Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुंढेंची सत्ताधाऱ्यांवर कृपा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्रिसूत्रीचे कारण देत फुली मारल्याने सत्ताधाऱ्यांनी मुंढे यांच्या विरोधाचा सूर घेत संघर्ष उभा केला होता. मात्र, मुंढेंनीही सत्ताधाऱ्यांचा हा रोष कमी करण्यासाठी आपल्या त्रिसूत्रीत ढिलाई देत, सत्तारूढ भाजपला अच्छे दिन दाखवण्यास सुरुवात केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या अस्तरीकरणाच्या कामांसह शहरातील अन्य भागांतील रस्त्यांच्या खडीकरणाच्या तब्बल ८६ कोटींच्या प्रस्तावांना आयुक्त मुंढेंनी मान्यता दिली आहे. या रस्त्यांची ही कामे दोन टप्प्यांत होणार आहेत. यापैकी ४५ कोटींचे प्रस्ताव येत्या महासभेवर, तर उर्वरित ४१ कोटींचे प्रस्ताव पुढील महासभेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यात साडेचारशे, तर मनसेच्या सत्ताकाळात दोनशे कोटींच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक असतानाच, सत्ताधारी भाजपनेही २५७ कोटींचा बार रस्त्यावर उडवण्यास सुरुवात केली होती. मात्र, महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेला ब्रेक लावून भाजपला दणका दिला होता. कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता अशा त्रिसूत्रीनेच कामे होतील, असे फर्मान काढले होते. या निर्णयाने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मुंढेंनी सादर केलेल्या बजेटमध्येही नवीन रस्त्यांनाच प्राधान्य देत कामांचा क्रम ठरवून दिला होता. या निर्णयाने भाजपने थेट आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेत, संघर्ष सुरू केला होता. मात्र, मुंढेंनी आता भाजपबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. त्रिसूत्रीला बाजूला ठेवत मुंढेंनी आता रस्त्यांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महासभेत अंबड औद्योगिक वसाहतीत जवळपास १७ किलोमीटरचे सुमारे १९ कोटी रुपयांचे रस्ते करण्याचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. त्यापाठोपाठ आता सिडको विभागातील कॉलनी रस्त्यांचे खडीकरण व खडीकरण झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १९ कोटी ७२ लाखांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. याचबरोबर नाशिक पूर्व विभागातील विविध प्रभागांतील रस्ते खडीकरणासाठी ५ कोटी ८२ लाख, सातपूर विभागातील प्रभागातील विविध ठिकाणच्या रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी ९ कोटी ३० कोटींचे प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहेत. याशिवाय नाशिकरोड विभागातील रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी ८ कोटी, तर पंचवटी विभागातील विविध प्रभागांतील रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल ३२ कोटी लाखांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. प्रभागातील विकासकामे महासभेच्या पटलावर येऊ लागल्याने नगरसेवकांचाही विरोध मावळणार असून, विरोधाची तीव्रताही कमी होणार आहे.

सानप, हिरेंवर कृपा

भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांचा मुंढेंना सर्वाधिक विरोध आहे. त्यामुळे या दोघांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आलेल्या प्रस्तावांवरून दिसून येत आहे. आमदार बाळासाहेब सानप यांचा मतदारसंघ असलेल्या पंचवटी विभागाला झुकते माप देण्यात आले आहे. पंचवटी विभागातील सर्वाधिक ३२.२४ कोटींची रस्ते डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत. त्या खालोखाल नवीन नाशिक विभागातील रस्ते डांबरीकरणासाठी २० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांसोबतच आमदारांवरही कृपा केल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरला साकारणार शंभर खाटांचे रुग्णालय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर परिसराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत सातपूर विभागातील मायको प्रसूतिगृहाचा विस्तार केला जाणार असून, या ठिकाणी १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने या रुग्णालयाच्या कामासाठी पाच कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून, त्यातील अडीच कोटींचा पहिला हप्ता महापालिकेला प्राप्त झाला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सातपूरमधील नागरिकांची स्वतंत्र रुग्णालयाची मागणी पूर्ण होणार आहे.

शहरातील नागरिकांना आरोग्य व वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असून, महापालिकेच्या माध्यमातून शहरात सहा रुग्णालये चालविली जातात. शहरातील सध्यस्थितीत महापालिकेची जुने नाशिक भागात डॉ. झाकीर हुसेन (कथडा) रुग्णालय, नाशिकरोडला जेडीसी बिटको रुग्णालय, सिडकोत स्वामी समर्थ (मोरवाडी) रुग्णालय, गंगापूर भागात गंगापूर रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, सिन्नर फाटा येथे सावित्रीबाई फुले रुग्णालय अशी रुग्णालये कार्यरत आहेत. सातपूर विभागात २० खाटांचे मायको प्रसूतिगृह कार्यरत आहे. मात्र, सातपूर परिसराचा वाढता विस्तार व वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता या प्रसूतिगृहाचा विस्तार करून या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. येथे मोठे रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते, नाही तर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात जावे लागते. परंतु, सातपूरच्या रुग्णालयाची प्रतीक्षा आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामुळे पूर्ण होणार आहे.

चुंचाळे, म्हसरूळ, मखमलाबादलाही दवाखाना

केंद्राच्या अभियनांतर्गत सातपूरमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय मायको प्रसूतिगृहाच्या जागेवर उभे केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानापैकी पाच कोटी रुपयांचा पहिला हप्तादेखील महापालिकेला मिळाल्याने आता मायको रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ऑगस्टअखेर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. विस्तारित रुग्णालयात प्रसूतीबरोबरच सीझेरियन, तसेच अन्य वैद्यकीय सेवादेखील नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. सोबतच आता चुंचाळे, म्हसरूळ व मखमलाबादलाही नवीन दवाखाना महापालिकेच्या वतीने सुरू केला जाणार आहे.

