Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओझरचा पाणीपुरवठा होणार बंद

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठ्यापोटी ३० कोटी ७४ लाख रुपये थकल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गावाचा पाणीपुरवठा ११ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओझर, साकोरा व २ गावे असे नाव असलेल्या या योजनेत इतर गावांनी मात्र नियमीत पाणीपुरवठ्याचे देयक दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही संकट कोसळणार आहे.

पाणी पुरवठा योजनेतून पालखेड डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे सर्व जलव्यवस्थापन जीवन प्राधिकरणाकडे आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात जानेवारी पर्यंत या पाणीपुरवठ्यापोटी प्राधिकरणाने वीज देयकाचे ९९ लाख १४ हजार रुपये भरले. पण, त्यांची वसुली फक्त ७७ लाख ७२ हजार झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाला आपल्या फंडातून पैसे द्यावे लागले. त्यामुळे प्राधिकरणाने आता कडक पाऊले उचलली असून, ओझर गावात पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळयात पेटणार आहे.

ओझर ग्रामपंचायतीकडे या आर्थिक वर्षातील एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत १ कोटी २१ लाख ३८ हजार रुपये थकबाकी आहे. त्यात ओझर ग्रामपंचायतीने ४५ लाखच भरणा केला आहे. चालू थकबाकीसह जानेवारी २०१८ पर्यंत मागील थकबाकी विलंब शुल्कासह २९ कोटी ५३ लाख आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना चालवणे प्राधिकरणाही अवघड झाले आहे. पाणीपुरवठ्याचे बील भरावे यासाठी जीवन प्राधिकरणाने वांरवार पत्रांद्वांरे व प्रत्यक्ष भेटी देऊन बैठकाही घेतल्या. पण, थकबाकीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. सदर योजना चालविण्यासाठी जीवन प्राधिकरणाही कोणते अनुदान व मदत मिळत नसल्याने ही योजना पाणीपट्टीवर अवलंबून आहे.


५० हजार लोकांचा प्रश्न

ओझर ग्रामंपचायती जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असेलेली ग्रामपंचायत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ५१ हजार २९७ असून त्यात ११ हजार ६१५ कुटूंब आहे. त्यात २६ हजार ६७१ पुरूष तर २४ हजार ६२६ महिला या शहरात वास्तव करतात. एचएलमुळे या शहराला वेगळे महत्त्व असून त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजना बंद झाल्यास पाण्याचा प्रश्न तीव्र होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकात्मतेसाठी धावणार हजारो मालेगावकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एकात्मता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस व शहर शांतता समितीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ११ मार्च रोजी 'रन फॉर युनिटी' मालेगाव मॅरेथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन बोधचिन्ह तसेच स्पर्धा टी शर्टचे अनावरण जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी दिली.

येथील शहर पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगाव मॅरेथॉनसाठी येथील पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी १०, ५ व ३ किलोमीटर धावणे असे तीन गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटात वयानुसार पाच विभाग करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता एकात्मता चौकापासून मॅरेथॉनचा शुभारंभ होणार आहे. मॅरेथॉन मोसमपूल, शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्थानक, भिक्कू हॉटेल, दरेगाव शिवारातील रिलायबल कंपाउंडमार्गे पुन्हा पोलिस कवायत मैदान अशी पूर्ण केली जाईल. तीनही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकास बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मॅरेथॉनच्या मार्गावर सर्व धर्मीयाच्या योगदानातून स्पर्धकांसाठी खजूर, फळे,पाणी असे स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. स्पर्धा पूर्ण करून परतणाऱ्या स्पर्धकास मैदानावर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असेल मालेगाव मॅरेथॉन

- ३ , ५ व १० किमी अंतर धावणार

- तिन्ही गटात वयानुसार ५ विभाग

- तीनही गटात विजेत्या स्पर्धकास बक्षीस

- जागोजागी पाणी अल्पोआहार व्यवस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्सानियत बचावसाठी मालेगावी निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सिरीयात सुरू असलेल्या कलहात हजारो नागरिकांचा बळी जात असून, शांततेसाठी प्रयत्न व्हावेत याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी इन्सानियत बचाव संघर्ष समिती व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील किडवाई रोडवर आमदार असिफ शेख यांचे बंधू खालिद रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे मौलाना हसनैन रहमानी, साफिक राणा, मौ. अयूब्ब कलमी, मौ. अनिस अजहर, अब्दुल सलीम सिद्दिकी, सलीम अन्वर, अस्लम अन्सारी आदी उपस्थित होते.

सिरीया व रशियाने सिरियातील बॉम्बहल्ले थांबवावेत, जखमींवर उपचार व्हावेत, रशियाने सिरीयाचा हुकुमशाह असाबला सहकार्य करू नये, मानवतेच्या भावनेतून येथील सामान्य नागरिक, लहान मुले यांना वाचवावे व शांततेसाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी मौलाना व नगरसेवकांनी मनोगतात व्यक्त केली. शेख यांनी देखील याबाबत मुंबईस्थिती रशियन दूतावासास निवेदन दिले असून हिंसाचार थांबवावा अशी मागणी केली आहे. यावेळी आंदोलनस्थळी प्रतीकात्मक स्वरुपात जखमी मुलांना दाखविण्यात आले होते. यावेळी जमित ए उलेमा, इन्सानियत बचाव समिती तसेच काँग्रेस नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.

