Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तिहेरी अपघातात चार जणांचा मृत्यू

0
0

इगतपुरीतील घटना; ग्रामस्थांचा रास्तारोको

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावर उभाडे शिवारात झालेल्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले. मृतातील तिघेजण उंबरकोन येथील असून, रिक्षाचालक युवक देवळे येथील रहिवासी आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अचानक रास्तारोको करून महामार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक व साइडपट्ट्या टाकण्याची मागणी केली. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.

घोटी-सिन्नर महामार्गावर उभाडे शिवारातील उंबरकोन फाट्यालगत अज्ञात टेम्पो, इनोव्हा कार (महाराष्ट्र ०४/ ईएन ३३३०) व रिक्षा (एमएच ०२ यूए ९८०८) यांच्यात रविवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात रिक्षाचालकासह चार जण जागीच ठार झाले. घोटी येथून बाजार करून उंबरकोन येथे ही रिक्षा जात होती. यात भास्कर कोंडाजी कोरडे (वय ६०), अर्जुन बहिरू सारुकते (वय ४५) शिवराम विठोबा सारुकते (वय ४०, सर्व रा. उंबरकोन) व अविनाश मोहन दालभगत (वय २२, रा. देवळे) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त कळताच पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, घोटीचे सहायक निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक विलास घिसाडी, इगतपुरीचे निरीक्षक शिंगटे, वाडीवऱ्हे निरीक्षक देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातानंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केले. या महामार्गावर स्पीडब्रेकर व साइडपट्टे नसल्याने अनेकवेळा अपघात होतात. अखेर सामाजिक कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढली. याबाबत बांधकाम विभागाला निर्देश देण्याचे आश्वासन दिले. या रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विद्यार्थ्यांचा कल विचारात घ्यावा!’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पालकांनी विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊनच त्यांना पुढील शिक्षणासाठी पाठविले पाहिजे. त्यांना कोणतीही सक्ती करू नका, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.

खान्देश मराठा समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शंकर पाटील, निंबा पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, सुधाकर शिसोदे अविनाश पाटील, अशोक पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बच्छाव यांनी सांगितले, की शिक्षणाबरोबरच अनेक क्षेत्रात विद्यार्थी नावलौकिक मिळवू शकतात. पालकांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची मुभा द्या, असेही सांगितले.

यावेळी प्रा. पाटील यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत. समाजातील सुमारे दोनशे गुणवंताचा सत्कार करण्यात आला. पी. टी. पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या रासिका शिंदे हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील समाज बांधव उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून धमकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मनसे कामगार सेनेचा राजीनामा द्या; नंतर वेतन घ्या, अशी धमकी इंडियन टूल्स कंपनीतील ठेकेदाराने आपल्याला दिल्याची तक्रार कंत्राटी कामगारांनी सातपूर पोलिस ठाण्यात केली आहे. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांना कामगारांनी नुकतेच निवेदन दिले.

कायम कामगारांना वेतनवाढ केल्याने नाराज झालेल्या इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी काही दिवसांपूर्वीच संप पुकारला होता. यानंतर मनसे कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारत कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर फलक लावला. यावर आता कंपनीतील ठेकेदाराने आक्षेप नोंदविला आहे. कंत्राटदारामार्फत पगारासाठी सही घेत त्या आड युनियनचाही राजीनामा घेत असल्याचे समोर आले. कामगारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. कामगारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी कंत्राटदाराची कानउघाडणी केल्याचे समजते. तसेच कामगारांनी व्यवस्थापनासह कंत्राटदाराविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

सातपूर एमआयडीसीतील इंडियन टूल्स मॅन्युफॅक्चरर्स (बिर्ला प्रिसीझन) या कारखान्यातील २३० कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी

व्यवस्थापनाविरोधात बंड पुकारत मनसे कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. कारखान्यातील कायम कामगारांनी चाँद बीबी झैदी यांच्या अखिल भारतीय मजदूर सभेचे तर कंत्राटी कामगारांनी मनसेचे नेतृत्व स्वीकारल्याने एका कंपनीत दोन युनियन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, कंत्राटदाराला हाताशी धरत व्यवस्थापनाकडून कंञाटी कामगार व त्याच्या परिवाराला धमकावून कामावर हजर केले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला होता. याबाबतची ऑडिओ क्लिपही पोलिस ठाण्यात सादर करण्यात आली. यावेळी कंत्राटदाराला पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कामावर घेतले होते. मात्र, कंत्राटदाराने कामगारांना पगार वाटपासाठी सह्या घेणे सुरू केले. त्याआड मनसे युनियनचाही राजीनामा घेत असल्याचे काही कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे ठेकेदारासह कंपनीतील कायम कामगारांकडूनही आपल्याला धमकविण्यात येत असल्याचे कंत्राटी कामगारांनी सांगितले.

