Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गावरान करवंदे खाताहेत भाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

करवंदांची गोडी चाखण्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच हौस असते. अशी ही उन्हाळी हंगामात येणारी काळीशार करवंदे अर्थात, डोंगराची काळी मैना सध्या चांगलाच भाव खाताना दिसत आहे. करवंदे घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी होत असून, उत्पादनाअभावी यंदा करवंदांचे भावही वधारले आहेत. एका किलोसाठी पन्नास ते साठ रुपयांचा दर आकारला जात आहे. छोटे माप पाच रुपये, मोठे माप दहा रुपये अशा पद्धतीने करवंदांची शहरातील सीबीएस, शालिमार, रेल्वेस्थानक व नाशिकरोड बसस्थानक परिसरात आदिवासी भागातून आलेल्या नागरिकांकडून विक्री केली जात आहे. जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ सुरगाणा आदी ठिकाणी असलेल्या डोंगराळ भागातून ही करवंदे शहरात विक्रीसाठी आणली जातात. पिकलेली करवंदे जाळ्यांमध्ये शिरून तोडण्याचे काम येथील स्थानिक महिला व मुले करीत असतात. करवंदांची जाळी काटेरी असते, त्यामुळे काट्यांतून करवंदे तोडने जिकिरीचे काम असते. विविध प्रकारच्या पानांचे द्रोण तयार करून ते द्रोण दहा रुपये याप्रमाणेदेखील हे आदिवासी बांधवबाजारपेठेत विक्री करीत असतात. गोड व काळ्या करवंदांना यंदा चांगली मागणी दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणपूर्तीअभावी महासभा तहकूब

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम महासभेवर झाला असून, शनिवारी गणपूर्तीअभावी महापौरांवर महासभा तहकूब करण्याची वेळ आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे सदस्य सहलीवर गेले आहेत, तर भाजपचे नगरसेवक दिशा नसल्याने सैरभैर झाले आहेत. अनेक नगरसेवक आकडेमोडीत व्यस्त आहेत. त्यामुळे १२२ पैकी जेमतेम १५ नगरसेवकांनीच हजेरी लावल्याने अखेरीस महासभा तहकूब करावी लागली.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महासभा बोलविण्यात आली होती. विधान परिषदेची आचारसंहिता असल्याने या महासभेत गेल्या महासभेत झालेले इतिवृत्त मंजुरीचेच विषय होते. त्यामुळे अगोदरच नगरसेवकांमध्ये निरुत्साह होता. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने बहुसंख्य नगरसेवक सहलीवर गेले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवकही सहलीवर गेले आहेत. त्यामुळे महापालिकेत यांची उपस्थिती शक्यच नव्हती. मात्र, भाजपने विधान परिषदेसंदर्भात कोणासोबत जायचे, याचा अद्याप निर्णय घेतला नसून, त्यांचे नगरसेवक सहलीवर गेलेले नाहीत. त्यामुळे भाजपचे नगरसेवक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्याही नगरसेवकांनी दांडी मारली. जेमतेम १२ ते १५ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी महापौरांनी महासभा तहकूब करण्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रग्ज तस्कराचा शस्त्र विक्रीचा धंदा उघड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी रणजीत मोरे (३२, रा. हरिविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा) या संशयिताचा शस्त्र खरेदी विक्रीचा धंदाही क्राईम ब्रँचने मोडून काढला आहे. मोरेने वेगवेगळ्या तिघा संशयितांना विक्री केलेल्या ७ देशी बनावटीच्या पिस्टलसह २५ काडतुसे हस्तगत करीत पोलिसांनी खरेदीदारांना अटक केली.

निगाहेबेन इम्तीयाज खान (रा. ओंकार रेसीडन्सी, टिटवाळा, कल्याण), दीपक राजेंद्र जाधव (रा. पंचवटी) आणि अमोल भास्कर पाटील (रा. म्हसरूळ टेक, शिवाजी चौक) अशी या तिघा खरेदीदारांची नावे आहेत. क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने १६ मे रोजी मध्यरात्री मोरेसह त्याच्या दोघा साथिदारांना ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पाथर्डी फाटा येथे अटक केली होती. पोलिसांना तपासात मोरेच्या अवैध शस्त्र विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रँचने वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून अटक केली. या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून, मोरे सदर कट्टे कोठून आणयाचा, खरेदीदारांनी हे कट्टे कशासाठी खरेदी केले हे समोर येणे बाकी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दिली. मुंबईतील ड्रग्ज तस्करांना अटक करणे तसेच अवैध शस्त्र विक्रीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख आदींनी प्रयत्न केले.

