Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भावभावनांची गुंतागुंत दाखवणारे ‘एडिपस रेक्स’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे कुणालाही कळत नाही. मात्र, भविष्याचा वेध घेण्याचा ज्याने प्रयत्न केला, त्याला त्याची जाणीव थोड्याबहुत फरकाने होते. हाताशी नियती जाणून घेणारा एखादा भविष्यवेत्ता असला की त्याची ही वाट सुकर होते आणि त्याला जे भविष्य कळते ते भयानक असते, अशी मानवी मनाची गुंतागुंत दाखवणारे नाटक ‘एडिपस रेक्स’ होय.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘एडिपस रेक्स’ हे नाटक मंगळवारी सादर झाले. नाट्यक्षेत्रातील बायबल मानल्या जाणाऱ्या सोफोक्लिस लिखित या ग्रीक कलाकृतीचा अनुवाद अभय सदावर्ते यांनी केला होता. शापित राजा लुईस, त्यांची पत्नी जोकाश्टा व राजपुत्र एडिपस यांच्या नात्यातील गुंतागुंतीची ही कथा होती. ‘तुझी तुझ्या मुलाकडूनच हत्या होईल व तुझ्या पत्नीशी तुझ्या मुलाचा विवाह होईल’, असा लुईसला शाप असतो. तो ऐकून लुईस त्याच्या मुलाला-एडिपसला जंगलात फेकून देतो. मात्र, नियतीचा खेळ त्यांना पुन्हा एकत्र आणतो व शापवाणी खरी ठरते, असे नाटकाचे कथानक होते.

प्रा. रवींद्र कदम हे निर्मिती सूत्रधार होते, तर प्रफुल्ल लेले हे सूत्रधार होते. महेश डोकफोडे यांनी दिग्दर्शन व एडिपसची भूमिका केली. अमेय कुलकर्णी, अक्षय मुडावदकर, जयदीप लखलानी, आशिष चंद्रचूड, डॉ. प्राजक्ता लेले, अनिकेत कुलकर्णी, प्रतीक शर्मा, सुरभी पाटील, हर्षल भट आदींच्या भूमिका होत्या. नेपथ्य सुनील परमार, पार्श्वसंगीत तेजस बिल्दीकर, प्रकाशयोजना विनोद राठोड, रंगभूषा माणिक कानडे यांची होती, तर वेशभूषेची जबाबदारी नेहा मुडावदकर यांनी सांभाळली.

आजचे नाटक : ये मामला गडबड है

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिढी घडविण्यासाठी कष्ट घ्या

$
0
0

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या पिढीवरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. यामुळे ही पिढी घडविण्यासाठी सोसता येतील तेवढे कष्ट सोसा आणि राष्ट्राभिमानी पिढीची घडवणूक करा, अशी अपेक्षा आयपीएस अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोंसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक, स्वातंत्र्य सैनिक, सैनिकी शिक्षणाचे गाढे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची १४५ वी जयंती विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कायम विद्यार्थ्यांसोबत संवादाला महत्त्व दिले असून, त्यांचा दृष्टिकोन राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारत भूमीमध्ये श्रीराम आणि हनुमंतासारख्या आदर्श प्रतिमा होऊन गेल्या आहेत. या प्रतिमांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हायला हवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्रभक्ती हे तीन मूल्य प्राधान्याने अंगीकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सोसायटीच्या सर्व शाखांच्या वतीने धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या समाधीस मानवंदना देण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांनी डॉ. मुंजे यांच्या समाधीस माल्यार्पण केले. तसेच हुतात्मा स्मारकास प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय रामदंडी आबुजेद शेख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रामदंडी कप्तान अक्षय झोपे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे समादेशक (मेजर) चंद्रसेन कुलथे यांनी केले व संस्थेच्या कार्याचा आढावा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी घेतला.

डॉ. मुंजे संग्रहालयाचे उद््घाटन

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मूंजे यांचा जीवनपट भावचित्र, शस्त्र, दैनंदिन वापरातील पुरातन आशा नानाविध वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात आले. त्यास धर्मवीर संग्रहालय असे संबोधले गेले असून, या संग्रहालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यकारिणी सदस्य प्रशांत नाईक, राजाभाऊ गुजराथी, मंगला सवदीकर, नितीन गर्गे, नरेंद्र वाणी, नारायण दीक्षित, संजय सराफ, पराग कणेकर, प्रमोद धनगर, आशुतोष रहाळ्कर, प्राचार्या चेतना गौड व सर्व शाखांचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी, हितचिंतक, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रबद्ध संचलनाला मार्गदर्शन सुभेदार शिवाजी पाटील, सर्व सैनिकी प्रशिक्षकांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदंडी साहिल अतुल याने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित कॉलनीत ‘वन वे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंडित कॉलनीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘वन वे’ मार्गासह सम-विषम पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. शहर वाहतूक विभागाने तशी अधिसूचना प्रसिद्ध केली असून, २० डिसेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे.

