Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नमाड हळदी कुंकवातून सामाजिक संदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सध्या सगळीकडे हळदीकुंकवासाठी महिलांची एकच धावपळ सुरू आहे. घरी येणाऱ्या महिलांना वाणात काय द्यायचे यावर आठवडाभर खल करूनही काहींना सर्वोत्तम वस्तू सापडत नाही. सापडली तरी नेमकी तिच वस्तू शेजारच्या गृहिनीने आधीच वाटली असं कळत आणि महिलांचा हिरमोड होतो. यावर मनमाड येथील भाग्यश्री दराडे यांनी चौकटीच्या बाहेर विचार करून वाणात महिलांना सॅनिटरी नॅपिकन वाटले. त्यांनी वाटलेला हा आगळावेगळा वाण पाहून घरी आलेल्या महिलांनीही येत्या हळदीकुंकवात असे नपॅकिन वाटण्याचा निर्धार केला.

दराडे यांनी महिलांना वाण म्हणून नॅपकिन तर वाटलेच शिवाय मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी व पाळावयाची स्वच्छता याबाबत देखील त्यांनी आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. सॅनिटरी नॅपकिनची उपयुक्तता समजावून सांगितली. त्यांच्या या उपक्रमाचे आणि प्रबोधनाचे परिसरात स्वागत होत आहे. संक्रांतीच्या सणानिमित्त घरी हळदी कुंकू करून महिलांना वाण देण्याची प्रथा सर्वत्र आहे. वाण म्हणून विविध गृहोपयोगी वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधनेही वाटले जातात. भाग्यश्री दराडे यांनी मोठ्या धाडसाने यंदा संक्रांतीचे वाण म्हणून सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती डॉ. भागवत दराडे यांनीही या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले. सुरुवातीला सॅनिटरी नॅपकिन चे वाण घेताना काही महिलांना अवघडल्यासारखे झाले. पण त्यांना याबाबत समजावून सांगत दराडे यांनी प्रबोधन केले. नुसते वाण वाटले नाही तर त्यामागचा उद्देश देखील त्यांनी समजावून सांगितला.

उपक्रमाचे कौतुक

या उपक्रमाचे महिलांच्या 'आम्ही मनमाडकर' या सोशल मीडियावरही स्वागत झाले. ज्या विषयावर बोलणे महिला टाळतात, त्यावर दराडे यांनी मात करीत थेट सॅनिटरी

नॅपकिनचे वाण वाटले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात आजपासून हेल्मेट कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट वापरामुळे शहरात जीवघेण्या अपघातांच्या घटनांत सातत्याने घट होत आहे. मात्र, अनेकदा नागरिक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट सोबत ठेवतात, पण परिधान करीत नाहीत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२३) शहर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

अती वेगामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकीचालकांचा हकनाक बळी जातो. रस्ते अपघातांत असे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी गतवर्षापासून दुचाकीचालकांसाठी हेल्मेट वापरण्यास सक्ती सुरू केली. सुरुवातीला थोडाफार विरोध झाला. पण, पोलिसांनी कधी जनजागृती तर कधी कारवाई असे धोरण ठेवत आपल्या निर्णयाची अंमलबजावणी केली. पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे जीवघेण्या अपघातांत घट झाली असून, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली. मात्र, अजूनही बरेच दुचाकीचालक हेल्मेट आरशाला अडकून किंवा डिकीत ठेवून प्रवास करतात. विशेषत: तरुणवर्गाचा यात समावेश असतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीचालकांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी आज, मंगळवारपासून शहर पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेचा वापर करावा व वाहतूक नियमांचे पालन करून आर्थिक दंड होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोटींची दंडवसुली

२०१७ मध्ये जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान हेल्मेट परिधान न केलेल्या २२ हजार १६८ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दुचाकीचालकांकडून तब्बल एक कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. यादरम्यान वाहतूक पोलिसांनी जवळपास साडेचार कोटी रुपयांचा दंड वसूल केला. म्हणजे एकूण दंडापैकी जवळपास २५ टक्के दंडाची रक्कम फक्त दुचाकीचालकांनी भरलेली दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांवर सवलत

0
0

प्रजासत्ताक दिनानिमित्त योजना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी ग्राहकांसाठी सवलतींचा वर्षाव सुरू केला असून, त्याला तोड म्हणून दुकानदारांनीही सवलत देऊ केली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

सध्या बाजारात खरेदीची धूम आहे. मेनरोड, भद्रकाली, रविवार कारंजा या भागात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ दिसून येते आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स कंपन्याच्या फेस्टिवल सेलची धूम सुरू झाली आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन या तिन्ही बड्या ई-कॉमर्स कंपन्यांचे ऑनलाइन सेल सुरू झाले आहेत. जास्तीत जास्त प्रकारची उत्पादने आणि आकर्षक ऑफर्सची दोन्हीकडे रेलचेल आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल २६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

तीनही कंपन्यांनी फर्निचर, कपडे आदींवर या सेलमध्ये आकर्षक सवलत आहे. या सेलमध्ये अगदी ९० टक्क्यांपर्यंत मोठी सूट देत असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. उद्योग क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते, 'या कंपन्या या ऑनलाइन सेलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांपर्यंतची उत्पादने विकू शकतात. ऑफर्समुळे ग्राहकांचीही चंगळ आहे. सेलमधील ऑफर्सव्यतिरिक्त विविध बँकांच्या कार्ड्सवरदेखील डिस्काऊंट मिळणार आहेत. याशिवाय 'नो कॉस्ट इएमआय'चा देखील पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. जी वस्तू बाजारात १०० रुपयाला मिळते आहे, तीच वस्तू या कंपन्यांनी ७० रुपयाला विक्रीस ठेवली आहे.

