Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘रमजान ईद’ला विश्वशांतीची प्रार्थना

0
0

‘रमजान ईद’ला पावसासह विश्वशांतीची प्रार्थना; सामूहिक नमाजपठण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजानसाठी केलेल्या मुस्लिम बांधवांच्या रोजाची सांगता शनिवारी (दि. १७) हजारो बांधवांच्या सामूहिक नमाज पठणाने झाली. यावेळी विश्वशांतीसह ‘या अल्लाह बारिश का नुजूल फरमा’ अशा शब्दांत मौलाना उस्मान कासमी यांच्यासोबत मुस्लिम बांधवांनी पावसासाठी प्रार्थना केली.

पवित्र रमजान महिन्यात हजारो भाविकांनी रोजे ठेऊन अल्लाहचे स्मरण केले. या रमजान ईदनिमित्त शहरातील मशिदींमध्ये आकर्षक सजावट करून रोषणाई करण्यात आली होती. मशिदींच्या बाहेर गुलाबांसह अन्य फुल विक्रेत्यांची गर्दी होती. जळगावातील इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची शहरातील अजिंठा चौफुलीपासून, टॉवर चौकाकडून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्यांची रेलचेल होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, डोक्यावर टोपी घालून लहानग्यांना घेऊन पायी चालत मैदान गाठले.

ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली तत्पूर्वी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त फारूक शेख यांनी ‘मुफ़्ती अतीकुर्रहमान’ यांचा परिचय करून दिला. त्यांना ‘ईदचे विश्व शांतीसाठी महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यानुसार अर्धा तास मूफ्ती यांनी मार्गदर्शन केले.
अब्दुल करीम सालार यांनी प्रस्तावना सादर केली. मौलाना उस्मान यांनी खुतबा व नमाज पठन केले, अमीन बदलिवाला यांनी आभार मानले.

या वेळी देशात चांगला पाऊस व्हावा, शांतता नांदावी, भारत महासत्ता व्हावी, शत्रूंपासून देशाचे रक्षण कर, चांगले आरोग्य दे, दहशतवाद व भ्रष्टाचार नाहीसा होऊ दे व आपसांत प्रेमभावना वाढीस लागू दे, अशी दुआँ करण्यात आली. यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाकीर रजा रजवी, मौलाना मुफ्ती रेहान रजा, मौलाना नजमुल हक, मौलाना मुफ्ती इन्तेखाब अशरफ यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

या वेळी पिंप्राळा मशीदीसाठी चंदा जमा करण्यात आला, शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराडे, सीईओ दिवेकर, डीवायएसपी सचीन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, अनिरुद्ध आढाव यांनी प्रत्यक्ष ईदगाहमध्ये येऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम समाजातर्फे गफ्फार मलिक, करीम सालार, फ़ारूक शेख, अमीन बदलिवाला, रागिब जहागिरदार, रय्यान जहागिरदार, गनी मेमन, अॅड. आमिर शेख, शरीफ शेख, प्रा. डॉ इकबाल शाह यांनीसुद्धा त्यांचे स्वागत करून आभार मानले.

याशिवाय शहरातील तांबापूरा, शनीपेठ, शाहू नगर या ठिकाणच्या मशिदींमध्येही मुस्लिम भाविकांची रेलचेल होती. याप्रसंगी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर सायंकाळी सुकामेवा, शेवयांचे दूधात एकत्रीकरण करून शिरखुर्म्यासाठी आप्तेष्टांना घरी बोलाविण्यात आले. रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाण्यासाठी नागरिकांची घाई गर्दी सुरूच होती.

सुन्नी ईदगाहवर नमाज
जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी सुप्रीम कॉलनीतील नियाज अली नगर सुन्नी ईदगाह मैदानावर सुन्नी जामा मस्जिद भिलपुराचे पेश इमाम मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वात ‘नमाज ऐ ईद-उल-फित्र’ ईदची नमाज पठण केली. याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले. मौलाना नजमुल हक यांनी ‘तरीका-ए-नमाज’ अर्थातच नमाज पठणाचे महत्त्व सांगितले. मौलाना जाबीर रजा रजवी नमाज व खुतबा केले. मौलान जुबेर आलम यांनी ‘सलाती सलाम’ म्हटले.


धुळ्यातही ईदचा उत्साह

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदनिमित्त शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या ईदगाहसह विविध मशिदीत शनिवारी सकाळी ८ वाजता नमाज पठण करण्यात आले. तसेच परस्परांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरात सकाळी लहान पुलाजवळील स्व. उत्तमराव पाटील स्मारकाशेजारी असलेल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठणासाठी गर्दी केली होती. यात ५ ते ८० वर्षांपर्यंतच्या अबालवृद्धांचा उत्साही सहभाग होता. नमाज पठणानंतर लहान्यायांसह मोठ्यांनीही परस्परांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

पोलिस प्रशासनानेही ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सावरकर पुतळ्याजवळ जय्यत तयारी केली होती. मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. या वेळी निरीक्षक दत्ता पवार, उपनिरीक्षक एल. डी. कोळी उपस्थित होते. तर पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी वडजाईरोडवर मौलानांचे स्वागत करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात ईदचा सण शांततेत व आनंदात साजरा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गॅलरीतून चार मोबाइल लंपास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खुल्या गॅलरीद्वारे घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी घरातील २९ हजारांचे चार मोबाइल लंपास केले. ही घटना १५ ते १६ जूनदरम्यान हिरावाडी परिसरातील बनारसीनगर येथील गोकुळधाम सोसायटीच्या बी विंगमध्ये राहणाऱ्या राजेश चव्हाण यांच्या घरात झाली. या प्रकरणी चव्हाण यांच्या सोसायटीतील रोसान कारभारी कुटे (वय ३४) यांनी फिर्याद दिली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. एम. सरोदे तपास करीत आहेत.

सासरच्या चौघांवर गुन्हा

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला सतत मारहाण आणि शिवीगाळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध उपनगर पोलिस स्टेशनमध्ये कलम ४९८ अ, ३२३, तसेच ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मनीषा समाधान काळे (वय ३०, रा. अनुष्का सोसायटीजवळ, म्हसोबा मंदिर परिसर, नाशिकरोड) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. मनीषाचा विवाह समाधान काळे याच्याशी झाला असून, विवाहानंतर दोन वर्षांपासून पतीसह भिकाबाई काळे, बाजीराव काळे, सरलाबाई शेळके, कल्पनाबाई सावंत आदींनी स्वयंपाक येत नाही, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला. छळाला कंटाळून मनीषा काळे यांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर भाजलेल्या मनीषा यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे तपास करीत आहेत.

