Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सावानाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

१७८ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके यांची निवड करण्यात आली. श्रीकांत बेणी यांची प्रमुख सचिवपदी फेरनिवड करण्यात आली.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी कार्यकारी मंडळाची विशेष बैठक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते.

सन २०१८-१९ या वर्षाकरिता कार्याध्यक्षपदी डॉ. धर्माजी बोडके यांची निवड करावी, अशी सूचना मावळते कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे यांनी मांडली. त्यास श्रीकांत बेणी यांनी अनुमोदन दिले. गेल्या वर्षभरात केलेले सक्षम काम लक्षात घेऊन प्रमुख सचिवपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करावी, अशी सूचनादेखील अॅड. बगदे यांनी मांडली. त्यास संजय करंजकर यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांचा गजर केल्याने एकमताने निवड झाल्याचे सभाध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांनी जाहीर केले. मावळते अर्थ सचिव गिरीश नातू यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 'सावाना'ची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचे आणि आणखी नवनवीन उपक्रम सुरू करून 'सावाना'च्या कीर्तीमध्ये भर टाकण्याचा मनोदय प्राचार्य औरंगाबादकर यांनी व्यक्त केला.

निवड झालेले अन्य पदाधिकारी

सहाय्यक सचिव- अॅड. भानुदास शौचे, अर्थसचिव- शंकरराव बर्वे, ग्रंथ सचिव- बी. जी. वाघ, सांस्कृतिक कार्य सचिव- प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, नाट्यगृह सचिव- अॅड. अभिजित बगदे, वस्तुसंग्रहालय सचिव- देवदत्त जोशी, बालभवनप्रमुख- संजय करंजकर, उद्यान वाचनालयप्रमुख- कुमार मुंगी, अभ्यासिकाप्रमुख- प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, डिजिटलायझेशनप्रमुख- प्रा. संगीता बाफना, मुक्तद्वार विभागप्रमुख- वसंत खैरनार, लायब्ररी ऑन व्हील प्रकल्पप्रमुख- जयप्रकाश जातेगावकर.

----

पुस्तक मित्रमंडळातर्फे उगलमुगले यांचे व्याख्यान

नाशिक : 'चांदणभूल' (ललित लेख) या विजयकुमार मिठे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर लेखक विवेक उगलमुगले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सभासद, तसेच नाशिककर नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे पुस्तक मित्रमंडळप्रमुख प्रा. प्र. द. कुलकर्णी व अॅड. मिलिंद चिंधडे आणि 'सावाना'च्या कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.

कर्करोगावर मार्गदर्शन (फोटो)

देवळाली कॅम्प : येथील दर्शन अॅकॅडमी येथे डॉ. गुरदीप सिंग यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगावर मार्गदर्शन केले. कर्करोग हा आजार चुकीच्या आहाराविषयक सवयींमुळे जडू शकतो. प्रत्यक व्यक्तीने मुलांनी समतोल आहार कसा ठेवावा, आहारविषयी चांगल्या सवयी कशा लावाव्यात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, तसेच अमली पदार्थ सेवनापासून स्वतःला कसे दूर ठेवावे व या गोष्टी शरीराला किती अपायकारक आहेत, हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. कर्करोगावरील उपचारांबाबत मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांचे शंकानिरसनही केले.

--

प्रशिक्षण वर्गाचा समारोप

जेलरोड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शंकराचार्य न्यासातर्फे समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी गंगापूर येथील श्री बालाजी मंदिरात दर वर्षी पूजा प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गाचे यंदा सातवे वर्ष होते. या वर्गाचा समारोप आज, शनिवारी (दि. १४) सकाळी दहा वाजता गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात होणार आहे. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव शिंदे यांचे यावेळी व्याख्यान होईल. लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष राजेश कोठावदे, धर्म जागरण विभागाचे प्रमुख हेमंत हरहरे, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी प्रमुख पाहुणे राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी पाहणी; अहवालानंतर पंचनामे!

$
0
0

अवकाळी पावसामुळे सटाणा, कळवण, देवळ्यात शेतपिकांचे नुकसान

विभागीय आयुक्तांचे पाहणीचे यंत्रणेला आदेश

दोन दिवसात प्राथमिक अहवाल होणार तयार

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी (दि. १२ एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता गृहित धरून सटाणा, देवळासह कळवण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करा, असे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंतची यंत्रणा कामाला लागली असून, दोन दिवसात याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे.

असह्य उकाड्याने शहर आणि जिल्हावासी त्रस्त असताना गुरुवारी सायंकाळी अनेक भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. यामुळे काही काळापुरता वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु, ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यासह पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या. शेतांमध्ये पाणी साचले. मिरची, कांदा, टोमॅटो, द्राक्ष आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील निकवेल, कंधाणे, जोरण, दहिंदुले, भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जायखेडा, सोमपूर, आसखेडा, तांदूळवाडी, ब्राह्मणपाडे या भागात उघड्यावर ठेवलेल्या कांदा भिजला. देवळा आणि कळवणमध्येही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप सरकारने दिले नसले तरी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित तालुक्यांमधील तहसीलदारांनी तलाठी आणि कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेमार्फत नुकसान झालेल्या शेतांमध्ये पाहणी करावी, त्याबाबतची माहिती तसेच छायाचित्रे घ्यावीत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. दोन दिवसात हा पाहणी अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैदीचा सिव्हिलमधून पोबारा

$
0
0

हत्येप्रकरणी पतीसह नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये भोगत होती शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिलेने शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून पलायन केले. ही घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास कैदी वार्डात घडली. गभर्वती असल्याने तसेच पोट दुखत असल्याने महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