--

जानेवारीपासून २८ कट्टे जप्त

शहर पोलिसांनी जानेवारी ते मे या महिन्यापर्यंत तब्बल २८ गावटी कट्टे जप्त केलेत. या प्रकरणी ३२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदया इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

0
0

विद्या स्कूलचे घवघवीत यश

येवला  : 'आयसीएसई' मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर होताना येवल्यातील विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा यंदा एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. आस्था पटेल ही ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली. सिद्धेश कुशारे (९३ टक्के), साक्षी वाणी (८९ टक्के), पार्थ शिंदे (८८.४ टक्के), कशक ठाकूर (८८ टक्के), राजवीर परदेशी (८६.४ टक्के) तर लब्दी संकलेचा (८५ टक्के), सिद्धेश्वरी झाल्टे (८४.४ टक्के), साक्षी चोरडिया (८४.२ टक्के) व सय्यम साबद्रा (८०.६ टक्के) असे यश संपादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळ आवाहन

0
0

महिला मंडळ कॉलमसाठी आवाहन

--

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? दर आठवड्याला किंवा महिन्याला सगळे जण भेटतात? विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवित असालच! त्याचा प्रत्यक्षात किती जणांना फायदा झाला? आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांसह आपल्या मंडळाची माहिती आपण पाठवू शकता. त्यासाठी अश्विनी कावळे यांच्याशी ashwini.kawale@timesgroup.com या इ मेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच, आपल्या मंडळाविषयीची माहिती महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावरही पाठवू शकता. तेव्हा कुठलाही वेळ न दवडता तातडीने मंडळाची माहिती पाठवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाइम्स ग्रुपतर्फे २६ पासून प्रॉपर्टी फेस्टिवल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियातर्फे नाशिककरांसाठी प्रॉपर्टी फेस्टिवलचे होणार आहे. गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २६ आणि २७ मे रोजी सकाळी साडेदहा ते रात्री नऊ या वेळेत हा प्रॉपर्टी फेस्टिवल होईल.

या उपक्रमात शहरातील नामवंत विकसक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात आवाक्यातील घरे, लक्झरी फ्लॅट, टाउनशिप, रो हाउसेस, व्हिला, फ्लॅट, प्लॉट्स, वीक अँड होम, कार्यालये आदींच्या खरेदीसाठी माहिती उपलब्ध असणार आहे. इच्छुकांसाठी सहभागी विकसकांच्या वतीने आकर्षक योजनाही ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रदर्शनात रुंगटा ग्रुप, सम्राट ग्रुप, ड्रीम शेल्टर्स, श्रीयोग बिल्डर्स, मालपाणी ग्रुप, अनमोल नयनतारा ग्रुप, जय डेव्हलपर्स, एचडीएफसी आणि कारडा कन्स्ट्रक्शन्ससह विविध ग्रुप सहभागी होणार आहेत. घराचं स्वप्न साकारण्यासाठी या प्रदर्शनास उपयुक्त ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनकोंडी फुटण्यासाठी हवे नियोजन

0
0

उपनगर सिग्नलवर फायबर कोन बसविण्याची मागणी 

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल येथे उपनगरमध्ये जाणाऱ्या गाड्यांसाठी सिग्नलवर उभ्या असलेल्या अन्य वाहनांमुळे अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने या ठिकाणी लेन कटिंगसाठी ' फायबर कोन' ठेवल्यास सोयीचे होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.  त्यामुळे येथेील वाहनकोंडी फुटून वाहनचालकांना सोयीचे होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून उपनगर नाक्यावर सिग्नल  यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे रस्त्याने चालणे जिकरीचे होत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर नेहमी डावीकडे वळणाऱ्या वाहतुकीसाठी थांबणे बंधनकारक  नसते.

मात्र,  या ठिकाणी वळण्यासाठीदेखील अगोदर उभ्या असलेल्या वाहने जाण्याची प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने या सिग्नलवरून डावीकडे वळणारे रिक्षाचालक, चारचाकी व दुचाकीस्वार यांना डावीकडे वळण्यासाठी सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या बेशिस्त वाहनांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

वाहनचालकांना मनस्ताप

या सिग्नलवर बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार छोटेमोठे अपघात घडत असतात. त्याचबरोबर वाहनचालकांमध्ये हमरीतुमरी होऊन थेट मारामारीपर्यंत वाद पोहोचतो. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकरिता महापालिकेच्या नगररचना विभागाने येथील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जुना गंगापूर नाका सिग्नलप्रमाणे या ठिकाणीही त्वरित लेन कटिंगसाठी फायबर कोनची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून, हे करणे क्रमप्राप्त झाले आहे. 

अनेक परिसरातील रहिवासी वळण्यासाठी या सिग्नलवर अनेकदा ताटकळत उभे राहतात. यामुळे येथे लेन कटिंग करण्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे.