अपघातात वाहनचालक ठार

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत छोटा हत्ती वाहनचालक ठार झाला. अपघाताची घटना बुधवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास पाथर्डी रोडवर घडली. जखमी चालकावर उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. कैलास संपतराव हेरिंगे (वय ४५, रा. हरिमाता सोसा., शनी मंदिरासमोर, सायट्रिक इंडिया, जेलरोड) असे या चालकाचे नाव आहे. १३ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास हेरिंगे छोटा हत्ती वाहन घेऊन पाथर्डी फाट्यावरून निघाले होते. पाथर्डी रोडवर अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने हेरिंगे मेंदूला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार भोजने तपास करीत आहेत.

वाहकाचा प्रवासात मृत्यू

एसटी महामंडळाच्या बसचे वाहक गंगाधर तुळशीराम गवळी (वय ५०, रा. हरी भाग्योदय सोसा., वासन बजाज शो-रूममागे, म्हसरूळ, दिंडोरी रोड) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना १५ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गवळी आणि बसचालक दत्तू पुंडलिक पगारे १५ जून रोजी बस (एमएच १२/ईएफ ६३२७) घेऊन जातेगाव येथे गेले होते. तेथून प्रवासी घेऊन बस नाशिककडे परतली. बस पंचवटीत जाण्यापूर्वीच गडकरी चौकात गवळी यांच्या छातीत दुखू लागले. यामुळे बेशुद्ध झालेल्या गवळी यांना चालक पगारे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार कडाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट दाखले दिल्यास गुन्हा

0
0

तंत्रशिक्षण संचालनलयाचा विद्यार्थ्यांना इशारा

कॉलेज क्लब रिपोर्टर

शैक्षणिक वर्ष २०१८-१९मध्ये तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या प्रवेशप्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती, बनावट दाखले तसेच प्रमाणपत्रे सादर करु नयेत. अन्यथा विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा सूचना वजा इशारा तंत्रशिक्षण संचालनलयाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी. यासाठी विद्यार्थ्यांचा लढा सुरू आहे. असे असतांनाच तंत्रशिक्षण संचालनायलाने बनावट दाखले सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. असा सूचना वजा इशारा दिला आहे. याचे कारण असे, की शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान जातीचा दाखला, जातवैधता, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर ही प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेतली नव्हती. पडताळणीअंती ही कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत. तसेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी बनावट दाखले व कागदपत्रे सादर करू नये. अन्यथा, प्रवेश रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल होतील. विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत. प्रवेश मिळवण्याच्या आणि सवलतींच्या हव्यासात कोणीही गैरमार्गाने प्रवेश प्रक्रियेत दाखले सादर करू नयेत, अशी सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने केली आहे.

या विद्यार्थ्यांची कोंडी

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच प्रथम वर्ष डी. फार्म, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कटरिंग टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एम. ई, एम. टेक, एम. फार्म, एम. आर्किटेक्चर, एम. एचएमसीटी, एमबीए, एमएमएस हे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी हक्कभंग आरोपावरून भारताची प्रतिक्रिया योग्यच

0
0

काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर या दोन्ही भागात मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असून, येथील घटनांची आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे चौकशी झाली पाहिजे, असा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र संघातर्फे प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल चुकीचा असून, भारताने तीव्र शब्दांत तो फेटाळून लावला आहे. मानवी हक्कभंग आरोपावरून भारताची संतप्त प्रतिक्रिया योग्यच असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने पुरेशी शहानिशा करून असे अहवाल देणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून याबाबत पुरेसे गांभीर्य दिसत नसल्याची भावनादेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने आलेले सरकार आहे, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजनैतिक अधिकारी प्रमुख आहे. भारतीय प्रदेशाचा चुकीचा उल्लेख करण्यात आला असून, हा प्रकार खोडसाळपणाचा व दिशाभूल करणारा आहे.

-उषा पगार

संस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह

आझाद जम्मू-काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तान असा कोणताही भाग अस्तित्वात नाही. हा अहवाल पूर्णपणे चुकीचा व पूर्वग्रहदूषित आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघासारख्या संस्थांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा पूर्वग्रहांना संस्थेत स्थान दिले जात असल्याबाबत तीव्र चिंता वाटते.

-राजेंद्र भामरे

अहवाल पूर्वग्रहदूषित

हा अहवाल म्हणजे निवडक अर्धवट माहितीचे गाठोडे आहे. पूर्वग्रहदूषित भावनेने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भारताने तो पूर्णतः फेटाळला आहे. हा भारताच्या अखंडतेवरच घाला आहे. हा अहवाल नेमका कशाच्या आधारे तयार करण्यात आला त्या बाबीदेखील तपासल्या जाव्यात.

-सागर वाणी

अॅम्नेस्टीकडून स्वागत चुकीचेच

मानवी हक्कांबाबत जगभरात लक्ष ठेवून असणाऱ्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेच्या भारतातील शाखेने या अहवालाचे स्वागत केले असून, भारत व पाकिस्तानने काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. अॅम्नेस्टीने त्यांचीच री ओढणे स्वाभाविकच आहे.

-नितीन वालखेडे

भौगोलिक एकतेचे उल्लंघन

भारताने संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचा हल्ला चढविला आहे. सत्ताधारी सरकारने घेतलेल्या भूमिकेला काँग्रेस पक्षानेही एक प्रकारे पाठिंबा देत हा अहवाल चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. हा अहवाल भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि भौगोलिक एकतेचे उल्लंघन करतो.

