Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गाळणा किल्ल्याचे थ्री डी मॅपिंग

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT

नाशिक : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे अधिक कार्यक्षमतेने जतन व्हावे व संरक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून राज्यातील १५ किल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या किल्ल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील गाळणा किल्ल्याचा समावेश आहे.

राज्य सरकारने पुण्याजवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याचे उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी मॅपिंग केले होते हे मॅपिंग योग्य पद्धतीने झाल्याने राज्यातील १५ किल्ल्यांचेही अशाच पद्धतीने मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या राजगडाचे देखील मॅपिंग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (एमआरएससी) द्वारे हे काम होणार आहे. या उपग्रह मॅपिंगमध्ये स्थलाकृतिक सर्वेक्षण, रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि जीपीएस यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे काम लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे. पुरातत्त्व विभागासाठी रिमोट सेन्सिंगचा पहिल्यांदा वापर होणार आहे. यात मास्टर प्लॅन तयार करणे, किल्ल्याच्या आसपास असलेले अतिक्रमणे काढून टाकणे, बागकाम व लँडस्केपिंग आणि संरक्षणासाठी रेखाचित्रे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राजस्थानसारख्या राज्यांमध्ये किल्ल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तर महाराष्ट्र प्रथमच तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करणार आहे.

महाराष्ट्रात ३५३ किल्ले आहेत ज्यात ४९ राज्य सरकारचे संरक्षित आणि ५१ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) आहेत. या तंत्रज्ञानामुळे किल्ल्याचा भाग किंवा त्याचे तटबंदी कमकुवत आहेत, त्यांना मजबुतीकरण, संरक्षण नियोजन, अतिक्रमणे काढून टाकणे, पर्यटनास प्रोत्साहन देणे इत्यादी कामे हाती घेणे सोयीचे होणार आहेत

या किल्ल्यांचा समावेश
शिरगाव (कोकण विभाग), खर्डा, गाळणा (नाशिक विभाग), तोरणा, भुदरगड (पुणे विभाग), अँटूर, परांडा, दहूर (औरंगाबाद विभाग), औसा, कंधार, माहूर (नांदेड विभाग) आणि नागर्नधाण, माणिकगड आणि अम्बागड (नागपूर विभाग)

थ्री डी मॅपिंगमुळे किल्ल्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. ठराविक ठिकाणचा एखादा दगड निसटला तरी तो या माध्यमातून समजणार आहे. तसेच शैक्षणिक कामासाठी सुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर होणार आहे.
- विलास वहाने, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग

मटा भूमिका

जतन व संवर्धनासाठी समस्त गड किल्ल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेऊन सरकारने हा विषय अग्रक्रमात घेतला ही समाधानाची बाब आहे. आजपर्यंत गड-किल्ल्यांचे ढासळणे मूकपणे पाहण्याव्यतिरिक्त गडप्रेमीही काही करू शकत नव्हते. पुरातत्वच्या ताब्यात काही किल्ले असले तरी त्याच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडेही निधीची चणचण असे. आता या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने किमान तेथील स्थिती कळू शकेल. त्याबरहुकूम कामही करता येईल. पण, केवळ मॅपिंग करून थांबले असे सरकारी काम होता कामा नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीरामनगरमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मूळचा जळगावचा आणि शिक्षणासाठी नाशिकमध्ये रहात असलेल्या शुभम सुभाष पाटील (२१) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गळफास घेतल्याचे दिसून आले असले तरी त्याचे दोन्ही हात पाठिमागील बाजूस बांधलेले होते. त्यामुळे याप्रकरणी संशय वाढला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) उघडकीस आली असून घटनास्थळी शुभमने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे.

शुभम हा के. के. कॉलेजमधील विज्ञान शाखेत मायक्रो बायलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मुंबई-आग्रा महामार्गालगत, धात्रक फाटा येथील बळीरामनगर येथे त्याच्यासह पाच विद्यार्थ्यांनी रो-हाउसची खोली भाडेतत्वावर घेतली होती. दीड वर्षापासून ते तेथे राहत होते. दुमजली असलेल्या या रो-हाऊसच्या वरच्या मजल्यावर हे विद्यार्थी झोपत असत. दोन दिवसांपासून शुभम हा खालच्या खोलीत झोपायला जात होता, असे त्याच्या सहकारी मित्रांनी सांगितले. तो रविवारी (दि. १७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खाली झोपण्यास गेला. सकाळी त्याचा मित्र अक्षय तुकाराम अंबोरे याला तो स्वयंपाक घरात छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घाबरलेल्या अक्षयने इतर मित्रांना झोपेतून उठवले आणि याबाबत सांगितले. या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला. घाबरून गेलेल्या या मित्रांनी टाहो फोडला. या घटनेबाबत आडगाव पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. शुभमच्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती कळविण्यात आली. या प्रकरणाची आडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन सदाफुले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा थेट श्रीगणेशा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कन कंपनीकडून येत्या २२ डिसेंबरपासून थेट विमानसेवा सुरू होणार असून, त्यासाठी कुठलीही चाचणी घेतली जाणार नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तसेच, सेवेच्या या शुभारंभाची कंपनीने जोरदार तयारी केली असून, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रादेशिक विमानसेवा उडाण या अंतर्गत नाशिक-मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे-नाशिक, जळगाव-मुंबई-जळगाव आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या सेवेला एअर डेक्कनच्यावतीने प्रारंभ होत आहे.

याचअंतर्गत येत्या २२ डिसेंबर रोजी ओझर विमानतळावर सकाळी साडेसहा वाजता या सेवेचा शुभारंभ होणार आहे. कंपनीचे १९ आसनी विमान ओझरहून मुंबईला झेपावणार आहे. या सेवेसाठी कुठल्याही प्रकारची चाचणी कंपनीकडून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव विमानतळाची पाहणी करुन येत्या २१ डिसेंबरला तेथे चाचणी घेण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. मात्र, ओझर येथील विमानतळ सज्ज असून, येथे चाचणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सेवेच्या शुभारंभप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहण्याची चिन्हे आहेत.

