Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पंधराशे टन द्राक्ष निर्यात

0
0

यंदा निर्यातीत होणार भरघोस वाढ; सर्वाधिक निर्यात रशियामध्ये

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यापासून द्राक्ष निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी एकट्या नाशिक जिल्ह्यांतून ९० टक्के द्राक्ष निर्यात केले जातात.

नाशिक जिल्ह्यातून या हंगामातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, १३६० टन द्राक्ष रशिया, ६० टन मलेशिया आणि ८० टन द्राक्ष हे श्रीलंका या देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहेत. मागील वर्षी २०१६-१७ च्या वार्षिक हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून १ लाख ३१ हजार टन द्राक्ष निर्यातची विक्रमी नोंद झाली होती. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३.५ लाख एकर एकरमध्ये द्राक्षाची लागवड झाली असून, त्यापैकी दोन लाख एकर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी एकट्या नाशिक जिल्ह्यांतून ९० टक्के द्राक्ष हे निर्यात केले जातात.

निर्यातक्षम क्षेत्रातही वाढ

नाशिक जिल्ह्यातून युरोपसाठी निर्यातक्षम द्राक्षांची नोंदणी ४० हजार ११० एकर इतकी झाली आहे. सुमारे २५,०५७ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांसाठी रशिया, चीन, इंडोनेशिया, अरब राष्ट्रासाठी नियम खूप कडक केले आहेत. हे नियम जर शिथिल केले तर भारतीय द्राक्ष निर्यातीत भरघोस वाढ होऊ शकते, असे निर्यातदार व्यापारी मधुकरराव क्षीरसागर यांनी सांगितले.

गुणवत्तेमुळे मागणीत वाढ

सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ द्राक्षांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले असून, दरवर्षी भारतातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी वाढतीच आहे.

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा

निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांची अनेक वर्षांच्या मोनोपॉलिला मागच्या वर्षापासून चिली या देशाने आव्हान दिले आहे. मागील वर्षी चिलीच्या द्राक्षांनी चांगलाच भाव खाल्ला होता. त्याचा परिणाम भारतीय द्राक्षाच्या निर्यातीवर झाला होता. चिलीत द्राक्षाच्या ३० ते ३५ व्हरायटी आहेत. भारतीय द्राक्षांच्या मात्र तीन ते चार व्हरायटीच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जसरंगी जुगलबंदीने हरखले नाशिककर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पं. भानुदास पवार स्मृती समारोहाचा समारोप रविवारी झाला. या वेळी जसरंगी जुगलबंदी सादर करण्यात आली. या अनोख्या जुगलबंदीमुळे नाशिककर प्रेक्षक हरखून गेले.

जसरंगी जुगलबंदीचा प्रारंभ ज्ञानेश्वर कासार आणि मधुरा बेळे यांच्या जसरंगी जुगलबंदीने झाला. यात ज्ञानेश्वर कासार यांनी राग अभोगीमध्ये ‘पिया के घर’, तर मधुरा बेळे यांनी कलावती रागातील ‘प्यारा बनरा’ या विलंबित एकतालातील ख्यालाने या जुगलबंदीची सुरुवात केली. यानंतर ‘कारी घटा घिर आयी’ ही द्रुत एकतालातील बंदीश सादर केली. यानंतर काही भक्तिगीते सादर करण्यात आली. संवादिनीला पंडित सुभाष दसककर, तर तबल्यावर पंडित नितीन पवार, पंडित नितीन वारे यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमादरम्यान सत्यजित तळवलकर यांच्या हस्ते सुदर्शन कांबळे, विनय निकम, आशुतोष इप्पर, स्वयम तांबट या चार होतकरू विद्यार्थ्यांना सरावासाठी तबलाजोडी प्रदान करण्यात आली. उत्तरार्धात पंडित सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी एकतालात उठाण, पेशकार, कायदे, रेले, चलन, गत, तुकडे, मोहरे, चक्रदार, परण आदी रचना सादर केल्या. त्यांच्या वादनावर श्रोते मुग्ध झाले. तळवलकर यांना संवादिनीची साथ प्रशांत महाबळ यांनी केली.

कार्यक्रमात एसडब्लूएस कंपनीतर्फे गुरुकुल परिवार संघ, महाराष्ट्र समाजसेवा संघ यांना रघुवीर अधिकारी यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. प्रारंभी रघुवीर अधिकारी, मनीषा अधिकारी, नितीन पवार, संदीप देशमुख, दीपक कुलकर्णी, अविराज तायडे, भास भामरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी महोत्सवाबद्दल तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनेत्रा महाजन-मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तोतया पोलिसांपाठोपाठ शहरात चेन स्नॅचर्स सक्रिय झाले असून, चोरट्यांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी हात साफ केला. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची ही तिसरी घटना ठरली आहे. शनिवारी पाथर्डी फाटा येथील वासननगर, त्यानंतर अशोका मार्ग परिसरात चोरट्यांनी महिलांचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली.

अशोका मार्ग येथील राजकुमारी देवेंद्रसिंग ठाकूर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलीसह घराकडे पायी निघाल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी राजकुमारी यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तोडून धूम ठोकली. घटनेची मुंबई नाका पोलिसांनी नोंद केली. दरम्यान, मंदा कैलास अहिरे (रा. वासननगर) यांच्याही गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची चेन चोरट्यांनी हातोहात लंपास केली. शुक्रवारी (दि. १५) रात्री आठच्या सुमारास मंदा अहिरे वासननगर येथून घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची पोत तोडून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनोरंजन’चा आज फैसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या बोटी पर्यटनमंत्र्यांनी पळविल्याचा मुद्दा गाजत असतानाच गंगापूर धरणालगत जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मनोरंजन पार्कची निविदा आज, सोमवारी (दि. १६) उघडणार अाहे. आता ही निविदा निकषांत बसते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, या पार्कचा फैसला आज होण्याची चिन्हे आहेत.

