Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी केदा आहेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक कोंडीत सापडेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी देवळा येथील केदा तानाजी आहेर यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी सकाळी चुरशीच्या राजकीय घडामोडीनंतर आहेर यांच्या नावावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ही माहिती त्यांनी फोनवरून दिल्यानंतर अन्य इच्छुक उमेदवार आहेर यांचे सूचक व अनुमोदक झाले. नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. गेले काही दिवस अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आली. मात्र, भाजपने आपल्या मुशीत वाढलेल्या आहेर यांना पसंती दिल्याने दिग्गज संचालकांचा हिरमोड झाला.

देवळा तालुक्यातील सोसायटी गटातून पहिल्यांदाच जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले आहेर यांच्यासाठी हे पद म्हणजे काटेरी मुकुट असल्याची जाणीव संचालकांनी करून देत शुभेच्छा दिल्या. १९९६ मध्ये सरपंच झालेले आहेर भाजपचे माजी मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांचे पुतणे, तर विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचे चुलतभाऊ आहेत. विविध पदे भूषविल्यानंतर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद त्यांना मिळाले आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत सर्व १९ संचालक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीत झालेल्या या सभेत इतिवृत्तावर संचालकांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर साडेअकरा ते बारापर्यंत नामनिर्देशनपत्र व स्वीकृतीसाठी वेळ देण्यात आली होती. मात्र, या वेळेत केवळ आहेर यांनीच फॉर्म भरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी त्यांनी दोन फॉर्म भरले होते. पहिल्या फॉर्मवर सूचक म्हणून परवेझ कोकणी, तर अनुमोदक म्हणून गणपत पाटील या ज्येष्ठ संचालकांनी सह्या केल्या. दुसऱ्या फॉर्मवर सूचक म्हणून माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे व अनुमोदक म्हणून संदीप गुळवे यांनी सह्या केल्या. त्यामुळे यातील कोकणी, कोकाटे व गुळवे हे तिन्ही इच्छुक सूचक, अनुमोदक झाले. संचालक आमदार सीमा हिरे, अनिल कदम, जे. पी. गावित यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याबरोबरच माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल व ज्येष्ठ संचालक गणपत पाटील, परवेझ कोकणी यांनी केदार यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

अशा घडल्या घडामोडी

जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार हे निश्चित होते. बँकेत एकूण २१ संचालक असून, दोन संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे १९ संचालकांमधून अध्यक्षपदाची निवड करायची होती. बहुमतासाठी १० संचालकांची गरज असल्यामुळे त्यासाठी जुळवाजुळवही सुरू केली गेली. त्यात कोकाटे व कोकणी यांच्यात रस्सीखेचही झाली. मात्र, कोकाटेंचे पारडे जड होते. त्यांच्याकडे अखेरच्या दिवशी १० संचालकांचे बळ होते, तर कोकणी यांच्याकडे सहा संचालक होते. भाजपने या दोघांना बाजूला ठेवून अखेरच्या क्षणी आहेर यांचे नाव फायनल केल्यामुळे शक्तिप्रदर्शन फारसे उपयोगी पडले नाही.

दराडे यांनी केली चाचपणी

ऐनवेळी राजीनामा दिलेले अध्यक्ष दराडे यांनी ही सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात राहावी, यासाठी प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे भाऊ व विद्यमान संचालक किशोर दराडे यांचे नाव पुढे केले. मात्र, संख्याबळाची जुळवाजुळव न झाल्यामुळे त्यांची चाचपणी फारशी उपयोगी पडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टुरिस्ट एजंटांनी पळविली पाच वाहने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटकांसाठी दरमहा भाडेतत्त्वावर वाहने घेत दोघांनी पाच वाहनांची परस्पर विल्हेवाट लावली असून, तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारे संशयितांनी इतर ठिकाणीही फसवणूक केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरहान जिलानी कोकणी आणि आवेश जिलानी कोकणी अशी फसवणुकीचा आरोप असलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी शिळफाटा (ठाणे) येथील वाहनमालक दिनेश ज्ञानेश्वर जाधव (रा. एकतानगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. जाधव यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी जाधव यांच्यासह त्यांच्या पाच वाहनधारक मित्रांशी संपर्क साधला होता.

मुंबईत पर्यटन व्यवसायासाठी वाहने दिल्यास महिना ३० ते ५५ हजारांपर्यंत पैसे देण्याचे आमिष संशयितांनी वाहनमालकांना दाखविले. वाहनाचा इतर खर्चही संशयित करणार होते. त्यामुळे जाधव यांच्यासह इतर वाहनमालक या व्यवहारासाठी तयार झाले. दोघा संशयितांनी त्या पाचही वाहनमालकांना शहरात बोलावून घेतले. जिल्हा कोर्टासमोरील एका व्यापारी संकुलात असलेल्या वकिलाच्या चेंबरमध्ये वाहन भाडे करार झाला. इसारापोटी काही रक्कम संशयितांकडून मिळाली होती. त्यानुसार वाहनमालकांनी आपल्याकडील इनोव्हा, निस्सान, बोलेरो, झायलो अशी वाहने संशयितांकडे सोपविली होती. मात्र, काही काळानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास अल्यावर तक्रार नोंदविण्यात आली.

--

जिवे मारण्याची धमकी

काही महिन्यांनंतर संशयितांनी भाडे करारानुसार ठरलेले मासिक पैसे देणे बंद केले. पैशाचा तगादा आला, की संशयित त्यांना चेक देऊन वेळ मारून नेत होते. मात्र, हे चेकदेखील बाऊन्स झाले. पैसे मिळत नसल्याने वाहनमालक वाहन परत घेण्यासाठी आले असता, थकित भाडे १३ लाख २५ हजार आणि वाहन देण्यास संशयितांनी नकार दिला. पुन्हा मागणी करण्यासाठी आले तर जिवे मारू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर वाहनधारकांनी लागलीच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. भाडे आणि वाहनांची रक्कम अशी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक एन. एस. मोहिते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर समाज अचेतन अवस्थेत जाण्याचा धोका

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

समाजातील घटनांची संवेदनशीलपणे नोंद घेऊन जे चुकीचे आहे, विद्रुप आहे ते बोलून दाखविले पाहिजे. ज्या समाजात कुणी बोलत नसतं तो समाज अचेतन अवस्थेत जाण्याचा धोका असतो. सध्या देशात सुरू असलेले जातीय, धार्मिक, सामाजिक कल्लोळ वेळीच आवरले गेले नाही तर देशात अराजक आणि यादवी अटळ आहे. हे बदलण्याकरिता आपण स्पष्टपणे बोलले पाहिजे, विरोध केला पाहिजे आणि जाती धर्माच्या पल‌िकडे जाऊन विवेकाच्या निकषावर विचार करून चूक आणि बरोबर ठरविले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार आणि कवी बालाजी सुतार यांनी केले