दुकाने, मॉल्सवरच भरवसा

ई कॉर्मस कंपन्यांनी कितीही घोषणा केल्या तरीही काही पारंपरिक ग्राहक मात्र आजही कानाडोळा करीत आहेत. आजही काही लोक वस्तू हातात घेऊन तिची पारख करूनच खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. ऑनलाइन मार्केटिंगवर काही लोकांचा भरवसा नाही, त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करताना दिसत आहेत. स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. कपड्यावर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात असून, अनेक मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडेही ग्राहकांचा ओढा आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन ग्राहकांसाठी खरेदीची पर्वणी घेऊन आला आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावला बूस्ट

0
0

'मेड इन मालेगाव'मुळे उत्पादनांना बूस्ट

२६ जानेवारीपासून शहरात फेस्टिव्हलचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धार्मिक तेढ, दंगल, गुन्हेगारी, बकालपणा आदींमुळे मालेगावची नकारात्मक बाजूच आतापर्यंत समोर येत होती. मात्र, खाद्यसंस्कृतीपासून कलासंस्कृतीपर्यंत अशी विविधांगी संपन्नता ही मालेगावची खरी ओळख असून, हीच बाजू समोर आणण्यासाठी आमदार असिफ शेख यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच हेतूने शहरातील कापड उद्योजक, व्यावसायिक, खाद्यपदार्थांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःची ओळख मिळावी, या उद्देशाने २६ ते ३० जानेवारीदरम्यान शहरात 'मेड इन मालेगाव फेस्टिव्हल' होणार आहे. यंत्रमाग, मॉलीवूड आणि येथील खाद्यपदार्थांमधील वैविध्य एकाच छताखाली या फेस्टिव्हलमधून प्रथमच पाहायला मिळणार आहे.

शहरात यंत्रमाग उद्योगात रंगीत साडी, लुंगी, ड्रेस, शर्ट मटेरियलसह विविध दीडशेहून अधिक प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन होत असते. यासह हिंदू व मुस्लिम अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या मालेगाव शहरात खाद्यसंस्कृतीही विकसित झाली आहे. काही खास पदार्थ येथे बनवले जातात. या शहरातील कापड, तसेच खाद्य उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाल्यास रोजगारनिर्मितीत वाढ होऊन शहराची ओळख बदलण्यास मदत होणार आहे. यासाठी २६ जानेवारीपासून 'मेड इन मालेगाव फेस्टिव्हल' होत आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समितीचे सभापती सलीम अन्वर प्रमुख पाहुणे असतील.

शहरातील जुन्या आग्रा रोडवरील दरेगावनजीक रिलाएबल मैदानावरील दहा एकर जागेवर या फेस्टिव्हलची जोरदार तयारी सुरू आहे. फेस्टिव्हलनिमित्त १०० स्टॉल उभारण्यात येणार असून, साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, लाकूड वस्तू, हर्बल प्रॉडक्ट, औषध तेल, यंत्रमाग उत्पादने, लोखंडी स्टील अशी दीडशेहून अधिक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. खवय्यांसाठी शहरातील व्हेज, नॉन व्हेज पदार्थांचे खास स्टॉलदेखील असतील. फेस्टिव्हलला भेट देणाऱ्यांना माफक किमतीत येथे खरेदीही करता येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये शहरासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

शहरातील उत्पादने व खाद्यपदार्थांच्या मेजवानीसह या फेस्टिव्हलमध्ये शहरातील स्थानिक कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही असतील. रोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विविध विषयांवरील चर्चासत्रे, टॅलेंट शो, अॅक्शन साँग, राष्टभक्तिगीत, नाटक स्पर्धा, क्वीझ स्पर्धा, फिल्म फेस्टिव्हल, श्याम-ए-गझल आदी कार्यक्रम होतील.

