Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबकेश्वरला कलशयात्रा

$
0
0

माँ अन्नपूर्णा मंदिर सोहळ्यास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या अन्नपूर्णा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भव्य कलशयात्रेने रविवारी (दि. १८) शुभारंभ झाला. हा सोहळा दि. २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, त्यानिमित्त लक्षचंडी महायज्चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २१ फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माँ अन्नपूर्णाच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी, कलश शोभायात्रेद्वारा प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजता नीलपर्वतापासून सुरू झालेली ही यात्रा त्र्यंबकेश्वर मधील रस्त्यांवर वाजतगाजत कुशावर्तापर्यंत गेली. यात्रेत सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्वर स्वामी सच्चिनानंद गिरी, लक्ष्यचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित यांच्यासह देशभरातून आलेले भाविक, १०० यजमान जोडपी व नागरिक सहभागी झाले होते. आज (दि. १९) सकाळी ८ वाजेपासून अरणीमंथनद्वारा अग्नि प्रज्वलित करून लक्षचंडी महायज्ञाची सुरुवात होईल.

जोतिर्लिंग मंदिराचा कलश व मॉ अन्नपूर्णाचे दर्शन असा अदभूत योग मिळणाऱ्या नील पर्वतावर हे मंदिर ३ एकरच्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले असून, शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकच ठिकाणी असलेले हे देशातील दुसरेच ठिकाण आहे. वस्तूकलेचा अद्वितीय नमुना असलेले हे मंदिर पूर्णता: संगमरवर मध्ये साकारले आहे. या मंदिरात अन्नपूर्णा देवीची मूर्तीसह सरस्वती देवी व महाकालीची मूर्तीही पंचधातूमध्ये साकारल्या आहेत. दि. २१ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती समितीद्वारे देण्यात आली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नारळपाण्याची गोडी महागाईने झाली कमी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्यात थंडावा देणारे आणि रुग्णांसाठी संजीवनी ठरणारे नारळपाणी महागले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने, तसेच मागणी वाढल्याने विक्रेत्यांनी शहाळ्यांच्या दरामागे दहा रुपयांनी वाढ करीत ४० रुपये नगाप्रमाणे विक्री सुरू केली आहे. यामुळे नारळपाण्याची गोडी सर्वसामान्यांसाठी कमी झाली आहे.

शुद्ध नारळपाण्याला उन्हाळ्यात शीतपेय म्हणून पसंती दिली जाते, तसेच रुग्णाला भेट देताना नातेवाईक मंडळी नारळपाणी हमखास घेऊन जातात. शहाळ्यांची मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी नगामागे दहा रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना हे पाणी महाग झाले आहे. मागणी लक्षात घेता दर कमी होण्याची शक्यता धूसर आहे.

नारळपाण्याबरोबरच इतर रसरशीत फळांचीही मागणी वाढली आहे. टरबूज, खरबुजांचेही दर पाच रुपयांनी वाढले आहेत. टरबूज २० रुपये किलो, तर खरबूज ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पपईची आवक वाढली असली दर ३० रुपये किलोवर स्थिर आहेत. चिक्कू, सफरचंद, किवी, केळी या फळांचे दरही स्थिर आहेत. द्राक्षाची आवक वाढली असली तरी दर मात्र टिकून आहेत. येत्या काही दिवसांत आवक वाढून दर थोडे कमी होण्याची शक्यता आहे. डाळिंबाला सध्या चांगले दर मिळत आहेत. बाजार समितीत २० किलोच्या क्रेटला सरासरी १२०० ते १७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. ज्यूससाठी सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या संत्र्यांची ५० ते ७० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

किलोचे दर

पपई : ३०, द्राक्ष : ५० ते ६०, अॅपल बोर : ३०, टरबूज : १५, खरबूज : ३०, संत्री : ५०, चिक्कू : ६०, सफरचंद : ८० ते १२०, डाळिंब : ५० ते ७० रुपये, केळी : ३० रुपये डझन, किवी : ४० रुपये प्रतिनग, शहाळे : ४० रुपये प्रतिनग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमावळ्यांनी केला 'शिवबाचा' जयजयकार

$
0
0

वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात आयोजन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे विद्यार्थ्यांना दर्शन घडावे यासाठी शिवजयंतीनिमित्त निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेत 'शिवचित्रसृष्टी' साकारण्यात आली. शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या द्विमिती चित्रातून विद्यार्थ्यांना शिवचित्रसृष्टीचे दर्शन घडत आहे.

निफाडच्या शाळेत साकारण्यात आलेल्या या शिवचित्रसृष्टीत इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील शिवछत्रपतींचा संपूर्ण जीवनपट द्विमीती, त्रिमीती चित्रस्वरूपात तयार केला आहे. वैनतेय प्राथमिक विभाग, शिशुविहार, इंग्लिश मीडिअम, वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी कार्यक्रमात रोहन सोनवणे, नरेंद्र पुरी या विद्यार्थ्यांनी शिवरायांची वेषभूषा केली. बालमावळ्यांनी भगवे झेंडे नाचवत शिवबाचा जयजयकार केला. किरण खैरनार यांनी शिवरायांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, अॅड. ल. जि. उगावकर, राजेश सोनी, राजेंद्र राठी, किरण कापसे, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका मालती वाघावकर व पालकांनी अभिनंदन व कौतुक केले.

