Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कंत्राटींबाबतचा निर्णय मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या तुघलकी कार्यपद्धतीचा सामना करावा लागत आहे. कंत्राटी पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यामुळे अशा सुमारे एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीने दिला आहे.

राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये म्हटल्यानुसार कंत्राटी कामगारांवरील अटी आणि शर्ती अधिक जाचक करण्यात आल्या आहेत. विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा निर्णय या परिपत्रकाद्वारे घेण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय राज्यभरातील एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची नोकरीची संधीच हिरावून घेण्यात येणार असल्याने राज्यभर याविरोधात बुधवारी आंदोलने करण्यात आली.

सरकारी कामकाज ठप्प

नाशिक येथे तब्बल १५ सरकारी विभागांच्या कार्यालयात कार्यरत शेकडो कर्मचारी सामूहिक रजा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकारच्या या जुलमी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. काळ्या फिती लावून हे कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

२५ टक्के कुटुंबे प्रभावित

गेल्या १५ ते २० वर्षांपासून विविध विभागात अनेक कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. सरकारी सेवेत कायम करण्यात येईल अशी आशा असल्याने कर्मचारी झोकून देऊन जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्ष काम करताना सरकारी सेवेत लागणारे वयही निघून गेले आहे. सरकारी सेवेत कायम करण्याऐवजी प्रथमत: ११ महिन्यांसाठी नेमणूक करण्याचे आणि अशाप्रकारे जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. त्यानंतर पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याचे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजून सुप्रीम कोर्टाने निकाल दिले असून त्याचीही राज्य सरकारने अंमलबजावणी केली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देणे आवश्यक असतानाही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील २५ टक्के कुटुंब प्रभावित होणार आहेत. हे परिपत्रक तत्काळ रद्द करावे अन्यथा मार्च महिन्यात राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाडेकरूंची नोंद करा

$
0
0

पोलिसांनी सोसायट्यांना नोटीस बजावल्या

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी भाडेकरूंची नोंद करायला हवी, अशी सूचना शहरातील सर्वच पोलिस स्टेशनला केल्या आहेत. याबाबत त्या-त्या पोलिस स्टेशनकडून याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. मात्र त्याला काही परिसरातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती देण्यास दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे आता सातपूर पोलिस स्टेशनकडून संबंधित घरमालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जर त्यांनी ही माहिती दिली नाही तर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

नाशिक शहरात सातपूरचा विस्तार वाढला असून, एकेकाळी शिवाजीनगर भागातील फाशीच्या डोंगरावर जाण्याचे धाडसही कोणी करत नसल्याचे सांगितले जायचे. परंतु, आज त्याच फाशीच्या डोंगरावर घरकुलांची मोठी संख्या वाढली आहे. यात गुंतवणूक करणारे बांधकाम व्यावसायिकांकडून घर खरेदी करत भाड्याने देत असतात. अनेकदा झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये भाडेकरूंची नोंदच नसल्याने पोलिसांना तपास करताना मोठी अडचण सहन करावी लागते. त्यामुळे ही समस्या मोठी असून, त्याबाबत पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

पोलिसांकडून घरमालकांनी आपल्याकडे असलेले भाडेकरूंची तत्काळ नोंद करण्याबाबत आवाहनही केले होते. परंतु, याकडे घरमालकच दुर्लक्ष करत असल्याने अखेर सातपूर पोलिसांनी सोसायट्यांना नोटीस बजावल्या आहेत. भाडेकरूंची नोंद करा अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

दरम्यान, सातपूर पोलिसांनी घरमालकांवर भाडेकरूंची नोंदणी केली नसल्याने गुन्हेही दाखल केले होते. असे असतानादेखील सोसायट्यांमधे राहणाऱ्या भाडेकरूंची नोंद करण्यात येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर सातपूर पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्षांनाच नोटीस बजावत घरमालकांना भाडेकरूंची नोंद करण्याबाबत आवाहन केले. भाडेकरूंची नोंद करत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

गुन्ह्यांच्या तपासकामी सहकार्य नाही

विशेष म्हणजे, शेजारी राहणारे रहिवासीदेखील पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासकामी सहकार्य करत नसल्याचे चित्र पहायला मिळते. याकरीता सरकारच्या आदेशावरून पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी घरमालकांनी भाडेकरूंची नोंद करणे गरजेचे केले. तसेच घरमालकांनी भाडेकरूंची नोंद करत नसतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता घरमालकांनी आपापल्या भाडेकरूंची नोंद करीत पोलिसांना सहकार्य आवश्यक झाले आहे. तरी याबाबत तातडीने आपल्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची नोंद करायला हवी, असेही पोलिसांनी या नोटीसद्वारे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी महोत्सवाकडे मंत्र्यांची पाठ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात चारही मंत्र्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे ऐनवेळी या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी क्षेत्रावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत करुन अर्थसंकल्पात अनेक सवलती देऊन या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारचे मंत्री मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड करत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर भुषविणार होते तर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे या महोत्सवाला उपस्थित राहणार होते. पण, या कार्यक्रमाला यापैकी एकही मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे स्थानिक आमदारांवर त्याची जबाबदारी पडली. त्यातही अवघे चारच आमदार उपस्थित होते. त्यापैकी दोन्ही आमदार हे शहरी भागातील प्रतिनिधीत्व करणारे होते. यावेळी नाशिकच्या प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यासह चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ उपस्थित होते. त्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

