Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोठ्याला आग; दोन जनावरांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील वाढोली येथील शेतकरी दशरथ राधाकृष्ण ठाणगे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे या गोठ्याला आग लागली. या आगीत दोन जनावरांचा मृत्यू झाला. सोबत १० ट्रॅक्टर गवत व शेणखत जळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तलाठी संतोष जोशी, संजय पाटील, एस. बी. बोंद्रे यांनी पंचनामा केला.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे बंबाची मागणी केली असता मुख्याधिकाऱ्यांनी ही गाडी जागेवरून हलवायची नाही, असे बजावले असल्याचा खुलासा संबंधित कर्मचाऱ्याने केला. नगरपालिकेकडे अग्निशमन बंब आहे परंतु फायरब्रिगेडसाठी आस्थापना येथे नाही. वाहनचालकही नाही. त्यामुळे हा बंब केवळ शेभेची वस्तू ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला चोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील शिक्षकाने आठवीतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असून, संतप्त नागरिकांनी शिक्षकाला चोप दिला. यानंतर शिक्षकाविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील सुनील कदम या शिक्षकाने शाळेतील आठवीतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून 'आय लव्ह यू म्हणून तूपण मला आय लव्ह यू म्हण' अशी गळ घातली. विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही दिवसांपूर्वी कदम या विद्यार्थिनीच्या घराजवळसुद्धा गेल्याचे समजते. यामुळे ती घाबरली. त्यातच सुनीलने या विद्यार्थिनीला हा प्रकार कोणाला सांगितला तर बघ म्हणून दमसुद्धा दिला. या भीतीपोटी विद्यार्थिनीने शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला. पालक या तिला शाळेस जाण्यास सांगत असतानाही ही जातच नसल्याने पालकांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी थेट शाळेतच जाऊन शिक्षकाला चोप देऊन जाब विचारला. इंदिरानगर पोलिसांना याबाबतची माहिती देऊन सुनीलविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर कदम फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान कदम याच्या विरोधात यापूर्वीही काही तक्रारी असल्याची चर्चा पालकांमध्ये होती. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित शिक्षक निलंबित

शाळेत शुक्रवारी उघडकीस आलेल्या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाला काहीही माहीत नव्हते. संबंधित मुलीच्या पालकांनी शिक्षकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची दखल घेत आज आम्ही संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणा, मालेगाव बाजार समितीकडून नोटिशीला ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी मनमाड, येवला, मालेगाव, उमराणे बाजार समितीला जिल्हा उपनिबधकांनी नोटिसा बजावल्या आहेत. परंतु उमराणा आणि मालेगाव बाजार समितीने या नोटिसांना ठेंगा दाखविला असून, त्यांना ११ जूनपर्यंत मुदत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समित्यांमध्ये २० व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे पाच कोटी रुपये थकविले आहेत. चौदाशेहून अधिक शेतकऱ्यांची पाच कोटी रुपयांची देणी न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात जिल्हा उपनिबंधकांनी पाच बाजारसमित्यांना बरखास्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील देवळा, मनमाड, येवला, मालेगाव, आणि उमराणे बाजारसमित्यांचा त्यामध्ये समावेश आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर येवला व देवळा बाजार समितीने शेतकऱ्यांचे थकित पैसे परत केले. तर मनमाड बाजार समिती संचालकांनी स्वतः अनामत रक्कम भरून शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. उमराणे आणि मालेगाव बाजार समित्यांनी मात्र अद्याप या नोटीसला अनुसरून कार्यवाही केलेली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा बाजार समिती बरखास्तीची कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलात खांदेपालट

$
0
0

२० पोलिस निरीक्षकांसह ३४ अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांसह (पीआय) ३४ एपीआय आणि पीएसआर यांची बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरूवारी रात्री याबाबत आदेश काढले. या बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती आणि कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असला तरी काहींना दिरंगाई केल्याचा फटका बसला आहे.

अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे पंचवटीची धुरा देण्यात आली असून, पंचवटीचे दिनेश बर्डेकर यांच्याकडे शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या बदल्यांकडे पोलिस दलाचे लक्ष लागले होते. ३१ मे पर्यंत बदल्याबाबत अंतिम निर्णय बंधनकारक असल्याने मागील काही दिवसांपासून याबाबत बैठका पार पडल्या. यातील बहुतांश बदल्या प्रशासकीय तसेच विनंतीनुसार असल्या तरी काही पोलिस निरीक्षकांबाबत येणाऱ्या तक्रारींमुळे बदलीस सामोरे जावे लागले.

