Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विद्यार्थी वाहून गेला

$
0
0

कादवाच्या प्रवाहात

शाळकरी मुलगा बुडाला

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

लखमापूर गावाजवळील कादवा नदीपात्रात नववीतील समीर शंकर सोनवणे (वय १४) हा विद्यार्थी मंगळवारी वाहून गेला असून, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. समीर कादवा नदीवर बैलांना धुण्यासाठी घेऊन गेला होता. करंजवन धरणाचे पाणी सोडले असल्याने कादवा नदी भरून वाहत होती. समीर काठावर बैल धुवत असताना हातातील कासरा निसटला आणि जलप्रवाह वेगात असल्याने समीर पाण्यात फेकला गेला. ही माहिती गावात पोहोचताच त्याला शोधण्यासाठी तरुणांसह ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. आपत्कालीन विभाग व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बुधवारी पुन्हा शोधकार्य राबवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटक’चे आज आंदोलन

$
0
0

नाशिक : कंत्राटी, मानधनावरील कर्मचारी, कामगारांचे शोषण वाढले आहे म्हणून डावे पक्ष, कामगार संघटना यांच्यावतीने जन अधिकार जन आंदोलन देशभर बुधारी (दि. २३) देशभर आंदोनल करण्यात येणार आहे. नाशिकमध्येही आंदोलन होणार आहे. आयटक कामगार संघटना नाशिक जिल्ह्याची बैठक जिल्हाध्यक्ष कॉ. व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सरचिटणीस कॉ. शाम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुंबई येथे ५ मे रोजी झालेल्या राज्य कौन्सिल निर्णयाची माहिती शाम काळे यांनी दिली. नाशिक महाराष्ट्रातील शेतकरी-कामगार चळवळीचे केंद्र आहेत. महाराष्ट्र आयटकचे येत्या नोव्हेंबरमध्ये राज्य अधिवेशन नाशिक येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आक्रोश मोर्चात सहभागी व्हा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेचे प्रशासक थकीत कर्जदारांकडून संपूर्ण व्याजासहित वसुली करत आहे. मात्र ठेवीदारांना ठेवींवरील व्याज न देता १०० टक्के परताव्याची पावती देऊन प्रत्यक्षात २० टक्के रक्कमेचाच परतावा दिला जात आहे. ठेवीदारांवर होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडून हक्काचा पैसा परत मिळविण्यासाठी येत्या ३१ मे रोजी जळगाव येथे आयोजित 'आक्रोश मोर्चा'मध्ये राज्यातील पतसंस्थेच्या सर्व ठेवीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरा यांनी केले. येथील राजस्थानी मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी पतसंस्थेच्या राज्यातील ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्ष सुधाकर पाटील, धनसिंग वाघ, पन्नालाल भांगडिया, राजकुमार सोनी, योगेश मोगरे, भास्कर शिरसाठ, कैलास मालपाणी आदी उपस्थित होते. बीएचआरमध्ये राज्यातील सर्वसामान्य ठेवीदारांच्या ७०० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मुदती संपल्यानंतरही त्या ठेवी परत मिळालेल्या नाहीत. पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व ठेवीदारांनी ३१ मे रोजी थेट जळगाव येथे आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही मंडोरा यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चल यार; धक्का मार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीचा भडका असह्य होऊ लागल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. महागाईच्या झळा सोसवेनाशा झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करून अनोख्या पध्दतीने दरवाढीचा निषेध नोंदविला. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

भाजप सरकार दररोज इंधनाचे दरवाढ करीत असून, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. रुग्णवाहिका लोटत आणून ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभी करण्यात आली. याखेरीज आंदोलकांनी त्यांची वाहनेही प्रवेशद्वारावर सोडून दिली. या वाहनांची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे फलकही यावेळी लावण्यात आले. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर अवलंबून आहे, असे सांगत सरकार स्वत:ची जबाबदारी झटकू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमध्ये इंधनाचे दर कमी होऊ शकतात. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित करीत सरकारचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला. मोदी सरकारने ग्राहकांची मोठी लूट चालविल्याचा आरोप स्वाभिमानीचे हंसराज वडघुले यांनी केला. राज्यात दुष्काळ जाहीर केला जात नाही. परंतु पेट्रोल, डिझेलवर 'दुष्काळ कर' आकारला जातो. ही दुटप्पी भूमिका सोडावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात नितीन रोटे पाटील, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, योगेश कापसे, मनोज भारती, शरद लभडे, विक्रम गायधनी, अ‍ॅड. वायचळे, दर्शन बोरस्ते, नीलेश कुसमाडे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीसाठी दोघींची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागामधील (आयबीबी) दोन विद्यार्थिनींना यावर्षीची प्रतिष्ठेची 'आयएएस शिष्यवृत्ती' मिळाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देशातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांबरोबर दोन महिन्यांच्या काळासाठी थेट काम करण्याची संधी देण्यात येते.

यावर्षी आयबीबीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या नताशा केळकर आणि मैत्रेयी पूर्णपात्रे या विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत नताशा हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिक डॉ. इंद्रजीत कौर यांच्याबरोबर काम करणार आहे. नताशा मायओपिया आणि ग्ल्युकोमासंदर्भात कौर यांच्यासमवेत काम करणार आहे. या संधीमुळे उत्साह वाढला असून मी लवकरात लवकर लॅबमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे, अशी भावना नताशाने व्यक्त केली.

