Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निवडणूक हालचाली थंडावल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागेसाठी सुरू झालेल्या राजकीय हालचाली नववर्षात थंडावल्या आहेत. गेल्या महिनाभरात जिल्हा बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळ बरखास्त केल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यामुळे त्याचा परिणाम या हालचालींवर झाला आहे. या सर्व गोंधळात भाजपचे शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ वाढवत कामाला सुरुवात केल्यामुळे राजकीय चर्चेचे विषयही बदलले आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी सुरू झालेली चर्चा काहीशी थंडावली आहे.

विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयवंत जाधव यांची मुदत जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी विधान परिषदेची ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी काहींनी गेल्या सहा महिन्यांपासून जोरदार तयारी करून मोर्चेबांधणीला सुरुवात केली. पण, नाशिकच्या थंडीत राजकीय वातावरण काही घटनेमुळे गरम झाल्यामुळे या हालचालींचा वेग मंदावला आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे करण्यात आले. ही चर्चा आता थांबली आहे. स्थानिक नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या राणेंच्या नावाला विरोध करीत आपली इच्छा प्रकट केली. पण, राणेंचे नाव कोणी पुढे केले व त्यात राणे यांना किती रस होता या सर्व गोष्टी मात्र गुलदस्त्यातच राहिल्या. या निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर यांनी भुजबळ फार्म येथे गुप्तगू केले होते. पण, दुसऱ्याच दिवशी त्यांना बँक बरखास्तीमुळे पद गमवावे लागले. जिल्हा बँकेत केदा आहेर बरोबरच अनेक संचालक आमदार होण्याचे स्वप्न बघत होते. पण, बँक बरखास्तीमुळे त्यांनासुध्दा मोठा झटका बसला आहे.

मे म‌हिन्यात निवडणूक?

नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक मेमध्ये होणार असल्याची चर्चा असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू करून गाठीभेटी घेणेही सुरू केले होते. पण, महिनाभरात घडलेल्या घटनेमुळे या हालचाली आता थंडावल्या आहेत.

शिवसेनेचे वर्चस्व

या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांचे मतदान असून, त्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्या पाठोपाठ भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली तर त्यांना सहज उमेदवार निवडून आणता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यालय की कोंडवाडा?

0
0

मटा मालिका

सरकारी इमारतींना ‘घरघर’

जेलरोड

--

कार्यालय की कोंडवाडा?



डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

महापालिकेला घसघशीत महसूल मिळवून देणाऱ्या ेलरोड येथील उपकार्यालयाची अनेक वर्षांपासूनची उपेक्षा कायम असल्याची स्थिती आहे. परिसराचा मोठा विस्तार होऊनही हे कार्यालय अत्यंत छोटे असल्याने ते कोंडवाड्यासारखेच भासत असल्याचे आणि मूलभूत सुविधींचीही वानवा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत महापालिकाचे नाशिकरोड विभागीय कार्यालय आघाडीवर आहे. त्यात जेलरोड उपकार्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, तरीही या उपकार्यालयाची हेळसांड सुरू आहे. या कार्यालयात बारा कर्मचारी आहेत. त्यांना एक संगणक, जुने फर्निचर आहे. कपाट नाही. कार्यालयाला शेडच नाही, अशी या कार्यालयाची अवस्था आहे. महापालिकेने या कार्यालयाकडे लक्ष देण्याची व सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे. नाशिकरोडला दुर्गा गार्डनशेजारी महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली जेलरोड येथे उपकार्यालय कार्य करते. महसूल वसुलीत शहरातील सहा विभागांत नाशिकरोड दुसऱ्या स्थानी आहे. त्यात जेलरोड कार्यालयाचे योगदान मोलाचे आहे. या कार्यालयाला सुविधा दिल्यास महसूल आणखी वाढू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसंख्या वाढूनही कानाडोळा
जेलरोडचे कार्यालय शिवाजीनगर चौकाजवळ आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ते सोयीचे आहे. मात्र, हे कार्यालय पूर्वीपासून समस्यांनी घेरलेले आहे. जेलरोडची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये दुपटीने वाढली आहे. या कार्यालयात तीस हजार मिळकतींची नोंद आहे. घरपट्टी तीस हजार आणि पाणीपट्टी सुमारे पंधरा हजार अशी मोठी वसुली येथून केली जाते. त्यांचा भरणा करण्यासाठी कंत्राटी पद्धतीचे ई सेवा केंद्र या उपकार्यालयाच्या मागे सुरू करण्यात आले आहे. उपकार्यालयात बारा कर्मचारी आहेत. त्यांना तीन संगणक होते. आता कार्यालयामागे ई सेवा केंद्र ठेकेदारी पद्धतीने सुरू करण्यात आले. त्यांना यातील दोन संगणक देण्यात आले आहेत. फक्त वसुलीचे काम महापालिका कर्मचारी करतात, बिल स्वीकारणे, पावत्या देणे हे काम ई सेवा केंद्र करते, असे सूत्रांनी सांगितले.

कपाटाअभावी कागदपत्रे उघड्यावर
येथे पहिल्यापासूनच जुने फर्निचर आहे. कपाटे नसल्याने महापालिकेचे दप्तर सुरक्षित ठेवता येत नाही. दस्तावेज उघड्या रॅकवर ठेवावे लागतात. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जुन्या खुर्च्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहांचाही प्रश्न आहे. हे कार्यालय पाडून नवीन मोठे कार्यालय बांधणे ही काळाची गरज आहे. दीड वर्षापूर्वी रात्री कार्यालयातून टॅब चोरीस गेला होता. सध्या येथे एक संगणक आहे. त्याला रेंजअभावी नेटची समस्या होती. आता डोंगल घेतल्याने ती दूर झाली आहे. मात्र, प्रिंटर नादुरुस्त असल्याने विभागीय कार्यालयाला डेटा पाठवता येत नाही. बॅटरी बॅकअपही बंद आहे.

शेड काढल्याने असुविधेत भर
जेलरोडला महापालिकेचे पडीक उद्यान आहे. त्याच्या एका कोपऱ्यात हे कार्यालय आहे. भरपूर जागा असतानाही महापालिका कार्यालयाचा आकार छोटा ठेवण्यात आल्याने ते कोंडवाड्यासारखे वाटते. नागरिकांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे बाहेर शेड बांधण्यात आले होते. जेलरोडला तीन वर्षांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम झाली, त्यावेळी महापालिकेच्या या कार्यालयाचे शेडदेखील पाडण्यात आले. त्यामुळे नागरिकांना उन्हा-पावसात उभे राहावे लागते. या कार्यालयाची दुरवस्था दूर करण्याची आवश्यकता असून, कर्मचाऱ्यांना सुविधा व प्रोत्साहन दिल्यास महसुलात चांगली वाढ होईल, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

दस्तावेज चोरीची भीती
येथील कार्यालयाच्या दरवाजे-खिडक्या फारशा मजबूत नाहीत. कार्यालयातून टॅब चोरीला गेल्यानंतर हा प्रश्न प्रकर्षाने समोर आला. टॅबमध्ये मतदार सर्वेक्षणाची माहिती होती. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदारांचा सर्वे करण्यात आला. मतदारयादीत दिल्यानुसार मतदार दिलेल्या पत्त्यावर राहतो की, नाही याची खातरजमा करण्याबाबत हा सर्वे होता. जेलरोड परिसरात हा सर्वे करण्यात आला होता. त्याची माहिती चोरीस गेलेल्या टॅबमध्ये होता. या टॅबची किमत चार हजार रुपये होती. रात्री येथून महत्त्वाचे दस्तावेज चोरीस गेले तर जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण
हे कार्यालय कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करते. या कार्यालयाचा प्रारंभ झाल्यानंतर जेलरोडची लोकसंख्या भरमसाट वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत येथील कर्मचारीसंख्या पूर्वीप्रमाणेच तोकडी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर संकलित करतात. मतदार सर्वे व अन्य कामेही या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. येथे पुरेशी कर्मचारी संख्या देण्याची मागणी होत आहे.