याअगोदर काढलेल्या निविदेवरून विजय वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय पाठिंबा असलेल्या कंपनीला हा ठेका मिळावा म्हणून निविदा प्रक्रियाच रद्द केल्याचा आरोपही त्यांनी मागील निविदेवर केला आहे. तब्बल सात एकरवर तयार करण्यात आलेले हे मनोरंजन पार्क पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर जलसंपदा विभागाने हे काम पूर्ण केले. त्यानंतर या मनोरंजन पार्कची देखभाल करण्यासाठी निविदा काढली. त्यात पहिली २६ जुलैला काढलेली ई निविदा वादात सापडली. लक्ष्मी एंटरप्रायजेसचे पार्टनर विजय वानखेडे यांनी ही निविदा भरली होती. सर्वाधिक सात कोटींची निविदा भरूनही ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्यामुळे त्यांनी थेट न्यायायलात धाव घेतली. सात जणांनी या निविदा भरल्या होत्या. या निविदेमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती. एका कंपनीला निविदा देण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. त्यासाठी वेळोवेळी कायदा मोडून बदल केले, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर दुसरी निविदा काढण्यात आली. त्यात तीन जणांनी टेंडर भरले आहेत. आता त्यातून काय निर्णय होतो, हे पुढे येणार आहे. मनोरंजन पार्कच्या निविदांमध्ये तीन वर्षांचा अनुभव हा महत्त्वाचा निकष होता. गेल्या वेळेसच्या निविदांमध्ये फक्त एकाकडेच हा अनुभव असल्याचे जलसंपदाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे वानखेडेंचा दावाही ते खोडून काढतात. त्यामुळे या निविदा प्रक्रियेचा घोळही वाद निर्माण करणारा ठरला, तर पुन्हा मनोरंजन पार्क रखडणार आहे.

--

मागणीकडे होतेय दुर्लक्ष

नाशिकमध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बोट क्लब व मनोरंजन पार्क सरकारच्या अनास्थामुळे सुरू झालेले नाही. ते पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी पर्यटकांसह नागरिकांकडून होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतापही आहे. मनोरंजन पार्कमध्ये उद्यान, हॉटेल, भव्य लॉन्स व राहण्यासाठी प्रशस्त कॉटेज बनविण्यात आले आहेत. ते सुरू झाल्यास त्याचा आस्वाद सर्वांना मिळणार आहे. आता त्याचा फैसला आज होणार आहे.

---

मनोरंजन पार्कसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात तीन निविदा आल्या आहेत. एक-दोन दिवसांत त्या उघडल्या जाणार आहेत. त्यात तांत्रिक व आर्थिक असे दोन निकष आहेत. तांत्रिक निकषांच्या निविदा आधी उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर आर्थिक निकषांची निविदा उघडली जाईल. त्यात या निविदा नियमानुसार असेल, तर संबंधितांना हे काम दिले जाणार आहे.

-राजेंद्र शिंदे ,कार्यकारी अभियंता, जलसंपदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धविहाराची सभा मुद्द्यावरून गुद्द्यावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

येथील देवी चौकातील दीनबंधू डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि महाकर्मभूमी बुद्धविहाराच्या विश्वस्तांच्या अनागोंदी कारभारावर भारतीय बौद्ध महासभेतर्फे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा बोलावण्यात आली होती. आरोप- प्रत्यारोपांमुळे ही सभा मुद्द्यावरून थेट गुद्द्यावर आल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या वादात ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर वादावर पडदा पडला. प्रकाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड बुद्धविहार बचाव कृती समितीची स्थापना या वेळी करण्यात आली.

नाशिकरोडमधील देवी चौकात महाकर्मभूमी बुद्धविहार आहे. बुद्धविहाराच्या देखभालीसाठी १९९४ मध्ये बुद्धविहार पब्लिक ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. ट्रस्टच्या स्थापनेवेळी असलेल्या २१ पैकी सध्या केवळ १० विश्वस्त कार्यरत आहेत. या विश्वस्तांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभा व इतर काही संघंटनांनी केला. त्या पार्श्वभूमीवर ही सभा देवी चौकात झाली. बुद्ध विहाराच्या सध्याच्या विश्वस्तांकडून मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून ही सभा भरकटली. शेवटी मुद्द्यावरून ही सभा थेट गुद्द्यावर येऊन पोहोचल्याने काही वेळ बुद्धविहाराचा जणू आखाडाच झाला. हा वाद काही वेळाने सार्वजनिक रस्त्यावरही पोहोचला.

बौद्ध महासभेचे आरोप

बुद्धविहाराच्या विद्यमान विश्वस्तांनी ठरल्याप्रमाणे विहारातील मूळ मूर्तीचे संवर्धन केले नाही, असा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे चारुदास भालेराव यांनी केला. मूळ मूर्तीसह डॉ. बाबासाहेबांनी वापरलेली येथील ऐतिहासिक खुर्ची गायब असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना बुद्धविहार ट्रस्टचे सभासद होण्यास मज्जाव करणे, समाजबांधवांना धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई करणे, विहाराच्या नावाखाली निधी उकळणे आदी आरोपही त्यांनी केले. या विहाराच्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असल्याचा जाहीर आरोप अमोल घोडे यांनी या सभेत केला.

वादाला फुटले तोंड

विश्वस्तांवर झालेल्या आरोपांवर भीमशक्ती संघटनेचे जगदीश पवार यांनी आक्षेप नोंदवला. ज्याचे चुकले असेल त्यांना जरूर जाब विचारा, तसेच आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या, असा आग्रह त्यांनी धरला. येथेच वादाला तोंड फुटले. समाजबांधवांना एकमेव बुद्धविहार सांभाळता येत नसल्याबद्दल पवार यांनी खेद व्यक्त केला. त्यानंतर बौद्धाचार्य पी. के. गांगुर्डे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर तक्रार करण्याची सूचना मांडली. राजू जगताप, प्रकाश भालेराव, सभेचे अध्यक्ष शैलेंद्र गांगुर्डे यांनीही सभेत विश्वस्तांच्या कामकाजाला कडाडून विरोध दर्शविला.