कंपनीच्या विमानसेवेचा श्रीगणेशाच या सेवेने होणार असल्याने कंपनीने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. कंपनीचे चिफ एक्जिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन गोपिनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नाशिकला नाईट पार्किंग

कंपनीच्या १९ आसनी विमानाचे पार्किंग ओझर येथेच होणार आहे. त्यामुळेच पहाटे साडेसहा वाजता ओझरहून मुंबईसाठी सेवा दिली जाणार आहे. ओझर विमानतळाची धावपट्टी मोठी असून नाईट पार्किंगचीही सुविधा उपलब्ध आहे. त्याचा फायदा कंपनीला होणार आहे.

बुकिंगविषयी समाधान

नाशिकहून पुणे आणि मुंबई या दोन्ही विमानसेवेसाठी बुकिंगला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नाशिककरांकडून यापुढील काळातही बुकिंगला असाच प्रतिसाद मिळाले, असा विश्वास कंपनीला निर्माण झाला आहे. तशी कबुली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराबाहेर सांयकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना राजसारथी सोसायटी पाठीमागील बजरंग सोसायटी मार्गावर घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोद करण्यात आली.

सीमा रामचंद्र गिधाडे (रा. देवांग कॉम्प्लेक्स, बापू बंगला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास गिधाडे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या. बजरंग सोसायटीच्या मार्गावर पायी जात असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.

पाटीलनगरला घरफोडी
सिडकोतील पाटीलनगर भागात घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अजित अनिल खोडके (रा. पेठे हायस्कूल पाठीमागे पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दोन दिवसांसाठी खोडके कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ८५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

सायकलस्वार जखमी
भरधाव मालट्रकने हुलकावणी दिल्याने सायकलस्वार पडून गंभीर जखमी झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानीबाबा चौकात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
किरण नारायण गांगुर्डे (६२, रा. शिवदर्शन अपा. मोरेमळा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अपघाताची घटना रविवारी (दि. १७) दुपारी एक वाजेच्या सुमारास झाली. भीमनगरकडून मोरेमळा येथे सायकलवरून जाणाऱ्या गांगुर्डे यांना सैलानी बाबा चौकात पाठीमागून भरधाव मालट्रक (जीजे व्ही ८८४५) वरील चालकाने हुलकावणी दिली होती. या प्रकरणी ट्रकचालक अल्तनुर महम्मद मल्लीक (रा. दासलवाडा, जि. खेड, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

पिस्तुल बाळगणारे दोघे अटकेत
शहरात पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यातील एक संशयित अल्पवयीन असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.
पांडुरंग मुरलीधर लगड आणि त्याचा १६ वर्षीय साथीदार (रा. दोघे भैरव कॉलनी, अशोकनगर) अशी संशयितांची नाव आहे. काकडमळा भागात थांबलेल्या या संशयितांकडे पिस्तुल असल्याची माहिती युनिट दोनचे कर्मचारी लक्ष्मण सानप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपयांचा देशी बनावटीचा पिस्तुल आढळून आली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

होर्डिंगप्रकरणी गुन्हा दाखल
इंदिरानगर : नाशिक महापालिकेकडून सध्या विविध प्रकारची अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असून वडाळागाव परिसरात विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वडाळागाव परिसरात बंटीभाई शेख याच्या वाढदिवसाचे दोन होर्डिंग उभारण्यात आले होते. मात्र, यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे लक्षात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पूर्व विभागाने हे दोन्ही होर्डिंग काढून जप्त केले. तसेच प्रमोद लिमजे या महापालिका कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात; दोन ठार

$
0
0

नाशिक

नाशिक-मुंबई महामार्गावर टेम्पोच्या भीषण अपघातात एका पाच वर्षाच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या या टेम्पोला वालदेवी नदीजवळ अपघात झाला. अपघातात ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. त्यातील जखमींवर नजीकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वऱ्हाड घेऊन जाणारा हा टेम्पो पाथर्डीवरून अस्वलीला जात होता. भरधाव असलेल्या टेम्पोचे स्टेरिंग फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेमधून जखमी झालेल्या १५ ते २० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार्तिक दीपक माळी (वय ५) गोपाळ रमेश पवार (२५) यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमसंस्कार शिबिरातून सेवेचा संस्कार

$
0
0

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळेंचे मत

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमन कळते. श्रम, सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्री भावना, सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.

येथील चांडक बिटको कॉलेजच्या एनएसएस शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. कोटमगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सरपंच बाळासाहेब म्हस्के, प्रकाश घुगे, निसाकाचे अध्यक्ष तानाजी गायधनी, नगरसेवक बाजीराव भागवत, दिनकर आढव, पंडित आवारे, अरुण ढिकले, कार्यक्रम अधिकारी शशिकांत खेमनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांद्वारे परिसरात नालेसफाई

गावाच्या विकासात युवकांचा सहभाग हवा. सामान्य बुद्धिमत्ता असली तरी काहीही करता येते फक्त त्याला जिद्दीची जोड हवी, असे प्राचार्य कुलकर्णी यांनी सांगितले.

नागरिकांनी सर्व गट-तट विसरून एक झाल्यास विकास साधता येतो, असे सरपंच म्हस्के म्हणाले. शिबिरासाठी प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. प्रतिभा घुगे, प्रा. डॉ. सीमा जाधव, प्रा. पागधने, प्रा. नरेश पाटील, अरुण ताजनपुरे, दिनेश म्हस्के, नाना घुगे, समाधान जाधव, शरद म्हस्के, आप्पा माने, ग्रामसेवक पुरकर, संजय राजगुरू आदींनी सहकार्य केले. सप्ताह काळात विद्यार्थ्यांनी कोटमगाव परिसरात नालेसफाई केली.

अंगणवाडी परिसर, व्यायामशाळा परिसर, समाजमंदिराची स्वच्छता केली. विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम राबवली. स्मशानभूमी, दारणाघाट, मांगीरबाबा मंदिर, दारणेश्वर, रेणुकामाता मंदिर परिसरात स्वच्छता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट क्लब विरोधात याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये उभारलेला बोट क्लब प्रकल्प पर्यावरण, सुरक्षा आणि आरोग्य यासाठी हानिकारक असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने गंगापूर धरणावर असलेल्या बोटी हलविण्यात येत आहेत. हा प्रकल्प येथे होणार नव्हता, तर जनतेच्या खिशातील पैसा का वाया घालवला असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. जनतेच्या या वाया गेलेल्‍या पैशांची भरपाई म्हणून वसुली व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणार आहेत.

