Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एक शून्य तीन’नाटकाचा २५ ला शो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा नाताळची विशेष भेट म्हणून वाचकांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लबने ‘एक शून्य तीन’ या राज्यभरात गाजत असणाऱ्या नाटकाचे आयोजन केले आहे. येत्या २५ डिसेंबर रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता हे नाटक सादर केले जाणार आहे.

कल्चर क्लब सदस्यांसाठी २५० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. नव्याने सदस्य होणाऱ्यांसाठी या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत.

अभिजित साटम आणि ऋजुता चव्हाण हे या नाटकाचे निर्माते आहेत. नीरज शिखईकर आणि सुदीप मोडक यांनी दिग्दर्शन केले आहे. सुदीप मोडक यांनी नाटकाचे लेखन केले आहे. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका या नाटकात आहे. ‘दिल दोस्ती...’ फेम स्वानंदी टिकेकर हिचे हे पदार्पणातील नाटक आहे. सुमित राघवन अनेक वर्षांनंतर मराठी नाटकात भूमिका करीत आहे. आजच कल्चर क्लबचे सदस्य होऊन मनोरंजनाचा आस्वाद घ्या. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क सधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आधार’वर मंगळवारी मटा संवाद

$
0
0

मटा संवाद

-----

‘आधार’वर मंगळवारी मटा संवाद


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्डशी संबंधित समस्यांनी त्रासलेल्या नाशिककरांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (दि. १९) ‘मटा संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. गंगापूररोडवरील ‘मविप्र’च्या केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी चार ते सहा या वेळेत उपस्थ‌ित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड काढले म्हणजे आता काही टेन्शन नाही, अशा गोड गैरसमजामध्ये राहणेदेखील तापदायक ठरू लागले आहे. आधार लिंकिंगसाठी ते अपडेटेड ठेवणेदेखील सक्तीचे झाले असून, ते अपडेटेड नसल्याने नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बँका, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय, हॉस्पिटल्स, विमा कंपन्या, मोबाइल कंपन्या, आयकर विभाग यांसह प्रत्येक सरकारी विभागांशी संबंधित कामकाजाकरिता आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडत असून, त्यातूनच त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बहुसंख्य आधार केंद्रे बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आधार लिंकिंगअभावी नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, काही सरकारी कार्यालयांच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी उसळू लागली आहे. या गर्दीपुढे आधारशी संबंधित यंत्रणा तोकडी ठरत असून, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारींचा ओघ वाढू लागल्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आधार या विषयावर ‘मटा संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

---

समस्या मांडण्याची मिळणार संधी

‘मटा’च्या या समाजोपयोगी उपक्रमात नवीन आधार कार्ड काढण्यापासून ते आधार अपडेटेशनपर्यंत आधारशी संबंधित छोटी-मोठी कामे मार्गी लावण्यात येणाऱ्या समस्या नागरिकांना येथे मोकळेपणाने मांडता येणार आहेत. विशेष म्हणजे या तक्रारींची दखल घेऊन त्यावर उपाययोजनांची हमी देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि त्यांचे सहकारी यावेळी आवर्जून उपस्थ‌ित राहणार आहेत. त्यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि आधारशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी नागरिकांनी उपस्थ‌ित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रसाठ्यात तफावत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ग्रामीण पोलिस दलाने जप्त केलेला आणि प्रत्यक्षात उत्तर प्रदेश येथून चोरीस गेलेल्या शस्त्रसाठ्यात तफावत आढळून येत आहे. प्रवासादरम्यान ही शस्त्रे आणखी कोठे विकण्यात आली की संशयितांकडून ती गहाळ झाली, याचे कोडे पोलिसांना पडले आहे. तिकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील या घटनेच्या तपासाकडे मोर्चा वळवला असून, स्थानिक पातळीवर संशयितांना काही मदत मिळाली काय याचा तपास केला जात आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास चांदवड टोलनाक्याजवळ शस्‍त्रसाठा जप्त केला होता. बोलेरो वाहनात एक विशेष कप्पा तयार करून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ४१ बंदुका तसेच, चार हजार १४२ जिवंत काडतुसांचा साठा हस्तगत केला होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक नागेश राजेंद्र बनसोडे (२३) तसेच सलमान अमानुल्ला खान (१९ रा. शिवडी मुंबई) बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७ रा. शिवडी मुंबई) या तिघांना अटक केली आहे.

संशयितांनी ज्या दुकानातून एवढा मोठा शस्त्रसाठा लुटला त्या दुकानमालकाने उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार जेवढा शस्त्रसाठा चोरीला गेला तेवढा तो इथे हस्तगत झालेला नाही.

पोलिस चौकशीला विविध कंगोरे

चोरीस गेलेल्या व हस्तगत केलेल्या शस्‍त्रसाठ्यात तीन ते चार बंदुकांची तफावत आढळून येत आहे. प्रवासादरम्यान संशयितांनी त्यांची कोठे विल्हेवाट लावली, की प्रवासात त्या गहाळ झाल्या असा प्रश्न समोर येत आहे. संशयितांकडे वेगवेगळ्या पध्दतीने चौकशी सुरू आहे. एवढा मोठा शस्त्रसाठा दहशतवादी कारवाईसाठी वापरण्यात येणार होता, की मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळ्यांना तो पुरवण्यात येणार होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे नाशिक ग्रामीण पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.

खान, बादशाह मुख्य सूत्रधार

खान आणि बादशाह हे दोघे तस्करीच्या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपी सराईत तर आहेतच पण खूप थंड डोक्याचे असल्याने तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात पंजाब आर्मी सेंटर हे लायसन्स बंदुका विकणारे दुकान लुटले होते. रातोरात प्रवास करून ते नाशिकपर्यंत आले. मात्र, एका पेट्रोलपंपावर डिझेल टाकून पैसे न देता धूम ठोकल्यानंतर संशयितांचा पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली.

उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास

बंदुकांचे दुकानच लुटून नेल्याच्या घटनेचे परिणाम बांदा जिल्ह्यासह उत्तरप्रदेशमध्ये दिसून आले आहे. बांदा पोलिसांनी स्थानिक पातळीवर देखील शोध मोहीम हाती घेतली असून, त्यांचे एक पथक नाशिकमध्ये हजर झाले आहे. या पथकाने देखील आज संशयितांकडे चौकशी केली. तसेच फिर्यादीची फिर्याद व इतर माहिती नाशिक पोलिसांनी जाणून घेतली. याबाबत बोलताना बांदा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक शालिनी यांनी सांगितले की, संशयित आरोपींनी दुकानात लूट केल्यानंतर रातोरात परतीचा प्रवास सुरू केला. ते कोठेही थांबले नाहीत. या लुटीच्या गुन्ह्यात त्यांना स्थानिक पातळीवरून काही मदत झाली का हा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. आमचे एक पथक नाशिकला पोहचले असून, ते परत आल्यानंतरच काही धागेदोरे मिळू शकतील, अशी अपेक्षा एसपी शालिनी यांनी व्यक्त केली.

चर्चा खूप, पण पोलिसांची चुप्पी

संशयित आरोपी मुंबईचे असून, त्यातील बादशाहावर मुंबईतील वडाळासह इतर पोलिस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही अंडरवर्ल्ड टोळ्यांशी संबंधित असल्याची देखील चर्चा आहे. बादशहाचा पूर्वइतिहास पाहता एवढ्या मोठ्या शस्त्रसाठ्याचे काय होणार होते, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस दलातील सर्वच अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली असून, अफवांचा बाजार मात्र तेजीत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनकेपीएलचा जेता आज ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

नाशिकमधील क्रीडाप्रेमींचे आकर्षण केंद्र ठरलेला के. व्ही. एन. नाईक कबड्डी प्रीमिअर लीगची सेमिफायनल अत्यंत चुरशीची झाली. शनिवारी दिवसभरातील लढतींमध्ये एबीसी रॉयल आणि सिन्नर सायलेंट किलर या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. आता या दोन्ही संघांमध्ये आज (१७ डिसेंबर) अंतिम सामन्याची लढत होणार आहे.

सेमिफायनलमध्ये एबीसी रॉयल, सर्वज्ञ रायडर्स, दिंडोरी डिफेंडर आणि सिन्नर सायलंट किलर हे चार संघ पोहोचले होते. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एबीसी रॉयल आणि सर्वज्ञ रायडर यांच्यात झालेल्या सामन्यात एबीसी रॉयल संघाने सर्वज्ञ रायडर्सवर ५९/१५ अशी मात केली. या सामन्यात एबीसी रॉयलचा दादा आव्हाड उत्कृष्ट चढाईपटू ठरला. उत्कृष्ट पकडचा पुरस्कारही एबीसी संघाच्या परेश म्हात्रे याने पटकावला, तर या संघाचा खेळाडू राकेश खैरनार याने सामनावीराचा किताब पटकावला.

दुसरा सामना दिंडोरी डिफेंडर आणि सिन्नर सायलेंट किलर यांच्यात झाला. या सामन्यामध्ये सिन्नर सायलेंट किलर या संघाने दिंडोरी डिफेंडरवर ३५-३१ अशी मात केली. या सामन्याचा उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू मयूर शिवथरकर ठरला. सिन्नर संघाचा आदिनाथ गवळी याने उत्कृष्ट पकड हा पुरस्कार पटकावला, तर याच संघाचा ओमकार जाधव हा सामनावीर ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाकडे मनपाचे दुर्लक्ष

$
0
0

शेतकऱ्यांना फेरा मारून जाण्याची वेळ

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

तीन गावातील शेतकऱ्यांना त्र्यंबकेश्वर रोडवर येणाऱ्यांसाठी लागणारा मळे विभागाचा पूल महापालिकेकडून आजही दुर्लक्षित आहे. गेल्या पावसाळ्यात पूल वाहून गेल्याने अंबड-लिंकरोडवरील जाधव टाऊनशिपला फेरा मारून शेतकऱ्यांना शेतात जाण्याची वेळ आली होती. तरी याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातपूर विभागातील चुंचाळे, सातपूर व पिंपळगाव बहूला या तीन गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कुबेर पेट्रोल पंपाच्या मागे नंदिनी नदीवर छोटा पूल उभारण्यात आला होता. परंतु, कालांतराने पावसाच्या पाण्याने पूल अनेकदा खचलाही होता. गेल्या पावसाळ्यात जोरदार झालेल्या पावसाने पुलच वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती.

शेतात जाण्यासाठी सातपूर व पिंपळगाव बहूला गावातील शेतकऱ्यांना अंबड-लिंकरोडवरील जाधव टाऊनशिपमधून जावे लागले होते. त्यामुळे आता त्र्यंबकेश्वर रोडला अगदी सोपा मार्ग असलेल्या नंदिनी नदीच्या पुलाकडे महापालिका कधी लक्ष वेधणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीवरून सभापती माधूरी बोलकर यांनी पुलाची पाहणी करीत तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले होते. यानंतर महापालिकेने केवळ दगड, मातीचा भराव टाकत रस्ता सुरू केला आहे. चुकून एखादे अवजड वाहन पुलावर गेल्यास पुन्हा पूल खचण्याची शक्यता आहे. याठिकाणी महापालिकेने कमकुवत पूल असा फलकही लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वररोडला लागून असलेल्या कुबेर पेट्रोलपंपाच्या पाठिमागील पूल अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. मात्र गेल्या पावसाळ्यात पुलच वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. महापालिकेने नवीन पुलाची उभारणी करण्याची गरज आहे.

