Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सूप अँड सलाड वर्कशॉप शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सूप हे प्रत्येकाचे आवडते पेय असते. हिवाळा सुरू असल्याने सध्या तर सूप किचनकिंगच बनलेले आहे; मात्र गृ‌हिणीला सूप बनवता येत नसेल तर किंवा सुपाचे विविध प्रकार माहीत नसतील तर अडचण निर्माण होते. यासाठीच कल्चर क्लबतर्फे सभासदांसाठी सूप अँड सलाडचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ऑलिव्ह गार्डन रेस्टॉरंट, प्रमोद महाजन गार्डनच्या मागे, गंगापूर रोड येथे हे डेमो वर्कशॉप होईल.

नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. हिवाळा म्हटला की बाजारात भाज्यांची रेलचेल असते. मग घरच्या घरी सलाड किंवा सूप बनविले जाते; मात्र हॉटेलमध्ये जसे सूप किंवा सलाड मिळते तसे घरी बनविता येत नाही. यासाठीच मटा कल्चर क्लबतर्फे ही कार्यशाळा होणार असल्याने गृहिणींना त्याचा फायदा होणार आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे सलाड, त्याचप्रमाणे सूप आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जातात. या वर्कशॉपमध्ये मेक्सिकन सूप, हर्बल सूप असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप आणि जेली सलाड कसे बनवायचे ते शिकविले जाणार आहे. शेफ रेणू गरेवाल हे डेमो वर्कशॉप घेणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १००, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - (०२५३)-६६३७९८७, ७०४०७६२२५४. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांच्या पाहणीत स्वच्छतेची पोलखोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छता सर्वेक्षण मोह‌िमेला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच, महापौर रंजना भानसी यांनी अचानक केलेल्या पाहणीत शहरातील अस्वच्छतेची पोलखोल झाली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, दुभाजकांची माती रस्त्यावर, उद्यानांची बिकट अवस्था समोर आली. यामुळे स्वच्छता रँकिंगमध्ये नाशिकचा क्रमांक सुधारेल कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महापौर पंचवटीचा दौरा करणार याची माहिती असतानाही, तब्बल २३ सफाई कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने महापौरांचा संताप अनावर झाला. त्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना नोट‌िसा बजावण्याचे आदेश देत स्वच्छतेसाठी दोन दिवसांचा अल्ट‌िमेटम दिला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक गुरूवारी (दि. ४) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. या पथकाकडून शहरातील स्वच्छतेच्या उपाययोजनांची पाहणी केली जाणार असून, पालिकेच्या उपाययोजना आणि नागरिकांना दिलेल्या गुणांवर पालिकेचा स्वच्छतेतील क्रमांक ठरणार आहे. नागरिकांच्या प्रतिसादाअभावी गतवर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर घसरले होते. यंदा पहिल्या दहा शहरांत नाशिकचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने ‘स्वच्छ नाशिक’साठी आयुक्त अभिषेक कृष्णा आणि महापौर रंजना भानसी यांनी नियोजन सुरू केले आहे. यासाठी महापौर स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यानुसार महापौरांनी मंगळवारी पंचवटी विभागात ठिकठिकाणी अचानक भेटी देत स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली.

महापौरांच्या या पाहणी दौऱ्यातच अस्वच्छतेची पोलखोल झाली. महापौरांनी सकाळी ७ ते ९ दरम्यान केलेल्या पाहणीत म्हसरूळ येथील भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याचा कचरा रस्त्यावरच पडून होता. पंचवटीत ठिकठिकाणी रस्त्यावरच दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचलेले होते. पेठरोड, दिंडोरीरोडवर दुभाजकांमध्ये अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, कचरा, उखडलेले पेव्हर ब्लॉक, उद्यानांची तसेच सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दिसून आली. महापौरांनी पंचवटीतील निमाणी बसस्थानक, बाजार समिती यांच्या आवरांचीही पाहणी करत तेथील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. सोबतच विविध सफाई शेडच्या ठिकाणीही भेटी दिल्या. गोदाघाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडला दिलेल्या भेटीत ७, इंदिरा गांधी रुग्णालयालगतच्या हजेरी शेडवर ७, संजयनगर येथे २, तर फुलेनगर हजेरी शेड येथे ७ अशा प्रकारे २३ सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापौर संतप्त झाल्या. या कर्मचाऱ्यांना नोट‌िसा काढण्याचे आदेश त्यांनी दिले.

दोन दिवसांचा अल्ट‌िमेटम

अस्वच्छतेवरून महापौर भानसी यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना पाचारण करत, त्यांचीच कानउघडणी केली. आयुक्त कृष्णा यांनाही शहरातील अस्वच्छतेच्या वस्तुस्थितीची जाणीव फोनवर करून दिली. स्वच्छता सर्वेक्षण पथकाच्या आगमनासाठी जेमतेम दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील ही अनागोंदीची तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली. स्वच्छतेसाठी दोन दिवसांचा अल्ट‌िमेटम देत, गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वच्छतेच्या कामात कुचराई केली जाऊ नये, अशी सूचना महापौरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशात तणावपूर्ण शांतता

$
0
0

जळगावसह अमळनेरमध्ये बसवर दगडफेक; धुळ्यात बंद, भीमा कोरेगावच्या घटनेचे तीव्र पडसाद

टीम मटा, जळगाव

भीमा कोरेगाव आणि मराठवाड्यात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनांचे पडसाद मंगळवारी (दि. २) जळगावसह धुळे, रावेर, अमळनेर, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, यावललाही उमटले. जिल्ह्यातील अमळनेरला दुपारी बसचे काच फोडण्यात आले. तर धुळ्यातही एसटी बसेससह लक्झरीच्या काचा फोडण्याची घटना घडली. दुपारनंतर घटनास्थळी पोलिस कुमक दाखल झाल्याने परिस्थिती आटोक्यात आली. बसेस फोडल्याने याचा फटका प्रवाशांना बसला.

जळगाव ः भीमा कोरेगाव येथे विजयी शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यास गेलेल्यांवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना मारहाण झाल्याच्या घटनेचे पडसाद खान्देशात सर्वत्र उमटले. जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील पुलावर पंधरा ते वीस जणांकडून पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच शिव कॉलनी पुलासह लेंडी नाला पुलावर दगडफेक करीत बसच्या काचाही फोडण्यात आल्या. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन प्रवासी जखमी झाले.