टाकाऊ वस्तूंमधून जीवनपट

टि. व्ही, फ्रीज यांच्या वाया गेलेल्या रिकाम्या खोक्यांचा वापर करून अतिशय कमी खर्चात आकर्षक व टिकाऊ असा शिवरायांचा जीवनपट तयार करण्यात आला आहे. यात शिवरायांचा जन्म, बालपण, शिक्षण, पुण्याचा कायापालट, स्वराज्याचे तोरण बांधले, प्रतापगडावरील पराक्रम, शर्थीने खिंड लढवली, बादशहाचा वाढदिवस, गड आला पण सिंह गेला, शिवरायांचा राज्याभिषेक आरमार दल, राजमुद्रा या पाठांसोबतच शिवनेरी, लालमहाल, राजगड, तोरणा, विजयदुर्ग, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, जंजिरा, पुरंदर, या किल्ल्यांची चित्ररूपी माहितीचे प्रदर्शन मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण महत्त्वाचे

$
0
0

खासदार सुप्रिया सुळे यांचे 'मायबोली' भेटीदरम्यान प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, येवला

सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी आपल्यातील अपंगत्वावर मात केल्याखेरीज त्यांचे आयुष्य आत्मनिर्भर होणार नाही, त्यांना आत्मभान येणार नाही. त्यासाठी शिक्षणाबरोबर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या शनिवारी (दि. १७) येवल्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी मायबोली या निवासी कर्णबधिर विद्यालयास भेट दिली.

अपंगत्वाने खचलेल्या अपंगांचे आत्मबल वाढविण्यासाठी त्यांना व्यावसायिक पुनर्वसन देणे यापेक्षा चांगले काम त्यांच्या आयुष्यात दुसरे कोणतेच असू शकत नाही, असेही सुळे यावेळी म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल' यात्रेच्या निमित्ताने येवला दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळे येवल्यात आल्या होत्या. येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात झालेल्या एका छोटेखानी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारोतराव पवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

मायबोलीच्या या भेटीदरम्यान खासदार सुळे यांनी कर्णबधीर मुलांशी संवाद साधला. मायबोलीची ही विशेष शाळा आणि अपंग पुनर्वसन केंद्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. अपंगांच्या शिक्षण-प्रशिक्षणासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी काम करणारी समता प्रतिष्ठान ही संस्था मानवतावादी कामातील आपला वाटा उचलत असल्यामुळे आपण या संस्थेला भविष्यात सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे आश्वासन खासदार सुळे यांनी यावेळी दिले.

विद्यालयातील विविध बाबींकडे समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून लक्ष वेधले. या मुलांच्या पुनर्वसनासाठी संस्था जुन २०१८ पासून पैठणी विणकाम, संगणक प्रशिक्षण, शिवणकाम यासारखे प्रशिक्षण वर्ग सुरू करणार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले. विश्वास को. ऑप बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, रविकांत वर्पे, अकबरभाई शहा, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागुनाथ उशीर, सलिल पाटील, मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे, सुकदेव आहेर आदींची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोख्याची दौड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या नाशिक मॅरेथॉन-२०१८ स्पर्धेत १५ हजारपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत यंदा प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या मिकयास येमाटा (वय २६) आणि महिला गटात कोलकाताच्या श्यामली सिंग यांनी बाजी मारली.

स्पर्धेची सुरुवात रविवारी (दि. १८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाली. उद्घाटनावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, सिनेअभिनेत्री संयमी खेर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आमदार सीमा हिरे, अभिनेता चिन्मय उदगीरकर, महंत बिंदू महाराज, भक्ती चरणदास महाराज यांच्यासह अन्य धार्मिक गुरू, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल उपस्थित होते. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार नागरिक ठिकठिकाणी उपस्थित होते. ४२ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला पाच वाजता सुरुवात झाली. त्यानंतर इतर स्पर्धक रवाना झाले. यादरम्यान झालेल्या झुम्बा डान्समुळे स्पर्धकांच्या उत्साहात भर पडली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर झुम्बा डान्स, तालरुद्रचे ढोल पथक आणि गुलालवाडीचे ढोल पथक हजर होते. स्पर्धेनंतर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, तसेच वादन केले.

पालकमंत्र्यांसह अधिकारीही धावले

पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिक मॅरेथॉनच्या पाच किलोमीटर अंतराच्या गटात सहभाग घेतला. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल याही मागे राहिल्या नाहीत. आरोग्याची काळजी घेण्यात आपणही मागे नसल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दाखवून देत २१ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी नोंदवून स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे अप्पर पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन यांनीही २१ किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी पोलिस आयुक्त असताना ही स्पर्धा सुरू केली होती. त्यानंतर झालेल्या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचा उत्साह

तीन किलोमीटर अंतर स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अगदी ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांनी सहभाग घेत स्पर्धेत रंगत आणली. यंदाची स्पर्धा नियोजनाच्या दृष्टीने उत्तम होती. स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी, ढोल पथके हजर होती. या सर्वांनी स्पर्धकांसह स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा उत्साह वाढवला.

दीड लाखाचे बक्षीस

या स्पर्धेचे विजेते ठरलेले मिकयास येमाटा आणि महिला गटातील कोलकाताची श्यामली सिंग यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्रत्येक स्पर्धकाला खास पदक देण्यात आले. ही स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट काहीसे अवघड होते. पण, आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो, हे दाखविण्याची संधी अनेक स्पर्धकांनी साधली.

ढोल, बँड अन् झिंगाट

गोल्फ क्लब मैदानावर सकाळपासून उत्साह ओसंडून वाहताना दिसला. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यासाठी शहरातत्च नव्हे, तर जिल्ह्यातील अगदी वेगवेगळ्या पाड्यांवरील शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उपस्थिती दर्शविली. गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या हजारो नागरिकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरला.

सामाजिक संघटनांचे उपक्रम

या स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या २० सामाजिक संघटनांनी सहभाग घेऊन जनजागृती केली. वेगवेगळे पोस्टर्स, तसेच कलाकारांनी केलेली वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. चाइल्ड लाइन संस्थेने यावेळी मुलांच्या हक्काविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

कड कुटुंबाचा आदर्श

या स्पर्धेत अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह त्यांच्या पत्नी नलिनी, मुलगा नयन आणि मयंक यांनी भाग घेतला. नलिनी कड यांनी २१, नयन १०, मयंक तीन, तर मधुकर कड यांनी पाच किलोमीटर स्पर्धा पूर्ण केली.

अतिशय महत्त्वाचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन झाले असून, त्यात हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, यातच सर्व आले. हा आरोग्याचा महाकुंभमेळा असून, याचे मनापासून स्वागत करतो.

