Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चारचाकी वाहनाने बालकाला चिरडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

घरच्याच चारचाकी वाहनाच्या मागील बाजूने बसत असताना तीन वर्षांचा बालकाचा वाहनाखाली चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. आडगाव शिवारातील जय आप्पा मते (वय ३) असे बालकाचे नाव आहे. जय गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराजवळ खेळत होता. या वेळी चालकाने पिकअप (एमएच१५/ईजी५४३३) हे मालवाहू वाहन सुरू केले असता, जय पिकअपच्या मागील बाजूस वाहनात बसण्याचा प्रयत्न करीत होता. चालकाने पिकअप मागे घेतल्याने जयचा तोल जाऊन जमिनीवर पडला व पिकअपचे चाक जयच्या पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नगररचना’चे गुपचूप स्थलांतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील नगररचना कार्यालय चक्क शहरातील महापालिका मुख्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. या गुपचूप स्थलांतरामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांनाही याबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे. हे कार्यालय नाशिकरोडलाच राहावे यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नगररचना विभागाचे स्थलांतर कोणालाही न सांगता झाले. याबाबत महापालिकेच्या नाशिकरोड प्रशासनानेही मौन बाळगले आहे. नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आणि नगररचनाचे उपअभियंता प्रशांत पगार यांच्याशी मोबाइलवर संपर्काचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या कार्यालयात एक उपअभियंता, दोन सहाय्यक अभियंते, एक कनिष्ठ अभियंता, दोन क्लर्क, एक शिपाई आणि एक ट्रेसर असा स्टाफ होता. या सर्वांना नाशिक मुख्यालयात हलविण्यात आले आहे.  

पूर्वीही होता घाट

नाशिकरोड महापालिकेचे जुने कार्यालय देवी चौकात होते. तेव्हा सन २०१० मध्येही नगररचना कार्यालय जागेअभावी हटविण्याचा घाट घालण्यात आला होता. दप्तर बांधून तयारे झाले असतानाच तत्कालीन नगरसेवक सूर्यकांत लवटे, दिनकर आढाव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हाचे नगरसेवक केशव पोरजे, सुनीता कोठुळे, नयना घोलप, रंजना बोराडे, संभाजी मोरुस्कर, कोमल मेहरोलिया, सुनील वाघ, शैलेश ढगे, मंगला आढाव आदींना बरोबर घेऊन त्यांनी आवाज उठवला. नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन नागरिकांच्या तीव्र भावना निदर्शनास आणल्यानंतर त्यावेळी स्थलांतर रद्द करण्यात आले होते. 

सामान्यांना बसणार झळ

सातपूर, पंचवटी, सिडको, मध्य नाशिक, पूर्व, पश्चिम नाशिक ही पाचही कार्यालये नाशिक महापालिकेपासून जवळ आहेत. नाशिकरोड बारा किलोमीटर दूर आहे. नाशिकरोडचे क्षेत्रफळही सर्वांत जास्त आहे. नगररचना विभागात ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यावसायिक अशा सर्वांचीच कामे असतात. नाशिकरोडपासून थेट मुख्यालयापर्यंत बस नाही. रिक्षाने गेल्यास किमान साठ रुपये खर्च होतात. प्रदूषण, ताणतणाव हे प्रश्नही आहेत. एवढे करूनही नगररचनाचे अधिकारी भेटतील याची खात्री नसते. अधिकारी साइट व्हिजिटला गेले किंवा कार्यालयात असले, तरी सामान्यांना लवकर भेटत नाहीत. त्यामुळेच नागरिकांचा कार्यालय स्थलांतराला विरोध आहे.

विश्वासात घेतले नाही

नाशिकरोडचे कार्यालय हलविताना नगरसेवकांना विश्वासात घेतलेले नाही. अनेक नगरसेवकांना याची माहितीच नाही. कार्यालय स्थलांतरास शिवसेनेसह सर्वच पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेऊ व हे कार्यालय नाशिकरोडलाच ठेवावे, अशी आग्रही मागणी करू, असे प्रभाग सभापती सुमन सातभाई यांनी 'मटा'ला सांगितले. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी महापालिकेला पत्र देऊन कार्यालय नाशिकरोडलाच ठेवण्याची मागणी केली आहे. 

गोंधळाचीच शक्यता

प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचा उद्देश सक्षम, जलद व स्वच्छ कारभार हा असतो. नाशिकरोडचे कार्यालय हलविल्याने याला हरताळ फासला जाणार आहे. नाशिकरोड नगरपालिका असतानाचा म्हणजे १९६१ पासूनचा नाशिकरोडचा अभिलेख (रेकॉर्ड) स्वतंत्र आहे. ते लक्षात घेऊन नगररचना कार्यालय नाशिकरोडलाच होते. हे रेकॉर्ड ठेवण्याची नगररचनाची पद्धत वेगळी आहे. हे रेकॉर्ड नाशिकला नेले, तर नाशिकरोड व नाशिकचे रेकॉर्ड एकत्र होऊन मोठा गोंधळ होईल. कारण, सर्वांचे नंबर सारखे आहेत.  