प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या व्याख्यानमालेत ‘कल्लोळाचे प्रहर:आजचे सामाजिक वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. कोपर्डी आणि खैरलांजी बलात्कारांचा उल्लेख करून सुतार म्हणाले की, मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात सारा समाज एकवटला असता तर त्याला संवेदना म्हणता आले असते. पण मुलींवरील अत्याचाराविरोधात नव्हेतर जातीसाठी लाखो लोक रस्त्यावर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील प्रभावी नेत्याच्या सुटकेकरिता नाशकात हजारोंचा मोर्चा निघाला. बाबा गुरमीत रामरहीमला अटक झाल्यावर सत्ताधारी पक्षाचे खासदार साक्षी महाराज म्हणाले की, पीडित मुलींच्या जबानीपेक्षा बाबाला मानणारे लाखो लोक काय म्हणतात ते ऐकले पाहिजे. लव्ह जिहादच्या नावावर माणसं जिवंत जाळून टाकली जातात आणि हे नृशंस कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराकरिता समाजातील लोक आर्थिक मदत गोळा करतात हे चित्र भयावह आहे. डॉ. दाभोळकर, डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांना गोळ्या घातल्या जातात. या सर्व घटना म्हणजे झुंडीला कायदा लागू नसतो व बळी तो कान पिळी ह्या मध्ययुगातील मानसिकतेकडे चाललेली वाटचाल आहे, असे मत त्यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेटल कोटेड मांजाची ‘एंट्री’

$
0
0

स्नेहल गिते, नाशिक

नायलॉनचा मांजा घातक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली असली, तरी आता बाजारात मेटल कोटेड मांजा दाखल झाला आहे. हा मांजा नायलॉनच्या मांजापेक्षाही घातक आहे. मात्र, तरीही त्याची खुलेआम खरेदी-विक्री होत असल्याने आगामी काळात अनेक समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.

मकर संक्रांतीस अजून अवकाश असला, तरीही पतंग, मांजा विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. नायलॉनचा मांजा विक्रीसाठी बंदी असतानादेखील हा मांजा, तसेच यंदाच दाखल झालेला त्यापेक्षा धोकादायक मेटल कोटेड मांजादेखील बाजारात सहज उपलब्ध होत आहे.

बाजारात बरेली, सुरती, साधा असे मांजाचे प्रकार उपलब्ध आहेत. ते बाजारात अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहेत. मात्र, मेटल कोटेड मांजावर धातूचे आवरण असल्याने तो सहजासहजी तुटत नसल्याने या मांजाला वाढती मागणी दिसत आहे. सध्या मेटल कोटेड मांजाचा दर ३०० रुपये प्रतिरीळ, तर साधा मांजाचा दर १५० रुपये प्रतिरीळ आणि चायनामेड मांजा १२० रुपये प्रतिरीळ असे दर असूनही मेटल कोटेड मांजाला मागणी वाढत आहे. मानवास, तसेच निसर्गातील विविध घटकांना घातक ठरणाऱ्या मांजाचा वापर टाळून पतंगप्रेमींनी पतंग उडविण्याचा आनंद घेणे अपेक्षित असतानाही हा स्थिती असून, या मांजामुळे अपघात होण्याची शक्यता वाढल्याने यासंदर्भात पुरेशी जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.

---

या दुर्घटनांची वाढली भीती

मेटल कोटेड मांजावर विशिष्ट धातूचे आवरण लावलेले असते. हा मांजा नायलॉनच्या मांजापेक्षाही जास्त मजबूत, तसेच घातकही आहे. कारण, धातूचे आवरण असल्यामुळे हा मांजा जर विजेच्या तारांच्या संपर्कात आला, तर पतंग उडविणाऱ्या व्यक्तीस विजेचा झटकादेखील बसू शकतो, तसेच पतंग उडविताना बोटांना इजादेखील होऊ शकते. वाहनचालकांसह पक्ष्यांसाठीदेखील हा मांजा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्याला वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

--

आपल्याला जसा मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे, तसा पक्ष्यांनाही मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे. आपण आनंद साजरा करताना पक्ष्यांच्या जिवाशी खेळ करता कामा नये.

-किरण सानप, पक्षीप्रेमी

--

आम्ही जरी दुकानात मेटल कोटेड, तसेच नायलॉनचा मांजा विक्रीस ठेवलेला नसला, तरीही असंख्य ग्राहकांकडून या दोन्ही मांजांची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.

-मांजा विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत नागरिकांना नाही कुणाचा आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील उर्दू शाळेत सुरू करण्यात आलेले आधार केंद्र केवळ नावापुरतेच आहे. दिवसभर केंद्र उघडे राहणार असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी हे केंद्र सतत बंदच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच या केंद्रचालकाकडून नागरिकांनाही सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सध्या कोणत्याही कागदोपत्री कामासाठी आधार सक्तीचे करण्यात आले आहे. त्यातच ज्यांनी पहिल्या टप्प्यांत आधार कार्ड काढले त्यांच्या कार्डावर असंख्य चुका असल्यामुळे आता दुरुस्तींसाठी आधार सेंटर्सचे उंबरे झिजवावे लागत आहेत. विशेष म्हणजे आधार आणि पॅन लिंक करतांनाही दोन्ही कार्डवरील नावातील स्पेलींगमध्ये जराही बदल असला तरी ते लिंक होत नाही. त्यामुळे नागरिक या लिंकिंग आणि दुरुस्तीच्या फासात पुरते अडकले आहे. त्यातच शालेय विद्यार्थ्यांनाही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्यामुळे त्यांचेही नोंदणीसाठी हाल होत आहेत. पालकांसह घराघरातील विद्यार्थी नोंदणी आणि दुरुस्तीसाठी आधार केंद्राच्या शोधात असल्याचे दिसत आहे.

फलकवर सूचनांचा भडीमार

प्रशासनाने सिडकोतील उर्दू शाळेत आधार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरील सूचनाफलकावर केंद्र सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहणार असल्याची नोंद आहे. असे असले तरी प्रत्यक्षात हे केंद्र बंद आहे. त्याचबरोबर दिवसभरात फक्‍त तीसच जणांना आधारचे फॉर्म दिले जाणार असून, त्यांनाच नंबर देण्यात येत असल्याची पद्धत येथे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक पहाटेपासूनच याठिकाणी रांगा लावतात. .

तोरणानगर येथे असलेले आधार केंद्र कधी उघडे असते, तर कधी बंद असते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. त्याचबरोबर दररोज केवळ तीस फॉर्म देण्यात येत असल्याने या फॉर्मसाठी नागरिक गर्दी करतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून प्रशासनाने याची दखल घ्यावी.

- पंकज जाधव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कैद्याची ससेहोलपट कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाची अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या वकिलाने तीन महिन्यानंतरही एक पैसाही परत केलेला नाही. उलट माझ्याविरोधात तक्रारी करतात म्हणून वकिलाने धमकी देऊन पैसे देण्याबाबत हात वर केले आहेत.