शायदा शफीक पठाण, असे या महिलेचे नाव आहे. महिलेसह तिच्या पतीवर हत्येचा आरोप असून, नोव्हेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१७ रोजी दोघांची रवानगी नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. अटक झाली त्यावेळी महिला गर्भवती होती. तसेच तिला अरबाज दोन वर्षांचा मुलगा असून, तोही तिच्यासोबत आहे. मालेगाव येथील एका खून प्रकरणात या दाम्पत्यास अटक करण्यात आली होती. सेंट्रल जेलमध्ये येण्यापूर्वीच गर्भवती असलेल्या शायदाचे १२ एप्रिल रोजी पोट दुखायला लागले. त्यामुळे जेल प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलशी संपर्क साधला. येथील डॉक्टरांनी जेलमध्ये येऊन शायदाची प्रत्यक्ष तपासणी केली. मात्र, काही अडचणी असल्याने शायदाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्याच दिवशी शायदला अॅडमिट करण्यात आले. काही तासांच्या कालावधीनंतर नैसर्गिक बाळंतपण झाले नाही तर सिझेरीयन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्या अनुषंगाने शायदावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास शायदा मुलगा अरबाजला घेऊन फरार झाली. शायदासोबत जेल प्रशासनाने दोन महिला कर्मचारी दिलेल्या होत्या. मात्र, इतक्या अवघडलेल्या स्थितीत शायदा कोठे जाणार, असा सहानभुतीपूर्वक विचार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात शायदाने धूळ फेकली. शायदा फरार झाल्याची घटना पाचच मिनिटांत स्पष्ट झाली. या दोन कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकांसोबत परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

पतीही अनिभज्ञ

जेलच्या अधिकाऱ्यांनी शायदाच्या पतीकडेही चौकशी केली. मात्र, या अवस्थेत ती कोठे जाणार असा प्रश्न तिच्या नवऱ्यालाही पडला आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बाळांतपणासाठी महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. पती आणि पत्नी दोघेही खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये कारगृहात दाखल झाले होते.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागसवर्गीयांनाही मंदिराचे गाभारे खुले

$
0
0

८० मागासवर्गीय युवक बनले पुजारी

…fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी काळाराम सत्याग्रहचा लढा दिला त्याच भूमीत मागासवर्गीय समाजातील व्यक्ती देवाची पूजा अर्चा करण्यासाठी सज्ज होत आहेत. देवाच्या गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा करणे ही ठराविक समाजाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नाशिकच्या शंकराचार्य न्यासाच्या वतीने २०१२ पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आजपर्यत नाशिक जिल्ह्यातील २४५ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत.

मागासवर्गीयांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. काळ बदलला त्याप्रमाणे समाजाची मानसिकता बदलली. आज अनेक हिंदू मंदिरांमध्ये मागासवर्गीय युवक पुजारी म्हणून काम करीत आहेत. हिंदू धर्मात असलेल्या पूजाअर्चा या ठराविक समाजानेच कराव्यात असा नियम होता. मात्र आता तो बदलला आहे. यासाठी नाशिकच्या शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी धर्मजागरण परिषदेच्यावतीने सन २०१२ पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. शंकराचार्य कुर्तकोटी हे आधुनिक विचारसरणीचे होते. त्याचीच दखल घेऊन न्यासाने अशा प्रकारच्या आधुनिक उपक्रम सुरू केला. या प्रशिक्षणाला हिंदू धर्मातील कुणीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. आजपर्यंत विविध जातीच्या लोकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून सन २०१२ मध्ये ३४, २०१३ मध्ये ३०, २०१४ मध्ये ३१, २०१५ मध्ये ५०, २०१६ मध्ये ३१, २०१७ मध्ये ४५, २०१८ मध्ये २४ अशा एकूण २४५ युवकांनी प्रवेश घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यातील ८० युवक हे मागासवर्गीय आहेत. यातील बहुतांश युवक हे आपापल्या गावात पूजाअर्चा करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या प्रशिक्षण वर्गात सर्वदेव पूजा, ज्योतिष पंचांग, नामकरण विधी, संस्कृत संभाषण वर्ग, योगासने शिकविली जातात. यामध्ये सत्यनारायण पूजा, विवाह, अंत्येष्टी, नामकरण विधी हे मुख्य असतात. ग्रामीण भागात वेगवेगळ्या श्रद्धा परंपरा असतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीच्या-परंपरा माहीत असलेला पुरोहीत हवा असतो याकरिता येथे प्रशिक्षण घेतलेले युवक योग्य काम करित आहेत. या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन गेलेले तीन मागासवर्गीय युवक हे पंढरपूर देवस्थानच्या पुजारी निवड समितीचे सदस्य आहेत. नाशिक शहराप्रमाणेच गेल्या वर्षापासून पैठण, सज्जनगड, सोलापूर, कोल्हापूर कणेरी आश्रम या ठिकाणीही पूजा प्रशिक्षण सुरू आहे. त्याठिकाणीही पूजा प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये मागसवर्गीय युवकांची उपस्थिती लक्षणीय आहे.

…..

वंचीत समाजाने पूजा शिकावी हा या मागचा उद्देश आहे. आजपर्यंत अनेक लोक शिकून जात आहेत. अनेक जातींचे लोक येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.--अनिल चांदवडकर, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागाचा राखीव निधी ‘वर्ग’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात लघु पाटबंधारे विभागाने आदिवासी भागातील बिगर जलयुक्तच्या कामांसाठी राखीव असलेला अडीच कोटी रुपयांचा निधी जलयुक्तच्या कामांना वर्ग केला. त्यावर जलव्यवस्थापनाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

जिल्हा परिषदेला आदिवासी तालुक्यात काम करण्यासाठी नाशिक प्रकल्पांतर्गत ११ कोटी तर कळवण प्रकल्पांतर्गत १० कोटी असा २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील १० टक्के निधी बिगर जलयुक्तच्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. उर्वरित १८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांकडून त्यांच्या गटातील कामांचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यापैकी जलयुक्तच्या कामांसाठी ४ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले होते. मात्र ३१ मार्चचा हिशोब पूर्ण करण्यात प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगत बिगर जलयुक्तचा निधी जलयुक्तच्या कामांसाठी वळविला. त्यावर आता पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय निधी वर्ग करण्यात येत नसतानाही प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने जलयुक्त बैठकीत या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या ही गोष्ट ५ एप्रिलला निदर्शनास आले. यानंतर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्षांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. ही सभा एक तास तहकूब करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व अनिल लांडगे यांनी त्यानंतर चर्चा केली. त्यावेळेस लघु पाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालदोस्तांसाठी पाठवा साहित्य

