Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

..तर कचरा उचलणार नाही!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता स्वच्छतेबरोबरच शहरातील कचरा विलगीकरणावर अधिक भर दिला आहे. नागरिकांना कचरा विलगीकरणासाठी मार्चचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागासह घंटागाडी ठेकेदारांना फैलावर घेतले असून, शहरात कोणत्याही परिस्थितीत मार्च १८ पर्यंत कचरा विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक घरात मार्चपर्यंत ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जी घरे, सोसायट्या, बंगले, झोपडपट्ट्यांमधून स्वतंत्रपणे ओला व सुका कचरा येणार नाही, अशांचा कचरा महापालिका उचलणार नाही, अशा इशारा देण्यात आला आहे. शहर पुन्हा झिरो गार्बेज करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी एप्रिलची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले नाही तर, त्या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील आदेश महापालिकांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच, स्वच्छतेसह कचरा विलगीकरणाला प्राधान्य दिले आहे. मुंढे यांनी आरोग्य विभागाचा स्वतंत्र आढावा घेतला. त्यात घंटागाडी ठेकेदारांच्या तक्रारींसह आरोग्य विभागाच्या खर्चाच्या आकडेवारीवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. घंटागाडीच्या ठेक्यातच कचरा विलगीकरणाची अट असतानाही, वर्षभरापासून कचरा विलगीकरणाचे काम संथ गतीने झाल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभागाची कानउघडणी केली. शहरात कचरा विलगीकरणासाठी स्वतंत्र मोहीम चालवण्याचे आदेश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत मार्चपर्यंत ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण सक्तीचे करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील जवळपास पावणेपाच लाख मालमत्तांना भेटी देऊन नागरिकांमध्ये स्वच्छता व कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिनाभर आरोग्य विभागाकडून ओला व सुका कचऱ्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी घरातच स्वतंत्रपणे दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा टाकावा. सोसायट्यांनीही आपल्या इमारतीत स्वतंत्रपणे ओला व सुका कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबणे बंधनकारक असेल.

पुन्हा झिरो गार्बेज

मुंढे यांनी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांवर कठोर दंडाची मात्रा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढवा असे आदेश देत, शहरात सध्या असेलेले कचऱ्याचे 'ब्लॅक स्पॉट' बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ४४८ ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जातो. परंतु, यापुढे या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घेऊन शहर झिरो गार्बेज होईल, यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत.

घंटागाडी ठेकेदार रडारवर

महापालिकेने घंटागाडी ठेकेदारांसोबत केलेल्या करारानुसार घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलनाची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. पंरतु अजूनही निम्म्यापेक्षा जास्त घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याचे आढळून आहे. त्यामुळे आयुक्तांनी या ठेकेदारांनाही अल्टिमेटम दिले असून, सर्व घंटागाड्यांमध्ये फेब्रुवारीअखेर कचरा विलगीकरणाची व्यवस्था असावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंटची व्यवस्था करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

कचरा विलगीकरणाची सद्यस्थिती

मालमत्तांची संख्या - ४ लाख ३ हजार

नव्याने मिळालेल्या मालमत्ता- ६७ हजार

शहरातील उद्योग - ३५००

कचरा विलगीकरण - २० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेस कामगारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो त्यामुळे कोणताही भेद न करता प्रेस कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

नाशिकरोड प्रेस कामगारांना सातवा आयोग मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलल्याबद्दल खासदार चव्हाण यांचा आपला पॅनलतर्फे सत्काराचा कार्यक्रम झाला. या वेळी भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी आमदार माणिकराव कोकाटे, पॅनलचे नेते रामभाऊ जगताप, अशोक गायधनी, जयंत गाडेकर, अरुण मानभाव, सुरेश बोराडे, बाळासाहेब बोरस्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकशाहीत जनता श्रेष्ठ असून, कोणी विधायक काम सुचवली तर सर्व भेद विसरून ती करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे, असे खासदार चव्हाण म्हणाले. नोटाबंदीत प्रेस कामगारांनी अधिकचा मोबदला न घेता रात्रंदिवस काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल. त्यांचे सरकार कामगार हिताची धोरणे राबवत असून, सरकार कामगारविरोधी असल्याचा प्रचार खोटा आहे, असेही ते म्हणाले.

राजकारणात प्रसिद्धीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्यावरच त्यांचे पोट भरते. मात्र, राजकारणात चमकधमक फार काळ चालत नाही असे मत माजी आमदार कोकाटे यांनी सांगितले. निवडणुका येतील जातील, पण कामगारांवर अन्याय होता कामा नये. खासदार चव्हाण अनेक वर्षांपासून संघटना व प्रेस कामगारांच्या मागे ठामपणे उभे आहेत, असेही ते शेवटी म्हणाले. या वेळी किसन बोराडे, बाबा बोरसे, सुरेश लवांडे, प्रशांत कापसे, राजाभाऊ पगार, शशी आवारे, सुभाष खर्जुल, दगू खोले, रवी जगताप, सुनील गायधनी, रवींद्र पिंगळे, सुभाष दरोडे, विलास भावनाथ, अनिल खाडे, ज्ञानेश्वर शेळके, राजू भोसले, कैलास चव्हाण, कैलास पाटोळे, पद्माकर कुलकर्णी आदी कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स ओढून चोरट्याचे पलायन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाह सोहळा आटोपून घराकडे पायी परतणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून पोबारा केला. ही घटना गंगापूररोडवरील सहदेवनगर परिसरात घडली असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शलाका किरण थेटे (रा.ठक्कर स्ट्रीट,जुना गंगापूररोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. १८) सायंकाळी शलाका थेटे या सहदेवनगर येथील चिंतामणी लॉन्स येथे गेल्या होत्या. विवाहसोहळा आटोपल्यानंतर त्या लॉन्सबाहेर पडल्या. तसेच तेथून घराकडे निघाल्या. काही अंतरावर पायी जात असलेल्या थेटे यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करीत थांबवले. चोरट्यांनी विचारलेल्या पत्त्याबाबत थेटे काही सांगण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पोबारा केला. पर्समध्ये १० हजार रुपये किमतीचा मोबाइल, बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड होते. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोकडे करीत आहेत.