सर्वांचाच तोटा

नगररचनामध्ये ना हरकत दाखले, पिठाची गिरणी परवानगी, झोनिंगचे दाखले देणे, बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचे दाखले, अभिन्यासाची परवानगी, जुन्या मंजूर दस्तांची कॉपी देणे, अनधिकृत बांधकांमावर नजर ठेवणे ही महत्त्वाची कामे होतात. बांधकाम व्यावसायिकांपासून सामान्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. देवळाली नगरपालिका असतानापासून नगररचना विभाग नाशिकरोडला आहे. तेव्हापासूनची सर्व कागदपत्रे येथे आहेत. ऑनलाइनचा जमाना असताना नागरिकांना मुख्यालयात खेटा घालण्यास भाग पाडणारी ही कृती धक्कादायक आहे, अशी भावनी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

देवी चौकात जागा नव्हती, ही सबब ठीक होती. परंतु, आता महापालिकेची नाशिकरोडला भव्य इमारत झाली आहे. त्यामुळे नगररचना कार्यालय नाशिकरोडलाच ठेवावे. हे कार्यालय नाशिकरोडलाच राहील यासाठी आम्ही सर्व नगरसेवक जोरदार प्रयत्न करू. नागरिकांची गैरसोय होणार यासाठी दक्ष राहू.

-सूर्यकांत लवटे, दिनकर आढाव, नगरसेवक 

कामचुकार अधिकाऱ्यांमुळेच या कार्यालयाचे स्थलांतर झाले. कार्यक्षम प्रशासनाचे विकेंद्रीकरण हे धोरण असताना येथे केंद्रीकरण होत आहे. त्यातून नागरिकांना जाच होत आहे. किरकोळ कामांसाठी नाशिकला जावे लागेल. आयुक्तांना चुकीचे फिडिंग झाल्याने स्थलांतर झाले. हा निर्णय चुकीचा आहे.

-उन्मेष गायधनी, वास्तुविशारद

नाशिकरोडचा विस्तार पूर्वकडे साडेतीन, उत्तरेकडे चार, दक्षिणेकडे तीन किलोमीटर आहे. येथे छोटे-मोठे बंगले, अन्य बांधकामे, इमारत दुरस्ती कामे सुरू असतात. महापालिकेच्या छोट्या-छोट्या परवानग्यांसाठी नाशिकला जाणे वास्तुविशारद, नागरिकांना परवडणारे नाही. अधिकाऱ्यांनाही स्थळ पाहणीसाठी दूर यावे लागेल.

-हेमंत गायकवाड, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसा परमो धर्म:...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावीर जन्मोत्सवानिमित्त शुभ्र वस्त्र परिधान करून जैन धर्माच्या ध्वजाखाली एकत्र येत पुरुष, महिला, युवक-युवतींनी गुरुवारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा केला.

शहरात निघालेल्या मिरवणुकीतील अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीरच्या घोषणांनी अवघे शहर दुमदुमले होते. पेशवाई ढोल पथकासोबत युवक-युवतींचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. भगवान महावीरांची ध्यानस्थ प्रतिमा, डिजिटल इंडिया, अन्न वाचवा, स्वच्छता अभियान या विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी गोधन बचाव रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.

दहीपूल येथील श्री धर्मनाथ देरासर येथून सकाळी ८ वाजता शोभायात्रेची सुरुवात झाली. श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, जुनी तांबट लेन, श्री दिगंबर जैन मंदिर भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, जैन स्थानक, रविवार पेठ, अशोक स्तंभ, गंगापूररोडमार्गे चोपडा बँक्वेट हॉल येथे ११ वाजता मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीतील बहुसंख्य अबालवृद्धांनी शुभ्रवस्त्र परिधान केले होते. बँड पथकाच्या तालावर युवक-युवती जल्लोषपूर्ण घोषणा देत होते. भगवान महावीरांच्या जीवनावरील गीतांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. लूक अँड लर्न शाळेतर्फे डिजिटल पाठशाळा या विषयावरील शोभायात्रेतील प्रस्तुती प्रशंसनीय ठरली. …चोपडा लॉन्सच्या प्रांगणावरील भव्य मंडपात आयोजन करण्यात आले होते. हजारो समाजबांधवांनी त्याचा लाभ घेतला. हा महाप्रसाद सटाणा येथील वर्धमान लुंकड परिवार, जयचंद पटणी, पूनमचंदजी शहा, मोहनलालजी साखला परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. जैन सेवा संघाचे अध्यक्ष पवन पटणी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिलीप पहाडे यांनी मनोगत व्यक्त केले. समारोहाचे संचलन राजेंद्र पहाडे, जयेश शहा, ललित मोदी यांनी केले. सुमित पटवा यांनी आभार मानले.