(लोगो : शुभ वार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ची आज प्राथमिक फेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'आयोजित 'वामन हरी पेठे ज्वेलर्स'प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी आज, रविवारी (दि. १९) रंगणार आहे. प्राथमिक फेरीसाठी स्पर्धक सज्ज झाल्या असून, आज लावण्यावतींची सिटी फिनालेसाठी निवड केली जाणार आहे.

शरणपूररोडवरील हॉटेल एमरॉल्ड पार्कच्या पंचम हॉलमध्ये श्रावणक्वीन प्राथमिक फेरी रंगणार आहे. सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चंदेरी दुनियेतील दिग्गज या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत. श्रावणक्वीन स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या स्पर्धकांतून काही स्पर्धकांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांना 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे ई-मेल व फोनद्वारे कळविण्यात आले आहे. त्याच स्पर्धक प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात. रॅम्प वॉक, सेल्फ इन्ट्रोडक्शन, परफॉर्मन्स आणि टॅलेंट राउंड प्राथमिक फेरीत होईल. या सर्व राउंडमध्ये उत्तम असणाऱ्या स्पर्धकांना सिटी फिनालेसाठी निवडले जाईल. परीक्षकांचा निकाल अंतिम असेल. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

(संबंधित वृत्त पान २)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात-जोड-

0
0

'एलजेडी'ची निदर्शने (फोटो)

नाशिकरोड : दिल्लीत भारतीय संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ लोकतांत्रिक जनता दलातर्फे (एलजेडी) शनिवारी विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी विभागीय आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तृषाल अंभोरे, शहर प्रभारी अमर दोंदे, अविनाश पगारे, तारिक शेख, पवन साळवे, भारती साळवे, गौरव दाणी, प्रकाश वाघ आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाचक अटींविरुध्द लढा!

0
0

गणेशोत्सव मंडळांचा निर्धार; जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची पुनर्स्थापना

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव मंडळांवर लादलेल्या जाचक अटींमुळे शहरातील सर्व मंडळांनी एकत्र येत नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची पुनर्स्थापना केली आहे. शनिवारी चोपडा लॉन्स येथे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी एकीचे बळ मोठे आहे असे सांगत रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशाराही देण्यात आला. या बैठकीत मध्यवर्ती कोअर कमिटी तयार करण्यात आली. विभागवार कोअर कमिटी करण्यासाठी प्रमुख नावेही घोषित करण्यात आली.

तब्बल तीन तास चाललेली ही बैठक समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखील झाली. यावेळी गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, पदमाकर पाटील, सुरेश पाटील, शंकरराव बर्वे, देवांग जानी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाचक अटींविरुध्द आपला संताप व्यक्त केला. गेल्या वर्षी जेथे मंडपाला परवानगी दिली तेथे यावर्षी दिली जाणार नसेल, तर अगोदर ज्यांनी परवानगी दिली ती चुकीचे होती का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. आमचा डीजे वाचतो तो दिसतो पण, पब व बारमध्ये डीजे वाजतो तो का दिसत नाही, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. यावेळी गेल्या दोन वर्षापासून अनेक जाचक अटी लावल्या जात असून, त्या आपण सहन करीत आहोत. पण, आता एकीची ताकद दाखवायला हवी असा सूरही कार्यकर्त्यांनी काढला. यावेळी गजनान शेलार, समीर शेटे, पदमाकर पाटील, निवृत्ती अरिंगळे, शंकरराव बर्वे, विजय बिरारी, नंदू पवार, मंगश सुंगधी, व्ही. व्ही. उदावंतर, राकेश जंगम, देवांग जानी, स्वप्निल पाटील, विजू ठाकरे, सचिन डोंगरे, मदन दायमा, अरुण काळे, नीलेश जाधव, अमोल जगळे, विठ्ठल कस्तुरे, सुरेश पाटील, लक्ष्मणराव धोत्रे, सर्जेराव वाघ, रामसिंग बाबरी,यांनी भाषणे केली.

...

महामंडळच घेणार परवानगी

प्रत्येक गणेश मंडळाने स्वतंत्र परवानगी घेण्यापेक्षा महामंडळच सर्व गणेशोत्सव मंडळाची एकत्रित परवाणगी घेईल, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे गणेश मंडळाचा त्रास कमी होईल व प्रशासनाचा त्रासही कमी होईल.

...

पुणेसारखे महामंडळ असावे

पुणे येथील गणेशोत्सव महामंडळाची चर्चा करून प्रशासन निर्णय घेते. त्यामुळे पुणेसारखे गणेशोत्सव महामंडळ असावे, यासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. हे महामंडळ सर्वांसाठी आदर्श व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले.

...

अगोदर चर्चा नंतर निर्णय

अगोदर महामंडळ प्रशासनाबरोबर अडचणीबाबत चर्चा करेल. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. पण, जाचक अटी कायम ठेवल्यास मात्र बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असा इशाराही देण्यात आला.

...