मैत्रेयी बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील प्रख्यात वैज्ञानिक डॉ. संदीप ईश्वरप्पा यांच्याबरोबर काम करणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी देशभरातील प्राप्त झालेल्या अर्जांनंतर अकादमीकडून निवडक प्रतिभावान उमेदवारांची निवड केली जाते. या पार्श्वभूमीवर नताशा व मैत्रेयीची झालेली निवड ही विद्यापीठासाठी व विशेषत: आयबीबीसाठी अभिमानाची बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा डेंग्यू संकट!

$
0
0

मिशन टास्क फोर्सची स्थापना; चारशे कर्मचाऱ्यांकडून होणार प्रबोधन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत डेंग्यू पुन्हा परतत असल्याचे चित्र आहे. मे महिन्यात ३९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीपासून संशयित आणि बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबदारीच्या उपयायोजना सुरू केल्या आहेत.

जानेवारीपासून आतापर्यंत २३५ संशयित रुग्ण आणि ४३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी महापालिकेने स्वच्छ नाशिक, स्वस्थ नाशिकचा नारा देत डेंग्यू नियंत्रणासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यात जवळपास चारशे कर्मचारी हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यूच्या प्रकोपाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेल्या डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी डिसेंबर उजाडला होता. परंतु, जानेवारीपासून डेंग्यूचे पुनरागमन होत असल्याचे चित्र आहे. जानेवारीत डेंग्यूचे ७८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर फेब्रुवारीत ५५, एप्रिलमध्ये २५ तर मेमध्ये आतापर्यंत ३९ रुग्ण संशयित आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत २३५ संशयित रुग्ण आणि ४३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाने डेंग्यूच्या पुनरागमनाची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेतली आहे.

डेंग्यू नियंत्रणासाठी मलेरिया विभागाचे २६८ कर्मचारी, १५३ आशा वर्कर्स आणि ३० बहुउद्देशीय सेवक मिळून जवळपास ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवून डेंग्यूच्या डासांबाबत जनजागृती करण्याचे काम देण्यात आले आहे. डेंग्यूचे डास हे झोपडपट्टीऐवजी स्वच्छ पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी सापडतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन घरातील फ्रिज, मनीप्लांट आणि वॉटर कुलरसह टाक्यांचीही तपासणी केली जात आहे. स्वच्छ नाशिक, स्वस्थ नाशिक असा नारा देत हे कर्मचारी जनजागृती मोहीम राबवत आहेत. पावसाळा सुरू झाल्यास डेंग्यूचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने अगोदरच ही मोहीम हाती घेतल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.

डेंग्यूचा वाढता प्रकोप

महिना संशयित रुग्ण बाधित रुग्ण

जानेवारी ७८ ९

फेब्रुवारी ५५ ११

मार्च ३८ ८

एप्रील ३५ ३

मे ३९ १२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृह नोंदणीला कडक नियमांमुळे खीळ

$
0
0

८० टक्के संस्था बंद पडण्याची भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे संगोपन करणाऱ्या राज्यातील सर्वच बालगृहांची नोंदणी अभावी तारंबळ उडाली आहे. कडक नियमांमुळे बालगृहांची संख्या आटोक्यात राहण्याची शक्यता वर्तवली असून, नवीन निर्बंधामुळे तब्बल ८० टक्के बालगृह बंद पडण्याची शक्यता संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील सर्वच बालगृहांना महिला व बालविकास विभागाकडे नोंदणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात एक वर्ष शिक्षा किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. बालगृहांची नोंदणी झाल्यामुळे अवैध संस्थाचालकांना चाप बसू शकतो.

बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने राज्य बाल न्याय नियम २०१८ लागू केले आहेत. या कायद्याच्या कलम ४१ (१) नुसार विधीसंघर्षित आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत व इच्छूक असलेल्या सर्व स्वंयसेवी संस्थांना २० मेपर्यंत नोंदणी करून तसे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिकसह राज्यातील काही संस्था बालकांचा सांभाळ करतात. अशा संस्था मोठ्या प्रमाणात निधीची जमवाजमव करतात. मात्र, या संस्थांची नोंदणीच महिला व बाल विकास विभागाकडे नसल्याने संस्थाचालक मनमानी करतात. त्यास यामुळे चाप बसणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याउलट, ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेली मुदत फारच कमी होती. तसेच वेबसाइटची कासवगती आणि ऐनवेळी टाकण्यात आलेल्या कडक नियमांमुळे मुदतीपर्यंत अवघ्या २० टक्के संस्थाचालकांची नोंदणी झाली असल्याची माहिती संस्थाचालकांच्या संघटनेने दिली. मुलांची संख्या वाढवून अनुदान लाटणाऱ्या संस्थांना नवीन नियमांमुळे अटकाव बसणार असून, नियमांची पूर्तता करणाऱ्या संस्थांना भरीव आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.