पंडित कॉलनीतील दोन प्रमुख रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच रस्त्यावर एखादे वाहन पार्क झाल्यास निर्माण झालेली कोंडी लवकर सुटत नसल्याची येथील वस्तुस्थिती आहे. सततच्या त्रासाला स्थानिक नागरिकदेखील वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंडित कॉलनीतील दोन्ही प्रमुख रस्ते ‘वन वे’ करण्यात आले आहेत.

--

गंगापूररोड ते टिळकवाडीचा मार्ग

गंगापूररोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूने जुनी पंडित कॉलनीमार्गे राजीव गांधी भवनशेजारील टिळकवाडी सिग्नलकडे येणाऱ्या वाहतुकीस हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. २० डिसेंबरपासून टिळकवाडी सिग्नलकडून गंगापूररोडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना तनिष्क शोरूमसमोरून राणे डेअरीच्या उजव्या बाजूने नवीन पंडित कॉलनीमार्गे मॅरेथॉन चौकाकडे जावे लागले.

--

राणे डेअरी ते मॅरेथॉन चौकाचा मार्ग

नवीन पंडित कॉलनीतील या रस्त्यावरदेखील बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. त्यामुळे हा मार्गदेखील ‘वन वे’ घोषित करण्यात आला आहे. राणे डेअरी ते मॅरेथॉन चौक असा मार्ग एकेरी करण्यात आला असून, मॅरेथॉन चौकाकडून शरणपूररोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना जुनी पंडित कॉलनीतील मार्गाचा वापर करावा लागेल.

--

सम-विषम पार्किंग

या दोन्ही रस्त्यांवर सम-विषम पार्किंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिस कारवाई करतील. या नियमाचे पालन झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांश निकाली निघण्याची चिन्हे आहेत.

--

प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर पाहणी

या बदलाबाबत बोलताना वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की या दोन रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सतत तक्रारी येत होत्या. बेशिस्त पार्किंग आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतुकीमुळे हा प्रश्न उद््भवत असल्याने ‘वन वे’सह सम-विषम पार्किंगचा पर्याय निवडण्यात आला. नवी आणि जुनी पंडित कॉलनीला जोडण्यासाठी अंतर्गत तीन रस्ते उपलब्ध असून, त्यांचाही वापर करून ‘वन वे’ नियमांचे वाहनचालकांनी पालन करणे गरजेचे आहे. एक महिन्याच्या कालावधीनंतर याबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येईल.

--

एका महिन्याच्या कालावधीत नागरिक आपल्या सूचना वाहतूक विभागास सादर करू शकतील. त्यासाठी शरणपूररोडवरील वाहतूक विभागात नागरिकांनी संपर्क साधावा. येत्या २० तारखेपासून ‘वन वे’चा नियम लागू होणार आहे.

-अजय देवरे, सहायक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगप्रेमींनो, काळजी घ्या...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मकरसंक्रांतीचा सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असल्याने पतंगप्रेमींकडून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. पतंग उडवतांना वीजवाहक तारांपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पतंग उडवताना वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढताना झालेल्या दुर्घटनेत शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, फीडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र, पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्चदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व तरुणही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेक वेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतो. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न एका दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातुमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीजतारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. वीजतारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतणारे ठरू शकते, तसेच वीजवाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासन् तास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

--

हे लक्षात ठेवा...

-वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतू शकते

-वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टहास करू नका

-वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका

-धातुमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा

-दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पात्रता निकषांचा मदतीत अडथळा

$
0
0


नाशिक ः शेतकरी आत्महत्येच्या घटनांना निकषांमध्ये ताडून न पहाता सरसकट एक लाखांची मदत देण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी ठरली आहे. या घोषणेची अंमलबजावणी होऊ न शकल्याने गेल्या पावणेदोन वर्षांत ८३ पीड‌ित कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली आहेत. सात वर्षांत १५४ शेतकरी आत्महत्या जिल्हा प्रशासनाने निकषांच्या आधारे अपात्र ठरविल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. म्हणूनच पीडित शेतकरी कुटुंबाला आधार म्हणून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, या मदतीला पात्र ठरण्यासाठी सरकारने काही निकष ठरवून दिले आहेत. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा अशा कारणांमुळे शेतकऱ्याने स्वत:ची जीवनयात्रा संपविली असेल, तरच त्याचे पीड‌ित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरते. महसूल, पोल‌िस आण‌ि कृषी विभागाचा अहवाल त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. अशी प्रकरणे संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली जातात. त्यामध्ये पोलिसांचा अभिप्राय आणि शवविच्छेदनाचा अहवाल, नापिकीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तर कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचा मानला जातो. कर्जबाजारीपणा हे आत्महत्येचे कारण असेल, तर कर्जाचा तपशील आणि कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचे ठोस पुरावे या अहवालासोबत जोडले जातात. त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित आत्महत्येचे प्रकरण मदतीस पात्र आहे की नाही, हे ठरवितात. परंतु, आत्महत्येची ही ठोस कारणे पुढे आली नाहीत तर व्यक्त‌िगत कारणांतून आत्महत्या केल्याचे गृहीत धरून अशी प्रकरणे आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविली जातात.

