Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवकाळी पिच्छा सोडेना!

$
0
0

बागलाण, निफाडमध्ये पाऊस; शेतकरी हवालदिल

टीम मटा

गत दोन दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर उकाडा आणि सायंकाळी पावसाचे वातावरण होत आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह सटाणा, निफाड भागात काही ठिकाणी पाऊस झाला. येवला, सिन्नर तालुक्यातही पावसाचे वातारण होते

बागलाणला पुन्हा फटका

सटाणा : बागलाण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सटाणा शहरवासीयांना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वातावरणात आलेल्या गारव्याने सुखद धक्का दिला. थोड्याच वेळात सोसाट्याच्या वारा सुटल्याने ज्यांच्या शेतमाल बाहेर होता त्या शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, दोधेश्वर, कोटबेल जोरण, किकवारी, तळवाडे दिगर आदी भागात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा खांडणीला मोठा पटका बसला आहे. मात्र पावसानंतर काही मिनिटातच ताबडतोब कडकडीत उन्हाचे चटके बसू लागले.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सटाणा शहरात सोसाट्याचा वारा व ढगांचा गडगडाट होवून वातावरणात बदल झाला. दुपारी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर तालुक्यातील काही भागात हलक्या व तुरळक सरी पडल्या. मात्र अर्धा तासांच वातावरणात पुन्हा पूर्ववत होवून कडकडीत ऊन पडले. तालुक्यातील जोरण, किकवारी, तळवाडे दिगर, नामपूर, दोधेश्वर, कोटबेल या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सोमोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी सावरत असतांनाच मंगळवारी पुन्हा अवकाळी सरींनी कोसळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

गोदाकाठावर हलक्या सरी

निफाड : मंगळवारी वातावरणात प्रचंड उष्मा होता. दुपारी चारच्या दरम्यान ढगाळ वातावरण झाले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसर, पश्चिम भागात वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चितेगाव ते पिंपळस या नाशिक महामार्गावर मात्र जोरदार पाऊस झाला. वादळवारा असल्यामुळे महामार्गावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तालुक्यात दुपारी चारच्या दरम्यान खेरवाडी, चांदोरी, सोनगाव, भेंडाळी, सायखेडा या गावांच्या परिसरात हलका तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला. तर नैताळे, उगाव, निफाड, विंचुर, पिंपळगाव, ओझर या गावांच्या परिसरात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी वादळवारा सुरू होता. बहुतांश द्राक्ष बागांचे खुडे आटोपले असून, अपवादात्मक ठिकाणी द्राक्षाचे खुडे सुरू आहेत. तर काही भागात गहू काढण्याचे कामही शेतांमध्ये सुरू आहे. उन्हाळ कांदा काढणीचे कामेही यामुळे खोळंबली. पावसाचा संभाव्य अंदाज घेऊन कांदे झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिक कागद टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

येवल्यात ढगाळ वातावरण

येवला : तोंडचे पाणी पळविणाऱ्या यंदाच्या कडक उन्हाळ्याने सर्वांनाच हैराण केले असताना गेल्या दोन दिवसांतील अवकाळीसदृश्य ढगाळी वातावरणाने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. सोमवारी सायंकाळी तालुक्यात अवकाळीचे काहीसे थेंब पडतानाच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी तालुक्यात ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा निर्माण होताना घामाघूम करणाऱ्या दमट वातावरणाने तालुकावासीयांना असह्य केले होते. दुपारी चार नंतर तळपता सूर्य अधूनमधून ढगाआड लपला गेल्याने तालुक्यात अवकाळी पावसाच्या छटा दिसत होत्या. मात्र, दोन तासानंतर हे वातावरण निवळले. दरम्यान, गेल्या दोन दिवसात निर्माण झालेल्या या पावसाळी वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा काढणीला आला आहे. काही शेतकऱ्यांकडून शेतातील उन्हाळ कांदा काढून तो चाळीत साठविण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दीच्या वादामुळे मृतदेह ५ तास रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बेकायदेशीर वाहतूक, चोरटी वाहतूकप्रसंगी किंवा दंडात्मक कारवाईचा मुद्दा असल्यास नेहमी 'कर्तव्यदक्ष' असणाऱ्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघाताबाबत हद्दीचा वाद पुढे करून महिलेच्या मृतदेहाला तब्बल पाच तास हात लावला नाही. त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांच्या या कृत्यामुळे मयत महिलेच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

त्र्यंबकपासून जव्हार रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर तोरंगण घाटात त्र्यंबक पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हद्द संपते. नाशिक ग्रामीण पोलिस हद्द संपते आणि पालघर ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाजारात खेळणी विक्री करणारे व्यावसायीक टेम्पोने नाशिककडे येत असताना तोरंगण घाटातील एका अवघड वळणावर भांगेदेव येथे टेम्पो पलटून दरीत कोसळला. अपघात झाला तेथे त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांच्या हद्दीची सीमा आहे. याबाबत त्र्यंबक आणि मोखाडा पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून त्र्यंबक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. भागवत लोंढे, डॉ. नायडू यांनी आठ जखमींवर उपचार केले. मात्र या अपघातात नाशिकमधील वडाळा गाव येथील महिला चंद्रभागा ठाकरे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. मोखाडा पोलिसांनी मात्र ही घटना आमच्या हद्दीतील नाही असे सांगून अपघात ठिकाणापासून काढता पाय घेतला. दरम्यान, त्र्यंबक पोलिसांनीही आपण अपघातग्रस्तांना येथे आणले. परंतु अपघातस्थळ मोखाडा हद्दीत येते म्हणून मृतदेहाचा पंचनामा त्यांनीच करावा, अशी भूमिका घेतली. हद्दीच्या या वादात तब्बल पाच तास गेले. त्यानंतर रात्री बारा वाजता नाशिक जिल्हा रुग्णालयात त्या महिलेचा मृतदेह आणून तेथे पंचनाम करण्यात आला. पोलिसांच्या हद्दवादामुळे मृत महिलेच्या नोतवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. नातेवाईकांनी त्रागा केल्यानंतर रात्री उशिरा मोखाडा पोलिसांनी घटना त्यांच्या हद्दीतील असल्याचे मान्य करून गुन्हा नोंदवला. तसेच अपघातातील वाहन देखील ते घेऊन गेले.