माजी पर्यटनमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून बोट क्लबच्या कामाला सुरुवात झाली. हा बोट क्लब म्हणजे नाशिककरांचे एक स्वप्न होते. नाशिकमध्ये आलेल्या पाहुण्यांना काय दाखवायचे असा प्रश्न या बोट क्लबमुळे दूर होण्यास मदत होणार होती. निवडणुकीच्या अगोदर कामे अर्धवट असताना मोठा गाजावाजा करीत या बोट क्लबचे घाईघाईने उद्‍घाटन उरकण्यात आले होते. .

नागरिकांचा विरोध

या कामाला सुरुवातीपासूनच विरोध झाला होता. हे बोटिंग सुरू झाले, तर गंगापूर धरणातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त रहाणार नाही, असा पवित्रा नाशिकमधील काही संघटनांनी घेतल्याने हे काम ठप्प झाले हाते. भुजबळांची सत्ता गेल्यानंतर हा क्लब सुरू होण्यास आणखी विलंब झाला. मध्यंतरीच्या काळात पर्यटनमंत्री जयकुमनार रावल हे नाशिकमध्ये आले असताना त्यांची दृष्टी या बोटींवर पडली व या बोटी त्यांनी सारंगखेडा येथे हलवल्या. त्यामुळे नाशिककरांचे स्वप्न भंग पावले.

गंगापूर धरणाच्या ठिकाणी बोट क्लबचा प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही याचा अहवाल प्रथम का करण्यात आला नाही. कोट्यवधी रुपयांचा चुराडा येथे झाला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हा अव्यवहार्य प्रकल्प केला त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्याकडून हा निधी वसूल केला जावा यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहोत.

- नितीन शुक्ल, निर्मल गोदा अभियान

असा झाला खर्च

बोट क्लब बांधण्यासाठी १४ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये, बोटिंगची सुविधा पुरविण्यासाठी ८ कोटी २७ लाख ५० हजार रुपये, एकूण २३ कोटी ७ लाख ८६ हजार रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारायण’ची अनेक रूपे फेर धरताहेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नारायण आपल्यात नाही हे मानणे कठीण गोष्ट आहे. आमची खूप वर्षांची मैत्री. नारायण गेला त्यादिवशी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या शो ची तयारी करीत होतो. काकाजींच्या जागी नारायणच दिसू लागला. त्याची अनेक रूपे माझ्याभोवती फेर धरताहेत. अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यनम्रता संस्थेचे संस्थापक सदस्य उपेंद्र दाते यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन मंगळवारी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी दाते बोलत होते. दाते पुढे म्हणाले की, नारायण सुंदरतेवर प्रेम करणारा होता. त्याच्या अनंत आठवणी आहेत. नाटकामुळेच आम्ही संस्थाही जन्माला घातली. केटरिंग, सेवासदन, रंगभूषा जे ही केले ते मनापासून केले. त्याला सुषमाची खूप साथ होती. नारायणला अधिक समजून घेऊ शकू यासाठी आलोय.

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्यनम्रता संस्थेचे संस्थापक रवींद्र ढवळे म्हणाले, की नारायणचे शेवटचे शब्द होते, ‘रवी मी प्रयोगाला येतोय’ प्रयास नाटकाची रंगभूषा नारायण करायचा. संस्थेसाठी शेवटपर्यंत रंगभूषा केली. लेखक सुनीत पोतनीस, प्रमोद तेंब्रे, नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, हर्षवर्धन कडेपूरकर, श्रीकांत बेणी, वसंत खैरनार, कांता हिंगणे, रंगकर्मी विठ्ठल देशपांडे, सावानाचे माजी कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनंत येवलेकर, दत्ता पाटील, श्याम दशपुते, सतीश सामंत, चारूदत्त कुलकर्णी, राजा पाटेकर, पंकज क्षेमकल्याणी, अदिती मोराणकर, वंदना अत्रे, लोकेश शेवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुग्धविकास विभागाचे दोन अधिकारी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅण्टी करप्शन विभागाच्या पथकाने (एसीबी) दोन ठिकाणी सापळे लावून दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इगतपुरीतील एका ई सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीस अटक केली. एसीबीचा पहिला सापळा दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर लागला. अवैध जनावरांच्या गोठ्याप्रकरणी कारवाई टाळून नवीन परवाना देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दुग्धविकास कार्यालयातील जिल्हा विस्तार अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई महापालिकेच्या रामायण बंगल्यासमोर करण्यात आली.

सुभाष रामचंद्र वाघ (जिल्हा विस्तार अधिकारी) आणि केशव रामभाऊ मांजरे (पशुधन पर्यवेक्षक) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा शहर परिसरात जनावरांचा गोठा आहे. हा गोठा सुरू करताना दुग्धविकास कार्यालयाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. मात्र, परवान्यासाठी तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता संशयित लाचखोरांनी कारवाई टाळण्याबरोबरच नव्याने परवाना देण्याच्या मोबदल्यात सहा हजार ५१० रुपयांची शासकीय शुल्क व तीन हजार रुपयांची लाच अशी ९ हजार ५१० रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला.

इगतपुरीतही एसीबीची कारवाई

दरम्यान, एसीबीच्या पथकाने इगतपुरी येथेही कारवाई केली. इगतपुरी येथील महा ई सेवा केंद्रात जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करणाऱ्या तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयांची मागणी करून दोन हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राजू काळू गांगड यास एसीबीने जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगरला गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनाचा हॉर्न वाजविण्याच्या किरकोळ कारणातून परप्रांतीय तरुणाने चक्क गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरारी झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

नंदन जयस्वाल (रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ राहणार आझमगड, उत्तर प्रदेश) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी गावठी कट्टाही जप्त केला. या प्रकरणाची अधिक माहिती अधिक अशी, की मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रमिकनगरमधील सातमाऊली चौकात गोळीबार करणारा संशयित नंदन जयस्वाल गाडीचा हॉर्न वाजवीत होता. आवाजामुळे येथेच राहणाऱ्या वाल्मीकी नावाच्या व्यक्तीने जयस्वाल यास हॉर्न वाजविण्याचे कारण विचारले. वाहनांची कोणतीही गर्दी नसताना हॉर्न वाजवीत जाऊ नकोस, असे वाल्मीकीने म्हटल्याचा राग जयस्वालला आला. तो रागतच घरात गेला आणि घरातील गावठी कट्टा बाहेर आणून हवेत गोळीबार केला. या धक्कादायक प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर संशयित जयस्वालने धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्यासह सातपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

