Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुटुंबांमध्ये पुरुषांइतकीच महिलांची भूमिका मोलाची

0
0

कुटुंबात महिलांची भूमिका मोलाची

अनिता पगारे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरुषांइतकीच महिलांचीही भूमिका तितकीच मोलाची असते, असे प्रतिपादन संगिनी महिला जागृती मंडळाच्या अध्यक्षा अनिता पगारे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संचलित मखमलाबादमधील आर्टस अॅण्ड कॉमर्स कॉलेजात 'लिंगभाव समानता' या विषयावर त्या बोलत होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय फडोळ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पगारे म्हणाल्या की, कुठल्याही व्यक्तीचे जन्मानंतर स्त्री किंवा पुरुष असे वर्गीकरण केले जाते. पुरुषाने केलेली कृती ही मर्दानगी म्हणून समजली जाते. तर महिलांकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. त्यामुळे धाडसाच्या व्याख्यांची पूनर्रचना करणे आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा स्त्री हे कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडते. घर सांभाळणे हे देखील कौशल्य आहे. आजही पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, महिलाही पुरुषांप्रमाणेच सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. अनुभवातून माणूस समजून घ्यावा, नाते हा एक अभ्यास आहे. आयुष्याचा निर्णय घेताना नात्यांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रियंका आहेर या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. प्रा. नलिनी बागूल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. सोनाली कतवारे यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संदीप क्षीरसागर, प्रा. विजयकुमार सोनवणे, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. छाया लभडे, प्रा. वैशाली क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सप्टेंबरमध्ये टेबल टेनिस स्पर्धा

0
0

सप्टेंबरमध्ये टेबल टेनिस स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मानांकन टेबल टेनिस असोसिएशन आयोजित दुसरी जिल्हा मानांकन १ ते ३ सप्टेंबरदरम्यान जिमखाना, शिवाजी रोड, येथे जिमखाना, शिवाजी रोड टेबल टेनिस स्पर्धा होणार आहे. आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघात निवड होण्याकरिता स्पर्धेत सहभाग घेणे सक्तीचे आहे. या स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, युथ मुले, मुली, ज्युनिअर मुले, मुली, सब ज्युनिअर मुले, मुली, कॅडेट मुले, मुली अशा विविध दहा गटांत खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे सर्वश्री जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, पुरुषोत्तम आहेर यांच्याकडे २९ ऑगस्टपूर्वी प्रवेश फीसह संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत द्यावयाची आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी केले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव शेखर भंडारी किंवा राजेश भरवीरकर यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्याम मनोहर यांची उद्या जाहीर मुलाखत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे सुप्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांची शुक्रवारी (दि. २६) जाहीर मुलाखत घेण्यात येणार आहे. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉल येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कवी, समीक्षक, अनुवादक डॉ. चंद्रकांत पाटील हे मनोहर यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीस अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

'उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरीसाठी मनोहर यांना २००८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 'शंभर मी' या कादंबरीसाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील कुसुमांजली पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कादंबऱ्या आणि नाटकांना नाट्यदर्पण तसेच राज्य सरकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक मेळाव्यात तरुणांना सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारचे उद्योग संचलनालय, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे अनुसूचित जातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकता परिचय व प्रोत्साहन मेळावा झाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मंगळवारी आंबेडकरनगर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर हॉलमध्ये मेळावा झाला. त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र- कार्यालय परिचय, विविध सरकारी योजनांची माहिती तसेच नव्याने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक प्रोत्साहन योजना २०१६ याबाबत माहिती देण्यात आली. एच. पी. टी. महाविद्यालयातील पर्यटन व आदरातिथ्य व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रा. उमेश पठारे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडेबाजाराची दैना!

0
0

गोदावरीच्या पाण्याने आठवडे बाजार गणेशवाडीत; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्रावणसरीच्या पावसाची संततधार सुरू असल्याने, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हे वाढलेले पाणी आता गौरी पटांगण आणि म्हसोबा पटांगणावर वाहत असल्यामुळे दर बुधवारी (दि. २२) आठवडे बाजार हा गणेशवाडी रस्त्यावर भरविण्यात आला. रस्त्यावरील या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गोदकाठ मोकळा करण्यात आला आहे. नदीकिनारी असलेले छोटे-मोठे व्यावसायिकांनी आपले दुकाने (टपऱ्या) व विक्री साहित्य सुरक्षित जागी हलविले आले आहे. या वाढलेल्या पाण्याचा फटका आठवडेबाजाराला बसला आहे.