श्रीहरी राजलिंगम गुंटुका असे या बंदीवानाचे नाव आहे. खुनाच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत श्रीहरीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, मागील सात वर्षांपासून तो नाशिक सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. १९९२ मध्ये श्रीहरीवर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे दोन महिने होते. ३ मार्च १९९३ रोजी श्रीहरीला जामीन मिळाला. त्यानंतर १२ वर्षे जामीनावर असलेल्या श्रीहरीला २००४ मध्ये कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यानंतर त्याची रवानागी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली. येथे श्रीहरीची ओळख हितेश पी. शहा नावाच्या कैद्याशी झाली. शहालाही खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. दोघांची मैत्री झाली. या दरम्यान शहाने ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये सुटका झाल्यानंतर शहाने वकिली व्यवसाय सुरू केला. जून २०१६ मध्ये शहाने सेंट्रल जेलमध्ये जाऊन श्रीहरीची भेट घेतली. अल्पवयीन असताना गुन्हा झाल्याने सदर खटला पुन्हा सुरू करण्यासाठी शहा यांनी श्रीहरीकडून जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तसेच ५० हजार रुपये मागितले. सुटका झाली नाही तर सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन शहा यांनी दिले. इतक्या वर्षांची ओळख असल्याने श्रीहरीने पत्नीला फोन करून त्वरित ५० हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार पत्नीने शहा यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर शहा यांनी पुन्हा श्रीहरीची भेट घेतली. हायकोर्टातून तुझा खटला सत्र न्यायालयात आला असून, त्याची बाल न्यायालयासमोर सुनावणी होणार असल्याचे शहाने सांगितले. तसेच, सर्व बाबी मॅनेज करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. सुटका होण्याच्या अपेक्षेने श्रीहरीसह त्याच्या पत्नीने दोन लाख रुपयांची जुळवाजुळवा करीत पैसे शहाच्या स्वाधीन केले. मात्र, शहा यांनी मुंबईत कोणत्यातरी एका वकिलास दहा हजार रुपये देऊन केस सुपूर्द केली. यानंतर परत शहा यांनी संपर्क ठेवला नसल्याचा आरोप श्रीहरीने केला आहे. याबाबत बंदीवानाने प्रसारमाध्यमांकडे लेखी निवेदन दिले. या संबंधी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहाने आपले काम सुरू असल्याचे सांगत बंदीवानाच्या पत्नशी संपर्क साधला. पैसे देण्याचे आश्वासन देत त्याने आणखी काही दिवस पुढे ढकलले. तसेच काही दिवसांपासून तुम्ही तक्रारी करता म्हणून पैसे देण्यास नकार दिला. बंदीवान श्रीहरीसह त्याची पत्नी पैशांची आणि न्यायाची आस लावून बसली आहे. दुर्दैवाने कायदा आणि प्रशासन तुर्तास तरी या दाम्पत्यांकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र तपासात ‘हरवली’ हत्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची अद्याप ओळखच पटलेली नाही. मुंबईकडे जाणारा शस्त्रसाठा ग्रामीण पोलिस दलाच्या हाती लागल्यानंतर सर्व यंत्रणा याच तपास कामात गुंतली. या कालावधीतील सटाणा येथील एटीएम फोडून पैसे पळवण्याचा तसेच वावी येथील दरोड्याच्या गुन्ह्याचाही तपास थंडावलेला आहे.

आंबेगण शिवारातील पाझर तलावात २७ नोव्हेंबर रोजी एका १६ ते १८ वयोगटातील मुलीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने मुलीची निघुर्ण हत्या केली. चेहऱ्याची ओळख पटू नये याची काळजी आरोपीने घेतली. यानंतर सदर मृतदेहाचे हातपाय बांधून तो एका गोणीत टाकला. या गोणीत दगड भरून तो आंबेगण शिवारातील पाझर तलावत टाकून दिला होता. साधारणतः तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची गोणी तरंगत पाण्याच्या वर आली. त्यानंतर खूनाच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले. मात्र, पहिल्या आठ ते १० दिवसात पोलिसांच्या हाती काहीही विशेष लागले नाही. शहरसह ग्रामीण भागात महिला, युवती तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यापार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण, शहर पोलिस, परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी बेपत्ता मुलींची माहिती घेतली. मात्र, यातूनही काहीच निष्पन्न झालेले नाही. पोलिसांनी शेजारील राज्यातही तपास सुरू केला. बेपत्ता मुलींची घेतली जाणारी माहिती अन सापडलेला मृतदेह यांच्यात अद्याप साधार्म्य दिसून आलेले नाही. तसेच हत्येची घटना उघडकीस येऊनही मुलीचे पालक समोर आले नाहीत. ग्रामीण पोलिसाने यामुळे ऑनर किलिंगच्या दृष्टीकोनातून शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली.

अन्य तपासासाठी पथक माघारी
दरम्यान, १४ डिसेंबरच्या रात्री मुंबईकडे मोठा शस्त्रसाठा घेऊन निघालेल्या तिघा संशयितांनी पोलिसांनी अटक केली. मुंबईतील टोळी युद्धाशी निगडीत या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दिंडोरी येथील अनोळखी मुलीची हत्या, सटाणा येथे एटीएम फोडून चोरी करण्यात आलेल्या २२ लाखांची रक्कम आणि त्यानंतर वावी येथे पडलेल्या दरोड्याच्या तपासला गती मिळाली नाही. एटीएमप्रकरणी पोलिसांचे एक पथक हिमाचल येथे पोहचले होते. मात्र, त्याचरात्री त्यांना शस्त्रसाठ्याच्या तपासासाठी माघारी बोलवण्यात आले.

हत्या, एटीएम फोडून झालेली चोरी आणि वावी येथील दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपासास लवकरच गती देण्यात येईल. शस्त्रसाठा पकडल्यानंतर या गुन्ह्याचा प्राधान्याने तपास करण्यात आला. पुढील आठ दिवसांनंतर प्राधान्यांनी याकडे लक्ष दिले जाईल.
- अशोक कर्पे, पोलिस निरीक्षक, एलसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राच्यविद्या परिषदेचे अधिवेशन आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे बारावे अधिवेशन सोमवारपासून (दि. २५) सुरू होणार आहे. अधिवेशन बुधवारपर्यंत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगरात (दि. २७) सुरू राहणार आहे.

संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सवातच अधिवेशनाचे यजमानपद बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, पुणे व एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजने संयुक्तरित्या भूषविले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडेदहा वाजता प्रि. टी. ए. कुलकर्णी सभागृहात अधिवेशनाचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आयआयटी मुंबईच्या मानव्यविद्या शाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हार कुलकर्णी संस्थेच्या मनुष्यबळ विकास संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या उपस्थिती राहणार आहेत. या तीन दिवसीय परिषदेत वेद आणि अवेस्ता, व्याकरण व भाषाशास्त्र, अभिजात साहित्य, धर्म आणि तत्वज्ञान, इतिहास आणि पुरातत्व विभाग, प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, नाशिक-इतिहास आणि संस्कृती या विषयांवर देशभरातील सुमारे २०० प्रतिनिधी चर्चा करतील, अशी माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आणि कॉलजेचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आणि अधिवेशनाच्या स्थानिक सचिव व संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अनुदान, त्रिधारा प्रकाशन पुणे, स्वरमाधव फाउंडेशन, प्रॉलिफिक् लँग्वेज अॅकॅडमी नाशिक यांचे अधिवेशनास प्रायोजकत्व लाभले आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. रूपन सिंग, डॉ. एस. आर. खंडेलवाल नियोजन करत आहेत.