--

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी जेलरोडचे उपकार्यालय सुरू केले. त्यामुळे नाशिकरोड किंवा नाशिकला जाण्याचा त्रास वाचतो. मात्र, येथे पुरेशा सुविधा देण्याची गरज आहे. त्यामुळे महसूल वाढून नागरिकांचाही त्रास कमी होणार आहे. कार्यालयात नागरिकांसाठी बेंच, शेड टाकावे.
-सचिन गडाख, नागरिक

येथील कर्मचाऱ्यांना संगणक, फर्निचर आदी सुविधा दिल्यास त्यांचा उत्साह वाढून ते महसूल वसुली आणखी जोमाने करतील. कार्यालयाची इमारत जुनी झाली असून, ती अपुरी पडत आहे. जुनी इमारत पाडून नवीन बांधावी. अधिक सक्षम अधिकारी येथे नियुक्त करावा.
-मसूद जिलानी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट छपाईत बदलाचे वारे

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अतिसंवेदनशीलतेच्या मुद्यावर परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाने सध्या पासपोर्टच्या रचनेत बदलाचे संकेत दिले असल्याने लवकरच नवीन स्वरूपातील पासपोर्ट नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्वरूपातील नारंगी (ऑरेंज) रंगातील पासपोर्टची छपाईही नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात होणार आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१७ या कालावधीत सध्या अस्तित्वात असणाऱ्या तब्बल ९३ लाख ५८ हजार ५०० पासपोर्टची विक्रमी छपाई नाशिकरोडच्या आयएसपीत झालेली आहे.
नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय प्रशासनाला पासपोर्ट छपाईत नव्याने होणाऱ्या बदलांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसल्याने मार्च २०१८ पर्यंत अजून तब्बल २१ लाख ९८ हजार इतक्या पासपोर्टची छपाई केली जाणार आहे. ईसीआर श्रेणीतील पासपोर्ट नारंगी रंगात आणण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या विचाराधीन असून, या नव्या पासपोर्टची छपाई नाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात होणार आहे.

पत्त्याचे पान हटविणार
देशभरातील पासपोर्टधारकांकडून आपला पासपोर्ट पत्त्याचा पुरावा म्हणून विविध ठिकाणी सर्रास वापरात येतो. सध्याच्या पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्टधारकाच्या पत्त्याची माहिती असते. परंतु, अतिसंवेदनशीलतेच्या मुद्यावर सध्या अस्तित्वात असणाऱ्या पासपोर्टमधील शेवटचे पान रद्द करण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. तसे झाल्यास पासपोर्टच्या नवीन सिरीजमध्ये शेवटच्या पानावर पासपोर्टधारकाचा रहिवासाचा पत्ता येथून पुढे दिसणार नाही. मात्र, सध्याचे पासपोर्ट त्यांच्या अंतिम मुदतीपर्यंत वापरता येणार आहेत. सध्याच्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर पासपोर्टधारकाचा फोटो आणि इतर तपशील असतो. त्या रचनेत मात्र बदलाचे संकेत नाहीत. सन २०१२ पासून पासपोर्टला बारकोडिंग झालेले असल्याने आतापर्यंत पासपोर्टधारकांच्या पासपोर्टवरील माहितीचे स्कॅनिंग करण्यात आलेले आहे. यापुढे पासपोर्टमधील पत्त्याचा उल्लेख असलेले पान रद्द झाले, तरी बारकोडमुळे संबंधित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
--
रंगांतही बदलाचे संकेत
सध्या सरकारी अधिकारी आणि शासनाच्या कामानिमित्ताने परदेशांत जाणाऱ्यांसाठी पांढऱ्या रंगाचे पासपोर्ट वापरात आहेत. राजकीय (डिप्लोमॅट्स) व्यक्तींसाठी लाल आणि सामान्य नागरिकांसाठी निळ्या रंगाचा पासपोर्ट वापरात आहे. मात्र, आता स्थलांतर (ईसीआर) अथवा अस्थलांतर (ईसीएनआर) या श्रेणीतील नागरिकांसाठी नारंगी रंगातील पासपोर्टचे संकेत आहेत. या ईसीआर श्रेणीतील नारंगी रंगातील पासपोर्टची छपाई नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात होणार आहे.
--
सध्याच्या पासपोर्टवरील शेवटचे पान पासपोर्ट काढताना एमईएत पासवर्ड घेतेवेळे लावले जाते. त्या पानाची छपाई आयएसपीत होत नाही. पासपोर्ट छपाईतील बदलाबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आयएसपीत सुमारे सव्वाकोटी पासपोर्ट छापले जातील.
-ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष, मजदूर संघ, आयएसपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग, टोईंगची खिशाला झळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हायड्रोलिक वाहनांद्वारे टोईंगची कारवाई करून दुप्पट तडजोडशुल्क आकारण्यासाठी पोलिस सज्ज झाले असून, महापालिकेनेही पार्किंगचे दर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांचा खिसा रिकामा करण्याचा ‘उद्योग’ प्रशासनाकडून सुरू असून, त्यामुळे सामान्यांचीच मुस्कटदाबी होते आहे. महापालिकेने दर वाढविण्याऐवजी पार्किंगच्या मुबलक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
शहरात दिवसागणिक अनेक नवीन वाहने रस्त्यावर उतरत आहेत. सीबीएससह आसपासच्या किमान पाच ते दहा किलोमीटरच्या परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण शक्य नाही. आहे त्या रस्त्यांचा वाहतुकीच्या समस्येमुळे श्वास कोंडतो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे लोक वाहने उभी करतात. वाहतुकीला अडथळा करणारी अशी वाहने उचलण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हींनीयुक्त हायड्रोलिक वाहनांची मदत घेतली आहे. परंतु दुचाकी वाहनांसाठी आता १७० ऐवजी ३०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी ४५० ऐवजी ६५० रुपये घेतले जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाबरोबरच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. हे कमी म्हणून की काय महापालिकेनेही पार्किंगस्थळांवरील दर दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची सर्वच बाजूने कोंडी करण्याचा सरकार आणि प्रशासनाचा हा डाव असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करू लागले आहेत.