व्यापाऱ्यांना निमंत्रण

शहरातील उत्पादित वस्तूंच्या विक्रीस योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी अनेक राज्यांतील व्यापारी, व्यावसायिकांना फेस्टिव्हलसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात मुंबई, सुरत, इंदूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदाबादसह अन्य शहरांतील व्यापारीही निमंत्रित करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचे आवर्तन सोडा

0
0

आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; योजनेचे काम रखडले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेमार्फत जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत सुरू असलेले मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम जलसाठ्यामुळे रखडले आहे. पाणीपुरवठा योजनेचे सध्या ६९ टक्के पूर्ण झाले असले तरी, जलाशयामुळे हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे आवर्तन लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी (दि. २२) मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. मुकणे धरणावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यंदा धरणात अजूनही सुमारे ९५ टक्के इतका जलसाठा आहे. गेल्या १० वर्षात प्रथमच एवढा साठा आहे. धरणातील जलसाठ्यामुळे जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद झालेली आहेत. सद्यस्थितीत हेडवर्क्सचे काम ५८ टक्के इतकेच झालेले आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय हेडवर्क्सची उर्वरित कामे सुरू करता येणार नसून, या कामाची मुदत जुलै २०१८ पर्यंतच आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी लवकरात लवकर कमी करून मिळण्यासाठी आवर्तन लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याची सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांना केली. त्यानंतर, आयुक्तांनी मुंबई महामार्गालगत सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामाचीही पाहणी केली. सोबतच राजूरफाटा, वाडीवऱ्हे, रायगडनगर, जैन मंदिर या भागात सुरू असलेल्या कामांचीही पाहणी आयुक्तांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये १६६ लॉन्स अनधिकृत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची कोणतीही परवानगी न घेताच शहरात तब्बल १६६ अनधिकृत लॉन्स, तसेच मंगल कार्यालये सुरू असल्याचे नगररचना विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे नगररचना विभागाच्या वतीने नियमबाह्य व अनधिकृतपणे सुरू असलेल्या या सर्व लॉन्स, तसेच मंगल कार्यालयांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ६५ अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालये पंचवटीत सुरू असून, दुसऱ्या क्रमांकावर नाशिकरोड परिसराचा समावेश आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

शहर व आजूबाजूच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालयांचे पेव फुटले असून, लॉन्समालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराबाहेर जाणाऱ्या रोडवर जागामालकांनी मंगल कार्यालये व लॉन्स सुरू केली आहेत. त्यातील बहुतांश लॉन्स, तसेच मंगल कार्यालये महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी न घेताच सुरू करण्यात आली आहेत. अशी सर्व लॉन्स, कार्यालये अनधिकृत व्यवसाय सुरू करीत असल्याचे समोर आले आहे. या लॉन्स व कार्यालयांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

...अन्यथा बांधकामांवर हातोडा!

अनेक लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अनधिकृत बांधकाम झाले असून, त्याबाबतच्या तक्रारी नगररचना विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व लॉन्स व कार्यालयांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरात तब्बल १६६ लॉन्स व कार्यालये अनधिकृत असल्याचे आढळले आहे. त्यामध्ये पंचवटीतील सर्वाधिक ६५ लॉन्स, कार्यालये असून, त्यापाठोपाठ नाशिकरोड (२४) आणि सिडकोचा (१९) समावेश आहे. नगररचना विभागाने आता या लॉन्समालकांना नोटिसा बजावल्या असून, मुदतीत त्यांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. कार्यवाही न झाल्यास अतिक्रमण विभागाकडून पोलिस बंदोबस्तात या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आजी-माजी नगरसेवक

नगररचना विभागाच्या सर्वेक्षणात काही बड्या हस्तींचीही अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालये आढळून आली आहेत. त्यात विशेषकरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. या बड्या हस्तींकडून नगररचना विभागाच्या कारवाईत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगररचना विभाग कशी भूमिका बजावते, याकडे लक्ष लागले आहे. नगररचना विभागाची परवानगी न घेताच या लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. परवानगी घेऊन बांधकाम केले असते तर महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळाले असते. घरपट्टीही वसूल करता आली असती.

विभागनिहाय लॉन्सची संख्या

पंचवटी ६५, नाशिकरोड २४, नवीन नाशिक १९, नाशिक पूर्व १४, नाशिक टीपी स्कीम-२ : १५, पाथर्डी परिसर १४, नाशिक गावठाण ०९, सातपूर ०६, एकूण १६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये अनधिकृत हॉटेल्स

0
0

बेसमेंटमध्ये १४ अनधिकृत हॉटेल्स

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथील कमला मिल आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील टेरेसवर, तसेच इमारतींच्या बेसमेंटवर सुरू असलेल्या हॉटेलांचे सर्वेक्षण केले. यात सहा विभागांत टेरेसवर ३८ अनधिकृत टेरेस हॉटेल आढळून आली होती. आता इमारतींच्या बेसमेंटमध्येही १४ अनधिकृत हॉटेल्स आढळून आली आहेत. या हॉटेलचालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, यात काही नामांकित हॉटेल्सचा समावेश आहे.

