Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सायकल ट्रॅकला ठेंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत त्र्यंबकरोडवर सीएसआर अंतर्गत सायकल ट्रॅक करून देण्याच्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या प्रस्तावाबाबत पालिकेने अनास्था दाखवली आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावरील दीड मीटरच्या साइटपट्टीचा वापर हा सायकल ट्रॅक म्हणून केला जात असल्याचे सांगत, या रस्त्यावर सायकल ट्रॅकची गरज नसल्याचे उत्तर जिल्हा उद्योग मित्र समितीला पालिकेने कळवले आहे. शहरात अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास कळवले जाईल, असे मोघम उत्तर देऊन जिल्हा उद्योग मित्र समितीच्या स्वतंत्र सायकल ट्रॅकच्या प्रस्तावावर पाणी फिरवले आहे.

जुलै महिन्यात जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत महापालिका हद्दीतून जाणाऱ्या त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक करून देण्यावर चर्चा झाली होती. या रस्त्यावर सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन करून त्यासंदर्भातील आराखडा व निधी खर्चासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. सीएसआरअंतर्गत विविध उद्योगांकडून निधी जमा करून हा सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन करण्यात येणार होते. त्यासंदर्भातील झूमचे पत्र पालिकेला मिळाले असले तरी, या सायकल ट्रॅकबाबत पालिकेने अनास्था दाखवली आहे. सध्या त्र्यंबकरोडला दीड मीटर लागून साइटपट्टी आहे. त्यामुळे महापालिकेने या साइटपट्टीला सायकल ट्रॅक ठरवत त‌िचा सायकलिस्ट वापर करीत असल्याचा दावा केला आहे. सध्या त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक असल्याचा शोध लावत, सध्या येथे सायकल ट्रॅकची गरज नसल्याचा अहवाल पालिकेने तयार केला आहे. स्वतंत्र सायकल ट्रॅकची गरज नसल्याचे पत्र जिल्हा उद्योग मित्र समितीला कळवले आहे. त्र्यंबकरो़डवर सायकल ट्रॅक अस्तित्वात नसतानाही पालिकेने घेतलेल्या या भूमिकेवरच आता संशय निर्माण झाला असून, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागणी असेल तर कळवू!

त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक करून देण्याच्या जिल्हा उद्योग मित्र समितीचा प्रस्ताव परतवून लावत शहरात अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक करण्याची मागणी आल्यास समितीला कळवले जाईल, असे मोघम उत्तर पालिकेने दिले आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून कामांसाठी निधी नाही. दुसरीकडे सायकल ट्रॅक सीएआरअंतर्गत विकस‌ित करण्याची तयारी उद्योजकांनी दर्शवली असताना त्याबाबत अनास्था दाखवण्यात आली आहे. त्यामळे पालिकेच्या उद्देशावरच आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कबड्डी सामन्यांचा थरार रंगणार

$
0
0

'केपीएल' सिझन २ ला ११ डिसेंबरपासून सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक महापालिका व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते १७ डिसेंबरदरम्यान कबड्डी प्रीमियर लीग सिझन २ चे आयोजन करण्यात आले आहे.

सिझन एकच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत दादाजी आव्हाड, आदिनाथ गवळी, मयुर शिवतरकर यांच्यासारखे प्रो कबड्डी खेळलेल्या खेळाडूंबरोबर सिद्धार्थ देसाई, मोबीन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार, यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. या स्पर्धेत यजमान नाशिक जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, या जिल्ह्यातील ७८ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांची विभागणी ६ संघात करण्यात आली आहे. सर्वज्ञ रेंडर्स, एबीसी रॉयल फायटर्स, नाशिक लायन्स, सिन्नर सायलेंट किलर, कन्हैया चॅलेंजर, डेरी पॉवर या संघांचा समावेश आहे.

सराव शिबिर आजपासून

ही स्पर्धा ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते १० या वेळात खेळवली जाणार आहे. १५ साखळी सामने व ४ बाद फेरीचे सामने असे १९ सामने होणार आहे. पहिले ५ दिवस रोज ३ सामने आणि सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे, शेवटच्या दिवशी तृतीय, चतुर्थ व अंतिम सामना खेळविण्यात येईल. स्पर्धेसाठी ६ हजार क्षमतेचे स्टेडियम बनविण्यात येत आहे. संघाचे सराव शिबिर आजपासून सुरू होणार आहे.

विजेत्या संघात

५ लाखांचे बक्षीस

स्पर्धेतील विजेत्यास ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस व चषक त्याचप्रमाणे उपविजेत्या संघास ३ लाख रुपये व चषक आणि तृतीय विजेत्या संघास २ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला ३१ हजार रुपये रोख व चषक, उत्कृष्ट चढाईपटू व पकडपटू यांनाही गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृउबा सचिवपद कार्यभार वादात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांच्याकडे पुन्हा सचिवपदाचा कार्यभार देण्यास ११ संचालकांनी विरोध केला आहे. या अगोदर संचालकांच्या बैठकीत काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव संचालकांनी केला होता. काळे यांची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घ्यावा, अशी मागणी या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पत्राद्वारे केली आहे.

या विरोधाचे पत्र शंकर धनवटे, प्रभाकर मुळाणे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे, ताराबाई माळेकर, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, श्याम गावित, विमल जुंद्रे, संजय तुंगार या ११ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. या पत्रात काळे यांनी सचिव म्हणून काम करीत असताना बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी संचालक मंडळाने दि. ९ ऑक्टोबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवेदन दिलेले आहे. तसेच, संचालक मंडळाने काळे यांचा पदभार काढून घेण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, असे असताना जिल्हा उपनिबंधकांनी काळे यांच्याकडे पदभार देण्याची सूचना केली. या पत्रानुसार सभापती शिवाजी चुंभळे यांनी कार्यवाही केली. मात्र, इतर संचालकांनी काळे यांच्याकडे पुन्हा सचिवपद देण्यास विरोध कायम ठेवला आहे.

--

या कारणांवरून विरोध

नाशिकरोड येथील जागा विक्रीत मुदतीत रक्कम न भरल्यामुळे बाजार समितीचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर, विमा हप्ता, संघटना वर्गणी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत न भरल्यामुळे बाजार समितीविरोधात दंड आकारणी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. बाजार समितीच्या २०१५-१६ पासून लेखापरीक्षण न होण्यास काळे जबाबदार आहेत, असे मुद्दे या पत्रात संचालकांनी मांडून त्यांना पदभार देण्यास विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक लाख १० हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला असून, या शेतकऱ्यांनी वीजबिलापोटी तब्बल ५३ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे.

थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना लागू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात योजनेला प्रतिसाद वाढविण्यासाठी ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीसाठी तीन, तर ३० हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी पाच हजार रुपये भरून योजनेचा लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. वीजबिलाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबरमध्ये फीडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (दि. ३० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ५३३ कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. एकूण थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांच्या तुलनेत ३६ टक्के ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.

--

नाशिक मंडलाची स्थिती

नाशिक शहर मंडलातील विभागनिहाय आकडेवारी (अनुक्रमे सहभागी कृषिपंपधारक व जमा केलेली रक्कम) ः नाशिक शहर १- १३४६ ग्राहक, ७९ लाख, नाशिक शहर २- ७८९९ ग्राहक, ५ कोटी १ लाख, नाशिक ग्रामीण- २१ हजार ९७४ ग्राहक, ११ कोटी ६९ लाख, चांदवड- २५ हजार ३२ ग्राहक, १२ कोटी ८२ लाख रुपये. नाशिक शहर मंडल- एकूण ५६ हजार २५१ ग्राहक, ३० कोटी ३२ लाख रुपये.

--

मालेगाव मंडलाची स्थिती

मालेगाव मंडलातील विभागनिहाय आकडेवारी (अनुक्रमे सहभागी कृषिपंप ग्राहक व जमा केलेली रक्कम) ः मालेगाव- १५ हजार ७८३ ग्राहक, ४ कोटी ९३ लाख, मनमाड- १२ हजार ३९० ग्राहक, ४ कोटी ९७ लाख, सटाणा- ११ हजार ८७५ ग्राहक, ५ कोटी १७ लाख, कळवण- १३ हजार २३४ ग्राहक, ७ कोटी ८७ लाख रुपये. मालेगाव मंडल- एकूण ५३ हजार २८२ ग्राहक, २२ कोटी ९४ लाख रुपये.

--

‘त्यांनी’ गमावली संधी

नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार २२२ कृषिपंपधारक शेतकरी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र ठरले होते. या ग्राहकांकडे वीजबिलाची ७६६ कोटी रुपये मूळ रकमेची वीजबिले थकीत आहेत. अंतिम मुदतीपर्यंत योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी सुलभ हप्ते, तसेच व्याज व दंडमाफीसह थकबाकीमुक्त होण्याची संधी गमावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या गोटात चलबिचल

$
0
0

भुजबळांना जामीन मिळाल्यास जिल्हा बँकेतील बिघडणार गणित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी शेतकरी कर्जमाफीचे कारण देत नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपने अध्यक्षपदासाठी फि‌ल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सन २०१५ मध्ये अध्यक्षपदाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या भाजपने आता येनकेन प्रकारे अध्यक्षपदासाठी गुप्त बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांवर पुन्हा भुजबळ फॅक्टरमुळे पाणी फिरण्याची शक्यता आहे. भुजबळांचा मंगळवारी जामीन झाल्यास जिल्हा बँकेची गणिते पुन्हा बदलण्याची शक्यता असून, भाजपच्या प्रयत्नांना खो बसणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे तब्बल सहा संचालक निवडून आले होते. तर २१ संचालकांपैकी अपूर्व हिरे गटाकडे ९, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे सहा संचालक होते. राज्यात सत्ता असल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार असावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यात स्पर्धा सुरू होती. परंतु, ऐनवेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजप नेत्यांना जोरदार धक्का दिला. माजीमंत्री छगन भुजबळ यांनी ऐनवेळी भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रीत करीत अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास कांदे यांना बिनविरोध निवडून आणले. भुजबळांच्या खेळीने भाजपला बँकेत सत्तेपासून दूर रहावे लागले. भुजबळ फार्मवरून चक्रे फिरल्याने बँकेचे अध्यक्षपद येवल्याला मिळाले.

पावणेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नरेंद्र दराडे यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा भाजपला अध्यक्षपद मिळण्‍याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांकडून गुप्त बैठकाचां सपाटा लावला जात आहे. जिल्हा बँकेत भाजपचे पूर्वी सहा अधिकृत संख्याबळ होते. मात्र, हिरे बंधूंनी राजीनामा दिल्याने आता भाजपचे संख्याबळ चारवर आले आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीचे परवेज कोकणी आणि नुकताच सेनेचा राजीमाना दिलेले संदीप गुळवे यांना गळाला लावल्याचे बोलले जात आहे. कोकणींना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या संचालकांचीही मनधरणी केली जात आहे. अध्यक्षपद ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी हे अवघड शिवधनुष्य उचलले असले तरी, भुजबळांचा करिश्मा त्यांच्या आड येण्याची शक्यता आहे. भुजबळ जेलमधून बाहेर आल्यास पुन्हा बँकेची गणिते फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा चलबिचल सुरू झाली असून, भुजबळांना थोपविण्यासाठी रणनितीत बदल केला जात आहे.

आजच्या निर्णयाकडे लक्ष

छगन भुजबळ यांच्यामागे अवैध संपत्तीचे प्रकरण लागून त्यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या पावणेदोन वर्षांपासून ते कारागृहात आहेत. परंतु, अवैध संपत्ती प्रकरणी त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम सुप्रीम कोर्टाने नुकतेच रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता असून, त्यावर आज (दि. ५) सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या बाजूने लागल्यास बँकच्या निवडणुकीत पुन्हा चमत्कार घडू शकतो, अशीही राजकीय गोटात चर्चा आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन इंद्रधनुष्यात मालेगाव केंद्रस्थानी

$
0
0

७ डिसेंबरपासून लसीकरण; टक्का वाढविण्याचे प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ७ ते १५ डिसेंबरदरम्यान मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मालेगाव शहराकडे विशेष लक्ष देऊन येथे जनजागृती केली जाणार आहे. एकही माता, बालक या मोहिमेत वंचित राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विशेष मिशन इंद्रधनुष्य टप्पा क्र. ३च्या सूक्ष्म नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा माता व

बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक मनपा आरोग्य अधिकारी, मालेगाव मनपा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत दोन टप्प्यांमध्ये झाालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांच्या लसीकरणात २० टक्क्यांनी वाढ झाली असून, मनपा क्षेत्रात ७२ टक्के, ग्रामीण भागात ९४ टक्के कामकाज करण्यात आले आहे. मालेगाव येथे लसीकरणाचे कामकाज चांगले व्हावे, यासठी जनजागृती करण्यात यावी तसेच धर्मगुरू, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग वाढवावा याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

७ ते १५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त वंचित राहिलेल्या माता व बालकांचे लसीकरण कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील एकही बालक व माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिकारी झाले उदंड...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरात भिकाऱ्यांची संख्या अलीकडे चांगलीच वाढली असून, त्यांच्यातील वादाचा जाच भाविकांना सहन करावा लागत आहे. रामकुंडावर एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याचा खून केल्याच्या घटनेनंतर या परिसरातील भिकाऱ्यांमध्ये होत असलेले वाद किती विकोपाला गेले आहेत, हे दिसून आले. मात्र, तरीही याप्रश्नी ठोस कार्यवाही होत नसल्याने तीर्थस्थाने भिकाऱ्यांना आंदणच दिलीत की काय, असा सवाल भाविकांकडून उपस्थित होत आहे.