पार्किंगचे चोख नियोजन

शहराच्या विविध भागातून भाविक शोभायात्रेसाठी येत असल्याने अन्यत्र कुठे पार्किंग करून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी सर्व भाविकांना आपली वाहने चोपडा लॉन येथे पार्क केली होती. तेथून भाविकांना शोभायात्रेसाठी ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा मार्गावर विविध संस्थांनी जलपानाची व्यवस्था केली होती. त्यामुळे रस्त्यावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी जे. एस.जी. प्लॅटिनम ग्रुपने पुढाकार घेतला. हा कचरा घंटागाडीत जमा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभ असूनही मिळेना पाणी

$
0
0

सातपूरला पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने सातपूर भागातील अशोकनगर येथील राधाकृष्णनगर भागात नवीन पाण्याचा जलकुंभ उभारला आहे. परंतु, नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभाच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीत मुबलक पाणीपुरवठा केला जात नसल्याचा महिलांनी आरोप केला आहे.

अनेकदा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला तक्रारी करूनदेखील असमतोल पाणीपुरवठा केला जात असल्याचेही या महिलांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका माधुरी बोलकर, नगरसेविका पल्लवी पाटील यांनी वेळोवेळी राधाकृष्णनगर भागातील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे कळविले होते. याकडे मात्र महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली. या समस्येवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.

विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राधाकृष्ण नगरच्या पाणीच्या जलकुंभाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले होते. जलकुंभाचे उद्घाटन केल्यावर चक्क शेजारीच असलेल्या भागाला पाणी मिळत नसल्याने महिलांनी पाणीपुरवठा अधिकारी ए. व्ही. जाधव यांना घेराव घालत मुबलक पाणीपुरवठा मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यावर, पाणीपुरवठा अधिकारी जाधव यांनी नव्याने जलवाहिन्या टाकत मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासनही महिलांना दिले. तरी आजही सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतानादेखील अशोकनगर भागात कमी दाबाने पाणी मिळत असल्याचेही महिलांनी सांगितले आहे.

राधाकृष्णनगर भागात मुबलक पाणीपुरवठा रहिवाशांना मिळावा यासाठी नवीन पाण्याचा जलकुंभ उभारण्यात आला होता. परंतु, नवीन पाण्याचा जलकुंभ उभारूनदेखील आजही मुबलक पिण्याचे पाणी रहिवाशांना मिळत नसल्याने याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

-छाया पाटील, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिष्कीलीत’ रमले मालेगावकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील एकता सांस्कृतिक मंचच्या वतीने मराठी नववर्षारंभ व स्व. गोविंद गोरवाडकर यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी रात्री प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर व अरुण म्हात्रे यांचा मराठी कवितांवर आधारित 'मिष्किली कवितेच्या वाटेने' हा कार्यक्रम झाला. दोन्ही दिग्गज  कवींनी विविध काव्य प्रकारातील कवितांचे सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. नायगावकर यांच्या विनोदी शैलेने श्रोते हास्यरसात बुडाले होते, तर कवी म्हात्रे यांनी मराठीतील अनेक कवींच्या कविता सादर करीत रसिकांची दाद घेतली.

काव्य वाचन कार्यक्रमाप्रसंगी महापलिका आयुक्त व साहित्यिक संगीता धायगुडे व ग्रंथमित्र अजय शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुक्त धायगुडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आयुष्यात संघर्षाच्या काळात कवितेनेच जगण्याचे बळ दिले असे सांगत आपला साहित्यिक प्रवास उलगडून सांगितला. कवी म्हात्रे म्हणाले, भाऊ गोरवाडकर यांनी मालेगावच्या सांस्कृतिक वारसा जपला असून, कवितेसाठी जणू मोठे अंगणच दिले आहे. यानंतर त्यांनी ' शब्द सुरांच्या काठामधुनी वाहते गाणे' या कवितेने काव्यवाचनास सुरुवात केली. म्हात्रे यांनी यावेळी मराठीतील कवी सुरेश भट, पाडगावकर, करंदीकर, बहिणाबाई, शांता शेळके, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण करीत श्रोत्यांना अंतर्मुख केले.