...तेव्हा धावत येतात पोलिस

या घाटात सतत अपघात होत असतात. याआधी अनेकदा दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या वाहनांचाही अपघात झाला आहे. तेव्हा मात्र मोखाडा पोलिस तातडीने धाव घेतात. मग एका महिलेचा मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी हद्दीचा मुद्दा पुढे करून मोखाडा पोलिसांनी माणुसकीची लक्तरे वेशीला टांगली, अशा प्रकारचे मेसेज मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धनगरचे वळण जीवघेणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वररोडला लागूनच असलेल्या समृद्धनगर येथील रस्त्याचे वळण अपघातांचे केंद्र बनले आहे. सोमवारी रात्री महिंद्रा कंपनीत यंत्रे घेऊन जाणारा आयशर टेम्पो येथे उलटल्याने मोठा अपघात घडला. परंतु, रस्त्यावर दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. वारंवार अपघात होत असलेल्या समृद्धनगरच्या वळणावर त्वरित गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

समृद्धनगर, अशोकनगर, कार्बन नाका, शिवाजीनगर ते थेट बारदान फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोजच वाहनांची मोठी वर्दळ असते. महिंद्र कंपनीचे मटेरिअल गेट नेमके याच रोडवर असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. अगोदरच दुभाजकांविना असलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात. त्यातच त्र्यंबकेश्वररोडला लागून असलेल्या समृद्धनगर येथील रस्त्याचे वळण अपघातांचे केंद्रच बनले आहे. त्र्यंबकरोडवरून येथे वळण घेताना वाहनचालकांची नेहमीच तारांबळ उडते. महापालिका व पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी मागणीकरूनदेखील दुभाजक व गतिरोधक टाकण्यात येत नसल्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, सोमवारीचा अपघातही त्याचमुळे घडल्याचेही सांगितले जात आहे. आयशर टेम्पोतून महिंद्र कंपनीची यंत्रे पडल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे समृद्धनगरमधील रहिवासी धास्तावले होते.

सातपूर भागात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास लॉजेस्टिक कंपनीचा कंटेनर बॉश (मायको) कंपनीसमोर चालकाने उभा केला. कंटेनर बंद न करता न्यूट्रल ठेवत चालक पत्ता विचारण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गेला होता. उतार असल्याने कंटेनर अचानक पुढील दुचाकींना चिरडत निघाला. घाबरलेल्या कंटेनरचालकाने केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून त्याचा कंटेनरच्या चाकाखालीच मृत्यू झाल्याची घटना घडली. असे अपघात वारंवार होत आहेत. मात्र, याप्रश्नी महापालिका व पोलिस प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातांचा रोजच सामना करण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. त्यामुळे किमान गरजेच्या ठिकाणी तरी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

समृद्धनगरच्या वळणावर रोजच अपघात होत असल्याने येथे, तसेच परिसरात आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. मात्र, पोलिस प्रशासन व महापालिका याकडे लक्ष देत नसल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे तातडीने उपाय योजावेत.

-सुभाष गुंबाडे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांची अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरातील धोंडीरोड भागात गेल्या ४० वर्षांपासून लष्कराच्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या घरांवर मंगळवारी जेसीबी चालविण्यात आला.

येथे राहणाऱ्या नागरिकांना लष्कराने घरे असलेली संबंधित जागा मोकळी करावी, अशी सूचना दिली होती. त्यावर संबंधित घरमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या रहिवाशांकडे जागेचा कोणताही पुरावा नसल्याने अखेर न्यायालयाने लष्कराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर लष्कराच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकास पाचरण करीत स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात चार घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले.

कॅम्प परिसरातील धोंडीरोडवरील खंडोबा टेकडीच्या मागील पोल्ट्री फार्मजवळील लष्कराच्या जागेत तुकाराम शंकर बोडके, भास्कर सुधाकर वाघमारे, सुरेश दामू निकम, श्रीमती लक्ष्मीबाई शर्मा यांच्यासह काही नागरिक गेली ४० वर्षे अनधिकृतरीत्या राहत होते. येथील अतिक्रमण हटविण्याबाबत लष्कराने संबंधितांना सूचना देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान लष्करातील अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील अतिक्रमण नाशिक महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करण्यात आले. सोळा कर्मचारी, तीन वाहने, तसेच देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह ५० पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी स्वत:हून घरांतील साहित्य काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना उन्हाचा चटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिलच्या मध्यावर उन्हाचा कडाका वाढला असून मंगळवारी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वातावरणातील आर्द्रतेमध्ये होत असलेले कमी जास्त प्रमाण तापमानात वाढीस कारणीभूत ठरत असून नाशिककरांना तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत कडक ऊन व त्यानंतर ढगाळ वातावरण शहरात होते.

राज्यभरात बुधवारी (दि. १८) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. याचा अनुभव शहरात मंगळवार दुपारनंतर आला; परंतु त्यामुळे नाशिककरांची उकाड्यापासून मुक्तता झाली नाही. वातावरणातील आर्द्रतेच्या बदलत्या प्रमाणामुळे उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून घामाने नाशिककर पुरते हैराण झाल्याचे चित्र शहरात होते. दुपारी साधारणपणे ३ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन असल्याने अनेकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणेही टाळले. शहरवासीय सिग्नल लागल्यावरही सिग्नल सुटेपर्यंत झाडांचा आसरा घेत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. या परिस्थितीपासून ढगाळ वातावरणात सुटका मिळेल, ही अपेक्षाही फोल ठरली असून दमट वातावरणामुळे उकाड्याची तीव्र अधिक जाणवत होती. दरम्यान, यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाची पहिली सर येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत असून त्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून यंदा लवकर सुटका होणार आहे.

आठवडाभरातील तापमान

दिनांक........कमाल....किमान....आर्द्रता (टक्के)

१७ एप्रिल....४०.२....२४.८ ........५८

१६ एप्रिल....३८.५....२२.३........५४

१५ एप्रिल....३८.७....२१.६........५४

१४ एप्रिल....३७.६....२०.४........४७

१३ एप्रिल....३८.१....१८.१........५०

१२ एप्रिल....३६.५....१९.८........६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना करदिलासा नाहीच

$
0
0

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना टोलवले

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या तुघलकी करवाढीच्या विरोधात नाशिकचे वातावरण तापले असतांनाच, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी केलेल्या करवाढीतून नाशिककरांना दिलासा देण्याची मागणी आमदारांच्या वतीने झाली. परंतु, मुख्यमंत्र्यानी थेट दिलासा देण्याऐवजी आमदारांनाच टोलवले आहे.

शेतकरी आणि जनतेच्या भावना ऐकण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये येतील. त्यानंतर शेतकरी, नागरिकांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या आमदारांना रिकाम्या हाताने परत यावे लागले आहे.

तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या करवाढीवरून शहरातील शेतकरी, नागरिक, औद्योगिक, व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. या करवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार असून, शेतकरीही भरडला जाणार आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शहरात या करवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह भाजपच्या तीनपैकी दोन आमदारांनी या करवाढीविरोधात थेट भूमिका घेत, रस्त्यावर उतरले आहेत.

