, चेहेडीगाव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर सातपुते हे पत्नी आरती यांच्यासोबत नाशिकरोडला खरेदी करण्यासाठी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता गेले होते. खरेदी आटोपून सव्वाअकरा वाजता पुन्हा घरी आले असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. सातपुते यांना घरात चोरीचा प्रकार उघडकीस आला. कपाटात ठेवलेली तीन तोळे सोन्याची पोत, नऊ ग्रॅमचे कानातील झुबे असा ७५ हजाराचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज आणि शेतीच्या कामासाठी घरात ठेवलेले २५ हजार रुपये असा १ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले. सातपुते यांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती देऊन अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीचा हा प्रकार अत्यंत गजबजलेल्या परिसरात आणि भर दिवसा घडल्याने चेहेडी परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रात्री उशिरा या घरफोडीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबतर्फे रविवारी शाडू गणपती कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून 'रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे रविवारी, दोन सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ यावेळेत शाडू गणपती कार्यशाळा होणार आहे.

शहरात गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांकडून पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनविले जातात. पर्यावरण जागृतीच्या उद्देशाने कार्यरत असलेली रोटरी क्लब प्रयत्नशील आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची नंतर होणारी विटंबना या उत्सवाचे पावित्र्य आणि मांगल्य नष्ट करणारी असते. गणेश मूर्तीचे पावित्र्य राखले जावे, या उद्देशाने रोटरी क्लबतर्फे दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची कार्यशाळा घेत आहे. शहरातील डॉ. श्रीया कुलकर्णी आणि स्नेहा वाणी या कार्यशाळेत मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.

गणपती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती संस्थेतर्फे पुरविण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्यासोबत पाट किंवा पुठ्ठा, पेपर, पाण्याची बाटली आणणे आवश्यक आहे. कार्यशाळेस तयार केलेला गणपती वाळल्यानंतर त्यास रंग कसा द्यायचा, हेही सांगितले जाणार आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्वाचे महत्त्व आणि सजावटसुद्धा कशी असावी, हे दृक-श्राव्य स्वरूपाच्या माध्यमातून सांगणार आहेत. अधिक माहितीसाठी सुधीर वाघ यांच्याशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, मंथ लीडर मृदुला बेळे, उन्मेष देशमुख आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजयाची आनंद अन् पराभवाची सल

0
0

विजयाची आनंद अन् पराभवाची सल

इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन गेममध्ये कबड्डीत इराणच्या मुलींच्या संघाने भारतीय मुलींच्या संघाला हरवून सुवर्णपदक पटकावले. इराणसारख्या संघाला कबड्डी हा खेळ नवखा असला तरीही या विजयामागे नाशिकच्या शैलजा जैन यांचा मोलाचा वाटा होता. त्या या संघाच्या प्रशिक्षिका आहेत. इराणच्या संघाला प्रशिक्षण देताना त्यांचा काय अनुभव होता त्यांच्याशी केलेली बातचीत...

इराणमध्ये प्रशिक्षकपदी जाण्याचा निर्णय कसा झाला

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी म्हणून मी नोकरी करीत होते. पूर्वीपासूनच कबड्डी माझा आवडता खेळ. क्रीडा अधिकारी असताना शहरातील शिवाजी स्टेडियम, यशवंत व्यायाम शाळा, गर्ल्स हायस्कूल, पुष्पावती कन्या शाळा, रचना विद्यालय येथे मी प्रशिक्षक म्हणून काम केले. दिल्ली येथे २००८ मध्ये इराणमधील मुलींच्या कबड्डी संघाच्यासाठी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती झाल्या ती मी दिली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. माझ्या निवृतीनंतरचा वेळ मला कबड्डीच्या कोचिंगसाठी द्यायचा होता, मला एखाद्या शाळेने कोचिंगसाठी बोलावले असते तरी मी गेले असते. सुदैवाने मला इराणकडून बोलावणे आले. क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना हो सांगितले. जाताना एकच अट होती माझ्या कामात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही. ते त्यांनी मान्य केले. तेथील फेडरेशनने मला मोकळीक दिली आणि मग मी कामाला सुरुवात केली. २०१७ च्या जानेवारी मध्ये मी इराणला गेले.

