Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विम्याचे सव्वाआठ लाख देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघात झालेल्या वाहनावर शिकाऊ ड्रायव्हर असल्याचे कारण देत विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका देत वाहनधारकाला विम्याचे ८ लाख २० हजार रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कंपनीला १५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यात शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च पाच हजाराचा समावेश आहे.

दिंडोरी तालुक्यातील वणी येथे राहणाऱ्या अजय बाळू सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. या तक्रारीत सावंत यांनी म्हटले आहे की, आपणाकडे व्हेर्ना कार आहे. त्याचा विमा काढलेला होता. सदर वाहन भाचा साहिल जावरे याला दिले होते. तो वणी येथे मित्रांसोबत जाताना कारचा खांडे मळ्याजवळ अपघात झाला. कार झाडाला आदळून पलटी झाली. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रीतसर विम्यासाठी दावा दाखल केला. पण, अॅश्युरन्स कंपनीने भाचा साहिल याच्याकडे योग्य व वैध वाहन चालविण्याचा परवाना नाही म्हणून दावा नाकारला.

या तक्रारीवर न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने दावा नाकारण्याचे कारण सांगताना म्हटले की, साहील जावरे यांच्याकडे कार चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना त्याच्याकडे कार सुपूर्द केली. त्यामुळे अटी व शर्तींचा भंग झाला आहे. जावरे यांच्याकडे एलएमव्ही ट्रॅक्टर चालविण्याचा शिकाऊ परवाना होता. अपघात झाला त्यावेळी त्याने वाहनावर एल हे अक्षर लावले नव्हते. तोदेखील अटी व शर्तीचा भंग असल्याचे म्हटले.

सेवेतील कमतरतेचा ठपका

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने निर्णय दिला. त्यात साहील जावरे याच्याकडे एलएमव्ही ट्रॅक्टर व कारचे दोन्हीही शिकाऊ परवाने होते. त्याच्याशेजारी त्याचा मित्र इम्रान शेख सलीम हा पर्मनंट लायसन्स असलेला चालक बसला होता. एल अक्षरांचे स्टिकर लावले नाही असे कंपनीने सांगितले असले तरी त्यामुळे अपघात झाला, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे कोणतेही योग्य कारण नसताना दावा नाकारलेला आहे. ही बाब सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने वाहन मालक अजय बाळु सावंत यांना व्याजासह विमा दाव्याची रक्कम ८ लाख २० हजार द्यावी. त्याचप्रमाणे १५ हजाराचा दंडही द्यावा. हा निर्णय न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी यांनी दिला. सावंत यांच्याकडून अॅड. एच. आर. पाटील यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

देवळाली कॅम्प : येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील शालेय विद्यार्थी सचिन मधुकर पाळदे (वय १४) याने रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी आहे. घरात शिकवणीसाठी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. लालपूल परिसरात त्याने मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. यावेळी येथून जाणाऱ्या एक नागरिकाने देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्याच्या पश्च्यात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावकरांनी दिला एकतेचा संदेश

$
0
0

नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे आयोजित 'रन फॉर युनिटी' ला प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'आओ सब दौड ले, दिल को दिलसे जोड ले' असा नारा देत रविवारी (दि. ११) हजारो मालेगावकर 'रन फॉर युनिटी मालेगाव मॅरेथॉन २०१८' मध्ये धावले.

नाशिक ग्रामीण पोलिस दल व शांतता समितीच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याला मालेगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. भल्या पहाटे शहरातील अबालवृद्धांनी मॅरेथॉनमध्ये धावत एकतेचा संदेश दिला. शहरात प्रथमच अशा भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी येथील पोलिस दल तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ५ हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली होती. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शनिवारी (दि. १०) सायंकाळी 'आओ और गावो' हा गीतगायन कार्यक्रमदेखील घेण्यात आला.

तीन, पाच व दहा किमी. अशा तीन गटांत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. शहरातील एकात्मता चौक पोलिस परेड मैदानपासून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. प्रारंभी दहानंतर पाच व तीन किमीची मॅरेथॉनला फ्लॅग दाखवण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, आर्यन मॅन सुमेध वाव्हळ आदी मान्यवरांनी मॅरेथॉनला फ्लॅग दाखवत शुभारंभ केला.

मान्यवरांनी धरला ठेका

शहरातील एकात्मता चौकापासून मोसमपूल, शिवाजी पुतळा, नवीन बसस्थानक, फरान हॉस्पिटल ते परत एकात्मता चौक अशा मार्गाने स्पर्धक उत्साहाने धावले. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जागोगाजी ढोलताशा पथक, देशभक्तीपर गीते वाजविण्यात येत होती. तसेच विविध सामाजिक संस्थाकडून पाणी, ज्यूस, चॉकलेट आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. विविध गटांत धावण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अनेकांनी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतल्याने थकले तरीदेखील एकतेसाठी धावायचे आहे, असा उत्साह स्पर्धकामध्ये दिसून येत होता. या वेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णनदेखील उपस्थित राहिले. नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने शहराच्या एकात्मतेसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्तुत्य उपक्रम असून, शहरवासियांनी दिलाला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी गाण्यांवर ठेका धरला तर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

'आय एम फिनिशर!'साठी गर्दी

मॅरेथॉनच्या समारोपप्रसंगी पोलिस परेड मैदानावर शहरातील विविध कलावंतानी आपले नृत्य , गायन सादर करून सहभागी झालेल्यांना प्रोत्साहित केले. आपण धावलो...आणि शर्यत पूर्ण केली याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. सहभागी झालेल्या प्रत्येकाला मेडल देण्यात आल्याने 'आय एम फिनिशर' या पॉडेमवर सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. भल्या पहाटे 'रन फॉर युनिटी'साठी शहरातील विविध मान्यवरदेखील धावले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राजमाने, अजित हगवणे, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत उत्साह दाखवला.

ज्येष्ठ नागरिकांनी वेधले लक्ष

या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक गटात ८२ वर्षीय बी. के. देवरे हे सर्वाधिक वयस्कर धावपटू होते. तसेच अण्णा कापडणीस (वय ७०) यांनी ज्येष्ठ नागरिक गटात १० किमी मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यासह वैशाली शेलार, डॉ. असिफा शेख, अफरोज शेख, मालेगावचा आंतरराष्ट्रीय धावपटू भिकू खैरनार यांनी लक्ष वेधून घेतले. मुस्लिम महिलांचादेखील सहभाग लक्षणीय ठरला.

मॅरेथॉनचा निकाल पुढीलप्रमाणे...

..दहा किलोमीटर..

(३६ ते ४५ वयोगट, पुरुष) - भिक्कू खैरनार (प्रथम), डॉ. विनीत देवरे (द्वितीय), पंकज पहाडे ( तृतीय)

(३६ ते ४५ वयोगट, महिला) - वैशाली शेलार (प्रथम), निरुपमा कासलीवाल (द्वितीय), स्वाती वाघ (तृतीय)

...........................................

(४६ ते ५५ वयोगट, पुरुष) - राजेश दुग्गड(प्रथम), रवी शेलार(द्वितीय), संजय पवार(तृतीय)

(४६ ते ५५ वयोगट, महिला) - डॉ. गिता तेलरांधे (प्रथम), अर्चना डावरे (द्वितीय)

...........................................

(१८ ते २५ वयोगट, पुरुष) - हिमांशू बोरसे (प्रथम), देव पठारे (द्वितीय), अमोल महाले (तृतीय)

(१८ ते २५ वयोगट, महिला) - योगिता वाघ (प्रथम), श्रद्धा पवार(द्वितीय), सरवद्या पवार(तृतीय)

...........................................

(२६ ते ३५ वयोगट, पुरुष) - विनोद पगारे (प्रथम), शफीक शेख (द्वितीय)

(२६ ते ३५ वयोगट, महिला) - वैष्णवी राऊत (प्रथम)

...........................................

खुला गट - काशिनाथ कापडणीस (प्रथम), डॉ. विलास बागडे (द्वितीय), दादाजी भारती (तृतीय)

...........................................

