Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सर्वसामान्यांवर अन्याय करणारा निर्णय

$
0
0

नागरिकांच्या आंदोलनाला वकील संघाचा पाठिंबा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करवाढ करताना ती नियमानुसार झालेली नसून, हुकमशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाविरोधात लढणाऱ्या कृती समितीच्या आंदोलनास वकील संघाचा पाठिंबा असून, वेळप्रसंगी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.

महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला नाशिक वकील संघाने पाठिंबा दर्शवला आहे. यासंबंधी मंगळवारी (दि. १७) दुपारी जिल्हा कोर्टाच्या लायब्ररी हॉलमध्ये यासंबंधी बैठक पार पडली. त्यात वकील संघाने पाठिंबा दर्शवित करवाढीला विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रसंगी हायकोर्टात याचिका

प्रास्ताविकात अॅड. ठाकरे यांनी करवाढीचे दुरगामी परिणाम विषद केले. बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी नाशिककर म्हणून सर्वांनी यात सहभागी व्हावे तसेच अन्यायकारक कर रद्द करण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन केले. नगरसेवक गजानन शेलार यांनीही महापालिकेवर टिकास्त्र सोडताना सदर कर शेतजमीनीला, बिनशेती क्षेत्राला तसेच हॉस्पिटल, हॉटेल्स, वसतीगृह, शाळा, क्रीडांगणे यांनादेखील लागू केल्याचे स्पष्ट केले. या सर्वांची झळ सर्वसामान्यांना बसणार असून, त्यास विरोध करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी लादलेले कर हे सर्वसामन्यांना परवडतील असे असावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांनी करवाढीचा घटनात्मकदृष्ट्या अभ्यास करून त्याबाबत वकिलांची एक समिती तयार करून महापालिकेला कायदेशीर सल्ला देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने तरीही दखल घेतली नाही तर या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करू असे अॅड. जायभावे यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांना करप्रणालीचा फटका

कृती समितीचे सल्लागार उन्मेश गायधनी यांनी महापालिकेवर दिशाभूल करण्याचा आरोप केला. महापालिकेने ही करवाढ चौरस फुटाला लागू केली आहे. वास्तविक चौरस मीटरनुसार क्षेत्राचे मोजमाप केले जाते. त्यामुळे ही वाढ अवाजवी असून, यात सर्वसामान्य माणूस दबला जाणार असल्याचे सांगितले. वकिलांनासुद्धा या करप्रणालीचा फटका बसणार असून, वाणिज्य दराच्या तीनपटीने आकरणी करण्यात आली असल्याची बाब गायधनी यांनी स्पष्ट केली. या वेळी माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, त्र्यंबक गायकवाड, दत्ता गायकवाड, अॅड. मुकुंद आढाव, नाशिक संघाचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश आहुजा, सहसेक्रेटरी अॅड. शामला दिक्षीत, सदस्य अॅड. हर्षल केंगे, अॅड. शरद मोगल, अॅड. महेश लोहिते, अॅड. सोनल कदम तसेच वकील उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. शरद गायधनी केले तर आभार अॅड. जालिंदर ताडगे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनेखरेदीसाठी आज होणार गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. १८) बाजारपेठेला झळाळी मिळणार आहे. अक्षय्य तृतीयेपाठोपाठ सुरू होणारी लग्नसराई विचारात घेता सोनेखरेदीसाठी बाजारात झुंबड उडणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या भावाने उसळी घेतली असून ३१ हजारांचा उंबरठा ओलांडला आहे. याशिवाय वाहन, वास्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, कपडे आदी वस्तूंच्या खरेदीवरही नागरिकांचा जोर आहे. बाजारपेठेतील मरगळ अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झटकली जाण्याच्या आशा व्यापारी वर्गाला आहे.

अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा भाव ३१ हजार ८०० तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २९९५० च्या घरात होता. तर चांदीचा भाव किलोमागे ३९ हजार ७० इतका आहे. लग्नसराईही जवळच असल्याने सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देत आहेत. विविध कंपन्यांची दुचाकी व चारचाकी वाहनेही बाजारपेठेत दाखल झाली आहेत. अनेक खरेदीदारांनी आठवडाभरापासूनच वाहने बुकिंग केली आहेत. मॉल्ससह विविध दुकाने आणि कंपन्यांनी वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांसाठी ऑफर दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिटूचे आंदोलन