पार्किंगच्या सुविधा वाढवा
शहरात सीबीएस, शालिमार, मेनरोड, अशोकस्तंभ, एम. जी. रोड, भद्रकाली, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, पेठरोड, दिंडोरीरोड या मध्यवर्ती भागासह सिडको, सातपूर, नाशिकरोड यांसारख्या रहिवाशी भागातही अनेक वर्दळीच्या ठिकाणांवर महापाल‌िकेचे वाहनतळच नाहीत. काही ठिकाणी वाहनतळे आहेत ती अनधिकृतरित्या बळकावल्याचेही प्रकार पुढे आले आहेत. महापालिकेने पार्किंगचे दर वाढविण्याऐवजी वाहनतळांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

शहर बससेवा प्रबळ नसल्याने नागरिक खासगी वाहने वापरतात. महापालिकेने किमान वाहनतळांची सुविधा वाढवायला हवी. तेथे शुल्कही १० रुपयेच असावे. त्यातून महापालिकेला महसूल मिळेल व टोईंगची कारवाई टळल्याने नागरिकांनाही भुर्दंड बसणार नाही.
- स्वप्नील पवार, सिडको

वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची पुरेशी सुव‌िधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. ती सक्षमतेने पार पाडली जात नसल्याने नागरिकांना रस्त्यांवर किंवा व्यावसायिकांच्या दुकानांसमोरच वाहने उभी करावी लागतात. ती पोलिस उचलून नेतात. पार्किंगची सोय नसेल, अशा ठिकाणी पोलिसांनी वाहनांवर कारवाई करू नये.
- संतोष निकम, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट अन् सरकत्या जिन्यांनी कुलींची घालमेल

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आधीच फारसा व्यवसाय नसलेले नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधील मान्यताप्राप्त कुली सध्या वेगळ्याच चिंतेने त्रस्त आहेत. स्टेशनमध्ये एक व दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. आता प्लॅटफॉर्म एक व दोनवर सरकते उभारले जात आहेत. त्यातच दोन समांतर पादचारी पूलही जोडले गेले आहेत. या सुविधा प्रवाशांना दिलासा देणाऱ्या असल्या, तरी कुलींमध्ये बेरोजगारीचे संकट ओढाविण्याची धास्ती निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.

येथे व्यापारी संकुलांप्रमाणे अॅटोमॅटिक जिने उभारले जाणार आहेत. प्लॅटफॉर्म एकवर सरकत्या जिन्यांचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले, तर बहुसंख्य प्रवाशांना कुलींची गरज भासणार नाही, अशी भीती हे कुली बोलून दाखवत आहेत. परिणामी सरकत्या जिन्यांमुळे सध्या कुलींची झोप उडाली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकात ३५ मान्यताप्राप्त कुली आहेत. ते दोन शिफ्टमध्ये काम करतात. नाशिकरोड स्थानकातून दररोज सरासरी पंधरा हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अनेकांकडे मोठे सामान असते. प्रवाशांमध्ये वृद्ध नागरिक, गरोदर महिला, रुग्ण, लहान मुले असतात. त्यांचे सामान वाहण्याची सेवा हे कुली देतात. कुलींना दिवसाला तीनशे-चारशे रुपये मिळतात. दिवाळी व सुटीच्या काळात हा आकडा कसाबसा सातशेच्या आसपास जातो.

अन्य कामांनाही हातभार

रेल्वेचे कुलींना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. कामे मात्र ड्युटीबाहेरची करायला लावली जातात. रेल्वेखाली एखाद्याने आत्महत्या केली, तर रेल्वे प्रशासन गाडीखाली कुलींना पाठवून मृतदेहाचे तुकडे आणायला सांगते. साहेबांशी पंगा नका म्हणून कुली हे काम नाइलाजाने करतात. स्थानकात बेवारस मृतदेह आढळला, तर तो उचलून पोलिस ठाण्यात आणावा लागतो. आजारी रुग्ण प्रवाशाला स्ट्रेचरवरून न्यावे लागते. बॉम्बची अफवा पसरली, तर कुलींनाही धावपळ करावी लागते. कुंभमेळ्यात कुलींनी अनेक भाविकांचे सामान मोफत पोहोचविण्याची सेवा दिली होती. रेल्वे प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देते परंतु, कुलींना बोनस, मानधन, वेतन काहीच देत नाही. कुलींना वर्षातून दोन महिने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन पास देते एवढाच काय तो लाभ. कुलींची सगळी भिस्त प्रवाशांवर असते. आता प्रवासी लिफ्टचा वापर करू लागले आहेत. सरकते जिने सुरू झाल्यावर कुलींचा हा रोजगारही जाणार आहे. त्यामुळे रोजीरोटी कशी मिळवायची, घरसंसार कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न आम्हा कुलींना सतावत असल्याचे ४८ वर्षांचे संजय काळे डोळ्यात पाणी आणून सांगतात.
--
रेल्वेकडून सहकार्याची अपेक्षा
नाशिकरोडच्या कुलींमध्ये सामनगावचे पांडुरंग मानकर यांना आदराचे स्थान आहे. ते ७० वर्षांचे असले, तरी धडधाकट असून, कुलीचे काम करतात. हमाली करून त्यांनी मुलांना शिकविले आहे. अनेक वर्षांपासून ते येथे हमाली करतात. ते सांगतात, रेल्वेकडून आम्हाला काहीच सुविधा मिळत नाहीत. आरोग्य व जीवन विम्याची तरतूद नाही. फक्त स्थानकात हमाली करण्याची परवानगी मिळते. आमचे हाल बघून पोरांना कुली म्हणून कामाला लावणे योग्य वाटत नाही. कुलींची सेवा बघून रेल्वेने चतुर्थ श्रेणीत तरी आम्हाला बढती द्यावी किंवा आमच्या मुलांची परीक्षा घेऊन रेल्वेने त्यांना नोकरीत तरी घ्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकन्यायालयात सहभागी व्हा

0
0

जिल्हा सत्र न्यायाधीश शिंदे यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याला देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची महान परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेला अधीन राहूनच आज सामाजिक बांधिलकीने न्यायदानाचे काम सुरू आहे. जनतेने किरकोळ स्वरूपाच्या भांडणात वेळ व पैसा वाया न घालविता लोकन्यायालयात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी येथे केले.

येथील न्यायालय आवारात बागलाण वकील संघ व सटाणा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून न्या. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पवनकुमार तापडिया, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार बुक्के, सहन्यायाधीश विक्रम आव्हाड, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, बागलाण वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे, सरकारी वकील व्ही. टी. बोराळे आदी उपस्थित होते.

न्या. शिंदे पुढे म्हणाले, की यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तीच परंपरा कायम ठेवण्यासाठी येत्या १० फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत बागलाणच्या जनतेने सहभागी व्हावे.