- प्रवीण जगताप, नागरिक  

अनेकदा या भागातून अंध, अपंग यांची ये-जा होत असते. याशिवाय इच्छामणी मंदिरासह  उपनगरच्या अन्य भागात  जाणाऱ्या  रिक्षाचालकांना डावीकडे  पुणे महामार्गाकडून डावीकडे वळण घेण्यासाठी उपाययोजना होणे अनिवार्य आहे.

-  राजू बेंद्रे, रिक्षाचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नगाठी जुळविण्याची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सर्वजातीय वधू-वरांना लग्नगाठी जुळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमतर्फे दि. २७ मे रोजी सर्वजातीय वधू-वर मेळावा (स्वजातीय व आंतरजातीय) आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे लग्नगाठी जुळविल्या जाणार आहेत.

हॉटेल एमराल्ड पार्क, मायको सर्कलजवळ, नाशिक येथे सकाळी १० वाजता या मेळा‌व्यास प्रारंभ होणार आहे. अनुपमशादी डॉट कॉमतर्फे आजपर्यंत विविध समाजांचे वधू-वर मेळावे / वेडिंग स्वयंवर झाले. या सर्व वधू-वर मेळाव्यांतून अनेकांचे लग्न जुळले आहेत. या पद्धतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमने प्रथम नोहेंबर २०१३ मध्ये केले होते. तेव्हापासून झालेल्या सर्व वधू-वर मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उपवधू-वर यांना लग्न जमेपर्यंत मदत व वेबसाइटवर नोंदणी ही सेवा मिळणार आहे. या मेळाव्यात ब्राह्मण, मराठा, सोनार, शिंपी, माळी, तेली, सुतार, चांभार, वंजारी, कोळी, जैन, श्वेतांबर व इतर सर्व समाजांचे वधू-वर संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उपवर-वधू यांना आपल्याच समाजातील व आंतरजातीय विवाह स्थळे बघता येतील, असे संचालक संजय लोळगे यांनी सांगितले.

यामध्ये स्वजातीय व आंतरजातीय, प्रथम विवाह, घटस्फोटित, विधूर, विधवा, अपंग, अंध इत्यादी सर्व वधू-वर सहभागी राहणार आहेत. आपणही या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. अंध, अपंग वधू-वरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुलींसाठी खास पैठणी भेट योजनाही ठेवण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले.

--

नोंदणीसाठी साधा संपर्क

या वधू-वर मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुपमशादी डॉट कॉम, शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, द्वारा- नाशिक (मोबाइल : ७४४७७८७४४७ किंवा ८३७८९१०९९९) येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसचा नाशिकमध्ये जल्लोष

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्नाटक विधानसभेत भाजपच्या बी. एस. येड्डियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून, देशात सुरू असलेल्या भाजपच्या दंडेलशाहीला कर्नाटकात रोखले गेल्याने नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार येणार असल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या निकालानंतर सर्व कार्यकर्त्यांनी लोकशाहीवरील विश्वास व्यक्त करून लोकशाही भारतात रुजलेली आहे हे आजच्या कर्नाटकातील राजकीय घडामोडींनंतर लक्षात आले आहे. यापुढे देशातील जनता भाजपची दंडेलशाही सहन करणार नाही, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेवक राहुल दिवे, सुनील आव्हाड, नितीन काकड, सचिन भुजबळ, महेश बाफना, अनिकेत गांगुर्डे, संदीप दिवे, गणेश आठवले, सचिन पगारे आदी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्रिस्तरीय समिती

0
0

जि.प.च्या सीईओंनी दिली आठवडाभराची मुदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामविकासात महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुढाकार घेतला असून, यासाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामसेवकांचे सर्व प्रलंबित प्रश्न पुढील आठवड्यापर्यंत निकाली काढण्यासाठी समितीला आदेश देण्यात आल्याचेही डॉ. गिते यांनी सांगितले. यामुळे ग्रामसेवकांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रकरणांचा निपटारा होणार असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

सिन्नर येथील ग्रामसेविकेच्या रजेचा अर्ज मंजुरीसाठी विलंब झाल्याने ग्रामसेवकांची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांच्या निदर्शनास आली. याबाबत तत्काळ माहिती घेऊन ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित संचिका कोणाकडे व किती दिवसांपासून प्रलंबित आहेत, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकारी एम. एस. कदम, सहाय्यक लेखाधिकारी के. एम. पटेल व कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवी आंधळे यांची समिती यासाठी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. या समितीने पुढील आठवड्यात विविध प्रलंबित विषयांबाबत माहिती घ्यायची आहे. यामध्ये कोणाकडे किती दिवसांपासून प्रकरण प्रलंबित आहे, याबाबत विहित प्रपत्रांत माहिती घ्यायची असून, प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढायची आहेत. पुढील आठवड्यात याबाबचा अहवाल सादर करण्याचे आदेशही डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामविकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामसेवकांचे रजा प्रकरण, वैद्यकीय देयके, कालबद्ध पदोन्नती, स्थायित्व प्रमाणपत्र आदी विषय तत्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकृषक कराची नवीन नियमानुसार आकारणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयीन लढाईमध्ये तब्बल १८ वर्षे अडकून पडलेला अकृषक सारा वाढविण्याबाबतची स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. या निर्णयामुळे जिल्हा यंत्रणेला महसूल वसुली करणे अधिक सोपे होणार असून, नवीन नियमानुसार सुधारित अकृषक कराची आकारणी करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