-महेंद्र हिरे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तपदाची अनेकांना भूरळ

0
0

आज मुलाखतीनंतर यादी जाहीर होणार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तपदाची अनेकांना भूरळ पडली आहे. भाविकांमधील चार विश्वस्त पदासाठी तब्बल ११३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पंधरा अर्ज महिलांचे आहेत. दरम्यान, आज (दि. १८) नाशिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात यासाठी मुलाखती होऊन त्याचदिवशी सायंकाळी नियुक्ती यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मंदिराच्या परंपरेने त्रिकाल पुजक तीन घराणे आहेत. त्यापैकी विद्यमान विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांचे नाव पुन्हा देण्यात आले आहे. त्यांच्या नावास दोनपैकी तिसऱ्या पुजक घराण्याचे सदस्यांनी हरकत घेतली होती. हा वाददेखील मुलाखतीदरम्यान सोडविण्यात येणार आहे. यामध्ये अर्जदारांची संख्या पाहता दोन ते तीन दिवस मुलाखती चालतील, असे चित्र आहे. विश्वस्त मंडळामध्ये पुरोहित संघ, पुजक, पुजारी तुंगार ट्रस्ट यांचे प्रतिनिधीदेखील याचदरम्यान जाहीर होणार आहेत. यापूर्वी पुरोहित संघ प्रतिनिधी म्हणून प्रशांत गायधनी आणि पुजारी तुंगार ट्रस्ट प्रतिनिधी म्हणून दिलीप तुंगार यांचे त्यांच्या संघ व ट्रस्टतर्फे नामांकन अर्ज देण्यात आलेले आहेत.

मुलाखती लांबणीवर पडण्याची शक्यता?

विद्यमान विश्वस्त ललिता शिंदे यांनी विश्वस्तपदाची संख्या १३ करावी आणि अध्यक्ष हे त्यामधूनच निवडावे, अशी मागणी केली. त्यांनी, विश्वस्त मंडळ सदस्य संख्या ९ असून, त्यात पदसिद्ध २ आणि संबंधित संस्थांचे तीन असे पाच सदस्य विरुद्ध नागरिकांतील ४ असे अल्पमत तयार होते. भाविकांच्या हिताचे निर्णय होत नाहीत, असे कारण जोडले आहे. या विश्वस्त मंडळ आराखड्यातील बदलासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून, या याचिकेची सुणावणीदेखील आज (दि. १८) होत आहे. जर सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या याचिकाकर्त्यांनी 'जैसे थे' आदेश मिळविले तर मुलाखतीसाठी सरसावलेल्या विश्वस्तांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

विश्वस्तपदाला आले महत्त्व

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तपदाला स्थानिक पातळीवर खास डिमांड आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा जास्तच महत्त्व या पदाला लाभले आहे. यापासून दर सोमवारी निघाणारी पालखी, दसरा सीमोल्लंघन, महाशिवरात्र,रथोत्सव आणि सणावाराचे उत्सव यामध्ये विश्वस्तांना मिळणारे महत्त्व, संस्थानची हजारो एकर जमीन आणि इतर संपत्ती यांचे व्यवस्थापन करण्याचा सन्मान मिळतो. तीर्थक्षेत्र असल्याने शहरातील बहुतेकांचे व्यवसाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. अशा एक ना अनेक कारणांनी विश्वस्त पदास महत्त्व आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणवेली काढण्यासाठी युवकांची धडपड

0
0

चांदोरीच्या गोदावरीकाठाची प्रदूषण समस्या सोडविली

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पाणवेलींमुळे सायखेडा, चांदोरीतील गोदावरी नदीकाठावर वसलेल्या गावांमध्ये प्रदूषणाची समस्या आहे. या पाणवेली काढण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आरली. मात्र, प्रशासनाने ती तत्परता न दाखवल्याने अखेर या गावातील तरुणांनीच जोखीम पत्करत पाणवेली काढायला सुरुवात केली आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीत चर्चेत असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा भागात गोदावरीला पाणवेलींचा फास तयार झाल्याचे चित्र कित्येक दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे या फासातून नदीला मोकळे करण्यासाठी चांदोरी येथील युवकांनीच आता प्रयत्न सुरू केलेले दिसत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने, गत सात-आठ महिन्यांपासून आपला जीव धोक्यात टाकून हे युवक पाणवेली हटवत आहेत. सायखेडा पुलाला अडकलेल्या पाणवेली पुन्हा नदीत सोडल्याने चांदोरी भागात पाणवेली साचून आहे. यासाठी चांदोरीचे पोलिस पाटील अनिल गडाख, संजय मते, सागर गडाख, अशोक आहेर, संकेत आहेर, महेश राजोळे, सागर राजोळे, पिंटू डगळे, शुभम गारे, अंबादास मोरे, संजय जाधव आदीं तरुणांकडून हे काम सुरू आहे.

प्रशासन सुस्त; ग्रामस्थ त्रस्त

पाणवेलीमुळे पाणी असूनही प्रदूषणाच्या समस्येला या ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून गोदावरीला पाणवेलींचा विळखा पडलेला आहे. काही दिवसांपासून या पाणवेलींचे ढकलाढकलीचे सुरू झालेले काम आजही सुरूच आहे. तर सायखेडा पुलाला अडकलेल्या पाणवेली या फक्त पुढे काढून देत पुन्हा नदी पात्रात सोडल्या जात आहेत. त्यामुळे सायखेडा भागात गोदावरी स्वच्छ होते. तर या पाणवेली पुढे वाहून जाऊन चांदोरी, सायखेडा, शिंगवे, गोंडेगाव, करंजगाव आदी भागांच्या नदीपात्रातील मंदिरे, काठालगत अडकतात. परिणामी, या पाणवेलींची समस्या वाढल्याने अखेर ग्रामस्थांनाच आता यासाठी पाण्यात उतरावे लागले आहे. वास्तविक हे काम प्रशासनाचे आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची तहान टँकरवरच

0
0

बागलाण तालुक्यात २१ गावांना १५ टँकरने पाणीपुरवठा; नागरिकांना पावसाची प्रतीक्षा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

यंदा मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होण्याच्या वार्तेने सुखावलेल्या बागलाणवासीयांची पावसाळा लांबताच तोंडचे पाणी पळाले आहे. आजमितीस तालुक्यात तब्बल २१ गावांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ९ गावांना विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांची तहान भागविण्याच्या आटापिटा चालू आहे. त्यामुळे सटाण्यासह बागलाणच्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षाच आहे.

पावसाळा उंबरठ्यावर असताना अजूनही काही गावांची टँकरची मागणी असून, प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सटाणा शहरात देखील चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ऐन जून महिन्याच्या पंधरवड्यात आली आहे.