जिल्ह्यात गेल्या सात वर्षांमध्ये ३८३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५४ शेतकरी कुटुंबांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरवून मदत नाकारली आहे. तर २२१ शेतकऱ्यांची कुटुंबे मदतीच्या निकषांना पात्र ठरल्याने त्यांना एक लाखांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित काही प्रकरणांवर अद्याप प्रशासनाकडून निर्णय झालेला नाही.

सरकारकडून शेतकऱ्यांची निराशा

शेतकरी आत्महत्येची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाल्यास संबंधित शेतकऱ्याचे कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकते. कुटुंबप्रमुख गेल्यामुळे शोकाकूल अस्वस्थेत असणाऱ्या कुटुंब‌ियांना चौकशी तापदायक वाटू लागते. म्हणूनच चौकशी न करताच पीड‌ित कुटुंबाला सरसकट एक लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी १५ मार्च २०१६ रोजी केली होती. परंतु, खडसे मंत्र‌िपदावरून पायउतार झाल्यानंतर सरकारमधील अन्य मंत्र्यांनी पावणेदोन वर्षांत या घोषणेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांची मात्र निराशा झाली आहे.

शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांचा तपशील

वर्ष पात्र अपात्र

२०११ २३ ११

२०१२ १६ ३

२०१३ ७ ८

२०१४ २५ १७

२०१५ ५३ ३२

२०१६ ४६ ४१

२०१७ ५१ ४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक शून्य तीन’चा रंगणार प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही खास महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २५ तारखेला सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक संपूर्ण राज्यात गाजत आहे.

एक शून्य तीन या नावापासूनच नाटकाचा चकवा सुरू होतो. कारण, एक शून्य तीन हा आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा महिला आणि बालकांसाठीचा हेल्पलाइन नंबर. त्याचा आणि नाटकातल्या गोष्टीचा थेट कोणताही संबंध नाही. मात्र, नाटक स्त्रियांवरील अत्याचारावर काही भाष्य करते, बलात्कार आणि त्यानंतर खुनाची शिकार झालेल्या काही स्त्रियांच्या अनुषंगाने एका गायब झालेल्या तरुणीच्या शोधाची गोष्ट सांगते किंवा या गायब तरुणीचा अनुषंग घेऊन हर्षदा या तरुणीच्या गायब होण्याच्या रहस्यापर्यंत पोहोचते. हा शोध अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा होतो, तो त्याच्या मांडणीमुळे आणि संपूर्ण घटनेला असलेल्या वेगळ्या बॅकड्रॉपमुळे. स्त्री अत्याचाराशी संबंधित या नाटकातले धागेदोरे विशिष्ट धर्मसूत्रांपर्यंत पोहोचतात आणि एका हिंसक प्रवृत्तीला धार्मिकतेचे पवित्र आवरण असण्याकडे निर्देश करतात. हेच खरे तर या नाटकाचे वेगळेपण आहे.

---

एकावर एक तिकीट फ्री!

कल्चर क्लब सदस्यांना एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची २ तिकिटे मोफत मिळणार आहेत. तेव्हा आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजनाचा आस्वाद घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. या नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वरनेत्र पुरस्कार’ १६ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॅब, डॉ. मोडक सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १६ आणि १७ डिसेंबर रोजी ‘स्वरनेत्र पुरस्कार’ ही हिंदी-मराठी गीतगायन स्पर्धा कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. ही स्पर्धा दृष्टिबाधित व्यक्तींसाठी गायनाची राज्यस्तरीय स्पर्धा असून, यात राज्यभरातून सुमारे १५० दृष्टिबाधित तरुण- तरुणी सहभागी होत आहेत.

सर्व अंध विद्यार्थ्यांची त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाहून नाशिकला येण्या-जाण्याची, तसेच त्यांच्या नाशिकमधील वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. १६ आणि १७ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत ही स्पर्धा होणार आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध गायक आणि आझादी ५०, मधुर बाला, माणिक मोती, अमृतलता या कार्यक्रमाचे निर्माते आणि चौरंग, मुंबई या संस्थेचे प्रमुख अशोक हांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. १७ तारखेला दुपारी स्पर्धेची अंतिम फेरी आणि त्यानंतर स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण होईल. स्पर्धा कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात होणार आहे.

