Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाड्याची रिक्षा पळविली

0
0

जेलरोड : तोंडी भाडे कराराने चालविण्यास दिलेली नवी रिक्षा घेऊन विहीतगावचा एकजण फरार झाल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेख नासीर इमाम (४७, राजहिरा, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, वडाळारोड, नाशिक) यांनी २०१५ साली नाशिकरोड बँकेकडून कर्ज घेऊन नवीन रिक्षा (एमएच- १५, इएच २२४५) घेतली. ती चालवणे परवडत नसल्याने शेख यांनी शालिमार येथील राम फंड यांच्या ओळखीने विहीतगाव येथील सुरेशलाल ठक्कर यांना ती चालविण्यास दिली. रोज दोनशे रुपये भाडे व रिक्षा ठक्कर याच्याच घरी लावण्याचा तोंडी करार झाला. सुरेश ठक्कर याने पंधरा-वीस दिवस भाडे व्यवस्थित दिले. नंतर ते देणे बंद केले म्हणून शेख यांनी राम फंड यांना घेऊन विहीतगाव व शहरात अन्यत्र ठक्करचा तपास केला. मात्र, ठक्कर रिक्षासह फरार झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याने शेख यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


..अन् मंगलाष्टकांविनाच गेली वधू सासरी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शुभविवाह म्हटला की वाद्यांचा दणदणाट...हौस मौज...नटणे-थटणे...वऱ्हाडी मंडळींचा मानमरातब …असा सर्वत्र आनंदीआनंद आणि धावपळ असते. …परंतु, सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनीतील रोहिणी गोदडे या नववधूच्या अंगाला हळद लागत असतानाच सख्खी चुलत बहीण सुनंदा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन वडिलांच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत नववधू रोहिणीचे चुलते विजय गोदडे यांचा मृत्यू झाला. ऐन आनंदाच्या क्षणीच या लग्नघरी दुःखाचा डोंगर कोसळल्याची साक्ष देणारा फाटका लग्नमंडप दुसऱ्या दिवशी रिकामाच वाऱ्यावर फडफडत असल्याचे दिसून आले. मंगलाष्टके न म्हणताच अगदी साध्या पद्धतीने विवाह लावून नववधूला सासरी पाठविण्यात आले.

अश्विनी कॉलनीतील विजय गोदडे यांची पुतणी रोहिणीचा शुभविवाह शुक्रवारी (दि.२७) होता. गुरुवारी रात्री नववधू रोहिणीच्या अंगाला हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदात सुरू असताना विजय गोदडे यांची मुलगी सुनंदा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली तिच्या वडिलांच्या अंगावर पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत मुलगी सुनंदा वाचली, परंतु वडील विजय गोदडे यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे या लग्नघरी शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशीही या लग्नघरासमोर असलेला फाटका व वाऱ्यावर फडफडणारा मांडव निर्मनुष्य दिसून आला.

जेवणही अर्धेच राहिले

अश्विनी कॉलनीतील म्हाडा घरकुल योजनेतून मिळालेल्या घरात विजय गोदडे यांचे कुटूंब पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते. विजय यांच्या मोठ्या भावाचाही एक वर्षभरापूर्वी मृत्यू झालेला असल्याने पुतणीचे कन्यादान विजय गोदडे करणार होते. गुरुवारी रात्री इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी विजय गोदडे मंडपाजवळ बसलेले होते, तर त्यांची मुलगी सुनंदा पाचव्या मजल्यावरील घरात जेवणासाठी गेली होती. जेवण करतानाच ती लोखंडी शिडी लावून गच्चीवर गेली आणि तोल जाऊन पडली. तिचे जेवणाचे अर्धे ताट बघून शनिवारी तिच्या कुटुंबियांना दु:खाचे कढ येत होते.

मंगलाष्टकांविनाच झाले लग्न

या दुर्घटनेमुळे नववधू रोहिणीचे लग्नही आटोपते घेतले. मंगलाष्टकांचे सूरही उमटले नाहीत. …एक औपचारिकता पूर्ण केली. असे सांगताना नववधूची मोठी बहीण शैला हिच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. नववधू तिच्या सासरी गेली, परंतु या लग्नघरातील सर्वजण दुसऱ्या दिवशीही शोकमग्न दिसून आले.

टेरेसच्या भिंतींचे बांधकामही सदोष?

अश्विनी कॉलनीत पालिकेने घरकुल योजनेंतर्गत प्रत्येकी ८० फ्लॅटच्या पाच इमारती बांधलेल्या आहेत. या इमारती पाच मजल्यांच्या आहेत. या सर्व इमारतींच्या टेरेसवरील भिंती अत्यंत कमी उंचीच्या असल्याची माहिती या घरकुलांत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी दिली. या भिंती पुरेशा उंचीच्या बांधलेल्या असत्या तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती, अशी प्रतिक्रियाही येथील रहिवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्यानधारणा केंद्रात युवतीचा विनयभंग

0
0

मार्गदर्शकाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ध्यान धारणा करण्यासाठी आलेल्या युवतीचा मार्गदर्शकानेच विनयभंग करीत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित मार्गदर्शकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये पॉस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश अशोक झगझाँ (वय ३१, रा. सुंदरबन कॉलनी, लेखानगर, सिडको) असे संशयित आरोपीचे नाव आहे. लेखानगर येथील भावातीत ज्ञान केंद्र असून, तिथेच हा प्रकार घडला. साडेसतरा वर्षांची पीडित युवती या केंद्रात ध्यान धारणेसाठी येत होती. साधारणत: दोन ते तीन महिन्यांपासून १४ एप्रिल २०१८ पर्यंत मार्गदर्शन म्हणून काम करणाऱ्या योगेशने पीडित मुलीला मेडिटेशन करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून खासगी प्रश्न विचारले. या प्रकरणी कोणाला काही न सांगण्याबाबत धमकी देत संशयिताने विनयभंग केल्याचे युवतीच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी संशयित योगेशविरोधात विनयभंगासह पोस्को कायद्यातील कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निमसे करीत आहेत.