या दिग्गजांची हजेरी
प्राच्यविद्या परिषदेचे कार्याध्यक्ष भांडारकर इन्स्टिट्यूटचे डॉ. गणेथ थिटे, डेक्कन विद्यापीठाचे डॉ. प्रसाद जोशी, वाईच्या डॉ. अंजली पर्वते, मुंबई विद्यापीठाचे डॉ. साहेबराव निगळ, राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे, पुणे विद्यापीठाचे प्रा. मिहीर अर्जुनवाडकर, प्रा. डी. एम. पठाण आदी उपस्थित राहणार आहे. बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. एम. के. ढवळीकर, सचिव डॉ. बहुलकर, सहसचिव डॉ. श्रीनंद बापट हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शन व नाटिका
अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘वीक्षा’ (विस्डम) प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. आधुनिक शास्त्रांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर पारंपरिक शास्त्रात उत्तर शोधण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात करण्यात येईल. तसेच कॉलेजच्या ग्रंथालयासमोरील जागेत मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता ‘मृच्छकटीकम्’ या नाटकाचे सादरीकरण होईल. या नाटकाची संस्कृत रंगावृत्ती प्रथमच सादर होत असून तिचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य विद्यार्थ्यांनी केले आहे. अधिवेशनाचा समारोप बुधवारी (दि. २७) दुपारी २ वाजता राज्य सरकारच्या राजपत्राचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांच्या उपस्थितीत होईल. गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार अपघातामध्ये पतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी मार्गावर पाथरे गावाजवळ रस्त्याच्या कडेला झाडावर कार धडकून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

अंबादास देवराम गांगवे (३७, बारागावपिंप्रि) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी वैजापूर येथे जात होते. मात्र, मार्गातच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारागावपिंप्री (ता. सिन्नर) येथून कारने (एमएच ०३ एस २७६४) जात असताना समोरून आलेल्या भरधाव वाहनाला चुकवताना पाथरे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर गांगवे यांची कार धडकली. यात गांगवे, त्यांची पत्नी आणखी एक जण असे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी शिर्डी येथे हलविले. रस्त्यातच गांगवे यांचे निधन झाले. अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक उपनगराध्यक्षपदी कोण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे थेट नगराध्यक्षांच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. नगराध्यक्षांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून २५ दिवसांच्या नगराध्यक्षांनी पहिली सर्वसाधारण सभा बोलावणे आणि पिठासन अधिकारी म्हणून ही निवड प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर यांचे नाव १४ डिसेंबरच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे. तेथून पुढे २५ दिवस म्हणजेच आठ जानेवारीपूर्वी पहिली सभा होणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत गट नेत्यांची नोंदणी झालेली नाही. त्र्यंबक नगरपालिकेत भाजपचे १४ आणि नगराध्यक्ष म्हणजेच १५ सदस्य संख्याबळ आहे. त्याच्याखालोखाल शिवसेना दोन आणि अपक्ष एक असे सदस्य आहेत. १८ सदस्यांच्या १० टक्के म्हणजेच दोन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यांचे नामनिर्देशन नोंदणी केलेले गटनेते करतील, अशी शक्यता आहे. भाजपच्या गोटातील मान्यवरांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागणार हे संख्याबळाच्या आधारे दिसून येते. दरम्यान अद्याप गटनेते जाहीर झालेले नाहीत त्यामुळे स्वीकृतबाबत उत्सुकता कायम आहे.

निवडणूकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांनाही उपनगराध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत मतदान करता येणार आहे. तसेच समसमान मते पडल्यास नगराध्यक्षांना असलेल्या निर्णायक मताचा वापर त्यांना करता येणार आहे. कलम २ (७) आणि कलम २ (४९) प्रमाणे थेट नगराध्यक्षांचा तौलनिक संख्याबळ निश्चित करतांना सदस्य म्हणून विचारात घेतले जाते. नामनिर्देशित म्हणजेच पूर्वी स्वीकृत सदस्य म्हणायचे त्यांची निवड करतांना पक्ष/गट/आघाडीचे प्रमुख या सदस्यांचे नामनिर्देशन करणार आहेत. सदस्यांचे अर्ज प्रथम बैठकिच्या किमान २४ तास आगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाच्या पात्रतेच्या पुरावे छाननीसाठी सादर करावयाचे आहेत. जिल्हाधिकारी पात्र नामनिर्देशित सदस्यांची यादी नगराध्यक्षांना देईल आणि त्यानंतर पक्ष/गट/आघाडीचे नेते यांनी दिलेल्या क्रमानुसार अनुज्ञेय संख्येत सदस्यांची नावे नगराध्यक्ष जाहीर करतील. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या १४ सदस्यांमध्ये चुरस आहे. अर्थात, यापैकी कैलास चोथे, स्वप्निल शेलार आणि अनिता बागुल यांची नावे चर्चेत आहेत.

अपक्ष घागरे तटस्थ

अपक्ष नगरसेवक अशोक घागरे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणीसाठी अर्ज केला होता; मात्र एकमेव सदस्याची गट म्हणून नोंदणी करता येत नाही, असे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे घागरे यांनी आपण स्वतंत्र राहणार असून कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रभाग ३ अ मधील मतदारांनी आपणास अपक्ष म्हणून मतदान दिले. त्यामुळे आपणास सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आदर आहे. कोणत्याही एका पक्षात आपण प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलशनाबादच्या गुलाबाचा उडाला ‘रंग’

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात लग्नतिथी नसल्याने गुलाबाची मागणी एकदमच कमी झाली असून त्याचे दरही वेगाने खाली आले आहेत. लांब दांडीचा टाटा गुलाब १० रुपये डझन तर आखूड दांडीचा टाटा गुलाब केवळ ५ रुपये डझन अशा दराने विकला जात आहे.

गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात गुलाब फुलाची शेती केली जाते. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई धुमधडाक्यात सुरू झाली. एकापाठोपाठ एक तिथीमुळे लग्नसाठी लागणाऱ्या विविध बाबींची उलाढाल मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यात गुलाब फुलांना चांगली मागणी होती. मात्र, आता लग्नसराईच नसल्याने गुलाबाची मागणी घटली आहे. त्याचा थेट परिणाम गुलाबाच्या दरावर झाला आहे.

दसरा आणि दिवाळीनंतर फुलांची मागणी लग्नसराईच्या काळात वाढते, लग्नतिथींचा विचार करून गुलाबाचा पुरवठा करण्यावर फुलांचे उत्पादन घेणाऱ्यांचा कल असतो. लग्नासाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. विविध प्रकारच्या फुलांचा वापर हार, गुच्छ, बुके, डेकोरेशन आदींसाठी केला जातो. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून गुलाब फुल देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गुलाबाला लग्नसराईत मागणी वाढते. गेल्या काही दिवसांपासून लग्नतिथी नसल्यामुळे ही मागणी घटली आहे. त्यामुळेच गुलाबाची ५ ते १० रुपये डझन या दरात विक्री होत आहे. ऐरवी लग्नसराईत याच गुलाबाला २० ते ५० रुपये इतका दर मिळतो.