परिस्थितीची जाणीव करून दिली

विशेष म्हणजे, महापौर रंजना भानसी यांनीही आता जनतेसोबत राहत रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या करवाढीविरोधात जनतेची भावना तीव्र होत असल्याचे लक्षात घेऊन आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, भाजपचे पदाधिकारी महेश हिरे यांनी मंगळवारी तातडीने मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना शहरात करवाढीवरून उसळलेल्या आगडोंबची जाणीव करून दिली आहे. आयुक्तांनी शहरातील इंचइंच जागेवर कर लावण्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. शेतजमिनीवरही कर लावून शेतकऱ्यांनाही उद्ध्वस्त केले जात आहे. त्यामुळे ही करवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

करवाढीचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात

मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बाजू ऐकून घेत, थेट दिलासा देण्याऐवजी करवाढीचा चेंडू पालकमंत्री गिरीश महाजनांकडे टोलवला आहे. वाढलेल्या करासंदर्भात पालकमंत्री महाजन हे आठ दिवसांत नाशिकमध्ये येऊन शेतकरी, औद्योगिक संघटना, शैक्षणिक संघटना, नागरिकांच्या संघटनांसोबत चर्चा करतील. त्यानंतर महाजन हे आयुक्तांसोबतही चर्चा करून करवाढीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगत आमदारांना टोलवले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारात थेट दिलासा देता आला असता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याऐवजी पालकमंत्र्याच्या कोर्टात चेंडू टोलवल्याने करवाढीसंदर्भात भाजपकडूनच वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजप विरोधातील असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशक्रियेला जीवन संजीवनीची प्रात्यक्षिके

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक - थोरले दोन भाऊ अकाली हरपण्याचा धक्का कुणासाठीही मोठाच. यातून सावरणेही कठीण. मात्र आपल्या कुटुंबावर अपघाताने ओढवलेली अशी वेळ अन्य कुणावरही येऊ नये ही जाणीव जपत मोहाडीतील एका धाकट्या भावाने अनोख्या पद्धतीने आपल्या थोरल्या भावांना आदरांजली अर्पण केली. भावाच्या दशक्रियेला जीवन संजीवनी (बेसिक लाइफ सपोर्ट) मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे याचे प्रात्यक्षिकच भूलतज्ज्ञांच्या मदतीने स्नेहीजणांना दाखविले. या अभिनव उपक्रमाद्वारे कळमकर कुटुंबीय आणि मोहाडी गावाने आदर्श घालून दिला आहे.

'जातस्य ही ध्रुवो मृत्यू' हा सिद्धांत अटळ आहे. जो जन्मला त्याला मृत्यू आहेच, हा त्याचा मथितार्थ. भगवतगीतेमधील हा विचार तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने शंभर टक्के बरोबर असला तरी जीवाभावाची व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली की चुटपूट लागतेच. अशावेळी त्या व्यक्तीला वाचविण्यात आपण कुठे कमी पडलो का हा विचार संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील कळमकर कुटुंबीयही याला अपवाद कसे असणार! बाळासाहेब देवराम कळमकर (वय ६०) यांना ह्दयविकाराच्या तीव्र झटका आला. गावापासून शहर तसे दूरच. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे २००९ मध्ये बाळासाहेबांचे दुसऱ्या क्रमांकांचे बंधू कमलाकर यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानंतर पुन्हा ही अनपेक्षित घटना घडल्याने कळमकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतचे उपचार आपण देऊ शकलो असतो तर कदाचित त्यांना वाचविता आले असते, याची चुटपूट कुटुंबीयांना लागली. बाळासाहेबांच्या दशक्रियाविधीची तयारी सुरू झाली. त्यांचे सर्वात धाकटे बंधू शाम कळमकर आणि चुलते सुरेश कळमकर तयारीबाबत चर्चा करीत असतानाच कीर्तन-प्रवचनाऐवजी जीवन संजीवनी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याचा विचार पुढे आला. कळमकर कुटुंबीय व नातलगांनी त्यास एकमुखाने होकार दिला. अवयवदान चळवळीचे अध्वर्यू डॉ. भाऊसाहेब मोरे यांनीही कळमकर कुटुंबीयांच्या या निर्णयाचे कौतुक केले. नाशिकमधील भूलतज्ज्ञांना मंगळवारी (दि. १७ एप्रिल) दशक्रिया विधीवेळी कार्यशाळा घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. कळमकर परिवाराचे नातलग, ग्रामस्थ, स्नेहीजण आणि मित्रपरिवाराला डॉ. प्रशांत देवरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. नितीन वाघचौरे आणि डॉ. दिनेश पाटील यांनी प्रात्यक्षिकांद्वारे जीवन संजीवनीबाबत मार्गदर्शन केले. हृदयविकाराची लक्षणे, कारणे तसेच अशावेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावयाचे प्रथमोपचार याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे उपस्थित काही महिलांनी स्वत: पुढे येऊन ही प्रात्यक्षिके केली. शंकांचे निरसनही करवून घेतले. या प्रबोधनात्मक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे.

जीवन संजीवनी क्रिया समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेसिक लाइफ सपोर्ट प्रशिक्षण आता खऱ्या अर्थाने चळवळीचे रूप धारण करते आहे. कळमकर कुटुंबीयांनीही दशक्रिया विधीवेळी हा उपक्रम आयोजित करून समाजाला आदर्श घालून दिला आहे.

डॉ. राहुल भामरे, सदस्य, भूलतज्ज्ञ संघटना, नाशिक

माझ्या दोन्ही भावांचे हृदयविकाराने निधन झाले. प्रथमोपचारांच्या माहितीअभावी कुणाच्याही कुटुंबात अशी घटना घडू नये हा जीवन संजीवनी कार्यशाळा घेण्यामागील आमचा उद्देश होता. कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाद्वारे कुणी एकाचेही प्राण वाचविले तरी हा उद्देश सफल होईल.

- शाम कळमकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम पुन्हा कॅशलेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील अनेक एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने ग्राहकांना भरदुपारी वणवण भटकण्याची वेळ आली. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर एटीएममधील खडखडाट ग्राहकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरत होता. राष्ट्रीय बँकांपासून सहकारी बँकांपर्यंत अनेक एटीएम पैशांविनाच असल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. काही एटीएमवर कुठल्याही प्रकारची सूचना नसल्याने ग्राहक पैशांसाठी प्रयत्न करुनही त्यांना पैसे मिळत नव्हते. गंगापूररोड, एमजीरोड या बाजारपेठेतील एटीएमही पैशांविनाच असल्याचे दिसून आले. यामुळे ग्राहकांना पैशांसाठी वणवण करावी लागली.

जिल्ह्यातील एटीएममध्ये पैसे नाहीत याबाबत सध्या तरी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. चलन तुटवड्याबाबत तातडीने आढावा घेतला जाईल.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

रांगा लावूनही हात रितेच!

