Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रिक्षाचालकांची चंगळ

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत रिक्षाचालकांची मनमानी बघायला मिळाली. अनेकांनी दुप्पट भाडे आकारल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

शहरातील बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. शुक्रवारी सकाळपासूनच अनेक बस स्टॉपवर प्रवाशांची गर्दी बघायला मिळत होती. कित्येक तास वाट बघूनही बस येत नसल्याने प्रवाशांनी रिक्षाने इच्छित ठिकाणी जाण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र, या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी दुप्पट भाडे आकारले. यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. अनेक मार्गांवर रिक्षाचालकांनी मनमानी करीत हवे ते भाडे आकारले. रिक्षात जास्त प्रवासी कोंबत नियम धाब्यावर बसविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. बसचा संप असल्याने नागरिकांची सोय म्हणून रिक्षाचालकांनी सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, दुप्पट भाडे आकारत केलेला संधीसाधूपणा योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नाशिककर प्रवाशांनी व्यक्त केली.

सीबीएसवरुन पवननगर येथे मला यायचे होते. साधारणपणे १५ रुपये भाडे रिक्षाचालक घेतात. आज मात्र २० रुपये घेण्यात आले.

- संगीता सोनवणे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर बससेवा विस्कळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे सिटीबस वाहतूकही विस्कळीत झाली. सकाळी तुरळक प्रमाणात सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले. याअगोदर एसटीने सिटी बसच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यात गुरुवारी या संपामुळे अनेक मार्गावर या बसेस धावल्याच नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडेवाढ करीत प्रवाशांची अडवणूक केली.

संपामुळे दुपारपर्यंत १०८९ फेऱ्यांपैकी फक्त २६६ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. सायंकाळी सातपर्यंत १९८४ फेऱ्यांपैकी ३३८ फेऱ्या झाल्या. त्यानंतरही सिटी बस तुरळक प्रमाणातच सुरू होती. एसटीच्या थांब्यावरही गर्दी ठिकठिकाणी दिसत होती. शहरात ११० सिटी बस सध्या सुरू आहे. त्यापैकी फक्त ३८ बस रस्त्यावर धावत होत्या. कामगार सेनेने या संपात सहभाग घेतला नाही. त्याचप्रमाणे इतर संघटनांचे सदस्यही भीतीपोटी कामावर रुजू झाल्यामुळे काही प्रमाणात सिटी बसचे काम सुरू होते.

बाहेरच्या प्रवाशांचे हाल

बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांचे सिटी बस बंद असल्यामुळे हाल झाले. त्यांना रिक्षांचा आसरा घ्यावा लागला. या प्रवाशांच्या हातातील सामान बघून रिक्षा चालकही जास्त भाडे सांगत त्यांची अडवणूक करीत असल्याच्या घटना घडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी वाहनचालकांची चांदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी या संधीचा फायदा घेत दुप्पट भाडेवाढ केली. सकाळी खासगी वाहतूकदारांना एसटीने बस संप केला हे माहीत नसल्यामुळे त्यांचाही गोंधळ उडाला. प्रवाशांची विचारणा वाढायला लागल्यानंतर त्यांनी भाडेवाढ करीत सेवा उपलब्ध करून दिली. पुणे येथे जाण्यासाठी सर्वाधिक प्रवाशी असल्याचे हेरून ही भाडे टप्प्याटप्प्याने वाढवले जात होते. सकाळी ४०० रुपये असलेले नाशिक पुणे भाडे सायंकाळी ६०० रुपयापर्यंत गेले.

द्वारका, ठक्कर बाजार बस स्टॅण्ड, नाशिक रोड येथे बिटको पॉइंटवर खासगी वाहनांसाठी प्रवाशांची बरीच गर्दी त्यामुळे दिसत होती. राज्य सरकारनेही संपकाळात खासगी बस बरोबरच इतर वाहनांना परवानगी दिली. पण, यात खासगी बसेस व इतर खासगी वाहने जास्त होती. इतर वाहने मात्र दिसत नव्हती. परराज्यांतून आलेल्या बसेसनेही या काळात भाडेवाढ करीत प्रवाशांकडून जास्त पैसे घेतले. गेल्यावेळी संपावर आरटीओने नियंत्रण ठेवण्याचे काम केले होते. पण, अचानक पुकारलेल्या या संपामुळे ही यंत्रणाही फारशी सक्रिय दिसली नाही.