$
0
0

\Bबालदोस्तांसाठी पाठवा साहित्य

\Bबालदोस्तांसाठी सुटी म्हणजे मजा, धमाल आणि फुल टू एन्जॉय. सुटीमध्ये बालगोपाळ खेळ आणि विविध शिबिरांमध्ये दंग असतात. मात्र, मैदानी खेळांबरोबरच बौद्धिक क्षमतावाढही तेवढीच महत्त्वाची असते. हेच लक्षात घेऊन चिमुकल्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'मटा'तर्फे 'सुपरसुट्टी' हे पान सुरू करण्यात येणार आहे. या पानासाठी छोट्या दोस्तांना रुचेल, आवडेल असे साहित्य मागविण्यात येत आहे. लहान मुलांच्या गोष्टी, कथा, कविता, कोडे, चित्र, चुटकुले तसेच त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल असे साहित्य पाठवावे. साहित्य पसंतीस उतरल्यास त्याला यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल.

\Bसाहित्य पाठविण्यासाठी

\B- पत्ता : महाराष्ट्र टाइम्स तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड

- ई मेल आयडी : nashikplus18@gmail.com

- साहित्य पाठविताना त्यावर 'सुपरसुट्टी' असा उल्लेख करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयवादाची लढाई हिंसक

$
0
0

इंदिरानगर : नाशिक महानगरपालिकेच्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रथमच चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. या रचनेमुळे किंवा चार सदस्यीय पद्धतीमुळे अनेक प्रभागांत विकास झाला नाही. अनेक प्रभागांत वेगवेगळ्या पक्षांचे किंवा एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. एकाच प्रभागातील या नगरसेवकांमध्ये कामांचे श्रेय लाटण्यावरून वाद-विवाद झाल्याचे वर्षभरात दिसून आले. इंदिरानगर भागात तर एकाच पक्षाच्या चारही नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने आता भाजप यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात मागील वर्षात अनेक प्रभागांमध्ये अशा श्रेयवादाच्या लढाया झाल्या आहेत. प्रभाग २५ मध्ये शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये स्मशानभूमीच्या विकासावरून वाद झाला होता. हा वादही पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झालेले हे वाद आजपर्यंत अनेकदा समोर आले आहेत. विशेष म्हणजे या वादात अद्याप कोणत्याही पक्षश्रेष्ठीने लक्ष दिले नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरामाची मर्यादा बालपणापासून

$
0
0

विजय कौशल यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राम आणि श्रीकृष्ण यांचे बालपण बघितले तर श्रीकृष्णाच्या तक्रारी खूप येत असल्याचे दिसते. मात्र, श्रीरामाची कुणी तक्रार केलेली नाही. श्रीरामाची मर्यादा बालपणापासून होती, असे विचार विजय कौशल यांनी व्यक्त केले.

स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे धनदाई लॉन्स येथे शुक्रवारी (दि. १३) झालेल्या श्रीरामकथाच्या दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते. माता, पिता, गुरू, यांचे बंधन स्वीकारले पाहिजे. मर्यादांचे बंधन हवेच. दान देण्याची वृत्ती असायला हवी. जशी क्षमता आहे, तशा प्रकारे दान केले पाहिजे. देवतांच्या आध्यात्मिक विकासाचे स्वरूप लक्षात घ्यावे. जसा भाव आहे, तशी मूर्ती बनविली जाते. ज्या प्रकारे माता- पित्याजवळ जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते त्याचप्रमाणे भगवताजवळ जाण्यासाठी पूर्व तयारी करण्याची गरज नसते, असे कौशल यांनी सांगितले.

भगवान आपले माता-पिता आहे. भगवंतांसाठी काही सोडू नका. जागे राहिल्यास भगवान मिळतो. ज्यांच्यासाठी भगवान प्रकट झाले ते सर्व गृहस्थी होते. विरक्त नव्हते. पद-पैसा मिळविण्यासाठी शरीराला कष्ट करावे लागतात, भगवंताला मिळविण्यासाठी शरीराला बसावे लागते. भगवन्त मिळण्यासाठी व्याकुळता असावी लागते. भजनासाठी स्वार्थी बनावे मात्र, व्यवहारात परमार्थ पाहिजे. एकदा भगवंतांचा आसरा मिळाला की दुसऱ्या आसऱ्याची गरज नाही. माता, पिता आणि गुरू यांचा आशीर्वाद घेतल्यास दुसऱ्या कुणाचाही आशीर्वाद मागण्याची गरज नाही. आचार, व्यवहार, समर्पण, वाणी यांनी माता, पिता, गुरू याना प्रसन्न केले तर दुनियेतील कोणत्याही आशीर्वादाची गरज नाही, असेही कौशल यांनी मत मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जादा दराच्या कामांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने मंजूर केलेल्या प्राकलन दराच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक जादा दराच्या कामांना ब्रेक लावत आयुक्त तुकाराम मुंढेंनी दोन कामांत एक कोटीची बचत केली आहे. म्हणजेच यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय स्थायी समितीने व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने निविदाप्रक्रियेत 'रिंग' करून महापालिकेची कोट्यवधीची लूट होत असल्याचा थेट आरोप स्थायीच्या सदस्यांनी बैठकीत केला. त्यामुळे वर्षभरातील जादा दराच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर गेल्या वर्षभरातील जादा दराने मंजूर झालेल्या कामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले.