पाच दिवशीय कृषि महोत्सवात जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. त्यांना या निमित्ताने सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहे हे मंत्र्यांना सांगता आले असते. त्याचबरोबर त्यांच्या दु:खावर फुंकरही घातला आली असती. पण, मंत्र्यांनी दाखवलेल्या या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. २५ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून, शेतकऱ्यांकडून थेट अन्नधान्य खरेदी यातून करता येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाचे वेगळे महत्त्व होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजमीटर बदलण्यास महावितरणकडून गती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज वापराचे अचूक देयक, हे ग्राहकांसह महावितरणला फायदेशीर ठरणारे आहे. त्यामुळेच अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत महावितरणने मीटरचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. एकट्या नाशिक परिमंडळात गेल्या महिनाभरात ४१ हजारपेक्षा अधिक सिंगल फेज मीटर बदलण्यात आले असून नवीन वीज जोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन मीटरचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद असणे, तुटलेला डिस्प्ले, नादुरुस्त मीटर या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही. परिणामी बिलासंदर्भात वाद निर्माण होऊन महावितरणला नुकसान तर वीज ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला आहे. नवीन वीज जोडणी तसेच नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी महावितरणने पुरेशा प्रमाणात मीटरचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण होत आहे.

संबंधित ग्राहकांनी संपर्क करावा

नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी पुरेसे वीज मीटर उपलब्ध झालेले आहेत. महावितरणने साधन सामग्रीच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया इआरपीच्या (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ऑनलाइन केली असून यातून मीटरची उपलब्धतता व पुरवठा प्रक्रिया पारदर्शकतेसह गतिमान झाली आहे. संबंधित ग्राहकांनी नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलून घ्यावेत. यात अडचण आल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नाशिक परिमंडळात गेल्या एक महिन्यात आलेल्या ८० हजार सिंगल फेजच्या नवीन मीटरमधून ४१ हजार २५६ जुने मीटर बदलण्यात आले. नाशिक शहर मंडळात २२ हजार ८७५, मालेगाव मंडळात ८ हजार ५९७ तर अहमदनगर मंडळात ९ हजार ७८४ मीटर बदलण्यात आले आहेत.

बदलेल्या मीटरची विभागनिहाय आकडेवारी

नाशिक शहर मंडळ :
नाशिक शहर विभाग - १ : ९,४३९
नाशिक शहर विभाग - २ : ७,१२१
नाशिक ग्रामीण : ३,८९३
चांदवड : २,४२२
एकूण : २२,८७५

मालेगाव मंडळ :
मालेगाव : ३,२२६
मनमाड : २,३०८
सटाणा : १,७२८
कळवण : १,३३५
एकूण : ८,५९७

अहमदनगर मंडळ :
संगमनेर : ५,१८६
अहमदनगर शहर : २,०५२
श्रीरामपूर : १,७६५
अहमदनगर ग्रामीण : ५८२
कर्जत : ५८२
एकूण : ९,७८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुराणा ज्वेलर्सची ईडीकडून चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गीतांजली ग्रुपचा मेहूल चोक्सी याने नाशिकच्या फ्रँचायसीला सात कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आल्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) नाशिककडे लक्ष वळवले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्सची बुधवारी दिवसभर चौकशी केली. सन २०१३ मध्येच गीतांजलीची फ्रँचायसी सोडून दिल्याची माहिती सुराणा ज्वेलर्सच्या संचालकांनी ईडीला दिली.

देशभरात सध्या पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक चर्चेत आहे. याच प्रकरणातील मेहूल चोक्सी याचा गीतांजली हा ब्रँड आहे. या ब्रँडच्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची बाब उजेडात येत आहे. नाशिकच्या व्यापाऱ्यांनाही चोक्सीने गंडवल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले. त्यानंतर या फसवणुकीची दखल ईडीनेही घेतली आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू केलेली चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती. या चौकशीत गीतांजली फ्रँचायसी असताना केलेल्या व्यवहारांची माहिती घेतल्याचे बोलले जात आहे. अत्यंत गोपनीय पध्दतीने ही चौकशी करण्यात आल्यामुळे दिवसभर सुराणा ज्वेलर्सच्या दोन्ही शोरुम्सध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. ईडीने मात्र या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले होते. या कारवाईमुळे सराफ व्यवसायामध्ये खळबळ निर्माण झाली. नाशिकमध्ये पहिल्यांदा गीतांजली ज्वेलची फ्रँचायसी सुराणा ज्वेलर्सला देण्यात आली होती. पण, काही महिन्यानंतर त्यांनी व्यवहारात पारदर्शकता नसल्यामुळे ती सोडली. त्यानंतर नाशिकरोडवरील दत्त मंदिर चौकातील वैभव ज्वेलर्सच्या भास्कर माळवे व वैभव माळवे यांनी ही फ्रँचायसी घेतली व १८ महिन्यानंतर त्यांनी ती सोडली. आज गीतांजली जेम्सची एकही फ्रँचायसी नाशिकमध्ये नसली तरी ईडीचे चौकशी शुक्लकाष्ठ मात्र सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झगमगाटात हरवला उपचार!