---

नातेवाई, मित्रांची चौकशी

याबाबत बोलताना सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की गोळीबार करून संशयित आरोपी फरारी झाला. त्याने गोळीबार करून तो कट्टा घरात ठेवला होता. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त केले. फरारी झालेल्या जयस्वालचा शोध सुरू असून, त्याच्या नातेवाइकांसह मित्रांची कसून चौकशी सुरू आहे. मागील १८ ते २० वर्षांपासून जयस्वाल कुटुंबीय या भागात राहते. संशयित जयस्वाल वेल्डिंगचे काम करतो. जयस्वालच्या अटकेनंतर त्याने हा कट्टा कोठून आणला, त्या आधारे त्याने काही गुन्हे केले आहेत काय, याचा तपास केला जाणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. संशयित आरोपीविरोधात यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नसल्याचे गोरे यांनी सांगितले.

--

संशयित आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो नेहमीच तिकडे जात होता. तेथून त्याने हा कट्टा आणला असावा, अशी शक्यता असून, त्याच्या अटकेनंतर हे स्पष्ट होऊ शकेल. तूर्तास गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

-श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्या' प्रेमीयुगुलाची धाडणेत आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आंतरजातीय विवाह केलेल्या प्रेमीयुगुलाने एकत्रितपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील धाडणे येथे मंगळवारी उघडकीस आला. काही महिन्यांपूर्वीच या युगुलाने विवाह केला होता. मात्र, दोन्हींच्या कुटुंबांमध्ये जातीभेदामुळे वाद निर्माण होतील या भीतीने त्यांनी जीवनयात्रा संपविली.

साक्री तालुक्यातील धाडणे येथील सचिन नानाजी बागूल (वय २२) हा तरुण वेकिंज पोल्ट्री या फर्ममध्ये कामाला असताना गेल्यावर्षी त्याची नियुक्ती कळवण तालुक्यातील अभोणे गावाजवळ झाली. याठिकाणी कामादरम्यान तेथे राहणाऱ्या दीपाली चव्हाण (वय १९) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांच्या भेटी होत असताना त्यांनी ४ मे २०१७ रोजी सप्तशृंगी गडावर जाऊन विवाह केला. मात्र सचिन हा पाटीदार समाजाचा तर दीपाली ही कोकणी समाजाची असल्याने सचिनच्या घरच्यांनी विरोध केला. पोलिसांनी सचिन व दीपालीच्या नातेवाईकांचे जबाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करीत घटनेची नोंद साक्री पोलिस ठाण्यात केली आहे. आमच्या लग्नाला तुम्ही मान्यता देणार नाहीत. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करीत आहोत, असे चिठ्ठीत लिहीले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळूसाठी पळवाटा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात चोरट्या मार्गाने अवैध वाळू वाहतूक सुरूच असून, मंगळवारी पुन्हा बेकायदा वाहतूक करणारा वाळूचा ट्रक पकडण्यात आला. औरंगाबाद रोडवरील माडसांगवी येथे नाशिक तहसील कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. कोपरगावहून आलेल्या या ट्रकसह सात ब्रास वाळू जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनवीन मार्गांव्दारे ही अवैध वाळ वाहतूक केली जात असल्याने तहसील विभागही बुचकळ्यात पडला आहे.

अलीकडेच गौण खनिज विभागाने राबविलेल्या वाळू ठिय्यांच्या ई ऑक्शन प्रक्रियेला प‍्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २४ पैकी केवळ सहाच वाळू ठेक्यांचा लिलाव होऊ शकला. एकीकडे अशी परिस्थ‌तिी असताना अन्य जिल्ह्यांमधून चोरट्या मार्गाने नाशिकमध्ये वाळू आणली जात असल्याचे प्रकारही सातत्याने उघड होऊ लागले आहेत. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास निफाडहून नाशिककडे निघालेल्या ट्रक (एमएच १५ सीके ९८००) मध्ये वाळू असल्याचा संशय तलाठी सी. एस. उगले यांना आला. त्यांनी नाशिक तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अरुण शेवाळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शेवाळे यांच्यासह मंडळाधिकारी अनिल रोकडे, वसंत ढोमसे, ओमकार शिंदे यांच्यासह महसूलच्या पथकाने मांडसांगवी येथे धाव घेऊन हा ट्रक अडविला. या ट्रकमधून अवैधरित्या सात ब्रास वाळू वाहून नेली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा ट्रक नाशिक तहसील कार्यालयात आणण्यात आला. तसेच, नियमानुसार त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी‌ दिली.

सिन्नरऐवजी निफाडची पळवाट

कोपरगावहून बहुतांश वेळा बेकायदा वाळू वाहतूक होते. ही वाहतूक शक्यतो सिन्नरमार्गेच केली जाते. परंतु, हा ट्रक निफाडमार्गे नाशिककडे येत असल्याने महसूल विभागही बुचकळ्यात पडला आहे. सिन्नर मार्गावर कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याने आणि शिंदे येथील टोलनाका चुकविण्यासाठी निफाडचा सोयीस्कर मार्ग अवलंबल्याची चर्चा महसूलच्या वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत अर्भक आयुक्तांच्या टेबलवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने आजारी अवस्थेत जन्मलेल्या नवजात अर्भकाला उपचारांसाठी चक्क खासगी रुग्णालयात रेफर करण्याचा प्रस्तावही रुग्णालयाने दिल्याची बाबही उघडकीस आली.