कवी अशोक नायगावकर यांनी गोरवाडकर वाड्याने मराठीपण जपले आहे याचे समाधान वाटते अशा भावना व्यक्त केल्या. काव्य सादरीकरणात त्यांनी सध्याची सामाजिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थिती याविषयी अत्यंत मार्मिक व मिश्कील शब्दात भाष्य करीत श्रोत्यांना हसवत विचार करण्यास भाग पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांना बरोबर नेणारा खरा राजकारणी

$
0
0

व्याख्यानमालेत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जो सर्वांना बरोबर घेतो तोच खरा राजकारणी असतो. राज्यात राजकारणाची दिशा ठरवताना सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. पण, तसे होताना आज दिसत नाही. सध्या तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा झाली आहे असे सांगत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आजच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व श्री जैन सेवा कार्य समितीतर्फे आयोजित तीन दिवशीय व्याख्यानमालेल पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा या विषयावर बोलत होते. त्यांनी यावेळी या व्याख्यानात काही किस्से व प्रसंग सांगत दिलखुलासपणे हा विषयावर आपली मते मांडली. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात त्यांचे पहिलेच पुष्प असल्यामुळे या व्याख्यानमालेची सुरुवातही उत्साहात झाली. गुरुवारी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचे तर शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आहे.

जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्याध्यक्ष प्रविण खाबिया, जैन सेवा कार्य समितीचे अध्यक्ष सुनिल बुरड, संजोजक गौतम सुराणा यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिडकाव्याने तजेला...

$
0
0

शिडकाव्याने तजेला...

शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. परिणामी वाढता दाह शमविण्यासाठी पोषक फळे, कंदमुळांना मागणी वाढली आहे. मात्र, अशी फळेदेखील उन्हामुळे कोमेजून जात असल्याने विक्रेत्यांना त्यांचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी असा पाण्याचा शिडकावा मारावा लागत आहे.

पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चामरलेणी येथे पाळणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकल जैन समाज मेरी-म्हसरूळतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले. श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ येथे सकाळी ६.३० वाजता विजयकुमार लोहाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन समारोहाची सुरुवात झाली. त्यानंतर बँडसोबत धूमधडाक्यात शोभायात्रेस प्रारंभ झाला.

शोभायात्रेत भगवंतांचे मातापिता होण्याचा मान श्री. व सौ. वायकोस तथा सौधर्म इंद्र होण्याचा मान जयंचद पाटणी परिवार यांना मिळाला. शोभायात्रेच्या अग्रभागी कुंभकलश घेऊन चंचला झांजरी, योगिता झांजरी व स्विटी झांजरी सहभागी झाल्या होत्या. म्हसरूळ जैन मंदिर येथून शोभायात्रा सुरू होऊन दिंडोरीरोडवरून आकाश पेट्रोलपंपामार्गे जैन स्थानक येथे पोहोचली. तेथे श्री संघ मेरी-म्हसरूळतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गजपंथ सोसायटीमार्गे जैन मंदिर गजपंथ येथे शोभायात्रेचा समारोप झाला. महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, पूनम धनगर यांनी गजपंथ सोसायटी येथे शोभायात्रेचे स्वागत केले. त्यानंतर तेथे भगवंतांचा अभिषेक झाला. आचार्य श्री समतासागरजी महाराज यांचे प्रवचन झाले.

सायंकाळी ७ वाजता गजपंथ जैन मंदिर येथे भगवंतांच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अहमदनगरच्या गायिका पल्लवी जैन यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. महावीर भगवंतांच्या जीवनावर आधारित नाटिकाही झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विजयकुमार कासलीवाल, जयप्रकाश अचलिया, कांतिलाल अलिझाड, सुवर्णा काले, अशोक पाटणी, भागचंद पारख, सुनील कासलीवाल, रवींद्र पाटील आदींनी प्रयत्न केले. शोभायात्रेत अभय सुराणा, सुनील ललवाणी, संतोष कोटे आदींसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाडला सर्वधर्मीयांचा सहभाग

$
0
0

निफाडला सर्वधर्मीयांचा सहभाग

निफाड : येथे शोभायात्रा, प्रतिमापूजनासह विविध कार्यक्रम झाले. जैन स्थानकापासून सुरू झालेल्या शोभायात्रेत जैनसमाजबांधवांसह निफाडचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, जावेद शेख, तसेच संजय कुंदे, मधुकर शेलार असिफ पठाण आदी सहभागी झाले होते. सजवलेल्या रथात भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. चाँदनी चौकात मुस्लिम बांधवांनी या शोभयात्रेचे स्वागत करून जैनबांधवांना आइस्क्रीम वाटप केले नगरसेवक जावेद शेख, इरफान सय्यद, असिफ पठाण आदी उपस्थित होते. शोभायात्रा शिवाजी चौकात आल्यानंतर वंदे मातरम ग्रुपने स्वागत करून जैनबांधवांना ताकवाटप केले. विक्रम रंधवे , सुमित जाधव ,सचिन निकाळे ,सचिन चव्हाण, प्रतीक बाफना आदी उपस्थित होते. नंतर जैन स्थानकात मुख्य कार्यक्रम झाला. नंदलाल चोरडिया, नंदलाल बाफना, राजेंद्र राठी, ब्रिजलाल भुतडा, दिनेश बागमार, मोतीलाल चोरडिया, सुगनचंद रुणवाल, अभय सुराणा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील एकमेव ‘गरूड हनुमंत’

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : हनुमंताची मूर्ती नेहमी, दास हनुमान किंवा छाती फाडून राम-लक्ष्मण-सीता दर्शविणारा हनुमान अशी असते. परंतु, कधी गरूड हनुमानाची मूर्ती पाहिलीय? नाशिकला कपालेश्वर भगवानांच्या मागे, मुठे गल्लीमध्ये कपिकूल सिद्धपीठात वैनतेय हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. विशेष म्हणजे ही अत्यंत दुर्मिळ असून देशभरात कुठेही अशी मूर्ती पहायला मिळत नाही, असा दावा केला जातो.