बागलाण वकील संघातर्फे अध्यक्ष अॅड. भदाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश शिंदे व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नाशिक वकील संघाचे सदस्य अॅड. हर्षल केंगे, महेश लोहिते, शरद मोगल, कमलेश पाळेकर, ज्येष्ठ विधिज्ञ डी. जी. क्षीरसागर, एम. आर. भामरे, संजय सोनवणे, प्रकाश गोसावी तसेच नाशिक वकील संघातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यश मिळविणारे अॅड. नीलेश डांगरे, यशवंत पाटील, प्रणव भामरे आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अॅड. रेखा शिंदे व नाना भामरे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सोमदत्त मुंजवाडकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान तापमानात दीड अंशाने घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात थंडीचा जोर ओसरत असला तरी रविवारी किमान तापमानाचा पारा दीड अंशांनी घसरला. मात्र, कमाल तापमानाचा पारा एक अंशांनी वाढला आहे. रविवारी किमान तापमान १४.३, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस नोंदवले गेले. दि. २० जानेवारीपर्यंत किमान तापमान २० अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा थंडी काहीशी रूसल्याचाच अनुभव नाशिककरांनी घेतला. चार अंशांपर्यंत खाली जाणारे तापमान आणि शब्दश: हुडहुडी भरविणारी थंडी यंदा नाशिककरांना अद्याप अनुभवायलाच मिळालेली नाही. यंदा किमान तापमानाचा पारा साडेसहा ते सात अंशांपर्यंत खाली गेला. रविवारी तर तो १५.८ अंशांपर्यंत पोहोचला. याचवेळी कमाल तापमान ३० अंश सेल्स‌ियस होते. शनिवारी मात्र किमान पारा दीड अंशांनी खाली उतरून १४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र कमाल तापमान ३१ अंश सेल्सियसवर पोहोचले. दि. १७ जानेवारीपर्यंत किमान तापमान १३ अंशांवर, तर २० जानेवारीपर्यंत ते १२ अंश सेल्स‌ियसपर्यंत खाली उतरेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील सर्वात नीचांकी तापमान रविवारी गोंदिया येथे नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर, चंद्रपूर येथेही तापमान कमी आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात नाशिकमध्येच किमान तापमान कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ महिन्यांत १३३ अपघात!

0
0

एसटी प्रवासात १६ जणांचा मृत्यू; तर ९२ गंभीर जखमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटीची प्रवास, सुरक्षित प्रवास असे म्हटले जात असले तरी गेल्या आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत जिल्ह्यात एसटीचे १३३ अपघात झाले असून, त्यात १६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात ९२ जण गंभीर, तर किरकोळ जखमींची संख्या २५ आहे. या सर्व अपघातग्रस्तांना या डिसेंबरअखेर चार कोटी ४७ लाख ५३ हजार ४४६ रुपये नुकसानभरपाई दिली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत एसटी अपघातात यंदा वाढ झाली असून, मृत्यूचे प्रमाण मात्र घटले आहे. मर्यादेचे उल्लंघन, ओव्हरटेक करण्याची घाई, तांत्रिक बिघाडसह विविध कारणांमुळे हे अपघात झाले आहेत. हे अपघात कसे कमी करता येतील, यासाठी एसटी नेहमी विविध कार्यक्रम घेत असले तरी त्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. गेल्या चार वर्षांत अद्यापपर्यंत तब्बल ५६ जणांनी आपला जीव अपघातांमुळे गमावला आहे. सन २०१६-१७ मध्ये १४८ अपघात झाले होते. त्यावेळेस एसटीने अपघात सहाय्यता निधीमधून २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५४६ रुपये दिले होते.

एसटीची देखभाल नियमित केली जात असली तरी बऱ्याच वेळा जुन्या गाड्या व तांत्रिक कारणेसुध्दा या अपघाताला कारणीभूत ठरतात. काही वेळा एसटीचालकाची चूक नसतानाही अपघात होतात. पण, त्याचे प्रमाण कमी आहे. हे अपघात कसे कमी करता येईल यासाठी एसटीने दक्ष राहणे गरजेचे आहे. राज्यात या अपघाताची संख्या मोठी असून, त्यावर विशेष लक्ष देऊन हे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. एसटीमध्ये आता अनेक बदल केले जात असून, नवनवीन गाड्यांचा समावेश केला जात आहे. त्याचप्रमाणे विविध सुविधा देण्याचा प्रयत्नसुध्दा सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत असला तरी अपघात टाळणे महत्त्वाचे आहे.

अपघातांचे प्रमाणे

अपघात प्रकार - २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ (डिसेंबरपर्यंत)
प्राणातिक - २३ - १७- १६
गंभीर - ११९ - १०८- ९२
किरकोळ - २३- २३- २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोंडीचा तिढा सुटता सुटेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
अगदी अलीकडच्या काळापर्यंत नाशिक शहराचे एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला पाथर्डी फाटा परिसर आता शहराच्या मध्यवर्ती भागात गणला जात आहे. मात्र, या ठिकाणची वाहतुकीची समस्या अद्यापही मिटलेली नसल्याचे दिसून येते. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांच्या थांब्यांसह रिक्षाचालकांच्या मुजारीमुळे हा चौक कायमच वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडलेला असतो. सायंकाळी, तर या चौकातून पायी जाणेसुद्धा अवघड होत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे फेरनियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.
नाशिक शहराच्या लगत असलेल्या गावांपैकी पाथर्डी हे प्रमुख गाव असून, या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला पाथर्डी फाटा असे नाव पडले आहे. या चौफुलीवर पूर्वी वाहतुकीचे नियोजन अत्यंत चांगले होते. मात्र, नाशिकचा विकास होत गेला आणि अंबड औद्योगिक वसाहतीसह अनेक घरकुलेसुद्धा या परिसरात उभारली गेल्याने पाथर्डी फाट्यावर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली.
--
सिग्नल होईना सुरू
या ठिकाणी सहा रस्ते एकत्र येत असून, सिडको, अंबड व नाशिक शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची या चौकात कायमच वर्दळ असते. या ठिकाणीच नव्याने मुंबई, कसारा आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांचे वाहनतळ तयार झाले असले, तरी अनेक गाड्या सर्रासपणे सर्व्हिसरोडवरच उभ्या राहत असतात. त्याचबरोबर या चौकात महापालिकेने गाजावाजा करून सिग्नल उभारला आहे. मात्र, तो सुरूच केला नसल्याने येथे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम आहे.
--
बेशिस्त पार्किंगची स्पर्धा
या रस्त्यावरून सकाळी कंपनीत जाणारे व सायंकाळी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असल्याने सायंकाळी या रस्त्यावर कायमच कोंडी झालेली दिसते. या चौफुलीच्या चारही बाजूंना रिक्षा व खासगी वाहने उभी असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते. अंबड औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या अनेक रिक्षा पाथर्डी फाट्यावर सर्रासपणे रस्त्यातच उभ्या राहत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या चौफुलीवर असलेल्या उड्डाणपुलाखाली अनेक वाहने उभी राहत असून, ती वाहनेसुद्धा विनापरवानगी उभी केली जात असल्याचे दिसून येते. अनेक हॉटेल्स व मंगल कार्यालय असल्याने येथे बेशिस्त पार्किंगची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते.
--
पाथर्डी फाटा परिसरात पोलिसांनी हस्तक्षेप करून रिक्षा स्टँड उभारण्याची गरज असतानाही पोलिस त्याकडे लक्ष देत नाहीत. वाहतूक पोलिस शाखेचे काही कर्मचारी या ठिकाणी उभे असले, तरी केवळ दंडात्मक कारवाईतच त्यांना रस असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. पाथर्डी फाटा येथे, तर वाहतूक शाखेने थेट पोलिस चौकीच सुरू केली असली, तरी वाहतुकीच्या नियोजनाकडे मात्र लक्षच नसल्याचा आरोप अनेकदा केला जातो. या ठिकाणी असलेल्या रिक्षा व खासगी वाहनचालक आणि पोलिसांची मिलिभगत असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. पाथर्डी फाट्यावरील वाहतुकीवर पोलिसांनी वेळीच नियंत्रण न मिळविल्यास भविष्यात द्वारका चौफुलीसारखी डोकेदुखी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
--
पाथर्डी फाट्यावर रस्त्याच्या कडेला अनेक विक्रेते बसलेले असतात, तर खासगी वाहतूक करणारे व रिक्षाचालक रस्त्यातच उभे राहत असल्याने या ठिकाणाहून गाडी चालविणे जिकिरीचे ठरते. पोलिसांनी येथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
-धनंजय पाटील, नागरिक
--
पाथर्डी फाटा हा सध्या अपघातांचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जातो. पाथर्डी फाट्यावर वाहतूक पोलिसांची खास चौकी असली, तरीही येथे वाहतुकीचे नियोजन होत नसल्याने आश्चर्य वाटते. या ठिकाणची वाहतूक व्यवस्थेचे नियोजन होणे अतिशय गरजेचे आहे.
-रामदास जाधव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