कृषक जमिनीवर शेतसारा आणि एनए झालेल्या अकृषक जमिनीवर सरकारकडून कर आकारला जातो. त्यापैकी अकृषक जमिनीवरील करात साधारणत: दर दहा वर्षांनी वाढ करण्याची तरतूद आहे. सरकारने यापूर्वी २००१ मध्ये अकृषक कर वाढविले होते. मात्र, २००५ ला त्या विरोधात आक्षेप घेण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. २०१० मध्ये अकृषक साऱ्यात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे २००१ पासून २०१७ पर्यंत अकृषक कराच्या दरात सरकारकडून वाढच केली गेली नाही. यंदाच्या आर्थिक वर्षापासून अकृषक कराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसे आदेश सरकारने जिल्हा यंत्रणेला निर्गमित केले आहेत. अकृषक करवाढीची आकारणी गटनिहाय होणार असून, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी बैठक घेतली. बैठकीला मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. नवीन नियमानुसार सुधारित अकृषक कराची आकारणी करण्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यात मालेगाव आणि नाशिक हे दोन मोठे विभाग आहेत. २००५ नंतरच्या टप्प्यानुसार सुधारित करातून नागरिकांनी भरलेल्या कराची रक्कम वळती करीत, उर्वरित थकीत व नवीन अकृषक कर नेमका किती होतो, याची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारनगर येथे तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारनगर येथे एका फायनान्स कंपनीची रिकव्हरी एजन्सी चालविणाऱ्या स्वप्निल पुंड (वय २५) या तरुणाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सातपूर कॉलनीत राहणाऱ्या स्वप्निलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पैशाची देवाणघेवाण असल्याचा उल्लेख आल्याने सातपूर पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. हवालदार दराडे अधिक तपास करीत आहेत.

सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेजवळ राहणाऱ्या स्वप्निलने एका खासगी फायनान्स कंपनीची रिकव्हरी करण्याची एजन्सी घेतली होती. कामगारनगर येथे त्या एजन्सीचे कार्यालयदेखील उघडले होते. शुक्रवारी या कार्यालयातच त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. गळफास घेण्यासाठी वापरण्यात आलेली साडी नवीकोरी असून, त्या साडीचे लेबलदेखील काढलेले नव्हते. गुरुवारी स्वप्निल घरी आलाच नाही. शुक्रवारी सकाळी कार्यालयातील कामासाठी आलेल्या मुलीने कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा प्रकार समोर आला. स्वप्निलच्या मोठ्या भावाचा विवाह नुकताच झाला होता. स्वप्निलच्या पश्चात आई, भाऊ, भावजय व बहीण असा परिवार आहे.

--

गुणवत्तेसाठी करार -२

अपघातांचे सत्र थांबेना -३

'आधार'साठी लगबगीस 'ब्रेक' -४

टार्गेट चुकतंय! -५

आम्ही ट्रेकवेडे -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान साहित्याचे आज वाटप

0
0

सोमवारी बॅलेट पेपरवर होणार मतदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तयारीचा आढावा घेतला. मतदान केंद्राध्यक्षांना मतदानप्रक्रियेसाठीचे साहित्य वाटप रविवारी (दि. २०) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदान केंद्रे सोमवारी मतदानासाठी सज्ज होणार आहेत. निवडणुकीसाठी सोमवारी, २१ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार असून, मतदारांना पसंतिक्रम नोंदवत मतदान करायचे आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ६४४ सदस्य मतदान करणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायत, नगर परिषद, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि नाशिक आणि मालेगाव महापालिकांचे सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी संबंधित तालुक्यांच्या तहसील कार्यालयांत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिकमध्ये महापालिका, भगूर नगर परिषद, देवळाली छावणी परिषद, नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे १६० मतदार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) यांच्या दालनात मतदान करू शकतील.

