Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवयवदानाची चळवळ रुजवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अवयवदानाविषयी चर्चा खूप होत असली तरी प्रत्यक्षात काम त्या तुलनेत कमी होते. सामान्य माणसांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून, नागरिक म्हणून आपली जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. अवयवदानाची गरज ओळखत ही चळवळ म्हणून रुजवली गेली पाहिजे,' असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी केले.

नाशिकमध्ये पुण्यातील रि-बर्थ या संस्थेच्या शाखेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. आयुक्त सिंघल म्हणाले, 'समाजात डोळे, किडनी अशा काही अवयवांच्या दानाविषयीच जनजागृती झाली आहे. इतर अवयवांबाबतही जागरुकता व्हावी, यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. अवयवदानाबाबत आपल्या मनात खूप संभ्रम असतो. परंपरा, रुढी यांचे कारण त्यामागे आहे. परंतु, आजच्या काळानुसार विचारांमध्ये बदल करत अवयवदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सोशल मिडियासारख्या व्यासपीठांचादेखील लाभ आपल्याला करुन घेता येईल.'

गणेश बाकले यांनी अवयवदानाविषयी प्रेझेंटेशन सादर केले. रि-बर्थ संस्थेची माहिती, अवयवदानासाठी होत असलेले कार्य, ग्रीन कॉरिडॉर आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी अवयवदान ही चळवळ होण्याची गरज व्यक्त करत घराघरात या विषयावर बोलले गेले पाहिजे, असे मत मांडले.

सूत्रसंचालन सुनंदा जरांडे यांनी केले. यावेळी गुरु गोबिंदसिंग संस्थेचे सीईओ परमिंदर सिंग, अमरजित सिंग, संजय पठाडे, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्कशीट न मिळाल्याने गमावली नोकरीची संधी

$
0
0

विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वीपणे पार पडल्यानंतर केवळ विद्यापीठाने वेळेत मार्कशीटच न दिल्याने नोकरीची संधी गमवावी लागल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्याने नाशिकमधील विद्यापीठावर केला आहे. विद्यार्थ्याला मार्कशीट उपलब्ध करून द्यायला विद्यापीठ तयार असतानाही विद्यार्थीच पुन्हा न फिरकल्याने त्यात विद्यापीठाचा दोष नसल्याची भूमिका विद्यापीठ प्रशासनाने मांडली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी श्रेयांश सराफ याने नाशिकमधील खासगी कंपनीतील रिक्त असलेल्या व्यवस्थापक पदासाठी मुलाखत दिली होती. मुलाखतीच्या वेळी कंपनीने विद्यार्थ्याकडे गुणपत्रिकेची मागणी केली. परंतु, विद्यापीठाकडूनच गुणपत्रिका न मिळाल्याने श्रेयांश याने संदीप युनिव्हर्सिटीकडे गुणपत्रकाची मागणी केली. पण युनिर्व्हसिटीने गुणपत्रिका न दिल्याने होतकरू विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिला असल्याच्या तक्रारीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आकाश कदम यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना दिले.

तो विद्यार्थी आलाच नाही

याबाबत संदीप युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता याबाबत विद्यार्थ्याची तक्रार चुकीची असल्याने व्यवस्थापनाने म्हटले आहे. संबंधित विद्यार्थ्याने युनिर्व्हसिटीकडे २३ एप्रिल रोजी अर्ज केला होता. अर्ज मिळाल्यानंतर पुढील २४ तासात आम्ही गुणपत्रिका उपलब्ध करून देतो. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांला सूचना देण्यात आली. पण अर्ज दाखल केल्यापासून २४ तास उलटून गेले तरीही संबंधित विद्यार्थी गुणपत्रिका घेण्यास पुन्हा आलाच नसल्याने यामध्ये युनिर्व्हसिटीचा दोष नसल्याचे व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी म्हटले आहे. याशिवाय विद्यार्थ्याने केलेल्या इतर आरोपांमध्येही तथ्य नसून सर्व अभ्यासक्रमांसाठी पूरक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असल्याने व्यवस्थापनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासायनिक घटकांचा वापर कमी करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काळाशी सुसंगत शेती करण्याच्या स्पर्धेत मानवी आरोग्यास घातक अशा रसायनांचा मारा शेतीवर आज होतो आहे. मात्र, सेंद्रीय शेतीचे दीर्घकालीन फायदे ओळखून सेंद्रीय शेतीला प्राधान्य मिळावे आणि शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक घटकांचा वापर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक अण्णासाहेब मोरे यांनी केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रकांत मोरे, आमदार सीमा हिरे, सेंद्रीय शेती अभ्यासक सुभाष शर्मा, आकाश चौरसिया, द्राक्ष शेती अभ्यासक वासुदेव काठे, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, पर्यटन महामंडळाचे आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब मोरे म्हणाले, की प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी शेतीच्या तंत्राबाबत अतिशय सखोल अभ्यास केला. त्यातून मानवी जीवनासाठी अतिशय उपकारक संशोधने त्यांनी मांडली. कृषी या शब्दाची उत्पत्ती ऋषीशी समान वाटते. या दोन शब्दांचे एकमेकांशी प्राचीन काळापासूनचे नाते आहे. या देशात ऋषींच्या कालखंडानंतर प्राचीन काळापासून असंख्य आक्रमणे झाली. अलिकडील काळात इंग्रजांनीही संस्कृती आणि देशाला लक्ष्य केले होते. आजमितीस कॉन्व्हेंट संस्कृतीस आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे पारंपरिक संस्कृती धोक्यात येणार नाही ना, याचा विचार व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेती ही व्यवस्था या देशाच्या समृद्धीचा कणा आहे. शेतकरी वर्गाच्या हाती हा देशाचा कणा असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:स कमी लेखू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी दिंडीचे आकर्षण

