Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भूकंपाचे केंद्र सापडेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरापासून ४० किलोमीटरवर सोमवारी भूकपांचे धक्के जाणवले. मात्र, या धक्क्यांचे केंद्र नेमके कोठे होते ते प्रशासनालाही समजू शकलेले नाही. सुरगाणा, दिंडोरी किंवा पेठ तालुक्याच्या परिसरात हे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी सकाळी ३.२ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. परंतु, भूकंपाचे केंद्र नेमके कोणते याबाबत नोंद झालेली नाही. पेठच्या दिशेने हे धक्के जाणवल्याचा अंदाज वर्तविण्यात

आला होता. मात्र, धक्के नेमके कोठे बसले याचे गूढ कायम आहे. सोमवारी सार्वजनिक सुटीमुळे याबाबत अधिकृत माहिती मिळत नव्हती. याबाबत मंगळवारीही ठोस माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मराठी माणसाला न्याय मिळालाच नाही’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची निर्मिती होती; परंतु तसे झाले नाही. मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालाच नाही. त्यामुळे स्वाभिमान पक्ष काढला आहे. या पक्षाच्या मार्केटिंगसाठी मी येथे आलो आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले.

रत्नसिंधू मित्र मंडळातर्फे ईदगाह मैदान येथे आयोजित कोकण महोत्सवात ते बोलत होते. गेल्या चार दिवसांपासून हा कोकण महोत्सव सुरू आहे. राणे पुढे म्हणाले, की मी नाशिकमधील कोकणी माणसासाठी येथे आलो. कोकणी माणूस नाशिकमध्ये येऊन व्यवसाय करतो आहे. पैसे कमावतो आहे यात समाधान आहे. परंतु, तिकडे मुंबईत काय चालले आहे. आज सर्वचजण म्हणतात की मुंबई मराठी माणसाची आहे. परंतु तरूणांनो, विचार करा मुंबईच्या आर्थिक उलाढालीत मराठी माणूस कुठे आहे?

राणे पुढे म्हणाले की, मी तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. काँग्रेस पोसले, भाजपला सत्ता दिली. आता माझ्या पक्षालाही जागा द्या आणि काय बदल घडवून आणतो ते पहा. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोकणी माणसाचा आहे. कोकणी माणसाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे त्याच्यावर माझी भिस्त आहे. दरम्यान कोकण महोत्सवात आयविल एन्टरटेन्मेट प्रस्तूत नवरसांचा आविष्कार मार्तंड हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. निवेदन दीप काकडे, समाधान पिंपळे यांनी केले. साईगणेश रांजणेकर यांनी परफॉर्मन्स सादर केले.

महोत्सवात आज

आज बुधवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा बिझनेस फोरम आयोजित मी उद्योजक होणारच तसेच शिवाजी महाराजांवर कार्यक्रम प्राध्यापक नामदेव जाधव सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेल्टरमध्ये ८७ कोटींची उलाढाल

0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित शेल्टर २०१७ या प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. या प्रदर्शनाला तब्बल ९० हजार नागरिकांनी भेट दिली. ३५० सदनिकांची विक्री झाली असून या माध्यमातून तब्बल ८७ कोटींची उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

जूना गंगापूर नाक्यावरील डोंगरे वसतिगृहावर २२ डिसेंबरपासून हे प्रदर्शन सुरू होते. त्याचा समारोप मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थ‌ितीत झाला. शहर, जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील नागरिकांनीही या प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिली. ९० हजारांहून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. त्यापैकी तीन हजारांहून अधिक नागरिकांनी शहरातील वेगवेगळ्या साइट्सला प्रत्यक्षात भेट दिली. तर ३५० सदनिकांची विक्री झाल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. समारोप कार्यक्रमात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल आणि उदय घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी नाशिक क्रेडाईचे सचिन बागड, हेमंत पारीख, अविनाश आव्हाड, रोहन कुटे, दीपक हांडगे, प्रशांत पाटील, अनिल आहेर, मनोज खिंवसरा, शंतनू देशपांडे, सुनील गवांदे, ऋषिकेष कोते, अभिजित पाटील, कुणाल पाटील आदींसह बांधकाम व्यावसायिकांनी परिश्रम घेतले.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
शेल्टर प्रदर्शनाने केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांची माहिती दिली नाही. तर मार्गदर्शनपर सत्रांचेही आयोजन केले. महारेरा कायदा, इंटेरियर डिझायनिंग, सौंदर्याबाबतच्या टिप्स, आरोग्य संवर्धनाच्या टिप्स मिळाल्या. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सहभागी होत मार्गदर्शन केले. ‘अनिश्चितेच्या वातावरणातील प्रगतीच्या दिशा’ या विषयावर अतुल राजोळी यांनी प्रेरणादायी विचार मांडले. स्थानिक कलावंतांनाही या प्रदर्शनाने मंच उपलब्ध करून दिले. नृत्यांगना रेखाताई नाडगौडा यांच्या शिष्या आणि नृत्यांगना अदिती नाडगौडा-पानसरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘कृष्णा माधुरी’ हा कार्यक्रम येथे नागरिकांना आनंद देऊन गेला. याखेरीज अन्य कलावंतांनीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठासाठी आज मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टर्स घडविणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध प्राधिकरण मंडळांसाठी गुरुवारी (दि. २८) निवडणूक पार पडते आहे. या निवडणुकीत राज्यात ४५ जागांसाठी ९,१३४ मतदार आपला मतदानहक्क बजावणार आहेत. यासाठी ३२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली आहे.

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळांवर ३६ जागांसाठी ९०९ मतदार आहेत. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रि-क्लिनिकल विभागात अंतर्गत ९४ मतदार आहेत. दंत विद्याशाखेमध्ये क्लिनिकल मेडिसिन विभागात १६१ मतदार आहेत. आयुर्वेद व युनानी विद्याशाखेमध्ये प्रि-क्लिनिकल विभागात १५३, पॅरा-क्लिनिकल विभागात १४२, क्लिनिकल काया विभागात १८२, क्लिनिकल शल्य विभागात १७७ मतदार आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी नाशिकसह मुंबई, पुणे व औरंगाबाद या चार महसूल विभागात उमेदवारांची लढत होणार आहे. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या चार जागांसाठी प्राध्यापक गटातून मुंबई विभागात ५६३, पुणे विभागात ६०९, नाशिक विभागात ३७२ व औरंगाबाद विभागात ३४१ असे एकूण १,८८५ मतदार आहेत.

शिक्षक गटातील चार जागांसाठी वैद्यकीय विद्याशाखेत ४,१३४, दंत विद्याशाखेत १,६९६, आयुर्वेद व युनानी विद्या शाखेत १,९३३, तत्सम विद्याशाखेत १,३७१ अशा प्रकारे एकूण ९,१३४ मतदार आहेत. विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसाठी एक जागेसाठी तत्सम विद्याशाखा अंतर्गत एकूण ५१ मतदार आहेत.

निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेली मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी तयार असून विद्यापीठाकडून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, मतदान साहित्याची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्था व अनुषांघिक यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज आहेत. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक मतदानाची मतमोजणी शनिवारी ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल. त्यानंतर निवडणूक निकाल जाह‌ीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न सुटला वाहतूक कोंडी कायम

0
0

नाशिक जिल्ह्यातील धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नांदगाव शहरात गेल्या तीन दशकांपासून नगरपालिकेची सत्ता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. या पालिकेवर जणू काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी असल्याचे चित्र गेल्या पंधरा वर्षांपासून होते. मात्र, नोव्हेंबर २०१६मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतक्या वर्षांच्या सत्तेला शह देण्याचे व परिवर्तन घडविण्याची कामगिरी सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केली. शिवसेनेचे नगराध्यक्ष राजेश कवडे थेट नगराध्यक्षपदी निवडून आले. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवून नांदगाव पालिकेची सूत्रे त्यांच्या ताब्यात दिली.
नांदगाव नगरपालिकेवर यापूर्वी माजी पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांचा मोठा प्रभाव होता. पण त्या प्रभावाला दूर सारत नांदगावमध्ये शिवसेनेने बाजी मारली. नांदगाव धरणांचा तालुका असला, तरी येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने व निवडणुकीपूर्वी १५ ते १७ दिवसांआड नागरिकांना पाणी मिळत असल्याने शिवसेनेने पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत व विकासकामांचा शब्द देत निवडणूक लढविली व जिंकलीही!

गेल्या वर्षभरात आश्वासनानुरूप काम करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या सत्ताधारी आघाडीने केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नांदगाव शहराचा पाणीपुरवठा १५ ते १७ दिवसांवरून ४ ते ५ दिवसांआड आला आहे, ही कवडे यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. पाणी प्रश्न सोडविण्याचा किंवा त्याची त‌ीव्रता कमी करण्याचा प्रयत्न वर्षभरात झाला. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले गेले. लिकेजेस काढण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक भागात घंटागाडी सुरू करण्याचा मनोदय नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी व्यक्त केला आहे. शहरात व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचा दावा करीत त्यासाठी ८६ लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शहरात उद्यान उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षभरात मुस्लिम दफनविधीचा प्रश्न सोडविला आहे. रस्ते, सांडपाणी, पथदिवे, भुयारी गटारी या समस्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

स्वच्छतेचा बोजवारा

घंटागाडीद्वारे कचरा उचलून शहर स्वच्छ राखण्याचा पालिकेचा प्रयत्न असून, त्यासाठी कचऱ्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, तरी नांदगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे व साफसफाईचा प्रश्न कायम असल्याची नागरिकांची ओरड आहे. शहरातील गटारी साफ व्हाव्यात, कचरा व्यवस्थित गोळा करण्यात यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

पाणीपुरवठा अभियंताच नाही

नांदगाव नगरपालिकेत पाणीपुरवठा अभियंताच नसल्याने प्रशासन व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसते. पालिकेत स्टाफ कमी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपालिका संवर्गात सहा पदे बदलली गेली, पण एकही पद भरले गेले नाही. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा फटका पालिकेला बसत आहे. ही पदे शासनाने तत्काळ भरावीत व प्रशासन सुरळीत होण्यास मदत करावी, असा सार्वत्रिक सूर आहे.

रस्त्यावरचा बाजार

नांदगाव शहरातील रस्त्यांवर भरणाऱ्या बाजाराने नागरिकांना पायी चालणेसुद्धा मुश्किल केले असल्याचे चित्र आहे. शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. शनीमंदिर ते नगरपालिका यांसह विविध मार्गांवरील वाहतुकीची कोंडी ही समस्या दिसून येते. रस्त्यावरील अतिक्रमणांचा बंदोबस्त व्हावा, नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

वर्षभरातील ठळक बाबी

- पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

- पाणी टंचाई समस्येची तीव्रता कमी करण्यात यश

- शहर स्वच्छतेसाठी आऊट सोर्सेसचा वापर

- व्यापारी संकुलासाठी ८६ लाख मंजूर

- दहेगाव माणिकपुंज प्रस्तावित पाणी पुरवठ्यासाठी ६४ लाख मंजूर

- नगरोत्थानसाठी ५० लाख

- हागणदारीमुक्त योजनेअंतर्गत ७२२ वैयक्तिक शौचालयाचे काम

- जलशुद्धी करणे केंद्रासाठी प्रयत्न

मोकाट कुत्र्यांचा प्रश्न

नांदगावमध्ये रस्त्यावरचे खड्डे व मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना त्रासून सोडले आहे. गेल्याच महिन्यात मोकाट कुत्र्याने १२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. मोकाट कुत्री, जनावरे यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करताना दिसतात. कुत्र्यांमुळे नागरिकांत घबराट पसरत असल्याने मोकाट कुत्र्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, असे नागरिकांना वाटते.

नगराध्यक्ष म्हणतात
आश्वासनांची पूर्ती

वर्षभरात पाणी प्रश्नाला अग्रक्रम देऊन प्रामाणिक प्रयत्नातून पाणीप्रश्न बहुतांश प्रमाणात सोडवला आहे. वचननाम्यातील वचनाची पूर्ती केली आहे. त्याशिवाय शहर स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून कचऱ्याचा ठेका, घंटागाडी व्यवस्था, शहर साफसफाईकडे लक्ष या गोष्टी केल्या आहेत. यापुढील काळात शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. भुयारी गटारी, रस्ते यांची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. उद्यान, मुस्लिम दफनविधीचा प्रश्न, व्यापारी संकुल हे प्रश्न मार्गी लागले आहेत. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी निश्चित नियोजनपूर्वक पावले उचलणार आहोत. जुने कचरा डेपो उचलणार आहे. लेंडी नदीकिनारी टपरी सेंटर उभारून व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे.

- राजेश कवडे, नगराध्यक्ष

अधिकारी म्हणतात...

पाणी नियोजन चांगले

पाण्याचे नियोजन वर्षभरात चांगले सुरु आहे त्यामुळे चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या कारकिर्दीत पाणीपुरवठा पंधराऐवजी चार ते पाच दिवसांआड आला आहे. तसेच दलित वस्ती सुधारणाअंतर्गत कामे सुरू आहेत. हागणदारीमुक्ती योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. पालिकेत स्टाफ कमी असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.

- विश्वंभर दातीर, मुख्याधिकारी, नांदगाव

विरोधक म्हणतात...

गटारींचा प्रश्न कायम

पाणी समस्या बरीचशी कमी झाली आहे. शहरात साफसफाई सुरू असल्याचा आनंद आहेच. मात्र, रस्ते, गटारी ही प्रलंबित कामे लवकर पूर्ण झाली पाहिजे. वॉर्डानुसार गटारींचे काम करण्यात यावे. रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दूर व्हायला हवी. या प्रश्नी आंदोलने करून पालिकेच्या सभेत आवाज उठवूनदेखील वाहतुकीच्या कोंडीबाबत उपाययोजना अद्याप झालेली नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही ठिकाणी लिकेजेस असल्याने नळाला अस्वच्छ पाणी येते. या बाबतीतही प्रशासनाने लक्ष देऊन पावले उचलावीत.