डीजे व ढोल पथक

डीजे व ढोल पथकाचे प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महामंडळाने पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. इतर शहारात त्रास होत नाही. नाशिकमध्ये तो होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलजार यांच्या गीतांत नाशिककर मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मैं एक सदी से बैठी हूँ... इस राह से कोई गुजरा नहीं, कुछ चाँद के रथ तो गुजरे थे... पर चाँद से कोई उतरा नहीं' अशा भावगर्भ गीताने 'जिंदगी गुलजार है' कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुलजार यांच्या लेखणीतून जिवंत झालेली गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात मोरा गोरा अंग लै ले, वे शाम कुछ अजीब थी, हमने देखी है उन आँखो की, मेरी जाँ मुझे जा न कहो, ना जिया लागे ना, तुम पुकारलो, रूके रूके से कदम, दो नैनों मे आसू भरे है, सुरमयी अँखियोमे, नाम गूम जायेगा, आपकी आँखो मे कुछ, हजार राहें, तुझसे नाराज नहीं जिंदगी यासह काही गाणी सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात गायिका रागिणी कामतीकर यांनी गायन केले. श्रीपाद कोतवाल यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. तबल्यावर आदित्य कुलकर्णी, संवादिनीवर अॅड. प्रमोद पवार, तर ध्वनी व्यवस्था तुषार बागूल यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांना सक्तमजुरी

0
0

नाशिक : व्याजाच्या पैशांची मागणी करून एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघा खासगी सावकारांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी चार वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. पेठरोडवरील भराडवाडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ गतवर्षी १३ जानेवारीला हा प्रकार घडला होता. प्रेम मोहन शिंदे आणि शरद कमलाकर लोखंडे (दोघे रा. भराडवाडी, पेठरोड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चंदू उर्फ धाऱ्या विष्णू सावंत (वय २७, रा. भराडवाडी) याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांसह एका अल्पवयीन संशयितावर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल पावतीवर आता एड्सचा टोल फ्री क्रमांक

0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : जीवन उध्वस्त करणाऱ्या एचआयव्हीबाबत जनजागृतीच्या दिशेने आरोग्य विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. वाहनधारकांना टोल नाक्यावरून मिळणाऱ्या पावतीवर १०९७ हा टोल फ्री क्रमांक प्रसिध्द होऊ लागला आहे. विशेष म्हणजे राज्यातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच शिंदे येथील टोल नाक्यावर हा प्रयोग राबविण्यास सुरूवात झाल्याचा दावा आरोग्य विभागातील सूत्रांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक टोलनाक्यांवरील पावत्यांवर हा टोल फ्री क्रमांक मिळावा यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.

बेशिस्त वाहनचालकांना सावध करण्यासाठी 'नजर हटी दुर्घटना घटी' असे स्लोगन महामार्गांवर ठिकठिकाणी लावलेले असतात. अपघात होऊ नये याकरीता अशा स्लोगन्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे शारीरिक संबंधांवेळी योग्य खबरदारी न घेतल्यास एचआयव्ही हा असाध्य आजार होण्याचा धोकाही संभवतो. विशेषत: कुटुंबीयांपासून अनेक दिवस दूर राहणाऱ्या ट्रक चालकांना एचआयव्ही होण्याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब वारंवार पुढे आली आहे. नाशिकमध्ये १५ हजार तर मालेगावात तीन हजार एचआयव्हीबाधित असल्याची नोंद आहे.

ट्रक टर्मिनल्स, टोलनाके आणि जेथे जेथे ट्रक चालक एकत्रित जमतात तेथे तेथे त्यांच्या समुपदेशनाचे काम जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाकडून (डाप्को) केले जाते. एचआयव्हीबाबत खुलेपणाने बोलता यावे, त्याबाबत माहिती जाणून घेता यावी याकरीता १०९७ हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. परंतू या क्रमांकाबाबत अजूनही अनेकांना माहिती नाही. हा टोल फ्री क्रमांक अधिकाधिक नागरिकांपर्यंत आणि विशेषत: अधिकाधिक ट्रक चालकांपर्यंत पोहोचावा याकरीता तो टोल पावतीवर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न जिल्हा एडस नियंत्रण विभागाने सुरू केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी देखील या संकल्पनेबाबत सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील दोडी येथील एकात्मिक सल्ला चाचणी केंद्राच्या (आयसीटीसी) पुढाकाराने शिंदे येथील टोल नाक्यावर एचआयव्हीच्या टोल फ्री क्रमांकासह टोल पावत्या मिळण्यास सुरुवात झाली आहे.

एड्सबाबत ट्रकचालकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता टोल पावतीवरही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. देशातील हा बहुदा पहिलाच प्रयोग असून, दोडी येथील आयसीटीसी सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील अन्य टोल नाक्यांवरही या प्रयोगाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न आहे.

- योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डाप्को

वाहनांच्या परवान्यावरही टोल फ्री क्रमांक

प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या परवान्यावरही हा टोल फ्री क्रमांक दिला जावा, यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. परंतु अद्याप हा एचआयव्ही/एड्सचा टोल फ्री क्रमांक प्रत्यक्षात परवान्यावर येऊ शकलेला नाही. त्याबाबतचे जनजागृतीपर स्टीकर्स मात्र वाहनांवर लावण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने सहकार्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरुणराजाने घेतली शहरात विश्रांती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. मात्र, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह इगतपुरी तालुक्यात पाऊस सुरूच असल्याने दिवसभर गंगापूर धरणासह दारणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला.

गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत शनिवारी शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत जिल्ह्यात १६५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पेठमध्ये ४०, दिंडोरीत २८, त्र्यंबकेश्वरमध्ये २७, सुरगाण्यात २६, तर इगतपुरीत २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदगाव, मालेगाव, सिन्नर आणि बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली, तर नाशिकसह निफाड, देवळा, येवला आणि कळवण या तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरात २४ तासांत ९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, शनिवारी दिवसभरात अवघ्या ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

या धरणांमधून विसर्ग

शहर-जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सात धरणांमधून विसर्ग सुरू आहे. शनिवारी दारणा धरणातून दोन हजार ६३६ क्युसेकने, तर गंगापूर धरणातून २०२४ क्युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून १२ हजार ४६६ क्युसेक, आळंदीतून ६८७, वालदेवीतून ५९८, तर भावलीतून १३५ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार लेख : ये रे ये रे पावसा

0
0

\Bलहरी पावसा!