कृषी प्रदर्शनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याअगोदर रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान या मार्गावर कृषी दिंडी झाली. सकाळी श्री स्वामी समर्थांचे प्रतिमापूजन आणि कृषी ग्रंथांच्या पूजनाने दिंडीस प्रारंभा झाला. शेतकरी नृत्य, कृषी परंपरांचे दर्शन आणि कृषी संस्कृतीतील प्रतिकांच्या मांडणीमुळे दिंडीला शोभा आली. नागरिकांनीही रांगोळी रेखाटन आणि पुष्प वर्षावाने दिंडीचे स्वागत केले. प्रमुख सोहळ्याचे उद्घाटन कृषी दाम्पत्य संपत आणि शोभा तिडके यांच्या हस्ते झाले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूर नाका परिसरात अल्पवयीन मुलीला शौचालयात नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश सुचित्रा घोडके यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना १४ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती. सचिन हिरामण पाटील (रा. औरंगाबादरोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी आडगाव पोलिसात बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल होता. औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी सचिन पाटील याने अल्पवयीन मुलीला शौचालयात नेले. तिच्यावर अत्याचार केला. घरी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक धनश्री पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर सरकारी पक्षातर्फे व्ही. डी. जाधव यांनी कामकाज पाहिले. बलात्कारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास, पोस्को अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास यासह धमकावणे व खोटे बोलून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रत्येकी तीन वर्षे व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेनगर परिसरात बालबिरादरी प्रकल्प

$
0
0

चर्चा तर होणारच!

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी 

 शिक्षणापासून वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वसाहतीतील मुलांना चांगले संस्कार मिळावे, यासाठी आजवर अनेक उपाय राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने नाशिक पोलिस आयुक्त व एनजीओ फोरम यांनी एकत्रितरित्या शाळाबाह्य मुलांसाठी बालबिरादरी या अभिनव प्रकल्पाची सुरुवात फुलेनगर येथे केली आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेस मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पेठरोडवरील फुलेनगर परिसरातील समाज मंदिरात कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन दिले जात आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून 'बाल बिरादरी' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळाबाह्य मुलांना मूळ शैक्षणाच्या प्रवाहात सामील करणे व वाईट वृत्तीपासून परावृत्त करणे हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा आहे. या कार्यशाळेत मुला-मुलींसाठी गायन, नृत्य, क्राफ्ट, हस्तकला, व्यक्तिमत्व विकास, कराटे, खेळ, वैद्यकीय व आरोग्य विषयक मार्गदर्शन आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

कार्यशाळेतील सहभागी मुलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्तरावर मंच मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवर यांनी सांगितले. शोभा पवार, राजू शिरसाठ, मुकुंद गांगुर्डे, आसावरी देशपांडे, प्रतिक शुक्ल, अमित पंडित आदींनी आयोजन केले आहे. 

शेकडो मुलांचा सहभाग

कार्यशाळेत १२ ते १८ वयोगटातील शेकडो मुलामुलींनी सहभाग नोंदविला आहे. कार्यशाळेत पोलिस आयुक्त डॉ. सिंघल, पोलिस कल्याण विभागाच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता निकम, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. जविद्रसिंग चिक्की, सोमनाथ राठी, शुभांगी बैरागी, सचिन पवार आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी संरक्षण धोरणाची व्हावी परिणामकारक अंमलबजावणी

$
0
0

राज्यातील नद्यांमधील प्रदूषण लक्षात घेता न्यायालयाने नद्यांच्या संरक्षणासाठी काय केले, असा प्रश्न सरकारला विचारला आहे. नद्यांच्या दुरवस्थेस राज्य सरकारचे धोरण जबाबदार असून, नद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नागरिकांनीदेखील पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. विविध शहरांतील नद्यांच्या पात्रात येणारा कचरा व घाणीचे व्यवस्थापन होणेदेखील गरजेचे असून, नदी संरक्षणासाठीचे नवे धोरण लवकरात लवकर आणि परिणामकारकतेने लागू करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सरकारी यंत्रणांची स्थानिक पातळीवरील उदासीनता दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मतदेखील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सरकारला येईल जाग!

राज्यातील ४९ नद्यांची स्थिती प्रदूषणामुळे वाईट असल्याचे अहवालात स्पष्ट होऊनदेखील नद्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातील बहुतांश नद्यांचे आज नाले झाले आहेत. त्याला राज्य सरकारचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे. त्यावरच न्यायालायाने ताशेरे ओढले आहेत. आता तरी सरकारला जाग येईल ही अपेक्षा.

-निखिल पवार

धोरणाला उशीर नको

न्यायालयाने सरकारला नदी संरक्षणाबाबत जाब विचारल्याने नद्यांचा प्रश्न किमान चर्चेत तरी आला आहे. राज्यातील कोणत्याही नदीचे चित्र पाहिले, तर परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते. सरकारने नदीक्षेत्र नियमनाचे धोरण नव्याने आणायला उशीर केल्यानेच आज नद्यांची असी अवस्था अशी झाली आहे. या धोरणाला उसीर व्हायला नको.