$
0
0

सुरक्षारक्षकांसाठी 'सीटू'चे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या विविध मागण्यांसाठी 'सीटू'तर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यानुसार सुविधा पुरविल्या जात नसल्याबाबतचे निवेदन कामगार उपायुक्तांना दिले. कामगार उपायुक्त कार्यालयाकडूनच सुरक्षारक्षक मंडळामार्फत नेमण्यात आलेल्यांना किमान वेतनदेखील दिले जात नसल्याच आरोप डॉ. कराड यांनी केली. विशेष म्हणजे कामगार उपायुक्त हेच मंडळाचे प्रमुख असताना सरकारच्या सुविधा दिल्या जात नसल्याने सुरक्षारक्षक किमान वेतन व सुविधांपासून वंचित आहेत. यावेळी 'सीटू'ने दिलेल्या निवेदनात सर्वच सुरक्षारक्षकांना समान वेतन देण्याची मागणी केली. किमान वेतन १८ हजार रुपये असावे, ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची मंडळात नोंदणी करावी, सुरक्षारक्षकांना आठ तासांचीच ड्युटी देण्यात यावी, महिन्याच्या ७ तारखेला वेतन करण्यात यावे व कामगार उपायुक्त कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा सुरक्षारक्षकांना देण्यात याव्यात आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. आयटीआय सिग्नलच्या बाजूला असलेल्या उद्योग भवनातील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सुरक्षारक्षकांनी घोषणाबाजी करीत मागण्या मान्य करण्याची जोरदार मागणी केली.

--

अस्वच्छतेमुळे भगूरवासीय त्रस्त (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या अनेक दिवसांपासून भगूरमध्ये शहराच्या प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या रस्त्यावर साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात डुकरांचा उच्छादही वाढल्यामुळे येथे निर्माण होणाऱ्या घाणीत अधिकच भर पडत आहे. नगरपालिकेत वारंवार तक्रारी करूनही येथे स्वच्छता होत नसल्याचा नागरिकांचा आरोप असून, नागरिकांना या त्रासातून सोडविण्यासाठी भगूर नगरपालिकेने या परिसरात तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाच्या निकालाचामुंढे करणार अभ्यास

$
0
0

खंडपीठाच्या निकालाचा

मुंढे करणार अभ्यास

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शेतीसह मिळकतींवरील वाढीव करवाढ योग्य ठरवल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

नागपूर महापालिकेने शेतीवर आकारलेला कर रद्द करण्यासंसदर्भातील नागपूर खंडपीठाच्या निर्णयाची प्रत भाजपचे नगरसेवक अजिंक्य साने यांनी आयुक्तांना सोपवली आहे. शेतीवर कर लावता येत नसल्याचा दावा साने यांनी केला असून, आयुक्तांनी अभ्यासासाठी निकालाची प्रत ठेवून घेतली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या अभ्यासाकडे भाजप नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

तुकाराम मुंढेंनी शेतीलाही कराच्या कचाट्यात आणत, नवीन मालमत्तांच्या करात भरमसाठ वाढ केली असून, करवाढीला नागरिकांसह सत्ताधाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. भाजपने या करवाढीला विरोध करण्यासाठी येत्या २३ तारखेला महासभा बोलवली आहे. त्यामुळे यात मुंढेंना घेरण्याची रणनीती सुरू झाली आहे. भाजपचे नगरसेवक साने यांनी नागपूर खंडपीठाने शेतीसंदर्भात दिलेल्या एका आदेशाची प्रत आयुक्तांना सोपवत, शेतीवर कर रद्द करण्याची मागणी केली आहे. संबंधित खंडपीठाने नागपूर महापालिकेने शेतीवर लावलेला कर रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हाच खंडपीठाचा निर्णय नाशिक महापालिकेलाही लागू होत असल्याचा दावा त्यांनी मुंढेंची भेट घेऊन केला. त्यावेळी मुंढे यांनी नगरसेवकांचीच शाळा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, थेट आदेशच आयुक्तांच्या हाती सोपवल्यानंतर मुंढेंनीही अभ्यास करून सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला शोभायात्रा

$
0
0

मनमाडला शोभायात्रा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भगवान परशुराम यांची जयंती मनमाड शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील परशुराम प्रतिष्ठान, ब्राह्मण सेवा संघ, वेदिका महिला मंडळ यांच्या वतीने सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीराम मंदिर येथून ज्येष्ठ कार्यकर्ते राम वैशंपायन यांच्या हस्ते शोभयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान भाजप उपाध्यक्ष नितीन पांडे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. दत्त मंदिर येथे सांगता झाली. समीर कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, प्रसाद दिंडोरकर, हेमंत लाळे, उमेश कुलकर्णी अंकुश जोशी, अक्षय जोशी, आनंद औटी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार घटनांविरोधात शनिवारी मालेगावात धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जम्मु-कश्मीर आणि उत्तर प्रदेशातील तसेच गुजरातमधील अल्पवयीन मुलींचा बलात्कार व हत्या या घटनांच्या निषेधार्थ येथील जमेअतुल उलमाच्या संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे दोन्हीही गट एकत्र येवून शनिवार, २१ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती जमेअतुल उलमाचे प्रमुख तथा माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी येथे दिली.