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममध्ये मंगळवारी पैशांचा खडखडाट झाल्याने नागरिकांची पैशांअभावी मोठी गैरसोय झाली. नाशिकरोडला एटीएममधील कॅश संपल्यानंतर नागरिकांना तासभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.

शहरातील बहुतांश एटीएममध्ये मंगळवारी सकाळी काही प्रमाणात रोकड होती. परंतु, दुपारनंतर जवळजवळ सर्वच एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. रांगेत तासभर उभे राहूनही नागरिकांना एटीएममधून पैसे मिळाले नाही. प्रेस आवारातील स्टेट बँकेच्या एटीएमवर शेकडो कामगारांची पैसे काढण्यासाठी रांग लागलेली होती. परंतु, एटीएममधील कॅश संपल्याने कामगारवर्गास रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. दत्तमंदिर, बिटको चौक, रेल्वे स्टेशन, स्टेट बँक शाखा या परिसरातील सर्वच एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दुपारनंतर धावाधाव

मंगळवारी दुपारनंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याने नागरिकांना दुसरे एटीएम शोधावे लागले. काही एटीएमवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. ज्या काही तुरळक ठिकाणच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती, तिथेही केवळ दोन हजाराच्या नोटाच मिळाल्या. परंतु, अवघ्या तासाभरातच सर्वच एटीएम खाली झाली. नागरिकांना पैशांसाठी धावाधाव करावी लागली. काही नागरिकांनी ऐनवेळी बँकांमध्ये धाव घेतली.

सणाच्या पार्श्वभूमीवर पैशांची टंचाई

अक्षय्य तृतिया सणाच्या निमित्ताने नागरिकांकडून मोठी खरेदी केली जाते. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची मंगळवारी मोठी झुंबड उडालेली असताच एटीएममधील कॅश संपल्याने नागरिकांची मोठी फजिती झाली. काही नागरिकांना ऐनवेळी कॅशअभावी किरकोळ खरेदी करता आली नाही.

प्रेस आवारातील स्टेट बँकेच्या एटीएममधील कॅश मंगळवारी संपल्याने नागरिकांना पैसे काढता आले नाहीत. या एटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागली होती.

-दिनेश मोवळे, ग्राहक

मंगळवारी गंगापूररोड, अशोकस्तंभ, सीबीएस या भागातील एटीएममध्ये खडखडाट होता. सोमवारीदेखील पेठफाटा, दिंडोरी रोड, मेरी कॉलनी या भागातील एटीएममध्ये पैसे नव्हते. दोन दिवसांपासून एटीएममध्ये पैशांची टंचाई आहे.

-अनिल कदम, ग्राहक

सायंकाळी आले पैसे

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसै नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. सातपूर भागात गेल्या तीन दिवसांपासून काही ठराविक ठिकाणी असलेल्या एटीएममध्येच पैसे असल्याने ग्राहकांची गर्दी झाली होती. रविवारी व सोमवारी एटीएमध्ये पैसेच नसल्याने रिकाम्या हाती ग्राहकांना परतावे लागले. मंगळवारीदेखील दिवसभर एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला. सायंकाळी पाच वाजेनंतर एटीएममध्ये पैसे आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. वयोवृद्ध नागरिक व निवृत्त झालेल्या कामगारांना एटीएममध्ये नसलेल्या

पैशांमुळे सर्वांधिक त्रास सहन करावा लागला.

पंचवटीत एटीएम पर्यायी व्यवस्था

पंचवटी : पंचवटी परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये खडखडाट होता. अॅक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, युनियन, आयसीआयसीआय आदी बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध होते. पर्यायी व्यवस्था असल्यामुळे पंचवटीतील ग्राहकांना फारसा परिणाम जाणवला नाही.

ज्येष्ठांची वणवण

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दोन दिवसांपासून इंदिरानगर परिसरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे दिसून येत आहे. एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बँकेत याबाबत विचारणा केली असता प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. बँकांच्या एटीएममध्ये ऐन सणावारात अशा प्रकारे पैसे मिळत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

बँक बंद असताना किंवा बँक जवळ नसताना एटीएममधून पैसे काढणे सहज शक्‍य होते. आजकाल सर्वचजण एटीएमचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. कालपासून इंदिरानगर परिसरातील एकाही एटीएमवर पैसे उपलब्ध नसल्याने एटीएम बंद असल्याचा फलक लावण्यात आले होते. अचानकपणे असे फलक लावल्याने नागरिकानी संताप व्यक्‍त केला आहे. विशेष म्हणजे बँकांच्या जवळ असलेल्या एटीएममध्येसुद्धा पैसे शिल्लक नसल्याचे दिसून आले. बँकेत इतरवेळी पैसे काढण्यासाठी उभे राहिल्यावर कर्मचारी एटीएमचा वापर करण्याचा सल्ला देत असतात, मात्र आता एटीएममध्येच पैसे नसल्याने काय करायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला होता. इंदिरानगर परिसरात साधारणतः ३५ एटीएम असून यातील एकाही एटीएमवर पैसे शिल्लक नव्हते. ज्या एटीएमवर पैसे आहेत तेथे केवळ दोन हजाराच्याच नोटा उपलब्ध असल्याचे दिसून आले.

कॅशलेस करण्याच्या सवय नागरिकांना लावण्याआधी बँकांनी एटीएममध्ये पैसे भरण्याची व्यवस्था सक्षम करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

जवळ पैसे ठेवण्यापेक्षा गरजेनुसार एटीएममधून पैसे काढणारे ज्येष्ठ नागरिक अनेक आहेत. सण असताना नागरिकांना बँकेतून स्वतःचेच पैसे काढता येत नसल्याने त्रास होत आहे. बँकांनी याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे.

- हर्षद गोखले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Cash Crunch: इथं फक्त २०, ५०च्या नोटांची छपाई

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा देशात नोटांची टंचाई जाणवत आहे. सरकारी निर्णयाच्या दिरंगाईमुळेच देशात चलनी नोटांची टंचाई झाली आहे. नाशिकरोडच्या नोटप्रेसमध्ये सहा डिनॉमिनेशनच्या नोटा छापल्या जातात. मात्र, धक्कादायक बाब अशी की, फक्त वीस आणि पन्नास या मूल्यांच्या नोटांचीच छपाई सुरू आहे.

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये थांबली आहे. दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे. परिणामी देशात नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहे.

स्टेट बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, नोटांची रखडलेली छपाई हे जसे एक कारण आहे तसे नागरिकांची प्रवृत्ती हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, बँकेतून काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजारांच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे. नोटा बँकेतून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भरणा तेवढा होत नाही.

