Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चंदनतस्करांना बेड्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मालेगाव येथून चांदवडमार्गे चंदनाची बेकायदा तस्करी करणाऱ्या तिघांना सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड टोल नाक्यावर शुक्रवारी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदवड टोलनाक्यावर बेकायदा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर चांदवड-नाशिक मार्गावरील ही मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध चांदवड पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चंदन तस्करी करणारे तीन जण स्कोडा कारने जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर सापळा रचला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एमएच ०२ सीएच ४५०१ क्रमांकाची कार मालेगावकडून नाशिककडे घेऊन जात होती. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने या कारला अडवून त्यातील तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे चंदन, तर सात लाख किमंतीची स्व्होडा कार ताब्यात घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तात्या काळू पवार, निशांत मारोती पवार, राकेश मधुकर वाघ (सर्व रा. मालेगाव) यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चांदवड पोल‌िस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोल‌िस करीत आहेत.

गुन्हेगारांचे धाबे दणाणले

चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडल्यानंतर लगेच पोलिसांनी चंदन तस्करी पकडल्याने गुन्हेगाराचे चांगले धाबे दणाणले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोल‌िस अधीक्षक प्रवीण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोल‌िस उपनिरीक्षक भरत चौधरी, कर्मचारी चेतन सवंस्तर, विजय कोरडे, किरण गांगुर्डे, कुणाल मराठे, संपत अहिरे यांच्या पथकाने केली.

चंदन आणले कोठून

या चंदनतस्करांनी हे चंदनाचे लाकूड आणले कोठून, याआधीही त्यांनी चंदनाची तस्करी केली का, ते लाकूड कोणाला पुरवित होते, यात कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मालेगावातील आहेत. मालेगाव साक्री रोडवर मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे हे लाकूड मालेगाव परिसरातील आहे की बाहेरून आणले याचाही पोलिस शोध घेत आहेत.

खासगी वाहनाचा वापर

चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर गेल्या महिन्यात खासगी वाहनातून मुंबईकडे नेला जाणारा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी पकडला होता. आता त्याचप्रमाणे खासगी वाहनातून चंदनाचे लाकूड लंपास केले जात होते. तसेच मालेगाव, धुळे या परिसरातून गुरांचीही बेकायदेशीर वाहतूक खासगी वाहनातून केल्याचे घटना उघडकीस आले आहे. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना संशय येवू नये म्हणून खासगी लहान कारचा गुन्ह्यांसाठी वापर केला आहे. त्यामुळे या महामार्गावरील संशायास्पद धावणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी करण्याचीही जबाबदारीही पोलिसांवर वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगावकरांना हवा विदर्भ, महानगरीचा थांबा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेचे महा व्यवस्थापक शनिवारी नांदगाव येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत. नांदगाव रेल्वेस्थानकात विदर्भ आणि महानगरी एक्स्प्रेसला थांबा द्यावा या प्रमुख मागणीचा त्यांनी सकारात्मक विचार घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकात अनेक रेल्वेगाड्या थांबत नाही. त्यांना नांदगाव येथे थांबा द्यावा. नांदगाव स्थानकात विदर्भ एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी आहे. रात्री ९ वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस गेल्यानंतर दुसरी कोणतीही गाडी मुंबई-नाशिक-मनमाडहून नांदगावसाठी नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. पंचवटीने मनमाडपर्यंत आल्यास पुढे अनेकदा नांदगावपर्यंत वाहन नसते. त्यानंतर येणारी विदर्भ एक्स्प्रेस नांदगाव स्थानकात थांबल्यास प्रवाशांची सोय होईल. त्याचबरोबर सकाळीदेखील नांदगावकडून मनमाड-नाशिक-मुंबईकडे येण्यास रेल्वेची संख्या कमी आहे. झेलम एक्स्प्रेस केवळ मनमाडपर्यंत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी रेल्वेला नांदगावमध्ये थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे महाव्यवस्थापकांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या दोन्ही गाड्यांना थांबा देण्याबाबत सखारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे



प्रवास गैरसोयीचा

नांदगावला जाण्यासाठी पुरेशा रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना मनमाडला उतरुन बस अथवा खासगी वाहनाने नांदगाव गाठावे लागते. त्यातही मनमाड-नांदगाव रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे प्रवाशी वैतागले आहेत. गावातून रेल्वेलाइन असूनही गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे रेल्वेप्रवाशांनी विदर्भ, महानगरीच्या थांब्यासाठी जोर लावला आहे.



नांदगाव स्थानकात महानगरी व विदर्भ या दोन्ही गाड्यांना थांबा मिळाल्यास प्रवाशांचे हाल थांबतील. सध्या त्यांना महागडा बसप्रवास करावा लागत आहे. तोही गैरसोयीचा आहे. नांदगाव रेल्वेप्रवाशांच्या या मागणीची रेल्वे महाव्यवस्थापकांनी गांभीर्याने विचार करावा.- एम. सलीम अहमद, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला येथे होणार ट्रान्स्फॉर्मर भवन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवला मतदारसंघातील रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येवला येथे ट्रान्स्फॉर्मर भवन मंजूर केले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी ही माहिती दिली. ट्रान्स्फॉर्मर भवनासाठी सुमारे ५२ लाख ३५ हजार रुपये खर्च येणार आहे.

येवला तालुक्यात रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर ते जमा करण्यासाठी आणि नवीन रोहित्रासाठी मनमाड, चांदवड किंवा नाशिकला जावे लागते. मात्र, आता येवला येथे ट्रान्स्फार्मर भवन होत असल्यामुळे नादुरुस्त रोहित्रांची ने-आण करण्याच्या कालावधीमध्ये बचत होऊन शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागात नवीन सुस्थितीमधील रोहित्र तातडीने बसविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर भवन उभारण्यात यावे, यासाठी भुजबळ यांनी ऊर्जामंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. ट्रान्स्फॉर्मर भवनाला सरकारने मंजुरी दिली असून, या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल. ट्रान्स्फॉर्मर भवनाचे बांधकाम झाल्यानंतर येथे अद्ययावत तंत्रज्ञान व मशिनरी उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बॉश’मधील चोरीप्रकरणी दोघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉश कंपनीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी शिश अहमद अस्लम हुसेन खान आणि अहमद रजा शुभराजी खान यांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने शनिवारी चार दिवसांची वाढ केली. फरार असलेला मुख्य सूत्रधार छोटू चौधरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच या गुन्ह्याची खऱ्या अर्थाने उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