पगारासाठी सही घेत असल्याचे सांगत मनसे युनियनचा राजीनामा लिहून घेतला जात आहे. त्यास विरोध केला तर शिवीगाळ केली जाते.

- महेश चौधरी, कंत्राटी कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरच्या हस्ते पुस्तकांचे वाटप

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मराठी शाळेत मी व माझी मुले शिकल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक राजकुमार साळी यांनी केले.

महापालिकेच्या जेलरोड येथील शाळा क्रमांक ५६ मध्ये शाळा प्रवेश, मोफत पाठ्यपुस्तक वाटप साळी यांच्या हस्ते झाले. पहिलीच्या नवागतांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे, तुरुंग अधिकारी संतोष कोकणे, नन्हीकली प्रकल्प समन्वयिका योगिता जाचक, मनीषा बाहुले, चंद्रकांत गांगुर्डे, नरेंद्र पवार, मंगेश पाठक आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक मंगेश पाठक व नरेंद्र पवार यांनी स्वागतगीत गायले.

साळी म्हणाले, की मी शासकीय शाळेत शिकलो. माझी मुलेही मराठी शाळेतच शिकली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा असलेला ओढा कमी होऊन मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढणे गरजेचे आहे. पहिलीच्या वर्गात प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे औक्षण शिक्षकांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना लाडू व चॉकलेटचे तसेच पाठ्यपुस्तकाचे वाटप झाले. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार

0
0

राज्यमंत्री दिलीप कांबळेंची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील समतानगर परिसरातील एका आठवर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार दि. १४ जून रोजी सकाळी उघडकीस आला होता. या पीडित कुटुंबीयांची रविवारी (दि. १७) सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी बालिकेच्या वडिलांची शिक्षा माफ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्‍वासन मंत्री कांबळे यांनी दिले.

शहरातील समतानगर पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना सरकारकडून आधार मिळावा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी हत्या झालेल्या बालिकेच्या वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांना झालेल्या जुन्या खटल्यातील शिक्षा माफ करण्यासंदर्भात सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येतील. तसेच मृत बालिकेचे आजोबा हे जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय सेवेत होते. ते सेवानिवृत्त आहेत. त्याच्या मोबदल्यात कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत आमदार सुरेश भोळे यांनी पीडित कुटुंबातील दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा यावेळी केली. दरम्यान, कुटुंबीयांनी जिल्ह्यात अनेक पदाधिकारी, पालकमंत्र्यांनी येऊनही आमच्याकडे पाठ फिरवली, अशी खंत कांबळे यांच्याकडे व्यक्त केली. या वेळी अरुण चांगरे, दिलीप चांगरे, सरिता माळी, अनिल अडकमोल, दिलीप माहेश्‍वरी, जितू करोसिया उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांच्या ओल्या पार्ट्या

0
0

धुळ्यात गेस्टहाऊसवर नियंत्रकांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाकडून चालक-वाहकांना समुपदेशनाची मोहीम हाती घेण्यात आली. प्रत्येक आगारात आठवड्यातून एकदा तज्ज्ञांकडून चालक-वाहकांचे समुपदेशन करण्यात येते. मात्र, दुसरीकडे धुळे मध्यवर्ती आगारातील गेस्ट हाऊसमध्ये एसटी कर्मचारी खुलेआम ओल्या पार्ट्या करीत आहेत. येथील गेस्ट हाऊसला गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी आगारातील अधिकाऱ्यांसह अचानक भेट देऊन पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

एसटी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीदेखील दुसरीकडे एसटीच्या कार्मचाऱ्यांमधील व्यसनाधीनता कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी धुळे विभागांतर्गत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांची काळजी घेऊनही अशा घटनांनी आगाराचे वातावरण बिघडत आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशनासाठी धुळे विभागांतर्गत दोन समुपदेशकांची नियुक्तीदेखील करण्यात आली असून, संबंधित समुपदेशक ज्यांना गरज आहे अशा कर्मचाऱ्यांचे समुपदेशन त्यांच्या आगारात जाऊन करीत आहेत. याशिवाय मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मज्जाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांची अल्कोटेस्ट करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना करूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांमधील व्यसन कमी होण्याऐवजी वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पाहणीत विभाग नियंत्रक सपकाळ यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे़, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मद्य आले कोठून?
धुळे मध्यवर्ती आगारात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये मद्याच्या बाटल्या येतातच कशा, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये मद्याच्या बाटल्यांसह प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गेटवर झडती का घेतली जात नाही. तशी यंत्रणा अद्याप विकसित कशी करण्यात आली नाही. खुलेआम गेस्ट हाऊसमध्ये मद्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कानाडोळा का करण्यात येतो, यासारखे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठा १२ टक्क्यांवर

0
0

जिल्ह्यातील सहा धरणे कोरडीठाक; पाणीटंचाईचे संकट

- आठ धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर

- गंगापूर धरण समुहातही २१ टक्के जलसाठा

- २४ धरणांत १२ टक्के उपयुक्त जलसाठा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकीकडे मान्सूनच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मान्सूनचा प्रवास लांबल्यास पाणी कपातीचे संकट अटळ आहे. आजमितीस जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांत ६५ हजार ८१४ दलघफू क्षमता असलेल्या पाणीसाठ्यापैकी अवघा ८ हजार २ दलघफू इतकाच उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे.