$
0
0

नाशिक : ‘आधीच झालं थोडं, त्यात व्याह्याने धाडलं घोडं’ या म्हणीप्रमाणे आज वैद्यकीय क्षेत्राची वाटचाल सुरू आहे. उपचार पद्धतीत होणारा आमूलाग्र बदल ही काळाची गरज असली तरी त्यात भव्यता आणि दिखाऊपणा केंद्रस्थानी पोहोचला आहे. उभ्या करण्यात येणाऱ्या डौलाऱ्याची किंमत मात्र पेशंटकडून वसूल केली जात असून, उपचारपद्धती महाग होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.

शहरीकरणात दिसणारा झगमगाट फारच झपाट्याने वैद्यकीय क्षेत्रात घुसला. त्याचा परिणाम थेट एकूण वैद्यकीय खर्चावर झाला. कोणतेही धोरण नसताना झालेली प्रगती मुळावरच उठणारी असते, याची प्रचीती वैद्यकीय क्षेत्राला येते आहे. काहीही करून महिन्याला इतके पैसे मिळालेच पाहिजे, ही संकल्पना यातून पुढे आली.

शिक्षण, हॉस्पिटलसाठी जागा, इमारत, मशिनरी, त्या अनुषंगाने लागणारा सपोर्ट स्टाफ अशी ही मोठी यादी कमी करणे डॉक्टरांच्या हातात आहे. मात्र, स्पर्धेची भीती, मिळणारा पैसा आणि काहीतरी वेगळे करण्याच्या नादात बुद्धिजीवी वर्गातील काही व्यक्ती नको ते मार्ग अवंलबताना दिसतात. फॉरिन मेडिसिन हा त्यातलाच प्रकार! मनुष्यावर थेट औषधांचे प्रयोग फक्त भारतातच केले जातात. त्यात पेशंटची आर्थिक परिस्थिती, जिवाचे बरे-वाईट होणे यापेक्षा औषध कंपन्यांकडून मिळणारा पैसा महत्त्वाचा ठरतो. एकाने सुरू केलेला गोरखधंदा जोरात सुरू झाला, की दुसराही त्याच्या मागे लागतो.

हॉस्पिटलची इमारत, तेथे मिळणारी सुविधा कशी महत्त्वाची हे पटवून देताना पेशंटच्या खिशावर किती भार पडतो, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते आहे. मेडिक्लेमसारखी सुविधा उपलब्ध असली तरी तिचाही दुरुपयोग झाल्याचे प्रकार नवीन नाहीत. मेडिक्लेम म्हंटले, की दहा हजार रुपये खर्चाचा पेशंट हळूच १५ ते १६ हजारांच्या घरात पोहोचवला जातो. एखाद्या विशिष्ट आजाराला नक्की काय उपचार आवश्यक आहे, हे बघून उपचार करणारे डॉक्टर आजही शहरात आहे.

ते झगमगाटाची, तसेच कॉर्पोरेट क्लचरची बरोबरोही साधू शकत नाही. अशा तज्ज्ञांची हळुवार कमी होणारी संख्या भविष्यात त्रासदायक ठरू शकते. पेशंटच्या उपचारासाठी झगमगाट हवा आहे की प्रामाणिक उपचार करणारा डॉक्टर हे ठरविण्याची वेळ आली असून, ज्या सुविधांचा वापर पेशंटने केलाच नाही, त्याचे पैसे आकारणारी हॉस्पिटल्स, तसेच डॉक्टरवर कायद्यानुसार बंधने येणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनावरील ९१३ कर्मचाऱ्यांवर संक्रांत?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या वशिल्याने मानधनावर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. मानधनावरील कर्मचाऱ्यांची आवश्यकता तपासण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले असून, वशिल्याने भरती होऊन वारंवार मुदतवाढ घेणाऱ्या मानधनावरील ९१३ कर्मचाऱ्यांची नोकरीच धोक्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा मोठा दणका ठरणार आहे.

दरम्यान, महापालिकेत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ११ अधिकाऱ्यांची चौकशी महिनाभरात मार्गी लावण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

आयुक्त मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून दणक्यांची मोहीमच सुरू ठेवली आहे. प्रशासनाला शिस्त लावत अधिकाऱ्यांवरही वक्रदृष्टी फिरवली आहे. सहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ महापालिकेत राजकीय नेते, पदाधिकारी व नगरसेवकांच्या वशिल्याने मानधनावर भरती झालेल्या ९१३ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट कोसळणार आहे. या कर्मचाऱ्यांचे काम तपासले जात असून, त्यांची खरेच आवश्यकता आहे का, याबाबतची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे. यातील निम्मे कर्मचारी अंगणवाडीत, तर निम्मे कर्मचारी महापालिकेतल्या विविध पदांवर कार्यरत आहेत. यातील बहुसंख्य कर्मचारी महापालिकेतून निवृत्त होऊनही पुन्हा मानधनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे या अशा निव्वळ वेतनासाठीच महापालिकेत ठाण मांडून पदाधिकाऱ्यांचे खबरे बनून काम करणाऱ्यांवर मुंढे यांची वक्रदृष्टी फिरली आहे. या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात असून, त्यांची उपयुक्तताही तपासली जाणार आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