मतदारांना मोबाइल, पेजर, कॅमेरा यांसारख्या वस्तू मतदान केंद्रात नेण्यास मनाई असेल. पसंतिक्रम नोंदविण्यासाठी केंद्राध्यक्षांकडे असलेल्या पेनचाच वापर करणे अनिवार्य आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रविवारी सकाळी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मतपेटीसह मतपत्रिका, पेन, सील करण्याचे साहित्य, विविध प्रकारचे अर्ज अशा सुमारे ४३ प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या साहित्याचा वापर कसा करावा, तसेच या साहित्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणुकीचे साहित्य बंदोबस्तात संबंधित केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवरील तयारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असून, कर्मचाऱ्यांना या केंद्रांवरच मुक्काम करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दरोडेखोर जेरबंद

0
0

चांदवड चौफुलीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री चांदवड चौफुली परिसरात धडक कारवाई करीत आठ दरोडेखोरांना हत्यारांसह जेरबंद केले.

पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मालेगावकडून ७ ते ८ संशयीत एका पीकअप वाहनातून गुन्हा करण्याचे उद्देशाने नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने चांदवड चौफुलीनजीक शुक्रवारी मध्यरात्री या वाहनाला गतीरोधाकाजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. त्याचवेळी पथकाने पाठलाग करून वाहन अडविले. चालक आणि अन्य तीन जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. गाडीच्या मागे बसलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने त्यांना देखील शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी गाडीत असलेल्या दोन दुचाकींची तपासणी केली असता त्यात एक गावठी बनावट पिस्तुल, एक जिवंत काडतूस, दोन चॉपर, तलवार, टॉमी, दोन मिरची पूड पॅकेट असे शस्त्र आढळून आले. पोलिसांनी अजिजू रहेमान अतिक अहमद, मोहमद रफिक मोहम्मद युनुस, मोहमद मुन्नवर मोहम्मद फारुख, लईक अहमद अन्सार अहमद, असिफ खान उस्मान खान, शेख सईद शेख मज्जीद, मोहम्मद इस्माईल मोहम्मद इस्त्राइल, आरिफ अहमद मोहम्मद हुसेन (सर्व रा. मालेगाव ) या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांचा म्होरक्या अजिजू रहेमान यांच्या नियोजनानुसार हे सर्व मालेगाव-नाशिक महामार्गावर एखादे मालवाहू वाहन अडवून लूटमार करणार करणार होते. पोलिसांनी एकूण ३ लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अशोकस्तंभ परिसरातील मल्हारगेट पोलिस चौकी भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, हल्लेखोर दुचाकीस्वारांनी परस्परांच्या घरावर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिमान सानप (घनकर गल्ली), अविरत सानप (रामवाडी), अक्षय सानप (घारपुरेघाट), प्रितम आहिरे (सिडको), प्रसाद बोराडे, प्रशांत जाधव (आरटीओ कॉर्नर) आणि कृष्णा सानप (मल्हार गेट चौकी) अशी संशयितांची नावे आहेत. आशिष शिरसाठ (लोणार लेन) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित टोळक्याने हातात कोयते, लाकडी दांडे घेवून त्याच्या घरावर दगडफेक केली. 'तुमच्या मुलाला मारून टाकतो', अशी धमकी आशिषच्या आई-वडिलांना दिली. नंतर सर्व संशयित दुचाकीवर अशोक स्तंभकडे शिरसाठच्या शोधासाठी गेले. आहेर सोसायटीजवळ संशयितांनी पाठलाग करीत शिरसाठला गाठले. तेथे प्रसाद बोराडे याने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर तर अन्य एकाने त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, कृष्णा सानप याने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आशिष शिरसाठ, आदित्य शिंदे, आकाश शेंडे, अक्षय वानखेडे, मयुर सूर्यवंशी आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मल्हार गेट पोलिस चौकी परिसरात कृष्णाचा चुलत भाऊ अविरत आणि त्याचा मित्र प्रितम आहेर यांना सीबीएस परिसरात झालेल्या वादातून दमदाटी केली. त्यानंतर टोळके सायंकाळी आशिषच्या घरी गेल्याचा राग मनात धरून संशयितांनी सानपच्या घरासमोर हातात लाकडी दांडे, रॉड, चाकू घेवून मोटारसायकलींवर येत 'कृष्णा कोठे लपून बसला आहे', असे म्हणून त्याच्या फ्लॅटवर दगडफेक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

ओटीपी मिळवीत परस्पर खरेदी

बजाज फायनान्स कंपनीच्या ग्राहकाचा कार्ड नंबर आणि ओटीपीनंबर मिळवीत चोरट्यांनी २३ हजार रुपयांची परस्पर ऑनलाइन खरेदी केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी संपत दिवेकर (रा. केवलपार्क, अंबड सातपूर लिंकरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दिवेकर यांना ५ मे रोजी सकाळी मोबाइलवर भामट्यांनी संपर्क साधला होता. बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगणाऱ्या चोरट्यांनी कार्डवरील काही अंक सांगितले, त्यानंतर दिवेकर यांनी उवर्रीत आकडे सांगितले. दिवेकर यांना ओटीपी येताच चोरट्यांनी त्याच्याकडून तो मिळविला आणि ऑनलाईन खरेदी केली.