१७ जणांच्या अंतर्गत बदल्या

आयुक्तालयातील ३४ एपीआय आणि पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरूवारी करण्यात आल्या. त्यात म्हसरूळचे वाल्मीक शार्दुल यांची पंचवटी, संजय बेडवाल यांची वाहतूक शाखा, भद्रकालीच्या मोहिनी लोखंडे यांची नियंत्रण कक्षात, मुंबई नाक्याचे केतन राठोड यांची विशेष शाखा, मनीषा घोडके यांची अंबड, मनोज शिंदे यांची भद्रकाली, नितीन कंडारे यांची गंगापूर, वाहतूक शाखेचे सुरेश भाले यांची सातपूर, गुन्हे शाखेचे दीपक गिरमे व नागेश मोहिते यांची पंचवटी, सातपूरचे योगेश देवरे यांची नियंत्रण कक्ष, वीज वितरणचे अभिजीत सोनवणे यांची युनिट दोन, पंचवटीचे महेश कुलकर्णी यांची युनिट एक, सायबरचे अतुल डहाके यांची बीडीडीएस, आडगावचे अशोक महिरे यांची नियंत्रण कक्ष उपनगरचे सदाशिव भडीकर यांची म्हसरूळ अंबडच्या पुष्पा निमसे यांची युनिट एकला बदली करण्यात आली आहे. वरील सहाय्यकांसह १७ उपनिरीक्षकांच्याही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलिस निरीक्षक-सध्या कार्यरत- बदलीचे ठिकाण

नम्रता देसाई-वाहतूक शाखा-तांत्रिक विश्लेषण विभाग

विजय पन्हाळे- आर्थिक गुन्हे- पोलिस मुख्यालय, प्रशासन

किशोर मोरे- विशेष शाखा- गंगापूर पोलिस स्टेशन

सोमनाथ तांबे- दहशतवादविरोधी विभाग- अंबड

मधुकर कड-अंबड पोलिस स्टेशन- पंचवटी पोलिस स्टेशन

गुरूनाथ नायडू- वाहतूक शाखा- नियंत्रण कक्ष

दिनेश बर्डेकर- पंचवटी पोलिस स्टेशन- क्राइम युनिट दोन

राजेश आखाडे- सातपूर पोलिस स्टेशन- दहशतवादविरोधी विभाग

सिताराम कोल्हे- नियत्रंण कक्ष- विशेष शाखा

सुरज बिजली-नाशिकरोड-आडगाव

सुरेंद्र सोनवणे- मुंबईनाका-वाहतूक विभाग

अनिल पवार- महिला सुरक्षा विभाग- देवळाली कॅम्प

सुभाष डौले- देवळाली कॅम्प- महिला सुरक्षा विभाग

के. डी. पाटील- गंगापूर पोलिस स्टेशन- नियंत्रण कक्ष

नीलेश माईनकर- युनिट दोन- दंगल नियंत्रण पथक

सुनील पुजारी- आडगाव- आर्थिक गुन्हे शाखा

सुनिल नंदवाळकर- मुंबईनाका पोलिस स्टेशन- आर्थिक गुन्हे शाखा

मनोज कंरजे- दंगल नियंत्रण पथक- मुंबई नाका

कमलाकर जाधव- भद्रकाली पोलिस स्टेशन- सायबर पोलिस स्टेशन

राजेंद्र कुटे- तांत्रिक विश्लेषण विभाग- सातपूर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराच्या नोटांची छपाई बंद

$
0
0

नाशिकरोड प्रेसमध्ये पाचशेच्या नोटांचे उत्पादन तिप्पट

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकरोड नोट प्रेसमध्ये (सीएनपी) पाचशेच्या नोटांचे उत्पादन तिपटीने वाढविण्याची ऑर्डर रिझर्व्ह बँकेने दिली आहे. या प्रेसमध्ये शंभराच्या नोटेची छपाई अनेक वर्षांपासून होत होती. 'आरबीआय'ने शंभराच्या नोटेच्या छपाईची जबाबदारी या प्रेसकडून काढून घेतल्याची माहिती प्रेसच्या सूत्रांनी दिली. नोटांचे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने आता प्रेसमध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे दिवसाला १७ दशलक्ष नोटांचे उत्पादन सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरबीआय'ने काही दिवसांपूर्वीच सीएनपीला शंभराच्या नोटांची छपाई थांबविण्यास सांगितले. त्याचवेळी पाचशेच्या नोटांची छपाई तिपटीने वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकरोड प्रेसला चालू आर्थिक वर्षात पाचशेच्या एक हजार दशलक्ष नोटा छापण्याचे निर्देश दिले होते. आता हे लक्ष्य तिप्पट म्हणजे तीन हजार दशलक्ष करण्यात आले आहे.

'आरबीआय'ने अलिकडे स्वतःचे म्हैसूर (कर्नाटक) आणि सालगोणी (पश्चिम बंगाल) येथे नोट कारखाने सुरू केले आहेत. त्यामध्ये आधुनिक मशिनरी लावलेली आहे. तेथेही नोटांची छपाई होते. प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड आणि देवास (मध्य प्रदेश) येथे नोट प्रेस आहेत. नाशिकरोड प्रेस एवजी देवास प्रेसला आता शंभराच्या तसेच दोनशेच्या नोटांची छपाई करण्यास 'आरबीआय'ने सांगितले आहे.

सरकारी निर्णयातील दिरंगाईमुळे नोटांची टंचाई जाणवतच असते. उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, 'आरबीआय'ने काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे. नोटा बँकेतून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भरणा तेवढा होत नाही.

'त्या' ऑर्डरचे काय?