प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तृतीय क्रमांकास ५ हजार आणि दोन हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेचे संयोजन रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) आणि कुसुमाग्रज स्मारकातर्फे करण्यात येणार आहे. आर्थिक व्यवस्थापन रोटरी क्लब ऑफ नाशिक पाहत असून, बापये आय हॉस्पिटल व पी. एन. मेहता ट्रस्ट यांची मदत झाली आहे. स्पर्धेला नाशिककरांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नॅबचे चेअरमन हेमंत टकले व सचिव शाहीन शेख, शाम पाडेकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे व रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष बेनिवाल आणि सचिव मनीष चिंधडे, मृदुला बेळे आणि इतर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यांसाठी दिव्यांगांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता यावा यासाठी दिव्यांग बाधवांना २१ हजार रुपये उत्पन्न असल्याचा दाखला सादर करावा लागतो. परंतु, असा दाखला मिळण्यात अडचणी येत असून, तो सहजगत्या मिळावा अशी मागणी अपंग साधना संघ संचलित बृहन्मुंबई अपंग विकास संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मंगळवारी दुपारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे द‌िव्यांगांनी अनेक मागण्या मांडल्या आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ब यादीतला अनुशेष भरून काढतानाच ड यादीत नोंद झालेल्या दिव्यांग बांधवांची निवड करण्यात यावी, प्राधान्य कुटुंबांतर्गत दिव्यांगांना रेशनकार्ड देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव असलेला तीन टक्के निधी दिव्यांगांच्या हितासाठी खर्च करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिले जाणारे मानधन ६०० वरून एक हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चार महिन्यांपूर्वी केली होती. परंतु, अजूनही या योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने संघटनेने बडोले यांचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे श्रीराम पाटणकर, दीपक शेवाळे, मच्छिंद्र मोरे, विठ्ठल पाटील, माधुरी भावसार, सुरेखा हिरे, वैशाली चव्हाण यांसह जिल्हाभरातील दिव्यांग बांधव उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटनस्थळांवर आता ‘नो सेल्फी’ झोन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटन स्थळांवर सेल्फीच्या नादात पर्यटक हकनाक जीव गमावत असल्याने हळहळ व्यक्त होण्यापलिकडे फारसे काही होत नाही. परंतु, पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. पर्यटन स्थळांवरील धोकादायक पॉईंट्स ‘नो सेल्फी’ झोन म्हणून निश्चित करण्यात येणार असून, उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही संबंध‌ित विभागांना करण्यात आल्या आहेत.

धकाधकीच्या जीवनात पर्यटन हा छंद नव्हे, तर गरज बनली आहे. त्यामुळेच पर्यटन स्थळांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देताना ते क्षण कॅमेराबध्द करण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. सेल्फीद्वारे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे सर्रास पहावयास मिळते. परंतु, सेल्फीच्या नादापायी पर्यटक स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशा अपघातांमुळे संबंधित पर्यटन स्थळाची देखील बदनामी होते. पर्यटन स्थळांवर अशा जीवघेण्या घटनांची पुनरावृत्ती टाळता यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. उत्साही पर्यटकांच्या सेल्फी नादाला आवर घालण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक विभागाने आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ना‌शिक विभागासाठी कार्यवाहीच्या सूचना

पर्यटन स्थळे ही पाटबंधारे, वनविभाग, पुरातत्व विभाग, महापालिका यांच्या अख्त्यारीत असतात. त्यामुळे संबंधित विभागांनी पर्यटन स्थळांवरील धोकेदायक पॉईंटस निश्च‌ित करून तो ‘नो सेल्फी’ झोन होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना महामंडळाकडून करण्यात आल्या आहेत. नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित विभागांना या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन स्थळांवर वावरताना कोणती काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शनही सूचना फलकांद्वारे करण्यात येणार आहे.

पर्यटकांनी सेल्फीच्या नादापायी जीव गमावणे या अत्यंत दुर्दैवी घटना असतात. या घटना टाळता याव्यात यासाठी संबंधित विभागांनी धोकादायक स्थळे न‌िश्चित करावीत. सेल्फीला प्रतिबंधासह तेथे आवश्यक ते सूचना फलक लावावेत, अशा सूचना पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

- नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपंचायतीसाठी अाज शिंदखेड्यात मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी (दि. १२) सायंकाळी थंडावल्या असून, शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनी आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावल्याचे चित्र होते. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ११ प्रभागातून चौरंगी लढत आहे. तर उर्वरित पाच प्रभागात पंचरंगी व तिरंगी सामना होणार आहे. नगरपंचायतीसाठी आज (दि. १३) सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून, मतमोजणी गुरुवारी (दि. १४) पार पडणार आहे.

नगरपंचायत निवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाशा पटेल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या सभा झाल्या आहेत. तसेच पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल हे शिंदखेडा शहरात तळ ठोकून आहेत. या निवडणुकीचे चित्र गुरुवारी मतमोजणीतून स्पष्ट होणार असून, नेमके पर्यटन विकास मंत्री रावल यांना शिंदखेडा नगरपंचायतीची सत्ता मिळते विरोधकांकडे, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

नंदुरबारमध्येही मतदान

नंदुरबार शहर नगरपालिकेच्या ३९ नगरसेवक पदाच्या जागांसाठी ११४ जण तर नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. शहरातील १९ प्रभागातील ३९ जागांसाठी आज (दि. १३) मतदान होणार असून, गुरुवारी (दि. १४) मतमोजणी प्रक्रियेतून नेमकी सत्ता काँग्रेस की भाजपकडे जाते या निकालावर लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार शिरीष चौधरी या दिग्गजांनी आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. मात्र नेमका विजय कोणाचा होईल हे आता मतमोजणीतून दिसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी संजीवनी’कडे पाठ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील कृष‌पिंप ग्राहकांना थकबाकीत सवलत देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस मालेगाव विभागात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ३० नोव्हेंबर अखेर विभागातील केवळ १५ हजार ५४६ कृष‌पिंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. थकीत वीजबिलापोटी ५ कोटी १ लाख ९ हजार ८४४ रुपयांचा भरणा महावितारांकडे करण्यात आला आहे.