कोर्टात दाद मागणार

राज्यातील महिला व बालविकास विभाग करत असल्याचा आरोप करत या प्रक्रियेला संघटनेचा विरोध कायम असून याबाबत कोर्टात दाद मागण्याचा इशारा बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी जोशी, रवींद्रकुमार जाधव, माधवराव शिंदे, रमेश सरपते, लालजीबा घाटे, संजय गायकवाड, देविदास बच्छाव, राम शिंदे, गंगाधर भालाधरे यांनी दिला आहे.

ऐनवेळी अटींचा भडीमार

ऑनलाइन नोंदणीसाठी आयुक्तालयाने १७ मे रोजी पत्र प्रसिद्ध केले. यात नीती आयोगाकडे नोंदणीची सक्ती आणि पायाभूत सुविधांमध्ये इमारतीचा मालमत्ता कर भरल्याची पावती अपलोड करण्याबाबत सूचित करण्यात आले. या दोन्ही अटी अवास्तव असून, संस्थाचालकांची कोंडी करण्याचा खोडसाळपणा असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कार्यरत संस्थांना ऑनलाइन होताना अडथळा यावा तसेच माहिती अर्धवट राहून संस्थांवर कारवाई व्हावी यादृष्टीने विभागाने अडथळे निर्माण केले. ऐनवेळी क्लिष्ट अटींचा समावेश झाल्याने ८० टक्के संस्था बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.

- आर. के. जाधव, कार्याध्यक्ष,

बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अंदाजे १४० ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुगल मॅपवर MRSAC चे नकाशे सुपर इंपोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्यासाठी तहसीलदारांना १८ जूनपर्यंत मुदत दिली आहे. तलाठी आणि ग्रामसेवकांना स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे तसेच अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण निश्चितीचे काम २५ जूनपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. ३० जूनपर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रभाग रचनेला मान्यता देणे अपेक्षित असून, ७ जुलैला विशेष ग्रामसभा बोलावून प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी १३ जुलैला जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. २० जुलैपर्यंत हरकती सादर करण्यात येणार असून, ३१ जुलैपर्यंत उपजिल्हाधिकाऱ्यांना त्या अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत. प्राप्त प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला ६ ऑगस्टपर्यंत अंतिम मान्यता देणे अपेक्षित आहे. या अंतिम रचनेला जिल्हाधिकारी ९ ऑगस्ट रोजी व्यापक प्रसिध्दी देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडको दहशतीखाली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको / म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात करवाढीवरून अगोदरच आगडोंब उसळला असतानाच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोवर हातोडा फिरविण्याची तयारी सुरू केल्याने सिडकोतील रहिवासी दहशतीखाली आले आहेत. दोन दिवसांतच सिडकोच्या २४ हजार घरांपैकी पाचशे घरांवर अतिक्रमणाचे रेखांकन करण्यात आल्याने अतिक्रमणाच्या कारवाईने स्थानिक रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत.

परिसरात मंगळवारी रेखांकनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी घेराव घालत मोजणीला तीव्र विरोध करीत जाब विचारला. परंतु, तरीही रेखांकन सुरूच ठेवल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आधी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मग आमचे अतिक्रमण काढा, अशी भूमिका सिडकोच्या रहिवाशांनी घेतली आहे, तर महापालिकेच्या या अतिरेकाविरोधात आता नगरसेवकांसह आमदारही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

शहरातील अनधिकृत बांधकामांबरोबरच सिडकोतीलही अनधिकृत बांधकामांबाबतही अनेक तक्रारी महापालिकेकडे केल्या जात आहेत. शनिवारी झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमात अनेकांनी अतिक्रमणांच्या तक्रारी केल्याने आयुक्‍तांनी सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर रेखांकन करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी शिवपुरी चौकातील सुमारे दीडशे घरांवर महापालिकेने रेखांकन केले. त्यावेळी नागरिकांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे मंगळवारी दुपारपासून महापालिकेने तानाजी चौकात सुरुवातीला रेखांकनास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे आधी काढा, मगच गल्लीतील अतिक्रमणे काढा, अशी सूचना करून या रेखांकन कामास विरोध दर्शविला. मात्र, महापालिकेने या ठिकाणी रेखांकनाचे काम पूर्ण केले. त्यानंतर सिडकोतील रायगड चौक भागात रेखांकनास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी हे काम सुरू होताच परिसरातील नागरिक व महिलांनी अधिकाऱ्यांना हे काम करू नये, असे सांगून तीव्र विरोध केला. मात्र, कोणत्याही विरोधाला न जुमानता काही अधिकारी व कर्मचारी रेखांकनाचे काम करीतच होते. अखेरीस संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून या कामास विरोध केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

महापालिकेकडे सिडकोच्या योजना आता हस्तांतरित झाल्या आहेत. त्यापूर्वी सिडकोकडे यासाठी पाठपुरावा सुरू होता. सिडकोने यासंदर्भात परवानग्याही दिल्या आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन परवानग्या दिल्या असून, आधी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली. महापालिकेने ही रेखांकन कारवाई थांबावावी, अशी मागणी केली. यावेळी विभागीय अधिकारी व नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. आयुक्‍तांच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी आम्ही आयुक्‍तांना भेटतो, तुम्ही काम थांबवा, अशी मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विरोधाला न जुमानता संपूर्ण रायगड चौकातील अनधिकृत बांधकामांना रेखांकन केले. दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे पाचशे घरांवर रेखांकन करण्यात आले असून, मुख्य चौक पहिल्यांदा मोकळे करण्याच्या उद्देशाने हे रेखांकन करण्यात येत असल्याचे समजते. त्याचबरोबरच रेखांकन केलेल्या जागेवर १ जूनपासून केव्हाही हातोडा पडू शकतो, अशी चर्चा यावेळी होती.

