Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समृद्धीसाठी आजपासून सक्तीने भूसंपादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जमिनी न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता भूसंपादन कायद्यान्वये खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना बुधवारी (३० मे) जाहीर करण्यात येणार असून, याच दिवसापासून भूसंपादनास विरोध केल्यास सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नागपूर ते मुंबई असा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांना हा महामार्ग जोडणार आहे. शेतकऱ्यांनी थेट खरेदीने जमिनी द्याव्यात, यासाठी सरकारकडून सुरुवातीपासून प्रयत्न होत आहेत. त्यासाठी त्यांना बाजारभावाच्या पाच पट दर दिला जातो आहे. जिल्ह्यात ११०८ पैकी ७४५ हेक्टर म्हणजे ६७.२२ टक्के जमीन शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन दिलेली नाही. काही गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध पाहता सरकारने

थेट भूसंपादन कायद्यानुसार जमीन अधिग्रहणासाठी हालचाली गतिमान केल्या. कायद्यात आवश्यक ते बदल करून घेण्यात आले. दुरुस्तीसह या कायद्यातील बदलांना राष्ट्रपतींची मान्यताही घेतली. याच आधारावर सरकारने २५ मे रोजी गॅजेटमध्ये नोटिफिकेशन जाहीर केले असून, जिल्ह्यातही ते बुधवारी, ३० मेस प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. त्यामुळे समृद्धीसाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने संपादित केल्या जाणार आहेत. थेट खरेदीने जमिनी देण्यास तयार नसणाऱ्या ३३ टक्के शेतकऱ्यांना २५ टक्के कमी मोबदल्यावर समाधान मानावे लागणार आहे. शेतकरी कोर्टात गेले तरी नुकसानभरपाईची रक्कम कोर्टात जमा करून प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीयकरणाचे विनाशकारी धोरण शिक्षणाच्या मुळाशी

0
0

संमेलानाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारने शिक्षणाला प्राथमिक दर्जा देऊन मोफत शिकवण्याची व्यवस्था करायला हवी. शिक्षणासाठी ओतलेला पैसा हा गुंतवणूक म्हणून पाहिल्यास त्याचे येणारे फायदे हे नक्कीच सकारात्मक असतील, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे वसंत व्याख्यानमालेत २९ व्या पुष्पात 'उच्च शिक्षणाची गुणवत्ता : एक मोठे प्रश्नचिन्ह' या विषयावर देशमुख बोलत होते. हे व्याख्यान अजुर्नसिंग बग्गा यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. देशमुख म्हणाले, की शिक्षण हे श्रीमंतासाठी राखीव झालेले आहे, गरीबांनी शिकूच नये अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याबाबत विचार करण्याची आज गरज आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश हरवत चालला आहे. हे सर्व शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने होत आहे. बाजारावर शिक्षण सोडणे ही मोठी घातक बाब आहे. आपण बाजाराला स्वीकारले आहे तरीही माणूस घडण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. उच्चशिक्षण हे केवळ तांत्रिक झाले असल्याने सांस्कृतिक मूल्यांचा अभाव दिसत आहे. शिक्षण हे समाजाभिमूख नसून ते नोकरीपुरते मर्यादित झाले आहे. त्यामुळे तरुण दिशाहीन झालेला आहे.

देशमुख यांनी पंतप्रधान नेहरू यांचा दाखला दिला, ते म्हणत विद्यापीठे मानवतेसाठी आहे, त्यानुसार विद्यापीठांनी काम करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मानवता आली पाहिजे, त्यासाठी उच्च शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता विकसित व्हायला पाहिजे. उच्चशिक्षणातून सद्सद् विवेकबुद्धी, नैतिकता आत्मसात करता आली पाहिजे.

आजचे व्याख्यान

वक्ते : प्रमोद कांबळे

विषय : सर्वांसाठी कला

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंडा मोर्चा काढूनही पाणीप्रश्न जैसे थे

0
0

हंडा मोर्चानंतरही पाणीप्रश्न जैसे थे

जेलरोड : रोकडोबावाडीचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागात पुरेशा दाबाने पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेकडे वारंवार कळवून, तसेच नगरसेवकांना सांगूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. मुलाबाळांसह महिलांनी हंडा मोर्चा काढूनही प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. महापालिकेने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन (फोटो)

पंचवटी : भारतीय जनता पक्षाच्या पंचवटी मंडलतर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. स्वामीनारायणनगर येथील सावरकर स्मारकात आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, सुरेश खेताडे, नाना शिंदे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ आदी उपस्थित होते. सोमनाथ बोडके यांनी सूत्रसंचालन केले. मोहिनी भगरे यांनी आभार मानले.

