Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

२५ एप्रिल जागतीक हिवताप दिनानिमित्ताने जनजागृती मोहिम सातपूर

0
0

थोडक्यात

हिवताप दिनानिमित्त

सातपूरला जनजागृती

सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागाच्या वतिने जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून नागरिकांना हिवताप विषयी आजाराचे पत्रके वाटण्यात आली. तसेच डेंग्यू आजाराबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून उन्हाळ्यात पाणी साठवतांना काय काळजी घ्यावी याबाबत मलेरिया विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती देणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड पेखळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याध्यापकाची मनमाडला आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरातील विवेकानंदनगरमधील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या मेसेन खेडे खुर्द (ता. चांदवड) येथील शाळेचे मुख्याध्यापक मुकुंददास शोभावत (वय ५४) यांनी सरकारच्या ऑनलाइन कामांना वैतागून बुधवारी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सरकारने शिक्षकांना दिलेल्या ऑनलाइन कामाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून शोभावत यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गेल्या वर्षापासून कार्यभार सांभाळणारे शोभावत हे बुधवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरून केंद्र सरकारकडे मुदतीत पाठवण्याचे आदेश संस्था, शाळा मुख्याध्यापक यांना देण्यात आले होते. वार्षिक निकालाच्या कामासह हे काम शिक्षक करीत आहेत. शोभावत यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. या चिठ्ठीत ऑनलाइन व बांधकाम कामांचा ताण आल्याने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शोभावत यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न्यूड’मध्ये झळकणार नाशिकची कल्याणी

0
0

मटा विशेष

prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : बहुचर्चित मराठी चित्रपट 'न्यूड' उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होणार असून, यात नाशिकची अभिनेत्री कल्याणी मुळे प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आर्ट फिल्ममध्ये काम करणारी ती नाशिकची एकमेव कलाकार ठरली आहे. प्रारंभापासून चर्चेत असलेला हा चित्रपट

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनेनुसार इफ्फीमधून (आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) वगळण्यात आल्याने गदारोळ उडाला होता.

गोव्याला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इप्फी'च्या 'इंडियन पॅनारोमा सेक्शन'च्या १३ परीक्षकांनी २६ चित्रपटांमधून 'न्यूड'ची निवड केली होती. त्यामुळे या चित्रपट महोत्सवाच्या ओपनिंगचा मान 'न्यूड'ला मिळाला होता. मात्र केवळ चित्रपटाच्या शीर्षकामुळे तो नाकारण्यात आल्याच्या चर्चाही झडल्या होत्या. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत असून, यात न्यूड मॉडलिंग करणाऱ्या महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष चितारण्यात आला आहे. मुख्य भूमिकेत नाशिकची अभिनेत्री कल्याणी मुळे असल्याने नाशिककरांना चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

कल्याणी मुळे ही मुळात नाट्य कलाकार असल्याने अनेक नाटकांमधून तिने काम केलेले आहे. अतिशय ताकदीचे 'अनसीन' शीर्षकाचे नाटक कल्याणी हिने केले असून, त्याचे इंग्रजीत आलेले परीक्षण वाचून रवी जाधवने या चित्रपटासाठी कल्याणीची निवड केली. नाशिकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत हिरे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम सुरू असतानाच कल्याणीला एनएसडीला (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) जाण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला गेल्यानंतर कठोर मेहनत घेऊन कल्याणीने स्वत:ला सिद्ध केले. अनेक हिंदी मराठी नाटकातून काम, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे. 'न्यूड' चित्रपटात तिने 'यमुना' या मॉडेलची भूमिका साकारली आहे. त्यासाठी 'न्यूड' मॉडेल्सशी प्रत्यक्ष संवाद, कार्यशाळा याची तिला मदत झाली. 'न्यूड' हा आई आणि मुलाच्या नात्याचा चित्रपट असून, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई मनावर दगड ठेवून काय करू शकते, याचा प्रत्यय या चित्रपटातून येईल.

वेगळी व आव्हानात्मक भूमिका असल्याने 'न्यूड'ला चित्रपटाला होकार दिला. भूमिकेच्या अभ्यासासाठी पुस्तके वाचली, माहितीपट, लघुपट पाहिले. जे. जे. महाविद्यालयातील दोन मॉडेलशी चर्चा केली आणि यमुना साकारली.