नाशिकरोड नोट प्रेसला या आर्थिक वर्षात शंभराच्या तब्बल दोन हजार दशलक्ष नोटा छापण्याचे निर्देश 'आरबीआय'ने दिले होते. तसे पत्र प्रेसला मिळालेही होते. तयारीही झाली होती. तथापी, एक एप्रिलपासून शंभर आणि वीसच्या नोटांची छपाईच बंद पडलेली आहे. या नोटा नव्या स्वरुपात येणार आहेत. मात्र, अर्थमंत्रालयाच्या दिरंगाईमुळे या नोटांचे नवीन डिझाईन प्राप्त झाले नाही. त्यामुळे गेल्या एक एप्रिलपासून या दोन्ही नोटांची छपाई ठप्प आहे. त्याऐवजी पाचशेच्या नोटा छापण्याचे आदेश 'आरबीआय'ने नाशिकरोड प्रेसला दिले आहेत.

नाशिकरोड प्रेसमध्ये शंभराच्या नोटांची छपाई थांबली आहे. त्याऐवजी 'आरबीआय'ने या प्रेसला पाचशेच्या नोटांची छपाई जास्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून प्रेसमध्ये आता पूर्ण क्षमतेने नोंटांचे उत्पादन सुरू आहे. कामगारांसह सर्वांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी परताव्यावर खास शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयातर्फे जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी भरलेल्या कररूपी रकमेच्या परताव्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यासाठी नाशिक येथील जीएसटी कार्यालयातर्फे ३१ मे ते १४ जून या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांसाठी जीएसटी परताव्यासाठी खास शिबिर होणार आहे.

व्यापाऱ्यांनी भरलेल्या रकमेच्या परताव्यासाठी अनेकदा फेऱ्या माराव्या लागत होत्या. करपरतावा कधी मिळेल, याचे ठोस उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे यात सुसूत्रता यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदनही दिले होते. त्याचा परिणाम म्हणून जीएसटी आयुक्तांनी १४ जूनपर्यंत विशेष शिबिर आयोजित केले आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी सिडकोतील कमिशनर ऑफ सीजीएसटी कार्यालयात शिबिर होणार असून, त्यासाठी अमोल केत, विवेकानंद जाधवार व श्वेता पचौरी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी २३९९९५३, ५४, ४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर येथील व्यापाऱ्यांसाठी किसान क्रांती बिल्डिंग मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहमदनगर येथे शिबिर होईल. या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून गिरीश वडसेरी यांची नेमणूक करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी ०२४१-२४५०१८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. धुळे विभागासाठी सीजीएसटी कार्यालय, पहिला मजला, प्लॉट नं १९, स्वामी दयानंद हौसिंग, सिंचन भवनामागे, साक्री रोड, धुळे येथे शिबिर होणार आहे. येथे संजय दवे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, माहितीसाठी ०२५६२-२७६३६५ या क्रमांक दिला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी सीजीएसटी कार्यालय, डॉ. बेंद्रे टॉवर, इच्छादेवी चौक, जळगाव येथे शिबिर होणार असून, त्यासाठी सी. पी. सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७- २२२५४९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तपदी सुरेखा पाटील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला बाल कल्याण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार महिला व बाल कल्याण अधिकारी सुरेखा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. उपायुक्त बी. टी. पोखरकर सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांनी शुक्रवारपासून कामकाज पाहण्यास सुरुवात केली.

महिला व बाल कल्याण विभागाचे आयुक्तालय पुणे येथे असून, नाशिकमध्ये पाच जिल्ह्यांसाठी उपायुक्त काम पाहतात. काही वर्षांपासून पोखरकर हे काम पाहत होते. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्या योजना तसेच त्याअनुषंगाने असलेले कायदे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोखरकर यांच्यासह पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची पगारवाढ तुटपुंजीच

$
0
0

विविध संघटनांनी नोंदविला आक्षेप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्ताचे औचित्य साधत पगारवाढीची घोषणा केली असली तरी त्यावर विविध संघटनाच्या विरोधी प्रतिक्रिया उमटत आहे. या निर्णयाविरुद्ध पुन्हा संघर्ष करण्याची तयारी या संघटनांनी सुरू केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाने एकतर्फी घोषित केलेली पगारवाढ तुटपुंजी आहे. या विरोधात सर्वांशी संपर्क करून संप पुकारून संघर्ष करू, असेही इंटक नेते जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. कोणतेही सूत्र न वापरता ही पगारवाढ करण्यात आली आहे. कराराला दोन वर्षे उशीर झालेला असताना त्यातून चांगले अपेक्षित होते. पण, त्यातून कामगारांच्या हाती काहीच लागलेले नाही. कामगारांचे विविध थकबाकीच्या रक्कमाही उल्लेख नाही. तसेच महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटीला खासगीकरणाकडे नेत आहे. त्याला विरोध होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

भत्त्यात व कनिष्ठांना सुद्धा वाटाघाटीत मान्य केल्याप्रमाने लाभ दिलेला दिसून येत नाही. या प्रस्तावाने कामगार समाधानी होईल, असे वाटत नाही. प्रथमच अशा प्रकारची एकतर्फी घोषणा करून कामगारांवर स्वीकृतीपत्रके भरण्याबाबत सुचविण्यात आले आहे. ज्यांना हा प्रस्ताव मान्य नाही त्यांनी नोकरी सोडून कंत्राटी पद्धतीने नोकरी स्वीकारण्याची सुवर्णसंधीच्या नावाखाली धमकीही दिली आहे. अगोदरच वेतनवाढीने त्रस्त झालेल्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे नेते स्वप्नील गडकरी यांनी केला आहे. महामंडळाकडून सुस्पष्ट प्रस्ताव घेऊन राज्य कार्यकारीणीची बैठक घेऊन संघटना यावर अंतिम निर्णय घेईल; मात्र संमतीपत्र जबरदस्तीने भरून घेण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेक होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