-सुनील बागुल

कचरा व्यवस्थापन गरजेचे

नद्यांचे प्रदूषण रोखायाचे असेल, तर शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले जाणे गरजेचे बनले आहे. घनकचरा, रसायन, मलमूत्र आदी सारेच घटक नद्यांत मिसळले जात असतील, तर नद्यांचे अस्तित्व धोक्यात येईलच. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने तातडीने कठोर उपाययोजना राबविल्या पाहिजेत.

-प्रशांत सोनवणे

नागरिकांनीही घ्यावा पुढाकार

नद्यांना भारतीय संस्कृतीत देवतांचे स्थान दिले गेलेले आहे. मात्र, प्रत्यक्षात या नद्या आज प्रदूषणाचे आगार झाल्या आहेत. यास सरकारी धोरण जितके जबाबदार आहे, तितकीच नागरिकांची उदासीनतादेखील कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनासह नागरिकांनीदेखील नद्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-केशव खैरनार

नदीपात्रांतील अतिक्रमणे रोखावीत

न्यायालयाने केलेल्या टिप्पणीतून राज्य सरकार खरोखरच नद्यांच्या बाबतीत गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच्या धोरणामुळे नदीपात्रालगत अतिक्रमणे करण्यास मोकळीक मिळाली आणि नंतर केवळ नवे धोरण आणू असे म्हणून वेळकाढूपणा सरकारने केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे न्यायालयानेच आता याबाबत आदेश द्यावा.

-देवा पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल शिबिरास उत्साहात प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित केलेल्या उन्हाळी सायकलिंग शिबिराचे उद्घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक योगेश हिरे, दीपक भोसले, डॉ. श्वेता भिडे, मनीषा भामरे, प्रशांत परदेशी, राज लूथरा हे उपस्थित होते. एशियन ट्रायथलॉनसाठी जाणाऱ्या अनुजा उगले हिचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त सिंगल यांनी मुलांना मार्गदर्शन करून नाशिकचे नाव उज्ज्वल करू शकता, असा आत्मविश्वास दिला. या शिबिरात अजूनही ज्यांना सहभागी व्हायचे आहे अशा इच्छुकांनी शरद जोशी, नितीन नागरे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी सभागृहातून साऊंड सिस्टीमची चोरी

$
0
0

गोदावरी सभागृहातून

साऊंड सिस्टीमची चोरी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या एकलहरे रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन येथील गोदावरी सभागृहातून ९५ हजार ५०० रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम चोरीस गेल्याची तक्रार सिक्युरिटी सर्व्हिसेस मॅनेजर परमेश्वर कुचबिहारी दुबे (रा. ओझर) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. १४ एप्रिलच्या रात्री या सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची काच फोडून सभागृहातील ४० हजार रुपयांचे ६ स्पीकर, ४१ हजार रुपयांचे २ एंप्लीफायर, १० हजार ५०० रुपयांचे १ लाईव्ह मिक्सिंग कन्सोल अणि ४ हजार रुपयांचे ४ एलईडी बल्ब, असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागीय आयुक्त समितीने केली गोदेची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिरातील कारखाने आणि मलजलयुक्त पाणी गोदापात्रात सोडण्यात येते. गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने, याप्रकरणी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक विभागीय आयुक्त समितीने गुरुवारी (दि. २६) गोदावरी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात गोदापात्रात अनेक ठिकाणी दूषित पाणी मिसळले जात असल्याचे आढळून आले. याबाबत न्यायालयास रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये उद्योग वाढल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले कारखाने येथे उभारले आहेत. या कंपन्यांमधील प्रदूषित पाणी थेट गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. शहरातील मलजलदेखील गोदापात्रात सोडले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर गोदावरी गटारीकरण मंचच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये सद्य:स्थितीत गोदावरी नदीची काय अवस्था आहे, याचा अहवाल नाशिक विभागीय महसूल आयुक्तांना सादर करावयास सांगितले आहे.

त्यानुसार विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीने गुरुवारी (दि.२६) दुपारी गंगापूर गावापासून गोदापात्र पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. सोमेश्वर, रामकुंड परिसर, तपोवन आदी भागात गोदापात्रात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे या दौऱ्यात आढळून आले. या पाहणी दौऱ्यात पोलिस उपायुक्त (गुन्हे) विजय मगर, विभागीय कार्यालयीन उपायुक्त रघुनाथ गावडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, मनपा उपायुक्त घुगे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित, पंचवटी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्यासह आदी सहभागी झाले होते.

फेसयुक्त पाणी पात्रात

टाळकुटेश्वर पुलाजवळ एका मोठा व्हॉल्व्ह असून, तो कोणीही कसाही फिरवत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाघाडीचे दूषित पाणी गोदावरीत मिसळले जाते. तर तपोवन येथील मलजल शुद्धीकरण केंद्राच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर फेसयुक्त पाणी नदीत मिसळले जात आहे. या फेसमुळे या भागातील माती काळी पडली आहे, फेस उडालेल्या झाडांची पाने वाळली आहे. त्यामुळे हा फेस किती घातक आहे, हे लक्षात येते. हे फेसयुक्त पाणी नदीत मिसळायला नको असे मत महसूल आयुक्त माने यांनी नोंदविले. यानंतर टाकळी येथील मलजल शुद्धीकरण केंद्र व नासर्डी नदी पात्रातील भिंत बांधकामाचे पाहणी या समितीने केली.

नाशिकला गोदावरी नदीच्या पात्रात वेगवेगळ्या माध्यमातून प्रदूषण होत आहे. ते कमी व्हावे, गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात गेली ५-६ वर्षांपासून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या कामासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने गोदावरीच्या सद्य:स्थितीची पाहणी करण्यात येत आहे.