बस स्टँडसमोरच रांग

ठक्कर बाजार बस स्टॅण्ड समोर मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची रांग लागली होती. बस स्थानकात जाऊन प्रवाशी गोळा करण्याचे काम केले जात होते. जोपर्यंत पूर्ण प्रवाशी होत नव्हते, तोपर्यंत खासगी बसेसही सोडल्या जात नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागत होते. या संपामुळे खासगी एजंटची संख्याही बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणत दिसत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूनर्मूल्यांकनासाठी फोटोकॉपी आवश्यक

$
0
0

नाशिक : मार्च २०१८ परीक्षेमधील उत्तरपत्रिकेचे पूनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी असणे अनिवार्य असून फोटोकॉपी मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसात पूनर्मूल्यांकनाची कार्यपद्धती करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - पेंडींग

$
0
0

झेडपी राबविणार पटनोंदणी पंधरवाडा

शाळेत होणार प्रवोशोत्सव सोहळा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, याबाबत नियोजन करण्यासाठी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

१५ जून पासून शैक्षणिक वर्षास सुरुवात होत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांना नियोजन देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी व शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गिते यांनी सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

गटस्तरीय कार्यशाळा

शाळा प्रवेशोत्सव सोहळा व पटनोंदणी पंधरवडा अंतर्गत ११ जूनला गटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पटनोंदणी पंधरवडा व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आयोजनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही याच दिवशी करण्यात येणार आहेत. १२ जूनला जिल्हास्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची पटनोंदणी पंधरवड्यात शाळांना भेटी देण्याचे नियोजन भेट पत्राचे वाटप करण्यासोबतच स्थानिक माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

शाळा प्रवेश दिंडी

१५ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश खरेदीचा आढावा घेण्यात येणार असून, १५ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व गटविकास अधिकाºयांना केल्या आहेत.

शाळेत आणण्यासाठी दवंडी

मुलांना शाळेत आणण्यासाठी देणार दवंडी १३ जून रोजी प्रत्येक शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा होणार आहे. १३ ते १६ जून या कालावधीत गावपातळीवर दवंडी देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा कबड्डीदिनाचे आज पुरस्कार वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड येथील समता क्रीडा मंडळातर्फे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहाव्या कबड्डीदिनाच्या पुरस्कारांचे वितरण आज, शनिवारी (ता. ९) होणार आहे. मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. जिल्ह्यातील कबड्डीच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जयवंत जाधव अध्यक्षस्थानी असतील. भारतीय कबड्डी महासंघाच्या पंच मंडळाचे प्रमुख तथा मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सचिव विश्वास मोरे, राज्य संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, मनमाडच्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, नांदगावचे माजी आमदार संजय पवार, आमदार पंकज भुजबळ, आमदार अपूर्व हिरे, म.वि.प्र. समाज संस्थेचे संचालक दिलीप पाटील, जिल्हा कबड्डी असोशिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड आदी प्रमुख पाहुणे असतील.

बीजिंग येथे ९ जून १९९० रोजी झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले होते. या दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याची माहिती जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी दिली. वाल्मीक बागूल, योगेश पाटील, चेतन सुतार, प्रभाकर कोल्हे, सुभाष बहोत, आनंद चाबूकस्वार, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी आदी सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशियाई स्पर्धेत दुर्गा देवरेला ब्राँझ

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गिफू (जपान) येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या दुर्गा देवरेने पंधराशे मीटर शर्यतीत ब्राँझ मेडल जिंकले. तिने ४ मिनिटे २४ सेकंद ५६ मायक्रो सेकंदांची वेळ नोंदवली. या स्पर्धेत जपानच्या हिरोनाका रीरिका हिने गोल्ड मेडल मिळवताना ४ मिनिटे १७ सेकंद ६२ मायक्रो सेकंदांची वेळ नोंदवली. सिल्व्हर मेडलही जपानच्याच ताकामात्सूने पटकावले. तिने ४:२१:६५ मिनिटांची वेळ नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपविरोधात काँग्रेसचे ‘शह-काटशह’ अभियान

$
0
0

शहरात १० जूनपासून होणार प्रारंभ

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय पडघम वाजू लागले आाहे. सत्ताधारी भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली असून देश, प्रदेश, राज्य, विभाग पातळीवर लोकसंपर्क अभियान राबविले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे या अभियानाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. परंतु, भाजपाच्या या संपर्क अभियानाला प्रत्युत्तरादाखल काँग्रेस कार्यकर्ता जागर समितीच्या वतीने 'शह-काटशह' अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी शहर काँग्रेस अध्यक्ष अॅùड. आकाश छाजेड यांनी दिली आहे. शहरात १० जूनपासून हे अभियान राबविले जाणार आहे.