- इकबाल शेख, विरोधी पक्ष गटनेते, राष्ट्रवादी

नागरिक म्हणतात...

रहदारीची समस्या बिकट

यंदाच्या वर्षी पाण्याच्या प्रश्नावर चांगले नियोजन व उपाययोजना केल्याने चार-पाच दिवसांआड पाणी मिळते. ही समाधानकारक बाब आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, अस्वच्छ गटारी यांकडे लक्ष द्यायला हवे. रेल्वेगेट ते गांधीचौक, तसेच फुलेचौक येथे रस्त्यातील गाड्या विक्रेते यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. फरशी पुलावरील टपऱ्या उठल्या, पण तरी रहदारी समस्या बिकट आहे. याबाबत कार्यवाही होणे गरजेचे वाटते.

- कचेश्वर बारसे, नागरिक

(संकलन- संदीप देशपांडे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमध्ये हवेत सीसीटीव्ही

0
0

देवळाली परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा आग्रह

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देवळाली शहरातील भरचौकात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मोबाइल दुकानाच्या चोरीमुळे शहरात पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरात तीन चोऱ्या, एक बलात्काराच्या प्रयत्न झाल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनने दिली.

देवळाली शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे आवाहनदेखील आहे. मंगळवारी (दि. २६) जुन्या बस स्थानक परिसरात झालेल्या चोरी जरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असली तरी चोर कोठून आले आणि कोठे गेले हे समजण्यासाठी परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाही. शहरात नुकतेच झालेल्या गायीच्या चोरीचे प्रकरण ताजे असताना याआधी पाणी मीटर चोरी व विविध कॉलन्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्या यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास अशा अप्रिय घटनांवर आळा बसण्यास मदत होईल.

देवळालीच्या सार्वजनिक ठिकाणांवर १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे स्वच्छतागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. यासोबत येथील भाजपचे पदाधिकारी रतन चावला यांनी १२ सप्टेंबर रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिलेल्या पत्रात ते स्वतः मेहेक फाउंडेशनच्या माध्यमातून शहराच्या मुख्य ७ ठिकाणी कॅमेरे बसविण्यास तयार होते. मात्र त्या अर्जाबाबत कुठलीही दाखल घेण्यात आली नाही.

गुन्हेगारी रोखावी

मनपा क्षेत्रासह विविध नगरपालिकांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असताना स्कुल ऑफ आर्टिलरी, स्टेशन हेड क्वॉर्टर यासारख्या लष्कराच्या प्रमुख केंद्राचे ठिकाण असलेले देवळालीसारख्या अतिसंवेदनशील शहरात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. एकीकडे येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्मार्ट कॅन्टोन्मेंट म्हणून समावेश झाला असताना शहरातील गुन्हेगारीला पायबंद घालणेही क्रमप्राप्त झाले आहे.

सीसीटीव्ही लोकार्पण

सिन्नर फाटा ः प्रभाग क्रमांक २२ मध्ये देवळालीचे आमदार योगेश घोलप यांच्या प्रयत्नांतून सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा आज (दि. २८) सकाळी दहा वाजता देवळाली गावात आयोजित करण्यात आला आहे. भयमुक्त प्रभागाच्या उद्देशाने आमदार योगेश घोलप यांच्या प्रयत्नांतून देवळाली मतदार संघात समाविष्ट असलेल्या पालिकेच्या प्रभागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.


शहरात दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. सोबतच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे अनिवार्य बनले आहे.

-सुनंदा कदम, माजी उपाध्यक्षा

देवळालीत अनेक दानशूर नागरिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी सहज पुढाकार घेतील. मात्र त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डासह येथील नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

-हनुमंता देवकर, सामाजिक कार्यकर्ते

शहरात सीसीटीव्ही यंत्रणा असणे अनिवार्य आहे. यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे सोयीचे होईल.

- सुभाष डौले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरुस्ती निधीचा मिळेना तपशील!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पालिकेच्या सर्व सहाही विभागांतील रस्ते दुरुस्तीसाठी दिल्या जाणाऱ्या निधी वापराचा तपशील वारंवार मागणी करुनही मिळत नसल्याने रस्ते दुरुस्ती निधीच्या वापरात घोळ झाला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक विभागाला चार ते साडेचार कोटी रुपये निधीचे वाटप गेल्या वर्षी झाले होते. त्यानुसार एकूण सुमारे २५ कोटी रुपये निधीचा वापर शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी खर्ची झालेला असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडूनच रस्ते दुरुस्तीच्या निधी वापराचे तपशील जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्ती निधी वापराचा तपशील शोधण्यासाठीचा रस्ताच सापडेनासा झाल्याने भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक मनपाकडून दरवर्षी साधारणतः मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शहरातील सर्व सहाही विभागांतील रस्ते दुरुस्तीसाठीचे टेंडर जाहीर करून त्याला मान्यता दिली जाते. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी या निधीचा वापर केला जातो. या कामासाठी शहरातील प्रत्येक विभागासाठी सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. अशा प्रकारे संपूर्ण शहरासाठी २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी दरवर्षी शहरातील खड्डेदुरुस्तीसाठी खर्च केला जातो. या निधीच्या खर्चाचा तपशील भाजपच्याच नगरसेवकांकडून प्रभाग समिती सभेत वारंवार मागितला गेला असला, तरी अद्याप तो पालिका प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा संपूर्ण निधी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली जिरवला गेला असल्याची शक्यता भाजपच्याच नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

खड्डे दुरुस्तीची माहिती नाही

खड्ड्यांची दुरुस्ती कधी झाली, याची दस्तुरखुद्द बहुतांश नगरसेवकांनाच माहिती नसल्याची धक्कादायक माहिती आहे. ज्या काही विभागांतील काही रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती, तीही टेंडरमधील तपशिलाप्रमाणे झालीच नव्हती, असा दावा भाजपच्याच काही नगरसेवकांनी केला आहे. खड्डेदुरुस्तीचा केवळ फार्स पूर्ण करण्यात आला होता. त्यामुळे रस्ते दुरुस्ती निधीच्या वापरात मोठा घोळ झाला असल्याचे भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

निधी प्रभागनिहाय का नाही?

रस्ते दुरुस्तीचा निधी दरवर्षी विभागनिहाय वितरीत होतो. हा निधी प्रभागनिहाय का दिला जात नाही, हा खरा कळीचा मुद्दा आहे. एका विभागासाठी मंजूर होणारा रस्ते दुरुस्ती निधी संबंधित विभागातील सर्व प्रभागांना सारख्या प्रमाणात वाटप होणे आवश्यक आहे. परंतु, प्रभागनिहाय निधी देण्याऐवजी विभागानुसार दिला जात असल्याने या निधीच्या वापरात मोठे गौडबंगाल झाले असण्याची शक्यता आहे.

दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागाला चार ते पाच कोटी रुपयांचा निधी वाटप केला जातो. परंतु, त्या निधीच्या वापरातून कोणत्या प्रभागात किती खड्डे दुरुस्त करण्यात आले, याचा तपशील अनेकवेळा मागणी करुनही पालिका प्रशासनाकडून मिळालेला नाही.

- संगीता गायकवाड, नगरसेविका, प्रभाग क्र. २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्याच्यासाठी डॉक्टर बनले देवदूत!

0
0

जखमीवर रस्त्यावरच केले उपचार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रुग्णसेवा करून प्राण वाचविणे हे डॉक्टरांचे कर्तव्य. ही जाण ठेवली तर डॉक्टर हा देवदूतच बनतो. याचाच प्रत्यय मंगळवारी रात्री मुंबई-आग्रा हायवेवर आला. आपल्या पेशाला जागत कळवण येथील डॉ. सुहास कोटक यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वारावर रस्‍त्यावरच उपचार करून त्याचे प्राण वाचवले.

मंगळवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर दोन मोटरसायकली एकमेकांवर धडकल्या. या अपघातात मोटरसायकलस्वाराच्या तोंडाला आणि डोक्याला मार लागला. तो जखमी होऊन रस्त्यात पडला असताना त्या मार्गावरून जाणारे कळवणचे उपजिल्हा रुग्‍णालयातील उपवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोटक यांनी गाडी थांबवत त्या जखमीवर रस्‍त्यावरच त्वरित उपचार सुरू केले. त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता. हा रक्त फुफ्फुसात जाऊ नये, यासाठी त्यांनी नळी टाकली. त्यांच्या गाडीत असलेल्या ऑक्सिजन पंप जखमीला लावला. त्यांच्या या उपचारामुळे गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचले. या जखमी युवकाला अॅम्ब्युलन्समधून नेण्यात आले. मात्र, त्याला कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले याची माहिती पोलिसांनीही समजू शकली नाही. त्यामुळे या अपघाताची नोंद पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये झाली असली तरी जखमीचे नाव कळू शकले नाही.

अमृतधाम चौफुली ही आडगाव पोलिस स्टेशनपासून जवळ असतानाही अपघात झाल्यानंतर या पोलिस स्टेशनमधून एकही पोलिस कर्मचारी अपघातस्‍थळी आला नाही. याउलट पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी येथील गर्दी हटवून डॉक्टरांना उपचार करण्यासाठी मदत केली.

इतरांसाठी आदर्श

सरकारी कर्मचारी म्हटला तर फार चांगला अनुभव नसतो. याचा प्रत्यय वारंवार सरकारी रुग्‍णालयांमध्येही येत असतो. मात्र, आपल्या पेशाला जागलं तर डॉक्टर देवदूत बनतो, हेच डॉ. सुहास कोटक यांनी दाखवून दिले. त्यांच्यामुळे एका जणाचे प्राण वाचले. या कार्यामुळे त्यांनी इतर डॉक्टरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाने कळवणला जात असताना अपघात झाल्याचे दिसल्याने गाडी थांबवून जखमीकडे धाव घेतली. त्याच्या तोंडातून खूप रक्तस्त्राव होत होता. हे रक्त फुफ्फुसात जाऊ नये यासाठी नळी टाकली आणि पुढील धोका टाळला.

- डॉ. सुहास कोटक,

उपवैद्यकीय अधिकारी, कळवण उपजिल्हा रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरला मिळेना ‘ओळख’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यावर सर्वाधिक कर सातपूर भागातून मिळत होता. परंतु, त्याच सातपूर गावाला नावाची कमान कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कमानीचे काम मंजूर झाले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हजारो एकर शेतजमिनी कारखान्यांना देऊनही गावाला नावच मिळाले नसल्याने महापालिकेतील नगरसेवक करतात काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, माजी नगरसेवक सचिन भोर, माजी नगरसेविका उषा शेळके यांनी सातपूर गावाला नावाची कमानीची मागणी सभागृहात केली होती. परंतु, याकडे महापालिकेने दुर्लक्षच केल्याचे चित्र आजही पहायला मिळत आहे. प्रभाग ११ च्या नगरसेविका सीमा निगळ यांनी पुन्हा महापालिकेकडे सातपूर गावाला कमानीची मागणी केली आहे. आता त्यांच्या तरी कार्यकाळात गावाला नाव मिळावे, अशी सार्थ अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

महापालिका स्थापनेअगोदर सातपूरचे दिवंगत नगराध्यक्ष रामचंद्र पाटील-निगळ यांनी जकातीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न सुरू केले होते. सन १९९२ साली महापालिकेची स्थापना झाल्यावर सर्वाधिक उत्पन्न सातपूर भागात असलेल्या कारखान्यांकडून जकात रूपाने मिळत होते. शहराच्या वाढत्या विकासात सातपूरकरांचे सर्वाधिक मोठे योगदान आहे. तरीही आर्थिक उत्पन्न देणाऱ्या सातपूरला नेहमीच महापालिकेने दुय्यम दर्जा दिला असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

सातपूर गावातील शेकडो शेतकऱ्यांनी एमआयडीसीला हजारो एकर शेतजमिनी कारखान्यांसाठी दिल्या होत्या. कारखाने उभे राहिल्यावर लाखो कामगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. ज्या गावाने शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिले त्या गावाच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांकडून नाराजी

दरम्यान, सहा वर्षांपासून सातपूर गावात प्रवेश करताना असलेली स्वागत कमान तुटून पडली होती. यानंतर नवीन कमानीचे काम तत्काळ हाती घेण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. यासोबतच माजी नगरसेवक भोर व माजी नगरसेविका शेळके यांनी सातपूर गावाची कमान तत्काळ उभारण्यात यावी यासाठी सभागृहात मागणीही केली होती. परंतु, आजतागायत सातपूर गावाला हक्काची कमान मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावाच्या विकासाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. सातपूर गावाच्या प्रवेशद्वारावरील कमान तत्काळ उभारण्यात यावी याची मागणी केली असून, याबाबत बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच गावाची नवीन कमान उभारण्यात येईल.

सीमा निगळ, नगरसेविका, प्रभाग ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर तहसीलदार ज्योती देवरे व महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. देवरे यांनी येथील तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून या कारवाईस वेग आला आहे. गेल्या महिन्याभरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांकडून २९ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयास जमीन महसुलाचे ७ कोटी ४ लाख ३६ हजार तर गौण खनिजचे एकूण ११ कोटी असे एकूण १८ कोटी ४३ लाख ६१ हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यात होत असलेल्या बेकायदा गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी मंडळनिहाय पथकाची निर्मिती करून कारवाई सुरू करण्यात आल्याने गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. गौण खनिज कायदेशीररित्या स्वामित्व धन (रॉयल्टी) भरून वाहतूक करणे बंधनकारक असताना देखील अशा प्रकारे रॉयल्टी भरून वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. दंडात्मक कारवाईची रक्कम मात्र झपाट्याने वाढत असल्याने तालुक्यात गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे समोर येते आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील मंडल अधिकारी तसेच तलाठी यांना याबाबत स्पष्ट निर्देश

दिले आहे.