छपाईचा प्रचंड वेग

नाशिकरोड कारखान्यात दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटांची छपाई केली जाते. सर्व प्रकारच्या नोटांची मिळून दर दिवसाला चौदा ते अठरा दशलक्ष एवढ्या प्रचंड संख्येने छपाई केली जाते. यासाठी अडीच हजार कामगार सकाळी सातपासून तीन शिफ्टमध्ये काम करतात. सहा डिनॉमेशनपैकी फक्त दहा आणि पन्नासच्या नोटांची छपाई सुरू आहे. सरकारने पन्नास आणि दोनशेच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस आणि शंभराच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. मात्र, वीस आणि शंभराच्या नोटांची ३१ मार्चपर्यंतची ऑर्डर छापून झाली आहे. या दोन्ही नोटांचे नवीन डिझाइन अर्थमंत्रालयाकडून अजून मंजूर न झाल्याने त्यांची छपाई थांबली आहे. तर दोनशे आणि पाचशेच्या नोटांची छपाई परदेशातून येणाऱ्या ओव्हीआय शाईअभावी थांबली आहे. म्हणजेच फक्त वीस, दहा आणि पन्नासच्या नोटाच छापल्या जात आहेत. कामगारांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सर्व मशिन्सवर याच नोटांचे डिझाइन सध्या लावण्यात आले आहे.

नवीन लाइन येणार

नाशिकरोड आणि देवास या प्रेस महामंडळाच्या मालकीच्या आहेत. नाशिकरोड नोटप्रेसमधील मशिन्स १९८५ साली उभारण्यात आल्या. त्यांची सर्व्हिसिंग व आधुनिकीकरणही झालेले नाही. याउलट रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी प्रेस आधुनिक आहेत. मशिन्सची संख्याही जास्त आहे. नाशिक व देवासच्या प्रेसमध्ये पाचशेच्या पाच दशलक्ष नोटा दर दिवसाला छापल्या जातात. छपाई वेग वाढविण्यासाठी नाशिकरोड प्रेसमध्ये पाच मशिनलाइन आहेत. दोन नवीन लाइन येणार आहेत. एका लाइनमध्ये ऑफसेट, इंटेग्लो, नंबरिंग आणि कटपॅक अशा चार मशिन असतात. एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते.

जोश आहे, काम नाही

नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये अडीच हजार कामगार रात्रंदिवस निष्ठेने काम करतात. सध्या फक्त दहा व पन्नासच्या नोटांचीच ऑर्डर असल्याने कामगारांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा आहे. नोटबंदीच्या काळात नाशिकरोड प्रेस कामगारांनी वर्षभर सुटी न घेता काम केल्यामुळेच देशाला नोटबंदीची झळ पोहचली नाही. नोटबंदीत नाशिकरोड प्रेसच्या नोटा रस्ता, रेल्वे बरोबरच प्रथमच हवाईमार्गे देशभरात पोहचविण्यात आल्या. नाशिकरोड आणि देवास प्रेसने मिळून नोटबंदीत २७ डिसेंबरला एकाच दिवसात एकूण ३७.५ दशलक्ष नोटांची छपाई करून विक्रम केला होता. त्यामध्ये नाशिकरोडचा वाटा २०.५ दशलक्ष तर देवासचा वाटा १७ दशलक्षांचा होता. ३७.५ दशलक्ष नोटांमध्ये पाचशेच्या २६.५ दशलक्ष नोटांचा समावेश होता. उर्वरित नोटा वीस, पन्नास आणि शंभरच्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन प्रभाग समित्या बिनविरोध

$
0
0

सिडको, सातपूर, नाशिकरोडमध्ये मात्र थेट लढत रंगणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम या तीन प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने तीनही ठिकाणी सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, सिडको, सातपूर व नाशिकरोड प्रभाग समितीसाठी शिवसेना व मनसेने उमेदवार उतरवल्याने या ठिकाणी काट्याची लढत बघायला मिळणार आहे. दरम्यानल सातपूरमध्ये मनसेसह भाजप आणि शिवसेनेही अर्ज दाखल केल्याने तेथे चुरशीची लढत होणार आहे.

महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतिपदांसाठी येत्या २० आणि २१ एप्रिल रोजी निवडणूक आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यानुसार, प्रभाग समित्यांसाठी नगरविकास विभागाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. सहा प्रभाग समिती सभापतीसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. पंचवटी प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने या ठिकाणी पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर नाशिक पूर्वमध्येही भाजपचे बहुमत असून सुमन भालेराव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचाही निवड बिनविरोध झाली आहे. नाशिक पश्चिम प्रभाग समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडी करत, नुकत्याच नव्याने निवडून आलेल्या अॅड. वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम प्रभागासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही निवडणूक बिनविरोध झाली असून आता निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता उरली आहे.

मनसेचा कौल ठरणार मोलाचा

नाशिकरोड प्रभाग समितीमध्ये भाजपकडे काट्यावर बहुमत आहे. तेथे भाजपचे १२ सदस्य असून पंडित आवारे यांना उमेदवारी दिली आहे. बहुमत असतानाही शिवसेनेने ज्योती खोले यांचा अर्ज दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी सरळ लढत होणार आहे. सिडकोमध्ये बहुमत असलेल्या शिवसेनेने हर्षा बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपने भगवान दोंदे यांनी उमेदवारी दिल्याने तेथेही थेट लढत होणार आहे. सातपूरमध्ये कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आले असले तरी शिवसेना-रिपाइंचे संख्याबळही नऊ आहे. त्यामुळे मनसेच्या दोन सदस्यांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो. यावर तेथील सभापतिपदाचा फैसला होतो. गेल्या वेळी मनसे-भाजपसोबत गेली होती. मात्र, यंदा मनसेने योगेश शेवरे यांना, शिवसेनेने संतोष गायकवाड यांना तर भाजपने रवींद्र धिवरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तेथे तिरंगी सामना होणार असून मनसेच्या भूमिकेवरच सभापती ठरणार आहे.

विषय समित्यांना २६ चा मुहूर्त

विभागीय आयुक्तांनी प्रभाग समित्यांपाठोपाठ पालिकेतील चार समित्यांच्या निवडणुकीचाही कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, २६ तारखेला या चारही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. २६ तारखेला सकाळी साडेदहा वाजता विधी समितीच्या सभापतीची, दुपारी १२ वाजता शहर सुधारणा समितीची, दीड वाजता आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदाची तर दुपारी साडेतीन वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या चारही समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणे जवळपास निश्चित आहे.