दुचाकीसह सायकल चोरी

एका मोपेड स्कूटरसह चोरट्यांनी सायकल चोरून नेली. या दोन्ही घटनांबाबत उपनगर आणि अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दशरथ शेजवळ (रा.कुणालपार्क, वीर सावरकर नगर) यांची अॅक्टिव्हा (एमएच १५ एफपी २३०९) सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली असून, याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये वाहनाचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार बोडके करीत आहेत. दरम्यान, प्रमोद एकनाथ बिरारी यांची बिटविन कंपनीची सुमारे सहा हजार रुपये किमतीची सायकल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. घरासमोर उभी असलेली सायकल चोरट्यांनी हातोहात लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मनोज संपतराव गांगुर्डे (५० रा.संघमित्रा हौ. सोसा. बेला डिसूजारोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी (दि. १८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास गांगुर्डे आपल्या दुचाकीने जेलरोडयेथून नाशिकरोडकडे जाण्यासाठी निघाले होते. दुचाकीवर बसल्यानंतर अचानक ते तोल जाऊन पडले. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. घटनेचा अधिक तपास हवालदार बोडके करीत आहेत.

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली. राजशेखर चंद्रशेखर शेट्टी (वय २७, रा. लेखानगर, सिडको) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजशेखर शेट्टी रविवारी (दि. १८) दुपारी मुंबईनाका परिसरातील डेटामॅटिक्स कार्यालयासमोरून पायी जात असताना ही घटना घडली. अचानक चक्कर येऊन पडल्याने नागरिकांनी त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार ठाकूर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनाची मंदावली गती

0
0

जलयुक्त योजनेत प्रशासकीय दिरंगाईचा अडसर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षी १ लाख ४१ हजार ८४६ टीसीएम इतक्या पाणीसाठ्याच्या क्षमतेची कामे पूर्ण झालेली असून, प्रत्यक्षात १ लाख १५ हजार ९४३ टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे २ लाख ३१ हजार ८८७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे संरक्षण कवच मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.

जलयुक्त योजनेची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाकडून संथगतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम या योजनेवर झाला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत येणाऱ्या सिंचनची गती मंदावली आहे. याबरोबरच वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्कीही प्रशासनावर ओढवली आहे. राज्यातील टंचाईग्रस्त गावांना टंचाईच्या समस्येतून कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून 'जलयुक्त शिवार अभियान' या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

यंदा या योजनेचे तिसरे वर्ष असून, या योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे विभागात पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाल्याचा दावा विभागीय प्रशासनाने केला आहे. या पाण्यामुळे नाशिक विभागातील दोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधेचे कवच मिळणार आहे. तसेच नाशिक विभागात नगर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रत्यक्ष पाणीसाठा निर्माण होण्यास या योजनेमुळे शक्य झाले आहे. या पाण्यामुळे विभागात निर्माण झालेल्या संरक्षित सिंचन क्षेत्रापैकी निम्म्याहून जास्त क्षेत्र एकट्या नगर जिल्ह्यात आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्याचा नंबर लागतो.

३५ टक्के गावांतील कामे रखडली

जलयुक्त शिवार योजनेची कामे वर्षभरानंतरही पूर्ण झाले नसल्याचा परिणाम विभागातील जलयुक्तच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. जलयुक्तची रखडलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी दिले होते. तरीही अद्यापपर्यंत ३५ टक्के गावांतील कामे रखडलेली आहेत.

'जिओ टॅगिंग'मध्ये पिछाडी

विभागात गेल्यावर्षी झालेल्या जलयुक्तच्या कामांपैकी अवघ्या ८१ टक्के कामांचे आतापर्यंत जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. या कामात धुळे आणि जळगाव हे दोन जिल्हे विभागात पिछाडीवर आहेत. मान्यताप्राप्त २६ हजार ६०८ कामांपैकी २६ हजार १३५ इतक्या कामांना वर्कऑर्डर मिळालेली होती. त्यापैकी अवघ्या २१ हजार ८८ इतक्याच कामांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे उर्वरित ५ हजार ४७ कामांवरील निधीची मलई लाटली गेल्याची शक्यता आहे.

'जलयुक्त'बाबत गावांची आकडेवारी

........................................................

शंभर टक्के कामे पूर्ण...............५८९

८० टक्के कामे पूर्ण....................२६३

कामे अपूर्ण............................३११



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजले शिवरायांचे मावळे

0
0

टीम मटा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवशाहीचा थाट असलेली मिरवणूक, मावळ्यांच्या वेशातील तरुण आणि त्याच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या ढोलताशांच्या पथकाने शिवजन्मोत्सवाच्या आनंदात भर घातली.

मालेगावात मिरवणुकीने वेधले लक्ष
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करीत सोमवारी संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर पुष्पमाळांनी सजविण्यात आला होता. दिवसभर शिवप्रेमींची अभिवादनासाठी गर्दी झाली होती.

शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीसह विविध संघटना, मंडळ यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून मिरवणुका काढल्या होत्या. मध्यवर्ती समितीच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा, लेझीम व झेंडा पथक अग्रभागी होते. तर जिजाऊ, शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून युवक युवतींनी लक्ष वेधून घेतले. शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. येथील तहसीलदार ज्योती देवरे, आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध मिरवणूक पथकांनी साहसी खेळांचे प्रदर्शन केले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता.
पोलिस दलातर्फे किल्ले स्वच्छता मोहीम
येथील पोलिस दलाच्या वतीने देखील अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेत शिवरायांना अभिवादन केले. या मोहिमेत अनकाई, मुल्लेर व गाळणा या तीन किल्ल्यांवर पोलिसांनी तेथील ग्रामस्थांच्या वतीने कचरा संकलित करून स्वच्छता अभियान राबविले. यात पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.
शाह विद्यालयात पोवाडा गायन
शहरातील रवी शाह विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य संजय बेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक ए. डी. तावडे, पुरुषोत्तम तापडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवन परिचय करून दिला. यानंतर विद्यालयातील शिक्षक टी. के. देसले, श्रीमती आर्विकर, श्रीमती शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बेलन यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते

येवल्यात शिवरायांना मानाचा मुजरा
येवला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी येवला शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांच्या वेशात अश्वारूढ झालेले तरुण, भगवे ध्वज नाचवीत मिरवणुकीत सहभागी झालेली तरुणाई अन् पदोपदी होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून येवला शहरातील पाटोळे गल्लीतून पाटोळे यांच्या घराण्यात ७८ वर्षांपूर्वी सुरू झालेली शिवजयंती उत्सवाची मिरवणूक याही वर्षी निघाली. कोपरगाव येथील संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन कोल्हे तसेच आयोजक सुभाष पहिलवान पाटोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील एन्झोकेम विद्यालयाच्या भगवे फेटेधारी युवतींचे झांज पथक अग्रभागी मिरवणुकीच्या अग्रभागी होते. वैष्णवी पाटोळे व युवराज पाटोळे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन केले. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, बालशिवराय, मावळे आदी सर्व या मिरवणुकीचे आकर्षण ठरताना छत्रपतीच्या वेशातील तरुण अश्वारूढ झाले होते. खास तयार करण्यात आलेल्या अश्वबग्गीत शिवरायांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मार्गस्थ होताना मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत शिवरायांची वेशभूषा केलेल्या तरुणांचे देखील ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण केले. मिरवणूक मार्गावर येणाऱ्या शहरातील राणाप्रताप यांच्या पुतळ्याला युवराज पाटोळे, तर टिळक मैदानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुभाष पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. शहरातील देवीखुंट परिसरात शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने काझी राफिउद्दिन व सलीम काझी यांनी मिरवणूक सुभाष पाटोळे व युवराज पाटोळे यांचा सत्कार केला. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, सुशीलचंद्र गुजराथी, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, संजय बनकर, नगरसेवक गणेश शिंदे, सचिन शिंदे, संकेत शिंदे, प्रवीण बनकर, विजय नंदनवार आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.

पोवाड्याने शहारले कळवण
कळवण : श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कळवण शहरात मिरवणूक काढण्यात आली. शहर व तालुक्यातील अनेक मंडळ, सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्व समाजाच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण कळवण शहर शिवप्रेमींनी भगवेमय करून टाकले होते. भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ व संभाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा करीत मिरवणुकीत रंगत आणली. विद्यालयाचे लेझीमपथक व घोडे, पोवाडे, तुतारीवाले, सजविलेल्या रथातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक लक्षवेधी ठरली. सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना आर्यन ग्रुपच्या माध्यमातून नगरपंचायतचे आरोग्य सभापती अतुल पगार व मित्र परिवाराने व्हेज पुलाव व केळीचे वाटप केले. मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी चौक मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ, महाराजा मित्र मंडळ, भगवती प्रतिष्ठान, महामंडलेश्वर मंडळ, छावा संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. सायंकाळी भगवती मंडळाच्या वतीने व गणेशनगर मंडळ यांनी रात्री मंडळापुढे फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सवात रंग भरला.

दिंडोरीत ढोल पथकाची मानवंदना
दिंडोरी : शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवरायांच्या पुतळ्याची भव्य आरास उभारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ढोल पथकाने जोरदार मानवंदना दिली. आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, भाजपचे चंद्रकांत राजे, प्रकाश शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख, रमेश बोरस्ते, बाळासाहेब मुरकुटे, बंडूशेठ शिंदे, मनोज ढिकले आदींसह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. दिंडोरी येथील युवक उत्सव समितीतर्फे डिजिटल आरास उभारण्यात आली होती. तसेच दोन डिजिटल तोफांद्वारे सलामी देण्यात आली. डिजिटल स्क्रीन वर शिवचरित्र दाखविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूच्या ट्रक पळविणाऱ्यांवर चोरीचा गुन्हा

0
0

सहा लाख २१ हजारांच्या मुद्देमालाच्या चोरीची फिर्याद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करून अशी वाहतूक करणारे काही ट्रक जप्त केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून तीन ट्रक पळवून नेत संबंधितांनी थेट महसूल विभागालाच आव्हान दिल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे.

अवैध गौण खनिज वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. अशा कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली होती. परंतु, १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तीन ट्रक आवारातून चोरून नेण्यात आले. याप्रकरणी नायब तहसीलदार अरुण शेळके यांनी फिर्याद दिली आहे. तहसील कार्यालयाच्या मंडळाधिकारी पथकाने अवैधरित्या खडीची वाहतूक करणारे तीन ट्रक पंचनामे करून ताब्यात घेतले. हे ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले. कारवाईची अंमलबजावणी बाकी असतानाच हे ट्रक चोरून नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अंबादास भागवत सदगीर (रा. शिंदे, ता. नाशिक), सुरेश चंदर भोईर, दत्ता मुरलीधर माने, भरत मोतीराम नवले (रा. सारूळ, ता. जि. नाशिक) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. महिला सहायक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेनेच टोचावे सरकारचे कान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणव्यवस्थेत काळाशी सुसंगत बदल घडविणारा नवीन विद्यापीठ कायदा आहे; पण या कायद्याच्या नावाखाली मूळ कायद्याच्या मसुद्यात नसणाऱ्या तरतुदीही मागाहून आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थी निवडणुकांमधून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर प्रतिनिधित्व दिले जात असेल तर योग्य आहे काय, याचा विचार आता जनतेनेच करायला हवा. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन यांसारख्या मुद्द्यांवर मंथन करावे आणि सरकारला योग्य काय ते समजावून सांगावे, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. निगवेकर बोलत होते. डॉ. निगवेकर म्हणाले,"राजकारणामध्ये तरुणाईचा प्रवाह बदल घडवेल अशी विद्यमान सरकारची धारणा आहे. या धारणेमागे काही तर्कही असतील, पण आपल्या कुठल्याही कृतीचा प्रतिकूल परिणाम हा शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रावर व्हायला नको, याचा विचार जनतेचे पालकत्व निभावणाऱ्या सरकारने करायला हवा."

ते म्हणाले, "विद्यापीठांप्रमाणेच कॉलेजांना स्वतंत्ररीत्या सक्षम करण्यासाठी नवीन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार आता कॉलेजांनीही स्वतंत्रपणे पावले रोवायला हवीत. एकविसावे शतक हे वेगळे आहे. या शतकाच्या दुसऱ्या दशकात आपण आहोत. आपण काळाशी सुसंगत बदल करू शकलो नाही तर हे युग आपल्याला प्रवाहाच्या बाहेर फेकते. चीनसारख्या देशाला या बदलांचे महत्त्व कळले आहे. त्यांच्याकडील चांगल्या बदलांकडून धडा घ्यावा. दिवसाचे २४ तास त्यांच्या विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचे काम सुरू आहे. त्या दृष्टीने आपणही आपली धोरणे लवचिक करण्यात काय वावगे आहे?"