--

दाम्पत्याने लांबविले महिलेचे गंठण

अंगावर किडा पडला असल्याची बतावणी करून महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण सोसायटी आवारातील लॉण्ड्री व्यावसायीक दांम्पत्याने लांबविल्याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर चौक परिसरात घडली.

संजीवणी दुधाळे व आण्णासाहेब दुधाळे असे दाम्पत्याचे नाव आहे. स्मिता मनोरंजन परियकत (४१ रा. स्पेस ओरीयॉन, विश्वंभर हॉटेल मागे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परिसयकत यांच्या सोसायटीस लागून दुधाळे दाम्पत्यांची लॉन्ड्री आहे. मंगळवारी दुपारी स्मिता परियकत या भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. दुधाळे यांच्या लॉण्ड्री समोरून पायी जात असताना दाम्पत्याने त्यांना बोलावून घेतले. यावेळी संजीवनी दुधाळे यांनी तुमच्या अंगावर किडा पडला असून, मी काढून देते असे सांगितले. त्यामुळे स्मिता या पाठमोऱ्या उभ्या राहिल्या असता संशयित महिलेने गळ्यातील गंठण नकळत काढून घेत आपल्या पतीकडे स्वाधीन केले. ही बाब कालांतराने निदर्शनास आली. घटनेचा अधिक तपास महिला उपनिरीक्षक तेली करीत आहेत.

--

जनरल मुख्त्यारपत्राचा गैरवापर

जनरल मुख्त्यार पत्र लिहून देणारी व्यक्ती मरण पावलेली असतानाही ती जिवंत आहे, असे भासवून जमीन विक्रीचा दस्त नोंदविल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. अरुण दादाजी आहेर आणि सुनीता किशोर सूर्यवंशी अशी संशयिताची नावे आहेत. प्रकाश गांगोडे (रा. मखमलाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी आडगाव शिवारीतील ४० आर क्षेत्र जमीन खरेदीचे दस्त तयार केले. या जमिन विक्रीसाठी कृष्णा निकम यांनी जनरल मुख्त्यारपत्र लिहून दिले होते. मात्र त्यांचे निधन झाले असताना ते जिवंत आहेत, असे भासवून या मुख्त्यारपत्राच्या आधारे निर्मला देवरे, भाऊसाहेब निकम, प्रवीण देवरे यांच्यावतीने जनरल मुख्त्यार म्हणून अरुण आहेर आणि सुनीता सूर्यवंशी यांनी दुय्यम निरीक्षक वर्ग दोन यांच्या कार्यालयात बोगस घोषणापत्राद्वारे दस्त नोंदविला. म्हणून या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक क्राईम ब्रँचने पकडले ड्रग्जमाफिया

0
0

सव्वादोन किलो ड्रग्जसह दोघांना मुंबईतून अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेफेड्रोन अर्थात एमडी या ड्रग्जच्या तस्करी प्रकरणात शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचला मोठे यश मिळाले आहे. क्राईम ब्रँचच्या युनिट एकने मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथून २३ वर्षांच्या मुख्य सूत्रधारासह एका मध्यस्थास जेरबंद केले. पोलिसांनी सूत्रधाराकडून तब्बल २२०० ग्रॅम एमडी पावडरसह ८० लाख रुपये किमतीची कार जप्त केली. एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपींची संख्या पाचपर्यंत पोहचली असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली.

सफैउल्ला फारूख शेख (२३, रा. मिरारोड, मुंबई) आणि नदीम सलिम सौरठीया (३०, रा. नागपाडा, मुंबई) अशी या दोघांची नावे आहेत. यातील सफैउल्ला हा तस्करीचा सूत्रधार असून, नदीम हा दलाल आहे. पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन दिवस माग काढीत दोघांना अटक केली. पथकाने १६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रणजीत मोरे, पंकज दुंडे आणि नितीन माळोदे या तिघांना अटक केली होती. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता ड्रग्जचे कनेक्शन मुंबईत असल्याचे समोर आले. संशयित आरोपी दलाल नदीमकडून ड्रग्ज घेत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. एक ग्राहक असल्याचे भासवत पोलिसांनी नदीमच्या मदतीने सफैउल्लाला लोखंडवाला येथून मुद्देमालासह अटक केली.