येथील उर्दू मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मौलाना म्हणाले, कठुआमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा खटला कश्मीरच्या बाहेर इतर कोणत्याही राज्यात चालविण्यात यावा, बलात्कारांचे खटल्यांसाठी फास्ट ट्रक कोर्टची स्थापना करण्यात यावी, कश्मीरमध्ये ज्या वकील, बार कॉन्सिलचे पदाधिकारी, व मंत्र्यांनी आरोपिला मदत केलेली आहे आणि चार्जशिट फाईल करण्यास मज्जाव केला आहे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कठुआमधील बलात्कार झालेल्या मुलीच्या परिवाला संरक्षण द्यावे आदी मागण्या त्यांनी केल्या. या मागण्यांसाठी येत्या २१ एप्रिल रोजी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ३ ते ५ यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह मौलाना हमीद जमाली, शाकीर शेख, हाफीज अनिस अजहर, कारी अकलाख अहमद, सोहेल अहमद, इस्माईल जमाली आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला टॅक्सी, रिक्षा चालकांचा बंद, उद्या मूक मोर्चा

$
0
0

मनमाड : कठूआ व उन्नाव येथील घटनांच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड शहरातील रिक्षा व टॅक्सी युनीयनने रिक्षा व टॅक्सी बंद आंदोलन करून पीडितांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली. या प्रकरणी दोषींना कठोर शासन करावे, अशा आशयाचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. कठूआ व उन्नाव येथील मुलींच्या अत्याचार घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले असून, बुधवारी रिक्षा व टॅक्सी युनीयनने उत्स्फूर्त बंद पाळून पीडितांना श्रद्धांजली वाहिली. अक्षय तृतियेच्या दिवशी रिक्षा व टॅक्सी बंद असल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी पाचपर्यंत बंद होता. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट

यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, या घटनांच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परशुराम जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परशुराम प्रतिष्ठानच्यावतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा समावेश करण्यात आला होता.

परशुराम जयंतीनिमित्त शहराबरोबरच उपनगरांमध्येही दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य शोभायात्रा भद्रकाली येथील श्रीमंत साक्षी गणेश येथून काढण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता निघालेल्या शोभायात्रेला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी सटाणा येथील ढोलपथक वादन करीत होते. याच शोभायात्रेत सहभागी झालेले महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभायात्रेत एकूण पाच चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. अग्रभागी असलेल्या चित्ररथात भगवान परशुरामांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान करण्यात आला होता. ब्राह्मण बिजनेस नेटवर्क, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, सकल पंच छन्नादी ब्राह्मण मंडळ, परशुराम प्रतिष्ठान यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. भद्रकाली येथून निघालेली शोभायात्रा गाडगेमहाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, मेनरोड, बोहरपट्टी, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजा, सुकेणकर लेन, पाथरवट लेन मार्गे काळाराम मंदिरात पोहचली. या ठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात येऊन प्रभुरामचंद्राची व परशुरामांची भेट घडवून आणण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात येऊन शोभायात्रेची सांगता झाली. सायंकाळी सातपूर येथूनही मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे परशुराम जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर सकाळी १०. ३० वाजता शुक्ल माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने पंचवटीतील यजुर्वेद मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रथमच परशुराम जयंती साजरी करण्यात आली. प. सा. नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी ११ वाजता अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेसगेटजवळ बॉम्ब निकामी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील नोट प्रेसच्या गेट क्रमांक दोनवर आढळलेला शक्तिशाली बॉम्ब निकामी करण्याची रंगीत तालीम (मॉक ड्रील) यशस्वीरित्या पार पडली. बॉम्बशोध पथकाने सीआयएसएफ, आयबी, अग्नीशमन दल, पोलिस आदींच्या सहाय्याने ही कामगिरी फत्ते केली.