- कल्याणी मुळे, अभिनेत्री

चित्रपटाची उत्सुकता

'नटरंग', 'बालगंधर्व', 'बालक पालक' असे सुपरडुपर हिट चित्रपट रवी जाधवने प्रेक्षकांना दिले आहेत. त्यामुळे 'न्यूड'विषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. स्वत: रवी जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्टचा विद्यार्थी असल्याने 'न्यूड' मॉडेलविषयी त्याच्या मनात अनेक वर्षांपासून कुतूहल होते. ते या चित्रपटाच्या रुपाने पहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’ आता शनिवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वॉक विथ कमिशनर या उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवार (दि. २८) रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक येथे सकाळी साडेसहा वाजता महानगरपालिका अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आयुक्त थेट सुसंवाद साधून नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेणार आहेत व त्यावर उचित कार्यवाही करण्याबाबत प्रशासनास सूचना देणार आहेत. महापालिकेच्या वतीने 'वॉक विश कमिशनर' या उपक्रमाअंतर्गत जे नागरिक आपल्या तक्रारी, सूचना, संकल्पना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करू इच्छित आहेत, त्यांनी त्या साध्या कागदावर लेखी स्वरुपात उपक्रमस्थळी संबंधित विभागीय कार्यालय प्रतिनिधींकडे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजेपासून उपस्थित असणाऱ्या महानगरपालिका विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी

0
0

लोगो- वर्षभरानंतर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०१३ पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षी जिल्ह्यातील तब्बल १२ लाख २२ हजार ४२७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५० बालकांवर किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ही योजना जिल्ह्यातील बालकांसाठी नवसंजीवनीच ठरली आहे. यापैकी १४५ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया तर उर्वरित ६०५ बालकांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षीही जिल्ह्यातील ७२० विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

एप्रिल २०१३ पासून अंगणवाडी व शालेय मुलांच्या आरोग्य संवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. वय वर्षे ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार केले जातात. जिल्ह्यात या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आतापर्यंत ७५० विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. आणखी १२३ विद्यार्थ्यांवर हृदयशस्त्रक्रिया होणे बाकी आहे. यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्यात सध्या ७५ पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात एक-एक पुरुष व महिला वैद्यकिय अधिकारी असे एकूण १५० वैद्यकीय अधिकारी, ७५ औषध निर्माता व ७५ परिचारिका अशा ३०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात.

अशी होते अंमलबजावणी

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ७५० विद्यार्थ्यांवर या योजनेतून शस्त्रक्रिया झाली.

 - डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेची प्रगती (२०१७-१८)

शाळा प्रकार- विद्यार्थी- तपासणी केलेले- हृदयरोग आढळलेले- हृदय शस्त्रक्रिया झालेले - किरकोळ व गंभीर शस्त्रक्रिया झालेले - एकूण शस्त्रक्रिया

अंगणवाडी- ४,८८,७११- ४,४७,३६५- १३२-८३-१९५-२७८

शाळा- ७,९५,११७- ७,७५,०६२-१३६-६२-४१०-४७२

एकूण- १२,८३,८२८- १२,२२,४२७- २६८-१४५-६०५-७५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा मिळकतधारकांनी भरले पैसे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने घरपट्टी थकलेल्या पन्नास मिळकतधारकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे बुधवारी लिलाव आयोजित केले होते. यातील अकरा मिळकतधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरल्याने त्यांच्या मालमत्ता परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेने घरपट्टी वसुलीचे कडक धोरण स्वीकारले असून, ज्या मिळकत धारकांच्या अनेक वर्षांपासून थकबाकी आहे, अशा मिळकती जप्त करण्यात आल्या होत्या. या पन्नास मिळकतींचे लिलाव बुधवारी दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणार होते. सकाळपासून याची प्रकिया सुरू करण्यात आली. मात्र, यातील यशोधन हेल्थकेअर, के अँड एफ. के. कोकणी, नेम गुलामगेस कोकणी, आदमसो, महमदसो मंहमंद रफिक, निरामय फार्मास्युटिकल्स, मायक्रो मेकर्स, विशाल देशमुख, अभिजीत देशमुख, अरविंद पोतनीस, काशिनाथ जाधव, हीना शेरजाद शारुख यांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरून मालमत्तांचा होणारा लिलाव टाळला आहे. यानिमित्ताने मनपाला लाखो रुपयांची थकबाकी प्राप्त झाली आहे. उर्वरित ३९ थकबाकीदारांच्या लिलाव प्रक्रियेत कोणाकडूनही बोली न आल्याने त्या मिळकतींचा लिलाव तहकूब करण्यात आला आहे. या मिळकतींच्या लिलावाची तारीख जाहीर करून पुन्हा नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्यांचा मनपास ठेंगा!

0
0

हॉकर्स झोनकडे जाण्यास नकार; जुन्याच जागी व्यवसायास पसंती

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला कोर्टाने दिलेल्या आदेशावरून शहरात ठिकठिकाणी हॉकर्स झोनची उभारणी करण्यात आली. सातपूर परिसरातही मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यात आले. मात्र, या हॉकर्स झोनकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवित महापालिकेला ठेंगा दाखविला आहे.