या परिसरातील बहुतांश भिकारी धडधाकट असल्याची स्थिती दिसून येते. या परिसरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी त्यांचा बिनबोभाट वावर असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांबरोबरच नाशिककरांनाही या भिकाऱ्यांचा वावर त्रासदायक ठरत आहे. त्यांचा त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचेही या खुनाच्या प्रकारामुळे

उघडकीस आल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थस्थानावरील हे चित्र बदलण्याचे मोठे आव्हान स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या प्रशासनाला पेलवावे लागणार आहे.

विविध कारणांनी घर सोडून आलेले लोक भिकारी बनून नाशिकच्या विविध परिसरात राहत असल्याचे दिसून येते. धार्मिक नगरीत होत असलेल्या अन्नदानामुळे सकाळ-सायंकाळाच्या जेवणाचा प्रश्न सुटतो. रामकुंड परिसरात तर अशा प्रकारचे अन्नदान नेहमीच सुरू असते. पोटाला पुरेसे अन्न मिळत असतानाही हे भिकारी रोख पैशांच्या भिकेसाठी भाविक आणि पर्यटकांकडे हात पसरत असतात. त्यांच्या हातात पैसाही पडत असतो. हा हाती पडलेला पैसा दारू आणि अन्य नशांसाठी वापरला जातो. अशा प्रकारच्या नशा करणारे भिकारी या परिसरात सर्रास नजरेस पडतात.

रामकुंड परिसरात मिळणाऱे अन्न तेथेच बसून खाणे, उरलेले अन्न तसेच टाकून देणे, तेथेच झोपणे, कित्येक दिवस अंघोळ केली नसल्यामुळे त्यांची सुटलेली दुर्गंधी, अंगावरील कपडे धुतलेले नसल्यामुळे त्यांचा दिसणार गलिच्छ अवतार भाविक आणि पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. हे चित्र बदलण्याची गरज व्यक्त होत आहे.

--

खुनापर्यंत जातेय मजल

परिसरातील भिकाऱ्यांत अनेक कारणावरून वाद होत असतात. त्यांच्या वादाकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. त्यांचे वाद कधी-कधी विकोपास जातात. रात्रीच्या वेळी झोपण्याच्या जागेवरूनही वाद होतात. अशाच एका वादातून नरोत्तम भवनसमोरील दुकानांच्या शटरजवळच एका वृद्ध भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार घडला होता. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकराचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे या खुनाची उकल आतापर्यंत झालेली नाही. दुसरा प्रकार रामकुंड परिसरात साईबाबा मंदिराच्या समोरच्या पारावरच घडला. हा वाद दारूच्या नशेत झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

--

बेघर हाऊसची निकड

या भिकाऱ्यांना पवित्र तीर्थस्थानावर येण्यास बंदी घालण्यात यावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र ठिकाणी भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेने रामकुंड परिसरात असलेल्या भिकाऱ्यांसाठी बेघर हाऊसच्या उभारणीचा विचार मांडला होता. त्यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारचे बेघर हाऊस अजूनही उभे राहिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर चषक बजेटमधून गायब?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने क्रीडा विभागासाठी राखीव ठेवलेल्या पाच टक्के निधी खर्चात अनास्था दाखवली असतानाच आता बजेटमधूनच महापौर चषक क्रीडा स्पर्धा गायब केल्याची चर्चा आहे. कबड्डी खो खो आणि कुस्ती या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या महापौर चषकाची परंपरा सन २०१२पासून खंडित करण्यात आली असून, आता थेट बजेटमधूनही या स्पर्धा हद्दपार झाल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनापाठोपाठ आता लोकप्रतिनिधींमध्येच या स्पर्धेबाबत मोठी अनास्था असल्याचे चित्र आहे.

क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांच्या कार्यकाळापासून महापौर चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. कबड्डी खो खो आणि कुस्ती या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी महापौर चषक क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. त्यासाठी बजेटमध्ये दरवर्षी विशिष्ट तरतूदही केली जात होती. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू ‌राहिली. परंतु, सन २०१२ नंतर या परंपरेला ब्रेक देण्यात आला आहे. उद्धव निमसे हे सन २०१२ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ही शेवटची स्पर्धा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकखाली चौघांना चिरडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड- मालेगाव रस्त्यावरील दहेगाव शिवारात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मोटारसायकलला टँकरने मागून धडक देऊन बोयेगाव (ता. नांदगाव) येथील एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले. यापैकी तीन जण जागीच ठार झाले, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मालेगाव येथे मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. यात आठ वर्षीय बालक जखमी झाले आहे. सर्व जण बोयेगाव येथील चितळकर परिवारातील आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की मृतांच्या कवटीचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. या प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांनी दिली.

मृतांमध्ये संतोष रामभाऊ चितळकर (वय ३२), पत्नी आशाबाई (वय २७), मुलगा रोशन ( ८), पुतण्या भूषण (७) आणि भावजयी सविता उत्तम चितळकर (२०) यांचा समावेश आहे. टँकरचालक मृतांचा नातेवाईक आहे. हा अपघात नसून, हत्या असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला होता. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात संतोष चितळकर याचे संपूर्ण कुटुंब उद््ध्वस्त झाले. संतोष यांना दोन भाऊ असून, एक मिलिटरीत, तर दुसरा भास्कर बोयेगाव येथे शेतकरी आहे. सविता ही भास्करची पत्नी होती.