मानवतेसाठी मानवी साखळी

शहरात एकीकडे काँग्रेसच्या वतीने सिरियातील हिंसाचार थांबवावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वात जमाते उलेमा इ मालेगावच्या वतीने मानवतेसाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. संपूर्ण जगात राजकीय, धार्मिक वर्चस्वासाठी मानवतेविरोधात हल्ले सुरू असून यामुळे निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. या जागतिक संघर्षात बळी पडणाऱ्यांविषयी सहानुभूती ठेवून मानवतेचे रक्षण व्हावे या उद्देशाने या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. गांधी पुतळा परिसरात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौलाना मुफ्ती समवेत गिरीश बोरसे, जितेंद्र देसले, निखील पवार, अनिल पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री जीवनावर रचली ९४९ ओळींची कविता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

स्त्री जीवनाचा आलेख मांडणारी व स्त्रियांच्या व्यथांबरोबरच त्यांच्या कर्तृत्त्वाचा गौरव करणारी तब्बल ३२२९ शब्दांची आणि ९४९ ओळींचा एक दीर्घ कविता नांदगावच्या सूनबाई असलेल्या वैशाली सोर यांनी केली असून, या अनोख्या प्रयोगाचे साहित्य व काव्य क्षेत्रात मोठे कौतुक होत आहे.

स्त्रियांच्या आयुष्यावर बरेच लिहिले गेले आहे. अजूनही भरभरून लिहिले जात आहे. मात्र नारी शक्तीचे वेगळेपण, तिचा त्याग, तिची हुशारी आणि घरासाठी चंदनासम झिजणे, तिचे कर्तृत्व हे एकाच कवितेत व तब्बल सव्वा तीन हजार शब्दात मांडून नांदगावच्या वैशाली सोर या सूनबाईंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे, त्यांचा हा दीर्घ काव्याचा प्रयोग पाहून जणू सर्वांच्या ओठांवर 'शाब्बास सूनबाई' असे शब्द उत्स्फूर्तपणे येत आहेत.

त्यांच्या या काव्याची इंडिया बुक ऑफ रेकार्ड मध्ये दीर्घ काव्य सादरीकरणात नोंद झाली आहे.

नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश सोर व माधवी सोर यांच्या मोठ्या सूनबाई वैशाली तुषार सोर (वाघमौडे) यांनी मराठी काव्यातील दीर्घ काव्य सादरीकरणात स्त्री आयुष्याची महती सार्थ शब्दात मांडली आहे. चपखल व नेमके ३२२९ शब्द आणि ९४९ ओळीत ही कविता पूर्ण झाली आहे. एका स्त्रीने स्त्रियांच्या आयुष्याचा मोठा सन्मान करत केलेली दीर्घ कविता देशभरात गाजत आहे. नांदगावच्या व महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीतील हे एक ऐतिहासिक सोनेरी पान ठरेल अशा जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत.

कवितेचा ध्यास आहे. कविता लिहिणे व जगणे हा स्थायीभाव असल्याने ही कविता साकारली. स्त्री जीवनाचा वेध घेतला असून, एकाच कवितेत स्त्री जीवनाचे विविध पैलू प्रतिकात्मक रुपात मांडले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कवितेचा समावेश हा मोठा गौरव आहे. या कवितेचे पुस्तक करण्याचा मानस आहे. - वैशाली सोर, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळोशीतील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील आकाश पांडुरंग गिते (वय २२) या सर्पमित्राचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला. आकाश गिते हा चार वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करीत होता. त्याने आतापर्यंत अनेक विषारी साप पकडून ते जंगलात सोडले आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरेवाडी येथे शेतात काम करत असताना नाग आढळून आला. त्याने हा नाग पकडला मात्र चपळ असणाऱ्या नागाने आकाशच्या कानाच्यावर चावा घेतला व आकाशच्या तावडीतून सुटला. थोड्याच वेळात आकाशला चक्कर यायला लागली. त्याच्या मित्राने त्याला लागलीच इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. नाशिकला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे तळोशीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपेक्षितांची शिक्षण‘सुधा’!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : 'वेळ नाही', 'आमचा काय संबंध?', 'काय फरक पडणार आहे?' असा नकारात्मक विचार करणाऱ्या पांढरपेशी समाजाला आरसा दाखवण्याचे काम सुधा मेहता या उद्योजिका गेल्या एक तपापासून करीत आहेत. आपला व्यवसाय खंबीरपणे सांभाळणाऱ्या मेहता यांच्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या शेकडो मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पडला आहे.