विभाग....... नियोजित सभापती

पूर्व : सुमन भालेराव

पंचवटी : पूनम धनगर

पश्चिम : अॅड. वैशाली भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंडी फुटणार

$
0
0

सहा हजार इमारतींचा प्रश्न मिटणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर एफएसआयचे उल्लघंन केल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून इमारतींमधील रखडलेला कपाटाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांनी एफएसआयचे उल्लंघन केल्याने तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. महासभा आणि स्थायी समितीच्या ठरावानंतर महापालिकेने मंगळवारी सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडाच्या दोन्ही बाजूला अंतर सोडून रस्ता नऊ मीटरचा करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी तीस दिवसांत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्याने शहरातील प्रलंबित कपाटकोंडीही फुटण्यास मदत होणार आहे.

शहर विकास आराखड्यामध्ये बांधकामातील कपाटांसाठी सरकारने ठराविक एफएसआय मोफत दिला होता. मात्र, तरीही व्यावसायिकांनी कपाटांऐवजी खोल्यांची रुंदी वाढवून ग्राहकांकडून जास्तीचा पैसा लाटला होता. त्यावर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला. जानेवारी २०१६ मध्ये सरकारने टीडीआर धोरण बदलताना सहा व साडेसात मीटर रस्त्यावर टीडीआर लोड करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे शहरात कपाटकोंडीमुळे बांधकाम व्यवसायच ठप्प झाला होता. यावर बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर सरकारने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार रस्ते रुंदीकरणाचे धोरण स्वीकारण्याचा ठराव स्थायी समिती व महासभेने पारित केला. यात आयुक्तांना अशी बांधकामे नियमित करण्याचे अधिकार देण्याचे धोरण आहे. महापालिकेच्या वतीने मंगळवारी हे धोरण जाहीर करण्यात आले. त्यात सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील भूखंडासमोरील ठराविक अंतराची जागा नऊ मीटरचे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. यातून नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार १.१ एफएसआय व यापूर्वी इमारतीवर लोड केलेला ४० टक्के एफएसआय मिळून दीड एफएसआय उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ मिळून कपाटांच्या माध्यमातून झालेले एफएसआयचे उल्लंघन कायद्याच्या चौकटीत बसविता येणार आहे. त्यामुळे शहरातीस कपाटकोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसाविरोधात फसवणुकीप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाच्या २०१७ मध्ये झालेल्या पोलिस शिपाई बॅण्डमनच्या भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी के. व्यंकटगौड आणि या भरतीतील उमेदवार शुभांगी आंबेकर यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दिली होती. त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाल्यानंतर बॅण्डसमन म्हणून भरती झालेल्या शीतल संपत गायकवाड यांच्याविरोधात शासनाची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दीपक यशवंत पोतद्दार यांनी तक्रार दिली आहे. २०१७ मध्ये नाशिक पोलिस आयुक्तालय स्थरावर झालेल्या बॅण्डसमन भरतीमध्ये शीतल गायकवाड यांची महिला पोलिस शिपाई बॅण्डमन या पदासाठी नियुक्ती झाली. मात्र, त्यांनी बनावट नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर केले. त्यावर खोटे सही-शिक्के आहेत. या संदर्भात नाशिक तहसील कार्यालयाने माहितीच्या अधिकारात शीतल गायकवाड यांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र दिले नसल्याची बाब के. व्यंकटगौड आणि शुभांगी आंबेकर यांनी समोर आणली होती. या प्रकरणी मागील महिन्यातच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले होते. गायकवाड यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून बनावट असलेले प्रमाणपत्र खरे असल्याचे भासविणाऱ्या गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दोघांनी दिला होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती गायकवाड यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पीएसआय भालेराव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपिला संगम घाटावर कचऱ्याचे ढीग जैसे थे

$
0
0

कपिला संगम घाटावर कचऱ्याचे ढीग जैसे थे (फोटो)

पंचवटी : गतवर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा कपिला संगमाच्या घाटावर अडकून पडलेला होता. हा गोळा करण्यात आलेला कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून या घाटावर पडून आहे. प्लास्टिक, कापड आणि गाळमिश्रित असलेला हा कचरा घाटाचे सौंदर्य नष्ट करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या घाट परिसराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात येत आहे.

--

खड्यामुळे अपघाताची भीती

जेलरोड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाका येथील सिग्नलच्या पुढे महापालिकाने कामासाठी जेसीबीद्वारे मोठा खड्डा खोदलेला आहे. मात्र, काम झाल्यानंतरदेखील येथे डांबरीकरण न झाल्याने त्यात वाहने आदळत आहेत. ओढा आणि जत्रा हॉटेलकडे जाणाऱ्या वळणावरच हा खड्डा महिनाभरापासून कायम असल्याने सिग्नल सुटताच अपघातांची भीती वाढली आहे. तो त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

--

'अग्निशामक'ची प्रात्यक्षिके (फोटो)

जेलरोड : अग्निशमन सप्ताहांतर्गत महापालिकेच्या पंचक येथील स्वामी विवेकानंद

विद्यानिकेतन शाळेत अग्निशामक दलाने प्रात्यक्षिके सादर केली. आग लागल्यानंतर ती विझविणे, जखमी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, घरात आग लागू न देण्याबाबतची खबरदारी, तसेच बॉम्बस्फोट झाल्यानंतर जखमींना उपचारांसाठी घेऊन जाणे आदी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. लीडिंग फारमन एस. बी. निकम, एम. एम. मधे, एम. के. साळवे, आर. आर. काळे, आर. बी. आहेर, एस. के. आडके, एस. एस. नागपुरे, बी. के. कापसे, आर. एम. दाते, बी. एस. कांदे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक के. बी. लभडे, केंद्रप्रमुख बी. बी. निरगुडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

साईबाबा मंदिरात कार्यक्रम

सिडको : शिवाजी चौक येथील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादवाटपासह विविध कार्यक्रम होणार आहेत. आज, बुधवारी (दि. १८) सकाळी १० वाजेपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता मंदिरापासून परिसरातून साई पालखी निघेल. गुरुवारी (दि. १९) महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केले आहे.