श्रीमद भागवत सप्ताह

नाशिक : अमृतधाम येथील दत्त मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद भागवत सप्ताहात हभप विठ्ठल महाराज धोतर्डीकर यांनी श्रीकृष्ण जन्मकथा सांगितली, रामजी व श्यामजी सूर्यवंशी यांनी विविध गीतांचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले, पंचवटी सभापती प्रियंका माने, धनंजय माने, माजी सभापती रुची कुंभारकर, दिलीप अहिरे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. रमेश वानखडे यांनी स्वागत केले, मोहन सहाणे यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ पगार, मुकुंद क्षीरसागर, प्रभाकर डिडोलकर, प्रवीण सोनवणे, मुरलीधर भामरे, श्यामराव पाटील आदी उपस्थित होते.

(थोडक्यात)

---

पॉइंटर्स...

एमपीएससीचा 'आधार' उद्यापर्यंतच! -२

भुरटे चोरटे 'कामाला'-३

'केंब्रिज'वर गुन्हा -४

अद्भुतरम्य सफर! -५

रक्तदाब घाम फोडतोय! -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरमसाठ प्रतिनियुक्त्यांचे गौडबंगाल!

0
0

प्रशासकीय सोयीच्या नावाखाली विद्यार्थी हिताची गळचेपी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौशल्य विकासातून विद्यार्थी विकासाचे ध्येय ठरवून काम करणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात गेल्या वर्षभरापासून कर्मचारी बदल्यांमध्ये प्रतिनियुक्त्यांचा धडाका सुरू आहे. काही 'खास' कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थी हिताची गळचेपी केली जात आहे. विशेष म्हणजे सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी दलालांची साखळी कार्यरत असल्याची उघड चर्चा आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे तीन प्रकार पडतात. यात सेवेत एका ठिकाणी सहा वर्षे पूर्ण केलेला वर्ग तीनचा प्रत्येक कर्मचारी बदलीस पात्र ठरतो. अशा नियतकालिक बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष विनंती बदल्या केल्या जातात. अशा बदलीतही स्थानिक सहसंचालकांची शिफारस महत्त्वाची ठरते. अर्थात, अशा बदलीसाठी कर्मचाऱ्याकडून मांडण्यात आलेले कारण प्रशासकीय पातळीवर दखल घेण्याजोगे ठरणे हा एकमेव निकष विचारात घेतला जातो. अशा बदलीसाठी सहसंचालकांकडून संचालक, संबंधित विभागाचे सचिव आणि मंत्री यांच्यापर्यंत बदलीचे सबळ कारण आणि संबंधित कर्मचाऱ्यांची विशेष बदलीसाठीची निकड विचारात घेतले जाते. त्याशिवाय ही बदली होतच नाही. गंभीर आजारपण, महिला कर्मचाऱ्यांचे बाळंतपण यासारख्या काही कारणांचा अशा विनंती बदल्यांमध्ये विचार केला जाऊ शकतो. या दोन प्रकारांव्यतिरिक्त प्रतिनियुक्तीच्या (डेप्युटेशन) स्तरावर कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. अशा बदल्या करण्याचे सर्वाधिकार सहसंचालकांच्या हातात एकवटलेले असतात. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणची निकड या निकषांना प्राधान्य दिले जाणे अपेक्षित असते. मात्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या नाशिक विभागात प्रतिनियुक्त्यांचा जणू बाजार मांडलाय की काय, असा प्रश्न वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

गेल्या वर्षभरात सुमारे ७० जणांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे अशा प्रतिनियुक्त्या देतांना कोणतेही मापदंड पाळण्यात आलेले नाहीत. एकाच शहरात काही किलोमीटरच्या अंतरावर प्रतिनियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. नाशिकचा विचार केल्यास नाशिक-पुणे महामार्गावरील जात पडताळणी कार्यालयाशेजारील आयटीआयमधील कर्मचाऱ्याला सातपूर आयटीआयमध्ये किंवा सातपूर आयटीआयमधील क्लार्कला त्र्यंबक नाक्यावरील विभागीय कार्यालयात प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला अगदी शेजारीच असलेल्या महिला आयटीआयमध्ये प्रतिनियुक्ती दिलेली आहे. यासाठी प्रशासकीय कामकाजांच्या निकषाआड मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची खुली चर्चा आहे. तसेच प्रतिनियुक्ती देतांना संबंधित मर्जीतील कर्मचाऱ्याऐवजी पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, हा प्रश्न कायम आहे.