- राजाराम माने, विभागीय महसूल आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आसारामला दिलेली जमीन परत मिळावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अजंग वडेल (ता. मालेगाव) येथे आसाराम बापू याच्या आश्रमाला दिलेली नऊ एकर जमीन परत मिळावी, यासाठी पित्यासह मुलाने कोर्टात दावा दाखल केला आहे.

लैगिंक अत्याचार प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आसाराम याच्या आश्रमासाठी अजंग वडेल येथील संजय जाधव यांनी स्वत:ची नऊ एकर जमीन दिली होती. मात्र, आश्रमाला दिलेली जमीन परत मिळावी असा दावा जाधव यांचे पुत्र दर्शन जाधव यांनी कोर्टात दाखल केला आहे. वडेल शिवारात गट नंबर ३४७ मधील नऊ एकर क्षेत्र आश्रमाला दिले आहे. या विरोधात दर्शन जाधव यांनी जानेवारी २०१८ मध्ये कार्टात दावा दाखल केला आहे. दर्शन यांच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील संजय जाधव हे आसाराम बापू याच्या आहारी गेले होते. कुटुंबाच्या हिताविरुद्ध विचार करून कुटुंबाचे मत जाणून न घेता आश्रमाला नऊ एकर जमीन परस्पर बहाल केली. ही जमीन आश्रमाच्या एका विश्वस्ताच्या नावे करून दिली; मात्र या जमिनीचा कुठलाही मोबदला घेतला नाही. सर्व नऊ एकर जमीन आसाराम बापू ट्रस्टला बक्षिस दिली. सदर जमीन अंधश्रद्धेपोटी दिली गेल्याची तक्रार दाव्यात केली आहे. याप्रकरणी ८ जून रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचा संभ्रम वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात भरमसाठ करवाढीवरून नागरिकांमध्ये असंतोष आणि संभ्रम असतानाच, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांसाठी रजेवर जात असून, शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. करवाढीला महासभेने दिलेल्या स्थगितीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी महापौरांना परिणांमाची जाणीव करून दिल्यानंतर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. करवाढीच्या ठरावाबाबत आस्तेकदमची भूमिका घेत, कायदेशीर सल्लामसलत सुरू केल्याने करवाढीच्या ठरावाबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. दुसरीकडे प्रशासनानेही करवाढीच्या ठरावाबाबत तूर्तास 'जैसे थे'ची भूमिका स्वीकारल्याची चर्चा आहे.

शहरातील मालमत्ता करवाढीवरून महापालिकेत सध्या आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहिला असून, मुंढेंच्या भरमसाठ करवाढीने संकटात सापडलेल्या भाजपने विशेष महासभा घेऊन करवाढ स्थगितीची घोषणा केली. महापौर रंजना भानसी यांनी मुंढेंच्या करवाढीला स्थगिती देतानाच, प्रभाग क्र. १३ च्या पोटनिवडणुकीवेळी करवाढीची अधिसूचना जाहीर करणाऱ्या मुंढेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे आदेशित केले होते. त्यावरून भाजप आणि मुंढेंमधील संघर्ष टोकाला पोहचला होता. करवाढीच्या स्थगितीचा निर्णयही विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळातच जाहीर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाही आचारसंहिता भंगाबाबत कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. तसेच महापौरांनी करवाढीच्या स्थगितीचा ठराव दिल्यास महापौर अडचणीत येतील, असा संदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांसह भाजपने 'आस्ते कदम'ची भूमिका स्वीकारली असून, आता या ठरावावरून कायदेशीर काथ्याकूट सुरू केला आहे. ठरावाबाबत कायदेशीर तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतरच ठराव आता पाठविला जाणार आहे. त्यामुळे या ठरावाबाबत संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे आयुक्त मुंढे २ ते ११ मेपर्यंत सुटीवर चालले आहेत. आयुक्तांच्या सुट्यांचा कालावधी हा शासकीय सुट्यांना लागून असल्याने शनिवारपासून आयुक्त एकूण पंधरा दिवस सुटीवर आहेत. करवाढीची धग शहरात सुरू असतानाच, आयुक्तांच्या सुटीच्या कालावधीने संभ्रम अधिकच वाढवला आहे. १ एप्रिल रोजी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू राहणार की, तूर्तास 'जैसे थे' राहणार याबाबत प्रशासनासह नागरिकांमध्येही संभ्रम आहे.

मुंढेंचा खासगी युरोपदौरा

शहरात करवाढीवरून असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असतानाच तुकाराम मुंढे हे शनिवारपासून पंधरा दिवसांच्या सुटीवर जात आहेत. ते २ ते ११ मेदरम्यान युरोपच्या खासगी दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा भार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे राहणार आहे. महापालिकेला चौथा शनिवार (२८), रविवार (२९), सोमवारी बुद्धपौर्णिमा (३०) आणि मंगळवारी महाराष्ट्र दिन (१ मे) अशी सलग चार दिवस सुटी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शुक्रवारी सायंकाळी मुंढे यांच्याकडून पदभार स्वीकारला जाणार असल्याची चर्चा आहे.

'वॉक विथ'बाबत अनिश्चितता

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (२७) सायंकाळी पदभार स्वीकारणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यास आयुक्तांनी शनिवारी(२९) आयोजित केलेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आयुक्त कार्यालयाकडून मात्र, हा उपक्रम नियोजित कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पदभार सुपूर्द केल्यानंतर रजा कालावधीत आयुक्तांना असा उपक्रम घेता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. गेल्या शनिवारी कौटुंबिक कारणास्तव आयुक्त मुंढे यांना सदरचा उपक्रम पुढे ढकलावा लागला होता. आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाच्या मुहूर्तावरूनच गोंधळ आहे.