---

आधी सिडकोवर कारवाई करा

सिडको : सिडकोच्या योजनांमध्ये झालेल्या बांधकामास सिडकोने परवानगी दिली असून, महापालिकेने पहिल्यांदा सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बांधकामांना परवागी दिली आहे, तरीही ते अनधिकृत ठरवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये यासंदर्भात तीव्र असंतोष असून, सिडकोतील अधिकाऱ्यांची शिक्षा आम्हाला का, असा सवाल ते विचारत आहेत. यावेळी काही युवकांनी रेखांकन करण्याच्या ठिकाणीच उभे राहून रेखांकनास विरोध केला, तरी सरकारी कामात अडथळा आणू नका, अशी सूचना करून महापालिका अधिकाऱ्यांनी रेखांकनचे काम सुरूच ठेवले.

अधिकारी, कर्मचारी धास्तावले

सिडको : सिडकोतील संपूर्ण २४ हजार घरांचे अतिक्रमण काढणार असल्याचे आयुक्तांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, रेखांकनासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध होत आहे. मंग‌ळवारी तर नागरिक आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या रेखांकनासाठी जाणारे अधिकारी व कर्मचाराही आता धास्तावले आहेत. अगोदरच संतप्त असलेल्या नागरिकांनी चुकीची पावले उचलल्यास कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे कर्मचारीही आता दहशतीखाली आले आहेत.

संघर्ष पेटण्याची चिन्हे

सिडको : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकीकडे शहरातील बड्या अतिक्रमणांकडे डोळेझाक करीत गोरगरिबांच्या अतिक्रमणांचा इश्यू केल्यावरून नगरसेवक व आमदारांनी आयुक्तांविरोधातच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सिडकोतील नागरिकांचा थेट मोठा मोर्चा महापालिकेवर काढण्याची तयारी सुरू केली आहे. आमदार सीमा हिरे, अपूर्व हिरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित मोर्चेबांधणी सुरू करीत थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंढे विरुद्ध सिडकोवासीय असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

---

मटा भूमिका

सिडको वसाहतीतील अतिक्रमित बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेची ही कारवाई योग्य की अयोग्य यावरून बरीच भवती न भवती सुरू असली, तरी तब्बल लाखभर नागरिकांशी संबंधित या मोहिमेमुळे वातावरणात तणाव आहे. कायदेशीर विचार केल्यास अतिक्रमण काढले पाहिजे यात शंका नाही. तथापि, दोन तपांहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या व तत्कालीन सिडको प्रशासनाकडून मंजुरी घेऊन बांधकाम करणाऱ्यांवर अशी धडक कारवाई पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करणे संयुक्तिक वाटत नाही. खरे तर वाहतुकीस अडथळा आणणारी, असुरक्षित अशी बांधकामे प्राधान्याने रडारवर घेतल्यास त्याला लोकांचाही फारसा विरोध राहणार नाही.

0000000000000000000

सिडकोवायीस धास्तावले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोड दृष्टीपथास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाक्यामधील १.१ किलोमीटर 'स्मार्ट रोड'चे सामासिक अंतरामुळे लांबलेले काम पुन्हा दृष्टीपथास आले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने एका बाजूने रस्त्याचे काम सुरू करण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. आता एकाचवेळी कलम २१० अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्यासह रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना येथील वाहतूक वळविण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याने स्मार्ट रोडच्या कामाला पुढील आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाक्यावरील मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ किलोमीटरचा मार्ग स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी १६ कोटींची तरतूद होऊन स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने बनविलेल्या आराखड्यानुसार, रस्त्याच्या दुतर्फा ७.५ मीटर जागा रस्त्यासाठी सोडून उर्वरित जागेत फूटपाथ, सायकल ट्रॅकची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकारात्मकतेचा वास तेथे आनंद निर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नकारात्मक स्वसंवाद दु:खास कारणीभूत ठरतो. स्वसंवाद सकारात्मक केल्यास आंनद मिळतो.  सकारात्मकतेचा वास असतो तेथे आनंद निर्मिती होते, असे प्रतिपादन अॅड. मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले.

ओम हास्य सरिता म्हसरुळ मेरी परिसर, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ  व गणेश अभ्यासिका यांच्यातर्फे वसंत व्याख्यानमालेत 'सकारात्मक स्वसंवाद आनंदाचे रहस्य' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.  म्हसरुळ येथे झालेल्या व्याख्यानास नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, व्याख्यानमाला अध्यक्ष अरविंद भामरे, हास्य सरिताच्या अध्यक्षा शोभा आहेर आदी उपस्थित होते. 