सभेस बुद्धविहाराचे विलास गांगुर्डे एकमेव विश्वस्त उपस्थित होते. याशिवाय रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, आर. पी. पगारे, रवींद्र जाधव, स्वप्निल घायवटे, राहुल माने, विजय धीवर, गौतम कर्डक, जी. जी. चंद्रमोरे, मनोज बर्वे, दिलीप भालेराव, शंकरराव नेटावणे, सुनील खडांगळे, सागर भालेराव, रवींद्र शिरसाठ आदींसह बौद्ध महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील ३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कर्जमाफीपोटी एकूण १२ कोटी ७२ लाखांची रक्कम मिळाली आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहन अनुदानही प्राप्त झाले आहे. तर, दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम माफ झाली आहे. बँकाकडून ही कर्जमाफीचा रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखाती वर्ग करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जखाती कर्जमाफीच्या रक्कम वर्ग होण्यास प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांना याबाबत संदेशही मोबाइलवर प्राप्त होऊ लागले आहेत. इगतपुरी तालुक्यात एनडीसीसी बँकेकडून सर्वाधिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, दीड लाखावरील थकीत कर्जदारांना उर्वरित रक्कम ३१ मार्चपर्यंत भरावी लागणार आहे.

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक शेतकरी कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. शासनाच्या या कर्जमाफी योजनेनुसार ३ हजार ३५४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून, १२ कोटी ७२ लाख २० हजार २३७ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यापैकी ३२११ शेतकरी लाभार्थ्यांना १२ कोटी ३५ लाख ४२ हजार ३८४ रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीचा नाहक भुर्दंड

0
0

नाशिकरोड बसस्थानकावरील टाकी कोरडी; कर्मचारी पाण्याविना

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या बसस्थानकावरील पिण्याच्या पाणीची टाकी दररोज कोरडीठाक राहूनही एसटी प्रशासनाला पाणीपट्टी भरावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नाशिकरोड बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन गायब झाले आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून डोळे झाकून पाण्याची पट्टी भरणे सुरूच आहे. या बसस्थानकावरील नळ कनेक्शनचा इतरत्र बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वापराकडेही एसटीचे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत असल्याने एसटीचे वरिष्ठ अधिकारी व बेकायदेशीरपणे येथील नळ कनेक्शनचा वापर करणाऱ्यांत साटेलोटे असल्याचे यावरून उघड झाले आहे.

शहरातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक बसस्थानक असलेल्या नाशिकरोड बसस्थानकावर गेल्या दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपट्टी वसुली विभागाकडून नाशिकरोड बस स्थानकाला पिण्याच्या पाण्याचे बील दिले जात आहे. एसटी प्रशासनाकडूनही या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसतानाही डोळे झाकून ते भरणे सुरू आहे. या बसस्थानकावर दिवसभरात सुमारे चारशे बसेसच्या फेऱ्या होतात. या बसद्वारे सुमारे २५ हजार प्रवाशांची दररोज या बसस्थानकात ये-जा होत असते. तरीही या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

नाशिकरोड बसस्थानकावर सिंहस्थ कुंभमेळ्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बस स्थानकाच्या नावाने पाण्याचे अधिकृत कनेक्शन आहे. याबाबत विभागीय कार्यालयाकडे लेखी कळविले होते. त्यांनी पाण्यासाठी सिंटेक्सची टाकीही दिली. परंतु, त्यासाठी पाण्याचे कनेक्शन अद्यापही जोडून मिळालेले नाही.

-सोमनाथ जाधव, वाहतूक नियंत्रक, नाशिकरोड बसस्थानक

महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर दबाव

येथील बसस्थानकावर गेल्या सिंहस्थापूर्वी पिण्याच्या पाण्याचे अधिकृत नळ कनेक्शन होते. मात्र सिंहस्थ काळात नाशिकरोड बसस्थानकावर विकासकामे झाली. त्यादरम्यान येथील पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले होते, तेव्हापासून येथील पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बसस्थानकावरील सुलभ शौचालयाचा ठेकेदार बेकायदेशीररित्या वापरत असल्याचा आरोप या बसस्थानकावरील अधिकाऱ्यांनी केला. त्यासंदर्भात एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी कळवूनही वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने या प्रश्नावर सर्वांनीच तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे.

रेकॉर्डवरील नळ कनेक्शन गायब

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रेकॉर्डनुसार नाशिकरोड बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याची पट्टी दरवर्षी भरली जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असून, हे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन सिंहस्थ कुंभमेळ्यापासून गायब झालेले आहे. नाशिकरोड बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन नसतांनाही राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक कार्यालयातील अधिकारी राजरोसपणे पाणीपट्टीचा भरणा करीत आहेत. त्यामुळे आता या गायब झालेल्या कनेक्शनचे बील का भरले जातेय, हाही संशोधनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमस केक वर्कशॉपद्वारे मिळाल्या टिप्स

0
0

कल्चर क्लबच्या आयोजनास सहभागींचा प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्लॅक फॉरेस्ट, व्हाइट फॉरेस्ट, पाइनॅपल केक, वॉलनट बनाना ब्राऊनी, मोचा हेजलनट ब्राऊनी अशा एकापेक्षा एक उत्तम प्रकारच्या केकचे व ब्राऊनीचे प्रकार रविवारी (दि. १७) कल्चर क्लबच्या सभासदांना शिकायला मिळाले.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकचे वर्कशॉप स्व. प्रमोद महाजन गार्डनच्या मागे असलेल्या ऑलिव्ह गार्डन रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आले होते.

या वर्कशॉपला उपस्थित असलेल्या महिलांना ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरले जातात, तसेच हा केक नेमका कसा बनवितात हे शिकवण्यात आले. त्याचप्रमाणे फ्रूट केक बनविताना त्यात कोणकोणत्या प्रकारची फळे वापरायची याची माहिती सांगण्यात आली. घरात असलेले जिन्नस वापरून केक कसा चांगल्या पद्धतीने तयार केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

घरात असलेले गव्हाचे पीठ वापरुन कशाप्रकारे केक तयार केला जाऊ शकतो हेदेखील दाखवण्यात आले. याच वर्कशॉपमध्ये मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी शिकवण्यात आल्या. केक तयार झाल्यानंतर बेक करण्याची सर्वात मोठी प्रोसेस असते. तो जर व्यवस्थित बेक झाला तरच त्याचा चांगला स्वाद येतो. अनेकदा काही लोकांकडे बेक करण्यासाठी मायक्रोवेव्ह नसतो अशावेळी कुकरमध्ये तो कसा बेक करायचा, त्याला तडे न जाऊ देण्यासाठी काय करायचे अशा विविध प्रकारच्या टिप्स यावेळी देण्यात आल्या.