तडीपार बडगुजरला अटक

तडीपार केलेले असताना शहरात वास्तव्यास असलेल्या आणि तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या राहुल धनराज बडगुजर यास अंबड पोलिसांनी अटक केली. दि. २८ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवजीवन डे स्कूलजवळ, शिवशक्ती चौक, सिडको येथे ही कारवाई करण्यात आली. राहुल विरोधात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्यास या वर्षाच्या सुरुवातीलाच एका वर्षासाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही बडगुजर शहरात वास्तव्यास होता. त्यातच शनिवारी, तो तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी बडगुजरला अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी मनोहर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस स्टेशनमध्ये शस्त्रबंदी अधिनियमातील कलमांसह महाराष्ट्र मुंबई पोलिस अॅक्टमधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बसमधून उतरणाऱ्या तरुणीच्या बॅगवर डल्ला

बसमधून खाली उतरत असताना चोरट्याने तरुणीची बॅग लंपास केली. बॅगेत सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी तेजश्री पी. वाईकर (रा. सोमवार पेठ) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तेजश्री यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्या शिवशाही बसमधून (एमएच ०९ ईएम १२९७) ठक्कर बाजार बसस्थानक येथे पोहचल्या. बसमधून खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तेजश्री यांच्याकडील बॅग लंपास केली. या बॅगेत ८० हजार रुपयांचा लॅपटॉप, चार्जर, कपडे, पाच हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज होता. घटनेचा अधिक तपास हवालदार ए. आर. राठोड हे तपास करीत आहेत.

विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हा

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस विरोध करून महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या शांतीनगर झोपडपट्टीतील प्रशांत खरात, प्रवीण जाधव यांच्यासह इतर नागरिकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी अंकुश आंबेकर यांनी फिर्याद दिली आहे. शांतीनगर झोपडपट्टीतील मारूती शोरूमजवळील अतिक्रमण काढून टाकण्याचे काम विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागासह पोलिस कर्मचारी हे अतिक्रमण हटवत असताना संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कर्मचाऱ्यांना विरोध केला. तसेच धमकीवजा अरेरावी करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय पवार करीत आहेत.

अमृतधामला घरफोडी

अमृतधाम येथील दत्तात्रय नगर परिसरात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने २२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी आनंदा जीवन साबळे (३८) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आनंदा यांच्या घरी शनिवारी (दि. २८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोणी नसताना चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील २२ हजार रुपये काढून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रौलेट’मुळे युवकाचे अपहरण

0
0

८० हजारांची उधारी; संशयिताला अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रौलेट या ऑनलाइन जुगारात ८० हजार रुपये हरल्यानंतर पैशांचा तगदा सुरू झाल्यामुळे एक युवक बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पैशांचा तगादा लावणाऱ्या संशयिताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मात्र, यानंतरही अपह्रत युवकाचा शोध लागलेला नाही. हर्षल सदाशिव गाडेकर (वय २८, रा. गाडेकर निवास, हिरावाडीरोड, क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गाडेकरला कोर्टाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हर्षल आणि अपह्रत राहुल सेवकराम दर्डा (वय ४७, रा. ०८, ऋतुराज, अपार्ट. क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) हे एकाच परिसरात राहतात. त्यामुळे या दोघांची ओळख होती. राहुल कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. हे दोन मित्र रौलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत होते. यातूनच संशयित गाडेकर राहुलकडे सतत ८० हजार रुपयांचा तगदा लावत होता. रौलेटमधून पैसे मिळत नसल्याने तसेच, गाडेकरचा तगादा वाढत गेल्याने २६ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून राहुल बेपत्ता झाला. घटनेच्या दिवशी राहुल कामावर होता. शौचास जाण्याच्या बहाण्याने गेलेल्या राहुलचा नंतर कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यानच्या काळात संशयित गाडेकर राहुलच्या वडिलांच्या संपर्कात होता. राहुलच्या ठावठिकाणाबाबत एका ब्राह्मणास विचारले असून, दोन दिवसात तो परत येईल, असा विश्वास गाडेकरने राहुलच्या वडिलांना दिला. या दरम्यान दर्डा यांनी सातत्याने गाडेकरकडे राहुलबाबत विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातच रौलेट जुगार तसेच गाडेकरचे राहुलकडे असलेल्या पैशांबाबत दर्डा यांना माहिती मिळाली. दर्डा यांचा संशय बळावल्याने त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून गाडेकरविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी लागलीच गाडेकरला अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव करीत आहेत.

लवकरच तथ्य बाहेर येईल

हा प्रकार रौलेट या ऑनलाइन जुगाराच्या पैशांमधून झाला आहे. राहुलकडे संशयित आरोपी सातत्याने तगदा लावत होता. राहुलच्या अपहरणप्रकरणी गाडेकरला अटक करण्यात आली असली तरी राहुलचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणी चौकशी केली असता गाडेकर कधीही कोणत्या ब्राह्मणाकडे गेला नसल्याचे समोर आले आहे. राहुलचा शोध युध्द पातळीवर सुरू असून, लवकरच यातील सर्व तथ्ये बाहेर येतील, असे, सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक रौलेटच्या कचाट्यात

0
0

शहरातील २५ ते ३० हजार तरुण खेळतात जुगार

असा खेळतात जुगार

- रौलेट या जुगारात गोल चक्रीचा वापर केला जातो. यात काही आकडे असतात

- जुगारी नंबर सांगतो आणि चक्री गोल फिरवून त्यात छोटा बॉल टाकला जातो.

- बॉल ज्या क्रमाकांवर थांबतो, त्या क्रमाकांवर पैसे लावणाऱ्यांना लावलेल्या पैशांच्या अनेक पट पैसे परत मिळतात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रौलेट या ऑनलाइन जुगारात नाशिकमधील २५ ते ३० हजारांपेक्षा अधिक तरुण गुंतले आहेत. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असली तरी अद्ययावत स्मार्टफोनच्या माध्यमातून सुरू असलेले रौलेटचे रॅकेट उद्ध्वस्त करणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे.