-अशोक बंदावणे, शेतकरी, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेट मीटरिंगद्वारे ‘त्यांची’ वीजबिलापासून सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सौरऊर्जा निर्मितीसाठी घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसवून वीजनिर्मिती करून स्वतःच्या वापरानंतर उरलेली वीज महावितरण कंपनीला विकता येते. या योजनेला प्रतिसाद देऊन पंचवटीतील रवींद्र जगझाप यांनी वीजबिलापासून सुटका मिळविली आहे.

हनुमाननगर परिसरातील रवींद्र जगझाप यांनी तीन किलो वॅट क्षमतेची नेट मीटर सिस्टिम स्वतः इंजिनीअर असल्याने स्वतःच बसविली. घरातील सर्व उपकरणे चालू शकतील एवढी वीजनिर्मिती त्यामधून होत असल्याने एक वर्षापासून त्यांना वीजबिलच भरावे लागलेले नाही. उलट महावितरणकडूनच आपल्याला काही प्रमाणात घेणे असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना जगझाप म्हणाले, की आपल्या घरावर गतवर्षी परिसरातील पहिली नेट मीटर सिस्टिम बसविली. त्याकरिता सौर पॅनल आणि सर्व उपकरणे मिळून जवळपास दोन लाख दहा हजार रुपयांच्या आसपास खर्च आला. पण, ही सिस्टिम बसविल्यापासून आपल्याला वीजबिलच भरावे लागलेले नाही. याशिवाय ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषण टाळण्यासाठी आपला हातभार लागत असल्याचे समाधानही लाभले. आपल्या अनुभवानंतर काही नातेवाइकांनीदेखील ही सिस्टिम बसविली आहे.

--

काय आहे नेट मीटरिंग?

नेट मीटरिंगमध्ये इन्व्हर्टर, ट्रान्स्फॉर्मर आणि वीजमीटर यांच्या साहाय्याने घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसविले जातात. या पॅनल्सच्या माध्यमातून वीजनिर्मिती होते. एका सौर प्रकल्पाद्वारे एक हजार युनिट वीजनिर्मिती होते. हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणतर्फे संयंत्र उपलब्ध करून दिली जातात. आपण किती किलोवॅटचा प्रकल्प उभारतो, त्यावर प्रकल्पाचा खर्च अवलंबून असतो. नेट मीटरिंगमुळे वीजबिल भरण्यापासून मुक्तता होण्यासह प्रदूषण टाळण्यासदेखील मदत होते. ही सिस्टिम सरकारी कार्यालयांत बसविल्यास आर्थिक आणि विजेची मोठी बचत होऊ शकेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

----

नेट मीटरिंग सिस्टिम बसवून जवळपास एक वर्ष झाले अाहे. रीडिंग घेण्यासाठी दर महिन्याला कर्मचारी येतात, पण वीजबिलच येत नाही आणि आले तरी मायनसमध्ये येते. त्यामुळे वीजबिलाच्या सर्व तक्रारींपासून सुटका झाली आहे.

- रवींद्र जगझाप, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग विझणार कशी?

$
0
0


कैलास येवला, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या भोंगळ कारभार वारंवार समोर येवूनही या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील आगीच्या घटनांवेळी आत्पकालीन परिस्थितीत या विभागाचे वाभाडे निघूनही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. शहरातील गादी कारखान्याला आग लागली तेव्हा संपूर्ण शहराने या समस्येचे उग्र रुप पाहिले आहे. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी घटना घडल्यास जबाबदार कुणाला धरावे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एकीकडे सटाणा शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि दुसरीकडे पालिकेच्या तोकड्या सेवा व सुविधा यामुळे शहरवासीयांना दररोज मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील जनतेला आपला जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे.

नुकत्याच सटाणा शहरातील प्रिन्स गादी कारखान्यास लागलेल्या आगीच्या निमित्ताने पालिकेच्या अग्निशमन विभागाचे तीन तेरा वाजले. इतकेच नव्हे तर शहरातील प्रत्येक आगीच्या घटनावेळी ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा बाका प्रसंग उभा राहिला असतांना देखील प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सटाणा नगर परिषदेचा अग्निशमन विभाग हा एक स्वतंत्र विभाग आहे. तरीही या विभागाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. याविभगाला विभागाला पूर्णवेळ अधिकारी नाही. शासनाच्या दंडकानुसार अग्निशामक स्थानक पर्यवेक्षक हे राज्य संवर्गातील पद सटाणा नगर परिषदेच्या प्रशासन विभागात मंजूर आहे. मात्र असे असतांनाही गेल्या काही वर्षापासून हे पद रिक्त आहे. अर्धवेळ व प्रभारी अधिकारी या पदाला न्याय देवू शकत नाही. त्यातच ते तांत्रिकदृष्टया मागास व प्रशिक्षित नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

पालिकेचा बंब जुनाट

सटाणा पालिकेच्या अग्निशमन केंद्राकडे आग विझविण्यासाठी असलेला बंब हा दहा ते बारा वर्षांपूर्वीचा जुनाट आहे. तत्कालीन आमदार संजय चव्हाण यांनी तत्कालीन आमदार डॉ. वसंत पवार यांच्या आमदार निधीतून सदरच्या बंबाची खरेदी केली होती. तेव्हापासूनची हाच बंब कार्यरत आहे. त्यात वेळोवेळी तांत्रिक बिघाड होतात. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेत शहरवासीयांना त्याचा प्रत्यय आला.

प्रशिक्षित वर्ग नाही

अग्निशमन विभागाकडे तांत्रिक व प्रशिक्षित वर्ग नाही, ही मोठी गंभीर बाब आहे. या विभागात पूर्णतः प्रशिक्षित व कुशल वर्गातील एकही कर्मचारी नाही. त्यामुळे घटना घडते तेव्हा नियोजनबद्ध कामाचा अभाव दिसून येतो. तसेच आपत्कालीन प्रसंगी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचाही अभाव या अशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येतो.


कारवाई करणार कोण, कुणावर?