तूर्तास 'जैसे थे'?

करवाढीच्या प्रश्नावर नाशिकमध्ये रान पेटल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतल्याची चर्चा असून, करवाढीच्या तसेच करवाढीच्या स्थगितीच्या ठरावाबाबत 'जैसे थे' आदेश असल्याचे बोलले जात आहे. करवाढीच्या ठरावाबाबत मुंढेंनीही आस्तेकदम भूमिका घेतली असून अधिकाऱ्यांना करवाढीच्या विषयावर आता जास्त चर्चा नको असे सुनावले आहे. सत्ताधारी भाजपनेही स्थगितीच्या ठरावाबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे करवाढीच्या प्रश्नावर आता मुंढेंच्या परतीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये नाशिकला सात सुवर्णपदके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्नाटकच्या दक्षिण कॅनडा मास्टर अॅथलिट असोसिएशनतर्फे १२ ते १५ एप्रिलदरम्यान झालेल्या ३८ व्या मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकने सात सुवर्णपदकांसह १५ पदके मिळविली. यात पाच रौप्य व तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.

कर्नाटकच्या मंगला स्टेडियममध्ये १२ ते १५ एप्रिलदरम्यान झालेल्या या स्पर्धेत ३० ते १०० वर्षे वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. देशातील १८ राज्यांतून ४ हजार खेळाडूंनी सहभागी झाले होते. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ३५ ते ८५ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या ठिकाणी ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान असताना नाशिकच्या खेळाडूंनी ७ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्यपदकांची लूट केली आहे. स्पर्धेत के. पी. कोशी (वय ५५), राम बधान (८६), हरिभाऊ ढोली (७९), बाळ आलई (७८), तानाजी भोर (६०), आनंदन के (५५), उल्हास कुलकर्णी (५६), संजय चव्हाण (५०), नंदू उगले (३५), संदिप भगरे (३६), अनिल ढोकणे (४५), विलास सातपुते (४५), करीम अन्सारी (५०), संजय माथूर (४५), हरभजन सावरिया (७०), छाया कापुरे (४५), मधुकर वाघ (५०), संजय दुर्जड (३५), योगेश मोजाड (४५) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूड चित्रशिल्प प्रदर्शन आजपासून

$
0
0

न्यूड चित्रशिल्प प्रदर्शन

नाशिक : के. के. वाघ ललितकला महाविद्यालयातर्फे शुक्रवारपासून (दि. २७) न्यूड चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील हार्मनी आर्ट गॅलरी येथे १ मेपर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. नग्न चित्रशिल्पांकडे सर्वसामान्य रसिक सौंदर्यपूर्ण वृत्तीने पाहत नाही. या शिल्पांमधील सौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच त्याकडे त्यांनी अभ्यासू वृत्तीने बघावे, या उद्देशाने नाशिकमध्ये प्रथमच असे प्रदर्शन होत असल्याची आहे. रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य प्रा. सचिन जाधव, अधिष्ठाता बाळ नगरकर व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्चंट बँकेला ४१ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

बनावट कागदपत्र सादर करून नाशिक मर्चंटस्‌ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेतून तब्बल ४१ लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक मर्चंटस्‌ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेचे शाखाधिकारी उमाजी गावित यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित विवेक अरुण उगले (रा. पाथर्डी फाटा), सुनील रूंजा धोंगडे (रा. कुरेगांव), सोमनाथ गेणू गव्हाणे (रा. सावतानगर), भास्कर परशराम नरवाडे (रा. आंबे बहुला), संगीता पंढरीनाथ कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे (दोघे रा. पाथर्डी फाटा) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. विविध नामांकित कंपन्यांच्या शोरूमच्या नावाने कोटेशनही बँकेच्या शाखेत सादर केले. तसेच टाटा कंपनीचा ट्रक खरेदीसाठी वीस लाख ८५ हजार, फियाट पुंटो इमोशन या कार खरेदीसाठी आठ लाख पन्नास हजार रुपये, टाटा सफारी कार खरेदीसाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश नामको बँकेकडून शहरातील विविध नामांकित चारचाकी विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या दालनांच्या नावाने घेऊन पाथर्डी फाटा येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेतून तब्बल ४१ लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित उगले याने स्वत:ला मोटार विक्री दालनाचा संचालक असल्याचे भासवले.

चेक वटला नाही

संशयित कर्जदारांनी आयसीआयसीआय बँकेचा धनादेश नामकोच्या अंबड शाखेला दिला. हा धनादेश बँकेने पाठविला, मात्र तो वटू शकला नाही. या प्रकरणी नामको व्यवस्थापनाने संबंधितांना नोटीस बजावली. नोटिसांद्वारे खरेदी वाहने पडताळणीसाठी बँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले, मात्र कर्जदारांनी वाहन खरेदी न करता रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. अनुक्रमे २० लाख, ८५ हजार, ८ लाख ५० हजार, ११ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हे धनादेश उगले याने संगनमताने स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेतून वटविले. यावेळी त्याने परस्पर रक्कम काढून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही पोलिसांना संशय आहे. उगले याने वरील मोटार विक्री करणाऱ्या दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालयही उघडले होते असे समजते. दरम्यान, नामको बँकेकडे व खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुजित मुंढे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिहिनांसाठी शहरात १४ ऑडिओ लायब्ररी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमदार बच्चू कडू यांच्या राड्यानंतर महापालिकेने शहरातील दिव्यांगांसाठी विविध उपक्रम सुरू केले असून, पहिल्या टप्प्यात शहरातील दृष्टिहिनांसाठी १४ ठिकाणी ऑडिओ लायब्ररी सुरू केल्या आहेत. अंधांना या ठिकाणी शालेय शिक्षणासह, साहित्याचा समावेश असलेल्या व नॅबकडून मान्यताप्राप्त असलेल्या २०० डीव्हीडी अभ्यासासाठी ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रत्येक लायब्ररीसाठी जवळपास तीस हजार रुपये खर्च केले असून, शहरातील अभ्यासिकांमध्ये त्यासाठी स्वतंत्र सेट उभा करण्यात आला आहे. त्यामुळे दृष्टिहिनांना ब्रेल लिपीचा वापर न करताही थेट या लायब्ररीमधून सर्व प्रकारचे ऑडिओ शिक्षण घेता येणार आहे.