नोट प्रेस सुटण्याच्यावेळी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता भीमनगर गेट क्रमांक दोन जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यांनी पोलिस व संबंधित खात्यांना ती दिली. त्यानंतर सुरू झाली बॉम्ब निकामी करण्याची कवायत. बॉम्ब निकामी पथक, बॉम्बशोध पथक, दहशतवाद विरोधी पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, गुप्तचर विभाग, प्रेसची सुरक्षा सांभाळणारे सीआयएसफ, नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाणे, प्रेस व महापालिकेचे अग्नीशमन दल, रुग्णवाहिका पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन महिन्यांपूर्वी प्रतिभूती (आयएसपी) प्रेसच्या ग्रीन गेटवर असेच मॉक ड्रील झाले होते. त्यावेळी तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. नोट प्रेसचा मंगळवारी नंबर लागला.

बॉम्बशोध पथकाच्या श्वानाने ही वस्तू बॉम्ब असल्याचे संकेत दिले. यानंतर बॉम्ब निकामी पथकाने सावधगिरी बाळगत हा बॉम्ब निकामी केला. सायंकाळी सहाला हे मिशन यशस्वी झाले. सीआयएसएफचे डेपुटी कमांडर एस. आर. एस. मीना, रितेशकुमार राय, सुनील दुपारे, अरविंद सरकार, राजेंद्र साळवे, मंजुळा शर्मा, परमजित सिंग, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, एस. वाय. बिजली, उपनगरचे प्रभाकर रायते महेंद्र चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर लूटमार

$
0
0

मंगळवारी मध्यरात्री दोन दाम्पत्यांना मारहाण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-चाळीसगाव रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना मंगळवारी रात्री घडल्या. शहरातील ललवाणी व शेख दाम्पत्यास मारहाण करून दागिने लुटण्याचा प्रकार घडला. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा शहरातील प्रशांत ललवाणी व त्यांच्या पत्नी प्रीती ललवाणी (रा. सोयगाव, मालेगाव) हे कळवाडी येथून मालेगावकडे परतत होते. दरम्यान, सायने शिवारात त्यांच्या दुचाकीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ललवाणी दाम्पत्य रस्त्याच्या कडेला थांबले. तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठत जबर मारहाण केली. त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम ओरबाडून घेतली. हल्ला होताच ललवाणी यांनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील इतर काही काही वाहने थांबली. तेव्हा हल्लेखोर फरार झाले. या दाम्पत्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ललवाणी दाम्पत्यावरील हल्ला करून काही तास उलटत नाही तोच याच रस्त्यावर शेख शफिक शेख लतीफ व त्यांची पत्नी शेख नसीमा (रा. पिलखोड) हे मालेगावहून पिलखोडकडे जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्यावर शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात या दोन्ही हल्ला प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर याच रस्त्यावर आयशर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या महिलेलाही अज्ञात हल्लेखोरांकडून मारहाण झाल्याचे वृत्त आहे. याविषयी मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर अवघ्या काही तासांत प्रवाशांवर झालेल्या हल्ल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी व हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी पेट्रोलिंग करावे

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर धुळे फाटा ते कळवाडी दरम्यान केवळ दहिवाळ हे एकच गाव लागते. बाकी इतर गावांचे केवळ फाटे असल्यामुळे तेथे फारशी चहलपहल नसते. मात्र दहिवाळ ते मालेगाव आणि कळवाडी ते दहिवाळ दरम्यान अनेक ठिकाणी चोरट्यांना लपण्यासाठी जागा आहे. तसेच अवघड वळण असल्यामुळे वाहनांचाही त्या ठिकाणी वेग कमी होतो. त्यामुळे दबा धरून बसलेले चोरटे हल्ला करतात. म्हणून या रस्त्यावर रात्री पोलिसांनी पेट्रोलिंग करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सण आखाजीचा मोलाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोन्यासह नवनवीन वस्तूंची खरेदी, गृहप्रवेश, आमरसावर यथेच्छ ताव अन् स्नेहीजणांच्या अक्षय सुखाची मंगलकामना करीत अक्षय तृतीयेचा सण बुधवारी साजरा करण्यात आला. पूर्वजांनाही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्यांचे स्मरण करण्यात आले.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया अर्थात आखाजी म्हटले जाते. हिंदू पंचागांनुसार हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास प्राधान्य दिले जाते. असे शुभकार्य कधीच क्षय होत नाही असे मानले जाते. अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. कराकेळीच्या रुपात त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे नागरिकांनी कराकेळी व पुजेचे साहीत्य खरेदीला प्राधान्य दिले. पुजेसाठी सकाळी ५.५६ मिनिटांपासून दुपारी १२.२० पर्यंत शुभमुहुर्त होता. त्यामूळे यावेळात कराकेळीची विधीवत पूजा करून पूर्वजांचा आशिर्वाद घेण्यात आला. त्यानंतर त्यांना आंबेरस, पुरणपोळीसह पंच पक्वान्नांचा नैवेद्य दाखवित भोजनावर यथेच्छ ताव मारण्यात आला. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. लग्नसराई अन भविष्यात सोने चांदीच्या दागिन्यांचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी मुहुर्तावर सोने खरेदीला पसंती दिली. सराफ बाजारसह शहरात ठिकठिकाणी असलेल्या सराफी पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी होती. सोने खरेदी शक्य नसणाऱ्यांनी यथाशक्ती दान करण्यासही महत्व दिले.