श्री गरुड व हनुमान एकाच मूर्तीत असलेले हे हनुमंताचे दुर्मिळ स्वरूप आहे. ही मूर्ती सातशे ते आठशे वर्षांपूर्वीची असून वालुकामय दगडाची ही मूर्ती वज्रलेप करून अधिक सुबक, सुंदर व भक्कम करून घेण्यात आली आहे. हनुमंताच्या खांद्यावर गरुडाचे पंख असून, पाठीवरून वर पुच्छ आलेले आहे. नाक गरुडाचे व मुख हनुमंताचे आहे. मस्तकी तपस्वीसारख्या शिखा आहेत. हातामध्ये गदा नसून कमळाचे फुल आहे. शस्त्राशिवाय हनुमंत हे रूपच अनोखे आहे.

विठ्ठलाच्या प्राचीन आरतीत, 'गरूड हनुमंत, पुढे उभे राहती' असा उल्लेख आढळतो. त्याप्रमाणे गरूड हनुमान इथे उभे आहेत. या अतीजीर्ण झालेल्या मंदिराचा व प्राचीन संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे.

मूर्तीपुढे संजीवन समाधी

वैनतेय हनुमानाच्या या मूर्तीपुढे एक प्राचीन संजीवन समाधीही आहे. ही समाधी अत्यंत जीर्ण अवस्थेत आढळल्याने तिचाही जीर्णेाध्दार करण्यात आला. या समाधीची रोज पूजा करण्यात येते, असे एका नाथपंथीय साधूने सांगितले.

श्री कपिकूल म्हणजे कपींचे कुळ, हनुमंताचे कूळ आहे. कलियुगात हनुमान उपासनेचे फार महत्व आहे. भक्तांना अनेक संकटांतून मुक्ती देणारे हे जागृत स्वरूप आहे.

-महंत वेणाभारती महाराज, कपिकूल सिद्धपीठम

या दुर्मिळ हनुमान स्वरूपाची नित्य सेवा, पूजा करण्याचे भाग्य आम्हास लाभले. यासाठी आम्ही परमेश्वराचे कृतज्ञ आहोत. जगामध्ये एका पुराणप्रसिद्ध हनुमान व समाधीची पूजा श्रीगुरूंच्या कृपेमुळे करायला मिळतेय.

-कृष्णमै, उत्तराधिकारी, कपिकूल सिद्धपीठम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली गाव मारुती

कार अपघातात मायलेकासह तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बायपासलगत गुरेवाडी फाट्याजवळ गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या कार अपघातात नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले. मृतांमध्ये जितू राम अमेसर (चालक, वय २५), त्याची आई सीमा राम अमेसर (४५) या मायलेकासह वर्षा जगदीश अमेसर (४०) यांचा समावेश आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

जेलरोड, नाशिकरोड येथील जितू अमेसर व कुटुंबीय टाटा मांझा कारने (एमएच ०४, ईएक्स ८६३२) शिर्डीकडे निघाले होते. सिन्नरजवळ आल्यानंतर रस्ता चुकून बायपासने संगमनेरच्या दिशेने जात असताना गुरेवाडीजवळ चालक जितू अमेसर याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती, की तीन ते चार गिरक्या घेऊन कार शेतात कोसळली. त्यात कारचा चुराडा झाला, तर कारचालक सुमारे ३०० ते ४०० फूट लांब फेकला गेला. अपघातात चालक जितू अमेसरसह त्याची आई सीमा अमेसर व चुलती वर्षा अमेसर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखूमुक्त अभियानाचा प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून, हे लोण लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. त्यामुळे कर्करोग फोफावत असून, यावर मात करण्यासाठी 'जॉइन द चेंज' या चळवळीची सुरुवात झाली आहे. नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था यात सहभागी झाल्या असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले.

पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या कल्पनेतून, एचसीजी मानवता हॉस्पिटलच्या सहकार्यातून व विविध संथांच्या पुढाकाराने 'जॉइन द चेंज' तंबाखूमुक्त नाशिक या जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. 'जॉइन द चेंज' अभियानाच्या बोधचिन्हाचे व फेसबुक पेजचे अनावरण या वेळी झाले. सिंगल म्हणाले, की भारतात तंबाखूविरोधात २००३ मध्ये कायदा आला तरी त्या संदर्भात जाणीव, तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. तंबाखूच्या निर्मूलनासाठी सामाजिक समर्थनाची नितांत गरज आहे. निव्वळ कायदे करून प्रश्न सुटणार नाही, तर समाजातील घटकाने याची जाणीव ठेवून दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ज्या तंबाखूजुन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, त्यावर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

एचसीजी मानवता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की शहराचे आरोग्य व कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी या अभियानाची सुरुवात झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले, की जगातील सर्वांत जास्त कर्करुग्ण भारतात आढळतात. हा देश तरुणांचा आहे. ही देशाची शक्ती निरोगी ठेवायची असेल तर तरुणांना व्यसनांपासून सावरण्याची गरज आहे.

महापालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी म्हणाले, की तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूला जागतिक समस्या घोषित केले आहे. अशा परिस्थितीत तंबाखूपासून दूर राहणे गरजेचे आहे. जनजागृतीविषयी आपल्या कल्पना मांडल्या. फ्रवशी अकादमीचे संचालक रतन लथ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम महिलांचा आज एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिहेरी तलाकबाबत प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी शरियत बचाव कमिटीच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजता मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चात हजारो मुस्लिम महिला सहभागी होणार असून, मोर्चानंतर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. बडी दर्गा ते ईदगाह मैदान असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.

केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेला तिहेरी तलाक कायदा लवकरच राज्यसभेत सादर होणार आहे. कायद्यातील बहुतांश तरतुदी चुकीच्या असून, मुस्लिम समाजाच्या धारणेविरोधात असल्याने यास विरोध करण्यासाठी शरियत बचाव कमिटीने मोर्चाचे आयोजन केले असल्याचे शरियत बचाव कमिटीचे अध्यक्ष, तसेच खतीब-ए-शहर हाफिझ हिसामुद्दीन खतीब यांनी सांगितले. खतिब यांनी स्पष्ट केले, की प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असून, तलाक हा वैवाहिक स्वरूपाचा, तसेच पूर्णपणे दिवाणी वाद आहे. भारतात कोणत्याही धर्मात घटस्फोटासाठी शिक्षेची तरतूद नाही. फक्त मुस्लिमांनी तलाक दिल्यास त्यास शिक्षेची तरतूद का? समान नागरी कायद्याच्या दिशेने प्रयत्न करणारे सरकार इतर नागरिकांसाठी शिक्षेची तरतूद करणार काय, असा प्रश्न खतीब यांनी उपस्थित केला. वास्तविक मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार असून, नवीन कायद्याची आवश्यकता नाही. बिल तीनप्रमाणे तिहेरी तलाक अवैध असून, कायद्याप्रमाणे तलाकच होत नाही. मग बिल ४ प्रमाणे तलाक देणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा कशी होऊ शकते? कलम तीनप्रमाणे तलाक घडत नाही, तरीही पुरुषास कलम ४ व ७ नुसार तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कलम पाचप्रमाणे पुरुषास पोटगी द्यावी लागणार आहे. तुरुंगात असलेली व्यक्ती पोटगी कशी देऊ शकते? कलम ४९३ ते ४९८ मध्ये लग्नासंबंधी तरतुदी असून, हे सर्व गुन्हे अदखलपात्र आहेत. वॉरंटशिवाय संशयितांना अटक होऊ शकत नाही. मात्र, तलाक बिलाच्या कलम सातप्रमाणे तलाक देणे दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून, तिसऱ्या व्यक्तीने तक्रार दिल्यास गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. याचा गैरवापर होऊ शकतो. त्यातून नवरा-बायकोतील वाद विकोपाला जाऊ शकतो. मुळात इतर धर्मांच्या तुलनेत मुस्लिम धर्मात घटस्फोटांचे प्रमाण कमी असून, तसेच शिक्षा देऊन घटस्फोटांचे प्रमाण कमी होणार असेल, तर इतर धर्मीयांसाठीही शिक्षेचे तरतूद करावी, अशी मागणी शरियत बचाव कमिटीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीने लांघल्या धर्माच्या भिंती

$
0
0

लोगो - हनुमान जयंती विशेष

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet- @SanchetigMt

नाशिक : श्रद्धा आणि भक्तीला जाती-धर्माचे बंधन नसते, हे सातपूरच्या मेहमूद शेख या हनुमानभक्ताने दाखवून दिले आहे. कृषीनगर येथील जॉगिंग पार्कसमोर २५ वर्षांहून अधिक काळ गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या शेख यांची हनुमानावर श्रद्धा आहे. दररोज आपल्या व्यवसायाला सुरुवात करण्याअगोदर ते आधी हनुमानाची मनोभावे पूजा करतात. त्यानंतर त्यांचे काम सुरू होते.