सन २०१६ या वर्षी नाशिक शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील बंधारा कोरडाठाक पडल्याने तब्बल ६० दिवस पंपिंग स्टेशनला टाळे लावण्याची वेळ आली होती. यंदाही मान्सूनचा प्रवास ऐनवेळी रखडल्याने खरिपाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. याशिवाय रोहिणी आणि मृग नक्षत्रांत पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण २४ धरणांत केवळ १२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. मान्सूनच्या जोरदार पावसाचे आगमन अजूनही लांबल्यास २०१६ या वर्षी कराव्या लागलेल्या पाणीकपातीची नाशिक शहरात पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरडीठाक पडलेली धरणे

जिल्ह्यातील भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या आणि माणिकपुंज ही सहा धरणे कोरडीठाक पडली आहेत. वाघाड, तिसगाव, गौतमी गोदावरी, पुणेगाव, कडवा, हरणबारी, केळझर आणि गिरणा या आठ धरणांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण समुहातही अवघा २१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकामगार रस्त्यावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात किमान घरेलू कामगारांना लागू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळाला होता. परंतु, युती सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी घरेलू कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेले कल्याणकारी मंडळच बरखास्त करीत विकास आयुक्तांची नेमणूक केली आहे. परंतु, घरेलू कामगारांना कल्याणकारी लाभ मिळणे बंदच झाल्याने पुन्हा कामगार उपायुक्त कार्यालयावर आंदोलन करावे लागल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कामगार उपायुक्तांना घरेलू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले. यामध्ये राज्य घरकामगार कल्याणकारी मंडळाची पुन्हा स्थापना करावी, जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरकामगार मंडळ स्थापावे, जिल्ह्यात प्रत्येक नोंदणीकृत घरेलू कामगारांचे नूतनीकरण, ओळखपत्र वाटप व लाभ पोहचविण्यासाठी स्वंतत्र यंत्रणा उभी करावी, लाभार्थींची वयोमर्यादा ७० वर्षे करण्यात यावी. वय वर्ष ५५ असलेल्या घरकामगारांना सन्मानधन त्वरित द्यावे, घरकामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी भरीव शिष्यवृत्ती देण्यात यावी, आरोग्य, मातृत्व लाभ, आयुर्विमा, मासिक तीन हजार पेन्शन व घरकुल अनुदान या कल्याणकारी योजनेचा लाभ लागू करावा. किमान वेतन, आठवड्याची पगारी सुट्टी, वर्षातून एकदा १५ दिवसांची रजा, बोनस इत्यादी कामगार कायदे लागू करावेत. घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, कामगारांची नूतनीकरण मर्यादा बांधकाम कामगारांप्रमाणे ५ वर्षांची करण्यात यावी. घरकामगारांना पंतप्रधान आवास योजनेतून मोफत घरे देण्यात यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. घरेलू कामगार

संघटनेच्या सरचिटणीस सिंधू शार्दुल, मंगला पाटील, विजया टिक्कल यांसह महिला कामगार सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवारा शेडचे कोसळले छत

0
0

निवारा शेडचे कोसळले छत

सातपूररोडवरील आयटीआय बसथांब्याच्या निवारा शेडचे छत जोरदार वाऱ्यामुळे काही दिवसांपूर्वी कोसळले आहे. पावसाला प्रारंभ होऊनही या छताची दुरुस्ती होत नसल्याने विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना उघड्या निवारा शेडखालीच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

--

पंकज चांडोले / नामदेव पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतींची वाट बिकट

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रभाग क्रमांक तीनमधील अयोध्यानगरी परिसरातील गजानन कॉलनी भागातील नववसाहतीत रस्त्यांची समस्या बिकट झालेली आहे. या भागात नव्या वसाहती झपाट्याने वाढत असतानाही महापालिकेकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. येथील रहिवाशांवर कराचा बोजा टाकला जातो. मात्र, सुविधांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत असल्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिरावाडीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील भागात नव्या वसाहतींची संख्या वाढलेली आहे. या भागातील प्रमुख समस्या रस्त्यांची आहे. पक्के रस्ते नसल्यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. या भागात ले-आउट पडल्यानंतर रस्त्यांसाठी पुरेशी जागा सोडण्यात आलेली आहे. काही भागातील रस्ते खडीकरण करण्यात आलेले आहेत. हे खडीकरण चार-पाच वर्षांपूर्वीचे असून, त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नसल्यामुळे ही खडी निघालेली आहे. निघालेली खडी कच्च्या रस्त्यावर पसरल्याने त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. दुचारीस्वारांची तर खडी आणि खड्डे चुकवित वाहने चालविताना चांगलीच दमछाक होत आहे.