महात्मानगरमध्ये कुरियर कंपनीचे कार्यालय चालवणाऱ्या सुधा मेहता यांना लहानपणापासून शिकविण्याची आवड. सुनील मेहता यांच्याशी विवाह झाल्यानंतर अगदी घरगुती काम म्हणून त्या इयत्ता १०वीपर्यंतच्या मुलांची शिकवणी घ्यायच्या. पुढे कुरिअर कंपनीचा विस्तार झाला. त्यामुळे त्यांचा हा छंद कमी झाला. एक दिवस महात्मानगर येथीलच एका मैत्रिणीच्या बंगल्यावर गेलेल्या मेहता यांच्या आयुष्यात ही संधी पुन्हा चालून आली. बंगल्याच्या वॉचमनचा मुलगा शिक्षण घेत नसल्याचे त्यांना समजले. तेव्हा मेहता यांनी त्याची समजूत घातली. व्रात्यपणा सोडून शिकेन, पण तुम्ही शिकवणार काय? असा प्रश्न मुलाने उपस्थित केला. आपले ज्ञान दुसऱ्यास द्यावे, अशी शिकवण असलेल्या मेहतांनी लागलीच त्यास होकार भरला. या मुलासोबत आणखी मित्र आले. जवळपास १२ वर्षांपूर्वी महात्मानगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत ज्ञानाजर्नाचे काम सुरू झाले. इमारतीत वॉचमन असलेल्या कामगाराने आपल्या मुलांना यात सहभागी करून घेतले. हळूहळू मुलांची संख्या वाढत असताना इमारतही पूर्ण झाली. इमारतीच्या आडोशाला सुरू असलेला क्लास एकाच दिवसात खुल्या आभाळाखाली आला. मेहता यांच्या फ्री क्लासची माहिती झोपडपट्टी भागात पसरली. महात्मानगरसारख्या भागात वॉचमन, घरकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा अर्थ नव्याने उमगला. विद्यार्थी शाळेत जातो म्हणजे शिक्षण घेतोच, असे नाही. झोपडपट्टीतील मुले शाळेत जातात पण घरी परतल्यानंतर घरातील, आजुबाजूच्या परिस्थितीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो, याची जाणीव मेहतांना होती. त्यामुळे पहिल्या ठिकाणी नकारघंटा मिळताच त्यांनी विश्वास ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. ठाकूर यांनी जागा देण्यास होकार दर्शवला. गंगापूररोडवर तेव्हापासून सुरू झालेला ज्ञानयज्ञ आज अविरत सुरू आहे. आजमितीस मेहता यांच्या क्लासमध्ये तब्बल १२५ पेक्षा विद्यार्थी अगदी मोफत शिक्षण तसेच जीवन कौशल्याचे धडे घेतात. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. झोपडपट्टीतील मुलींना फारतर दहावी किंवा बारावीपर्यंत शिकवले जाते. यानंतर पैसा नसल्याने मुलींचे शिक्षण थांबवले जाते. ही बाब मेहता यांच्या लक्षात आली. यावेळी जायंट ही संस्था पुढे आली. मेहता यांच्या क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी बुद्धिमत्तेची धनी असलेल्या मुलींना ही संस्था पुढील शिक्षण, तसेच करियर घडवण्यासाठी दत्तक घेते. सध्या या क्लाससाठी सेवानिवृत्त किंवा याच ठिकाणी शिक्षण घेतलेल्या मुली शिक्षक म्हणून काम करतात. पावसाळ्याचे चार महिने खूपच त्रासदायक असतात. आजही हा क्लास उघड्यावरच भरतो. मात्र, विद्यार्थ्यांकडून एक पैसाही घेतला जात नाही. काही शिक्षकांना मेहता आपल्या कमाईतील पैसा मानधन म्हणून देतात. फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नाते प्रस्थापीत व्हावे म्हणून कधीही प्रयत्न केले जात नाही. तर विद्यार्थ्यांमधील चांगला माणूस घडावा, यासाठी मेहता यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करतात.

गवसल्या नोकरीच्या वाटा

या संस्थेत शिक्षण घेणारी काही मुले इंजिनीअर झाली. कोणी डिग्री घेऊन नोकरी करत आहे. झोपडपट्टीतील शिक्षित मुलांना पायावर उभे करण्याचे व्रत घेतलेल्या मेहता यांनी आपल्या कुरियर कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्यामुळे येथे किमान पाच मुले आपली उपजीविका भागवतात. वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी याबाबत आगपाखड करणाऱ्या समाजाने कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. आपण भले आणि आपले कुटुंब अशी धारणा असलेल्यांना सुधा मेहता यांनी आपल्या कार्यातून आदर्श घालून दिला. एका मुलाच्या रुपाने लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले ते मेहता यांच्या शिक्षणावरील निस्सीम श्रद्धेमुळेच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्थायी'चा सुभेदार शनिवारी ठरणार

$
0
0

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर; भाजपमधील असंतोष शिवसेना उचलणार फायदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभापतीदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून येत्या शनिवारी (दि. १७) निवडणूक होणार आहे. या पदासाठी शुक्रवारपर्यंत (दि. १५) अर्ज दाखल करता येणार असून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. भाजपकडे बहुमत असले तरी पक्षांतर्गत असंतोषाचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेकडून भाजपविरोधातील सर्वपक्षीयांची मोट बांधली जाणार आहे. शिवसेना उमेदवार देणार असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जाहीर केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बजेटची अडवणूक करण्यासाठी भाजपने सदस्य निवडीचा ठराव दिला नव्हता. परंतु, मुंढे यांनीही बजेट महासभेवर ठेवण्याची रणनीती तयार करताच सत्ताधारी भाजप नेत्यांनी घाईगर्दीत सभापती निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गुरूवारी पाठवला. विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. १२ ते १५ मार्च दरम्यान सभापती पदाचे अर्ज वितरित केले जाणार आहे. शुक्रवारी (दि. १५) दुपारी १ वाजेपर्यंत सभापतीपदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. शनिवारी (दि. १७) साडेसहा वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी सभापती पदाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

स्थायी समितीत १६ सदस्य असून भाजपकडे बहुमतासाठी आवश्यक नऊचा आकडा आहे. शिवसेना ४, राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायीवर भाजपचे बहुमत असले तरी सभापती पदावरून भाजपमध्ये रस्सीखेच आहे. भाजपकडून हिमगौरी आडके आहेर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षातील दोन आमदारांनी त्यांच्याच विरोधात भूमिका घेतली आहे. तर दिनकर पाटील आणि उद्धव निमसे यांचीही दावेदारी मानली जात आहे. त्यामुळे भाजपमधील या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी शिवसेनाही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेने भाजपला शेवटपर्यंत जेरीस आणले होते. त्यामुळे यंदाही शिवसेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या सदस्यांची मोट बांधून भाजपला आव्हान दिले जाणार आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