पाच किलोमीटर (खुला गट, पुरुष) - मोहन शिंदे(प्रथम), द्वारकादास तापडिया (द्वितीय), शिरीष कलंत्री (तृतीय)

पाच किलोमीटर (खुला गट, महिला) - साक्षी जोहरे (प्रथम), हिराबाई आहिरे (द्वितीय), दीप्ती चिंधडे (तृतीय)

...........................................

(४६ ते ५५ वयोगट, पुरुष) - मुकेश भोये - (प्रथम), सुधाकर महाजन(द्वितीय), नरेंद्र परदेशी(तृतीय)

(४६ ते ५५ वयोगट, महिला) - दीपाली मगर (प्रथम), अंजू लोढा (द्वितीय), माधवी ओस्तवाल(तृतीय)

...........................................

(३६ ते ४५ वयोगट, पुरुष) - हरिभाऊ खैरनार (प्रथम), उत्तम मानकर (द्वितीय), बाळासाहेब जगताप(तृतीय)

(३६ ते ४५ वयोगट, महिला) - डॉ. रोहिणी पाटील(प्रथम), वैशाली खैरनार(द्वितीय)

...........................................

(२६ ते ३५ वयोगट, पुरुष) - सचिन हिरे (प्रथम), पंकज चित्ते (द्वितीय), सोमेश महाजन (तृतीय)

(२६ ते ३५ वयोगट, महिला) - परेना बाहेती (प्रथम), मधू ओस्तवाल(द्वितीय)

...........................................

तीन किलोमीटर - (पुरुष) - मोहिर मौलिक (प्रथम), गोविंद शर्मा (द्वितीय), दीपक वाघ (तृतीय), वेदांत शिरसाठ (चतुर्थ), मानव सोनवणे (पाचवा)

तीन किलोमीटर - (महिला) - नंदिनी पवार (प्रथम), ऋतविका मंडाले (तृतीय), जयश्री देवकर (चतुर्थ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडच्या रस्त्यांचा मेकओव्हर

$
0
0

शंभर कोटींच्या तरतुदीची आमदार अनिल कदम यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्याच्या अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात निफाड तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या रस्त्यांच्या मेकओव्हरसाठी तसेच इतर विकासकामांसाठी एकूण ९७ कोटी ६० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टिकचा वापर करून मालवाहतुकीस योग्य असा चौपदरीकरण रस्ता तयार करण्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील असा एकमेव रस्ता करण्यात येणार असून, इतरांसाठी हा पायलट प्रोजेक्ट ठरेल, असेही आमदार कदम यांनी सांगितले. निफाडजवळील रसलपूर शिवारात नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणीकरिता १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत-चिंचखेड चौफुली ते निफाड रस्ता, शिरवाडे-वणी, पालखेड, दावचवाडी रस्ता, कसबे सुकेणे अशा साडेबारा किलोमीटर रस्त्यांचा रुंदीकरण, डांबरीकरणासाठी ६ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती नुकतीच आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निफाड तालुक्यातील सायखेडा, शिंगवे फाटा, करंजगाव, मांजरगाव ते राज्य महामार्ग क्र. २७ या सात किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरणासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निफाड रेल्वे स्टेशन, नांदूर्डी रानवड, सावरगाव, खडकजांब रस्त्यासाठीही पाच कोटींची तरतूद केली असून, यासह विविध रस्ते, पूल तसेच इतर विकासकामांसाठीही भरीव निधी दिल्याचे आमदार कदम म्हणाले. पत्रकार परिषदेप्रसंगी निफाडचे नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, संजय कुंदे, मोतीराम मोगल, कोठुरेचे सरपंच आशिष मोगल, सुधीर शिंदे, अतुल शिंदे, बाजीराव मोगल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीमुळे २३ संचालकांचे पद रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील २० विकास सोसायट्यांच्या ६८ थकबाकीदार संचालकांपैकी ४५ थकबाकीदार संचालकांची ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपयांच्या थकबाकीची वसुली जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. मात्र, उर्वरित विकास सोसायट्यांच्या २३ थकबाकीदार संचालकांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देवळा येथील सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी दिली.

देवळा तालुक्यातील २० विकास सोसायट्यांचे ६८ विद्यमान संचालक मार्च २०१७ ला थकबाकीदार होते. त्यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सहकार कायद्याच्या नियमानुसार तीन नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी होऊन त्यातील ४५ संचालकांनी थकबाकीची रक्कम ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये जिल्हा बँकेत भरणा केली असून, उर्वरित २३ संचालकांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला असतानाही त्यांनी थकबाकी न भरल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी यावेळी सांगितले.

संचालकपद रद्द झालेल्या विकास सोसायट्या व संचालक

गुंजाळनगर (२), विठेवाडी (१), देवळा आदिवासी (२), देवपूरपाडे (१), लोहोणेर (१), शेरी (२), खामखेडा (१), सरस्वतीवाडी (१), भिलवाड (३), वाजगाव (२), कुंभार्डे (१), तिसगाव (१), न्यू वासोळ (१), सांगवी (१), डॉ. जे. डी. पवार भऊर (१), महात्मा फुलेनगर (२) आदी सोसायट्यांच्या संचालकांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीही वादात!

$
0
0

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या भरतीवर विश्वस्तांचा आक्षेप

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टची नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता असून, मुलाखती घेताना विश्वस्त मंडळाला डावलल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुलाखती घेण्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांना बोलावणार नसाल, तर शासन नियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांनीच कारभार चालवायला पाहिजे. अन्यथा, विश्वस्तांना केवळ नामधारी करण्याचा हा प्रयत्न बंद करावा, अशी मागणी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल केली आहे.

देवस्थान ट्रस्टने काही दिवसांपूर्वी नेटवर्क ऑपरेटर आणि स्वॉफ्टवेअर इंजिनीअर अशा दोन जागा भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. तसा ठराव विश्वस्तांच्या बैठकीत करण्यात आला होता. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र त्याची कल्पना चेअरमन, सचिव आणि एक विश्वस्त या व्यतिरिक्त उर्वरित पाच विश्वस्तांना देण्यात आली नाही. याबाबत काही विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज किती आले व मुलाखतीसाठी त्यांची छाननी कशा प्रकारे करण्यात आली. प्रत्यक्ष मुलाखती घेताना सर्व विश्वस्तांना का सामावून घेण्यात आले नाही. याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारात गैरव्यवहार घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी रविवारी झालेल्या मुलाखतींबाबत हरकत घेऊन नियुक्तीपत्र देण्यात येणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. मुलाखती घेण्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांना बोलावणार नसाल, तर शासन नियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांनीच कारभार चालवायला पाहिजे. अन्यथा, विश्वस्तांना केवळ नामधारी करण्याचा हा प्रयत्न बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरिकांमध्येही नाराजी

रविवारी शहरातील नागरिकांमध्ये देखील याबाबत नोकरभरतीबाबत नाराजी होती. नोकरी देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून येथे नागरिकांना काही बाबतीत नेहमीच गैरसोय सहन करावी लागते. येथे व्यवसायासाठी अन्य साधने नाहीत. किमान सुशिक्षित बेरोजगार तरुणांना येथे नोकरी मिळाली पाहिजे अशी रास्त अपेक्षा येथे व्यक्त होत असते.

मुलाखती घेण्यासाठी निवड करताना सहा विश्वस्तांना विचारात घेतलेले नाही. याबाबत काही समिती तयार करण्यात आली नाही आणि असेल तर आम्हाला त्याबाबत कल्पना देण्यात आली नाही. विश्वस्त मंडळातील सदस्यांना डावलून निर्णय घेतले जातात. त्यामुळे या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याबाबत संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.

- सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

अध्यक्षांनी समितीची निवड केलेली होती. अध्यक्ष, सचिव आणि एक विश्वस्त यांनी मुलाखत घेऊन कागदपत्र पाहणी केली आहे. सर्व कामकाज नियमाप्रमाणे झालेले आहे.