आयुक्त मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर विकासकामांना त्रिसूत्री लावत, मंजूर कामांच्या प्राकलनाचीही तपासणी केली होती. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ४ मधील फुलेनगर भागात दलित वस्ती विकास योजनेंतर्गत आरसीसी गटार टाकण्याच्या ८.३३ कोटींच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतरही आयुक्तांनी मक्तेदाराशी वाटाघाटी करीत हे काम ७.४४ कोटींमध्ये करण्यास मक्तेदाराला राजी केले. सातपूर विभागातील प्रभाग ११ मधील प्रबुद्धनगरमधील आरसीसी गटार टाकण्याचे १.०६ कोटीचे कामही १.०२ कोटीपर्यंत आणल्याने महापालिकेची सुमारे ९४ लाखांची बचत झाली आहे. या संदर्भातील फेरप्रस्ताव स्थायी समितीने सादर केला. प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आयुक्त मुंढे यांच्या या कृतीचे समर्थन करताना यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असावा, असा संशय सदस्यांनी व्यक्त केला. आयुक्त मुंढे दोन कामांमध्ये एक कोटीची बचत करू शकतात, तर यापूर्वी मंजूर झालेल्या जादा दराच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी तसे प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल उद्धव निमसे यांनी केला. महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार 'रिंग' करून कामे मंजूर करीत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. वर्षभरातील जादा दराच्या कामांची चौकशी करण्याची मागणी मुशीर सय्यद, दिनकर पाटील यांनी केली. सिंहस्थ काळात झालेले रस्ते, रिंग रोड व १९२ कोटींच्या कॉलनीअंतर्गत रस्ते विकासाच्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. चर्चेअंती गेल्या वर्षभरात जादा दराने मंजूर झालेल्या कामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश सभापती आहेर-आडके यांनी दिले. महापालिकेच्या औषध खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही सदस्यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन संशियत चोरटे अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वणी-पिंपळगाव भागातील दुकाने फोडणाऱ्या तिघांपैकी दोघा संशयितांना ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संशयितांनी कापड दुकान, हॉटेल आणि पानस्टॉल फोडल्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ७८ हजाराचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितांमध्ये दोघा सराईतांचा समावेश आहे.

रोहित केशव गायकवाड (रा. शिवाजीनगर, पिंपळगाव बसवंत) आणि मुकुंद गणपत देशमुख (रा. चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्याचा एक साथिदार प्रतिक उर्फ बापू पांडूरंग मातेरे (रा. चिंचखेड, ता. दिंडोरी) फरार आहे. वणी भागात दुकान फोडणारे संशयित पिंपळगाव बसंवत येथे राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी पुढील कारवाई केली. तिघांनी मिळून दिंडोरी रोडवरील लखमापूर फाटा येथील कापड दुकान, वणी चौफुलीवरील हॉटेल तसेच पानटपरी फोडल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून रेडिमेड कपडे, परफ्युम व पान दुकानातील साहित्य असा ७७ हजार ४५३ रुपयांच्या मुद्देमाला आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५ ईयू ३९८२) जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रेय साबळे, पुंडलिक राऊत, गणेश वराडे, पोलिस नाईक अमोल घुगे, शिपाई विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमजन्मोत्सवासाठी नाशिक सज्ज

$
0
0

ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी भिमसैनिक सज्ज झाले असून शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून निळे झेंडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे यंदा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादाप्रमाणे यंदाही हर्षोल्हासात साजरी करण्यासाठी भिमसैनिक सरसावले आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्त जयंती उत्सव साजरा होते आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

जुन्या नाशकातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केला आहे. भद्रकाली परिसरातील मोठा राजवाडा येथून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शालिमार येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीची सांगता होणार आहे. शहरातील डॉ. आंबेडकरांचे पुतळे रोषणाईने उजळले आहेत. अनेकांनी घरांवर, वाहनांवर निळे झेंडे फडकावले आहेत. फाळके स्मारकाजवळील बौद्धविहार परिसरातही बांधव गर्दी करतात. त्यामुळे येथेही स्वागताची तयारी करण्यात आली आहे. शांततामय वातावरणात जयंती साजरी करावी तसेच सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे. शहरात ठिकठिकाणी लहान मोठ्या मंडळांकडून डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अन्नदान, विद्यार्थी गुणगौरव, यांसारख्या उपक्रमांचे आयोजन मंडळांनी केले आहे.

'ड्राय डे' पाळा

जयंती उत्सव उत्साहात परंतू निर्विघ्न वातावरणात पार पडावा यासाठी १३ आणि १४ डिसेंबरला 'ड्राय डे' पाळण्याबाबतचे आवाहन बुद्धविहार समन्वय समिती, बहुजन हिताय संघ, धम्म संस्कार प्रचार व प्रसार समिती, धम्म युवा विचारमंच, मिशन एम्पॉवरमेंट आणि मेत्ता मल्टीपर्पज ऑर्गनायजेशन आदींनी केले आहे. प्रशासकीय स्तरावरूनही याबाबत कार्यवाही व्हावी, याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. शनिवारी 'ड्राय डे' पाळण्यात येणार आहे.

विधायक उपक्रमांसाठी आवाहन

डॉ. आंबेडकर या विश्ववंदनीय महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ उत्सव नको तर परिवर्तनाचा जागर व्हावा, असे आवाहन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधवांना विधायक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन, पुस्तकांचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, ग्रेटभेट सारखे कार्यक्रम, सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार, विविध स्पर्धा, नेतृत्व व वकृत्व विकास शिबिर, पथनाट्यातून प्रबोधन, कलामहोत्सव, भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करा, असे आवाहन काही दिवसांपासून सजग आणि सुजाण बांधव करीत आहेत. अशा काही उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणास स्थानिकांचे पाठबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड भागातील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या भाजीबाजारातील व्यावसायिकांना नवीन नियमानुसार जागा द्यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला शुक्रवारी स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. येथील भाजीबाजरप्रश्नी आता तातडीने निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

आकाशवाणी केंद्राजवळ नव्याने होत असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये आमच्या हक्काची जागा आम्हाला द्या, अशी मागणी गंगापूररोडवरील भाजीविक्रेत्यांनी केली असून, त्यांनी सुरू केल्ल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकही शुक्रवारी रस्त्यावर उतरले. उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. हे आंदोलन तीव्र होत असून, जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. या भाजीबाजारातील विक्रेत्यांची कैफियत ऐकून घेण्यासाठी सकाळपासूनच नेत्यांची रीघ लागली होती. परंतु, एकाही नेत्याने याबाबत ठोस भूमिका घेतली नाही. विक्रेत्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मात्र, भाजीबाजाराचा प्रश्न माझ्या कारकीर्दीत निर्माण झालेला नाही. त्यामुळे मी याबाबत काहीही बोलणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्याचे समजते.

