Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आदिवासी विकास कर्मचारी संघटनेचा आज मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा रविवारी (दि. १७) पेठ रोडवरील आर. टी. ओ. ऑफिस शेजारील एकलव्य शाळेत होणार आहे. यात शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत निर्णायक भूमिका घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांचा मेळाव्यात सहभाग असेल.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी पाच अशी करावी, आदिवासी विकास विभागातील शिक्षक संवर्गातील नियतकालिक रखडलेल्या बदल्यांबाबत भूमिका घेणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना डी.सी.पी.एस. योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात यावी, शालेय शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्यात यावा यासह काही विषय या मेळाव्यात घेण्यात येणार आहे.

मेळाव्यात या महत्त्वपूर्ण विषयांसह इतरही विषयांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवारी करणारे सर्व उमेदवारांना एकाच मंचावर आमंत्रित केले जाणार आहे. आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित कर्मचारी वर्गाच्या व विभागातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नाशिक विभागीय मेळावा होत आहे.

नाशिक विभागात २१७ शासकीय आश्रमशाळा असून २११ अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे,यावल आणि राजूर या सात आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत आश्रमशाळांच्या समस्यांवर २५ वर्षांपासून कर्मचारी संघटना कार्यरत आहे. शासनमान्यता प्राप्त असलेल्या या संघटनेची नाशिक विभागातील शिक्षकांनीही दखल घेतली आहे. विभागात होणाऱ्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत संघटनेने संघटित आणि निर्णायक भूमिका पार पाडावी, असा निर्णय नाशिक येथे झालेल्या बैठकीत संघटनेने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्याप्रकरणी पाचही सावकार अटकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेकायदा कर्ज वसुलीच्या त्रास देऊन दाम्पत्यास आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या पाचही संशयित सावकारांना अटक करण्यात आली. या सर्वांना सोमवारपर्यंत (दि. १८) कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

खासगी सावकारांच्या बेकायदा पैसा वसुलीने त्रस्त झालेल्या वासुदेव अंबादास जाधव (३८) आणि संगिता वासुदेव जाधव (३४, दोघे रा. अष्टविनायकनगर, कमल रेसिडन्सी, सिडको) या दाम्पत्याने शुक्रवारी (दि. १५) दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी दाम्पत्याने पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिट्टी लिहिली. यात दाम्पत्याने घेतलेले कर्ज आणि दिलेले पैसे याचाही तपशील नमूद केला होता. त्यानुसार पोलिसांनी राहुल जाधव (२६, रा. साईजीत रो हाउस, शुभम पार्कमागे, गजानननगर), अमोल मंगेश सोनवणे (२८, रा. फ्लॅट १७, बिल्डींग १, शुभम पार्क, अंबड लिंकरोड), अशोक केदू होळकर, सुनील पुरकर आणि प्रवीण भाऊ (वेदमंदिर) अशा पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यातील जाधव आणि सोनवणे वगळता अंबड पोलिसांनी तिघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली. तर, जाधव आणि सोनवणे यांना क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास इगतपुरीतील जोगेश्वरी अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले. या पाचही संशयितांना कोर्टात दुपारी हजर करण्यात आले. कोर्टाने सर्व संशयितांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोलताना अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले की, संशयित आणि जाधव दाम्पत्य यांच्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कागदपत्रे जप्त करणे आणि बँके खात्यांचे तपशील जमा केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचा शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रमजान ईदचे पर्व उत्साहात साजरे होत असताना शनिवारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनने हलकासा शिडकावा केला. यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

नाशिकमध्ये पावसाचे आगमन झाले असले तरी अद्याप तो हवा तसा बरसलेला नाही. जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली. शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास पावसाने हलकासा शिडकावा केला. मात्र, काही मिनिटांतच तो थांबला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींनी शहराच्या बहुतांश भागात हजेरी लावली. त्यामुळे बेसावध नागरिकांची धांदल उडाली. अवघ्या १५ ते २० मिनिटांतच पावसाने विश्रांतीही घेतली. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी २२ जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शनिवारी कमाल तापमान ३१, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शहरात १ जूनपासून आजपर्यंत ३७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात शनिवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत अवघ्या ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. १४ जूनला अवघ्या दोन तासांत ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तुलनेने यंदा पाऊस अजूनही बरसलाच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्र्यंबकेश्वर येथेही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी होती. अचानक आलेल्या पावसाने त्यांची चांगलीच तारांबळ उडविली. हवेतही गारवा निर्माण झाला.

विजेचा लपंडाव

पावसाचे आगमन होते न होते तोच शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. पावसाचा शिडकावा झाल्यानंतर शहरात अनेक भागांत वीज गूल झाली. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. शहरासह त्र्यंबकेश्वरमध्येही विजेचा लपंडाव सुरू असल्याचा अनुभव रहिवाशांनी घेतला. पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये याकरिता महावितरणला सज्ज राहावे लागणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले. पंचवटी, कॉलेज रोड, सिडको, सातपूर या परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा सावकारी पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेल्या बेकायदा सावकारीचा उद्योग खपवून घेतला जाणार नाही. याबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास अथवा तक्रार द्यायची असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

सावकारांच्या जाचामुळे केवलपार्क येथील पती पत्नीने शुक्रवारी आत्महत्या केल्यानंतर अवैध सावकारीचा व्यवसाय पुन्हा चर्चेत आला. या प्रकरणी पाच सावकारांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले, की खासगी बेकायदा सावकारी खपवून घेतली जाणार नाही. अशा सावकारांबाबत काही माहिती असल्यास अथवा तक्रार द्यायची झाल्यास नागरिकांनी थेट पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शहरात जर असे प्रकार सुरू असतील तर ते मोडून काढण्यासाठी पोलिस सर्वोत्परी प्रयत्न करतील, असे आश्वासन डॉ. सिंगल यांनी दिले.