थकबाकीदार कृष‌पिंप ग्राहकांना वीजबिले भरणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने नोव्हेंबरच्या सुरुवातीस ही योजना आणली होती. मात्र या योजनेस मालेगाव विभागात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे समोर आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०१७ अखेरीस असलेली वीज बिलाची मूळ थकबाकी रक्कम दहा किंवा पाच समान हप्त्यामध्ये दीड व तीन महिन्याच्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. मात्र योजनेत सहभागी होण्यासाठी कृषीपंप ग्राहकांना १ एप्रिल २०१७ नंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे भरणे आवश्यक करण्यात असल्याची अट घालण्यात आल्याने देखील या योजनेस शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मालेगाव विभागातील ३९ हजार ८६९ कृषीपंप ग्राहकांपैकी केवळ १५ हजार ५४६ ग्राहकांनी थकीतबिलाचा भरणा केला आहे. यात महावितरणची थकबाकी १५ कोटी ६ लाख ९१ हजार ४७२ इतकी आहे. मात्र योजनेत केवळ ५ कोटी १ लाख ९ हजार ८४४ रु इतका भरणा शेतकऱ्यांकडून झाला आहे. एकूण थकबाकीदर कृषीपंप ग्राहकांपैकी केवळ ३८ टक्के ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.

चोवीस हजार कृषीपंपधारक वंचित

मालेगाव विभागातील पाच उपविभागापैकी पाचव्या उपविभागात (मालेगाव ग्रामीण उपविभाग) सर्वाधिक ७ हजार ९४२ कृषीपंप ग्राहकांनी एकूण २ कोटी ४६ लाख ३९ हजार ३७८ रुपये थकबाकी भरणा केला आहे. तर त्या खालोखाल दाभाडी उपविभागात ३ हजार ८१० कृष‌पिंप धारकांनी १ कोटी ३७ लाख ७६ हजार १६८ रुपये इतका भरणा केला आहे. मात्र कृष‌पिंपधारकांची एकूण संख्या लक्षात घेता २४ हजारांहून अधिक कृष‌पिंपधारकांनी यात सहभाग नोंदवलेलाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत प्रवाह सोडून मृत साठ्यात मासेमारी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणातून जाणाऱ्या एक्स्प्रेस कालव्यातील मृतसाठ्यात विद्युत सप्लाय टाकून मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक आणि जीवघेणा प्रकार समोर आला आहे. हा प्रकारी त्वरित थांबवून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वर येथील चंद्रकांत शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. शिंदे यांची कॅनॉललगत शेती व वस्ती आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस कॅनॉलच्या पाचव्या मैलाजवल कॅनॉलमध्ये सध्या पाण्याचा मृतसाठा आहे. या पाण्यात छोटे छोटे मासे असतात. येथे मासेमारी करण्यासाठी चक्क पाण्यात विद्युत सप्लाय सोडला जात आहे.

सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. बागांच्या कामांसाठी पेठ, सुरगाणा भागातून मजूर आले आहेत. हे मजूर फावल्या वेळात पाणी काढण्यासाठी असलेल्या डिझेल मशीनचा वापर विद्युत सप्लाय घेण्यासाठी करतात. तो विद्युत सप्लाय काही वेळ हे मजूर पाण्यात सोडतात आणि पाण्यात धरणातून वाहत आलेले मासे या सप्लायमुळे तडफडून मरतात. त्यानंतर विद्युत सप्लाय बंद करून मृत मासे हे मजूर बाहेर काढतात. असा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. पाण्यात सोडण्यात येणारा सप्लाय अनेकांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे या प्रकाराकडे पोल‌सि आणि पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

अघोरी प्रकाराने संताप

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मासेमारी करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत कुणाच्याही जीवावर उठू शकते. त्यामुळे हा अघोरी प्रकार बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष समिती करणार उपोषण

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नदीजोड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित मांजरापाडा-२ चा प्रस्ताव त्वरित स्थगित करून नार-पार-अंबिका-औरंगा-तान-मान पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने वळविण्याच्या वांजुळ पाणी प्रकल्प राबविण्यात यावा या मागणीसाठी वाळुंज पाणी संघर्ष समिती १४ डिसेंबरपासून उपोषण करणार आहे.