पूर्ववैमनस्यातून घात

हा अपघात नसून, हा भरधाव टँकर अंगावर घालून मोटारसायकल टँकरखाली चिरडून चार जणांची हत्याच असल्याचा आरोप संतप्त कुटुंबीयांनी केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. मृत संतोष चितळकर व टँकरचालक संशयित तुकाराम चितळकर एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. या दोन्ही कुटुंबांत शेतजमिनीवरून वाद व पूर्ववैमनस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी या दोन्ही कुटुंबांत हाणामारीच्या घटना घडल्या असून, २०१२ मध्ये या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीही दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. संतोष व इतर चौघे मोटारसायकलवरून मनमाडकडे निघाले, त्याच वेळी तुकाराम टँकर घेऊन बोयेगावातून मनमाडकडे निघाला. मात्र, मनमाडच्या अलीकडे दहेगाव शिवारात हा भीषण प्रकार घडला. मागून येऊन घात केल्याची भावना संतोषच्या भावांनीही व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समावेशक आरक्षणांमध्ये ‘झोल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समावेशक आरक्षणाच्या (एआर) नावाखाली विकसीत करण्यात येणाऱ्या आरक्षणात बिल्डर, नगररचना आणि मिळकत विभागातील अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

शहरातील ३३ समावेशक आरक्षणांपैकी २५ आरक्षणांचा गैरवापर झाला असून, पार्किंगसाठी विविध ठिकाणी २८ आरक्षणे असताना जेमतेम ४ भूखंडांच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रोटरी, पझल पार्किंगचा बडेजाव मिरवणाऱ्या महापालिकेने पार्किंगच्या जागा ताब्यात घेण्याकडे मात्र काणाडोळा केला आहे. पार्किंगसह अन्य नागरी प्रयोजनांसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागांवर काही भूविकासकांनी कब्जा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. संबंधितावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली आहे.

शहर विकास आराखड्यात पार्किंग, रुग्णालये, शाळा, कार्यालये, मैदाने यांसह विविध नागरी प्रयोजनांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. या सर्व आरक्षणांच्या संपादनासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची पालिकेला आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देत काही आरक्षणे टीडीआरच्या माध्यमातून, तर काही आरक्षणे समावेशक आरक्षण तरतुदीच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याअंतर्गतच समावेशक आरक्षणाच्या (अॅकॉमडेशन रिझर्व्हेशन) माध्यमातून ३३ आरक्षित भूखंडांच्या विकासासाठी मंजुरी दिली गेली. संबंधित जागा मालकांनी आरक्षण विकासाच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करत आपली मान सोडवून घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात आकाशवाणी टॉवरजवळ असेच समावेशक आरक्षणाखाली मैदान विकसित करण्याच्या कामाला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. त्यानंतर समावेशक आरक्षणाबाबत बोरस्ते यांनी माहिती मागविली असता त्यात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

शहरात समावेशक आरक्षणाखाली ३३ पार्किंगची ठिकाणे विकसित करण्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातील चार प्रस्ताव भूसंपादनासाठी असून, पाच प्रकरणे विकसित झाली आहेत. विकसित झालेल्या प्रकरणांमध्ये सातपूर गावठाण, टीपी स्किम दोनमधील एकूण तीन तर गोदाघाट परिसरातील एका आरक्षणाचा समावेश आहे. परंतु, यात मूळ आरक्षणे विकसित केली गेलीच नसल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये आरक्षणे स्थलांतरित करण्यात आली, तर बऱ्याच प्रकरणांमध्ये आरक्षणांचा ताबाच महापालिकेला मिळू शकलेला नाही. विशेषत: शहरात पार्किंगची समस्या गंभीर बनली असताना पार्किंगची आरक्षणे एआरअंतर्गत विकसित करताना महापालिकेची फसवणूक केली गेली. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

मागच्या दाराने प्रस्ताव

समावेशक आरक्षणे विकसित करू नयेत, असा ठराव सन २००४ मध्ये करण्यात आला असताना अजूनही मागच्या दाराने समावेशक आरक्षणे विकसित करण्याचे प्रस्ताव दाखल होत आहेत. जागा आरक्षणातून सोडवून घेण्यासाठी पुन्हा पालिकेकडे सहा ते सात एआरचे प्रस्ताव दाखल होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा ठराव कागदावरच राहणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

मंजूर पार्किंग, वापर भलताच

मोक्याच्या जागेवर असलेल्या आरक्षणांचा बिल्डर, अधिकाऱ्यांनी बट्ट्याबोळ केला आहे. देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक १२२ चे क्षेत्र शॉपिंग आणि पार्किंगसाठी आरक्षित होते. तेथे पार्किंगची जागा विकसित झाली. परंतु, महापालिकेकडे हस्तांतरित झाली नाही. नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक ४३२ मधील क्षेत्राचे अद्याप बांधकाम झालेले नाही. टीपी स्किम दोनमधील सर्वे क्रमांक ९९९, १००० मध्ये सहाशे चौरस मीटर जागेवर पार्किंग अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलच्या चार हजार चौरस मीटर जागेवर भूमिगत वाहनतळ उभारण्यात आले; परंतु, दहा वर्षे उलटूनही महापालिकेने ते वाहनतळ ताब्यात घेतले नसून, तेथे बिल्डिंग उभी राह‌िली आहे. पंचवटी गावठाणात सीतागुंफा येथे १२९० चौरसमीटर वाहनतळ विकसित करण्यात आले. परंतु, अद्याप महापालिकेने त्या वाहनतळाचा वापर केलेला नाही. पंचवटी गावठाणातील सीटीएस क्रमांक ५८७७ मध्ये पार्किंगसाठी इमारत तयार असली, तरी त्याचा अनधिकृतपणे वापर सुरू आहे.

शहरात प्रशासन व बिल्डरांकडून समावेशक आरक्षण विकसित करण्याचे रॅकेट चालविले जात असून, मोक्याच्या जागांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या सर्वांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून ही अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहोत.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळवटवासीय दहशतीखाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दळवट व परिसरातील गावांना भूकंपाचे धक्के बसल्याने तेथील आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. सोमवारी पहाटे तसेच दुपारी धक्का बसल्याचे दळवट ग्रामस्थांनी सांगितले.

भूकंपाच्या धक्क्याबाबत कळवण तालुक्यातील वीज महावितरण व पोलिस वगळता अन्य शासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी दळवट येथे भेट देत ग्रामस्थांसोबत बैठक घेत भूकंपाबाबत माहिती जाणून घेतली. भूकंपप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

दळवट व परिसर भूकंप केंद्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. मात्र, तेथे भूकंपमापन यंत्रणा नसल्याने अधिक माहिती मिळू शकत नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलपेक्षा कमी असल्याने त्याची नोंद करता न आल्याचे मेरी येथील सूत्रांनी सांगितले.