कुकरमध्ये बेक केलेल्या केकला शक्यतो तडे जात नाही असेही सांगण्यात आले. केक झाल्यानंतर तो चांगला दिसला पाहिजे याची देखील खबरदारी घेणे महत्त्वाचे असते यावेळी त्याला आयसिंग करताना कोणते टूल्स वापरायचे. फुल तयार करताना कोणते टूल्स वापरायचे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. केक बनवण्याची पद्धती व त्यात कोणत्या प्रकारचे इसेन्स कसे वापरायचे हेदेखील दाखवण्यात आले. या वेळी ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट, पाइनॅपल केक, ऑरेंज केक, स्ट्रॉबेरी केक, मिक्स फ्रूट केक, बटर स्कॉच केक इत्यादींची माहिती सांगण्यात आली. प्रसिद्ध शेफ विवेक सोहनी यांनी केक बनवण्याची कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

अनेकदा नेटवर पाहून केक तयार केला जातो, मात्र त्यातील जिन्नस घरात नसल्याने केक चांगला होत नाही. परंतु, घरात असलेल्या पदार्थांपासून कसा चांगल्याप्रकारे केक बनवता येऊ शकतो, हे या वर्कशॉप मधून शिकायला मिळाले. एक आत्मविश्वास आल्याने आता घरात कधीही केक बनवू शकते.

वैद्य यामिनी चौधरी, सहभागी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गांधी हत्या हा पूर्वनियोजित कट’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आपला देश अद्याप समजू शकलेला नाही. गांधी हत्येनंतर समोर आलेली हत्येची कारणे अत्यंत निराधार होती, हे समजून घेणे गरजेचे आहे. हत्येमागचा हेतू काही वेगळा होता, तर हत्येनंतर सांगण्यात आलेली कारणे वेगळी होती. गांधीजींची हत्या ही तात्कालिक व आकस्मित प्रतिक्रिया जरी वाटत असली तरी तो एक पूर्वनियोजित कट होता ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयातर्फे शनिवारपासून ग्रंथसाप्ताह व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी ‘लेट अस किल गांधी : गांधी हत्येचा शोध आणि बोध’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह, मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले, शरद दुसाने, प्रदीप कपाडिया, पुरुषोत्तम तापडे आदी उपस्थित होते. यावेळी व्याख्यानाच्या पूर्वार्धात बोलताना तुषार गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वीच्या घटनाक्रम आणि त्यामागचे कंगोरे, कारणमीमांसा उलगडून सांगितली.

गांधी पुढे म्हणाले, की आपल्या देशात सतत दोन जाती धर्मियात संशयाचे, शंकेचे वातावरण राहिले आहे. त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. महात्मा गांधींनी मात्र जीवनभर हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींच्या हत्येचा शोध घेण्यासाठी मी सातत्याने पाच वर्षे संशोधन केले. या संशोधांतून एक बाब ठळकपणे समोर आली ती म्हणजे गांधीजींच्या हत्येमागे एकाच विचारधारेची माणसे होती. याविषयीचे पुस्तक मी लिहिल्यावर त्यावर वाद झाले. परंतु, गांधीजींची हत्या करणारे ब्राह्मण होते हे सत्य नाकारता येणार नाही. परंतु, याचा अर्थ समस्त ब्राह्मण समाज दोषी आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, की आमच्यात एकमेकांच्या प्रति द्वेष व संशय नसेल तर आम्हाला कोणीच वेगळे करू शकणार नाही. हिंसा किंवा आतंकवादाला कुठलाही धर्म किंवा जात नसते, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ पक्षीय अजेंड्यावर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे नागरिकांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष पुढाकार घेऊ लागले आहेत. आधारशी संबंधित तक्रारी राजकीय पक्षांनी अजेंड्यावर घेतल्या असून, यंत्रणेत सुधारणा व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनावरही दबाव वाढू लागला आहे.

नाशिक शहरामध्ये आधार सेवा केंद्रे नेमकी कोठे चालू आहेत याची माहितीच नागरिकांना नाही. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी काही सेंटर्सची यादी जाहीर केली. परंतु, तेथेही आधारशी संबंधित सेवा सुरळीतपणे मिळत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले. अशा बंद सेंटर्सची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जाहीर करीत ती जिल्हा प्रशासनाच्याही निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अशा काही आधार सेवा केंद्रांवरील किटही जिल्हा प्रशासनाकडून जप्त करण्यात आले. त्यानंतरही आधारची घडी विस्कटलेलीच आहे. आधार कार्ड मिळविताना, तसेच आहे त्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करताना नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही केंद्रे प्रशासनाच्या लेखी सुरू असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे ती बंद ठेवली जात असल्याचे स्पष्टीकरण केंद्रचालकांकडून दिले जाऊ लागले आहे. आधार केंद्रांशी संबंधित तक्रार टोल फ्री नंबरवर कॉल करूनही‌ समाधान होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. अचूक मार्गदर्शन मिळत नसल्याची कैफियत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अलीकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. आधार सेंटरवरील कर्मचारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याची तक्रारदेखील करण्यात आली. अनेक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डबाबतची कार्यवाही पूर्ण केली आहे. परंतु, अजूनही अनेकांना नवीन, तसेच दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळू शकलेले नाही. शहरातील सर्व आधार केंद्रे सुरळीत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी मनसेने केलेली आहे.

