Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पायाभूत चाचणी २८ ऑगस्टपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ३१ ऑगस्टपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत.

इयत्ता दुसरीसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांवर, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा व इंग्रजी या विषयांवर, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, विज्ञान व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांसाठी परीक्षा होणार आहेत. त्यातील इयत्ता दुसरी ते आठवीची प्रथम भाषा चाचणी २८, गणित या विषयाची २९ ऑगस्ट रोजी चाचणी होणार आहे. त्यानंतर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची चाचणी ३० व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याची विज्ञान या विषयाची चाचणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.

शाळांना दक्षतेच्या सूचना

सध्या सोशल मीडियावरून पेपरफुटीच्या समस्या वारंवार समोर येत असल्याने पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी यापैकी कोणीही मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकांचे फोटो काढू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. चाचणी झाल्यावर एक आठवड्याच्या कालावधीनंतर शाळांना पेपर तपासणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. महास्टुडण्ट अॅपच्या साहाय्याने त्यात गुण भरायचे आहेत.

लोगो : शाळा/ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाते संवर्धनासाठी संवाद गरजेचा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याची स्वरूपाचे नाते टिकविण्यासाठी घरात संवाद आवश्यक बनला आहे, असे प्रतिपादन औद्योगिक कीर्तनकार आणि व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. संदीप भानोसे यांनी केले.

औद्योगिक डॉ. भानोसे यांच्या मातोश्री सुनीता भानोसे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त पोलिस अधिकारीवर्गासाठी आनंदी घरकुल, नाती व्यवस्थापन व माध्यम संवादातून नाती या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस आयुक्तालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. भानोसे म्हणाले, की देशातील कुटुंबसंस्था सध्या खिळखिळी होताना दिसत आहे. नातेसंबंध तुटत चालले आहेत. पती-पत्नीचे नाते विरत चालले आहे. घराघरांतील आनंद हरवला आहे. घरात व समाजात अनेकजण मोबाइलवर संवाद करीत आहेत. परंतु, प्रत्यक्ष भेटून संवाद अभावानेच होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर संवाद वाढविणे अपरिहार्य बनले आहे.

बॉर्न टू हेल्प या सामाजिक संस्थेचे आनंद कवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणातून प्रेरणा घेत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्याचे सांगितले. रत्नमाला भोळे आणि पोलिस नाईक जयंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. गरुडझेप प्रतिष्ठानचे संकेत भानोसे, रेणू, पारख, संजय राठोड, गोविंद तोरडमल, किशन राठोड, भावना कुलकर्णी, राम जाजू, शिवकार्य गडकोटचे दुर्गसंवर्धक अविनाश क्षीरसागर, रवींद्र कुलकर्णी, तसेच पल्लवी जोशी, रवी जोशी, आनंद कवळे, धनश्री, ऋचा भालेराव कार्यकर्ते आणि ३५ पोलिस अधिकारी उपस्थित होते. रवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. भावना कुलकर्णी यांनी आभार मानले.

(डीप सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव, चोपड्यासाठी आता शिवशाही बस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून जळगाव व चोपड्यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे खान्देशातील मोठ्या शहरांमध्ये आरामदायी व वातानुकूलित प्रवास करणे प्रवाशांना शक्य होऊ शकणार आहे. जळगावसाठी सकाळी साडेदहा व सायंकाळी साडेपाच तसेच चोपड्यासाठी सकाळी साडेनऊ व सायंकाळी साडेचार अशा प्रत्येकी दोन बस नाशिकहून सोडण्यात येणार आहे. ही सेवा शनिवारपासून सुरू झाली आहे.

जळगाव आणि चोपड्याला बसने जाण्यासाठी सुमारे ६ ते ७ तास इतका कालावधी लागतो. त्यामुळे या बसचा प्रवास आता सुखकर होणार आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता राज्य परिवहन महामंडळाने इतर शहरांसाठीही शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकहून विविध मार्गांवर आता तब्बल ७७ बस धावत असून त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ६७ तर ट्रॅव्हल्स एजन्सीकडून भाड्याने घेतलेल्या १० बसचा समावेश आहे. जळगावसाठी ४७५ तर चोपड्यासाठी ४४५ रुपये बसभाडे आकारले जाणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चार बस राज्य परिवहन महामंडळाने दिल्या. पण, त्या सुरू होण्यापूर्वी त्या नागपूरला पळविण्यात आल्या. त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच महामंडळाने १३ शिवशाही बस दिल्या. त्यानंतर या बसमध्ये आता वाढ होत असून शिवशाही बस आता शंभरी गाठेल अशी स्थिती आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणात या बसला प्रतिसाद मिळाला असून पुणे महामार्गावर सर्वाधिक बस धावत आहे. तसेच नागपूर, कोल्हापूर येथे सुरू केलेल्या स्लिपर कोचलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धेला खतपाणी नको!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा मनोभावे देवपूजा करावी. मात्र, देवपूजेचा अतिरेक करून अध्यात्माच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, असे निरूपण ऋषिराजशास्त्री महानुभाव यांनी केले.

वांबोरी आश्रमाचे संचालक ऋषिराजशास्त्री महानुभाव यांचा सत्संग द्वारका येथील श्रीकृष्ण लॉन्सममध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता. सत्संग सुरू होण्यापूर्वी द्वारका ते श्रीकृष्ण लॉन्स या मार्गावर श्रीकृष्ण भगवान यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महानुभाव पंथाचे अनुयायी सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्व अनुयायांनी देवतापूजन केले. त्यानंतर ऋषिराजशास्त्री महानुभाव यांचा सत्संग झाला. यावेळी निरूपण करताना ऋषिराजशास्त्री म्हणाले, की देवपूजा करताना अनेक जण घाई करतात. देवपूजेतील विधी घाईने उरकल्याने देवपूजा सफल होत नाही. अनेकदा काही जण देवपूजेचा अतिरेक करतात. त्यामुळे अंधश्रद्धा जन्म घेऊ लागते. अंधश्रद्धा वाढायला लागली, की अध्यात्म बाजूला सारले जाते. असे होणे चुकीचे आहे. देवाच्या भजनांची शैली बदलत जात आहे. अनेकदा भक्तगण भजने म्हणताना चुकीचे शब्द वापरतात. भजनांची चालदेखील बदलली जाते. चुकीच्या शब्दांचा वापर करीत भजन गायले, तर दुसरा अर्थ निघू शकतो. त्यामुळे देवपूजा करताना भजन आणि आरतीमधील योग्य शब्दांचाच वापर करावा. जर योग्य शब्दांतून देवाची धारणा केली, तरच देवपूजा सुफळ संपूर्ण होते, असे निरूपणही त्यांनी केले. यावेळी महानुभाव पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(लोगो : सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरला दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. या दोन्ही घटना उपनगर परिसरात घडल्या असून, या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती विनय मोरे (रा. सरस्वती निवास, दीपनगररोड, पुणारोड) या शनिवारी (दि. १८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गॅस एजन्सीकडे जात असताना, शिवाजीनगरच्या एसबीआय बँकेच्या एटीएमसमोर त्यांची पोत ओरबाडण्यात आली. समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत ओढून नेली. तर, दुसऱ्या घटनेत रत्ना रघुनाथ पवार (रा. विमलनगर, पवारवाडी, जेलरोड) या शनिवारी (दि. १९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नारायण बापू चौकाकडून सैलानीबाबा चौकाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेले. दोन्ही घटनांमध्ये संशयितांचे वर्णन सारखेच असल्याचे समोर आले असून, या घटनांचा तपास उपनगर पोलिस करीत आहेत.