वेतनवाढीत गोलमाल

एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते एकतर्फी वेतनवाढीच्या घोषणा करून गोलमाल केले आहे. कामगार संघटनेचा प्रस्ताव ३१ मार्च २०१६ चे मूळ वेतन + ३५०० x २.५७ असा होता व आहे. मात्र, आताच्या विनास्वाक्षरीच्या प्रसिद्धीपत्रकात फक्त २.५७ चे सूत्र दिलेले म्हटलेले आहे. ३१ मार्चच्या रकमेत काही वाढ दिलेली दिसत नसल्याचा मुद्दा एसटी कामगार संघटनेचे नेते स्वप्नील गडकरी यांनी मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संजीवनी, मोनिकाची ‘सुवर्णधाव’

$
0
0

लोगो

राज्य अॅथलेटिक्स स्पर्धा

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची संजीवनी जाधव, मोनिका आथरे, प्रगती मुळाणे, सुनील पावरा यांनी सुवर्णपदक पटकावले.

विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेत १८ वर्षांखालील (ज्युनिअर) मुले आणि मुली आणि सीनिअर पुरुष आणि महिलांच्या खुल्या गटातील स्पर्धा शुक्रवारी झाल्या. महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत पहिली तिन्ही बक्षिसे जिंकली. नाशिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव हिने लौकिकास साजेशी कामगिरी करीत १६:२२:८४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळविले. नाशिकच्याच मोनिका आथरेने (१६:५३:२३ मि.) द्वितीय, तर आरती पाटीलने १७:०३:४० मिनिटे वेळ देऊन तिसरे स्थान मिळविले. ज्युनिअर मुलींच्या गटातील ३००० मीटर शर्यतीत नाशिकच्या प्रगती मुळाणे हिने १०:४५:४४ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. ज्युनिअर मुलांच्या गटातील भालाफेक प्रकारात नाशिकच्या जीवन नुंदावा याने ५५.५६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. पोल व्हॉल्टमध्ये नाशिकच्या सुनील पावराने सुवर्णपदक पटकावले.

पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत मुंबईच्या सुमित पाटीलने सुवर्णपदक मिळविले. लांब उडीत रायगडच्या अभिषेक पाटीलने, महिलांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत पुण्याच्या अंकिता गोसावीने सुवर्णपदक पटकावले. ज्युनिअर मुलींच्या गटात १०० मीटर अडथळा शर्यतीत ठाण्याच्या मिंटविली फर्नांडिसने सुवर्णपदक मिळविले, तर तिचीच जोडीदार मिकांनी रॉड्रिक्स हिने रौप्यपदक पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगररचना’त मनुष्यबळाचा तुटवडा

$
0
0

अवघ्या ३२ कर्मचाऱ्यांवर भार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्यसरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार नगररचना विभागाकडे प्रस्तावांचा ढिग पडला असला तरी, या प्रस्तावांच्या छाननीसह प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मात्र तुटवडा आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राबवलेल्या बदलीसत्राचा सर्वात मोठा फटका नगररचना विभागाला बसला असून जेमतेम ४५ जणांचे मनुष्यबळ असलेल्या या विभागात साफसफाई मोहीमेमुळे आता अवघे ३२ अधिकारी व कर्मचारी उरले आहेत. त्यामुळे दैनदिन कामकाजासह अडीच हजाराच्या वर प्रस्तावांचा निपटारा कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण-२०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने ३१ मेपर्यंत बंधन घालून दिले होते. त्यामुळे या धोरणाअंतर्गत अनेकांनी अनाधिकृत बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागामध्ये शेवटचे तीन दिवस मोठी गर्दी केली. ३१ मेपर्यंत जवळपास अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले. बिल्डरांनी सादर केलेल प्रस्ताव दाखल करून घेण्याचे काम अजूनही सुरूच असून त्याची मोजदाद केली जात आहे. त्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे या धोरणामुळे नगररचना विभागाचा ताण वाढला असतानाच येथील मनुष्यबळ मात्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंनी गेल्या आठवड्यात नगररचना विभागाची साफसफाई करत, मोठ्या प्रमाणावर येथील अभियंता, उपअभियंत्यांच्या बदल्या केल्या. सुमारे २७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नगररचना विभागातील १७ अभियंता व उपअभियंत्याची बदली अन्य विभागात केली. तर ११ अभियंता व उपअभियंत्यांना या विभागात नियुक्त केले.