महापालिकेच्या मायको रुग्णालयाबाहेर रिक्षातच महिलेची प्रसूती झाल्याची घटना ताजी असतानाच वैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणाची ही आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयात तीन तासांतच या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी हे मृत अर्भक थेट अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलवर ठेवून आपबीती कथन केली. महापालिकेत तब्बल तासभर हा गोंधळ सुरू राहिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित डॉक्टर, तसेच परिचारिकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधितांनी केली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची लक्तरे वेशीवर टांगण्याचे प्रकार विभागातील डॉक्टरांकडून सुरूच आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पंचवटीतल्या मायको रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाली होती. त्या प्रकरणापासून कोणताही बोध न घेणाऱ्या वैद्यकीय विभागाच्या अनास्थेचा आणखी एक बळी मंगळवारी गेला. पेठरोडवरील राहूलवाडीत राहणाऱ्या आशा तांदळे या गर्भवती महिलेला नातेवाइकांनी सोमवारी इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. संबंधित महिलेच्या प्रसूतीकडे मात्र रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी दुर्लक्ष केले. संबंधित महिलेच्या पोटात प्रचंड कळा येत असतानाही, तसेत नातेवाइकांनी विनंती करूनही डॉक्टरांनी सिझेरियन करण्याऐवजी नॉर्मल प्रसूतीची वाट पाहिली. त्यामुळे संबंधित महिलेची मंगळवारी साडेअकरा वाजता नॉर्मल प्रसूती झाली.

परंतु, अर्भकाने पोटातच शी केल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर जागे झालेल्या डॉक्टरांनी संबंधित अर्भकाला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा बिटकोत रेफर करण्याऐवजी चक्क शताब्दी या खासगी रुग्णालयात रेफर केले. विशेष म्हणजे शताब्दी हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्समधूनच त्या अर्भकाला रुग्णालयात नेले. परंतु, तीन तासांतच त्या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाइकांचा संताप अनावर झाला. मृत अर्भकाची आजी गंगूबाई खोडे आणि अर्भकाचे वडील अशोक तांदळे यांनी अर्भकाला थेट महापालिकेत आणून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडले. यावेळी त्यांची कैफियत ऐकण्यासाठी वैद्यकीय अधिकारीही जागेवर नव्हते. जवळपास अर्धा तास वाट पाहिल्यानंतर दोघांनी आपला मोर्चा आयुक्त कार्यालयाकडे वळविला. परंतु, आयुक्तही नसल्याने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या टेबलवर मृत अर्भक ठेवून आपबीती कथन केली, तसेच संबंधित डॉक्टरांसह परिचारिकांवर कारवाईची मागणी केली.

--

खुनाचा गुन्हा दाखल करा

मृत अर्भकाचे संतप्त नातेवाईक नगरसेवक जगदीश पाटील, दीपक डोके यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात ठाण मांडून संबंधित डॉक्टर व परिचारिकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉक्टर व परिचारकांना वारंवार सांगूनही त्यांनी प्रसूतीकडे दुर्लक्ष केले. विनंती केल्यावर उलट नातेवाइकांशीच असभ्य वर्तन केेले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केल्याशिवाय मृत अर्भक उचलण्यास नकार दिला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृत अर्भक ताब्यात घेतले.

--

आजीने फोडला हंभरडा

मृत अर्भकाच्या आजी गंगूबाई खोडे यांनी घटनेसंदर्भात सांगितलेली आपबीती ऐकून उपस्थित अधिकाऱ्यांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. सोमवारी सकाळी सात वाजता दाखल करूनदेखील डॉक्टरांनी उपचार मंगळवारी सकाळपासून सुरू केले. डॉक्टर, नर्स यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मलाच सलाईन लावण्याची धमकी दिल्याची कैफियत खोडेंनी मांडली. नर्सने माझी मदत घेतली असती, तरी अर्भक वाचले असते. परंतु, त्यांनी याकडे वारंवार दुर्लक्ष केले. डॉक्टर आणि नर्सने केलेली दिरंगाई व हलगर्जीपणामुळे प्रसूतिपश्चात बाळ दगावल्याचा आरोप खोडेंनी केला. साहेब, कालपासून अन्नाचा कणही खाल्ला नाही. बाळासाठी वणवण फिरले. परंतु, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझी नात दगावली हे सांगतानाच त्यांचा हंभरडा फुटला...

--

खासगी रुग्णालयाचे रॅकेट?

संबंधित अर्भकाला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी अर्भकाला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा बिटको रुग्णालयाकडे रेफर करायला हवे होते. परंतु, संबंधित डॉक्टरांनी अर्भकाच्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची असतानाही त्याला शताब्दी रुग्णालयाकडे रेफर केेले. विशेष म्हणजे शताब्दीच्या अॅम्ब्युलन्समधूनच त्या अर्भकाला शताब्दीमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तीन तासांच्या उपचारांनंतर अर्भक मृत झाले आणि या तीन तासांचे रुग्णालयाने चक्क १२ हजार रुपये बिल काढले, तसेच तपासण्या आणि औषधांचेही स्वतंत्र ६ हजार रुपये बिल काढले. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये पेशंट पाठविण्याच्या रॅकेटमध्ये आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील डॉक्टरच सहभागी असल्याचे दिसून आले.

--

अर्भकाची हेळसांड

संबंधित मृत अर्भक संतप्त नातेवाइकांनी थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून ठेवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने बोलावण्याची मागणी केली. परंतु, गेंड्याची कातडी परिधान केलेल्या वैद्यकीय विभागाने अर्भकाकडे दुर्लक्ष केले. मृताचे नातेवाईक जमा झाल्यानंतर थेट सुरक्षारक्षकांना, तसेच पोलिसांना पाचारण केले. मृत अर्भकाच्या नातेवाइकांची समजूत काढण्याऐवजी विभागातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्धा तास थांबूनही वैद्यकीय अधिकारी आले नसल्याने नातेवाइकांनी मृत अर्भक आयुक्तांच्या कार्यालयात नेले. परंतु, तेथेही आयुक्त नसल्याने अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवून निषेध व्यक्त केला.

--

रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या मुलीवर उपचार करण्याऐवजी टिंगलटवाळी केली. विनंती करूनही उपचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे माझ्या नातीचा बळी गेला असून, याला सर्वस्वी डॉक्टर आणि परिचारिका कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

-गंगूबाई खोडे, मृत अर्भकाची आजी

--

रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूतीकडे दुर्लक्ष केेले, तर बाळाला त्रास झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयाकडे पाठविले. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यानेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे या डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.

-अशोक तांदळे, मृत अर्भकाचे वडील

--

संबंधित घटना अत्यंत गंभीर असून, निष्काळजीपणाचा कळस आहे. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

-किशोर बोर्डे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

----------------

कट प्रॅक्टिसमध्ये पालिकेचेही डॉक्टर?