बागलाण तालुक्यातील लखमापूर ग्रांमपंचायतीच्या राजगड सभागृहात वाळुंज पाणी संघर्ष समितीची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच १४ तारखेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास बच्छाव होते.

मांजरापाडा-२ चा प्रस्ताव स्थगित करून नार-पार-अंबिका-औरंगा-तान-मान पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने वळविण्याच्या वांजुळ पाणी प्रकल्प राबविण्यात यावा, या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी चणकापूर धरणात आणून गिरणा नदीद्वारे गिरणा डॅममध्ये पोहचवावे. यामुळे गिरणा डावा व उजवा कालवा तसेच गिरणा नदी लाभ क्षेत्रातखालील शेती सिंचनास उपयोग होईल. या साठी एकत्रित लढा देण्याचे ठरविण्यात आले.

तृटीच्या गिरणा खोऱ्यासाठी मंजूर ६७० एम सेफ्टीची मांजरापाडा-१ योजना मागील काळात गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आली, त्यावेळी यास ‘कसमादेना’ परिसरातील जनतेने आंदोलन करून विरोध केला असता तत्कालीन जलसंपदामंत्री यांनी मांजरापाडा-२ ही योजना मंजूर करून एकाच वेळी दोन्ही योजनांचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मांजरापाडा-१ या योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. व मांजरापाडा २ ला तीन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता राज्यपाल यांनी दिली आहे. परंतु मांजरापाडा २ बाबत जलतज्ज्ञांनी पाहणी करून लिफ्ट योजनेपेक्षा वळण योजनेद्वारे नैसर्गिक उताराने बोगदा करून पाणी वळविल्यास मोठा फायदा व खर्चात बचत होईल, असे मत नोंदविले आहे. या बैठकीत भाजपनेते अद्वय हिरे, अॅड शशी हिरे, अनिल निकम, डॉ. विलास बच्छाव, नीलेश कचवे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात ३० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मागील ११ महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये १६० नागरिकांचा बळी गेला. यात ४७ म्हणजे तब्बल ३० टक्के पादचारी मृत्युमुखी पडले असून, रस्त्यांवर हकनाक जीव जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

शहर हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे ५८८ अपघात झाले. १४७ जीवघेण्या अपघातांमध्ये १६० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. गंभीर स्वरूपाच्या २४५ अपघातांमध्ये ३५४ व्यक्ती जायबंदी झाल्या. किरकोळ स्वरूपाच्या ७० अपघातांमध्ये ११३ व्यक्तींना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १२६ इतकी होती. मृत्युमुखी पडलेल्या १६० नागरिकांमध्ये ४७ पादचाऱ्यांचा समावेश आहे. जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. यात ३९ पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. वाहनांची धडक बसून ८२ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील बरेच रस्ते रुंद असून, रस्त्यांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आलेला नाही. आडगाव परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर तर रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते. शहरातील रस्त्यांवर फूटपाथ शोधण्याची वेळ येते. दुसरीकडे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगसारखे महत्त्वाचे नियम पाळत नाहीत. सर्वच पातळ्यांवर पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढते आहे. महापालिकेसह शहर पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करून पादचारी मार्ग, रस्ता ओलांडण्याचे सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

बाइकचा वेग जीवघेणा

बाइकचा स्पीड, तसेच हेल्मेट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन ७२ जणांचा बळी गेला. हे प्रमाण एकूण संख्येच्या ४५ टक्के इतके आहे. मोटारसायकल अपघातात ५७ पुरुष चालकांचा, तर एका महिला चालकाचा मृत्यू झाला. मागे बसलेल्या एका पुरुषासह सहा महिलांना आपल्या प्राणास मुकावे लागले. दुसरीकडे स्कूटर्सच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मोपेड अपघातात चौघांचा प्राण गेला असून, त्यात एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून गोवंशांची वाहतूक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मोकाट जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य दोन संशयित तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे चारही गोवंशांची वाहतूक तवेरा कारमधून केली जात असल्याचे आढळून आले आहे.

इस्माईल अब्बास गाडीवाला (२८, रा. कल्याण), इलियास कामील कुरेशी (३०, रा. कुर्ला) आणि कयास मुर्तझा डोन (२७, रा. कल्याण) अशी संशयितांची नावे आहेत. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना संशयितांना आपण पकडले जाण्याची भीती वाटली. या भीतीपोटीच त्यांनी पोलिस व्हॅनला धडक देत पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. देवळालीच्या हाडोळा परिसरात ही घटना घडली. संशयितांकडून तवेरा कार, दोन इंजेक्शन व नायलॉन दोरी असे साहित्य पोलिसांना जप्त केले. संशयितांच्या ताब्यातून १ गाय, २ गोऱ्हे आणि १ कालवड यांची सुटका करण्यात आली आहे.