महापालिकेच्या एकूण बजेटपैकी तीन टक्के खर्च शहरातील दिव्यांगांवर करायचा असतो. परंतु, पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या निधीबाबत केवळ कागदी घोडे नाचविले जात होते. परंतु, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी गेल्या वर्षी महापालिकेत येऊन दिव्यांग निधीवरून चांगलाच राडा केला होता. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा आणि कडू यांच्यात हमरीतुमरीही झाली होती. त्यानंतर महापालिकेने दिव्यांगांसाठीच्या निधी खर्चासाठी पावले उचलत २० कोटींचा कृती आराखडा तयार केला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात शहरातील अंधांसाठी १४ ठिकाणी ऑडिओ लायब्ररी सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या व मान्यताप्राप्त अभ्यासिकांमध्ये अंधांसाठी स्वतंत्र ऑडिओ लायब्ररीचा सेट उभा करण्यात आला आहे. त्या ठिकाणची सर्व जबाबदारी ही अभ्यासिका चालवणाऱ्यांची राहणार असून, अंध या अभ्यासिकेत आल्यानंतर त्याच्या मागणीनुसार ऑडिओ अभ्यासक्रमाची पूर्तता केली जाणार आहे. या लायब्ररीसाठी महापालिकेने प्रत्येकी ३० हजार रुपयांचा खर्च केला आहे.

या ठिकाणी आहेत लायब्ररी

अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका (पंडीत कॉलनी), बालगणेश फाऊंडेशन (पंडीत कॉलनी), श्रीमती माई लेले विकास विद्यालय (गंगापूररोड), नॅब (कृषीनगर), राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब अभ्यासिका(भद्रकाली), शासकीय अंध शाळा (पुणे रोड), समर्थ अभ्यासिका (गंगापूररोड), नागरिक अभिनव वाचनालय (नाशिकरोड), नाशिक मनपा वाचनालय (नाशिकरोड), नॅब (सातपूर), लोकमान्य वाचनालय (मेरी), सार्वजनिक वाचनालय (म्हसरुळ), सार्वजनिक वाचनालय (मखमलाबाद), डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालय (खुटवड नगर) या ठिकाणी ऑडिओ लायब्ररी सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरात १० हजार दृष्टिहिन

शहर आणि जिल्ह्यात जवळपास २३ हजार अंध व्यक्ती असल्याचा दावा नॅब कडून करण्यात आला आहे. शहरात जवळपास दहा हजार अंध व्यक्ती असून शहर आणि ग्रामीण भाग मिळून जवळपास २३ हजार अंध व्यक्ती या लायब्ररीमध्ये येऊन शिक्षण घेऊ शकतात. नॅबच्या मान्यतेनुसार या ठिकाणी ऑडिओ सेट उभारण्यात आला असून, अंधांच्या अभ्यासासाठी दोनशे डीव्हीडी ठेवण्यात आल्या आहेत. मागणीनुसार त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकमध्ये रेड कार्पेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थानने दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी येथे रेड कार्पेट अंथरला आहे, याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

उन्हाचा तडाखा वाढलेला असतांना भाविक अनवाणी पावलांनी मंदिरात प्रवेश करतात. दर्शन आटोपल्यानंतर गायत्री मंदिराच्या बाजूने बाहेर पडल्यास भाविकांना चपला शोधण्यासाठी पुन्हा मंदिराच्या समोरील रस्त्याने अनवाणी जावे लागते. भाविकांची गैरसोय लक्षात घेता मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावर रेड कार्पेट अंथरण्यात आले आहेत. त्याच सोबत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर भाविक बालाजी मंदिरासमोरील गंगास्लॅबवरून लक्ष्मीनारायण चौकात येतात. या मार्गावर सावलीसाठी नेट बांधण्यात आली आहे. मंदिरातही मॅट अंथरण्यात आली आहे. उन्हाच्या झळांपासून भाविकांना संरक्षण मिळावे, म्हणून अशी व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानचे चेअरमन आणि सर्व विश्वस्त यांच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने केलेल्या कामाचे स्वागत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकांच्या रखरखलेल्या हाती पुस्तक अन् पेन!

$
0
0

'मुक्त'च्या कुलगुरूंच्या प्रयत्नाने उजळले वंचितांचे कोनाडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वंचितांसाठी असून ते महाराष्ट्रातील कोणालाही कोणत्याही वयात शिकण्यासाठी उभे केले आहे या कष्टकरी महिलांना माहितच नव्हते. श्रमिकांच्या रखरखलेल्या हातात पुस्तक आणि पेन आले असून त्यांच्यासाठी कुलगुरूंनी शिक्षणाची कवाडे खुली केली.