बॉश कंपनीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे सुटे पार्ट चोरी केल्याप्रकरणी चौधरीसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. सिडकोतील पंडितनगर येथील चौथ्या स्कीममधील रहेतमुल्ला चौधरी यांच्या तीन मजली इमारतीसमोर एक जानेवारी रोजी संशयास्पद ट्रक उभा असताना पोलिसांनी चौकशी केली. ट्रकमध्ये बॉश कंपनीकडून उत्पादित होणारे नोझल, निडल्स, वॉल्व्हसेट, वॉल्व्ह पीस, पिस्टन व इतर सुटे असा १० कोटी ६६ लाख रुपयांचा २३ टन माल पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी शिश अहमद अस्लम हुसेन खान आणि अहमद रजा शुभराजी खान यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार छोटू चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो फरार आहे. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात आणखी बऱ्याच व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी संशयितांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दोघांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, मुख्य संशयितास अटक झाल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असे अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.

राजकीय हस्तक्षेपाकडे लक्ष!

हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर सिडकोतील काही नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून गुन्हा दाखल केला. आता वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते आहे. चोरीच्या या गुन्ह्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचे थेट लागेबांधे असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांवर राजकीय दबाव नसून, यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचणार असल्याचा दावा पोलिस निरीक्षक कड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पदाधिकारी निधीचा हट्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तिजोरीत आर्थिक खडखडाट असतानाही प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांना ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी दिल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी पदाधिकारी निधीची रट लावली आहे. सध्या स्पीलओव्हर सव्वाआठशे कोटींवर पोहोचला असतानाही पदाधिकाऱ्यांचा हट्ट आता कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. महापौर ते विरोधी पक्षनेता आणि सभापतींसाठी जवळपास १७ कोटींच्या पदाधिकारी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हा निधी द्यायचा कुठून, या पेचात प्रशासन पडले आहे.

महापालिकेत सत्तेत आल्यापासून भाजपकडून कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही पदाधिकाऱ्यांच्या कोटीच्या कोटी उड्डाणांचे चोचले पुरवणे आता प्रशासनाला अवघड झाले आहे. भाजपला नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नाराजीला पहिल्याच वर्षात सामोरे जायला लागू नये म्हणून विकासकामांचा निधी ७५ लाखांपर्यत वाढवून दिला होता. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीदेखील नगरसेवकांच्या प्रस्तावाला नकार न देता मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ९१ कोटींहून अधिक किमतीचा बोजा पडला. त्यानंतर पुन्हा शहरात २५७ कोटींचा हट्ट पुरवण्यात आला. आता पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाहीर झालेल्या पदाधिकारी निधीसाठी आयुक्तांकडे रेटा लावला आहे. महापौरांना पाच कोटी, स्थायी समिती सभापती व उपमहापौरांना प्रत्येकी तीन कोटी, सभागृह नेत्यांना दोन, तर विरोधी पक्षनेत्यांना एक कोटी रुपये विकास निधी घोषित करण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी प्रभाग सभापतींवर उदार होत प्रत्येकी ५० लाख रुपये घोषित केले होते. पदाधिकाऱ्यांनी आता आपला मोर्चा १७ कोटींच्या पदाधिकारी निधीकडे वळवला असून, तो देण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नगरसेवक निधी आणि रस्ते विकास योजनेमुळे महापालिकेचा स्पीलओव्हर ८६४ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे हा निधी देणे शक्य नसल्याने प्रशासन हतबल झाले असून, हा निधी आता आणायचा कूठून, अशा पेचात पडले आहे. सध्याच्या स्थितीत हा निधी देणे शक्य नसल्याने प्रशासनाने याबाबत हात वर केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल ट्रॅकसाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली सायकलिस्ट्सची संख्या आणि सायकलिंगचे वेड पाहता नाशिकमध्ये सायकलिंग ट्रॅक उभारण्याची विधायक मागणी पुढे येणे स्वाभाविक आहे. नाशिकमधील पत्रकारांनी एकत्र येत महापालिकेमार्फत शहरात सायकल ट्रॅक उभारावेत, असे प्रतिपादन डॉ. भारतकुमार राऊत यांनी केले.

नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे पत्रकार सायकल रॅली उत्साहात झाली. या वेळी डॉ. राऊत बोलत होते. ते म्हणाले, की अशा सायकल रॅली सातत्याने व्हाव्यात. पुढील वर्षात किमान एक सायकल ट्रॅक उभारण्यात यश मिळाल्यास दर वर्षी पत्रकारदिनी पत्रकार पुन्हा सायकल रॅलीसाठी नाशिकमध्ये येतील, असा शब्दही या वेळी डॉ. राऊत यांनी दिला.

समाजातील विविध घटकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्या सर्व घटनांचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी मात्र कोणताही कार्यक्रम होत नाही. मात्र, आजच्या सायकल रॅलीमुळे हे चित्र बदलले असून, याबद्दल नाशिक सायकलिस्ट्सचे डॉ. राऊत यांनी अभिनंदन केले.

शहरातील सर्वच माध्यमांतील पत्रकारांनी या सायकल राइडचा अनुभव घेतला. या वेळी विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यम व्यवस्थापनाचे संपादक, युनिट हेड, विभागप्रमुख, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर, नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल, अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस, योगेश शिंदे, वैभव शेटे, श्रीकांत जोशी, डॉ. मनीष रौंदळ आदी उपस्थित होते.

डॉ. नगरकर म्हणाले, की समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकार बांधवांनी आपला वसा सांभाळताना आपल्या आणि परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच आज हरित आणि अतिशय सुंदर असलेले आपले नाशिक शहर यापुढेही असेच सुंदर व आरोग्यदायी राहील, याकडे लक्ष द्यावे.