चौकशीला महिन्याचा अल्टिमेटम

महापालिकेत भ्रष्टाचार प्रकरणी दोन वर्षांपासून ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबित आहे. त्यामध्ये रमेश पवार, जी. बी. पाटील, अविनाश आगरकर, अनिल महाजन अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या चौकशीवर निर्णय प्रलंबित होता. आता आयुक्तांनी ही चौकशी रडारवर घेतली असून, त्यांचा निपटारा करण्यासाठी महिनाभराचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावातील उद्योजकांना वाढती पसंती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील उद्योगीक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदे'ची मंगळवारी सांगता झाली. या जागतिक परिषदेत मालेगाव शहरातील तरुण उद्योजक सहभागी झाले होते. या परिषदेत उभारण्यात आलेल्या 'मालेगाव इंडस्ट्रियल हब स्टॉल'मुळे मॅग्नेटिक महाराष्ट्रत मालेगावचेच्या ब्रँडिंगला चालना मिळाली असून, अनेक नवउद्योजक व गुंतवणूकदारांनी शहरातील प्रस्तावित एमआयडीसीत उद्योग उभारणीसाठी तयारी दर्शविली आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेत मालेगावची देखील इंडस्ट्रियल हब म्हणून गुंतवणूकदरांना ओळख व्हावी या हेतून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने चार स्टॉल उभारण्यात आले होते. शहरातील साखर उत्पादनातील एम. बी. शुगर, कापड उद्योगातील एच. पी. टेक्सस्टाइल या प्रायोजाकांसह अन्य नवउद्योजकांचे स्टॉल येथे उभारण्यात आले होते. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मालेगाव इंडस्ट्रियल हब नावाने उभारलेले स्टॉल पाहून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह वस्त्रउद्योग मंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी भेट देवून मॅग्नेटिक महाराष्ट्र मधील मालेगावच्या सहभागाने सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. यासह परिषदेत आलेल्या अनेक उद्योजकांनीही मालेगावच्या स्टॉलला आवर्जून भेटी दिल्या. यासह कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे, नाशिक, सुरत येथील नवउद्योजक व गुंतवणूकदार यांनी अजंग येथील प्रस्तावित एमआयडीसीची माहिती घेत जमीन व्यवहारासाठी उत्सुकता दर्शविली. तसेच उद्योग उभारणीचीही तयारी दर्शविल्याचे मालेगावचे उद्योजक अरविंद पवार यांनी सांगितले. 'निमा'ने देखील समन्वयातून प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

उद्योगस्नेही ओळख होण्यास मदत

तीन दिवशीय परिषदेत हजाराहून अधिक उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांनी येथे भेट दिली. या परिषदेतील सहभागासाठी शहरातील मनोज बाहेती, शाम मुंदडा, सम्यक लोढा, चिंतन जैन, तुषार बोरसे, पवन जाधव, नितीन देवरे, प्रतिक देसाई आदी नवउद्योजकांनी परिश्रम घेतले. या परिषदेच्या निमित्ताने उद्योग व औद्योगिक क्षेत्रात संवेदनशील मालेगाव शहराची नवी उद्योगस्नेही ओळख निर्माण होण्यास मदत झाली असून, येणाऱ्या काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा आशावाद मालेगावातील उद्योजकांनी व्यक्त केला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी

$
0
0

ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शिवाय दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्याही मोठी झाली. मात्र, प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या तोकडी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले. उभय पक्षांमधील वाद समुपदेशन आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गंजमाळ येथे एक 'कोर्टाची पायरी चढण्याआधी' या आगळ्या वेगळ्या विषयावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात मंचावर जिल्हा विधी सेवा आयोगाचे सचिव न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के आणि ज्येष्ठ वकील इंद्रायणी पटणी उपस्थित होते.

जयंत जायभावे म्हणाले, की भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय उभय वकील आणि न्यायालये यांच्यावरील जबाबदारीचीही जायभावे यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली. न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के यांनी लोकन्यायालायचे महत्त्व विशद करून त्याबाबतच्या सर्व तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालायच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले.

वरिष्ठ वकील अॅड. इंद्रायणी पटणी यांनी कौटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त करून कौटुंबिक न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे विषद केले. चर्चासत्रात राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलिपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंथ लीडर शेखर ब्राह्मणकर आणि उपासना टिबरेवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत नळजोडण्या तोडल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेला प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिकेने आता अनधिकृत नळकनेक्शनधारक रडारवर घेतले असून, त्यांच्या विरोधात शोधमोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत दोन दिवसांत ६८ अनधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले असून, १९ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरभर अनधिकृत नळकनेक्शन तपासले जाणार असून, अशा कनेक्शनधारकांची नावे कळविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. यासाठी बुधवारपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करुन घेण्यासाठी ४५ दिवसांची अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेस २० डिसेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या नागरिकांनी अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेतले नाहीत, अशा नळजोडणीधारकांच्या जोडण्या बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशान्वये सहाही विभागांमध्ये अनधिकृत नळकनेक्शन शोधमोहीम बुधवारी राबविण्यात आली.