--

खरेदीत फसवणूक

इमारतीतील गाळा खरेदीत साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संजय भुतडा (युनिटी पार्क, विसे मळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अरविंद येवलेकर (राधेशाम सोसायटी, जीपीओरोड) यांनी फिर्याद दिली आहे. येवलेकर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित भुतडा यांनी गंगापूररोडलगत असलेल्या सर्वे क्रमांक ६५९ मधील ३६५ अ पैकी प्लॉट क्रमांक ४/१ वर बांधण्यात येणाऱ्या मिळकतीतील तळ मजल्यावरील २२. ११ चौ.मीटर क्षेत्र घेण्यासाठी व्यवहार ठरला होता. या व्यवहारपोटी २००९ ते २०१८ या कालावधीत येवलेकर यांनी भुतडा यांना ९ लाख ६२ हजार रुपये दिले. मात्र, पैसे देऊनही येवलेकर यांना ताबा मिळाला नाही.

...

हिरावाडीत ज्वेलरी दुकान फोडले

हिरावाडीतील परिसरातील त्रिमूर्तीनगर येथील ज्वेलरी दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रत्नाकर काशिनाथ वडनेरे (रा. दुर्वांकुर अपार्टमेंट, रविवार कारंजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडनेरे यांचे हिरावाडीत माऊली ज्वेलर्स हे दुकान असून, शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी ग्रीलचे गज कापले आणि दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील एक लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचे तब्बल ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. यात सोन्याचे मणी, मंगळसूत्र, लहान मुलांचे दागिने, कानाच्या रिंगा, झुबे आदींचा समावेश आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

..

जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

राहत्या घरावर शिडीवरून चढताना पडल्याने डोक्‍याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश विठ्ठल वाघमारे (वय ४०, रा. जुने नाशिक) असे या व्यक्तीचे नाव असून, ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१८) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्प होणार स्वच्छ कॅन्टोन्मेंट

0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देशभरात सध्या सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंटमध्येदेखील ओल्या व सुक्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन केले जाणार असून, त्यासाठी १२ लाख ५७ हजार रुपयांची एक अशा नव्या ११ आधुनिक घंटागाड्या देवळालीवासीयांच्या सेवेसाठी येत्या महिनाभरात दाखल होणार आहेत.

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंटने स्वच्छ भारत अभियानात राज्य व देशपातळीवर यापूर्वीच पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्या पार्शवभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी बोर्डाने नव्याने तयारी केली आहे. बोर्डाकडून आतापर्यंत उघड्या घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जात होते. त्यातून कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. या पद्धतीला विराम देत बोर्ड प्रशासनाने कचरा संकलनसाठी नव्या घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. बोर्ड परिरसरात कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या एनएचपी सर्व्हिसेसचे संचालक एन. एच. पटेल यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजयकुमार यांच्याशी चर्चा केल्यावर घंटागाडी कशी असावी, याबाबत निर्णय घेत सीईओ अजय कुमार यांनी स्वत: या गाड्यांचे डिझाइन तयार केले आहे. यामध्ये ओल्या कचऱ्यासाठी अधिक, तर सुक्या कचऱ्यासाठी थोडी कमी जागा ठेवण्यात आली आहे.

कामावर जीपीएसद्वारे नजर

कचरा संकलनासाठी या गाड्या शहरात घरोघरच्या फिरणार आहेत. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लोकांना हा कचरा वेगवेगळा सहजतेने टाकता येईल, अशी व्यवस्था या नव्या घंटागाड्यांमध्ये करण्यात आली आहे. या गाड्या कचरा संकलन नीट करीत आहेत की नाहीत, यावर नजर ठेवण्यासाठी जीपीआरएस प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी या गाड्या रुजू करण्यात येणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने 'स्वच्छ देवळाली व सुंदर देवळाली' ही संकल्पना साकार होऊ शकणार आहे.

नागरिकांना डस्टबिनचे वाटप

कॅन्टोन्मेंटच्या सर्व वॉर्डांतील प्रत्येक घर, सोसायटी व व्यापारी संकुल यांना कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी एका जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन घंटागाड्यांचे उद्घाटन आणि रहिवाशांना डस्टबिनचे वाटप केले जाणार आहे. घरांसाठी दहा किलो, प्रत्येक सोसायटीसाठी ५० ते ११० किलो व व्यापारी संकुलांसाठी मोठ्या आकाराचे डस्टबिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागरिकांना निळ्या डस्टबिनमध्ये सुका, तर हिरव्या डस्टबिनमध्ये ओला कचरा टाकावा लागणार आहे.

घंटागाडी कर भरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी निळ्या व हिरव्या रंगाचे डस्टबिन दिले जाणार आहेत. विलगीकरण केलेला कचरा वाहून नेण्यासाठी शहरासाठी नऊ व बाजारपेठेतील दुकाने व संकुलांसाठी दोन स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. देवळालीवासीयांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

-मीना करंजकर, उपाध्यक्षा, कॅन्टोन्मेंट बोर्ड

कचरा विलगीकरण ही देशभरात राबविली जाणारी संकल्पना आहे, जी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची आहे. राज्यात अद्याप अशी डिझाइन केलेली घंटागाडी नाही. या आकर्षक व उपयुक्त नवीन घंटागाड्या ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नागरिक, तसेच कर्मचाऱ्यांनाही सहाय्यकारी ठरणार आहेत.

-एन. एच. पटेल, कंत्राटदार

(लोगो : शुभ वार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार हजार महिला बेपत्ता!

0
0

साडेचार हजार महिला बेपत्ता!

माहिती अधिकारात वास्तव उघड; मुंबईत सर्वाधिक घटना

दीपक महाजन, कळवण

जागरुक आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकारात गृह विभागाकडून मागविलेल्या माहितीत गेल्या वर्षभरात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून साडेचार हजार महिला गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

महाराष्ट्रात जानेवारी २०१७ ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३२ हजार ७६२ महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी विविध पोलिस ठाण्यात नोंदविल्या गेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील संख्या तब्बल ४ हजार ५३५ एवढी आहे.

महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. मनमाडचे आरटीआय कार्यकर्ते महेंद्र मिसर यांनी माहितीच्या अधिकारात सदरची धक्कादायक माहिती प्राप्त केली आहे. बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांचा समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्रातील बेपत्ता महिलांच्या तक्रारींची संख्या पाहता अल्पवयीन मुलींना प्रेम प्रकरणातून फूस लाऊन पळवून नेण्याबरोबरच ब्लॅकमेलिंगसाठीही विवाहित महिला गायब होण्याची कारणे समोर आली आहेत.

महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याने हा सामाजिक चिंतेचा विषय समाज मन सुन्न करणारा आहे.

- रवींद्रकुमार जाधव, सामाजिक समस्या विश्लेषक

विभागनिहाय आकडेवारी

विभाग............महिला...अल्पवयीन मुली...अठरा वर्षांच्या तरुणी

मुंबई........................९२०३............५३९............७८०

पश्चिम महाराष्ट्र............७२९०............१६.............५२६

मराठवाडा...................१९४५............२१............१४८

विदर्भ........................५७११............११२............५०६

उत्तर महाराष्ट्र............४५३५............३०५............३९०

कोकण.....................६७५............०४................५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही घडलो...त्यांनाही घडवा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी वाटलं नव्हतं की आम्ही चांगल्या कॉलेजला अॅडमिशन घेऊन आमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करू. पण 'मटा'ने साथ दिली, त्यांच्या माध्यमातून समाजाने मदतीचा हात दिला. आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही आज केवळ 'मटा'मुळेच आम्ही चांगले शिक्षण घेतोय. आमचे जीवन जसे तुम्ही सावरले, तसेच या दहा मुलांचे सावराल ना? आम्ही घडलो...त्यांनाही घडवाल ना! असं आवाहन 'मटा हेल्पलाइन' उपक्रमामुळे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून असलेले २०११ चे पहिल्या वर्षाचे तीन विद्यार्थी तेजस आमले, तेजस शिंदे व रोशनी गांगुर्डे यांनी केलं आहे.

अॅकेडमिक ज्ञानाच्या बाबतीत हुशार परंतु, आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मटा' ने हेल्पलाइन हा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देत वाचकांनी हा उपक्रम उचलून घेतला. आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना या तिघांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. नुसतंच शिक्षण नाही घेतलं तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविलं. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर पडण्यासाठी हे तिघं प्रयत्न करीत होते, भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचं आहे त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमांतर्गत त्यांच्यासाठी मदतीची हाक देण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत नाशिकमध्ये पहिल्यांदाच असा प्रयत्न झाला त्याला अभूतपूर्व असं यशही लाभलं.

मटा हेल्पलाइनच्या दहाही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा भार नाशिककरांनी उचलण्याचीही तयारी दाखविली. कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला. कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तीनही वर्षे मोफत शिकवू, असेही सांगितले. परंतु, हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे तो वाचकांच्या हातून ओढला जावा असा 'मटा'चा हेतू आहे. त्यासाठी नाशिककरांकडून मदत होईल, अशी अपेक्षा.

तेजस आमले करतोय इंजिनीअरिंग

तेजस आमले मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. यशाची आणखी शिखरं पादाक्रांत करण्याचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्याला गरज होती मदतीची. 'मटा'ने हेल्पलाइनच्या माध्यमातून त्याला साथ दिली. आज तो चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. तो म्हणतो, 'माझ्याप्रमाणेच यंदाच्या दहाही मुलांना मदत केली तर ते तुमचे ऋण आयुष्यभर विसरणार नाहीत.'

तेजस शिंदे झाला सायन्स पदवीधर

तेजस शिंदेला दहावीच्या परीक्षेत ९२.७३ टक्के गुण होते. डॉक्टर व्हायची इच्छा उरी बाळगून त्याने शिकण्यासाठी कंबर कसली खरी पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याचे शिक्षण पूर्ण होईल का असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला होता. परंतु, 'मटा'ने हात दिल्याने त्याने आज केटीएचएम कॉलेजमधून सायन्स या शाखेतून पदवी घेतली आहे. चांगले मार्कस कमावून डॉक्टर व्हायचं अशी मनीषा तो बाळगून आहे. त्याने या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी वाचकांना आवाहन केलं आहे. तो म्हणतो, माझा प्रत्येक क्षण 'मटा' व समाजाच्या उपकारांनी दबलेला आहे. माझे मित्र मला विचारतात, 'तू कँटिनला का बसत नाही, तेव्हा मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की मला खूप जणांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे मला अभ्यासासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मला तुम्ही जशी मदत केली तशीच या दहाही मुलांना केली तर त्यांना यशाची वाट सोपी होईल.'

रोशनी होतेय कम्प्युटर इंजिनीअर

मटा हेल्पलाइनने २०११ ला निवडलेली रोशनी गांगुर्डे मूळातच हुशार. परंतु, खाणारी तोंडे पंधरा अन् कमावणारे मात्र दोघेच. घरची परिस्थिती अर्थातच बेताची. पण, हलाखीच्या काळोखात रोशनीने तिच्या यशाचा प्रकाश झाकोळू दिला नव्हता. कम्प्युटर इंजिनीअर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला या शाबासकीची आवश्यकता तर होतीच, पण आर्थिक मदतीचीही गरज होती. 'मटा'ने तिच्यातील स्पार्क ओळखून तिला आर्थिक मदत मिळवून दिली. आज ती सामनगाव कॉलेजला शेवटच्या वर्षाला शिकत आहे. ती म्हणते, 'मला माझ्या मनासारखं शिक्षण कधीच घेता आलं नसतं. पण 'मटा'ने मला साथ दिली. माझ्यासाठी माध्यम होऊन माझ्या शिक्षणासाठी पैसा जमा केला. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत, त्यातून या दहा जणांना मदत केली तर त्यांनाही पुढील शिक्षण सोपं जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवापुरात मदतकार्य सुरू

0
0

राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर भराव टाकण्यास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये दि. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पुलाचा भराव खचला होता. त्यामुळे मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या महामार्गावरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. आता पाऊस ओसरल्याने प्रशासनाकडून परिसरातील आपातग्रस्तांसाठी मतदकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त केले असून, त्यांना आता प्रशासनाकडून मतद केली जात आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरजवळील विसरवाडी गावाजवळ कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी वाहून गेलेला रस्त्याच्या जागेवर भराव टाकण्याचे काम अद्यापही सुरू आहे.

वाहनांच्या रांगा कायम
सुरतवरून येणारी वाहतूक विसरवाडी नंदुरबारमार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तुटलेल्या पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू असून, रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गावरील पूल खचला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून एका दिवसाचा कालावधी लागेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असल्याने ट्रक चालकांचे हाल होत आहेत.