भाजपमध्ये रस्सीखेच

भाजपकडून स्थायी समितीवर जवळपास ७ महिला आणि दोन पुरूष सदस्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सभापती पदासाठी महिलेलाच संधी देण्याच्या विचारात आहे. मात्र, दिनकर पाटील आणि उद्धव निमसे यांनाही सभापतीपदावर दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सभापतीपदासाठी मोठी रस्सीखेच आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांची बहीण हिमगौरी आहेर-आडके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी दोन आमदारांकडून त्याला शह देण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे डोकेदुखी नको म्हणून तडजोडीचा तिसराच उमेदवारही रिंगणात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोध लढत नाहीच

$
0
0

भाजपसह शिवसेनाही देणार उमेदवार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मनसेने अॅड. वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली असून भाजपनेही निवडणूक प्रतिष्ठेची करत जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप उमेदवार उतरविणार असल्याने शिवसेनेनेही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

मनसेच्या ज्येष्ठ नगरेसविका सुरेखा भोसले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मनसेच्या वतीने भोसले कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी (दि. १०) याबाबत बैठक होत असून इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. भाजप सर्व शक्तीनिशी या निवडणुकीत उतरून जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने उमेदवार उतरवल्यास शिवसेनाही उमेदवार देईल, अशी घोषणा शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. यात बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भाजपने निवडणूक लढवल्यास शिवसेनेनेही लढतीत उतरावे, असे मत व्यक्त केले. त्यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली आहे.

तिरंगी लढत रंगणार

मनसे पाठोपाठ भाजप आणि शिवसेनेचाही उमदेवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेसोबत गेल्या वेळेस ही निवडणूक एकत्रित लढवली होती. त्यामुळे मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रसद मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांचा आज ‘हल्लाबोल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन यशस्वी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची उत्तर महाराष्ट्रातील समारोप सभा आज, (दि. १०) नाशिक येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे. यासाठी शनिवारी सायंकाळी ४ वाजता गोल्फ क्लब मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीने ठिकठिकाणी बॅनर व झेंडे लावले आहेत.

राज्यात राष्ट्रवादीने १ डिसेंबरपासून सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भ, मराठवाडयामध्ये हे आंदोलन झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात १० दिवसांत २१ सभा घेत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आता या आंदोलनाची सांगता नाशिकच्या जाहीर सभेने होणार आहे. ही सभा व्हावी, यासाठी राष्ट्रवादीने महिनाभरापासून जोरदार तयारी केली आहे. या सभेनंतर आता पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही हल्लाबोल आंदोलन होणार आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता जाहीर सभेला अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घरबसल्या मुद्रांक अन् नोंदणीची कामे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई, पुणे व ठाणे पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुध्दा मुद्रांक व नोंदणी विभागाशी संबंधित कामे घरबसल्या करता यावे, यासाठी ऑथराइज सर्व्हिस प्रोव्हाइडरची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या विभागाचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी ऑनलाइन अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्याचाही वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणतीही मालमत्ता खरेदी करीत असताना त्याचा ३० वर्षांचा इतिहास, बोजा व वाद याबाबतची माहिती सर्च केल्यानंतर मिळावी, यासाठी कामकाज सुरू आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना अधिक सुलभता येणार आहे. त्याचप्रमाणे ई-व्हॅल्यूएशनच्या माध्यमातून मिळकतीची माहिती नमूद करून थेट मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. यामुळे पारदर्शीपणा वाढून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कवडे यांनी मुद्रांक विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रेझेन्टेशनही दाखवले. त्यानंतर त्यांनी हा विभाग देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले. आपली प्रणाली आता देशाने स्वीकारली असून, त्याचा सर्वत्र वापर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोंदणी विभागात असलेले अनेक मसुदे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्याचा फॉर्मेट घेऊन नागरिकांनी त्याचा वापर केल्यास त्यांना ही कामे करता येणार आहे.

ई-पेमेंट वाढविण्याचा प्रयत्न

मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ई-पेमेंट सुविधा, ई-रजिस्ट्रेशन, नागरिकांसाठी पूर्णवेळ हेल्पलाइन, आय सरिता, ई-सर्च, ई-म्युटेशन, ई-एएसआर, मॅरेज रजिस्ट्रेशन, दस्त पडताळणी- एसएमएस सेवा, स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर, सारथी हेल्पलाइन या सुविधा उपलब्ध असून, त्याचा वापर जास्तीत जास्त केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक टाळणे हा उद्देश आहे. ई-पेमेंट वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेशांचेच दहन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उघड्यावर अस्वच्छता करणाऱ्यांसह कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून, उघड्यावर कचरा जाळल्यास ५ ते २५ हजारापर्यंत दंड करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने एकीकडे या आदेशाची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू केली असतानाच, पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाच या आदेशाचा विसर पडला आहे. शहरातील नागरिकांना कचऱ्याबाबत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महापालिकेच्याच सिडकोतील बांधकाम विभागाच्या शेडमध्ये मात्र कर्मचाऱ्यांनी सर्रासपणे कार्यालयातील कचरा आणि कागदपत्रे उघड्यावर जाळून जणू लवादाच्या आदेशाचेच दहन केले आहे. त्यामुळे नागरिकांवर कारवाई करणारी महापालिका या विभागावर काय कारवाई करते, याकडे नाशिककरांचे लक्ष आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने उघड्यावर कचरा व प्लास्टिक जाळण्यास बंदी घातली असून, असा उघड्यावर कचरा जाळल्यास संबंधिताला ५ ते २५ हजारांचा दंड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, त्याची राज्यसरकार व महापालिकांसह अन्य स्थानिक संस्थांकडून अंमलबजावणी केली जात आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातही हा आदेश लागू करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्यास त्याला पाच ते पंचवीस हजार दंड करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही या आदेशाची काटेकोरपणे अंमबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. गुरुवारी सिडकोत आरोग्य विभागाच्या पथकाने ऑनलाइन तक्रारीच्या आधारे भागू राजाराम मटाले यांना पाच हजारांचा दंड केला. सिडकोतील हा दंडाचा पहिलाच प्रकार असल्याने नागरिकांमध्ये या कारवाईने दहशत बसली आहे.