या हॉटेलांमध्ये पश्चिम विभागातील विकी सागर, १२ टू १२ हॉटेल, फ्रंट पेज टर्निंग पॉइंट, पंचवटी इलाइट, हॉटेल फर्माइश, सत्कार हॉटेल, कोपा कबानी, पंचवटीतील हॉटेल गोंधळ, राही हॉटेल, न्यू पंजाब, हॉटेल प्राइड, नाशिक पूर्वमधील हॉटेल सिंग पॅलेस, कामत हॉटेल, तर नाशिकरोड येथील साईलीला हॉटेलचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीत पोलिस भरतीची शक्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पोलिस भरतीची जाहिरात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना त्यापूर्वीच आपले प्रमाणपत्र प्रमाणित करावे लागणार आहे. अर्जासोबत असे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित व्यक्तीस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

ग्रामीण पोलिस दलाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार, पोलिस भरतीची जाहिरात ५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारास ठराविक मुदत दिली जाते. या भरती प्रक्रियेमध्ये खेळाडूंना पाच टक्के आरक्षण मिळते. मात्र, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खेळाडूला अर्जासोबतच पडताळणी केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागणार आहे. अन्यथा सदर अर्जाचा खेळाडू आरक्षणात विचारच होणार नाही. खेळाडू आरक्षण देण्यासंदर्भात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २०१६ मध्ये सर्वसमावेशक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यातील नियम चार (पाच) नुसार खेळाडू उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वीच विभागीय उपसंचालकाकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. विभागीय उपसंचालकांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच, खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो, याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र खेळाडूला प्राप्त करून अर्जासोबत जोडावे लागेल. सन २०१८ च्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरक्षणासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यापूर्वीच पडताळणीचे काम पूर्ण करून अहवाल प्राप्त करावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाडमध्ये दोन शेतकऱ्यांच्य आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, सोमवारी, २२ जानेवारी रोजी निफाड तालुक्यात पुन्हा दोन शेतकऱ्यांनी विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. निफाड येथील अमोल भाऊसाहेब गाजरे (वय २५) व दिंडोरे येथील विनायक नानासाहेब शिरसाठ (३९) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे आठवडाभरात एकूण सहा शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक तीन आत्महत्या निफाड या सधन तालुक्यात झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मालेगावातील अल्पवयीन तरुणीसह नवविवाहितेच्या आत्महत्येची नोंद प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

बळीराजाच्या आयुष्यातील विघ्नमालिका संपण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे नवीन वर्षात जुन्याच संकटांचा गाडा बळीराजाला ओढावा लागतो आहे. नववर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग न पत्करल्याने यंदाचे वर्ष निरंक आत्महत्यांचे जावो अशी सदिच्छा सारेच व्यक्त करीत होते. मात्र, संक्रांतीनंतर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. निफाड, बागलाण, देवळा आणि मालेगावपर्यंत हे लोण पसरले आहे. १४ ते २१ जानेवारी या सप्ताहात चार शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेकडे झाली होती; परंतु सोमवारी त्यामध्ये आणखी दोन आत्महत्यांची भर पडली आहे.

निफाड येथे अमोल भाऊसाहेब गाजरे (वय २५, रा. निफाड) या तरुणाने रविवारी रात्रीसव्वा आठच्या सुमारास विषप्राशन केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अमोल यांच्या वडिलांच्या नावे शेती आहे. दुसरी घटना दिंडोरे या गावात घडली. विनायक नानासाहेब शिरसाठ (३९) यांनी शनिवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास विषप्राशन केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, शेतकरी आत्महत्येचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यांचे वडील नानासाहेब शिरसाठ यांच्या नावे १.४ हेक्टर जमीन आहे.

जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील पहिली आत्महत्येची घटना निफाड तालुक्यातीलच औरंगपूर येथे घडली. बाजीराव मार्तंड चिखले (वय ४०) यांनी आत्महत्या केली. बागलाण तालुक्यात कृष्णा भाऊराव वाघ (५३, रा. निकवेल), अशोक काकुळते (वय ५२, रा. कंधाने) यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून, देवळ्यात नारायण पंडित शेवाळे (४०, रा. खामखेडा) यांनीदेखील जीवनप्रवास संपवला आहे. याशिवाय शेतकरी कुटुंबातील १७ वर्षांच्या तरुणीसह एका २३ वर्षांच्या नवविवाहितेनेही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल तेथील तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे; परंतु या आत्महत्यांच्या ठोस अहवालाची जिल्हा प्रशासनाला अद्याप प्रतीक्षा असून, त्यांनी या आत्महत्यांची नोंद घेतलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक : सातबारा आणखी दिड महिना ऑफलाईन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व्हर डाऊन होण यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन सातबारा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व्हर देण्याची घोषणा जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांनी दिली असली तरी अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. नाशिक तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत सातबारा उताऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दहा महिन्यांपासूनच्या नोंदी अद्याप प्रलंबित आहेत. सातबारा दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. ही कामे वेळखाऊ असून ती लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी जिल्हाधिकारी कायार्लयात स्वतंत्र दालनात यंत्रणा उपलब्ध करून देऊन ही कामे केली जात आहेत. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठ्यांचा वर्गच भरला असून एकत्रितरित्या बसून ही कामे मार्गी लावली जात आहेत. हस्तलिखित सात-बारा व संगणकीकृत सात-बारा तंतोतंत जुळणे आवश्यक असून अजून दीड महिना नाशिक तालुका ऑफलाइन राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