पांझरा नदी दुथडी
धुळे तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या वरुणराजाने चार दिवसांपूर्वी जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिणामी, या धरणांचे शनिवारी दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर, मोठ्या प्रतीक्षेनंतर नदीला पाणी आल्याने धुळेकर नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. आज कानुमातेचा विसर्जन सोहळा पार पडणार असून, या विसर्जनापूर्वी नदीला पाणी आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील मालनगाव, लाटीपाडा आणि अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

मात्राण नदीपात्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू
रावेर : येथील रहिवासी शे. हाशीम व शे. इम्रान या दोघांचा शेतात जात असताना मात्राण नदी पात्रातील बंधा·ऱ्यात बुडून मृत्यू झाला. शहरातील मन्यार वाड्यातील रहिवासी शे. हाशीम शे. मेहमूद (वय १४) व मदिना कॉलनीतील रहिवासी इम्रान कालू मन्यार (वय १५) हे दोघे शेतात जात होते. शहराबाहेरून वाहणाऱ्या मात्राण नदीपात्रातील बंधाऱ्याजवळ एकाचा पाय घसरला व तो नदीपात्रात बुडू लागला. या वेळी त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांची आरडाओरड ऐकू आल्यावर शेख मुश्ताक शेख हुसेन यांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. मुक्तार यांनी दोघांना बाहेर काढले तोपर्यंत दोघेही मृत झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. तहसीलदार विजयकुमार ढगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पद्माकर महाजन, पी. के. महाजन, भास्कर महाजन, मुस्लिम पंच कमेटी सदस्य यांनी भेटी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’ला नवे रस्ते!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड 'एमआय़डीसी'तील रस्त्यांसाठी तब्बल ११ कोटींचा निधी महापालिकेने मंजूर केला असून, त्यासाठी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे अंबड 'एमआयडीसी'तील रस्ते आता लवकरच चकाचक होणार आहेत.

अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेतर्फे 'एमआयडीसी'त नवीन रस्त्यांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लवकरच रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन 'आयमा'च्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. आता त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेने अंबडसाठी निधी मंजूर करताना सातपूर एमआयडीसीला मात्र डावल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. सातपूर एमआयडीसीतील अनेक रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याने त्या रस्त्यांचीही कामे महापालिकेने हाती घ्यावीत, अशी मागणी 'निमा'तर्फे करण्यात आली आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीतील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची समस्या 'निमा' व 'आयमा'च्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच महापालिकेकडे मांडल्या जातात. त्यातच अंबड एमआयडीसीत अंतर्गत रस्त्यांची चाळण झाल्याची स्थिती आहे. कामगारांना कामावर जाताना मोठी कसरत करूनच जावे लागते. पायी चालणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. 'आयमा'ने महापालिका आयुक्तांकडे येथील रस्त्यांची स्थिती मांडली होती. त्यानंतर आयुक्तांनी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता महापालिकेने जाहीर केलेल्या निविदेत तब्बल ११ कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. त्यामुळे लवकरच अंबड एमआयडीसीत नवीन रस्ते होणार आहेत.

सातपूरसाठी 'निमा'चा पुढाकार

दुसरीकडे मात्र सातपूर एमआयडीसीतही अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. विशेष म्हणजे सीएट कंपनीसमोरील रस्त्यावरून जाताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांनादेखील कसरत करूनच जावे लागते. अंतर्गत रस्तेही खड्डेमय झालेले असल्याने सातपूरलाही रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी 'निमा' संघटनेतर्फे करण्यात येत आहे. 'निमा'चे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांना सातपूर एमआयडीसीतील रस्त्यांबाबत विचारले असता, पुढील काही दिवसांत महापालिकेकडून साडेसात कोटींचा निधी उपलब्ध करून निविदा काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात महत्त्वाचे रस्ते नव्याने करण्यात येणार आहेत, असेही पाटणकर म्हणाले.

--

अंबड एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरवस्थेची माहिती महापालिका आयुक्तांकडे सादर केली होती. त्यात कुठला रस्ता किती वर्षांपासून झाला नाही, याचीही माहिती दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ११ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

-धनंजय बेळे. माजी अध्यक्ष, आयमा

(लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालकी हक्कावर गदा!

0
0

सातबारा संगणकीकरण शेतकऱ्यांना पडलेय महागात

...

- मनोलीत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 'श्री व्यंकटेश देव'ची नोंद

- प्रशासनाच्या चुकीचा १०५ शेतकऱ्यांना फटका

- चूक दुरुस्त करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

डिजिटल इंडियाच्या धोरणांतर्गत शासनाने हाती घेतलेल्या संगणकीय सातबारा उताऱ्याची योजना नाशिक तालुक्यातील दुगाव ग्रुप ग्रामपंचायतीतील मनोली येथील शेतकऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे. या योजनेंतर्गत तयार झालेल्या तब्बल १०५ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर मालकी हक्कात 'श्री व्यंकटेश देव' अशी नोंद झाल्याचे उघड झाल्याने या सर्व शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीवरील मालकी हक्कावरच गंडांतर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी चूक दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.

सातबारा संगणकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेअरमधील ही तांत्रिक चूक असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. भाजपने राज्यात सत्ता मिळविल्यानंतर केंद्राचे डिजिटल इंडिया धोरण राज्यात राबविण्याला प्राधान्य दिले. या धोरणांतर्गत राज्यातील ३५७ तालुक्यांतील सर्व ४३ हजार ९५२ गावांतील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा व सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच घेतला. मात्र संगणकीकृत सातबारा उताऱ्यांवरील नोंदींमुळे शेतकऱ्यांची सोयीच्या ऐवजी गैरसोयच अधिक झाली असल्याचे प्रकार आता उघडकीस येऊ लागले आहेत. नाशिक तालुक्यातील मनोली गावातील तब्बल ६७ गटांतील १०५ शेतकऱ्यांच्या संगणकीय सातबाऱ्यांवर मालकी हक्कात सामाईक क्षेत्र म्हणून 'श्री व्यंकटेश देव' अशी नोंद झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या या जमिनींवरील आजवरील मालकी हक्कावरच गदा आली आहे. या प्रकारामुळे संगणकीय सातबारा योजनेकडे जिल्हा प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष उघड झाले असून, या गावातील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

..

ग्रामसभेत स्थगितीचा ठराव

मनोली गावातील १०५ शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संगणकीय सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कात 'श्री व्यंकटेश देव' अशी नोंद झाल्याने त्यास स्थगिती मिळावी व या शेतकऱ्यांच्या संगणकीय सातबारा उताऱ्यात दुरुस्ती व्हावी, असा ठराव दुगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. संगणकीय सातबारा उतारे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत पूर्वीचे हस्तलिखित सातबारा उतारेही ग्राह्य धरण्याचा ठराव या मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव नाशिकचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

..

शेतकऱ्यांच्या आक्षेपांना केराची टोपली

संगणकीय सातबारा योजनेत खाता प्रोसेसिंगची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केल्यानंतर प्रत्येक गावात या माहितीची खात्री करण्यासाठी चावडी वाचन केले होते. मनोली गावातील चावडी वाचनातच ही चूक सर्व शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देत लेखी आक्षेपही नोंदवले होते. परंतु, या सर्व अधिकाऱ्यांनी या आक्षेपांना केराची टोपली दाखवल्याने आता हा संपूर्ण घोळ उघडकीस आला आहे.