आरोग्य विभागाने एकीकडे शहरात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली असतानाच, महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या सिडकोतल्या दुर्गानगरमधील बांधकाम विभागाच्या शेडमध्ये मात्र या आदेशाची होळी करण्यात आली. महापालिका आयुक्तांकडून सध्या कार्यालयांची साफसफाई व स्वच्छता मोहीम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्व कार्यालयांची साफसफाई करून त्यातील कचरा बाहेर काढला जात आहे. हा कचरा व कागदपत्रे खत प्रकल्पावर जाणे अपेक्षित असताना, विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बहाद्दर कर्मचाऱ्यांनी तो चक्क बांधकाम विभागाच्या शेडमध्ये आणून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण' अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. नागरिकांना कचराप्रकरणी जबर दंड करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे आता लक्ष लागून आहे.

घाईगडबडीत विल्हेवाट

नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून कार्यालयाच्या आवारात हा कचरा व कागदपत्रे जाळण्यात येऊन लगोलग त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कचरा जाळल्याची बाहेर बोंबाबोब होऊ नये म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी जाळलेल्या कचऱ्याचा ढीग एका गाडीत भरून तो बाहेर फेकण्याचाही आटापिटा केला. त्यामुळे नागरिकांनाच उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कृतीने महापालिकेच्या उद्देशांवर वरवंटा फिरवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनसाठी मार्चएंडचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर फेरिवाला धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला असून रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून रस्त्यांवरील फेरिवाल्यांविरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक पडसाद उमटत असून, आतापर्यंत २२५ पैकी ६६ हॉकर्सझोनची अंमलबजावणी झाली आहे. २५ हॉकर्स झोनबाबत तक्रारी असून, १३४ हॉकर्स झोनची अंमलबजावणी मार्चपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे महिनाभरात उर्वरित १३४ हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

हॉकर्सच्या विरोधामुळे शहरातील हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी रखडली होती. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. मुख्य रस्त्यांवरील हॉकर्सवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून हॉकर्स व अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात ९६२० हॉकर्सची नोंदणी झाली असून, त्यांच्यासाठी २२५ हॉकर्सझोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील २५ हॉकर्स झोनबाबत फेरिवाल्यांचे आक्षेप आहेत. १६६ मुक्त फेरिवाला क्षेत्रे असून, ५९ प्रतिबंधित फेरिवाला क्षेत्रे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६६ फेरिवाला झोन तयार करण्यात आले आहेत, तर उर्वरित १३४ हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी मार्चचे अल्टिमेटम आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे २० मार्चपर्यंत हॉकर्स झोनची अंमलबजावणी केली जाणार असल्याने त्यासाठी अतिक्रमण विभागाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉकर्स झोन तयार झाल्यानंतर त्यांची मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यांनतर निवडणूक घेतली जाणार आहे.

विभाग हॉकर्स झोन

नाशिक पूर्व ७

पंचवटी २०

नाशिक पश्चिम ७

नाशिकरोड ८

सिडको १३

सातपूरमध्ये ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज 'एमएसटी' बोगीची

$
0
0

प्रवासादरम्यान पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांचा जागेसाठी रोजचाच संघर्ष

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जागतिक महिला दिनानिमित्ताने मनमाड व नाशिक येथून पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलांचा बॅच देऊन सत्कार करण्यात येणार आला. मात्र, एक दिवस सत्कार करण्यापेक्षा महिला पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी (एमएसटी) सुरू करून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

महिला दिनानिमित्ताने पंचवटी एक्स्प्रेसमध्ये विविध क्षेत्रातील कर्तबगार भारतीय महिलांचे माहिती देणारे बोर्ड लावण्यात आले. भुसावळ रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले जात असले तरी महिला प्रवाशांचा जीवघेणा प्रवासाचा प्रश्न सोडविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सत्कार हवाच

पंचवटी एक्सप्रेस ही चाकरमान्यांची गाडी आहे. यामधून मुंबईला अप-डाऊन करणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांची संख्या मोठी असते. ही गाडी 21 बोगींची असली तरी ती अपुरी पडत आहेत. मासिक पासधारकांसाठी दोन बोगी आहेत. एक एसी बोगी आहे. नाशिक रेल्वे परिषदेच्या प्रयत्नांमुळे शिस्त, स्वच्छता यामुळे या बोगीचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे. एवढे असतानाही महिलांसाठी मात्र गैरसुविधाच आहे. या गाडीने प्रवास करणे म्हणजे महिलांसाठी दिव्यच आहे. त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.