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका रुग्णालयातील औषधे बाहेर घेऊन जाण्याचे, तसेच वैद्यकीय विभागातील डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे आरोप वारंवार केले जातात. परंतु, आता वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स थेट खासगी रुग्णालयांमध्ये पेशंट पाठवीत असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. पंचवटीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयातील नवजात अर्भक जिल्हा रुग्णालयात पाठविण्याऐवजी थेट खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे रुग्णांच्या पळवापळवीच्या, तसेच कट प्रॅक्टिसच्या रॅकेटमध्ये महापालिकेची रुग्णालयेही सहभागी असल्याचा आरोप होऊ लागला असून, त्याच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कट प्रॅक्टिस आणि पेशंट पळविण्याचे रॅकेट सुरू असतानाच या रॅकेटमध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरही सहभागी असल्याचे या घटनेवरून समोर आले. नागरिकांवर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये घडत असले, तरी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष असल्याने नाशिककरांचे आरोग्यच रामभरोसे झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालात जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा बिटको रुग्णालयात पाठविण्याऐवजी चक्क शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे संबंधित मृत अर्भक घेण्यासाठी शताब्दी हॉस्पिटलची अॅम्ब्युलन्स थेट महापालिकेच्या रुग्णालयात आली. नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी अर्भक नातेवाइकांच्या संमतीशिवाय थेट शताब्दी रुग्णालयात पाठविले. या रुग्णालयात अर्भक दाखल झाल्यानंतर रुग्णालयानेही तीन तासांतच १२ हजारांचे बिल काढले. त्यामुळे या रॅकेटबद्दल संशय अधिकच बळावला असून, याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित अर्भकाची जीवनदायी योजनेची कागदपत्रे तयार होत असतानाच अर्भकाच्या नातेवाइकांनी त्याला हलविल्याचा खुलासा शताब्दी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला आहे, तसेच केवळ चार हजार रुपयांचे बिल घेतल्याचा दावाही केला आहे.

---

तीन रुग्ण पाठविले

इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी यापूर्वी शताब्दीमध्ये अधिक उपचारांसाठी तीन रुग्ण पाठविल्याचा आरोप मृत अर्भकाच्या नातेवाइकांनीच केला आहे. अशोक तांदळे यांनी इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांकडून थेट शताब्दीच्या डॉक्टरांशी संपर्क साधून पेशंट पाठविले जात असल्याचा आरोप केला असून, आजही या तीन बालकांवर उपचार सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कट प्रॅक्टिसमध्ये महापालिकेचेही अधिकारी सहभागी असल्याच्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे.

--

खरेदी जाते कुठे?

महापालिकेच्या रुग्णालयासांठी दर वर्षी कोट्यवधींची खरेदी केली जाते. त्यामध्ये आधुनिक यंत्रणा, मशिन यांसह औषधांचा समावेश आहे. वैद्यकीय विभागाकडून दर वर्षी खरेदीचा बार उडविला जातो. परंतु, कोट्यवधींची खरेदी केेलेली ही सामग्री जनतेच्या उपयोगातच येत नसल्याचे चित्र आहे. खरेदी केलेल्या औषधांचा वापर रुग्णांवर होतो का, याबाबत आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. यातील औषधे रुगालयाबाहेर नेली जात असल्याचा आरोप महासभा, स्थायीच्या बैठकांमध्ये केला जातो. त्यामुळे या रुग्णालयांचेच ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---

इंदिरा गांधी रुग्णालयात झालेला प्रकार हा कट प्रॅक्टिसचा असून, डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करण्याऐवजी खासगी रुग्णालयांच्या संपर्कात राहून पेशंट पाठवीत असतात. मायको रुग्णालयातील घटनेनंतरही प्रशासनाने कारवाई केली नसल्याने डॉक्टरांची हिंमत आता चांगलीच वाढली आहे.

-जगदीश पाटील, नगरसेवक, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामगार कल्याण’च्या निकालात ‘नाट्य’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर त्याविषयी धुसफूस सुरू झाली असून, खान्देशच्या रंगकर्मींनी या निकालावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. निकालामध्ये नाशिकला झुकते माप देण्यात आले असून, खान्देशला डावलल्याचा आरोप काही रंगकर्मींनी केला आहे.

सांघिक प्रकारात नाशिक विभागाला सर्वच बक्षिसे देण्यात आली असून, खान्देशातील आठही नाटकांना डावलण्यात आल्याची भावना नाट्यकर्मींमध्ये निर्माण झाली आहे. केवळ वैयक्तिक प्रकारात दोनच बक्षिसे जळगावला दिली गेल्याने जखमेवर आणखी मीठच चोळले गेले आहे. काही वर्षांपासून नाट्यस्पर्धेतील निकालाबाबत खान्देशातील रंगकर्मींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. सातत्याने जळगाव केंद्रावरील नाटकांना दुय्यम स्थान दिले जात आहे. नाशिकचा रिझल्ट एकतर्फी लागला असून, तीन अधिक उत्तेजनार्थ, सांघिक दोन असे पाचही संघ फक्त नाशिक जिल्ह्यातीलच असल्याने असे का? असा सवाल खान्देशच्या रंगकर्मींनी केला आहे.

राजा ईल्वलू नाटकाला वैयक्तिक पुरुष मेडल, स्त्री अभिनय उत्तेजनार्थ, एक पुरुष प्रशस्तीपत्र, प्रकाशयोजना एक अशी बक्षिसे असूनही हे नाटक सांघिकमध्ये नाही. नाशिक बाहेरच्या एकाही संघाचे सांघिक सादर चांगले झाले नाही का, असाही प्रश्न रंगकर्मींच्या मनाला डाचत असून, नेहमी नाशिकला प्राधान्यक्रम ठेवून असे होते. यावेळी तर हद्दच झाली आहे, असा आरोपही रंगकर्मींनी केला आहे. या आरोपात वैयक्तिकता काही नसून, अशामुळे नाटक करणारी मंडळी निराश होतात. नाट्यचळवळ टिकवणे ही परीक्षकांची जबाबदारी आहे. निःस्पृह निकाल चळवळला सशक्त करतात, वाढवतात परंतु नाशिकला तसे होत नाही असेही रंगकर्मींचे म्हणणे आहे.