...

जून १९७४ मध्ये मनोली गावातील ६८ गटांच्या महसुली रेकॉर्डवर रेघेच्यावर श्री व्यंकटेश देव अशी नोंद झालेली आहे. याविषयी या गावातील शेतकऱ्यांना नोटीस देणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र पूर्वकल्पनाही दिली नाही. आता संगणकीय सातबारा उतारा प्रक्रियेत श्री व्यंकटेश देवस्थानचे नाव रेघेच्या खाली आल्याने शेतकऱ्यांबरोबरच श्री व्यकटेश देवस्थानलाही मालकी हक्क प्राप्त झाल्यासारखे आहे. ही शासनाची मोठी चूक आहे.

- कैलास आढाव, शेतकरी, मनोली

..

संगणकीय सातबारा प्रक्रियेत रि-एडिट सर्वेवेळी लेखी आक्षेप नोंदवूनही उताऱ्यावर मालकी हक्कात श्री व्यंकटेश देव अशी नोंद झाली आहे. यामुळे शेतकयांना बँकांकडून कर्ज देण्यास नकार मिळत असून, इतर व्यवहारही ठप्प झाले आहेत. या परिस्थितीस महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जबाबदार आहे.

- अनिल बोराडे, शेतकरी, मनोली

...

मनोलीच्या शेतकऱ्यांच्या साताबारा उताऱ्यावर मालकी हक्काबाबत झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्येच दुरुस्ती केली जाईल. या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील चूक तातडीने दुरुस्त करण्यासंबंधीचे आदेश नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील.

- राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्यपी धरणग्रस्तांचा मोबदल्यासाठी मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येची वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या पाण्याच्या गरजेची पूर्तता व्हावी म्हणून २५ वर्षांपूर्वी 'काश्यपी धरण' अस्तित्वात आले. यावेळी ज्या आदिवासींच्या जमिनी गेल्या, त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. तो त्वरीत मिळावा, यासाठी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

ज्या आदिवासींनी जमिनी दिल्या, त्यांना आजही मोबदला मिळालेला नाही. तसेच कराराप्रमाणे कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचे वचनसुद्धा प्रशासन विसरले आहेत. इतकेच नाही तर आम्हाला या पाण्याची गरजच नाही त्यामुळे आम्ही कोणाचे काही देणेघेणे लागत नाही अशी मुजोरीची भूमिका घेतली आहे.

यावेळी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या नेतृत्वात सरकारचा निषेध केला. काश्यपी धरणग्रस्त बांधवांनी निकराचा आणि निर्णायक लढा उभारला आहे. काश्यपी धरणग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, मनपा व पाटबंधारे विभागाने केलेल्या करारानुसार अटी-शर्तींची पूर्तता तत्काळ करण्यात यावी, नाशिक मनपा काश्यपी धरणाच्या पाण्यावर जो महसूल गोळा करते त्या पैकी काही महसुल धरणग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना मिळावा, काश्यपी धरणातील पाणी हे पिण्यासाठी व शेतीसाठी विनामूल्य देण्यात यावे, काश्यपी धरणग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहीत केल्याबद्दल याच भागात सुपिक जमिनी देण्यात याव्यात. या संदर्भात धरणग्रस्तांनी मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या गेटसमोर गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा हेल्पलाइन’ने दिले प्रतीक्षाला बळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

'लोग पुछते है मेरी खुशीयों का राज क्या है? इजाजत हो तो आप सभी का पता बता दूं...' जेलरोडच्या गोरेवाडीत पत्र्याच्या घरात राहणारी प्रतीक्षा शरद गायकवाड आता बारावीत आहे. २०१७ साली तिला दहावीत ९५ टक्के मिळाले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढे शिकण्याची तिला शाश्वती नव्हती. मात्र, मटा हेल्पलाइनच्या माध्यमातून नाशिककरांनी तिला भरभरून मदत केली आणि परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळाले. जगण्याची नवी उमेद मिळाली. नाशिककरांच्या मदतीने ती भारावून गेली आहे. त्यामुळे ती कृतज्ञता व्यक्त करत आहे.

जेलरोडहून गोरेवाडीकडे जाताना रेल्वेगेट लागते. ते ओलांडल्यावर उजवीकडील मोकळ्या पटांगणातून आत गेल्यावर प्रतीक्षाचे छोटेसे घर दिसते. वडील शरद गायकवाड आपली छोटीशी शेती करतात, तर काका अशोक गायकवाड प्रेसमध्ये कामाला आहेत. प्रतीक्षाचे दोन्ही काका एकत्र राहतात. जेलरोडच्या कोठारी कन्या शाळेची पहिल्या इयत्तेपासून हुशार विद्यार्थिनी असलेल्या प्रतीक्षाने गरिबीशी दोन हात करीत दहावीत ९५.४० टक्के मार्क्स मिळवून सर्वांच्या अपेक्षा सार्थ ठरवल्या होत्या. सायकलवर क्लास, शाळा करीत तिने चमक दाखवली. तिला इतरांप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर किंवा खूप मोठी व्यक्ती व्हायचे नाही, तर देशसेवेसाठी संरक्षण दलात जायचे आहे. शाळेच्या दीपाली पाटीलसारख्या शिक्षिकांनी देशप्रेमाचे संस्कार केले, ते फळाला आले आहेत.

हेल्पलाइनच्या एफडी

प्रतीक्षा सध्या आरवायके कॉलेजमध्ये बारावी सायन्सला असून, तिने पीसीएम ग्रुप घेतला आहे. मटा हेल्पलाइनद्वारे साडेतीन लाखांची मदत मिळाल्याने क्लासपासून अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. हेल्पलाइनच्या तीन लाखांचे तिने योग्य नियोजन केले आहे. पन्नास हजारांच्या सहा एफडी (मुदतठेवी) प्रतीक्षाने कॉसमास बँकेत ठेवल्या आहेत. वरचे पन्नास हजार रुपये ती क्लासची फी भरण्यासाठी वापरत आहे. बारावीनंतर एफडीची मोठी गरज भासणार असल्याने सध्या अगदी मोजूनमापून प्रतीक्षा हे पैसे खर्च करीत आहे. नोकरी लागल्यावर तीही इतरांना अशीच मदत करणार आहे. दत्तमंदिर चौकात तिने खासगी क्लास लावला आहे. अकरावीला तिला ७० टक्के मिळाले आहेत. सोमवार, बुधवार, गुरुवारी दुपारी एकला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी बसने जाणे आणि उर्वरित दिवशी सकाळी साडेसातला सायकलवर नाशिकरोडला क्लासला जाणे, आल्यावर घरची कामे आटोपून रात्री दोन तास अभ्यास करणे असा तिचा दिनक्रम आहे. वेळ मिळाला तर जुनी गाणे ती आवर्जून ऐकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमोग्लोबिन तपासणीचे दुर्लक्ष भोवणार