-गिरीश महाजन, पालकमंत्री

या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या काळात झाली ही समाधानाची बाब आहे. तेव्हा लावलेले रोपटे आता वटवृक्ष होत असून, यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो. अत्यंत चांगले नियोजन झाले. मोठ्या संख्येने स्पर्धक नागरिक उपस्थित होते. यापुढेही एकोपा राहावा.

-एस. जगन्नाथन, अप्पर पोलिस महासंचालक

गत सहा महिन्यांपासून स्पर्धेची तयारी सुरू होती. नियोजनाच्या दृष्टिकोनातून हे एक आव्हान होते. मात्र, आम्ही ते पार पाडले. जवळपास २२ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांसह नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

नाशिकला येण्याची ही दुसरी वेळ होती. यावेळी पूर्ण मॅरेथॉन असून, यात बाजी मारायची असा निश्चय केला होता. सुदैवाने त्यात यश मिळाले. स्पर्धेचे आयोजन सर्वच दृष्टिकोनातून चांगले होते. स्पर्धकांची संख्या मोठी होती, तसेच नागरिकांनी चांगला उत्साह दाखवला.

-मिकयास येमाटा, मॅरेथॉन विजेता

मॅरेथॉनमधील ठळक बाबी...

-इथिओपियाच्या मिकयास येमाटाची ४२ किलोमीटरमध्ये बाजी

-कोलकात्याच्या श्यामली सिंगची महिला मॅरेथॉनमध्ये बाजी

-१५ हजारांवर धावपटूंचा सहभाग

-१० हजारांवर नागरिकांनी वाढविला उत्साह

-नाशिककरांसह देशी-विदेशी नागरिकांची उपस्थिती

-लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-शिर्डी रेल्वेमार्ग?

$
0
0

सिन्नरमार्गे ७२ किलोमीटरच्या मार्गाच्या सर्वेक्षणाचे सूतोवाच

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड-शिर्डी या ७२ किलोमीटरच्या थेट रेल्वेमार्गाची शक्यता पडताळून पाहली जात आहे. तसे झाले तर दुधात साखर. सिन्नरमार्गे जाणाऱ्या या नव्या रेल्वेमार्गाबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे सूतोवाच देण्यात आले आहे. याचबरोबर नाशिककरांसाठी अन्य काही महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचा सर्वे केला जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच रेल्वेसह केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. रेल्वे अर्थसंकल्पात नाशिककरांसाठी काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. रेल्वे मंत्रालयाने याबाबतचा अहवाल खुला केला आहे. त्यात काही आशादायक उत्तरे मिळाली आहेत. नाशिक ही धार्मिक नगरी आहे. येथे येणारे भाविक शिर्डीसारख्या काही जवळच्या धार्मिक स्थळांनाही भेटी देतात. शिर्डीला जाण्यासाठी भाविकांना बसचा आधार घ्यावा लागतो. त्यांना थेट रेल्वे सेवा मिळाली तर त्यांची सोय होऊन रेल्वेचा महसूलही वाढेल या उद्देशाने रेल्वे मंत्रालय नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गाची शक्यता पडताळून पाहत आहे. या मार्गावर सिन्नरच्या गुळवंचपर्यंत इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्याचा काही उपयोग नाशिक-शिर्डी मार्गासाठी होऊ शकतो.

नाशिक-सूरत या १८४ किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गासाठीही सर्वेक्षण करण्यावर रेल्वे मंत्रालयाचे एकमत झाले आहे. इगतपुरी-भुसावळ या ३०८ किलोमीटर दरम्यान तिसरी नवी रेल्वे लाइन टाकण्याचाही अंतिम लोकेशन सर्वे रेल्वे मंत्रालय करणार आहे. कसारा-इगतपुरी या सोळा किलोमीटर दरम्यान अनेकदा तांत्रिक अडचण होऊन गाड्यांना विलंब होता. त्यामुळे या दरम्यान चौथी लाइन टाकण्याची जुनी मागणी आहे. तीचा सकारात्मक विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तसा प्राथमिक सर्वेक्षण केले जाणार आहे.

प्रत्यक्ष कार्यवाही होणार का?

रेल्वेचे सर्वेक्षण म्हणजे 'बोलाची कढी आणि बोलाचाच भात' असा अनुभव असतो. नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण अनेकदा झाले. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद झाली. घोषणेला अनेक वर्षे झाली, अनेक मराठी रेल्वेमंत्री झाले. परंतु, अजून या मार्गाचा शुभारंभ झालेला नाही. प्रकल्प खर्च मात्र तिपटीने वाढला आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पातील प्रस्तावित नाशिक-शिर्डी व अन्य मार्गांचे केवळ सर्वेक्षणच होणार का, असा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला शिवराज्याभिषेक सोहळा

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत भगवा ध्वज हाती धरलेल्या युवती अन् जल्लोषपूर्ण ढोलवादनाने झालेली वातावरणनिर्मिती... अशा उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या जयघोषाने गोखले एज्युकेशन सोसायटीचा कॅम्पस दुमदुमला होता. या कॅम्पसमध्ये शिवचरित्र कीर्तनमालेच्या समारोपाच्या पुष्पात शिवराज्यभिषेक सोहळा रंगला. आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये हा भव्य सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कीर्तनमालेचे सातवे पुष्प रविवारी गुंफण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पंडित, उपाध्यक्ष आर. जे. गुजराथी, सचिव डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुनंदाताई गोसावी, संस्थेच्या मानव संसाधन व्यवस्थापन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

कीर्तनमालेत कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी शिवचरित्रातील राज्यभिषेक सोहळ्याचा प्रसंग सांगितला. यावेळी संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला. यावेळी ढोलवादनाच्या तालावर शिवस्तुती सादर करण्यात आली. या सोहळ्यात शिवाजी महाराज, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, तसेच मावळे व रयत असा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यानेच सर्व घटकांना समान न्याय दिला. या सन्मानामुळेच शिवराज्याभिषेक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे, असे कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सांगितले.