सातपूर परिसरात काही ठराविक ठिकाणीच विक्रेत्यांनी हॉकर्स झोनच्या ठरवून दिलेल्या जागेवर व्यवसाय करीत आहेत. तर ८० टक्के विक्रेत्यांनी जुन्याच जागेवर व्यवसाय करीत आहेत. हॉकर्स झोनची उभारणी करताना नको त्याठिकाणी जागा दिल्याचा आरोप विक्रेत्यांकडून नेहमीच केला जातो. या हॉकर्स झोनमध्ये महापालिकेने बदल करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.

शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने सर्वे करत हॉकर्स झोनची उभारणी केली होती. सातपूर भागातही मुख्य रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची जागा निश्चित केली. विक्रेत्यांना देण्यात आलेल्या जागेवर ग्राहकच येत नसल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. यामुळे पुन्हा जुन्याच जागी जाऊन विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. हॉकर्स झोनची जागा देताना ती किमान व्यवसाय करणे सोपे होऊ शकेल अशा ठिकाणी देणे तरी अपेक्षित होते. तशी न दिल्याने ग्राहक येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

स्थानिक रहिवाशी त्रस्त

सातपूर गावात अनेकदा शिवाजी मंडईच्या पार्किंगमधील अतिक्रमणे महापालिकेने हटविली. यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना मंडईत जागा देण्यात आली. त्याठिकाणी विक्रेत्यांनी जाणे टाळल्याने पुन्हा मंडईच्या बाहेर पार्किंगच्याच जागेत व्यवसाय सुरू झाल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांचे सायंकाळी रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याने स्थानिक सातपूरवासीयांना घराकडे जाणे अवघड होते. यावर महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे मत सातपूरवासीयांनी व्यक्त केले आहे.

सातपूर गावात प्रवेश करताना अतिक्रमणांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने अनेकदा अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली. परंतु, पुन्हा काही दिवसात त्याच ठिकाणी विक्रेते व्यवसाय करतात. याप्रश्नी महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे.

- सोपान बंदावणे, स्थानिक रहिवाशी, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लिंबू मिरची आंदोलन

0
0

'आप' कडून कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये खडे आणि रत्न देणाऱ्या मात्रिकांचा वावर वाढला असून, त्यामुळे शहराची आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन होते आहे. या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गळ्यात लिंबू मिरची बांधून अनोखे आंदोलन केले. यापुढे असे प्रकार घडू नयेत याकरीता जिल्हा रुग्णालयात कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली.

गळ्यात लिंबू आणि मिरचीच्या माळा अडकवून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले. 'आता रोगावर इलाज, लिंबू मिरची','कशासाठी हवी औषधोपचारावर खर्ची, 'हरले डॉक्टर हरले विज्ञान जिंकला मांत्रिक कधी होणार सज्ञान', अशी घोषवाक्य असलेले फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. रुग्णालयात मांत्रिकांना बंदी घालावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनातील अधिकारी डॉ. होले यांच्याकडे करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी घडलेला प्रकार चुकीचाच असल्याची कबुली देत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

रुग्णालयात वैद्यकीय आणि वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असून, त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण येतो. येथे तातडीने भरती प्रक्रिया राबवून रिक्त जागा भराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आरोग्य क्षेत्रात जगाला हेवा वाटेल, असे काम करत असताना पुरोगामी महाराष्ट्रात सरकारी अनास्थेमुळे आरोग्य क्षेत्रच 'आयसीयू'मध्ये असल्याबाबत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. राज्याला आरोग्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. सरकारी आरोग्य व्यवस्था संपवून खासगी कॉर्पोरेट लोकांच्या हातात पूर्ण राज्याची आरोग्य व्यवस्था देण्याचा राज्यकर्त्यांचा घाट आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. आंदोलनात जितेंद्र भावे, जगबीर सिंग, गिरीश उगले, नितीन शुक्ल, विकास पाटील, पद्माकर अहिरे, राजेश जाधव, रफिक शेख, विनायक येवले, संतोष राऊत, अश्विनी चोमल, प्रमोदीनी चव्हाण आणि एकनाथ सावळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासिका जुनी; देखभाल कमी

0
0

मटा मालिका : परीक्षा अभ्यासिकांची

प्रेरणा अभ्यासिका

अधिकारी घडविणाऱ्या अभ्यासिकेकडे तरुणांचा ओढा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी घडविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा ठरणारी प्रेरणा अभ्यासिका शहरातील जुन्या अभ्यासिकांपैकी एक आहे. प. सा. नाट्यगृहासमोार नेहरू उद्यानाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या प्रेरणा मंडळाच्या या इमारतीने सत्तरच्या दशकांपासून स्पर्धा परीक्षार्थींना अभ्यासाच प्रेरणा दिली आहे. कर्तृत्व सिद्ध केलेल्या परीक्षार्थींचे लाभणारे मार्गदर्शन ही या अभ्यासिकेची जमेची बाजू असली तरीही देखभालीचा अभाव सहन करतच परीक्षार्थी वर्षानुवर्षे येथे अभ्यास करत असल्याचे चित्र आहे.