या विभागातील सर्वच कर्मचारी पालिकेच्या अन्य विभागात काम करतात. त्यात पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी स्थानिक असल्याने कारवाई करायची तरी कुणी आणि कुणावर, असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे येरे माझ्या मागल्या हा प्रकार या विभगात सुरू आहे.

कर्मचारी सतत गैरहजर

चालक, सहाय्यक व फायरमनच्या कामाच्या वेळा पत्रकानुसार निश्चित असल्या तरी ते सगळे अग्निशमन केंद्रावर उपलब्ध असतीलच यांची शाश्वती नसते. हा अनुभव काही दिवसांपूर्वी गादी भांडारला आग लागली तेव्हा सगळ्या शहरवासीयांसह नगरसेवक मुन्ना कासम शेख यांनाही आला.

केंद्राची इमारतही अपूर्णावस्थेत

अग्निसुरक्षा अभियानांततर्गत सटाणा नगरपरिषदेचे स्वतंत्र असे सुसज्ज अग्निशमन केंद्र नवीन अमरधामलगत ५८ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या केंद्रांचा सांगाडा अपूर्णावस्थेत आहे. परिणामी सद्यस्थितीत अग्निशमन केंद्र व बंब हे पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या निवास्थानातच उभारण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा २०० रुपयांनी घसरला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

आठवडाभरापासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी अमावस्येमुळे लिलाव बंद असल्याने तीन दिवस व्यवहार बंद राहणार असल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची विक्रमी आवक वाढली. परिणामी दिवसभरात कांद्याच्या दरात चढ-उतार होते. गेल्या दोन दिवसात कांद्याचे दर २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत.

शनिवार लासलगाव व उमराणा बाजार समिती वगळता इतर सहा मार्केट आवारात ७४ हजार ८०० क्विंटल कांद्याची आवक झाली. यात कमीत कमी १४५० (चांदवड बाजार समिती) जास्तीत जास्त ३३८१ (पिंपळगाव बाजार समिती) व सरासरी २६०० ते २९०० पर्यंत प्रति क्विंटल दर होते.

सरकार पाकिस्तानातून कांदा आयात करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने बाजारभाव घससरतील या भीतीने कांद्याची विक्रमी आवक झाल्याची चर्चा बाजार समिती परिसरात सुरू होती. लासलगाव बाजार समितीत रात्री सात वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होते. गुरुवारच्या तुलनेत लासलगाव मार्केटला २०० रुपयांनी तर पिंपळगाव मार्केटला ३५० रुपयांनी कांदा घसरला.

परदेशात निर्यात सुरू

गुरुवारच्या तुलनेत सर्वच बाजार समित्यांमध्ये २०० ते ३०० रुपयांपर्यंत कांदा घसरला. उन्हाळ कांदा पूर्णतः संपल्याने सध्या मार्केटमध्ये लाल कांद्याचीच आवक आहे. लाल कांदाही सरासरी २५०० ते ३००० रुपये भाव टिकून आहेत. बांग्लादेश, दुबई, श्रीलंका, मलेशिया या देशांमध्ये कांद्याची निर्यात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास संकल्पनांनी जिंकली उपस्थितांची मने

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील टेहरे येथील समता विद्यालयात पंचायत समिती शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ४३ वे तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्ष‌ीस वितरण शनिवारी पार पडले.

भाजप नेते अद्वय हिरे यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. शनिवारी झालेल्या बक्षीस समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती यतीन पगार, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, पंचायत समिती उपसभापती अनिल तेजा, जिल्हा परिषद सदस्य दादाजी शेजवळ, सर्वांगिक विकास मंडळचे सचिव डी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत पाटील, अध्यक्ष शिवाजी शेवाळे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

गटशिक्षणअधिकारी शोभा पारधी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

या विज्ञान प्रदर्शनात यंदा शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर आधारित विज्ञान उपकरणे मांडण्यात आली असून, तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला. पाच वेगवेगळ्या गटात एकूण १९६ मॉडेल यात ठेवण्यात आले.

निकाल

प्राथमिक गटः तहजीब हायस्कूल मालेगाव (प्रथम), जे. ए. टी. हायस्कूल (द्वितीय), मालेगाव हायस्कूल (तृतीय).माध्यमिक गट ः जनता विद्यालय वजीरखेडे (प्रथम), विद्या विकास स्कूल भायगाव (द्वितीय), के. बी. एच विद्यालय मालेगाव (तृतीय) व्यवसाय मार्गदर्शन ः सरस्वती विद्यालय सायने (प्रथम), न्यू इंग्लिश स्कूल रावळगाव (द्वितीय).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावकरांना बौद्धिक मेजवानी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी संस्था प. बा. काकाणी नगर वाचनालयातर्फे ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजनातून लोकशिक्षण या उद्देश्याने ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमाला गेल्या ५० वर्षांपासून आयोजित केली जात आहे. शहरातील वैचारिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून ओळखली जाणारी ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमाला शनिवारपासून सुरू होत आहे. यात सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, विचारवंत यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकण्याची संधी मालेगावकरांना मिळणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांनी दिली.

या व्याख्यानमालेचे उद‌्घाटन शनिवारी झाले. महात्मा गांधींचे पणतू आणि सुप्रसिद्ध लेखक तुषार गांधी यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद‌्घाटन झाले. या निमित्ताने त्यांची गांधी हत्येचा समग्र इतिहास उलगडून सांगणारे व्याख्यान तुषार गांधी सविस्तर व्याख्यान देणार आहेत.

जागतिकीकरण आणि पर्यायी विकासनीती, आजचे सामाजिक वास्तव या सारख्या सध्या चर्चेत असलेल्या विषयांसह पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या वैचारिक भूमिकांची मीमांसा करणारी व्यासंगी अभ्यासकांची व्याख्याने या वर्षीच्या व्याख्यानमाळेची वैशिष्ट्य आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदाचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने कवी विदांचे चिरंजीव आणि वैचारिक लेखक डॉ. आनंद करंदीकर आणि श्रीमती सरिता आवाड हे ‘विंदांची त्रिपदी’ नावाचा खास द्रुकश्राव्य कार्यक्रम शनिवार (दि. २३) सादर करणार आहेत.