(लोगो- सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपला दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत जिल्हाभरात सुमारे ११२१ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जिल्ह्यामध्ये पाचवीसाठी १५३ केंद्रांवर, तर आठवीसाठी १२४ केंद्रांवर रविवारी ही परीक्षा झाली. सकाळी ११ ते १२.३० व दुपारी १.३० ते ३ या वेळेत ही परीक्षा विविध केंद्रांवर झाली. जिल्ह्यात पाचवी व आठवीतील एकूण ४३ हजार ३२४ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सुमारे एक हजार विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.

परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने विविध शाळांनी भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील ४३ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पाचवीतील २४ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २४ हजार १२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ६३६ विद्यार्थी यात अनुपस्थित होते. ही परीक्षा जिल्ह्यातील १५३ केंद्रांवर पार पडली. यासाठी १५३ केंद्र संचालक आणि ११ उपकेंद्र संचालकांसह १२२३ पर्यवेक्षकांनी काम पाहिले.

आठवीमधून १९ हजार ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १८ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४८५ विद्यार्थी गैरहजर होते. १२४ केंद्रांवर १२४ केंद्र संचालक आणि ७ उपकेंद्र संचालकांसह ९४४ पर्यवेक्षकांनी परीक्षेचे नियोजन केले.

परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर ३०० गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ३० टक्के सोप्या स्वरूपाचे प्रश्न, ४० टक्के मध्यम स्वरूपाचे, तर ३० टक्के कठीण स्वरूपाचे प्रश्न असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. नाशिक महापालिका क्षेत्रात पाचवीसाठी ३० आणि आठवीसाठी २८ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, परीक्षेचे जिल्हा समन्वयक प्रमोद चिंचोले आदींच्या पथकांनी परीक्षेदरम्यान डी. डी. बिटको शाळा, मराठा हायस्कूल, होरायझन स्कूल आदी परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये मालेगावचे ब्रँडिंग

$
0
0

शहरातील नवउद्योजक होणार सहभागी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई येथे दि. १८ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ - ग्लोबल इन्व्हेस्टर समिट' अंतर्गत देश-विदेशातील उद्योजकांचा मेळा आयोजित करण्यात येत असून, या समेटअंतर्गत शहरातील तरुण उद्योजक सहभागी झाले आहेत. या मोठ्या स्तरावरील कार्यक्रमात मालेगावच्या ब्रँडिंगला चालना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. १८) मुंबईत या समिटचे उद्घाटन झाले असून, दि १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी मालेगाव शहरातील उद्योजक जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. या प्रदर्शनात शहरातील उद्योजकांचे चार स्टॉल आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, या स्टॉलमध्ये साखर उत्पादनातील एम. बी. शुगर, कापड उद्योगातील एच. पी. टेक्सस्टाइल, केजल, सौर ऊर्जेतील इन्फ्रा सोलर या मालेगावातील उद्योग व उत्पादनाचे स्टॉल आहेत. प्रदर्शनासाठी अजिंक्य भुसे यांच्यासह अरविंद पगार, रविश मारू, मनीष बाहेती, सम्यक लोढा, चिंतन जैन यासह शहरातील तरुण उद्योजक सहभागी झाले आहेत. मालेगाव शहरातील उद्योग व उत्पादनांना देश-विदेशात ओळख मिळावी, या उद्देशाने उद्योजक सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजन्मोत्सवानिमित्त शहर 'भगवेमय'

$
0
0

शिवजन्मोत्सव निमित्ताने रॅली, दीपोत्सव, मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शिवजयंती निमित्ताने मालेगाव शहर व तालुक्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच शिवप्रेमींनी जोरदार तयारी केली आहे. आज (दि. १९) शहरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरात रस्त्यावर भगवा ध्वज जागोजागी लावण्यात आल्याने शिवजयंतीनिमित्ताने शहरातील वातावरण भगवामय झाले आहे.

शहरातील जुना मुंबई-आग्रा रोडवरील पांजरापोळजवळील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवजयंती पार्श्वभूमीवर मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. १८) बाइक रेलीचे आयोजन करण्यात आले होते. भुईकोट किल्ला येथे भगवा ध्वजारोहण झाल्यानंतर या रॅलीस प्रारंभ झाला. या वेळी तरुण, तरुणी, महिला सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी उशिरा शिवाजी पुतळा येथे शिवदीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.

शहरातील मोसमपूल सर्कल, कॅम्प रोड आदी प्रमुख रस्त्यांवर शिवजयंती निमित्ताने विविध दुकाने सजली आहेत. या दुकानांवर विविध आकारातील भगवे ध्वज, टीशर्ट, किचन, फोटो फ्रेम, टोपी असे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. तसेच शहरातील अनेक दुचाकी , चारचाकी वाहनधारक रिक्षा चालक यांनी आपापल्या वाहनांवर भव्य असे भगवे ध्वज लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड बॅँकेचा न्यूबा पुरस्काराने गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स असोसिएशनतर्फे चंदीगड येथे झालेल्या कार्यक्रमात नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेला न्यूबा पुरस्काराने गौरविण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब पाळदे, संचालक अशोक सातभाई, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडिया, अरुण जाधव, बाबा सदाफुले, सुनील आडके आदी उपस्थित होते. चंडीगढ येथे उत्तर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी व संचालक यांच्यासाठी तीन दिवसीय शिबिर झाले. त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या कामगिरीचा आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यात आला. विविध सात प्रकारच्या ठेवींच्या गटातून पारितोषिके प्रदान करण्यात आली. नाशिकरोड बँकेला चारशे कोटींच्यावर ठेवी असलेल्या गटातून प्रथम क्रमांक मिळाला. सतीश मराठे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. नाशिक जिल्हा नागरी सहकारी असोशिएशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, यशवंत अमृतकर, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभाग ‘मनरेगा’त अव्वल

$
0
0

कामाचा मोबदला मजुरांच्या बँक खात्यात जमा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा) कामाचा मोबदला मजुरांच्या बँक खात्यावर वेळेत जमा करण्यात नाशिक विभागाने राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

मनरेगा मजुरांना वेळेत मजुरी दिली न गेल्याने सरकारला सुमारे ३० लाख रुपयांचा भुर्दंड बसल्याची बाब काही महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसुल करण्याची तंबी दिली होती.