राज्यात कधीकाळी हा जुगार फार लोकप्रिय होता. मात्र, फुकटचा पैसा जसा टिकत नाही तसा तो मिळतही नाही. त्यामुळे पोलिसांच्या सततच्या कारवाईंमुळे रौलेट सेंटर्स बंद झाले. शहरात रविवार कारंजा परिसरात असे सेंटर काही काळापूर्वी सुरू होते. मात्र, स्मार्टफोनचा वापर वाढला तसा जुगार खेळवणाऱ्यांनी आपला मोर्चा याकडे वळवला. आता स्मार्ट फोन्सवर रौलेट ऑनलाइन खेळला जातो. यासाठी एक मोठा एजंट असून, तो वेगवेगळ्या एजंटामार्फत पैशांची देवाण-घेवाण करतो. कमी श्रमात पैशांची हाव ठेवणारे युवक एजंटांच्या संपर्कात आले की ठराविक रक्कम युवक एजंटच्या हाती सोपवतात. यानंतर एजंट झेंडरसारख्या अॅप्लिकेशनच्या मदतीने रौलेटचे अॅप्लिकेशन खेळणाऱ्यांना ट्रान्सफर करतात. दिलेले पैसे ऑनलाइन पध्दतीने युवकांच्या खात्यावर जमा होतात. तसेच यासाठी विशिष्ट युजर आयडी आणि पासवर्डही असतो. रौलेट जुगार ऑनलाइन पध्दतीनेच खेळला जातो. तसेच सुरुवातीस कमी-अधिक प्रमाणात पैसे मिळाले की तरुण कामधंदा सोडून सतत जुगार खेळण्यास सुरुवात करतात. यामुळे अनेक युवकांना नैराश्याने ग्रासले असून, प्रसंगी चोरी करून रौलेट खेळण्यास युवक तयार होतात. या ऑनलाइन जुगारात शहरातील २५ ते ३० व्यक्ती सहभागी असून, अत्यंत नियोजनपूर्वक हा प्रकार हातपाय पसरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अॅप्लिकेशन कंट्रोल करता येते तरीही...

एका अॅप डेव्हलपरने याबाबत सांगितले की, अॅप्लिकेशन तयार करताना डेव्हलपर सिक्युरिटीकडे लक्ष पुरवितो. यात अॅप्लिकेशनचे कंट्रोल डेव्हलपरकडेच असते. त्यामुळे रौलेटसारख्या जुगारात कोणत्या क्रमांकावर सर्वात जास्त पैसे लागले आहेत, कोणत्या क्रमांकावर कमी पैसे लागले आहेत किंवा कोणता क्रमांक आल्यास एक पैसाही द्यावा लागणार नाही, याची चाचपणी करण्याचे काम सहजतेने होते. सर्व बाबी मॅनेज करणे शक्य असल्याने यात खेळणाऱ्यांना सतत पैसे मिळणे शक्यच होत नाही. तरुणांनी अशा ऑनलाइन जुगारापासून दूर राहणे कधीही हितावह असल्याचा सल्ला संबंधित अॅप डेव्हलपरने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लाखांसह चोरट्यांचा लागेना थांगपत्ता

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँकेतून लंपास केलेल्या तब्बल २८ लाखांच्या रोकडसह विद्याविकास सर्कलकडे गेलेल्या चोरट्यांचा महिना होत आला तरी कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी नाशिक व राज्यासह परराज्यातदेखील तपास केला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांनी कोणताही मागमूस सोडला नसल्याचे पोलिस तपासावरून समोर येत आहे.

दहा रुपयांच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत सहा ते सात चोरट्यांनी अगदी नियोजित पध्दतीने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास केली होती. चोरीची घटना याच महिन्याच्या सुरुवातीला (दि. ३ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉर्डन कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती. आता या घटनेस महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी बॅग लिफ्टिंग करणाऱ्यांचा कोणताही तपास लागलेला नाही.

एका आरोपीने १० रुपयांच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत भरणा करण्याकरिता आलेल्या कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ या दुकानामधील कर्मचाऱ्याचे लक्ष विचलीत केले होते. खाली पडलेले पैसे उचलण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधत आरोपीने पैशांनी भरलेली बॅग उचलली तसेच बँकेबाहेर चालता झाला. या गुन्ह्यात सहा ते सात जणांचा सहभाग असल्याचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केलेल्या फुटेजमध्ये सहज दिसते. अगदी काही सेकंदात हा प्रकार घडला असला तरी आरोपींनी यासाठी केलेले प्लॅनिंग महत्त्वाचे ठरले. बॅग घेऊन बाहेर पडणारा चोरटा, त्याला कव्हर करण्यासाठी आलेला दुसरा चोरटा विद्या विकास सर्कलच्या दिशेने गेले. उर्वरित आरोपी गंगापूर रस्ता ओलांडून विरुध्द दिशेला गेले. यानंतर या आरोपींचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

चोरटे सराईत असून, त्यांच्या तपासासाठी एक पथक नुकतेच सुरत येथे जाऊन आले. आरोपींचा वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि पथकांमार्फत शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या संशयितांच्या फोटोग्राफ्सची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी कळविण्यात आली आहे.

- अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त, क्राईम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक स्पीड ब्रेकर्स

0
0

नाशिक : शहरातील बहुतांश स्पीड ब्रेकर्सजवळील पांढरे आणि पिवळे पट्टेच नाहीत किंवा आहे ते एकदम अस्पष्ट झाले आहेत. स्पीड ब्रेकर्स असल्याबाबत सूचनाफलक देखील नसल्याने या ठिकाणी सतत छोटे मोठे अपघात घडत आहेत. स्पीड ब्रेकर्समुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढत असून, महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

काम हाती घ्यावे

नाशिक: वडाळा गावातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवून काही महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी महापालिका प्रशासनाने येथील रस्त्याचे काम हाती घेतलेले नाही. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामास गती मिळालेली नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता आणखी खराब होऊन अतिक्रमण देखील वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

सिग्नलच्या वेळा बदला

नाशिक : उन्हाचा कडका वाढला असून, दुपारच्या सुमारास रस्त्यावरील गर्दी तुरळक होते. कडाक्याच्या उन्हातही वाहतूक सिग्नल्स सुरू असल्याने वाहनचालकांना विशेषत: दुचाकीचालकांना त्याचा त्रास करावा लागत आहे. किमान उन्हाळ्यासाठी का होईना तुरळक गर्दी असलेल्या रस्त्यांवरील सिग्नल्सच्या वेळा बदलून वाहनचालकांना महापालिकेसह पोलिसांनी दिलासा द्यावा, अशी मागणी होते आहे. बऱ्याच ठिकाणी कमी गर्दी असल्याने वाहनचालक थांबण्याची तसदी घेत नाही. यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण होते.