चाकरमान्या महिलांचे हाल

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक येथून महिला प्रवासी बसतात. मात्र, त्यांना जागाच नसते. या गाडीत दोन महिला बोगी आहेत. पण एका बोगीत पुरुषांची घुसखोरी असते. रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. दुसऱ्या बोगीत अप-डाउन न करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असते. त्यामुळे अप-डाउन करणाऱ्या महिला प्रवाशांचे हाल होतात. त्यातू वाद होतात. अप-डाउन करणाऱ्या महिलांसाठी पासधारक (एमएसटी) बोगी नाही. रोज अप-डाउन करणाऱ्या महिलांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो. त्यातून गुडघेदुखी, कंबरदुखी आदी समस्या निर्माण होतात. या गाडीत महिला सुरक्षा समस्या नाही. पिण्याचे पाणी व अन्य सुविधा आहेत. छेडछाड व चोरी या घटना शक्यतो होत नाहीत. जागेवरून वाद मात्र नेहमीच होतात, असे महिलांचे म्हणणे आहे.

पंचवटी एक्स्प्रेसमधील आम्ही महिला रोज कसा प्रवास करतो, काय हाल सहन करतो, कोणत्या दिव्यातून रोज जातो हे फक्त आम्हालाच माहित आहे. नोकरदार महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बोगी सुरू केल्यास आमची लढण्याची ताकद तरी वाढेल.

- प्रा. आशा कदम, प्रवासी महिला

स्वागताचे ठिकठिकाणी बोर्ड

जेलरोड : पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलांचा बॅच देऊन महिला दिनी सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील कर्तबगार भारतीय महिलांचे माहिती देणारे आणि स्वागत करणारे बोर्ड लावण्यात आले होते. भुसावळ रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले जात असले तरी महिला प्रवाशांचा खास करुन अप-डाउन करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रश्न सोडविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, भुसावळ विभागीतल नवीन अमरावती रेल्वेस्टेशनमध्ये सर्व महिला नियुक्त करण्यात आल्या आहेत. बडनेरा, शेगाव, नाशिक या रेल्वे स्टेशनवर सॅनिटरी नॅपकीन मशिन्सचे उद्घाटन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावनोंदणीची आज शेवटची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलांना उत्सुकता असलेली ऑल वुमन पॉवर रॅली येत्या रविवारी (ता. ११) सकाळी सात वाजता पार पडणार आहे. महिलांनी मिळून धम्माल करण्याबरोबरच नारीशक्तीची एकजूट दाखवून देण्याची संधी यानिमित्ताने त्यांना मिळणार आहे.

खास स्पर्धा आणि बक्षिसेही

रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला व ग्रुपसाठी यावर्षीही खास स्पर्धा होणार आहेत. बेस्ट ड्रेस, बेस्ट हेल्मेट, बेस्ट बाइक सजावट, बेस्ट सामाजिक संदेश आणि ग्रुपसाठी बेस्ट ड्रेसकोड या प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहे. विजेत्या महिला व ग्रुपसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

हे नियम लक्षात ठेवा

- रॅलीमध्ये सहभागी होताना लायसन्स, पीयूसी आणि गाडीची कागदपत्रे जवळ ठेवा.
- गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
- वळणांवर बाईक काळजीपूर्वक चालवा.
- रॅलीसाठी निश्चित केलेल्या मार्गावरूनच सहभागी व्हा.

नोंदणीसाठी

- रॅलीत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे..
- सकाळी ६. ३० वाजता ईदगाह मैदान गोल्फ क्लब याठिकाणी नावनोंदणीला सुरुवात होणार असून, प्रत्येक सभासदाला एक माहिती अर्ज भरणे आवश्यक आहे.
- संयोजकांकडून देण्यात येणारे गाडी क्रमांकाचे स्टिकर गाडीवर लावणे आवश्यक आहे.

असा असेल रॅलीचा मार्ग

ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) - चांडक सर्कल - मायको सर्कल- एबीबी सर्कल- महात्मानगर - जेहान सर्कल - गंगापूर रोड - डोंगरे वसतिगृह - कॅनडा कॉर्नर - जुना सीटीबी सिग्नल - मायको सर्कल - चांडक सर्कल - ईदगाह मैदान (गोल्फ क्लब)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७६ लाभार्थींना घरकुलाचे अनुदान

$
0
0

महापालिका १७ कोटी ४१ लाखांचा प्रस्ताव सरकारला पाठवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील २७६ लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या २७६ लाभार्थ्यांसाठी १७ कोटी ४१ लाख रुपयांचा सुधारित प्रकल्प अहवाल महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरकुलांची प्रतिक्षा संपणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली असून त्याच्यावर सध्या काम जोमाने सुरू आहे. चार घटकांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी देशभरात केली जात आहे. पहिल्या घटकांतर्गत झोपडपट्ट्यांचा आहे तेथे पुर्नविकास केला जाणार आहे. दुसऱ्या घटकात कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांना गृहकर्ज व्याज अनुदान साहाय्य दिले जाणार आहे. तिसऱ्या घटकात खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. तर चौथ्या घटकात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांच्या उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. चार पैकी चौथ्या घटकांतर्गत घरकुलांच्या उभारणीसाठी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २७६ लाभार्थींची निवड केली आहे. म्हाडाच्या निर्देशांनुसार जीएसटी आणि सुधारित ई-डीएसआर प्रमाणे प्राकलन तयार करून १७ कोटी ४१ लाखांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो सरकारच्या मान्यतेसाठी महापालिकेकडून पाठवला जाणार आहे. त्यामुळे या २७६ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन कार्यालयाबाहेर मद्यपींचा भरतो अड्डा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबक रोडवरील वन जमिनींची देखभालीसाठी व ग्रामीण भागात येणाऱ्या बिबट्यांवर तात्काळ कारवाई करता यावी, यासाठी सातपूर गावालगत वन विभागाकडून कार्यालय उभारण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या कार्यालयाबाहेर मद्यपींचा अड्डा भरत असल्याचे चित्र आहे. याबाबत वनविभागाने सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार देत मद्यपींवर कारवाईची मागणी केली आहे.