गोवर्धन, गंगापूर यासारख्या आपापाल्या छोट्या गावातून पायपीट करीत किंवा मिळेल त्या वाहनाने येऊन विद्यापीठात काम उपसत बसणाऱ्या या ६०-७० कंत्राटी कामगारांकडे कुलगुरू डॉ. ई वायूनंदन यांचे लक्ष गेले आणि त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्र सुरू केले. त्यामुळे अक्षर ओळख नसलेल्यांना लिहिता-वाचता येऊ लागले. कुलगुरूंनी या कष्टकऱ्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना लक्षात आले, की यातील अनेकांना लिहिता-वाचता येत नाही. काही अगदीच अक्षरओळखीपुरता साक्षर आहेत. अनेकांचा संगणकाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कंत्राटदारांकडून ठरलेले पुरेसे वेतनही या लोकांच्या हातात पडत नाही. मुळात ते त्याबाबत जागरुकच नाहीत. कुलगुरू डॉ. वायूनंदन यांनी कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या यंत्रणेला शिस्त लावली आणि कामाचे संपूर्ण पेमेंट या कामगारांच्या हाती पडू लागले. एवढेच नव्हे, तर पेमेंटची स्लिपही मिळू लागल्याने व्यवहारात पारदर्शकता आली.

कुलगुरूंनी कामगार वर्गाला एकत्रित बोलवून त्यांचे प्रबोधन केले. शिक्षणासाठी उद्युक्त करून 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या नावाने विद्यापीठाच्या आवारात अभ्यास केंद्र सुरू केले. या केंद्रातील वर्गात दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी वर्ग भरतो. एकूण ६० विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण घेत आहेत. मुक्त विद्यापीठातील पी. एचडीचे दहा विद्यार्थी गट शिक्षणपद्धतीने या प्रौढ विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. स्वत: कुलगुरू या तीनही दिवशी वर्गांवर जाऊन या कामगार विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रगतीचा आढावा घेतात. अनेकदा ते शिकवितातही.

शिक्षणाला प्रशिक्षणाचीही जोड देताना कुलगुरूंनी या महिलांसाठी आता कृषी आधारीत घरगुती लघु उद्योगांचेही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. गोवर्धन गावातून पायपीट करीत येणाऱ्या या कष्टकऱ्यांसाठी विद्यापीठाने गेल्या वर्षापासून खास बस सुरू केली. तीच बस कामगारांच्या मुलांना शाळेत ने आण करण्याचीही जबाबदारी निभावते. यातील गर्भवती महिला बाळंतपणासाठी सुटीवर असतानाही त्यांना रोजगार दिला जात आहे. दूरच्या लोकांना शिक्षण देता-देता दुर्लक्षित राहिलेल्या घरातल्या या कष्टकऱ्यांच्या पंखात विद्यापीठाने प्राण फुंकले आहेत.

५७ वयाची विद्यार्थिनी

पौढ अभ्यास केंद्रात ५७ वर्षे वयाच्या ताराबाई मवळे या सर्वात ज्येष्ठ आणि उत्साही विद्यार्थिनी आहेत. सहा महिन्यांपूर्वी अक्षर ओळखही नसलेल्या ताराबाई आता अतिशय तन्मयतेने अक्षर गिरवताना दिसतात. स्वत: कुलगुरू त्यांना वहीवर अक्षर गिरवण्यासाठी मदत करतात तेव्हा त्यांचा चेहरा आनंदाने उजळून गेलेला असतो. त्यांचा उत्साह पाहून बाकी विद्यार्थ्यांनाही हुरूप वाढत आहे.

मुक्त विद्यापीठ आवारातील लोकांना शिक्षण देण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्र सुरू केले. आज ६० विद्यार्थी मोठ्या आनंदाने शिक्षण घेत आहेत. गोवर्धनपासून सुरुवात करून वेगवेगळ्या छोट्या गावांत जाऊन शिक्षणाची ही घरांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. ई. वायूनंदन,

कुलगुरू, मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन टन कचऱ्याचे गोदाकाठी संकलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापलिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोदाकाठ आणि परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिोत सुमारे तीन टन कचरा संकलन करण्यात आले. पंचवटी विभागातील आसाराम पुलापासून ही मोहीम थेट मानूर घाटापर्यंत राबविण्यात आली.

आसाराम पूल, होळकर पूल, रामसेतू पूल, गाडगे महाराज पूल, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर पूल, पंचवटी अमरधामरोड, वनोद्यान, कन्नमवार पूल, लक्ष्मीनारायण पूल, तपोवन, कपिला संगम, घाट परिसर, नांदूर घाट आणि मानूर घाट या भागात स्वच्छता करण्यात आली. विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, आरोग्य स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, किरण मारू, दीपक चव्हाण आदींनी ही मोहीम राबविली. या स्वच्छता मोहिमेच्या काळात गोदावरी नदीत निर्माल्य न टाकता निर्माल्य कलशाचा वापर करावा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, उघड्यावर शौचास बसणे टाळावे, शौचालयांचा वापर करावा, ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा, कचरा जाळू नये, पर्यावरणाचे रक्षण करावे आदी सूचना नागरिकांना करण्यात आल्या.