चोपडा येथून दुपारी दीड वाजता निघालेली चोपडा-जळगाव (एमएच. १४, बी.टी. १८८५) ही बस धरणगावमार्गे दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात येत होती. त्यावेळी शहरातील शिव कॉलनी आणि लेंडी नाला पुलाजवळ १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी येऊन बसवर अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे बसच्या काचा फुटल्या. यापैकी एकाने बस चालकाच्या सीटवर पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालक जगतराव पाटील आणि वाहक वासुदेव कोळी यांनी तत्काळ माती टाकून आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. तर दुसर्‍या घटनेत लेंडी नाला पुलाजवळ जळगाव-भादली या बस (एमएच. १४, बी.टी. १६००) च्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी दोन्ही बाजूने काचा फोडल्या. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, शनी पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिस बंदोबस्तात ही बस भादलीपर्यंत नेली. सुदैवाने या दोघा घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हल्लेखोर पसार

जळगावातील शिव कॉलनी आणि लेंडी नाला पुलाजवळ बसवर झालेल्या दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून लगेच पसार झाले. पोलिसांनी हल्लेखोरांना शोधण्यासाठी आपला तपास सुरू केला आहे. या दोन्ही बसेसवर दगडफेक झाल्यामुळे पहिल्या बसमधील २५ आणि दुसर्‍या बसमधील ४० प्रवासी भयभित झाले होते. दरम्यान शिव कॉलनी पुलावर झालेल्या दगडफेकीत बसमधील प्रवासी धरणगाव येथील आयटीआयचा विद्यार्थी दिगंबर महाजन आणि किनगाव येथील सकुबाई नाना भील यांना दगड लागल्यामुळे ते जखमी झाले. भीमा कोरेगाव येथील विजयी क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी (दि. २) समता समाज मंडळातर्फे मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

गोलाणीत पळापळ

फुले मार्केटसह गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारी (दि. २) रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास अचानक पळापळ झाली. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी पाच मिनिटांत दुकाने बंद केली होती. डीवायएसपी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अफवांवर विश्वास ठेवू नका? असे आवाहन केले.

पाच बसेस फोडल्या

चाळीसगाव : शहरात काही समाजकंटकांनी मंगळवारी (दि. २) दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाच बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात बसेसच्या काचा फुटून चालकासह बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर पाचोरा येथे सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला.
पोलिस पथक हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना

शिव कॉलनी पुलावर झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर हल्लेखोर ज्या दिशेने पसार झाले, त्या दिशेने पोलिस पथकही शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनीही घटनास्थळी भेट देऊन बस नुकसानीची पाहणी केली. महामार्गावरील या दगडफेकीच्या घटनांमुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या. अखेर वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस वर्कशॉपमध्ये नेण्यात आली. शिव कॉलनी पुलावर दगडफेक व पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसांत तर लेंडी नाला पुलाजवळ बसच्या काचा फोडणार्‍या हल्लेखोरांविरुद्ध शनी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रावेरला बंद; जामनेरला बस जाळण्याचा प्रयत्न

रावेर : रावेर शहरात निळे निशान सामजिक संघटना, परिवर्तनवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नागरिकांना आवाहन करीत दुकाने बंद ठेवण्यात आले. यावललाही या घटनेचा निषेध नोंदवत तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. अमळनेर बसस्थानकात सोमवारी (दि. १) रात्री नऊ वाजेच्या सुमारास तीन बसेसच्या काचा फोडल्या. मंगळवारी (दि. २) दुपारी चार बसेसचे नुकसान करण्यात आले. जामनेर येथील नगरपालिका चौकात बसवर दगडफेक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. आंदोलकांनी नेरी-औरंगाबाद रस्त्यावर काहीकाळ रास्ता रोको केला.


धुळ्यात बसेसचे नुकसान; रास्ता रोको

धुळे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनांचे पडसाद धुळे शहरात सोमवारी रात्रीपासून उमटले. यात रात्री एसटीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले तर मंगळवारी (दि. २) देखील सकाळी दोन बसेसचे नुकसान करण्यात आले. या वेळी अज्ञात मोटार सायकलवरील जमावाने साक्री रोड परिसरासह मुख्य बाजारपेठ पाच कंदिल, फुलवाला चौक, नगावबारी परिसर, वाडीभोकर रोड याठिकाणी रास्ता रोको केला. सोबतच दगडफेक करून आरडाओरड करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुपारनंतर शाळांना सुटी देण्यात आली. दुपारी दोन वाजेनंतर शहरात परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्ह्यात पोलिस, एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरात मंगळवारी (दि. २) दुपारी बारावाजेनंतर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने धुळे आगरातून बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत एकही बस आगराच्या बाहेर पडली नाही. यामुळे आगारामध्ये बसांची रांग लागलेली होती तर प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानक फुल्ल झाले होते. मात्र दुपारनंतर टप्प्याटप्प्याने पोलिस बंदोबस्तात मार्गस्थ करण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने तत्काळ बंद करून घरचा रस्ता धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षारक्षकाचा टॉमीने ठेचून खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गालगत नगाव गावाजवळील शाम बिल्डमॉलमध्ये झोपलेल्या रामदास शिवराम पाटील (वय ६८, रा. नगाव ता. धुळे) या सुरक्षारक्षकाचा दरोडेखोरांनी लोखंडी टॉमीने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १) मध्यरात्री घडली. या वेळी दरोडेखोरांनी लाखों रुपयांच्या टाइल्सच्या २०० पेट्या एका मालवाहू ट्रकमध्ये भरून लंपास केल्या. हा प्रकार मंगळवारी (दि. २) सकाळी लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान पश्चिम पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सरिता भांड व पथकाने तत्काळ घटनास्थळी पाहणी करीत पंचनामा केला. सुरक्षारक्षकाचा मृतदेह तपासणीसाठी शासकीय हिरे वैद्यकीय कॉलेजला पाठविण्यात आला. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दीड हजार पोलिस तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद शहरातही उमटले असून, सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. या वेळी आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मंगळवारी सायंकाळी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बंदोबस्ताबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की पोलिस प्रशासन संपूर्णपणे सतर्क झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन, सातपूर दोन, सिडको १, तर वडाळा नाका परिसरात १ अशा सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर शहरात दहशत पसरवणाऱ्या २० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळपासून शहरात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे शहरातील गंजमाळ, अंबड, परिसरात किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे होमगार्ड व एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्ल्या जात आहेत.