जवळपास सर्वच गावांना पाणीटंचाईने ग्रासलेले असताना तालुक्यातील दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. तर भूगर्भ जलस्रोतही शेवटच्या थराला गेला आहे. साहजिकच लांबलेल्या पावसामुळे बागलाणवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, धरणात पाणीटंचाई असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या घशाला कोरड

चालूवर्षी पावसाने सरासरी ओलांडूनही तालुक्यातील जनतेची जीवघेण्या पाणीटंचाईतून सुटका होऊ शकलेली नाही. त्यामुळे तालुक्यातून डिसेंबरपासून टँकरची मागणी मागणी पुढे करण्यात आली. मात्र, पावसाने सरासरी ओलांडल्याच्या निमित्ताने मंजुरीसाठी अडसर निर्माण झाला. त्यातच जिल्ह्यात झालेली जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी दाखविण्यासाठी टँकर मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, प्रातांधिकारी आणि मग जिल्हाधिकारी अशी साखळी असल्याने ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडूनही लालफितीच्या शुक्लकाष्टामुळे टँकरचा वेळेवर श्रीगणेशा होऊ शकला नाही.

अहवालानंतरही प्रस्तावास विलंब

तालुक्यातून टँकरसाठीच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाणीटंचाईची खात्री करून तसा अहवाल देत प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले. त्या मंजुरीनंतर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. मात्र, त्या गावांना टँकरची गरज आहे का असा सवाल करित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. विशेष म्हणजे, यासाठी कधी नव्हे ते ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडूनही अहवाल घेण्यात आला. खरोखरच पाणीटंचाई असून, पुन्हा एकदा भूजल सर्वेक्षण विभागाकडूनही याची खातरजमा करण्यात आली. त्यांनीही पाणीटंचाईची भीषणता स्पष्ट केली. यानंतरही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनही अहवाल मागविण्यात आला. त्यांनीही तातडीने टँकर देण्याबाबत सहमती दिली. त्यानंतर कुठे प्रशासनाने तालुक्यातील कऱ्हे खिरमाणी, चिराई, राऊड, रामतीर, बहिराणे, भाक्षी या गावासंह एकूण २१ गांवाना टँकर सुरू केले. एकंदरीत प्रत्यक्ष कार्यवाहीची अंमलबजावणीस अहवालानंतरही विलंबच झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडमुळे अडथळ्यांची शर्यत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेहेर सिग्नल ते सीबीएस हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी खोदकाम सुरू झाले असून त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील एकूण वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. आधीच अरुंद ठरणाऱ्या सीबीएस ते मेहेर सिग्नल रस्त्यावर एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू केल्याने या मार्गाने जाणेही नागरिकांना शिक्षा वाटू लागली आहे. येथे नको-नकोशा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून, ही अडथळ्यांची शर्यत संपविण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

सीबीएस अर्थात सेंट्रल बस स्थानक हा नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग आहे. बाहेरगावाहून येणारा कोणताही प्रवासी शहरात याच परिसरात उतरतो. त्यामुळे देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा याच परिसराचे दर्शन घडते. बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेली नाशिक महापालिकेची मुख्य इमारत, जुना नाशिक-मुंबई महामार्ग याच परिसरात असल्याने येथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. एकीकडे रस्त्यांवर उतरणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत असताना रस्त्यांची रुंदी मात्र वाढू शकलेली नाही. परिणामी वाहतुकीची कोंडी ही नित्याची डोकेदुखी ठरू लागली आहे. मेहेर सिग्नल ते सीबीएस या मार्गाला स्मार्ट लूक मिळावा आणि वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासही मदत व्हावी याकरीता या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, सीबीएस ते मेहेर सिग्नल या एकाच मार्गाने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सध्या सुरू आहे. परंतु, एकेरी वाहतुकीसाठीच हा रस्ता अरुंद ठरत असताना तेथून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतल्याने येथून ये-जा करणे नाशिककरांना मोठी शिक्षा वाटू लागली आहे. या रस्त्याने वाहन चालविणे ही अडथळ्यांची शर्यत ठरत आहे.

रिक्षा थांबे गेले कुठे?

सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर, कामठवाडे यांसह अन्य काही भागात जाण्यासाठी मेहेर चौक ते सीबीएस रस्त्यावरील थांब्यांवरूनच रिक्षा मिळत असे. परंतु, येथील सर्वच रिक्षाथांबे गायब झाले असून, हा रस्ता खोदण्यात आला आहे. या रिक्षा सीबीएस सिग्नलच्या पुढे थांबविल्या जातात. त्यामुळे नाशिकमध्ये काही कालावधीनंतर आलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडतो. इच्छितस्थळी जाण्यासाठी त्यांना रिक्षांची शोधाशोध करावी लागते. रिक्षाचालक प्रवाशांकडून अधिक पैसे उकळत असल्याचे प्रकारही घडू लागले आहेत.

बसेसमुळे अधिक खोळंबा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेस सीबीएस बस स्थानकातूनच ये-जा करतात. नेमके याच चौकापासून रस्त्याचे काम सुरू होत असल्याने एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू आहे. बसेसची ये-जा सातत्याने सुरू असते. त्यामुळे सीबीएस बसस्थानकाजवळ वाहतुकीचा सर्वाधिक फज्जा उडत असल्याचे पहावयास मिळते. येथे सिग्नल यंत्रणा असली तरी एका मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने ती कूचकामी ठरू लागली आहे. जेमतेम एक बस व्यवस्थित जाऊ शकेल, एवढ्याच रस्त्यावर सध्या पूर्ण शहरातील वाहने धावत असून, त्यामुळे वाहतूक वेळोवेळी ठप्प होते. वाहतूक पोलिसही केवळ बघ्याच्या भूमिका घेण्यापलीकडे काही करू शकत नसल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयांत जाण्यासाठी या मार्गाशिवाय अन्य पर्यायच नसल्याने वाहतूक कोंडीबरोबरच नागरिकांचीही कोंडी होऊ लागली आहे.