'भीख मांगो' आंदोलन

गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू असून, विक्रेत्यांच्या घरात चूल पेटलेली नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी भीख मांगो आंदोलन केले. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांकडून भीक मागितली जात होती. त्यामुळे याप्रश्नी निर्णय होत नसल्याने नागरिकांकडूनदेखील सखेद आश्चर्य व्यक्त केले जात होते.

आमदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न

आंदोलनाच्या ठिकाणी आमदार प्रा. देवयानी फरांदे आल्यानंतर त्यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जागामालक, विकसक व महापालिकेचे अधिकारी यांना दूरध्वनी करून याबाबत विचारणा केली. मात्र, विकसक बाहेरगावी असल्याने त्याबाबत बोलणी होऊ शकली नाही. यावेळी रविवारी बैठक घेऊन याबाबत निश्चित तोडगा काढला जाईल, असे आमदार फरांदे यांनी सांगितले. बाजीबाजार प्रश्नी आपण तुमच्या पाठीशी आहे. मात्र, सध्या सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. मात्र, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे आमदारांना माघारी फिरावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी वाहनतळाला विरोध; १५ ला बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने अशोकस्तंभ ते गडकरी चौकापर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत नुकतीच स्मार्ट रोडची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम, सीबीएस येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. या वाहनतळाला क्रीडा संघटनांनी विरोध केला असून, यावर १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियममधील फुटबॉल असोसिएशनच्या कार्यालयात बैठक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, तसेच क्रीडा संघटक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान कायमस्वरूपी फक्त खेळासाठी उपलब्ध ठेवावे, असे निर्देश असतानासुद्धा नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध असलेले एकुलत्या मैदानावर भुयारी वाहनतळाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या भुयारी वाहनतळाला क्रीडा संघटनांनी विरोध केला आहे. सर्व जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी सभेला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव या मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे, खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सचिव अर्जुन टिळे, क्रीडा संघटक अविनाश खैरनार, आनंद खरे, उमेश आटवणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करयोग्य मूल्य दर २० पैशांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह शहरातील शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन रस्त्यावर उतरत आंदोलनाची भाषा केली होती. शहर विकास आराखडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील २३ खेड्यांमधील शेतकरी एकवटत असताना आयुक्त मुंढेंनी वाढता जनक्षोभ लक्षात घेत दोन पावले माघारी येण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील मोकळ्या भूंखडावरील करयोग्य मूल्य दर ४० पैशांवरून २० पैशांवर आणला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी निवासी ३३, अनिवासी ६५ तर औद्योगिक मालमत्ता करामध्ये ८२ टक्के वाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. परंतु, महासभेने हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्त मुंढेंनी त्यांच्या अधिकारात मालमत्ता कराच्या करयोग्य मूल्य दरात वाढ करण्याची अधिसूचना जाहीर केली. नव्या मालमत्तांचे करयोग्य मूल्य पाच पट वाढविण्यासह शहरातील जमीन, मोकळे भूखंड, पार्किंग, इमारती व बंगल्यांचे सामासिक अंतरासह इंच इंच जागेवर कर लावण्याची घोषणा केली होती. शहरातील संपूर्ण शेती क्षेत्र कराच्या कचाट्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

कर निम्म्यावर

मुंढे यांनी शहरातील मोकळ्या भूंखडावरील करयोग्य मूल्य ३ पैशांवरून ४० पैशांवर नेला होता. त्यामुळे एक एकर जमिनीला तब्बल १ लाख ३७ हजार रुपयांची कर आकारणी होणार होती. यामुळे शेतकऱ्याचा संताप अधिकच वाढला होता. परंतु, जमिनीवरील करयोग्य मूल्य आयुक्तांनी निम्म्यावर अर्थात ४० पैशांवरून २० पैशांवर आणत जनआंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे नाशिककरांना ५० टक्के दिलासा मिळाला असला तरी, त्यांना कर हा भरावाच लागणार आहे. त्यामुळे कमी केलेल्या करयोग्य मूल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटणार असले तरी, शेतकऱ्यांना कर मात्र द्यावाच लागणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्रेद्वारे प्लास्टिकबंदीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकच्या विळख्यातून मानवाची मुक्तता व्हावी यासाठी तीन पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकबंदीचा प्रचार व प्रसार करीत एक हजार किलोमीटरची हिमालय पदयात्रा करण्याचा संकल्प केला आहे. या तिघांमध्ये पुण्याचे माधव बडवे, अहमदनगरमधील अकोलेचे तात्यासाहेब देशमुख, तर नाशिकचे देवळाली व्यापारी बॅँकचे संचालक श्रीराम त्र्यंबकराव गायकवाड यांचा समावेश आहे.