- डॉ चेतना केरूरे, सचिव, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोक्याचा गळफास; बालिकेचा मृत्यू

$
0
0

सिडको : चुंचाळे शिवारातील जाधव टाऊनशिप येथे घरात झोका खेळताना गळफास बसल्याने तितिक्षा किरण राऊळ या दहा वर्षीय बालिकेचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. झोका खेळताना तोल गेल्याने तितिक्षाला झोक्याचा गळफास बसला. हा प्रकार वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तितिक्षाला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारकीचे ‘ऑनलाइन’ डोहाळे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

विधानसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपलेल्या असताना सिडकोतील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी 'नाशिक पश्चिमचा आमदार कोण?' या मथळ्याखाली ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. सध्या तरी यात तीनच इच्छुकांची नावे टाकण्यात आली असली, तरी वर्षभर आधीच हे सर्वेक्षण सुरू झाल्याने आमदारकीची लगीनघाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने एकप्रकारे प्रचारालाच सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातील नाशिक पश्चिम हा मतदार संघ सिडको, सातपूर व इंदिरानगरचा काही भाग मिळून तयार झालेला आहे. विधानसभेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच काहीजणांनी तिकिटासाठी फिल्डिंग लावण्याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करून सर्वेक्षण व प्रचारालाही सुरुवात केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर 'नाशिक पश्चिमचा आमदार कोण?' या शीर्षकाखाली एक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात विद्यमान आमदारांसह अन्य दोन इच्छुकांची नावे टाकण्यात आली असून, यापैकी नाशिक पश्चिमचा आमदार कोण यावर ऑनलाइन मते नोंदविण्यात येत आहेत. या सर्वेक्षणाची चर्चा आता संपूर्ण सिडको परिसरात सुरू झाली आहे. निवडणुकांना अजून बराच अवधी असताना अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू झाल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. अशा प्रकारचे सर्वेक्षण करूनच अनेकजण उमेदवारीसाठी दावा करणार असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

निवडणुकीची तारीख, त्यात होणाऱ्या आघाड्या, युत्या याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसताना अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या सर्वेक्षणात नागरिक ऑनलाइन मतदान करून व्हर्च्युअली आपला आमदार निवडणार आहेत. याला कुठलाही कायदेशीर आधार, सरकारी मान्यता नसली तरी यामुळे प्रभागातील दिग्गजांचे बळ दिसणार आहे. यात भविष्यात उमेदवारांची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. सध्या तरी सोशल मीडियावर एकाच व्यक्तीकडून हे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

कामांच्या माहितीचा प्रसार

सध्या सोशल मीडियाचा वापर राजकीय व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारचे ग्रुप तयार करून त्यावर आपली किंवा आपण केलेल्या व करणार असलेल्या कामांची माहिती पाठविण्यात येते. याचाच आधार घेऊन जनतेचा कौल घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर आपण कोणत्या पक्षाचे कोणते पदाधिकारी होणार, आपले राजकीय भवितव्य काय, आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व कोण करणार अशा पद्धतीच्या जाहिरातीही सुरू झाल्या आहेत. अनेक राजकीय नेते यात आपला सहभाग नोंदवून आपण कोण होणार, याची छबी नागरिकांसमोर उभी करताना दिसत आहेत. याचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धूरफवारणीचेही आता वेळापत्रक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोलला ऑनलाइन ट्रॅकवर आणल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत, पेस्ट कंट्रोलबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात सर्वाधिक तक्रारी पेस्ट कंट्रोलबाबत असल्याने आयुक्तांनी आरोग्य विभागाला शहरातील धूर व औषध फवारणीचे मासिक वेळापत्रकच तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने पेस्ट कंट्रोलचे मासिक वेळापत्रक तयार केले असून, ते पालिकेच्या वेबसाइटवरही टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या प्रभागात पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी कधी येणार, याची माहिती मिळणार आहे. शिवाय नागरिकांच्या मोबाइलवरही अलर्ट येणार आहे.

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असलेल्या घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोलबाबत शहरात सर्वाधिक तक्रारी आहेत. नगरसेवक आणि नागरिकांकडून या दोन विभागांच्याच तक्रारी अधिक केल्या जातात. प्रभाग सभा, आरोग्य सभा, स्थायी समिती आणि महासभेत हा विषय वारंवार गाजतो. स्थायी समितीला डावलून पेस्ट कंट्रोलचा ठेका न्यायालयाने दिग्विजय एंटरप्रायजेसला दिला आहे. तीन वर्षांसाठी १९ कोटींना हा ठेका देण्यात आला असला तरी, ठेकेदाराच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. डेंग्यू व साथीचे आजार वाढण्यास पेस्ट कंट्रोल विभागास जबाबदार धरण्यात येते. स्थायी समितीच्या सभांमध्ये सदर ठेका रद्द करण्याची मागणी वारंवार नगरसेवकांकडून केली जाते. परंतु, आरोग्य विभागाकडून ठेकेदाराला वारंवार पाठिशी घातले जात होते. मुंढे यांनी पेस्ट कंट्रोलचाही आढावा घेत तक्रारी कमी करण्यासाठी पेस्ट कंट्रोल विभागही ऑनलाइन ट्रॅकवर आणला आहे. आरोग्य विभागाला शहरातील पेस्ट कंट्रोलचे वेळापत्रक तयार करून ते दरमहा सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदार आणि आरोग्य विभागाने हे वेळापत्रक तयार केले असून, मार्च महिन्याचे पेस्ट कंट्रोलचे नियोजन हे वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत प्रत्येक प्रभागात धूर फवारणी केली जाणार आहे.

अलर्टही मिळणार

धूर फवारणीचे वेळापत्रक वेबसाइटवर असल्याने नागरिकांना व नगरसेवकांना आपल्या प्रभागात कधी धूरफवारणी होणार याची माहिती मिळणार आहे. पेस्ट कंट्रोल विभाग मनपाच्या ई-कनेक्ट अॅपशी जोडण्यात आला आहे. घंटागाडीप्रमाणेच पेस्ट कंट्रोलवर रजिस्टर केल्यास नागरिकांना आपल्या प्रभागात पेस्ट कंट्रोलचा कर्मचारी कधी येणार याचा अलर्ट मिळणार आहे. दिलेल्या वेळेत पेस्ट कंट्रोलचा कर्मचारी आला नाही तर त्याला अॅपवर तक्रार करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांना ‘अच्छे दिन’

$
0
0

आयुक्तांच्या धसक्याने नाशिकरोड परिसरात नियमित देखभाल

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकाल्यापासून नाशिकरोड तसेच द्वारका भागातील उद्यानांना अच्छे दिन आले आहेत. या सर्व उद्यानांना संबंधितांनी चकाचक करीत त्यांची नियमित देखभालही केली जात आहे.

नूतन आयुक्तांनी प्रत्येक ठिकाणी धडकभेटीचा धडाका लावल्याने नाशिकरोड परिसरातील उद्यानांनाही संबंधित विभागाने चकाचक केले आहे. आयुक्तांच्या धसक्याने उद्यानांत औषध फवारणी, झाडांचे कटिंग, झाडांना पाणी देणे याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.

उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे नागरिकांचा उद्यानांकडे ओढा वाढला आहे. यामध्ये द्वारकेचे काठेगल्लीतील सावतामाळी उद्यान, भाभा नगरमधील भाभानगर तसेच कानडे उद्यान, उपनगरमधील अयोध्या उद्यान, टागोर नगरमधील उद्यान, डीजीपी नगरमधील गणेश मंदिरातील उद्यान ही सर्व उद्याने पूर्ण चकाचक झाल्याने नागरिकांनाही याठिकाणी प्रसन्न वाटत आहे. काठेगल्लीतील बनकर चौकातील जीजामाता उद्यान तसेच शीतल सोसायटी उद्यानातील हिरवळीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

याठिकाणी सुशोभीकरण

नाशिकरोड येथील सोमानी उद्यान, आडकेनगर दोन व तीन, आनंदनगर उद्यान, जेलरोडचे महालक्ष्मी उद्यान, लोखंडेमळ्यातील चैतन्यनगर येथील उद्यानही सुशोभित करण्यात आले आहे. विहितगाव येथील महादेव मंदिर, मीनाताई ठाकरे उद्यान, शिखरेवाडीतील जॉगिंग ट्रॅक, गंधर्वनगरीतील गजानन महाराज उद्यान, आशानगरमधील उद्यानांकडेही लक्ष देण्यात आले आहे. जयभवानीरोडचे महेशनगर,जीवनछाया, प्रधाननगर एक व दोन, लवटे मळा सूमन हॉस्पिटलमागील उद्यान तसेच चेहेडीगावीतील उद्यानची कळी खुलली आहे.