या नवीन विद्यापीठ कायद्याच्या निर्मितीप्रक्रियेत प्रमुख तीन समित्यांपैकी कायदाविषयक मसुद्यासाठी निगवेकर उच्चस्तरीय समितीने काम पाहिले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकर यांच्या वक्तव्यास महत्त्व आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा…

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव सोहळा म्हणून शहरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार सीमा हिरे व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून पालखी काढण्यात आली.

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आदल्या दिवशीच मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. रात्री १२ वाजता सीबीएस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार असल्याने परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. शहराच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुभाजकांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिवप्रेमींचे जत्थे मैदानाकडे कूच कीत होते. 'तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय' अशा घोषणा देण्यात येत होत्या. मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. सकाळी ९ वाजता सई वाकचौरे, वैष्णवी ठाकरे, मुग्धा थोरात, मयुरी पिंगळे, सृष्टी बनकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाषण करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर नितीन पाटील यांनी शिववंदना सादर केली. शिवर्गजना ढोल पथकाच्या वतीने ध्वजप्रणाम करून 'गारद' सादर करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. त्यानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुरेश भामरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपूजन होताच मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी सोहळ्याच्या अग्रभागी घोडदळ होते. त्यावर वेषभूषा केलेले मावळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवगर्जना ढोल पथक वादन करीत होते. विविध महाविद्यालयांचे विद्यार्थीदेखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. नाशिक शहराने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा चांगला पायंडा घालून दिला आहे. महाराजांनी सर्व राष्ट्राला गनिमी काव्याने लढण्याची शिकवण दिली, ती आजही लष्कराला उपयोगी पडते आहे, असे प्रतिपादन सुभाष भामरे यांनी केले.

या मार्गावरून काढली पालखी

ही पालखी त्र्यंबकनाका सिग्नल, सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँडमार्गे पंचवटी कारंजावर पोहचली. या ठिकाणी मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पालखी रामकुंडावर जाऊन तेथे शिवप्रतिमेला अभिषेक घालण्यात आला. मिरवणुकीत विविध ठिकाणची आदिवासी पथके सामील झाली होती. त्यांनी टिपरी नृत्य व बोहाड्यातील सोंगे सादर केली. त्याचप्रमाणे विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिमचे प्रकार सादर केले.

चित्ररथांचे स्वागत

या पालखी सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवल्याचा देखावा, शिवराज्यभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला. मिरवणूक मार्गावर विविध संस्था व संघटनांच्यावतीने स्वागत करण्यात येत होते. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.

लक्षवेधी पेहराव

मिरवणुकीत सहभागी झालेल्या पुरुषांनी भगवे व पांढरे झब्बे, भगवे फेटे परिधान केले होते, तर महिलांनी नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक वेशभूषेने मिरवणुकीला शोभा आणली. लहान मुलांनी शिवाजी महाराजांचा पेहराव केला होता.

पालकमंत्र्यांनी धरला ताल

याठिकाणी लहान मुले लेझिम खेळत होती, त्याच वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आगमन झाले. त्यांनादेखील लेझिम खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मुलांसाबोत लेझिमवर ताल धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वर्षांत किती रोजगार दिले?

0
0

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘मेक इन महाराष्ट्र’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि आता कोट्यवधींच्या जाहिराती करून सुरू केलेला उपक्रम ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ यांसारखी गोंडस नावे देऊन केवळ सामान्यांना भूरळ घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे़. इकॉनॉमिक फोरमच्या नावाखाली सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांत खरोखरच किती रोजगार निर्मिती झाली आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चानिमित्त सोमवारी (दि. १९) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील धुळ्यात आले होते़ याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे बोलत होते.

कोट्यवधी रुपये जाहितांवर खर्च करून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रम सुरू केला़ यापूर्वीही ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘स्टार्टअप इंडिया’ राबविण्यात आले़, मात्र त्यापासून किती फायदा झाला, हे कोडेच आहे. देशभरातील गुणवणूकदारांना महाराष्ट्रात आणून आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ मात्र प्रत्यक्षात ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले त्यातून उत्पादन सुरू झाले का, किती रोजगार निर्मिती झाली याचे आकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान तटकरे यांनी केले.


वास्तवात महाराष्ट्र गुंतवणूकच झाली नसून, रोजगारदेखील घटला आहे़ हातमागाचे मँचेस्टर समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यासह भिवंडी, मालेगाव येथील हातमाग व्यवसाय या सरकारने बकाल करून टाकला आहे़, असा आरोप सुनील तटकरे यांनी केला. शेजारच्या तेलंगणा राज्यात हातमाग व्यवसायासाठी सवलती दिल्या जात आहेत़ म्हणून सुमारे साडेतीनशे महिला कामगार तेथे स्थलांतरित झाले आहेत़ स्थलांतरित होणाऱ्या कुशल, अकुशल कामगारांची संख्या वाढत असून, ज्या महाराष्ट्रात देशभरातून कामगार रोजगारासाठी येत होते़ त्यांच्यावर आता बाहेर जाण्याची वेळ या सरकारमुळे आल्याची टीकाही त्यांनी बोलताना केली.

तोपर्यंत शांत बसणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी नगण्य आहे़ हिवाळी अधिवेशनानंतर योजनेचे काम ठप्प झाले आहे़ बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. परिणामी, मंत्रालयात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत़ धर्मा पाटील यांना अद्यापही न्याय मिळाली नसल्याने त्यांच्या अस्थीचे विसर्जन झालेले नाही़ जोपर्यंत धर्मा पाटील यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही तटकरे यांनी सांगितले़

...तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे

सर्वाधिक संख्याबळाचे सरकार असूनही भाजप-शिवसेना युतीच्या सरकारचा वकुब संपला आहे़ शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची निंदानालस्ती करण्यात येते़ नुकतेच कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर रोष व्यक्त केला़ सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या धमकीचे शतक आता पूर्ण झाले आहे़ हिंमत असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे, असा पुनरुच्चार करत भाजप-सेनेच्या भांडणामुळे प्रशासन कोलमडले असून, कायदा-सुव्यवस्था नसलेले राज्य बनले आहे, अशी टीकाही सुनील तटकरे यांनी केली़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला ऑफलाइन करा

0
0

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आवाहन; जिल्ह्यात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खोटारड्या राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली असून, नेहमी ऑनलाइन असणाऱ्या सरकारला आता ऑफलाइन करण्याचा निर्धार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सोमवारी अमळनेर तालुक्यात आली होती, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत तटकरे बोलत होते.