बस बंद पडल्याने वाहनांच्या रांगा

सीबीएस बसस्थानकातून बाहेर पडताना सिग्नलकडे जाण्यासाठीच्या शरणपूर रस्त्यावरच दुपारी चारच्या सुमारास मोहाडी बस बंद पडली. त्यामुळे या भागात वाहतुकीचा फज्जा उडाला. शरणपूर रोडवर रिक्षांसह अन्य वाहनांच्या रांगा लागल्या. तर बसस्थानकातील अन्य बसेसही बाहेर पडण्यासाठीचा मार्गच बंद झाल्याने बस स्थानकामध्ये अडकून पडल्या. मोहाडीकडे प्रवाशी घेऊन निघालेली शहर बस क्र. एमएच १५ एके ८०५४ दुपारी चारच्या सुमारास बस स्थानकाच्या वळणावरच बंद पडली. त्यामुळे हा रस्ताच बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या परिश्रमानंतर ही बस तेथून काढण्यात आली. परंतु, नागरिकांना गैरसोयीचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारांची दमछाक

0
0

अवघ्या आठ दिवसांवर निवडणूक; प्रचाराला चढतोय रंग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांची प्रचारात दमछाक होत आहे. निवडणुकीत पाच जिल्ह्यातील ५२ तालुक्यांमध्ये प्रचार करावा लागत असल्याने ही निवडणूक उमेदवारांसाठी अवघड बनली आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील ५२ हजारांच्या आसपास शिक्षक मतदार असलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रत्यक्ष भेट घेणे कमी वेळात सर्वांनाच अवघड झाले आहे. त्यामुळे मतदारांचे तालुका निहाय मेळावे घेऊन या निवडणुकीत प्रचार केला जात असला तरी तो मात्र फारसा प्रभावी ठरत नसल्याचेही समोर आले आहे.

शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी हवा यासाठी ही निवडणूक होत असली तरी त्यात शिक्षक कमी व राजकीय नेते जास्त आहेत. त्यात अनेक संस्था चालकांचाही समावेश आहे. या निवडणुकीत काही उमेदवारांनी अगोदरपासून तयारी केल्याने त्यांचा संपर्क प्रत्येक शिक्षक मतदारांशी झाला आहे. तर काहींनी अचानक उडी घेतल्याने त्यांना आता कमी वेळात संपर्क साधणे अवघड झाले आहे. या निवडणुकीसाठी तालुकानिहाय भेटी, संस्था चालकांच्या भेटी, शिक्षक नेत्यांच्या भेटीवरही भर दिला जात आहे. तसेच काही उमेदवार शाळांना भेटी देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

मुख्य लढतीत आठ उमेदवार

शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत अनिकेत विजय पाटील (भाजप), किशोर भिकाजी दराडे (शिवसेना पुरस्कृत), संदीप त्रंबकराव बेडसे (राष्ट्रवादी पुरस्कृत व टीडीएफ बोरस्ते-मोर गट पुरस्कृत), माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, भाऊसाहेब कचरे-पाटील (टीडीएफ-निरगुडे बादशहा गट), सुनील पांडुरंग पंडित (शिक्षक परिषद), शाळीग्राम ज्ञानदेव भिरूड (तिसरी टीडीएफ) आणि अप्पासाहेब रामराव शिंदे यांच्यात मुख्य लढत आहे.

यांनी वाढविली डोकेदुखी

चुरशीच्या या लढतीत काही नवख्या आणि बंडखोर उमेदवारांनी राजकीय पक्षांचे समर्थन असलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. अजितराव किसान दिवटे, अप्पासाहेब रामराव शिंदे, अशोक शंकर पाटील, रवींद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, महादेव साहेबराव चव्हाण, मुख्तार कासीम या उमेदवारांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. आता त्यांचा फटका कोणाला बसतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

२५ जूनला मतदान

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ११ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. रिंगणात एकूण १६ उमेदवार असल्याने ही निवडणुक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी, २५ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर २८ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

- रिंगणात उमेदवार १६

- शिक्षक मतदार ५२ हजार

- कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यातील ५४ तालुके

- मतदान २५ जून रोजी

- मतमोजणी २८ रोजी

लोगो : विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसची भाडेवाढ नगण्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाचे १८ टक्के भाडेवाढ केल्यामुळे सिटी बसच्या भाड्यातही वाढ झालेली असली तरी ती नगण्य आहे. १ ते ३ रुपयांपर्यंतच ही वाढ असल्यामुळे प्रवाशांवर मोठा बोजा पडणार नाही. विशेष म्हणजे सिटी बसच्या या दरवाढीत काही मार्गांवर हे भाडे कमी झाल्याचा सुखद धक्काही मिळाला आहे. काही ठिकाणाचे भाडे 'जैसे थे'च आहे. पाच पटीत पूर्णांकात करण्याची पद्धत एसटीने अवलंबल्यामुळे त्याचा हा फायदा झाला आहे. पण, त्याचे प्रमाण कमी आहे.

शहरात सिटी बस चाकरमान्यांसाठी सर्वात स्वस्त असे सार्वजनिक वाहन असताना आता ते महागडे होईल अशी भीती होती. पण, त्यात नगण्य वाढ झाली आहे. एसटीने केलेल्या या दरवाढीमुळे सिटी बसचे दोन किमीपर्यंतचे ८ रुपये असलेले भाडे १० रुपये झाले आहे. २ ते ४ किमीपर्यंतचे १० रुपये असलेले भाडे 'जैसे थे' असेल. ४ ते ६ किमीपर्यंतचे १४ रुपये असलेले भाडे १५ रुपये, ६ ते १० किमीचे १८ रुपये असलेले भाडे २० रुपये झाले आहे. १० ते १४ किमीसाठी २२ रुपये असलेले भाडे २५ रुपये झाले आहे. १४ ते १८ किमीसाठीचे भाडे २६ रुपयांवरून २५ रुपये झाले असून, त्यात घट झाली आहे. त्याचप्रमाणे १८ ते २२ किमीपर्यंतचे ३० रुपये भाडे 'जैसे थे' आहे. २२ ते २६ किमीपर्यंतचे ३४ रुपये भाडे ३५ झाले आहे. २६ ते ३० किमीपर्यंतचे भाडे ३८ रुपयांवरून ४० रुपये झाले आहे. ३० ते ३४ किमीचे भाडे ४२ रुपयांवरुन ४५ रुपयापर्यंत गेले आहे.