दलालांची 'प्रवीण'ता

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिनियुक्तींसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विभागीय कार्यलयात कार्यरत दलालांची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून 'मोला'चा सल्ला दिला जातो. आदिवासीबहुल तालुक्यात आपली 'प्रवीण'ता दाखवून प्रतिनियुक्तीवरच बदलून आलेला एक कर्मचारी निर्णय प्रक्रियेत कमालीचा हस्तक्षेप करीत असल्याचे बोलले जात आहे. अशा दलालांची जळगाव जिल्ह्यातही साखळी कार्यरत आहे.

विद्यार्थी हाच आमचा केंद्रबिंदू आहे. प्रतिनियुक्ती देताना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते. प्रतिनियुक्त्यांमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही.

- सतीश सूर्यवंशी, सहसंचालक,

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला औद्योगिक वसाहतीत ‘सहकार’

0
0

माणिकराव शिंदेंच्या पुढाकाराने १२ जागा बिनविरोध

म. टा. वृत्तसेवा, येवला

संचालक मंडळातील आपसातील गटतटबाजीमुळे तालुक्यात चर्चेचा मोठा विषय ठरलेल्या येवला औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठा चमत्कार मंगळवारी समोर आला. 'संस्थेचे हित लक्षात घेवून गटातटाच्या राजकारणाला तिलांजली द्या, सर्वसमावेशकता ठेवून ही निवडणूक बिनविरोध करू या', अशी साद घालत ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी माघारीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे १३ पैकी तब्बल १२ जागा बिनविरोध झाल्या. संस्थेच्या सोसायटी गटातील एका जागेसाठीच्या लढतीत केवळ दोन उमेदवार आणि दोनच मतदार हा तिढा अंतिम क्षणापर्यंत न सुटल्याने, या एका जागेसाठी मतदान होणार आहे.

येवला शहरानजीक असलेल्या अंगणगाव शिवारातील येवले औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक मंडळ गेल्या काही महिन्यांपूर्वी बरखास्त झाले होते. सहा महिने सहकार विभागाचा अधिकारी प्रशासक होते. त्यानंतर पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. संस्थेतील सर्वच गटांतील एकूण २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतला. सोमवारी सायंकाळी शिंदेंच्या निवासस्थानी बैठक घेत शिंदेंच्या आवाहनाल सर्वांनीच होकार दिला. मंगळवारी १३ पैकी तब्बल १२ जागा 'बिनविरोध' झाल्याचे चित्र समोर आले.

हे उमेदवार बिनविरोध

अनिल (लाला) कुक्कर, अंबादास बनकर, भोलानाथ लोणारी, अजय जैन, शाम कंदलकर, विष्णू खैरनार, सुकृत पाटील, जयश्री काळे, अस्मिता गायकवाड, मुकेश चवळे, दत्तकुमार महाले, नवीनचंद्र परदेशी यां उमेदवारांचेच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने या सर्व जणांची निवड बिनविरोध झाल्यातच जमा आहे. संस्थेच्या १३ जागांपैकी १२ जागा या बिनविरोध होणार असून त्याची अधिकृत घोषणा ३ जूनला केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश उगलमुगले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोपान पैठणकर यांनी दिली.

'हत्ती गेला अन् शेपूट राहिलं'

तब्बल १२ जागा बिनविरोध होताना, आता केवळ संस्थेच्या सोसायटी गटातील एका जागेसाठी मतदान घ्यावे लागणार आहे, त्यामुळे 'हत्ती गेला अन् शेपूट राहिलं' अशी परिस्थिती आहे. सुवर्णा चव्हाण व प्रवीण पहिलवान हे दोघेच उमेदवार अन् दोघेच मतदार आहेत. साहजिकच मतदानादरम्यान दोघांनीही आपणा स्वतःलाच मतदान केल्यास, मतमोजणीदरम्यान दोघांनाही प्रत्येकी एक-एकच मत असे चित्र समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३ जूनच्या मतदानानंतर 'लॉटरी' अर्थातच सोडत पद्धतीने चिठ्ठीचा मार्ग अवलंबविला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत योग वर्ग

0
0

मोफत योग वर्ग

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्व ओळखून यंदा 'मटा'च्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते २१ जून या कालावधीत योगविद्या गुरुकुलाच्या माध्यमातून नाशिकरोड भागात मोफत योग वर्ग घेण्यात येणार आहेत. त्यासाठी नावनोंदणी गरजेची असून, प्रवीण देशपांडे (९४२०२८४००५), सुनील जाधव (९४२२२४९९८०), प्रशांत गोवर्धने ( ९८८१०१८२०२) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजार अतिक्रमणप्रश्नी उपेंद्रनगर येथे वादावादी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

उपेंद्रनगर येथे असलेल्या भाजीबाजाराचे अतिक्रमण काढण्याचा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मंगळवारी प्रयत्न केला असता भाजीविक्रेत्यांनी तेथून न हटण्याची भूमिका घेतल्याने चांगलीच वादावादी झाली.