गार्डन हाऊसफुल्ल

नाशिक : उन्हाळी सुट्यांचा मौसम त्यात सलग आलेल्या चार सुट्यांचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. विशेषत: संध्याकाळनंतर शहरातील सुस्थितीत असलेले सर्वच गार्डन्स लहान मुलांनी तुडुंब भरत आहेत. इंदिरानगरमधील सीटी गार्डन, जुना गंगापूर नाका येथील प्रमोद महाजन गार्डनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिक येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतीवर बोलणे हा झाला धंदा’

0
0

'शेतीवर बोलणे हा झाला धंदा'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'कुणीही उठतो शेतीवर बोलतो, आज महाराष्ट्रात चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्याला शेतीतले कळत नाही असेही लोक शेतीवर बोलत असून, शेती व शेतकऱ्यांवर बोलणे हा काही लोकांचे धंदा झाला आहे.' असे प्रतिपादन कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

पटेल म्हणाले,'पूर्वी पाऊस हा २७ नक्षत्रांवर पडायचा आता तो फक्त ढगफुटी आणि दुष्काळ या दोनच नक्षत्रांवर पडतो निर्सगाचे चक्र बदलले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचे चक्र बदलणार आहे. काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे. कांद्याचे प्रश्न आहेत, सोयाबीनचे प्रश्न आहेत. सोयबीनला हमी भाव मिळत नव्हता त्यामुळे सोयाबीन वरचे आयात शुल्क साडे सात टक्क्यावरुन ४४ टक्क्यांवर नेले त्यामुळे २ हजार रुपयांचे सोयाबीन ४ हजार रुपयांना विकले जाऊ लागला. देश पिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. मागील वर्षी चनाडाळ ७४ लाख क्विंटल इतकी झाली होती. यंदा त्याचे विक्रमी उत्पादन होऊन १ कोटी १० लाख क्विंटल इतके झाले आहे.'

अनेक ठिकाणचे डोंगर उघडे झाले आहेत झाडे नसल्याने पाणी मुरत नाही. प्रत्येक गावाने पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येकाने सेंद्रीय शेतीची कास धरणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती झाल्यास शेतकऱ्यांची हाती पैसा येईल. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी काढण्याचा त्यांनी सल्ला दिला. या कंपनीच्या माध्यमातून माल विकावा, असे देखील त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिप - बालकविता

0
0

\Bबावरे मन...\B

हे मन माझे आहे बावरे

क्षणात होते कावरेबावरे

असे कसे हे मन आहे रे

याचा ठाव ओळखणे अशक्य रे

क्षण आनंदाचा हा सुखाचा

खेळ हा या माझ्या मनाचा

पारा फुटतो आनंदाचा

क्षण या सुंदर जीवनाचा

आनंदी असताना वाटते मला

हे बाहेर येईल फोडून छातीला

यामुळे मिळते दिशा जीवनाला

व अर्थ मिळतो माझ्या जगण्याला

--

-सोहम कुलकर्णी, इयत्ता दहावी, आदर्श माध्यमिक विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी वाचला तर देश वाचेल

0
0

शेतकरी वाचला तर देश वाचेल

खा. राजू शेट्टी यांचे कृषी प्रदर्शनात प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतीचा व्यवसाय तोट्यात असून, त्याला उभारी देण्याची गरज आहे. आज देशातला शेतकरी वाचला तर देश वाचेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या सरपंच परिषदेत ते बोलत होते.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना सरपंचापर्यंत पोहचाव्यात यासाठी सरपंच व ग्रामसेवकांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, 'शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. जागतिकीकरणाचा धोका आहे. तंत्रज्ञानाचा अभाव आहे. निर्सगाचीही कोप आहे. या सर्व बोजाखाली शेतकरी पिचला आहे. शेतकरी लाखो रुपये खर्च करुन पीक घेतो; मात्र त्याच्या पिकाला रास्त भाव मिळत नाही. शेतकऱ्याची अवस्था बिकट असेल तर गावाची अवस्था बिकट होते. गावाला आर्थिक खाईतून बाहेर काढायचे असेल तर शेतकऱ्याचा आर्थिकस्तर उंचावला पाहिजे.' शेतकऱ्यांनीही नकारात्मक विचार बाजूला सारून नवीन तंत्रज्ञानाची कास धरत पीक घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यांच्या अगोदर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, सरपंचानी साक्षर होण्याची गरज आहे. अनेकदा निवडून आल्यानंतर सरपंचांनी काय काम करायचे हे माहीत नसते हे माहीत होण्यात बराच कालावधी जातो. याकरता सरपंचांनी विविध योजनांचा अभ्यास करावा. याकरता लवकरच 'यशदा'तर्फे एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, राज्यातील ७ हजार ३०० सरपंचापर्यंत तो विभागनुसार पोहचविण्यात येणार आहे, असेही सांगतले. यावेळी ग्रामसेवक व सरपंच हे हातात हात घालून चालले पाहिजे, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा

0
0

नाशिक : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसबरोबर चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली. यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवारी करणार हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर भुजबळांचे समर्थक दिलीप खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या पोस्ट सुरू झाल्यामुळे अॅड. पगार यांनी या वृत्ताचेही खंडण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी महोत्सव समारोप

0
0

नैसर्गिक शेती स्विकारा

समारोपात अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यामातून नेहमीच अध्यात्म व कृषी शास्त्राची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असून, अत्याधुनिक शेतीबरोबरच अध्यात्मिक म्हणजेच नैसर्गिक शेतीचा मंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न अखंडपणे सर्वांनी करायला हवा.' असे आवाहन प. पु. अण्णासाहेब मोरे यांनी केले.

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवाचा समारोप रविवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी कृषी माऊली पुरस्कार वितरण करण्यात आले. यासोहळ्यात खा. राजू शेट्टी, कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल, बबनराव लोणीकर, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सिमा हिरे, सरपंच संघटनेचे पुरषोत्तम घोगरे, बाळासाहेब म्हस्के, वंदना गुंजाळ, पोपटराव पवार असे मान्यवर उपस्थित होते.

अण्णासाहेब मोरे यांनी सरपंच परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सरपंच व शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनेक उपदेश केले. शेतकऱ्यांनी आत्महत्तेपासून दूर रहावे, असे आवाहन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

कृषी माऊली पुरस्कार

बाळासाहेब बोराडे, सविता पोटे, राजेंद्र बोरगुडे, आनंद ठाकूर, कृषी समर्पण समुह, संजय जाधव, अलका पिंगळे, वसंत माळी, सुभाष पाटील, सचिन पोतदार, राजेंद्र गाडे, प्रतापराव देशमुख, दत्तत्रय मुंडावत, छत्रपती शिवाजी महाराज ऑफ इंजिनीअरिंग, डीएमई हायस्कुल यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दराडेंसाठी समझोता!

0
0

शिवसेनेच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने नरेंद्र दराडे यांचे नाव घोषित केल्यानंतर सुरू झालेली नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने समझोता बैठक घेतली. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दराडे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. पण, या बैठकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद शमेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चार दिवसांपूर्वीच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत यांच्या बैठकीकडे महापालिकेच्या ३७ पैकी ३० नगरसेकांनी पाठ फिरवल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. याची दखल घेत शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे समजते. या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंसह शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजीमंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे व भाऊलाल तांबडे, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप, उदय सांगळे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे, मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर आदी उपस्थित होते.