पत्रकार परिषदेत डॉ. सिंगल म्हणाले, या गुन्ह्यात आणखी काही जणांना अटक होऊ शकते. आतापर्यंतच्या तपासात सैफउल्ला हा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सैफउल्लाचे वडील व्यावसायिक असून, हिंदी चित्रपटांसाठी ते फायनान्स करीत असल्याचे समजते. या गुन्ह्यात धनदांडग्यांचा समावेश असल्याने पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--

संशयितांच्या कोठडीत वाढ

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीच्या कोठीत २२ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर नव्याने अटक करण्यात आलेल्या नदीम आणि सफैउल्ला यांना कोर्टाने २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईचा ‘बार’

0
0

नाशिक : नाशिकरोड भागात गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ अतिक्रमित बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली असून, आता सोमवार(दि. २१)पासून गंगापूररोड परिसरातील अतिक्रमणांविरोधात कारवाईचा 'बार' उडणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतील अनधिकृत बांधकामेदेखील रडारवर असल्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस शहरात उद्ध्वस्त होणाऱ्या अतिक्रमित बांधकामांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---

बापू आश्रमावर हातोडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकाने शहरातील अनधिकृत बांधकामांसोबतच पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची तयारी केली आहे.

नदीपात्रात असलेल्या आसारामबापू आश्रमासह ग्रीन फिल्ड, विश्वास लॉन्स, तसेच गंगाजल नर्सरीवर हातोडा मारण्याची सज्जता महापालिकेने केली आहे. त्यामुळे सोमवारी पहिला जेसीबी आसारामबापू आश्रमावर चालविला जाण्याची शक्यता आहे. आश्रमात परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचा अहवाल नगररचना विभागाने दिला असून, त्यासंदर्भात नोटीसही बजावली आहे.

महापालिकेची परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या १६६ अनधिकृत लॉन्स, मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्यानंतर महापालिकेकडून सोमवारपासून या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही कारवाई गंगापूररोडवरील नदीपात्रात असलेल्या अतिक्रमणांपासून होणार आसारामबापू आश्रमाच्या काही भागासाठी नगररचना विभागाकडून यापूर्वी भागश: परवानगी घेण्यात आली आहे. परंतु, मंजूर बांधकामापेक्षा जास्त बांधकाम जागेवर उभारण्यात आले असून, त्यासाठी कुठलीही परवानगी न घेण्यात आल्याने आश्रमाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ग्रीन फिल्ड व विश्वास लॉन्स पूररेषत आहेत. गंगाजल नर्सरीच्या अतिरिक्त बांधकामास परवानगी नाही. त्यामुळे यांच्यावरील कारवाईपासून बड्या अतिक्रमणांविरोधातील कारवाईला सुरुवात होणार आहे.

दंडाकडे अनेकांची पाठ

राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण अंमलात आणले आहे. त्यानुसार अनधिकृत लॉन्सधारकांना धोरणात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी दंडात्मक शुल्क भरावे लागणार असले, तरी दंडात्मक कारवाई सुमारे ५० लाख रुपयांच्या पुढे जात असल्याने एवढ्या रकमेत नवीन लॉन्स उभारता येईल किंवा व्यवसाय बंद करणे परवडेल, असे सांगत प्रशमन संरचना धोरणाकडे अनेक लॉन्सधारकांनी पाठ फिरविली आहे.

-------------------

सिडकोत कारवाई अटळ

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोसाठी कोणताही वेगळा न्याय लावला जाणार नसून, सिडकोच्या प्लॅननुसार असलेल्या बांधकामाव्यतिरिक्तचे अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी केली.

सिडकोने प्लॅन बनवून घरांची विक्री केली आहे. कुटुंब वाढले म्हणून घर वाढवून अतिक्रमण केले, असे सांगणे चुकीचे असून, ड्रेनेज लाइन आणि जलवाहिन्यांवरसुद्धा अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाल्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमात स्पष्ट केले.

सिडकोतील अनधिकृत बांधकामांबाबत काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली असून, सिडकोतील अतिक्रमणांबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपली मते यापूर्वीच मांडली असल्याने आता आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आयुक्तांच्या स्पष्टोक्तीमुळे कारवाईवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आयुक्त म्हणाले, की सिडकोने प्लॅन बनवून घरे उभारली आहेत. मात्र, सध्या सिडकोतील ड्रेनेज लाइन आणि जलवाहिन्यांवरसुद्धा अतिक्रमित बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांना या सुविधा देताना महापालिकेची अडचण होत आहे.