ऑफर्सची बरसात

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असल्याने खरेदीला पसंती दिली जाते. या मुहुर्तावर अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला. एसीसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, वाहन खरेदीला पसंती देण्यात आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ केल्या. या ऑफर्सचा लाभ उठवित खरेदीचा आनंद लूटण्यास नाशिककरांकडून पसंती देण्यात आली. खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने सायंकाळी शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या.

अक्षय सुखाची मंगलकामना

अक्षय तृतीयेचे पर्व आपणास व आपल्या परिवारास अक्षय ऊर्जा, आरोग्य, प्रगती, ऐश्वर्य, यश प्रदान करो यांसारख्या शुभेच्छांचा आप्तस्वकीय व स्नेहीजणांवर वर्षाव करण्यात आला. व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यास प्राधान्य देण्यात आले. या दिवशी गोरगरीबांना दान करण्याची प्रथा असल्याने माठ, रांजण, आंबे, मिठाई, कपडे यांसारख्या वस्तूंचे दान करण्यासही पसंती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड कारखान्याच्या पडिक जागेत ड्रायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. निफाड साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मान्यता दिली असून, जेएनपीटी ड्रायपोर्टसाठी कारखान्याची पडिक जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात जिल्हा बँकेला १०५ कोटींचे मुद्दल देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेचे कारखान्यावर १५९ कोटींचे कर्ज आहे. वनटाइम सेटलमेंट करून १२९ कोटी एवढी रक्कम कारखान्याकडून येणे बँकेला अपेक्षित आहे. जेएनपीटीला ड्रायपोर्टसाठी जागा हवी असल्याने त्यांनी १०५ कोटी रुपये देऊन ही जमीन घेण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रांताधिकारी महेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, जेएनपीटीचे नीरज बन्सल आदी उपस्थित होते. कारखान्याने १०५ कोटी रुपये मुद्दल घेऊन हा विषय मार्गी लावल्यास बँकेची रक्कमही मिळेल व ड्रायपोर्टचा मार्गही मोकळा होईल, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. बैठकीनंतर बन्सल यांनी कारखान्याच्या जमिनीचे मूल्यांकन आधार समजून घेतले व मान्यता दिली. हा प्रस्ताव जेएनपीटी बोर्डाच्या व मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

कारखान्यावर राहणार २४ कोटींचा बोजा

वनटाइम सेटलमेंटनुसार जिल्हा बँकेला १२९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. परंतु, जेएनपीटीने जागेसाठी १०५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरीत २४ कोटी रुपयांच्या वसुलीचा प्रश्न कायम राहातो. १०५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात कारखान्याची १०८ एकर जागा ड्रायपोर्टच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. परंतु, उर्वरित २४ कोटी रुपयांचा बोजा कारखान्यावर कायम राहील अशी माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे या २४ कोटी वसुलीचा प्रश्न कायम राहणार आहे.

निसाकावरील कर्जाची एकरकमी कर्जफेड करताना जिल्हा बँक निसाकाच्या जमिनीचे टायटल क्लिअर करून देणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे ही तांत्रिक बाब असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आतापर्यंत शासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ट्रायपोर्ट आणि निसाका लवकर सुरू होईल यासाठी आम्ही आशावादी आहोत.

- सुरेशबाबा पाटील, भाजप नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी यात्रोत्सवात बारागाड्या ओढल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळचे ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मंगळवारी झाला. यात्रेनिमित्ताने अभिषेक, महापूजा, महाप्रसाद आणि बोहड्याचा कार्यक्रम रंगले.