प्रशिक्षणचे शेड्युल्ड कसे होते

इराणला गेल्यानंतर दीड वर्षांत तुमची टीम तयार करुन देईन असे सांगितले. त्यासाठी ८ महिने मी तीथे वास्तव्य करून होते. या काळात भाषेची, जेवणाची अडचण होती. त्यांचे काही शब्द समजायचे, काही समजत नव्हते हातवारे करुनच कम्युनिकेशन करावे लागत होते. काही कालावधीनंतर मी थोडीफार इराणी भाषा शिकले. या संघात एक मुलगी अतिशय अस्खलित हिंदी बोलायची, तिला विचारले तुला इतके चांगेल हिंदी कसे येते. ती म्हणाली, 'मी शहारुख खानचे चित्रपट पाहते.' तिच्या संवाद साधता येत असल्यामुळे भाषेचा प्रश्न मिटला होता. रोज सकाळी सात वाजता प्रशिक्षणाला सुरुवात व्हायची सकाळी ७ ते ८ फिटनेस, १० ते १२ कबड्डीचा सराव, १२ ते १ स्विमिंग संधायाकाळी पुन्हा ५ ते ७ कबड्डीचा सराव त्यानंतर विविध प्रकारचे मोटीव्हेशनल व्हिडीओ बघणे. सामन्यांचे शूट केलेले व्हिडीओ पाहून काय चुका होतायेत याचा अभ्यास करणे असा दिनक्रम होता. काही वेळा समुद्राच्या पाण्यात देखील सराव करून घेतला.

इतर देश कबड्डीत प्रगती करतायेत का‌?

कबड्डीत आपल्याला कुणी हरवू शकणार नाही असा भारतीय संघाचा समज होता, मात्र आता तो फोल ठरतोय. कोरिया, थायलंड, तैवान या देशानेही कबड्डीत प्रगती केली आहे. आपल्याकडे सामन्याच्या दोन महिने अगोदर तयारी केली जाते. इतर देशांमध्ये मात्र संपूर्ण वर्षभर तयारी होते. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचे फिजीकल फिटनेस ट्रेनर आहेत. इराणच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या मुलींकडे प्रचंड फिटनेस आहे. फक्त त्यांना टेक्निक समजावून सांगणे गरजेचे होते. ते मी प्रामुख्याने केले. इराणने मला ४५ मुली दिल्या होत्या. त्यातील १८ मुली या शेवटपर्यंत खेळविल्या.

भारतीय कबड्डी बद्दल काय सांगाल

आपल्याकडे एकंदरीतच सर्वच खेळांबद्दल अनास्था आहे. आपला सर्व भर हा शिक्षणावर आहे. खेळाला दुय्यम स्थान दिले जाते ते कुठे तरी हे बदलायला हवे, असे मला वाटते. प्रशिक्षकांनाही हवे तसे काम करू दिले जात नाही . त्याच्यावर दबाव असतो त्यामुळे रिझल्ट येऊ शकत नाही. बाहेर तुम्ही यश मिळवल्यानंतर आपल्या देशात आपण मोठे होतो. कबड्डीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकवेळ अशी येईल की बाहेरच्या देशाकडून तुम्हाला प्रशिक्षक बोलवावा लागेल. हॉकीसारखा खेळ आपण गमवून बसलोय. वेळीच सावध झालो नाही तर कबड्डी देखील आपल्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

शेवटी सामन्याच्या वेळी परिस्थिती कशी होती

भारतीय संघाची कमतरता काय आहे हे मला माहीत होते. त्या तुलनेत इराणचा संघ काय करू शकतो हे देखील माहीत होते. इराणी मुली या ब्लाइंड गेम खेळत होत्या. आदल्या दिवशी कोरीया, बांग्लादेश बरोबर सामना झाला तो जिंकला होता. त्यानंतर एक सामना हरला. हाच हरलेला सामना आम्हाला विजयाकडे घेऊन गेला. शेवटच्या वेळी कव्हर कुठे आहे, आपल्याला कोणत्या डावाने खेळायचे आहे. हे त्यांच्या मनावर बिंबवले. मेडल आपलेच आहे हे त्यांना ठासून सांगितले. ज्यावेळी विजय मिळाला त्यावेळी एकीकडे माझा संघ विजयी झाल्याचा आनंद होता तर मी ज्या देशातून आले त्या देशाला हार पत्करावी लागते याचे दु:ख मनात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातंग समाजाची वज्रमूठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, संविधानाचे रक्षण करावे यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजबांधव बुधवारी रस्त्यावर उतरले. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकल मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने साद देण्यात आली होती. जिल्ह्याच्या विविध भागांतून शेकडो वाहनांनी बांधव सकाळपासूनच गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाले. 'जय लहुजी' लिहिलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेऊन मोर्चाला सुरुवात झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. तेथे साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बी. डी. भालेकर मैदानाजवळ मोर्चा विसर्जित करण्यात आला. त्यानंतर शेकडो आंदोलकांच्या वतीने शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या पिवळ्या झेंड्यांनी लक्ष वेधले. तेथे युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये म्हटल्यानुसार, मातंग समाजातील व्यक्ती तसेच मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजूर शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी, साठे महामंडळाचे भाग भांडवल वार्षिक एक हजार कोटी रुपये करण्यात यावे, साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, मातंग समाज, मांग-गारूडी समाजाचे सर्व्हेक्षण करून त्यांना दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे, वस्ताद साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, सर्व अत्याचाराच्या प्रकरणांची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात राजू वैरागर, संतोष अहिरे, यू. के. अहिरे, सचिन नेटारे, सुनील अहिरे, अशोक साठे, यशवंत शिरसाठ, राजू कांबळे, गोपाळ बस्ते, साहेबराव श्रृंगार, ओंकार सपकाळे, सूर्यकांत भालेराव, विठ्ठल नाडे, अनिल निरभवणे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे कामाला गती द्यावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच 'एमओयू' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा रेल्वेमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा खरे तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धताही फारशी नाही. त्यामुळे पुणे-नाशिकची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक- पुणे नियोजित लोहमार्ग २४८ किलोमीटरचे अंतर अवघ्या अडीच तासांत पार केले जावे, असे नियोजन आहे. यामुळे सध्या ट्रॅफिकमुळे लागणारा सहा तासांचा वेळ निम्म्यावर येऊ शकेल, तसेच प्रवासी वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन इंधन बचत होईल. यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाणही घटेल. रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेची निर्मिती होईल. त्यामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पर्यावरणविषयक फायदे मिळतील, असेही पत्रात सांगण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने आता नवीन कोचेस २२० किलोमीटर प्रतितास धावण्याच्या क्षमतेचे आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्याने ते अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर सर्वेक्षण, भूसंपादन, तसेच निविदा कार्यवाही याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन होणे अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी व प्रकल्पांची कामे सत्वर सुरू करण्याचा दृष्टीने याबाबत स्थानिक पातळीवर सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे आपल्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे महाजन यांनी केली आहे.