छोटे रस्ते चांगले, मोठ्यांची दुर्दशा

वाढत्या लोकवस्तीचा विचार करून येथे मिळणाऱ्या सुविधा अत्यल्प आहेत. काही ठिकाणी कॉलनीतील छोटे रस्ते डांबरीकरण करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे सोसायटी, अपार्टमेंट, रो-हाउस यांच्यासमोर डांबरीकरण आणि मुख्य मार्गापासून ते सोसायटीपर्यंत पोहोचण्यासाठी खडतर मार्ग, अशी स्थिती या भागात बघायला मिळत आहे. पावसाळ्यात अशा रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानंतर ही अवस्था आणखी बिकट होते. वाहने चालविणे अवघड होते, तसेच पायी चालताना निघालेली खडी टाळून चालावे लागते.

पाणीही कमी दाबाने

या भागात पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्याही कमी व्यासाच्या आहेत. पूर्वीच्या लोकवस्तीसाठी असलेल्या जलवाहिन्या आता कमी पडत असल्यामुळे अनेक कॉलनी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे परिसरात नव्याने जलवाहिन्या टाकण्याची मागणी होत आहे. ड्रेनेजची सुविधाही मिळण्याची मागणी वाढत आहे.

(२ किंवा ३ कॉलम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांअभावी रखडल्या मुलाखती

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी सोमवारी होणार असलेल्या पूर्वनियोजीत मुलाखती आता पुढच्या मंगळवारी (दि. २६) होणार असल्याचे नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे. मुलाखती पुढे ढकलण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि.१८0 होणार असलेली सुणावणी पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले आहे. कार्यालयातील २१ कर्मचारी भारत निवडणूक आयोगाच्या कामकाजाकरिता कार्यमुक्त करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा आभाव असे कारण पुढे करण्यात आले आहे.

३ जून २०१८ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्र्यंबक ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार १३ जूनपर्यंत ११३ ग्रामस्थांनी चार विश्वस्तपदासाठी अर्ज केले होते. त्यातील बहुतेक नागरिक आज, सोमवारी सकाळी नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयात हजर होते. तथापि येथे सह धर्मदाय आयुक्त घुगे यांनी मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात अल्याची नोटीस लावल्याने सर्वांचीच निराशा झाली.

पुढील सुणावणीकडे लक्ष

विद्यमान विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विश्वस्त मंडळाच्या आराखड्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यातील मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त मुंबई, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि नाशिक जिल्हाधिकारी यांना याबाबत आपले म्हणने मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. यापुढील सुणावणी दरम्यान काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

आता तारीख पे तारीख

नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मुलाखतीकरिता दिलेली २६ तारीख देखील थेट मुलाखतीसाठी नसून मुलाखतीची रुपरेषा अवगत करण्यासाठी आहे, असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. एकूणच आता मुलाखतीसाठी इच्छुकांना तारीख पे तारिक असा अनुभव येणाण्याची शक्यता आहे. विश्वस्तांची मुदत ४ जून २०१८ रोजी संपुष्टात आलेली आहे. यापुढे अशा प्रकारे नवीन नियुक्त्या न्यायालयीन वादात सापडल्यास प्रशासन अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर परिसरात स्वच्छतेचा बोजवारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून, या भागात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईच न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भगूर नगरपालिकेने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नाका नंबर ३ जवळील कदमवाडा सुतार गल्ली, सुभाषरोड, कुंभारवाडा, चांभारवाडा, राजवाडा, आंबेडकर चौक, नवीन वसाहत परिसरात सार्वजनिक शौचालये आहेत. त्यांचा वापर परिसरातील नागरिक करतात. स्वच्छता अभियानांतर्गत या शौचालयांना नवीन दरवाजे लावून डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. एक महिन्यात शौचालयांचे दरवाजे तुटून पडले, तर काही ठिकाणी शौचालयांमधून मैल वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगून नागरिकांनी तक्रार अर्ज दिल्यावर पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र संसारे यांनी पाहणी करून तुटलेले दरवाजे नगरपालिकेकडे जमा केले व लवकरच व्यवस्थित लावून दुर्गंधी दूर करण्याचे आश्वासन दिले. परंतु, महिना उलटून गेला, तरी काहीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा सुरू झाला, तरीही नाले, गटारींची साफसफाई केली नसल्याने त्यात घाण कचरा साचलेला आहे. या भागातील पथदीपदेखील बंद आहेत. या पार्श्वभूमीवर भगूर नगरपालिकेने येथील समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईग्रस्त गावांची वाढली संख्या