दळवट परिसर हे भूकंपाचे केंद्र असून कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, खिराड, बोरदैवत आदी भागात भूकंपाचे धक्के बसत असतात. आता धक्के पुन्हा बसू लागल्याने दळवट परिसरात भूकंप मापन यंत्र बसवावे अशी मागणी दळवट येथे झालेल्या बैठकीत सरपंच रमेश पवार, शाम भोये, यशवंत पवार यांनी केली. परिसरातील महावितरणचे वीजपुरवठा करण्यासाठी उभे केलेले पोल जीर्ण झाले असून भूकंपाच्या धक्क्यामुळे जीवीत हानी होण्याची शक्यता नामदेव गावित, उलशा पवार यांनी बोलून दाखवली. यावेळी उपस्थित महावितरणचे कनिष्ठ अभियंता अस्वले यांनी जीर्ण पोल तत्काळ बदलून देण्याची ग्वाही दिली.

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर परिसरात कुठेही नुकसान झाले नाही. मात्र नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अभोणा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांनी घटनास्थळी भेट देवून आदिवासी नागरिकांना दिलासा दिला. दळवट परिसरात दोन दिवसांपासून धक्के बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शासन व शासकीय यंत्रणा भूकंपांच्या या सौम्य धक्क्याकडे दुर्लक्ष करीत असून या धक्क्याकडे गांभीर्याने बघून शासनाने तत्काळ उपाय योजना करावी. भूकंपमापन यंत्रणा दळवट येथे बसवावे व आदिवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी यावेळी केली.

बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, प्रभू जाधव, मुरलीधर पवार, अनिल पवार, संजय गायकवाड, नंदलाल पवार, जयराम कनोज, केदा पवार, सोमनाथ पवार, हिरामण पवार तलाठी बोरसे, विस्तार अधिकारी महाले व परिसरातील ग्रामसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार लिंकिंगने वाढली डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलचे सिमकार्ड असो की बँक खाते त्याला आधार लिकींग करण्यासाठी थोडाच काळ नागरिकांच्या हाती शिल्लक असला तरी अडचणींचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. विशिष्ट मुदतीत लिंकिंगचे काम मार्गी लागणार की नाही या चिंतेने नागरिकांना डोकेदुखी वाढली आहे.

आधारकार्ड ही प्रत्येक भारतीयाची मुख्य ओळख बनू पहात आहे. त्यामुळे आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य झाले असून त्यासाठी सरकारने नागरिकांना विशिष्ट मुदतही दिली आहे. आर्थिक सेवांची जोडणी, सिमकार्ड लिंकिंग असेल किंवा सामाजिक सुरक्षा योजनेसाठी आधार लिंकिंग करणे अनिवार्य झाले आहे. आधारला बँक खाते, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इव्किटी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, स्मॉल सेव्हिंग स्किम्स, पीपीएफ, किसान विकास पत्र यांच्यासोबत लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठीही हीच मुदत असून मोबाइल ग्राहकांची रिव्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये संबंधित ठिकाणी आधार लिंकिंग झाले नाही तर बँक खाते तसेच मोबाइल सेवा बंद होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सिमकार्ड आधारशी जोडणे गरजेचे असून नागरिकांची त्यासाठी बँका, मोबाइल कंपन्यांच्या आउटलेट्समध्ये गर्दी होऊ लागली आहे. परंतु, अजूनही थंब इम्प्रेशन न जुळण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते आहे. आधार लिंकिंगसाठी मोबाइल कंपन्यांच्या आउटलेट्समध्ये जाणाऱ्या नागरिकांना थंब द्यावा लागतो. परंतु, तो जुळत नसल्यास आधारकार्ड अपडेट करण्यास सांगितले जात आहे.

आधार केंद्रांचा शोध संपेना!
अनेक नागरिकांना या अडचणीला सामोरे जावे लागत असून आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांची शोधाशोध करावी लागते आहे. खासगी आधार केंद्रे बंद असल्याने नागरिकांना सरकारी कार्यालयांमधील आधार केंद्र गाठावे लागत आहेत. परंतु, हे आधार केंद्रेही सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेतच खुले असल्याने नागरिकांना अन्य सर्व कामे बाजुला ठेवून आधारशी संबंधित कामे मार्गी लावण्यास प्राधान्य द्यावे लागत आहे. बँकांमध्ये नवीन खाते उघडताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, तेथेही बोटांचे ठसे जुळत नसल्यास नागरिकांना आधारकेंद्र गाठण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

बचत खाते उघडण्यासाठी मी बँकेत गेलो होतो. तेथे अर्ज भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केली. बँकेत माझ्या बोटांचे ठसे मशिनवर घेण्यात आले. परंतु, ते आधार कार्डच्या ठशांशी जुळत नसल्याने मला खाते उघडता आलेले नाही. आता मला आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्राचा शोध घ्यावा लागतो आहे.
- निशित राठोड, आडगाव नाका

मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या आऊटलेट्समध्ये सिमकार्ड आधारलिंक करावे लागते. परंतु, तेथे ज्येष्ठांचेच नव्हे तर तरुणांचेही बोटांचे ठसे जुळत नाहीत. त्यामुळे अडचणी वाढतच आहेत. ज्या नागरिकांनी सिमकार्ड आधारला लिंक केले आहे. त्यांनाही ते लिंक करून घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जातो. त्यामुळे नागरिकांची नाहक धांदल उडते.
- धनराज भोसले, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिसांकडून बेकायदा डांबून अथवा थांबवून ठेवणे, कोठडीतील छळ, तक्रार न घेणे, धमकावणे इत्यादीबाबत तक्रार घेणाऱ्या राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे (एसपीसीए) विभागीय कार्यालय लवकरच नाशिकमध्ये सुरू होणार आहे. यासाठी प्राधिकरणाकडून पोलिसांसह बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

सांगली येथे उघडकीस आलेल्या कोठडी मृत्यू प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. टिकेच्या स्थानी आलेल्या गृह विभागाने एसपीसीएचा विस्तार करण्याचे धोरण आखले. आजमितीस हे प्राधिकरण मुंबईत कार्यरत असून, तिथे वर्षाकाठी ३०० हून अधिक तक्रारी येतात. सर्वसामान्य नागरिक एका पानावर तक्रार नोंदवून ती वेबसाइटवर असलेल्या प्रतिज्ञापत्राच्या मसुद्याप्रमाणे टपालाद्वारे एसपीसीएच्या कार्यालयात पाठवू शकतो. एसपीएसचे कामकाज सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चालते. राज्यभरात १५१ अधिकारी एसपीसीएचे कामकाज सांभाळतात. राज्यभरात तक्रारी असताना मुंबईतील मुख्यालाचे काम विभागीय पातळीवर नेण्याची गरज असल्याचे सांगलीच्या घटनेनंतर स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने सदर प्राधिकरणाचे कार्यालय विभागानुसार देण्याच्या निर्णयास गती दिली. आता नाशिकसह राज्यात औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नवी मुंबई याठिकाणी प्राधिकरणाचे विभागीय कार्यालये सुरू होणार आहेत.