मधुरा क्षेमकल्याणी म्हणाल्या,  की आपला आनंद आपल्याजवळच असतो. कस्तुरी मृगासारखी माणसाची स्थिती असते. जीवनाच्या प्रवासात वाईट प्रसंग आले तरी आंनद घ्यायला हवा, दुःखाला यशाची शिडी लावता आली पाहिजे. दुःख हे सुद्धा भेट होऊ शकते. जीवनात प्रत्येक बघून आनंदी झाले पाहिजे. शरीर, मन, हृदयाचे उद्यान करता आले पाहिजे. निसर्गाने अनेक सुंदर गोष्टी दिल्या आहे. या गोष्टीचे आभार मानले पाहिजे. जसे आहेत त्यात आनंद बाळगा, मन साफ ठेवले पाहिजे.

व्याख्यानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे डॉ. भरत भुरे व अनंत भालेराव यांचा तसेच प्रयोजकांचा सत्कार करण्यात आला.

वसंत व्याख्यानमाला : म्हसरुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक फास्ट

$
0
0

दामू शिंगडा

सर्वांत श्रीमंत उमेदवार

पालघर ः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी पाच मुख्य उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खासगी व कौटुंबिक संपत्तीची विवरण माहिती दिली असून, त्यामध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसचे दामू शिंगडा ठरले आहेत. त्यांची संपत्ती आठ कोटी ९६ लाख आठ हजार ७७ रुपये आहे. भाजपचे राजेंद्र गावित यांची संपत्ती आठ कोटी ७७ लाख ५० हजार ३७९ रुपये, बविआचे बळीराम जाधव यांची संपत्ती दोन कोटी ३३ लाख नऊ हजार ३२७ रुपये, श्रीनिवास वनगा यांची संपत्ती ५४ लाख ४९ हजार ३६२ रुपये; तर सर्वांत कमी संपत्ती माकपचे किरण गहला यांची नऊ लाख ७८ हजार ८४ इतकी आहे.

..........

नेरुळमध्ये हातोडा

नवी मुंबई ः नेरुळमध्ये सिडकोच्या भूखंडावर बेकायदा बांधण्यात आलेल्या झोपड्या व एका आरसीसी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईला प्रकल्पग्रस्तांकडून विरोध करण्यात आला. परंतु, पोलिस बंदोबस्तामध्ये सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. नेरुळ सेक्टर ६ मधील १२.५ टक्क्यांचा आरक्षित असणाऱ्या भूखंडावर १५ ते २० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या.

............

तरुणाला मारहाण

नवी मुंबई ः जुन्या भांडणाच्या रागातून पनवलेच्या करंजाडे भागात राहणाऱ्या तरुणांच्या टोळीने त्याच भागात रहाणाऱ्या साजन कदम (२४) या तरुणाला बेस बॉल स्टिक आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात साजन जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल शहर पोलिसांनी तरुणांच्या टोळक्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

..............

शुल्कवसुली वादात

ठाणे ः घोडबंदर रोड परिसरात साकारण्यात आलेल्या 'जुने ठाणे-नवीन ठाणे' थीम पार्कवरून मंगळवारी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली होती. थीमपार्क पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना प्रतिव्यक्तीस ५० रुपयांचे आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ठराव केला का, तसेच पावतीही का दिली जात नाही, असा सवाल भाजपच्या नगरसेवकाने उपस्थित केला आहे. त्यामुळे या शुल्कवसुलीबाबत वाद निर्माण झाला आहे.

.............

बांधकामांवर कारवाई

पनवेल ः सिडकोच्या भूखंडावर वसविलेल्या झोपड्या मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केल्या. कळंबोली गावालगत आणि नौपाडा गावाजवळील बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना उभारण्यात होर्डिंगवर कारवाई करण्यात आली, मात्र मालकांनी स्वत: बॅनर उतरवू, अशी लेखी हमी दिल्यामुळे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली नाही.

........

खारफुटींची कत्तल

ठाणे ः ठाणे शहरामध्ये वॉटर फ्रंटडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या नावाखाली शहरालगतच्या खाडी किनाऱ्यावरील पाच महत्त्वपूर्ण कांदळवनांचा पट्टा नष्ट करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या गायमभुख परिसरातील कामादरम्यान सुमारे एक हजार ७४ ब्रास माती खारफुटींवर टाकण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाकडून आवश्यक असेलल्या परवानग्या नसल्यामुळे ही कामे थांब‌ण्याच्या सुचना दिल्यानंतरही ही कामे सुरू असून त्यामुळे मोठा हरितपट्टा नष्ट होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

.............

निष्काळजीचा गुन्हा

नवी मुंबई ः विमानतळाच्या कामासाठी पनवेल भागात सुरू असलेल्या भू-सुरुंग स्फोटातील दगड वरचा ओवळा गावातील काही घरांवर पडून नुकसान झाल्याचे आढळून आल्यानंतर अखेर पनवेल शहर पोलिसांनी विमानतळाच्या सपाटीकरणासह अन्य कामे करणाऱ्या टीआयपीएल, जेएमपीआयएल, गायत्री व जीव्हीके या कंपन्यांच्या कंत्राटदारावर निष्काळजीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

..........

गाडीचालक ठार

नवी मुंबई ः नवी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या होंडा एमेझ गाडीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या नीता ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात होंडा गाडीचा चालक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भातण बोगद्याजवळ घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या बसचालकाला अटक केली आहे.