0
0

विभागातील सहा लाख नागरिकांना पाणी टँकर्सचा आधार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मान्सूनचे आगमन झालेले असूनही नाशिक विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही विभागातील ३१६ गावे आणि ३५८ वाड्यांवरील ५ लाख ९२ हजार ५६३ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून २६४ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांसह प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मान्सूनचा प्रवास लांबल्याने नाशिक विभागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विभागात यंदा पाणीटंचाईनेही कळस गाठला होता. मान्सूनच्या सरींनंतर पाणीटंचाईची धग कमी होण्याची शक्यता होती. मात्र, विभागाला मान्सूनच्या सरींनी हुलकावणी दिल्याने विभागातील पाणीटंचाई जैसे थे आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे.

सुमारे सहा लाख नागरिकांना टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी

नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त १३९ टंचाईग्रस्त गावांची संख्या असून, या जिल्ह्यात तब्बल २ लाख ५९ हजार ७७ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यातील १०३ टंचाईग्रस्त गावांतील १ लाख ८२ हजार ३२९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७७ टँकर्सच्या फेऱ्या सुरू आहेत. नगर जिल्ह्यातही ५४ टंचाईग्रस्त गावांतील १ लाख १३ हजार ७०१ नागरिक ६२ टँकर्सद्वारे पुरवठा होत असलेल्या पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. धुळे जिल्ह्यातही १८ गावांत ३७ हजार ७६, तर नंदुरबार जिल्ह्यातील २ गावांतील ३८० नागरिकांना टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

टंचाईची तीव्रता जास्त असणारे तालुके व गावे

नाशिक : बागलाण (२१), येवला (४२), सिन्नर (१२), मालेगाव (८)

धुळे : शिंदखेडा (१०)

जळगाव : अमळनेर (४८), जामनेर (३४), पारोळा (२७), चाळीसगाव (११)

नगर : संगमनेर (२१), पारनेर (१०), पाथर्डी (९)

विभागातील टंचाईस्थिती

जिल्हा - टंचाईग्रस्त गावे - वाड्या - टँकर्स संख्या - अधिग्रहित विहिरी - लोकसंख्या

नाशिक १०३ १६५ ७७ ५७ १,८२,३२९

धुळे १८ ० १६ ९९ ३७,०७६

नंदुरबार २ ० १ ४८ ३८०

जळगाव १३९ ० १०८ २२५ २,५९,०७७

नगर ५४ १९३ ६२ २ १,१३,७०१

एकूण ३१६ ३५८ २६४ ४३१ ५,९२,५६३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ कुटुंबीय त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी सोमवारी त्र्यंबकराजाचे, संत निवृत्तिनाथ समाधीचे दर्शन घेतले. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडर चौकात त्यांचे आगमन झाले. तेथे ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहीरू मुळाणे, शहराध्यक्ष मनोज कान्नव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, बाजार समिती संचालक युवराज कोठुळे, उपसभापती रवी भोये, अरुण मेढे, विजय गांगुर्डे, गोकुळ बत्तासे उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान विश्वस्त कैलास घुले यांनी त्यांचे स्वागत केले. भुजबळ यांनी कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात अभिषेक व पूजा केली. आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ पुजेस बसले होते. संत निवृत्तिनाथ महाराज समाधीची आरती केल्यानंतर त्यांनी मंदिर कामाची पाहणी करून माहिती घेतली. ठिकठीकाणी त्यांचे औक्षण करण्यात आली. माळी समाजाच्या वतीनेही भुजबळांचे स्वागत करण्यात आले. मंदिर प्रांगणात छगन भुजबळ यांनी पुरुषोत्तम कडलग यांचा आधार घेतला तेव्हा ते थकले असल्याचे सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरट्यांना ठोकल्या बेड्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओझर शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून आठवडे बाजारातून नागरिकांचे मोबाइल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर पोलिसांना हे चोरटे पकडण्यात यश आले आहे. आठबडेबाजारात असणाऱ्या अगदी सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करून पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे.

ओझर येथे दर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारात मोबाइल चोरांची पर्वणीच ठरायची. गेल्या काही महिन्यांपासून मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, अनुपम जाधव, भास्कर पवार, बी. व्ही. हेगडे यांनी साध्या वेशात आपली गस्त वाढवली होती. मंगळवारी गस्त घालत असतांना राकेश केशव चव्हाण (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड) सचिन अरुण भोये (रा. सुर्दशन कॉलनी, नवनाथ नगर, पेठरोड नाशिक), राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड, नाशिक) हे तीन तरुण संशयीतरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेही पळून जाऊ लागले. शोध पथकाचे अनुपम जाधव व अमोल गांगोडे यांनी भर बाजारात त्यांचा पाठलाग करून सीनेस्टाइल पद्धतीने त्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाइल आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागेच्या वादात एकाची हत्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