0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : हिमोग्लोबिन घटल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकाराची मृत्यू अन्वेषण समितीने गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या गर्भवतींचा हिमोग्लोबिन तीन-साडेतीन टक्के असताना सुरुवातीपासूनच्या तपासणीत याकडे दुर्लक्ष झाल्याची किंवा त्यांना पोषक आहारच मिळाला नसल्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. समितीने बजावलेल्या नोटिशीमुळे मातामृत्यूचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

माता मृत्यू, तसेच बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. मोफत प्रसूती, घरापर्यंत मोफत अँब्युलन्स, पोषक आहार अशा योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. पैशांचा महापूर वाहत असताना मातामृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान नुकताच तीन महिलांचा मृत्यू झाला. सिन्नर, नाशिक तालुक्यातील धोंडेंगाव आणि जव्हार तालुक्यातील या महिलांपैकी दोघींचे हिमोग्लोबिन अत्यल्प होते, तर एकीला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. या महिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या, त्या वेळी त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान या महिलांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या वेळी झालेल्या या मातामृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली मातामृत्यू अन्वेषण समितीची बैठक झाली. त्यात महिलांमध्ये इतक्या कमी प्रमाणात हिमोग्लोबिन असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत अनेक चाचण्या व तपासण्या केल्या जातात. त्यात महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. हे आढळून कसे आले नाही, असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असल्याचे वेळीच समोर आले असते तर त्यावर उपचार करणे शक्य झाले असते. मात्र, या महिला थेट बाळंतपणासाठी दाखल झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हिमोग्लोबिनकडे दुर्लक्ष भोवले

प्रभारी आरोग्य उपसंचालक, तसेच सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की मातामृत्यूनंतर लागलीच मृत्यू अन्वेषण समितीची बैठक होते. बैठकीत मातामृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नुकताच तीन मातांचा मृत्यू झाला. त्यातील दोन महिलांचे हिमोग्लोबिन फारच कमी होते. सुरुवातीपासून याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांच्यासह जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले. गर्भवतींना पोषक आहार पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बालकल्याण विभागालासुद्धा या समितीने अवगत केले आहे.

दर हजारी ६१ मातांचा मृत्यू

नाशिकमध्ये दर हजारी ६१ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होतो. राज्यात हे प्रमाण दर हजारी ६८ इतके आहे. रक्तदाब कमी अथवा जास्त होणे, तसेच हिमोग्लोबिनची कमतरता असणे ही मातामृत्यू होण्याची प्रमुख कारणे ठरतात. याशिवाय महिलेच्या प्रकृतीनुसार अचानक उद्भवणाऱ्या काही वैद्यकीय समस्यादेखील असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रुमिंगची नवलाई...

0
0

फोटो - सतीश काळे

पहिला धडा आत्मविश्वासाचा

'श्रावणक्वीन' ग्रुमिंग सेशनला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेच्या ग्रुमिंग सेशनला सोमवारी सुरुवात झाली. प्राथमिक फेरीमधून निवड झालेल्या तरुणींसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. रॅम्पवॉक कसा करावा यापासून ते देहबोली कशी असावी अशा मोलाच्या टिप्स यावेळी एक्सपर्टसकडून मिळाल्या.

ग्रुमिंग सेशनच्या पहिल्या दिवशी वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दालनाला भेट तरुणींनी भेट दिली. नावीन्य कलेक्शन आणि इझारा कलेक्शनच्या नव्या दागिन्यांची मोहिनी तरुणींवर पडली. वेगवेगळ्या स्टाइलचे सुबक अलंकार परिधान करीत तरुणी नटत अन् सजत होत्या. यानंतर सिटी फिनालेत वेस्टर्न रॅम्पवॉकच्या परफॉर्मन्ससाठी खास वेस्टर्न गाउन खरेदी करण्यासाठी तरुणींना काठियावाड शोरूम गाठले. वेस्टर्न रॅम्पवॉकसाठी खास गाउन सिलेक्ट करण्यासाठी प्रत्येकीत चुरस होती. गाउन्सच्या चॉईस झाल्यानंतर तरुणींचे नवीन डान्स अॅकॅडमी येथे ग्रुमिंग सेशन घेण्यात आले. रॅम्पवॉक करतानाची देहबोली आणि एक्स्प्रेशन्सची प्रॅक्टिस यावेळी करवून घेण्यात आली. ग्रुमिंग एक्स्पर्ट नवीन तोलानी यांनी तरुणींना मार्गदर्शन केले. या सेशनमध्ये 'श्रावणक्वीन २०१६'ची फायनलिस्ट श्रीया तोरणे हिने तरुणींना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या टिप्स दिल्या. श्रावणक्वीनच्या प्लॅटफॉर्मवरून ग्लॅमरस करिअरची स्वप्न बघताना स्वतःला केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ग्रूम करा, असा सल्ला श्रीयाने दिला. प्राथमिक फेरीमधून सिटी फिनालेसाठी २० स्पर्धकांची निवड करण्यात आली. या तरुणींची 'श्रावणक्वीन'च्या झळाझळत्या मुकुटासाठीची स्पर्धा आता रंगात येणार आहे.

..

हे ठेवा लक्षात

रॅम्प करताना तुमचा लूक खूप महत्त्वाचा असतो.

रॅम्प करताना तुमच्या चेहरा हसरा ठेवा.

परीक्षकांच्या नजरेला नजर देत रॅम्प करा.

रॅम्पमध्ये लयबद्धता असावी.

एखाद्या समारंभात तुमच्याकडे लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी ग्रेसफुल ड्रेसअप असावा.

इअर रिंग्ज मोठे असावेत. नेकलेस स्टेटमेंट स्टाइल असावा.

कोणत्याही इव्हेंटला जाताना प्रॉपर मेकअप असावा.

आउटफिटला साजेशीच ज्वेलरी आणि हिल्स असावेत.

ग्लॅमरस करिअर करताना सौंदर्यासोबतच तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली असायला हवे.

संवाद साधताना कॉन्फिडेन्ट असावे.

----

रॅम्पवॉकची शैली...

रॅम्पवॉकची प्रॅक्टिस करताना प्रत्येकीची शैली वेगळी होती. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द चेहऱ्यावर ठामपणे दिसत होती. एकमेकींच्या स्टेप्स लक्षात ठेवत रॅम्पवॉकच्या टिप्स फॉलोअप केल्या जात होत्या. रॅम्पवॉक करतानाची देहबोली तरुणींनी काही मिनिटांत समजून घेतली. रॅम्प एक्स्पर्टप्रमाणे पहिल्याच दिवशी रॅम्पवॉकचा परफॉर्मन्स तरुणींनी दिला.

..

आता 'लेव्हल अप'

सिटी फिनालेत निवड झाल्याने आम्ही श्रावणक्वीन झालोच आहोत. सिटी फिनालेतून ग्रँड फिनालेसाठी वीस स्पर्धकांत लढत होईलच. पण श्रावणक्वीनच्या सिटी फिनालेसाठी परफॉर्म करणं हेच खूप काही आहे. ग्लॅमरस करिअरसाठी आम्ही आता 'वन लेव्हल अप' झालो आहोत. असे मत फायनलिस्टनी ग्रुमिंग सेशनच्या पहिल्या दिवशी चंदेरी दुनियेचा झगमगाट अनुभवत असताना व्यक्त केले.