बदल्या सत्रापूर्वी नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ही ४५ होती. परंतु बदल्यानंतर ही संख्या आता ३२ वर आली आहे. अन्य विभाागातील ११ अभियंते व उपअभियंते नगररचनात पाठविण्यात आले असून त्यापैकी केवळ ९ जण आतापर्यंत रुजू झाले आहेत. तर अजून दोघांची विभागाला प्रतीक्षा आहे. सोबत काही लिपिकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागाचा कारभार सध्या ३१ लोकांवरच सुरू आहे. अगोदरच कामाचा मोठा ताण असतानाच, त्यात नव्याने प्रशमित संरचना धोरणाचा अतिरिक्त ताण विभागावर आला आहे. आतापर्यंत अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून त्यांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर डोअर टू डोअर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सध्याचे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडणार असल्याने या फाईलींचा निपटारा कधी होणार याबाबत आता शंका आहेत. त्यामुळे अधिकचा कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोकडोबावाडीत बिबट्यासाठी पिंजरा

$
0
0

जेलरोड : देवळालीगाव परिसरातील रोकडोबावाडी येथील डोबी मळ्यात बिबट्याच्या वावराने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या मदत पथकाने पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी येथे पिंजरा लावण्यात आला आहे. डोबी मळ्यात गोरखनाथ बुवा, विश्वनाथ बुवा यांची शेती आहे. त्यांच्या शेतात आतापर्यंत चार-पाच वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. गुरुवारी अनिल बुवा यांच्या शेतात बिबट्या आढळल्याने नागरिकांनी वन विभागाला कळविल्यावर वन परिमंडळ अधिकारी रवी सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उत्तम पाटील, बाळू मोरे, सुनील खानजोडे, डी. पी. जगताप, रोहिणी पाटील यांनी डोबी मळ्यात पाहणी करून पिंजरा लावला आहे.

--

'माण देशी'ची शाखा

जेलरोड : म्हसवड (सातारा) येथील माण देशी उद्योगिनीच्या जेलरोड शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले. महिलांनी उद्योजक व्हावे यासाठी आर्थिक साक्षरता, व्यवसायवृद्धी, संगणक, ब्यूटिपार्लर, फॅशन डिझाइन आदींचे प्रशिक्षण संस्थेतर्फे अल्प शुल्कात दिले जाते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सहाय्य या उपक्रमांसाठी लाभते, असे संयोजकांनी सांगितले.

--

ज्येष्ठांचा वाढदिवस

जेलरोड : येथील श्री दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश ढगे, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र चव्हाण, शिवाजी भोर, संघाचे सचिव रमेश डहाळे, अरविंद भालेराव, राजेंद्र जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भागवत गुरव यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. १० जूनला सहस्रचंडी महायज्ञ होणार असून, त्याबाबत शिवाजी भोर यांनी माहिती दिली.

(थोडक्यात)

--

पॉइंटर्स

साधी राहणी, उच्च विचार... -२

९५ सुरक्षारक्षक सेवामुक्त -३

'यश मिळवण्याची घाई नाही' -४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात१

$
0
0

\Bमिलिंद जोशी निवृत्त

\Bनाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील वरिष्ठ लिपिक मिलिंद मधुसूदन जोशी ३१ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. प्राचार्य प्र. ला. ठोके यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. मदन शिंदे, रेखा हिरे, र. ज. चौहान गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी धामणे, पर्यवेक्षिका प्रतिमा खैरनार आदी उपस्थित होते.

\Bआज मेळावा\B

नाशिक : म्हसरूळ येथील महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शनिवारी, २ जून रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी १९९९ ते २०१८ पर्यंतच्या सर्व बॅचच्या एकूण साडेसात हजार विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

\Bबस्ती शिबिर\B

नाशिक : श्री गुरुजी रुग्णालयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयुर्वेद विभागातर्फे वर्षाऋतू बस्ती शिबिर होणार आहे. एक जूनपासून शिबिरास प्रारंभ झाला असून, ३१ ऑगस्टपर्यंत शिबिर सुरू राहील. ग्रीष्म ऋतूत साठून राहिलेला वातदोष वर्षाऋतूतील थंड वातावरणाने वाढतो. यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या वात व्याधी उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी बस्ती ही पंचकर्म चिकित्सा आबालवृद्धांसाठी उपयुक्त असते. इच्छुकांनी श्री गुरुजी रुग्णालय, आयुर्वेद विभाग, आनंदवल्ली चौक, गंगापूर रोड येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड न्यूज पहिला टप्पा

$
0
0

तेजस्विनची माघार

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा उंच उडीपटू तेजस्विन शंकरने मानेच्या दुखापतीमुळे आगामी आशयाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. १९ वर्षीय तेजस्विनने शुक्रवारी भारतीय अॅथलेटिक्स संघटनेला माघारीचा निर्णय कळवला. तेजस्विनने या वर्षी मार्च महिन्यात तेजस्विनने २.२८ मीटर उंच उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तेजस्विनच्या माघारीमुळे आशियाई स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक पटकावण्याच्या भारताच्या आशांना धक्का लागला आहे.

.....

पॅक्वेटा यांची नियुक्ती

पुणे : इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एफसी पुणे सिटी या संघाने शुक्रवारी ब्राझीलच्या मार्कोस पॅक्वेटा यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पॅक्वेटा यांनी प्रशिक्षक म्हणून ब्राझीलला दोन युवा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहेत. पॅक्वेटा यांना प्रशिक्षक म्हणून सुमारे ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे. रँको पोपोविच यांनी पुणे सिटीचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पॅक्वेटा यांची या पदासाठी निवड करण्यात आली.

....