नाशिकरोडला परिस्थिती नियंत्रणात

नाशिकरोड ः पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दोन गटांत झालेल्या तणावाचे पडसाद मंगळवारी नाशिकरोडमध्येही उमटले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. जेलरोडच्या दसक भागात समाजकंटकांनी दोन बसवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, तातडीने पोलिस कुमक आल्याने वातावरण निवळले.
पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन यांनी सहकाऱ्यांसह कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बंदोबस्तासाठी एसआरपीएफ, होमगार्डसची मदत घेण्यात आली आहे. शांतता कमिटीची बैठकही घेण्यात येत आहे.
जेलरोडचे भीमनगर, देवळाली गाव, बिटको चौक, दसक, पंचक, राजवाडा या भागात सोमवारी रात्रीपासून तणावसदृश परिस्थिती होती. आंबेडकर पुतळा परिसरात काही दुकानदारांनी खबरदारी म्हणून सकाळी दुकाने बंद ठेवली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिटको चौक, सुभाषरोड, दसक, जेलरोड, भीमनगर, गोरेवाडी, देवळाली गाव, विहितगाव या संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महसूल अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांना निवेदन दिले. भीमा कोरेगाव येथील घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, सुनील वाघ, पवन पवार, दिलीप दासवानी, भारत निकम, रामबाबा पठारे, नारायण गायकवाड, फकीरा जगताप, विलास पवार, गुंफाताई भदरंगे, सुरेखा भंडारे, अनिल गांगुर्डे, गोटीराम पवार, सुनील यशवंत, दिनेश जाधव, किशोर खडताळे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. कोरेगाव येथे समाजकंटकांनी दगडफेक करीत वाहनांचे नुकसान केले.

बंदचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात तीन जानेवारी रोजी बंदची हाक दिली असून, यात सहभागी होण्याचे आवाहन प्रकाश बागूल व शशिकांत उन्हवणे यांनी केले आहे. निवेदनावर सागर जाधव, रवींद्र मोकळ, हरीश भडांगे, नंदकिशोर बागूल, आकाश भालेराव, संजय भालेराव, रवींद्र जाधव, विशाल घेगडमल, प्रतिभा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदार हायकोर्टात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडको आणि पंचवटीतील घंटागाडीचा वादग्रस्त ठेकेदार जी. टी. पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याची नोटीस महापालिकेने ठेकेदाराला बजावली आहे. त्यामुळे ठेकेदाराने या नोटिशीविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली असून, महापालिकेने केलेला दंड चुकीचा असल्याचा दावा केला आहे.

हायकोर्टाने याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, ठेकेदाराने थेट हायकोर्टात धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, यात आरोग्य विभागाची भूमिकाही संशयास्पद असल्याची चर्चा आहे. दंड योग्यच असून, त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

जी. टी. पेस्ट कंट्रोल कंपनीने पंचवटी आणि सिडको विभागाच्या घंटागाडीचा ठेका घेतला आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाबाबत तक्रारी असून, अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे, तसेच संबंधित ठेकेदाराला पावणेदोन कोटींचा दंड ठोठावला आहे. त्याला अनियमिततेप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. नगरसेवकांच्या तक्रारींनंतर आरोग्य विभागाने आता थेट ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात ठेकेदाराने हायकोर्टात धाव घेतली असून, महापालिकेची कारवाई चुकीची ठरविली आहे. हायकोर्टाने यााबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

--

दंड वसुलीचा विश्वास

संबंधित ठेेकेदाराने हायकोर्टात धाव घेतल्याने आता हा वाद लांबणार असून, आरोग्य विभागाची भूमिका याबाबत संशयास्पद असल्याची चर्चा आहे. परंतु, आयुक्त कृष्णा यांनी सदर दंड योग्य ठरवत ठेकेदाराने त्याबाबत यापूर्वी आक्षेप घेतला नसल्याचा दावा केला आहे, तसेच दंड वसूल केला जाणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला बंद, मालेगावात मोर्चा

$
0
0

टीम मटा

भीमा कोरेगाव येथे विजयी शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यास गेलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करून त्यांना मारहाण झाल्याच्या घटनेचे मंगळवारी जिल्हाभरात पडसाद उमटले.

मनमाड बंद

मंगळवारी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाने मनमाड बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. मनमाड बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा रिपाइं नेत्यांनी केला. बंद दरम्यान किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील दुकाने तसेच टॅक्सी सेवा बंद असल्याने नागरिकांसह प्रवाशांचे हाल झाले. रिपाइंचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे, दिलीप नरवडे, विलास आहिरे, कैलास आहिरे आदींच्या उपस्थितीत सकाळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. सार्वजनिक ठिकाणी फलक लावून भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यात आला.

शिवसेनेचे पदाधिकारी मयूर बोरसे यांनी रिपाइंच्या बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले. स्वाभिमानी पक्षानेही बंदला पाठिंबा दिला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी या घटनेचा पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला. शिवसेना, रिपाइं नेत्यांनी या घटनेतील आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. बंद दरम्यान मनमाड-चांदवड रस्त्यावर टायर जाळण्यात आले. दुपारनंतर बंद मागे घेण्यात आला.

मालेगावात निषेध

मालेगावात दलित बांधवांनी निषेध मोर्चा काढला. शहरातील एकात्मता चौकापासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. राकेश देवरे, भारत म्हसदे, सुरेश बागुल, नितीन झलटे यां मोर्चात सहभागी झाले होते.

सटाण्यात निवेदन

बागलाण तालुका रिपब्लिकन पार्टी ऑप इंडिया, आर. पी. आय युवक शहर शाखा व भिम सैनिकांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. बागलाणचे नायब तहसीलदार विनोद चव्हाण यांना निवदेन देण्यात आले. समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आरपीआयचे प्रांतिक सदस्य व कृउबाचे संचालक दिलीप सोनवणे, शहरध्यक्ष भारत बच्छाव, अरुणा बच्छाव, राजेंद्र सरदार आदी उपस्थित होते.

पिंपळगाव बंदची हाक

पिंपळगाव बसवंत ः येथील बौद्ध बांधवांच्या वतीने पोल‌सि प्रशासनास निवेदन देण्यात आले. शुक्रवारी (दि.५) पिंपळगाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आहे आहे.