नाशिकचा आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात. धान्यांचा बाजारही हा गोदापात्रातील सांडव्यावरून थेट रोकडोबा पटांगण आणि गाडगे महाराज धर्मशाळासमोरच्या भागात भरतो. या बाजारात केवळ भाजीपालाच नाही तर विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, बाजाराच्या भागात सकाळपासून पाणी असल्यामुळे हा बाजार रस्त्यावर भरला. परिणामी, याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. एका बाजूला विक्रेते त्यांची वाहने, खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडचणी येत होत्या. वाहने अडकून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली होती ती थेट गाडगे महाराज पुलापर्यंत झाली होती.

चिखलपाणीने नागरिकांची गैरसोय

दर बुधवारी भरणारा हा आठवडे बाजार या बुधवारी गणेशवाडीच्या रस्त्यावर भरला होता. त्यामुळे नागरिकांचीही धावपळ झाली होती. या बाजारासाठी आलेल्या विक्रेत्यांना थेट अमरधामच्या रस्त्यापर्यंत बसण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत होते. गणेशवाडीच्या रस्त्यावरच बसलेल्या या विक्रेत्यामुळे गाडगे महाराज पुलावरून व गणेशवाडीकडून येणारी वाहने पुढे जाऊ शकत नव्हती. या वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे नागरिकांची व भाजी खरेदी करणाऱ्या गिऱ्हाईकांची संख्या चांगलीच रोडावली होती. पावसाच्या पाण्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलपाणी होऊन, यामुळे भाजीविक्रेत्यांनादेखील अडचणींचा सामना करावा लागत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रजांचे एकत्रित साहित्य पुस्तकरूपात

0
0

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीचा निर्णय

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'कुसुमाग्रज व्यक्ती आणि वाड्मय' या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांचे लिखित साहित्य, त्यांच्याविषयी आलेले लेख यांचे एकत्रीकरण करून ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या आजीव सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा दालनात बुधवारी घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मधु मंगेश कर्णिक होते. कुसुमाग्रज स्मारकातील जीवनदर्शन दालनाचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी ध्वनी मुद्रीत कविता, त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांच्या नाटकातील प्रवेश चित्रफितीद्वारे दाखवण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रतिष्ठानच्या सर्व माजी अध्यक्षांच्या आवाजातील तात्यासाहेबांविषयीचे मत रेकॉर्ड करून जतन करण्यात यावे, जुन्या नाटकांचे जतन करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी, यासंबंधीच्या मांडलेल्या सूचनांना सर्वांनी अनुमती दिली.

'कुसुमाग्रज व्यक्ती आणि वाड्मय' पुस्तकरूपाने छापण्यात यावे, यात कुसुमाग्रजांविषयी आलेले लेख अप्रकाशित साहित्य, पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात यावे, यासाठी डॉ. नागेश कांबळे यांची मदत घ्यावी असाही ठराव करण्यात आला.

..

केवळ ४३ सभासद उपस्थित

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे एकूण १ हजार ४० आजीव सभासदांपैकी केवळ ४३ सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. या सभेत २०१६-१७ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. सन २०१७-१८ चा अहवाल व हिशेब पत्रके मंजूर करण्यात आली. सन २०१८-१९ च्या अंदाजपत्राची माहिती देण्यात आली.

..

प्रतिष्ठानच्या ठेवी अडकल्या

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ९ लाख ३८ हजार ३६३ रुपयांच्या ठेवी श्रीराम बँकेत अडकल्या आहेत. त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी श्रीकांत बेणी यांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रतिष्ठानच्या अहवालातही या ठेवी लवकरात लवकर मिळविण्याबाबत प्रयत्न करावेत, असे सनदी लेखापालांनी सुचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींसाठी पुन्हा एल्गार

0
0

डीबीटी विरोधात एसएफआय २८ पासून छेडणार आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वसतिगृहांमधील खानावळ बंद करून विद्यार्थ्यांच्या खात्यात त्या बदलत्यात पैसे वर्ग करण्याचा (डीबीटी) सरकारचा निर्णय चुकीचा असून या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. आंदोलनास मंगळवारपासून (दि. २८) सुरुवात करण्यात येणार आहे. नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासह राज्यातही इतरत्र महाघेराव आंदोलन बेमुदत कालावधीपर्यंत छेडले जाईल, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