सिडको पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात असल्याने अनधिकृत बांधकामांबाबत सिडकोला कोणताही वेगळा न्याय देण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकाम असेल तर ते पाडण्यातच येणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा आम्ही काढल्यावर त्याचा खर्च नागरिकांकडूनच घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे १ जूनपासून सिडकोतही अतिक्रमण निर्मूलन मोहीम व्यापक स्वरूपात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

--

दबाव आणून नका…

सिडकोतील अनधिकृत बांधकामांबाबत काही जण जनआंदोलन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करणार असतील, तर तसे त्यांनी करू नये. शहराच्या विकासासाठी अनधिकृत बांधकामे पाडणे आवश्यकच असल्याने ती कारवाई करण्यातच येईल, असे त्यांनी स्पष्ट करून एकप्रकारे राजकीय नेत्यांनाच दम भरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

--

शहर स्वच्छता सामूहिक जबाबदारी

पान ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परधाडीत घरफोडी

0
0

मनमाड : नांदगाव तालुक्यातील परधडी येथे चोरट्यानी एका घरातील एक लाख रुपये व सोन्याचे दागिने असा १ लाख ९२ हजारांचा ऐवज शिताफीने चोरून नेला. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी नांदगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परधडी येथील

पंढरीनाथ शिंदे हे शुक्रवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी दरवाजा उघडा ठेवून पडवीत झोपले असता चोरट्यांनी हात साफ केला. शिंदे यांच्या पत्नीला जाग आली असता त्यांनी आरडाओरड करताच चोराने पलायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला ५१ अतिक्रमणे उद्ध्वस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प 

 महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत जेलरोड परिसरात अनधिकृत बांधकामे, रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या  व दुकानांसमोरील शेड काढण्याची कारवाई करण्यात आली. शनिवारी झालेल्या या कारवाईमध्ये विविध ठिकाणची चार प्रकारांतील एकूण ५१ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली . 

 महापालिका  आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त आर. एम. बहिरम, अधीक्षक एम. डी. पगारे, नगररचनाचे अभियंता गावित, सोनार  यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या दोन पथकांनी एका जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली. कुठलीही परवानगी न घेता नागरिकांनी घरासमोर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उभारलेले शेड, टपऱ्या, दुकाने अशा प्रकारची  अनधिकृत बांधकामे व पत्र्यांचे शेड  यावेळी पाडण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

यापुढे महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरुद्ध अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलिसांत गुन्हेदेखील दाखल करण्यात येथील. त्यामुळे संबंधितांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोडतोड, फोडाफोडीला ऊत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत चुरशीच्या झालेल्या आणि सरतेशेवटी तिरंगीवरून दुरंगी झालेल्या नाशिक विधान परिषदेसाठी मतदानाला अवघे चोवीस तास शिल्लक राहिले असून, फोडाफोडीच्या राजकारणामुळे घोडेबाजाराला ऊत आला आहे. भाजपने भूमिका स्पष्ट केली नसल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यातच आता थेट लढत होणार आहे. या दोघांसाठी ही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. उमेदवारांनी शनिवारी 'लक्ष्मीदर्शन' खुले केल्याने मतदारांचे चेहरेही फुलले आहे. दरम्यान, भाजपने सहाणे की दराडे याबाबतचा फैसला करण्यासाठी रविवारी सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली असून, त्यात शिवसेनेला धडा शिकवण्यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या 'नरो वा कुंजरोवा' राजकारणामुळे सुरुवातीला तिंरगी असलेली ही लढाई आता दुरंगी झाली आहे. भाजपने अपक्ष उमेदवार परवेझ कोकणींबाबत स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने आता राष्ट्रवादीचे सहाणे आणि शिवसेनेचे दराडे यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. त्यातच शनिवारी उमेदवारांनी आपले हात बऱ्यापैकी खुले केल्याने मतदारांची चंगळ झाली आहे. निवडून येण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यातील दोन पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने सहकार्य केले नाही. विधान परिषद निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढविण्याचे ठरवले होते. ज्या ठिकाणी अधिक संख्याबळ, तिथे उमेदवार उभे करण्यात आले. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजप पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत विधान परिषदेबाबत निर्णय झाला नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. पक्षाची भूमिकाही स्पष्ट होत नसल्याने भाजपचे मतदार सैरभैर झाले आहेत. भाजपच्या एका गटाने तर आपल्या सोयीच्या उमेदवाराला पाठिंबाही दिल्याचे समजते. पक्षाचा निर्णय काहीही असला तरी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपमध्ये खदखद असून, गटबाजीचे चित्र कायम आहे. त्यामुळे चुरस अधिक वाढली आहे.

भाजपचा आज निर्णय

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सहाणे की शिवसेनेचे दराडे यांना पाठिंबा द्यायचा, याबाबतचा भाजपचा निर्णय रविवारी होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत कोणाला मतदान करायचे, याचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. अधिकृत निर्णयानंतर मतदारांना पक्षाचा व्हिप बजावला जाणार असल्याचे सांगत, भाजपने कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यातच शिवसेनेशी आमचा संबंध नसल्याचे सांगत पाठिंब्यासंदर्भात मतदारांबाबत अफवा पेरल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे भाजपच्या आजच्या निर्णयाकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images