येथील काकाणी नगर वाचनालय सभागृहात रोज रात्री ८ वा. व्याख्यान होणार आहेत. या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेचा सर्व रसिक, जिज्ञासू श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा तसेच ग्रंथालय सप्ताहात ग्रंथभेट व ग्रंथनिधी देऊन वाचनालयाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रदीप कापडिया, अॅड. उदय कुलकर्णी, मिलिंद गवांदे, सुरेंद्र टिपरे, पुरुषोत्तम तापडे, रवीराज सोनार यांनी केले आहे. त्यामुळे मालेगावकरांनी पुढील काही दिवस वैचारिक मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

विजेचे खांब असो की इतर कुठलेही विद्युत काम करताना आजवर मोठ्या प्रमाणात होणारे अपघात बघता महावितरणच्या तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे देणे ही गरजेची बाब आहे. हिच गरज लक्षात घेवून वीज वितरण कंपनीच्या एकलहरे येथील नाशिक प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने येवल्यात सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण शिब‌िर आयोजित करण्यात आले. यात तालुक्यातील महावितरणच्या तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे धडे देण्यात आले.

महावितरण कंपनीतील तांत्रिक कर्मचारी, वायरमन, लाईनमन यांना कधी पोलवर चढताना, तर कधी रोहित्र अथवा इतर ठिकाणचे काम करताना बऱ्याचदा धोका पत्करावा लागतो. भावनेच्या भरात तर अनेकदा कुठलीही काळजी न घेतली गेल्याने या कर्मचाऱ्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात थेट तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. संजीवकुमार यांच्या या संकल्पनेनुसार सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधत महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीष करपे यांच्या मार्गदर्शनखाली एकलहरे येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने येवला तालुक्यातील महावितरणच्या तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. शासकीय विश्रामगृहावरील सभागृहात आयोजित या शिबिरात महावितरणच्या तालुक्यातील येवला ग्रामीण व अर्बन या दोनही उपविभागातील सर्वच तांत्रिक कर्मचारी सहभागी होताना त्यांनी सुरक्षेबाबत घ्यायची काळजी व उपाययोजना यासंदर्भात ज्ञान अवगत केले. तीन तासांच्या या प्रशिक्षण शिबिरात महावितरणचे मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेशकुमार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव, एकलहरेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दारव्हेकर, उपकार्यकारी अभियंता ढवळे यांनी अपघाताची छायाचित्रे चित्रफितीद्वारे दाखवून त्या अपघातांची कारणमिमांसा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईईच्या विद्यार्थ्यांना ‘आधार’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या गुणपत्रिकेवरीलच नाव आधारकार्डवर सक्तीचे करण्यात आल्याने जेईईच्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. मुदतीत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक असले तरी आधार अपडेशनअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली आहे. शहरात सोमवारपासून १४ नवीन आधार सेंटर्स कार्यान्वित होणार असून, त्यापैकी चार आधार सेंटर्स केवळ जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतील अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

नवीन आधार काढण्यासाठी, आहे त्या आधारकार्डचे अपडेशन करण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला वर्गाची त्यामध्ये अधिक फरफट सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने आमदार देवयानी फरांदे यांनी काही नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांसह शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचत शहरात आधार केंद्रांची संख्या वाढवा, अशी मागणी करण्यात आली. याखेरीज पेन्शनरांची तसेच जेईईच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्याकरिता स्वतंत्र आधार सेंटर्स सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. या सर्व विषयाकडे प्रशासनाचे लक्ष असून उपाययोजना देखील सुरू असल्याची माहिती यावेळी राधाकृष्णन बी. यांनी फरांदे यांच्यासह उपस्थ‌तिांना दिली. आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जेईई-मेन’ या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंत‌मि मुदत आहे. आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये नावात थोडाही बदल असला तरी अर्ज स्वीकारला जात नाही. आधारकार्ड दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना आधार केंद्रांची शोधाशोध करावी लागत आहे. या परीक्षार्थींसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार फरांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चार स्वतंत्र केंद्र सुरू करावीत असे आदेश महाऑनलाईनच्या समन्वयकांना दिले.

ऑनलाईन नोंदणी करा

युआयडीच्या सकेतस्थळावरही आधारकार्ड अद्यावत करता येते. युआयडीएआयडॉटइन या संकेतस्थळावर त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे अपलोड केल्यास अपडेशनचे काम ऑनलाइन करता येणार आहे. अपलोड करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्रे स्वतःच्या सहीने सांक्षाकित करणे आवश्यक आहे.

…तर आमच्याकडे करा तक्रार

शहरात सर्वत्र नवीन आधार कार्ड मोफत काढून दिले जाते तर आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी २५ रुपये शुल्क आहे. त्याहून अधिक पैशांची मागणी कोणी केली तर १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सोमवारपासून शहरात १४ नविन केंद्रे सुरू करण्यात येतील. प्रत्येक नागरिकाचे कागदपत्र स्कॅन करून युआयडीकडे अपलोड करावे लागते. त्यामुळे एका केंद्रावर दिवसभरात ३० ते ३५ नागरिकांची नोंदणी होते. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी यापूढे टोकन द्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित

यंत्रणेला केली. तसेच शहरात आधार केंद्र सुरू करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते विकासाची प्रशासनालाही घाई

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


शहरातील २५७ कोटींच्या रस्ते विकासाचा ठराव सत्तारूढ भाजपने मागच्या दाराने मंजूर केल्यानंतर प्रशासनानेही सत्ताधाऱ्यांचीच री ओढत याबाबतचा ठराव प्राप्त नसतांना हा खर्च स्पीलओव्हरमध्ये समाविष्ट केला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती डामडौल असतांनाही, सत्ताधाऱ्यांचे लाड पुरवण्याच्या या प्रयत्नाने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची शक्यता आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या जादा विषयांतील प्रस्तावांना मागच्या दाराने मंजुरी दिली होती. विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर महापौरांनी महासभा गुंडाळली होती. या मंजुरीवरून दीड महिन्यापासून गोंधळ सुरू आहे. मनसेच्या सत्ताकाळात मंजूर झालेल्या १९२ कोटींच्या रस्ते विकास योजनेत हाती घेतलेल्या रस्त्यांवरच डांबर ओतण्याचे काम सत्तारूढ भाजपकडून केला जात असल्याचा आरोप शिवसेना, मनसेसह विरोधकांनी केला. या आरोपांना उत्तर देत महापौरांनी २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. मात्र, त्याबाबतचा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्तच झालेला नाही.