आदिवासी वसतिगृहांमध्ये निवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना देय असणारा नियोजित भत्ता आणि शिष्यवृत्तीच रखडवली जाते. याशिवाय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी डीबीटी योजना लागू करण्यात आली. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होत नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. असे अनुभव गाठीशी असताना डीबीटीची सक्ती करून शासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ खेळला जात आहे. शासनाच्या डीबीटीच्या निर्णयानुसार ही रक्कम देण्याची जबाबदारी आदिवासी विभागाच्या वसतिगृह प्रशासनाची नव्हे तर थेट शासनाची राहील. अगोदरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी भत्त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते, त्यातच भरीस भर डीबीटी येत असेल तर विद्यार्थ्यांनी या पैशांसाठी मुंबईत रांगा लावायच्या का, असाही सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांच्या निवासासाठी शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय इमारती, जेवणाची व्यवस्था, सुरक्षितता, आरोग्याची जबाबदारी, वसतिगृहांमधील पायाभूत व शैक्षणिक सुविधा या मुद्यांपासून पळ काढत असल्याचा आरोप संघटनेने केला. डीबीटी संदर्भातील हा निर्णय रद्द होईपर्यंत आयुक्तालयास महाघेराव घालण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सचिव बालाजी कलटेवाट, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, विलास साबळे, नवनाथ मोरे, उत्तम गावित आदींनी दिली.

विद्यार्थ्यांना संघटनेचे बळ

डीबीटीच्या विरोधात अगोदर कुठल्याही संघटनेचा आधार न घेता आदिवासी विद्यार्थी एकवटले होते. पुणे ते नाशिक या मार्गावर त्यांनी काढलेल्या मोर्चालाही पोलिसांकरवी अटकाव करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर मोठे आंदोलन छेडले होते. यानंतर पाठपुरावा करूनही हा निर्णय शासनाने रद्द केलेला नाही, आदिवासी विद्यार्थ्यांची यामुळे शासनाने दिशाभूल केली असून त्यांच्या मागण्यांसाठी 'एसएफआय'ने हे आंदोलन पुन्हा हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सटाणा तालुक्यात आत्महत्या करणारा दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून आत्महत्येस जबाबदार असलेल्या सेंट्रल बँक आॕफ इंडियाच्या शाखेतील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील पगार यांनी मंगळवारी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून सेंट्रल बँक आॕफ इंडियाच्या म्हसदी शाखेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीचा त्रास झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. संबंधित बँक अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आपण सूचना द्याव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रवीणच्या आत्महत्येमुळे पगार कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाला सरकारने भरघोस आर्थिक मदत करावी, त्याच्या भावाला विनाविलंब सरकारी नोकरीत घ्यावे, अशी मागणीही केली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या वरिष्ठांची संयुक्त बैठक बोलावून गरजवंतांची अडवणूक केली जाऊ नये, अशा सूचना द्याव्यात असेही त्यामध्ये म्हटले आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये किंवा बँक प्रशासनाकडून अडवणूक होत असेल तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी निसंकोचपणे संपर्क साधावा, असे आवाहन करण गायकर, तुषार जगताप, प्रा. उमेश शिंदे, विकास कानमहाले, संतोष माळोदे, पुंडलिक बोडके, विकास काळे, निवृत्ती शिंदे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर विद्यार्थ्यांची ताल नादातून गुरुवंदना

0
0

तबल्यावर त्रिताल, झपताल, पंचमसवारी सादर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्रिताल, झपताल अन् पंचमसवारीसह विविध ताल रचना तबल्यावर सादर करून सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांनी गुरुवंदना देत गुरुपौर्णिमा उत्सवात बहार आणली. निमित्त होते पवार तबला अकादमी आणि एसएमआरके कॉलेज यांच्या वतीने आयोजित गुरूपूजन सोहळ्याचे. कॉलेजच्या पाटणकर सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी विविध तालरचना सादर करीत विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ तबलाादक कै. पंडित भानूदासजी पवार यांना गुरुवंदना दिली.

कॉलेजचे संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. अविराज तायडे आणि अकादमीचे संचालक नितीन पवार यांच्या हस्त दीपप्रज्ज्वलन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध तालंमध्ये तबला सहवादन केले. अर्घ्य देव, लक्ष्मीपती शुक्ल, हर्षवर्धन जगताप, श्लोक दिवाण, गुरूप्रीत सिंग, दर्शिल मुंगी, चैतन्य राऊत, कैवल्य पवार, श्लोक चांगटे, श्रणोत क्षेमकल्याणी, सिद्धेश सोनार, आर्यन महाजन, शिवम शुक्ल, श्रीरंग अभोणकर या विद्यार्थ्यांनी ताल तिनतालमध्ये सहवादन सादर केले. तनिष वाघमारे, पार्थ आडगांवकर, मानस मोकाशी, पार्थ गायधनी, श्रेयांक नाशिककर, तन्मय कुलकर्णी, सार्थक पांढारकर, निकुंज अग्रवाल, ध्रुव दीक्षित, अथर्व शाळीग्राम, प्रतिक पाटील यांनी ताल झपतालमध्ये सहवादन केले.