..

छबीदार, सूरत देखनी..

ठुशी, राणी हार, चोकर, नथ, झुमके, बिंदी, कमरपट्टा अन् छल्ला हे अलंकार परिधान करत श्रावणक्वीन्स छबी टिपत होत्या. अतिशय सुंदर अन् सुबक कलाकुसर असलेली सोने आणि चांदीची दागिने तरुणींनी परिधान केले होते. एकमेकींवर उठून दिसणाऱ्या अलंकाराची स्तुती केली जात होती. चमकत्या दागिन्यांनी सजलेले मनमोहक रूप किल्क करण्यात स्पर्धक दंग झाल्या होत्या. हा माहोल होता, शरणपूररोडवरील वामन हरी पेठे ज्वेलर्स येथे झालेल्या ज्वेलरी सेशनचा. यावेळी इझारा हे खास ज्वेलरी कलेक्शन तरुणींना दाखविण्यात आले. खरेदीवर डिस्काउंट व्हाउचर्सही तरुणींना देण्यात आले.

..

माहोल खरेदीचा...

सिटी फिनालेसाठी निवड झालेल्या २० स्पर्धकांचा वेस्टर्न रॅम्प राउंड असणार आहे. या राउंडमधून आपली मोहिनी परीक्षकांवर टाकण्यासाठी वेस्टर्न गाऊनची खरेदी चांगलीच रंगली होती. वेस्टर्न आउटफिटच्या खरेदीसाठी 'काठियावाड' शोरूममधील डिझायनर गाउनला तरुणींनी पसंती दिली. ब्लॅक, व्हाइट अँड रेड गाउनची खरेदी रॅम्पवॉकसाठी केली गेली. वेगवेगळ्या आऊटफिटचे गाउन बघण्यात तरुणी दंग झाल्या होत्या.

----

श्रावणक्वीनसाठी काठिवायाड शोरूमतर्फे खास डिझायनर वेस्टर्न गाउन तरुणींना दाखविण्यात आले. सिटी फिनालेत रॅम्पवॉक करताना फायनलिस्ट काठियावाडमधील गाउन परिधान करणार आहेत. भविष्यातील अभिनेत्री आणि मॉडेल्समुळे या गाउनचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.

- प्रीतेश ठक्कर, संचालक, काठियावाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटलजींना श्रद्धांजली; महासभा तहकूब

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महासभेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करीत सभा तहकूब करण्यात आली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मनोगत व्यक्त करत वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

महापौर भानसी म्हणाल्या की, माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी संपूर्ण जगभरात आदराचे स्थान निर्माण केले आहे. शांत व संयमी स्वभावाने ते सर्वांना जिंकून घेत असत. ते केवळ एका पक्षाचे नेते नव्हते तर सर्व पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. १९९६ मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना माझे वडील कचरुभाऊ राऊत यांना खासदार होता आले. यामुळे माझ्यासह कुटुंबाला संसद पाहता आली. त्यावेळी मला वाजपेयी यांचे आशीर्वाद लाभले. आज त्यांच्या आशीर्वादानेच आपण राजकारणात आहोत.

यावेळी गटनेते शाहू खैरे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी हे संपूर्ण भारताचे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. पक्षीय भेद त्यांनी कधीही ठेवला नाही. त्यांच्या जाण्याने प्रत्येकाला दु:ख झालेले आहे. सुधाकर बडगुजर यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योद्धा असे वाजपेयी यांचे वर्णन केले. वाजपेयी यांच्या जाण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांनी देशासाठी तन, मन अर्पण केले होते. कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ मानवाला देश मुकला आहे, असे मत सभापती हिमगौरी आडके यांनी व्यक्त केले. जग एका कर्तृत्त्ववान महान व्यक्तीला मुकल्याची भावना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते संभाजी मोरूस्कर, विलास शिंदे, गजानन शेलार, वैशाली भोसले, डॉ. हेमलता पाटील, सुषमा पगारे, शोभा साबळे, गुरुमित बग्गा, समिना मेनन, राहुल दिवे, वत्सला खैरे, योगेश शेवरे यांनी सभेत दाखल केलेल्या श्रद्धांजली प्रस्तावांचे वाचन करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नगरसेवक सुदाम नागरे, माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, एम. करुणानिधी, मनपाचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर, किशोर गायकवाड, मेजर कौस्तुभ राणे, नारायण पवार तसेच जुन्या नाशिकमधील वाडा कोसळून झालेली दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

0
0

केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

देवळाली कॅम्प : नाशिकमधील ऑल इंडिया मल्याळी असोसिएशन व गुरू स्पोर्टस अँड सोशल फाऊंडेशनतर्फे केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी दि. २४ ऑगस्टपर्यंत जीवनावश्यक साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबू जोस (९८२३७७६६३३), शिनू जोस (९७६२५९४७१०२), रणजित नायर (९८८१९९६९९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यातआले आहे.

--

भूखंडावर पार्किंग (फोटो)

सातपूर : एकीकडे शहरातील अतिक्रमणे हटविली जात असतानाच महापालिकेच्या भूखंडांवर चक्क कंटेनरचे अनधिकृत पार्किंग होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक ९ मधील महापालिका विद्यालयासाठी आरक्षित भूखंडावर सर्रासपणे कंटेनर पार्क केली जात आहेत. संततधार पावसामुळे कंटेनरच्या वाहतुकीतून चिखल रस्त्यावर येत असून, दुचाकीस्वारांना त्याचा त्रास सहन करावा लात आहे. महापालिकेने याबाबत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

डस्ट बिन ओसंडले

पंचवटी : श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आणि कानबाईच्या मिरवणुका यांच्यामुळे रामकुंड परिसरात पूजेसाठी गर्दी झाली होती. पूजेनंतरचे निर्माल्य येथे उभारण्यात आलेल्या डस्ट बिनमध्ये टाकले जात असल्यामुळे परिसरातील डस्ट बिन भरून त्यातून निर्माल्य खाली सांडत होते. सण-उत्सवाच्या काळात निर्माल्य वाहून नेण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्याची गरज असल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे.

--

संगमावर कचरा

पंचवटी : पावसाच्या सरींनी गारवा निर्माण झाल्याने गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसांची मागणी वाढते. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या जागेवर मक्याची कणसे भाजून विक्री करणारे हातगाडे पावलोपावली नजरेस पडतात. कपिला-गोदावरी संगमावरही मक्याच्या कणसांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ही कणसे खाऊन ती संगमावरील खडकावर टाकून दिली जात असल्यामुळे येथे त्या खाल्लेल्या मक्याच्या कणसांचा कचरा मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे.