..............

अवैध मद्यविक्री

नवी मुंबई ः पनवेल शहर पोलिसांनी दापोली गावात बेकायदा देशी व विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपये किंमतीचे देशी विदेशी मद्य जप्त केले आहे. पनवेल तालुक्यातील दापोली गावात बसस्टॉपजवळ एक व्यक्ती विनापरवाना मद्याची विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट फेसबुक अकाउंटने छळले सहाशेवर महिलांना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे महिलांना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ कॉल करणाऱ्या २६ वर्षांच्या तरुणास सायबर पोलिसांनी लातूर शहरातून अटक केली. या महाभागाने एकाच अकाउंटच्या मदतीने ६५८ महिलांना त्रास दिल्याचे समोर आले असून, तपासांती हा प्रकार फारच मोठा निघण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विश्वजित प्रकाशराव जोशी (वय २६, रा. लातूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

एमसीएचे शिक्षण घेतलेल्या जोशीला कोर्टाने २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. फेसबुक वापरणाऱ्या पीडित विद्यार्थिनीला सोनल शितोळे या नावाच्या अकाउंटवरून अश्लील मेसेज येत होते. विद्यार्थिनीने ते अकाउंट ब्लॉक केले. यानंतर सोनल जमाल या फेसबुक अकाउंटवरून पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. १७ मे रोजी हा प्रकार घडला. यामुळे वैतागलेल्या तरुणीने या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला असता धक्कादायक माहिती हाती लागली. या फेसबुक अकाउंटवरून एक तरुण जवळपास ६५८ महिलांना अश्लील मेसेज, तसेच कॉल करीत असल्याचे समोर आले. प्रकरणातील गांभीर्य ओळखून सायबर पोलिस स्टेशनच्या निरीक्षक जयश्री अनवणे, हवालदार किरण जाधव आणि कर्मचारी कृष्णा राठोड यांचे पथक लातूरकडे रवाना झाले. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी संशयित जोशीच्या मुसक्या आवळल्या.

संशयिताचे तब्बल २० बनावट अकाउंट!

पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले, की हा विकृत प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता आहे. संशयिताने महिलांच्या नावाचा वापर करीत तब्बल २० बनावट फेसबुक अकाउंट सुरू केले आहेत. त्यातील एका अकाउंटचे डिटेल तपासले असता संशयिताने ६५८ महिलांना त्रास दिल्याचे दिसते. महिलांना नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल करणाऱ्या संशयितांचे इतर अकाउंट तपासण्याचे काम अद्याप सुरू असून, हा आकडा मोठा असू शकतो, असे बोरसे यांनी स्पष्ट केले. एमसीएचे शिक्षण घेतलेला संशयित सर्वसामान्य कुटुंबातील असून, लॅपटॉप आणि मोबाइलच्या माध्यमातून तो उद्योग करीत होता. आजमितीस एकाच तरुणीची तक्रार समोर आली असून, अश्लील मेसेज किंवा कॉल महिलांना आले असतील तर त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.

महिलांनी घ्यावी काळजी

फेसबुकवर महिलांच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारण्यापूर्वी महिलांनी खातरजमा करायला हवी. आपल्या ओळखीतील असतील अशाच व्यक्तीला फ्रेंड लिस्टमध्ये जागा द्यायला हवी. अनेकदा विकृत माणसे महिलांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करून महिलांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर विकृत पद्धतीने व्हिडीओ कॉल करणे किंवा संदेश पाठवले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यास लुटणारे चौघे अटकेत

$
0
0

धुळे पोलिसांची कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील बसस्थानक परिसरात व्यापाऱ्यास पोलिस असल्याचे भासवून वाहनात कोंबून नेले. त्यानंतर या चोरट्यांनी व्यापाऱ्यास कारद्वारे महामार्गावर नेले. तिथे त्यांच्याजवळील रोकड लुटत त्यांना सोडून पळ काढला. याबाबत अमरतभाई पटेल यांनी पोलिसात तक्रार केली होती.

पोलिसांनी तातडीने चौकशी पथके नेमून या गुन्ह्यातील चौघांना अटक करीत रोकड, वाहनही जप्त केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे व शोध पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गुजरात मधील उमियानगर मोढेरा येथील व्यापारी सध्या जळगावमधील ईश्‍वर कॉलनीत वास्तव्याला आहेत. दि. १६ मे रोजी ते जळगाव-नंदुरबार बसने पहाटे ५.३० वाजता धुळे बसस्थानकावर उतरले. त्यानंतर सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते सुरत बसमध्ये चढत असता पोलिस असल्याचे भासवून दोघांनी त्यांना बसखाली उतरविले. तसेच चौकशीच्या नावाखाली बसस्थानकाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या इनोव्हा कारमध्ये कोंबले. या वेळी कारमध्ये आणखी दोघे होते. या चौघांनी अमरतभाई पटेल यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव रोडने तिसगाव-ढंढाणे शिवारात नेवून त्यांच्याजवळील २८ लाख १० हजारांची रोकड लूटली. शिवाय त्यांच्या जवळील मोबाइल हिसकावून सिमकार्ड व बॅटरी काढून घेत हॅण्डसेट त्यांना परत केला. तसेच त्यांना गाडीखाली उतरवून या चौघांनी गाडीसह पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पथके नियुक्त करीत तपासचक्रे फिरवली. या आधारे मुंबई स्थानिक पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यात वापरलेली एमएच. ०२, एयू. ९४८० ही इनोव्हा कार शोधून काढली. तसेच या गुन्ह्यातील म्होरक्या मुंबई पोलिसातील संजय देवराम पवार (५०, रा. म्हाडा पोलिस क्वॉर्टर), प्रथमेश पांडूरंग खनवेकर (२४, रा. इंदिरानगर), विजय मनोहर चंदणे (२९, रा. इंदिरानगर) व प्रवीण सुरेश सावंत (३३, रा. शिवसागर चाळ, महाराष्ट्र नगर) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील ११ लाख ५६ हजारांच्या रोकडसह १२ लाखांची इनोव्हा कार मिळून २३ लाख ५६ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण हत्येप्रकरणी चार जण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