येथील अतिक्रमण काढल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा काही भाजीविक्रेत्यांनी यावेळी दिल्याने बराच काळ वाद होऊनही हे अतिक्रमण न काढताच महापालिकेच्या पथकाला परतावे लागले. मात्र, यावेळी काही भाजीविक्रेत्यांचा माल पथकाने जप्त केला. सिडकोत सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. पक्‍क्‍या बांधकामांचा विषय वादग्रस्त ठरल्यानंतर आता महापालिकेने भाजीबाजारांसह रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक उपेंद्रनगर येथील बाजारात दाखल झाले. मात्र, या ठिकाणी हॉकर्स झोन करून द्यावा, अशी मागणी करीत भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमणास विरोध करण्यास सुरुवात केली. माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून ही मोहीम राबविली जात असल्याचा आरोप यावेळी भाजीविक्रेत्यांनी केला. अतिक्रमण निर्मूलन पथकाने काही भाजीविक्रेत्यांचा भाजीपाला यावेळी जप्त केला असला, तरी ही मोहीम न राबविता पथक रवाना झाले. यावेळी पोलिस बंदोबस्त घेण्यात येऊनही पोलिसांनी काहीही हस्तक्षेप केला नसल्याचे दिसून आले. उपेंद्रनगर येथील भाजीबाजाराचे अतिक्रमण आम्ही काढू देणार नसून, पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाने येण्याचा प्रयत्न केल्यास थेट आत्मदहन करू, असा इशारा या मार्केटच्या अध्यक्षा मीरा साबळे यांच्यासह विलास भालेराव, विनोद बडगुजर, दीपक चौधरी, मनीषा जमधाडे आदींसह भाजीविक्रेत्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपूल उभारणीसाठी मालेगावमध्ये वृक्षतोडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारे १५ वृक्ष महापालिकेने सोमवारी तोडले. महापालिकेच्या या कृतीवर वृक्षप्रेमी नागरिक व संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मालेगाव ग्रीन ड्राइव्ह संस्थेने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महापालिका आयुक्त व संबधित ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीनंतरच झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

शहरातील जुना आग्रा रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या रस्त्यालगत मालेगाव ग्रीन ड्राइव्ह व इतर सामाजिक संस्था यांनी तीन वर्षात २५ झाडे लावली होती. या झाडांचे स्थानिक नागरिक व दुकानदार यांच्या मदतीने संगोपन केले जात होते. मात्र उड्डाणपुलास कामात अडथळा येत असल्याचे कारणाने ती झाडे महापालिकेकडून तोडण्यात आली. यामुळे सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात वृक्षांची संख्या कमी होत असताना महापालिका प्रशासन वृक्ष लागवड व संगोपन बाबत उदासीन असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, वृक्षतोडीपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, तशी परवानगी घेण्यात न आल्याने या आदेशाचा भंग झाला आहे. या कारवाईबाबत सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हे दाखल करावे, उद्यान अधीक्षकांना तत्काळ निलंबित करावे, अन्य ठिकाणी झाडे लावावीत अशी मागणी संघटनेने केली आहे. याची दखल न घेतल्यास २ जून रोजी आंदोलन केले जार्इल, असा इशारा मालेगाव ग्रीन ड्राइव्हचे कलीम युसूफ अब्दुल्ला, निखिल पवार, असिफ अब्दुल्ला, नगरसेवक नजीर फल्लीवाले आदींनी दिला आहे.

हरकतीची दखल नाही

संघटनेकडून या रस्त्यावरील झाडे तोडण्याबाबत हरकत घेण्यात आलेली होती. मात्र, महापालिकेने याची दखल घेतली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वृक्षतोड करू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही अवमान करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छेड काढल्याने मुलास बदडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागात मुलीची छेड काढत असल्याने मुलाला मुलीच्या पालकाने चोप दिला. यावर मुलाच्या पालकानेही आक्षेप घेतला. यातून पालकांमध्येच वादाची ठिगणी पडली. त्यांच्यातील वाद थेट सातपूर पोलिस ठाण्यात पोहचला. यानंतर मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी मुलगा व त्याचे पालक यांना समज देत सोडून दिले.