हाडोळा परिसरातील मस्जिद रोडवर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान तिघे संशयित हे मोकाट जनावरांना तवेरा कारमध्ये टाकून घेऊन जात होते. याच दरम्यान देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पोटे, शिपाई सुनील वायकंडे, गणपत मुठाळ व यू. जे. जगदाळे आदी गस्त घालत होते. संशयित आरोपींनी पोलिसांना बघताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्यांची तवेरा कारमधून (एमएच ०४ सीजे २६०९) बसून पळ काढला. मात्र, पुढे रस्ता न दिसल्याने गाडी पुन्हा मागे वळवली. त्यांचा सामना थेट समोरून येत असलेल्या पोलिसांशी झाला. त्यांनी पोलिसांच्या व्हॅनलाच धडक दिली. यात पोलिस शिपाई वायकंडे जखमी झाले आणि पोलिस वाहनाचेही नुकसान झाले. पोलिसांनी कार थांबविली आणि आतमध्ये बसलेल्या तिघा संशयितांना पकडले तर दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी कारमध्ये कोंबलेली जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. जनवारांना गाडीत कोंबता यावे यासाठी कारमधील ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी सीट वगळता अन्य सर्व सीट काढून ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, इंजक्शन दिल्याने बेशुद्ध झालेल्या गाय व अन्य गोवंशांना नाशिकमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर शुद्धीवर आणण्यात यश आले आहे. तसेच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

संशयितांना १६ पर्यंत कोठडी
या प्रकरणी संशयितांविरुद्ध जनावरे प्रतिबंधक कायदा अधिनियम कलाम ११ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दृष्टिहिनांना सिग्नल ओलांडण्यासाठी सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयटीआय सिग्नल परिसरात दृष्ट‌िबाधीत बांधवांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. यावर नाशिक महापालिकेच्या वतीने या ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा व स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार असून, त्यामुळे अंध बांधवांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास वाचणार आहे.

नाशिक फर्स्ट व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने येथे सुधारणा करण्याबाबत नाशिक महापालिकेला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावर नाशिक महापालिका व पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई केली जाणार असून, या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहनधारकांना समजावे यासाठी बोर्ड लावण्यात येणार आहेत. अंध व्यक्ती जेव्हा येथून ये-जा करतील, त्या वेळी उपस्थित असलेले पोलिस सिग्नल ऑपरेट करतील, अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार आहेत. या परिसरात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र युनिट ही संस्था कार्यरत आहे. अंध व्यक्ती शैक्षणिक व इतर कार्यालयीन कामकाजासाठी संस्थेत येत असतात. तसेच संस्थेचे कार्यशाळेतील दृष्ट‌िबाध‌ित विद्यार्थी दररोज नाशिक शहरातून प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी बसने येतात.

स्पीडब्रेकर बसवणार

नाशिक-सातपूर रोडवर भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. दृष्ट‌िहीन विद्यार्थ्यांना वाहनाने धडक दिल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. वाहनधारकांना समजावे यासाठी महापालिका या ठिकाणी तातडीने बोर्ड लावणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिमूर्ती चौकाचे रुपडे पालटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातील मुख्य चौकाचे सुशोभीकरणाबरोबरच वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी विविध चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यातील सिडकोतील पहिला चौक हा त्रिमूर्ती चौक निवडण्यात आला असून, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी बुधवारी (दि. १३) नगरसेवकांसह पोलिस निरीक्षक व विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी या चौकाची पाहणी केली.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्वच चौक हे सुशोभीकरण करून त्याठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतील अनेक चौक अशाप्रकारे सुशोभित करण्यात येणार असून, सुरुवातीला त्रिमूर्ती चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुशोभीकरणाद्वारे चौकातील वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक असून, या चौकातील वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच या चौकाचे सुशोभीकरण केले पाहिजे, असे मत व्यक्‍त केले जात आहे.

वाहतूक व्यवस्थेला फायदा

प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी बुधवारी, या चौकाची पाहणी केली. या चौकात वाहतुकीच्या नियमांसाठी आवश्यक असणारे पांढरे पट्टे मारणे, पथदिपांची व्यवस्था सुधारित करणे यांसारख्या विविध गोष्टी करण्यात येणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. या वेळी े उपअभियंता ए. जे. काझी, कनिष्ठ अभियंता नाना जगताप, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस. एस. घोटेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्र पुन्हा शेवाळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी नदी पात्रात सध्या पाण्याचा प्रवाह सुरू नसल्यामुळे पाणी स्थिर झाले आहे. काँक्रिटीकरणाच्या भागात साचत असलेल्या पाण्यावर शेवाळाचे थर तयार होऊ लागले आहेत. पाणी स्थिर असल्यामुळे या शेवाळाची वाढण्याची गती प्रचंड वाढलेली आहे. अशा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करणारे नागरिक या शेवाळलेल्या दगडांवरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत.