वणी बंदला प्रतिसाद

दिंडोरी : वणीत अचानक पुकारलेल्या बंदला समिश्र प्रदिसादात मिळाला. मंगळवारी सकाळी शहरात मोर्चा काढण्यात आला. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मोर्चाच्या वेळी शहरातील दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आले. बंदमुळे अनेक दुकानदारांची धांदल उडाली. बाजाराचा दिवस असल्याने अनेकांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थक रस्त्यावर

$
0
0


टीम मटा

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना ‘ईडी’ न्यायालयाकडून जामीन मिळत नसल्याने मंगळवारी जिल्हाभरात भुजबळ समर्थकांकडून निदर्शने करण्यात आली. भुजबळांची सुटका करा, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.
येवल्यात तीन तास ठिय्या

येवल्यात भुजबळ समर्थकांकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वपक्षीय भुजबळ समर्थक हजारोंच्या संख्येने येवला तहसील कार्यालयावर धडकले. त्यांनी तहसीलबाहेर तीन तास ठिय्या दिला. येवला मतदार संघाच्या विकासात छगन भुजबळ यांचे मोठे योगदान असून भुजबळांचा बुलंद आवाज दाबण्यासाठीच भाजपा सरकारने डाव रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सकाळी साडेदहापासूनच समर्थक जमा झाले होते. या आंदोलनात तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं, शेतकरी संघटना आदी पक्षातील भुजबळ समर्थक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेना व भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनीही या आंदोलकांना भेट दिली. आंदोलकांनी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांना निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे, भारती पवार, शिवसेनेचे जयदत्त होळकर, साहेबराव मढवई यांनी भुजबळांच्या सुटकेची मागणी केली. या आंदोलनात अंबादास बनकर, डॉ. विकास चांदर, मायावती पगारे, प्रकाश वाघ, साहेबराव मढवई, अकबर शेख, भागवत सोनवणे, हरिभाऊ जगताप, राधाकिसन सोनवणे, उषाताई शिंदे, संतु पा. झांबरे, बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी आदींसह भुजबळ समर्थक सहभागी झाले. येवल्याचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर व नगरसेवक गणेश शिंदे यांनी पक्षीय मतभेदाचे जोडे बाजूला ठेवत आंदोलनस्थळी काही वेळ

हजेरी लावली.

निफाडला धरणे आंदोलन

निफाड येथे तहसील कार्यालयाबाहेर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार दिलीप बनकर, निफाड पंचायत समितीचे समितीचे सभापती पंडित आहेर, निफाडचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर, जि. प. सदस्य यतीन कदम, अनिल कुंदे, सुधीर कराड, शिवाजी ढेपले आदी उपस्थित होते. भुजबळ समर्थकांकडून जोरदार निदर्शने

करण्यात आली. तसेच भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून निफाडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील भुजबळ समर्थक उपस्थ‌ति होते.

कळवणमध्ये निवेदन

छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी व त्यांची सुटका करावी या मागणीचे निवेदन कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रवींद्र देवरे, कौतिक पगार, शशिकांत बागुल, पांडुरंग पाटील, युवक काँग्रेसचे प्रवीण रौदळ, सागर खैरनार यांनी कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयाच्या आवाराबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी भुजबळांच्या सुटकेसाठी निवेदन देण्यात आले.

देवळ्यात अटकेचा निषेध

कळवण ः छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची तुरुंगातून सुटका न झाल्यास भुजबळ यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांनी दिला.

भुजबळ समर्थकांच्या वतीने देवळ्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडित निकम, सुनील आहेर, उदय आहेर, आबासाहेब खैरनार, दिलीप सोनवणे सहभागी झाले होते. यावेळी भुजबळांसह समीर यांच्यावरील कारवाईचा निषेध

करण्यात आला. तसेच भुजबळांना लवकर सोडले नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिरणा-मोसम संगमावर सोनेरी उधळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

‘सदानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार येळकोट…हर हर महादेव, चिंतामण मोरया…भैरोबाचा चांदोबा…अगडबंब नगारा…सोन्याची जेजुरी…मोत्याचा तुरा…निळा घोडा…पायी तोडा…अशी तळी भरत अन् येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात चंदनपुरीतील यात्रोत्सवात सुरुवात झाली. खंडोबाच्या जयजयकाराने श्री क्षेत्र चंदनपुरी मंगळवारी दणाणले होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तळी भरून महापूजा करण्यात आली. पुढील पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे.

श्री क्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सावास उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी तरुण व मल्हारभक्त यांनी जेजुरी येथील खंडोबा मंदिरातून प्रज्ज्वलित केलेली मशाल ज्योत दाखल झाली होती. दादा भुसे यांच्या हस्ते या मशाल ज्योतीचे स्वागत करण्यात होते. मंगळवारी सकाळी देवाच्या मुखवट्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भंडारा उधळीत खंडेरायाचा जयजयकार करीत हजारो भक्त सहभागी झाले होते.

मंदिर गाभाऱ्यात हे मुखवटे देवावर चढविण्यात आले. यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक महापूजा केली.

भंडारा खोबरे उधळून कोटम व तळी भरत वाघ्या-मुरळी यांनी गोंधळ घातला. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. यावेळी सरपंच योगिता अहिरे, ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील, राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील, विनोद शेलार, राजू अहिरे, संजय पवार, समाधान उशिरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पार्किंगचा उडाला फज्जा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकणारी ‘नियमांची ऐशीतैशी’ ही मालिका महाराष्ट्र टाइम्सने गेल्यावर्षी प्रसिद्ध केली होती. यात शहरातील शिवाजी पुतळा ते जुने बसस्थानकदरम्यान होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या मांडण्यात आली होती. एक वर्ष उलटून देखील या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे आहे.

शहरातील नवीन व जुने बसस्थानक यांना जोडणारे वाहतूक बेट म्हणजे शिवाजी पुतळा परिसर. या वाहतूक बेटापासून ते थेट जुन्या बसस्थानकादरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. शहरातील अनेक मोबाइल, इलेक्ट्रिकल दुकाने, व्यापारी संकुल, गो-शाळा याच रस्त्यावर आहेत. व्यापारी संकुलांना पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनचालक आजही रस्त्यावर वाहने लावतात. ही वाहने लावताना किमान शिस्तीत लावण्याचे देखील सौजन्य काही वाहनचालक दाखवत नसल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बसेस येथे अडकतात. आजही वाहतूक कोंडीचे हे चित्र कायम आहे.