प्रेरणा अभ्यासिकेच्या या इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतानाच नजरेला पडणारा कचरा, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि अभ्यासिकेच्या अंगणातील कोपऱ्यांमध्ये कोळ्यांनी विणलेले जाळे नव्या उमेदवाराला कोड्यात टाकते. अंधारलेल्या जिन्यातून चाचपडत अभ्यासिकेच्या अभ्यास कक्षात पोहचल्यानंतरचे वातावरण जरा दिलासा देणारे आहे. जागोजागी असलेल्या कचऱ्याचा मुद्दा वगळल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी असली तरीही येथे त्यांच्या नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र जाणवते. अभ्यासिकेच्या बाहेरील रस्ता प्रमुख वर्दळीचा असल्याने या परिसरात बाहेरून गोंगाट जाणवतो. पण अभ्यासिकेच्या आतील वातावरण शांततापूर्ण आहे.

जुन्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन प्रेरक

अभ्यासिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. अभ्यासिकेचे औपचारिक उद्घाटन १९९७ मध्ये झाले. प्रेरणा अभ्यासिकेने राज्य आणि देशाला आजवर असंख्य अधिकारी, डॉक्टर्, इंजीनिअर्स, प्राध्यापक दिले. उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून बहुतांश विद्यार्थी काही असुविधांकडे दुर्लक्ष करून प्रेरणा अभ्यासिकेला प्राधान्य देतात. या अभ्यासिकेतून यशस्वीपणे बाहेर पडलेले विविध खात्यातील अधिकारी नव्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मार्गदर्शन करतात. अभ्यास साहित्याच्या उपलब्धतेपासून तर वैयक्तिक संवाद साधण्यापर्यंत या अधिकारी वर्गाचे पाठबळ येथील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने जिल्हा व उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी या अभ्यासिकेची निवड करताना दिसत आहेत.

अभ्यासिकेचे ४७२ विद्यार्थी अधिकारी म्हणून सेवेत

प्रेरणामध्ये अभ्यास करून आजवर सुमारे ४७२ विद्यार्थी अधिकारी शासनाच्या विविध विभागात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देत आहेत. प्राधान्याने कष्टकरी कामगार वर्ग आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले या अभ्यासिकेचा लाभ घेतात. सध्या सुमारे ३६ विद्यार्थी तेथे नियमित अभ्यास करत आहेत. या अभ्यासिकेतील विद्यार्थी खासगी क्लास लावल्याशिवाय गटचर्चांमधून अभ्यासाची तयारी करतात.

अभ्यासिकांसमोर आव्हाने

अभ्यासिका चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. हे पूर्णत: सामाजिक काम असून यातून कुठलाही नफा नसल्याने उपलब्ध साधनात अभ्यासिकेचा मेंटेनन्स ठेवणे आव्हानात्मक झाले आहे, असे प्रेरणा अभ्यासिकेचे संस्थापक व संचालक राजेंद्र बागूल यांनी सांगितले. अभ्यासिका सामाजिक उद्देशाने असली तरीही वीज बिलासही कमर्शिअल दर लागू होतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बाहेरील लोकांच्या त्रासासह अनेक आव्हानांना आजवर अभ्यासिका समोर गेली आहे. सुविधापूर्ण खोल्या आणि अभ्यासास पोषक वातावरण यामध्ये तडजोड नाही. म्हणूनच आजवर येथून शेकडो नामवंत अधिकारी घडू शकले आहेत. शासनानेही अभ्यासिकांच्या आव्हानांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बागूल यांनी केली आहे.

ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नाशिकमध्ये आलो. तीन वर्षांपासून प्रेरणा अभ्यासिकेचा सदस्य आहे. अभ्यासास पोषक असे वातावरण आणि उपलब्ध सुविधांमुळे लवकरच माझ्या उद्दिष्टापर्यंत मी पोहोचेल.

- दशरथ झनकर, अभ्यासिका विद्यार्थी

एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी चार वर्षांपासून प्रेरणा परिवाराचा सदस्य बनलो. अनुकूल वातावरणामुळे मला ही अभ्यासिका बदलण्याची गरज कधी वाटली नाही. जुन्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि सोबतच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य यामुळे प्रेरणा परिवाराची साथ प्रेरक ठरते.

- तुषार कानकाटे, अभ्यासिका विद्यार्थी

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल

0
0

आरोपीला फाशी देण्याची सरकारी वकिलांकडून मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर एमआयडीसीलगत कार्बन नाका परिसरातील दुहेरी हत्याकांडाची बहुचर्चित घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. समाजमनावरही अशा घटनांचा विपरीत परिणाम होत असल्याने आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद बुधवारी सरकारी पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आला. या खटल्याचा निकाल गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता सुनावण्यात येणार आहे.