\B

नेहमीच परीक्षा पाहणाऱ्या पावसाने यंदाही बळीराजाची चांगलेच तरसवले. आणखी दोन-तीन दिवस पाऊस आला नसता तर रडवेला चेहरा झालेल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला असता. दुबार पेरणीनंतरही पीकं मान टाकत असतील तर त्याचे दु:ख काय असेत हे शेतकऱ्याहून अधिक चांगले कोण सांगणार? असो, अगदी वेळेवर हजेरी लावून पावसाने जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा दिला, हे ही नसे थोडके.

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

पावसाला कुणी मालक नाही. तो त्याच्या मर्जीचा राजा आहे. म्हणूनच त्याचा लहरीपणा सहन करण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही. अर्थात त्याच्या लहरी वागण्याला आपणच कारणीभूत आहोत, हे नव्याने सांगायला नकोच. मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, त्यामुळेच निसर्गाचे चक्रही विचलित होते आहे. म्हणूनच हल्ली पाऊस कधीही पडतो. वेळापत्रक चुकल्यासारखा. जेव्हा तापदायक उन्हाचा चटका बसायला हवा तेव्हा धो-धो पावसाचे फटके नाशिककरांनी सहन केले आहेत. फार जुना नाही अगदी गतवर्षीच नाशिककरांनी हा अनुभव घेतला. एप्रिल आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील २६ हजार ८८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी २२ कोटी ३४ लाख ३२ हजार रूपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. नाशिकसह जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहमदनगर येथील पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: ३३ हजार ३५३ हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिक उत्पादक शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईमुळे दिलासा मिळाला आहे.

यंदाही पावसाने नाशिककरांच्या संयमाची परीक्षा पाहिली. यंदा सरासरीएवढा पाऊस पडेल, असे भाकीत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेकांकडून वर्तविण्यात आले. परंतु जुनच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहीला. जुन, जुलै अन् आता ऑगस्ट या प्रत्येक महिन्यात निम्म्याहून अधिक दिवस पावसाने दांडी मारल्याचेच पहावयास मिळत आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर भागातील अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिके करपू लागली. ती मान खाली टाकू लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीतही कृषी विभागाने पावसाअभावी निर्माण झालेल्या दाहक परिस्थितीचेच चित्र उभे केले. नांदगाव, येवला, बागलाण, देवळा, चांदवड या तालुक्यांमधील परिस्थिती हाताबाहेर जात असून, २० ऑगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास पेरणी केलेल्या पिकांची वाताहात निश्चित असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. ऑगस्टचा पंधरवडा उजाडूनही जिल्हा प्रशासनाला ग्रामीण भागातील रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ५० टँकर सुरू ठेवावे लागतात यावरूनच यंदा पावसाने जिल्हावासियांच्या तोंडचे पाणी कसे पळविले आहे, याची प्रचिती येते. माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची कोठूनही व्यवस्था करता येईल. परंतू पाऊस नाही झाला तर चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होतो याकडेही या बैठकीमध्ये लक्ष वेधण्यात आले. नांदगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी चाऱ्याची मागणी केल्याचे जिल्हा प्रशासनानेही मान्य केले असले तरी चारा टंचाईची परिस्थिती निश्चितच नसल्याचा दावाही केला आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या की, चारा छावण्या उभारण्याचे, जनावरे या छावण्यांमध्ये नेऊन बांधण्याचे चित्र काही वर्षांपूर्वी मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही पहावयास मिळायचे. परंतू या परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. पावसाप्रमाणेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांचाही हा परिणाम म्हणावा लागेल. तरीही जिल्ह्यात जित्राबांना चाऱ्याची टंचाई जाणवू नये याकरीता वनविभागाकडून संकलित होणाऱ्या चाऱ्यापैकी निम्मा चारा आरक्षित करण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे.

२० ऑगस्टपर्यंत पाऊस झाला नाहीच काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन टंचाई आढाव्याच्या बैठकीमध्ये करण्यात आले. त्यामध्ये धरणांमधील उपलब्ध उपयुक्त पाणी चोरी जाणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत. पाणी चोरण्यासाठी अवैधरित्या विद्युत मोटारींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गरज भासल्यास त्यांची वीज जोडणी तोडावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या ५०० मीटर क्षेत्रातील विहिरी तसेच अन्य स्त्रोत बंद करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने टंचाई परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होते.

अर्थात २० ऑगस्टपूर्वी पाऊस झाला तर पिकांना जीवदान मिळू शकते, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला होता. गुरूवारी पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागात हजेरी लावली. केवळ हजेरीच लावली नाही तर पूर्वेसह उत्तरेकडील प्रत्येक तालुक्यात एका दिवसात ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. विशेषत: येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, चांदवड अशा वंचित राहिलेल्या तालुक्यांमध्येच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या तेथील पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे आरम, मोसम या नद्यांना पूर आला असून, पालखेड आणि गिरणा खोऱ्यातील धरणांमधील पाणी पातळी वाढण्यास या पावसामुळे मोठी मदत झाली आहे.

हरणबारी, केळझर, भावली, वालदेवी, वाघाड यांसारखी धरणे १०० टक्के भरली असून, चणकापूर, करंजवण, पुणेगाव, दारणा, कडवा, पुनद या धरणांमधील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. निश्चितच या धरणांवर अवलंबून असलेल्या तालुक्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गिरणा धरणाची तहान मात्र मोठी असून, परतीच्या पावसाने कृपा केली तर या धरणातील जलसाठ्याची स्थिती बदलेल अशी आशा करूयात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार ‘मेरी’

0
0

निसर्गायन

नाशिकमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही केवळ धरणांबरोबरच राज्यभरातील विविध बांधकामांचा कणा आहे. कारण या सर्व विकास प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यापासून त्याची गुणवत्ता तपासण्याचे काम 'मेरी'त चालते. अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर मेरीने आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे.