या रस्त्यावर शिवाजी पुतळा येथे वाहतूक नियंत्रण पोल‌सि चौकी आहे. पुढेच शहर पोल‌सि ठाणे व अपर पोल‌सि अधीक्षक यांचे कार्यालय आहे. असे असताना देखील पोल‌सि प्रशासनाकडून येथील वाहतूक कोंडीबाबत अद्याप ठोस उपाययोजना का केली जात नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस ठप्प; प्रवाशांची पायपीट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र बंदमुळे शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी सिटी बस सेवा बुधवारी ठप्प होती. सर्व सिटी बस पंचवटी डेपोमध्ये उभ्या करण्यात आल्या. नाशिकरोड व निमाणी बस स्थानकही ओस पडले. शहरातील बससेवेच्या सकाळी ४५ फेऱ्या झाल्या. मात्र, नंतर सेवाही बंद झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

बहुतांश कॉलेज व शाळ बंद असल्याने सिटी बसचा विद्यार्थ्यांना फटका बसला नाही. सिटी बससेवेचा रोज सुमारे एक लाख प्रवासी लाभ घेतात. शहरात अनेक मार्ग बंद केले असले तरी रोज १३० ते १४० बस धावतात. या सर्व बस बुधवारी दिवसभर बंदच ठेवण्यात आल्या. नाशिकरोड व सीबीएसपर्यंत मोठ्या प्रमाणात बस असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फायदा होतो. पण, या बस बंद असल्याने रेल्वेने नाशिकरोडला आलेल्या प्रवाशांना शहरात पोचण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांचे हाल झाले. सिटी बसमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये चाकरमान्यांचीही संख्या मोठी आहे. पण, बंदमुळे बहुतांश ठिकाणी सुटी देण्यात आल्याने शहरात प्रवास करणाऱ्यांची गर्दी कमी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे हाल; प्रवाशी बेहाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदमुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प झाली. दोन दिवसात १३ बसला लक्ष्य करत काचा फोडण्यात आल्यामुळे एसटीचे २ लाख २० हजारांचे नुकसान झाले. शहरासह जिल्ह्यातील १३ आगारात स्थानकात बस उभ्या कराव्या लागल्याने राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे १ कोटीचे उत्पन्न बुडाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले.

कोरेगाव भीमा घटनेनंतर मंगळवारी अनेक ठिकाणच्या बस रद्द करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी बससेवा तुरळक प्रमाणात सुरू होती. पण, सकाळी नऊ वाजेनंतर सर्वच सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे स्थानकांमध्ये बस उभ्या करण्यात आल्या. ठक्कर बाजार स्थानक रिकाम्या बसने भरून गेले. पंचवटी डेपो, मुंबई नाका येथील महामार्ग आणि नाशिकरोड बससह निमाणी स्थानकातह अशीच स्थिती दिसून आली. बससेवा बंद असल्याने प्रवासी गोंधळून गेले. त्यांनी माहिती मिळविण्यासाठी चौकशी कक्षात गर्दी केली. पोलिसांच्या पुढील आदेशानंतर ही सेवा सुरू केली जाणार असल्याचा फलक लिहिण्यात आला. थोड्या काळात पुन्हा बससेवा सुरू होईल या आशेवर अनेक प्रवासी बस स्टॅण्डवरच थांबले.

जळगावच्या बस लक्ष्य
जिल्ह्यात एक हजाराहून अधिक बस रोज ३ लाख ७ हजार किलोमीटर धावतात. मंगळवारी ३३ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या तर बुधवारचा आकडा अधिक मोठा होता. मंगळवारी ११ बसच्या तर बुधवारी दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. यात जळगावकडून येणाऱ्या बसला नाशिक येथे लक्ष्य करण्यात आले. तर एका बसच्या काचा लासलगाव येथे फोडण्यात आल्या.

आरक्षणही रद्द
बाहेरगावाला जाण्यासाठी अगोदरच आरक्षण केलेल्या तिकिटाचा परतावा मिळावा यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या बस केव्हा सुरू होणार याचा अंदाज नसल्याने अधिकारी अधिक माहिती सांगू शकत नव्हते. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. यात खासगी सेवाही बंद असल्याने प्रवाशांपुढे अन्य पर्यायही नव्हता. त्यांनी आरक्षण रद्द केले.

परदेशी पाहुणे अडचणीत
परदेशातून आलेल्या एका पर्यटकाला नाशिकहून औरंगाबादला जायचे होते. पण, बस बंदमुळे त्याला फटका बसला. बस केव्हा सुरू होणार, का बंद आहे, असे एक ना अनेक प्रश्न तो विचारत होता. त्याला काही प्रवाशांनी परीस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर त्याने रेल्वेचा पर्याय विचारला. पण नाशिकरोडला जाण्यासाठीही रिक्षा बंद असल्याचे समजल्यानंतर त्याने पुन्हा नाशिकला मुक्काम ठोकला.

ड्रायव्हर, कंटक्टरचा आराम
बस बंद आल्याने ड्रायव्हर, कंटक्टर यांना बाहेर पडता आले नाही. यातील काही जणांनी बसआगाराच्या छतावर आराम केला. काहींचे बसच्या टपावर बसून गप्पांचे फड रंगले. काही कर्मचाऱ्यांनी बसमध्ये झोप मारत आपला थकवा दूर केला.

शिवशाहीची चाके थांबली
सिन्नर फाटा : महाराष्ट्र बंदमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने शहरी व ग्रामीणसह नाशिक-पुणे मार्गावरील ३५ शिवशाही बसच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या. यामुळे शिवशाहीने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ग्रामीणच्या ३३० फेऱ्यांपैकी अवघ्या १४ फेऱ्या झाल्या. ग्रामीणच्या तब्बल ३१६ फेऱ्या रद्द झाल्याने सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, कोपरगाव, पुणे, सोलापूर, बीड, तुळजापूर, भोर, पाथर्डी या भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसचा पर्याय मिळू शकला नाही. ग्रामीणच्या ज्या बस रात्रीच मुक्कामी आलेल्या होत्या, त्या सकाळी नेहमीप्रमाणे रवाना झाल्या. परंतु, पुढे गेल्यावर या बसेसही थांबविण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनने अनुभवला आंदोलनाचा थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बंदचे पडसाद संवेदनशील नाशिकरोडला उमटले. नाशिकरोड रेल्वेस्टेशन व बसस्थानक परिसरात दुपारी चार वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून रेल्वेस्टेशनमध्ये घुसखोरी केली. रेल्वेचे सुरक्षा कर्मचारीही गांगरून गेले. आंदोलक रेल्वेगाडीकडे चाल करून गेल्यावर रेल्वे सुरक्षा बलाने लाठीमार करत सर्वांना पिटाळून लावले. त्यामुळे तोडफोडसारखी घटना घडली नाही.