के. के. वाघ परफॉर्मिंग आर्ट्स कॉलेजचे विद्यार्थी तेसज कंसारा, रोहित श्रीवर, आशुतोष ईप्पर, ऋषिकेश पगारे यांनी ताल त्रितालमध्ये सहवादन केले. राजेश भालेराव, सुहास बेरी, मंगेश जोशी, प्रसाद वडघुले, नितीन बरडिया, दुर्गेश पैठणकर यांनी पंचमसवारी या तालामध्ये तर वेदांत देव, प्रफुल्ल पवार, राधिका रत्नपारखी, ओंकार कोडिलकर यांनी ताल त्रितालमध्ये पारंपरिक पद्धतीने पेशकार-कायदा-रेला-चक्रधार-गत या रचना सादर केल्या. ज्येष्ठ विद्यार्थी अद्वय पवार आणि गौरव तांबे यांच्या एकल वादनास श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी सागर कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर नगमा साथ केली. एसएमआरके कॉलेजच्या संगीत विभागातील विद्यार्थिनींनी गायन-वादन सादर केले. मंगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन पवार यांनी आभार मानले.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नृत्यानुष्ठान’मध्ये रसिक मुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'सखी मन लागेना', 'कौन करत बिनती पिहरवा', 'जाती हू सजना वा मोरे घर' अशा एका पेक्षा एक बंदिशींनी परशुराम साइखेडकर नाट्यगृह बहरून गेले. निमित्त होते, पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या 'नृत्यानुष्ठान' या कार्यक्रमाच्या समारोपाचे. बुधवारी तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ उद्योजिका शोभना दातार व सारा क्रिएशन्सच्या संजना ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर नृत्यगुरू रेखा नाडगौडा यांच्या शिष्या आदिती नाडगौडा- पानसे हिने श्रीरामवंदना सादर केली 'अवध पूरक बसै धा' हे श्रीराम वंदनेचे बोल होते. परंपरेप्रमाणे वंदना, थाट, आमद असा क्रम पाळत अभिनयापर्यंतचा प्रवास सादर केला. वंदनेच्या अंतर्गत अहिल्या उद्धार, सीता स्वयंवरातील शिवधनुष्य प्रसंग, सीता हरण, शबरी, जटायूमोक्ष असे प्रसंग सादर केले. त्यानंतर अनवट ताल सादर केला. त्यात सव्वापाच मात्रांचा 'दक्षिणा' ताल प्रस्तुत केला. यात परंपरेनुसार थाट, आमद, तत्कार, तोडे, तुकडे, परण यांनी युक्त असा ताल सादर केला. अभिनयाची नृत्यरचना अश्विनी काळसेकर यांची तर तालरचना रेखा नाडगौडा व पं. जयंत नाईक यांची होती. तबलासाथ बल्लाळ चव्हाण, हार्मोनियमसाथ सुभाष दसककर, गायनसाथ आशिष रानडे, पढंत एश्वर्या पवार आणि मधुश्री वैद्य, सिंथेसायझरवर ईश्वरी दसककर यांनी साथ केली.

दुसऱ्या सत्रात बनारस घराण्याचे नर्तक पं. विशाल कृष्ण यांनी एकलनृत्य प्रस्तुती केली.शिववंदनेने सुरुवात करत त्यांनी तीनताल सादर केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या बनारस घराण्यातील विशेषता दाखवणाऱ्या अनोख्या बंदीशिंनी रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी त्यांनी राधा-कृष्णाची एक अनोखी कथा दाखवली. त्यांनी सादर केलेले थाळीवरील तत्कार हे प्रेक्षकांना अचंबित करून गेले. त्यांना तबला साथ विवेक मिश्रा, पखवाज कमल पाटील, गायन सोमनाथ मिश्रा, सितारसाथ अलाक गुजर यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पियू शिरवाडकर- आरोळे यांनी केले.

नृत्यानुष्ठान उपक्रमात कीर्ती कलामंदिराच्यावतीने विद्यार्थिनींसाठी स्पर्धा घेण्यात आली त्याचे परीक्षण अश्विनी दापोरकर आणि संजय दापोरकर यांनी केले. त्यात तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मृदुला कुलकर्णी हिला देण्यात आले. तिला चांदीचे घुंगरू देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आज लखनौ घराण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना सविता गोडबोले या नृत्य सादर करणार असून, त्यानंतर कीर्ती कलामंदीराच्या विद्यार्थिनी 'ज्यूक बॉक्स' हा नवीन प्रकार सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए पुढील महिन्यापासून

0
0

पुणे विद्यापीठातर्फे सिडकोतील मनपा शाळेत होणार श्रीगणेशा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून एमबीए अभ्यासक्रम सुरू होणार आहे. यासाठी विद्यापीठ उपकेंद्राच्या वास्तूत निश्चित करण्यात आलेली जागा आता महापालिकेच्या प्रतिसादामुळे बदलण्यात आली आहे. सिडकोतील महापालिकेच्या एका शाळेत या अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील यांनी दिली.