सातपूर गावालगत वन विभागाची २० गुंठे आरक्षित जागा आाहे. तेथे वन विभागाने आपले नवीन कार्यालय नुकतेच थाटले. परंतु, कार्यालय बंद झाल्यानंतर तेथे मद्यपींचा वावर वाढतो. पेग रिचविण्यासाठी त्यांना जणू हक्काचे ठिकाण उपलब्ध झालेले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या समोर देशी, विदेशी मद्याचे मोठे दुकान आहे. शेजारीच पाण्याच्या बाटल्या, प्लास्टकचे ग्लास आणि चणे फुटाणे विक्रेतेही असतात. त्यामुळे मद्य विकत घेतल्यानंतर वन विभागाच्या पायऱ्यांवरच मद्यपींची मैफल रंगते.

सातपूर भागात महापालिकेचे अनेक मोकळ्या भूखंडांवर अंधार पडल्यावर मद्यपींची गर्दी जमते. आता तर वन विभागाचे कार्यालय मद्यपींना निवडल्याचे दिसत आहे. मद्यपींकडून तेथे मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ग्लास, कचरा तसाच टाकून दिला जातो. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनकडे वन क्षेत्रपाल अधिकारी गणेश वाघ यांनी लेखी तक्रार केली आहे.

सातपूर गावाच्या मुख्य रस्त्यावर वन विभागाच्या जागेवर १ मार्चला रोजी नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र, येथे मद्यपींकडून रोजच घाण केली जाते. या प्रकरणी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

- गणेश वाघ, वन क्षेत्रपाल अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तालुक्यांत राबविणार ‘जलसमृद्धी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील युवा मित्र संस्था व टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला व देवळा तालुक्यांमध्ये जलसमृद्धी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सहा तालुक्यांतील ५२ धरणांमधून सुमारे ६५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट आहे. पाच वर्षांकरिता राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टकडून ३० कोटी तर राज्य शासनाकडून डिझेल खर्चापोटी १२ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, टाटा ट्रस्टने जलसमृद्धी कार्यक्रमासाठी सहा पोकलेन मशिन तातडीने दिले आहेत. शनिवार १० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता लोणारवाडी येथे युवा मित्रच्या कॅम्पसमध्ये पोकलेन मशिन हस्तांतरण कार्यक्रम तर भोजापूर, उंबरदरी आणि कोनांबे धरणांतील गाळ उपसा कामाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जलसंवर्धन व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., टाटा ट्रस्टचे मुंबई येथील अधिकारी अरुण पांदी, आनंद बंग, आय. एल. ऍड एफ एस, इन्फ्रा असेट मॅनेजमेंट लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश शहा, कुमार चैतन्य, मुकुल गुप्ते, लघु सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रकल्पात सामाविष्ट असलेल्या सिन्नर, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा या सहा तालुक्यांतील ५२ लघुपाटबंधारे व मध्यम धरणामधून 65 लाख घनफूट गाळ उपसा करणे व जलाशयांचा जलसाठा वाढविणे, त्याबरोबरच या सहा तालुक्यांतील 319 गावामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची शाश्वती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

धरणांतून उपसा होणाऱ्या गाळापासून सुमारे ५६६७ एकर जमिनीची सुपीकता वाढणार आहे. पाण्याचे योग्य नियमन व्हावे व जलाशयांच्या देखभाल-दुरुस्ती साठी ५२ पाणीवापर संस्थांची स्थापना करण्यात येणार आहे. दरम्यान, गाळ जलसमृध्दी कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या प्रत्येक धरणावर गाळ उपसा समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, धरणापासून शेतीपर्यंत गाळ वाहून नेण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी माहिती पोटे यांनी दिली.

असा आहे जलसमृद्धी कार्यक्रम

युवा मित्र व टाटा ट्रस्ट यांनी सिन्नर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत जलसमृद्धी कार्यक्रम यशस्वी केला. त्याचे दृश्य परिणाम आल्यानंतर दोन्ही संस्थाच्या वतीने जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये लघू पाटबंधारे व मध्यम धरणांतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कामासाठी टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने युवा मित्र संस्थेला ६ पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

$
0
0

मणक्याला इजा होऊनही ओमकारने दिली बारावीची परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपत्ती कितीही मोठी असली तरी जिद्दीपुढे त्या थिट्या पडतात, याचा प्रत्यय विविध घटनांमुळे येतो. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघात झाला असतानाही त्यातून खचून न जाता त्याने खंबीरपणे परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सर्व पेपर झोपून देत ओमकारने 'पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा!' या कवितेच्या ओळी सार्थ ठरवल्या. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ओमकारने अनेकांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

ओमकार रमेश सांभ हा विद्यार्थी २६ जानेवारीला शिर्डीला दर्शनासाठी गेला होता. परतीच्या प्रवासात वावीजवळ अपघात झाल्याने ओमकारचा पाठीचा मणका सरकला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने ओमकार आणि त्याच्या पालकांची अवस्था गंभीर झाली. डॉक्टरांनी सलग तीन महिने त्याला बेड रेस्ट सांगितली.