--

आमदारांकडूनही पाठपुरावा

विद्यार्थी संघटनांपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह काही नगरसेवकांनीही शनिवारी थेट जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, जेईईचे विद्यार्थी, पेन्शनर्स यांच्यासह सर्वच स्तरांतील नागरिकांना आधारशी संबंधित कामे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे यावेळी मांडण्यात आले. कितीही तांत्रिक अडचणी असल्या, तरी आधार केंद्रांची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. विशेष म्हणजे जेईईच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र चार केंद्रे सुरू करण्याची ग्वाहीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूणच आधारमुळे होणारी फरपट सद्यःस्थ‌ितीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरत असून, सर्वच राजकीय पक्षांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.

---

अवघ्या १७ सेंटर्सवर भ‌िस्त

शहरात आजमितीस क‌िमान ६० आधार सेंटर्सची आवश्यकता आहे. तशी मागणीदेखील जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडे केली आहे. परंतु, सद्यःस्थ‌ितीत केवळ १७ सेंटर्सद्वारे आधारशी संबंधित कामे सुरू आहेत. आज, सोमवारपासून नव्याने आणखी १४ सेंटर्स सुरू होतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आधार सेंटर्सची संख्या ३१ होणार असली, तरी आणखी २९ सेंटर्स केव्हा सुरू होणार, हा प्रश्न जैसे थेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. चौरसियांच्या बासरीवादनावर रसिक मुग्ध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमात रविवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन व उर्दू गझल, शायरी, नज्म, कव्वाली, सुफी गायकी असलेला ‘सुखन’ या कार्यक्रमावर रसिक मुग्ध झाले.

तीन तासांहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. चौरसिया यांनी यमन रागाने बासरीवादनाला सुरुवात केली. त्यानंतर झपताल व तीन ताल बासरीवर सादर केला. त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी साथ दिली. तीन तालामध्ये पं. चौरसिया व पं. घाटे यांच्यात झालेल्या जुगलबंदीने रसिकांना तृप्त केले. दुसऱ्या सत्रात उर्दू गझल, शायरी, नज्म, कव्वाली, सुफी गायकी यांची वेगळी ओळख असलेला ‘सुखन’ या कार्यक्रमाने सत्राची सांगता झाली.

दोन दिवसांच्या या वसंतोत्सवामध्ये शनिवारी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक तौफिकभाई कुरैशी यांचा कार्यक्रम झाला. मनोरमाबाई पोळ स्मृती पुरस्कार यंदा संगीत क्षेत्रात भरीव काम केलेल्या शिक्षिका अलका नारूलकर- देव व संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख विद्यार्थ्याचा पुरस्कार प्रीतम नागील यांना देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेबाबत उदासीनता

0
0

रामकुंड जीवरक्षकांना महापालिकेच्या प्रतिसादाची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडाची ओळख पवित्र धार्मिक तीर्थस्थान म्हणून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे. नाशिकला येणारा प्रत्येक पर्यटक रामकुंडावर हमखास येतो. या रामकुंडाच्या स्वच्छतेबाबत नेहमीच उदासीनता दिसते.

येथील पाणी कायमस्वरूपी स्वच्छ राहावे यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले आहे. रामकुंड स्वच्छ ठेवण्यासाठी येथील जीवरक्षक दलाने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी त्यांचा तोंडी प्रस्ताव मांडला असला तरी प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे खंत जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

गोदावरी नदीत धरणातून आवर्तन सोडलेले नसते त्यावेळी पाण्याचा प्रवाह स्थिर होतो. या स्थिर पाण्याचे शुद्धीकरणाची यंत्रणा महापालिकेने १६ वर्षांपूर्वी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रामकुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी येथील दिवे विक्रेत्या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन दीपदान कुंड तयार केली आहेत, तरीही पाण्याची अस्वच्छता कमी झालेली नाही. रामकुंडावर सध्या ४० जीवरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका तरुणीच्या अट्टहासाची कथा ‘प्रयास’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रयास ही कथा आहे एका तरुणीची, तिच्या अट्टहासाची. एका निश्चित ध्येयाने प्रेरित होऊन तिचे सुरू असलेले काम तिला यशापर्यंत घेऊन जाते. या प्रवासात अनंत अडचणींना तिला सामोरे जावे लागते. असंख्य प्रश्न आणि त्यांना उत्तरे देणारी ही तरुणी तिचा ‘प्रयास’ साकार होतो.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत मिलिंद पेडणेकरलिखित ‘प्रयास’ हे नाटक रविवारी सादर झाले. वेगवेगळे गुन्हे करून एकत्र आलेल्या महिला कैद्यांची ही कथा आहे. त्यांचे मन्वंतर, मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्ती पुरोहित ही तरुणी बाहेरच्या जगातून येते आणि आतल्या जगातले त्यांचे आयुष्यच बदलून जाते. ही कथा कीर्तीच्या आयुष्याशी निगडित आहे. सावित्री, मालती, सुखदा, रेवती, अनामिका, सारिका, वैदेही यांना एकत्र घेऊन कीर्ती मनोरंजनाच्या माध्यमातून मन्वंतर घडवते. त्यांचे लोकनाट्य बसवते. या प्रत्येकीचा भूतकाळ त्यातून उलगडत जातो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वाईट आहे अशा नकारात्मकतेने जगणाऱ्या या महिला कैदी, त्यांचे एकमेकांत असलेले वैर कीर्तीच्या प्रोजेक्टमुळे संपुष्टात येत‌े. या सर्व महिला कैदी सकारात्मक होतात. कीर्तीचे हे प्रोजेक्ट अनेक अडचणी येऊनही थांबत नाही. कितीही अडथळे आले तरी ते पूर्ण करायचे हे तिने मनाशी पक्के केलेले असते. एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये जाऊन महिला कैद्यांना सकारात्मक करण्याचे आव्हानात्मक कार्य कीर्ती करीत राहते. तिचा हा प्रयास असाच सुरू राहतो. अशा आशयाचे हे नाटक होते.