उद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प

नाशिकसाठी महत्त्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड या १२४ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे कामही प्रस्तावित आहे. यामुळे इगतपुरी आणि मनमाड या दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच तिसरा व महत्त्वाचा नाशिकचा मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरातून जाणार असून, तो नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे, असा आशावाद वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोष जनतेच्या माथी!

0
0

डेंग्यूप्रश्नी आरोग्य सभापतींचा अजब दावा; दंडात्मक कारवाईचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात साथीच्या आजारासंह डेंग्यूने थैमान घातले असून डेंग्यूबाधितांचा आकडा ११४ वर पोहचला आहे. मात्र, साथीच्या आजार व डेंग्यूचे खापर आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी नाशिककरांवरच फोडले आहे. शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीस लोकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा अजब दावा करीत डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या घरात आढळल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. परंतु, स्थायीने अजून या ठरावाला मंजुरी न दिल्याने कारवाई कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.

सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य समितीची सभा बुधवारी झाली. यावेळी डेंग्यूसंदर्भातील आकडेवारी सादर करण्यात आली. शहरात आतापर्यंत ११४ डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळले असून साथींच्या आजारांनीही थैमान घातले आहे. समिती सदस्या शोभा साबळे, प्रतिभा पवार, नयन गांगुर्डे, रुची कुंभारकर यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमधील अस्वच्छता आणि असुविधांकडे लक्ष वेधताना डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाविषयी नाराजी व्यक्त केली. शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाविषयी सदस्यांनी आक्षेप नोंदविताना प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराविषयी तीव्र शब्दांत टीकास्त्र डागले. संतोष गायकवाड यांनी प्रभागात डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचे कर्मचारी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. डासांचा प्रादूर्भाव वाढलेला असताना आरोग्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून अधिकारी नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे देतात, ऑनलाइन तक्रारी केल्यावरच निराकरण केले जाते. नगरसेवकांच्या सूचनांना महत्त्व दिले जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचे काम समाधानकारक नसल्याचे नमूद करीत ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कारवाई करणार कशी?

डेंग्यू डासांची उत्पत्ती घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात होते. बदनामी मात्र महापालिकेची केली जाते. त्यामुळे डेंग्यू निर्मूलनासाठी प्रबोधनाबरोबरच ज्या घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होताना आढळून येईल, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश सभापतींनी दिले. तर हा प्रस्तावच स्थायीवर अडकून पडल्याने कारवाई कशाच्या आधारे करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, २१० कर्मचाऱ्यांमार्फत शहरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. घराचे छत व परिसर, भंगार, टायर्स, फ्रीज, कुलर्स, झाडाच्या कुंड्या, नवीन बांधकामे, टायर्स दुकाने येथील स्वच्छ पाणी काढण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे.