शहरात यापूर्वी बेकायदा सावकरीमुळे अनेक गंभीर गुन्हे घडले असून, यातून सराईत गुन्हेगारांना देखील पैसे पुरविले जातात, हे स्पष्ट झाले आहे. बेकायदा सावकारीबाबत काही वर्षांपूर्वी पंचवटीत मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बरेच वर्षांनी बेकायदा सावकारीचा प्रश्न समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझर विमानतळावर लवकरच कॅफेटेरिया

$
0
0

५०० चौरस फुटाची जागा उपलब्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील नाशिक विमानतळाच्या ठिकाणी लवकरच सुसज्ज कॅफेटेरिया साकारला जाणार आहे. त्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) पॅसेंजर टर्मिनलमधील ५०० चौरस फुट जागा नाशकातील एका केटरर्सला भाड्याने दिली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ओझर येथे एचएएलची मालकी असलेल्या विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल उभारण्यात आले आहे. आता या विमानतळावरुन विमानसेवा सुरू आहे.

एअर डेक्कन कंपनीच्या वतीने गेल्या डिसेंबर महिन्यापासून सेवा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत एअर डेक्कनची नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू आहे. तर, नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा येत्या २१ जूनपासून सुरू होत आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे. तसेच, जेट एअरवेज कंपनीकडून नाशिक-दिल्ली-नाशिक या सेवेचे उदघाटन झाले आहे. त्यामुळे ही सेवाही १८ जुलैपासून सुरळीतपणे सुरू होणार आहे. दिल्ली सेवा ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस राहणार आहे. दिल्ली सेवा ही १६८ आसन क्षमता असलेल्या बोईंग विमानाद्वारे आहे तर मुंबई व पुणे ही सेवा १६ आसन क्षमता असलेल्या छोट्या विमानाद्वारे आहे. या तिन्ही सेवा पुढील आठवड्यापासून नियमित राहणार असल्याने प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी तिकीट काउंटर, चेक इन आणि चेक आउट एवढ्याच सुविधा आहेत. याठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा अन्य सुविधा नाहीत. मोहाडी गावापासूनही मोठ्या अंतरावर विमानतळ असल्याने प्रवाशांना बाहेर जाऊनही खाद्य पदार्थ आणणे शक्य होत नाही. विमान उशिरा येणे किंवा जाण्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पॅसेंजर टर्मिनल राज्य सरकारने पर्यटन निधीतून साकारले आहे. हे टर्मिनल देखभाल आणि दुरुस्तीसाठी ९९ वर्षांच्या कराराने 'एचएएल'च्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक येथे वाढत्या विमानसेवेचा विस्तार पाहता एचएएलने आता टर्मिनलमधील ५०० चौरस फुट जागा कॅफेटेरियासाठी भाड्याने दिली आहे. चेक इन काउंटरच्या लगत असलेल्या या जागेत चहा, कॉफीसह विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. नाशिकच्या एका केटरर्सला ही जागा देण्यात आली असून येत्या काही दिवसातच हा कॅफेटेरिया सज्ज होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.

विमानतळावर कॅफेटेरिया अत्यंत गरजेचा आहे. प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने ही सुविधा नव्हती. आता प्रवासी संख्या वाढल्याने कॅफेटेरियाही उपलब्ध होणार आहे.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

लहान मुले आणि वृद्धही प्रवासात असतात. त्यामुळे विमानतळावर खाद्य पदार्थांचा स्टॉल आवश्यक आहे. ही सुविधा लवकर सुरू करावी.

- नीलेश चव्हाण, प्रवासी

शुभवार्ता ........ फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ कॅफेटेरिया फोटो

कर्तृत्ववानांच्या पाठीवर रोटरीतर्फे कौतुकाची थाप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची सुसंधी लाभली असून, पुरस्कारार्थींनी भावी वाटचालीत आणखी नाव कमवावे, आपल्या शहराचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे स्टेशन कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले.

येथील रोटरी क्लबतर्फे दर वर्षी देण्यात येणाऱ्या रोटरी व्होकेशनल अॅवॉर्डच्या वितरणावेळी ते बोलत होते. मेसोनिक लॉज सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर क्लबचे सेवानिवृत्त कर्नल अध्यक्ष अशोक शिरगावकर, सचिव राजेश कटारे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रुती मदान आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्ती आणि संस्थांचा दर वर्षी सन्मान केला जातो. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा विजय शेट्टी, जय सुंदरामन, डॉ. अलका स्वादी, अश्विनी शिरगावकर आदींनी परिचय करून दिली. डॉ. अरुण स्वादी यांनी सूत्रसंचालन केले. मुरली राघवन यांनी आभार मानले. अॅड. अशोक आडके, कर्नल विनोद मलिक, डॉ. पूर्णेंदू बक्षी, मनोज कल्याणकर, दिनेश कारिया, प्रा. सुनीता आडके, कश्मिरा धवन, कमलेश वर्मा, शशी मदान, संजीवनी बक्षी, संध्या सुंदरामन आदी उपस्थित होते.