गेल्या वर्षी मे महिन्यात महेश झगडे यांनी नाशिक विभागीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गतिमान आणि पारदर्शी प्रशासकीय कारभाराला सर्वोच्च स्थान दिले. 'मनरेगा'चा विभागीय आढावा घेतल्यानंतर नाशिक विभागात मनरेगाच्या जॉब कार्ड धारकांना कामाची मजुरी मिळण्यास मोठा उशीर झाल्याने सरकारला सुमारे ३० लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उशिरा मजुरी मिळालेल्या मनरेगा जॉब कार्डधारकांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर दंडाची रक्कम संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसुल केली जाईल, अशी तंबी विभागीय आयुक्तांनी रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मनरेगाच्या प्रगतीत नाशिक विभाग राज्यात तळाला असल्याची बाबही विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी 'मनरेगा'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लक्ष घातले होते. 'मनरेगा' मजुरांना मजुरी मिळण्यास १०० दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रतिदिन पाच पैसे इतका आर्थिक दंड शासनाला होत असतो.


४८,४५२ मजुरांना वेळेत मजुरी

नाशिक विभागीय आयुक्त झगडे यांनी मनरेगा अंमलबजावणीत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली. विभागात 'मनरेगा'च्या ४८ हजार ४५२ मजुरांना कामाचा मोबदला वेळेत मिळाला. 'मनरेगा' मजुरांना कामाचा मोबदला वेळेत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यात तळाला असलेल्या नाशिक विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये राज्यातील सर्व महसूल विभागात अव्वल स्थान पटकावले. ९५ टक्के मजुरांना वेळेत मजुरी मिळालेली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१७ मध्ये हे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहचले होते. काम पूर्णत्वाबाबतही नाशिक विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

जॉब कार्ड व्हेरीफिकेशनही गतीने

नाशिक विभागात 'मनरेगा'चे १८ लाख ३४ हजार ५३४ जॉब कार्डस असून त्यापैकी ४ लाख ८७ हजार ३१९ इतकी अॅक्टिव्ह जॉब कार्ड्स आहेत. अॅक्टिव्ह जॉब कार्ड्सपैकी ४ लाख ५३ हजार ९६२ जॉब कार्ड्सचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. राज्याचे जॉब कार्ड्स व्हेरीफिकेशनचे प्रमाण ९० टक्के असून नाशिक विभागाचे ९३ टक्के इतके आहे. वर्षभरात १०८.३२ लाख इतके दिवस काम झाले असून त्यासाठी २९७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरला शिवरायांची ६० फूट कमान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहरात शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून, आज (दि. १९) शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने संयुक्त सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने शहरातील बस स्टँडजवळ सुमारे ६० फूट उंच व ५२ फूट रुंदीची शिवरायांची अश्वारुढ प्रतीमा असलेली भव्य कमान उभारण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी चौकातील परिसर सुशोभित करण्यात आला आहे. आडवा फाटा परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार असून, वावी वेस भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप होणार आहे. पूर्ण शिवजयंती सोहळ्यावर यंदा प्रथमच सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. पोलिसांनी मिरवणूक मार्गावर आठ ठिकाणी कॅमेरे बसविले असून, सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी सांगितले.

येथील शिवराज मावळे ग्रुपच्या वतीने शिवरायांचा रायगडावरील होळीच्यावर स्थानापन्न १८ फुटी भव्य पुतळा उभारण्यात येत असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष कृष्णा कासार यांनी दिली. येथील सरदवाडीरोड परिसरात असलेल्या सिल्व्हर लोटस् स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शिवजयंती दिनापासून (दि.१९) नऊ दिवस चालणार आहे. या सोहळ्यातून छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र, स्वराज्य, गडकिल्ले, प्रशासन याची अनुभूती मिळणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष दिलीप बिन्नर यांनी दिली.

स्वराज्य रक्षकांच्या वंशजांचा सन्मान

सिल्व्हर लोटस स्कूलच्या सोहळ्यात विविध शूरवीर सेनापतींच्या वंशजांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात पानिपत लढाईतील शुरवीर राणेखान यांचे सातवे वंशज मुस्ताक अहमद जहाँगीरदार, विठोजी राजे भोसले यांचे चौदावे वंशज विठ्ठल राजेभोसले, हतगडचे पराक्रमी किल्लेदार गंगाजी उर्फ गोबाजी मोरे देशमुख यांचे तेरावे वंशज मनोहर मोरे देशमुख, थोरले बाजीराव पेशवे यांचे मामा मल्हारराव बर्वे यांचे नववे वंशज प्रा. चंद्रशेखर बर्वे, बाजीप्रभू देशपांडे यांचे अकरावे वंशज नीलेश दिपक देशपांडे, येसाजी कंक यांचे चौदावे वंशज सिध्दार्थ कंक, तानाजी मालुसरे यांच्या चौदाव्या वंशज शीतलताई मालुसरे व सिंदोजी नाईक निंबाळकर यांचे नववे वंशज राजेंद्रसिंह निंबाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

येवल्यात जय्यत तयारी

येवला : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून येवला शहरात साजरी होणारी शिवजयंती करण्यासाठी उत्सव समितीने कंबर कसली असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मिरवणूक मार्गात व परिसरातील स्वच्छता करण्यात येऊन भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. उत्सव समितीच्या तयारीच्या आढावा बैठकीत प्रमुख संयोजक सुभाष पाटोळे ,युवराज पाटोळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी संजीवनी रुरल एजुकेशन सोसायटीचे विश्वस्त नितीन कोल्हे-पाटील यांचेसह प्रांताधिकारी, तहसीलदार या प्रमुख अतिथीसह शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेली ७८ वर्ष तिथीनुसार साजरी केली जाणारी ही येवल्यातील ऐतिहासिक शिवजयंती यंदा मात्र १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (दि.१९) सकाळी ९ वाजता संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील शिवप्रेमी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणार आहेत. त्यानंतर भव्य रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन द्या