ललित कला भवन, सिडको संस्थेच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. लेखन मिलिंद पेडणेकर, दिग्दर्शन पल्लवी पटवर्धन यांचे होते. वेशभूषा श्यामल हलकर्णी, संगीत अमोल काबरा, नेपथ्य अविनाश देशपांडे, प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. निर्मितीप्रमुख नंदकुमार देशपांडे होते. नाटकात धनंजय वाबळे, दुर्गा ढवळे, मयुरी विसपुते, तेजस्विनी गायकवाड, पूर्वा कुलकर्णी, निशिगंधा घाणेकर, क्षमा देशपांडे, रश्मी पवार, जाई कुलकर्णी, ईशा शेख, स्वाती माळी, धनश्री उपाध्ये, गायत्री पवार, दूर्वाक्षी पाटील, अपुर्वा देशपांडे, अरुण भावसार, अविनाश देशपांडे, सतीश मैंद, राजेश टाकेकर आणि पल्लवी पटवर्धन यांनी भूमिका केल्या.

नाटकाच्या प्रारंभी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाबाहेर नारायण देशपांडे यांच्या स्मृतींना ‘प्रयास’च्या टीमच्या वतीने अभिवादन करण्यात आले. देशपांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

आज पारितोषिक वितरण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६५ व्या नाट्यमहोत्सवाच्या नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. सोमवारी, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कामगार कल्याण भवन, सातपूर कॉलनी येथे पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सुनील देशपांडे, प्रा. विलास औरंगाबादकर उपस्थित राहतील. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे सहाय्यक महाप्रबंधक शिवाजी धुमाळ यांची विशेष उपस्थिती राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉलीबॉल स्पर्धेस ‘यशवंत’मध्ये प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने आणि नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने खुल्या गटाच्या पुरुष आणि महिलांच्या नाशिक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. नाशिकच्या क्रीडा जडणघडणीत मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांनी यशवंत व्यायाम शाळेचे कौतुक केले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील २१ पुरुषांच्या आणि ८ महिलांच्या संघानी सहभाग घेतला आहे. पुरुष गटाचे अ, ब, क आणि ड असे चार गट करण्यात आले असून महिलांचे अ आणि ब असे दोन गट आहेत. गटवार साखळी सामने होणार आहेत आणि त्यानंतर सोमवारी (दि. १८) दिवसभर बॅड पद्धतीचे सामने खेळविले जाणार आहेत, अशी माहिती स्पर्धा समिती सदस्य हेमंत पाटील व चैतन्य काळे यांनी दिली. अविनाश खैरनार यांनी सूत्रसंचलन केले.

उद्‍घाटन समारंभानंतर प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात झाली. यामध्ये यजमान यशवंत व्यायाम शाळेच्या संघाने सलग दोन सामने जिंकून अ गटात पुढे यशस्वी वाटचाल केली. एचएएल अ संघाने ही आपले दोन सामने जिंकून आगेकूच केली. सिडकोच्या युनायटेड संघाने आपल्या ड गटातील दोन सामने जिंकून आपल्या गटात प्रथम स्थानासाठी आपला दावा केला. तर नाशिकरोडच्या गणेश व्यायाम शाळेच्या संघानेही आपले दोनही सामने जिंकून चांगली सुरुवात केली. क गटात वडाळा रोडच्या जेएमसीटीह एकलहरा येथील एनटीपीएस या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंक‌ले.

महिलांच्या सामन्यात नाशिकच्या वीरेंद्र क्रीडा मंडळाच्या अ आणि ब या दोन्ही संघानी दोन-दोन सामने जिंकली तर नाशिकच्या रेणुका क्रीडा मंडळानेही आपल्या पाहिल्याच सामन्यात नाशिकरोडच्याच गणेश व्यायाम शाळा संघाला पराभूत करून विजय आघाडी घेतली.

आजच्या सामन्यांचे निकाल
पुरुष
यशवंत व्यायामशाळा अ विजयी विरुद्ध जेएमसिटी ब.
एच. ए. एल. विजयी विरुद्ध बी. वाय. के. कॉलेज
युनायटेड क्लब विजयी विरुद्ध गणेश व्यायाम शाळा ब.
जेएमसिटी क्लब विजयी विरुद्ध देवाज क्लब, सिडको

महिला
वीरेंद्र क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध गणेश व्यायाम शाळा, नाशिकरोड
रेणुका क्रीडा मंडळ, नाशिक रोड विजयी विरुद्ध रेणुका क्रीडा मंडळ ब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो-तस्करी कारवाईचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीत तीन दिवसांपूर्वी एका गायीसह तीन गोवंशांच्या तस्करीचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईचे परिसरातील मुस्लिम बांधवानी स्वागत केले आहे. गोवंशांच्या चोरीच्या निषेध व्यक्त करत त्यांनी पत्रकद्वारे देवळाली कॅम्प पोलिसांचे कौतुक केले आहे.

देवळाली शहर हे सर्वधर्म समभाव जपत एकोप्याने नांदणारे शहर आहे. याआधी शहरात सामाजिक वातावरण द‌ूषित होईल, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. मात्र, काही बाहेरील टवाळखोर आपल्या स्वार्थापोटी येथे येऊन शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. झालेल्या घटनेमध्ये शहरातील मुस्लिम बांधवांचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. कायद्याच्या रक्षणासह सामाजिक सलोखा राखणाऱ्या देवळाली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, असे पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. मुस्लिम बांधवाच्या वतीने शकील सिद्दीकी, इस्राईल खान, फारुख शेख, फारुख गनी, हैदर खान, सलीम खान, उमर खान, अल्ताफ खान, जफ्फर खान, मोहम्मद पीरजादा, शौकत काझी, अल्ताफ शेख यांसह संसरी व देवळाली शहरातील मुस्लिम बांधवानी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चौथा संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुंगीचे औषध देऊन मोकाट जनावरांना घेऊन फरार होणाऱ्यांपैकी चौथ्या संशयित आरोपीला देवळाली कॅम्प पोलिसांनी भिवंडी येथे अटक करून ताब्यात घेतले. त्याच्यासह यापूर्वी अटक झालेल्या अन्य तीन संशयितांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. कोर्टाने चौघा संशयितांच्या पोलीस कोठडीत मंगळवारपर्यंत (दि. १९) वाढ केली आहे.
एका गायीसह चार गोवंशांच्या तस्करीचा प्रयत्न करीत असताना संशयित आरोपींनी थेट पोलिस व्हॅनलाच धडक देत पोलिसांना मारण्याचा प्रयत्न देवळालीच्या हाडोळा परिसरात केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली होते. तर अन्य दोन संशयित फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी भिवंडीतील कसाईवाडा गाठले. तेथे चौथा संशयित फरारी कलीम कुरेशी याला अटक करण्यात यश आले. मात्र, त्याला अटक करतांना पोलिस पथकाच्या कामात अडथळा निर्माण केल्याने कलीम कुरेशी या संशयितासह पाच महिलांच्या विरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलीम यास देवळालीतील गायीच्या चोरी प्रकरणात रविवारी न्यायालयात हजर केले. त्यालाही मंगळवारपर्यंत (दि. १९) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षसंगोपनातही डॉक्टर आघाडीवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
रुग्णसेवेसह समाजाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचे पर्यावरण संवर्धनातही मोलाचे योगदान असल्याचे दिसून आलेले आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी लागवडीच्या उपक्रमात वृक्षसंगोपनामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे २१०० डॉक्टर्सचा सहभाग आहे.