नाशिक विभागाचे कार्यालय त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलच्या इमारतीत सुरू होणार आहे. यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क केला असून, सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी सुविधा पुरवण्यात येणार आहे. प्राधिकारणाच्या कामास गती मिळावी, तसेच प्राधिकरणास आवश्यक ती माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य अपेक्षित आहे. पोलिसांकडून धमकी देणे, मानसिक वा आर्थिक तसेच शारिरीक छळ करणे, बेकायदेशीर अटक करणे, तक्रारीची दखल न घेणे, विनाकारण चौकशी करणे अथवा तशी धमकी देणे, तपासाबाबत संशय असल्यास नागरिक एसपीसीएकडे दाद मागू शकतात. त्यात दोषी आढळल्यास थेट कारवाई होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांना वेटिंग!

$
0
0



कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा सुरू आहेत. यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि आयटी या दोन शाखेच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकाच वेळेत परीक्षा केंद्रावर आल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उशिरा पेपरला सुरुवात करावी लागली.

कॉम्प्युटर इंजीनिअरिंग शाखेच्या द्वितीय वर्षाचा ‘डेटा स्ट्रक्चर अॅण्ड अल्गोरिदम’ आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) शाखेचा ‘डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड लॉजिक डिजाइन’ विषयाचा सोमवारी पेपर होता. या दोन्ही पेपरची वेळ १० ते १२ अशी नियोजित होती. परंतु, १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिकार पडलेली नव्हती. वर्गांवर असलेल्या शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत प्रश्नपत्रिकांची व्यवस्था केली. त्यानंतर कॉम्पुटर शाखेच्या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळी साडेदहा तर आयटीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळी ११ वाजता सुरू झाला. प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागली. निर्धारित वेळेपेक्षा परीक्षा सुरू होण्यास अर्धा ते एक तास उशीर झाला. यापूर्वी, विद्यापीठाच्या वेळापत्रक आणि बारकोड संदर्भातील तक्रारीचा झाल्या होत्या.

विद्यापीठाकडून येणारी प्रश्नपत्रिका अपेक्षित वेळेपेक्षा कॉलेजेसच्या हाती उशिरा आल्याने दोन्ही पेपर वेळेत सुरू होऊ शकले नाहीत. विद्यापीठाच्या सर्व्हरला तांत्रिक समस्या असल्याने हा प्रकार झाल्याचे विविध कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

मागील वर्षी अनेक विद्याशाखेचे पेपर फुटण्याची घटना घडल्या. यावर उपाय म्हणून कॉलेजेसला थेट प्रश्नपत्रिका न पाठवत त्या ई-मेलद्वारे पाठविण्याचा निर्णय विद्यापीठाने यंदा घेतला आहे. त्यानुसार पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी विद्यापीठाकडून कॉलेजेस ला ई-मेल करून प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्याच्या झेरॉक्स कॉलेजमध्येच काढाव्या लागातात. त्यानंतर त्याचे परीक्षार्थींना वर्गामध्ये वितरण केले जाते.

पेपरची वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा होती. परंतु, साडेदहा वाजता कॉम्पुटर इंजिनीअरिंगचा पेपर सुरू झाला. पुढे साडेदहा ते साडेबारा अशी कॉलेजकडून वेळ वाढवून देण्यात आली.
- वैभव काळे, विद्यार्थी, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग

सोमवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत ‘आयटी’चा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर होता. मात्र, प्रश्नपत्रिकाच वेळेत न आल्याने पेपर सकाळी अकरा वाजता सुरू झाला. तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच ताटकळत बसावे लागले.
- शुभम मराठे, विद्यार्थी, आयटी इंजिनीअरिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मनिरपेक्ष समाज घडवणारे ‘साऊ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरोगामी विचारातून परिवर्तन घडविण्यासाठी कुटुंब व्यवस्थेचा व सामाजिक प्रबोधनातून धर्मनिरपेक्ष समाज घडविला जाऊ शकतो असा आशावाद ‘साऊ’ या नाटकातून मांडण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ६५ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र ललीत कला भवन ज‍ळगाव यांच्या वतीने परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सोमवारी नाटक सादर करण्यात आले. लेखक शरद भालेराव यांनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी ‘साऊ’ या दोन अंकी नाटकाची कथा गुफतांना त्या संहितेला कौटुंबिक आयाम देऊन पुरोगामी विचारांची पेरणी केली आहे. मुख्य पात्र साऊ भोवती कथा फिरते. पुरोगामी विचारांनी प्रेरीत झालेली साऊ शाहिरीतून समाजप्रबोधनाचे काम करीत असताना ती या देशाचा खरा इतिहास मांडते. तिच्या गाण्यावर प्रभावित होऊन मंगेश तिच्या प्रेमात पडतो. साऊच्या घरात जातीयतेला थारा नाही, पण मंगेशचे घर देवादिक मानणारे असते. मंगेशच्या वडिलांना प्रेमप्रकरणाची चाहूल लागते. साऊ पुरोगामी विचारसरणीची असल्याने ते विरोध करतात. गायतोंडे सर मध्यस्थी करून मंगेशच्या वडिलांना समजावतात. एकदम घेतलेल्या निर्णयाने मुलं भरकटतात, म्हणून मंगेशच्या कलाने घेऊन त्यांची मानसिकता बदलता येऊ शकते. या गोष्टीचे गंभीर्य लक्षात घेऊन औपचारिकता म्हणून साऊला पाहण्यासाठी येतात. त्या ठिकाणी बोलणी सुरू असताना साऊ आपले मत मांडतांना तिच्या वडिलांच्या अभंगाचा संदर्भ देते. त्यावेळी मंगेशची आई तो अभंग गाण्यास सांगते. साऊ अभंग गाताना मंगेशची आई रडू लागते आणि एकदम ओरडते की हा अभंग काशिनाथचा आहे. तेव्हा साऊचे वडील काशीनाथचं नाव ऐकून त्यांना विचारतात की, तुम्ही त्याला ओळखतात? तेव्हा मंगेशची आई म्हणते, ‘‘तो माझा भाऊ होता.’’ या घटनेनंतर मंगेशचे आई-वडील साऊचा सून म्हणून स्वीकार करतात.