मराठी पत्रकारदिनी आयोजित केलेल्या रॅलीसाठी शंभराहून अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला. मानवता सेंटर ते मुंबई नाका- चांडक सर्कल- गोल्फ क्लब- मायको सर्कल- संभाजी चौक- गोविंद नगर ते मानवता कॅन्सर सेंटरपर्यंतचे अंतर सायकलिस्ट्सने उत्साहात पार केले. सहभागी सायकलिस्ट्स पत्रकारांकारिता घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये दिनेश अमृतकर, मनोज मोरे, रत्नदीप रणशूर यांना जायंट स्टारकेन यांच्याकडून सायकली भेट देण्यात आल्या. सायकलिस्ट्सचे अध्यक्ष खाबिया यांनी प्रास्ताविक केले. सुखदा तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. वैभव शेटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेलिकन पार्कचा वनवास संपणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दादासाहेब फाळके स्मारक, पेलिकन पार्क, द्वारका येथील शॉपिंग कॉम्पेक्स आणि यशवंत मंडईचा वनवास नवीन वर्षात संपणार आहे. या प्रकल्पांचा विकास पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याची शिफारस कन्सल्टंटने केली आहे. त्या संदर्भात महापालिकेने प्रस्ताव तयार केला असल्याने या तिन्ही प्रकल्पांचा पुनर्विकास होणार आहे. सोबतच स्मार्ट सिटीअंतर्गत रविवार कारंजावरील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पेलिकन पार्क उभारले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या नवनिर्माणाला आर्थिक वर्षापासून चालना मिळणार आहे. या चार प्रकल्पांना चालना देण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कंबर कसली आहे.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याने नाशिककरांकडून प्रशासनासह सरकारकडून विकासकामांची आस लागून आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने पावले उचलली जात आहेत. निधीची अडचण लक्षात घेऊन शहरातील काही महत्त्वाचे प्रकल्प खासगी विकासकांच्या मदतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात महत्त्वाच्या तीन प्रकल्पांचा समावेश करण्यासाठी आयुक्तांनी कन्सल्टंट नियुक्त केले होते. त्यानुसार कन्सल्टंटने दादासाहेब फाळके स्मारकाचे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पाचे पूर्णतः नूतनीकरण करून रेव्हेन्यू शेअरिंगअंतर्गत त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यातून महापालिकेलाही महसूल मिळणार आहे. सध्या पूर्व विभागाचे कार्यालय महापालिकेच्या मेनरोड येथील जुन्या इमारतीतून चालते. मात्र, कामाचा वाढता पसारा व मेनरोडवरील गर्दी लक्षात घेऊन द्वारका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर पूर्व विभागीय कार्यालय उभारले जाणार आहे. सध्या या जागेवर गॅरेजचे अतिक्रमण असून, तो वाद न्यायप्रविष्ट आहे; परंतु येथील अतिक्रमणधारकांनी महापालिकेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बाजारभावाप्रमाणे गाळे घेण्याची तयारी दर्शविल्याने न्यायालयीन वाद मिटणार आहे. त्यामुळे हा शॉपिंग कॉम्प्लेक्सही पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणार आहे.

न्यायालयीन वादात अडकलेल्या सिडकोतील पेलिकन पार्कचाही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून विकास केला जाणार आहे. यापूर्वी सरकारकडे नमो उद्यानासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दोन्हींपैकी जो प्रस्ताव लवकर मान्य होईल तो पर्याय स्वीकारला जाणार आहे. पेलिकन पार्क विकसित करताना उत्पन्नाच्या दोन पर्यायांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेशकर महापालिका वसूल करणार व ठेकेदार कंपनीने विकसित केलेल्या पार्कमधील साहसी खेळांतून कंपनीला उत्पन्न मिळेल किंवा भागिदारी तत्त्वावर पार्क विकसित केले जाणार आहे. महिनाभरात महासभेवर प्रस्ताव ठेवून निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे, तर स्मार्ट सिटीअंतर्गत यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग केली जाणार असल्याची माहिती आयुक्त कृष्णा यांनी दिली. या प्रकल्पांना एप्रिलपासून चालना मिळणार आहे.

बससेवेचा अहवाल महिनाअखेर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात शहर बससेवा महापालिकेलाच चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खासगी ठेकेदाराच्या मदतीने बससेवा चालविण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विषयाला चालना दिली जात आहे. शहर बससेवेसंदर्भात महापालिकेने क्रिसील या संस्थेची कन्सल्टंट म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना महिनाअखेर अहवाल देण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्व हिरेंचा भाजपला अल्टिमेटम

$
0
0

उमेदवारीवर दावा; इतिहासाची पुनरावृत्ती, एक वर्तुळ पूर्ण

shailendra.tanpure@timesgroup.com

Tweet : shailendratMT

नाशिक : शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आगामी निवडणूक प्रचाराची नांदी करून एकप्रकारे भारतीय जनता पक्षालाच आव्हान दिले असले तरी आजोबांपासूनच चालत आलेल्या परंपरेचेच ते पालन करीत आहेत, असेच इतिहासात डोकावल्यावर दिसते.

शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर राजकारणाची हवा ओळखून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेल्या हिरेंची मुदत संपत असून, यापुढे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्याऐवजी नाशिक लोकसभा किंवा पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची हे त्यांनी त्यांच्यापुरते ठरवून टाकले असून, पक्षालाच त्यातून एकाची निवड करण्यास सांगितले आहे. हा एकप्रकारे पक्षशिस्तीचा भंग तर आहेच; पण त्यातून बंडाचाही वास येत असल्याने हिरे हे पक्षाला अंगावर घेण्यास तयार झाल्याचे दिसते आहे. यानिमित्ताने हिरे कुटुंबीयांच्या निवडणूक इतिहासाचीही पुनरावृत्ती होत आहे. आणीबाणीनंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत १९७८ साली अपूर्व हिरेंचे आजोबा दिवंगत व्यंकटराव हिरे यांनी चांदवड मतदारसंघात बंडखोरी केली होती. वास्तविक तत्पूर्वीच म्हणजे १९७२ सालीही त्यांच्याऐवजी डॉ. बळीराम हिरे यांना इंदिरा काँग्रेसने दाभाडी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात राहिलेल्या व्यंकटराव यांना हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी प्रारंभी गप्प राहणे पसंत केले. पण पुढील टर्ममध्ये मात्र बंडखोरी केली. पण चांदवडमध्ये त्यांना जनसंघाच्या फकीरराव डावखर यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. पुढे व्यंकटराव यांचे अपघाती निधन झाले व त्यांचा वारसा पत्नी पुष्पाताई यांनी चालविला. पुष्पाताई व डॉ. बळीराम हिरे ही भावजय-दीर लढत तेव्हा राज्यात गाजली. ताईंनी शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमधून उमेदवारी करीत तेव्हा इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व मातब्बर मंत्री असलेल्या डॉ. हिरे यांना पराभूत केले होते. मधल्या काळात ताईंचे सुपुत्र प्रशांत यांचीही महत्त्वाकांक्षा बळावली व त्यांनीही उमेदवारीवर दावा केला. घरातच संघर्ष होतोय असे दिसताच प्रशांत हिरेंनी भाऊसाहेब हिरे सेना ही स्वतंत्र संघटना काढून वेगळी चूल मांडली. त्या बॅनरखाली जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवून मोठे यशही मिळविले. पाठोपाठ शिवसेनेत प्रवेश केला. पण तेथे ते फार रमले नाहीत अन् पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत घरातील वादावरही पडदा टाकत त्यांनी विधानसभाही जिंकली. पुढे ते मंत्रीही झाले. पण नंतर शिवसेनेच्या दादा भुसे यांनी त्यांचा पराभव करीत हिरेंचे मालेगावातील साम्राज्य खालसा केले. या पराभवासाठी त्यांनी तेव्हा छगन भुजबळांना जबाबदार धरीत बरीच आरोपबाजी केली होती. पुढे त्यांनीही सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत अपूर्व व अद्वय या चिरंजीवांना पुढे चाल दिली. गेल्या निवडणुकीत अद्वय हे भाजपचे उमेदवार बनले खरे; पण नांदगाव मतदारसंघातून पराभूत झाले. बंधू अपूर्व यांनी मग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत प्रवेश केला. मोदींची चलती सुरू झाल्याने त्यांनीही मग भाजपमध्ये प्रवेश केला. पण आता ते भाजपलाही कंटाळलेले दिसत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी छगन भुजबळ समर्थकांच्या आंदोलनात सहभागी होत आपल्याच पक्षाविरोधी भूमिका घेतली तेव्हाच पुढील दिशा स्पष्ट झाली होती. इतिहासाची ही पुनरावत्ती होत असली तरी त्यामुळे नाशिकच्या राजकारणात लागलीच फार मोठे बदल घडतील अशी शक्यता मात्र नाहीच.