राज्य सरकारने हाती घेतलेल्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सर्वसामान्य व वृक्षप्रेमींचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभागाने ग्रीन आर्मी (राष्ट्रीय हरित सेना) हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या ‘ग्रीन आर्मी’तील सहभागाकडे नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर्स वगळता अन्य बुद्धीजीवी व उच्चशिक्षितांनी पाठ फिरविल्याची धक्कादायक वस्तुस्थिती उघड झाली आहे. गेल्या वर्षभरात राज्यभरातून अवघ्या ४३४ पीएचडीधारक ग्रीन आर्मीचे सदस्य बनले असून त्यात नाशिक जिल्ह्यातील अवघ्या २० पीएचडीधारकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १५ पैकी तब्बल ८ तालुक्यांमधून एकाही पीचडीधारकांला ‘ग्रीन आर्मी’त सहभागी व्हावेसे वाटलेले नाही, हे विशेष.

वनांचे राज्यातील आच्छादन वाढविणे काळाची गरज ओळखून राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. यात नागरिकांचाही हातभार असावा यासाठी ग्रीन आर्मीचा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाच्या कामात आवड असणाऱ्या सर्वच क्षेत्रातील नागरिकांना ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन सरकारने केले होते. ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीचे राज्यातील सर्वच विभागांना राज्य सरकारने उद्दिष्ट्यही दिले होते. त्यानुसार नाशिक विभागाने केवळ २६.४२ टक्के एवढेच उद्दिष्ट्य साध्य झाले आहे. जिल्ह्यातील उच्चशिक्षितांनी ग्रीन आर्मीच्या सहभागाकडे पाठ फिरविली असल्याचे शैक्षणिक पात्रतानुसार ग्रीन आर्मीच्या सदस्य संख्येच्या आकडेवारीतून उघड झाले आहे.

उच्चशिक्षित चार हात दूर
ग्रीन आर्मीचा जुलै महिन्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमात सक्रीय सहभाग राहिला होता. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य गाठण्यात प्रशासनाला ग्रीन आर्मीचे मोठे सहकार्य लाभले होते. मात्र, या ग्रीन आर्मीपासून जिल्ह्यातील उच्चशिक्षितांनी चार हात दूरच ठेवले आहे. या उपक्रमाचे सदस्यत्व घेऊन वृक्षलागवडीत सहभागी होण्याकडे जिल्ह्यातील उच्चशिक्षितांनी पाठ फिरविली. यातून उच्च शिक्षितांमध्ये पर्यावरणीय समस्यांबाबतच्या जाणीवा बोथट होत असल्याचे मानले जात आहे. जिल्हाभरात २०९२ डॉक्टर्स, ७२८ अभियंते, ३२५ आयटी इंजिनीअर्स आणि २० पीएचडीधारक असे एकूण ३,१६५ ग्रीन आर्मीचे सदस्य झालेले आहेत.

नाशिक-मालेगावमध्ये निरुत्साह
जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या नाशिक व मालेगाव या दोन्ही शहरांची आहे. मात्र, या दोन्ही शहरांसह तालुक्यातून आतापर्यंत प्रत्येक एकाच पीएचडीधारकाने ‘ग्रीन आर्मी’चे सदस्य होण्यात रस दाखविला आहे. या दोन्ही शहरांत डॉक्टरांची संख्याही मोठी आहे. मात्र, नाशिकमधून ११९ तर मालेगावमधून ११९५ इतक्या डॉक्टर्स मंडळीने ग्रीन आर्मीचे सदस्यत्व घेतले आहे.

जिल्ह्यातील पात्रतानिहाय ग्रीन आर्मी सदस्य संख्या

तालुका........अभियंता........डॉक्टर........आयटी........पीएचडी........एकूण
- बागलाण ११० ७१४ ७८ ७ ९०९
- चांदवड १० १ २ ० १३
- देवळा ३ १ १ ० ५
- दिंडोरी ३८ ७ १८ १ ६४
- इगतपुरी ४७ १५ ३७ ३ १०२
- कळवण १४ ६ १९ ५ ४४
- मालेगाव ७९ १,१९५ ७९ १ १,३५४
- नांदगाव १० ७ ० ० १७
- नाशिक २७४ ११९ ४५ १ ४३६
- निफाड २८ ४ ३ ० ३५
- पेठ ६ ५ १ ० १२
- सिन्नर ३८ ७ ११ ० ५६
- सुरगाणा १२ ३ २४ २ ४१
- त्र्यंबक ४६ ६ ६ ० ५८
- येवला १३ २ ४ ० १९
- एकूण ७२८ २,०९२ ३२५ २० ३,१६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगपेट्यांचा धावता ट्रक खाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आगपेट्यानी भरलेल्या ट्रकला रविवारी (दि. १७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीत ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी ट्रकसह आग विझविण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिलनाडूकडून राजस्थानमधील जयपूर येथे जात असलेला ट्रक (टीएन ३४ डब्ल्यू ४७८६) रविवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावरील जळगाव चोंडी शिवारात आला. ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकच्या पाठीमागून धूर येत असल्याचे समजताच ट्रकचालकाने गाडी थांबविली. तो खाली उतरून पाठीमागे जाईपर्यंत अवघ्या काही मिनिटात संपूर्ण ट्रकला आग लागली. यात ट्रकसह २१ टन आगपेट्या जळून खाक झाल्या. आगीने परिसरात सर्वत्र धूर पसरला. घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. आग विझवण्यात यश आले. मात्र, २० लाख रुपयांचा ट्रक व १८ लाख रुपयांच्या आगपेट्या आगीत भक्ष्यस्थानी पडून तब्बल ३८ लाखांचे नुकसान झाले.