कार्बन नाका परिसरातील कचरू संसारे हे आपल्या कुटुंबीयांसह आरोपी रामदास शिंदे याच्या घरातील एका खोलीत पोटभाडेकरू म्हणून रहात होते. एप्रिल २०१६ च्या दुसऱ्या पंधरवड्यात ते पत्नी, मुलगा आणि तीन मुलींसह नगर जिल्ह्यातील राहुरी जवळच्या आपल्या मुळगावी गेले. मुलींना गावी ठेऊन १७ एप्रिल २०१६ रोजी पत्नी पल्लवी (वय ३२) आणि मुलगा विशाल (वय ६) यांसह सातपूरला परतले. कचरू संसारे रात्रपाळीसाठी कामावर गेले. घरात पल्लवी आणि विशालच होता. मध्यरात्री रामदास मागील दरवाजा उघडून घरात आला. त्याने पल्लवी यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर चाकूने वार केले. या झटापटीमुळे विशाल जागा झाला. त्याच्यावरही वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दरवाजाला कुलूप लावून आरोपी पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी संसारे कामावरून परतले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्यामध्ये एकही प्रत्यक्षदर्शी नसताना पोलिस आरोपी शिंदे याच्यापर्यंत पोहोचले. घटनेनंतर लावलेल्या कुलूपाची चावी, रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना तपासादरम्यान मिळून आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे याला दोषी ठरविण्यात आले होते. बुधवारी त्याला शिक्षा सुनावण्यात होणार होती. त्यासाठीच्या युक्तीवादाला सुरुवात झाली. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. एक निर्बल महिला आणि तिच्या निरागस बालकावर अत्यंत निर्दयीपणे वार करणे ही दुर्मिळ घटना आहे. प्रत्यक्षदर्शी पुरावा राहू नये याच हेतूने बालकाचाही खून करण्यात आला. त्यामुळे अत्यंत थंड डोक्याने केलेला हा गुन्हा असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अजय मिसार यांनी केली.

स्पेक्ट्रोग्राफी अहवालामुळे निकालाकडे लक्ष

घटनेनंतर आरोपीने त्याच्या मित्राला फोन केला. या फोनचा एकमेव धागा पकडून पोलिसांनी हत्याकांडाचा तपास केला. सरकारी पक्षाने आरोपीने फोनवर दिलेली कबुली महत्त्वाची मानली. मोबाइलवरील आवाज आणि आरोपीचा आवाज एकच असल्याची बाब स्पेक्ट्रोग्राफी अहवालात समोर आली. स्पेक्ट्रोग्राफीच्या आधारावर निकालावर आलेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आरोपीला काय शिक्षा होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीतील जनआक्रोश रॅलीस नाशिकमधून कार्यकर्ते जाणार

0
0

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या २९ एप्रिल रोजीच्या दिल्ली येथील जनआक्रोश रॅलीस नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

केंद्रात भाजप सरकारचे दलित विरोधी धोरण, महिलांवर होणारे अत्याचार व त्याला मिळणारा राजाश्रय, सामाजिक असंतोष, अल्पसंख्यांकाच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, पेट्रोल व डिझेलच्या भावात सातत्याने होणारी वाढ, वेगाने ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मागील चार वर्षात रोजगार निर्मितीत आलेले अपयश व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश निर्माण झाला आहे. या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामलीला मैदान, नवी दिल्ली येथे जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या जनआक्रोश रॅलीसाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख नेते, आजी, माजी आमदार व खासदार, प्रदेश व अखिल भारतीय प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, फ्रन्टल प्रमुख व सेल अध्यक्ष, सेवादल, एनएसयुआय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांचे अपघात बनली चिंतेची बाब

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात तरुणांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांसह सर्वांसाठीच ही चिंतेची बाब ठरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यू होत आहेत.

दिंडोरी रोडवरील म्हसरूळ ययेथील राणा गार्डन हॉटेलच्या बाजूला झालेल्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. दोन दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर दोन मित्र चारचाकी वाहनाचे जात असताना दुभाजकला धडकले. त्यात एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुलाच्या अलीकडे सातपूरला येत असताना दुचाकी बाभळीच्या वृक्षावर धडक दिल्याने घरातील एकुलता एक तरुणाला जीव गमवावा लागला. सातपूर एमआयडीसीतील महिंद्रा सर्कलच्या पुढे दुभाजकाला दुचाकी धडकल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरातील सदस्यांसह पोलिस यंत्रणेकडून दुचाकी व चारचाकी चालविणाऱ्या तरुणांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मुख्य रस्त्यांवर गतिरोधक टाकण्याची सातत्याने मागणी नगरसेवक व स्थानिक नागरिकांकडून केली जाते. रस्त्यांवरून वाहने चालवितांना अल्पवयीन मुलांचाही सहभाग अधिक आहे. रस्त्यांचे नियम माहिती नसल्याने अपघातांवर नियंत्रण कसे येईल, याबाबत पोलिस यंत्रणेनेच तोडगा काढण्याची गरज आहे. पालकांनीही गरजेनुसार आपल्या पाल्यांना सुविधा दिल्या. अजाणत्या वयात दुचाकी अथवा चारचाकी वाहने मुलांना दिल्या जात असल्याने अपघातांसारख्या प्रसंगांना पालकांना सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम साहित्यांनी ड्रेनेजलाइन चोकअप