दुर्लक्षित उद्यानांसाठी आयुक्तांना साकडे

नाशिकरोड परिसरातील काही उद्यानांची अवकळा मात्र कायम आहे. जेलरोडच्या सावरकरनगरमधील दोन्ही गार्डन्सची दयनीय अवस्था झालेली आहे. येथील खेळणी गायब झाली आहेत तसेच उद्यानातील फुलझाडे कोरडी होऊन चार वर्षे झाली आहेत. आता तेथे गवत व काटेरी झुडपे उगवली आहेत. जेलरोडचे भीमनगर, देवळालीगावातील भागवत गल्लीतील गार्डनही आजारी आहे. ही सर्व दुर्लक्षित उद्याने दुरुस्त व सुशोभित करण्यासाठी तसेच खेळणी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा आदींबाबत नागरिक लवकरच आयुक्तांना साकडे घालणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून ऑडिटमध्ये तांत्रिक चूक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या तांत्रिक ऑडिटमध्ये 'कमवा व शिका' योजनेच्या तपशीलात तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. या योजनेचा तपशील ऑनलाइन नमूद करताना त्यात ओबीसी वगळता सर्व जातींच्या प्रवर्गांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, यात ओबीसीचा उल्लेख वगळल्याने ऑडिटमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. खास बाब म्हणजे, पुणे विद्यापीठाचे पदाधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचेही निदर्शनास आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे ऑडिट २० मार्चपासून सुरू होत आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या संलग्नित सर्व कॉलेजांना वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती ऑनलाइन स्वरुपात अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या वेबसाइटवर कॉलेज लॉगिन केल्यानंतर हे सर्व तपशील भरण्याचे काम सुरू झाले आहे. यात विद्यार्थी विकास मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या 'कमवा व शिका' योजनेच्या तपशीलात तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. यात वर्षभर सदर योजनेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या, आर्थिक ताळेबंद व इतर तपशील भरायचा आहे. यासोबतच विविध जात प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांची संख्या नमूद करायची आहे. मात्र, विद्यापीठाकडून झालेल्या तांत्रिक चुकीत ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिला आहे. इतर सर्व प्रवर्ग नमूद असून ओबीसी वगळल्याने विद्यार्थी विकास अधिकारी संभ्रमित झाले आहेत. विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, 'कमवा व शिका योजनेत ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, यात ओबीसीचा उल्लेख नाही. यामुळे या विद्यार्थ्यांची संख्या नमूद करण्यात संभ्रम आहे. सध्या खुल्या प्रवर्गात विद्यार्थी नमूद केले आहेत. पण अशी चूक होणे अपेक्षित नव्हते' असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी कधीच ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिला नसल्याने यंदा असे का झाले याबाबत विचारणा करण्यासाठी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 'ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिल्याची बाब आताच समजते आहे. याबाबत तपासणी करून पुढील माहिती कळवतो' असे उत्तर देण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेतून आर्थिक गरजा भागविणारे इतर प्रवर्गांसोबतच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी अधिक आहेत. मात्र, विद्यापीठाकडून झालेली तांत्रिक चूक त्यांच्याही निदर्शनास न आल्याने चर्चेचा मुद्दा बनली आहे. विद्यापीठ पदाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्व कॉलेजेस व विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचकांचे माहेरघर- अभिनव सार्वजनिक वाचनालय

$
0
0


वाचकांचे माहेरघर - अभिनव नागरिक वाचनालय

१८६० साली नाशिकला रेल्वे स्थानक झाले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने नाशिकरोड वसाहत उदयास आली. पुढे चालून १९२४ मध्ये आयएसपी आणि १९२८ साली सीएनपी प्रेस सुरू झाल्याने कामगारवर्ग या वसाहतीचा आत्माच ठरला. हळूहळू लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे या वसाहतीतील नागरी सुविधांची उणीव ठळक होत गेली. या वसाहतीत वाचनालयाची सुविधा नसल्याने डायालाल झवेरी, धरमदास कोठारी, एस. खन्ना, रामबगस करवा, तुळशीराम मंत्री, मणिरमाल पाठक, मूळशंकर जोशी, सखाराम गोसावी, पुरुषोत्तम पाटणकर, व्यंकटेश करकरे, मदारभाई कच्छी, कादरभाई हैदरअली, शिवनारायण लोया, लक्ष्मणराव नवले आणि राजाराम बाजपेयी या समाजधुरिणांनी १५ ऑगस्ट १९४१ रोजी देवी चौकातील वाड बिल्डिंगमधील एका छोट्याशा खोलीत अभिनव नागरिक वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रज राजवटीत सुरू झालेल्या या वाचनालयाने गेल्या ७५-७६ वर्षांत अनेक चढउतार अनुभवले. परंतु, नाशिकरोडमध्ये वाचनामृताचा झरा वाहता ठेवण्यासाठी नाशिकरोडमधील या पहिल्या वाचनालयाने आपली जबाबदारी इमानेइतबारे सांभाळली आहे. नागरिक अभिनव वाचनालय गेल्या सात दशकांपासून वाचकांसाठी माहेरघरच ठरले आहे.

पालिकेने २३ ऑक्टोबर १९८७ साली जवाहर मार्केटजवळ ६८७ चौरस फुटांची जागा असलेली इमारत दिली. पुढे ही जागाही कमी पडू लागली. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू झाला. १९९१ साली मधुकर जोशी यांनी रामकिसन करवा, संभाजी मोरुस्कर, गजानन तितरे या कार्यकर्त्यांना वाचनालयाच्या कामात सहभागी करून घेतले. संभाजी मोरुस्कर यांच्या पुढाकारातून या वाचनालयाला १९९७ साली मनपा शाळा क्र. १२५ जवळील सध्याची वास्तू पालिकेकडुन प्राप्त झाल्याने या वाचनालयाच्या जागेची अडचण मिटली. सध्या या वाचनालयाची एक शाखा जवाहर मार्केटजवळील जुन्या जागेवरही सुरू आहे. वाचनालयात उपलब्ध असलेल्या सुविधा बघता शासनाने 'अ'वर्गाचा दर्जा द्यायला हवा होता. परंतु, जागा स्वमालकीची नसल्याने या वाचनालयाला 'ब' वर्ग प्राप्त झालेला आहे. परिणामी अत्यल्प शासकीय अनुदानावरच या वाचनालयाचा गाडा ओढावा लागत आहे. पालिकेसह आमदार बाळासाहेब सानप, खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून या वाचनालयाला पुस्तके मिळालेली आहेत.

ग्रंथांसह वाचक संख्येचीही समृद्धी

या वाचनालयात सध्या २७ हजार ३६३ ग्रंथसंख्या असून, १५०० वाचक सभासद आहेत. त्यात ४८७ महिला, ७८६ पुरुष आणि १८७ बालवाचक आहेत. दररोजचे वाचक ३५० असून सुमारे तेवढेच वाचक पुस्तकांची नियमितपणे साप्ताहिक देवघेव करतात. ५५ आजीवन सभासद आहेत. ग्रंथसंख्या आणि वाचक संख्येची समृद्धी या वाचनालयाने टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे महिला वाचकांची संख्या लक्षणीय आहे. तीन कर्मचारी कार्यरत असून, त्यात एक ग्रंथपाल, एक सहाय्यक ग्रंथपाल आणि एका शिपायाचा समावेश आहे. १७ वर्तमानपत्रे, ६० मासिके, ८ साप्ताहिके आणि ९ पाक्षिके नियमितपणे घेतली जातात. सर्व ग्रंथांची मांडणी अत्यंत आकर्षकपणे केलेली असून, त्यांची काळजी घेतली जाते.