अमळनेर येथे ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात सोमवारी (दि. १९) राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा प्रभारी आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ़ सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, गफ्फार मलिक, किरण शिंदे, संग्राम कोते-पाटील, तिलोत्तमा पाटील, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते़

पंधरा लाखांची खोटी वल्गना

या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली़ असून, त्या राजाच्या राज्यात २०१४ नंतर ‘खोट बोल पण रेटून बोल’ असा प्रकार सुरू आहे. या सरकारने जनतेची फसवणूक करून ‘अच्छे दिन आयेंगे’ सांगून सत्ता काबीज केली़, असा आरोप तटकरे यांनी यावेळी बोलताना केला. देशात सत्तांतर झाल्यानंतर विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकले जातील, अशी खोटी वल्गना करून कृषिप्रधान देशात तरुणांना रोजगार दिला जाईल, हा शब्दही हवेत विरल्याचे तटकरे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनांबाबत या सरकारला जनतेने प्रश्न विचारावा, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. ज्यावेळी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली त्यावेळी एकही माणसाने कर्जमाफीची मागणी केलेली नव्हती तरी सर्व शेतकऱ्यांंना सरसकट कर्जमाफी दिल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली. विदर्भात गारपीटसाठी ऑनलाइन अर्ज करून शेतकरी त्रासले असून, आता या सरकारला २०१९ मध्ये ऑफलाइन करावे लागेल़, असा टोलाही त्यांनी लगावला.

केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना या फसव्या ठरल्या असून, त्यांचा डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असा गौप्यस्फोट माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला. सरकारकडे आता कुठलाही मुद्दा नसल्याने ते राममंदिर किंवा एखाद्या छोट्या देशाशी युद्ध करून सहानभूती मिळवून निवडणुका लढवतील, असेही वळसे-पाटील म्हणाले.

ते पैसे पाडळसरेला दिले असते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१६ मध्ये ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ च्या नावाखाली ८ लाख कोटींची गुंतवणूक करू, असे सांगितले होते. मात्र देशासह राज्याला दिलेले शब्द ते पूर्ण करू शकलेले नाहीत. मुंबई येथील समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन जाहिरातीसाठी १४ कोटी तर कार्यक्रमाला ५ कोटी खर्च केला गेला. हेच १९ कोटी रुपये पाडळसरे धारणास दिले असते तर कामात आले असते, असा खोचक सल्लाही आमदार वळसे-पाटील यांनी दिला.

पक्षावर परिणाम नाही

अमळनेर तालुक्यात गेल्या काळात अनेक लोक पक्षात आली अनेक गेली मात्र त्याचा कोणताही परिणाम पक्षावर न होता उलट पक्षाची लोकप्रियता वाढली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. अनिल भाऊ, तुम्ही पक्षात आलात महाराष्ट्राची शान राखण्यासाठी एकहाती सत्ता आली तर जळगाव जिल्हा व अमळनेर तालुक्याचा विकास शंभर टक्के होईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना दिले़ या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, जितेंद्र राजपूत, शिवाजी पाटील, प्रकाश जाधव, विनोद जाधव, प्रवीण पाटील, निवृत्ती बागूल, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, विजय पाटील, देविदास देसले, संजय पाटील, अनिल शिसोदे, प्रशांत भदाणे, दीपक पाटील, डॉ. संजय पवार आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार विनोद कदम यांनी मानले़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलांच्या प्रवाहात मानवीमूल्यांना मोठा धोका

0
0

संजय अपरांती यांची खंत

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

एकविसाव्या शतकात बदलत्या जगासमोर आपणा समोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. जग मोठ्या बदलाच्या प्रक्रीयेतून मार्गक्रमन करीत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. या बदलांच्या परिणामी मानवीमुल्ये धोक्यात सापडत आहेत, अशी खंत माजी पोलिस आयुक्त डॉ. संजय अपरांती यांनी व्यक्त केली.

मविप्रच्या शिक्षणशास्त्र कॉलेजमध्ये आयोजित परितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात सतत वाढ करावी. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या, चांगली तयारी करावी म्हणजे यश हमखास मिळते, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी संस्थेचे सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते व गुलाब भामरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांनी उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा इतिहास व शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथींच्या हस्ते कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विद्या जाधव , प्रा. अनिता शेळके , प्रा. ललिता वाघ, डॉ. किशोर चव्हाण आदींसह प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास खोंडे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. सुभाष भालेराव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी नाशिकरोडला मनोरंजनाची मेजवानी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्सुकता आणि मनोरंजनाची सफर घडवणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल यंदाही नाशिकरोडवासियांना अनुभवता येणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा, जेलरोड या रस्त्यावर सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिककरोडवासियांची सकाळ 'हॅपी' होणार आहे.

गाड्यांनी गजबजलेल्या रस्त्यांवर सुट्टीच्या दिवशी निर्धास्तपणे मौजमजा करण्याचा अनुभव सुखावणारा असतो. हा अनुभव महाराष्ट्र टाइम्सच्या 'हॅप्पी स्ट्रीट'द्वारे मिळत असल्याने या उपक्रमाची मोठी उत्सुकता नाशिकबरोबरच इतरत्रही दिसून येते. विविध संस्था, संघटनांबरोबर किंवा अगदी स्वतंत्रपणे या स्ट्रीटची मजा लुटली जाते. शिवाय, या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शहरवासियांच्या कलागुणांना मुक्त व्यासपीठही देण्यात येते. यंदाही नाशिकरोडवासियांसाठी महाराष्ट्र टाइम्स 'हॅप्पी स्ट्रीट' घेऊन येत असून, मनोरंजनाच्या या दुनियेत नाशिकरोडवासिय न्हाऊन निघणार आहेत. हॅप्पी स्ट्रीटचा पहिला रविवार कॉलेज रोडवरील मॉडेल कॉलनीत व दुसरा रविवार गोविंदनगर येथे पार पडल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी जेलरोडला बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळेदरम्यान हा उपक्रम होणार आहे. म्युझिक, डान्स, झुम्बा, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, मेहंदी, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन, स्टॅन्ड अप कॉमेडी असे मनोरंजनाचे अनेक प्रकार एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तसेच पझल, सापशिडी या खेळांचाही हॅपी स्ट्रीटमध्ये समावेश असणार आहे.