गेल्या महिनाभरापूर्वी रामकुंड परिसरातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेथे भाविक घसरून पडल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली त्यानंतर येथील दगडांवरील शेवाळ काढून टाकण्यात आले. मात्र आता पुन्हा गोदापात्रात गाडगे महाराज पुलाच्या खालच्या बाजूला अशा प्रकारचे शेवाळ तयार होऊ लागले आहे. हे शेवाळ काढणे गरजेचे आहे. नाहीतर येत्या काळात नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

मासे पकडणाऱ्यांची झुंबड

गोदावरीच्या पात्रात कचरा आणि घाण टाकण्याचे प्रमाण सध्या काही अंशी कमी झालेले आहे. मात्र, येथील पाणी स्थिर असल्यामुळे त्याची दुर्गंधी सुटलेली आहे, तसेच या पाण्यात शेवाळाचे प्रमाणही वाढले आहे. स्थिर पाण्यात मासे पकडण्याचे काम सोपे होत असल्यामुळे मासे पकडणाऱ्यांची झुंबड या भागात उडत असल्याचे चित्रही दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ख्रिसमस’साठी बनवा स्पेशल केक

$
0
0

मटा कल्चर क्लबकडून रविवारी आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तर्फे ख्रिसमस निमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रुट केक कसा तयार करावयाचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ऑलिव्ह गार्डन रेस्टोरंट, प्रमोद महाजन गार्डनच्या मागे, गंगापूर रोड या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

ख्रिसमस हा सर्वांचाच आवडता सण. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण यावेळी उत्सुक असतात. मात्र ख्रिसमस स्पेशल केक नेमका बनवायचा कसा हे माहित नसते. या वर्कशॉपमधून याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे घरच्या घरीच ख्रिसमस स्पेशल केक बनवता येणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रुट केक मध्ये ड्रायफ्रुट पासून ते मसाले कसे वापरावेत, हेदेखील शिकविले जाणार आहे. तसेच मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करीता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी विवेक सोहनी डेमो वर्कशॉप च्या माध्यमातून दाखवणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि वर्कशॉपमधून केक बनविणे शिका. अधिक माहितीसाठी (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कल्चर क्लबचे ऑनलाइन सभासदत्व मिळवण्यासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला व्हीजिट करा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांना स्वतंत्र जागा

$
0
0

पाथर्डी फाटा ते वडनेर गेटदरम्यान शनिवारपासून भाजीबाजार सुरू

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पाथर्डी फाटा ते वडनेर गेट पर्यंतच्या रस्त्यावर वाढत्या अपघातांबाबत बुधवारी (दि. १३) नगरसेवक व प्रशासनाने एकत्रितरित्या भाजी विक्रेते व शेतकरी यांच्याशी चर्चा केली. यात भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवारपासून या नवीन जागेत भाजीबाजार सुरू होणार असल्याचे सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी सांगितले.

येथील अतिक्रमणाने या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांसंदर्भात 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने पहिल्या टप्प्यात भाजी विक्रेत्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या रस्त्याच्या दुभाजकाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून, त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्‍त केले जात आहे.

पाथर्डी ते वडनेर या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघातांची शृंखलाच सुरू झाली होती. या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता याठिकाणी दुभाजक बसविणे गरजेचे आहे. तसेच याच रस्त्याच्या कडेला अनेक भाजी विक्रेते व काही शेतकरी भाजी विक्रीसाठी येऊन अतिक्रमण करीत होते. पूर्वी हा भाजीबाजार पाथर्डी फाट्यावर बसविला जात होता, आता तो एका कॉलनीतील रस्त्यावर स्थलांतरित झाला होता. त्यामुळे अतिक्रमण वाढण्याबरोबरच अपघातही वाढले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १३) नगरसेवक सुदाम डेमसे व भगवान दोंदे यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक महापालिका कार्यालयात आयोजित केली होती.

दीडशे विक्रेत्यांची नोंदणी

या वेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या. पाथर्डी परिसरातील साईबाबा मंदिरालगत सुमारे दोन हजार वारांचा एक भूखंड असून, या भूखंडावरून उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजीबाजाराच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच भूखंडातील सुमारे तीनशे वाराची जागा ही शेतकरी भाजी विक्रेत्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी हा भाजीबाजार उपलब्ध होणार असून, यातील सुमारे दीडशे विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात एका घरातील एकाच व्यक्‍तीला जागा देण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र ओटेही बांधण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या निर्णयाने भाजी विक्रेत्यांनी स्वागत केले असले तरी या रस्त्यावर दुभाजकही बसविण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. या बैठकीच्यावेळी अंकुश भोर, संदीप दोंदे, रवी गामणे, संदीप भोर, समाधान जाधव, भाऊसाहेब लोणे, बाळू बोराडे, पुष्पा लोखंडे, अंकुश शिंदे, तकदीर कडवे, सचिन भोर आदींनी चर्चेत भाग घेतला. शनिवारपासून हा भाजीबाजार सुरळीत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून भाजी विक्रेत्यांचा हा प्रश्न प्रलंबित होता. याठिकाणी भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अपघातांची संख्या वाढल्याने या प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा सुरू होता. आता शनिवारपासून हा प्रश्न निकाली निघणार असून, येत्या काही दिवसांतच दुभाजक टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

- सुदाम डेमसे, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images