झोपडपट्टीतील मोकळ्या भूखंडाच्या वादात एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यापूर्वी याच जागेवरून एक विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल झाला होता. या गुन्ह्याची पार्श्वभूमी हल्ल्या असून, हल्लेखोर आणि मयत एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

राजू शेषराव वाघमारे (वय ४५, रा. संतकबीरनगर झोपडपट्टी, भोसला मिलिटरी स्कूलमागे) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकुतला राजू वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संतकबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा. गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर) आणि त्यांचे तीन ते चार साथिदार एका कारमधून आले. राजू वाघमारे यांच्या ताब्यात असलेल्या झोपडपट्टीतील एका जागेवरून लाठ्याकाठ्या घेऊन आलेल्या संशयित आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपींनी वाघमारे यांना वर उचलून खाली आपटले, लाथाबुक्यांनी मारहाण केली. जखमी वाघमारे यांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शारीरिक तपासणी केली. कोणतीही जखम नसल्याचा रिपोर्ट दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावेळी वाघमारे व्यवस्थित बोलत होते. दुसऱ्या दिवशी मात्र वाघमारेंचा त्रास वाढत गेला. हळूहळू ते कोमात गेले. यानंतर त्यांना महात्मानगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गंगापूर पोलिसांनी लागलीच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तपासणीअंती मेंदुला मार लागल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत ऑपरेशन करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रविवारी रात्री उपचार सुरू असताना वाघमारेंना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही वार्ता समजताच नातलगांनी एकच गर्दी केली. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी हत्येचे कलम वाढवले.

--

विनयभंगानंतरचा प्रकार

गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये १५ जून रोजी एका २४ वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाचा प्रकार १ जून रोजी झाला होता. तसेच, संतकबीरनगरमधील जागेच्या वादातूनच हा प्रकार घडला होता. मात्र, युवती पुणे येथे गेल्याने गुन्हा उशिरा दाखल झाला. यात संशयित आरोपी म्हणून विजय शेषराव वाघमारे याचे नाव होते. त्यामुळे या घटनांपाठीमागे झोपडपट्टीतील तो प्लॉटच कारणीभूत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

--

महिलांचे आंदोलन

मारहाणीत मयत झालेले वाघमारे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत संतकबीरनगरमधील महिलांनी सोमवारी सकाळी गंगापूर पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले. आरोपींना नक्कीच अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वाघमारे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

--

हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून झाला असून, संशयित आरोपी फरार झाले आहेत. संबंधितास उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याची तब्येत साधारण होती. मात्र, काही तासांनी त्याची तब्येत बिघडत गेली.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथे नांदते माणुसकी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रस्त्यावर मोलमजुरी करीत हिंडणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आणि राबणारा हात थांबल्याचे दुःख आणि उपचारासाठी देखील पैसे नसल्याची वेदना उराशी बाळगत कुटुंबीय अश्रू ढाळत बसले खरे, पण मनमाडमधील माणूसपण जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी व सेवाभावी डॉक्टरने या महिलेवरील उपचारासाठी धडपड करून तिला या वेदनेतून सुखरुप बाहेर काढले. तिच्या हाताच्या वेदनेवर व दुःखावर फुंकर घातली. आता

अश्रू पुसून ती महिला मनमाडमध्ये माणुसकी नांदते, असे गौरवाने रस्त्यावरील तिच्या भाऊबंधांना सांगत आहे.

मनमाड शहर परिसरात रस्त्यावर मिळेल ते काम करणाऱ्या गरीब पण कष्टाळू कुटुंबातील महिला अचानक रस्त्यात पाय घसरून पडली. हाताला वेदना होत असताना आता उपचाराला पैसे कुठून आणायचे? आणि उपचार नाही झाले तर पोटाची खळगी भरायची तरी कशी? या काळजीने त्या महिलेला व तिच्या हातावर पोट असलेल्या कुटुंबियांना ग्रासले. मात्र माणुसकी जपणारी माणसे त्यांच्या मदतीला धावली. मिलिंद सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी या कुटुंबाला दिलासा दिला. त्यांना तडक डॉ. भन्साळी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हाताला फँक्चर झाले असल्याचे निदान झाले. उपचार व औषधांसाठी पैसे नसल्याने ते गरीब कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले. मात्र लायन्स क्लबमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अजय भन्साळी यांनी सामाजिक भान जपत या महिलेवर विनामूल्य उपचार केले. तसेच पुढील औषोधोपचारही उपलब्ध करून दिले. या माणूसपणाबद्दल मिलिंद सामाजिक संस्थेने डॉ. भन्साळी यांचे कौतुक केले. रुग्णांकडे पैसे नसल्याने त्यांना अँडमीट करून न घेण्याच्या, उपचार नाकारण्याच्या घटना कानावर पडत असतात. मात्र डॉ. भन्साळी यांनी कोणाची ओळख, शिफारस नसतानाही रस्त्यावरच्या गरीब महिलेला विनामूल्य उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. काही दिवसांनी पुन्हा काम करता येईल, चार पैसे लेकरासाठी मिळवता येईल या आशेने ती महिला सुखावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकी दूभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना एबीबी सर्कल परिसरात झाली. अपघातात मृत चालकाचा जोडीदार जखमी झाला. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