नाटकाचे दिग्दर्शन चिंतामण पाटील यांनी केले होते. पार्श्वसंगीत - शुभम पाटील, रंगभूषा - मीनाक्षी पाटील, संगीत - प्रबुद्ध भालेराव, नेपथ्य - कुलदीप भालेराव, प्रकाश योजना - विकास वाघ यांची होती. साऊची भूमिका वर्षा उपाध्ये, सरु - नेहा पवार, दिनकरराव - चंद्रकांत चोधरी, मंगेश - स्वप्निल गायकवाड, गायतोंडे - कुलदीप भालेराव, श्रद्धा - सरीता तायडे, श्रीरंग राव - अरुण सानप यांनी भूमिका साकारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाएसो’मध्ये दुरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक एज्युकेशन सोसायटी (नाएसो) या शिक्षण संस्थेची २०१७-२०२० च्या त्रैवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू असून उपाध्यक्ष, कार्यवाहपदासाठी चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. रहाळकर पॅनल आणि एनएस हितकारी पॅनलमध्ये लढत होणार आहे.
निवडणुकीत माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख सुहास अष्टपुत्रे व संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका स्नेहमयी भिडे यांच्या नेतृत्वाखाली एनएस हितकारी पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये अष्टपुत्रे व भिडे यांच्यासमवेत कार्यवाह पदासाठी शशांक मदाने, कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी वैशाली कुलकर्णी, हेमंत जानवे, वीणा नवले, रेखा क्षीरसागर, सुहास अष्टपुत्रे, स्नेहमयी भिडे उमेदवारी करत आहेत. या पॅनलद्वारे महिलांना ५० टक्के महिलांना संधी देण्यात असल्याचा प्रचार केला जात आहे. दुसरीकडे, रहाळकर पॅनलनेही निवडणुकीत विजयी होण्याचा दावा केला आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचाराला सुरुवात झाली असून आपली भूमिका मांडण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. रहाळकर पॅनलकडून उपाध्यक्ष पदासाठी दिलीप फडके व चंद्रशेखर मोंढे उमेदवारी करत आहेत. तर कार्यवाह पदासाठी रहाळकर पॅनलचे राजेंद्र निकम व एन एस हितकारी पॅनलचे शशांक मदाने यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ धक्के भूकंपाचे की अन्य आपत्ती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवण तालुक्यातील दळवटसह पाच ते सहा गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा स्थानिकांचा दावा असला तरी मेरी येथील भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षात त्याची नोंदच होऊ शकलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना जाणवले ते भूकंपाचे धक्के होते की अन्य आपत्ती याबाबत प्रशासकीय यंत्रणाच आता बुचकळ्यात पडली आहे.

कळवण तालुक्यातील दळवट आणि आसपासच्या गावांमध्ये नेहमीच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. त्यामुळे या परिसराला भूकंप प्रवण क्षेत्र समजले जाते. या परिसरातील जामले, हतगड, भाकुर्डी, लिंगामे यासारख्या काही गावांमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचा स्थानिकांचा दावा आहे. गतवर्षीही तालुक्यातील ओतूर गावात मध्यरात्री भूकंपाचे धक्के बसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु, त्यावेळी देखील भूकंप मापक यंत्रावर त्यांची नोंद झाली नाही. या यंत्रावर नोंद झाली तरच तो भूकंपाचा धक्का समजला जातो. परंतु, मापक यंत्रावर नोंद न झाल्याने प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.

परिसरात साधारणत: पावसाळा संपला की अशा प्रकारचे धक्के बसतात, असा स्थानिकांचा आजवरचा अनुभव आहे. येथील भूगर्भात चुनखडी असण्याची शक्यता असून पावसाळ्यानंतर भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे तिचा स्तर खाली सरकू शकतो. अशावेळी पोकळी निर्माण होऊन जमीन धसत असावी, अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या ओखी वादळामुळे वातावरणात बदल झाले आहे. या परिणामांमुळेही चक्री तयार होऊन अशा प्रकारचे धक्के बसू शकतात, अशी शक्यता प्रशासनाने वर्तविली जात आहे. सुपर सोनिक विमानाच्या टेस्टिंगवेळीही अशा प्रकारचे सौम्य धक्के बसण्याची शक्यता असते. परंतु, रविवारी अशा प्रकारच्या टेस्टिंग होत नाहीत. त्यामुळे हे धक्के बसले असावेत, अशी शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर गेल्या ४८ तासांत भूकंपाच्या धक्क्यांची नोंदच झाली नसल्याची माहिती मेरी येथील सूत्रांनी दिली आहे.

अर्लट सिस्टम नाहीच
भूकंपाची पूर्वसूचना देऊ शकेल अशी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे कार्यरत नाही. किंबहुना अशी यंत्रणा कुठेच कार्यरत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आपल्याकडे केवळ भूकंपाचे धक्के बसले तर त्याची तीव्रता किती होती याचे मोजमाप करून त्याची माहिती देणारीच यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी दिल्ली आणि कोलकाता येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील दळवट आणि तत्सम संवेदनशील गावांना भेट देऊन पाहणी केली. परंतु, भूकंपप्रवण क्षेत्रातील रहिवाशांनी कोणती काळजी घ्यायला हवी यावरच उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बारीपाड्याने दिली विकासाची दिशा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

संपूर्ण जग एका नव्या दिशेच्या शोधात असून, एकी, विश्वास आणि मेहनतीच्या बळावर परिवर्तन घडवून बारीपाडा गावाने विकासाची ही नवी दिशा निश्चित केली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. याच गावचा आदर्श ठेऊन अन्य गावांमध्ये त्यादिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, या शब्दात डॉ. भागवत यांनी बारीपाडा गावाचा गौरव केला.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा या छोट्याशा आदिवासी गावाने जल, जमीन, जंगल, जन आणि जनावर या ग्राम विकासातील पंचसूत्रीचा आधार घेऊन गेल्या २६ वर्षांत आदर्श व स्वावलंबी ग्राम निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सरसंघचालक मंगळवारी (दि. ५) बारीपाडा येथे आले होते. त्यानिमित्त बारीपाड्याच्या ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. मोहन भागवत बोलत होते.