काँग्रेस कार्यकर्ता जागर समितीच्या या अभियानात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक संस्था यांची भेट घेण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात रविवारी (दि. १० जून) हुतात्मा स्मारक येथे सकाळी १० वाजता ज्येष्ठ स्वातंत्रसैनिकांची भेट घेऊन करण्यात येणार आहे. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅùड. आकाश छाजेड, लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, नगरसेवक राहुल दिवे, जि. प. सदस्या अश्विनी आहेर, नगरसेविका आशा तडवी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील आव्हाड, प्रदेश एनएसयूआय सरचिटणीस नितीन काकड, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गुणवंतराव होळकर, प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्वप्नील पाटील, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, प्रदेश एनएसयूआय सचिव सागर दाते, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन भुजबळ, जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा, जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्षा साधना जाधव, जिल्हा इंटक अध्यक्ष भास्कर गुंजाळ, जिल्हा मजूर फेडरेशनचे शशिकांत आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव रामप्रसाद कातकाडे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव जावेद इब्राहिम आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गीताबाई रंधवेनिफाड : येथील गीताबाई बाबुराव

$
0
0

गीताबाई रंधवे

निफाड : येथील गीताबाई बाबुराव रंधवे (वय ८४) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रंधवे यांच्या त्या आजी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉपची चोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी रोख रुपये आणि लॅपटॉप असा सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना कॉलेजरोडवरील क्रोमा शोरूम परिसरात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थ दीपक चोरडीया (रा. महाराष्ट्र कॉलनी, हिरावाडी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. बुधवारी रात्री चोराडीया कॉलेजरोड भागात गेले होते. पाटील लेन क्रमांक चारमधील स्पेस वायजर या इमारतीसमोर त्यांनी आपली कार (एमएच १५ एफटी ४४२१) पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारचा दरवाजा उघडून चालक आसनाजवळ ठेवलेले रोकड असलेले पाकीट आणि लॅपटॉप असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

दुचाकीस्वारांनी मोबाइल हिसकावला

मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी खेचून नेला. ही घटना ड्रिम कॅसल भागात घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नारायण पाटील (रा. जाधव कॉलनी, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाटील ड्रिम कॅसल भागात गेले होते. कमल स्विट समोरून ते मोबाइलवर बोलत जात असताना स्नॅचिंगची घटना घडली. पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारानी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.

रोकडसह मोबाइलची चोरी

बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी एकाच्या खिशातील रोकडसह मोबाइल असा सुमारे १९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जुने सीबीएस बसस्थानक आवारात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंद दत्तात्रेय खोचे (रा. मधली होळी, तिवंधा चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. खोचे दाम्पत्य गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी निघाले असता ही घटना घडली. दुपारी एक वाजेच्या सुमारास खोचे दाम्पत्य त्र्यंबक बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने मुकुंद खोचे यांच्या नेहरू शर्टच्या खिशातील रोकड व मोबाइल असा सुमारे १९ हजारांचा ऐवज चोरला. अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.

दावा मागे घेण्यासाठी बिल्डरांकडून धमकी

दिवाणी न्यायालयातील दावा मागे घ्यावा, यासाठी पिस्तूलचा धाक दाखवित बिल्डरांनी अपहरण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना टाकळीरोड भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुधीर सुनील बोडके, प्रदीप पंढरीनाथ बोरसे, नेमिचंद ललिताप्रसाद पोद्दार आणि विपूल नेमिचंद पोद्दार अशी संशयित बिल्डरांची नावे आहेत. या प्रकरणी अकबर इस्माईल शेख (रा. हरिकुंज सोसायटी, टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांच्या तक्रारीनुसार, रामदास स्वामी नगरसह वेळोवेळी विविध ठिकाणी संशयितांनी अडवून पिस्तूलचा धाक दाखवित धमकी दिली. देवळाली गाव सर्व्हे नं. ७-१३ अ या मिळकतीमधील ६६ आर जमिनीचा दिवानी न्यायालयात सन २००८ पासून दावा दाखल आहे. हा दावा मागे घेण्यासाठी संशयितांनी कुटुंबीयासह अपहरण करून तुला गायब करून टाकू, अशी धमकी दिली. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

पैशांच्या वादातून एकास भोसकले

हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लागलीच संशयितास अटक केली.