भावेश ब्राह्मणकर

bhavesh.brahmankar@timesgroup.com

राज्यभरात जी काही धरणे बांधली जातात, त्याचे संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेला जाते. केवळ एवढी एकच ओळख या संस्थेची राज्यभरात आहे; पण 'मेरी' केवळ तेवढेच कार्य करते का? तर नाही. 'मेरी'च्या कार्याची ओळख करून घेताना राज्याच्या विकासातील तिचे योगदान तर कळून चुकतेच, शिवाय 'मेरी'विषयी आपल्याला मोठा आदर वाटायला लागतो. एखादी प्रशासकीय संस्था मैलाचा दगड ठरावी, याचा प्रत्यय 'मेरी' देते. राज्यभरात रस्ते, धरण आणि इतरही बांधकामे सरकारला करावी लागतात. त्यामुळे या कामांसाठी अभ्यास आणि संशोधन करणारी मातृसंस्था असावी, असा विचार पन्नासच्या दशकात पुढे आला. यावर बराच खल झाला. संस्था कशी असावी, काय नसावे, काय असावे आणि इतरही बाबींवर मोठे विचारमंथन झाले. अखेर १९५९ मध्ये 'मेरी'ची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. जमिनीचा पोत, बांधकामाचे साहित्य आणि साधनांचा अभ्यास, तपासणी, महामार्ग, समुद्रकिनारा, रिमोट सेन्सिंग, पाणथळे, जलसंधारणाच्या ठिकाणची वाळू, तेथील खडकांची स्थिती अशा विविध बाबींवर संस्थेने अभ्यास, संशोधन करावे असे निश्चित झाले; पण संस्थेच्या कार्याचा व्याप पाहता, तिला पोषक असे वातावरण देणे आवश्यक होते. त्यामुळेच 'मेरी'चे स्थलांतर १९७६ मध्ये नाशिकला करण्यात आले. भव्य अशा परिसरात मेरी स्थापन झाली.

महासंचालक हे 'मेरी'चे प्रमुख आहेत. 'मेरी'मध्ये एकूण सात विभाग कार्यरत आहेत. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा), नियोजन आणि जलविज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, धरण सुरक्षितता संघटना, गुणनियंत्रण मंडळे आणि राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (टॅक) यांचा त्यात समावेश आहे. 'मेरी'च्याच आवारात भूकंप पृथक्करण केंद्र साकारण्यात आले आहे. केवळ भारतातच नाही तर अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाची नोंद या केंद्रात होते. तशी अधिकृत माहिती 'मेरी'कडून दिली जाते. भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे आहे, किती तीव्रतेचा भूकंप आहे हे या केंद्रातून सरकारला कळविले जाते. राज्यातील भूकंप विषय माहितीची त्रैमासिक पत्रिकाही 'मेरी'कडून प्रसिद्ध केली जाते. भूकंप आणि कंपनांचा बांधकामांवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास 'मेरी'कडून केला जातो. 'मेरी'मध्ये सुदूर संवेदन तंत्राच्या साह्याने पीकक्षेत्र मोजणी, धरणातील गाळ सर्वेक्षण करणे, भूकंप लहरींविषयी माहिती संकलित करून त्याचे पृथक्करण करणे, धरणाचा सांडवा, कालवे अशा भागांची प्रतिरूपे तयार करून त्याचे परीक्षण करणे, धरणांवर वेगवेगळी उपकरणे बसविणे, रस्त्यांचे परीक्षण करणे, सिमेंट, वाळू, खडी, लोह आदी बांधकाम साहित्याच्या चाचण्या करणे, प्लेट लोड टेस्ट, काँक्रीट मिक्स डिझाइन आदींचे परीक्षण करणे, विविध जलाशयांवर उभारल्या जाणाऱ्या पुलाचा आराखडा तयार करणे आदी कामे 'मेरी'कडून केली जातात.

मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेमध्ये चार सुप्रिटेंडिंग इंजिनीअरच्या नेतृत्वाखाली जवळपास २० इंजिनीअर काम करतात. दगडी धरणे, मातीचे धरण, विमोचक, विद्युत गृहे, उपसा सिंचन आदींबाबतच्या संकल्पनांचे काम येथे केले जाते. जलसंपदा विभागातील मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या मुख्य भागाचे संकल्पन करणे, सांडवा, बंधारे, कालवे, वक्राकार दरवाजे, पाण्याचे नियोजन, पूर नियंत्रण, भूगर्भीय संशोधन आदी कामे या विभागात केली जातात. राज्य सरकारच्या बांधकाम, जलसंपदा व अन्य विभागांमध्ये दाखल होणाऱ्या इंजिनीअर्सला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन १९६४ मध्ये स्टाफ कॉलेजची स्थापना 'मेरी'मध्ये करण्यात आली. त्यानंतर या कॉलेजचे नाव 'मेटा' असे करण्यात आले. एमपीएससीद्वारे सेवेत आलेल्या इंजिनीअर्सला 'मेटा'मध्ये प्रशिक्षण दिले जाते. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे 'मेटा'ची तीन विभागीय कार्यालये आहेत. जलसंपदा व बांधकाम विभागातील इंजिनीअर्सच्या वेळोवेळी विविध परीक्षा 'मेटा'कडून घेतल्या जातात. राज्यभरातील धरणांची सुरक्षितता वाहण्यासाठी १९८० मध्ये 'मेरी'त स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. धरणांना असणारे संभावित धोके ओळखणे व त्यावर उपाय शोधणे हे या विभागाचे प्रमुख काम आहे. यासाठीच संस्थेकडून राज्यातील सर्व धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर परीक्षण केले जाते. त्याचा अहवाल तयार करून तो सरकारला सादर केला जातो.