...यांचा झाला सन्मान

अनिरुद्ध अथनी (मॅरेथॉन मॅन), अनिता पगारे (महिला सबलीकरण), डॉ. शिरीष घन (अष्टपैलू कामगिरी), गोकुळ लोखंडे (पत्रकारिता), वैभव गागे, प्रेम लुल्ला (सामाजिक कार्य), योगेश गुप्ता (भ्रमणवीर), बुद्धभूषण बोराडे (वक्तृत्व), अक्षय रहाणे (शैक्षणिक), भक्तवत्सलम नायडू (खानपानतज्ज्ञ), सुनीता ताजनपुरे (स्त्री उद्योजक) आदी पुरस्कारार्थींचा ब्रिगेडिअर पी. रमेश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाच्या शांतीसाठी दुआँपठण

$
0
0

मालेगावात रमजान ईद साजरी; येवला, मनमाडला उत्साह

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी (दि. १६) झाली. शहरातील बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली.

शहरात रमजान ईदनिमित्त वेगवेगळ्या १८ ठिकाणी सामूहिक नमाज व दुआँ पठण करण्यात आले. कॅम्प रस्त्यावरील मुख्य ईदगाह मैदानावर माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. या वेळी देशाच्या अमन व शांतीचा संदेश आपल्या मनोगतातून मौलाना यांनी दिला.

मुख्य ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मता चौकात शांतता व एकात्मता समितीतर्फे आमदार मौलाना मुफ्ती यांचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मनपाचे उपायुक्त राजू खैरनार, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, माजी सभापती प्रसाद हिरे, हरिप्रसाद गुप्ता आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी बोलताना मौलाना म्हणाले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिम समाज नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. येणाऱ्या काळातदेखील देशात अमन व शांती राहावी सौदाहार्याचे वातावरण राहावे, अशी दुआँ यावेळी मागण्यात आली. तसेच मौलाना मुफ्तींनी धार्मिक संदेश देतानाच सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य केले. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षतोड रोखून वृक्षसंवर्धनासाठी सर्वांची पुढे यावे. लेक वाचवून त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. समाजात, प्रामुख्याने तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता चिंतेचा विषय आहे. तरुणांनी यापासून दूर राहावे. यासह काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग असून, तेथील स्थानिकांना हक्क मिळावेत तरच शांतता टिकून राहील, असेही ते शेवटी म्हणाले. घरोघरी शिरखुर्म्याचा आनंद घेण्यात आला. हिंदू बांधवांनीदेखील गळाभेट घेत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त वरिष्ठ पोलिस अधिकारी बंदोबस्तावर लक्ष ठेऊन होते. टेहेळणी मनोरे आणि क्लोज सर्किट टीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहातील नियंत्रण कक्षात प्रत्येक हालचाल टिपली जात होती. चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडून 'स्नेहमिलन'

मनमाड : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने ईदच्या निमित्ताने गुलाबपुष्प देऊन स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने मनमाड नगरपालिका परिसरात मुस्लिम समाजबांधवांना गुलाबपुष्प देऊन गळाभेट व स्वागत करून स्नेहमिलन केले. या वेळी शहरप्रमुख मयुर बोरसे, उपप्रमुख जाफर मिर्झा, खालिद शेख, शहर संघटक मुराद शेख, महेंद्र गरुड, वाहतूक सेनेचे अमजद शेख, अंकुश गवळी, स्वराज देशमुख, कासिफ शेख, रिजवान कुरैशी, नितीन जाधव, हेमंत मुदलीयार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख योगेश इमले, उपप्रमुख कयाम सैय्यद, सचिन आव्हाड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवस्थानची नावे करावीत सातबारावरून कमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

श्रीराम व व्यंकटेश बालाजी देवस्थान यांची नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील नावे कमी करण्याचा प्रश्न थेट मंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे.

संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावरील देवस्थानांची नावे कमी करून भोगवट नंबर ३ हा वर्ग काढून तो नंबर १ मध्ये समाविष्ट करीत शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करावे, यासाठी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस प्रीतम आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील शिंगवे बहुला, बेलतगव्हाण, विहितगाव, मनोली, सावरगाव, तिरडशेत या गावांतील सर्व जमिनी वंशपरंपरेने शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. परंतु, पेशवेकाळात सदर देवस्थानांची दिवाबत्ती व वार्षिक उत्सव साजरा होण्यासाठी या गावांच्या जमा होणाऱ्या महसुलातून काही रक्कम सरकारने देवस्थानला परस्पर द्यावी, असा आदेश दिला होता. संबंधित देवस्थानाकडून सरकारला येणे असलेली रक्कम रामनवमी उत्सवाच्या खर्चासाठी 'रेव्हेन्यू ग्रँट' म्हणून देण्यात आल्याचे सरकार दप्तरी स्पष्ट उल्लेखित आहे.

सन १९७२ मध्ये दोन्ही देवस्थानांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर आपली नावे लावली. १९९० पर्यंत सदर मिळकत शेतकऱ्यांच्या कब्जात असूनही देवस्थानकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी होत नव्हती अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे बिनशेती करण्यासाठी, खरेदी-विक्री होण्यासाठी कोणताही त्रास होत नव्हता. मात्र, १९९२ नंतर देवस्थानांनी आपला ना हरकत दाखला घेणे बंधनकारक केले. त्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात बाजू मांडू दिली नाही. याबाबत महसूलमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सूचित केले. शिष्टमंडळात कॅन्टोन्मेंट नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, विक्रांत चांदवडकर, तानाजी करंजकर, विलास धुर्जड, सुनील धुर्जड, शरद पाळदे, राजेंद्र मांडे, संदीप धुर्जड, तुषार बोडके आदींचा समावेश होता.

अभिप्राय सकारात्मक असूनही...