कोकाटे, हिरेंचे आव्हान!

अपूर्व हिरे यांना नाशिकमधून ज्या मतदारसंघातून उमेदवारी करायची आहे त्या नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे या विद्यमान आमदार असल्याने त्यांना डावलून या हिरेंना संधी मिळणे शक्य दिसत नाही. लोकसभेसाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाला खिंडीत गाठण्यासाठी अपूर्व हिरेंनी थेट प्रचाराचीच सुरुवात करण्याचा पवित्रा घेतलेला दिसतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या जगण्याला चालक-वाहकांचा अलविदा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

कळकटलेले जुने खाकी कपडे उतरवत त्यांनी तलम कापडाचा चकचकीत पोशाख परिधान केला. नवीन कापडाचा हवाहवासा वास नाकपुड्यांमध्ये साठविताना जुन्या जगण्यालाच त्यांनी जणू अलविदा केले. चिमुकल्यांना असावे तेवढेच अप्रूप आणि कुतूहलही नवीन कपडे अंगावर चढविताना एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांच्या चेहऱ्यावर होते. कित्येक वर्षांनंतर महामंडळाने दिलेले नववर्षाचे हे गिफ्ट कर्मचाऱ्यांना हळवे करून गेले.

महामंडळ देईल ती बस घेऊन सांगेल त्या मार्गावर कर्तव्य बजावण्यात चालक- वाहकांची जिंदगी व्यतित झाली. ना कोणती तक्रार ना कसला अट्टहास. केलीच तक्रार तरी ऐकते कोण? मळकटलेला अन् रोजच्या वापरामुळे जीर्ण झालेला खाकी पोशाख अंगावर चढवून कामावर हजर व्हायचे. ठरलेल्या वेळेत डबल बेल पडली की काम सुरू. हा दिनक्रम वर्षानुवर्षांचा. आता तर काहींची निवृत्त होण्याची वेळ आली. अगदी शेवटी शेवटी का असेना, राज्य मार्ग परिवहन महांमडळाने आपल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का दिला. महामंडळातील चालक- वाहकांसह सर्वच विभागातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचे गणवेश बदलण्यात आले असून, प्रातिनिधिक स्वरूपात नाशिकमध्येही १८ कर्मचारी, अधिकाऱ्यांना या गणवेशांचे शनिवारी वाटप करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या हस्ते नवाकोरा गणवेश स्वीकारताना या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पुरुष कर्मचाऱ्यांना केवळ शर्ट, पँटच नव्हे, तर बेल्ट, बूट आणि टोपीही या गणवेशासोबत देण्यात आल्याने हे कर्मचारी आता रुबाबदार दिसणार आहेत. विशेष म्हणजे, वर्षात दोन पोशाख मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

असा आहे नवा गणवेश

चालक- वाहकांचा गणवेश खाकी रंगाचाच असला तरी त्यावर सफेद रंगाच्या रिफ्लेक्टर पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. अंधारात या पट्ट्या चमकणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या गणवेशाची मदतच होणार आहे. महिला वाहकांनाही अबोली गणवेशासोबत कॉफी रंगाचे जॅकेट देण्यात आले आहे. यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना कॉफी रंगाचा गणवेश देण्यात आला असून, सहायक वाहतूक निरीक्षकांना खाकीच, परंतु पोपटी रंगाच्या जवळ जाणारा गणवेश प्रदान करण्यात आला. आज एकूण ९० जणांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, १८ गणवेश प्राप्त झाल्याने तेवढ्यांचेच वाटप करण्यात आले.

यांना गणवेशाचे व‌ितरण

जनार्दन देशमुख, टी. जी. आहेर, आर. बी. घुले, एल. एम. उदार, गिरीश घोलप, के. एस. घोलप, अभिषेक तागडे, राजेंद्र ठोंबरे, डी. जी. आहिरे, एस. एच. बर्वे, भास्कर बोडके, ए. बी. गोरे, एस. एस. शुक्ला, एम. ए. खैरनार, एस. एम. जाधव, आर. एस. मुठेकर, एन. एस. नागरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वेक्षणातच पाण्याचा अपव्यय

$
0
0

सांडपाण्याबाबत प्रबुद्धनगरवासीयांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता राखण्याबाबत नेहमीच आवाहन केले जाते. असे असतानादेखील रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. नाशिक शहराचा समावेश स्मार्टसिटीत झाला असल्याने स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. नुकतेच सातपूर भागात सभापती माधूरी बोलकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अचानक पाहणी दौरा घेतला.