0
0

आमदार डॉ. अपूर्व हिरे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी यापूर्वीही आपण प्रयत्न केले आहेत. पदाधिकारी असो अथवा नसो तरीही इगतपुरीशी असलेल्या बांधिलकीमुळे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठपुरावा करीत राहणार, अशी ग्वाही आमदार अपूर्व हिरे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार अपूर्व हिरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात जनसंर्पक अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने घोटी शहरातही त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे स्नेहसंमेलन घेऊन संवाद साधला. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, माजी सभापती संपतराव काळे, भाजप तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश परदेशी, पांडुरंग बऱ्हे, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, संजय झनकर, माजी तालुकाध्यक्ष खंडेराव झनकर, हरिश चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त करून तालुक्याच्या समस्यांबाबत आ. ‌हिरे यांच्याशी हितगूज केले. इगतपुरीच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेणार असून, सरकारच्या मध्यमातून अनेक योजना आणल्या आहेत. काही योजनांसाठी प्रयत्नशील आहे. सिन्नर-घोटी-त्र्यंबक महामार्ग लवकरच मार्गी लागणार असून, नाशिक-कसारा लोकलसेवा, मुंबई-नाशिक लोकल सेवा सुरू करण्याबाबत लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानग्रस्तांना लवकरच मिळणार मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील १७० गावांमधील १३०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दीड हजार शेतकरी त्यामुळे बाधित झाले असून, नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे दोन कोटी ३३ लाख रुपयांची मागणी केली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या ओखी चक्रीवादळाचा थेट नसला तरी नाशिक जिल्ह्यातील भागाला फटका बसला. नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड तालुक्यांमध्ये बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. कांद्याच्या रोपांसह शेतात काढून ठेवलेला कांदा, मकाही भिजला. जिल्ह्यात त्यावेळी एकूण १२५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. कृषी सहाय्यकांनी नुकसानीचे पंचनामे केले असता जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १ हजार ५०६ शेतकऱ्यांच्या ताब्यातील १ हजार २९५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

निकषांच्या आधारे मिळणार मदत

ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायत पिकांखालील क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत १३,५०० रुपये, तर फळपिकाखालील क्षेत्रासाठी १८,००० रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी दोन कोटी ३३ लाख ८ हजार २९० रुपये मिळणे अपेक्षित असून, तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल पुरावा ठरला मोलाचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सोनई तिहेरी हत्याकांडाची घटना २०१३ मधील जानेवारीच्या सुरुवातीला उघडकीस आली. यामुळे अहमदनगर जिल्हाच नाही तर राज्यातही खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून झालेल्या या हत्याकाडांत तपासात काही त्रुटी होत्या. मात्र, चार वर्षे सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत मोबाइलचा तांत्रिक पुरावा तसेच आरोपीच्या मुलीने फिरविलेला जबाब महत्त्वपूर्ण ठरला.

प्रेमप्रकरणामुळे आरोपींनी अत्यंत निर्घृण पद्धतीने प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांचा खून केला होता. पुरावे मिटविण्यासाठी आरोपींपैकी एकानेच सेफ्टी टँकमध्ये अनोळखी मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर याच ठिकाणी पोलिसांना आणखी दोन मृतदेह आढळून आले. प्राथमिक जाबजबाबानंतर हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. काही संघटनांनी या प्रकरणी मोर्चे काढून कडक कारवाई करण्याची मागणी केली. राज्यातील वातावरण गरम होण्याची चिन्हे असल्याने हा तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्यात आला. तसेच खटल्याची व्याप्ती मोठी असल्याने यात स्थानिक पातळीवर दबाव निर्माण करण्यात येऊ शकतो, असा मृतांच्या कुटुंबीयांनी दावा करीत औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाच्या आदेशाने एका वर्षातच हा खटला नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याबाबत सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले, की सोनई हत्याकांड हा ऑनर किलिंगचा प्रकार असून, कोर्टाने त्याकडे गांभीर्याने पाहिले. तपासात काही त्रुटी होत्या. मात्र, सरकारी पक्षाने तांत्रिक पुरावे सक्षमपणे मांडले. घटनेच्या एक दिवस अगोदर रात्री उशिरापर्यंत आरोपी तसेच हत्या झालेल्या व्यक्तींचे मोबाइलवरून संभाषण झाले होते. तसेच हत्याकांडानंतर तो मोबाइल घटनास्थळीच होता. हत्याकांडानंतर संबंधित मुलीचे जबाब घेण्यात आले होते. मात्र, त्यात विसंगती आढळून आली. ही मुलगी बीएडचे शिक्षण घेत असताना प्रेमप्रकरण सुरू झाले होते. मात्र, हत्याकांडानंतर ती परत कधीही कॉलेजला आली नाही. तिने असे का केले? हा मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरला. त्याचे कोणतेही स्पष्टीकरण समोर न आल्याने कोर्टाने तिला फितूर घोषित केले. यामुळे आरोपींनी कट रचला हे सिद्ध झाल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.

तरुणांची निर्घृण हत्या
अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील पोपट उर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले यांची मुलगी बी.एडचे शिक्षण घेत असताना संस्थेतील सफाई कामगार सचिन सोहनलाल घारूसोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. ही घटना दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर आरोपींनी वस्तीवरील शौचालयाच्या सेफ्टी टँकची दुरुस्तीचा बहाणा करून तसेच जास्त मजुरीचे आमीष दाखवून सचिन घारू, संदीप थनवार व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी सोनई येथे बोलावून घेतले होते. यावेळी आरोपींनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकमध्ये बुडवून ठार केले. पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने वार करीत तर प्रियकर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खून करण्यात आला होता.