परंतु, ओमकारची इच्छाक्ती अन् केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या केंद्र संचालक आणि शिक्षकांनी बोर्डाला विनंती केली आणि ओमकारला गादीवर झोपूनच पेपर देता येता येतील अशी परवानगी मिळवली. वर्ष वाया जाईल या भीतीने पाठीच्या दुखण्याची पर्वा न करता ओमकारने बारावीचे सर्व पेपर गादीवर झोपूनच दिले. पेपरसाठी त्याचे पालक चार चाकी वाहनातून घेऊन येत. गेटपासून केंद्र संचालक, शिक्षक, विद्यार्थी त्याला गादीसह उचलून वर्गात आणत. दहावीला साठ टक्के गुण मिळवलेल्या ओमकारला बारावीची परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आशा आहे.

ओमकार सांभ या विद्यार्थ्याच्या इच्छाशक्तीमुळे आम्ही बोर्डाला पत्र दिले. अशा अवस्थेत या विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी बोर्डानेही आम्हासा प्रोत्साहन दिले. त्यामुळे आम्ही व आमच्या शिक्षकांनी या विद्यार्थाला परीक्षा केंद्रावर रोज ने-आण करण्यासाठी मदत केली.

- कैलास गिते, केंद्र संचालक

अपघातानंतर ओमकारला डॉक्टरांनी तीन महिने बेड रेस्ट सांगितला. त्यावेळी बारावीची परीक्षेला नुकतीच सुरुवात होणार होती. अशा अवस्थेत पेपर कसे देणार अशी भीती मनात आली. मात्र, ओमकारने वर्ष वाया जायला नको म्हणून अशा अवस्थेतही पेपर देण्याची तयारी दर्शवली. जिद्द पाहून आम्हीही त्याला प्रोत्साहन दिले.

- ज्योती सांभ, ओमकारची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७ कोटींचा अर्थसंकल्प!

$
0
0

जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी विशेष बैठकीत २०१८-१९ च्या ४६ कोटी ८५ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यामध्ये पंचायत समितीच्या ३ कोटी ९२ लाख २५ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात अनेक नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश असून, त्यात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटासाठी २१ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे नव्या प्रशासकीय इमारतींसाठी या अर्थसंकल्पात १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेली ही बैठक तब्बल सात चालली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पाटील यांच्यासह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या तरतुदीत सूचना केल्यानंतर त्यात काही बदलही करण्यात आले. त्याचे सर्व अधिकारी अध्यक्षांना देण्यात आले. अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या बैठकीत २०१६-१७ च्या ५२ कोटी ९४ लाखांच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

अशी आहे तरतूद

- प्रशासन व मानधन : १ कोटी ५५ लाख ७२ हजार

- सामान्य प्रशासन : १ कोटी ६६ लाख ४७ हजार

- शिक्षण : १ कोटी ४९ लाख ३५ हजार

- बांधकाम : १६ कोटी ९९ लाख ३ हजार

- लघु पाटबंधारे : ४ कोटी ६० लाख ५० हजार

- आरोग्य : ३९ लाख ५५ हजार

- पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती : ७ कोटी २ लाख १२ हजार

- कृषी : १ कोटी २१ लाख

- पशुसंवर्धन : ७० लाख ५० हजार

- वने : ३ लाख

- पेन्शन : ३० लाख

- समाजकल्याण व अपंग कल्याण योजना : ३ कोटी ६० लाख ३३ हजार

- महिला व बालकल्याण : १ कोटी २३ लाख ५० हजार

- संकिर्ण : २ कोटी ११ लाख ८२ हजार

नाविण्यपूर्ण योजना

या अर्थसंकल्पात नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रशासकीय इमारतीसाठी १ कोटी, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अपंगांना त्यांच्या इच्छेनुसार वस्तू घेण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपये तरतूद केली आहे. यासारख्या ११ योजनांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मोठ्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्ते व चौकातील अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मोठी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची तयारी केल्याचे समजते. शहरातील मोठी बेकायदेशीर ७०० बांधकांमावरील प्रलंबित कारवाईला चालना देण्याचे आदेश मुंढे यांनी नगररचना विभागाला दिले असून अशा बांधकामाची यादीच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारच्या विविध जाचक नियमांमुळे शहरातील बांधकाम व्यवसायावर मंदीचे संकट आहे. कपाट प्रश्न, राष्ट्रीय हरित लवाद, सहा व साडेसात मीटरचा वाद, अग्निप्रतिबंधक योजनांच्या आदेशाने तीन ते चार वर्षांपासून बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बांधकामे करून नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यातच ऑटो डीसीआर यंत्रणेमुळे बिल्डर आणि आर्किटेक्टना घाम फुटला आहे. यातून हा व्यवसाय कसाबसा सावरत असताना आता मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे रडारवर घेतली आहे.

लहान अतिक्रमणे हटवल्यानंतर मुंढेंनी आता बेकायदेशीरपणे शहरात उभ्या राहिलेल्या बड्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळवला आहे. नगररचना विभागात अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्रलंबित असून त्या तक्रारींची संख्या सातशेच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. मुंढे यांनी नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या असून त्यात अनधिकत बांधकामांच्या तक्रारींचाही समावेश आहे. आतापर्यंत नगररचनेत पडून असलेल्या ७०० अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची छाननी करून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अहवाल सादर करून ती अनधिकृत बांधकामे, शेड, वाढविलेल्या गॅलरी, बंद केलेल्या बाल्कनी तोडण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images