दीपक उर्फ टिल्या विष्णू कुमावत (वय २२, रा. आयोध्यानगर, पिंगळपट्टीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रोहित मोहन जाधव (रा. महालक्ष्मीनगर, दसक) या फिर्यादीच्या तक्रारीनुसार, जाधव आणि कुमावत एकमेकांचे मित्र आहेत. गुरुवारी सायंकाळी रोहित जाधव परिसरातील विठाबाई टपरीवर उभा असताना टिल्या कुमावत तेथे आला. यावेळी जाधवने हातउसनवार दिलेल्या तीन हजार रुपयांची मागणी केली. यानंतर जाधव आपल्या घराकडे निघाला असता पैसे मागितल्याने संतप्त झालेल्या कुमावतने पाठीमागून त्याच्यावर थेट चाकूनेच हल्ला चढवला. यात जाधव जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

इंगळेनगरला आठ जुगारींवर कारवाई

जेलरोड परिसरातील इंगळेनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ उघड्यावर जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी उत्तम पगारे व त्याचे सात साथीदार उघड्यावर कल्याण नावाचा मटका खेळतांना सापडले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडवरील फुलेनगर येथील विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांची धावपळ उडाली असतानाच स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी एकनाथ बेंडकुळे (वय १६, रा. फुलेनगर पोलिस चौकीमागे, पेठरोड) ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. मात्र, तिला फक्त ५६ टक्केच गुण मिळाले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. साक्षीचे वडील हमालीचे काम करतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार आर. आर. साळवे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाद्वारे राज्यस्तरीय विज्ञान परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी विज्ञान परिषदेतर्फे सातवी ते नववीच्‍या विद्यार्थ्‍यांकरिता राज्यस्तरीय विज्ञान परीक्षा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचे वैशिष्‍टय म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम पोस्टाने पाठवला जातो व अभ्यासक्रमात दिलेले प्रयोग, प्रकल्प घरीच करून, संदर्भ शोधून उत्तरपत्रिका विद्यार्थ्‍यांना पुरेशा मुदतीत सोडवायची असते. तसेच परीक्षेत गुणानुक्रमे १ हजार, आठशे, आणि सहाशे अशी तीन पारितोषिके देण्‍यात येतात. ही परीक्षा मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात येत असल्याने राज्‍यभरातील विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क विश्‍वनाथ म्‍हाप्रळकर, दूरध्वनी (०२२) २४०५ ४७१४/ २४०५ ७२६८. या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेलवरील करमाफीने एसटीच्या भाडेवाढीस ‘ब्रेक’

$
0
0

गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणारे डिझेलचे दर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे आर्थिक बोजा वाढल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एस. टी. महामंडळाच्या या निर्णयाचा फटका शहरीपेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांना जास्त बसणार आहे. अगोदर महागाईने होरपळून निघालेल्या गरीब जनतेच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. वाढते इंधन दर आणि कर्मचाऱ्यांची वेतन वाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. तो खर्च प्रवाशांकडून वसूल करण्यासाठी करण्यात येणारी ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. राज्य शासनाने डिझेलवरील कर माफ केल्यास ही दरवाढ कमी होणार आहे. त्यामुळे कर माफ केल्यास एसटी महामंडळाला भाडेवाढ रोखणे शक्य होईल, असे मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

प्रवाशांवर भाडेवाढ लादू नये

एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणे गरजेचे आहे. हा पगारवाढीचा खर्च प्रशासकीय खर्च आणि देखभाल-दुरुस्ती यांच्यावरील खर्च नियंत्रित करून भरून काढावा. डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यावरील कर माफ करायला हवेत. एसटीच्या फेऱ्या सुनियोजित केल्यास इंधन दरवाढीलादेखील सामोरे जाता येऊ शकते. त्यासाठी प्रवाशांवर भाडेवाढ लादण्याची गरज नाही.