पोलिसांचा बंदोबस्त
राज्यभरातील सध्याचे वातावरण तसेच या हत्याकांडबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही मॅसेजेसमुळे जिल्हा कोर्ट आणि परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्यासह सुमारे ६० पोलिस कर्मचारी तैनात होते.

आरोपी नवगिरेचा संताप
खटल्यातील एक संशयित अशोक फलके याच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केले. कोर्टाने त्याची लागलीच सुटका करण्याचे निर्देश दिले. कोर्टाने आपला निर्णय सुनावताच दोषी ठरलेला अशोक नवगिरे कोर्टातच संतप्त झाला. फलकेला कसे सोडले? मी तर काहीच केले नाही. पोलिसांपाठोपाठ कोर्टानेही माझ्यावर अन्याय केला. माझे आयुष्य वाया गेले असे म्हणत नवगिरेने अश्लिल शिवीगाळ केली. यामुळे कोर्टात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

फाशीची मागणी
खटल्याच्या सुनावणीवेळी मृत संदीप थनवार, सचिन घारू तसेच तिलक राजू कंडारे यांचे कुटुंबीय कोर्टात हजर होते. कोर्टाच्या निकालाचा आंनद असला तरी आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी मृत राहुल कंडोरेचा भाऊ सागर राजू कंडारे याने केली. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, फाशीच्या निर्णयामुळेच न्याय मिळेल, अशी भावना मृत सचिन घारूच्या आईने व्यक्त केली. शिक्षा गुरुवारी (दि. १८) सुनावण्यात येणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉवरमध्ये करंट; डॉक्टरचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाथरूममध्ये अंघोळ करताना शॉवरमध्ये वीजप्रवाह उतरून तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. आशिष विलास काकडे (वय २४, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, गंगापूररोड) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये वरील मजल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी इतर रहिवाशांनी वरचा मजला गाठला असता घडला प्रकार उघड झाला. डॉ. काकडे यांच्या घरात पाणी साचले होते, तर बाथरूममध्ये शॉवरखाली डॉ. काकडे हे अर्धनग्न अवस्थेत निपचीत पडलेले होते. रहिवाशांनी तत्‍काळ वीजपुरवठा बंद करून पोलिसांना माहिती दिली. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने केलेल्या पाहणीनुसार डॉ. काकडे यांच्या अंगावर ठिकठिकाणी भाजल्याच्या खुणा आढळून आल्या. बाथरूममधील शॉवर तसेच, नळामध्ये वीजप्रवाह उतरून डॉ. काकडे यांना शॉक बसून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. डॉ. काकडे यांचा मृत्यू पहाटे झाला असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस स्थानकाच्या स्वच्छतेला वेग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व बस स्थानके चकाचक करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. एसटीचे स्वच्छतेचे काम खासगी कंत्राटदारने सुरू केले असले तरी आता ते लक्ष वेधू लागले आहे.

बस स्थानक परिसरात साफसफाईसाठी लाल टी शर्ट, काळी पँट व काळे बूट असा पेहराव असलेले हे रेड बॉय ठिकठिकाणी आता दिसत आहे. खासगी कंपनीने आधुनिक स्वच्छतेचे यंत्रासह जिल्ह्यात २०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे साफसफाईचे काम २४ तास केले जाणार आहे.

एसटी महामंडळाने स्वच्छता प्रकल्पाद्वारे राज्यातील ५३८ बसस्थानके आणि २५० आगार परिसर रोज स्वच्छ ठेवण्याचे वार्षिक कंत्राट ब्रिक्स कंपनीला दिले आहे. या कंपनीने राज्यभर हे स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यात १३ बस आगारासह ३३ ठिकाणी हे कर्मचारी काम करत आहेत. या ३३ ठिकाणांमध्ये बस स्थानक, ऑफिसेस यांचा समावेश आहे. तसेच बसच्या स्वच्छतेची जबाबदारी याच कंपनीकडे आहे.

बस स्थानक परिसर स्वच्छतेत हाय प्रेशरने पाणी मारण्यासाठी जेट प्रेशर मशिन, धूळ हटविण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर, फर्शी पुसण्यासाठी स्क्रब मशिन व कचरा उचलण्यासाठी फिल्पर मशिनचा वापर केला जात आहे. तीन शिफ्टमध्ये या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने यापुढे एसटीचा परिसर स्वच्छ राहणार आहे. बस स्थानक परिसर स्वच्छ असावा यासाठी एसटीने यापूर्वीही अनेक प्रयोग केले. पण, त्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम असल्याने आता राज्यभर एकच कंत्राटदार देऊन एसटीने नवा प्रयोग केला आहे. त्यात सातत्य राहिले तर त्याचा दिलासा प्रवाशांना मिळू शकणार आहे.

जिल्ह्यात १३ आगार व ३३ लोकेशन्सवर कंपनीतर्फे स्वच्छता करण्यासाठी २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. स्वच्छतेसाठी तीन शिफ्टमध्ये २४ तास काम केले जाणार आहे. बसची स्वच्छता करणे व ऑफिसची स्वच्छतेचेही काम आमचे कर्मचारी करणार आहेत.
- नासर देसाई, क्लस्टर हेड, ब्रिक्स कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीची नवी इमारत होणार आठ मजली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एबीबी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन आठ मजली प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार झाला असून तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्र्यंबकरोडवर बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचा प्लॅन इको फ्रेंडली करण्यात आला आहे. त्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

इमारतीमधील पहिले दोन मजले पार्किंगसाठी राहणार आहेत. विशेष म्हणजे पुढील तीस वर्षात जि. प. मध्ये येणाऱ्या सगळ्यांकडे कार असेल असे अंदाज बांधून अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था या परिसरात केली जाणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू होणार आहे.
पाच महिन्यापूर्वी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली होती. त्यानंतर नागपूर अधिवेशनात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी महादेव जानकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या कामाला गती मिळाली व जिल्हा परिषदेने प्लॅन तयार करून खर्चाचा प्रस्तावही तयार केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी यासाठी पाठपुरावा केला.

जिल्हा परिषदेच्या सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासह वाहनतळाअभावी अडचणीची ठरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी राज्यमंत्री दादा भुसे व ग्रामविकास पंकजा मुंडे यांच्यासमोर नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर जागेची शोधाशोध सुरू झाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सधन कुक्कुट केंद्राची जागा त्यासाठी सुचवण्यात आली. त्यासाठी मंत्री जानकर यांच्याकडे बैठक झाली. त्यांनी त्यास मान्यता दिली आहे.