नाशिकरोडच्या आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी दोनला आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत मोर्चा काढला. बिटको चौकात आल्यावर तेथे रास्ता रोकोचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर मोर्चा मुक्तीधाम, सुभाष रोडमार्गे पुन्हा आंबेडकर पुतळ्याजवळ आला. तेथे घोषणाबाजी झाली. थोड्यावेळाने द्वारकेहून मोटरसायकल रॅली आल्याने आंदोलकांची ताकद वाढली. आंदोलकांनी रेल्वे स्टेशनकडे मोर्चा वळवला. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन यांनी आंदोलकांना रोखले. त्यांच्या मदतीला कमांडो, दंगा नियंत्रक दल तसेच पोलिस होते. तथापी, जमावाचा रेटा वाढतच गेला. पोलिसांना बाजूला करून आंदोलक रेल्वे स्टेशनकडे पळत सुटल्याने प्रवाशी घाबरले. तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण व जवान होते. त्यांना न जुमानता आंदोलक प्लॅटफॉमपर्यंत पोचले. प्रवासी रेल्वेकडे त्यांनी मोर्चा वळवला. रेल रोकोसाठी ते घोषणा देत निघाले. मात्र, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीमार केल्याने आंदोलक पळून गेले. मुंबई, ठाण्यात आंदोलकांनी रेल्वेचे नुकसान केले होते. नाशिकरोडला वेळीच कारवाई केल्याने अनर्थ टळला. आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर आंदोलकांना शांततेत जाण्याचे आवाहन करण्यात आले.

रेल्वेला गर्दी कमी
रेल्वे सेवा नियमित सुरू असली तरी खबरदारी म्हणून अनेकांनी रेल्वे प्रवास टाळला. नाशिक-पुणे, पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेसबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही गर्दी कमी होती. पंचवटी एक्स्प्रेसमधील नोकरदार व व्यापारी प्रवाशांनी सुट्टी घेतली होती. पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम केला. नाशिकरोड आगारातील पन्नास टक्के बस रद्द करण्यात आल्याचे आगरप्रमुखांनी सांगितले. सातपूर, एकलहरा, जेलरोड आदी ठिकाणी जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून काही बस नाशिकरोडला आल्या नाहीत. अनेकांना रिक्षाने प्रवास करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दस्तगीर बाबांचा संदल देवळालीत उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

‘जय हो बाबा की’, ‘या गौस अल मदत’ अशा घोषणांनी ढोलताशांच्या गजरात विविध ढोल पथकांनी वाजतगाजत काढलेल्या लामरोडवरील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिराने पीर हजरत दस्तगीर बाबा दरगाह यांचा संदल उत्साहात साजरा करण्यात आला.

शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित या संदल अर्थात उरुसात देशभरातील सुमारे ५ ते ६ हजार भाविकांनी हजेरी लावली. या निमित्ताने नाशिक परिसरातील फकिरांनी गायलेल्या कव्वाली ऐकत भाविकांनी ढोल पथकांच्या तालावर ठेका धरीत उरुसाचा आनंद साजरा केला. सायंकाळी ७ वाजता मुख्य पूजेला आरंभ झाल्यानंतर हजरत दस्तगीर बाबा सेवा समितीचे प्रमुख विजयबाबा उमापा यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली.

मुख्य पूजेचे मानकरी असलेले ज्ञानेश्वर गोडसे यांच्या घरातून वाजतगाजत रामदासबाबा धोंगडे, शेख बाबा, अभय उमापा, प्रदीप पाटील, दत्तात्रय तौर, अशोक ताजणे, शिवा शिंदे आदींनी सहभाग घेतला. पहाटे दस्तगीर बाबा यांची गुस्सल कार्यक्रम पार पडला. तर आदल्या दिवशी भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या सदस्यांनी भजन सादर केले. लामरोड युवक मित्र मंडळ, शिवनेरी स्पोर्ट्स क्लब तसेच स्थानिक नागरिकांनी प्रसाद वाटपास सहकार्य केले. परिसरात खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक उन्नतीबरोबरच शाश्वत विकास

$
0
0

नाशिकः देशाची आर्थिक उन्नती साधण्याबरोबरच शाश्वत विकासाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडॉर (डीएमआयसी) मोलाचा ठरणार आहे. देशातील अन्य कॉरिडॉरही एकमेकाला जोडले जाणार असून, याद्वारे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या याचा विचार करतानाच इंजिनीअरिंग व अन्य पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या संकल्पनेला प्रारंभ झाला. थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. एका दशकांच्या प्रयत्नांनंतर कॉरिडॉरचे काहीसे मूर्त रूप दिसण्यास प्रारंभ झाला आहे. या महाकाय प्रकल्पाला देशातील अन्य प्रकल्प जोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने नॅशनल इंडस्ट्र‌िअल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्टची (एनआयसीडीआयटी) स्थापना केली आहे. याअंतर्गत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, चेन्नई-बंगळुरू इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, अमृतसर-कोलकाता इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, बंगळुरू-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर आणि विझाग-चेन्नई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर यांच्या विकासाचे धोरण आखण्यात आले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने डीएमआयसीमध्ये जवळपास ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. तर, २०१७-१८ या वर्षात तब्बल १०३१.७९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीमधून कॉरिडॉरअंतर्गत अत्याधुनिक औद्योगिक शहरे विकसित केली जात आहेत. कॉरिडॉरचा पहिला टप्पा २०१९च्या मध्यावधीत पूर्ण होणार असून, येथे या वर्षाअखेरच गुंतवणूक सुरू होईल, असा विश्वास कॉरिडॉर विकास प्राधिकरणाला आहे. देशातील विविध कॉरिडॉरद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी गती देण्यात येणार असून, हा विकासही शाश्वत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यास प्राधिकरणाचे एमडी आणि सीईओ आल्केश कुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.

आयात कमी होणार

कॉरिडॉरमधील औद्योगिक शहरांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना आमंत्रण दिले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक येण्यासह अनेक नामांकित उत्पादनांची निर्मिती येथे होण्याची आशा प्राधिकरणाला आहे. सद्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल आणि अन्य उद्योगांतही मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. विविध सुटे भाग मागवून भारतात केवळ त्याची जोडणी केली जाते. मात्र, कॉरिडॉरमध्ये प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेलाच प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत. याद्वारे भारतात होणारी विविध बाबींची आयात कमी होऊन भारतातील उत्पादने परदेशात निर्यात होण्याची संकल्पना साकार होणार आहे.

पर्यावरणविषयक परवानग्या

डीएमआयसीमध्ये विविध औद्योगिक शहरे विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पर्यावरण परवानग्या घेण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. औद्योगिक विकास करताना पर्यावरणाची हेळसांड केली जाते किंवा नुकसान होते, हा भ्रम असून शाश्वक विकासाचे योग्य मॉडेल कॉरिडॉरद्वारे सगळ्यांना दिसेल, असा विश्वास डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्यपरिषदेची निवडणूक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचा कार्यकाल यंदा संपणार असून २०१८ ते २०१३ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी नुकताच जाहीर केला.