-राहुल पवार

गरिबांवर ठरेल अन्यायकारक

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कर कमी केला जावा. आधीच किमती जास्त असल्याने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. ग्रामीण, तसेच शहरी भागातील गरीब जनतेला एसटीनेच प्रवास करावा लागतो. एकदमच १८ टक्के भाडेवाढ ही सर्वसामान्य गरीब जनतेवर अन्याय करणारी आहे.

-चिंतामण उगलमुगले

प्रशासकीय खर्च करावा कमी

एसटीची भाडेवाढ ही सामान्य गरीब जनतेची पिळवणूक आहे. राज्य सरकारने याप्रश्नी त्वरित लक्ष घालून डिझेलवरील कर माफ करावेत. गरीब जनतेची गैरसोय आणि लूट थांबविण्यासाठी सकारात्मक उपाय योजले पाहिजेत. अशा प्रकारची भाडेवाढ करून गरीब प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार घडत आहे. प्रशासकीय खर्च कमी केल्यास भाडेवाढ करण्याची गरज भासणार नाही.

-डॉ. श्याम थविल

ग्रामीण प्रवाशांचे नुकसान

राज्य सरकारने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ही करमाफी झाल्यास सर्वसामान्य जनतेची भाडेवाढीच्या त्रासातून मुक्तता होईल. या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसणार आहे. अगोदरच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बेरोजगारी आणि महागाईने ग्रामीण भागातील जनता पिचली आहे.

-रमा मिश्रा

सर्वच घटकांचा व्हावा विचार

डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, एसटीच्या कामगारांची वेतनवाढ करावी लागत आहे, अशी कारणे देत एसटी महामंडळाने बसच्या तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हा निर्णय घेताना एसटीने प्रवास करणारा वर्ग कोणता आहे याचा विचार केलेला नाही. गरिबांनाच या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही भाडेवाढ रोखली पाहिजे.

-सुनील परदेशी

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालपरी संपावर; प्रवाशी वाऱ्यावर

$
0
0

संपकाळात ४६४७ पैकी १०३६ फेऱ्या पूर्ण; जिल्ह्यात अवैध वाहतूक सुसाट

टीम मटा

एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेल्या अघोषित संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारावर नाराजी व्यक्त करीत गुरुवारी मध्यरात्रीपासून हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. दुपारनंतरही काही ठिकाणी बस सुरू होत्या. पण, त्याचे प्रमाण कमी होते. सायंकाळी सातपर्यंत जिल्ह्यात ४६४७ फेऱ्यापैकी १०३६ पूर्ण झाल्या होत्या. संपामुळे जिल्ह्यातील १३ आगाराताली बस स्थानकात २५ टक्केच बसेस रस्त्यावर धावल्या. दुपारपर्यंत २३८३ फेऱ्यापैकी १८२२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर ५६१ फेऱ्या या संपकाळात एसटीने पूर्ण केल्या.

00

सटाण्यातून पोलिस बंदोबस्त

सटाणा : एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे संप पुकरल्याने शुक्रवारी दिवसभर सटाणा आगरातून एकही बस बाहेर पडली नाही. तसेच बाहेरुनही एकही बस आली नाही. परिणामी सटाणा शहर त तालुकातील अनेक प्रवाशी यामुळे ताटकळत राहिले. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली. तर काही प्रवाशी बस सुरू होतील या आशेवर दिवसभर बस स्थानकात थांबून होते. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

000

भाविकांचे हाल

त्र्यंबकेश्वर : बस संपाचा भाविक यात्रेकरूंना फटका बसला. अधिकमासाच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील प्रवासी वाहतूक वाढलेली आहे. त्र्यंबक स्थानकात दिवसभरात जवळपास ३५० बस ये-जा करीत असतात. शुक्रवारी मात्र एकही बस बसस्थानकात आली नाही. मुक्कामी असलेल्या बस नियमीत वेळेत सोडण्यात आल्या. जव्हार, पालघर आदी ठिकाणाहून येणाऱ्या बस नाशिककडे रवाना करण्यात आल्या. जव्हारमार्गे येणाऱ्या बसेसमुळे काही प्रमाणात प्रवाशांची सोय झाली. मात्र ग्रामीण भागासह नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांचे या संपामुळे हाल झाले. बहुसंख्य प्रवाशी दिवसभर बसची वाट पाहत बसले होते. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी त्र्यंबक-नाशिकसाठी तब्बल १०० रुपये भाडे आकारले. बहुतांश परप्रांतीय भाविक थेट नाशिकरोड स्टेशनपर्यंत स्पेशल वाहन करीत होते.