स्वतः देवरे या शहरालगत असलेल्या नदीपत्राच्या गावाना रात्री भेट देत असून, बेकायदेशीर वाळू किंवा अन्य गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

कारवाई दरम्यान वडनेर खाकुर्डी पोल‌सि ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात जमीन महसुलाची एकूण २ कोटी ११ हजार ७४९ रु इतकी तर गौण खनिज महसुलाची एकूण १ कोटी ३९ लाख ३५ हजार ६७९ रु इतकी वसुली झाली आहे. एकूण ३ कोटी ३९ लाख ४७ हजार ३९८ रु महसूल यामुळे जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५०० विहिरींना विजेची प्रतीक्षा

0
0

जिल्हा प्रशासनाचे संयुक्त तपासणीचे आदेश

नाशिक : जिल्ह्यात शेती सिंचनासाठी गत पाच वर्षांत मनरेगांतर्गत साडेचार हजारांहून अधिक सिंचन विहिरी करण्यात आल्या असून, त्यापैकी जेमतेम ८७५ विहिरीच उपयुक्त ठरत आहेत. सुमारे ३५०० विहिरी वीजजोडणीअभावी निरुपयोगी ठरत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मात्र, प्रत्यक्षात एवढ्या विहिरी बांधल्या, की अनुदान लाटण्यासाठी त्या कागदोपत्री दाखविण्यात आल्या हा सवाल उपस्थ‌ित होत असून, संयुक्त पाहणी अहवालातूनच लवकरच ते स्पष्ट होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) अनेक योजना राबविल्या जातात. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वखर्चाने विहिरी, शेततळी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. निकषांना पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगांतर्गत सिंचन विहीर मंजूर केली जाते. जिल्ह्यात पाच वर्षांत ४ हजार ५६३ विहिरी बांधण्यात आल्या. त्यापैकी ८७५ विहिरींनाच वीजजोडणी झाली आहे. तब्बल तीन हजार ६८८ विहिरींना वीजजोडणी केली नसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे या विहिरींचा सिंचनासाठी वापर होतोय की नाही यासह एवढ्या मोठ्या संख्येने विहिरी खरोखरच बांधल्या गेल्या की नाही असा प्रश्नही उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

सुमारे ८७५ व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांनी वीजजोडणी केली असली तरी त्याची नोंद झाली नसावी, अशी शक्यता प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. नेमक्या किती विहिरी वीजजोडणीपासून वंचित आहेत, त्यामागची कारणे कोणती याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकारी, तलाठी आणि महावितरणचे अधिकारी यांनी ाबाबतचा सर्व्हे करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश दिले असून, कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये २१८ विहिरींना वीजजोडणी नसली तरी तेथे कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, दुर्मिळ हस्तलिखितांच्या जगात!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोथ्या हा आपल्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. या लाखमोलाच्या पोथ्या, हस्त‌लिखिते अन् दुर्मिळ ग्रंथांना जयंत गायधनी यांच्या चिकीत्सक अन् संशोधक नजरेने हेरलं अन् या पोथ्यांना हक्काच घर मिळालं. जणूकाही मेनरोडवरील गायधनी वाड्यात नाशिकचं भांडारकर वसलं आहे. हा दुर्मिळ ठेवा अनुभवण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सतर्फे रविवारी, ३१ डिसेंबर रोजी मटा हेरिटेज वॉकच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.

जयंत गायधनी यांना वडिलोपार्जित व अनेक अभ्यासकांची ग्रंथसंपदा व हस्तलिखिते संग्रही करताना हस्तलिखिते संवर्धनाचा छंद जडला. काशीचे अनंतशास्त्री फडके, सिन्नरचे मालपाठक, भय्याजी जोशी यांच्या संग्रहातील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची असंख्य हस्तलिखिते त्यांना मिळाली. त्यानंतरच त्यांनी आपल्या छंदाला हा वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने वाहून घेतले.

सध्या त्यांच्याकडे साडेतीन हजाराहून अधिक हस्तलिखिते आहेत. योग, धर्म, कविता, गणित, स्थापत्य, आयुर्वेद, व्याकरण, युद्धशास्त्र अशा अनेक विषयांवरील हस्तलिखिते मोडी, देवनागरी, संस्कृत, पारशी, उर्दू, बंगाली, नेपाळी, ओडीशी लिपीतील तसेच संस्कृतमधीलही सहाव्या शतकापासून दीडशेवर्ष जुनी हस्तलिखिते गायधनींच्या संग्रहात आहेत. सहाव्या शतकातील रामायणावरील पोथीही त्यांच्याकडे आहे तर नेपाळी लिपीतील परंतु संस्कृत भाषेत असलेले सुंदरकांड हे हस्तलिखितही त्यांच्या संग्रहात पहायला मिळतात. तसेच अनेक दुर्मिळ पत्र, वंशावळ, व्यवहाराचे दस्तही त्यांच्याकडे पहायला मिळतात. हा खजिना त्यांनी खास मटा हेरिटेज वॉकसाठी खुला केला असून, रविवारी तो पहायला उपलब्ध होणार आहे.

नावनोंदणी आवश्यक

‘मटा’ हेरिटेज वॉक ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. यासाठी ८.५० वाजता रविवार कारंजापासून मेन रोडला अष्टविनायक सारीजसमोर, जयंत गायधनी यांच्या गायधनी वाड्यासमोर एकत्र‌ जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावरील व्हॉटसअॅपवर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या मेसेज करायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी वाटून घेतली हद्द

0
0

राजन जोशी, सिडको

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागाची व्याप्ती व भौगोलिक क्षेत्रही मोठे झाले आहे. चार नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिध‌ित्व करीत असल्याने या नगरसेवकांमध्ये मतभेद होत आहेत. काही ठिकाणी नगरसेविकांऐवजी त्यांचे पतीच नगरसेवक म्हणून मिरवत आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या सीमा स्वत:हूनच ठरवून घेतल्या असून, प्रत्येकाने ठरवलेल्या हद्दीतच काम करायचे, असा दंडक घालून घेतल्याची चर्चा सिडकोत रंगली आहे.