सातपूर एमआयडीसीतील पहाणी दौऱ्यात चक्क सभापती बोलकर, नगरसेवक व अधिकाऱ्यांना पाण्याचा होणारा अपव्यय डोळ्यांनी दिसला. त्यातच पाहणी दौऱ्यात प्रबुद्धनगरवासीयांनी शौचालयाचे सांडपाणी सोडायचे कुठे, असा सवालच सभापती बोलकर व अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. जुन्या असलेल्या सांडपाण्याच्या लाइनी नेहमीच चोकअप होत असल्याने नवीन लाइनी टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला जाईल, असे सभापती बोलकर यांनी मटाशी बोलताना सांगितले.

सातपूरला सभापती बोलकर यांनी अचानक प्रभाग १० व ११ मध्ये पाहणी दौरा करताना एमआयडीसीतील प्रबुद्धनगर भागाचाही दौरा केला. या वेळी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानात शौचालय उभारण्यासाठी अनुदान दिले. परंतु, रहिवाशांनी शौचालये उभारली मात्र, त्याचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महापालिकेने या सांडपाण्याची योग्य विल्हेवाटाची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.

स्वच्छता राखण्याचे आदेश
या पाहणीदरम्यानच सभापती बोलकर, आरोग्य उपसभापती योगेश शेवरे, आरपीआय गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेविका पल्लवी पाटील, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांना प्रबुद्धनगरच्या दौऱ्यात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ आली. यांनतर सातपूर विभागात असलेल्या पाचही प्रभागात स्वच्छता राखण्याचे आदेश सभापती बोलकर यांनी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाशिक महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहाच्या आत नंबर येण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही बोलकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तचे वस्तुनिष्ठ आराखडे तयार करा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त शिवारांतर्गत होणाऱ्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्यानंतरच या कामांचे वस्तुनिष्ठ आराखडे तयार करावेत, अशा सूचना राज्याचे जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला केल्या.

जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डवले आले होते. जिल्ह्यात जलयुक्तच्या कामांची निवड करताना गाळ काढण्याच्या कामांसह नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे प्राधान्याने घ्या, अशी सूचना डवले यांनी केली. जुने बंधारे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यांची डागडुजी करून त्याद्वारे अधिकाधिक पाणी साठवणूक कशी करता येईल, याचा अभ्यास करून तशी कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.

सुरगाणा, पेठ व बागलाण यांसारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांऐवजी पाणी अडविण्याबरोबरच ते जमिनीत जिरवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. योजनेच्या निकषांत बदल करण्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात नाशिक पहिले

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २०१७ -१८ साठी २०१ गावांची निवड केली आहे. तेथे चार हजारांहून अधिक कामे केली जाणार असून, त्यासाठी ९८ कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत आराखड्यातील ७० टक्के कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अन्य कामे निविदाप्रक्रियेत असल्याची माहिती डवले यांनी दिली. या कामी राज्यात नाशिक पहिल्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

१२०० हेक्टरवरच फळबागा

राज्य सरकारने जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ५,२०० हेक्टरवर फळबागा लागवडीचे उद्द‌िष्ट दिले आहे. त्यासाठी नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, डिसेंबरअखेर केवळ १२०० हेक्टरवर लागवड झाली आहे. फळबागा लागवडीसाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, पावणेदोन महिन्यांत चार हजार हेक्टरवर लागवडीचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा पुलाला मुहूर्त कधी?

$
0
0

पुलाचे काम पूर्ण होऊनही नाशिक-पुणे महामार्गावरील पूल वापराविनाच

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गावर चेहेडी गावाजवळ दारणा नदीच्या पात्रातील पुलाचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झालेले असुनही हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने जुन्या पुलाचाच वापर सध्या सुरू आहे. हा जुना पूल अरुंद असल्याने दररोजच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. शिंदे गावाजवळील टोलनाकाही सुरू करण्यात आला आहे. या नूतनीकरणाच्या कामात चेहेडी गावाजवळील ब्रिटिशकालीन पुलालगत नवीन पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे काम पूर्ण झालेले असुनही तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी, जुना अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल अरूंद असल्याने वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे. या जुन्या पुलामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प होण्याचे नित्याचेच झालेले आहे.

वाहतुकीच्या खोळंब्यामुळे सिन्नर, संगमनेर, पुणे, नगर आणि शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या नव्या पुलाची एक बाजू दिवाळीपूर्वीच वाहतुकीसाठी खुली केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही या पुलाची एकही बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या पुलाचा मुहूर्त कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

ॲप्रोचरोडची कमतरता
चेहेडी गावाजवळ दारणा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या नवीन पुलास चेहेडी गावाकडील बाजुस ॲप्रोच रोडची कमतरता आहे.या ठिकाणी असलेल्या झाडांच्या अडथळ्यामुळे पुरेसा ॲप्रोचरोड तयार करता आलेला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. पुरेसा ॲप्रोच रोड नसल्याने वाहनांना अपघात होऊ शकतो.


वाहतूक कोंडीतून मुक्तता कधी?
चेहेडी गावाजवळील दारणा पात्रातील आर्च प्रकारातील ब्रिटिश काळातील पूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने या पुलामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीचा वारंवार खेळखंडोबा होत असतो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. या ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार, असा सवाल आता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे.

कोट००
दारणा नदीतील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असुनही हा पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. निदान जुन्या पुलाकडील एक बाजू तरी वाहतुकीसाठी खुली केली जावी जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

-संजय चव्हाण, प्रवासी

चेहेडी येथील नवीन पुलास चेहेडी गावाकडील बाजुस ॲप्रोचरोड कमी आहे. याठिकाणी असलेली झाडे तोडण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. हा मुद्दा न्यायालयात निकाली निघाल्यानंतर ॲप्रोचरोडला अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतरच हे काम पू्र्ण करता येणे शक्य आहे. त्यापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला करणे धोकादायक ठरू शकते.

-सी. आर. सोनवणे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवीदारांनी घाबरू नये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाने २०१६-१७ मध्ये केलेले विक्रमी कर्जवाटप व मार्च २०१७ मध्ये कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांनी कर्जफेड न केल्यामुळे बँक अडचणीतून जात आहे. मात्र, आता कर्जमाफीची रक्कम सरकारकडून मिळण्यास सुरुवात झाली आहे. बँकेनेही कर्जवसुलीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत होणार असून, ठेवीदारांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे प्रशासक मिलिंद भालेराव यांनी केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असून, सर्व ठेवी सुरक्षित आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी बँकेतून रक्कम काढू नये, असे आवाहन त्यांनी खातेदारांसह ठेवीदारांना केले आहे.