जागतिक बँकेच्या सहकार्याने देशात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प घोषित करण्यात आला. त्याअंतर्गत 'मेरी'मध्ये १९९५ मध्ये नियोजन व जलविज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली. संस्थेची दोन मंडळ कार्यालये आणि ८ विभागीय कार्यालये आहेत. पाण्याविषयी माहिती संकलन करून त्याचे विश्लेषण हा विभाग करतो. हवामानविषयक उपकरणे उभारणे आणि त्याची देखभाल दुरुस्ती विभाग करते. पाणी गुणवत्तेसाठी ३७ विविध मापदंड विभागाने निश्चित केले आहेत. विभागाकडे एकूण १२ प्रयोगशाळा आहेत. नद्यांचे खोरेनिहाय माहिती संकलन, माहितीचे पृथक्करण, पाण्याचे नियोजन व पाणी उपलब्धता अभ्यास, २५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत केले जाते. गुणनियंत्रण हा स्वतंत्र आणि मोठा विभाग आहे. एकूण ११ विभागीय कार्यालये आहेत, तर पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे मंडळ कार्यालये आहेत. बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, विविध बांधकाम साहित्याची दर्जा तपासणी, मानकांप्रमाणे साहित्याची चाचपणी करणे, प्रकल्पाच्या ठिकाणी मृदा आणि काँक्रिटची तपासणी करणे हे या विभागाचे काम आहे. विविध स्तरावरील कामे व तेथे येणाऱ्या अडचणींवरील उपाय शोधण्याचे कामसुद्धा हा विभाग करतो.

राज्यात जी काही धरणे बांधली गेली आहेत किंवा जी प्रस्तावित आहेत, त्याचा पूर्ण आराखडा 'मेरी'नेच तयार केला आहे, तसेच या धरणांच्या सुरक्षेची काळजीही 'मेरी'कडूनच वाहिली जाते. बंधारे आणि कालव्यांचा आराखडाही 'मेरी'च तयार करते. राज्यातील सिंचन क्षेत्र निर्माण होण्यात 'मेरी'चा मोठा वाटा आहे. जलसमृद्धीसाठी आवश्यक जलसंधारणाच्या कामाची रूपरेषाच 'मेरी' निश्चित करीत असल्याने तिचे मूल्य अनन्यसाधारण आहे. निमशासकीय आणि खासगी संस्थांकडून येणाऱ्या कामासंबंधीचे उपयोजित संशोधन व चाचणीसुद्धा 'मेरी'त केली जाते. त्यामुळे 'मेरी'चे कार्य हे राज्य आणि देशाच्या विकासावर मूलगामी परिणाम करणारे आहे. अभ्यास आणि संशोधनाद्वारे नवनवीन प्रकल्पांची पायाभरणी 'मेरी' करीत आहे. भारतीय उष्ण प्रादेशिक हवामान संस्थेप्रमाणेच विविध विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने पीएच.डी. आणि संशोधनपर अभ्यासक्रमांना 'मेरी'ने संधी द्यायला हवी. याद्वारे तरुणांना संशोधनाकडे आकर्षित करतानाच नव्या पिढीला अनेकानेक संधीही प्राप्त होतील. त्याशिवाय राज्याच्या विकासात या संशोधनाचे योगदानही लाभू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार चित्रवृत्त – भाजीपाला शेती ते एक्स्पोर्ट

0
0

फोटो - १८ ऑस्टच्या फोल्डरमधे आहे...फोटो -सतीश काळे

रविवार चित्रवृत्त - भाजीपाला शेती ते एक्स्पोर्ट

--

शेतातून थेट बाजारात

नाशिक हे देशाचे किचन आहे असे म्हंटले जाते. त्याचे कारण म्हणजे येथील भाजीपाला. मुंबईच्या वाशी बाजारसह देशाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नाशिकचा भाजीपाला जातो. कांद्यापासून तर विविध प्रकारच्या फळ आणि फुलभाज्या हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. शेतापासून थेट बाजारापर्यंत भाजीपाल्याचा नक्की प्रवास कसा होतो, याचा चित्रवृत्ताद्वारे घेतलेला हा वेध.

१. शेतातून भाजी काढताना (खुडताना) शेतकरी.

२. भाजी खुडल्यानंतर ती कॅरेटमधे एकत्रित केली जाते.

३. त्यानंतर सर्व भाज्यांची विभागणी करून वर्गीकरण केले जाते.

४. भाजी लिलावासाठी बाजार समितीत आणल्यानंतर कॅरेट उतरवताना.

५. शेतकऱ्यांच्या मालाचे दर ठरवून लिलाव करताना कमिशन एजंट.

६. लिलावात भाजीचा दर ठरल्यानंतर एजंट सर्व माल व्यापाऱ्याला देतो. त्यानंतर माल बाहेरगावी पाठविण्यासाठी व्यापारी मालाचे पॅकिंग तयार करतात.

७. भाजी पॅकिंग बॉक्समधे भरल्यानंतर त्याचे पॅकिंग करताना.

८. पॅकिंग झाल्यानंतर व्यापाऱ्याकडून सर्व भाजीपाल्याचा माल बाहेरगावी पाठविला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांना मिळणार उद्योजक बनण्याचे धडे

0
0

शहरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतातील सर्वात मोठ्या हाऊसकिपिंग कंपनी असलेल्या बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांचे नाशिक येथे आज (दि. १९) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून, त्यात ते नाशिकच्या तरुणांना उद्योजक बनण्याचे धडे देणार आहेत.

गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाचे केबीटी इंजिनीअरिंग कॉलेज येथे सकाळी १२ वाजता महाराष्ट्र राज्य मराठा उद्योग फोरम आयोजित व्यवसाय व नोकरी मार्गदर्शन कार्यशाळा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यशाळेत तरुणाना 'नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मराठा समाज' आणि 'महाराष्ट्रीयन उद्योजकांचा वाटा वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज' या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे, खासदार हेमंत गोडसे, डॉ. प्रशांत पाटील, विशाल बनकर हे मागदर्शन करणार आहेत. यानंतर दुपारी दोन वाजता गंगापूर रोडवरील फ्रवशी इंटरनॅशनल येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्ट यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजीव शर्मा, रोटरीच्या अध्यक्षा नेहा खरे, महेश मोकळकर, सचिव जुली शेरीकर, संजय कलंत्री हे सहभाग घेणार आहेत. दुपारी तीन वाजता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यक्रमात हणमंतराव गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे. संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त समाजदिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यात विद्यार्थी व सेवक यांचा गौरव केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज स्मारकात “लाखाची गोष्ट” चित्रपट

0
0

कुसुमाग्रज स्मारकात

'लाखाची गोष्ट'

नाशिक : श्रेष्ठ गीतलेखक कथा पटकथा संवादलेखक ग. दि. माडगुळकर आणि लोकप्रिय गायक-संगीत दिग्दर्शक सुधीर फडके या दोघांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीतर्फे लाखाची गोष्ट (१९५२) हा गाजलेला विनोदी चित्रपट सोमवारी (२० ऑगस्ट) सायं. ५.३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात सादर होणार आहे. "लाखाची गोष्ट" मध्ये राजा गोसावी, राजा परांजपे, चित्रा, रेखा, शरद तळवलकर, इंदिरा चिटणीस आणि ग. दि. माडगुळकर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटासाठी प्रवेश खुला असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला आज बुद्धिबळ प्रशिक्षण

0
0

नाशिकरोडला आज बुद्धिबळ प्रशिक्षण

जेलरोड : नाशिकरोड येथे आज, रविवारी (दि. १९) दुपारी बाराला बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर व बुद्धिबळ कोडे सोडविण्याची स्पर्धा होणार आहे. नाशिक-पुणे मार्गावरील फेम सिनेमागृहामागील सहस्रार्जुन क्षत्रिय समाज मंगल कार्यालयात मोरफी चेस अॅकॅडेमीतर्फे हे शिबिर होईल, अशी माहिती संचालक महेश शिंदे यांनी दिली. १५ वर्षांखालील मुलांना प्रवेश मिळेल. नावनोंदणीसाठी संतोष कस्तुरे (९७६२१०३२४०) यांच्याशी संपर्क साधता येईल.

--

कला कार्यशाळा (फोटो)

जेलरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालयात पर्यावरण मंडळातर्फे कला कार्यशाळा झाली. मंडळाच्या निमंत्रक कामिनी पवार, प्राचार्या डॉ. लीना पांढरे, प्रा. मीनल बर्वे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कागदी गुलाब फुले कशी तयार करावीत, कटिंग कसे करावे, पाकळ्यांना आकार कसा द्यावा आदींचे प्रशिक्षण पवार यांनी दिले. प्राचार्या डॉ. पांढरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

--

नेत्र तपासणी शिबिर

पंचवटी : प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेविका प्रियंका माने यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. बिरला आय हॉस्पिटलच्या सहकार्याने १८० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. दुर्गेश शिंदे, डॉ. शुभम जाधव, डॉ. अर्चना कामटे यांनी ही तपासणी केली. यावेळी निवृत्त सैनिक आणि शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. पंचवटी मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, पप्पू माने, शैलेश आचगे, मनोज दिवटे, सोमनाथ बोडके, विलास कारेगावकर आदी उपस्थित होते.

(थोडक्यात)

-----

पॉइंटर्स

--

यंदा भाववाढ नाही-२

खड्ड्यांमुळे अपघातांत भर-३

शहरात 'अ'स्वच्छतागृहे! -४

शिक्षण व्हावं स्मार्ट -५

केल्याने देशाटन -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशात मुलींच्या जन्मदरात वाढ

0
0

डॉ. राजेंद्र फडके यांचा दावा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'बेटी बचाव बेटी पढाओ' उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे लोकांमध्ये जागृती झाली असून, स्त्री भ्रूणहत्येत घट होऊन मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही मुलींचा जन्मदर कमालीचा वाढला असून चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये तर तो एक हजारपेक्षाही अधिक असल्याचा दावा बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केला आहे.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी हितगूज साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' (बीबीबीपी) या ड्रीम प्रोजेक्टच्या साडेतीन वर्षांच्या काळातील फलनिष्पत्तीची माहिती डॉ. फडके यांनी दिली. यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, गिरीश पालवे व्यासपीठावर होते. सन २०१४ मध्ये मुलींचा जन्मदर सरासरी ९२९ इतका होता. काही राज्यांत तर हा दर प्रतिहजारी ८५० पेक्षाही कमी होता. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आदी राज्यातील १६१ जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदराची परिस्थिती भयावह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर देशातील स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण रोखावे आणि समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या विषयाला हात घालून २१ जानेवारी २०१५ ला 'बीबीबीपी' या उपक्रमाला चालना देऊन त्याच्या राष्ट्रीय संयोजकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सहा राष्ट्रीय पथकांच्या मदतीने या उपक्रमाची सुरुवात झाली. सर्व राज्ये, सर्व जिल्हे आणि अगदी मंडल स्तरावर याची रचना करण्याचे निश्चित झाल्यानंतर अथक प्रयत्नातून अनेक ठिकाणी ही रचना पूर्ण झाली, तर काही ठिकाणी ती प्रगतीपथावर आहे. स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, संत-महंत यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम जणू जनचळवळ बनली आणि हळूहळू त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले, असे डॉ. फडके यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदैव देशहिताचा विचार केला

0
0

श्रद्धांजली सभेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माजी पंतप्रधान अटलजींनी देशाच्या हिताचा सदैव विचार केला. त्यांच्यासारखे लोकप्रियता लाभलेले नेते फार कमी झाले. मला त्यांचा अगदी थोडा सहवास लाभला, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे विचार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.