आगीचे कारण गुलदस्त्यात
ट्रकला आग लागल्याचे वृत्त पसरताच परिसरातील लोकांनी आग पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. काही जणांनी तर जळलेले आगपेट्यांचे बॉक्स घेऊन धूम ठोकली. दरम्यान, ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आग विझविण्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोराकडून सात गाड्या जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकींची चोरी करून आपल्या मूळ गावाकडे त्याची विक्री करणाऱ्या एका चोरट्यास नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नुकतेच जेरबंद केले. त्याच्याकडुन तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

प्रताप विष्णू कोरडे (मूळ रा. साखरखेरडा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो सध्या नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडे दोन चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक उपनिरिक्षक उत्तम दळवी यांनी मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापला दोन दुचाकींसह ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातीलच या दुचाकी निष्पन्न झाले. त्यानंतर प्रतापने अजून पाच दुचाकींची चोरी करून या दुचाकी आपल्या मूळ गावी साखरखेरडा येथे विकल्याची कबुली पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि सहाय्यक आयुक्त मोहन ठाकुर यांच्याकडे दिली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, राजेंद्र जाधव, विशाल कुवर, समाधान वारुंगसे आदींनी साखरखेरडा (जि. बुलढाणा) येथे जाऊन अन्य पाच दुचाकी जप्त केल्या. प्रतापकडून अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, प्रतापला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपब्लिकन ऐक्य व्हावे

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य घाईने नको तर विचारपूर्वक आणि टप्प्या-टप्प्याने हवे. ऐक्य तुटले तर आंबेडकरी जनता पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. पहिल्या टप्प्यात सर्व गटांनी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे आघाडी करून निवडणूक लढवावी, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर नुकतेच आले होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्यासाठी आपला पक्ष बरखास्तीची तयारी दर्शवली होती. त्याचा संदर्भ घेऊन गवई यांनी नाशिकरोड येथे पत्रकार परिषदेत आपली मते व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष भरत पुजारी, शहराध्यक्ष रामचंद्र खोब्रागडे, आनंद खरात, हेमंत भोसले, राजाभाऊ गांगुर्डे, प्रकाश बाजपेयी, मुन्ना शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. गवई म्हणाले, की रिपब्लिकन गटांच्या बरखास्तीने काही साध्य होणार नाही. फक्त निवडणुका आल्यावरच रिपब्लिकन गटांच्या ऐक्याची चर्चा सुरू होते, हा आरोप खरा असल्याने जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे ऐक्य करताना ते विचारपूर्वक आणि टप्प्या-टप्प्याने करावे. प्रारंभी सर्व गटांचे अस्तित्व कायम ठेऊन आघाडी करून निवडणुका लढवाव्यात. सुरुवातीला सर्व गटांमध्ये मैत्री होऊ द्यावी मग ऐक्याची प्रक्रिया पार पाडावी. अमेरिकेप्रमाणे आमचा नेता निवडीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी.

राजीनाम्याची मागणी नाही
डॉ. गवई म्हणाले, की आठवले ज्येष्ठ व आदरणीय नेते आहेत. त्यांचे व प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मला मान्य आहे. ऐक्य झाल्यावर दोघांपैकी एकाकडे नेतृत्व द्यावे. एक्यासाठी आठवलेंनी खासदारकीचा आणि जोगेंद्र कवांडेंनी आमदारकीचा राजानीमा द्यावा अशी मागणी करून मी ऐक्याला सुरुंग लावणार नाही.

आम्हीच लढतो स्वबळावर
राज्यात रिपब्लिकनचे प्रतिनिधी निवडून यावेत, अशी आमची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकरांना तसा प्रस्ताव आम्ही दिला होता. आगामी निवडणुकीत शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आम्ही स्वबळावर जिवंत ठेवला आहे. आम्ही व प्रकाश आंबेडकरांचा पक्षच फक्त स्वबळावर लढत आहे, असेही डॉ. गवई म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला तीन सुवर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवा येथे झालेल्या ७९ व्या सब ज्युनियर व कॅडेट आणि आंतरराज्य राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने तीन सुवर्णपदके पटकावली.

गोवा येथे सुरू असलेल्या १२ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा ३-० असा पराभव केला. त्यात पृथा वर्टीकरने पश्चिम बंगालच्या श्रीजिता शॉवर ११-३, ११-९, ७-११, ११-७ अशी मात करत महाराष्ट्राच्या विजयाचे खाते उघडून १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तनिशा कोटेचा हिने पश्चिम बंगालच्या सयानी पांडाचा ८-११, ११-७, ११-९, ६-११, ११-५ असा पराभव करून महाराष्ट्राच्या संघाने २-० ने आघाडी मिळवत विजेतेपदाकडे आगेकूच केली. तिसऱ्या दुहेरीच्या सामन्यात पृथा वर्टीकर व आर्या सोंगडकर यांनी श्रीयश्री दत्ता व सयानी यांच्यावर ३-१ अशी मात करत महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करून सुवर्णपदक पटकावले.

मुलींच्या १५ वर्षाखालील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचाच ३-२ असा पराभव करत दुसरे सुवर्णपदक पटकावले. अशीच विजयी घोडदौड चालू ठेवत १५ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने पीएसपीबी संघावर ३-२ ने विजय मिळवत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

महाराष्ट्राच्या या विजयी संघाचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, यतिन टिपणीस, अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता व नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरविरकर, जय मोडक, अजिंक्य शिंत्रे तसेच राज्य व जिल्हा संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images