मतदानास पात्र असलेल्या सभासदांची सुधारित यादी, जिल्हावार प्रतिनिधींची संख्या व जिल्हावार निवडणूक अधिकाऱ्यांची नावे त्या-त्या जिल्हा शाखेने ९ जानेवारीपर्यंत जाहीर करावीत, असे याद्वारे कळविण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी ९ ते १८ जानेवारी ही मुदत देण्यात आली असून, ते मध्यवर्ती कार्यालयातच भरावेत असे सांगण्यात आले आहे. आलेल्या अर्जांची छाननी १९ जानेवारी रोजी होणार असून २२ जानेवारी रोजी पात्र उमेदवारांची यादी मध्यवर्ती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. अंत‌िम यादी २७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाखांच्या सभासदांसाठी मतदान केंद्राचे ठिकाण संबंधीत शाखेत तसेच नाट्य परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्याची अंत‌िम तारीख ३१ जानेवारी देण्यात आली आहे. मतदान ४ मार्च रोजी होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर होणार आहे. ज्यांना निवडणुकीबाबत लेखी तक्रार करायची असेल, त्यांच्यासाठी २० मार्च ही मुदत देण्यात आली आहे. या लेखी तक्रारींचा निर्णय २५ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये १२०० मतदार

नाशिकमध्ये नाट्य परिषदेचे १ हजार २०० सभासद आहेत. या सर्वांना यात सहभागी होता येणार असून त्यांना प्रथम नियामक मंडळाची निवडणूक लढवावी लागणार आहे. या नियामक मंडळातून अध्यक्ष निवडला जाणार आहे. यंदा नाशिकच्या सभासद संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नियामक मंडळाचे तीन प्रतिनिधी निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजार पुन्हा वसला

$
0
0

मनपा हद्दीलगतच्या भागाकडे पोलिसांसह महसूल विभागाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने सातपूर अंबड-लिंकरोडवर असलेला अनधिकृत भंगार बाजार पोलिसांच्या मदतीने दुसऱ्यांदा हटवला. तरीही पुन्हा महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागात अनधिकृतपणे हा भंगार बाजार पुन्हा वसला आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करीत हा बाजार हटवावा आणि परिसर मोकळा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.

शहरालगतच्या हद्दीत अनधिकृतपणे भंगार बाजाराची दुकाने पुन्हा वसलेली दिसून येत आहेत. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी तक्रार करूनदेखील त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांसह महसूल विभागदेखील अनधिकृतपणे बसणाऱ्या भंगाराच्या दुकानांकडे दुर्लक्ष करत असल्याने यावर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित केला आहे.


तक्रार करूनही कारवाई नाही

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार काढण्याचे महत्त्वाचे काम केले. पोलिसांच्या मदतीने हा भंगार बाजार हटविण्यात आल्यानंतर मनपाच्या हद्दीलगतच्या भागात पुन्हा भंगाराची काही दुकाने सुरू झाली आहेत. या अनधिकृत दुकानांबद्दल परिसरातील नागरिकांनी तक्रार करीत त्यांना जागा देऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतरही या अनधिकृत भंगाराची दुकाने सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविल्यानंतर आता पुन्हा शहर हद्दीलगत काही भंगाराच्या दुकानांचे बस्तान वसलेले दिसून येत आहे. त्यात काहींनी त्र्यंबकेश्वर रोडजवळच भंगाराच्या दुकानांना जागा दिल्याने या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ग्रामसभेत संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. परंतु, याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून महसूल विभाग कधी याकडे लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


नाशिक महापालिकेने पोलिसांच्या मदतीने हा अनधिकृत भंगार बाजार हटवला होता. परंतु, आता शहरालगत असलेल्या हद्दीत भंगाराची दुकाने वसत असल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यावर महसूल विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.

-भागूजी बोकड, उपसरपंच, तिरडशेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’फलक विनोदाचा विषय

$
0
0

कपिला संगमावरील पूल सुरू; फलक मात्र तसाच

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरावेत म्हणून ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात येतात. त्याचा फायदा नागरिकांनी व्हावा, विशेषतः नव्याने शहरात आलेल्या नागरिकांना अडचणी येऊ नयेत म्हणून असे फलक लावण्यात येतात. अशा प्रकारचा एक फलक गोदावरी-कपिला संगमावर आहे. येथील पुलाची दुरुस्ती होऊन हा पूल सुरळीत सुरू झाल्यानंतरही ‘सावधान, या पुलाचा वापर कोणीही करू नये’ अशा फलक तेथेच असून, पर्यटकांसाठी हा फलक विनोदाचा विषय ठरत आहे.

कपिला संगमावरील खडकाळ भागात पाण्याचा प्रवाह जोरदारपणे आदळत असल्याने येथील खडकाला मोठी खळगी पडली आहे. या खळगीवरून पलीकडच्या बाजूला जाणे शक्य नसल्यामुळे येथे लोखंडी पूल बनविण्यात आला आहे. या पुलावरच्या बाजूला जाण्याच्या मार्गावर लाकडी बल्ल्या टाकण्यात आल्या असून, त्यावरून सहज चालत पलिकडे जाता येते. पर्यटकांकडून याबाबत अनेक दिवसांपासूनची मागणी केली जात होती. त्याबाबत प्रशासनाने दखल घेत पूल दुरुस्ती केली मात्र तो फलक तसाच ठेवल्याने पर्यटकांचा घोळ होतो. आत या फलकांचा उद्देश सफल झाला किंवा त्याची गरज राहिली नाही, त्यानंतर तो काढायला हवा होता. मात्र हा फलक अजूनही तेथेच लावलेला आहे. जर प्रशासनाने त्याठिकाणी दुसऱ्या प्रकारच्या सूचना देणाऱ्या फलकाला लावले तर बरे होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. मात्र अगोदरचा फलक तेथेच ‌दिसत आहे.

नाशिक महापालिकेचा कारभार कसा आहे, हे या फलकावरून दिसत आहे. पुलाची दुरुस्ती केल्यानंतर हा फलक काढून घेणे आवश्यक असताना तो तसाच ठेवल्यामुळे चांगल्या पुलावरून जाताना कशाचा धोका आहे हेच कळत नाही.