अशी असेल इमारत
साडेचार एकर परिसरात हे नवीन प्रशासकीय कार्यालय होणार आहे. त्यात दीड लाख स्वेअर फुटचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीत दोन मोठे हॉल असतील. प्रत्येक मजल्यावर मुख्य विभाग व सभापतीची कॅबिन असावी असा प्रयत्न करण्यात आला आहे. बिल्डींगच्या पार्किंगबरोबरच ओपन स्पेसमध्ये पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

शिफ्टिंगसाठी खर्च
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेत सधन कुक्कुट केंद्र आहे. त्याच्या शिफ्टिंगसाठी सुद्धा खर्च येणार आहे. तसेच हाय व्होल्टेज विद्युत तारा शिफ्ट करण्यासाठी खर्च येणार आहे. हा सर्व खर्च अपेक्षित धरून हे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शरयू’च्या शब्दांची सातासमुद्रापार मोहिनी

0
0

तरुणाईची पसंती; अॅमेझॉनकडून ‘इंक फोबिया’ प्रकाशित

नाशिक : ट्रेण्ड किंवा फॅशन म्हणून शरीरावर आकर्षक टॅटू गोंदवून घेणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही. ‘टॅटू’चे हे वेड रंजक असले तरीही अनेकदा त्याच्या भावविश्वात भेदकताही दडलेली असते, हे वास्तव अवघ्या विशीत प्रवेशणाऱ्या नाशिककर शरयू श्याम पवार हिने कथासंग्रहाच्या माध्यमातून जगासमोर मांडले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावरील तिच्या प्रभावी मांडणीची दखल अॅमेझॉनने घेतली असून, तिचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

ऑनलाइन माध्यमातून तिच्या ‘इंक फोबिया’ या चॅप्टर सीरिजने प्रत्यक्षात पुस्तकाचा आकार घेतला असून, ते जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरले आहे. व्हॉट्सअॅप किंवा इन्स्टाग्रामसारखी अनेक मोबाइल अॅप्लिकेशन्स सध्या अस्तित्वात आहेत. तरुणाई आपला बहुमूल्य वेळ या अॅप्लिकेशन्समध्येच घालवत असल्याची पालकवर्गाची तक्रार असते. अशा तक्रारी एचपीटी आर्ट्स कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या शरयूच्या बाबतीतही होत्या. पण ‘वॉटपॅड’ नावाच्या कथालिखानास प्रोत्साहन देणाऱ्या अॅप्लिकेशनद्वारे ती जगातील अनेक देशांमध्ये नवलेखिका म्हणून परिचय मिळविते आहे, ही माहिती मिळाल्यानंतर शरयूच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रित आश्चर्याचे भाव होते. अमेरिकेसह कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमधून १८ ते ४० वयोगटातील वाचक तिच्या लिखाणाचे फॅन ठरले आहेत. अॅमेझॉनने तिचे ‘इंक फोबिया’ हे फिक्शन गेल्या ऑगस्टमध्ये प्रकाशित केले. लवकरच ‘इंक फोबिया’चे वेब सीरिजमध्ये रुपांतर करण्याचा तिचा मानस आहे.

दहावे मानांकन

सुरुवातीस शरयूच्या ‘नाईट रायडर्स’ या बाईक रायडिंग करणाऱ्या तरुणांभोवतालच्या कथेने जागतिक स्तरावर चांगली मानांकने मिळवली. यानंतर पठडीबाहेरील विषय हाताळण्याच्या उद्देशाने तिने ‘इंक फोबिया’ या मथळ्याखाली चॅप्टर सीरिज लिखाणास सुरुवात केली. यातील टॅटू गोंदविणाऱ्या तरुणाईचे रंजक आणि भेदक विश्व जगभरातल्या उदाहरणांमधून तिने मांडले आहे. तिची इंग्रजीतली ही मांडणी युरोपीय देशांमधूनही जगभरातले दहावे मानांकन घेऊन स्पर्धेत उभी राहिली. या आर्टिकल सीरिजचा क्लायमॅक्स तिने पुस्तकात उतरविला आहे.

आई आणि बाबांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे इंग्रजी फिक्शन लिहिण्यापर्यंत प्रोत्साहन मिळू शकले. आता लेखनाच्या क्षेत्रात आणखी अस्सल आणि दर्जेदार शब्द वाचकांना देण्यासाठी मी प्रयत्नरत राहीन.

- शरयू पवार, लेखिका, इंक फोबिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्डाची मागणी केली म्हणून वाशिम जिल्ह्यात रेशन दुकानदाराला एका लाभार्थी ग्राहकाने मारहाण केली. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी दुकाने बंद ठेवून या घटनेचा नाशिकमध्येही निषेध नोंदविला. रेशन दुकानदारास मारहाण करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वस्त धान्य वितरणप्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकाला पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनच्या मदतीनेच धान्य वितरण केले जाते; परंतु त्याकरिता रेशन कार्डाशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ही जबाबदारी पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांच्या माथी मारली आहे. आधार लिंकिंगबाबत पुरवठा विभागाचा दबाव आणि सर्वसामान्यांचा उफाळून येत असलेला रोष अशा कात्रीत रेशन दुकानदार सापडत आहेत. वाशिम येथेही असाच प्रकार घडला. एका लाभार्थ्याकडे आधार कार्डाची मागणी केली म्हणून गणेश तिवारी या रेशन दुकानदारास आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील २,६०९ रेशन दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकानदारांच्या संघटनेने निवेदन दिले. अध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्यासह महेश सदावर्ते, दिलीप तुपे, सलीम पटेल, रतन काळे, राजू लोढा आदी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवाहर मार्केटचे हाल बेहाल