पालकांनी आपला पाल्य शाळेत अथवा खाजगी क्लासमध्ये जातांना नक्की अभ्यास करतो की नाही याची खात्री करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन वयात मुलीची छेड काढणे गुन्हाच आहे. परंतु, मोठा झाल्यावर तोच मुलगा अनुचित प्रकार करू शकतो. अशावेळी पालकांनी आपल्या मुलाची योग्य काळजी घेत त्याचे समुपदेशन देखील करावे असा सल्लाही पोलिसांनी दिला.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंगसे येथे अखेर कांदा लिलाव सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंगसे व्यापारी असोसिएशन यांच्यातील तिढा गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत सोडविण्यात आला. त्यानुसार सोमवारी मुंगसे येथील खरेदी विक्री केंद्रावर बाजार समिती संचालक व माजी सभापती प्रमोद बच्छाव यांच्या हस्ते अखेर कांदा लिलावाचा सुरुवात करण्यात आली.

व्यापारी परवाने नुतनीकरण, शेतमाल पेमेंट, शेतकऱ्यांची थकीत रक्कम अशा अनेक विषयावरून व्यापारी व बाजार समिती यांच्यात तिढा निर्माण झाला होता. प्रमोद बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्यापारी व बाजार समितीने यावर तोडगा काढून सोमवारपासून लिलाव पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोमवारी लिलाव सुरू झाले. निबायती येथील शेतकरी सलीम शेख यांचा कांदा व्यापारी जयेश शहा यांनी खरेदी करून यास सुरुवात केली. कांद्याचे बाजारभाव सरासरी ६५० रुपये प्रती क्विंटल इतके होते तर आवक ९ हजार ७०० क्विंटल राहिली. शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून आणावा म्हणजे चांगला भाव मिळेल, असे आवाहन बच्छाव यांनी केले. यावेळी बाजार समिती सदस्य गोरख पवार, वसंत कोर, व्यापारी सुरेश झालते, अशोक बच्छाव, राहुल सूर्यवंशी, पंकज शेवाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनमध्ये सरकते जिने

0
0

रेल्वे विभागाच्या पाहणीनंतर पंधरवाड्यात सुरू होणार; प्रवाशांना फायदा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशनमध्ये सरकते जीने (एस्केलेटर) लावण्याचे काम झाले आहे. हे स्वयंचलित जिने महिनाभरात कार्यान्वित होतील, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. शहरातील मोठ्या मॉलमधील जिन्यांप्रमाणे हे जिने कार्यरत होणार असून, त्यांच्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, दिव्यांग यांना दिलासा मिळणार आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात दोन लिफ्ट नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सरकते जिने झाल्यानंतर रेल्वेस्थानकाची शाईनिंग वाढणार आहे. याचा फायदा प्रवाशांना मिळणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी जिन्यांचे काम सुरू झाले होते मात्र, मध्यंतरी ते काम रेंगाळले होते. आता पुन्हा वेगात काम सुरू झाले असून, या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे, अशीही माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 'एस्केलेटर' बसविल्यामुळे प्रवाशांचा ताण कमी होणार असून, रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा आणि अकोला येथेही अशाप्रकारचे जिने बसविण्यात येणार आहेत.

पाहणीनंतर होणार कार्यान्वित

रेल्वे स्टेशनमध्ये सरकते जिन्यांचे बहुतांश काम झाले आहे. आता या जिन्यांवर स्लॅब टाकला जाणार आहे. तसेच पावसाचे पाणी जिन्यांवर येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ पत्रेही लावले जाणार आहेत. हे काम रेल्वेच्या बांधकाम विभागातर्फे सुरू असून, येत्या पंधरवड्यात ते पूर्ण होईल. हे जिने लावल्यानंतर रेल्वेच्या विद्युत विभागाचे काम सुरू होते. कारण या जिन्याला विजेचा पुरवठा ते करणार आहे. त्यानंतर येथील लिफ्ट, जिन्यांची पाहणी राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग करेल. समाधान झाल्यावर ते प्रमाणपत्र देतील. त्यानंतर महिनाभरात सरकते जिने प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.