विविध उपक्रमांचे आयोजन

अभिनव नागरिक वाचनालयात वर्षभर उपक्रमांची रेलचेल असते. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन यांसारखे सर्व राष्ट्रीय उत्सव वाचकांसोबत साजरे केले जातात. याशिवाय थोर देशभक्त, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी यांची जयंती-पुण्यतिथी साजरी करून देशप्रेमाचे धडे दिले जातात. वाचकांसाठी दिवाळी अंक योजना चालविली जाते. अभिरूची योजनेद्वारे समाजातील दानशूर नागरिकांकडील जुनी पुस्तके स्वीकारली जातात. दरवर्षी या योजनेद्वारे सुमारे २०० पुस्तके या वाचनालयाला प्राप्त होतात.

अभिनव नागरिक वाचनालयात वाचकांसाठी पुरेशा सुविधा आहेत. जुनी पुस्तके सहज उपलब्ध होतात. मोठ्या वाचनालयांच्या तोडीस तोड सुविधा आहेत. सर्व वर्तमानपत्रे व मासिकेही उपलब्ध असल्याने खर्चही वाचतो.

-पुरुषोत्तम स्वान, वाचक

हवी असलेली सर्व पुस्तके येथे मिळत गेल्याने वाचनाचा छंद वृद्धिंगत होत गेला. या वाचनालयाची कवाडे सदैव खुली असल्याने वाचन संस्कृती जोपासली गेली आहे. युवा वर्गात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.

-तुळशीराम बोराडे, वाचक

या वाचनालयात सर्व साहित्यप्रकारातील पुस्तके उपलब्ध आहेत. मासिके, पाक्षिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिकेही आहेत. वाचनालयाच्या वर्गवारीसाठी शासनाच्या काही अटींची पूर्तता होणे शक्य नसते. त्यामुळे वाचनालयाला आर्थिक नियोजनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डिजिटलायजेशनचा प्रयोग करून पाहिला. परंतु, वाढणाऱ्या खर्चामुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही.

-गजान तितरे, सचिव

आकडे बोलतात...

ग्रंथसंख्या - २७,३६३

सभासद- १५००

नियमित वाचक - ३५०

आजीवन सभासद- ५५

वर्तमानपत्रे - १७

मासिके-६०

साप्ताहिके- ८

पाक्षिके- ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकास ‘ब्रेक’

$
0
0

उंटवाडीजवळ मनपा अधिकाऱ्यांकडून कार्यवाही; नागरिकांची नाराजी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडीजवळील त्रिफुलीवर परिसरातील नागरिक गत एक वर्षांपासून गतिरोधकाची मागणी करीत आहेत. मात्र महापालिकेने येथे गतिरोधक टाकले नाही. यावर रविवारी रात्री नागरिकांनी याठिकाणी गतिरोधक उभारले. यावरून सोमवारी (दि. १२) सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हे गतिरोधक काढण्यात आले. या गतिरोधकावरून नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये काहीवेळ वाद झाला. मात्र, अधिकाऱ्यांनी या गतिरोधकास 'ब्रेक' लावला आहे. त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला.

उंटवाडी गावाजवळील रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असतात. उंटवाडी गावाजवळ त्रिमूर्ती, कालिका पार्क आणि शहरातून येणारी वाहने एकत्र होत असतात. या त्रिफुलीवर मागील काही दिवसांपासून सर्वाधिक अपघात झाले असून, यावर कोणाचेही लक्षच नसल्याचे दिसून येते. त्यातच याठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत किंवा काही सूचनाफलकही नसल्याने रात्री कायमच अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या त्रिफुलीवरील अपघात रोखण्यासाठी किमान याठिकाणी गतिरोधक उभारले तर वाहने हळू तरी चालतील या हेतूने नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधकांची मागणी केली होती. त्यानुसार नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी वाहतूक विभाग आणि महापालिका यांना एक वर्षापूर्वीच गतिरोधक टाकण्याचे पत्रही दिले आहे. मात्र महापालिका किंवा पोलिसांकडून कोणतीही हालाचाल झाली नाही. त्यामुळे रविवारी (दि. ११) रात्री उंटवाडीत नागरिकांनीच याठिकाणी गतिरोधक टाकले. अचानक गतिरोधक टाकण्यात आल्याने काहींनी पालिकेत ऑनलाइन तक्रार दाखल केली. यानंतर याची माहिती बांधकाम विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार तातडीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी पाहणी करून हे गतिरोधक काढून टाकण्याची सूचना केली. त्यानुसार हे गतिरोधक काढण्याचे काम सुरू करण्यात आले, मात्र नागरिकांनी यावेळी विरोध करीत गतिरोधक काढू देणार नाही, असा पवित्रा घेतला हेाता.

अवजड वाहनांना बंदी करा

उंटवाडीगावाजवळील रस्ता लहान असल्याने येथे गतिरोधक बसवून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या वेळी महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून लवकर गतिरोधक बसविण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले. उंटवाडीतील घराजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून मागील अनेक दिवसांपासून अवजड वाहनेसुद्धा जात आहेत.

मटा भूमिका

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गेली काही वर्षे रस्त्यांवर गतिरोधक टाकणे हा एकमेव पर्याय वापरला जात आहे. वास्तविक गतिरोधकांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. नॅशनल रोड काँग्रेस या संस्थेने तर रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यावरच मर्यादा आणली आहे. या संस्थेच्या परवानगीशिवाय गतिरोधक टाकताही येत नाहीत. वास्तविक वेगावर नियंत्रण ठेवणे, पादचाऱ्यांनी पदपथावरुनच चालणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे या उपायांवर भर दिला तर गतिरोधकांची गरजही राहणार नाही. त्यासाठी लोकजागराची गरज आहे.

वर्ष उलटूनही गतिरोधक न झाल्याने स्थानिक नागरिकांनी हे गतिरोधक टाकले. महापालिकेने ते आज काढून टाकले असले तरी ते पुन्हा टाकून द्यावे. पालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?

- विजय मुंजे, रहिवासी

या रस्त्यावर गतिरोधकाची मागणी नागरिकांनी केल्यानंतर आम्ही रितसर पत्रही दिले आहे. मात्र तरीही हा प्रश्न परवानगी मिळत नसल्याने प्रलंबित आहे. या प्रकारानंतर नागरिकांशी बोलून आश्वासन दिले असून, लवकरच याबाबतचा पाठपुरावा करून येथे गतिरोधक उभारू.

- भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा विलगीकरणासाठी अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असून, सफाई कर्मचाऱ्यांना वठणीवर आणल्यानंतर आता कचरा विलगीकरणावर भर दिला आहे. शहरातील घंटागाडी ठेकेदारांची आयुक्तांनी बैठक घेतली असून, कचरा विलगीकरणासाठी मार्चचा अल्टिमेमट देण्यात आला आहे. नागरिकांकडून ओला व सुका असा कचरा घेण्याची सक्ती करण्यात येणार असून, ज्यांच्याकडून कचऱ्याचे वर्गीकरण होणार नाही, त्यांचा कचरा स्वीकारला जाणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे. शहर पुन्हा झिरो गार्बेज करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आयुक्त मुंढे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी एप्रिलची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले नाही तर त्या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील आदेश महापालिकांना सरकारतर्फे पाठविण्यात आला आहे. सध्या शहरात केवळ २० टक्के कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. अजूनही ८० टक्के कचरा विलगीकरणापासून दूर आहे.

मुंढे यांनी आरोग्य विभागाचा स्वतंत्र आढावा घेत यापूर्वीच कचरा विलगीकरणासंदर्भात इशारा दिला आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली घंटागाडी ठेकेदारांची सोमवारी बैठक झाली. घंटागाडीच्या ठेक्यातच कचरा विलगीकरणाची अट असतानाही, वर्षभरापासून कचरा विलगीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलनाची स्वतंत्र तरतूद करावी. शहरातील जवळपास साडेचार लाख मालमत्तांना भेटी देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले. नागरिकांनी घरातच स्वतंत्रपणे दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा टाकावा. सोसायट्यांनाही इमारतीत स्वतंत्रपणे ओला व सुका कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबणे बंधनकारक असेल. मार्चनंतर नागरिकांकडून ओला व सुका कचरा एकत्रित आला तर स्वीकारू नये, असे आदेश त्यांनी ठेकेदारांना दिले आहेत.