नेपाळ आयसीसी क्रमवारीत

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी नेपाळ, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि यूएई या चार देशांचा आयसीसीच्या वन-डे क्रिकेट क्रमवारीत समा‌वेश करण्याचा निर्णय घेतला. या समावेशामुळे वन-डे क्रमवारीतील संघांची संख्या १६ वर पोहोचली आहे. स्कॉटलंड २८ गुणांसह तेराव्या स्थानी असून यूएईचा संघ १८ गुणांसह चौदाव्या स्थानावर आहे. नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांना क्रमवारीत येण्यासाठी किमान चार आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागणार आहेत.

....

विंडीजचा विजय

लंडन : एविन लुइस, दिनेश रामदिन आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने गुरुवारी वर्ल्ड इलेव्हन संघावर ७२ धावांनी विजय मिळवला. लुइसने २६ चेंडूंमध्ये ५ चौकार व ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. रामदिनने २५ चेंडूंमध्ये नाबाद ४४, तर सॅम्युअल्सने २२ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज - २० षटकांत ४ बाद १९९ (एविन लुइस ५८, दिनेश रामदिन नाबाद ४४, मार्लन सॅम्युअल्स ४३, रशीद खान २-४८) विजयी विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन - १६.४ षटकांत सर्वबाद १२७ (थिसारा परेरा ६१, शोएब मलिक १२, विल्यम्स ३-४२, सॅम्युअल बॅड्री २-४).

.....

बेकरचे वर्चस्व

रोम : अमेरिकन धावपटू रॉनी बेकरने शुक्रवारी रोम डायमंड लीग स्पर्धेमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ही शर्यत ९.९३ सेकंदांमध्ये पूर्ण केली. ही यंदाच्या मोसमातील १०० मीटर शर्यतीतील सर्वोत्तम वेळ असून बेकरचीही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. फ्रान्सचा जिमी विकॉट (१०.०२ से.) रौप्य, तर इटलीचा फिलिपो टॉर्टू (१०.०४ से.) ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील अपूर्ण कामे ठरताहेत जीवघेणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदार कंपनीचा मनमानीपणा आणि महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळणारे अभय या कारणांमुळे पळसे चौफुली येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गुरुवारी येथे झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यानंतर शुक्रवारी अखेरीस येथे महामार्गावर रंब्लर स्ट्रिप्स टाकण्यात आल्या.

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण झाले; परंतु पळसे येथील नागरिकांचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी वाढले असल्याचे येथे रोज होत असलेल्या अपघातांतून स्पष्ट झाले आहे. सर्व्हिस रोडची अर्धवट झालेली कामे, रात्रीच्या वेळी बंद असलेला सिग्नल, पथदीपांचे उभे असलेले खांब, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवरील मेहेरबानी, पुलाखालील रस्त्याचे अपूर्णावस्थेतील काम, दिशादर्शक फलकांचा अभाव या सर्व कारणांमुळे पळसे गावाजवळील चौफुली 'अपघातस्थळ' ठरली आहे. गेल्या वर्षभरात किरकोळ अपघातांव्यतिरिक्त येथे झालेल्या २६ अपघातांत तब्बल ५ प्रवाशांचा बळी गेला असून, दहापेक्षा जास्त प्रवासी कायमचे जायबंदी झाले आहेत. पळसे चौफुलीवर गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील हिराबाई बाळासाहेब वारुंगसे ही महिला जागीच ठार झाली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला. ठेकेदार कंपनीचे कर्मचारी स्थानिक नागरिकांच्या मागणीला जुमानत नसल्याचा आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळेच पळसे चौफुलीवर रोज अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या वेळी नागरिकांनी स्पीडब्रेकरच्या मागणीसाठी महामार्ग रोखून धरला होता.

महामार्गावरील त्रुटी

पळसे गावाजवळील चौफुलीवरील सिग्नल रात्री दिसत नाही. कोणतेही ट्रॅफिक साइन्स येथे नाहीत. सर्व्हिस रोडचे काम अर्धवट आहे. सर्व्हिस रोडवरील व्यावसायिकांचे अतिक्रमण जैसे थे आहे, तसेच दिशादर्शक फलकही नाहीत. चौफुलीजवळील नाल्यावरील पुलाखालील काँक्रिटीकरण अपूर्ण असल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी सर्व्हिस रोडचा वापर करता येत नाही. पुलाखाली व सर्व्हिस रोडवर पथदीप नाहीत, तसेच संरक्षक भिंतींचे कामही अर्धवट आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे चौफुली येथे एक इंच उंचीच्या रंबलर स्ट्रिप्स टाकण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या नाल्यावरील पुलाखालील रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. पळसे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या पुलाची दुरुस्तीही केली जाईल.

- सी. आर. सोनवणे

उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक

महामार्गाचे रुंदीकरण करताना दिलेली आश्वासने ठेकेदार कंपनीने पूर्ण केलेली नाहीत. महामार्गाच्या बांधणीत अनेक दोष राहिल्याने वारंवार अपघात होत असून, काही नागरिकांचे बळी गेले आहेत. सर्व्हिस रोड अपूर्ण असल्याने महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अधिकारीही या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- नवनाथ गायधनी, माजी सरपंच, पळसे