नहूश कैलास कडलग (२२, रा. नवशा गणपती मंदिराजवळ, आनंदवली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, संकेत भास्कर भालेराव (२६ रा. उपेंद्रनगर, सिडको) हा युवक जखमी झाला आहे. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कडलग आणि भालेराव हे दोघे मित्र सिटीसेंटर मॉलकडून एबीबी सर्कलच्या दिशने नवीन दुचाकीवर प्रवास करीत होते. भरधाव दुचाकी मील अ‍ॅण्ड व्हिल्स हॉटेलसमोरील वळणावर दुभाजकावर आदळली. यात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील कडलग याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर भालेराव याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बुराडे करीत आहेत.

शेजाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

अंगणात वादळाने झाडीची फांदी पडल्याच्या कारणातून शेजाऱ्याने महिलेस मारहाण करीत विनयभंग केला. ही घटना काठेगल्लीत घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की श्यामसुंदर मराळकर (२८ रा. नाविन्य सोसायटी, काठेगल्ली) असे संशयिताचे नाव आहे. वादळाने झाडाची फांदी संशयीताच्या घरासमोर पडलेली होती. मात्र, माझ्या घरासमोर का फांदी टाकली, यावरून वाद घालत संशयिताने महिलेस शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात मारहाण केली. यावेळी त्याने विनयभंग केला. संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

उघड्या घरातून मोबाइल चोरी

उघड्या घरात घुसून चोरट्याने मोबाइल चोरून नेल्याची घटना रविवार कारंजा भागातील कुटेलेन भागात घडली. या प्रकरणी गौरव जोशी (रा. रिमझीम वाडा, कुटेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी जोशी कुटुंबीय आपल्या घर कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून टीव्हीसमोर ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार धात्रक करीत आहेत.

युवकावर चाकू हल्ला

रागाने पाहिल्याचा जाब विचारल्याने संतप्त टोळक्याने युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना मोठा राजवाडा परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय विजय काळे (२३ रा. मोठा राजवाडा) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री हा हल्ला झाला. जय काळे मोठा राजवाड्यातील डॉ. सुभाष काळे यांच्या घराच्या ओट्यावर बसलेला असताना हा प्रकार घडला. रस्त्याने जाणाऱ्या आयुष साळवे याने त्याच्याकडे रागाने पाहिले. त्यामुळे जयने माझ्याकडे रागाने का बघतोस, अशी विचारणा केली. यावर आयुषने त्याचे साथीदार यश साळवे, रोहन रोकडे आणि सिद्धार्थ दोंदे यांना बोलावून घेतले. या सर्वांनी जयशी वाद घालत त्यास बेदम मारहाण केली. या वेळी संशयित आयुष, यश आणि रोहन यांनी जयला पकडून ठेवले तर सिद्धार्थ दोंदे याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यात जय जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

कुलकर्णी गार्डन परिसरात तरुणाला लुटले

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणास टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना कुलकर्णी गार्डन परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चौघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील यादव पाटील (२३ रा. निर्जल अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तो कुलकर्णी गार्डनकडून कॅनडा कॉर्नरच्या दिशेने आपल्या घराकडे पायी निघाला होता. शहा हॉस्पिटल भागातील पॅनासोनिक शोरूमशेजारील शॉपिंग सेंटरजवळून तो पायी जात असताना २० ते २५ वयोगटातील चौघांच्या टोळक्याने त्यास अडविले. संशयितांनी निखिलला बेदम मारहाण करीत दगड मारून जखमी केले. तसेच खिशातील मोबाइल आणि दोन हजार रुपयांची रोकड काढून घेत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

खंडणीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पंधरा हजाराची खंडणी मागून ती न दिल्यास एकाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील गिडाप्पा चाफळकर (४४, रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत, १७ जूनला रात्री दीडच्या सुमारास संशयित बाळा उर्फ विजय उदैनकर, बाळा कदम (रा. कॅनॉलरोड) सचिन धोभे (रा. कस्तुरबा नगर) यांनी करन्सी नोटप्रेसलगत चाफळकर यांना थांबवले. तुला या भागात रहायचे असेल तर १५ हजार रुपये दे, नाही तर तुझा चॉपरने काटा काढू, असा दम दिला, असे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयीतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीधाम मौत का कुआं!