पहिल्यादिवशी ३४ कनेक्शन बंद
पहिल्या दिवशी एकूण ३४ अनधिकृत नळकनेक्शन बंद करण्यात आले असून, ११ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर गुरुवारी ३० अनधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले तर ८ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे दोन दिवसात ६८ अनधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. यापुढेही ही मोहीम सुरू राहील. अनधिकृत नळजोडणी व पाणीचोरीबाबत काही माहिती असल्यास त्याबाबत पाणीपुरवठा विभागास कळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमण हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
सिडकोतील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमण काढण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. दोन दिवसांपूर्वी येथील भाजी बाजार हटविल्यानंतर आता या रस्त्यावर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण महानगरपालिकेने हटविले. सुमारे पन्नास दुकानांसमोरील अतिक्रमण काढण्यात आले.
सिडकोतील त्रिमूर्ती चौकात अनेक वर्षांपासून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला हेाता. अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन अनेक अपघात झालेले आहेत. मागील महिन्यापासून या चौकाचे सुशोभिकरण करून येथील वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिस व महानगरपालिका यांच्याकडून सुरू होते. त्यातच पालिकेने दोन दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौकात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना जागा देऊन भाजी बाजार या ठिकाणाहून हटविला होता. त्यानंतर गुरुवारी दुकानांसमोरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन जेसीबींच्या सहाय्याने ३० ते ३५ कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. यावेळी नागरिकांनी काहीसा विरोध केला. परंतु, पालिकेने दुकानांसमोरील पक्के ओटे, शेड हटविण्यास सुरुवात केली.
दत्त मंदिर बस स्टॉपपासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अनेक भाजीविक्रेत्यांनी दुकाने भाड्याने देऊन दुकानांपुढे व्यवसाय सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने सायंकाळी याठिकाणी सर्वात जास्त गर्दी होत होती. त्यातच याठिकाणी असलेल्या दोन शाळांही सायंकाळी सुटल्यावर येथून प्रवास करणे अशक्यप्राय ठरत होते. या मोहिमेमुळे त्रिमूर्ती चौक आता मोकळा श्वास घेणार आहे. संपूर्ण परिसरातील अतिक्रमण काढण्याचे निश्चित करण्यात आल्याने ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

स्वयंस्फूर्तीने काढली अतिक्रमणे
त्रिमूर्ती चौकात प्रथमच अशा प्रकारे व्यापक मोहीम राबविण्यात आल्याने याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली हेाती. अखेर पोलिस बंदोबस्तात वाढ करून पालिकेने ही मोहीम सुरूच ठेवली. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेतल्याचे दिसून आले. काही जणांनी मोहिमेचे स्वरुप पाहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. काहींकडून अतिक्रमण काढण्यास वेळ देण्याची मागणी होत होती.

पवननगर, उत्तमनगरला हातोडा कधी?
सिडकोतील त्रिमूर्ती चौकाप्रमाणे पवननगर, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर याठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न सर्वाधिक असून, यावर पालिका हातोडा चालविणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. सिडकोतील अतिक्रमण हटविण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पोलिसांची उपराजधानीवर सायकलसवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुरक्षित वाहतूक आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचे पोलिस तसेच सपोर्ट स्टाफ असा २० जणांचा चमू गुरुवारी सकाळी नागपूरच्या दिशेने रवाना झाला. या पथकात सहा लष्करी जवानदेखील सहभागी होणार होते. मात्र, अचानक आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे लष्करी जवानांना सायकल रॅलीतून माघार घ्यावी लागली.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ‘नाशिक-नागपूर-नाशिक’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लष्कर आणि पोलिस असे प्रत्येकी सहा आणि त्यांना मदत करणारी टीम असे मिळून हे पथक दहा दिवसांत १५०० किलोमीटरचा प्रवास करून नाशिकमध्ये परत दाखल होणार आहेत. गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोरून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल तसेच देवळाली कॅम्पचे एअर कमांडर जी. सी. भायंदर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर असा पहिला टप्पा हे पथक पाच दिवसांत पूर्ण करतील. त्यानंतर परतीच्या प्रवासात यवतमाळ, वाशिम, जालना, शिर्डीमार्गे नाशिक असे ४ मार्च रोजी हे पथक नाशिकमध्ये परतणार आहे. हा प्रवास तब्बल १५०० किमीचा असून, प्रवासादरम्यान शाळा-महाविद्यालयांसह पोलिस मुख्यालयांमध्ये जाऊन सुरक्षित वाहतूक तसेच आरोग्याचा संदेश या पथकामार्फत दिलला जाणार आहे.

पथकातील शिलेदार
या पथकात क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, पोलिस नाईक सुदाम सांगळे, पोलिस शिपाई दिनेश माळी, किरण वडजे, हर्षल बोरसे, एम. के. धूम, फुलचंद पवार (वाहनचालक) यांचा समावेश आहे. काही स्थानिक सायकलपटूही पथकासोबत असून, एकूण २० जणांचा सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात विरोधी पक्षांची आंदोलने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सत्ताधारी भाजपने महासभेत भरमसाठ करवाढीला मंजुरी दिल्यानंतर याविरोधात जनक्षोभ उसळत असून, विरोधकांनी रस्त्यावर उतरून करवाढीचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. घरपट्टीच्या जबर करवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारपासून सहा विभागीय कार्यालयांवर हल्लाबोल मोर्चे काढून आंदोलने केली जाणार आहेत. नाशिकरोड कार्यालयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. काँग्रेसकडून शुक्रवारी महापालिकेवर आंदोलन केले जाणार आहे. माकपच्या वतीने गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करीत, करवाढीचा निषेध करण्यात आला.
मंगळवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपने निवासी मालमत्ता करात ३३, अनिवासी मालमत्ता करात ६४ तर औद्योगिक मालमत्ता करात ८२ टक्के अशी भरमसाठ वाढ केली आहे. या करवाढीच्या दिवशीच विरोधी पक्षांनी या करवाढीला विरोध करीत, आंदोलनांचा इशारा दिला होता. परंतु, तरीही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याने विरोधकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आजपासून (दि. २३) महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांवर ‘हल्लाबोल’ मोर्चे काढून या करवाढीचा निषेध करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते गजानन शेलार यांनी पत्रकार परिषद घेवून आंदोलनांची घोषणा केली. नाशिकरोड येथे बिटको पॉइंटवरून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला नानावली ते नाशिक पूर्व कार्यालय, २८ फेब्रुवारीला सावतानगर ते सिडको विभागीय कार्यालय, १ मार्च रोजी पंचवटी कारंजा ते पंचवटी विभागीय कार्यालय, २ मार्च रोजी गंगापूर रोड ते नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय आणि ३ मार्च रोजी सातपूर कॉलनी ते सातपूर विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. या करवाढीमुळे बालकाच्या खिशावरच पालकाकडून डल्ला मारण्याचा प्रकार घडत असून हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, महीला कार्याध्यक्षा सुषमा पगारे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेविका समिना मेमन तसेच विभागीय अध्यक्ष उपस्थित होते.