अटलजी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने आणि विचारांच्या रूपाने ते सदैव आपल्यात आहेत, असेही ते म्हणाले. या वेळी विविध लोकप्रतिनिधींनीदेखील अटलजींच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सांयकाळी दिल्ली येथे निधन झाले. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील शाहू नाट्य मंदिरात या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यासाठी आमदार कुणाल पाटील, आमदार डी. एस. अहिरे, महापौर कल्पना महाले, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी महापौर भगवान करणकाळ, अनुप अग्रवाल, संजीवनी सिसोदे, कल्पना गंगवार, रमेश श्रीखंडे, युवराज करणकाळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावात आज सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. जळगावात स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (दि. १९) सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हावासीयांतर्फे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा हॉल, येथे आज दुपारी ४ वाजता ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समाजातील प्रत्येक घटकाने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैया कुमार साधणार तरुणांशी संवाद

0
0

नाशिकमध्ये उद्या गुंफणार

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या तरुणांनीही सरकारला आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारावेत, तरुणांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी नाशिकमधील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारचे व्याख्यान होणार आहे. तरुणांनो ! निर्भय बना... प्रश्न विचारा! या विषयावर कन्हैया तरुणांसोबत उद्या, सोमवारी संवाद साधणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५६ वे व्याख्यान सोमवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार आहे. यावेळी कन्हैया कुमार तरुणांसोबत सरकारच्या विविध भूमिका, रोजगार आणि विकास या विषयांवर संवाद साधणार आहे. कन्हैया कुमारची तुपसाखरे लॉन्स येथे ५ नोव्हेंबर २०१८ रोजी जाहीर सभा झाली होती. शहरातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी सभेपूर्वीच अनेक वादंग निर्माण झाले होते. यावेळी मात्र कन्हैयाच्या व्याख्यानाला अद्याप कोणत्याही संघटनेने विरोध केलेला नाही. पोलिसांनी देखील या व्याख्यानाला परवानगी दिली आहे. तरुणांच्या रास्त प्रश्नांवर तोडगा निघावा, यासाठी कन्हैयाचे व्याख्यान आयोजित केल्याचे डॉ. दाभोलकर व्याख्यानमाला समितीने सांगितले.

..

पोलिसांचा चोख बंदोबस्त

कन्हैया कुमारच्या व्याख्यानाप्रसंगी कोणताही गदारोळ होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. व्याख्यानासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

...

या मुद्द्यांवर साधणार संवाद

- देशाच्या विकासासाठी तरुणांची भूमिका काय असावी.

- सरकारला तरुणांनी कोणते प्रश्न विचारण्याची गरज आहे.

- विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या सरकारकडून रोजगार उपलब्ध का झाला नाही.

- दिशाभूल करणाऱ्या सध्याच्या परिस्थितीचे आकलन कसे करायचे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवभूमीच्या मदतीला धावली मंत्रभूमी

0
0

मल्याळी असोसिएशनकडून आज जाणार केरळला मदत

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी असोसिएशनच्या वतीने नाशकात ओनम सण साजरा केला जाणार नाही. तसेच, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसह फूड पॅकेट, जीवनावश्यक वस्तू आज (दि. १९) केरळमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आपत्ती उद्भवली आहे. केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातील सर्व नागरिक आपले बांधव असून, संकटकाळात त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, या हेतूने नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनतर्फे केरळमधील आपत्ती ग्रस्तांसाठी मदत पाठविली जाणार आहे. नाशिकहून केरळमध्ये रविवारी वाहनाद्वारे मदत पोहोचवली जाईल. यामध्ये मूगडाळ, तूरडाळ, तांदूळ, साखर, मीठ, चहाची पाने, ओट्स, पाणी, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, कपडे, टॉवेल्स, स्वेटर, सॅनिटरी पॅड, बॅटरी, बेबी फूड, डायपर या वस्तू पाठविण्यात येणार आहेत.

..

वस्तूंचे संकलन

कामटवाडे येथील माऊली आणि इच्छामणी लॉन्स येथे २२ ऑगस्टपर्यंत वस्तूंचे संकलन सुरू असणार आहे. मल्याळी बांधवांनी या वस्तू संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व नाशिककरांनी या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनने केले आहे.

..

ओनम सेलिब्रेशन नाही

मल्याळी बांधवांच्या नववर्षाची सुरुवात ओनम या सणापासून होते. श्रावणातील शुक्ल पक्षात पहिले दहा दिवस हा सण साजरा होतो. यंदा १५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत ओनम सण साजरा होत आहे. मात्र यंदा हा सण साजरा करायचा नाही, असा निर्णय नाशिकमधील मल्याळी बांधवांनी घेतला आहे. आपले बांधव संकटात असताना सणोत्सव साजरे करण्याचे मन होत नसल्याचे मत मल्याळी बांधवांनी व्यक्त केले आहे.

...

केरळच्या आपत्ती निवारणासाठी हातभार लावावा, या हेतूने पन्नास हजार रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये असोसिएशनतर्फे जमा करण्यात आली आहे. मल्याळी बांधवांनी आणि नाशिककरांनी देखील शक्य होईल त्या पध्दतीने मदत करायला हवी.

- अनुप पुष्पंगयन, सचिव, मल्याळी कल्चरल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

meri photo

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images