शेतकऱ्यांनी सरकार व जिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थानच्या आदेशाविरोधात आर्थिक व्यवहाराबाबत तक्रारी केल्या. विधी व न्याय विभागाने १० मार्च २००३ च्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे, की सदर जमिनी बिनशेती करणे, खरेदी-विक्री करणे, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणे याकामी सातबारावर असलेल्या देवस्थानांच्या नावात बदल न करता परवानगी देण्यात यावी. त्यासाठी शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, गत चार वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेशाला न जुमानता शेतकरी व जमीन विकासधारकांची गळचेपी चालविली असल्याने मंत्र्यांच्या दरबारी गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात विजेची अशी घ्या काळजी

$
0
0

मटा गाइड

पावसाळ्यात विजेची अशी घ्या काळजी

पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असते. ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास शून्य वीज अपघात हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. तेव्हा अपघातमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी वीजसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी मटा गाइड.

उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळा

पाणी हे वीजवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड, विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वीज मिटरच्या जागी पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास, मीटरजवळचा मेन स्विच बंद करून महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ओल्याव्याच्या ठिकाणी उपकरणे हाताळताना पायात रबरी चप्पल किंवा बूट घालावा. घरातील ओले कपडे विजेची वायर व तारेवर वाळवण्यासाठी टाकू नये किंवा काही बिघाड दिसल्यास तत्काळ मेन स्विच बंद करावा. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्याला कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्वासोच्छ्वास देत रुग्णालयात नेण्यात यावे.

अर्थिंग व घरातील वीज तपासणी व दुरुस्ती

शेतातील व घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अर्थिंग महत्त्वाची आहे. परवानाधारक ठेकेदाराकडून अर्थिंग व वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. अर्थिंग व वायरिंगमध्ये दोष आढळल्यास तत्काळ तो दोष परवानाधारक व्यक्तीकडून दुरुस्त केला पाहिजे. घरात सर्वप्रथम स्विच बोर्डाअगोदर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवणे फार गरजेचे आहे.

अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरमुळे घरातील वायरिंगमध्ये दोष निर्माण झाल्यास घरातील वीजपुरवठा लगेच बंद होतो व होणारी वित्त व जीवितहानी (अपघात) टाळता येण्यास मदत होते. घरातील प्रत्येक स्विच बोर्डापर्यंत अर्थ वायर पोहोचवून जोडणी करावी. इमारतीमध्ये वेगवेगळ्या विद्युतभाराकरिता क्षमतेप्रमाणे मिनीॲच्युर सर्किट ब्रेकर व मेन स्विचचा वापर करावा. त्यामुळे बाधित भागाचा वीजपुरवठा त्वरित बंद होऊन सुरक्षित राहण्यास मदत होते. इतर भागातील वीजपुरवठा सुरू असतो. घरातील जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली, तसेच आवरणाची रोधकक्षमता कमी झालेली वायरिंग तत्काळ बदलण्यात यावी. अर्थिंग वेळोवेळी तपासून घ्यावी.

दर्जेदार उपकरणांचा वापर

फ्रीज, कूलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, मोटार इत्यादी उपकरणांकरिता थ्री फेज पिन आणि सॉकेटचाच वापर करावा. आयएसआय चिन्ह आणि योग्य दर्जा असलेलीच विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

बांधकाम करताना काळजी घ्या

लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्चदाब वाहिनीखाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करू नये, तसेच, इमारत/बांधकाम व वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपूर आडवे अंतर असायला पाहिजे.

शेतात वीजवापर

जनावरे विजेच्या खांबास, तसेच विजेच्या खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिंगची वायर अखंड असावी. पाऊस सुरू असताना विजेचा पंप सुरू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. पाऊस सुरू असताना रोहित्र, खांबाजवळ वा वीजतारांखाली थांबणे टाळावे.

संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तत्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महावितरणच्या चोवीस तास उपलब्ध मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ वा १८००-२३३-३४३५ वा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप

$
0
0

महाराणा प्रताप जयंती

नाशिकरोड : येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तहसीलदार एस. डी. मोहिते यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामनगरवासीयांना मिळाली ‘ओळख’!

$
0
0

योजनांच्या लाभांपासून वंचितांना शिधापत्रिका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव व धुळे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या छोट्याशा रामनगर वस्ती येथील रहिवाशी २०११ च्या जणगणननेपासून अनेक शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले होते. नाशिक व धुळे जिल्हा हद्दीवर असल्याने एकप्रकारे सीमावादाचा फटका त्यांना बसला होता. अखेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तत्परतेने या वस्तीवरील नागरिकांना हक्काचे रेशनकार्ड मिळाले आहे.

तालुक्याच्या उत्तरेला धुळे नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर कंधाणे हे छोटेसे गाव आहे. या गावाचाच एक भाग असलेल्या रामनगर वस्ती मात्र दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीत वसलेली असून, जिल्ह्याच्या हद्दीचा गंभीर प्रश्नामुळे या वस्तीवरील तब्बल ७५ कुटुंब २०११ च्या जनगणनेपासून अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित होते. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी नुकतीच रामनगर वस्तीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार विजय चव्हाण, ग्रामसेवक बी. एन. पाटील, एस. बी. थोरकर आदी उपस्थित होते.