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगावातील महापालिकेच्या नव्या इमारतातील नागरिकांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. दोन महिन्यांपूर्वी फ्लॅटच्या स्लॅबचा तुकडा कोसळल्याने या रहिवासी इमारतीचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतरही विविध समस्या वाढतच असल्याने ही इमारत 'मौत का कुआं' झाली असल्याची भावना येथील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

महापालिकेने चार महिन्यांपूर्वी देवळालीगावातील गवळीवाडा आणि वडारवाडीतील झोपड्या हटवून तेथील रहिवाशांना घरकुल योजनेतील देवळालीगावतच गांधीधाम या नवीन इमारतीत फ्लॅट दिले. एका इमारतीत ८० प्लॅट आहेत. अशा दोन इमारती समोरासमोर आहेत. दुसरी इमारत रिकामीच आहे. दोन्ही इमारतींचे काम अत्यंत निकृष्ट आहे. दोन महिन्यांपूर्वी ए विंगमधील २२ नंबर प्लॅटमधील प्रसादे कुटुंबीयांच्या स्लॅबचा मोठा तुकडा टीव्हीवर कोसळला होता. तोच डोक्यात पडला असता, तर जीवितहानी झाली असती. सर्वच स्लॅब, बाथरूमची अशीच स्थिती असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

या इमारतीची पाण्याची टाकी खाली आहे. त्यावर डुकरांचा वावर वाढला आहे. टाकीशेजारीच असलेल्या उकिरड्याची घाण टाकीवर येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना देवळालीगावात वणवण करावी लागते. इमारतीमागे डेब्रिस टाकलेले असून, तेथेही डुकरांचा वावर असतो. या इमारतीसमोरच दुसरी नवीन इमारत उभी आहे. तेथे रहिवासी येण्याआधीच वरील जलकुंभाला गळती लागली आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरवाजे उखडले आहेत.

रहिवाशांनी इमारतीच्या निकृष्ट कामाबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, प्रशाननाने लक्ष दिले नाही, की लोकप्रतिनिधीही फिरकले नाहीत. येथे जीव धोक्यात घालण्यापेक्षा जुन्या ठिकाणी राहण्यास जागा द्या, अशी रहिवाशांची मागणी आहे.

प्लास्टरच्या जाडीबाबत गंभीर आरोप (स्वतंत्र चौकट)

येथील समस्यांचा आलेख वाढताच असून, स्लॅब कोसळल्यानंतर निकृष्ट वायरिंगमुळे या नव्या इमारतीच्या डीपीने पेट घेतला होता. दुसऱ्या घटनेत घरातील बटण दाबताच वायरिंग जळून गेले होते. सर्व फ्लॅटमधील बाथरूम, शौचालयांचे स्लॅब गळत असून, भिंती, स्लॅबना ओल आलेली आहे. काहींच्या दरवाजांच्या चौकटी उखडल्या असून, भिंतीला खिळा ठोकल्यास दुसऱ्या फ्लॅटमधील भिंत पडते. ड्रेनेज व बाथरूमचे पाइप गळत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. गॅलरऱ्यांना सेफ्टी ग्रिल्स नाहीत, इमारतीच्या पॅसेज व आवारात लाइट नाहीत. छताला ४० एमएम जाडीचे प्लास्टर हवे असताना ९० एमएम जाडीचे प्लास्टर केल्याचा आरोही होत आहे.

--

निकृष्ट बांधकामामुळे गांधीधाम मौत का कुआं झाली आहे. कधीही दुर्घटना होऊ शकते. पावसाळा सुरू झाल्याने जीव मुठीत धरूनच राहावे लागत आहे. पूर्वीची झोपडी सुरक्षित होती, असे वाटते.

-कमला सकट, स्थानिक रहिवासी

इमारतीमागे आणि पाण्याच्या टाकीवर डुकरे असतात. टाकीचे कामही निकृष्ट आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना गावात जावे लागते. आयुक्तांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही.

-लता चांदेकर, स्थानिक रहिवासी

(सेकंड लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील चोंढी गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी पहाटे शेतकरी भास्कर जगन मवाळ (गट नं. ३१४) यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोंढी शिवारातील मवाळ वस्तीवरील भास्कर मवाळ हे रोजप्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरात झोपले होते. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला चढवून त्यास ठार केले. त्यानंतर त्याने वासरू गोठ्यातच फस्त करून शेजारच्या शेतातून पसार झाला. पहाटे भास्कर मवाळ यांना जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे ते बाहेर आले. तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक शरद थोरात व अनिल साळवे यांनी घटनास्थळी पंचनामा. नागरिकांच्या मागणीनुसार मवाळ वस्तीवर वनविभागाने पिंजरा लावला आहे. बिबट्याचा हल्ल्यामुळे मेंढी व चोंढी मधील शेतकरी घाबरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images