या यात्रेच्या संकल्पनेबाबत श्रीराम गायकवाड म्हणाले, की २०१३ मध्ये मी नर्मदा परिक्रमा केली. ती तीन हजार किलोमीटरची होती. ती करीत असतानाच हिमालयाची पदयात्रा करायची असा निश्चय केला. यापूर्वी ही यात्रा माझे आजोबा कै. गबाजी बाबा यांनी पूर्ण केली होती. हिमालयात पर्यटक अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा टाकून जातात. त्यामुळे ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी प्लास्टिकबंदीचा संदेश पोहोचवणार आहे. जेथे जेथे पर्यटक भेटतील त्यांना प्लास्टिक वापरू नका, असा संदेश आम्ही देणार आहोत. या पदयात्रेंतर्गत १० ते ११ हजार फुटांवरून प्रवास करावा लागणार असून, घनदाट अरण्यातूनही मार्गक्रमण करावे लागणार आहे. बेभरवशाचे वातावरण व वाढती थंडी याचाही मुकाबला करावा लागणार आहे. या ठिकाणी तीनही ऋतू एकाच ठिकाणी अनुभवायला मिळणार असल्याने त्याअनुषंगाने तयारी केली आहे. सर्व सामान घेताना त्याचे वजन जास्त होऊ नये याचीदेखील खबरदारी घेतली आहे. या पदयात्रेतून सामाजिक संदेश देत निर्सगाचे चमत्कार बघण्याची, तसेच हिमालयातील जीवनमान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. या यात्रेतून ट्रेकिंग, आध्यात्मिक अनुभव व सामाजिक बांधिलकी या तिन्हींचा मेळ साधला जाणार आहे. ज्या गावांमध्ये मुक्काम असेल, तेथील शाळांमध्येही प्लास्टिकबंदीचा प्रचार करणार असून, मुलांना प्लास्टिक न वापरण्याबाबत धडे देणार आहोत, असेही ते म्हणाले.

असा असेल यात्रामार्ग

या एक हजार किलोमीटरच्या हिमालय पदयात्रेला हरिद्वारहून प्रारंभ होणार असून, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, व बद्रिनाथ असा त्यांचा प्रवास राहणार आहे. पदयात्रेत हे तिघेही दररोज ३० किलोमीटर पायी चालणार आहेत. नाशिकरोड स्थानकाहून हे तिघेही शुक्रवारी सकाळी रवाना झाले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्यांना निरोप देण्यासाठी हजर होते.

सर्वत्र प्लास्टिकबंदीचा जागर होत असताना आपणही खारीचा वाटा उचलावा, या निश्चयाने ही पदयात्रा सुरू केली आहे. आमच्या प्रबोधनाने एका व्यक्तीने जरी प्लास्टिक वापरणार नाही, असा निश्चय केला तरीही आमची यात्रा सफल झाली, असे मी म्हणेन.

-श्रीराम गायकवाड, पर्यावरणप्रेमी

(तीन पासपोर्ट फोटो आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करधाडीवरून स्थायीत वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नवीन मालमत्तांच्या करयोग्य मूल्यदरात पाचपट वाढ करण्यासह शेतीक्षेत्रावरही कर लादण्याच्या प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाचे तीव्र पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. आयुक्तांच्या या एकतर्फी करवाढीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. प्रस्तावित करवाढ रद्द न झाल्यास प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशाराच सदस्यांनी दिला. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा हा निर्णय असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा यांनी दिला. आयुक्त मुंढे यांच्या या निर्णयाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्धार स्थायी समितीने व्यक्त केला आहे.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे करवाढीच्या निर्णयाचे पडसाद उमटले. महापालिका क्षेत्रातील शेतीक्षेत्रावरही मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या मुंढे यांच्या निर्णयावर स्थायी समितीने तीव्र आक्षेप नोंदविला. उद्धव निमसे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाची भूमिका जनतेत संभ्रम निर्माण करणारी असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक एकर क्षेत्रासाठी मालमत्ता करापोटी लाखाची रक्कम भरण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांनी ती द्यायची कोठून, असा सवाल केला. यावर शेतजमिनीवरील करआकारणीबाबत सभापती आहेर-आडके यांनी उपायुक्त दोरकूळकर यांना खुलासा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात मालमत्ता कराचे एकरी मूल्य नमूद नसल्याचे सांगत जमिनींवरील कर योग्य मूल्य योग्यच असल्याचा दावा दोरकूळकर यांनी केला. जमिनींवरील ४० पैसे प्रतिचौरस फूट करयोग्य मूल्य वार्षिक नव्हे तर, मासिक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केल्याने स्थायीत सदस्यांचा संताप अनावर झाला. आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या असताना आता उर्वरित जमिनींवर मालमत्ता कराचा नांगर फिरविण्याची तयारी प्रशासनाने केली काय, असा संतप्त सवाल भागवत आरोटे यांनी केला. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा हा निर्णय असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा दिला. या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असेही पाटील, पुष्पा आव्हाड यांनी सांगितले. चर्चेअंती मनपाने मोकळ्या जमिनींवर लागू केलेला मालमत्ता कर शेतीक्षेत्रावरही आहे की केवळ ले-आऊट झालेल्या जमिनींवर याबाबतचा लेखी खुलासा प्रशासनाने पुढील सभेत करावा, असे आदेश सभापती आहेर-आडके यांनी दिले.

शिवसेनेची मुंढेंना ऑफर

करवाढीच्या या निर्णयावर शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकशी नाळ जुळलेली नसल्यामुळेच परसेवेतील अधिकारी नाशिककरांवर अन्यायकारक करवाढ लादत असल्याचा आरोप संतोष साळवे यांनी केला. मंढेंनी करवाढ लादण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रतिएकरी ७५ हजार रुपये द्यावेत आणि जमिनींचे हवे ते करावे, अशी ऑफर प्रवीण तिदमे यांनी दिली. तर शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांवर दुदैवी प्रसंग कोसळल्याचे नमूद करत समीर कांबळे यांनी प्रशासनाने लागू केलेल्या या 'सुल्तानी' कराचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट वळूंना मिळाले १७ तासांनंतर जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात नेहमीच रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर आढळतो. यातील काही जनावरे आक्रमण होऊन त्यांच्यात झुंजही होतात. शुकवारी मात्र मोकाट दोन वळूंवर त्यांच्यातील झुंज जीवावर बेतली. रामसेतू परिसरातील नागरिक, नगरसेवक व अग्नीशामक दलाच्या मदतीने या दोन्ही वळूंना १७ तासांच्या प्रयत्नानंतर वाचविण्यात आले.