या वेळी रामनगरवासियांनी देवरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. या वस्तीवरील सर्व कुटुंब हे कंधाणे गावाचे रहिवासी आहेत. मात्र, सध्या ते धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावाच्या गावठाण जागेवर राहतात. त्यामुळे जिल्ह्यांच्या सीमावादात कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो आहे. नागरिकत्वाचा पुरावा असलेले साधे रेशनकार्डदेखील आम्हाला नाही मग आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. देवरे यांनी त्यांची कैफियत शांतपणे ऐकून तत्काळ मालेगाव तालुका हद्दीत येणाऱ्या रहिवाशांना शिधापत्रिका वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच धुळ्याचे तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा करून उर्वरित धुळे जिल्हा हद्दीतील कुटुंबांना शिधापत्रिका देण्याबाबत सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात रामनगरमधील काही कुटुंबाना लगेचच शिधापत्रिकादेखील वाटप करण्यात आल्या. वस्तीवर असलेली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी टँकरची सोय करण्याचेदेखील आश्वासन त्यांनी दिले. देवरे यांच्या तत्परतेने रामनगर वस्तीवरील रहिवाशांना ओळख मिळाली असून, यावेळी रहिवाशांनी देवरे यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या वादातून तरुणीचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागेच्या वादातून एकाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना गंगापूर पोलिस स्टेशनसमोरील कॉलनीरोड भागात घडली. विजय शेषराव वाघमारे (रा. शाहू आंबेडकर कॉलनी, संतकबीरनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित २४ वर्षीय तरुणी पोलिस स्टेशनसमोरील कॉलनी रोडवर तिच्या आई- वडिलांसोबत रस्त्यावर गप्पा मारत उभी असताना ही घटना घडली. संशयिताने जागेच्या वादाची कुरापत काढून आई-वडिलांना शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

घरात घुसून महिलेस मारहाण

बेडरूममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांसह एकाने तिला बेदम मारहाण केली. यात महिलेचा विनयभंग झाला असून, ही घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शीतल गायकवाड (रा. शनिमंदिर, फुलेनगर), पूजा खंडारे आणि नितीन खंडारे (रा. दोघे शिवशक्तीचौक, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. सरस्वती चौकात राहणारी महिला रविवारी आपल्या बेडरूममध्ये कपडे बदलत असताना शेजारी राहणाऱ्या खंडारे दाम्पत्यासह शीतल गायकवाड या महिलेने पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी संशयितानी पीडितेस शिवीगाळ केली. तसेच मारहाण करीत घराबाहेर ओढून आणले. यावेळी खंडारे याने पीडितेचा विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

पत्नीस मारण्याचा प्रयत्न

घरगुती कारणातून पत्नीस बेदम मारहाण करीत तिला फिनेल पाजणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झला आहे.

गणेश शंकर कोळेकर (रा. पवारवाडी, सायखेडारोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गणेश आणि पत्नी स्वाती यांच्यात शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी घरगुती कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेला असता गणेशने पत्नी स्वातीस बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर फिनेलची बाटली स्वातीच्या तोंडात ओतली. यामुळे त्रास सुरू झालेल्या स्वातीला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वातीवर उपचार सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गणेशला अटक केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनोने करीत आहेत.

विहिरीत पडल्याने

अंध महिलेचा मृत्यू

शेतात जात असताना विहीरीत पडल्याने ४३ वर्षांच्या अंध महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मोहगाव (ता. नाशिक) येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सत्यभामा विलास म्हस्के (रा. मोहगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सत्यभामा या शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पायी निघालेल्या असताना ही घटना घडली.

पायवाटेने जाणाऱ्या म्हस्के यांना वाटेत आलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या विहिरीत पडल्या होत्या. वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलिस पाटील सोमनाथ टिळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

सातपूरला तरुणीची आत्महत्या

प्रबुद्धनगरमधील १८ वर्षीय तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुवर्णा राजू पवार (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १५) दुपारी आपल्या घरी सुवर्णाने अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

..

सावतानगरमध्ये

सात जुगारी गजाआड

सिडकोतील सावतानगर भागात एका घरात सुरू असलेला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत सात जणांना अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सावतानगर परिसरातील बजरंग चौकात एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि. १४) रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी अड्डामालक बालू बाबुराव बोमटे आणि त्याचे सहा साथिदार जुगार खेळतांना सापडले. संशयितांच्या ताब्यातून सात हजार ४१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक दोंबाडे करीत आहेत.

मोबाइल लंपास

रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने पळविल्याची घटना दत्तनगर येथील सुदर्शन कॉलनीत घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश कैलास मोरे (रा. सुदर्शन कॉलनी) या युवकाच्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जेवन आटोपून आदेश आपल्या घरासमोर मोबाइलवर बोलत फेरफटका मारीत असताना चोरट्यांनी संधी साधली. प्रितरंग सोसायटीसमोरून तो पायी जात असताना पाठीमागून डिओ (एमएच १५ एफडब्ल्यू ९१९७) दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेगर करीत आहेत.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओडिशातील सूत्राधार जेरबंद

$
0
0

महिलेसह शहरातील पाच संशयित पोलिसांच्या रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात आलेला गांजा पकडल्यानंतर पोलिसांनी तस्करांची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरू केले असून, या प्रयत्नात ओडिशा येथील अकबर नावाच्या मुख्य सूत्रधारास बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शहरातील पाच संशयित पोलिसांच्या रडारवर असून, यात एका महिलेचा समावेश आहे. गांजा तस्करीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर संशयिताची पळापळ सुरू झाली आहे.

शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. १२) दुपारच्या सुमारास तपोवन परिसरात तब्बल ६८० किलो गांजा पकडला. एका ट्रकमधून अगदी शिताफीने शहरात गांजा घेऊन येणाऱ्या यतीन अशोक शिंदे (३५, रा. प्रभातनगर, श्रीगणेश अपार्ट. म्हसरूळ) आणि सुनील नामदेवराव शिंदे (४७, रा. मिरचीचे पालखेड, ता. जि. नाशिक) यांना पोलिसांनी अटक केली. नाशिकला येताना ट्रकचालकाने सिन्नर येथेही गांजा उतरविल्याचे स्पष्ट झाल्याने शहर पोलिसांनी बुधवारी संतोष प्रकाश गोळेसर यास अटक करून त्याच्याकडून १९ लाख ५० हजार रुपयांचा ३९० किलो गांजा जप्त केला. या तिघांच्या चौकशीत सदर गांजा ओडिशा येथून येत असल्याचे निष्पन्न झाले. ओडिशा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात मलकानगिरी जिल्हा असून, हा भाग जंगल आणि नक्षलग्रस्त आहे. येथून अकबर नावाचा व्यक्ती नाशिकमध्ये गांजा पाठवत असल्याचे समोर आल्याने पोलिसांचे एक पथक ओडिशा येथे पोहचले. तिथे अगदी शिताफीने शुक्रवारी उशिरा अकबरला अटक करण्यात आली. अकबरला घेऊन हे पथक नाशिकला पोहचत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपींची संख्या वाढणार

जवळपास ७०० किलो गांजा शहरात कोठे जाणार होता, याचाही तपास सुरू असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, यात एका महिलेसह चौघांचा समावेश असून, त्याची नावेही निष्पन्न झाली आहेत. मात्र, पोलिस कारवाई करीत असल्याने संशयित परागंदा झाले आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून, यात आरोपींची संख्या वाढू शकते, असे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.

गांजा तस्करीच्या गुन्ह्यात आतापर्यंत चार संशयित अटक झाले असून, यातील ओडिशा येथील संशयित गांजा पुरविण्याचे काम करतो. शहरातील संशयिताची नावे स्पष्ट झाली असली तरी कारवाईच्या भीतीने ते फरार झाले आहे. त्यांचाही तपास सुरू असून, या गुन्ह्याचा पूर्ण तपास करून तस्करांचे समुळ उच्चाटन केले जाईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

लोगो : गांजा तस्करी प्रकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटलेल्या पाइपामधून पाण्याचा अपव्यय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडला फुलेनगर परिसरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यात महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटलेली आहे. यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आाहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हे पाणी कालव्यात साचत आहे.

फुलेनगर येथे महापालिकेचे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून पंचवटीतील विविध भागात पाइपलाइनद्वारे पाणी पाठविले जाते. त्यातील दोन मोठे पाइप कालव्यावरून मेरी परिसराला जोडण्यात आलेले आहे. या पाइपलाइनला कालव्याच्या भागात मोठे छिद्र पडलेले आहे. यातून कालव्यात पाण्याची मोठी धार लागली आहे. त्यात प्रचंड वेगाने पाणी पडत आहे. हे पाणी कालव्यात साचू लागले आहे. सध्या कालव्याला धरणातून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कसे काय साचते हा प्रश्न पडत आहे. हे साचणारे पाणी याच पाइपलाइनमधून पडत आहे.

येथील लोखंडी पाइपलाइन या अगोदरही फुटली होती. त्यातून पाडणारे पाणी कारंज्यासारखे उडत होते. त्यावर कापड टाकून ते उडणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वरच्या बाजूने फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आल्यानंतर आता ही पाइपलाइन खालच्या बाजूने फुटली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक पाइपलाइन फोडण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. येथे पडणाऱ्या पाण्याच्या धारेखाली कपडे धुतले जात आहे. भांडी घासली जात आहे. पिण्यासाठी येथून पाणी नेण्यात येत आहे. त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात येथील पाणी वाया जात आहे याचा विचार होत नाही. या पाण्यामुळे कालव्यात पाणी साचलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुलास लवकरच मंजुरी

$
0
0

जेलरोड : मोहगांव-कोटमगाव दारणा नदीवरील पुलांच्या बांधकामास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. नाशिक तालुक्यातील पळेस फाट्यापासून चार किलोमीटरवरील मोहगाव ते सामगाव-कोटमगाव शिव रस्त्याला जोडणाऱ्या दारणा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठीचा तीन कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार घोलप यांनी दिली आहे.

पळसे फाटा ते मोहगाव रस्ता, कोटमगाव शिव ते मोहगाव या गावांना जोडणारा आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा हा पूल झाल्यानंतर बाह्यवळण रस्ता तयार होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. एकलहरा औष्णिक वीज केंद्राकडे जाणारा हा जवळचा रस्ता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिश’, ‘एमएसजे’, ‘सुपरकिंग्ज’ची आघाडी

$
0
0

एनडीबीए ​​केन्सिंग्टन बॅडमिंटन लीग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि केन्सिंग्टन क्लबतर्फे सुरू झालेल्या एनडीबीए केन्सिंग्टन​ क्लब बॅडमिंटन लीग स्पर्धेत आदिश शटलर्स, एमएसजे वॉरिअर्स, सुपरकिंग्जने विजय मिळवत आघाडी घेतली. स्पर्धेत एकूण ६ संघ आणि ९६ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते शनिवारी सकाळी स्पर्धेचे उद्घाटन झाले. नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, केन्सिंग्टन क्लबचे विक्रांत मते, एनडीबीएचे सचिव अनंत जोशी, उपाध्यक्षा डॉ. शर्मिला कुलकर्णी आदी उपस्थित होते. १५ वर्षांखालील मिश्र दुहेरी, खुल्या गटातील पुरुष दुहेरी आणि वेटरन पुरुष दुहेरी अशा तीन गटांत ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत आदित्य कासार आणि आशिष तोरणे यांचा आदिश शटलर्स, धिरेन तिलवाणी, डॉ. पाप्रीकर आणि विश्वकर्मा यांचा डायनॅमिक शटलर्स, मनोज शिंदे आणि संतोष जाधव यांचा एमएसजे वॉरिअर्स, डॉ. जपे आणि रवी आढाव यांचा सुपर जायंट्स, रणजित सिंग आणि शैलेश वैश्य यांचा निवेक, योगेश दुसाने आणि मुकेश पवार यांचा नाशिक सुपरकिंग्ज हे संघ एकमेकांशी लढत आहेत.