अशी वाढली नाराजी

शिवसेनेने नरेंद्र दराडे यांचे नाव घोषित केल्यानंतर नाराजीला सुरुवात झाली. याअगोदर गेल्या विधान परिषद निवडणुकीत निसटता पराभव पत्करणाऱ्या शिवाजी सहाणे यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी करून निवडणुकीचा प्रचारही सुरू केला होता. पण, उमेदवारी घोषित झालेली नसताना प्रचार केल्याचे कारण पुढे करीत शिवसेनेने सहाणे यांची हकालपट्टी केली. त्यामुळे नाराजी वाढली.

महानगरप्रमुख बदलाचाही परिणाम

शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुपारी घेऊन नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता. तसेच, राऊत हे मराठाद्वेषी असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर शिवसेनेने महानगरप्रमुखपदही बदलले. त्यामुळे त्यातून नाराजी वाढली. या सर्व पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक अखेर समझोता बैठक ठरली.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात माझ्या उमेदवारीला सर्वांनी पाठिंबा दिला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आमदारांसह सर्वच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

- नरेंद्र दराडे, उमेदवार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची मंगळवारी बैठक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या सहा विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची १ मे रोजी प्रदेश कोअर टीमची बैठक होणार आहे. त्यात नाशिकच्या उमेदवारीचा फैसला होणार असल्याचे समजते. भाजपकडून नाशिकमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, संचालक परवेझ कोकणी, देवळाली कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड हे स्पर्धेत आहेत. त्याचप्रमाणे अॅड. शिवाजी सहाणे हे सुध्दा उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५१ मतदार असून, भाजपकडे १६७ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी १५९ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे भाजप या बैठकीत नेमकी काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीत राज्यपातळीवर शिवसेनेला तीन जागा सोडून तीन जागा भाजपला ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशपत्र भरण्याची अंतिम मुदत ३ मे आहे.

नाशिक विधान परिषदेसाठी १ मे रोजी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात राज्यातील सहा विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा होणार आहे. चर्चेनंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

- किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप संभ्रमात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीत नामनिर्देशन पत्राचे काऊंट डाऊन सुरू झाले असले तरी भाजप अजूनही संभ्रमात आहे. शिवसेनेने नरेंद्र दराडे यांचे नाव घोषित केले आहे. पण, भाजपने अद्यापही आपल्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही.

सहा विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. पण, भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. शिवसेनेने राज्यातील सहा विधान परिषदेपैकी तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे उर्वरित तीन उमेदवार शिवसेना जाहीर करते की, या जागा भाजपला सोडते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपला विधान परिषदेमध्ये आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून आणायचे असल्यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेने उमेदवारी घोषित करताना आक्रमकता दाखवत आपले उमेदवार भाजपशी चर्चा न करताच जाहीर केले आहेत.

भाजपही वेटिंगवर

शिवसेना खालोखाला भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण, शिवसेनेने अगोदरच उमेदवारी घोषित केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रदेश पातळीवर काय निर्णय होतो याची ते वाट पाहत असून, त्यानंतर ते पुढील निर्णय घेणार आहेत.

काय आहे अडचण

लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असताना परस्परविरोधी पक्षाशी आघाडी केल्यास त्याचा फटका पुढील निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे सगळे संभ्रमात आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगोदरच यापुढे भाजपशी युती नाही, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. दुसरीकडे सत्तेतील पक्ष काय निर्णय घेतात याकडे इतर पक्षाचे लक्ष लागले आहे.

तीन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार

शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली या तीन ठिकाणी उमेदवार घोषित केले आहेत. आता उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अद्याप निर्णय घेतला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचारी अपुरे, विद्यार्थी उदंड

0
0

 म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्र व राज्य सरकारी सेवेत कर्तव्य बजावणारे सुमारे तीनशेपेक्षा जास्त अधिकारी दिलेल्या महापालिकेच्या येथील जवाहर मार्केटमधील अभ्यासिकेत सध्या मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. येथील कर्मचारीसंख्या अपुरी असून, वर्षभर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यासासाठी येत असतात. मात्र, मूलभूत सुविधांअभावी या विद्यार्थ्यांची परवड होत असल्याची स्थिती आहे.

या अभ्यासिकेत सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरा, फॅन आणि ट्यूबलाइट्स आदी सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. या सुविधांशिवाय इतर सर्व मूलभूत सुविधांचा या अभ्यासिकेत बोजवारा उडालेला असल्याचे चित्र दिसून येते. या अभ्यासिकेची क्षमता १२० आहे. मात्र, एका सत्रात येथे किमान २३५ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवेश दिलेला आहे. त्यामुळे जागेचाही प्रश्न उद्भवतो. एका सत्रासाठी महापालिका विद्यार्थ्यांकडून १०० रुपये डिपॉझिट आणि २१० रुपये शुल्क आकारते.

घरून आणावे लागते पाणी

या अभ्यासिकेत पिण्याच्या पाण्याचे अधिकृत नळ कनेक्शन आहे. मात्र, पिण्याचे पाणी टाकीत साठविले जाते. या टाकीतील पाणी उन्हाने गरम होते. ते विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरता येत नाही. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी घरूनच आणावे लागते. येथील कूलरही काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने पाणी थंड करणारी यंत्रणाच बंद आहे. पाण्याच्या टाकीची स्वच्छताही होत नाही.

स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीने गैरसोय

अभ्यासिकेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा आहे. मात्र, या स्वच्छतागृहांची स्वच्छतेअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी या अभ्यासिकेत मोठी दुर्गंधी पसरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येत नाही. वॉशबेसिन प्रचंड अस्वच्छ झालेले आहे. दरवाजे खिडक्यांचीही दुरवस्था झालेली आहे. या अभ्यासिकेच्या प्रवेशद्वारालगतच विद्यार्थ्यांच्या पार्किंगसाठी जागा आहे. मात्र, या ठिकाणी विद्यार्थी येण्याआधीच रेल्वेने अप-डाऊन करणारे पासधारक त्यांची वाहने पार्क करून निघून जातात. या अभ्यासिकेत सुरक्षारक्षक नसल्याने या ठिकाणी अतिक्रमण झालेले दिसते.