शहरातील रामसेतू परिसरातील राममंदिराच्या वरील बाजूस असलेल्या विहिरीत गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या दोन वळूंना शुक्रवारी दुपारी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही वळूं मंदिर परिसरात फिरत होते. त्यांच्यात अचानक झुंज सुरू झाली. त्यातील एकाचा पाय घसरला, सो सुमारे ३० फूट खोल विहिरीत कोसळला. त्याला बघत असताना दुसरा वळूंही विहिरीत कोसळला. परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा बराच अंधार झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती नगरसेवक मदन गायकवाड, गोरक्षक सुभाष मालू, राजेंद्र शेलार व अग्निशामक दलास दिली. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्या दोघा वळूंची बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक विभागाचे प्रयत्न सुरू होते; मात्र अंधार असल्याने त्यांना यश आले नाही. शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. क्रेन मशिनद्वारे दुपारी तीनच्या सुमारास दोघा वळुंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघा वळूंना गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर दोन्ही वळूंना सोडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्मदाची यशोगाथा पुस्तकरुपात

$
0
0

पुढील महिन्यात होणार प्रकाशन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने पंचसूत्रीद्वारे केलेले कार्य संपूर्ण देशासाठी उल्लेखनीय ठरले आहे. त्यामुळेच या प्रयत्नांना कॉफी टेबल पुस्तकाच्या रुपात शब्दबद्ध केले जाणार आहे. 'यशदा'च्या माध्यमातून त्याचे काम सुरू असून येत्या महिन्याभरातच या पुस्तकाचे प्रकाशन होईल, अशी माहिती नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे सदस्य तथा पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अफ्रोज अहमद यांनी 'मटा'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

सरदार सरोवर प्रकल्प गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अनेक अटी-शर्थी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यांना घातल्या. या अटींची पूर्तता होते आहे किंवा नाही याची तपासणी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाकडून वारंवार केली जात आहे. त्यानुसार चारही राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला असल्याचे प्राधिकरणाचे सदस्य डॉ. अहमद यांनी सांगितले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने पंचसूत्रीद्वारे कृती आराखडा तयार केला. त्यात वृक्षलागवड, पाणलोट क्षेत्रावरील काळजी, जैविक विविधतेचे संरक्षण, बाधित गावे व पाड्यांना आरोग्य सुविधा आणि मत्स्यपालन या पाच मोहिमांचा समावेश आहे.

प्रकल्पात जाणाऱ्या घनदाट जंगलाच्या मोबदल्यात पडिक जमिनीवर दुप्पट वृक्षलागवड आणि महसूली जमिनींवरही दुप्पट वृक्षलागवडीचे महाराष्ट्र सरकारने निश्चित केले. त्यानुसार यवतमाळ, नांदेड, नागपूर, जालना, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली. अक्कलकुवा येथे ६० तर औरंगाबाद जिल्ह्यात ५० हेक्टरवर घनदाट जंगल साकारण्यात आले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा होण्याची शक्यता होती. म्हणूनच या क्षेत्रात विविध ठिकाणी बंधारे बांधण्यासह विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. जैविक विविधतेच्या संगोपनासाठी तोरणमाळ परिसर संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी दुर्मिळ असा पिंगळा (आऊलेट) आणि गिधाड (व्हल्चर) यांचा अधिवास वाढला आहे. पुनर्वसन केलेल्या गावे आणि पाड्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मोबाइल युनिट, आरोग्य बोट आदी सुविधा करण्यात आल्या. तर, स्थानिक आदिवासींना रोजगार निर्मितीसाठी मत्स्य व्यवसाय विकसित करण्यात आला. हे सारे प्रयत्न अतिशय यशस्वी ठरले आहेत. एखाद्या विकास प्रकल्प साकारताना पर्यावरणाची कशी काळजी घेतली जाते आणि कृती आराखड्याद्वारे किती मोठे काम उभे राहू शकते, याचा वास्तुपाठ महाराष्ट्राने घालून दिल्याचे डॉ. अहमद यांनी सांगितले आहे. त्यामुळेच ही सारी यशोगाथा आता पुस्तकरुपात बद्ध होत आहे. पुण्यातील 'यशदा'च्या वतीने त्याचे काम केले जात असून पुढील महिन्यात हे कॉफीटेबल बुक प्रकाशित होईल, अशी माहिती डॉ अहमद यांनी दिली आहे.

नर्मदा प्रकल्पा संदर्भात महाराष्ट्राचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरावे असे हे कार्य असल्याने ते एकत्रित स्वरुपात मांडावे अशी सूचना करण्यात आली. हे कॉपी टेबल बुक अन्य राज्यांना विकास प्रकल्प साकारताना मोलाचे ठरेल.

- डॉ. अफ्रोज अहमद, सदस्य, नर्मदा नियंत्रण प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसायदान’तर्फे व्यक्तिमत्व विकासाचा धडे

$
0
0

विद्यार्थ्यांसाठी २ मेपासून शिबिराचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शालेय परीक्षा संपल्या की शहरी भागातील मुलांसाठी सशुल्क उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात असते. मात्र ग्रामीण भागातील मुलांसाठी अशा शिबिरांचे आयोजन होत नाही. याचा विचारातून तालुक्यातील कंधाणे येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे ९ वर्षापासून 'आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास' या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदा देखील २ ते १६ मे दरम्यान झोडगे येथील संदीप कला महाविद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गांगुर्डे यांनी दिली.

शिबिर प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. या शिबिरातून विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना अध्यात्मिक संस्कार व त्याचसोबत व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जात असतात. योगासन, प्राणायाम, संतांची ओळख, वादन, गायन, क्रीडा, कीर्तन, पाठांतर अशा विविध दिनचर्येतून मुलांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला जाणार आहे. शिबिराचे ठळक वैशिष्ठ म्हणजे विद्यार्थ्यांना पंधरा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ऐकायला मिळणार आहेत. पुस्तकांची गोडी लागावी म्हणून 'पुस्तक मैत्री' हा उपक्रम घेतला जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गांगुर्डे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जलसंवर्धन व वृक्षारोपण उपक्रम

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना पाण्याचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलसंवर्धन विषयावर मार्गदर्शन केले जाणार असून, विद्यार्थ्यांनी येताना १०० बिया सोबत आणण्याच्या असून त्यांचे बीजारोपण व वृक्षारोपण देखील केले जाणार आहे. प्रतिष्ठान या वृक्षांचे संगोपन करेल. यासह क्षेत्रभेट, वनभोजन व बालकीर्तनकार महोत्सव देखील होणार आहे.