इंधन दरवाढीचा फटका

इंधन दरवाढ झाल्यामुळे एसटीने ही भाडेवाढ केली आहे. त्याचा फटका बाहेरगावी जाणाऱ्या प्रवशांना बसला आहे. पण, सिटी बसच्या या भाडेवाढीत १ ते ३ रुपये अशीच वाढ असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना ती पेलवणारी आहे. रोजच्या प्रवाशांना त्यात वाढ वाटेलही. पण, इंधन दरवाढीचा हा परिणाम असल्यामुळे त्याला पर्यायही नाही. स्मार्ट सिटीतंर्गत स्मार्ट रोडचे काम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे. या मार्गावरुन एक हजारांहून अधिक एसटीच्या फेऱ्या रोज होतात. पण, प्रशासनाने हा मार्ग एसटीसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास काही ठिकाणचे अंतर वाढणार असून, त्याचा फटका लांबच्या बसला बसणार आहे.

सिटी बस धावते ३६ किमी

महानगरात १२० हून अधिक सिटी बस धावत असल्या तरी त्यांचे अंतर ३६ किमी पेक्षा जास्त नाही. सर्वात कमी २ किमी अंतर असले तरी नाशिक शहराबाहेर असलेल्या काही थांब्यांचे अंतर जास्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो पार्किंगचा फलक फेकला अडगळीत

0
0

नो पार्किंगचा फलक फेकला अडगळीत (फोटो)

पंचवटी : निमाणी बस स्थानकाच्या बाहेरच्या बाजूला लावण्यात आलेला नो पार्किंगचा फलक उखडून अडगळीत फेकण्यात आला आहे. निमाणीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क करण्यात येऊ नयेत, असे दर्शविणाऱ्या या फलकाची मोडतोड करण्यात आली आहे. हा फलक सध्या निमाणी बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या आड फेकून देण्यात आलेला असून, या फलकाच्या ठिकाणी सर्रास वाहने पार्क केली जात आहेत.

--

जनावरांचा वावर (फोटो)

पंचवटी : शहरात मोकाट जनावरांची वाढलेली संख्या डोकेदुखी ठरू लागली आहे. इंदिरानगर येथे घडलेल्या घटनेनंतरही अजून मोकाट जनावरांचा प्रश्न सुटलेला नाही. आता थेट रामकुंड पुलावर मोकाट गायींचा वावर होऊ लागल्याने गर्दीच्या ठिकाणी एखादे जनावर जोरात इकडे-तिकडे पळू लागले, तर अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामकुंडासारख्या गजबजलेल्या ठिकाणची मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.

--

सर्व्हिसरोडवर तळे (फोटो)

पंचवटी : औरंगाबाद नाक्याच्या परिसरात सर्व्हिसरोडवर पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. त्यामुळे येथून वाहने नेणे अवघड होऊ लागले आहे. रविवारी झालेल्या पहिल्याच तुरळक पावसात ही स्थिती उद्भवली असून, अजून संपूर्ण पावसाळा जायचा आहे. त्यामुळे येथे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

------------------

(स्वतंत्र सिंगल)

--

जलमय रस्त्यांवर नागरिकांची कसरत (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात रविवारी झालेल्या मध्यम पावसानेच येथील रस्ते जलमय झाल्याने सातपूरवासीयांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाळी वाहिन्यांत पावसाचे पाणी जाण्याची योग्य व्यवस्था महापालिकेने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून महापालिकेला जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात पावसाळी वाहिन्या

टाकल्या. सातपूर भागातदेखील मुख्य रस्ते व गरजेच्या ठिकाणी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र, असे असतानाही रविवारच्या पावसाने रस्ते जलमय झाल्याने पादचारी व वाहनचालकांचटी तारांबळ उडाली होती. महापालिकेच्या पावसाळी गटार विभागाने किमान पावसाचे पाणी कोट्यवधी रुपये खर्च करून टाकलेल्या वाहिन्यांत कसे जाईल याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सातपूरला अनेक नैसर्गिक नाले बुजविण्यात आलेले असून, त्यातच महापालिकेने टाकलेल्या पावसाळी वाहिन्यांत पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्थाच केली नसल्याने रस्त्यांवरच पाणी वाहते. त्याचा त्रास पादचारी, तसेच वाहनचालकांना सहन करावा लागतो.

-महेश आहेर, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलधारा बरसल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे दर्शनही होऊ शकले नाही. थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पावसाच्या सरी कोसळत असल्याने खऱ्या अर्थाने पावसाळ्याची चाहूल लागली आहे. पावसामुळे नियमित कामांचा खोळंबा नको म्हणून रेनकोट, छत्र्या वापराला पसंती दिली जाऊ लागली आहे.

पावसाचे आणि नाशिककरांचे नाते हळवे आहे. कधी हा पाऊस मोसम नसतानाही नाशिककरांना भेटायला येतो, तर कधी तो मोसमातही भेटीसाठी तरसवतो. पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला असला तरी जूनचा पंधरवडा उलटूनही अद्याप हवा तसा पाऊस होऊ शकलेला नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या हलक्या सरींनी वादळी वाऱ्यासह शहरात हजेरी लावली. त्यामुळे नाशिककर सुखावले. मात्र, हे सुख क्षणिक ठरले. त्यानंतर पाऊस गायब झाला. पुन्हा शनिवारी (१६ जून) रोजी पावसाने अचानक हजेरी लावून नागरिकांची धांदल उडवली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. शहरात सकाळी दहाच्या सुमारास पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मात्र, पंधरा मिनिटांतच हा पाऊस थांबला. त्यानंतर पुन्हा साडेअकराच्या सुमारास सरी कोसळल्या. कधी उघडीप, तर कधी हलक्या सरी असा अनुभव नाशिककरांनी घेतला. या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाण्याची तळी साचल्याचे पाहायला मिळत होते. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत शहरात ५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शहरात १ जूनपासून आतापर्यंत ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम

जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सिन्नर आणि नांदगाव तालुक्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शनिवारपासून रविवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात ३८.५ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक तालुक्यात २.५ मिमी, इगतपुरीत १९ मिमी, त्र्यंबकेश्वर ४ मिमी, पेठ १२ मिमी, तर सुरगाण्यात १ मिमी पावसाची नोंदी झाली. जिल्ह्यात १ जून ते १७ जून या कालावधीत ४७४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ३१.६३ मिमी पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रश्न सोडवाल तर तुम्हालाच समर्थन!’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आदिवासी विकास विभागातील विविध प्रलंबित समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन ते सोडविण्याची तयारी दर्शविणाऱ्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ असा एकमुखी विचार नाशिक विभागीय मेळाव्यात मांडण्यात आला.