जिल्ह्यात ऑनलाइन सात-बाराचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, तालुक्यांमध्ये त्याचे वाटपही सुरू आहे. नाशिक तालुक्यातील सात-बारा उताऱ्यांची संख्या अधिक असून, गेल्या दहा महिन्यांतील नोंदी होणे बाकी आहे. त्यामुळेच आणखी दीड महिना ऑफलाइन पद्धतीने काम सुरू राहील.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६६ शाळांना नोटीसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शाळेच्या आवारात शालेय वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध करून न दिल्याप्रकरणी नगररचना विभागाने शहरातील २६६ शाळांना नोटिसा बजावल्या आहेत. मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस, रिक्षा व अन्य वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शाळांवर कारवाईसाठी पोलिसांनी महापालिकेला साकडे घातले होते. त्यामुळे नगररचना विभागाने या शाळांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठांसह मध्यवर्ती भागात असलेल्या शाळांमध्ये पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे या शाळामंध्ये येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. विशेषत: रहदारीच्या वेळेत या शाळांच्या बाहेर वाहने लागत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांकडून पार्किंगबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागानेही त्यासंदर्भात शाळांना तंबी दिली होती. परंतु, तरीही ही कोंडी कायम राहिल्याने आता नगररचना विभागानेच या सर्व २६६ शाळांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना आपल्याच आवारात पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील नामांकित शाळांचा समावेश आहे. तातडीने याबाबत कारवाई करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे फर्मान काढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन अध्यक्षांचा शनिवारी सत्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गुजरातमधील बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे शनिवारी (दि. २७) सत्कार होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी आणि कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी दिली.

नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटररोडवरील जैन भवनमध्ये सायंकाळी सहाला हा सत्कार होईल. देशमुख हे प्रथितयश साहित्यिक असून भारतीय प्रशासन सेवेतील प्रदीर्घ अनुभव त्यांचा लेखनातून प्रकर्षाने दिसतो. कथा, कादंबऱ्या, नाटक आदी विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. संमेलनाध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या निवडीनिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातर्फे त्यांचा सत्कार महापौर रंजना भानसी व जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रसाद पवार यांनी केले आहे. सुदाम सातभाई, नितीन ठाकरे, सावानाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, प्रशांत केंदळे, दशरथ लोखंडे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, शिवाजी म्हस्के, राहुल बोराडे, महेश वाजे, अनिल गुरव, रमेश औटे, मनीषा विसपुते, मंगला सातभाई, पांडुरंग गायधनी आदी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन नाशिकला

0
0

दिव्यांग साहित्य संमेलन नाशिकला

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे यांच्या वतीने २४ व २५ मार्च रोजी विश्वास लॉन्स, नाशिक येथे सातवे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन होणार आहे. या दोन दिवसीय संमेलनात राष्ट्रीय स्तरावरचे साहित्यिक, सांस्कृतिक, विचारवंतांचे मार्गदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, यशोगाथा, खुले व्यासपीठ, असे विभाग असणार आहेत.

सामाजिक, क्रीडा, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी या संमेलनामधील विविध सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी कामगिरीचा बायोडाटा संयोजन समितीच्या dssnashik2018@gmail.com या ईमेल आयडी वर दि. ३१ जानेवारीपर्यंत पाठवावा. यापूर्वी सातारा, वसई, कराड, पुणे, आळंदी व औरंगाबाद येथे संमेलन यशस्वीरीत्या आयोजित केलेले आहे. यापूर्वीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम महाजन, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, युवा साहित्यिक सोनाली नवागुळ, प्रा. प्रेम सिंग, अशोक थोरात यांनी भूषवले आहे.

संमेलनास देशभरातून दोन हजार दिव्यांग उपस्थित राहाणार असून, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, विविध संस्था या सर्वांनी या संमेलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी बापूसाहेब बोभाटे (९९६०१३२२०७) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीची टोलवाटोलवीच!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे झालेले काम विकासाचे प्रतीक ठरले असले तरी या महामार्गावरील शिंदे येथील टोलनाका स्थानिक नागरिकांसाठी जिझिया कर नाकाच ठरला आहे. वीस किलोमीटर परिसरातील नागरिकांसाठी शिंदे टोलनाक्यावरील टोलमुक्ती अखेरीस मृगजळच ठरली आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे नूतनीकरणाचे काम नाशिक मनपाच्या हद्दीवरील चेहेडी गावापासून पुढे जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार या महामार्गावर शिंदे गावाजवळ चेतक एंटरप्रायजेस प्रा. लिमिटेड या कंपनीने टोलनाका सुरू केला आहे. सिन्नर, संगमनेर, शिर्डी, नगर, पुणे या शहरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शिंदे येथील टोलनाका योग्य असला तरी मात्र शिंदे आणि जवळपासच्या चिंचोली, मोह, जाखोरी, पळसे, चांदगिरी या स्थानिक गावातील नागरिकांना मात्र हा टोल नाका जिझिया कराचे ठिकाण ठरू लागला आहे. स्थानिक नागरिकांना या टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारची सवलत मिळालेली नसल्याने स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

स्थानिकांना सवलत का नाही?