तज्ज्ञांच मार्गदर्शन

शिबिरात तहसीलदार ज्योती देवरे (स्वतःला कसे घडवावे?), डॉ. मनिषा कापडणीस (आध्यात्म आणि आरोग्य), डॉ. संजय शिंपी (जोडूनिया धन), निवृत्ती गायकवाड (आध्यात्म आणि आधुनिक काळ), गोकुळ अहिरे (जलसंधारण), प्रेमकुमार अहिरे (निसर्ग संवर्धन), बाळासाहेब शिरसाठ (काळ्या मातीशी जोडू नाते), सुनील आहेर (व्यवसाय मार्गदर्शन), डॉ. सुनिता भामरे (संवाद आणि समुपदेश), डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे (निसर्गाशी जोडू नाते), किशोर जाधव (अभ्यासातून व्यक्तिमत्व विकास), कमलाकर देसले (आयुष्यात थोडं वेगळं), अरुण पाटील (शासकीय योजना आणि विद्यार्थी), डी. बी. देशमुख (खेळातून शिक्षण) आदी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात ३

$
0
0

नाशिकरोड परिसरात

बंदोबस्त तैनात

नाशिकरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकरोडला मुख्य मिरवणुकीत २० चित्ररथ सहभागी होणार असून, ग्रामीण भागातही सहा स्वतंत्र चित्ररथांची मिरवणूक निघणार आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितींकडूनही उत्सवाची तयारी झाली आहे. मुख्य मिरवणुकीवर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असेल. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक निरीक्षक मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते, वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय वांबळे आदींनी मिरवणूक मार्गाची शुक्रवारी पाहणी केली. शहरात ७५ होमगार्ड जवान, राज्य राखीव दलाची एक तुकडी, पोलिस मुख्यालयाचे ६०, गुन्हे शाखेचे २५, आर्थिक गुन्हे शाखेचे पाच, तर स्थानिक पोलिस ठाण्याचे १०० कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी शहरात तैनात करण्यात आले आहेत. स्वयंसेवकांची टीमही पोलिसांच्या मदतीसाठी उभारण्यात आली आहे.

रसवंतीला पसंती

देवळाली कॅम्प : उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नाशिक शहर व परिसरातील रसवंतिगृहांत घुंगरू वाजू लागले आहेत. नाशिक पुणे-महामार्गावर बैलाच्या साह्याने पारंपरिक रसवंतिगृहे सुरू आहेत. अनेकांचा कल या रसवंतिगृहांकडे दिसून येतो आहे. नाशिकसह परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे रसवंतिगृहांची संख्याही वाढली आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने घाण्याचा उपयोग केला जात आहे, तर बहुतांश ठिकाणी इंजिनावर रसवंतिगृहे सुरू आहेत. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळण्यासाठी रसवंतिगृहांकडे नागरिकांची पाऊले वळत आहेत. अनेक वाहने या रसवंतिगृहांसमोर आवर्जून थांबतात. बैलाच्या मदतीने सुरू असलेल्या रसवंतिगृहांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

​​देवळालीत ​कोकीळ कुजन

देवळाली कॅम्प : देवळालीकरांची सकाळ कोकिळेच्या मंजूळ कुजनाने होत आहे. देवळाली कॅम्प परिसरातील हिरव्यागार वनराईमुळे येथील झाडांवर विविध पक्ष्यांचा सहवास नेहमीच असतो. हिरव्या दाट वृक्षराजींमध्ये कोकिळेच्या मंजूळ सुरांनी देवळालीकरांची सकाळ प्रसन्न होत आहे. कॅम्प परिसरातील दाट वटवृक्ष व कडुनिंबातून येणारा कोकिळेचा मंजूळ स्वर सर्वांना भुरळ घालत आहे. श्रावण महिन्यापर्यंत तिचे हे कुजन कानी पडते. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही घरटी बांधत नाही. मादा कोकीळ कावळ्याच्या घरात अंडी घालते. वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम कोकीळ पक्ष्यांवर होत असल्याने दिवसेंदिवस कोकिळेची संख्या घटत आहे. मात्र, देवळाली कॅम्प परिसरात कोकिळेचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

'आंदोलनाची वेळ

आल्यास तुमच्यासोबत'

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेकडून घरपट्टीसह विविध मिळकतींवर लावण्यात येणाऱ्या करांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण समितीला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. या संदर्भात लवकरच आम्ही सर्वच आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. मात्र, आंदोलन करावे लागले तर त्यात आम्हीही सहभागी होऊ. ही करवाढ कोणत्याही सत्ताधाऱ्याने केली नसून, प्रशासनाने केल्याचे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.

पाथर्डी फाटा येथे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने मेळावा झाला. त्या वेळी आमदार हिरे बोलत होत्या. मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या सूचना मांडून प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर या करवाढीचे खापर फोडले. मात्र, हा लढा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, कृती समितीचे काम हे अराजकीयदृष्ट्या सुरू असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी बोलताना नगरसेवक गजानन शेलार यांनी सांगितले, की ही करवाढ केवळ शेतकऱ्यांवरच केली नसून, शहरातील प्रत्येक इंचन् इंच जागेवर आहे. त्यामुळे याची माहिती सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे. जनतेवरही हा कर अन्यायकारक असून, त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते नाना महाले यांनी महापालिकेला उत्पन्नाची अनेक साधने असून, त्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारकडे निधी मागितला पाहिजे. सामान्यांवर करवाढ करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्‍त केले. यावेळी दत्ता गायकवाड, शिवाजी चुंभळे, ॲड. नितीन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, दिलीप दातीर, उन्मेष गायधनी, तानाजी जायभावे, तानाजी फडोळ, लक्ष्मण मंडाले, रंजन ठाकरे, मनोहर बोराडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images