सध्या सन २०१७-१८ चे सुधारित बजेट अंतिम करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात आयुक्त कृष्णा यांनी चालू आर्थिक वर्षातील स्पीलओव्हर अर्थात मागील मंजूर कामांच्या दायित्वात रस्ते विकास कामांचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे पालिकेवरील स्पीलओव्हर ७०० कोटींवर पोहोचला. महासभेचा ठराव प्राप्त झालेला नसताना स्पीलओव्हरमध्ये ही कामे गृहीत धरण्याच्या प्रशासनाच्या घाईमुळे आर्थिक डोलारा कोसळण्याची चिन्हे आहेत.

बजेटमध्ये तूट नाही

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १४१० कोटींचे प्रारूप बजेट स्थायीवर सादर केले होते. त्यानुसारच या आर्थिक वर्षात पालिकेला उत्पन्न मिळणार असून, बजेटमध्ये कोणतीही तूट येणार नसल्याचा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलखोलनंतर ‘आरोग्य’चा हास्यास्पद खुलासा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली शहरातील बाजारपेठांमध्ये लावलेल्या कचरापेट्यांच्या खरेदीतील आरोपांबाबत आरोग्य विभागाने केलेल्या खुलाशानंतर या खरेदीतील भ्रष्टाचाराभोवतीचा संशय गडद झाला आहे. कचरापेट्यांच्या किमतींपेक्षा ओव्हरहेड व अन्य करांमुळे कचरापेट्यांची किंमत वाढल्याचा केविलवाणा दावा आरोग्य विभागाने केल्यानंतर आरोग्याच्या दाव्याची शिवसेने पुन्हा चिरफाड केली आहे. प्रशासनाने सादर केलेले बिलाची चिरफाड करत, शिवसेनेने आरोग्याची पुन्हा पोलखोल केली आहे. दरम्यान या गैरव्यवहाराचे पुरावे शिल्लक राहू नये यासाठी कचरापेट्या चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

शहरात लावण्यात आलेल्या कचरापेट्यांची किंमत व बाजारात उपलब्ध असलेल्या कचरापेट्यांच्या किमंतीत प्रचंड तफावत आहे. आरोग्य विभागाकडून अकरा हजार १२१ रुपयांना खरेदी करण्यात आलेले कचरापेटी बाजारात केवळ २३०४ रुपयांना उपलब्ध असल्याचे पुरावे शिवसेनेने सादर केले आहे. त्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी हास्यास्पद खुलासा केला आहे. अकरा हजार १२ रुपयांना कचरापेटी उपलब्ध करून देताना जीएसटी, ओव्हरहेड चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस आदी कारणांमुळे किंमत वाढल्याचा दावा केला आहे. परंतु शिवसेनेने इतर चार्जेस पकडून बाजारभावात हीच किंमत पाच हजारापर्यंत जात असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेकडून पुन्हा चिरफाड

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून आरोग्य विभागाचा दावा खोडतांना यासंदर्भातील आकडेवारी सादर केली आहे. तसेच मुंबई महापालिकेने स्टील स्टॅण्डपोस्ट कचरापेट्या अवघ्या साडे तीन हजार रुपयांना खरेदी केल्याचा दावा केला आहे. परंतु नाशिक महापालिकेने चार पट अधिक रक्कम देवून प्लास्ट‌किच्या कचरापेट्या खरेदी करून त्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. याप्रकरणी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त डॉ. बुकाणे यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काडेपेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

$
0
0

मनमाड

काडेपेट्या घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला या काडेपेट्यांमुळेच आग लागल्याचा प्रकार मनमाडमध्ये घडला आहे. या अपघातात हा संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. मनमाड-मालेगाव मार्गावर पहाटे ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

आगीचे वृत्त कळताच मालेगाव तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी आले. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर सकाळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कारण आग विझवेपर्यंत वाहतूक थांबवण्यात आली होती.

संपूर्ण आग सुमारे ३ तासानंतर विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. तोपर्यंत वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधार कार्डची डोकेदुखी सोडवा संवादातून

$
0
0

आधार कार्डच्या समस्यांवर उद्या ‘मटा संवाद’; अधिकारी देणार प्रश्नांना उत्तर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसाठीच्या सक्षम यंत्रणेअभावी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना या समस्या खुलेपणाने मांडता याव्यात आणि त्यांच्या समस्यांवर प्रशासनाकडून लगेचच उत्तरेही मिळावीत यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या (दि.१९) गंगापूर रोडलगतच्या आकाशवाणी टॉवरजवळील केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दुपारी चार ते सहा यावेळेत हा संवाद होईल. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि त्यांचे सहकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.