000

निफाड : एसटी संपाचा फटका निफाड येथील प्रवाशांनाही बसला. निफाड बसस्थानकातून दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या जवळपास काही बस बंद होत्या, असे निफाड येथील कंट्रोलर व्ही. एन. गावित यांनी सांगितले. निफाड येथून पिंपळगाव, येवला, औरंगाबाद, नाशिक मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. त्यातच शुक्रवार निफाडचा आठवडे बाजार असल्याने ही गर्दी वाढली होती. मात्र सकाळी सात वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक मार्गावर धावणाऱ्या १२ बसेसपैकी अवघ्या ५ बस धावल्या. तर औरंगाबाद मार्गावर धावणाऱ्या १२ बसपैकी अवघ्या ६ बस धावल्या. निफाड-पिंपळगाव या मार्गावर दर एक तासाला धावणाऱ्या बसेसपैकी सकाळपासून फक्त चार बस आल्याचे कंट्रोलर यांनी सांगितले. लासलगाव डेपोतून नाशिकसाठी येणाऱ्या बस कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बंद होत्या. बस फेऱ्या कमी झाल्याने दोन तीन तासाने येणाऱ्या बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशी धावपळ व गर्दी करीत होते. तर खासगी वाहनाने काही प्रवाशी प्रवास करताना दिसत होते.

00

लासलगाव डेपोचे २०० कर्मचारी संपावर

निफाड : लासलगाव बुक डेपोतील २२४ कर्मचाऱ्यांपैकी २०० कर्मचारी संपात सहभागी झाल्याने लासलगाव डेपोतून एकही बस बाहेर पडू शकली नाही. लासलगाव बस डेपोतून रोज ५० बस बाहेर पडतात. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत १० बस बाहेर पडल्या. त्यानंतर मात्र एकही बस बाहेर पडली नाही. लासलगाव डेपोत वर्कशॉप व चालक, वाहक व इतर असे २२४ कर्मचारी आहेत. त्यापैकी फक्त २४ कर्मचारी हजर होते. उर्वरित २०० कर्मचारी कामावरच न आल्याने लासलगाव डेपोतून बाहेर जाणाऱ्या ५० बस बाहेर गेल्या नाहीत. त्यामुळे लासलगाव डेपोचे साडेचार लाख रुपये उत्पन्न बुडाल्याचे डेपो मॅनेजर पी. बी. पद्मने यांनी सांगितले.

00000

मालेगावातून दीडशेहून अधिक फेऱ्या रद्द

मालेगाव : पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी गुरुवार मध्यरात्रीपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपाचा फटका मालेगावातील प्रवाशांना बसला. दिवसभरात दीडशेहून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे मालेगाव आगारास चार लाखांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख किरण धनवटे यांनी 'मटा'ला दिली.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेली अल्प पगारवाढ हेच या संपमागील प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळीपासून या संपाचा परिणाम येथील बसस्थानकात पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात केवळ शिवसेना प्रणीत कामगार सेनेचे कर्मचाऱ्यांनी विनावाहक ३८ फेऱ्या रवाना केल्या. त्यानंतर मात्र दुपारपर्यंत बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. अचानक झालेल्या या संपामुळे मात्र प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

अनेकांना तर बस का ये-जा करीत नाही याची कल्पना नसल्याने बराच वेळ बसस्थानकात ताटकळत बसावे लागले. त्यामुळे सकाळी प्रवाशांची गर्दी झाली होती. अखेर संपाची माहिती मिळताच प्रवाशांनी बसस्थानकातून काढता पाय घेत खासगी वाहनाचा पर्याय निवडला. कामगारांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे धनवटे यांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत संप कायम असल्याने स्थिती जैसे थे होती. बसस्थानकात मात्र शुकशुकाट पसरला होता.