0
0

वाळू, दगड-गोटे काढण्याचे कामगारांपुढे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहर परिसरात गल्लीबोळात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी लागणारे साहित्य रस्त्यांवरच टाकले जाते. परंतु, याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. बांधकामांच्या याच वाळू, दगड-गोट्यांनी ड्रेनेजलाइन चोकअप होत आहेत. सातपूरला ड्रेनेजमधील हे साहित्य काढण्याचे मोठे दिव्य स्वच्छता विभागाच्या कामगारांना पार पाडावे लागत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे घरांचे बांधकाम वाढले आहे. घरांचे वाढीव बांधकाम करताना लागणारे मटेरियल ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे असे साहित्य रस्त्यालगत ठेवले जाते. यामध्ये वाळू, दगड, विटा यांचाही समावेश असतो. बांधकामाचा पहिला टप्पा पार पडल्यावर सिमेंटच्या भींतीना पाणी मारतांना रस्त्यांवरून पाणी वाहत जाते. ते थेट ड्रेनेजच्या पाइपलाइनमध्ये वाहून जाते. महापालिकेने टाकलेल्या पावसाळी पाइपलाइनमध्ये त्यांचा शिरकाव होतो. याचा त्रास ड्रेनेज विभागाला सहन करण्याची वेळ येत आहे. बांधकामाचे साहित्य थेट ड्रेनेज लाइनमध्ये जात असल्याने वारंवार चोकअपची समस्या सातपूर भागात उद्भवत आहे. थेट ड्रेनेज व पावसाळी पाइपलाइनमध्ये उतरून काम करण्याची वेळ कामगारांवर येऊन ठेपली आहे.

बांधकाम करतांना लागेल तेवढेच साहित्य संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर टाकावे. अतिरिक्त साहित्य ठेवल्यास सहाजिकच बांधकामास पाणी मारताना वाळू अथवा इतर साहित्य ड्रेनेज अथवा पावसाळी पाइपलाइनमध्ये जाते. याबाबत नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

- संदीप पवार, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटविण्याचा धडाका सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने शहरात अतिक्रमण मोहीम सुरू केली असून, बुधवारी शहराचा मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा भागात मोहीम राबविण्यात आली.

रविवार कारंजा परिसरात येथील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. येथील व्यावसायिकांनी दुकानातील माल बाहेर माल लावल्याने रविवार कारंजा, बोहरपट्टी, मेनरोड परिसरात नागरिकांना रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले होते. याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी बोहरपट्टी परिसरात अतिक्रमण काढले होते. मात्र, येथील विक्रेत्यांनी पथकाची पाठ वळताच पुन्हा बस्तान बसवले होते. महापालिकेने बुधवारी मोहीम आयोजित केली, त्यावेळी अनेक फळविक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे दुकानाबाहेर लावलेले सामान जप्त करण्यात आले. यावेळी काही विक्रेत्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

(फोटो आहे)

0
0

थोडक्यात

पंचवटीत जनजागृती रॅली

पंचवटी : पंचवटी  महापालिकेच्या आरोग्य विभाग व मलेरिया विभागातील यांच्यातर्फे बुधवारी जागतिक हिवताप दिनानिमित्त पंचवटी परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. पंचवटी विभागीय कार्यालयात नागरिकांसाठी एका प्रदर्शनीद्वारे जनजागृती करण्यात आली. ही रॅली मालेगाव स्टँड, सरदार चौक, काळाराम मंदिर, ढिकले नगर, कृष्ण नगर, काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बस स्टँड, दिंडोरी नाका मार्गे विभागीय कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला. डॉ. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानूर घाटावर अस्वच्छता

0
0

दारणा पुलावरील

पथदीप अद्याप बंदच

जेलरोड : नाशिकरोड येथील दारणा नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. तथापी, या पुलावरील पथदीप अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे अपघाताची भीती आहे. या पुलावर पथदीप उभारण्यात आलेले आहेत. परंतु, अद्याप वीज पुरवठा झालेला नसल्याने ते सुरु झालेले नाहीत. शिंदे गावाला जाताना हा पूल संपतो तेथूनच जुन्या पुलावरील वाहतूक वळण घेते. येथे पथदीप बंद असल्याने वाहनांची टक्कर होऊ शकते. त्यामुळे पथदीप लवकर सुरू करणे गरजेचे आहे.