रास्ता रोकोनंतर मागणी मान्य

पळसे गावाजावळ गुरुवारी सायंकाळी सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकखाली दुचाकी सापडून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यात मुलगा बालंबाल बचावला. अपघातानंतर पळसे येथील स्थानिक नागरिकांनी महामार्ग रोखून धरला होता. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महामार्गावरील रहदारी तब्बल दोन तास ठप्प पडल्याने प्रवाशांचीही गैरसोय झाली. पळसे येथील नागरिकांची समजूत काढण्यात पोलिस अधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री उशिरा यश मिळाले. महामार्गावर मागील काही दिवसांत चार जणांचा बळी गेल्याने गतिरोधकाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने सिमेंट घेऊन येत असलेल्या ट्रकखाली (एमएच १५/डीजे ९१५१) नाशिकरोडकडून पळसे येथे वळण घेणारी दुचाकी (एमएच १५/एआर ५७६५) सापडली. अपघातात दुचाकीवरील हिराबाई बाळासाहेब वारुंगसे (वय ४५, मूळ रा. सोनांबे) ही महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीचालक कल्पेश बाळासाहेब वारुंगसे (वय २५) किरकोळ जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून १६ तलवारी हस्तगत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पंजाबमधून तलवारी आणून त्या नाशिकमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका पंजाबी तरुणासह स्थानिकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १६ तलवारी आढळून आल्या असून, त्या शहरात कशासाठी आणल्या होत्या, याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्‍त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोरे यांनी सांगितले, की वडाळा-पाथर्डी रोडवरील सराफ लॉन्सजवळ दोन जणांकडे तलवारी असल्याची माहिती गुन्हे शोधपथकाचे पोलिस उपनिरीक्षक आर. सी. शिंदे यांना मिळाली होती. त्यानी तातडीने कर्मचाऱ्यांसह जाऊन पाहणी केली. सराफ लॉन्सजवळ गुरूचरणसिंग बलकारसिंग (वय २६, रा. गुरुद्वारा थाडा साहिब, लोदिपूर, जि. रूपनगर, पंजाब) व महेंद्र सुदाम धबडगे (२८, रंगरेज मळा, इंदिरानगर) हे दोघे उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोघाची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी त्यांच्याजवळील १६ तलवारी पोलिसांना दाखवल्या. या वेळी पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सर्व तलवारी जप्त केल्या आहेत. शहरात या तलवारी कोणाच्या सांगण्यावरून आणल्या किंवा यात त्यांचा नाशिकमध्ये आणखी कोण साथीदार आहे, याच तपास पोलिस करीत आहेत.

या दोघांना पकडण्यासाठी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आर. सी. शिंदे, आर. पी. निकम, रमेश टोपले, राजू राऊत, विनोंद खांडबाले, भगवान शिंदे यांच्यासह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. इंदिरानगर परिसरात काही दिवसांपासून अशा पद्धतीने हत्यारे सापडण्याचे प्रमाण वाढले असून, यातील स्थानिक तरुण वडाळा पाथर्डी रोडवरीलच एका महाविद्यालयात कार्यरत असल्याचे समजते. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना त्याने यापूर्वी सिंग याच्याकडून आणलेले हातातील कडे किंवा अन्य काही वस्तू विक्रीही केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना या तलवारी विक्री करण्याचा या दोघांचा प्रयत्न होता का, याची माहिती घेतली जात आहे. इंदिरानगर परिसरात आढळून आलेल्या या तलवारींमुळे मोठी घटना टळल्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायती होणार मालामाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व अकृषक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार करआकारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अकृषक प्लॉटवरील कर वाढणार असून, ग्रामपंचायतींचे उत्पन्न त्यातून वाढणार आहे. शेतसारा न भरणाऱ्या सर्वच अकृषक जमिनींवर रेडिरेकनर दरानुसार करआकारणी होणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी या अकृषक बिनशेती करण्यात येत आहेत. मात्र, अशा बिनशेती झालेल्या प्लॉटवर ग्रामपंचायती कोणत्याही प्रकारचा कर आकारत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीस या अकृषक प्लॉटधारकांकडून नियमानुसार कराची रक्कम मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतींचे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यायाने ग्रामपंचायतीस करापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व अकृषक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार करआकारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत

कारखान्यांवरही कराची संक्रात

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कारखान्यांना कलम १२५ नुसार ठोक अंशदानाऐवजी कलम १२४ नुसार कर लावून वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील कारखान्यांना विविध सुविधांच्या वापरापोटी संबंधित ग्रामपंचायतींना कराऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये होती. आता ती रद्द करण्यात आली आहे.

अशी होती तरतूद

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदान तरतुदीनुसार अंशदानाचा आकडा ठरविला जात असे. ही रक्कम दिल्यानंतर उद्योगांना ग्रामपंचायतीचे वेगळे कर द्यावे लागत नसे. पाच दशकांपासून ही तरतूद अस्तित्वात होती. मात्र, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मधील पंचायतीच्या क्षेत्रातील कारखान्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्यासह कलम १७६ च्या पोटकलम (२)च्या खंड (२७) अन्वये कलम १२५ च्या संदर्भात नियम करण्याची असलेली तरतूद सरकारने वगळली आहे.