संचालकांच्या गैरकारभारामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, जिल्हा बँकेवर ३० डिसेंबरला प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. विभागीय सहनिबंधक व प्रशासक भालेराव यांनी पदभार घेतल्यानंतर या आठवड्यात कर्मचारी, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांचा तगादा वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर भालेराव यांनी ठेवीदारांना ठेवी न काढण्याचे आवाहन केले आहे. ठेवीदारांसाठी जाहीर केलेल्या निवेदनात बँकेचा आर्थिक लेखाजोखा मांडला असून, एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत ठेवीदार व खातेदार यांना आरटीजीएस व एनईएफटीद्वारे दिलेल्या रकमांचा तपशील दिला आहे. जिल्हा बँकेने एप्रिल २०१७ पासून ठेवीदारांच्या ५० कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषद व विविध योजनांचे २४३ कोटी रुपये दिले असून, जिल्हा परिषदेलाही त्यांच्या खात्यातून २६ कोटी रुपये परत केल्याचे भालेराव यांनी सांगितले. बँकेला मिळणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेतून आता हळूहळू सर्व शाखांमधील व्यवहार सुरळीत होत आहेत. पीक कर्ज व इतर कर्जांची वसुली करून बँक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे बँकेकडील सर्व ठेवी सुरक्षित आहेत. यामुळे ठेवीदारांनी गरजेपेक्षा अधिक रक्कम काढू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सभासद व ठेवीदारांच्या विश्‍वास व सहकार्यावरच बँकेची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणारे रोड बनला धोकादायक

$
0
0

गतिरोधक टाकण्याची रहिवाशांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरातील पर्यटकांचे आवडे ठिकाण असलेल्या कश्यपी धरणावर जाण्यासाठी गिरणारे रोडवरूनच जावे लागते. परंतु, वाढलेल्या वाहनांमुळे गिरणारे रोड धोकादायक बनला आहे. ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाला निवेदन देत गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे टोमॅटोचे सर्वाधिक मोठे मार्केट गिरणारे गावात भरत असते. त्यासाठी या रस्त्यावर सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. यात रस्त्यावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना या अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. याकरीता गिरणारे गावाच्या रोडवर गतिरोधक तत्काळ बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक शहरातील चाकरमाने सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात फेरफटका मारण्यासाठी जाणे पसंत करतात. यात त्र्यंबकेश्वर व गिरणारे रोडवर सर्वाधिक पर्यटकांची गर्दी पहायला मिळत असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून गिरणारे रोड धोकादायक बनला आहे. वाढलेल्या वाहनांमुळे पर्यटकांना आनंद घेण्यासाठी या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील अरूंद झालेला रस्त्यात वाढलेल्या वाहनांमुळे रोजच किरकोळ अपघात होत असतात. नेहमीच होणाऱ्या अपघातांवर आळा बसावा यासाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व पोलिसांना निवेदनही दिले होते. निवेदनात प्रशासनाने तत्काळ गिरणारे गावालगत गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी केली होती. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कोट००
या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात. यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. परंतु, याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने रोजच होणारे अपघात कधी थांबणार.
-दिलीप थेटे, माजी ग्रामपंचायत सदस्य, गिरणारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाप्रबंधक म्हणाले…देखेंगे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड आणि नांदगाव रेल्वे स्‍थानकाबाबत तसेच येथे विविध एक्स्प्रेसला थांबा मिळणेबाबत प्रवासी संघटनांनी दिलेले निवेदन स्वीकारून केवळ ठिक है…देखेंगे, असे कोरडे आश्वासन देवून मध्ये रेल्वेच्या महाप्रबंधकांनी रेल्वेप्रवाशांचा हिरमोड केला. मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या वार्षिक तपासासाठी ते सध्या आले आहेत. त्याअंतर्गत त्यांनी नांदगाव, मनमाडला शनिवारी भेट दिली. टी. के. शर्मा यांना मनमाड शहर भाजपच्या वतीने मनमाड येथील रेल्वे समस्या व मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भुसावळ रेल्वे समिती सदस्य कांतीलाल लुणावत यांनी महाव्यवस्थापकांशी मागण्यांबाबत चर्चा केली.

निवेदनामध्ये मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई रेल्वे, गोदान एक्स्प्रेसला मनमाड येथे थांबा मिळावा, मनमाडमध्ये असलेले रेल्वेचे वाहनतळ हे शहराच्या मध्यवर्ती भागात येत असल्याने आणि रेल्वे प्रवाशी व गावातील रहदारी यामुळे याठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. म्हणून आर. एम. एस. विभागाकडे नवीन वाहनतळ निर्माण करावे, नवीन प्रवाशी रेल्वे सुरू करण्यात यावी तसेच जालना-नगरसूल-शिर्डी ही डेमो गाडी सोमवार, मंगळवार व गुरुवार रोजी मनमाडमार्गे शिर्डीला जाते. हीच गाडी बुधवार, शुक्रवार, शनिवार नाशिक रोडपर्यंत नेण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

पुन्हा हिरमोड

नांदगाव, मनमाड रेल्वे स्थानकातील विविध समस्या तसेच अनेक सुरप फास्ट गाड्यांना येथे थांबा म‌िळावा यासाठी प्रवाशांसह विविध संघटना या दौऱ्याकडे आस लावून बसलेल्या होत्या. मात्र महाप्रबंधकांनी केवळ कागदी निवेदने स्वीकारत देखेंगे असे कोरडे आश्वासन दिल्यामुळे या दोनही स्‍थानकांचे प्रश्न पुन्हा एकदा कागदावरच राहणार असे चिन्ह दिसत आहे.

नांदगावला केली पाहणी

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी नांदगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. स्थानकातील रेल्वेच्या चालकांसाठी तयार केलेल्या रुमची त्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. या वेळी नांदगाव रेल्वे स्थानकात विविध सुविधा करण्यात याव्यात तसेच नांदगावमध्ये विदर्भ एक्स्प्रेससह महानगरीला थांबा मिळावा अशा मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार पांडे, दत्तराज छाजेड, सुमित सोनवणे, उमेश उगले, सुरेश दंडगव्हाळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास वर्ष साहित्य संघाचा कामगिरीचा दरवळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तापलेल्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतो, तसा सुगंध मालेगाव मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून ५० वर्षे दरवळत राहिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दाहकतेतून वैचारिक मरगळीने स्तब्ध सागरावर उठलेला मानवी मनाचा तरंग म्हणजे मालेगाव मराठी साहित्य संघाची कामगिरी आहे, असे प्रतीपादन कवी सदाशिव सूर्यवंशी यांनी काढले.