सातपूरच्या स्वारबाबानगरमध्ये राहात असलेले मेहमूद शेख हे कृषीनगरमध्ये व्यवसायनिमित्त आले. तेथेच त्यांनी आपले गॅरेज टाकले. त्यानंतर गॅरेजशेजारी असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतानाच त्यांनी तेथे हनुमानाची प्रतिमा लावली. त्यानंतर हळूहळू या झाडाच्या खोडाच्या कपारीत अनेक हिंदू देवी-देवतांनी जागा घेतली. या भक्तीतून घरातही चांगले वातावरण निर्माण झाले. त्यातून आनंदही मिळू लागला. त्यामुळे रोज न चुकता गॅरेजच्या परिसराची साफसफाई केल्यानंतर देवांची हार व फुले अर्पण करून पूजा केल्यानंतरच ते व्यवसायाला सुरुवात करतात. विशेष म्हणजे त्यांच्या या देव्हाऱ्यात २४ तास दिवा तेवत असतो. याबाबत ते काळजी घेतात.

नमाज अन् रोजेही

धर्म कोणताही असला तरी त्यात भक्ती ही महत्त्वाची असते. त्यामुळे मेहमूद शेख यांची भक्ती अनेक ग्राहकांना सुरुवातीला आश्चर्यचा धक्का देते. त्यातून मग ते त्यामागील आनंद सांगत आपले कामही सहज उरकतात. दुचाकी वाहनांची दुरुस्ती करताना त्यांचे कौशल्य कारागिरीतून दिसते. पण, त्यांची भक्ती सर्वांच्या स्मरणात राहते. हनुमान भक्त असलेले शेख नमाज व रोजाही तितक्याच आत्मियतेने व नियमित करतात. पण, व्यवसायाचा दिनक्रम मात्र हनुमाच्या पूजेने सुरू होतो. शक्ती व युक्तीचा देव असलेल्या हनुमानाची भुरळ सर्वांनाच असते. तशीच ती शेख यांनाही पडली आहे. हनुमानाप्रमाणेच हा ४० वर्षीय भक्तही अविवाहीत आहे. शेख दर शनिवारी हनुमानाची नारळ वाढवून मंदिरातही पूजा करतात. साईबाबा, गणपती मंदिरातही ते दर्शनाला जातात. त्यांची ही भक्ती एकात्मेचे दर्शनही देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करभरणा

$
0
0

करदात्यांना

आरबीआयचा दिलासा

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

सरकारी करभरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी आज, ३१ मार्च रोजी बॅंका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत. त्यामुळे सामान्य करदात्यांसह उद्योग व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. एक एप्रिल रोजी सुरू झालेले आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी पूर्ण होते. या दिवशी आर्थिक कामकाजाचा ताळेबंद पूर्ण करून करभरणाही केला जातो. शेवटचा दिवस असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. याशिवाय बॅंकांमध्येही गर्दी उसळते. मात्र, बॅंकांच्या कामकाजाच्या वेळेनंतर नागरिकांना करभरणा करता येत नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ३१ मार्च रोजी सरकारी करभरणा करण्यासाठी बॅंकेच्या शाखा रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीत रंगत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, या निवडणुकीला आता रंगत आली आहे. मनसेच्या वतीने अॅड. वैशाली भोसले रिंगणात असून, शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण आणि भाजपच्या विजया लोणारी यांच्याशी त्यांचा सामना आहे. मनसेच्या बाजूने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकसंघ उभी राहिली असून, भाजपच्या दोन आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. शिवसेनेच्या दोन महानगरप्रमुखांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्याकडूनही चमत्काराची अपेक्षा केली जात आहे.

प्रभाग १३ मधील मनसेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेवर येत्या ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत मनसे, भाजप आणि शिवसेनेत आहे. मनसेच्या वतीने सुरेखा भोसले यांच्या स्नुषा अॅड. वैशाली भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने माजी शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण यांच्या कन्या डॉ. स्नेहल चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. भाजपनेही विजया लोणारी यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे. या तीन मुख्य उमेदवारांमध्येच लढत होत असून, सध्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर धरला आहे. मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने मनसेची ताकद वाढली आहे. मनसेच्या उमेदवारासाठी माजी आमदार नितीन भोसलेंसह काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे व महिला काँग्रेस अध्यक्षा वत्सला खैरे, तसेच राष्टवादीचे गटनेते गजानन शेलार प्रचारात सक्रिय निवडणुकीतल्या आघाडीप्रमाणे प्रचार करीत आहेत. अॅड. वैशाली भोसले यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे, तर भाजपनेही लोणारी यांच्या प्रचारासाठी नगरसेवकांची फौज उतरवली आहे. भाजपच्या ६६ नगरसेवकांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले असले, तरी नगसेवकांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनेच्या उमेदवार डॉ. स्नेहल चव्हाण यांनीही घरोघरी प्रचार सुरू केला असून, विनायक पांडे आणि संजय चव्हाण यांनीच निवडणूक हातात घेतली आहे. पांडे यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत भरली आहे.