त्रास कमी होणार

नाशिकरोड स्टेशनमध्ये चार प्लॅटफार्म आहेत. मुंबईला जाणाऱ्या गाड्या प्लॅटफार्म दोन किंवा तीनवर येतात. स्टेशनमध्ये सहा ठिकाणी जिन्यावरून जाण्याची सोय आहे. हे जिने उंच असल्याने काही ज्येष्ठ नागरिकांचे गुडघे दुखतात. कुंभमेळ्यात तर हे जिने चढताना भाविकांची कसोटी लागली होती. कुंभमेळ्यात नवीन पादचारी पूल बांधण्यात आला होता तो चारही प्लॅटफार्मला जोडतो. मात्र, त्याच्या जिन्यांची उंचीही जास्त असून, दुसऱ्या स्थानकावर गाडी येताच ती पकडण्यासाठी प्रवाशांची घाई होते. जिने चढण्यास अवघड असल्याने प्रवासी रुळ क्रॉसिंगचा धोका पत्करतात. या अडचणी लक्षात घेऊन एस्केलेटर बसविण्यात येणार आहेत. तसेच या जिन्यामुळे छोटे अपघातही टळणार आहेत. रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित असतो. अन्य वाहनांच्या तुलनेत रेल्वे प्रवास परवडतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिकरोड स्थानकातून दिवसाला सुमारे पंधरा-सोळा हजार प्रवासी प्रवास करतात. मालगाडीसह दररोज शंभर रेल्वेगाड्या येथून धावतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची संख्या वीस हजारावर जाते. एस्केलेटर बसविल्यानंतर या प्रवाशांचा फार मोठा ताण कमी होणार आहे.

दिव्यांगांना दिलासा

रेल्वेचे जिने चढणे हे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला, बालके आदींना अवघड जाते. एस्केलेटर कार्यान्वित झाल्यानंतर या सर्वांचा त्रास वाचणार आहे. सध्याच्या जीन्यावर काठी टेकत ज्येष्ठ नागरिक जिने चढताना दिसतात. त्यावरुन पाय घसरण्याचीही भीती आहे. गर्दीच्या वेळी अन्य प्रवाशाचा धक्का लागून हात-पाय फ्रॅक्चर मोडल्यास घरीच बसावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला रेल्वेने प्रवास टाळतात. सरकते जिने झाल्यानंतर त्यांचाही प्रवास सुखकर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सरपंचाचा विनयभंग

0
0

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वळवाडे येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास झाडांना पाणी टाकण्याच्या शुल्लक कारणावरून गावातील एका व्यक्तींनी शिवीगाळ केली. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सरपंच सुरेखा ह्याळीज यांनी फिर्याद दिली आहे. २९ मे मंगळवारी वळवाडे ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असता गावातील राजेंद्र पाटील कार्यालयात येवून सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागला. 'गावात मी लावलेल्या झाडांना ग्रामपंचायत पाणी का देत नाही?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महिला ह्याळील यांनी त्याची समजूत काढली असता राजेंद्रने त्यांनाच शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून हात धरून बाहेर काढले. हा प्रकार लक्षात येताच ह्याळीज यांचे पती कार्यालयात धावून आले मात्र पाटील यांनी त्यांनाही धक्क्बुकी व शिवीगाळ केली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर आज कालवा पूर्ण झाला असता

0
0

हरणबारी कालव्यावरून आमदार चव्हाणांचा गौप्यस्फोट

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे साहित्य बिजोटे येथील ग्रामस्थांनी तेव्हा फेकले नसते, तर आज हरणबारी प्रकल्पाच उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंत पूर्ण झाला असता, असा गौप्यस्फोट आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