पाटील यांनी नाशिक उपकेंद्रासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची पुण्यात भेट घेतली. या दरम्यान कुलगुरूंनी एमबीए अभ्यासक्रमाबाबत ही माहिती दिली. एमबीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा आहे. कॅप प्रक्रियेद्वारे या अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमास मिळणाऱ्या प्रतिसादावर विद्यापीठाच्या पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतचा निर्णय अवलंबून असणार आहे. नाशिक उपकेंद्र सक्षमीकरणासाठी स्थानिक उद्योगांना चालना देणारे अभ्यासक्रम येथे आणण्याचा कुलगुरू डॉ. करमळकर यांचा मनोदय आहे. यासाठी अगोदर एमबीए अभ्यासक्रमास नाशिककर कसा प्रतिसाद देतात, यावर पैठणी आणि शेतीविषयक अभ्यासक्रमाचा निर्णय अवलंबून राहील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या कुलगुरूंनी दिली होती.

जिल्ह्यामधील पैठणी व्यवसायावर आधारित अभ्यासक्रमासह, शेतीव्यवस्थेवर आधारित वाईनरी आदी अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत. विद्यापीठाचा एमबीए अभ्यासक्रम नाशिकमध्ये सुरू करण्यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह शहराचा दौरा केला होता. अभ्यासक्रमाचा वर्ग विद्यापीठ उपकेंद्राच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील इमारतीत सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस होता. मात्र, त्यानंतर महापालिकेची मदत मिळाल्याने आता सिडकोतील शाळेत या अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा सुरू होणार आहे.

विविध प्रश्नांबाबत कुलगुरूंना साकडे

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र, उपपरिसर तातडीने सुरू करण्यात यावे. जेणेकरून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच प्रशासकीय सुविधा जसे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज, फोटो कॉपी, निकालपत्र, पात्रता प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि ट्रान्स स्क्रिप्ट इत्यादी सुविधा जिल्ह्यातील उपकेंद्रातच उपलब्ध होतील. पुण्यात हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेरून शिक्षण व संशोधनासाठी येतात, वर्तमान स्थितीत ३०० मुलींसाठी आणि जवळपास ७०० व अधिक मुलांना राहता येईल एवढ्या क्षमतेच्या अतिरिक्त वसतिगृहांची निर्मिती करावी, विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यासाठी तातडीने परिपत्रक काढावे आदी मागण्यांबाबत युवासेनेच्या वतीने कुलगुरू डॉ. करमळकर यांची भेट देऊन साकडे घालण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांचरपोळ जागेबाबत फक्त ‘चर्चा’च

0
0

नवीन उद्योगांच्या विस्तारासाठी जागेची प्रतीक्षा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड एमआयडीसी लगत असलेली पांजरपोळची जागा उद्योगासाठी मिळावी यासाठी जिल्हा उद्योग संचलनायचे सहसंचालक पी. पी. देशमुख यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक झाली. यात तहसीलदार अनुपस्थित राहिल्याने या बैठकीत केवळ चर्चाच झाली. अनेक दिवसांपासून या जागेची मागणी केली जात असून त्यात कोणताही ठोस निर्णय अद्याप न घेतल्यामुळे या जागेचा प्रश्न कायम आहे.

नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागा शिल्लक नसल्याने अनेक उद्योगांना आपला विस्तार करता येत नाही. तर काही नवीन उद्योग नाशिकला येण्यास उत्सुक असले तरी त्यांना हवी तशी जागा मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात नवीन उद्योगही आला नाही. त्यामुळे अंबड लगत पांजरपोळची ८०० एकर जागा एमआयडीसीला मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक बैठकीत त्याबाबत चर्चाही झाली. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे महसूल आयुक्तांच्या सुचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पांचरपोळ संस्थेने ही जागा स्वमालकीची असल्याचे सांगितले असून त्याची खरेदी केल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे या जागेच्या मालकीबाबत महसूलचे अधिकारी नसल्यामुळे जागेच्या मालकीचा प्रश्नही कायम राहिला. त्यामुळे या चर्चेत फारसे काही निष्पन्न झाले नाही. केवळ विविध संस्था व अधिकारी एकत्र आले त्यामुळे ही सुरुवात सकारात्मक झाल्याचे बोलले जात आहे.