दरम्यान, प्रभाग १३ मधील अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. घोडके यांनी शिवसेनेच्या कार्यालयात शुक्रवारी चव्हाण यांना पाठिंबा जाहीर करीत शिवसेनेतही अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेचे बळ या निवडणुकीत वाढले आहे. यावेळी महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, माजी महापौर विनायक पांडे, संजय चव्हाण, रवींद्र जाधव उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा दावा बडवे, मराठे यांनी केला आहे.

शिवसेनेचे नेते गायब

प्रभागाच्या निवडणुकीत एकीकडे मनसे आणि भाजपने आपली सर्व फौज रिंगणात उतरवली असताना शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे बड्या नेत्यांनी पाठ फिरविली आहे. अॅड. शिवाजी सहाणेंच्या हकालपट्टीमुळे शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून, पदाधिकारी प्रचाराकडे फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांचेही मनोबल घटत चालले आहे. स्थानिक नेत्यांमधील वादामुळे मध्य विधानसभा संपर्कप्रमुखांना प्रचार फेरी न करताच परतावे लागल्याची चर्चा आहे. खासदार हेमंत गोडसेंच्या उपस्थितीत होणाऱ्या रॅलीकडेच खासदाराने पाठ फिरविल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नात्यागोत्यांच्या राजकारणामुळे वरिष्ठ नेते फिरकत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पांडे आणि चव्हाण यांनाच निवडणुकीचा भार उचलावा लागत आहे.

(लोगो : निष्पक्ष)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीला हजारोंची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून, ११ हजार ९३१ पुरुष उमेदवार मैदानी चाचणीला सामोरे गेले. मात्र, तब्बल पाच हजार ९४ उमेदवारांनी या चाचणीकडे पाठ फिरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा ग्रामीण पोलिस दलातर्फे दि. १२ मार्चपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याकरिता पुरुष उमेदवार, खेळाडू, माजी सैनिक अशा एकूण १७ हजार २५ उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ हजार ९३१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी मैदानावर उपस्थित होते. ५ हजार ९४ उमेदवारांनी दांडी मारली. ११७३ उमेदवार छाती आणि उंचीमध्ये अपात्र ठरले असून, आठ उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. महिला उमेदवारांची मैदानी आणि शारीरिक चाचणी आडगाव येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू झाली आहे. २ एप्रिलपर्यंत ही चाचणी सुरू राहणार असून, दररोज १२०० उमेदवारांना पाचारण करण्यात आले आहे. भरतीप्रक्रियेचे संपूर्ण नियंत्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. कोणत्याही उमेदवाराने आमिषांना बळी पडू नये. भरतीदरम्यान कोणीही अनुचित प्रकार करताना आढळल्यास भरतीप्रक्रियेतून बाद करीत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण काढताना अडथळा; चौघांवर अदखलपात्र गुन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

महापालिकेतर्फे गत पंधरा दिवसांपासून शहर परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी अशोका मार्ग परिसरात ही मोहीम राबवीत असताना चार विक्रेत्यांनी विरोध केला असता महापालिकेने या चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू झाल्यापासून शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. हॉकर्स झोनबाबतही अधिकाऱ्यांनी ताकीद दिल्याने सर्वच विभागांत मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पूर्व विभागाच्या वतीने अशोका मार्ग, नारायणनगर येथे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी संदीप मिसाळ, विकी कुमावत, धर्मा आल्हाट व पप्पू अग्रवाल या चार विक्रेत्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण तर काढेलच, परंतु या चौघांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हाही दाखल केला.  आता अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविल्यास थेट पोलिस ठाण्याचीच पायरी चढावी लागणार असल्याने यावेळी उर्वरित बऱ्याच अतिक्रमित नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेतले. विभागीय अधिकारी जे. डी. सोनवणे, अतिक्रमण विभागाचे शिवाजी काळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया ‘आयपीएस’ला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओला कंपनीच्या कारचालकासह नाशिकमधील काही हॉटेल व्यावसायिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अमित अंबिका सिंग (वय २५, रा. मुलूंड, मुंबई) असे त्याचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

सिंग बनाबनवी करीत असल्याचा संशय आल्यानंतर ओला कंपनीच्या कारचालकाने त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचा खोटेपणा उघड झाला. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबईचा राहणारा असल्याने त्याने तेथेही काही हॉटेल व्यावसायिकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांचे पथक त्याला सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. सिंगविरोधात मुंबई नाका पोलिसांनीही एसएसके हॉटेलची ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई नाका पोलिसही त्याला ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images