सिडकोत सध्या सहा प्रभाग असून, इंदिरानगरला तीन प्रभाग आहेत. सिडको आणि इंदिरानगरमध्ये सुमारे ३६ नगरसेवक कार्यरत आहेत. एकाच प्रभागात चार नगरसेवक असल्याने अनेकदा विकासकामांवरून वादविवाद होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नसताना हे वाद सुरू झाल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये वाद होणे ठीक आहे. परंतु, स्वपक्षाच्याच नगरसेवकांमध्ये वादविवाद होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सिडको व इंदिरानगरमध्ये सुरू असलेल्या या श्रेयवादामुळे काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आपापली हद्द निश्‍चित करून घेतल्याची चर्चा आहे. सिडकोतील प्रभाग २९ मध्ये भाजपचे मुकेश शहाणे, छाया देवांग व नीलेश ठाकरे हे तीन नगरसेवक व शिवसेनेच्या रत्नमाला राणे या एक नगरसेवक असलेल्या प्रभागात सर्वांनी एकत्र येऊन कोणी कोणात्या भागाचे काम पहावयाचे हे निश्‍चित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात अद्यापही असा वाद दिसून आलेला नाही. त्याचबरोबर इंदिरानगरमधील प्रभाग ३० मध्येही अशीच वाटणी करण्यात आल्याने नगरसेवकांचे कार्य चांगल्या पद्धतीने होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे प्रभाग ३०मध्ये सतीश सोनवणे, शाम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी व सुप्रिया खोडे हे चौघेही नगरसेवक भाजपचेच आहेत. प्रभागातील विकासासाठी हे नगरसेवक एकत्र येत असून, प्रभागाच्या समस्येसाठीसुद्धा एकत्र पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वादविवादांपेक्षा विकासाची वाट या ठिकाणी दिसून येत आहे. दुसऱ्या भागातील समस्या आपल्याकडे आल्यास त्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

याबाबत कोणीही नगरसेवक अधिकृत बोलत नसले तरी ही सोयीसाठी केलेली सोय असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभागाचा विकास व नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी हे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.


संपर्क कार्यालयेही व्याप्तीनुसार

इंदिरानगरमधील प्रभागात तर या चारही नगरसेवकांनी आपापले संपर्क कार्यालय प्रभागाच्या व्याप्तीनुसार केले आहेत. दोन कार्यालये कोठेही जवळ येणार नाहीत, याची काही प्रमाणात खबरदारी घेण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रथमच चार सदस्यांच्या या प्रभाग पद्धतीमुळे राजकारण तापणार होते. याची चर्चा निवडणुकीपूर्वीच होती. परंतु, आता हे वाद खऱ्या अर्थाने जनतेसमोर येऊ लागले आहेत. त्यामुळे विकासापेक्षा या वादांवरच जास्त चर्चा होत असल्याचे दिसत आहे. आगामी काळात हे वाद शमविण्यात पक्षश्रेष्ठींनीही पुढाकार घेण्याची गरज असून, पाच वर्षांत विकासाऐवजी हे वाद जास्त प्रचलित होणार नाहीत, याची काळजी राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेन रोड, भद्रकालीत अतिक्रमणांवर हातोडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी जुन्या नाशिकमधील वर्दळीच्या मेनरोडसह भद्रकाली परिसरात व्यावसायिक व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणावर हातोडा फिरवला. या कारवाईत भद्रकाली पोल‌िस स्टेशन, गाडगे महाराज पुतळा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, दहीपूल व शाल‌िमार या ठिकाणांवरील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, अतिक्रमणधारक, दुकानांचे ओटे, टपऱ्या, शेड हटविण्यात आले. यावेळी अनेक दुकानदारांनी या कारवाईला विरोध केला. परंतु, पोलिसांच्या मदतीने पालिकेच्या अतिक्रणविरोधी पथकाने या भागातील साफसफाई केली. पालिकेचे पथक फिरताच फेरीवाल्यांनी या विभागात पुन्हा दुकाने मांडली.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या नाशिकमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह भद्रकाली परिसर, धुमाळ पॉइंट, दहीपूल व शालिमार परिसरात फेरीवाले तसेच व्यावसायिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. काही व्यावसायिकांनी शेड, ओटे बांधून पोटभाडेकरूच ठेवले होते. दुकानाबाहेरच पत्रे व माल लावत असल्याने रस्ते चिंचोळे झाले होते. भद्रकालीतील अब्दुल हमीद चौक परिसरात थेट रस्त्यावरच दुकाने थाटली गेल्याने स्थानिक व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी होत्या. नगरसेवकांनीही या भागातील अतिक्रमणांसंदर्भात पश्चिम प्रभाग समिती, महासभेत आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. तसेच पालिकेच्या प्रस्तावित हॉकर्स झोनध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आपली वक्रदृष्टी या विभागाकडे फिरवली. महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. भद्रकाली पोल‌िस स्टेशन, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, दहीपूल व शाल‌िमार इत्यादी ठिकाणांवरील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, अतिक्रमणधारक, दुकानांचे ओटे, टपऱ्या, शेड हटविण्यात आले. तीन टपऱ्या, एक हातगाडी, सहा क्रेट, लोखंडी पत्रे, पाइप व अँगल दहा, तीन जुने फ्रीज, दोन पाल इत्यादी साहित्य जप्त करून ओझर जकात नाका अतिक्रमण गोडावूनला जमा करण्यात आले.

व्यावसायिकांची हुज्जत

मातंगवाडा येथे हॉकर्स झोनमध्ये असलेल्या टपऱ्या हटविण्यात आल्या. प्रभात थिएटरमागील महापालिकेच्या गाळ्यांभोवती करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला. यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी पथकाला विरोध करत, हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करत, कारवाई सुरूच ठेवली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहीदास बहीरम यांच्यासह पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर आणि पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई कऱण्यात आली.

अतिक्रमण स्वतः काढा

शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पा‌र्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रम‌ित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहनाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. अतिक्रमणे काढून न घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारसाठी आज विशेष मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अनेकदा आधारकार्ड काढूनही ते रिजेक्ट झालेल्या नागरिकांसाठी आज (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष ड्राईव्ह ठेवण्यात आला आहे. केवळ आधारकार्ड रिजेक्ट होत असलेल्या नागरिकांसाठीच हा ड्राईव्ह असणार आहे. त्यामुळे अशा तक्रारींचे निरसन करवून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्स आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेकदा आधार कार्डसाठी नोंदणी करूनही बऱ्याच नागरिकांचे आधारकार्ड मिळालेले नाही. आधारशिवाय अशा नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. बँक, मोबाइल कंपन्या, पीएफ कार्यालय, शाळा, कॉलेजेस अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचीच मागणी होते. परंतु, आधार कार्डअभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधारबाबतच्या समस्या थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे मांडता याव्यात, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने गत आठवड्यात मटा संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी आधारशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थ‌ित केले. त्यामध्ये वारंवार रजिस्ट्रेशनचा मुद्दाही पुढे आला होता. एकदा आधारकार्ड नोंदणी केली की संबंधित व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक तयार होतो. काही तांत्रिक कारणास्तव आधार कार्ड संबंधितांपर्यंत पोहोचत नाही. एकदा नोंदणी केली की पुन्हा नोंदणी करणे टाळावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले होते. वारंवार नोंदणी केली की आधार कार्ड कायमचे ब्लॉक होण्याची शक्यता असते. नोंदणी करूनही आधार कार्ड मिळाले नसेल तर अशा नागरिकांनी ती रीस‌िट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी २८ डिसेंबर ही तारीखदेखील निश्च‌ित करण्यात आली होती. सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात अशा समस्येने ग्रस्त नागरिकांसाठी विशेष ड्राईव्ह ठेवण्यात आला आहे. तेथे आधार कार्डचे स्टेटस तपासून डेटा रिट्राईव्ह करून दिला जाणार आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल शाखेच्या बाजूला आधारशी संबंधित कामे केली जातात. वारंवार रजिस्ट्रेशन करणाऱ्या नागरिकांसाठी तेथे गुरूवारी स्वतंत्र किट उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांनी आधारची रीसिट दाखवून त्रुटी दूर करून घ्याव्यात. गर्दीचा ओघ वाढल्यास आणखी एक किट उपलब्ध करून दिले जाईल.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांचा जमला मेळा