--

जलवाहिनी कामास प्रारंभ

गंगापूररोड : नाशिक महापालिकेच्या राजीव गांधीच्या अगदी बाजूलाच असलेल्या पंडित कॉलनीत पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याचा आरोप महिलांकडून केला जात होता. त्याची दखल घेत नगरसेवक अजय बोरस्ते यांनी वेळोवेळी महापालिकेकडे नवीन जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली होती. अखेर महापालिकेने नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच पंडित कॉलनीवासीयांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील रहिवाशांसाठीही नवीन जलवाहिनी टाकली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता निरीक्षकास नाशिकरोडला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दूध विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास दूध विक्रेत्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी नाशिकरोड येथे घडली. या मारहाणीत ज्ञानेश्वर भोसले हे स्वच्छता निरीक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर पालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनीही दादाभाऊ माने या अपंग दूध विक्रेत्यांस मारहाण करून जखमी केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

मंगळवारी सकाळी जेलरोडवरील बीएमएस मार्केटजवळील कलानगर येथे नितीन अरिंगळे, वसंत नागरे व दादाभाऊ माने आदी दूधविक्रेते प्लास्टिक कॅरी बॅग्समधून विक्री करीत होते. त्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी चौकशी केली असता वाद निर्माण झाला. या वादात दूध विक्रेते नितीन अरिंगळे, वसंत नागरे या दोघांनी ज्ञानेश्वर भोसले यांना मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानेश्वर भोसले जखमी झाल्याने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर काही वेळाने पालिका कर्मचाऱ्यांनी येवून याठिकाणी दूध विक्री करणारे अपंग दूध विक्रेते दादाभाऊ माने यांना मारहाण केल्याचा आरोप माने यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जखमी माने यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीच्या घटनेप्रकरणी रात्री उशिरा नाशिकरोड पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पालिका अधिकारी व आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. गेल्या आठवड्यातही शिवसेनेचे बाळासाहेब शेलार याने पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यास पाण्याचे आवर्तन सुरू आहे. कालवा दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास २० वर्षीय तरुणाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. आझाद कुरेशी असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

तुळजाभवानीनगर येथील कालव्याच्या पाण्यात आझाद आपल्या काही मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. मित्रांसोबत पाण्यात उतरण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. मात्र, पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या घेऊ लागला. पाण्याला वेग असल्याने तो पुढे वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावत शोधकार्य सुरू केले. यातील काही नागरिकांनी अग्निशामक दलास फोनवरून कळवले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. काही वेळानंतर आझादला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाळीने दाणाफाण

$
0
0

टीम मटा

राज्यात नाशिकसह कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नगर, कल्याण-डोंबिवली आदी भागांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला असला, तर ग्रामीण भागात अवकाळीमुळे संकट उभे ठाकले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वीज पडून एक जण ठार झाला, तर भंडारदरा परिसरात दोन जण जखमी झाले. एकूणच अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गहू, फळबागांचे नुकसान

भंडारदरा परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह तीन तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात पांजरे येथे वीज पडून शेतात काम करणारे दोन जण गंभीर जखमी झाले. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे गहू व पेंढ्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरात सायंकाळी ७ पर्यंत पाऊस सुरूच होता. कर्जत तालुक्यातील तालुक्यातील अळसुंदे, कुंभेफळ, राशीनसह अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यामुळे आंबा, डाळिंब, चिकू, पोपई, लिंबू यासह विविध फळबांगाबरोबरच ऊस, कडवाळ, मका ही उभी पिके आडवी झाली. हाती आलेला कांदा, हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. कल्याण-डोंबिवलीकरांनाही सायंकाळी पावसाचा तडाखा बसला. बदलापूरला गारांचा वर्षाव झाला. सायंकाळी लोकल बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील कौले, पत्रे उडाले, तर आंब्याच्या झाडांचे आणि पिकांचे नुकसान झाले. शिराळा शहरासह तालुक्याच्या दक्षिण भागात मांगले, सागाव परिसरात गारपीट झाली. सातारा जिल्ह्यातील कान्हरवाडी (ता. खटाव) येथे मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यात जनावरांच्या शेडचा पत्रा उडून एक महिला गंभीर जखमी झाली. साताऱ्यात मात्र हलक्या सरी कोसळल्या. औरंगाबादकराना पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागांत वीज गूल झाली होती. कोल्हापूरकरांनाही विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागला. सोलापुरात उन्ह-पावसाचा खेळ सुरू होता. यामुळे आंबा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यासह एक बैल दगावला आहे.

बागलाण, निफाडला पाऊस

नाशिक : बागलाण तालुक्याला दोन दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिला. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, दोधेश्वर, कोटबेल जोरण, किकवारी, तळवाडे दिगर आदी भागात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा खांडणीला मोठा फटका बसला आहे. नाशिकजवळील आडगाव परिसरात डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसर, पश्चिम भागात वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चितेगाव ते पिंपळस या नाशिक महामार्गावर मात्र जोरदार पाऊस झाला.

सविस्तर वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच एकरसाठी कोर्टाचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा कोर्टासाठी अडीच एकर जागेचा ताबा घेतल्यानंतर आता उर्वरित अडीच एकर जागेसाठी हायकोर्टात पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने या संबंधी प्रतिज्ञापत्र सादर केले. पोलिस आयुक्तालयाला जागेअभावी येणाऱ्या समस्यांचा पाढा पोलिस प्रशासनाने वाचला असून, हायकोर्ट यासंबंधी काय निर्णय घेते, याकडे पोलिसांसह वकिलांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा कोर्टाची जागा कमी पडते म्हणून पोलिस मुख्यालयाची पाच एकर जागा मिळावी यासाठी अॅड. का. का. घुगे यांच्या पुढाकाराने हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खल झाल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने तसेच शासनाच्या मध्यस्थीने पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा कोर्टासाठी वर्ग करण्यात आली. हायकोर्टाने आपल्या आदेशात अडीच एकर जागा लागलीच देण्याची तर उर्वरित अडीच एकर जागेबाबत गरजेनुसार विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे अॅड. घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लागलीच उर्वरित जागेवर ताबा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

मागील महिन्यातच याबाबत हायकोर्टात सुनावणी झाली. पोलिस प्रशासनाने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, वर्ग केलेल्या जागेत मोटार ट्रान्सपोर्टचे कार्यालय तसेच इतर काही महत्वाच्या कार्यालयांचे काम सुरू होते. आता सध्या हेच कार्यालय स्थलांतरीत करण्यासाठी जागा नाही. दुसरीकडे, शस्त्रागाराचा प्रश्नही गंभीर आहे. शस्त्रागार पोलिसांच्या घरांजवळ स्थलांतरीत करावे लागू शकते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अतिशय गंभीर बाब ठरू शकते.

पोलिस मुख्यालयातील मैदान महत्त्वाचे असून, उर्वरित जागेत वेगवेगळी कार्यालये तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाचे कामासही मंजुरी मिळाली असून, पुढील ५० वर्षांचा विचार करता ही जागा अपुरी पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तसेच पोलिस भरतीसारखे मोठ्या इव्हेंटचे नियोजन अगदीच कमी जागेत कसे पार पडणार, असा प्रश्नही पोलिस प्रशासनाला सतावतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेत आंब्याचा दरवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय तृतीयेसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून शहरामध्ये आंब्याचा दरवळ पसरला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आंब्याची गोडी चाखण्यास सुरुवात होणार असून पुढील दोन महिने रसास्वादावर यथेच्छ ताव मारला जाणार आहे. परंतु, यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

अक्षय तृतीयेचा सण बुधवारी (दि. १८) साजरा होत आहे. या सणाला करा-केळीची पूजा मांडली जाते. पूर्वजांचे पुण्यस्मरण करून त्यांना आंब्याचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतरच हंगामातील आंब्याचा आस्वाद घेण्यास सुरुवात होते. अक्षय तृतीया अर्थात आखाजीचा सण उद्यावर आला असून बाजारपेठेत आंबे दाखल झाले आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेतही मर्यादित आवक झाली आहे.