फुलांचे दर (रुपयांमध्ये)
जर्बेरा : २५ ते ३०
शेवंती : २० ते ३०
झेंडू (छोटे क्रेट) : ४० ते ५०
झेंडू (मोठे क्रेट) : ८० ते १००
कलर गुलाब : १५ (प्रति नग)

वर्षाच्या अखेरच्या दिवसात लग्नतिथी नसल्याने गुलाबाची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम गुलाबाच्या दरांवर झाला आहे. ५ ते १० रुपये प्रति डझन अशा दरात गुलाबाची विक्री करण्याची वेळ आली आहे.
- स्वप्नील घोडे, फुल विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमस कार्निव्हलमध्ये बच्चेकंपनी दंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाणी म्हणत, खेळांची मजा लुटत, सेल्फी काढत, सांता क्लॉजसोबत डान्स करत बच्चेकंपनी दंग झाली होती. निमित्त होते, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने आयोजित ख्रिसमस कार्निव्हलचे. रॉकिज अॅण्ड डुडलर्स येथे रविवारी हा कार्निव्हल उत्साहात पार पडला.

मटा कल्चर क्लबतर्फे सर्व वयोगटांचा विचार करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बच्चेकंपनीला सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या असून यानिमित्त कल्चर क्लबतर्फे ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. ख्रिसमस म्हटलं की आठवतो सांताक्लॉज, गिफ्ट आणि धमाल मस्ती. मात्र, महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी यंदाचा ख्रिसमस स्पेशल ठरावा यासाठी हा कार्निव्हल घेण्यात आला. बच्चेकंपनीला आवडतील अशा सर्व गोष्टींचाच या कार्निव्हलमध्ये समावेश होता. डीजे म्युझिकवर ताल धरत वेगवेगळे गेम्स यावेळी खेळण्यात आले. तसेच डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही अशा जादूंचे प्रयोगही यावेळी त्यांना पाहायला मिळाले. हातावर, फेस पेंटिंग, वेगवेगळे टॅटूही अनेकांनी काढून घेतले. कार्निव्हलमध्ये विशेष आकर्षण ठरले ते सांताक्लॉजचे. खाऊची पोटली घेऊन आलेल्या सांताने बच्चेकंपनीसाठी धमाल केली. शिवाय त्यांना चॉकलेट आणि केकचे वाटपही केले. एकाच ठिकाणी ख्रिसमसची पुरेपूर धमाल करायला मिळाल्याने लहान मुलांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही ख्रिसमस स्पेशल ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेरा’ बिल्डर्स-ग्राहक हिताचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘रेरा’ कायदा बिल्डर्स तसेच खरेदी करू इच्छ‌िणाऱ्या ग्राहकांच्या हिताचा आहे. त्यामुळे या कायद्याकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे, असे आवाहन महाराष्ट्र सरकारचे महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

‘क्रेडाई’च्या वतीने डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित शेल्टर २०१७ प्रदर्शनात रेरा आणि मुंबई हायकोर्टाचा अलिकडील निकाल या विषयावर कुंभकोणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर अॅड. जयंत जायभावे, ‘क्रेडाई’चे उदय घुगे उपस्थ‌ित होते. वकील, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थ‌ित होते. यावेळी कुंभकोणी म्हणाले, की देशात सध्या बदलाचे वातावरण असून रेरा त्याचाच भाग आहे. हा कायद्यामुळे ग्राहक व बिल्डर्सला मानसिकता बदलावी लागणार आहे. सर्वांनी योग्यरितीने कायदा राबविला तर तो चांगला व परिणामकारक ठरेल. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथोरिटी डेव्हलपमेंट अॅक्ट (रेरा) असे या कायद्याचे नाव आहे. परंतु, ‘रेरा’ असा शब्दोच्चार करताना त्यामधील डेव्हलपमेंट हा शब्दच वगळण्यात आला आहे. त्यामुळेच या कायद्याला नकारात्मकता प्राप्त झाल्याची खंत कुंभकोणी यांनी व्यक्त केली. पूर्वी बिल्डर्सची फ्लॅट विकण्याची पद्धती अपारदर्शक होती. प्लॅन मंजूर आहे की नाही, परवानग्या सर्व आहेत की नाहीत हे ग्राहकांना कळत नसे. ग्राहक आपल्याला केव्हाही कोर्टात खेचू शकतो, असे बिल्डर्सला वाटायचे. तर बिल्डर्स आपली फसवणूक करीत नाहीत ना या विचाराने ग्राहक अस्वस्थ असायचे. परंतु, ‘रेरा’मुळे दोघांनाही आपली जबाबदारी व बांधिलकीची जाणीव होणार आहे. या कायद्यान्वये बांधकाम प्रकल्पाची माह‌िती वेबसाइटवर टाकणे अनिवार्य आहे. पारदर्शकता, कमीत कमी जोखीम आणि प्रकल्पाची माहिती हे रेराचे बलस्थान आहे. त्यामुळे फसण्याची आणि फसविण्याची जोखीम कमी झाल्याचा विश्वास त्यांनी बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना दिला. बिल्डर्स आणि ग्राहकांचे वाद होऊ नयेत यासाठीच ‘रेरा’ असून खोटे बोलणारे तसेच फसविणारे अशी बिल्डर्सची प्रतिमा पुसण्यास रेरा रजिस्ट्रेशनमुळे मदत होत असल्याचेही ते म्हणाले.

‘रेरा’च्या वेबसाइटशी मैत्री करा
‘रेरा’बाबत maharera.mahaonline.gov.in या वेबसाइटवर सोप्या भाषेत माहिती मिळते. ही यूजर फ्रेंडली वेबसाइट असून प्रत्येकाने तिच्याशी मैत्री करायलाच हवी, असा आग्रह कुंभकोणी यांनी यावेळी धरला. १ मे २०१८ नंतर कोणीही आपली शंका अथवा तक्रार घेऊन ‘महारेरा’च्या कार्यालयात जाऊ शकणार नाही. वेबसाइटवरूनच शंकांचे निरसन करवून घ्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. सद्यस्थ‌ितीत सुरू प्रत्येक प्रकल्पासाठी हा कायदा लागू आहे. परंतु, कायद्यात अनेक त्रुटी असून तरतूदी व्हायला हव्यात. फ्लॅटची क‌िंमत कशी ठरवावी व कशी असावी याबाबत कायद्यात कोणतीच तरतूद नाही या त्रुटीवरही त्यांनी बोट ठेवले. ‘क्रेडाई’चे नाशिक जन्मस्थान आहे. त्यामुळे येथील बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाची फसवणूक केली म्हणून त्याच्यावर ‘रेरा’ अन्वये गुन्हा दाखल होणार नाही यासाठी काळजी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेल्टरला तुफान प्रतिसाद