$
0
0

रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्य कोठून स्पेअर पार्टस आणून त्याची आपल्याकडे जोडणी करणे म्हणजे 'मेक इन इंडिया' नव्हे. 'मेक इन इंडिया' हा असेंबल इंडिया नसावा. स्वत: इनोव्हेशन करून जगाला वस्तू, तंत्रज्ञानाचा पुरवठा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने 'मेक इन इंडिया' आहे. नव्या पिढीतील मुलांमध्ये प्रचंड कल्पकता असून, राष्ट्रविकासासाठी या कल्पकतेला विद्यार्थीदशेपासूनच प्रोत्साहन द्यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले.

आरएस सायन्स टुर्सच्या रवींद्र शास्त्री यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयात ग्रेट भेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेत भरविलेल्या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी माशेलकर यांनी केली. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करून देशाला फायदा कसा होईल याचा विचार ही मुले आतापासून करतात ही आनंदाची गोष्ट असल्याचे कौतुगोद्गार त्यांनी यावेळी काढले.

ते म्हणाले, की 'नवीन कल्पनांची पूर्ती होऊन ती बाजारपेठेत येणे याला इनोव्हेशन म्हणतात. बदलांमुळेच माणसाचे आयुष्य बदलत असते. परंतु, हे बदल स्वीकारत असताना त्यापैकी किती संशोधन भारतात झाले, याचाही आवर्जून विचार व्हायला हवा. आपल्याकडे 'मेक इन इंडिया'चा नारा देण्यात आला असून, त्यामुळे इनोव्हेशनला, रोजगार निर्मितीला आणि आर्थिक विकासालाही गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजाला उपयुक्त ठरेल असे काही निर्माण व्हायला हवे, असे सांगतानाच शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवेसाठी काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांनी सकाळी उठताना 'माय बेस्ट इज यट टू कम' असे म्हणायला हवे तर रात्री झोपताना माझा भारत, माझा भारत, माझा भारत असे तीन वेळा बोलायला हवे असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध माता-पित्यांची मुलांकडूनच उपेक्षा

$
0
0

नाशिक : मुलांना म्हातारपणाची काठी म्हणतात; परंतु वृद्ध मातापित्यांची सेवाशुश्रूषा करण्याऐवजी त्यांच्या मूलभूत हक्कांवर काठी उगारण्याचेच प्रकार हल्ली सभोवती घडू लागले आहेत. कुटुंबातील वृद्ध मातापित्यांबाबत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अशा पाल्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने तक्रारी वाढल्या आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारींतून हे वास्तव समोर आले आहे.

नाशिकमध्येच जन्मलेल्या 'नटसम्राट' या अभिजात कलाकृतीतून आईवडिलांची वृद्धापकाळात पोटच्या मुलांकडूनच हेळसांड दाखविण्यात आली आहे. अशीच काहीशी कैफियत जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली जाऊ लागली आहे. अन्यायग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ या कायद्याचा मोठा आधार मिळू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी अशा तक्रारींमध्ये तिपटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. आयत्या बिळावर नागोबा होऊन बसणाऱ्यांमुळे ज्येष्ठांना उपेक्षिताचे जीणे जगावे लागते. अशा वृद्ध व्यक्तींनी थेट मायबाप सरकारच्या महसूल विभागाकडेच दाद मागण्यास सुरुवात केली आहे. कायदा अन् हक्कांबाबतच्या जनजागृतीमुळे तक्रारींची संख्या वाढत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

२०१५ मध्ये ३ जणांनी, तर २०१६ मध्ये २ जणांनी या कायद्याची मदत घेत संबंधित भागातील प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला. या पाच तक्रारींपैकी प्रत्येकी दोन तक्रारी नाशिक आणि निफाडच्या होत्या, तर एक तक्रार मालेगावमधील होती. गेल्या वर्षी १० वृद्ध माता- पित्यांनी मुले सांभाळत नसल्याची, त्यांच्याकडून हेळसांड होत असल्याची व त्यांनी जगणे मुश्कील केल्याची कैफियत मांडली. त्यापैकी पाच तक्रारी नाशिक शहर आणि तालुक्यातील आहेत. चार मालेगावच्या, तर एक तक्रार चांदवडमधील आहे. समाजकल्याण विभाग आणि न्यायालयांमध्ये अशी किती प्रकरणे असतील याची तर गणतीच न केलेली बरी. महसूल विभागाकडे दाखल प्रकरणांपैकी पाच प्रकरणांमध्ये निकाल देण्यात आले आहेत. काही प्रकरणांत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले असून, त्यावर निर्णय होणे बाकी आहे. अशा प्रकरणांत वादी आणि प्रतिवादींशी चर्चा करून तक्रारीचे स्वरूप समजून घेतले जाते. तक्रारीमधील तथ्य तपासून निकाल दिला जातो. निकाल मान्य नसल्यास तक्रारदार किंवा ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशी व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करते. अशा प्रकरणांत निकाल कायम ठेवला जातो किंवा त्यामध्ये अंशत: बदल केले जातात.

कायदा कोणासाठी?