शिंदे गावासह पळसे, मोह, चिंचोली, जाखोरी आणि चांदगिरी या लगतच्या गावांतील नागरिकांना शिंदे टोलनाक्यावर टोलमधून वगळण्यात यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या गावांना शिंदे टोलनाक्यावर टोलमुक्ती का नाही असा सवालही नुकतेच दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्थानिक नागरिकांनी विचारला होता. परंतु, मंत्री महोदयांनीही या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा न काढताच बगल दिल्याने शिंदे येथील नागरिकांची जखम आणखी चिघळली आहे. मात्र स्थानिक नागरिकांची ओळख सिद्ध करणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने आम्ही नियमाप्रमाणाचे टोल वसुली करू, अशी माहिती टोल नाका प्रशासनाने दिली आहे. माणुसकीच्या भावनेतून स्थानिक शेतकरीवर्गास टोलमधून मुक्ती दिली असल्याचा खुलासाही स्थानिक टोल प्रशासनाकडून केला गेला आहे.
स्थानिक नागरिकांच्या जमिनी टोलनाक्यापलिकडे आहेत. या नागरिकांना दिवसभरात आपल्या शेतात ये-जा करावी लागते. परंतु, टोल नाक्यावर टोल भरावा लागत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

-विश्वास कळमकर, स्थानिक

टोलनाक्याच्या पलिकडेही नागरी वसाहत आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारे काही नागरिक नाशिक, नाशिकरोडमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्याकडूनही टोलची आकारणी केली जाते. या नागरिकांना टोलमधून वगळले पाहिजे.

- सचिन टिळे, स्थानिक

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावरील टोल वसुली केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे होते. स्थानिकांना टोलमधून वगळण्यासाठी केंद्र सरकारकडून आम्हाला आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार अंमलबजावणी नक्की होईल.

- सुनील भोसले, प्रोजेक्ट मॅनेजर, चेतक एंटरप्रायजेस प्रा. लि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर उपचारासाठी प्रोटोकॉल आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सर एकीकृत उपचारासाठी सरकारने सर्व उपचार पद्धतींचा समावेश असणारा प्रोटोकॉल निर्धारित करून सध्या अस्तित्वात असलेल्या ड्रग्ज व कॉस्मेटिक्स कायद्यात बदल करावा, असा ठराव नाशिक येथील कर्करोग परिषदेत करण्यात आला, अशी माहिती डॉ. संदीप रॉय यांनी दिली.

कॅन्सर केअर फाउंडेशन, ग्लोबल होमिओपॅथीक फाउंडेशन आणि मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे संयुक्तरित्या आयोजित तिसऱ्या एकीकृत कॅन्सर उपचारावरील परिषदेचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी कर्करोगाच्या प्रभागी उपचारासाठी अनेक मागण्याही सरकारकडे करण्यात आल्या. यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर पेशंटकरिता राखीव बेड ठेवणे या मागणीचाही समावेश आहे. नाशिकमध्ये देखील कॅन्सरच्या एकीकृत उपचारासाठी प्रायव्हेट पब्लिक भागिदारीतून हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचेही डॉ. संदीप रॉय यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणीप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या गायकवाड मळ्यातील हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे पंधरा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक अंबादास पगारे आणि भाजपचे नेते सुनील आडके यांच्यासह रेणू सोनवणे व त्यांचे पती रमेश सोनवणे यांच्याविरूद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. प्रवीण प्रताप जाधव (५४) यांचे गायकडवाड मळा येथे ओंकार हार्ट इन्सिट्यूट अँड नर्सिंग होम आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा- सन २००९ मध्ये माझ्याकडे रेणू सोनवणे आल्या व डीएमएलटी असल्याचे सांगून डॉ. राजेंद्र आव्हाड यांच्यासोबत पॅथालाजी लॅब चालविण्याची इच्छा व्यक्त केली. हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील जागेत मी त्यांना लॅब चालविण्याची तात्पुरती परवानगी भाडेतत्वाचा करार करून दिली. काही दिवसांनंतर रेणू सोनवणे या गैरहजर राहू लागल्याने रुग्णांची गैरसोय होऊन हॉस्पिटलची बदनामी होऊ लागली. त्यांना विचारणा केल्यावर काम व्यवस्थित सुरू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ऑगस्ट २०१७ मध्ये माझ्याकडे एक रुग्ण आला. रेणू सोनवणे यांच्याकडे रक्त तपासणी करून महिना झाला तरी त्यांनी अहवाल दिला नाही. त्यामुळे सोनवणे यांना लॅबचे काम बंद करण्यास सांगितले. ३ मार्च २०१७ रोजी दुपारी दोनला मी घरी असताना रेणू या पती रमेश, सुनील खंडेराव आडके, अंबादास रामभाऊ पगारे यांच्यासह अन्य लोकांना घेऊन आल्या. लॅब बंद करण्यास का सांगता, असे विचारून शिवीगाळ केली. हॉस्पिटलचे डॉ. महेंद्र महाजन, चेतन सोनकुळे व कर्मचारी आले व त्यांनी शिवीगाळ करणाऱ्यांची समजूत घातली. रेणू यांना लॅब खाली करण्यास सांगितले तर हातपाय तोडून टाकण्याची धमकी रमेश सोनवणे, आडके व पगार यांनी दिली. अंबादास पगार म्हणाले की, मी नगरसेवक असून तुमचे हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करून टाकतो. तुमचे हॉस्पिटल कसे चालतो ते मी पाहतो. ते कृती करतील म्हणून मी घाबरून पोलिसांत तक्रार केली नाही. त्याचा गैरफायदा घेऊन रेणू सोनवणे यांनी लॅब सुरूच ठेवली. त्यांनी डॉ. राजेंद्र आव्हाड हे एमडी असल्यामुळे त्यांच्या सहीचे रिपोर्ट रुग्णांना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे न करता आव्हाड यांच्या नावासमोर सही करून तसा रिपोर्ट रुग्णांना देऊन नियमबाह्य वर्तन केले. डॉ. आव्हाडांना विचारणा केली असता त्यांनी रेणू माझी नातेवाईक आहे, तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या, असे सुनावले. शेवटी आपण वकिलांमार्फत लॅब खाली करण्याची नोटीस दिली. तरीही रेणू व त्यांच्या पतीने दाद दिली नाही. तसेच लॅब खाली करायची असल्यास पंधरा लाख रुपये द्या, आम्हाला सुनील आडके, अंबादास पगारे यांच्यासारख्या मोठ्या राजकीय लोकांचा पाठिंबा आहे. अशा नोटिसा आल्या तर तुमच्याविरुध्द खोट्या केसेस करून तुम्हाला अडकवू, अशी धमकी पती-पत्नीने दिली. त्यांनी २६ ऑक्टोबर २०१७ ला पोलिसांत माझ्याविरूध्द खोटी तक्रार दिली.