शेल्टर २०१७ या प्रदर्शनाला रविवारी नाशिककरांनी तुफान प्रतिसाद दिला. फ्लॅट, प्लॉट खरेदी करू इच्छ‌िणाऱ्यांना असंख्य पर्याय येथे पहावयास मिळत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच प्रदर्शनाला गर्दी लोटली. आपल्या बजेटमध्ये काय मिळू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी बिल्डर्सच्या स्टॉल्सवर नागरिकांनी गर्दी केली. शंकांचेही निरसन करवून घेतले. दुपारनंतर गर्दीचा ओघ अधिकच वाढला. त्यामुळे सायंकाळी डोंगरे वसत‌िगृह आणि आसपासच्या परिसरात वाहने उभी करण्यासही जागा शिल्लक नव्हती. प्रदर्शनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचाही नागरिकांनी आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून नियमित उड्डाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कन कंपनीच्या वतीने मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांसाठी मंगळवारपासून आता नियमित सेवा सुरू होणार आहे. शनिवारी या सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर रविवारी फक्त पुण्यासाठीच विमानाने उड्डाण घेतले. मुंबई येथील सकाळची सेवा मात्र रद्द करण्यात आली. सोमवारी ही सेवा बंद असल्यामुळे मंगळवारपासून दोन्ही शहरांसाठी ‌नियमित उड्डाण सुरू होणार आहे.

शनिवारी पुणे येथे विमान झेपावल्यानंतर रात्री १२ वाजता हे विमान नाशिकला आले. त्यामुळे रविवारी ही सेवा देता आली नाही. आता या दोन्ही शहरांच्या सेवेचे बुकिंगही सुरू करण्यात आले असून, त्यामुळे पुढील दिवसांत ही विमानसेवा नियमित सुरू राहणार आहे. मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ पहाटे ६.२० वाजेची, तसेच येण्याची वेळ सायंकाळी ५.१०ची असणार आहे. पुणे येथे जाण्यासाठी नाशिकहून सायंकाळी ६.२० ला विमान उड्डाण करणार असून, ७ वाजता ते पुण्याला पोहचेल. त्यानंतर ७.२० ला ते परत फिरणार असून, ८ वाजता नाशिकला पोहचेल. त्यामुळे नाशिककरांचा मुंबई व पुणे कनेक्ट अधिक सोपा होणार आहे. या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईला जाण्यासाठी ५० मिनिटे, तर पुणे येथे जाण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ लागणार आहे.

वेळापत्रक सोयीचे

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ती २३ डिसेंबर रोजी सुरू झाली. नियमित सेवा २६ डिसेंबरपासून असेल. मुंबईचे वेळापत्रक कामाच्या सोयीसाठी चांगले असल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.

तिकीट दर किफायतशीर

विमानसेवेचा शुभारंभ झाल्यानंतर आता बुकिंग सुरू करण्यात आले आहे. मुंबईसाठी १२५० रुपये तिकीट दर आहे. पुणे येथे जाण्यासाठी १४२० रुपयांचे तिकीट लागणार आहे. हे दर कमी असल्यामुळे त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. साधारण टॅक्सीचे दरही या आसपासच आहेत. त्यामुळे विमानप्रवासावर प्रवाशांच्या उड्या पडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक संस्थेचा ‘गच्ची’ताबा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या टेरेसचा विकसकाने चालविलेला वापर हा बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शेकडो सभासदांनी संबंधित जागेवर हल्लाबोल केला. या वादग्रस्त जागेवर सभासदांनी कब्जा केला. या वेळी सभासदांनी घोषणाबाजी करीत टेरेसला असलेले विकसकाचे टाळे हातोड्याने तोडत संस्थेचे नवे टाळे तेथे लावण्यात आले.

जिल्ह्यातील शिक्षण संस्थांपैकी महत्वाची असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेत संस्थेच्या इमारतीवरील टेरेसचा विकसकाने बेकायदेशीर वापर चालविला असल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. विकसक टेरेसवर अतिक्रमण करूनही संचालक मंडळ गप्प का, असा सवाल काही सभासदांनी उपस्थित करीत संचालक मंडळाला धारेवर धरले. संचालक या प्रश्नी पाठपुरावा करण्यास तयार नसतील तर सभासदच ही जागा त्वरित ताब्यात घेतील, असा सूर उपस्थितांमध्ये एकमुखाने निघाला. विकसकांशी वारंवार संपर्क करूनही विकसक श्यामराव केदार आणि कंपनी अजिबात प्रतिसाद देत नसल्याचे संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सभेला सांगितले. यानंतर सभेतील ठरावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शेकडो सभासदांनी वसंत मार्केट इमारतीच्या टेरेसकडे मोर्चा वळविला. सभासदांनी टेरेसला अगोदर ठोकण्यात आलेले टाळे तोडून मध्ये प्रवेश केला. तेथे घोषणाबाजी झाल्यानंतर जागेवर नाईक संस्थेचा कब्जा झाल्याची घोषणा करण्यात आली. पुढील टप्प्यात या प्रश्नी कायदेशीर मार्गाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे संचालक मंडळाने सांगितले.

सभेमध्ये काही मुद्द्यांवर सभासदांमध्ये गटा-तटाचे दर्शन घडले असले तरीही टेरेसच्या वादग्रस्त मुद्द्यावर सभासदांचे मत विकसकाच्या विरोधात होते. अचानक शेकडोंच्या संख्येने सभासदांनी वसंत मार्केटमध्ये मोर्चा वळविल्याने परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण होते. सभासदांनी जागा कब्जात घेऊन घोषणाबाजी केल्यानंतर सभासद माघारी परतले. या प्रश्नी कायदेशीर मार्गाने जागा कब्जात घेण्याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आश्वासन अध्यक्ष आव्हाड यांनी सभासदांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुतर्फा पार्किंगने रस्ता ब्लॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

उंटवाडी परिसरातील नावाजलेल्या मॉलसमोरील रस्त्याच्या दुतर्फा सर्रास वाहने उभी केली जात असल्याने हा रस्ताच ब्लॉक होत असल्याची स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत असून, रविवारीही असेच चित्र दिसून आले.

येथील मॉलसमाेरचा रस्ता चक्क पार्किंगरोड बनला असून, त्यातील बहुतांश वाहने ही मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची असल्याने मॉलमध्ये येणाऱ्यांच्या वाहनांची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवालही उपस्थित होत आहे. मॉलतर्फे पार्किंगसाठी दुचाकी व चारचाकी चालकांकडून जादा शुल्क घेतले जात असल्यानेच रस्त्यावर पार्किंग करण्याची फॅशन सुरू झाल्याचा आरोप अन्य वाहनचालकांकडून केला जात आहे. याकडे महापालिका व वाहतूक पोलिसदेखील दुर्लक्ष करीत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.