म्हसरुळ येथील महालक्ष्मी देवीचे मूळ स्थान हरसूलजवळील गडदावणे येथील आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी तेथे जाऊन दरवर्षीप्रमाणे तेथील देवीचा मानसन्मान करण्यात आला. सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक व महापूजा करण्यात आली. दुपारी होमहवन करण्यात आले. सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. मोंढ बाबा यांनी दरवर्षीप्रमाणे या बारा गाड्या ओढल्या. त्यानंतर महालक्ष्मी रथाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री बोहाड्याचा कार्यक्रम झाला. यात्रा समितीचे अध्यक्ष अशोक बुरुंगे, सोमनाथ वडजे, रुंजा मोराडे, कैलास मोराडे, वाळू शिंदे, भाऊसाहेब बोंबले, रघुनाथ गुंजाळ, राजू सातकर आदींनी आयोजन केले. मंदिराला रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली आहे. खेळणी, खाद्यपदार्थ आणि पूजा साहित्य यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी (दि. १९) रोजी सकाळी आठ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा पारा ४२.२ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सूर्य आग ओकू लागल्याने नाशिक शहरासह मालेगावकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मालेगावचा पारा दिवसागणिक चढतच असून, बुधवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. नाशिकच्या तापमानाचाही पाराही ३८.८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दिवसभराच्या उकाड्याने नाशिककरही घामाघूम होत आहेत.

मालेगाव शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यात चांगलीच वाढ होत आहे. बुधवारी मालेगावचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उन्हाचा पारा ०.२ अंशाने वाढला आहे. उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढेच राहत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या आठवडाभर उन्हाचा तडाखा असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

मालेगावची तापमान नोंद

दिनांक कमाल तापमान

१३ एप्रिल ४०.८

१४ एप्रिल ४२.०

१५ एप्रिल ४२.०

१६ एप्रिल ४२.०

१७ एप्रिल ४२.०

१८ एप्रिल ४२.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईसाठी सकाळची विमानसेवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना प्रतीक्षा असलेली सकाळची मुंबई विमानसेवा शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहे. एअर डेक्कन कंपनीच्या वतीने सकाळी सहा वाजता ओझरहून मुंबईसाठी सेवा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खंडित झालेली विमानसेवा सुरू झाली आहे. उन्हाळी पर्यटनाच्या माध्यमातून सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन कंपनीने नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली. डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेली ही सेवा गेल्या महिन्यात खंडित झाली. पायलटची अनुपलब्धता आणि तांत्रिक कारणामुळे खंडित झालेली ही सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. येत्या शुक्रवारपासून (२० एप्रिल) मुंबईसाठी पहाटे सहा वाजेची सेवा उपलब्ध होणार आहे. मुंबई विमानतळावर टाइम स्लॉट उपलब्ध होत नसल्याने यापूर्वी ही सेवा सकाळी साडेअकरा वाजता होती. मात्र, नव्या वेळापत्रकात नाशिकसाठी पहाटेचा स्लॉट उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजता ओझरहून निघणारे विमान अवघ्या पन्नास मिनिटांमध्येच मुंबई विमानतळावरील टर्मिनल एकवर पोहचणार आहे. या सेवेमुळे नाशिककरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. पहाटेच मुंबई गाठता येत असल्यामुळे तेथून देशांतर्गत आणि परदेशातील सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे उद्योजक, व्यापारी, डॉक्टर तसेच सातत्याने विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २० एप्रिलपासून सेवा सुरू होईल, असे कंपनीने जाहिर केले होते. पण, सर्व प्रकारची उपलब्धता झाल्याने आम्ही पुणे व मुंबई ही सेवा सुरू केली आहे, असे एअर डेक्कन कंपनीने सांगितले आहे. येत्या ३० जूनपर्यंत कंपनीने सेवेचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

बुकिंगसाठी ऑफर

सेवा खंडित झाल्याने ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी आणि बुकिंग चांगले व्हावे या उद्देशाने कंपनीने ऑफर दिली आहे. अवघ्या पाचशे रुपयांत तिकिट बुक करण्याची संधी काही भाग्यवंतांना मिळणार आहे. या ऑफरला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

असे आहे वेळापत्रक

ठिकाण- प्रस्थान-ठिकाण-आगमन

ओझर-६.००-मुंबई-६.५० (सकाळी)

मुंबई-४.५५-ओझर-५.४५ (सायंकाळी)

ओझर-६.०५-पुणे-६.४५ (साय़ंकाळी)