काँग्रेसचे आज आंदोलन
राष्ट्रवादीबरोबरच शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी ११ वाजता महापालिका कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपने केलेली करवाढ ही अन्याय्य असून, ती मागे न घेतल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिला आहे. करवाढीच्या विरोधातील आंदोलनात नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन आहेर यांनी केले आहे. त्यामुळे भाजपची कोंडी अधिकच वाढणार असून ही करवाढ अंगलट येण्याची शक्यता आहे.

माकपची निदर्शने
राष्ट्रवादी आणि काँग्रेस करवाढीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच, गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर माकपच्या वतीने करवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. या करवाढीने सर्वसामान्य माणसांवर कराचा मोठा भार पडणार असून, आर्थिक गणित बदलणार आहे. त्यामुळे माकप या करवाढीचा तीव्र निषेध करत असून ही करवाढ त्वरीत मागे न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दत्तक नाशिककरांची उपेक्षा केली जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी माजी नगरसेवक तानाजी जायभावे, डॉ. श्रीधर देंशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना कुठे आहे?
करवाढीच्या विरोधात महासभेत विरोधात भूमिका घेणारी शिवसेना सभागृहाबाहेर चूप झाल्याबद्दल राष्ट्रवादीने शिवसेनेवर टीका केली. शहर बससेवा आणि करवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेची बस कुठे पंक्चर झाली, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी लगावला. भाजप सेनेची सरकारमध्ये युती आहे. महिनाभरापूर्वी शिवसेनेने परिवहन मंत्र्यांना शहर बससेवेबद्दल अॅक्शन प्लॅन देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा कुठे गेली, असा जाब विचारत, करवाढीवर शिवसेना आता गप्प का, असा सवाल उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीरव मोदीचा नाशिकमध्ये सौर प्रकल्प

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदीची नाशिकमध्ये स्थावर मालमत्ता व सौर प्रकल्प असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही मालमत्ता कोणती व सौर प्रकल्प कुठे आहे, याबाबत अद्याप ईडीने कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे बिल्डर व व्यापारीवर्गात अनेक तर्क लावले जात आहेत. मुंबईपासून जवळ असलेल्या नाशिकमधील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल या हेतूनेच मोदीने ही गुंतवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे.

सीबीआय आणि ईडीने नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे. शहरात मोदी यांनी मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता घेतली आहे. गेल्या आठ दिवसांत नीरव मोदी कुटुंबीयांशी संबंधित मालमत्ता आणि बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या घर व कार्यालयावरही छापा टाकला आहे. या छाप्यांमधून तपास यंत्रणांना काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यात नाशिकची माहिती मिळाली असल्याचे बोलले जात आहे. नीरव मोदीप्रमाणेच गीतांजलीचे मेहुल चोक्सी यांचीसुध्दा नाशिकमध्ये बेनामी संपत्ती असल्याची चर्चा आहे. गेले दोन दिवस ईडीने नाशिकच्या तीन सराफांची दोन दिवस चौकशी केली. त्यात काय हाती लागले हे पुढे आले नाही. ईडीने छापे टाकून जप्त केलेल्या मालमत्तेच्या किंमतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यानंतर ईडीनेसुध्दा सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नाशिकच्या मालमत्तेचा आकडा अद्याप पुढे आलेला नाही.

सौर प्रकल्पाबाबत साशंकता

नाशिकमध्ये नीरव मोदीचा सौर प्रकल्प आहे, याबाबत सोलर सिस्टिमच्या व्यवसायात काम करणाऱ्यांनी साशंकता व्यक्त केली. हा प्रकल्प धुळे जिल्ह्यात असेल असेही काहींचे म्हणणे आहे. पारंपारिक ऊर्जा योजनेच्या मेडाचे नाशिक हे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे नाशिकचे नाव आले असावे असे या व्यावसायिकांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखातातही होणार जय शिवरायचा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी माणूस देशात असो की परदेशात, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही. स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या छत्रपतींची जयंती आता आखात अर्थात, 'यूएई'मध्ये ९ मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे.

आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या देदीप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्स्पायर इव्हेंट्स यूएईतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा, भारुड, एकांकिका, गवळण, लेझीम, बाल्या नृत्य, कोळीगीते इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे वाचन आणि खाद्यसंस्कृती यांसारखे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कीर्तनभूषण, शिवकथाकार व समाज प्रबोधक हभप योगेश्वर उपासनी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतील शिवचरित्र व्याख्यान या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. 'यूएई'मधील शिवभक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रशेखर जाधव, संतोष मोरे, सुहास हांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये आजपासून वाइन फेस्टिवल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाइनच्या ब्रँडिंगसाठी वाइन क्लस्टरच्या वतीने इंडिया ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल साजरा करण्यात येत आहे. त्यात सोमा विनियार्ड येथे शनिवारी 'मराठी तडका' हा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये लावणी नृत्य सादर करण्यात येणार आहे. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अडीचशे डॉक्टर्स 'आरोग्य आणि वाइन' या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती इंडिया ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिली.

इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या माध्यमातून वाइनबाबत जनजागृतीसाठी ९ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान या वाइन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शनिवारी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये २५० डॉक्टरांची बैठक होत असून, त्यामध्ये ग्रेप स्टॅम्पिंग, ग्रेप टू ग्लास, वाइनचा आरोग्यासाठी होणारा उपयोग याबाबत माहिती दिली जाणार आहे. कुंदेवाडी (ता. निफाड) येथील व्हिंटेज वायनरीला मुंबईसह परदेशी पर्यटक भेट देणार आहेत. या ठिकाणी आलेले वाइन पर्यटक कादवा नदीच्या कडेला असलेल्या २७ एकरांवरील कोर्सवर गोल्फ खेळण्याचा आनंद लुटतील. सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या इतर गायकांनी सादर केलेल्या गाण्यांची मैफलदेखील रंगणार आहे. गंगापूर गावाजवळील सोमा वायनरी येथे शनिवारी सायंकाळी 'मराठी तडका : लावणी विथ वाइन' हा कार्यक्रम होईल. रविवारी सुला वायनरीच्या अलीकडे असलेल्या कोंबल स्ट्रीट येथे 'वॉक इन द क्लाउड' हा वायनरीवरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार हिरेंच्या वाहनाला कसाऱ्याजवळ धडक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या इनोव्हा कारला शुक्रवारी सकाळी कसाऱ्याजवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनामुळे अपघात झाला. यात आमदार हिरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातानंतर स्कार्पिओमधील तरुणांनी पळ काढल्याने पाठलाग करताना आमदारांच्या अंगरक्षकाची या तरुणांसोबत बाचाबाची झाल्याने वाद निर्माण झाला.

अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, स्थानिक भाजप व शिवसेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटल्याचा दावा आमदार हिरे यांनी केला आहे.

आमदार हिरे शुक्रवारी सकाळी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे जात होत्या. कसारा घाटात माशाळा फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या इनोव्हा कारला धडक दिली. त्यामुळे इनोव्हाचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झाली नाही. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओमधील तरुणांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार हिरे यांनी या पाठलाग करीत कार अडवली. त्या वेळी कारमधील तरुणांनी स्थानिकांच्या मदतीने उलट आमच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार हिरे यांच्यावर केला. या वेळी आमदार हिरेंचे अंगरक्षक आणि या स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. अंगरक्षकाने रिव्हॉल्हर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे हा वाद चिघळून प्रकरण कसारा पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. इनोव्हा कारचे नुकसान आणि आमदारांवर हल्ल्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू होताच, संबंधित तरुणांनी माफी मागितली. स्थानिक भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनीही मध्यस्थी करीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने आमदारांनी आपली तक्रार मागे घेत वादावर पडदा टाकला.

आमच्या वाहनाला धडक देऊन कारमधील तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाठलाग केल्यानंतर त्यांनीच आमच्याशी हुज्जत घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने अंगरक्षकाने प्रतिकार केला. त्यामुळे किरकोळ वाद झाले. मात्र, स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला.

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासदांसाठी ‘सावाना’चे मोबाइल अॅप

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com
Tweet : bharvirkarPMT

नाशिक : चोपडीवर बोरूच्या टाकाने वाचकांची माहिती नोंदविणारे सार्वजनिक वाचनालय काळाच्या गतीनुसार वेगवान होऊ पाहत असून, लवकरच सभासदांसाठी एक मोबाइल अॅप आणण्यात येणार आहे. या अॅपचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ते सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नित्यनूतन राहण्यासाठी काळाच्या बरोबर राहणे गरजेचे असते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात सावानामध्ये संगणकीकरणाचे वारे वाहू लागले होते. दुर्दैवाने ते बरेच रखडले. त्यामुळे संस्थेने ते काम नव्याने उभे करण्यासाठी कंबर कसली आहे. आता संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे संगणकीकरण झाल्यावर पुस्तक विभागात आधुनिकता येईलच, परंतु कारभार सुविहित होण्यासाठी त्याची फारच मदत होणार आहे. सावानाची वेबसाइटसुद्धा नव्याने तयार होत असून, सावानाचे एक स्वतंत्र अॅपसुद्धा नव्याने विकसित होत आहे. ते झाल्यानंतर वाचक सभासदांना घरबसल्या त्यांना हवे ते पुस्तक वाचनालयात आहे किंवा नाही ते समजेल, तसेच वर्गणीची सूचना, पुस्तक मुदत संपल्याची सूचना या व अशा इतर सेवा वाचकांना त्या मोबाइल अॅपवरच देणे शक्य होणार आहे. या मोबाइल अॅपचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच सभासदांच्या सेवेत हे अॅप देण्यात येणार आहे.