कर्मचाऱ्यांचीही वानवा

या अभ्यासिकेसाठी तीन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी एक कर्मचारी सेवानिवृत्त, तर एकाची अन्य ठिकाणी बदली झाल्याने सध्या प्रकाश जाधव हे एकमेव कर्मचारी या अभ्यासिकेची धुरा सांभाळत आहेत. वाचनालयातही सध्या एकच कर्मचारी कार्यरत असून, नंदकुमार शिंगोटे हे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले असूनही केवळ वाचनालयाला ग्रंथपाल नाही म्हणून कामकाज सांभाळत आहेत.

या सुधारणा होणे अपेक्षित

या अभ्यासिकेत क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी बसतात. अभ्यासिकेच्या खालील मजल्यावरील सर्व हॉल गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडून आहेत. हे सर्व हॉल अभ्यासिकेसाठी दिले, तर विद्यार्थ्यांच्या जागेचा प्रश्न सुटू शकतो. येथील वाचनालयात स्पर्धा परीक्षांची पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठीची व संदर्भ पुस्तके उपलबध झाली पाहिजेत. स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची व इतर तज्ज्ञांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली पाहिजेत.

महापालिकेच्या जवाहर मार्केटमधील अभ्यासिकेत गेल्या अडीच वर्षांपासून अभ्यासासाठी येतो. परंतु, येथे पिण्यासाठी योग्य पाणी उपलब्ध नाही. सध्या उन्हाळा असल्याने टाकीतील पाणी उन्हाने गरम होते. त्यामुळे पिण्यासाठी घरूनच पाणी आणावे लागते. कर्मचारीही कमी आहेत.

-विवेक शिंदे, विद्यार्थी

या अभ्यासिकेत अभ्यासासाठी बसण्याची सुविधा चांगली असली, तरी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची स्थिती वाईट आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता योग्य तऱ्हेने होत नसल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे अभ्यासातही व्यत्यय येतो. देखभाल-दुरुस्तीही वेळेत होत नाही.

-माया हुल्लुळे, विद्यार्थिनी

जवाहर मार्केटमधील महापालिकेच्या ग्रंथालयाचे ग्रंथपालपद १९९२ सालीच रद्द केलेय. तेव्हापासून या ग्रंथालयाला ग्रंथपाल नाही. कर्मचारीही कमी आहेत. पुस्तकांची संख्या १५ हजार असली, तरी निम्मी-अधिक पुस्तके देखभालीअभावी खराब झाली आहेत.

-नंदकुमार शिंगोटे, प्रभारी ग्रंथपाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्योदय वाङ्मय पुरस्कार जाहीर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे सूर्योदय वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रख्यात लेखक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) यांना जाहीर करण्यात आला असून, आठव्या वर्षाचा अखिल भारतीय दलूभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार नामवंत लेखक भारत सासणे (पुणे) यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी एकवीस हजार रुपयांचा धनादेश व गौरवपत्र असे आहे.

दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ बाराव्या वर्षाचा सूर्योदय सेवा पुरस्कार नामवंत लेखिका विनिता ऐनापुरे (पुणे ) यांना जाहीर करण्यात आला आहे. स्व. बन्सीलाल, स्व. शिवराज हस्तीमल जैन स्व. कांतिलाल हिरालाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ पहिल्या वर्षाचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार नामवंत लेखिका डॉ. विजया वाड (मुंबई ) यांना जाहीर करण्यात आला असून, दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी अकरा हजार रुपये व गौरवपत्र असे आहे.

प्रा. पन्नालाल भंडारी, बदामबाई देसर्डा यांच्या स्मरणार्थ पंधराव्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार नामवंत लेखक सुबोध जावडेकर (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला असून, स्व. इंदरचंद-श्रीमती स्व. सौ. रामकुंवरबाई देसर्डा यांच्या स्मरणार्थ पंधराव्या वर्षाचा सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार नामवंत गझलकार प्रदीप निफाडकर (पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश, गौरवपत्र असे आहे. लिलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बालवाङ्मय पुरस्कार जयसिंगपूर येथील नामवंत लेखिका नीलम माणगावे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपयांचा धनादेश, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्व. गोकुळचंद्र लाहोटींच्या स्मरणार्थ चौथ्या वर्षाचा सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार नामवंत युवालेखक ऐश्वर्य पाटेकर (भाऊसाहेब नगर, नाशिक) यांना जाहीर करण्यात आला आहे. पंचवीसशेचा धनादेश, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार प्रदान सोहळा ऑगस्टमध्ये जळगाव येथे होणार आहे.

वसंत आबाजी डहाके, गिरिजा कीर, प्रभा गणोरकर, प्रा. भास्कर गिरिधारी, प्रा. डॉ. तारा भवाळकर, प्रा. विश्वास वसेकर, डॉ. अनुपमा उजगरे, रेखा बैजल, आसावरी काकडे, माया धुप्पड, डॉ. उल्हास कडुसकर, एकनाथ आव्हाड, सुभाषचंद्र वैष्णव, दिनेश दगडकर, डॉ. ज्ञानेश पाटील, मेधा उज्जैनकर, प्रा. चारूता गोखले या निवड समितीने पुरस्कार्थींची निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर उन्हात गोदावरीत डुबकीचा गारवा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाची काहिली वाढल्याने गारवा मिळविण्यासाठी जो-तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारून उन्हाची तीव्रता कमी करण्याचा आनंद घेण्यास रामकुंड, गांधी तलाव येथे भर दुपारी डुबकी मारणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. पोहण्याबरोबच यथेच्छ डुबकी मारण्यासाठी दुपारी गोदाघाट परिसरात गर्दी वाढली आहे. त्यात भाविक आणि पर्यटक यांची संख्या जास्त आहे.

नाशिकच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिवसभर उन्हाची काहिली होत असल्यामुळे अशा वेळी नदीच्या पाण्यात डुबकी घेण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे दुपारी रामकुंड आणि गांधी तलावातील पाण्यात डुबकी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ज्यांना पोहता येते ते पाण्यात लांबवर पोहत जातात, तर ज्यांना पोहता येत नाही, ते कुंडाच्या कडेला पाण्यात बसून राहत असल्याचे चित्र दिसते.