ग्रामस्थांसोबत मुक्त संवाद

बारीपाडा गावात डॉ. भागवत यांचे मंगळवारी (दि. ५) सकाळी १० वाजता आगमन झाल्यानंतर गावातील लोकांनी पारंपरिक वनवासी नृत्य वाद्यांच्या साथीने सरसंघचालकांना ग्रामदर्शन घडविले. यावेळी बारीपाडा गावचे सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी गावातील भगिनींनी डॉ. भागवतांचे औक्षण केले. त्यानंतर गेल्या २६ वर्षांपासून देखरेख करीत असलेल्या ११०० एकर जंगलाची सरसंघचालकांनी भेट दिली. या जंगलातील विविध वृक्षांच्या प्रजाती, औषधी वनस्पती, वनभाज्या या बरोबरच ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेले दगडी बंधारे, मातीचे बांध यांचीदेखील सविस्तर माहिती ग्रामस्थांकडून घेतली. उजाड माळरानावर ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या जंगलाचे विहंगम दृश्य बघितल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. बारीपाड्यातील विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाल्याबद्दल संरसंघचालकांनी समाधान व्यक्त केले. डॉ. मोहन भागवत यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात ग्रामस्थांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस; पिकांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकलाही ओखी वादळाचा तडाखा बसला असून, जिल्ह्यात मंगळवारी तब्बल १२५.५ मिमी पावसाची नोंद झाली. हिवाळ्यात झालेल्या या बिगरमोसमी पावसामुळे वातावरणातील गारठा वाढला असून, द्राक्षबागांसह कांदा आणि भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले आहे. पुढील चोवीस तास वातावरणातील गारठा कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

शहरात मंगळवारी ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १३ डिसेंबर २०१४ रोजी शहरात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापूर्वी २००८ मध्ये ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षांतील डिसेंबर महिन्यातील हा रेकॉर्डब्रेक पाऊस ठरला आहे.

मंगळवारी पहाटे पाचपासून शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे निफाड, इगतपुरीसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात द्राक्षबागा, लाल कांदा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पंचनाम्यांबाबत संभ्रम

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पीक नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. आता पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षबागांसह कांदा, भाजीपाला, मकाचे नुकसान झाले आहे. एका दिवसात तालुक्यात किमान ६५ मिमीहून अधिक पाऊस झाला तरच नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र, एवढा पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांचे नुकसान मात्र झाले आहे. त्यामुळे पंचनामे होऊन मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्राथमिक नुकसानीचा आढावा घेऊन ती माहिती सरकारला देणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय पाऊस

सुरगाणा ः २६, पेठ ः २२.२, बागलाण ः १८, देवळा ः १५.८, नाशिक ः ८, इगतपुरी ः ८, येवला ः ७, कळवण ः ६, नांदगाव ः ६, दिंडोरी ः ४.५, त्र्यंबकेश्वर ः ३, चांदवड ः ३, मालेगाव ः ३,

निफाड ः १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यावर काळाचा घाला

$
0
0

चोपड्याच्या मयूर पाटीलचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडस्ट्रिअल व्हिजिटसाठी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. त्र्यंबक रोडवरील संदीप युनिव्हर्सिटीजवळ झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी आहे. १५ दिवसांच्या कालावधीत याठिकाणी तब्बल दुसरा जीवघेणा अपघात घडला आहे. यातील मृत विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा रहिवासी असून, दुसरा शिरपूरचा रहिवासी आहे.

संदीप युनिव्हर्सिटीच्या वतीने एमएससी आणि बीएससी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल व औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. ४) मध्यरात्री रात्री २ वाजता महाबळेश्वर येथे जाण्यासाठी बसेस निघणार होत्या. यासाठी या अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी मयूर पाटील व किरण माळी हे विद्यार्थी रात्री २ वाजेच्या सुमारास कॉलेजमध्ये येत होते. त्यावेळी त्र्यंबकेश्वरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने या दोघा विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये मयूर पाटील याचा जागीच मृत्यू झाला, तर किरण माळी हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

संस्थेचा प्रतिसाद नाही

शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास बोलविण्यातून अपघात झाल्याने याप्रकरणी संदीप युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकलेला नाही.


मृत्यूचा सापळा

त्र्यंबक रोडवरील संदीप युनिव्हर्सिटीजवळ गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत दुसरा जीवघेणा अपघात घडला असून, हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनले आहे. मयूर पाटील व किरण माळी हे दोन्हीही विद्यार्थी महिरावणी गावात भाडेतत्त्वावर राहत होते. ते मध्यरात्री कॉलेजमध्ये येताना अपघात झाला. या अपघातानंतर संस्थेने पुढे गेलेल्या काही बसेस माघारी बोलवत सहल रद्द केली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १३ नोव्हेंबर रोजी हर्षिका सुर्वे हा विद्यार्थिनीचा दुचाकीने धडक दिल्याने बसच्या चाकाखाली जाऊन जागीच मृत्यू झाला होता.

याठिकाणी पोलिस चौकी, कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासाठी विद्यार्थी, परिसरातील नागरिक व महिरावणी गावचे उपसरपंच रमेश खांडबहाले यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने येथे कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने याठिकाणी कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस वाहतूक नियंत्रणासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती; परंतु हे कर्मचारी पाच-सहा दिवस या ठिकाणी वाहतूक व्यवस्था पाहताना दिसले. मात्र, नंतर याठिकाणी कोणीही फिरकले देखील नसल्याच्या तक्रारी आहेत.


मध्यरात्री दोनच्या सुमारास महाबळेश्वर येथे शैक्षणिक सहल व औद्योगिक भेटीसाठी कॉलेजमधून बस निघणार होत्या. यापूर्वी देखील येथे अनेक अपघात घडले आहेत; परंतु प्रशासनाने अजून गंभीर दखल घेतलेली नाही.

- विशाल जाधव, विद्यार्थी

मागील महिन्यातही येथे जीवघेणा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला येथे पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यासंदर्भात व गतिरोधक बसवण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु, अद्याप प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

- स्वागत आहिरे, विद्यार्थी

त्र्यंबक रोडवर वारंवार अपघात घडत आहेत. याठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासन हे विद्यार्थी व गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कॉलेजसमोर व महिरावणीगावाजवळ गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.

- राजाराम पाटील, ग्रामस्थ, महिरावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images