--

बसथांब्याला विळखा फोटो)

सातपूर : अशोकनगर बस थांब्याच्या अगदी समोरच अवजड वाहने उभी राहत असल्याने प्रवाशांना थेट रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. अशोकनगररोडवर असलेला सात माऊली व श्रमिकनगर बस थांबा अवजड वाहनांमध्ये अडकला असल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे किरकोळ अपघातही होत असल्याने किमान गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणीही वाहनचालकांकडून होत आहे.

--

'कॅन्टोन्मेंट'ला निवेदन

देवळाली कॅम्प : येथील भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जुनी स्टेशनवाडी परिसरातील समस्यांचे निराकरण न झाल्याने पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे. महासंघाचे शहराध्यक्ष लखन डांगळे, सुरेश साळवे, विनोद भगवाने विक्रांत चव्हाण, मोहन पवार, बाळा केदारे, राहुल उन्हवणे आदींसह स्टेशनवाडी भागातील महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा मजलीत हॉलिडे फिव्हर

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेचे आयुक्त मिटिंगसाठी मुबंर्इला तर दोन्ही उपायुक्त सुटीवर असल्याने सोमवारी सतरा मजली इमारतीमध्ये सुटीसारखेच वातावरण होते. दुपारनंतर कामासाठी येणाऱ्या ना‌गरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले.

महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना शुक्रवारी पतेतीची सुटी होती. अनेकांनी शनिवारी सुटी टाकली. त्यात रविवार आल्याने सलग तीन दिवसाची सुटी मिळाल्यामुळे अनेकांनी पर्यटनाची संधी साधली. आज, सोमवारी आठवड्याच्या पहिलाच दिवस होता. मात्र, आयुक्त चंद्राकांत डांगे मिटिंगसाठी मुबंर्इत गेले होते. तसेच उपायुक्त लक्ष्मीकांत कहार हे आठ दिवसांच्या रजेवर आहेत. उपायुक्त चंद्रकांत खोसे देखील रजेवर असल्याने सोमवारी सतरा मजलीत कुणीही वरीष्ठ अधिकारी नव्हते. अधिकारी नसल्याने सतरा मजलीतील अनेक विभागप्रमुख देखील सकाळी येवून नंतर निघून गेले. त्यामुळे दिवसभर हॉलिडे फिव्हर होता. वाढता आस्थापना खर्च, घटत चालले उत्पन्न आणि कर्जफेडीच्या हप्तांमुळे महापालिका प्रशासनाची गाडी अद्याप रुळावर आली नसतानाच अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांची वणवण

महापालिकेत अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांनीही कामे नसल्याने त्यांनी ऑन ड्युटी सुटीचा आनंद घेतला. आधीच महिनाभर निवडणूक त्यातच गेल्या आठवड्यातील तीन दिवस सुट्यांमुळे मूलभूत सुविधा, अतिक्रमण, नगररचना विभाग, घरपट्टी संदर्भातील कामांसाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांची कामे खोळंबली आहेत. 'साहेब नाहीत, उद्या या' अशी उत्तरे ऐकून नागरिकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने हटविली शहरातील अतिक्रमणे

0
0

महापालिकेने हटविली

शहरातील अतिक्रमणे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने अतिक्रमण मोहीम तीव्र केली असून, सोमवारी नाशिकरोड, पूर्व विभाग व पश्चिम विभागातील अतिक्रमणे काढण्यात आली.

गंगापूर रोड भागातील निर्मला कॉन्व्हेंट जवळील प्रमोद देवरे यांच्या टेरेसमधील लोखंडी अँगल व पत्र्याचे बांधकाम त्यांनी स्वत: हटविले. तर पार्किंगच्या जागेतील शेडचे अनधिकृत बांधकाम मनपाने हटविले. साठे बाग, एमजीरोड येथील नंदलाल पारख यांचे अँगलचे बांधकाम, तसेच ओटा, जिन्यावरील बॉक्सचे बांधकाम मनपातर्फे हटविण्यात आले. घर नं. १०८४ गाढवे वाडा, चांदवडकर लेन, हॉटेल अलंकारचे अनधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत: हटविले असून, नाशिकरोड विभागातील अश्विन सोसायटी येथील शेड व रस्त्याचे जागेतील बांधकाम मनपामार्फत हटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद, गोवा होणार कनेक्ट

0
0

मटा विशेष

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : अनेक महिन्यांपासून नाशिककरांना अपेक्षित असलेली हैदराबाद आणि गोवा या शहरांसाठीची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तसे अधिकृत पत्रच स्पाइस जेट कंपनीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) दिले आहे. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ आणखी दोन शहरे नाशिकशी कनेक्ट होणार आहेत.

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नाशिकला सर्वाधिक सेवांची घोषणा झाली आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, बंगळुरू, भोपाळ, हिंदण या प्रमुख शहरांसाठी नाशिककरांना सेवा मिळणार आहे. जेट एअरवेज कंपनीने नाशिक-दिल्ली-नाशिक ही सेवा १५ जूनपासून सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद आहे. आता स्पाइसजेट या आघाडीच्या कंपनीकडून हैदराबाद आणि गोवा या दोन शहरांसाठी सेवा सुरू होत आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असून, त्यासंबंधीचे पत्र कंपनीने एचएएल प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार कंपनीने या सेवेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे काम सुरू केले आहे. बुकिंग काउंटर, स्टाफ यासह विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांसाठी कंपनीने नियोजन सुरू केले आहे. या सेवेबाबतची अधिकृत घोषणा कंपनीकडून येत्या काही दिवसांतच होणार आहे, तर ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या सेवेसाठीचे तिकीट बुकिंग सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

अशी असेल सेवा

हैदराबाद येथून सकाळी नऊच्या सुमारास विमान निघेल आणि ते दोन ते तीन तासांत ओझरला पोहोचेल. त्यानंतर हेच विमान ओझरहून गोव्याला रवाना होईल. तेथून पुन्हा ओझरला येणार आहे. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हे विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाईल. विशेष म्हणजे कंपनीकडून आठवड्यातील सातही दिवस ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील महत्त्वाचे शहर हैदराबाद, तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा हे थेट कनेक्ट होणार आहे. १८९ आसनी क्षमता असलेल्या विमानाद्वारे या दोन्ही शहरांसाठी सेवा मिळणार आहे. यातील ४० आसने ही उडान योजनेअंतर्गत राखीव असतील. त्यामुळे या ४० आसनांसाठी साधारण २८०० ते ३००० रुपये एवढे तिकीट आकारले जाणार आहे.

आज 'निमा'त बैठक

जेट एअरवेज कंपनीने उडान योजनेशिवाय देशातील महत्त्वाच्या शहरांसाठी नाशिकहून सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठीच कंपनीच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष गिलबर्ट जॉर्ज यांच्यासह अन्य अधिकारी मंगळवारी (२१ ऑगस्ट) नाशिकमध्ये येणार आहेत. निमा हाऊस येथे दुपारी १२ वाजता ते विविध संस्था- संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images