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुलाबी थंडीचा महिना आणि नाताळच्या सुट्यांचा उपयोग करून घेणसाठी निसर्गप्रेमी पर्यटक सध्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षीनिरीक्षणाची मजा लुटत आहेत. देशी आणि स्थलांतरित पक्षांचे नांदूरच्या पाण्यात सुरू असलेला नयनरम्य विहार पाहताना पर्यटकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या पर्यटकांच्या यंदाची गर्दी ही जास्त असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

जागतिक पाणथळ क्षेत्र म्हणून नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य घोषित झाले आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात येथे पक्षीप्रेमी, पर्यटक देश विदेशातील पक्षांचा किलबिलाट आणि त्यांचा विहार पाहण्याचा, तो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येतात. या पक्षांत प्रामुख्याने पेंटेड स्टार्क, प्लेमिंगो, काँब डक कामन, टेल विजन, गढवाल आदींसह इतर पक्षी येतात. यातील काही पक्षीतर आता येथेच स्थायीक झाले असून ते वर्षभर पाणवठ्यावर दिसतात.

या पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक भेटी देत आहेत. मागच्या महिन्यात झालेल्या पक्षीगणनेनुसार २० हजार पक्षी नांदुरमध्यमेश्वरच्या अभयारण्यात मुक्त विहार करीत आहेत. गेल्या काही वर्षांत याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाल्याने यावर्षी अभयारण्यात गर्दी वाढली आहे. कॉमन क्रेन या स्थलांतरित पक्षांची ७०० पेक्षा अधिक संख्या आहे.

शासनाच्या वन्यजीव विभागाने या परिसरात अनेक सुविधा केल्याने पर्यटकांना मनसोक्त पक्षीनिरीक्षण करता येत आहे. चापडगाव, मांजरगाव आणि खाणगाव बंधारा या ठिकाणी पक्षाच्या दर्शनासाठी पर्यटक भेटी देत आहेत. चापडगाव येथील पक्षीनिरीक्षण स्पॉटवर जास्त गर्दी आहे. या ठिकाणी पाच मनोरे आणि पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी गार्डन, जवळच खाणगाव येथे पक्षी निर्वेचन केंद्र आहे.

परिसरात हॉटेल्स आणि पक्षीप्रेमींना मुक्कामासाठी इको हट, गेस्ट हाउसची व्यवस्था आहे.

गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार व सोमवार सलग सुटी आल्याने अभयारण्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरातील शाळांना नाताळच्या सुट्या असल्याने अजूनही या परिसरात गर्दी कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात चार हजार पक्षीप्रेमींनी भेट दिली. डिसेंबर महिन्यात शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या केवळ तीन दिवसात चार हजार पेक्षा अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली. गुजरात, मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून पर्यटक आले होते. यातून वनविभागाला शुल्क आकारणीतून चांगली रक्कम जमा झाली आहे.

गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड पाहता यावर्षी पक्षीनिरिक्षणासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी ही रेकॉर्डब्रेक आहे. येथे वन्यजीव विभागामार्फत पर्यटकांसाठी पार्किंग, हॉटेल्स, मुक्काम या प्राथमिक सुविधांसह पक्षीनिरीक्षणासाठी प्रशिक्षित गाईड व दुर्बिणीची व्यवस्था आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे.

- बी. के. ढाकरे, वनपरिक्षेत्रपाल,

नांदुरमध्यमेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हागणदारीमुक्त मालेगाव’ फसवे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता व औषध फवारणी नियमित होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली गेली मात्र हा केवळ फार्स ठरला असल्याचा आरोप करीत मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ‘आम्ही मालेगावकर’ विधायक संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणात समितीचे निखिल पवार, देवा पाटील, राहुल देवरे, रविराज सोनार, योगेश निकम, सतीश कलंत्री, दीपक भोसले, हाजी सलाम कुरेशी, शेखर पगार, कुंदन चव्हाण, दीपक पाटील, विवेक वारुळे, प्रदीप पहाडे, सुरेश पिंगळे, हरीश मारू, गणी शाह, दीपक महाजन, लोटन शेवाळे आदींसह कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायाब तहसीलदार सायनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात शहरातील छोट्यामोठ्या गटारिंसह प्रमुख गटारीही तुडुंब भरल्या आहेत. मनपाच्या घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी नियमित फिरत नाहीत. शहर स्वच्छतेसाठी वॉटरग्रेस कंपनी कुचकामी व अकार्यक्षम ठरली असून, कोणतीही कारवाई करायला प्रशासन धजावत नाही. तसेच कागदोपत्री करोडो रुपये खर्च करून घेतलेले औषध फवारणी यंत्रणा कुठे आहे? असा प्रश्न समितीने उपस्थित केला. आंदोलनस्थळी उपायुक्त राजू खैरनार यांनी भेट देऊन चर्चा केली. ४ जानेवारी रोजी येणाऱ्या सर्वेक्षण टीमला काळे झेंडे दाखविण्याचा ईशारा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितिने दिला.

शौचालयांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

समितीच्या कार्यकर्त्यांनी शहर केवळ कागदोपत्री हागणदारीमुक्त झाल्याचा आरोप केला. शौचालयांच्या कमतरतेमुळे नागरिकांना सकाळी शौचासाठी ताटकळत उभे राहावे लागते. सार्वजनिक शौचालयांची बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून अवघ्या काही महिन्यातच बांधकाम ढासळत चालले आहे. व्यक्तिगत शौचालय व सार्वजनिक शौचालयांची कमतरता व दुरवस्था हागणदारीमुक्त मालेगाव ही घोषणा केवळ कागदोपत्री ठरली असल्याचा आरोपही करण्यात आला.

पंतप्रधानांना पाठविणार निवेदन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना याबाबत निवेदन पाठवून हागणदारीमुक्त मालेगावचे पुन्हा सर्वेक्षण करावे, गुप्तवार्ता विभागातर्फे गोपनीय अहवाल घ्यावेत, शौचालय बांधकामाची सखोल चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, मालेगाव शहरात स्वछता औषध फवारणी नियमित करण्याचे आदेश द्यावेत, हागणदारी मुक्त मालेगाव निर्माण करण्यासाठी शाश्वत उपाय योजना कराव्यात अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी खान

0
0


म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरी नगरपाल‌किेच्या उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक योगेश चांडक व ज्येष्ठ शिवसैनिक विनोद कुलथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीनंतर बुधवारी पहिली सर्वसाधारण सभा झाली. मुघ्याधिकारी डॉ. विजय कुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नईम खान यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी नईम खान यांची बिनविरोध निवड केल्याची घोषणा नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी केली. तर स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी नगर परिषदेवर शिवसेनेचे स्पष्ठ बहुमत असल्यामुळे शिवसेनेकडून योगेश चांडक व विनोद कुलथे यांचे दोन अर्ज दाखल झाले. दोन्ही स्वीकृत पदाचा अधिकार शिवसेनेला असल्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध करण्याची घोषणा इंदुलकर यांनी केली.