मानूर घाटावर अस्वच्छता

पंचवटी : सिहस्थ कुंभमेळ्याच्या घाटांच्या कामात मानूर येथे बांधण्यात आलेल्या घाटाची स्वच्छता होत नाही. या घाटावर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा कचरा, माती, दगड साचलेले आहेत. झाडांचा पालापाचोळा, काचांचे तुकडे पडून आहेत. घाट बांधण्याचा घाट घातला गेला, मात्र, स्वछतेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी यांच्यासाठी आलेल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

खड्डा दुरुस्ती करावी

सातपूर : कामगारवस्ती असलेल्या सातपूर कॉलनीतील आनंद छायाच्या वळणावर अनेक दिवसांपासून खड्डा पडला आहे. खड्डा वाचवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महापालिकेने रस्त्यात पडलेला खड्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मैदानावर सापाचे पिलू

सातपूर : एमआयडीसी परिसरातील एकमेव असलेल्या मैदानावर जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, तेथे सापाचे पिलू आढळल्याने खेळाडूंची धावपळ उडाली. यानंतर काही जणांनी सोशल मीडियावरून संबधित सापाचा फोटो सर्पमित्राला पाठवित विचारणा केली. सर्पमित्राने संबंधित पिलू बिनविषारी सापाचे असल्याचे सांगत त्याला काही करू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला. त्यांनी सापाच्या पिलाला जाण्यासाठी मार्ग करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरून गोमांस वाहतूक; दोघे ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी असतानाही गोमांसाची दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात ही कारवाई करण्यात आली.

इब्राहिम रज्जाक शेख व अशपाक इब्राहिम शेख (रा. दोघे नानावली, भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे व जमादार चंद्रकांत पळशिकर यांनी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. महामार्गावरून दोन तरुण गोवंश मासांची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. २४) सकाळी युनिट १ च्या पथकाने ठिकठिकाणी सापळा लावला. जत्रा हॉटेल समोरून भरधाव जाणाऱ्या लाल रंगाच्या अ‍ॅक्सेस (एमएच १५ एफएस ६६८२) या दुचाकीस्वारास अडवून पोलिसांनी तपासणी केली असता गोमांस पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यातील खाकी रंगाच्या बारदानात हे गोमांस मिळून आले. पळशीकर यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस स्टेशनमध्ये प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. युनिट १ चे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जाकीर शेख, हवालदार वसंत पांडव, रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, शांताराम महाले, दिलीप मोंढे आदींनी कारवाई केली. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण जीवन जगण्यासाठी नव्हे तर चांगल्या चारित्र्यासाठी घ्यावे - प्रा. गिरासे

0
0

शिक्षणातून घडते चारित्र्य

प्रा. प्रवीणसिंग गिरासे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिक्षण हे जीवन जगण्यासाठी नव्हे तर चांगले चारित्र्य घडविण्यासाठी घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनशैलीतून समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांच्या क्रांतीकारी विचारांनीच समाजाला चांगले ज्ञान व प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन प्रा. प्रवीणसिंग गिरासे यांनी केले. 

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे  स्वामी विवेकानंदाचे विचार या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना गिरासे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद राजगुरे आणि कवी रवींद्र मालुंजकर उपस्थित होते. यावेळी प्रा. गिरासे यांनी सांगितले की, राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या चारित्र्यवान तरुणांची देशाला गरज असून स्वामी विवेकानंदांचे विचारच देशाला विकासच्या वाटेवर आणू शकतात. राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक करत रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले. स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून समाजातील सर्वांनाच विरोध पत्करून सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुले यांच्या चळवळीत स्त्रिया आणि दलितांना  शिक्षण देण्याचे काम केले. स्वामी विवेकानंदानी पारतंत्र्यात असलेल्या भारतीय अज्ञान आणि अत्याचार पीडित समाजात आत्मविश्वास निर्माण करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी समाजात आत्मविश्वास आपल्या क्रांतिकारक विचारांनी प्रेरणा दिली.

यावेळी सजगुरे यांनी सांगितले की, नाशिक शहरात अशा वसंत व्याख्यानमालांची खऱ्या अर्थाने गरज असून धार्मिकतेकडून यंत्रभूमीकडे जाणाऱ्या या नगरीला विचारांची ओळखही देणे आवश्यक आहे. या व्याख्यानमालांमुळेच पुढील पिढीला खऱ्या अर्थाने विचारांची देवणाघेवाण करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी कवी रवींद्र मालुंजकर यांनी कविता सादर केल्या. 

सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. उपस्थितांचा परिचय प्रकाश काळे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार देवराम सैंदाणे यांनी मानले. यावेळी जनार्धन माळी, अनिल देवरे, रामदास शिंपी, नंदकुमार दुसानीस, अरविंद वडिले, कृष्णराव बेधडे, विनय  गुंजाळ, रमेश सोनावणे, श्रीकांत सोनार, शालिग्राम चौधरी, विजय गोसावी आणि मधुकर पाटील यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

------

आजचे व्याख्यान - सुजोग थेरपी निसर्गउपचार

वक्ते - डॉ . श्यामकांत दुसाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव @ ४३

0
0

नाशिक : उष्णतेची लाट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काहीशी ओसरली असताना आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी शहरे तापली आहेत. मालेगावचे तापमान ४३ अंशांवर गेले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान आहे. नाशिक शहराचे तापमानही ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे. रविवारपासून मालेगावचा तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे पुढे सरकत आहे. बुधवारी तापमानाचा पारा ४३ अंशांवर स्थिरावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध भक्तीचे प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आसारामला जोधपूरच्या विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याने भक्तांनी मोठा आक्रोश केला. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गंगापूररोड येथील आश्रमामध्ये गेल्या आठवड्यापासून आसाराम भक्त भजन आणि जप करीत होते. बुधवारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही बापू निर्दोष असून, वरचे न्यायालय त्यांना मुक्त करेल असा विश्वास भक्तांनी व्यक्त केला. बुधवारी दिवसभर हा आश्रम परिसर गजबजला होता.

नाशिकमध्ये आसारामभक्तांची संख्या मोठी आहे. आसाराम सातत्याने नाशिकमध्ये येत असे. त्याचे मोठे प्रवचन कार्यक्रम नाशकात होत असत. गंगापूररोडवरील सावरकरनगर परिसरात त्याचा मोठा आश्रम आहे. याठिकाणी आसाराम साधक येऊन साधना करतात. गेल्या काही वर्षांपासून आसाराम जेलमध्ये असतानाही त्याच्या भक्तांची श्रद्धा ढळली नाही. त्यामुळेच बुधवारी जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आसाराम भक्तांनी गेल्या आठवड्यापासून आश्रमामध्ये भजन आणि जप सुरू केला होता. न्यायालय त्यांची निर्दोष म्हणून सुटका करेल, असा विश्वास त्यांना होता. बुधवारी सकाळपासूनच आश्रमामध्ये अतिशय धीरगंभीर असे वातावरण होते. तेथे महिला साधकांची संख्या मोठी होती. या महिला साधक आसाराम यांच्यासाठी आक्रोश करीत होत्या. तसेच भगवंताकडे आराधना करीत होत्या. आसाराम हे निर्दोष आहेत, असे वारंवार हे साधक सर्वांना सांगत होते. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही, अशा प्रतिक्रिया साधक व्यक्त करीत होते.

हिंदू जनजागृती समितीचा पाठिंबा

आसाराम हे निर्दोष असल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. आसाराम यांनी गेले काही दशके समाजहितासाठी चांगले कार्य केलेले आहे. मग ते वनवासी क्षेत्रातील कार्य असो वा शिक्षणक्षेत्रातील. अन्य पंथांत गेलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. लोकांना धर्ममार्गावर आणण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. आजचा जोधपूर न्यायालयाचा निकाल हा मोठा धक्काच आहे. तरीही बापूंच्या भक्तांनी संयम ठेवून समंजसपणा दाखवला आहे. न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. अर्थात त्यामुळे पुढच्या न्यायालयात न्याय मागण्याचा त्यांचा अधिकार काही संपलेला नाही. भारताच्या इतिहासात असे अनेक खटले आहेत की, ज्या प्रकरणांत खालच्या न्यायालयाचा निकाल वरिष्ठ न्यायालयाने पालटला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत न्यायिक आणि संविधानिक मार्गाने लढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यातर्गंत आसाराम बापू यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सहकार्य करू, असे हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

--

बस स्टॉपचे नाव बदला

गंगापूररोड परिसरातील आसाराम आश्रम हा बसचा स्टॉप आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाची नाशिक शहर बससेवा तेथे आहे. निमाणी ते आसाराम आश्रम अशी सेवा महामंडळाकडून दिली जाते. आता न्यायालयाने आसारामला दोषी ठरवून शिक्षा ठोठवल्याने एसटी महामंडळाने बसवरील आश्रमाच्या नावाची पाटी काढून टाकावी, अशी मागणी काही नाशिककरांकडून होत आहे. त्यासंबंधीचे निवेदन महापौर, मनपा आयुक्त आणि एसटी महामंडळाला देण्यात आले आहे. तसेच, यापुढे आसाराम आश्रमाऐवजी सावरकर नगर असा बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बापू निर्दोष आहेत. वरचे न्यायालय त्यांना न्याय देईल. आम्हाला परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे.

- रामभाई, साधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images