000

सिन्नरला समिश्र प्रतिसाद

सिन्नर : बसस्थानकात आज बसच्या संपास संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सिन्नर तालुक्यातील गामीण भागातील बस सुरळीत सुरू असल्याने नागरिकांना त्रास जाणवला नाही. तसेच नाशिक येथे जाणाऱ्या गाड्या दुपारच्या सुमारास कमी झाल्याने प्रवाशांना बसची वाट बघत स्थानकावर बसावे लागले. पण लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी बाहेरुन येणाऱ्या गाड्या बंद असल्याने बाहेरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला कांदा

$
0
0

राष्ट्रवादीकडून निफाडशहरात रास्ता रोको आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली निफाड येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे सुमारे एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

सध्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता शांतीनगर चौफुली येथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरी जमा झाले. लिलावासाठी आणलेले कांदे रस्त्यावर ओतले नाशिक व येवला मार्गावर कांद्याचे ट्रॅक्टर, बैलगाडी आडवी लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपला हिंदूंचे राज्य आणून जातीयवाद जन्माला घालायचा असल्याचा आरोप करून आमच्या सरकारच्या काळात उसाला २३०० रुपये भाव होता तो आज १६०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर केले. यावेळी लासलगाव बाजार समिती संचालक सुभाष कराड, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, भीमराज काळे यांनीही आपल्या मनोगतातून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचा शेतकरी विरोधी प्रतिक्रियावर कारवाई करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, डिझेलवर अनुदान मिळावे, बिबट्यांचा बंदोबस्त करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतीमालाला उत्पादनावर आधारित हमी भाव मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात राजेंद्र बोरगुडे, नगरसेवक देवदत्त कापसे, वाल्मिक कापसे, बापूसाहेब कुंदे, जाणकीराम धारराव, नंदू कापसे, कृष्णा नागरे सहभागी झाले होते.

निफाडच्या आठवडे बाजारावर परिणाम

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निफाडचा आठवडेबाजार दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र निफाडचा आठवडे बाजारावर या आंदोलनाचा परिणाम झाला. बाजारासाठी येणारे व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांनी बंद असल्याच्या चर्चेमुळे बाजाराला न येणे पसंत केले. परिणामी तालुक्याचा आठवडे बाजार असलेल्या कालच्या बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाले. शिवाय बाजारहाट करणारे व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. दुपारनंतर थोड्या प्रमाणात बाजार भरला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याने गोठ्यातच फस्त केले वासरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पांढुर्ली येथून जवळच असलेल्या विंचूरदळवी गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करावा, अशी मागणी दळवी वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. विंचूरदळवी शिवारातील दळवी वस्तीवरील केशव निवृत्ती दळवी हे रोजच्या प्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरात झोपले असता शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात ते वासरू ठार झाले. वासराच्या गळ्यातील दोर न तुटल्याने बिट्याने वासरू गोठ्यातच फस्त केले. त्यानंतर वस्ती शेजारी असलेल्या मक्याच्या शेतात गुडूप झाला. पहाटे सहाच्या सुमारास केशव दळवी हे गाईला चारा टाकण्यासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सिन्नर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे व पांढुर्ली विभागाचे पशुधन अधिकारी डॉ. विश्वास वल्टे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून शवविच्छेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्राची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्रावर धुळ्यात शुक्रवारी सायंकाळी जिवघेणा हल्ला करण्यात आला़ या हल्ल्यात पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना वडिलांचाही मृत्यू झाला. हल्लेखोरांनी तलवार, चॉपरसह धारदार शस्त्रांचा वापर केला़ या हल्ल्यात आणखी एक जण जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धुळे शहरातील वानखेडकरनगर परिसरात शुक्रवारसायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण असून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रावसाहेब दगाजी पाटील (वय ५५) आणि त्यांचा पुत्र वैभव पाटील (वय २२) हे त्यांच्या वानखेडकरनगरातील घराकडे येत असताना अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला़ वैभव या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ तर त्याचे वडील रावसाहेब पाटील यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास रावसाहेब पाटील यांचाही मृत्यू झाला़ रावसाहेब पाटील यांच्यासमवेत असलेला आकाश राजेंद्र पाटील (वय १४) हादेखील जखमी झाला आहे़ त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे़ ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे़ पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते़ वैभवचे गेल्या महिन्यात ८ मे २०१८ रोजी लग्न झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे संप चौकट