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा नाशिक विभागीय मेळावा रविवारी पेठरोड येथील एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाला. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष विक्रम गायकवाड, अध्यक्ष संतोष राऊत, सरचिटणीस भालचंद्र बोऱ्हाडे, कार्याध्यक्ष सुभाष बावा, सचिव संजय जाधव आदींनी मेळाव्यात विविध समस्या मांडल्या.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी पाच अशी करावी, आदिवासी विकास विभागातील शिक्षक संवर्गातील नियककालिक रखडलेल्या बदल्यांबाबत भूमिका घेणे, शालेय शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसेच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, आश्रमशाळेतील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंद करू नये, सहाव्या वेतन आयोगात काही संवर्गाच्या बाबतीत त्रुटी आहेत; सातव्या वेतन आयोगात त्या दूर कराव्यात अशा विविध मागण्या शिक्षक मतदार संघातील उमेदवारांसमोर करण्यात आल्या. मेळाव्यास नाशिक, कळवण, राजूर, धुळे, नंदुरबार, तळोदा, यावल या प्रकल्पातील कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोळ

0
0

फोटोळ

०००००००

विकासमार्गाला वेग!

गोंदे ते पिंपळगाव रस्त्याचे काही भागात रस्त्याचे काम रखडले होते, ते आता पूर्ण केले जात आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल परिसरात सध्या सुरू असलेल्या कामाने वेग घेतला आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणगौरव समारंभ २२ जुलै रोजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माळी समाज सेवा समितीच्या वतीने माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीचे विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धा लॉन्स येथे बैठक पार पडली.

माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी समितीच्या वतीने पहिली ते बारावी, बी. कॉम, एम. कॉम, डी. एड., बी. एड, इंजिनीअरिंग सर्व वर्षातील सर्व विभागातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या व विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकाची प्रत १५ जुलैपर्यंत जमा करावी. त्यासाठी समाज बांधवांनी पंचवटी : दत्ता ढोले (९८९०९४०९३४), सिडको : उत्तमराव बडदे (९३७३९१३३३२), इंदिरानगर : महेश गायकवाड (९३७०२९५९४१), नाशिकरोड : अॅड. केशव खैरे (९८८१२३४७३४), कोणार्कनगर : मंगला माळी (८००७२१६७१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याखेरीज गुणपत्रकाची प्रत malisamajsevasamiti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ९७६६३५९२३३ या whatsapp क्रमांकावरही स्वीकारण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुटपाथवर अडगळ...

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरीरोडवरील पंचवटी पोलिस स्टेशनच्या जवळ फुटपाथवरच गंजलेली वाहने पडून आहेत. या वाहनांनी या रस्त्यावरचा फुटपाथ व्यापला आहे. त्याबरोबर या वाहनांच्या आडोशाचा वापर करून येथे प्रातर्विधीदेखील उरकले जात असल्याने येथे प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.

विविध प्रकारच्या गुन्ह्यांत वापरण्यात येणारी वाहने जप्त केली जातात. ही वाहने नंतर कित्येक वर्षे धूळ खात पडून राहतात. त्यांच्यावर गंज चढतो. त्यांचे काही पार्ट गायब केले जातात. अशीच चारचाकी वाहने दिंडोरीरोडवर कित्येक वर्षांपासून पडून आहेत. गंजून खिळखिळ्या झालेल्या या वाहनांनी दिंडोरीरोडचा फुटपाथचा भाग पार्किंगसारखा वापरला आहे. वाहनांची कायमच मोठी वर्दळ असलेल्या या भागात फुटपाथवर अशा अडगळीत पडलेल्या वाहनांची मोठी अडचण होत आहे. गंजलेल्या स्थितीतील या निकामी वाहनांच्या आडोशाचा वापर अस्वच्छता पसरविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. त्यामुळे येथील दुर्गंधी वाढली आहे. परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारी ही गंजलेल्या स्थितीतील निकामी वाहने येथून त्वरित हटविण्यात यावीत, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून होत आहे.

वाहनांआड शौचालय!

दिंडोरीरोड भागात सध्या दोन ट्रक आणि एक टेम्पो अडगळीच्या स्वरूपात पडून आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या भागाचा स्वच्छतागृहासारखा वापर केला जात आहे. उघड्यावर शौचास मनाई असतानाही येथे उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे येथील दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनी समाजातर्फे सप्टेंबरमध्ये अधिवेशन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया (माळी) सैनी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन सप्टेंबर महिन्यात नाशिक आयोजित केले जाणार आहे. अधिवेशनाच्या नियोजना संदर्भात बैठक पी. एम. सैनी यांच्या निवास्थानी ओझर येथे रविवारी माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माळी समजाची भूमिका, अधिवेशनाचे विषय या संदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी दहावी शालांत परीक्षेत आयुष राजकुमार जेफ ९९.८१ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ऑल इंडिया सैनी समाजाचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी ताराचंद गहलोत, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, प्रदेश अध्यक्ष संदीप नाईक, महाराष्ट्र प्रदेश महासचिव पी. एम. सैनी, प्रदेश महासचिव शंकर जी बागडी, प्रदेश चिटणीस शिवदास महाजन, प्रदेश उपाध्यक्ष किरण बिडकर, कार्यकारिणी सदस्य कैलास सैनी, सुभाष महाजन, रामलाल सैनी, राजकुमार जेफ व सारिका जेफ उपस्थित होते.

बैठकीपूर्वी सकाळी ऑल इंडिया (माळी) सैनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भुजबळ फार्म नाशिक येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती ऑल इंडिया सैनी समाजाचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी ताराचंद गहलोत यांनी दिली.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुर्ज खलिफावरून दुबई दिसली नाही!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुबईतील सर्वात उंच असणाऱ्या 'बुर्ज खलिफा' या १२४ मजली इमारतीवरून नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पर्यटकाला निराशा हाती पडल्यामुळे त्याने ग्राहक न्यायामंचात धाव घेतली. पण, येथेही ग्राहक न्यायालयाने या पर्यटकाची याचिका फेटाळल्यामुळे उंचीवरुन दिवसा नैसर्गिक सौंदर्य बघण्याचे या पर्यटकाचे भंगले.