महापौरांचा प्रभाग डेग्यूबाधित

शहरात ऑगस्टमध्ये ११४ रुग्ण आढळून आले असून त्यातील ६० टक्के रुग्ण दहा प्रभागांमध्ये आहे. यात सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ व १०, पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एक व दोन, पूर्व विभागातील २३ व ३०, नाशिकरोड विभागातील २० व २१ सिडको विभागातील २५ व ३१ या प्रभागांमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली. प्रभाग क्रमांक एक हा महापौर रंजना भानसी यांचा आहे. महापौरांच्याच प्रभागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने टीका होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन बातम्या एकत्र

0
0

जलसंपदा आगीबाबत

महावितरणला निवेदन

कळवण : तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या पुनद डावा व उजवा कालव्याच्या दोन्ही कार्यालयात लागलेल्या आगीची निःपक्षपातीपणे चौकशी करून लवकर अहवाल द्यावा, अशा मागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने महावितरणचे उप कार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांना देण्यात आले. जलसंपदा विभागाच्या दोन्ही कार्यालयात आग लागते तरी कशी? असा प्रश्न उपस्थित करीत ही आग लागली नसून लावण्यात आली आहे, असा आरोपही छावा संघटनेने केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप पगार, उप-तालुकाध्यक्ष देवा भुजाडे, शहर अध्यक्ष सागर पगार, युवा तालुका अध्यक्ष चेतन पगार, हर्षद पगार, गौतम पगार, योगेश पगार उपस्थित होते.

00000

टायर चोरणाऱ्यांना अटक

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर व मुंबई-आग्रा महामार्गावर विश्रांतीसाठी उभ्या केलेल्या ट्रकचे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टायर चोरणाऱ्या चार जणांना घोटी पोलिस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तपास पथकाने जेरबंद केले. या चोरट्यांकडून दीड लाखाचे टायर जप्त केले आहे.

घोटी येथील व्यावसायिक मंगेश कडू यांचा ट्रक (एमएच १९ झेड ४७१४) सिन्नर फाट्याजवळ उभा असता अज्ञात चोरट्यानी या ट्रकचे चारही चाके चोरी केल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हा शाखेने कसून तपास केला. पोलिस निरीक्षक अशोक कर्पे, उपनिरीक्षक एस. के. नाईक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुरुळे, हवालदार ठाकरे आदींच्या पथकाने या चोरीचा छडा लावला. यात भगवान उर्फ चड्डा किसन भोर, दीपक बाबुराव सोनवणे, जाकीर मोहमद मनियार (रा. घोटी) व जालिंदर रामनाथ शिरसाट यांना ताब्यात घेतले. या चौघांनी चोरीची कबुली देत व सदरचे टायर मुसळगाव येथे विक्री केल्याची कबुली दिली. दरम्यान तपास पथकाने मुसळगाव येथून टायर ताब्यात घेतले असून टायर विकत घेणाऱ्या सोमनाथ सुधाकर भागवत यालाही ताब्यात घेतले आहे.

0000

'कैलास'चे खातेदार वाऱ्यावर

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील कैलास नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेले ऑडिट तीन आठवडे झाले तरी संपलेले नाही. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त होवून देखील नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरिक्षण तपासणी अहवाल मिळाल्यावर बघू, अशी भूमिका घेतल्याने ठेवीदारांमध्ये संताप होत आहे. दोन आठवड्यांपासून पतसंस्थेचे व्यवहार बंद होते व त्यानंतर अल्पबचत ठेवीदारास अवघे चार हजार रुपये देण्यात येत आहेत.

२० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असूनही 'कैलास नागरी'मधील गैरव्यवहाराबाबत ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने खातेदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. संचालक मंडळातील जबाबदार पदाधिकारी काही दिवस शहराबाहेर निघून गेले होते. ते आता शहरात परतले आहेत. मात्र त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

या संस्थेचा कथित गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा एका कर्मचाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला. त्या कर्मचाऱ्याने मालेगाव येथे आत्महत्या केली. हे प्रकरण पोलिसात गेले व त्यानंतर चार पाच दिवसात एका संचालकाचा अल्पशा आजाराने झालेला मृत्यू या प्रकरणाचे गांभीर्य वाढविणारे ठरले आहे. कथित घोटाळाप्रकरणी २० दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नाही. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असताना ५ दिवसांपासून अल्प बचत ठेवीदारांना चार हजार रुपये देऊन मलमपट्टी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य खातेदार पैसे मिळतील या आशेने गर्दी करीत आहे. परंतु येथील दोन चार कर्मचारी वगळता पतसंस्थेचा कोणताही जबाबदार अधिकारी नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

चार हजारांसाठी रांगा

श्रावण महिन्यात व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून हातावर पोट असलेल्या व्यवसायिकांनी पोटाला चिमटा घेत या पतसंस्थेत बचत केली होती. परंतु आता अवघे चार हजार रुपये मिळत असल्याने आणि त्यासाठीही सकाळपासून थांबावे लागत असल्याने खातेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images