---

देवळाली कॅम्पला पारा ४० अंशांवर

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या देवळाली कॅम्पमध्ये एप्रिल महिन्याचा अखेरीसच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी येथील पारा ४० अंशांवर पोहोचला होता. परिसरातील रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. आकाशात तळपता सूर्य आणि वाढत्या उष्णतेमुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असून, उन्हाच्या काहिलीतून वाचण्यासाठी पंखा, कूलर, एसी यांसारख्या साधनांचा वापर वाढला आहे. सकाळपासूनच घराबाहेर पडताना नागरिक टोपी, स्कार्फ आणि गॉगलचा वापर करीत आहेत. उकाड्यापासून गारवा मिळविण्यासाठी थंड पेयांना नागरिक पसंती देत असून, उसाचा रस, लिंबूपाणी, लस्सी आणि ताज्या फळांच्या फोडींची विक्री होणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी होत आहे. देवळालीतील विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्ष सातत्याने वृक्ष लागवड करीत असूनदेखील शहराचे तापमान वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये देवळालीचे वाढते तापमान हा विषय चर्चेचा बनला आहे. मात्र, सकाळी व सायंकाळी पसरणारा गारवा आणि हवेच्या झुळकांमुळे मळे विभागात काहीशा प्रमाणावर गारवा अनुभवास येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना पाणी, ना खुर्च्या, शेडही उद्ध्वस्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या जेलरोड येथील उपकार्यालया नागरिकांसाठी पिण्याचे पाणी नाही, की बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. बाहेर शेडमध्ये नागरिक कर भरण्यासाठी उभे राहायचे. परंतु, ते शेड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हटविण्यात आल्याने कडक उन्हात उभे रहावे लागत आहे.

महापालिकेच्या नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली जेलरोड येथे सावरकरनगर उद्यानात हे उपकार्यालय कार्यरत आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होते. महापालिकेचे अन्य उपक्रमही राबविले जातात. जेलरोडची लोकसंख्या वाढल्याने या कार्यालयात गर्दी वाढत आहे. मात्र, येथील अनेक समस्या वर्षभरापासून जैसे थे असल्याचे चित्र आहे.

सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर

या कार्यालयाची इमारत अत्यंत छोटी, तसेच असुरक्षित आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान मतदारांचा सर्वे करण्यात आला. मतदारयादीत दिल्यानुसार मतदार दिलेल्या पत्त्यावर राहतो, की नाही याची खातरजमा करण्याबाबत हा सर्वे होता. जेलरोड परिसरात हा सर्वे करण्यात आला होता. त्याची माहिती असलेला टॅबच येथून चोरीला गेल्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. या घटनेमुळे या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

पुरेशा सुविधांची वानवा

या उपकार्यालयात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जुन्या खुर्च्या आहेत. कार्यालयाला भक्कम दरवाजा नाही. त्यामुळेच चोरीच्या घटना होतात. कार्यालयाची इमारत म्हणजे एक मोठी खोली आहे. त्यात नागरिकांना उभेदेखील राहता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहांचाही प्रश्न आहे. हे कार्यालय पाडून मोठे कार्यालय बांधणे काळाची गरज झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना कडक उन्हात बाहेर रांग लावावी लागते. हे लक्षात घेऊन बाहेर शेड उभारण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हे शेड महापालिकेनेच हटविले. कार्यालयात इंटरनेटच्या रेंजचा प्रश्न असल्याने संगणक हळू चालतात. त्यामुळे नागरिकांची काम वेळेत होत नाहीत. कार्यालयातील फर्निचर जुने असून, दस्तावेजही उघड्या रॅकवर ठेवावे लागत आहेत.

कर्मचारी संख्याही अपुरी

जेलरोडची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे जेलरोडच्या उपकार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. सध्या अपुऱ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हे कार्यालय चालवावे लागत आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टीचे मोठ्या प्रमाणावर संकलन करीत आहे. मतदार सर्वे व अन्य कामेही या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने येथे पुरेसे कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे. या कार्यालयामागेच घरपट्टी व पाणीपट्टी ऑनलाइन भरण्याचे कार्यालय सुरू आहे. ते कंत्राटी पद्धतीने चालते. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. मात्र, कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन या कार्यालयाच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

--

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामामध्ये दिरंगाई; दोन तलाठी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सातबारा संगणकीकरण व गौणखनिज चोरीबाबत कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तालुक्यातील सायने व मालेगाव कॅम्प येथील दोन तलाठ्यांचे प्रांताधिकारी संजय मोरे यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. एन. के. दळवी व एस. व्ही. तांबे अशी कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत.

सातबारा संगणकीकरणची डेडलाईन जवळ येत असल्याने तहसीलदार देवरे यांनी मोहीम हाती घेतली होती. कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. सायने येथील तलाठी एन. के. दळवी यांनी संजय गांधी लाभार्थींना अहवाल सादर न करून वंचित ठेवले तसेच सवंदगाव शिवारातील गौण खनिज चोरीबाबत तहसीलदार देवरे यांनी वारंवार सूचित करूनही कारवाई केली नाही. तसेच स्वतः देवरे यांनी बुधवारी (दि. २५) केलेल्या कारवाईनंतरही तलाठी दळवी हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले नाहीत. सातबारा संगणकीकारणासाठी तहसील मुख्यालयी काम करण्याच्या सूचनांचे पालन केले नाही. याबाबत नोटीस देऊनही त्यास उत्तर दिले नाही म्हणून दळवी यांचे निलंबन करण्यात आले आहे तसेच मालेगाव कॅम्प तलाठी एस. व्ही. तांबे यांनीही सातबारा संगणकीकरणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने त्यांचे देखील निलंबन करण्यात आले. सातबारा संगणकीकरणाचे काम ३० एप्रिलअखेर पूर्ण करायचे आहे. हे काम पूर्ण न करणाऱ्या तलाठ्यांवरही अशा प्रकारे कारवाईचा इशारा देवरे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images