‘लायब्ररी ऑन व्हील’ मेपर्यंत

पुस्तके वाचण्यासाठी सभासदांनी, वाचकांनी वाचनालयापर्यंत जावे ही जुनी परंपरा आहे; मात्र काही ज्येष्ठांना, तसेच नोकरी करणाऱ्यांना ते शक्य होत नाही. वाचनाची इच्छा मात्र अतीव असते. अशांसाठी ‘लायब्ररी ऑन व्हील’ हा उपक्रम येत्या मेपर्यंत सुरू करणार असल्याचे सावानाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी सांगितले. ‘लायब्ररी ऑन व्हील’ हा उपक्रम सुरू झाल्यास वाचकांना त्याचा फायदा होणार असून, मनासारखे पुस्तक या उपक्रमातून त्यांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

$
0
0

सुनीता पाटील, दुर्गा गुडीलू, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र कांगणे, डॉ. सुनीता बोर्डेंचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विद्यापीठाच्या या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली. पुरस्कारमूर्तींमध्ये नाशिकच्या सुनीता पाटील यांना श्रमसेवा, मुंबईच्या दुर्गा गुडीलू यांना रुक्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशाखा काव्य पुरस्कारांत ठाण्याच्या सुशीलकुमार शिंदे, सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे.

आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा 'श्रमसेवा पुरस्कार' नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनीता पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

रुक्मिणी पुरस्कार हा पुरस्कार वैदू या अतिशय मागासलेल्या समाजासाठी काम करणाऱ्या दुर्गा मल्लू गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. समाजातील महिलांचे ५८ बचतगट स्थापन करून, त्यांना प्रौढ शिक्षणवर्गात बसवले. आज अशा प्रकारच्या ८४ महिला मुंबईतील हॉटेल्सना रोज ३००० चपात्या बनवून देण्याचे काम करतात. टिफिन सर्व्हिसबरोबरच अनेक शाळांना नाश्ता बनवून देण्याचे काम करीत आहेत. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार (दि. २७) रोजी सायंकाळी पाच वाजता गंगापूर रोडवरील, शगून हॉल, मते नर्सरीमध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी किशोर पाठक उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. विजया पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे आदींनी केले आहे.

विशाखा काव्य पुरस्कार

कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे 'विशाखा काव्य पुरस्कार' खालील काव्यसंग्रहांना जाहीर झाले आहेत. प्रथम २१ हजार रुपयांचा पुरस्कार वर्तकनगर (ठाणे) येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास, १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार 'येठण' या सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे यांच्या काव्यसंग्रहास, तर १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या 'अस्तित्वाचा अजिंठा कोरताना' या काव्यसंग्रहास दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’ची उद्या नाशिकरोडला धमाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासूनही सुटका करून घेण्याची संधी येत्या रविवारी नाशिककरांना ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्याशाळा, जेलरोड येथे रविवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिकरोड येथील रहिवाशांची सकाळ हॅपी होणार आहे.

नेहमीच वाहतुकीने गजबजलेले रस्ते आपल्यासाठी खुले होणे, हा विचारच आपल्याला सुखावून जातो. त्यातच या रस्त्यांवर विविध खेळ, उपक्रम, डान्स, गाणी होणार असतील तर त्याची मजाच न्यारी असते. हीच मजा हॅपी स्ट्रीटमधून अनुभवण्यास मिळत असल्याने हा उपक्रम नेहमीच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये कॉलेजरोड व गोविंदनगरमधील हॅपी स्ट्रीटला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता वेळ आहे नाशिकरोड, जेलरोडवासीयांना हॅपी करण्याची. येत्या रविवारी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, झुम्बा, स्केटिंग, मेहंदी, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन अशा अनेक कलाप्रकारांचे सादरीकरण या वेळी विविध ग्रुप्सतर्फे होणार आहे. पहिल्या दोन हॅपी स्ट्रीटला धमाल केलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे नाशिकरोडलाही येणार असून, त्याला भेटण्याचीही संधी या वेळी मिळणार आहे.

हॅपी स्ट्रीटमध्ये एलिट फिटनेस क्लब, प्रज्ञा फिटनेस अँड क्लब, एमएच १५ रॉक्स, द गिटार वर्ल्ड, डेकेथलॉन स्पोर्टस गुडस मॉल, आर. डी. भडांगे स्केटिंग ग्रुप, मानव उत्थान मंच, धीरज फोटोग्राफी, रचना आर्ट, १८१ टॅटू, शंकर कंदेरा सिंगिंग, किट्टू कॉलीग आर्ट, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, एनडीज क्रिएटिव्ह ग्रुप, स्पार्टन हेल्थ सेंटर, प्राइस मेहंदी आर्ट, खगोल मंडळ, जादुगार विजयराज, पूजाज आर्ट अँड क्राफ्ट, ओम रंगोत्सव क्लासेस, अक्षरयज्ञ अॅकॅडमी, शिल्पकार वरुण भोईर, रंगलहरी आर्ट, नम्रता क्रिएशन, अंजलीज विसपुते आर्ट, दीपाज आर्ट सहभागी होणार असून, ते आपापली कला सादर करणार आहेत.

जिंका सरप्राइझ गिफ्ट

महाराष्ट्र टाइम्स हॅपी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. त्यासाठी ‘स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक’ या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरचा फोटो तुम्हाला सिटिझन रिपोर्टरच्या अॅपवर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. ‘हॅपी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी’ या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्याचे नाव पाठवायचे आहे. विजेत्या सोसायट्या, तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे याच्या हस्ते सरप्राइझ गिफ्टही मिळू शकते.

इच्छुकांना संधी

हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३- ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images