या कालव्याच्या प्रश्नावरून नामपूर बाजार समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गोराणे गावाचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता आमदार चव्हाण यांच्या पत्रकामुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी सन २००५ सालापासूनच हरणबारी प्रकल्पाचा उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर आपणही सर्वेक्षण करण्यासाठी पत्रव्यवहार केला. या कामासाठी धनजंय धारणकर यांची नियुक्तीही केली होती. पोलिस संरक्षणात सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. मात्र बिजोटे येथील ग्रामस्थांनी सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे साहित्य पेकून देत ठाम विरोध दर्शविला होता. त्यामुळे या योजनेला खीळ बसली. अन्यथा तेव्हाच ही योजना मार्गी लागली असती, असा दावा आमदार दीपिका चव्हा यांनी केला आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. केद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व ग्रामविकास राज्यमंत्री दादाभुसे यांनी उपरोक्त योजना मार्गी लावावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी पारनेर ते सातमाने वाढीव कालव्यासाठी सन २००५ पासून सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी ११० दशलक्षघनफूट पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. बिजोटेकरांनी सर्वेक्षणात अडथळा निर्माण करून गोंधळ घातल्याने हा प्रश्न चिघळला होता. यानंतर मी सन २०१५ मध्ये पुन्हा पत्रव्यवहार केला होता, असे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा, नामपूरचा आज निकाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सटाणा येथील प्रशासकीय कार्यालयात तर नामपूर बाजार समितीची मतमोजणी बाजार समितीच्या राज्य वखार मंडळाच्या गोडाऊन मध्ये होणार आहे. सटाणा बाजार समितीच्या १३ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. नामपूर बाजार समितीच्या १३ जागांसाठी ३४ उमेदवार आहेत. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी गणाबरोबरच व्यापारी आडते व हमाल मापारी गणांची एकाच वेळी मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे. प्रत्येक गणासाठी एक स्वतंत्र असे १३ टेबल लावण्यात आलेले असून पोलिस बंदोबस्त देखील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० लाख लुटणाऱ्या संशयितांचे स्केच जारी

0
0

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान कायम

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलसमोर ब्रिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भरदिवसा २० लाख रुपये लुटणाऱ्या दोन संशयितांचे स्केच पोलिसांनी बुधवारी जारी केले. दरम्यान, या लुटीप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पोलिस यंत्रणेला आव्हान देणारी कामगिरी चोरट्यांनी केली आहे. पोलिसांनी फिर्यादी व अन्य काही व्यक्तींच्या मदतीने २० लाख रुपये लुटणाऱ्या दोन संशयितांचे स्केच जारी केले आहेत. भरदिवसा दुचाकीवरून आलेल्यांनी फिल्मी स्टाइल लूट केल्याने व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली होती. संशयित चोरटे हे नक्कीच ब्रिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मागावर होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ब्रिक्स कंपनीचे कर्मचारी पैसै घेण्यासाठी ज्याठिकाणी गेले तेथील सीसीटीव्ही फुटेजची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र, अद्याप २० लाख लूट प्रकरणी पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा लागू न शकल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याच्या वादातून फोडल्या जलवाहिन्या?

0
0

खायदे, गिलाणे गावातील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील गिरणा नदीलगतच्या खायदे व गिलाणे गावातील शेतकऱ्यांमध्ये पाण्यावरून आपापसात झालेल्या वादातून गिलाणे येथील सुमारे २० ते ३० शेतकऱ्यांच्या शेतात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी गिलाणे येथील शेतकरी शेतात कामासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

गिरणा डॅमच्या बॅक वॉटर परिसरात गिलाणे येथील शेतकऱ्यांनी शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी पाइप टाकले आहेत. तसेच वीज जोडणी देखील घेतल्या आहेत. बुधवारी सकाळी या परिसरातील शेतकरी शेतात कामासाठी गेले असता मोटार चालू करून देखील पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी पाइपलाइन तपासली असता अज्ञातांनी या पाइपचे तुकडे केल्याचे तसेच वीज जोडण्या खंडित केल्याचा प्रकार समोर आला.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांनी गिलाने येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी खायदे गावातील अज्ञातांकडूनच हा प्रकार घडला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पाटील यांनी खायदे गावातील शेतकऱ्यांशी देखील चर्चा केली. खायदे गावातील शेतकऱ्यांचा गीलाणे गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास विरोध आहे यावरून हा प्रकार घडला असावा, असे पाटील यांनी 'मटा'ला सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत पाटील यांच्या उपस्थित दोन्ही गावातील शेतकऱ्यांची तालुका पोलिस ठाण्यात बैठक सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडसाठी नव्याने सूचना

0
0

निफाडसाठी नव्याने सूचना

निफाड : शिवसेनेच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्जावर दाखल केलेल्या अपिलाच्या सुनावणीमुळे बुधवारी होणारी निफाड नगराध्यक्ष निवड पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेनेच्या अपीलावर सुनावणी झाली. आयुक्त राजाराम माने यांनी भाजप आघाडीचा उमेदवार एकनाथ तळवाडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवून जिल्हाधिकारी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नव्याने सूचना काढण्याचा आदेश दिला आहे.