वाडिवऱ्हेचा प्रस्ताव फेटाळला

वाडिवऱ्हे (ता. इगतपुरी) व तेथील कारखानदार यांच्यात झालेल्या ठोक अंशदान करारनाम्याबाबत मंजुरीसाठी ग्रामपंचायत विभागाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, सरकारच्या अधिसूचनेनुसार कलम १२५ वगळण्यात आल्याने हा प्रस्ताव कलम १२४ प्रमाणे वसुली करण्यासाठी परत करण्यात आला आहे. याबाबत इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व पंचायत समित्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ नुसार ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील कारखान्याकडील इमारतींवर कर आकारणी करून वसुलीची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

रेडिरेकनरचे दर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २१४ बालकेंद्र होणार सरू

$
0
0

कुपोषित बालकांसाठी 'झेडपी'चा उपक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात आजपासून २१४ एवढे ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ग्राम बालविकास केंद्र सात जूनपासून ग्राम बालविकास केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी दिली.

या केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात तीन स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ४४१३ एवढी बालक आतापर्यंत तीव्र कुपोषित आढळून आली तर ११२२६ बालक मध्यम कुपोषित आढळली आहेत. मात्र, काही ठिकाणी अपेक्षित संख्या न आढळल्याने पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच शासनाने निर्देशित केलेली औषध ७ जूनपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सात जूनपासून ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी दिली.

दररोज आठ प्रकारचा आहार

ग्राम बालविकास केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत शासनाकडून वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्रामधील तीव्र कुपोषित बालकांना आठ प्रकारचा पोषण आहार दररोज द्यावयाचा आहे. यामध्ये बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, अंगणवाडीतील आहार दोन वेळा, अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत दिला जाणारा विशेष आहार तीन वेळा असा एकूण आठ वेळा आहार द्यावयाचा आहे. अमायलेजयुक्त आहार कसा तयार करावा, याच्या पद्धतीही देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचे डोस देण्याबाबतही द्यावयाचे आहेत. याबाबत सर्व संबंधिताना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व सरींची नाशिकमध्ये हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. पुणे व नगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.

नांदगाव तालुक्यात पळाशी व नागापूर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मनमाडसह नांदगाव परिसरात काही काळ जोरदार वादळाचे आगमन झाले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मालेगाव तालुक्यात दाभाडी पिंपळगाव परिसरात पावसाचा शिडकावा झाला. नगर जिल्ह्यात राहुरी, अकोले, राजूर, भंडारदरा, रंधा, वाकी, रतनवाडी, शेलद, जामगाव, पाडाळणे या परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. दरम्यान, महाराष्ट्रात सहा जूननंतर दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीकामांची लगबग वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जूनपासून निरूपण

$
0
0

नाशिक : रविवार कारंजा येथील चित्तपावन मंगल कार्यालयात ४ ते १० जूनदरम्यान श्रीकृष्णलीला रहस्य श्रीमद् भागवत दशम स्कंधवर निरूपण होणार आहे. या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता श्रीमद् भागवत ग्रंथयात्रा, पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री साक्षी गणेश, कानडे मारुती लेन, दहीपूल, श्री मुरलीधर मंदिर, गायधनी गल्ली ते चितपावन मंगल कार्यालय असा हा पालखी मार्ग आहे. पुरुषोत्तम मासाची पर्वणी साधून हा प्रवचन होणार आहे. श्रीमद् सद्गुरू यती माधवानंद तीर्थ स्वामी महाराज प्रवचन देणार आहेत. या श्री सदगुरू समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर भक्त परिवार व श्री कृष्णलीला केंद्र भक्त परिवार नियोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखाचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर परिसरातील बापू बंगला येथील बंद दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृत्विज रत्नाकर कासोदकर (रा. यशोधन अपार्ट., बापू बंगल्याजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कासोदकर यांचे त्यांच्या राहत्या इमारतीतच दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी रात्री शटरच्या पट्ट्या व कुलूप तोडून दुकानातील सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. सहाय्यक निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

भाजल्याने महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने शहनाज इस्माईल शाह (रा. सादिकनगर, वडाळा गाव) या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वडाळा गावातील सादिकनगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहनाज शाह या गुरुवारी (दि. ३१) सकाळी घरात स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली. हवालदार राणे तपास करीत आहेत.

सातपूर आयटीआयमध्ये चोरी

औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळेच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी विविध अभ्यासक्रमांची सुमारे २८ हजारांची उपकरणे लंपास केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटीआयचे कर्मचारी संजय मेतकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी मंगळवारी रात्री कार्यशाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आणि मागील शटर वाकवून ही चोरी केली. हवालदार पवार तपास करीत आहेत.

दुचाकीसह रिक्षाची चोरी

एका मोटारसायकलसह चोरट्यांनी ऑटो रिक्षा व स्प्लेंडर लंपास केल्या प्रकरणी मुंबई नाका आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारका भागातील छोटूभाई पीरमहंमद शेख मंगळवारी दुपारी गोल्फ क्लब परिसरात गेले होते. त्र्यंबक रोडवरील प्रवेशद्वारावर त्यांनी स्प्लेंडर (एमएच १५/सीए ६१२७) उभी केली असता चोरट्यांनी ती लंपास केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार आवारे तपास करीत आहेत. दुसरी घटना गोदा पार्क परिसरात घडली. सातपूर राजवाड्यात राहणारे रिझवान काबीर शेख गुरुवारी दुपारी रामवाडी भागातील गोदा पार्क येथे गेले होते. सार्वजनिक शौचालय भागात पार्क केलेली त्यांची ऑटो रिक्षा (एमएच १५/ईएच ३३६१) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार थेटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images