बैठकीला एमआयडीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, चेंबर अध्यक्ष संतोष मंडलेचा, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाचे माजी अध्यक्ष धनजंय बेळे, मंगेश पाटणकर, तसेच पाचंरपोळचे तुषार पालेजा, सागर आगळे, उदय जोशी व अॅड. अनिल आहुजा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जमीन व्यवहाराच्या नावाखाली तिघांना तब्बल पावणे तीन कोटींचा गंडा घातल्या प्रकरणी संशयित किशोर ताराचंद पाटील (रा. महात्मानगर) याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकरणांमध्ये आणखी काही नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून याबाबत संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे यांनी केले आहे.

जगदीश माणिकचंद अग्रवाल (वय ६५, रा. कामगारनगर) यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये संशयित पाटील याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. डिसेंबर २०१२ ते ऑगस्ट २०१६ या काळात जगदीश यांचा मुलगा माधव अग्रवाल यांना ७५ एकर जागा शोधून ठेवा. आपण ती खरेदी करून एखाद्या कंपनीला अधिक दराने विक्री करू, असे आमिष संशयित पाटील यांनी दाखवले. त्या आमिषाला भुलून जगदीश व माधव अग्रवाल यांनी एक कोटी ३१ लाख २५ हजार तसेच अन्य दोघांकडील एक कोटी ३८ लाख रुपये असे एकूण दोन कोटी ६९ लाख २५ हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर संशयिताने कोणताही व्यवहार केला नाही. तसेच तक्रारदारांचे पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये पाटील यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. अटक टाळण्यासाठी पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिसांनी पाटील याला अटक केली. अशा प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता सातपूर पोलिसांनी वर्तविली आहे. पाटील याने फसवणूक केली असल्यास सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वऱ्हाडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० हजार विद्यार्थ्यांना हवा अकरावीत प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत सुमारे १४ हजार प्रवेश पूर्ण झाले असून अखेरच्या 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या फेरींतर्गत १० हजारावर विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा आहे.

'प्रथम येईल त्याला प्रवेश', या तत्वावर ही प्रवेश फेरी शनिवार, २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत ८० टक्क्यांवरील, ६० टक्क्यांवरील आणि उत्तीर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रक्रिया २ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या फेरीतील रिक्त जागांची यादी २५ ऑगस्टला जाहीर होईल. केवळ ८० टक्क्यांवरील (प्रथम वर्ग) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया २७ ऑगस्टपासून राबविली जाईल. ६० टक्क्यांवरील (द्वितीय वर्ग) विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी २८ व २९ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. उत्तीर्ण वर्ग (तृतीय वर्ग) विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी ३० व ३१ ऑगस्ट रोजी तर सर्व वर्गांच्या (प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ग) रिक्त जागांसाठी यादी २ सप्टेंबर रोजी जाहीर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

लोगो : शाळा / कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुगोळा स्फोटात एकाचा मृत्यू

0
0

बेलगाव कुऱ्हे येथील घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लष्करी हद्दीतून आणलेला गोळा फोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात एक जण जागीच ठार, तर चार जण जखमी झाले. अजय संजय शिरसाठ (वय २१) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील गुलाबवाडीत बुधवारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लक्ष्मी उर्फ फशाबाई मुठे (वय ६०), उत्तम भीमा मुठे (वय ३५), गायत्री उत्तम मुठे (वय २५) आणि साई उत्तम मुठे (वय दीड वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. या स्फोटामुळे गावातील अनेक घरांना हादरे बसले असून, घरांचे कौल, पत्रे फुटले आहेत. बेलगाव कुऱ्हे गावालगतच लष्कराची हद्द असून, तेथे सरावाचा पडलेला एखादा दारुगोळा फोडून त्यातील धातू काढत असताना हा स्फोट झाला असावा, असा अंदाज वाडीवऱ्हे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुठे कुटुंबीयांच्या पडवीमध्ये शिरसाठ हे काम करीत होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. घरामध्ये स्वयंपाक करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती या कुटुंबाच्या निकटवर्तीयांकडून रुग्णालयातील पोलिस चौकीला देण्यात आली. परंतु, दारूगोळा फोडताना हा स्फोट झाल्याची माहिती घटनास्थळी वाडीवऱ्हे पोलिसांनी मिळाली. लष्करी हद्दीत जवानांनी सरावासाठी सोडलेल्या गोळ्याचा भाग फोडत असताना त्यातील दारूगोळ्यांशी झालेल्या स्पर्शाने भीषण स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