नागरिकांना शिस्त

शहरात सद्य:स्थितीत २० टक्केच कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. ही आकडेवारी चिंताजनक आहे. राज्य सरकारने एप्रिलअखेरपर्यंत ८० टक्के कचरा विलगीकरण झाले नाही, तर अनुदानच रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनाच शिस्त लावली जाणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरात स्वतंत्र दोन डस्टबिनची व्यवस्था करावी, तसेच सोसायटी व इमारतींमध्येही दोन डस्टबिनमधूनच घंटागाडीपर्यंत कचरा यावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. असा कचरा आला नाही तर स्वीकारू नका, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सण-उत्सवांमध्येही ‘चीन चीन चू’

$
0
0



fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT
नाशिक : भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांत वर्षभरामध्ये बहुविध सण साजरे केले जातात. हीच बाब लक्षात घेऊन चिनी उत्पादनांनी भारतीय सणांची बाजारपेठ काबिज केली आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंची आयात होत आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये चीनच्या उत्पादनांचे वर्चस्व असल्याने त्या वस्तू घेणे क्रमप्राप्त आहे. ‘डोकलाम’च्या पार्श्वभूमीवरील चिनीविरोध मावळला असून, नागरिक पुन्हा ‘चायनामेड’ वस्तूंच्या खरेदीकडे वळले आहेत. कमी किमतीत उत्पादने उपलब्ध करून देण्याचे कसब चिनी मार्केटने साध्य केले आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही चिनी वस्तूंचाच बोलबाला आहे. वस्तू टिकाऊ नसल्या तरीही त्या अत्यंत कमी दरात मिळणे आणि आकर्षक असणे हे चिनी वस्तूंचे वैशिष्ट्य आहे. नाशिक शहर परिसरात चिनी वस्तूंनी सणांच्या बाजारपेठेवर कब्जा मिळविला आहे. दिवाळीमध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा, दिव्यांच्या माळा, आकाशकंदील, पणत्या, विविध दिवे आदींची बाजारपेठ जोरात असते. आपल्याकडच्या बाजारपेठेतील मागणी आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने भारतीय उत्पादने कमी प्रमाणात होतात. चीनमध्ये मजुरीचे दर अत्यंत कमी असल्याने वस्तूंचे उत्पादन मूल्यही अत्यंत कमी असल्याचे आयातदार सांगतात. त्यामुळे कमी पैशांत मालाची विक्री करणे चिनी लोकांना परवडते. आपल्याकडे मात्र उलट स्थिती आहे. आपल्याकडे मजुरीचे दर जास्त असल्याने तितक्या कमी किमतीत मालाचे उत्पादन होऊ शकत नाही. उत्पादन झालेच तर कमी प्रमाणात होते. त्यामुळे सणांची बाजारपेठ चिनी मालावरच अवलंबून राहते.

व्यापाऱ्यांचाही नाईलाज
दिवाळीत चिनी पणत्यांऐवजी देशी पणत्या विक्रीचा निश्चय व्यापाऱ्यांनी केला खरा;Ḥ पण बाजारपेठेला मुबलक प्रमाणात भारतीय उत्पादनांचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव चिनी पणत्या खरेदी कराव्या लागल्या. परिणामी, चीनच्या मालावरची बंदी क्षणिक ठरली. नुकत्याच झालेल्या संक्रांतीच्या सणातही वाण देण्याच्या हळदी कुंकवाच्या बहुविध वस्तू या चिनीच होत्या. यात मोठी उलाढाल झाली. रंगपंचमीच्या सणासाठीही चिनी पिचकाऱ्या जोरात होत्या. ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि ‘फ्रेंडशीप डे’साठी आकर्षक बेल्ट, ब्रेसलेट आणि आदी उत्पादने चिनी बनावटीचीच होती. आगामी गुढीपाडव्यासाठी दाखल झालेल्या नॅनो गुढ्या, उन्हाळ्याच्या सुटीत विक्री होणारी विविध खेळणीचेही आगमन आता बाजारपेठेत होऊ लागले आहे.

जोपर्यंत भारतात जास्त उत्पादन होत नाही तोपर्यंत आपल्याला चीनच्या मालावर अवलंबून रहावेच लागेल. आज अनेक क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व आहे, हे नाकारून चालणार नाही. पूर्णत: बंदी आणणे शक्य होणार नाही. असे झाले तर अनेक भारतीय उद्योग बंद पडतील.
- दिलीप साळवेकर, माजी सरकार्यवाह, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कविता म्हणजे हृदयाचा आवाज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

हृदयातील भावना वाचकाच्या मनाला स्पर्श करतात. समाजात जागृती घडविण्याचे कार्य करतात. हा आतला आवाज म्हणजे कविता असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री शोभा बडवे यांनी केले.

येथील मराठा दरबार सभागृहात महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने परिवर्तन महिला मंडळ व मराठी साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वेध स्री मनाचा' या काव्यवाचन कार्यक्रमात बडवे बोलत होत्या.

उद्योजक संजय फतनानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी अहिराणी साहित्यिक डॉ. एस. के. पाटील, आशालता देवळीकर, अलका कोठावदे, मनपा गटनेते नीलेश आहेर, नगरसेविका जिजाबाई बच्छाव, राजेंद्र भोसले, परिवर्तनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अहिरे, मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित आदी उपस्थित होते.

बडवे पुढे म्हणाल्या, कविता समाजाला आरसा दाखवते. कविता अल्पाक्षरी असून, कमी शब्दात प्रभावीपणे आपले मत मांडणे यात कवीचे कसब असते. या कार्यक्रमात नाशिकच्या मुरलीधर गोटू कोतकर सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अॅड. वैदेही भगिरथ, भारती जाधव, पुष्पा चव्हाण, पिंकी मेहता, वंदना दशपुते, समिना कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला. काव्यस्पर्धेचे परिक्षण रवीराज सोनार, संतोष कांबळे, सतीश कलंत्री यांनी केले. प्रास्ताविक विजयालक्ष्मी अहिरे यांनी केले. गितांजली बाफना व रवीराज सोनार यांनी सूत्रसंचलन तर नूतन चौधरी व प्रतिभा अहिरे यांनी आभार मानले.

काव्यवाचन स्पर्धेचा निकाल

समाधान शिंपी (प्रथम), विशाल धिवरे (द्वितीय), माधवी नेरकर (तृतीय), नंदकिशोर ठोंबरे, रवीराज थोरात, सीमा कासार (उत्तेजनार्थ).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत बैठकीस अखेर मुहूर्त ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ भरती व कंत्राटी कामगार धोरणाच्या विरोधात केलेल्या आंदोलनास आज ९० दिवस झाले आहेत. इतका मोठा कालावधी उलटूनही पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या समस्या विचारात न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पालकमंत्र्यांच्या प्रतिसादाअभावी नाराज आंदोलकांनी अखेर आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावर आमदार सानप यांनी १५ मार्च रोजी दुपारी विधानभवनात या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

कर्मचाऱ्यांना वारंवार आश्वासने देऊन तोडगा काढला जात नसल्याबाबत आंदोलकांची नाराजी होती. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरणात कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र, अद्याप बैठक न झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आमदार सानप यांचे संपर्क कार्यालय गाठून ठिय्या मांडला. यावर आमदारांनी आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांना चर्चेसाठी बोलावले. त्या वेळी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, विद्यापीठाचे कुलसचिव आणि आमदार सानप यांच्यात चर्चा होऊन पालकमंत्री महाजन यांच्यासोबत १५ मार्च रोजी बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सानप यांनी कर्मचाऱ्यांना दिले असल्याची माहिती कंत्राटी कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने सीताराम ठोंबरे यांनी दिली.