कामगार अधिकारी म्हणतात, की आम्ही नाट्य परिषदेची मदत घेतो; ते देतील ते ठरवतो आणि नाट्य परिषद नाशिकवाले म्हणतात, की आम्ही फक्त नावे सुचवतो. बाकी तेच ठरवतात. आता कुणाचे ऐकायच हा प्रश्नच आहे. पण हे नक्की की दरवर्षी घोळ हा होतोच. यावेळी तर लाजच सोडली असे म्हणावे लागेल. दादागिरीच आहे.- रमेश भोळे, रंगकर्मी, जळगाव

पुरुषांना अभिनयाचे १३ बक्षीस व ‌‌‌स्त्रियांना आठ बक्षीस असे का? पुरुषांना जितकी बक्षिसे तितकीच बक्षिसे स्त्रियांनाही देणे गरजेचे आहे, तरच समसमान होईल. नाटकाच्या ठिकाणी सांस्कृतिक क्षेत्रात तरी स्त्रियांना असे डावलण्यात येऊ नये.

- सोनाली हिवराळे, रंगकर्मी

गेल्या वर्षीही धुळे संघावर अन्याय झाला होता. यंदाही तोच प्रकार झला. सांघिका पाच पारितोषिक असताना खान्देशातील एकाही नाटकाला सांघिकचे साधे उत्तेजनार्थ बक्षीस मिळू नये. एवढी कमतरता या नाटकांमध्ये असेल असे वाटत नाही. त्यामुळे जाणूनबुजून खान्देशला डावलण्याची शंका येते. पुढील वर्षी जळगाव, धुळे व नंदूरबारच्या स्पर्धा जळगावलाच घ्याव्यात.

- संदीप पाचंगे, रंगकर्मी धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांचे पुन्हा आंदोलन

$
0
0

दोन फेब्रुवारीला राज्यातील ज्युनिअर कॉलेजेस बंदचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. १९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात आले. या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या वतीने सुरू आहे. यासाठी टप्प्याटप्प्यावर आंदोलनांचे नियोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

गत तीन वर्षांमध्ये असंख्य आंदोलने आणि बैठका होऊनही ज्युनिअरच्या प्राध्यापकांच्या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. यामुळे संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक विभागावर धडक मोर्चा काढला जाईल. तरीही शासनाने दखल न घेतल्यास चौथ्या टप्प्यातील आंदोलनात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील ज्युनिअर कॉलेजेस बंद ठेवण्यात येतील. याशिवाय बारावीच्या परीक्षेवरही संघटनेच्या वतीने बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने या आंदोलनाच्या वेळी दिला आहे.

२०१२ नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आलेली नसून, २३ ऑक्टोबरचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचाही दावा यावेळी करण्यात आला. याशिवाय अनुदानित शिक्षणव्यवस्था मोडीत काढून स्वयं अर्थसहाय्य शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याचा घाट सरकार घालते आहे. अनेक ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांना विनावेतन काम करावे लागते. शिक्षण आयुक्त या पदाच्या निर्मितीपासून या समस्यांमध्ये भर पडली असून, रिक्त जागांवर नव्या नेमणूकांना परवानगी देण्यात आलेली नाही, शालार्थ प्रणालीमध्ये दीड वर्षांपासून शिक्षकांची नावे घेतली जात नाहीत, असेही आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आले.

शिक्षण आयुक्तपद रद्द करावे

एकीकडे व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरण अवलंबत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. मात्र शिक्षण व्यवस्थेचे सर्व अधिकार मंत्रालय आणि शिक्षण आयुक्तांकडे एकवटून ठेवण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्तांचा कारभारही भ्रष्ट असून, या कारभाराची चौकशी करण्यात यावी आणि शिक्षण आयुक्तांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.

लागू व्हावी जुनी पेन्शन योजना

सरकारच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या पेन्शन योजनेसंदर्भात गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत विधीमंडळात कायदा होणे अपेक्षित होते. मात्र हा कायदा झालेला नाही. त्यामुळे ही पेन्शन योजना बेकायदेशीर असू ती तातडीने रद्द करण्यात यावी. या योजनेचा फटका २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना बसत असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना राबविण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्र तस्करीप्रकरणी आणखी एकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शस्त्र चोरी आणि तस्करीच्या गुन्ह्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (दि.१९) दुपारी तीन ते वाजेच्या सुमारास आणखी एका संशयितास अटक केली. संशयित आरोपी मुंबई येथील असला तरी त्यास दुसऱ्या ठिकाणाहून जेरबंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.

शस्‍त्र तस्करीतील संशयितांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी अटक झालेल्या आरोपीचे नाव तसेच, त्याची इतर माहिती उघड करण्यास पोलिस सूत्रांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर मुंबईतील या संशयितास नक्की कोणत्या जिल्ह्यातून अटक झाली, हे ही उघड करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली. या गुन्ह्यात अटक केलेल्या नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३) तसेच सलमान अमानुल्ला खान (वय १९, रा. शिवडी, मुंबई), बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (वय २७, रा. शिवडी, मुंबई) यांच्यासह इतर संशयित आरोपींनी १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एक शस्त्र विक्रीचे दुकान फोडून मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा लुटून नेला होता. त्यातील ४१ शस्त्रे आणि चार हजार काडतुसे असलेली बोलेरो वाहन १४ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड टोलनाक्याजवळ पकडण्यात आली होती. अजूनही मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्याचे काम बाकी आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांसह विविध तपास यंत्रणांनी नाशिककडे धाव घेऊन एवढ्या शस्‍त्रसाठ्याचे नक्की काय होणार होते, याचा तपास सुरू केला आहे. तपासाची कोणतीही माहिती लिक होऊ नये यादृष्टीने सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत.

वरील तिघांना २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तसेच, मोबाइल डेटा अॅनॅलिसीसमधून काही नावे समोर आली आहेत. त्यानुसार मुंबईतून १७ डिसेंबर रोजी एकास अटक करण्यात आली. त्यास कोर्टाने २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी आणखी एका मुंबईतील संशयितास मुंबई सोडून दुसऱ्या ठिकाणावर अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पारा १० अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात थंडीने चांगलाच जोर पकडला असून, सोमवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने गारठ्यात आणखी भर पडली आहे. मंगळवारीही वातावरण ढगाळच असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागला.

ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही झाल्याचे दिसत असून, शहर परिसरात शनिवारपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. गत आठवड्यात १३ अंश सेल्सिअस असलेले तापमान सोमवारी अचानक १२.५ वर येऊन ठेपले, तर मंग‍ळवारी १० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यातच सकाळी सूर्यदर्शन न झाल्याने गारठ्यात जास्त भर पडली.

सोमवारप्रमाणेच मंगळवारीही ढगाळ वातावरणामुळे थंडीत वाढ झाली. शहरात मंगळवारी कमाल २८.१, तर किमान १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डिसेंबरपासून थंडीची चाहूल लागल्याने नाशिककर काहीसे सुखावले आहेत. सायंकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत थंडी आणि त्यानंतर ऊन असे दोन्ही बदल नाशिककर अनुभवत आहेत. गेल्या वर्षाची तुलना करता यंदाच्या डिसेंबर महिन्यातील थंडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, महिनाअखेरीस थंडी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमान २९.५, तर किमान १४.२ अंश एवढे होते. डिसेंबरच्या सुरुवातीला कमाल तापमान २७.७, तर १०.९ अंश एवढे होते. रविवारी कमाल २८.३ व किमान १३.१ अंश सेल्सिअस, सोमवारी कमाल २६.५, तर किमान १२.७ आणि मंगळवारी ते १० अंश सेल्सिअसवर आले होते. थंडीच्या आलेखात सतत चढ-उतार होत असल्याचे दिसते. थंडी कमी-अधिक होत असली, तरी वाढत्या थंडीमुळे चौकाचौकांत शेकोट्या व गप्पांचे फड मात्र रंगू लागल्याचे दिसत आहे.

--

आवश्यक दक्षतेचा सल्ला

एक आठवडा थंडी, तर दुसरा आठवडा काहीसा गरम अशा बदलत्या वातवरणामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. नाशिक शहर परिसरात मंगळवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. दिवसभर गारठा असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला. किमान तापमानात वाढ होऊनही गारठा असल्याने ही बाब आरोग्यावर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

----

निफाड @ ९.८

निफाड ः गेले चार ते पाच दिवस १२ ते १२ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या निफाडचा पार मंगळवारी एका दिवसात अचानक ३ अंशांनी घसरला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. निफाडला ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती वेधशाळा निरीक्षक मानकर यांनी दिली. तापमानात होणारी घट द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली असून, दुसरीकडे ही वाढती थंडी गहू आणि हरभरा पिकांसाठी लाभदायक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेल्टर प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘शेल्टर प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर होणाऱ्या प्रदर्शनाच्या समारोपाला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एरवी दर दोन वर्षांनी होणारे हे प्रदर्शन यंदा तीन वर्षांनी होत आहे. त्यामुळे दीर्घकाळाने नाशिककरांना योग्य किमतीत गृह खरेदीची संधी चालून आली आहे. परिणामी, प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता कोतवाल यांनी व्यक्त केली. घर ही माणसाच्या मूलभूत गरजेपैकी एक असून, घर बांधणीच्या कामात विकासकाची महत्त्वाची भूमिका असते. गत दोन ते तीन वर्षांपासून अर्थकारण, विविध नियम यामध्ये अनेक बदल होत होते. पण नोटाबंदी, जीएसटी, रेरा सर्व घटकांच्या अनिश्चिततांना आता पूर्णविराम लागला आहे. नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील प्रलंबित असलेला कपाट व बिल्टअप एरिया संदर्भातील प्रश्नही मार्गी लागल्यामुळे आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. रेरा कायद्यामुळे या व्यवसायात आणखी पारदर्शकता आली आहे. त्यामुळे हे प्रदर्शन गृह खरेदीची महत्त्वाची संधी ठरणार आहे. प्रदर्शनाचे हे आठवे वर्षे असून, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रदर्शनात विविध कार्यक्रमांची रेलचेल

प्रदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी गृह सजावट व ग्रूमिंग कार्यशाळा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, युवकांसाठी भविष्यातील माझे नाशिक या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून, प्रदर्शनात नाशिकच्या संस्था जसे निमा, आयमा या औद्योगिक संघटना, तान, वाईन उद्योग, सांस्कृतिक संघटना सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्य ठाकरेंनी घेतली ‘शाळा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी गुप्तगू करत पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.
बंद दरवाजा आड ठाकरेंनी शहर व जिल्ह्यात पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर आदित्य यांनी नाशिक व दिडोंरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करत पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत पुढील दिशेसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच भाजपचा आक्रमक विस्तार रोखण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तळाला जाऊन शिवसेनेचे कार्य वाढवावे, अशा सूचनाही दिल्या. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. तसेच नाशिक महापालिकेत स्वीकृत म्हणून नियुक्त केलेल्या सुनील गोडसे आणि अॅड. श्यामला दीक्षित यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करजंकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महापालिका गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आदित्य यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २०) खासदार हेमंत गोडसे याच्या निधीतून उभारण्यात आलेल्या महापालिका शाळा क्रमांक १६ मधील र्व्हच्युअल क्लासरूमचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेवर पुन्हा प्रशासक?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला असून बँकेवर थेट प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँकेवर पुन्हा बरखास्तीची टांगती तलवार असून नव्याने प्रशासक येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्ष निश्चित करण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी भाजपच्या संचालकांनी नागपूरमध्ये ठिय्या मांडल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या कारभारातील अनियमिततेमुळे बँकेवर पुन्हा बरखास्तीचे ढग घोंगावत आहेत. आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक बँकेच्या नोकरभरतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर सहकार मंत्र्यांनी या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. तसेच बँकेवर कारवाईचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्याचे स्पष्ट केले आहे. तर सहकार विभागाने हा प्रस्ताव आधीच पाठवला असून आता थेट रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत आस्तेकदम घेतले जात आहे. त्यामुळे बँक कधीही बरखास्त होण्याचा धोका असून बँकेवर नव्याने प्रशासक येणार असल्याची चर्चा आहे. त्यामळे संचालक मंडळच धास्तावले आहे. बँकेवरील कारवाई टाळण्यासाठी भाजपच्या काही संचालकासह विरोधी पक्षातील संचालकांनाही नागपूर गाठल्याची चर्चा आहे. नागपूरमध्ये ठाण मांडून बरखास्तीची कारवाई टाळून भाजपचा अध्यक्ष कसा होईल यावर मंथन सुरू आहे. त्यामुळे संचालकांच्या प्रयत्नांना कितपत यश हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images