नाशिकच्या रासबिहारी स्कूलसमोर हनुमानगर येथे राहणाऱ्या जिग्नेश ठाकूर यांनी मुंबईतील परळच्या 'क्लिअर ट्रिप' कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावर ग्राहक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही याचिका फेटाळली. ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, क्लिअर ट्रिपच्या वेबसाइटवरून बुर्ज खलिफा इमारतीवरुन दृश्य न्याहाळण्यासाठी बुकिंग केले होते. दुबई यात्रेत त्यासाठी ६ हजार ९२२ रुपये दिले होते. या बुकिंगमध्ये सायंकाळी पाच वाजताची वेळ देण्यात आली. पण, ही वेळ नंतर साडेसहाची करण्यात आली. या वेळेत सूर्यप्रकाश नसल्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य बघता आले नाही. त्यामुळे क्लिअर ट्रिपने पुन्हा अशी सहल आखावी किंवा एक लाख २० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये द्यावेत, असे ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले होते.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने ठाकूर यांनी सूर्यप्रकाश नसल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता आले नाही, असा दावा केला असला तरी परतावा मागण्याचा पर्याय उपलब्ध असताना तो वापरलेला नाही. त्यामुळे सेवा देण्यास कमतरता केली, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचे सांगितले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी यांनी दिला. पण, या याचिकेच्या निमित्ताने दुबईच्या सर्वात उंच असलेल्या 'बुर्ज खलिफा'चे नाव ग्राहक न्यायमंचात चर्चेला आले.

कंपनीने झटकली जबाबदारी

ठाकूर यांच्या तक्रारीवर क्लिअर ट्रिपने बाजू मांडताना स्पष्ट केले की, आमची इंटरमिजियरी सुविधा पुरविणारी संस्था आहे. दुबईतील सर्वात उंच बिल्डिंगवर जाऊन शहर न्याहाळण्याचे व्यवस्थापन करणारी 'अॅट टॉप बुर्ज खलिफा' ही संस्था आहे. ठाकूर यांचे बुकिंग याच संस्थेकडे केले होते. या संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भेटीची वेळ कधीही बदलू शकते व बदललेली वेळ मान्य नसल्यास पैसे परत करण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यात आम्हाला जबाबदार धरता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांना बसणार चाप?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आणि अजामीनपात्र गुन्हा असे कायद्याचे नवीन स्वरूप करण्यात आले आहे. यामुळे काही फरक पडत नाही, अशा मानसिकतेतून सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होतील काय, याविषयी सरकारी हॉस्पिटल्स, एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांमध्ये चर्चा सुरू आहे.

नाशिक शहरात २०१४ ते मे २०१८ या काळात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या १६१ घटना घडल्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांकडून वैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय कर्मचाऱ्यांना नेहमीच लक्ष्य केले जाते. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या प्रकारानंतर कर्मचारी संप पुकारतात. यानंतर रिक्षाचालकांसह खासगी वाहनचालक आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांची अधूनमधून झडप होत असते. द्वारका ते नाशिकरोड आणि क्वचित प्रसंगी शालिमार येथे बसचालकांना मारहाण झाल्याच्या घटना होत असतात. वाहतूक पोलिस आणि नागरिकांमध्ये कारवाईनिमित्ताने सुरू झालेला वाददेखील हाणामारीपर्यंत पोहोचतो. यावर्षी पहिल्या चार-पाच महिन्यांतच अशा प्रकाराचे किमान नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहतूक पोलिसांवर हात उचलण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. यानंतर विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिस आणि आंदोलनकर्ते समोरासमोर येतात. महापालिकेचे अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनादेखील रोषाला सामोरे जावे लागते. नाशिक ग्रामीणमध्ये अशा घटना घडण्याचे प्रमाण जास्त असले तरी मूळ कारणे याच स्वरूपाची असतात. ग्रामीण भागात वाळू तस्कर ही डोकेदुखी असून, त्यांच्यामुळे या गुन्ह्यांत वाढ होताना दिसते. २०१४ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २७६ गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास पूर्वी जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकत होती. त्यात हा गुन्हा जामीनपात्र असल्याने अटक झाल्याबरोबर संशयिताची सुटका होणे सोपे होते. आता मात्र राज्य सरकारने अशा गुन्ह्यांतील शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढवली असून, गुन्हाही अजामीनपात्र ठरवला आहे. यामुळे भविष्यात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कलम ३५३ मध्ये झालेल्या या बदलाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, त्याचा किती फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले

वर्ष- गुन्हे

२०१५- ३९

२०१६- ५०

२०१७-५३

२०१८-१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिप्रू’ने दिले जगण्याचे बळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला ही जन्माचीच सोशीक असते. स्वकीय असोत अथवा परक्या व्यक्ती, त्यांच्याकडून अनपेक्षितपणे होणारे आघात ती सोसत जाते. तिच्या सोशीकतेचा नको तसा लाभ उठविला जातो. कवीमनाच्या व्यक्तीला महिलांची ही अवस्था पाहवत नाही. तो अशा महिलांना अन्यायाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडतो. दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो अन् या महिलांचे आयुष्य वेगळ्या वळणावर येऊन थांबते. अशा वैचारिक नाटकाची सफर रविवारी नाशिककर रसिकांना घडली.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये रविवारी सायंकाळी 'झिप्रू' या वैचारिक नाटकाचा प्रयोग सादर झाला. शिवकांता सुतार आणि अमोल भुटे यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या. महिलांच्या सोशीकतेवर या नाटकाने प्रकाश टाकला. सोशीक महिलांचे होणारे हाल आणि अशा स्वभावामुळे त्यांच्या वाट्याला सातत्याने येणाऱ्या अपेष्टांचे दर्शन नाटकातील कलावंतांनी घडविले. झिप्रू नावाचा कवी अशा सोशीक महिलांच्या जीवनावर अभ्यास सुरू करतो. त्यांना या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो. समाजातील वाईट गोष्टी बदलण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, अचानक त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याचे आव्हान एका पोलिस अधिकाऱ्यावर येते. मात्र, या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा अधिकारीदेखील वेडसर व्यक्तीसारखा वागू लागतो. वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेले हे नाटक भावनिक पातळीवर येते अन् अखेर या महिलांची सुटका होते.

नाटकाचे लेखन श्रीकांत हळदुले यांनी केले, तर दिग्दर्शन भुटे यांचे होते. बाबा पर्सेकर यांचे नेपथ्य आणि राजा मुळे यांची प्रकाशयोजना होती. नाटकाचे संगीत संयोजन षण्मुखानंद आपटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images