सुट्यांमुळे वाढले पर्यटक

एप्रिल महिन्याचा तिसरा शनिवार, रविवार, बुद्ध पौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन अशा सलग चार दिवसांच्या सुट्या आल्यामुळे नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत पर्यटकांची संख्या वाढली आहे. पंचवटीतील मंदिरांमध्ये दर्शन घेण्याबरोबरच रामकुंडात पवित्र स्नान करण्यासाठी आलेले भाविक व पर्यटक तासन् तास रामकुंडातून बाहेर पडत नसल्याचे दिसत आहे. गोदापात्रात मनसोक्त डुबकी घेत असल्यामुळे भर दुपारी हा परिसर गर्दीने फुलून गेला होता. पाण्यात डुबकी घेत सेल्फीचा आनंद घेण्यामध्ये अनेकजण गर्क झाले होते. दुपारी गोदापात्रात आणि सकाळी तसेच सायंकाळी मंदिरांमध्ये भाविक व पर्यटकांची गर्दी होत आहे. कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि तपोवनातील मंदिरे गर्दीने फुलून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सायबर गुन्हेगारी’ सुरक्षा यंत्रणेपुढील आव्हान

0
0

निवृत्त लेफ्टनंट कर्नल नरेशकुमार चौधरी यांचे प्रतिपादन

कॉलेज क्लब रिपोर्टर

मागील काही वर्षांपासून भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट, सोशल मीडिया हे एक चांगले व प्रभावशाली माध्यम आहे. परंतु, याचा मागील काही काळापासून गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आजच्या घडीला 'सायबर गुन्हेगारी' हे सायबर सुरक्षा यंत्रणेपुढील आव्हान बनत चालले आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल नरेशकुमार चौधरी यांनी केले.

संदीप फांउडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातर्फे दोन दिवसीय 'रिसेंट ट्रेंडस् इन सायबर इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी, संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, प्राचार्य डॉ. रवींद्र क्षीरसागर, सायबर इनव्हेस्टीगेशन मुंबई विभागाचे एस. पी बालसिंह राजपूत यांच्या हस्ते झाले. या वेळी कर्नल नरेशकुमार चौधरी यांनी टेकनॉलॉजिकल इव्ह्यॅल्युशन, डाटाचा गैरवापर, डिफेन्सिव्ह आणि ऑफेन्सिव्ह सायबर ऑपेरेशन याविषयी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेत अधिकारी आशिष सुतार, एस. खडसारे, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट स्मिथ गोन्साल्वीस, योगेश पंडित, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे मार्गदर्शन

यामध्ये मुख्यत्वे नेट युजर्सचा डेटा चोरणे, एटीएम फ्रॉड, कार्ड क्लोनिंग हे प्रकार काळाच्या ओघात वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकने एका कंपनीस वापरकर्त्यांची परवानगी न घेता वैयक्तिक माहिती प्रदान केली. त्यामुळे आपण सोशल मीडिया साइट्सवर आपली वैयक्तिक माहिती गोपानियरित्या ठेवावी, असेही चौधरी यांनी सांगितले. पोलिसांची गुन्हेगाराला पकडण्याची पद्धती, सायबर क्राईमअंतर्गत येणारे कायदे, सायबर गुन्ह्यातील शिक्षा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या वेळी सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार, त्यापासून बचावाचे तंत्र, गुन्हेगाराची फसवण्याची पद्धती याबाबत चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. पॅनेल डिस्कशनमध्ये तज्ज्ञांनी सोशल मीडिया क्राईम, सिक्युरिटी, सायकोलॉजी, कौन्सेलिंग यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी कुलगुरू कर्नल डॉ. नल्लन रामचंद्रन, प्राचार्य डॉ. रवींद्र क्षीरसागर, विभागप्रमुख डॉ. कामिनी नलावडे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रावळीला ‘अच्छे दिन’ची आस

0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

हिरव्यागार पानांच्या ज्या पत्रावळीवर अनेक पिढ्यांच्या पंगती उठल्या, ज्या पत्रावळीवरील खाद्यपदार्थांनी उदरभरणासह तृप्ततेचा ढेकर देता आला ती पळसाच्या पानांची पत्रावळी आज अखेरच्या घटका मोजत आहे. विविध कारणांमुळे ही अस्सल नैसर्गिक पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता प्लास्टिक बंदीनंतर या पत्रावळीच्या कारागिरीला 'अच्छे दिन' येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

--

पूर्वी ग्रामीण भागात मराठी शाळेच्या मैदानावर लांबच लांब पंगत बसली, की अस्सल नैसर्गिक पत्रावळीचे वाटप केले जायचे. भात, वरण, भाजी, पुरी, बुंदी, बर्फी, मटकी, मसालेभात असे एकेक करून पदार्थ या पत्रावळीवर उतरायचे. कुणाला हिरवीगार, तर कुणाला काहीशी तांबूस पत्रावळी मिळत असे. या पत्रावळींवर उतरणाऱ्या गरमागरम पदार्थांची लज्जतच न्यारी होती. अजूनही ग्रामीण भागात अन् शहरातही काही प्रमाणात अशा पंगती बसतात. परंतु, ते नैसर्गिक भोजनपात्र त्यामधून गायब झाले आहे. प्लास्टिक, कागदी आणि थर्माकोलच्या पत्रावळ्यांमुळे पळसाच्या पानांची अस्सल नैसर्गिक पत्रावळी कालबाह्य ठरू लागली आहे. कळवण तालुक्यातील ओतूर गावाच्या अर्थव्यवहाराला या पत्रावळीचा मोठा आधार होता. परंतु, पत्रावळीच नामशेष होऊ लागल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचाच रोजगार बुडाला आहे.

ओतूर गावाने सामाजिक ऐक्याची ज्योत सदैव तेवत ठेवली. या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा धोडप किल्ला आहे. दक्षिण व पश्चिमेच्या टोकाला मार्कंडेय ऋषींचा डोंगर, पूर्वेकडे चौरंगीनाथ मंदिर, तर विखाऱ्या डोंगरावर गोरक्षनाथाचे समाधी मंदिर आहे. या गावाची निर्मिती १३ व्या शतकातील आहे, असे ग्रामस्थ सांगतात. त्या काळी हे गाव उतानपात या राजाची राजधानी मानली जात असे. राजाच्या नावामुळे या गावाला पूर्वी उतानपातनगरी असे म्हटले जाई. गावात पाणीपुरवठ्यासाठी वापरात येणारी पेशवेकालीन मजबूत दगडांमध्ये बांधलेली विहीर पुरातन काळाची साक्ष देते.