येथील मालेगाव मराठी साहित्य संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कवी संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. रमेश उचित यांनी प्रास्ताविक करतांना गत पन्नास वर्षांचा मागोवा घेतला. आगामी प्रकल्पाविषयी सांगतांना ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर राजेंद्र भोसले यांनी मालेगावच्या मराठी उर्दू, अहिराणी विषयी खुमासदार शैलीत वर्णन केले.

काव्य लेखन स्पर्धा

या निमित्ताने जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बालकवितेसाठी समृद्धी खैरनारला प्रथम पुरस्कार मिळाला, तृप्ती श्रावणला दुसरा, श्रुती भोईरला तिसरा पुरस्कार मिळाला. तसेच वयस्कर गटात सत्यजित पाटील यांना पहिला पुरस्कार मिळाला. मधुरा जोशी यांना दुसरा व प्रा. अरविंद भामरे यांना तिसरा पुरस्कार मिळाला. समाधान शिंपी व राजेंद्र सोमवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

यावेळी परीक्षण डॉ. विनोद गोरवाडकर, सुरेंद्र टिपरे व संतोष कांबळे यांनी केले. संघाचे कार्याध्यक्ष सतीश कलंत्री, नाना महाजन, डॉ. एस. के. पाटील, विलास सोनार, शिवाजी साळुंखे, टी. अहिरे, प्रा. भारती कापडणीस, भास्कर तिवारी, संजय पांडे, वैदेही भगिरथ यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय मल्हार’च्या जयघोषाने दुमदुमली चंदनपुरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील प्रतीजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंदनपुरी येथे श्री खंडेराय महाराजांच्या यात्रोत्सवला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांत यात्रोत्सावास दीड ते दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, रविवारी सुट्टी आणि खंडोबाचा वार असल्याने मोठी गर्दी होणार आहे.

जेजुरी येथील खंडेराय महाराजांच्या मंदिरातून मशाल ज्योत पेटवून आलेल्या मल्हार भक्तांचे स्वागत झाल्यानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी देवाच्या मुखवट्यांची मिरवणूक काढून यात्रोत्सवास मोठ्या थाटामाटात प्रारंभ झाला. आधीही प्रसिद्ध असलेले चंदनपुरी ‘जय मल्हार’ मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल्यामुळे येथील यात्रोत्सावास येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. यंदा देखील यात्रोत्सवासाठी ग्रामपंचायत चंदनपुरी, जय मल्हार ट्रस्ट यांच्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दर्शनासाठी बारी

दिवसेंदिवस भाविकाची गर्दी होत असल्याने गेल्या वर्षीपासून मंदिरप्रांगणात दर्शन बारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे दर्शन घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. तसेच भाविकांनाही वेळेत आणि रांगेत दर्शन घेणे सोपे झाले आहे.

५०० दुकानांची रेलचेल

जिल्ह्यातील सटाणा येथील यशवंतराव महाराज यात्रोत्सव समाप्ती नंतर लगेचच चंदनपुरी यात्रोत्सव सुरू होतो त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील लहानमोठे ५०० व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यासाठी ग्रामपंचायत व जय मल्हार ट्रस्टकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात प्रसाद, खेळणी, मनोरंजन, उपहारगृह, सौंदर्य प्रसाधने अशी विविध दुकाने थाटण्यात आली आहेत.

पार्किंगची सुविधा

यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना ट्रस्टकडून वाहन पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच मंदिरपरिसरात पिण्याचे पाणी, अग्निशामक यंत्रणा, रुग्णवाहिका, डॉक्टर पथक तैनात करण्यात आली आहे. यात्रोत्सवात खरेदीसाठी मोठी गर्दी असून, महिला वर्गाकडून भंडारा, कुंकू तसेच पूजेच्या साहित्यास विशेष मागणी आहे. खंडेराय महाराजांची माहिती सांगणारी सीडी, पुस्तके, फोटोंची देखील जोरदार विक्री सुरू आहे.

असा आहे फौजफाटा

२ पोल‌िस निरीक्षक

५ पोलिस उपनिरीक्षक

१०० पोलिस कर्मचारी

२० महिला कर्मचारी

१ वाहतूक शाखेचे अध‌िकारी

५ वाहतूक कर्मचारी

स्वयंसेवकही मदतीला

ट्रस्टकडूनही यात्रोत्सवासाठी १५ ते २० स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीस तैनात आहेत. यासह मंदिर गाभारा व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, दामिनी पथक, पोल‌िस सहायता कक्ष कार्यरत आहेत. यात्राकाळात जुगार, अवैध धंदे, पाकीट चोर यांचा बंदोबस्त करण्यासाठी गस्ती पथकही आहेत.

भेटीसाठी आले घरोघरचे देव

कसमादे परिसरासह राज्यभरातून भाविक आपल्या घरातील देव उजळण्यासाठी तसेच खंडेराय महाराजांची भेट घालून देण्यासाठी आणतात. यास ‘देव उजळावे’ असे म्हटले जाते. या देव भेटीच्या धार्मिक विधीसाठी देखील मोठी गर्दी होत आहे. परिसरात असलेल्या वाघ्या मुरळीकडून तळी भरून घेण्याचा विधी उत्साहात पार पडत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांकडून भंडारा व खोबऱ्याची उधळण केली जात आहे. अनेकांनी मानलेले नवस फेडण्यासाठी गर्दी केली असून भरीत-भाकरीचा नैवद्य दिला जात आहे.

महाराष्ट्र बंदचा फटका

यात्रोत्सव सुरू झाल्यानंतर लगेचच राज्यभरात कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद उमटले. महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. यामुळे सुरुवातीचे दोन दिवस भाविकांची संख्या रोडावली होती. बंद काळात तर यात्रोत्सवात शुकशुकाट पसरल्याने व्यावसायिक दुकानदार चिंतेत सापडले होते. मात्र शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आल्याने हळूहळू भाविकांची गर्दी वाढायला लागली. यात्रा पुन्हा गजबजली आहे. ‘जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला आहे.


यात्रोत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.-- सुरेश पारधी, पालिस निरीक्षक, किल्ला पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप मंडलाध्यक्षपदी जाधव, पाटील यांची वर्णी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरच्या सातपूर आणि सिडको मंडलाच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती रविवारी जाहीर करण्यात आली. महानगर अध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी या नावांची घोषणा केली.