काही काळापूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यावर मॉलच्या पार्किंगमध्येच वाहने पार्क केली जात होती. परंतु, मॉल चालकाने दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी शुल्क वाढविल्याने पुन्हा ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत असल्याने त्याचा त्रास अन्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात येत असल्याने वारंवार खोळंबा होईनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

--

उंटवाडी भागातील मॉलसमोर नेहमीच रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. पोलिसांकडून केवळ नावालाच कारवाई होत असल्याने इतरांना त्रास सहन करावा लागतो. याप्रश्नी ठोस कारवाई व्हावी.

-सुनीता दरेकर, त्रस्त वाहनचालक

--

समस्या भेडसावतेय?

तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला ‘दिसणाऱ्या’ बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे तुम्ही मांडू शकता ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यासपीठावर… MT Citizen Reporter या अॅपवर. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. तुमच्या माहितीची शहानिशा करून त्यास ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेच्या गाण्याचा उलगडणार प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी येत्या शनिवारी (दि. ३० डिसेंबर) ‘कवितेचे गाणे होताना’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.

संधिप्रकाशात, सांग सख्या रे, दमलेल्या बाबाची कहाणी यांसारखे पस्तीसपेक्षा अधिक अल्बम्स, नक्षत्रांचे देणे, मधली सुट्टी, ‘सारेगमप’सारख्या मालिका, तीसपेक्षा जास्त चित्रपटांचे संगीत, मैत्र जिवांचे यासारखे उत्कृष्ट कार्यक्रम सादर करणाऱ्या डॉ. सलिल कुलकर्णी यांची ‘कवितेचे गाणे होताना’ ही मैफल साऱ्यांनीच आवर्जून अनुभवावी अशीच आहे. सलिलजींची गाणी अन् मनसोक्त गप्पा, त्यासोबतच ‘चिंटू’ चित्रपटातील गाण्यांचा गायक शुभंकर सलील कुलकर्णी याला प्रथमच प्रत्यक्ष ऐकण्याचा योगदेखील या अनोख्या मैफलीच्या निमित्ताने नाशिककरांसाठी चालून आला आहे.

या कार्यक्रमाचा तिकीट दर २०० रुपये आहे. मात्र, मटा कल्चर क्लबच्या विद्यमान सदस्यांना सवलतीच्या दरात म्हणजे १०० रुपयांना एक तिकीट मिळेल. नव्याने सदस्य होणाऱ्यांना या कार्यक्रमाची दोन तिकिटे मोफत मिळतील. त्यामुळे या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन डझन वीजखांबांचे श्राद्ध!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील इंगळेनगर ते पवारवाडी कॅनॉलरोडवर वाहतुकीस अडथळा ठरणारे धोकादायक वीजखांब प्रशासनाला कळवूनदेखील वर्षभरापासून हटविले जात नसल्याने नागरिकांनी येथील तब्बल दोन डझन खांबांचे वर्षश्राद्ध घालून निषेध नोंदवला. प्रशासनाचे डोळे उघडणारी पाटीच या वीजखांबांवर लावून तिला हार घालून श्रीफळही वाढविले. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्याकडे तातडीने हालचाली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरातील या वर्दळीच्या रस्त्यावर दोन-चार नव्हे, तर तब्बल २४ धोकादायक वीजखांब वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला, तरी हे धोकादायक खांब न हटविल्यामुळे दिवसा व रात्रीही अपघात होत आहेत. निधीअभावी हे खांब हटविले जात नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी अखेर या वीजखांबांचेच वर्षश्राद्ध घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला. किमान आता ती हे खांब हटविले जातील, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

हे खांब हटविण्यासाठी परिसरातील नागरिक महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. अनेकदा निवेदने दिली. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. या खांबांवरून नाशिकरोडच्या आयएसपी, सीएनपीच्या फीडरची लाइन गेली आहे. हे खांब हटविण्यासाठी निधी महापालिकेने द्यायचा की महावितरणने यावरून वाद असल्याचे नागरिकांनी सांगितले. या खांबांबरोबरच शहरातील वीजतारा भूमिगत करणे व अन्य कामासाठी साडेतीन हजार कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे जीवघेणे खांब कायम आहेत. जेलरोडच्या खांबाना आम्ही रेडियम लावले असून, केशरी रंग दिल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, रात्री ते दिसतच नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेश जाधव, विलास रामराजे, किरण आहिरे, भीमराव बाविस्कर, सुरशे धात्र, सुरेश हिंगमिरे, मंगशे पवार, अनिल समदूर, नलिनी कसोटे, संजय तायडे, मारुती लोंढे, मंगेश तपासे, माया खैरनार, शिवाजी पाटील, प्रमिला बाविस्कर, हेमलता अहिरे, गंगाधर चव्हाण, नारायण इंगळे, निखिल पवार आदी हे धोकादायक खांब हटविण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. हे खांब त्वरित हटविले नाहीत, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

--

काय आहे समस्या?

जेलरोडवरील इंगळेनगर चौक भागातून एक रस्ता जेलरोड-बिटकोकडे, तर दुसरा उपनगर-पवारवाडी कॅनॉलरोडकडे जातो. पवारवाडी रस्त्यावरील अतिक्रमित मांसविक्रेते व अन्य टपऱ्यांची संख्या मोठी होती. हा रस्ता अरुंद व उखडलेला होता. महापालिकेने वर्ष-दीड वर्षापूर्वी येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून टपऱ्या हटविल्या. त्यानंतर तातडीने रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, रुंदीकरणानंतर इंगळेनगर चौकापासून पवारवाडीपर्यंत दोन डझनपेक्षा जास्त वीजखांब रस्त्यात आले. ते आजही कायम आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

--

अपघातांत अनेक जायबंदी

हा रस्ता चांगला झाल्याने दुचाकी व अन्य वाहने वेगात असतात. रात्री या रस्त्यावरील बहुसंख्य पथदीप बंद असतात. त्यामुळे रस्त्यात आलेले हे खांब दिसत नाहीत. रिक्षाचालक, कॉलेजचे दुचाकीस्वार युवक असे अनेक जण या खांबांवर धडकून जायबंदी झाले आहेत. या खांबांना चुकविण्याच्या प्रयत्नातही अपघात होत आहेत. या रस्त्यावर पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास भररस्त्यात खांबांचे जाळेच दिसते. मात्र, महापालिका व महावितरणला हे दिसत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

--

खांबांवरील फलकाचा आशय...

‘मनपा आयुक्त कारभारी, महावितरण कंपनी। रहदारी मार्ग, उभे-आडवे खांब मालमत्ता तुमची। तिजोरी जनतेची, वाट वाकडी करू नका। दखल घ्यावी, दुर्घटना टाळावी। विनंती हात जोडुनी!

-प्रभाग क्रमांक १८, दसक पूर्व कॅनॉलरोडचे त्रस्त नागरिक व वाहनचालक

--

इंगळेनगर-पवारवाडी रस्त्यावरील हे दोन डझन खांब दीड वर्षापासून जैसे थे आहेत. महापालिकेने रस्ता रुंद केला ही चांगली गोष्ट आहे. मात्र, रुंदीकरणाआधीच हे खांब हटविण्याचे नियोजन केले पाहिजे होते. आताही वेळ गेलेली नाही. त्वरित कृती करावी.