हॉस्पिटलमध्ये वाढदिवस

२८ ऑक्टोबर २०१७ ला दुपारी आपण हॉस्पिटलच्या केबिनमध्ये असताना रेणू पती रमेशसह सुनील आडके आले व दहा-बारा लोक जमा करून हॉस्पिटलच्या तळमजल्यावर सुनील आडके यांचा वाढदिवस साजरा करू लागले. गोंधळ घालू लागले. मी विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून मारण्याचा धमक्या दिल्या. मी घाबरून पोलिसांत तक्रार केली नाही. मात्र, सोनवणे पती-पत्नी, अंबादास पगारे, सुनील आडके यांनी धमकी व त्रास देण्याचे चालूच ठेवले. तसेच लॅब खाली करण्यासाठी पंधरा लाखांची खंडणी मागितली. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे मी आज पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या नावाखाली मद्याची वाहतूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी वाहनास पोलिस अशी प्लेट लावून मद्याची वाहतूक होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तपासणी पथकास चकवा देण्यासाठी वापरण्यात येणारी युक्ती मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोडून काढली आहे. राज्यात बंदी असलेला मद्यसाठा आणि कार असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवरील अंबोली चेक नाक्यावर झाली.

दीपक मोहन जाधव (वय ४४) आणि राकेश तुकाराम गादगे (वय ४१, रा. दोघे धुळे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विभागीय पथकाचे दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर यांना मिळालेल्या माहितीवरून आणि उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्राय डे असून, या दिवसासाठी राज्यात विक्रीस बंदी असलेला दादर नगर हवेली व दमन निर्मित मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सोमवारी सायंकाळी विभागीय भरारी पथकाने अंबोली चेक नाक्यावर वाहन तपासणी केली असता स्विफ्ट कार (एमएच ०३ एएम ८७६०) आणि मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी पोलिस फलकाचा वापर केला. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी संशयितांचा प्लॅन हाणून पाडला. पथकाने सरसकट वाहन तपासणी केली. कारच्या झडतीत मॅकडॉल व ब्लेंडर या विदेशी मद्याचा सुमारे एक लाख ६ हजार २० रुपये किमतीचा मद्यसाठा मिळून आला. ही कारवाई निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक वाय. आर. सावखेडकर, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक एम. बी.चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकांचा पंचनामा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यक्षेत्र स्वच्छ केल्याची शेखी मिरविणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकांचा पंचनामा केंद्रीय समित्यांकडून सुरू करण्यात आला आहे. स्वच्छतेच्या निकषात किती नगरपालिका तग धरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महापालिका क्षेत्रात स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण चर्चेचा विषय ठरत असताना केंद्रीय समित्यांनी जिल्ह्यातील नगरपालिकांकडेही मोर्चा वळविला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकांचा आटापिटा सुरू झाला आहे. सिन्नर, भगूर, मनमाड, त्र्यंबकेश्वर यासह विविध नगरपालिका वर्षापूर्वी स्वच्छ झाल्याचे सांगितले जात होते. साधारणत: ७५ टक्के नगरपालिकांची तपासणी पूर्वीच झाली असून, दोन नगरपालिकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्वच्छतेचा दर्जा टिकविण्यासाठी सत्ताधारी मंडळींच्या प्रयत्नासोबत गावागावांमधील विरोधकही जागरूक झाले आहेत. स्वच्छतेबाबतचे सत्ताधाऱ्यांचे दावे आणि प्रत्यक्षात झालेली कामे यांची पोलखोल करण्याची संधी विरोधकांसह नागरिकांना चालून आल्याने स्वच्छतेच्या निकषांत नगरपालिका टिकणार का याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल दुकान लुटणारे चौघे मुद्देमालासह ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्प येथील दुकान फोडून तब्बल ९० मोबाइल चोरून नेणाऱ्या चौघा संशयितांना क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने पकडले. सर्व संशियत देवळाली कॅम्प परिसरातच राहणारे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व मोबाइलसह एक रिक्षा असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शहानवाज उर्फ शानू अश्पाक शेख (वय २३, रा. बलकवडे, व्यायामशाळेजवळ, भगूर), फईम उर्फ बबन अश्पाक शेख (वय ३३, रा. चंद्रमणी बसस्टॉपसमोर,, आर्मी सर्व्हंट क्वॉर्टर, भगूररोड, देवळाली कॅम्प), सागर मुन्ना सोळंखी (वय ३०, जुनी स्टेशनवाडी, हनुमान मंदिराच्या मागे, देवळाली कॅम्प) आणि निखिल विजय गलोत (वय २०, जुनी स्टेशनवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या संशयित आरोपींनी मिळून देवळाली कॅम्प येथील जुन्या बसस्टॉपजवळील मोबाइलचे दुकान फोडून २६ डिसेंबर २०१७ च्या पहाटेच्या सुमारास ९० मोबाइल चोरून नेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. देवळाली कॅम्प पोलिसांनी राकेश कोडवाणी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाला संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार, १६ जानेवारी रोजी जुन्या बस स्टॅण्ड परिरसरात युनिटने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई युनिट एकचे हवालदार रवींद्र बागूल यांच्या माहितीवरून तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरणार, दीपक गिरमे, एएसआय जाकीर शेख, हवालदार संजय मुळक, कॉन्स्टेबल गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, विशाल देवरे, चालक दीपक जठार, सायबर शाखेचे विलास कुटे, सचिन आजबे, एएसआय चंद्रकांत पळशीकर, संजय पाठक, पोपट कारवाळ, हवालदार वसंत पांडव, बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, आदींच्या पथकाने केली.

रिक्षात दडवून ठेवला होता मुद्देमाल

चोरी केलेले ९० मोबाइल, मोबाइल अॅक्सेसरीज तसेच डमी मोबाइल आणि रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. दुकान फोडल्यानंतर आरोपींनी सर्व मुद्देमाल रिक्षात भरून एका ठिकाणी दडवून ठेवला होता. संशयित आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांनी यापूर्वी असे गुन्हे केले आहेत काय किंवा त्यांचे अन्य कोणी साथिदार आहेत काय याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनाप्रमुखांना शहरभर अभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना नाशिक महानगरच्यावतीने मंगळवारी साजरी करण्यात आली. या निमित्त शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महानगरप्रमुख अजय बोरस्तेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून शहरात भगव्या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. पुढील आठवडाभर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम होणार असून, पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

शालिमार येथील शिवसेना कार्यालयात प्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, शाम साबळे, आर. डी. धोंगडे, प्रशांत दिवे, संतोष गायकवाड, दीपक दातीर, सुनील गोडसे, नगरसेविका कल्पना पांडे, मंगला आढाव, रंजना बोराडे, सुवर्णा मटाले, शामला दीक्षित, नयना घोलप, यतीन वाघ, संजय चव्हाण, मामा ठाकरे, शिवाजी भोर, राजू वाकसरे आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील सर्व ३१ प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये परवानगी घेऊन होर्डिंग उभारण्यात आले होते.

नाशिकरोड येथील शिवाजी चौकात शिववाहतूक सेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११ च्या वतीने सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवली येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ७ मध्ये युवासेनेच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते, योगेश चव्हाणके, दीपक हांडगे, प्रवीण मराठे, गणेश बर्वे, विशाल खैरनार, दादाजी आहेर आदी उपस्थित होते. इंदिरानगर येथे अवजड वाहतूक सेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पालिकेतही अभिवादन

नाशिक महानगरपालिकेच्या वतीनेदेखील बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सभागृहनेते दिनकर पाटील, नगरसेवक प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, शाम साबळे, संतोष गायकवाड, दिलीप दातीर, शामला दीक्षित, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने व्दारका येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, म. वा. सेना संपर्क प्रमुख देवानंद बिरारी, जिल्हाप्रमुख अजीम सय्यद, राजू रंगरेज, शाम फर्नांडीस, रज्जाक पठाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images