अशी बनते पत्रावळी

आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या पळसाच्या पानांना सुतळीद्वारे गुंफून त्यांची माळ तयार केली जाते. अशा माळा पोटमाळ्यावर किंवा जेथे जागा असेल तेथे साठवून ठेवल्या जातात. पत्रावळी बनवायची असेल, तेव्हा त्यापैकी एक-दोन माळा पाण्यात भिजवितात. कडक झालेली पाने टाचण्यासाठी नरम व्हावीत हा त्यामागे उद्देश असतो. प्रत्यक्ष पत्रावळी बनविण्यास घेण्यापूर्वी पानांची माळ मोकळी करवून घेतली जाते. या पानांचे देठ कापून पाने एकावर एक रचून ठेवली जातात. ही पाने एकमेकांना टाचण्यासाठी बोरू साळला जातो. त्याच्या बारीक अन् टोकदार काड्या तयार केल्या जातात. हे काम कठीण असते. अस्सल कारागीरच ते अत्यंत सफाईदारपणे करू शकतो. पळसाची पाने कडक असतील, तर बोरूची काडीही ते टाचताना मोडते. तसे होऊ नये याकरिता या पानांवर पाणी मारून ती नरम केली जातात. त्यानंतर कारागीर एक-एक पान गोलाकार जोडत ते टाचत जातो. साधारणतः एक पत्रावळी बनविण्यासाठी सात ते आठ पाने टाचली जातात. परंतु, तयार पत्रावळी काहीशा ओबडधोबड आकारात असते. अशा काही पत्रावळी तयार झाल्या, की त्यांना एकसारखा गोल आकार देणे आवश्यक असते. त्यासाठी दगडी जात्याच्या तळीची मदत घेतली जाते. ही तळी पत्रावळींवर ठेवून त्याबाहेर आलेला भाग कात्रीने कापून घेतला जातो. गोलाकार पत्रावळी अर्थात, भोजनपात्र तयार होते. सुख-दु:खाच्या कुठल्याही कार्यात ते वापरले जाते.

शेकड्याला दीडशे रुपये भाव

साधारणतः दीडशे रुपये शेकडा याप्रमाणे ग्राहकांकडून कारागीर दर आकारतात. १५०० रुपयांत १००० पत्रावळ्या म्हणजेच दीड रुपया प्रतिपत्रावळी एवढा दर ग्राहकांकडून आकारला जातो. परंतु, हा दरही ग्राहकांना अधिक वाटू लागला आहे. पत्रावळीची ऑर्डर देण्यासाठी कारागिरांकडे येणारे ग्राहक दराच्या बाबतीत घासाघीस करतात. परंतु, ही पत्रावळी बनविण्यामागील मेहनत विचारात घेतली जात नाही. १०० पत्रावळ्यांसाठी १५० रुपये आकारण्यात येतात. काही पत्रावळ्यांना छिद्रे पडलेली असतात, तर काहींची पाने खराब असतात. त्यामुळे १०० पत्रावळींच्या गठ्ठ्यात ८० ते ९० पत्रावळ्याच चांगल्या असतात. पत्रावळी बनविण्यासाठी पळसाची पाने २५ ते ३० रुपये माळ याप्रमाणे खरेदी केली जातात. एका माळेत साधारणतः ५०० ते ६०० पाने असतात. त्यापासून ५० ते ६० पत्रावळ्या बनतात.

जंगलातील मुक्कामाचा आनंद विरला

अगदी पाच-दहा वर्षांपूर्वी ओतूरमधील शंभरांवर घरात पत्रावळ्या बनविल्या जात असत. एप्रिल-मेमध्ये पत्रावळी बनविणारे कारागीर कुटुंबातील काही सदस्यांसह पळसाची पाने आणण्यासाठी घराबाहेर पडत. जंगलाच्या जवळपास त्यांचा चार-आठ दिवसांचा मुक्काम असे. सर्व शिधा ते सोबत घेऊन जात. दिवसभर पळसाची पाने गोळा करून त्यांच्या माळा तयार करून ठेवणे हा त्यांचा दिनक्रम असे. अशा भरपूर माळा तयार झाल्या, की त्या टेम्पो, ट्रॅक्टर ट्रॉली यांमध्ये भरून ते घरी परतत. त्यानंतर गरज भासेल तशी ही पाने भिजवून ती पत्रावळी बनविण्यासाठी वापरली जात असत. जंगलाजवळील हा मुक्काम म्हणजे छोटेखानी सहलच होती. परंतु, या आनंदालाही आता कारागीर आणि त्यांची कुटुंबे मुकली आहेत. ज्या कारागिरांना जंगलात मुक्काम करून पाने आणणे शक्य होत नसे ते कारागीर आदिवासी बांधवांकडून या पानांच्या माळा खरेदी करत. १० वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती होती. परंतु, हळूहळू पत्रावळ्यांची मागणी कमी होत गेली तशी परिस्थितीही बदलत गेली. बाबापूर, मुळाणे, खिरमाडे, भातवडा, वंजारमुळाणे, पायरपाडा, गोलदरी, अहिंतवाडी, गोपाळखडे येथून ही पाने येत असत.

नैसर्गिक पत्रावळीला सरकारी मदतीची गरज

केळीच्या पानांवर जेवणाचे आरोग्याच्या बाबतीत जसे महत्त्व आहे, तसे पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणेही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे कागदी, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या भोजनपात्रांचे बाजारपेठेत आगमन झाले त्या सुरुवातीच्या काळात जुन्या पिढीतील लोक कुठल्याही शुभकार्यात किंवा पंगती उठविण्यासाठी पत्रावळीचाच आग्रह धरत असत. परंतु, अन्य पर्याय माफक दरात उपलब्ध झाल्यामुळे पत्रावळ्यांची मागणी कमी होत गेली. पळसाची झाडे आणि पर्यायाने पाने कमी झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात. परंतु, राज्य सरकारने प्लास्टिकबंदी करतानाच भोजनपात्र म्हणून पत्रावळी वापराचा आग्रह धरायला हवा. या व्यवसायाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी काही योजना अथवा धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा हे कारागीर व्यक्त करू लागले आहेत. या अस्सल नैसर्गिक भोजनपात्राला नवसंजीवनी लाभणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

--

पळसाची पाने बोरूच्या काडीने टाचून पत्रावळी बनविली जाते. हे काम अत्यंत कष्टाचे आहे. त्याला तेवढे दामही मिळत नसल्याने पूर्वी घराघरांत बनणारी पत्रावळी आता क्वचितच कुणी बनविते. सरकारने या स्वयंरोजगार वाढीला प्रोत्साहन द्यायला हवे.

-हरिभाऊ सोनवणे, कारागीर, ओतूर

\Bलोगो : ऑन द स्पॉट रिपोर्ट\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images