पहिल्या मिश्र सामन्यात​​ आदीश शटलर्स संघाने डायनॅमिक शटलर्सचा ४-३ असा पराभव केला. पहिल्या सामन्यात डायनॅमिकच्या हृषिकेश झाडे आणि रोहित पाटील यांनी आदिशच्या हर्षद टेंभुर्णीकर आणि रोहित भायभंग यांनी १५-७, १२-१५, १५-११ असा पराभव केला. या सामन्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आणि १ पराभव स्वीकारला. त्यामुळे मुख्य सामन्यात चुरस निर्माण झाली. मात्र, ट्रम्प गुणांच्या आधारे अखेर आदिश शटलर्सने बाजी मारली. शेवटच्या सामन्यात सई देशमुख आणि सर्वेश केळकर यांनी बाजी मारूनही डायनॅमिक शटलर्सला पराभव पत्करावा लागला. ट्रम्प गुणाचे महत्त्व या सामन्यात अधोरेखित झाले.

दुसऱ्या सामन्यात​​ एमएसजे वॉरिअर्सने निवेक संघाचा ६-३ असा पराभव केला. एमएसजे वॉरिअर्सने पाहिले ४ सामने जिंकत विजयासमीप गेले. पाचवा सामना गमावल्यानंतर सहाव्या सामन्यात अंश दुबे आणि मिहिका थत्ते यांनी जिया सेठी आणि पार्थ लोहकरे यांचा १५-६, १५-८ असा पराभव करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. निवेकला ट्रम्प गुण मिळूनही फारसा उपयोग झाला नाही.

नाशिक सुपर किंग्ज आणि सुपर जायंट्स यांच्यात झालेला तिसरा सुपर सामना चुरशीचा झाला. पहिल्याच सामन्यात सुपर जायंट्सने ट्रम्प गुण गमावला. त्यामुळे नंतर झालेल्या ३ सामन्यांत विजय मिळवूनही त्यांना २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. सहाव्या सामन्यात पुन्हा एकदा सुपर किंग्जच्या वरदा एखंडे आणि जगतार गाहिर यांनी जायंट्सच्या साक्षी कोठावदे आणि दूर्वेश पाटील यांचा १५-७, १५-११ असा पराभव करत विजयी आघाडी घेतली.

​ट्रम्प गुणांमुळे वाढली चुरस

लीग पद्धतीने खेळली गेलेली नाशिकमधील ही पहिलीच स्पर्धा असून, एक एकेरी आणि चार दुहेरी अशा पद्धतीने एका सामन्यात दोन संघ पाच वेळा एकमेकांशी भिडले. यात एक पर्यायी म्हणून ट्रम्प मॅच खेळवली गेली. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला अधिकचा एक गुण मिळतो, तर हरणाऱ्या संघाचा एक गुण कमी होतो. यामुळे गुणात्मक स्पर्धेमध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळाली.

संक्षिप्त निकाल

आदिश शटलर्स विरुद्ध डायनॅमिक शटलर्स ४-३

​एमएसजे वॉरिअर्स विरुद्ध निवेक ६-३

​नाशिक सुपर किंग्ज विरुद्ध सुपर जायंट्स : ४-३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी ‘क्लिक फॉर अॅडमिशन’ अॅप

$
0
0

शुभवार्ता

फोटो आहेत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थी व पालकांना कॉलेज व प्रवेशप्रक्रियेबद्दल माहिती सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आनंद शिरसाठ यांनी अभ्यास करून 'क्लिक फॉर अॅडमिशन' हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये विद्यार्थ्यांना पाच हजारपेक्षा जास्त कॉलेज व शाळांची माहिती व प्रवेशप्रक्रियेची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे या अॅपमुळे माहिती सहज व सोप्या पद्धतीने मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी एका क्लिकने कमी होणार आहे.

दहावीची, बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सर्वांत अगोदर अॅडमिशनचे टेन्शन वाढते. त्यात अनेकांना माहिती मिळत नाही. त्यामुळे गोंधळही वाढतो. त्यामुळे हे अॅप मदत उपयोगी ठरणार आहे. क्लिक फॉर अॅडमिशन हे इंजिनिअरिंग, फार्मसी, डिप्लोमा, डी. फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए, मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या अॅपमुळे सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. तीसुद्धा मोफत.

१४ विद्यापीठे, ३६ जिल्हे

अॅपमध्ये प्रवेशावेळी लागणारी सर्व माहिती व त्या सोबत महाविद्यालयांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. या अॅपमध्ये राज्यातील १४ विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची माहिती आहे. त्याचप्रमाणे ३६ जिल्ह्यांतील डी. फार्मसी., डिप्लोमाच्या महाविद्यालयांची माहिती आहे.