पुणे-७.०५-ओझर-७.४५ (रात्री)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरणपोळी, मांड्यांचा गोडवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अक्षय तृतीयेसाठी रेडिमेड मांडे, पुरणपोळीला चांगली मागणी होती. रेडीमेड वस्तूंवर भर दिला जात असल्याने आजही पुरणपोळी व मांड्यांना बाजारात मागणी असल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगर परिसरात अनेक महिला बचतगटांनी पुरणपोळी व मांड्यांची विक्री केल्याचे दिसून येत असून या व्यवसायातून परिसरात लाखो रूपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी, आमरस या विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात येते. यंदा करा केळीबरोबरच सिडको व इंदिरानगर परिसरात अनेकांनी पुरणपोळी व खापरावरचे मांडे विक्रीचे स्टॉल लावल्याचे दिसून आले. वीस रुपयांना एक पुरणपोळी व पन्नास रुपयांना एक मांडा यापद्धतीने विक्री सुरू असल्याचे दिसून आले. तसेच परिसरातील मिठाईच्या दुकानांमध्येसुद्धा सकाळपासूनच पुरणपोळीची खरेदी होत असल्याचे दिसत आहे. पुरणपोळी ही सर्वच दुकानांमध्ये उपलब्ध असली तरी खापरावरचे मांडे मात्र काही ठराविक ठिकाणीच दिसून येत होते. सिडकोतील काही महिलांनी तर आधीपासूनच ऑर्डर घेतलेल्या असल्याने ऐनवेळी आलेल्यांना मांडे उपलब्ध नसल्याचे सांगावे लागले. राजीवनगर येथे सुद्धा यंदा या खापरावरच्या मांड्यांची चांगलीच विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच यंदा पावसाळ्यापर्यंत आमरसाबरोबर खाण्यासाठी खापरावरचे मांडे उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाच्या कारची तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील माजी नगरसेवक कन्हैय्या साळवे यांच्या कार व दुचाकीची २० ते २५ युवकांनी बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तोडफोड केली. त्यांचा मुलगा व त्याच्या मित्रावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याआधी याच टोळक्याने एकलहरे रोडवरील पानपट्टीचालकावर प्राणघातक हल्ला केला. जुन्या वैमन्स्यातून हे दोन्ही हल्ले झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेमुळे तणावाचे वातावरण होते.

कन्हैय्या साळवे यांचा आरंभ महाविद्यालयाशेजारी कंथक हा बंगला आहे. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास साळवे हे बाहेरून आल्यावर वरच्या खोलीत आरामासाठी गेले. गेटमध्ये त्यांचा मुलगा आशिष व त्याचा मित्र उभे होते. त्याचवेळी तलवारी, कोयते, हॉकी स्टीक घेऊन दुचाक्यांवर २० ते २५ युवक आले. त्यांनी प्रथम साळवे यांच्या सियाझ सुझूकी कारच्या (एमएच १५ जीडी ९९९२) काचा फोडून आत बिअरच्या बाटल्या टाकल्या. नंतर दुचाकीची (एमएच १५ ईडब्लू १६०२) मोडतोड केली. नंतर त्यांनी आशिषवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साळवे कुटुंबातील संगीता साळवे यांनी एका हल्लेखोराचा शर्ट पकडला. नागरिक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर फरार झाले.

साळवे यांच्या घरावर हल्ला करण्याआधी सातच्या सुमारास एकलहरे रोडवरील गजानन रावसाहेब थोरात (वय २९) याच्या पानटपरीवर जाऊन टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर गेल्यानंतर नागरिकांनी गजाननला जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो बेशुध्द असून आयसीयूमध्ये आहे. उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या श्वानाने ठेवले कुटुंब ओलिस!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

चोर-दरोडेखोरांनी आपला कार्यभाग साधण्यासाठी सामान्यांना ओलिस ठेवण्याच्या घटना ऐकिवात येतात. पण, एका भटक्या श्वानाने एका घराचा ताबा घेत तब्बल चार तास एका कुटुंबाला ओलिस ठेवल्याचा चमत्कारिक प्रकार सातपूरमध्ये पहायला मिळाला.

नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मोठा आहे. सातपूर भागातही मोकाट श्वानांमुळे रात्री, अपरात्री येणाऱ्या कामगारांना त्रास सहन करण्याची वेळ येते. सातपूरच्या मौले हॉल शेजारील संदीपनगर य़ेथील भिला कोठावदे यांच्या घराचा ताबा एका भटक्या कुत्र्याने घेतला. तब्बल चार तास भिला कोठावदे यांच्या घराच्या कपाऊंडमध्ये पहारा देत या कुत्र्याने ठाण मांडल्याने कुटुंबीयांना घरातच कैदेत राहण्याची वेळ आली. हा कुत्रा बाहेर निघायचे नावच घेत नसल्याने शेजारी-पाजाऱ्यांनीही त्याला हटविण्याचे प्रयत्न केले. काठीच्या सहाय्याने त्याला धमकावले. मात्र तरीही कुत्रे बधले नाही. कुत्रे पिसाळलेले आहे की काय, या शंकेने त्याच्या अंगावर गरम, थंड पाणीही टाकून पाहिले. मात्र, तरीही कुत्रे जागचे हटेना. अखेर सायंकाळी कामावरून घरी परतलेल्या सचिन कोठावदे व त्यांच्या मित्रांनी मोठ्या मुश्किलीने या कुत्र्याला बाहेर हाकलून लावले. ग्रामीण भागातून शहरात आलेला हा कुत्रा घाबरलेला असल्याने त्याने या घरात ठाण मांडल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे घरातील मुलांची मात्र भीतीने गाळण उडाली होती.

लोकप्रतिनिधींची अनास्था

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना व अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना घडत असतानाही लोकप्रतिनिधी मात्र याबाबत फारसे काही करताना दिसत नाहीत. शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबाखरेदी जोरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर किरकोळ बाजारात फळांचा राजा आंब्याच्या खरेदीस नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद दिसून आला. आंब्याची आवक बाजारात कमीच असल्याने सर्व प्रकारच्या आंब्याचे दरही प्रतिकिलोस शंभर रुपयांच्या वरच राहिले.

काल बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी सकाळपासुनच गर्दी दिसून आली. नैवेद्यासाठी फळांचा राजा आंब्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे घरोघरी आंबाखरेदी होते. त्यानुसार बुधवारी फळबाजारात नागरिकांची आंबा खरेदीसाठी गर्दी झाली होती. आंब्याची आवक तशी कमीच असल्याने किरकोळ बाजारात आंब्याचे प्रतिकिलोचे दरही चढेच राहिले. सर्वच प्रकारच्या आंब्यांचे दर प्रतिकिलोस शंभर रुपयांपेक्षा जास्तच दिसून आले. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन्ही आंब्यांचे दर तर अडीचशे रुपयांपर्यंत होते. या आंब्यांची आवकही खूपच कमी दिसून आली.

किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो

रत्नागिरी हापूस- २२०

देवगड- २५०

बलसाड केशर - १६०

जुनागड केशर- १८०

लालबाग -१२०

पायरी - १२०

बदाम- १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपबाजार समितीत कांदा लिलावास प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर फाटा मार्केटमध्ये व्यापारी, शेतकरी आणि बाजारसमिती व्यवस्थापनाच्या समन्वयामुळे कांदा लिलावास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी असा समन्वय राहिला असता तर दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले कांदा लिलाव बंद पडले नसते. शेतकरी हितासाठी यापुढे मात्र कोणाचीही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी माजी सभापतींना नाव न घेता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी बुधवारी दिली.

अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार समितीच्या आवारात खुल्या पद्धतीने कांदा लिलावास प्रारंभ झाला. याप्रसंगी शिवाजी चुंबळे बोलत होते. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस या मार्केटमध्ये कांदा लिलाव होणार असून, शेतकऱ्यांना रोख पैसे मिळणार आहेत. या मार्केटमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांसाठी निवासव्यवस्थेची सुविधा लवकरच उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बंद असलेले गाळेही व्यापारीवर्गाला लवकरच दिले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या भाजीपाला मार्केटलाही नागरिक व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील भाजी विक्रेत्यांना बाजार समिती जागा देण्यास तयार असल्याचे पालिका प्रशासनाला लेखी कळविले असल्याची माहिती याप्रसंगी उपसभापती संजय तुंगार यांनी दिली. सिन्नर फाटा येथे डेली मार्केट सुरू करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचेही तुंगार यावेळी म्हणाले. याप्रसंगी अशोक खालकर, राजाराम धनवटे, संचालक प्रवीण नागरे, व्यापारी लालचंद दळवी यांनीही मार्गदर्शन केले.

पहिल्याच दिवशी ९०० रुपये भाव

अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सिन्नर फाटा उपबाजारसमिती आवारात खुल्या पद्धतीच्या कांदा लिलावास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ५० किलोच्या २००० हजार गोणी कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला. या कांद्याचा बोली पद्धतीने लिलाव झाला. कमाल ९०० रुपये तर किमान ४५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.सरासरी ६५० रुपये दर मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images