६० वर्षांहून अधिक वयाची कोणत्याही व्यक्तीला निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ या कायद्याद्वारे मदत मागता येते. नोकरी, व्यवसायामुळे ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. जे ज्येष्ठ नागरिक स्वत:च्या उत्पन्नामधून अथवा त्यांच्या मालमत्तेमधून स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत व ज्यांची मुले, नातेवाईक अथवा पाल्य त्यांची काळजी घेण्यास निष्काळजीपणा दाखवितात, त्यांना या कायद्यान्वये दाद मागता येते. संबंधितांना दरमहा १० हजार रुपयांपर्यंत मासिक भत्ता देण्याचे आदेश न्यायाधीकरण करू शकते. घराचा, जमिनीचा ताबाही त्याद्वारे मिळविता येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणावरील तरतूद वाढविणे गरजेचे

$
0
0

भाऊसाहेब चासकर यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शिक्षण हक्क कायदा ही कायदेशीर बाब असल्याने यापासून शासनाला दूर जाता येणार नाही. आजमितीस विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील खर्च हा अतिशय कमी आहे. ही तरतूद वाढविण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी केली.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी चासकर यांनी 'आजचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षकाची भूमिका' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, की शासनाने शंभर शाळा आंतरराष्ट्रीय करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. पण, शंभरऐवजी राज्यातील शंभर टक्के शाळा या आंतरराष्ट्रीय करण्याचे शासनाचेच कर्तव्य आहे. त्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून गुणवत्तावर्धनाचे काम करू द्यायला हवे असेही चासकर म्हणाले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्याम जवंजाळ होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नगरसेवक राहुल दिवे, मनपा शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, राजेंद्र म्हसदे, बाजीराव परदेशी हे विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने शिक्षिकांना गौरविण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कारार्थींमध्ये सुवर्णा लहिरे (प्रवरानगर, जि. नगर), मंजुषा स्वामी (हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), वैशाली भामरे (हाताणे, ता. मालेगाव, जि. नाशिक), वैशाली भोईर (आसनगाव, ता. शहापूर, जि. ठाणे), गीतांजली भोये (आंबेगण, ता. दिंडोरी, जि. नाशिक), तर जिल्हास्तरीय पुरस्कारार्थींमध्ये क्रांतीकुमार जाधव, वैभव गगे, कुंदन दाणी, संजय भामरे, शोभा दाणी, सुभाष बेलदार, संभाजी अनुसे, राजेश अमृतकर, सुनील कुटे, प्रमिला पगार, मीना शेवाळे, दत्तू कारवाळ, संतोष चव्हाण, रामदास भोये, मंगला गवारे, शारदा पवार, शिवाजी शेवाळे, गंभीर आहिरे, माणिक भालेराव, योगेश सूर्यवंशी, मंगला गायकवाड, संजीवनी जगताप, संजय सातपुते, प्रशांत गाजूल, मनोरमा सोनवणे, कल्पना पवार, हौसीराम भगत, विठ्ठल नागरे यांचा समावेश होता.

जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री खरे व सिध्दार्थ सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास बोढारे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचाही गौरव

गंगा म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिनी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात जनार्दन फसाळे, प्रशांत बेंडकोळी, पवन फसाळे, हिरामण फसाळे, मदन फसाळे, भारत फसाळे, जनार्दन फसाळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांचे नंबर प्लेट बनविणारे रडारवर

$
0
0

नियमांकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल करणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनाची कागदपत्रे न पाहता नंबर प्लेट बनवून देणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढे गुन्हेगारास मदत केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शोध पथकाने शोधून काढलेल्या सर्वच वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये बनावट नंबर प्लेट आढळून येत असल्याने ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

शहरासह ग्रामीण भागात फॅन्सी नंबर प्लेट तयार करून दिल्या जातात. नंबरचा वापर करून राज, दादा, भाऊ किंवा इतर नावे बनवून सर्रासपणे कायदा धाब्यावर बसविण्याचे काम केले जाते. कम्प्युटरच्या माध्यमातून नंबर प्लेट तयार होत असल्याने यात वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. तसेच, प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने विक्रेत असल्याने व्यावसायवृध्दी करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. याचा थेट फायदा वाहनचोरट्यांना होत आहे. चोरी केलेल्या वाहनाचा क्रमांक बदलून अशी वाहने दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यात अथवा राज्यात विक्री केली जातात. शहरात २०१७ मध्ये ६०२ आणि २०१६ मध्ये ५२८ वाहने चोरी गेली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुध्दा वर्षागणिक ४०० ते ५०० वाहनांवर चोरटे हात साफ करतात. याबाबत बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की मागील वर्षभरात वाहनचोरीचे जे गुन्हे उघडकीस आले त्यात वाहनाचा क्रमांक बदलण्यात आल्याचे समोर आले. आपण एका गुन्ह्यात सहभागी होत आहोत, याकडे व्यावसाय करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचा थेट फायदा चोरट्यांना होत असून, यापुढे नंबर प्लेट तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे कर्पे यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिकांसाठी सूचना

ग्रामीण भागात वाहन क्रमांक तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांनी वाहनधारकाकडून वाहनाचे आरसी बुक, वाहन परवाना, तसेच त्या व्यक्तीचे आधारकार्ड यांची छायाकिंत प्रत घेऊन त्याची रजिस्टरला नोंद घ्यावी. ही पूर्तता झाल्यानंतरच नंबर प्लेट बनवून द्यावी. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवर वाहनचोरीच्या गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक कर्पे यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी दमबाजी करून काम करवून घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक दंडाचा होणार ‘फायदा’