सणासाठी आंबा खरेदी करण्याकरीता मंगळवारी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. आंब्याचे प्रमाण यंदा कमी असल्याने बुधवारी अक्षय तृतीयेची वाट न पहाता एक दिवस आधीच आंबा खरेदीला प्राधान्य देण्यात आले. सीबीएस येथे जिल्हा बँकेच्या तळघरात भरलेल्या कोकण आंबा महोत्सवातही सकाळपासूनच गर्दी झाली. यंदा येथेही अल्प प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले असून ११ पैकी तीन स्टॉलवर आंबे शिल्लक राहिले नसल्याचे पहावयास मिळाले. येथे रत्नागिरी आणि देवगड हापूस ४५० ते ९०० रुपये डझन या दराने विक्री करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी फळविक्रेते तसेच हातगाडीधारकांनी आंबा विक्रीसाठी ठेवला. लालबाग १०० रुपये किलो, बदाम १२० रुपये किलो तर बेंगलोर हापूस २०० रुपये किलो दराने विक्री होत होता.

जादा आंबा मेपर्यंत येणार

यंदा अधिक मासामुळे अक्षय तृतीया सुमारे एक महिना आधी आली असून त्यामुळे आंब्याचा अधिकाधिक आस्वाद घेण्याची संधी खव्वयांना मिळाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारपेठेत दाखल होईल व आंब्याचे भावही कमी होतील, असे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेमध्ये ग्राहकांची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडे तीनपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा केला जाणार आहे. शहरात या सणानिमित्त ग्राहकांची लगबग सुरू झाली असून विक्रेतेही सणासाठी सज्ज झाले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येपासूनच बाजारात मडके, आंबे, खरबूज आदी खरेदीसाठी गर्दी दिसून आली. शिवाय, या दिवशी सोनेखरेदीस विशेष महत्त्व असल्याने सराफी पेढ्यादेखील सजल्या आहेत.

वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. हा दिवस साडेतीनपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. तसेच हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन या दिवशी करून त्यांना आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथाही पाळली जाते. शिवाय, यादिवशी नदीत आंघोळ करण्याचे, सातूचे महत्त्व असल्याने त्याचे सेवन कले जाते. अक्षय्य तृतीयेला केलेली पूजा ही घरातील अनेक दोष नष्ट करून कुटूंबाचा उद्धार करत असल्याचे मानले जात असल्याने घराघरांमध्ये पूजा केली जाते. तसेच या शुभ मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, आर्थिक व्यवहार, दागिने विकत घेणे यांसही विशेष महत्त्व असल्याने लाखो, करोडोंची उलाढाल या दिवशी होत असते.

अक्षय्यतृतीयेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू होत्या. रविवार कारंजापासून शालिमारपर्यंत विविध विक्रेत्यांची गर्दी दिसून आली. यात प्रामुख्याने अक्षय्यतृतीयेच्या पूजेसाठी आवश्यक वस्तूंनी दुकाने सजली होती. तर आंब्याचे या दिवशी विशेष महत्त्व असल्याने बाजारात आंबेविक्रेत्यांनीही गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीवरून आमदारांचा ‘खो-खो’

$
0
0

करवाढीवरून आमदारांचा 'खो-खो'

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आमदारांचा असमन्वय

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेने केलेल्या जुलमी करवाढीने एकीकडे शहरातील जनता व शेतकरी होरपळून निघाली असतांनाच, भाजपचे तीनही आमदारामंध्ये श्रेयवादासाठी 'खो-खो'ची स्पर्धा सुरू झाली आहे. एकीकडे शहराच्या महापौर या करवाढीविरोधात जनआंदोलनात उतरण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मात्र तीनही आमदारांमधील असमन्वयाने नाशिककरांचे हसू होत आहे.

आमदार फरांदेंनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाही, तोच मंगळवारी दोन आमदारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन दिलासासाठी प्रयत्न करत असल्याचा देखावा केला आहे. परंतु, तीनही आमदारांच्या भेटीनंतरही मुख्यमंत्र्यानी दिलासा न दिल्याने मुख्यमंत्री दरबारी आमदारांचे वजन घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या तुघलकी करवाढीने एकीकडे शहरातील वातावरण तापले असतांनाच, भाजपचे तीनही आमदार या करवाढीचे राजकारण करताना दिसत आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तरीही आयुक्त मुंढेंनी सत्ताधाऱ्यांना गुंडाळून ठेवत नव्या मालमत्तांवर भरमसाठ करवाढ लागू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आमदार सानप यांच्या सीमा हिरेही उतरल्या असून, त्यांनी या करवाढीला तीव्र विरोध केला आहे. त्यांसदर्भातील आंदोलन गावागावात उभे राहत असतांनाच, भाजपच्या मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदेनी यापासून अंतर राखले. त्यामुळे करवाढीला फरांदेचे अप्रत्यक्ष समर्थन असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आमदार फरांदेंबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाल्यानंतर फरांदेंनी तातडीने सोमवारी मुख्यमंत्र्याकडे धाव घेत, करवाढीतून दिलासा देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही थेट दिलासा देण्याऐवजी शेतीवर करमाफीची सूचना करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे मोठा विजय मिळवल्याचा अर्विभाव त्यांनी आणला.

शहरातील तीनही आमदारांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांकडे जाऊन नाशिककरांची बाजू मांडणे अपेक्षित असताना, तीनही आमदारांनी एकमेकांना चेकमेट देत नाशिककरांना गृहित धरण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे. फरांदे यांच्यापाठोपाठ आमदार सानप आणि हिरे यांनी मंगळवारी तातडीने मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी थेट दिलासा देण्याऐवजी पालकमंत्र्यांकडे बोट दाखवत वेळ मारून नेली. त्यामुळे आमदारांमधल्या असमन्वयामुळे नाशिकरांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र असून, आमदारांमध्येच एकवाक्यता नसल्याने नाशिककर भरडलेच जाणार आहेत.

हास्यास्पद दावे

आमदार फरांदेनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शेतीवरील कर माफ केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा केला होता. पाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्र्याकडे गेलेल्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्याचे नाव सांगत वेळ मारून नेली. दोन शिष्टमंडळाने वेग‌वेगळे दावे केल्याने नेमका खरे कोण बोलतोय अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार नाशिककरांना वेड्यात तर काढत नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images