सानप यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता ही बैठक १५ मार्च रोजी दुपारी १ वाजता विधानभवनात होणार आहे. बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्यासोबत आमदार सानप, तसेच कामगार संघटनेचे सात पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला मंत्र्यांनी बगल देऊ नये, अशी अपेक्षा तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक नाशिककरांच्या हाती भोपळाच!

$
0
0

मुख्यमंत्र्यांसह स्थानिक भाजप नेत्यांकडून उपेक्षाच अधिक

vinod.patil@timesgroup.com

Tweet : @vinodpatilMT

नाशिक : 'नाशिकला कोणी वाली नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते. त्यामुळे तुम्ही मला एकहाती सत्ता द्या, मी तुम्हाला विकास देतो. मी आजपासून नाशिक दत्तक घेतो', या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावनिक आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देत भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली. त्या भाजपच्या नाशिकमधील सत्तेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु, वर्षभरात नाशिककरांच्या हाती भोपळाच आला आहे. नाशिकच्या विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून दत्तक नाशिकची उपेक्षाच अधिक केल्याचे चित्र आहे. एकही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे.

नाशिक दत्तक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे फळ म्हणून गेल्या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत १२२ पैकी तब्बल ६६ जागांवर भाजपला विजय मिळाला. निवडणुकांपूर्वी भाजपने पारदर्शक कारभार आणि नाशिकच्या विकासाची मोठ मोठी स्वप्ने दाखवली. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो आणि मोनोरेल, आय. टी. हब, रोजगार निर्मिती उद्योग, शहरात सीसीटीव्ही, बहुमजली पार्किंग, पर्यावरणपूरक बससेवा, ई-रिक्षा, तपोवन पर्यटन विकास, क्रीडा प्रबोधिनी,'बेटी बचाव' योजनेंतर्गत पाच हजार रुपये भाजपच्या अशा घोषणांनी नाशिककर प्रभावित झाले होते. परंतु, वर्षभरात या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, ही बैठकही निव्वळ स्टंट ठरली असून, गेले वर्षभर नाशिककरांच्या हाती केवळ भोपळाच आला आहे. उलट नाशिकमधील उद्योगांचे इतरत्र स्थलांतर होत असून, नाशिककरांवर कराचा बोजा लादला गेला आहे.

गेल्या वर्षभराच्या भाजपच्या कारकिर्दीत नाशिककरांच्या जीवनमानात काडीमात्रही फरक पडलेला नसून, उलट अडचणी अधिकच वाढल्या आहेत. शहरातील वाहतूक व पार्किंग या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, वादग्रस्त विकास नियंत्रण नियमावलीने नाशिककरांची डोकेदुखी वाढवली आहे. कपाट प्रश्न काही अंशी सुटला असला तरी, सहा व साडेसहा मीटरवरील टीडीआर बंदीमुळे बांधकाम व्यवसायाच्या अडचणी कायम आहेत. सांडपाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. वर्षभरात बससेवा ताब्यात घेण्यास चालना देण्याव्यतिरिक्त एकही ठोस काम भाजपकडून झालेले नाही. त्यामुळे दत्तक नाशिककरांची वर्षभरात पूर्णत: उपेक्षा झाली आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी तर नाशिककरांवर पश्चातापाची वेळ आणली आहे.

-

हे प्रश्न कायम

वादग्रस्त कपाट प्रश्न, निळी व लाल पूररेषा, गावठाण पुनर्विकास, सीसीटीव्ही प्रकल्प, सहा, साडेसहा मीटर टीडीआर धोरण, महापालिकेचा आकृतीबंध, सफाई कर्मचाऱ्यांची भरती, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, गोदावरी प्रदूषण, पार्किंग, अंतर्गत वाहतूक, उद्योगांचे स्थलांतर

अ'पारदर्शकता'

नालेसफाईची चौकशी दडपली, वादग्रस्त डस्टबिन घोटाळा दडपला, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशी दडपल्या, एलईडी घोटाळ्यावर कारवाई नाही

वर्षभराची उपलब्धता

बससेवा ताब्यात घेण्याची तयारी, स्मार्ट लायटिंग प्रकल्पाला मंजुरी, तीन नवीन समित्यांची निर्मिती, भूमिगत तारांसाठी ८७ कोटी, नगरसेवकांना ७५ लाख निधी

गेले वर्षभर नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचे काम सुरू आहे. पारदर्शक कारभार आणि विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

- रंजना भानसी, महापौर, नाशिक

नाशिककरांचा वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी भ्रमनिरास केला आहे. दत्तक नाशिक विकासकामांनाच पोरके झाले आहे. शहरात कुठेही विकासाच्या खुणा दिसत नाहीत. नाशिकमध्ये उद्योगधंदे वा मूलभूत सुविधांचीही वानवा झाली आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलच्या केशरचा युरोपात ‘गोडवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आंबा म्हंटले की कोकण, असे समिकरणच झाले आहे. आंब्याची निर्यात करण्यातही कोकण बऱ्यापैकी आघाडीवर आहे. मात्र आता त्र्यंबकेश्वर सारख्या अतिदुर्गम भागातील आंबाही युरोपात गोडवा पेरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी शेतकरी कुटुंबाने आकाशाला गवसणी घालणारे प्रयाग करत ही यशोगाथा रचली आहे. एकरी तीन लाखांची हमी देणाऱ्या केशर आंब्यांची लागवड करण्याचा अनोखा प्रयोग कौतुकास पात्र ठरला आहे.

सुंदराबाई दामोदर वाघेरे आणि विलास त्र्यंबक भोये या दोन शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याने नुकतेच आंबा एक्सपोर्ट प्रमाणपत्र दिले आहे. हरसूलच्या अलिकडे साधरणत: पाच किलोमीटर अंतरावर चिंचवड हे गाव आहे. येथील शेतकरी जनार्दन वाघेरे हे नोकरी करतात. त्यांचे आई-वडील सुंदराबाई आणि दामोदर वाघेरे यांनी परिसरात पाच हजार केशर आंब्याची झाडे लावली आहेत. झाडे लावताना त्यांनी जंगली आंबा आणि केशर आंबा यांचे कलम तयार केले. ३ बाय १४ फुटावर एकरी हजार झाडांची लागवड केली. साधरणत: पाच वर्षांपासून त्यांचे प्रयोग सुरू आहेत. नदीतून पाण्याचे ठिबक करून त्यांनी पाणी टंचाईवरही मात केली. स्वत: जनार्दन वाघेरे हे कृषी पदविकाधारक आहेत. तर विलास भोये हे देखील उच्चशिक्षीत आहेत. त्यांच्यासोबत अमोल भोये, नितीन भोये यांनी एकत्रितपणे शेतीत प्रयोग राबविले. मोबाइलचा स्मार्ट वापर करून इस्त्राइल व जर्मन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.

सेंद्रिय खतांचा वापर

वाघेरे आणि भोये यांच्या बागेतील झाडांना दोन वर्षांपासून फळ घेण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवून तो जागेवर ५० रुपये किलोप्रमाणे सहा टन केशर आंबा विकला. झाडांना सेंद्रिय खते घालणे, फवारणी करतांना रसायनांचा वापर टाळणे, आंबा पिकवितांना कोणतेही रासायन न वापरणे आदी नियम त्यांनी पाळले. वर्तमानपत्राचा कागद वापरून पंधरा दिवसात आंबा पिकविण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे.