नगरसेवक सुनील रोकडे, मीना खातळे, उमेश कस्तुरे, उज्वला जगदाळे, आशा सोनवणे, गजानन कदम, सिमा जाधव युवराज भोंडवे, किशोर बगाड, रोशनी परदेशी, आरती करपे, रंगनाथ चौधरी, भाजपचे नगरसेवक अपर्णा धात्रक, गीता मेंगाळ, साबेरा पवार, दिनेश कोळेकर, अपक्ष नगरसेवक संपत डावखर आदी उपस्थित होते. शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून या निवडीचे जंगी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईग्रस्त चांदवड तालुक्यातील दरेगावात मनमाड महाविद्यालयाच्याराष्ट्रीय सेवा योजनेच्या शिब‌रिादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून बंधारा बांधल्याने या गावात पाणी साठविण्यासाठी सोय झाली आहे. या उपक्रमाचे दरेगावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिब‌रि दरेगाव येथे पार पडले. या शिबिरात सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रा. जे. के. देसले, प्रा. ज्योती बोडके व प्रा. पी. व्ही. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात बंधारा बांधण्याचे ठरवले. या गावातील बंधारा पावसाळ्यात वाहून गेल्याने पाणीसमस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्रमदान करून बंधारा बांधायचे ठरवले. शिब‌रिात रोज सकाळी ८ ते १ या वेळेत श्रमदान करून बंधारा बांधला. सरपंच अनिल देवरे व इतर पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे या कामामुळ कौतुक केले आहे. प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी या राबणाऱ्या हातांचे व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्राध्यापकांचे कौतुक केले.

गुडमॉर्निंग पथकही बनविले

या शिबिरात मुलांनी पहाटे लवकर उठून दरेगाव येथे हागणदारीमुक्त गाव व्हावे म्हणून गुड मॉर्निंग पथकाचे देखील काम केले. प्लास्टिक टाळण्यासाठी ग्रामस्थांना प्रबोधन केले. स्वच्छतेचा मूलमंत्र गावातील लोकांच्या मनात पेरला. त्यामुळे हे शिब‌रि अधिक लोकाभिमुख ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजच्या बलिदानाचा विद्यापीठाला विसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील पहिल्या २० विद्यापीठांच्या यादीत येण्याचे नवे ध्येय बाळगणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ब्रिटनमध्ये पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या दिवंगत विद्यार्थ्यांचा विसर पडला आहे. विद्यापीठाची परिसीमा इतकी की हल्लेखोराच्या हल्ल्यात बलिदान गेलेल्या अनुजच्या नावे दिली जाणारी मोठी स्कॉलरशीप पहिली दोन वर्षे दिली गेली. मात्र, त्यानंतर विद्यापीठाने माहितीच अपडेट न केल्याने या स्कॉलरशीपचा लाभ कुणीही विद्यार्थी घेऊ शकला नाही.

अनुज सुभाष बिडवे हा अवघा २३ वर्षांचा मूळ पुण्यातील निवासी विद्यार्थी युकेमध्ये लँकशायर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता. अनुजचे आजोळही नाशिक येथील होते. अनुज तेथे ‘मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयात ‘एम. एससी.’ अभ्यासक्रमात शिक्षण घेत होता. त्याच्यावर २६ डिसेंबर २०११ च्या रात्री एका माथेफिरू विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात अनुजचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय युवकांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता.

या घटनेनंतर लँकशायर विद्यापीठाने अनुजच्या सद्गुणांची दखल घेत त्याच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात अनुजच्या नावाची कोनशीला उभारण्यासह त्याच्या नावे एका स्कॉलरशीपचीही घोषणा केली. ‘अनुज बिडवे स्कॉलरशीप’ धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला परदेशातील विद्यापीठात इंजीनिअरिंग विद्याशाखेतील उच्च शिक्षणासाठी या स्कॉलरशीप अंतर्गत २२ ते २५ लाख रुपयांची मदत देण्याचे नियोजन होते.

यानंतर पुढच्या वर्षी पुण्यातील ऋषीकेश देशपांडे या विद्यार्थ्याला स्कॉलरशीपचा लाभ झाल्याचा फोन अनुजच्या वडिलांना लँकशायर विद्यापीठातून आला. त्यांच्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याला या स्कॉलरशीपचा लाभ मिळाल्याचे त्यांच्या ऐकिवात आहे. मात्र, याबाबतचा तपशील अनुजच्या कुटुंबीयांकडे नाही.

विशेष बाब म्हणजे २६ डिसेंबर रोजी अनुजचा सहावा स्मृतीदिन झाला. पण दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर ‘अनुज बिडवे स्कॉलरशीप’बाबत माहिती अपडेट करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. याबाबत गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपची माहिती देण्याचीही तसदी घेतली गेली नाही. विद्यापीठाला अनुजच्या बलिदानाचा विसर पडल्याबद्दल हवाई दलातून निवृत्त झालेले अनुजचे वडील सुभाष आणि आई योगिनी बिडवे यांनी खंत व्यक्त केली आहे.

म्हणून पुणे विद्यापीठाकडून अपेक्षा
‘अनुज बिडवे मेमोरिअल स्कॉलरशीप’ ही लँकशायर विद्यापीठाकडून दिली जात असली तरीही ती केवळ पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाच दिली जाते. इतर कुठल्याही विद्यापीठातील विद्यार्थी यास पात्र ठरत नाही. पुणे विद्यापीठाच्या दिवंगत विद्यार्थ्याच्या नावे देण्यात येणाऱ्या एवढ्या मोठ्या स्कॉलरशीपची माहिती किमान वेबसाईटवर समाविष्ट आणि अद्यावत ठेवण्यात यावी, अशी अनुजच्या पालकांची अपेक्षा आहे. ते ही कार्य विद्यापीठाकडून होत नसल्याने विद्यापीठ अनुजचे बलिदान विसरल्याची भावना आहे.

आमच्यासाठी २०११ मध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, अनुजच्या नावे देण्यात येणारी स्कॉलरशीप अत्यंत मोठी आणि गरजू विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारी आहे. ही स्कॉलरशीप विद्यापीठाच्या उदासिनतेमुळे लुप्त झाल्याचे चित्र आहे. ही स्कॉलरशीप पुनरुज्जीवीत व्हावी.
- सुभाष बिडवे, दिवंगत अनुजचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images