$
0
0

ट्रॅफिक वार्डनसाठी रक्कम वापरण्यासाठी चाचपणी

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : वाहतूक पोलिसांकडून वसूल होणारी दंडाची रक्कम स्थानिक पातळीवर वापरता यावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. शहर वाहतूक पोलिसांकडून नियुक्त होणाऱ्या ट्रॅफिक वार्डनसाठी हा पैसा कसा वापरता येईल याची चाचपणी होत असून, वाहतूक पोलिसांची संकल्पना पुढे आल्यापासून प्रथमच दंडाच्या रकमेचा थोडाफार फायदा शहरासाठी होणार आहे.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून पोलिस तडजोड शुल्क अर्थात दंड वसूल करतात. हा पैसा नियमितपणे सरकारी तिजोरीत जमा होतो. वाहतूक पोलिसांकडून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा फायदा मात्र शहराला होत नाही. नाशिक शहर पोलिसांनी २०१७ मध्ये एक लाख ८४ हजार १०७ वाहनचालकांवर कारवाई करीत चार कोटी ५३ लाख ५३ हजार ६१० रुपयांचा दंड वसूल केला होता. कारवाईच्या दृष्टिकोनातून हा आकडा फारच मोठा ठरला. सन २०१७ मध्येच शहर वाहतूक शाखेने ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्याबाबतच एक प्रस्ताव सरकारला सादर केला होता. या प्रस्तावाची सरकारने दखल घेतली. पण, ट्रॅफिक वार्डनला मानधन कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी ट्रॅफिक वार्डनला मानधन देण्याचे काम महापालिका प्रशासन करीत होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले. तर बजेटमध्ये अशी कोणतीही तरतूद नसून, मानधन देण्याबाबत महापालिकेने हतबलता दर्शवली. मानधनाचा चेंडू पुन्हा सरकारच्या कोर्टात गेला. नुकत्याच वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. यात वाहतूक पोलिसांकडून वसूल होणाऱ्या एकूण दंडाच्या रकमेपैकी काही टक्के रक्कम ही ट्रॅफिक वार्डनच्या मानधनासाठी तसेच, इतर आवश्यक पायाभूत सुविधांसाठी राखीव ठेवण्याबाबत ऊहापोह झाला. सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा थेट फायदा वाहतूक नियोजनात दिसून येऊ शकतो.

७५ ट्रॅफिक वार्डन मिळण्याची शक्यता

शहर वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी तब्बल ७५ ट्रॅफिक वार्डन मिळावेत, असा प्रस्ताव आहे. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. वाहतूक पोलिसांचा कारभार आता चार युनिटच्या माध्यमातून सुरू झाला असून, कर्मचाऱ्यांची संख्याही दुप्पट म्हणजे २०० करण्यात आली आहे.

वर्ष - दंड वसूल

२०१५ - एक कोटी ३१ लाख

२०१६ - दोन कोटी ४२ लाख ३० हजार ८००

२०१७ - चार कोटी ५३ लाख ५३ हजार ६१०

वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या विविध समस्या कमी करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन्सची नियुक्ती होणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव प्रलंबित असून, ट्रॅफिक वार्डनच्या मानधनाच्या प्रश्न सुटला की या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल.

- अजय देवरे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक फोडणाऱ्या सिन्नरच्या टोळीचा छडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत घरफोडी करून पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला गुन्हे शोध पथकाने (एलसीबी) शिताफिने बेड्या ठोकल्या. या टोळीने सिन्नरसह इतर तालुक्यांमध्ये घरफोडी आणि वाहनचोरीची कबुली दिली आहे.

स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी (वय १९, रा. देवीमंदिररोड, सिन्नर), अर्जुन गोरख धोत्रे (वय २३, रा. इदगाह मैदानाच्या पाठीमागे, सिन्नर, हल्ली श्रमिकनगर, जेलरोड, नाशिकरोड) आणि करण प्रकाश घुगे (रा. इदगाह मैदानाच्या पाठीमागे, सिन्नर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून २९ सप्टेंबर २०१७ रोजी सिन्नर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेची पाठीमागील भिंत फोडून आत प्रवेश केला होता. बँकेचे तिजोरी फोडताना सायरन सुरू झाल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या तसेच इतर काही तपासावरील गुन्ह्यांचा आढावा घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे तसेच अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू केला. त्यात, ओझर परिसरात घरफोडी करणाऱ्या संशयिताचा मुक्काम असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी ओझर येथून स्वप्नील गोसावीला अटक केली. त्यानंतर अर्जुनला नाशिक येथून, तर करणला सिन्नर शहरातून अटक करण्यात आली. संशयितांनी बँक फोडल्याची तसेच दोन घरफोडी व वाहनचोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कर्पे यांनी दिली. ही कारवाई कर्पे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक राम करपे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, मुनीर सैय्यद, पोलिस नाईक दिलीप घुले, प्रितम लोखंडे, रावसाहेब कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सुशांत मरकड, मंगेश गोसावी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ चौकी प्रतीक्षेतच; ज्येष्ठांना मात्र आधार

$
0
0

ज्येष्ठांना मात्र आधाराची सावली

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कधी काळी दसक परिसराच्या सुरक्षेचे केंद्र असलेल्या दसक पोलिस चौकीत काही वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या पोलिस चौकीवर शापित पोलिस चौकी असा शिक्का खुद्द पोलिसांनीच मारल्याने ही पोलिस चौकी गतवैभवाच्या प्रतीक्षेत आहे. पोलिसांनी ही पोलिस चौकी वाळीत टाकली असली तरी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मात्र ही पोलिस चौकी आधाराची सावली देत आहे.

दसक येथील महालक्ष्मीनगर येथे दसक पोलिस चौकी आहे. उपनगर पोलिस ठाण्याची निर्मिती होण्यापूर्वी ही चौकी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. मात्र उपनगर पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर दसकची पोलिस चौकी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट झाली. या चौकीत काही वर्षांपूर्वी एका पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलिसांनी ही पोलिस चौकी बहिष्कृत केली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून या पोलिस चौकीचा वापर बंद केला होता. तेव्हापासून या पोलिस चौकीला गतवैभवाची प्रतीक्षा लागून आहे.

पोलिसांनी या पोलिस चौकीला अव्हेरले असले तरी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मात्र या पोलिस चौकीकडून आधाराची सावली मिळत आहे. दुपारच्यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक या पोलिस चौकीच्या ओट्यावरील सावलीत आपले निवांत क्षण घालवण्यासाठी एकत्र येतात. पोलिसांच्या दृष्टीने भूतबंगला ठरलेली ही पोलिस चौकी ज्येष्ठांसाठी मात्र मनमोकळे करण्याची हक्काची जागा ठरली आहे.

दसक पोलिस चौकीत रात्रीच्या वेळी मद्यपींचा सर्रास वावर असतो. येथील उद्यानात झाडे झुडूपे वाढली आहेत. या झाडा झुडूपांच्या आश्रयास लव्ह बर्डस देखील सर्रास आढळून येत आहेत.

- सचिन भोसले, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images