थायलंडहून मागविल्या पिशव्या

यंदा आंबा निर्यात करायचा असे वाघेरे यांनी ठरविले आहे. त्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या सोबत विलास भोये हे शेतकरी देखील एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबा घेत आहेत. त्यांच्याकडेही दीड हजार झाडे आहेत. या आंब्यांना लावण्यासाठी थायलंड येथून पिशव्या मागविण्यात आल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, सहायक कृषी अधिकारी जालंदर बारे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. जगताप यांचे त्यांना मागर्दशन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट नाशिकची स्मार्ट ई-लायब्ररी

$
0
0

वाचनसंस्कृतीचे दुवे- डॉ. बाळकृष्ण शेलार

नाशिक शहराला ग्रंथालयांची समृद्ध परंपरा आहे. या ग्रंथालयांतूनच अनके उत्तुंग व्यक्तिमत्वे घडली आहेत. काळानुसार ग्रंथालयांच्या रचनेत, सोयी-सुविधांमध्ये बदल झाले आहेत. ग्रंथालये स्मार्ट होऊ लागली आहेत. स्मार्ट इंडिया, स्मार्ट नाशिककरांचे खरे प्रतिनिधित्व करणारी लायब्ररी म्हणजे नाशिकरोडचे अटल ज्ञान संकुल होय. तब्बल नऊ हजार चौरस फूट बांधकाम असलेली ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ई-लायब्ररी आहे. तीचे उद्घाटन २२ फेब्रुवारी २०१४ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या राजर्षी शाहू महाराज सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या महापालिकेच्या या लायब्ररीची घौडदोड वेगाने सुरू आहे. चार वर्षांत येथील ६४ विद्यार्थ्यांना सरकारी तसेच आयटीसारख्या कंपन्यांमध्ये प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

अत्याधुनिक सुविधा

नाशिकमधील ही पहिली वायफाय अभ्यासिका आहे. माफक फी, शिस्त आणि विनम्र सेवा ही येथील वैशिष्ट्ये. अत्याधुनिक सुविधा, कॉम्प्युटर लॅब, ई-ग्रंथालय, ई-सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, ग्रुप डिस्कशन रूम, स्टडी रूम असलेल्या या लायब्ररीची क्षमता साडेचारशे विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे अनेकांना प्रवेशासाठी नंबर लावावा लागतो यावरुन या लायब्ररीचे यश दिसते. दहा एमबीपीएस स्पीडची वायफाय सुविधा लायब्ररीत आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँक, सी. ए., पोलिस दल, सुरक्षा दल, रेल्वे, विक्री कर, इंजिनीअरिंग, मेडिकल आदी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत घेतात. सकाळी आठ ते रात्री दहा अशी वेळ आहे. आठ कर्मचारी येथे सेवेसाठी आहेत. नाममात्र शुल्क व देणगीतून लायब्ररीचा कारभार चालतो. दोन महिन्यांसाठी प्रवेश दिला जातो. विद्यार्थी नियमित येतो की नाही यासाठी बायोमेट्रिक प्रणाली आहे. त्यामध्ये नोंदणी झाल्यानंतरच ग्रंथालय, संगणक कक्ष व इतर ठिकाणचे प्रवेशद्वार उघडते. यावरून येथील आधुनिकतेची कल्पना यावी. त्या जोडीला प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही आहे. या दोन्ही यंत्रणांमुळे अनोळखी व्यक्ती येथे प्रवेश करू शकत नाही. दोन्ही मजल्यांवर वायफाय सुविधा सुरुवातीपासून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवेचा लाभ घेता येतो. संगणक कक्षात बसून हवी ती पुस्तके, संदर्भ इंटरनेटवरुन घेता येतात. शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांशी संबंधीत वेबसाइटस येथे बघता येतात. सोशल साइट्स ब्लॉक आहेत. स्वतःचा लॅपटाप वापरण्यास परवानगी आहे. मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे वाचनासाठी वेगळी सोय आहे. राष्ट्रीय सुट्या वगळल्यास बाराही महिने अटल ज्ञान संकुल सुरू असते. थंड पाण्यासाठी कुलर, पुरेसे पंखे, खेळती हवा, पुरेशी प्रकाशव्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना चर्चा करायची झाल्यास दोन रुम्स आहेत.

पहिल्या मजल्यावर फक्त मुलांसाठी अभ्यास कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर मुले व मुलींसाठी स्वंतत्र अभ्यास कक्ष आहेत. मुले व मुलींना स्वतंत्र टिफीन रुम, वॉश रूम आहे. संपूर्ण ग्रंथालयाची नियमित स्वच्छता राहील, यासाठी दक्षता घेतली जाते. दोन्ही मजल्यावर व प्रवेशद्वारांवर शू रॅक आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे. प्रत्येक मजल्यावर वॉटर कुलर आहेत. विद्यार्थ्यांना मदतीसाठी अकरा जणांचा कर्मचारी वृंद आहे. मुलांना गॅलरीत टेबल खुर्ची घेऊन अभ्यासाची सोय आहे.

संघर्षाची प्रेरणा

ग्रंथालय तीन मजली आहे. तळमजल्यावर ग्रुप डिस्कशन हॉल, वाचन कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय, पेपर वाचन दालन आहे. पहिल्या मजल्यावर मुलांसाठी रीडिंग रूम आहे. या ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी मनमाड, निफाड, मालेगाव, औरंगाबाद, नगर आदी ठिकाणांहून विद्यार्थी येतात. काही विद्यार्थी ग्रंथालयाच्या परिसरातच खोली घेऊन राहतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतली जातात. जे विद्यार्थी ग्रंथालयाची मदत घेऊन शासकीय, खासगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करत आहेत, त्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. अटल बिहारी वाजपेयींच्या नावे सुरू केलेल्या या लायब्ररीच्या वर्धापनदिनी हा सत्कार होतो. या विद्यार्थ्यांचे रजिस्टर ठेवलेले आहे. त्यामुळे इतरांना मार्गदर्शनासाठी या विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येतो.

अडथळे दूर

नाशिकरोडच्या शांत शाहूनगर कॉलनीत अटल ज्ञानसंकुल आहे. इमारत तीन मजली आहे. नऊ हजार चौरस फुटांत बांधकाम आहे. ही जागा महापालिकेच्या तांत्रिक समस्येत अडकली होती. नगरसेवक मोरुस्कर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून हा मोक्याच्या जागेवरील भूखंड लायब्ररीसाठी उपलब्ध करून घेतला. त्यातूनच एक आदर्श व भव्य ई-लायब्ररी सुरू झाली. टेक्नोसॅव्ही युवक-युवकांसाठी ही लायब्ररी वरदान ठरली आहे.

यांनी दाखवली चमक

सुरू होऊन चार वर्षे झालेल्या या लायब्ररीचा उपयोग करून ६४ युवक-युवतींनी करिअर घडवले आहे. चिंचोली (ता. सिन्नर) येथील गरीब घरचा विकास नवाळे एमपीएससीमध्ये नाशिकमध्ये सहावा आला. तो आता विक्रीकर अधिकारी आहे. अमोल उगलमुगले एमपीएससी झाला असून मंत्रालयात क्लास वन अधिकारी आहे. पूजा लांडगे, जयश्री कोठुळे मंत्रालयात सेवेत आहेत. दिव्यता कल्पवृक्ष सीए झाली आहे. अचल खापर्डे बँकेत, गौरी भदे वीज कंपनीत, तर श्वेता काळे कारागृहात कर्मचारी आहे.

या हव्यात सुविधा

या ग्रंथालयाची क्षमता साडेचारशे विद्यार्थ्यांची आहे. अनेकांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथील क्षमता वाढविण्याची मागणी आहे. पुरेशा खुर्च्या, संगणक असले तरी ते कमी पडत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पार्किंगपासून अन्य सर्व सुविधा उत्तम आहेत. व्हर्च्युअल क्लास रूम, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या सुविधांची गरज आहे. डिस्टन्स लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्ती, संस्थांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले.

इतर ग्रंथालयांच्या तुलनेत अटल ज्ञान संकुल नक्कीच उत्तम आहे. पिण्याच्या पाण्यापासून पार्किंगपर्यंत तसेच वायफायपासून इंटरनेटपर्यंत सर्व काही अत्याधुनिक आहे. राज्यात आदर्श असलेल्या या ग्रंथालयाला विद्यार्थ्यांनी एकदा तरी भेट द्यावी.

- वरुण पगारे, विद्यार्थी

अटल ज्ञान संकुलातील सोयी-सुविधा अत्यंत उत्तम दर्जाच्या आहेत. येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची समर्पण वृत्ती, मेहनत पाहता इतरांनाही ध्येय प्राप्तीची प्रेरणा मिळते. स्मार्ट नाशिकप्रमाणेच ही स्मार्ट लायब्ररी नाशिकचे भूषण आहे.

- स्वाती कांबळे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images