एमआयडीसी परिसरात एका बारमध्ये दोन दिवसांपूर्वी बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या हर्षल साळुंखे याच्या हत्येप्रकरणी सातपूर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे, सुधीर भालेराव व मुकेश मगर अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणी हर्षलचा मित्र मृणाल घोडके याने सातपूर पोलिसात फिर्याद दिली होती. एमआयडीसीतील कुमार बारमध्ये मद्य पिण्याच्या वाद झाल्याने हर्षलला चार जणांनी मारहाण केल्याची माहिती मृणालने दिली होती. संशयितांनी हर्षलला बार बाहेर उचलून नेत सातपूरच्या महादेववाडीत आणले. तेथे त्यांनी हर्षलच्या डोक्यावर बिअरच्या बाटलीने जोरदार प्रहार केले. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्यांनीच हर्षलला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. हर्षलला मारण्याचे नेमके कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. मद्य पिण्यावरून झालेल्या वादात हर्षलचा मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रांनी चौकशीदरम्यान सांगितले.

हर्षल पाथर्डी फाटा परिसरातील शरयूनगरमधील रहिवाशी होता. मनमिळावू स्वभावाचा म्हणून तो परिचित होता. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी हषर्लच्या मित्रांनी केली होती. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक एस. जी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला

$
0
0

दिंडोरी : लखमापूर गावाजवळील कादवा नदीपात्रात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह बुधवारी घटनास्थळापासून दीडशे फूट अंतरावर सापडला. समीर शंकर सोनवणे (वय १४) असे त्या मुलाचे नाव असून तो मंगळवारी बैलांना पाणी पाजण्यासाठी नदीजवळ घेवून गेला होता. तेव्हा पाय घसून नदीत पडला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला होता. अखेरी आज गुरुवारी नाशिकहून अग्निशामक दलाच्या आपत्कालीन पथकाने बोटीद्वारे शोध घेतला असता नदीतील कपारीत समीरचा मृतदेह आढळून आला. समीर एकुलता एक असून, त्याचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेस पोलिस कोठडी

$
0
0

सातपूर : फायनन्स कंपनीचे वसुलीचे काम करणाऱ्या स्वप्नील पुंड या तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या महिलेस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वप्नीलने कामगारनगर येथील त्याच्याच ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याने माधुरी घावटे या महिलेच्या नावाचा उल्लेख आहे. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करीत संबंधित महिलेला अटक केली. तिच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. घावटे यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक योगेश देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण काढा, परंतु आधी दुसऱ्याचे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातील सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या सिडकोतीलही अशी बांधकामे काढण्याचा निर्धार महापालिकेने केल्याने सध्या सुरू असलेल्या रेखांकन मोहिमेमुळे सिडकोवासीय चांगलेच धास्तावले आहेत. अनेकांनी तर 'अतिक्रमण काढा, परंतु आधी दुसऱ्याचे' असा सूर लावल्याने प्रशासनासमोरही ही मोहीम सुरू कोठून करायची असा प्रश्न पडण्याची चिन्हे आहेत.

सिडकोच्या सहाही योजनांमध्येही सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झाल्याने सिडकोतील चौक व रस्ते राहिलेच नसल्याने सिडकोत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. आयुक्तांनी आयोजित केलेल्या वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात तर सर्वाधिक नागरिकांनी अतिक्रमणांच्याच तक्रारी करून आयुक्त मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली होती. त्यानंतर आयुक्तांनीही तातडीने अधिकाऱ्यांना सिडकोच्या मुख्य नकाशानुसार मोजमाप करून अनधिकृत बांधकामे पाडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सिडको परिसरात विविध ठिकाणी प्रशासनाने मोजमाप करून रेखांकन करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेकडून सध्या ऑनलाइन तक्रारींवर कारवाई करण्यात येत असून, त्यानंतर उर्वरित सिडकोतील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे समजते. सिडको परिसरात सुमारे २५ हजार घरे असून, त्यापैकी ९५ टक्के घरांनी अनॉधिकृत बांधकाम केल्याचा दावा याच परिसरातील नागरिक करीत आहेत. सिडकोतील अतिक्रमण निर्मूलन मोहीम भविष्यात वादग्रस्त ठरणार असून, प्रशासनाकडून नागरिकांचा विरोध कितपत डावलला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या पथकाबरोबर एकही पोलिस दिसत नसल्याने दोन्ही आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या वादाचीही चर्चा रंगू लागली आहे.