$
0
0

धुळे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत संप पुकारला. काँग्रेसप्रणीत इंटक संघटना आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेने या संपात भाग घेतला. यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक एसटी बंद झाल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. एकीकडे हा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. तर विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी सकाळपासूनच धुळे आगारात ठाण मांडून होत्या. संपामुळे महामंडळाच्या धुळे विभागातील नऊ आगाराचे ६० लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सुधारीत वेतनवाढ या प्रमुख मागणीसह, पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी, एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जोपर्यंत वेतनाबाबत सुधारित करार होत नाहीत तोपर्यंत २५ टक्के हंगामी पगारवाढ दिली जावी, अशा विविध मागण्यांसाठी काल रात्रीपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. शिरपूर आणि शिंदखेडा आगार पूर्णपणे बंद होते. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा, साक्री, अक्कलकुवा यासह ९ आगारमधील तुरळक फेऱ्या सुरू होत्या. धुळे आगाराच्या १६० फेऱ्यांपैकी सुमारे १०० फेऱ्या पूर्ण झाल्याची तर नवापूर आगारातील १०० टक्के सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे निकाल

$
0
0

धुळे जिल्ह्याच्या निकालात घसरण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८७.५१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सात हजार ९५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. दरम्यान मागील तीन वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात दोन ते अडीच टक्क्यांनी घसरण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ६३ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. जिल्ह्यातून २९ हजार ९८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यात १६ हजार ६७३ मुले व १२ हजार ४२५ मुलींची संख्या होती. एकूण प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.५१ एवढी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १४ हजार २५७ मुले आणि ११ हजार २०६ मुली आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात या वर्षी घसरण झाली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यातुन २८ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ९१.३६ एवढी होती. तर २०१६ मध्ये २५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांची टक्केवारी ९०.३६ एवढी होती. २०१७ मध्ये २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८९. ७९ होती. तर यावर्षी म्हणजेच मार्च २०१८ मध्ये दहावीच्या निकालाची टक्केवारीत घसरण झालेली आहे. यंदा २० कॉपी बहाद्दरांवर मंडळ शिक्षासुचीनुसार कारवाई करण्यात आली.

सात हजार विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत

दहावीच्या निकालात जिल्ह्यातून सात हजार ९५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत आहेत. तर ११ हजार ९९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, सहा हजार ४७० विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७९९ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत. असे २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचा बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रस्त्याच्या कामासाठी मेहेर सिग्नल ते सीबीएस हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे सीबीएस चौकात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सीबीएस ते मेहेर चौक या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली, तरी अनेकांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अनवधानाने विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांसमोर अन्य वाहने उभी ठाकत असल्याने येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

मेहेर सिग्नल ते सीबीएस या रस्त्याचे रुपांतर स्मार्ट रस्त्यामध्ये करण्यात येणार असून, या रस्त्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळता यावी याकरिता सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गाने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. परंतु, या मार्गावरील एकूणच वाहनांची वर्दळ लक्षात घेता एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतुकीचा निर्णय नागरिकांसाठी तापदायक ठरू लागला आहे.

सीबीएस बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक अशी महत्त्वाची ठिकाणे याच मार्गावर असल्याने दिवसभर येथे हजारो नागरिकांची वर्दळ असते. बहुतांश नागरिक स्वत:ची वाहने घेऊन येत असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. शरणपूररोडवरून जिल्हा न्यायालयाकडे जाताना वाहनचालक नेहमीच्या सवयीप्रमाणे वळतात. त्यामुळे ते विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांसमोर उभे ठाकत असल्याचे पाहावयास मिळते. परिणामी येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. सीबीएस बसस्थानकामध्ये शिरणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस, याच मार्गाने धावणाऱ्या शहर बस यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये भरच पडत आहे.

पोलिसांची हतबलता

सीबीएस ते मेहेर सिग्नल मार्गावर एक बस आली, तरी मागील पूर्ण वाहतूक ठप्प होते. सीबीएस चौकात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवला जात असला, तरी वाहनांची वर्दळ आणि अरुंद रस्ता यामुळे त्यांच्याकडूनही हतबलता व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील वाहतुकीचे नियोजन फिसकटले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

---

लीड, निष्पक्षचा लोगो वापरणे. (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images