सरकारने आधारलिंकिंग सक्तीचे केले आहे. त्यासाठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. बहुतांश लोकांनी २०११ व आसपासच्या काळात आधार नोंदणी केली आहे. या आधार कार्डवर संबंधित व्यक्तींची पूर्ण जन्मतारीख, मोबाइल क्रमांक नाहीत. निवासाचा पत्ता, नाव, फोटो यामध्येही चुका आहेत. अशा सर्वांनाच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे अनिवार्य झाले आहे. केवळ या दुरुस्त्या न केल्यामुळे त्यांना बँक, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, विमा कंपन्या, मोबाइल कंपन्या, हॉस्प‌िटल्स, शाळा, कॉलेजेस यांसह बहुतांश ठिकाणी अपडेटेड आधार कार्डस् सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड दुरुस्तीसाठी नागरिकांनी आधार सेंटर्सवर धाव घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आधार लिंकिंगअभावी नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून, त्यामुळे वादाचेही‌ प्रसंग उद्भवू लागले आहेत. याबाबतच्या तक्रारींचा ओघ वाढू लागल्याने महाराष्ट्र टाइम्सने आधार या विषयावर ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आधारबाबत येणाऱ्या अडचणी नागरिकांना खुलेपणाने मांडता येणार आहेत. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि त्यांचे सहकारी नागरिकांना देणार आहेत. या उपक्रमात नागरिकांना आधारबाबतच्या समस्यांची उत्तरे जाणून घेता येणार असल्याने त्यांनी या ‘मटा संवाद’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्सतर्फे करण्यात आले आहे.

या प्रश्नांची मिळणार उत्तरे

आधार सेंटर्सचे कोठे आहेत, आधार दुरुस्ती‌ कोणासाठी आवश्यक आहे, परिपूर्ण आधार कार्डवर कोणती माहिती असावी, आधार दुरुस्तीसाठी काय करावे, बोटांचे ठसे जुळत नसतील तर काय करावे, प्रशासन आधारसाठी टोकन कोठे देते, आधार दुरुस्तीसाठी ठरलेले शुल्क किती, अधिक शुल्क आकारल्यास तक्रार कोणाकडे करावी, आधार कार्ड हरविल्यास काय करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळेना शस्त्रसाठ्याचा हिशेब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून चोरी करून मुंबईकडे जाणारा शस्त्रसाठा नेमका किती होता, याची जुळवाजुळव करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. पोलिसांनी चुप्पी साधल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले असून, मुंबईकडे जाणाऱ्या शस्त्रसाठ्याचे नक्की काय होणार होते हे समोर येऊ शकलेले नाही.

नाशिक ग्रामीण पोलिस दलाने जप्त केलेला आणि प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातून चोरीस गेलेल्या शस्त्रसाठ्यात तफावत आढळून येते. वाहनचालक नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३), तसेच सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी, मुंबई) बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित (२७, रा. शिवडी, मुंबई) या तिघांनी मिळून बांदा जिल्ह्यातील सर्वांत मोठे समजले जाणारे पंजाब आर्म्स सेंटर या दुकानावर दरोडा घालून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र लंपास केले. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. निवडणूक काळात लायसन्स असलेली शस्त्रे जमा करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे आदेश निघाल्यास परवानाधारक शस्त्रे जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा केली जातात. उत्तर प्रदेशमध्ये मात्र परवानाधारक शस्त्रे बंदुकीची विक्री करणाऱ्या दुकानातच ठेवली जातात. दुकानदार शस्त्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची, तसेच शस्रास्रांची नोंद करून घेतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान या दुकानात २०० रायफल, रिव्हॉल्व्हर, तसेच सहा हजारांहून अधिक काडतुसे जमा करण्यात आली होती. याशिवाय दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला शस्त्रसाठादेखील होता. या दुकानातील काही अनियमित कामांमुळे हिशेबाचा गोंधळ उडतो आहे. संशयित आरोपींनी रेकी करीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दुकानाच्या चौकीदारास बंधक बनवून शस्त्रास्त्रे लुटली. नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळी हा शस्त्रसाठा पकडला त्या वेळी फक्त ४१ शस्त्रे आणि ४,१४३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शस्त्रांच्या संख्येत मोठी तफावत असून, हाच पोलिसांसाठी कळीचा मुद्दा ठरतो आहे. उर्वरित शस्त्रे कोठे गेली, याचा शोध लागणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव येथील कार्यालयात रविवारीदेखील वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. याशिवाय इतर ठिकाणावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील हजेरी लावली. मात्र, प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगत पोलिसांनी चुप्पी साधली आहे.

तीन राज्ये, १९ तासांचा प्रवास!

संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी रेकी करून बांदा जिल्ह्यात दरोडा घातला. मागील महिन्यातच १४ नोव्हेंबर रोजी एका कंपनीवर छापा मारून स्थानिक पोलिसांनी अवैध हत्यारांचा मोठा साठा जप्त केला होता. अवैध हत्यारांच्या तस्करीत हा परिसर सक्रिय असल्याचे दिसते. अशा स्थितीत मुंबईतील तीन गुन्हेगार वाहनाने प्रवास करीत बांदा येथे पोहोचले. तिथे दरोडा घालून त्यांनी चक्क बंदुकांचे दुकान लुटले. तेथून तीन राज्ये ओलांडून एक हजार किलोमीटरचे अंतर कापून ते नाशिकमध्ये पोहोचले. सलग प्रवास केला तरी या प्रवासासाठी २० तास लागतात. एवढ्या मोठ्या कालावधीत तीन राज्यांमधील गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलिस, बॉर्डर चेक पोस्ट अशा कोणालाच भनकही लागली नाही हे विशेष. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्र या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून, पोलिस यंत्रणेतील सुस्तीबाबत खुद्द पोलिस यंत्रणांमध्येच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये पेट्रोलपंपावर ही घटना घडली नसती तर संशयित विनासायास मुंबईत दाखल झाले असते.