पहिल्या योजनेपासूनचा आग्रह

सिडकोच्या स्थापनेपासून आजपर्यंत अशा पद्धतीची एकही डक मोहीम न झाल्याने सिडकोतील नागरिक या रेखांकनामुळे धास्तावले आहेत. एकमेकांच्या अतिक्रमणांच्या तक्रारी करणाऱ्या नागरिकांच्या घरांवर जेव्हा मार्किंग करण्यास सुरुवात झाली, तेव्हा मात्र या नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईवर आक्षेप घेऊन या रेखांकनास विरोध केला असल्याचे दिसत आहे. यावेळी अनेक नागरिक अतिक्रमण काढण्याचे समर्थन करीत असल्याचे दिसून आले असून, अतिक्रमण काढा, परंतु पहिल्यांदा याच भागातील का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सिडकोत सर्वत्र अतिक्रमण असून, पहिल्यांदा ते काढा मगच आमचे अतिक्रमण काढा, अशी सूचना नागरिक करीत असल्याचे दिसत आहे. सिडकोचे अतिक्रमण काढायचे, तर पहिल्या योजनेपासून ते काढावे, अशी मागणीही काही जणांनी केली आहे.

सर्वपक्षीय एकीची अपेक्षा

सिडको : सिडकोत सध्या सुरू असलेल्या मोहिमेस परिसरातील विविध पक्ष, लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आपापल्या परीने विरोध करताना दिसत आहेत. मात्र, सिडकोतील सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. सिडकोने दिलेल्या परवानगीपेक्षा काही जणांनी वाढीव बांधकाम केले असले, तरी या सर्व परवानग्या सिडकोने रीतसर पैसे भरून नागरिकांना दिल्या आहेत. सिडकोने परवानगी दिली असल्याने हे बांधकाम अधिकृत असल्याचे मानले जात आहे. मात्र, तरीही महापालिकेने आता हेच बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर बुलडोझर फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाने अद्यापपर्यंत या वादात उडी घेतलेली नाही. मात्र, बुधवारी आमदार सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी याप्रश्नी उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे या मेाहिमेला विरोध होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, सिडकोतील सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारे या मोहिमेला विरोध करीत असले, तरी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले, तर त्याचा निर्णय निश्चितच चांगला लागू शकतो. अन्यथा या मंडळींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या चुकांची सुधारणा करण्याची वेळ राजकीय नेत्यांवर आली असून, आता तरी त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआरडीओ’ प्रयोगशाळेला पुरस्कार

$
0
0

डॉ. भट्टाचार्य ठरले सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नाशिकमधील प्रयोगशाळेला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच झालेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. एस भट्टाचार्य यांना सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दरवर्षी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा नाशिकस्थित 'डीआरडीओ'च्या ऊर्जस्वी पदार्थ उन्नत केंद्र (एसीईएम) या संक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेस दोन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रयोगशाळेचे सहसंचालक डॉ. एस. सी. भट्टाचार्य यांना रॉकेटच्या घन इंधनावरील प्रक्रिया विकासाच्या योगदानासाठी सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ हा पुरस्कार देण्यात आला. तर, आयुध आणि संसाधन अभियांत्रिकीचे महासंचालक पी. के. मेहता यांना सहकाऱ्यांसह क्षेपणास्त्राची क्षमता वाढविण्यास मदत करणाऱ्या घन रॉकेट इंधनावरील संशोधनातील कुशल योगदानासाठी विशिष्ट पुरस्कार देण्यात आला. या प्रयोगशाळेतील महाव्यवस्थापक श्रीनिवासन शेषाद्री, डॉ. भट्टाचार्य, राजेंद्र पाटील, एस. के. मंडल, अशुतोष शर्मा, मोहम्मद रहेमान, जी. सतीशकुमार, सी. एम. थोरात यांचा सन्मान करण्यात आला. दिल्लीतील डीआरडीओ भवनच्या कोठारी सभागृहात झालेल्या समारंभात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी 'डीआरडीओ'चे अध्यक्ष एस. ख्रिस्तोफर, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जी. सतीश रेड्डी, तिन्ही संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या दोन पुरस्कारांमुळे नाशिकचे नाव पुन्हा देशपातळीवर उंचावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा

$
0
0

प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव, मनमाड, देवळा, उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करा, या मागणसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्यास जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून व्यापाऱ्यांनी पैसे न दिल्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने या कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची नोटीस पाठवली होती. पण, त्यानंतही या शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेत उपनिबंधक कार्यालयावर प्रहार करण्यात आला. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर आतापर्यंत झालेले आंदोलनाची यादी सुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे उपनिबंधकाला दिली. आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार, नंदू शेवाळे, शिवदास पगार, संजय जाधव, विलास गुढे, शिवाजी सूर्यवंशी, सुकदेव वाकचौरे, संदीप अमृतकर, किरण गवळी यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

डाळिंब तोलाईबद्दलही तक्रार

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब मार्केटमधील तोलाई व हमालीबाबतही तक्रार यावेळी करण्यात आली. कृषी पणन विभागाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचेही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images