सातपूर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत जाधव यांच्यावर तर सिडको मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या दोहोंकडे संघटन कौशल्य असून ते पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्या निवडीमुळे दोनही मंडलात भाजपाचे संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला. शशिकांत जाधव हे विद्यमान नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य आहेत तर बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक आहेत. सिडको आणि सातपूर परिसरात डॉ. अपूर्व आणि अद्वय हिरे यांचे प्राबल्य आहे. तर या परिसराचे विधानसभेतील नेतृत्व मात्र आमदार सीमा हिरे यांच्याकडे आहे. येथील शह-काटशहाचे राजकारण लक्षात घेऊन पक्षाने मंडलाध्यक्षपदावर अदलाबदल केल्याचे तर्क लावले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत गुरूकुल ग्रामीण भागात जाणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीत गुरूकुल ही अनोखी संकल्पना शहरी भागात रूजते आहेच; परंतु ग्रामीण भागात खरे टॅलेंट आहे त्यांच्यापर्यंत हे गुरूकुल जावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंजुषा पाटील यांनी सांगितले.

नाशिकमध्ये 'गुरुकुल' पद्धतीवर विद्यार्थी घडवण्याचा उद्देशाने बाबाज थिएटर्स, नाशिक व द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान, पुणे या दोन्ही संस्था एकत्र आल्या असून संगीत गुरूकुल सुरू करण्यात आले असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. पाटील म्हणाल्या, की वर्षभरात पाच सहा वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच संगीतात रस असणाऱ्या नव्या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे गुरूकुल प्रयत्न करणार आहे. शास्त्रीय संगीताचा दर्जा घसरू नये यासाठी आता पालकांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘रिअॅलिटी शो’मध्ये शास्त्रीय गायकच अधिक प्रमाणात परीक्षक म्हणून दिसतात या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील म्हणाल्या, की ‘रिअॅलिटी शो’ला विरोध नाही. परंतु, परीक्षकांचे म्हणणे आयोजकांनी लक्षात घेतले पाहिजे, त्याच्या मताला किंमत दिली पाहिजे.

गुरूकुलमध्ये शिकताना विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील दिग्गजांच मार्गदर्शन लाभण्यासाठी मान्यवरांची कार्यशाळा होणार आहे. संगीतप्रेमींसाठी वर्षातून किमान सहा वेळा, दोन महिन्यातून एकदा भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील मान्यवरांची मैफल होईल. तसेच पुण्याच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी, पिक अप अँड ड्रॉप सुविधेसह संगीत मैफिलींचे आयोजनही होणार आहे. नवीन वर्ष २०१८ च्या सुरुवातीला नुकतेच शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन ईशान म्युझिक अकॅडमी, बाबाज थिएटर्स व द.वि. काणेबुवा, पुणे या संस्थांनी एकत्र येऊन केले.

संगीतप्रेमी, विद्यार्थी व ज्येष्ठांनी गुरूकुलमध्ये अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा. नाशिक नगरीचा प्रवास मंत्रभूमी, तंत्रभूमी, मेडिकल हब असा प्रगतीच्या मार्गावर असतानाच संगीत क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण संकल्पनेला उत्स्फूर्तपणे मदतीचा हात द्यावा, नाशिक शहर व आजूबाजूच्या परिसरातील सर्व मोठ्या व्यावसायिकांनी सीएसआर अंतर्गत भरभरून सहाय्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे, मधुरा बेळे, एन. सी. देशपांडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धमाल स्ट्रीट’मध्ये मालेगावकर दंग

$
0
0

लायन्स क्लब ऑफ साउथच्या वतीने आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नववर्ष २०१८ चा पहिला रविवार मालेगावाकारांसाठी खास ठरला. निमित्त होते लायन्स क्लब साउथ आयोजित ‘धमाल स्ट्रीट २०१८’ या कार्यक्रमाचे. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आयोजित होणारा धमाल स्ट्रीटचा कार्यक्रम पहिल्यांदाच मालेगाव शहरात आयोजित करण्यात आला होता. यात लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत साऱ्यांनीच खरोखर धमाल केली. शहरातील कॉलेज रोडवरील धावपळीचे चित्र रविवारी (दि. ७) मात्र धमाल स्ट्रीटच्या आयोजनाने बदलून गेले होते.

धमाल स्ट्रीटच्या कार्यक्रमासाठी कॉलेज रोडवर भव्य असे ७ व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावर आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवण्याची संधी उपस्थितांना मिळाली. यात नृत्य, गायन, योगा, झुम्बा, फ्लॅशमॉब यांसारखे प्रकार तसेच टेनिस टेबल, सायकलिंग, स्केटिंग आदी खेळांचादेखील मनसोक्त आनंद मालेगावकरांना लुटता आला.

शहरातील विविध शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे लेझीम, ढोलताशा, स्काऊट फलकदेखील यात सहभागी झाले होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी गायकांसमवेत देशभक्तीपर गीताचा सूर धरला होता. लायन्स क्लब ऑफ मालेगाव साउथच्या वतीने नि:शुल्क याचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावकरांनी यात उत्साहाने सहभागी होत आपल्या प्रतिभेचा परिचय करून दिला. आगामी काळातदेखील असे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या धम्माल स्ट्रीटच्या आयोजनासाठी अध्यक्ष अमित जीजू, कल्पेश हेडा, कृष्णा झवर, अाशिष झंवर, स्मिता जाजू, सुनीता मुंदडा, मीनल शाह, कमलेश पोरवाल आदींसह क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.

मिसेस महाराष्ट्र राऊत ठरल्या आकर्षण

नाशिक येथील मिसेस महाराष्ट्र व मिसेस इंटेलिजेंट डॉ. सायली राऊत या धमाल स्ट्रीटचे खास आकर्षण ठरल्या. सायली राऊत यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यानंतर स्ट्रीटवर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर सायलीने डान्स केला त्यावेळी साऱ्यांनीच तिच्याबरोबर ठेका धरला होता. मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील गायक कलावंताना संधी मिळाली. यानिमित्ताने खास खाद्य पदार्थांचा आस्वाददेखील मालेगावकरांनी घेतला. दाबेली, मिसळ, डोसा, भेळ अशा अनेक पदार्थांचे फूड स्टॉल लावण्यात आले होते. या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images