उदरनिर्वाहाचे साधन बेतले जीवावर

बेलगाव कुऱ्हे गावालगत लष्कराची हद्द असून, तेथे लष्कराचे जवान सराव करतात. काही ग्रामस्थ हद्दीत पडलेल्या गोळ्याचे साहित्य घरी आणतात. त्यातील तांबे, पितळ, शिसे आदी धातू भंगारात विकून उदरनिर्वाह करतात. या परिसरात आतापर्यंत अनेकजण अशा दुर्घटनांत मृत्युमुखी पडले आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी करण्यासाठी सर्व साहित्य व काही सुटे भाग ताब्यात घेतले. या दुर्घटनेत मुठे यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात -

0
0

शंकराचार्य न्यासतर्फे

आरोग्यभान व्याख्यानमाला

नाशिक : शंकराचार्य न्यासतर्फे आरोग्यभान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील शंकाराचार्य कुर्तकोटी सभागृहात हार्ट अटॅक विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. मनोज चोपडा, डॉ. साकेत जुनागडे, डॉ. नितीन घैसास आणि डॉ. अभयसिंग वालीया यांची मुलाखत व्याख्यानात होणार आहे. नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शंकाराचार्य न्यास तर्फे करण्यात आले आहे.

भजन संध्या कार्यक्रम

नाशिक : रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये शनिवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे. नाशिककरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राधेय येवले, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.यशवंत पाटील, सचिव शर्मिला मेहता यांनी केले आहे.

पालखी सोहळ्याचे आयोजन

नाशिक : साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांच्या जयंती निमित्त शुक्रवार (दि.२४ ऑगस्ट) रोजी पालखी सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजता जुने नाशिक परिसरातील चव्हाटा येथील साळीवाडा येथील जिव्हेश्वर मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात होईल. दुपारी १ वाजता जुने नाशिक परिसरातील डिंगर आळी येथील गणपती मंदिरात पालखीची सांगता होईल. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकुळ साळी समाज पंचमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायकोच्या प्रियकराचा खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून भरदिवसा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.२२) पावणेदोन वाजेच्या दरम्यान एकलहरे-गंगावाडी रोडवरील रेल्वे पुलाजवळ घडली. थरकाप उडविणाऱ्या या घटनेत संदीप वसंतराव मरसाळे (वय २९, रा. आर्ची व्ह्यू अपार्टमेंट, भैरवनाथनगर, जेलरोड) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संदीपचा खून करणाऱ्या दीपक भगवान पगार (वय ३५, रा. गंगावाडी, एकलहरे रोड, जेलरोड) यास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेंनंतर मृत संदीप मरसाळे याचा मित्र अक्षय माधव बागाईत (वय २४, रा. भैरवनाथनगर, जेलरोड) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार संदीप मरसाळे याचे आरोपी दीपक पगार याची पत्नी किरण हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा दीपकला संशय होता. त्यामुळे दीपक आणि संदीप यांच्यात यापूर्वी वाद झालेले होते. शिवाय दीपक आणि त्याची पत्नी किरण यांच्यातही वाद होऊन पत्नी किरण तीन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेलेली होती. याशिवाय त्यांनी घटस्फोटासाठीही दावा केलेला होता. मंगळवारी रात्री संदीप मरसाळे याचे आई-वडील शतपावलीसाठी गेले असता दीपक पगार याने त्यांना शिवीगाळ करून मुलाचा काटा काढीन, असे धमकावले होते. बुधवारी दुपारी संदीप दीपकबरोबरचा जुना वाद मिटविण्यासाठी त्याचे मित्र अक्षय बाणाईत, आदित्य बोराडे आणि सुमित काकडे यांना घेऊन घटनास्थळी मोटारसायकलवरून गेला होता. परंतु, यावेळी वाद मिटला नाही. दीपकने संदीपला मारण्यासाठी त्याच्या मित्रांना बोलावण्यासाठी फोन केला. त्यामुळे संदीप व त्याचे तिघे मित्र माघारी भैरवनाथनगरला आले. परंतु, एकट्याला गाठून दीपक संदीपला मारू शकतो या भीतीने संदीप व त्याचे मित्र पुन्हा पावणेदोन वाजता रेल्वे पुलाजवळ गेले. यावेळी दीपक त्याच्या मोटारसायकलजवळ एकटाच उभा होता. संदीपची मोटारसायकल दीपकजवळ येताच दीपकने त्याच्याकडील कुऱ्हाडीने संदीपच्या डोक्यात वार केले. यावेळी त्याच्या घाबरलेल्या मित्रांनी संदीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दीपकने त्यांच्यापैकी अक्षयवर हल्ला केल्याने सर्वांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दीपक पगार याला ताब्यात घेतले व पंचनामा केला. संदीपचा मृतेदह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेतील मृत संदीप हा दसक येथील ओमसाई ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत होता. आरोपी दीपक पगार हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.