-जयदीप क्षीरसागर, पर्यटक

पर्यटकांना पडला प्रश्न

पावसाळ्यात या पूलाला पुराच्या पाण्याचा तडाखा दरवर्षी बसत असतो. यंदाही पुरामुळे या पुलावरच्या बल्ल्या वाहून गेल्या होत्या. त्यामुळे या पुलावरून पलिकडे जाणे धोक्याचे झाले होते. या पुलावरून कुणी जाऊ नये यासाठी येथे बॅरिकेडस लावण्यात आले, त्यानंतर येथे एक फलक सूचना देणारा फलक लावण्यात आला. त्यावर सावधान सदर पुलावरून पावसाळ्यात पाणी जात असल्यामुळे व पुराच्या पाण्याने सदर पूल नादुरुस्त असल्याकारणाने पुलाचा वापर कोणीही करू नये, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पावसाळा संपल्यानंतरही या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यावरून येथे येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची ये-जा सुरू झाली, असे असताना हा सूचना देणार फलक अजूनही तसाच आहे. यामुळे पर्यटकांना आता प्रश्न पडला आहे, की या पुलावरून प्रवास करावा का नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालये दुपारनंतर सामसूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सरकारी कार्यालयात अत्यंत तुरळक उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. २) सायंकाळी घरी जाण्यासाठी वाहने न मिळाल्याने अनेकांनी बुधवारी कामावर येण्याचे टाळले.

शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होत असताना सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काढता पाय घेतला. ज्या कर्मचाऱ्यांशी जनतेशी थेट संबंध येत नाही असे कर्मचारी मंगळवारी दुपारीच घरी गेले होते. बंद असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे गरजेचे होते; परंतु लांबून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाड्या न मिळाल्याने येता आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते. सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्याने अनेक नागरिकांना कामे न होताच परत जावे लागत होते. काही कर्मचारी उशिराने कामावर पोहचले. कामाचा वेग मंदावला होता. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. शहरातील बहुतांश सरकारी कार्यालये रिकामी होती. विभागीय आयुक्‍तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय ओस पडल्याचे चित्र दिसून आले. कामानिमित्त नागरिक सकाळीच कार्यालयात दाखल झाले, पण त्यांचा हिरमोड झाला. अनेक विभागांत खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. उपस्थित कर्मचाऱ्यांना नागरिकांना थेय सोमवारी येण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी पळवण्याचा आमदारांचा डाव फसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मह‌िला बालकल्याण विभागाचा पाच टक्के राखीव निधी अन्य विभागांकडे पळविण्याचा डाव सभापतींसह महिला सदस्यांनी अयशस्वी केला असतानाच, भाजपच्याच आमदारांनी समितीचा दहा कोटींचा निधी पळविण्याचा प्रकार महासभेत उघडकीस आला. महिला बालकल्याण समितीच्या निधीतून आमदारपुत्राच्या प्रभागात महिलांसाठी १० कोटी २५ लाख खर्च करून महिला उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता; परंतु नगरसेविका समिना मेमन यांनी उद्योग भवन पंचवटीतच का, असा सवाल करीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या सूचनेवर हा निधी पळविल्याचा आरोप करत, सत्ताधाऱ्यांनाही तोंडघशी पाडले. सत्ताधाऱ्यांचा डाव फसल्यावर अन्य विभागात महिला उद्योग भवन उभारण्याला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, महापौरांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महिला बालकल्याण विभागाच्या निधीतून आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या प्रभाग तीनमधील म्युनिसिपल मार्केट व पार्किंगच्या आरक्षित जागेपैकी महिला उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या नगरसेवक सम‌िना मेमन यांनी आक्षेप घेतला. सदर उद्योग भवन पंचवटीतच का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी त्यासाठी महिला बाल कल्याण समितीचा निधी पळविण्यात आल्याचा आरोप करत, त्याला विरोध केला. गजानन शेलार यांनी महिला बालकल्याणच्या बजेटमध्येच दहा कोटींची तूट असताना सदरचा प्रस्ताव महासभेवर आलाच कसा, असा सवाल उपस्थित केला. आमदार सानप हे कार्यक्षम आमदार असून, ते आपल्या मतदारसंघात ४५० कोटी रुपये आणू शकतात तर १० कोटी रुपये त्यांच्यासाठी किरकोळ असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.

विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनीही केवळ एकाच विभागात उद्योग भवन न उभारता ते सहाही विभागांत उभारण्याची सूचना केली. आमदार पुत्राचा प्रभाग असल्याने भाजपच्या संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव व दिनकर पाटील यांनी प्रस्तावाचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शाहू खैरे यांनी मात्र पंचवटीतील अनेक मार्केट धूळखात पडून असून, त्यावर उद्योग भवन उभारण्याचा सल्ला दिला आणि करायचेच असतील तर सहाही विभागांत महिला उद्योग भवन उभारा, असे स्पष्ट केले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विरोधकांचा पवित्रा बघून सबुरीने घेत सहाही विभागात भवन उभारण्याची सूचना मांडली. त्यावर महापौरांनी सहाही विभागात महिला उद्योग भवन उभारण्याबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

भाजपची बोलती बंद

नगरसेविका समिना मेमन यांनी आमदार सानप यांचा उल्लेख केल्यानंतर भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील व रूची कुंभारकर यांनी आक्षेप घेत, या कामात आमदारांचा कसलाही संबंध नसल्याचे ठासून सांगितले; परंतु, आयुक्तांच्या प्रस्तावातच आमदार सानप यांच्या सूचनेवरून असे नमूद केले असल्याचे मेमन यांनी सांगताच भाजप नगरसेवकांची बोलती बंद झाली आणि नंतर त्यांनी सारवासारव करत आमदाराने महापालिकेला विकास कामे सुचवू नयेत का, अशी भूमिका घेत अन्य विभागांवरचे प्रेम व्यक्त केले.

एकच आमदार सक्षम कसा

महिला बालकल्याणच्या निधी पळवापळवीवरून विरोधकांनी भाजपला चिमटे काढण्याची संधी साधली. भाजप नगरसेवकांनी आमदार सानप यांच्या कार्यावर स्तुत‌िसुमने उधळली. त्यावर विरोधी पक्षनेता बोरस्ते यांनी पंचवटीच्या कार्यक्षम आमदारांकडून विकास कामे होत असताना मध्य आणि पश्चिममधील आमदार कमी पडत आहेत काय, असा प्रश्न करत पंचवटीचे लोक भाग्यवान असल्याचा टोला लावला. तर महिला रुग्णालयाच्या वादावरून डॉ. हेमलता पाटील यांनी अन्यत्र उद्योगभवन उभारण्यासाठी उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली मध्यच्या आमदारांची भेट घेण्याची कल्पना मांडताच, भाजपसह विरोधी नगरसेवकांना हसू आवरले गेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images