भाजप उमेदवार एकनाथ तळवाडे यांच्या अर्जाला पुरेशी कागदपत्रे जोडली नसल्याने शिवसेना नगरसेवक जावेद शेख,किरण कापसे यांनी हरकत घेतली होती. यावर निवडणूक निर्णय अधिकारी भामरे यांनी तळवाडे यांच्या बाजूने निकाल देत अर्ज वैध ठरवला होता. त्यावर शेख व कापसे यांनी नाशिक आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. आयुक्त माने यांनी तहसीलदार यांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे बुधवारी रद्द झालेला नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी नाशिक यांना केला आहे. येत्या तीन दिवसात निफाड नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या निर्णयाविरोधातही शिवसेना नगरसेवक उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष मंडलेचा यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा वर्णी

0
0

महाराष्ट्र चेंबरची कार्यकारणी जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या कार्यकारणीची निवड बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी सागर नागरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. अध्यक्षपदासाठी संतोष मंडलेचा यांचा एकमेव अर्ज आला होता. तर इतर पदाची निवडही बिनविरोध झाली. पण, त्याची घोषणा झाली नव्हती; ती आता करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया ७ मे रोजीच झाली होती.

कार्यकारणीची निवड २०१८ ते २०२० अशी दोन वर्षांसाठी आहे. संतोष मंडलेचा यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अमित कामत, उत्तर महाराष्ट्र विभागातून उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा, मुंबई विभागातून उपाध्यक्षपदी गौतम ठाकूर, शुभांगी तिरोडकर, पश्चिम महाराष्ट्र विभागातून उपाध्यक्षपदी ललित गांधी, मराठावाडा विभागातून उपाध्यक्षपदी उमेश दशरथी यांची बिनविरोध निवड झाली.

नाशिक विभाग कार्यकारीणी २१ सदस्य पदासाठी भावेश माणेक, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, नीलिमा पाटिल, सुनिता फाल्गुने, सोनल दगडे, नेहा खरे, दीपाली चांडक, प्रेमलता मिश्रा, प्रशांत जोशी, अमित अलई, स्वप्नील जैन, प्रमोद पुराणिक, अविनाश कोठावदे, सचिन शहा, नितीन दहिवलकर, महेंद्र पटेल, प्रकाश बोकाडिया, सुरेश चावला, प्रमोद छाजेड, श्रीधर व्यवहारे यांची बिनविरोध निवड झाली.

अर्ज छाननी समितीत गणपत बेलणेकर, नीलेश कपाडिया यांनी काम पाहिले; तर तक्रार निवारण समितीत माजी अध्यक्ष खुशालचंद्र पोतदार, आशिष पेडणेकर व कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अधिकारी आज होणार निवृत्त

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाचे सचिव राजेंद्रसिंह मारवाडी यांच्यासह तीन अधिकारी गुरुवारी (दि. ३१) निवृत्त होणार आाहेत.

निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये मारवाडी यांच्यासह नाशिक विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक दिलिप गोविंद आणि जिल्हा परिषदेच्या निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक यांचाही समावेश आह. या तीन अधिकाऱ्यांचा औपचारिक सेवापूर्ती समारंभ गुरुवारीच दुपारी २ वाजता जेलरोडच्या कन्या कोठारी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक व्यक्ती कलेशी जोडलेला

0
0

प्रमोद कांबळे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रत्येक व्यक्तीमध्ये अंगभूत कला असते. मात्र, ती त्याला ओळखता येत नाही. प्रत्येक व्यक्ती कलेशी जोडला गेला आहे. त्याचा कलेशी नकळत संबंध आलेला असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले.

वसंत व्याख्यानंमालेत ३० व्या पुष्पात चित्रकार शिवाजी तुपे स्मृती व्याख्यानात 'सर्वांसाठी कला' या विषयावर ते बोलत होते. यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण येथे झालेल्या व्याख्यानप्रसंगी चित्रकार मुक्ता बालिगा, शैला सानप, अनिल तुपे, बाळ नगरकर उपस्थित होते.

प्रमोद कांबळे म्हणाले, की कला साक्षरता हा देखील विषय आहे. घरातील इंटेरिअर करताना ते घरासारखे असावे. त्याचे शोरूम नसावे. कलाकाराने योग्यरीतीने काम केले नाहीतर चुका होतात. चित्रकलेमुळे एकाग्रता वाढते. त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. सराव झाला तर काही करावे लागत नाही. चित्रकला ही एकमेव भाषा अशी आहे की ती सर्वांना समजते. जगातील चित्रकला ही पहिली भाषा आहे. चित्र सहजतेने कसे काढायचे याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. श्रीकांत येवलेकर यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता बालिगा यांनी तुपे याना आदरांजली अर्पण केली. श्रीकांत बेणी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images