रेल्वे पुलाजवळ कोणी कोणाला बोलावले?

संदीपची हत्या झाली त्या रेल्वेपुलाजवळ कोणी कोणाला बोलावले होते, याविषयी पोलिस तपास करीत आहेत. प्रेमात अडचण ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचाच काटा काढण्याचा प्रियकराचा डाव होता. कदाचित त्यासाठीच प्रियकराने प्रेयसीच्या पतीला घटनास्थळी बोलावले असण्याची शक्यता आहे. परंतु, प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्षात प्रियकराचाच घात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांसाठी दिव्यांगांना कोचिंग

0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग देण्यात येत आहे. विभागातर्फे नमूद केलेल्या कोचिंग केंद्रावर विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाणार आहे.

सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी, स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. किमान पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कोचिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ४५०० रुपये तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना ७००० रुपये दरमहा दिव्यांग भत्ता दिला जाणार आहे. दिव्यांगता व समक्ष आरोग्य अधिकारी यांच्याकडून दिव्यांग प्रमाणपत्र असलेले विद्यार्थीच केवळ योजेनेसाठी पात्र ठरू शकतात. याआधी योजनेचे लाभार्थी ठरलेले विद्यार्थी पुन्हा अर्ज करू शकत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष कोचिंग सेंटरला भेट देऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. तसेच दिव्यांगता अधिकाऱ्यांकडून मिळालेले प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. कोचिंग केंद्राची यादी www.disabilityaffairs.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनविकासावर ड्रोनची नजर!

0
0

मटा विशेष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात वनविभागाकडून सुरू असलेल्या विकासकामांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विकासकामांचे फोटो तसेच त्याचे व्हिडिओचित्रीकरण करुन या कामामध्ये पारदर्शकता आणण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक वनविभागाने सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. यामुळे विकास कामांपूर्वीची आणि नंतरची स्थिती या साऱ्यांचे पुरावे मिळणार असून, विकासकामातील प्रगतीही नजरेत राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे राज्यभरात कोट्यवधी वृक्षांची लागवड आणि संवर्धनासाठी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आणि रोप वाटिका या विकासकामांचे वन संरक्षण विभागातर्फे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याची सुरूवात नाशिकच्या पूर्व वन संरक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे. राज्यभरात तेरा कोटी वृक्षांची लागवड करण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट्य आहे. या अंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्ष लागवडीचे उपक्रम राबविले जात आहेत. नाशिकमध्ये शहरासह जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, चांदोरी यांसह इतरही भागात वृक्ष लागवड आणि संगोपन होत आहे. ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य वनविभाग, सर्व महापालिका, जिल्हा परिषद यांसह सामाजिक संस्था, शाळा आणि कॉलेजांनी राज्यांतील सर्व ठिकाणी लाखो वृक्षांची लागवड केली. राज्यभरात लागवड करण्यात आलेल्या या वृक्षांना वेळेवर खत आणि पाणी दिले जात आहे. यामुळे वृक्षांची चांगली वाढ होत आहे. याची अधिकृत माहिती संकलित करण्यासाठी सर्व वृक्ष लागवडीच्या प्रकल्पांचे चित्रीकरण ड्रोनद्वारे केले जाणार आहे. यातून वृक्षांची एकूण संख्या, वृक्ष लागवडीनंतरची परिस्थिती यांचे चित्रीकरण वनसंरक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील रोप वाटिकांमधील कामाचेही चित्रीकरण होणार आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती वन विभागाच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. असे वन संरक्षण विभागाने सांगितले आहे. नाशिकच्या वन विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती नाशिक पूर्व वन संरक्षण विभागाने वेबसाइटवर जाहीर केली आहे.

राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड केली जात आहे. या उपक्रमाचे राज्यभरातील वन संरक्षण विभागातर्फे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हे चित्रीकरण वन विभागाच्या वेबसाइटवरही अपलोड केले जाईल.

- टी. ब्युला, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणावर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नगरपालिकेच्या वतीने पाइपलाइनच्या कामात अडथळा ठरणारे शहरातील वावी वेस ते नवा पूलपर्यंत (जय मल्हार खाणावळ) तसेच मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवर ओटे, पायऱ्या व इतर ठिकाणी विनापरवाना अनधिकृत असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मात्र त्यातून निवासी बांधकामे वगळण्यात आली. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरील दीडशे जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र आचारसंहिता असल्यामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. व्यापारी, व्यावसायिक यांची बैठक घेवून पालिकेने सूचना केल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण मोहीमेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन मोहिमेचे प्रमुख बावीस्कर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images