यावेळी पहिल्या दोन हॅपी स्ट्रीटला धमाल केलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे नाशिकरोडलाही येणार असून त्याला भेटण्याचीही संधीही यावेळी मिळणार आहे.

- -

जिंका सरप्राईझ गिफ्ट

यावेळी महाराष्ट्र टाइम्स हॅप्पी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यासाठी 'स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक' या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरच फोटो तुम्हाला सिटिझन रिपोर्टरच्या अॅपवर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. 'हॅपी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी'या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्यांचे नाव पाठवायचे आहे. विजेत्या सोसायट्या तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे याच्या हस्ते सरप्राइझ गिफ्टही मिळू शकते.

इच्छुकांना संधी

हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३ - ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या सत्तेत चोरांना अच्छे दिन

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजपच्या सत्तेत चोरांना अच्छे दिन आले आहेत, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला. फडणवीस चांगले आहेत मात्र गृह विभागाकडून पोलिसांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे डल्ला मारून हल्लाबोल आंदोलन करीत आहेत, असा टोलाही गोऱ्हे यांनी लगावला. मंगळवारी (दि. २०) त्या धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

विरोधक पंक्चर आणि भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधूर संबंध असल्याने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेला विरोधकांची भूमिका वठवावी लागत असल्याचा दावाही आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला. या वेळी आमदार गोऱ्हे यांनी विखरणला जाऊन धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. धर्मा पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांनादेखील २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी विधानपरिषदमध्ये आवाज उठवणार असल्याचे त्या म्हणाल्या. शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरूनही आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपला लक्ष केले. भाजपचे जे पोटात आहे तेच ओठावर असल्यामुळेच छिंदमसारखे लोक समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. दावोसमध्ये नीरव मोदींसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण द्यायला प्रॉटोकॉल कसा आडवा येतो, असा खोचक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नको असेल ते देवून जा, हवं असेल ते घेवून जा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून २०१६ साली नागपूर शहरातील तरुणांनी माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू केला होता. हवे असेल ते घेवून जा...नको असेल ते देऊन जा! असा संदेश देणारी ही भिंत अनेकांना गरजेच्यावेळी आधार देवून गेली. याच उपक्रमातून प्रेरणा घेत आता शहरातील विवेकानंद केंद्रातर्फे मालेगावातील पहिली माणुसकीची भिंतीचे लोकार्पण करण्यात आली आहे.

विविध सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवणारे शहरातील स्वामी विवेकानंद केंद्राचे डॉ. सुरेश शास्त्री यांनी कॅम्प रोडवरील टिपरे कॉलनी येथील आपल्या दवाखान्याबाहेर ही माणुसकीची भिंत उभारली आहे. 'शिवभावे जीवसेवा' या श्रद्धेतून कोणताही अनौपचारिक उद्घाटन सोहळा न करता त्यांनी समाजातील वंचितांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. डॉ शास्त्री हे नुकतेच एका व्याख्यानाच्या निमित्ताने तालुक्यातील दाभाडी येथे गेलेले असतांना येथील के. जे. एन. विद्यालयचे प्राचार्य तुषार अहिरे यांनी तेथील बचत गटाची कामे दाखवली. त्यावेळी डॉ. शास्त्री यांच्या नजरेस ती माणुसकीची भिंत पडली. त्यातून आपल्यापरिसरात देखील अशी समाजातील वंचितांसाठी माणुसकीची भिंत उभारण्याची प्रेरणा निर्माण झाली. शिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी या सामाजिक उपक्रमास सुरुवात केली. घराबाहेर असलेल्या जागेवर त्यांनी छोटासा बोर्ड लावून त्या बाजूला एका केरेट ठेवला आहे.

दुसऱ्याला उपयोगी पडेल असे द्या

आपल्या उपक्रमाविषयी सांगतांना ते म्हणाले की, समाजातील दोन विषम घटकांना जोडणारा सेतू म्हणजे माणुसकीची ही भिंत. आजकाल वस्तू जास्त टिकतात. अशा वस्तू वापरून झाल्यावर, कंटाळा आला म्हणून किंवा नवीन घ्यायच्या म्हणून त्या सुस्थितीतील जुन्या वस्तूंचे काय करायचे हा प्रश्नच असतो. आपल्याजवळच्या अशा वस्तू या माणुसकीच्या भिंतीला आपण देऊन टाकू शकतो. अर्थात पुन्हा वापरता न येण्यासारख्या, नको असलेल्या निकामी वस्तू टाकून देण्याची ही कचराकुंडी नव्हे. आपल्याकडील सुस्थितीतील जास्तीच्या वस्तू, गरजूपर्यंत सन्मानाने पोहचवण्याचे माध्यम म्हणजे ही माणुसकीची भिंत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या सुरवातीला, या भिंतीवर, गरिबांसाठी दात्यांनी आपल्याकडील सुस्थितीतील फक्त कपडेच द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. 'चॅरीटी विथ डिग्नीटी' असा हा सुंदर सामाजिक उपक्रम लवकरच गावोगावी व ठिकठीकाणी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवरील अत्याचाराविरोधात दोंडाईच्यात मूक मोर्चा

0
0

अत्याचार करणाऱ्यास तत्काळ अटक करा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दोंडाईचा शहरातील नूतन विद्यामंदिर व माध्यमिक हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या बालवाडीतील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २०) शहरातील महिला, युवतींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने गावातून मूक मोर्चा काढण्यात आला.