महाविद्यालयाची संपूर्ण माहिती

अॅपमध्ये महाविद्यालयांची माहिती, कोड नंबर, नाव, विभाग, फोटो, कोणते अभ्यासक्रम, कोर्सेस उपलब्ध आहेत, याची माहिती आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचा पत्ता, दूरध्वनी, संकेतस्थळाची माहिती आहे. गेल्या वर्षी कॅप राउंड व कटऑफबद्दलही यात माहिती मिळते.

तज्ज्ञ लोकांचे ब्लॉग

अॅपमध्ये तज्ज्ञ लोकांचे ब्लॉग्स, विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, खडतर परिस्थितीवर मात करून आयएएस, आयपीएस झालेल्यांची माहितीसुद्धा आहे. त्याचप्रमाणे बाबा आमटे, सुधा मूर्ती, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, सुनील खांडबहाले, बिल गेट्स यांच्याबद्दल माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस लांबल्याने कोथिंबीर महागली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्याच्या हंगामात विशेषतः मे महिन्यात पालेभाज्यांची लागवड करणे मुश्किल होते. मात्र, पोयट्याच्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या गाळपेऱ्याच्या जमिनीत सध्या कोथिंबीरीचे लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. पाऊस सुरू झाली की या गाळपेऱ्यातील कोथिंबीर सडून जाण्याचे प्रमाण वाढते. सध्या जिल्हाभरात पाऊस लांबल्याने गाळपेऱ्यातील कोथिंबीरीच नाशिक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. कोथिंबीरीला दरही चांगले मिळत असल्याने पालेभाज्या उत्पादकांच्या हाती चांगला पैसा पडू लागला आहे.

कोथिंबीरीचे संकरित वाण सध्या बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी येत आहे. अशी स्थिती जून आणि जुलैत राहणार असल्याने पालेभाज्यांना या कालावधीत तेजी राहणार असल्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात पालेभाज्यांची लागवड ही गाळपेऱ्याच्या भागात मोठ्या प्रमाणात होते. कळवण, त्र्यंबकेश्वर या भागातील धरणाकाढच्या भागात पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतांमध्ये ही लागवड केली जाते. उन्हाळ्यात येथे पालेभाज्यांचा चांगला बहर येतो. पावसाळा सुरू होऊन धरणांमध्ये पाणी साचू लागले, की येथील पालेभाज्यांचा हंगाम थांबतो. जिल्ह्यातील इतर भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. तसेच द्राक्ष, डाळिंब आदी पिकांखाली क्षेत्रात वाढ झालेली असलेल्या त्यांना सिंचनाच्या सुविधा करण्यात येत असल्याने शेतकरी उन्हाळ्यात पालेभाज्यांची पिके घेत नाहीत.

मुंबईच्या बाजारात मे महिन्यापर्यंत खेड, मंचर, लातूर, पुणे आदी भागातून पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने नाशिकच्या पालेभाज्यांना त्यांची स्पर्धा करावी लागते. या ठिकाणाहून येणाऱ्या पालेभाज्या पाऊस सुरू होताच बंद होतात. त्यामुळे नाशिकच्या पालेभाज्यांना मागणी वाढते. याच कालावधीत गाळपेऱ्यातील पालेभाज्यांची काढणी सुरू होते. त्यांना चांगला दर मिळतो. सध्या बाजार समितीत लिलावासाठी येणाऱ्या पालेभाज्यांमध्ये छानी ही संकरीत कोथिंबीर मोठ्या प्रमाणात येत आहे. गावठी कोथिंबीरीचे प्रमाण कमी आहे. मेथी, शेपू आणि कांदापात यांची आवक खूपच कमी झालेली आहे.

पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी)

कोथिंबीर (गावठी)...............१७ ते ४०

कोथिंबीर (संकरित)...............१५ ते २९

मेथी........................................१८ते ३२

शेपू.........................................२० ते २८

कांदापात................................१५ ते २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटन बांधणीवर आप देणार जोर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा आम आदमी पक्षाची बैठक मुंबई नाका येथे जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली झाली. बैठकीत पुढील काळात मजबूत संघटन बांधणी करून, तसेच दिल्ली सरकारच्या कामाचा प्रभावीपणे प्रचार करून पक्षाचा विस्तार करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी घेतला. याप्रसंगी आपच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांत घरपट्टी दरवाढ आंदोलन, इंदिरानगर बोगद्याचा प्रश्न, सिव्हिल हॉस्पिटल येथील आंदोलन अशा अनेक विषयांवरील प्रभावी कामामुळे सामान्य नागरिकांमध्ये आपविषयी सहानुभूती आणि विश्वास वाढत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

दिल्लीमधील आप सरकारबाबत भाजपच्या केंद्र सरकारची वागणूक आणि भूमिका अन्यायकारक आणि सूडबुद्धीची आहे. भाजप आणि मोदी सरकार लोकशाहीचा खून करत असल्याची भावना भावे यांनी व्यक्त केली. आगामी काळात लोकशाहीमूल्य मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावे, अशी भावना सर्वानुमते व्यक्त केली गेली. आपची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, संघटनात्मनक नियुक्त्याही लवकरच होणार आहेत. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने पारित झाला. सोशल मीडियाबरोबरच अभिनव प्रचारमाध्यमांचा वापर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पक्ष आपली भूमिका आणि कार्यक्रम पोहोचविणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

बैठकीस जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. गंगाधर बुरुंगे आणि अविनाश चौधरी यांनी आपमध्ये प्रवेश करून आगामी काळात पक्ष आणि समाजासाठी निष्ठेने काम करण्याचा संकल्प केला. जगबीरसिंग, नितीन शुक्ल, विकास पाटील, एकनाथ सावळे, कुंतल कापडणीस, गिरीश उगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images