0
0

मटा मालिका
सरकारी इमारतींना ‘घरघर’
नाशिकरोड

---



जवाहर मार्केटचे हाल बेहाल



नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड
भूतपूर्व नाशिकरोड-देवळाली नगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि सध्याच्या नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाची धुरा अनेक वर्षे वाहणाऱ्या देवी चौकातील जवाहर मार्केट या इमारतीचे सध्या हाल बेहाल झाले आहेत. साफसफाईअभावी या इमारतीच्या दालनांना सध्या उकिरड्याचे स्वरूप आले असून, सुरक्षेअभावी या इमारतीत मद्यपींचा सर्रास वावर वाढला आहे. तब्बल ५२ वर्षे परिसराचे वैभव असलेली ही इमारत सध्या जर्जर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जवाहर मार्केट या महापालिकेच्या पूर्वीच्या विभागीय कार्यालयाची सध्या दुरवस्था झाली आहे. या इमारतीची उभारणी तत्कालीन नाशिकरोड-देवळाली नगरपालिकेने केली होती. अगदी अलीकडच्या काळापर्यंत परिसराच्या विकासाचे केंद्र ठरणाऱ्या या इमारतीची पूर्वीप्रमाणे साफसफाई होत नाही. गॅलरीचा वापर कचरा साचविण्यासाठी होत आहे. बहुतांश दालनांना सध्या टाळे लावलेले आहे. येथील महापालिका विभागीय कार्यालयाचे कामकाज दुर्गा गार्डनजवळील नवीन इमारतीतून सुरू झाल्यापासून या इमारतीला बकाल स्वरूप आल्याचे दिसते. सध्या या इमारतीतीत सर्व फर्निचर धूळ खात पडून आहे. येथे सुरक्षारक्षकही नेमणुकीस नाही. केवळ शासकीय ग्रंथालय आणि सिटी सर्व्हे या दोन कार्यालयांचा अपवाद वगळता ही इमारत सध्या बेवारस पडून आहे. आगप्रतिबंधक सिलिंडर, झाडांच्या कुंड्या, खुर्च्या असे साहित्य गॅलरीत सध्या बेवारस पडून आहे. खिडक्या उघड्याच असल्याने बाहेरील धूळ आत आल्याने आतमध्ये धुळीचे थर साचलेले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जवाहर मार्केट या इमारतीचे पूर्वीचे वैभव लयाला गेले आहे.
--
गॅलरी, दालनांसमोर अडगळ
या इमारतीच्या गॅलरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचर साचलेला आहे. काही अडगळीचे साहित्यही सर्वांत वरच्या मजल्यावरील दालनांपुढील गॅलरीत गेल्या वर्षभरापासून पडून आहे. धुळीचे थर जमा झालेले आहेत. पूर्वीप्रमाणे या इमारतीच्या दैनंदिन स्वच्छतेचा महापालिकेच्या स्वच्छता विभागाला आता जणू काही विसरच पडलेला असल्याचे येथील अस्वच्छतेमुळे उघड झाले आहे.
--
फर्निचरला लागलीय वाळवी
या इमारतीत पूर्वी महापालिकेचे विभागीय कार्यालय होते. येथील विभागीय कार्यालय काही वर्षांपूर्वी दुर्गा गार्डनजवळील नूतन वास्तूत स्थलांतरित झाले. मात्र, तेव्हापासून या कार्यालयातील फर्निचर येथेच पडून आहे. लाखो रुपये किमतीच्या येथील फर्निचरची सध्या दुरवस्था झाली आहे. काही फर्निचरला वाळवीही लागल्याचे दिसून येते. इलेक्ट्रिकल साहित्याचीही मोडतोड झालेली आहे. काही साहित्य उघड्यावर बेवारस स्थितीत गॅलरीतच पडून आहे.
--
व्यावसायिकांचा पालिकेला चुना
या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यावसायिक गाळ्यांना गेल्या वर्षभरापासून सील लावण्यात आलेले आहे. या गाळ्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेचा लाखो रुपयांचा कर थकविल्याने त्यांच्यावर महापालिकेने ही कारवाई केली आहे. तेव्हापासून येथील गाळे बंद आहेत. अगदी वाजवी दराने भाडेतत्त्वावर देऊनही या गाळ्यांचा कर थकविणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक चुना लावला आहे.
--
ग्रंथालय शोभेचे बाहुले
या इमारतीत शासकीय ग्रंथालय सुरू आहे. मात्र, या ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या असहकार्याच्या वृत्तीमुळे व येथील समस्यांमुळे सध्या हे ग्रंथालय केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. या ग्रंथालयातील हजारो पुस्तके वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येथे काही विद्यार्थी येतात. परंतु, त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने जिन्यातील पायऱ्यांवर बसूनच वाचन करावे लागत असल्याची स्थिती आहे. काही ग्रंथालय कर्मचारी सोशल मीडियवरच व्यग्र दिसतात. शांतता राखण्यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत.
--
स्वच्छतागृहे मद्यपींचा अड्डा
या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे आहेत. ही सर्व स्वच्छतागृहे साफसफाईअभावी अस्वच्छ झालेली आहेत. काही स्वच्छतागृहांत अडगळीचे साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. काही स्वच्छतागृहांत मद्यपींचा दररोज अड्डा जमत असतो. या ठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. या मद्यपींमुळे या इमारतीतील ग्रंथालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
--
महापालिकेचे पूर्वीचे विभागीय कार्यालय असलेल्या जवाहर मार्केट या इमारतीत सध्या शासनाचे वाचनालय आणि सिटी सर्व्हे विभागाचे कार्यालय आहे. बाकी सर्व दालनांचा वापर होत नाही. या इमारतीतील काही गाळे सील करण्यात आलेले आहेत. या इमारतीचा पूर्वीसारखा वापर होत नसला, तरी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून येथील स्वच्छता राखली जाते.
-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड
--
जवाहर मार्केट इमारतीच्या देखभालीकडे महापालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांपासून साफ दुर्लक्ष केलेले आहे. सध्या या इमारतीची अस्वच्छतेने दुरवस्था झालेली आहे. लाखो रुपये किमतीचे फर्निचर व अन्य साहित्य वापराविना धूळ खात पडून आहे. काही साहित्य गायबही झाले असण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नगरसेवकांचेही या इमारतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे.
-योगेश आहिरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डाएटिंग’च्या मिळणार टिप्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजकाल वाढत्या वजनामुळे केवळ महिला आणि पुरुष दोघेही त्रस्त असतात. शारीरिक आकारमानच बिघडवून टाकणारे वजन सौंदर्यासाठीही घातक ठरते. मग सुरू होते शरीररचना योग्य आकारात आणण्यासाठीची धावपळ आणि डाएटिंगचे नियोजन. मात्र, डाएटिंग म्हणजे नेमके काय करायचे, हेच अनेकांना व्यवस्थित समजत नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे डाएटिंगवर आधारित वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेज, कॉलेजरोड येथे शनिवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता हे वर्कशॉप होणार आहे. ऋतूनुसार कुठला आहार घ्यावा, हा आहार घेताना आपली प्रकृती कोणत्या प्रकारची आहे, डाएटिंग करायाचे असल्यास कोणती काळजी घ्यावी, प्रकृतीनुसार आहार कसा असावा, ऋतूनुसार आहार कसा ठरवावा, हे ओळखून आपल्या आहारात कसा बदल करावा, याविषयी वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डाएटिंग तज्ज्ञ संदीप चिंचोलीकर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ५० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. ज्यांना कल्चर क्लब सदस्यत्व घ्यायचे आहे, त्यांना या वर्कशॉपच्या ठिकाणी सदस्यत्व मिळू शकणार आहे. नोंदणीसाठी (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. www.mtcultureclub.com <http://www.mtcultureclub.com/> या वेबसाइटवर ऑनलाइन सदस्यत्वही मिळवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा घरे फोडणाऱ्यास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिसांच्या मध्यवर्ती क्राइम ब्रँचच्या पथकाने संशयावरून पकडलेल्या संशयित आरोपीने तब्बल १५ घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या अन्य तिघा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

अंबड, चुंचाळे तसेच इंदिरानगर भागात सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर क्राइम ब्रँचच्या मध्यवर्ती पथकाने संशयावरून चुंचाळे येथील गोटीराम लक्ष्मण भोये याच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवली. त्यात काही संशयास्पद आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर त्याने गुरूदेव काळू खताले (१९), सागर आत्माराम जमदाडे (२१) आणि एका अल्पवयीन साथीदाराची नावे पोलिसांना दिली. मध्यवर्ती पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लागलीच सर्वांना ताब्यात घेतले. या संशयितांनी अंबड पोलिस स्टेशन हद्दीत १४ तर इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत एक अशा १५ घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई मध्यवर्ती पथकाचे निरीक्षक कुमार चौधरी, सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड आदींनी केली. या पत्रकार परिषदेसाठी सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

या वस्तूंची केली होती लूट
पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख चार हजार १५० रुपयांचे १६८ ग्रॅमचे सोन्याचे, ८०० ग्रॅमचे सुमारे ३२ हजार रुपयांचे चांदीचे दागिने तसेच सुमारे एक लाख रुपयांचे चार लॅपटॉप, १० हजार रुपयांचे दोन कॅमेरे आणि रोख चार हजार रुपये असा सहा लाख ५० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images