-गणेश जाधव, स्थानिक रहिवासी

--

महापालिका आणि महावितरणच्या वादात रोज अपघात होत आहेत. मात्र, तरीही खांब हटविले जात नाहीत, ही खेदाची बाब आहे. गंभीर अपघात झाल्यानंतर हे खांब हटवून उपयोग नाही. तातडीने हे खांब हटविले नाहीत, तर तीव्र आंदोलन केले जाईल.

-किरण आहेर, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक संस्थेच्या सभेत खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील शिक्षण संस्थांपैकी एक महत्त्वाच्या असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या सभेत काही मुद्द्यांवरून निर्माण झालेला गोंधळ काही वेळ हमरी-तुमरीवर येऊन पोहचला होता. परिणामी, सभेत थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांच्या गटातील ज्येष्ठ सभासदांचा सभेवर बहिष्कार असला तरीही उपस्थितांपैकी काही सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरल्याचे चित्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बघायला मिळाले.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या कॅनडा कॉर्नर येथील कॉलेजच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस संचालक मंडळासह जिल्हाभरातून सभासद उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्तविकात संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. इतर व्यवहारांचा तपशील मांडला. व्यासपीठावर धात्रक यांच्यासह अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, आमदार बाळासाहेब सानप आदी ज्येष्ठ संचालक उपस्थित होते.

यानंतर सभासदांच्या वतीने मनोज बुरकुले यांनी संस्थेच्या इमारतींच्या टेरेसचा गैरवापर होऊनही संचालक मंडळ हातावर हात धरून बसले असल्याचा आरोप करत संचालक मंडळास धारेवर धरले. या मुद्द्यावर संस्थेचे माजी सरचिटणीस पी. आर. गिते यांनीही परखड मत मांडत टेरेसचा विकसकाकडून बेकायदेशीर वापर सुरू असल्याचे सांगितले. हा प्रश्न जुना असताना संचालक मंडळाने विकसकावर कारवाई का केली नाही, असा सवाल यावेळी इतर सभासदांनी उपस्थित केल्यानंतर सभेत दोन गटांत हमरी-तुमरी झाली. यावेळी ज्येष्ठ सभासद लक्ष्मणराव सांगळे यांनी गोंधळ टाळून सभा खेळीमेळीत पार पाडण्याचे आवाहन सभासदांना केले.

या मुद्द्यासोबतच अनेक सभासदांना सभेच्या आदल्या दिवशी हाती मिळालेला वार्षिक अहवाल, अहवालातील त्रुटी, संस्था मालकीच्या इमारत टेरेसवरील अतिक्रमण, एनकेपीएलचे आयोजन आदी मुद्द्यांवरूनही गोंधळ झाला. सभेची सूचना सभासदांना वेळेत दिली जात नाही, अहवाल छपाईत त्रुटी राहतात कशा, बड्या देणगीदारांची विशेष दखल संस्था का घेत नाही, काही सभासदांना मुद्दाम का टाळले जाते, आदी मुद्दे यावेळी सभासदांनी उपस्थित केल्याने काही वेळ सभेचे वातावरण तापले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ थोरे यांनीही ताळेबंद आणि अहवालासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर गोंधळ उडाला होता.

कबड्डीच्या रेषेत गुरफटू नका!

नाईक शिक्षण संस्थेने नुकतेच एनकेपीएल या कबड्डी लीगचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठीच्या खर्चाचा एकूण तपशील अहवालात असला तरीही त्याचा बारिक-सारीक तपशील आणि प्रत्येक देणगीदारांची देणगी अहवालात का मांडली गेली नाही, असाही सवाल सभेत उपस्थित झाला. याशिवाय संस्थेचे माजी सरचिटणीस अॅड. गिते यांनी संचालक मंडळाचे कान टोचताना, कबड्डीच्या दीड मीटर रेषेवर अडकून बसू नका, तर ध्येय मोठे ठेवा असे सांगत संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासह संस्थेच्या दुरवस्था झालेल्या शाळांची स्थिती सुधारण्यावर भर द्या, असा सल्ला दिला.

माजी अध्यक्षांचा बहिष्कार

संस्थेच्या वतीने वार्षिक अहवालात मांडलेल्या जमा खर्चामधील तफावत, कब्बड्डी प्रिमियर लिगच्या खर्चाचा अपूर्ण तपशील यासह विविध अनियमित व्यवहार होत असल्याचा आरोप करीत नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांसह प्रल्हाद कराड पाटील, अॅड. का. का. घुगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपध्दतीबाबत त्यांनी पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषमतेमुळे विकास साध्य होत नाही!

$
0
0

साहित्यिक बाबूराव गुरव यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आज बहुजन समाज शिक्षणापासून वंचित असून, अंधश्रद्धा, विषमतेमुळे विकास साध्य होत नाही. प्रतिगामी शक्ती हे वृक्ष तोडण्याचे काम करीत आहेत, या भूमीत श्रमवाद व ब्राह्मणवाद हजारो वर्षांपासून सुरू आहे, असे मत साहित्यिक बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले.

शहादा येथील मीरा प्रताप लॉनमध्ये तेरावे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन सुरू आहे. रविवारी (दि. २४) दुसऱ्या दिवशी गटचर्चा व मांडणी या सत्राचे सत्राध्यक्ष साहित्यिक बाबूराव गुरव होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंचावर प्रा. श्रीरंजन आवटे (पुणे), के. डी. शिंदे, कॉ. अविनाश कदम (मुंबई), प्रमोद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुलेंनी बहुजनांचा शत्रू कोण याची मांडणी केली असल्याचेही गुरव यावेळी म्हणाले. यावेळी साहित्यिक कॉ. नजुबाई गावित, कविवर्य वाहरू सोनवणे, अरविंद कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, आरती पवार, प्रा. मनोज गायकवाड यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

समानता, मानवता, बंधुत्व मानणारा श्रमवाद आहे, तर वेदांती सुप्त पुरुषामधून आलेले वेद ग्रंथ हा ब्राह्मणवाद आहे, असे सांगत त्यांनी आपले विचार मांडले. कॉ. शरद पाटील यांना तीन वेळेस मारण्याचा प्रयत्न असून, त्यांना व त्यांचे साहित्य यांना समजून घेतले तर श्रमसंस्कृतीचे जतन करू शकतो, असे मत गुरव यांनी व्यक्त केले. भगवान महावीर व गौतम बुद्धांच्या मांडणीत श्रवण संस्कृती आध्यात्मिक मांडणीच्या रूपात असून, या दोघांनी अहिंसेची संस्कृती दिली आहे, असे ते म्हणाले. मूलभूत हक्कासाठी वीर खाज्या नाईक, कै. अंबरसिंग महाराज यांनी चळवळ केली आहे. भारतातील अनेक राज्यांपैकी केरळ राज्य सोडल्यास शिक्षणावर सहा ते आठ टक्के खर्च केला जातो. शिक्षणावर खर्चाची तफावत असल्याने बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, असेही गुरव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images