आणखी एकास अटक

मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या शस्त्रसाठ्याच्या तस्करीत पोलिसांनी रविवारी एका संशयितास मुंबई येथून अटक केली. या गुन्ह्यात संशयित आरोपींची संख्या चार झाली असून, या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या संशयित आरोपीची ओळख उघड करण्यास नकार दिला. संशयिताला नाशिकला आणून चौकशी केल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३), तसेच सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी, मुंबई), बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित (२७, रा. शिवडी मुंबई) या तिघांसमवेत हा संशयित उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात गेला होता. तिथे शस्त्रांची लूट केली. पैकी तिघांना गुरुवारी सायंकाळी नाशिक ग्रामीण पोलिस दलाने चांदवड टोलनाक्याजवळ अटक केली. एकूण शस्त्रे आणि जप्त झालेली शस्त्रे यांच्यात तफावत असल्याने या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा कयास होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तीन पथके तपासासाठी मुंबईला रवाना केली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आज एका संशयितास अटक केली. परतीच्या प्रवासात तो अटक केलेल्या आरोपींसमवेत नव्हता. त्यामुळे उर्वरित शस्त्रसाठा त्याच्याकडून हस्तगत होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हा आरोपीदेखील सराईत असून, अंडरवर्ल्ड गँगशी संबंधित असल्याची माहिती समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगांच्या फटकाऱ्यांतून निसर्गचित्रांची मांडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सभोवतालचे पर्यावरण, निसर्ग सौंदर्य, त्यांत ऋतूनुसारच ओघाने बदलणाऱ्या लुब्ध रंगछटा यांतली संवेदनशीलता सूक्ष्मतेने एखाद्या कलाकाराला खुणावू शकते, आकर्षित करू शकते. अशाच एक प्रयत्न चित्रकार किरण सोनार यांनी त्यांच्या विविध कलाकृतीतून केला आहे.

सौंदर्यात्मकच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन मानवी जीवनाचे, गहिरे रूप, मानवी भावभावना आणि वास्तव यांतील सुप्त संघर्ष रसिकांना पहावयास मिळत आहेत. प्रदर्शनामध्ये सोनार यांनी अ‍ॅक्रिलिक रंगाचा वापर करून काढलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन शिखरेवाडी येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारी असलेल्या पी. एन. जी. च्या कलादालनात भरविण्यात आले आहे. हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, बुधवार (दि. २०) पर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत पाहता येणार आहे.

माझे मन शांत, निर्मल आणि निर्भय राहते. त्याच शांतीतून मला अमोघ ऊर्जा मिळून रंग बोलू लागतात, ब्रश खेळू लागतात.

किरण सोनार, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पारा १२.६ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये तापमानाचा पारा २.२ अंश सेल्स‌िअसने घसरला असून, वातावरणातील गारठा वाढल्याचा अनुभव रविवारी नाशिककरांनी घेतला. शहरात रविवारी किमान तापमान १२.६ अंश सेल्स‌िअस नोंदविले गेले. पुढील आठवड्यात तापमान आणखी खाली घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला असून, अजूनही नाशिकमध्ये हुडहुडी भरेल अशा थंडीला सुरुवात झालेली नाही. गेल्या आठवडाभरात तर तापमानाचा पारा सातत्याने कमी-अधिक होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. १० डिसेंबर रोजी १५.४ अंश सेल्स‌िअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली होती. आठवडाभरात सर्वांत कमी तापमान १४ डिसेंबर रोजी ११.४ अंश सेल्स‌िअस एवढे नोंदविण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. १६) पुन्हा हे तापमान १४.८ अंश सेल्स‌िअसपर्यंत पोहोचले होते. गेल्या २४ तासांमध्ये ते १२.६ अंश सेल्स‌िअसपर्यंत खाली आले आहे. महाबळेश्वर आणि पुण्यामध्ये १३ अंश सेल्स‌िअस तापमान नोंदविण्यात आले. त्यापेक्षाही कमी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. शनिवारी राज्यातील किमान तापमानाची (१२.८) ब्रह्मपुरी येथे नोंद झाली होती. त्याहूनही कमी तापमान रविवारी नाशिकमध्ये नोंदविले गेले. आठवडाभरात कमाल तापमानात मात्र फारसे चढ-उतार राहिलेले नाहीत. ते २८ ते ३० अंश सेल्स‌िअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

--

पुढील आठवडा गारेगार

नाशिकमध्ये पुढील आठवड्यात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी १२.६ अंश सेल्स‌िअस तापमान नोंदविण्यात आले असले, तरी सोमवारपासून ते कमी कमी होत जाईल. २२ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ३.६ अंशांनी खाली उतरून ९ अंश सेल्स‌िअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून नाशिककरांना थंडीचा आनंद घेता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

--

आठवड्यातील तापमान असे...

--

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

--

१० डिसेंबर १५.४ २९.२

११ डिसेंबर १४.० २९.१

१२ डिसेंबर १३.२ २८.१

१३ डिसेंबर ११.६ २८.०

१४ डिसेंबर ११.४ २९.६

१५ डिसेंबर १३.० २९.८

१६ डिसेंबर १४.८ ३०.०

१७ डिसेंबर १२.६ २८.१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिका जंगीनमठ स्वरनेत्र स्पर्धेत अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि नॅब डॉ. मोडक सेंटरतर्फे झालेल्या स्वरनेत्र या दोन दिवसीय मराठी- हिंदी गायन स्पर्धेत कृतिका जंगीनमठ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्जुन वाघमोडे याने द्वितीय, तर आशिक पाटील याने तृतीय क्रमांक मिळवला. पूजा मालधुरे, अभिजित राऊत, कासिम बेग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेसाठी १५० स्पर्धकांनी हजेरी लावली होती. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हा कार्यक्रम झाला. रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे, अॅड. विलास लोणारी, नॅब मोडक सेंटरच्या शाहीन शेख, श्याम पाडेकर, डॉ. बापये, पी. एन ट्रस्टच्या वाघ उपस्थित होते. प्रसिद्ध गायक आनंद अत्रे, मीना परुळेकर-निकम परीक्षक होते. अनिल सुकेणकार, सोनाली जोशी, गौरव सामनेरकर, गौरी पाठक, शिल्पा येवले यांनी सहकार्य केले. मनीष चिंधडे यांनी सूत्रसंचालन केले. मृदुला बेळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images