हे प्रकरण दडपणाऱ्या संस्था चालकांसह मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ अटक करावी, हा खटला अतिशीघ्र न्यायालयात चालवावा, पीडितेस शासकीय धोरणानुसार तातडीने मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी निघालेला हा मूक मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार मांडळे यांना निवेदन दिले. या वेळी उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, नगरसेवक नरेश कोळी, चिरंजीव चौधरी, नरेश गिरासे, प्रवीण महाजन, विजय मराठे, सागर मराठे, मनोज निकम, कृष्णा नगराळे, डॉ. नितीन चौधरी, प्रकाश चौधरी, नगरसेवक सुनील चौधरी आदी उपस्थित होते. दोंडाईचातील बालवाडीत शिकणाऱ्या बालिकेला दि. ८ फेब्रुवारी रोजी चॉकलेटचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह अज्ञात नराधमाविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोंडाईचा येथे दि.८ फेब्रुवारी रोजी पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी असताना संस्था चालकांनी शाळेची बदनामी होईल, या भीतीने किंवा संस्था चालकांची कुटुंबियांना रोखले, अशी शंका येते, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारने जिल्ह्यावर अन्याय केला

0
0

हल्लाबोल यात्रेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, रावेर

महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले कुणावर काहीही कारवाई झाली नाही. मात्र जळगाव जिल्ह्यातील नेत्यावर आरोप होताच त्यांचे मंत्रिपद काढून घेत जिल्ह्यावर सर्वात जास्त अन्याय सरकारने केला, असे वक्तव्य मंगळवारी (दि. २०) रावेरला हल्लाबोल सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. येथील छोरिया मार्केटमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात इतर ठिकाणीही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र जळगावचाच माणूस त्यांनी काढला. मतभेद सगळ्यांचे असतात मात्र अन्याय विरोधात उभे राहण्याची भूमिका आमची असते, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्यावर झालेला अन्याय हा जिल्ह्यावर झाल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्ह्याने खासदार शदर पवार यांना खूप प्रमे दिले. सतत पंधरा वर्षे जनतेने आम्हाला साथ दिली. मात्र आता आमची सत्ता नसली तरी जनतेचा जिव्हाळा कायम आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यासाठीच आम्ही नैतिक जबाबदारीच्या नात्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या हल्लाबोलचे आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या.

...तर मराठी शाळा बंद झाल्या नसत्या

सर्वसामान्यांना महागाईची झळ पोहोचत असून, गॅस सिलिंडरचे भाव हे ३५० रुपयांवरून थेट ८०० रुपयांपर्यंत गेल्या तीन वर्षांत पोहचले. त्यामुळे याला कोण जबाबदार, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी केला. महागाईची झळ सर्वात जास्त गृहिणांना पोहचत असते. सरकारने निर्णय घेत तब्बल तेराशे जिल्हा परिषद शाळा बंद केल्या मात्र आम्ही सत्तेत आल्यावर एकही शाळा बंद होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आज जर बाळासाहेब असते तर एकही मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय झाला नसता. मात्र आता शिवसेना सत्तेत असताना शाळा बंदचा निर्णय घेण्यात येत असल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला.

कुणीही समाधानी नाही

सरकार भाषणे खुप सुंदर देते परंतु, कारवाई व कृती मात्र शून्य असल्याचा आरोप त्यांनी बोलताना केला. आमदार दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, नुसती भाषणे करून उपयोग नसून, जनतेत जाऊन जागरण करण्याची गरज आहे. कुणीही समाधानी नाही, सरकार दोन कोटी रोजगार देणार होते प्रत्यक्षात काहीच नाही, असे सांगत त्यांनी, उद्योग, शेती कशातही सुधारणा झाली नसल्याचा आरोप केला. आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय आणि सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतेय. या वेळी गफ्फार मलिक, सिमरन यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार अरुण गुजराथी, नानासाहेब काळे, भास्करराव जाधव, आमदार डॉ. सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तुम्ही शेतकरी आहात का सिद्ध करा?

हे फसवे सरकार असून त्यांनी जनतेला केवळ फसविले खोटे आश्वासन दिले. आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, मीही शेतकरी असून मी पाच पिढ्याचा शेतकरी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी तुम्ही शेतकरी आहात का, हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि. २०) रावेरला बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. सर्वसामान्य जनतेचा राग, रोष या हल्लाबोल यात्रादरम्यान आम्ही पाहतोय, असेही ते म्हणाले. कुठे गेले अच्छे दिन?, कुठे गेले २ कोटी रोजगार?, कुठे गेला आमचा शेतकरी, कुठे गेले प्रत्येकासाठी पंधरा लाख यासारखे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे सरकार केवळ जनतेला भोळवण देत असून, यामुळेच सरकारवर जनता रुसली आहे, असा आरोपही आमदार मुंडे यांनी केला.

मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी या सारख्या बड्याना पैसा बुडवणाऱ्याना पन्नास हजार कोटी कर्ज कसे मिळते? त्यांना कर्ज कसे मिळते, हा प्रश्न त्यांनी केला. आणि आमच्या शेतकऱ्याला कोणतेही कर्ज घ्यायला गेले तर त्यांना आधार लिंक आहे काय, सात-बारा आहे काय, असे अनेक प्रश्न विचारले जातात हे का? असा सवालही त्यांनी सरकारला केला. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, असे सांगत आमदार मुंडे यांनी छिंदमबाबतही सरकारवर टीका केली. निवडणुकीचा काळात दिलेल्या जाहिरातीची आठवण करून देत, तुम्ही जर शिवाजी महाराजांना विसरला असाल तर तुमचे सरकार पुढे जिंकून येणार नाही, अशी टीका केली. हे सरकार कोणाचेही नाही, त्यामुळे येत्या काळात ‘आपले सरकार’ आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला शेवटी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

0
0

पिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट घोंगावू लागले आहे. रब्बीची हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २३ फेब्रुवारीपासून पुढील ४८ तासांत हवामान विभागाने गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. शेतांमध्ये कापून ठेवलेली पिके सुरक्षित स्थळी हलविण्यासह शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले आहे.

शहरासह जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कधी थंडी, कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामानाचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गत आठवड्यात आणि त्यापूर्वीही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान, पावसाच्या हलक्या सरींसह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ढगाळ वातावरण वगळता गारपिटीसारख्या मोठ्या नैसर्गिक अरिष्टाचा सामना नाशिककरांना करावा लागला नाही. परंतु, आता पुन्हा हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरींसह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळ आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप यांनी केले आहे.

ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये तो विक्रीसाठी आणला असेल तर तो झाकून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात मदतीची आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नगदी पिकांना सर्वाधिक धोका

रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. नगदी पिके द्राक्ष, कांदा यांची काढणी सध्या सुरू आहे. तसेच काही शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यामुळे गारपिटीचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसू शकतो. याशिवाय हरभरा, गहू ही पिकेही कापणीला आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त शेतक-यांनी वीज कार्यालयास ठोकले टाळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथे शेती पंपावर वीज वापर नसताना देखील संबंधित शेतकऱ्यास वीजबिल आकारणी केल्याने वीज कंपनीच्या या भोंगळ कारभारबद्दल संतप्त झालेल्या दाभाडी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीज वितरणच्या कार्यालयास टाळे ठोकले.

तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी जगन्नाथ निकम यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत पंप सन २०१४ पासून बंद आहे. याबाबत तत्कालीन उपअभियंता वाघ यांनी पंचनामा करून पंप नसल्याचे सादर केले होते. प्रत्यक्ष पाहणी करून विहिरीला अल्प प्रमाणात पाणी असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. तरी देखील निकम यांना २१ हजार ५०० रुपयांचे वीजबिल आकारण्यात आले. त्यामुळे निकम यांच्या परिसरातील शेतकरी संतप्त झाले. तसेच गावातील सुभाष नहिरे, जगन्नाथ निकम यांच्या घरगुती बिलाला अंदाजे सरासरी बिले देण्यात आल्याची देखील तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वीज वितरण कंपनीस वेळोवेळी अर्ज देण्यात आले आहेत, तरी देखील कुठलीही दखल घेण्यात आली नाही.

त्याचप्रमाणे गावातील रस्त्यावर असणारे विद्युत पोल, जुन्या तारा, नवीन जोडणी, घरांवरून गेलेल्या धोकादायक विजतारा व मंजूर पोल याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराबाबत गावातील शेतकरी गावातील संबंधित कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले असता एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपअभियंता एस. टी. आहेर याठिकाणी उपस्थित झाले.

आश्वासनावर बोळवण

संतप्त शेतकऱ्यांनी अभियंता आहेर यांना जाब विचारला. यावेळी आहेर यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष नहिरे, अविनाश निकम, अमोल निकम, गब्बर निकम, संग्राम निकम, बापू मोरे, संदीप निकम, रावसाहेब निकम, दिनेश नवरे, नानाजी महिरे, विठ्ठल हिरे, चेतन अनावडे, आदी शेतकरी व ग्राहक उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकीवरून तापले वातावरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांना आचार्य जितेंद्र व गो-रक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी यू ट्यूब व्हिडियोवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ व दोघांना अटक करावी या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरातील विविध चाळीस ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईस्थित हिंदू आश्रमचे आर्चाय जितेंद्र व विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गो-रक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा यू ट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात येथील कॉंग्रेस आमदार अशिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार काँग्रेस समर्थकांनी पोलिसांकडे केली होती. या व्हिडिओत शेख यांच्यावर आतंकी आमदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर शेख यांनी या व्हिडिओतील सर्व आरोपांचे खंडन करीत शिर्के व आचार्य दोघांना अटक करण्याची मागणी केली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत अटक न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात दिला होता. काँग्रेस कमेटीचे प्रवक्ता साबीर गोहर यांनी यावेळी सांगितले की, आमदार शेख यांच्यावर शिर्के व अचार्य यांनी चुकीचे आरोप केले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देत कायदा सुव्यवस्थेस आव्हान दिले आहे.

आचार्य, शिर्केंच्या अटकेची मागणी

मंगळवारी शहरातील गांधी पुतळा, किदवाई रोड, भुक्कू चौक, मुशावरत चौक आदींसह विविध ४० ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. प्रत्येक ठिकाणी तीन कार्यकर्ते हातात काळ्या छत्र्या घेवून त्याद्वारे निषेध व्यक्त करीत होते. आचार्य जितेंद्र व गो-रक्षक मच्छिंद्र शिर्केया दोघांना अटक करण्यात यावी अशी मागणी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. या आंदोलनात साबीर गोहर, लतीफ बागवान, अस्लम अन्सारी यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी , नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज टाकीत पडला मुलगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंग गडावर आरोग्य उपकेंद्राच्या ड्रेनेजच्या उघड्या टाकीत ११ वर्षाचा मुलगा पडल्याने खळबळ उडाली. जवळच उभ्या असलेल्या ग्रामस्थांमुळे त्या मुलाला बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कळवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने वर्षभरापासून बोअर करतांना फूटलेली टाकी दुरुस्त का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नवनियुक्त उपसरपंच राजेश गवळी यांनी टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. स्वयंम संदीप बेनके असे त्या मुलाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी खेळता खेळता तो या टाकीत पडला होता.

गेल्यावर्षी जून महिन्यात ग्रामपंचायत मार्फत बोअरवेल करण्यात आले होते. आपल्या वार्डातही बोअरवेल व्हावे म्हणून गडावरील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच संदीप बेनके हे आग्रही होते. त्यानुसार त्यांच्या घराशेजारील कळवण पंचायत समितीच्या आरोग्य उपकेंद्राजवळ एक बोअर करण्याचे काम सुरू झाले. मात्र बोअर काही फुटांवर गेले असता दुर्गंधी पसरली व लक्षात आले की, उपकेंद्राच्या स्वछतागृहाची (ड्रेनेज) टाकी फुटली. तेव्हा ग्रामस्थांनी या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. याआधीही या उघड्या टाकीत गाय पडली होती. तर सोमवारी ही घटना घडली. याबाबत संतप्त झालेल्या संदीप बेनके यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षी बेनके यांच्या मागणीनुसार वार्ड क्र. ३ मध्ये बोअर केले. त्यावेळी टाकी नादुरुस्त झाल्याने बोअरचे काम थांबविले होते. या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.- राजेश गवळी, उपसरपंच

चुकीच्या ठिकाणी बोअर केली गेल्याने उपकेंद्राच्या टाकीचे नुकसान झाले. याबाबत कोणीही तक्रार केलेली नसल्याने हे काम पेंडिंग राहिले. सहाययक गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना तत्काळ घटनास्थळी काम मार्गी लावले.-डी. एम. बहिरम, बीडीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images