Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विधी समिती बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विषय समित्या गठित होऊनही महापालिकेतील अधिकारी या समित्यांच्या बैठका किंवा त्यांचे कामकाज गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. विधी विषय समितीच्या आयोजित बैठकीत लोकप्रतिनिधींना हा प्रत्यय पुन्हा आला. याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत विधी सभापती शीतल माळोदे यांनी ‘आम्ही भिंतींशी बोलावे का?’ असा सवाल केला. तर मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी सभात्याग केला.

बैठकीला बांधकाम, अतिक्रमण आणि विधी विभागाचे अधिकारी उपस्थित असले तरीही अन्य अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे गतवेळीही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक तहकूब करावी लागली होती. अवघ्या तीन अधिकाऱ्यांवर बैठक कशी चालवायची असा प्रश्न यावेळी निर्माण झाला. बराच वेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा यावेळी उपस्थितांनी केली. यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अधिकारी सोयीनुसार उपस्थित राहणार असतील तर ही समितीच बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनाही एकदा निमंत्रण द्यावे म्हणजे या समितीच्या कामकाजाचा प्रत्यय त्यांनाही येईल, अशा शब्दात शेख यांनी नाराजी मांडली.

विषयपत्रिकेवर प्रस्ताव देऊन महिनाभराचा काळ उलटला आहे. मात्र, त्याबाबतची उत्तरे देण्यासाठी आस्थापना विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नाही, असे सांगत शेख यांनी सभात्याग केला. सभापती शीतल माळोदे यांनीही अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी मांडताना त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले. महापालिकेच्या वतीने नियुक्त वकिलांच्या पॅनलवरील विधीतज्ज्ञांची मासिक सभा विधी समिती व विधी विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकला यायला नक्कीच आवडेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘‘नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग देवीबाबत मी फार ऐकलेले नव्हते. मी नाशिकला साधारणपणे २२ ते २५ वर्षांपूर्वी आलो होतो. त्या तुलनेने नाशिकने बरीच प्रगती केली आहे. मला नाशिकला यायला आवडेल, बघू वेळ कसा मिळतो ते!’’ माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी हे उदगार काढले आहेत.

खासदार हेमंत गोडसे, सप्तशृंग देवी ट्रस्टचे विश्वस्त उन्मेष गायधनी व छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी प्रणव मुखर्जी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना सप्तशृंगमातेच्या दर्शनाचे निमंत्रण दिले. नाशिकला विमान सेवा सुरू झाल्यावर येणे होऊ शकेल, असेही मुखर्जी यांनी सांगितले. ट्रस्टने दिलेले आमंत्रण वाचतांना त्यांनी काही अधिकची माहिती गायधनी यांना विचारली. एकमेव स्वयंभू शक्ती पीठ असल्याचे कळल्यावर त्यांनी सखोल चर्चा केली. गडावरील समस्यांची विचारणा केल्यावर, गोडसेंनी परिस्थितीची कल्पना दिली. देवीचा प्रसाद व सृजनांचा सारथी हे कॉफी टेबल पुस्तक देऊन प्रणवदांचे स्वागत करण्यात आले. नाशिक भेटीबाबत पुन्हा चर्चा करण्यासाठी त्यांनी बोलावल्याचे गायधनी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मासिक १८ हजार रुपये वेतन द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाच वर्षे पूर्ण झालेल्या मजुराला ग्रॅच्युइटी तसेच किमान मासिक वेतन रुपये १८ हजार मिळाले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र बीएसएनएल कॉन्ट्रक्ट वर्कर्स युनियनच्या परिषदेत करण्यात आली.

संघटनेच्या परिषदेला कॅनडा कॉर्नर येथे रविवारी सुरुवात झाली. परिषदेस महाराष्ट्र राज्य सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दिल्लीहून आलेले कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट वर्कस फेडरेशनचे अध्यक्ष व्ही. ए. एन. नंबुदरी व महासचिव अनिमेष मित्रा यांनी कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स (ठेका मजदूर) यांनी सरकारच्या धोरणाची माहिती देऊन जोरदार टीका केली.
परिषदेत कामगाराला कायद्याने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. पाच वर्षे पूर्ण झालेल्या मजुराला ग्रॅच्युइटी तसेच किमान मासिक वेतन रुपये १८ हजार मिळाले पाहिजे, कामावर हजर झाल्यापासून ईफीएफ, ईएसआय रजेचा पगार व महागाई भत्ता मिळालाच पाहिजे या बाबतीतील कायदेशीर तरतुदींचे मार्गदर्शन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले. राज्यात व देशभरात या बाबत सरकारी धोरणांत असलेल्या उदासीन धोरणाविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली.

बीएसएनएलईयूचे परिमंडल सचिव नागेश नलावडे, अध्यक्ष आप्पासहेब घागरे, अखिल भारतीय सहसचिव जॉन वर्गिस आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘बीएसएनएलईयू’चे जिल्हाध्य्क्ष सलीम शेख होते. बीएसएनएलईयूचे जिल्हा सचिव राजेंद्र लहाने यांनी प्रास्ताविक केले. दुर्गा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी राज्याच्या विविध भागातून आलेले कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स तसेच बीएसएनएलमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षपदी नीलेश काळे
महाराष्ट्र बीएसएनएल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी जळगावचे नीलेश काळे, सचिवपदी जावेद मुबला सातारा व खजिनदारपदी सातारा येथील महेश नलावडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

बीएसएनएलमध्ये ठेकेदारांची लूट
बीएसएनएलमध्ये गेली पंधरा वर्षांपासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार काम करीत आहेत. त्यांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन ठेकेदार प्रत्यक्षात बीएसएनएलकडून बारा ते सोळा हजार रुपये घेत आहेत. ही लूट थांबविली पाहिजे यासाठी लढा देण्याची व त्यासाठी बीएसएनएलईयू या बीएसएनएलमधील सर्वात मोठ्या कामगार संघटनेशी समन्वय ठेवण्याची गरज विषद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ ५५ रुपये किलो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने खरेदी केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांमधून ५५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी चार हजार ९२७ क्विंटल तूरडाळ मंजूर झाली असली तरी रेशनकार्डधारकांची संख्या अधिक असल्याने या तूरडाळीचे वितरण कसे करावे, असा प्रश्न पुरवठा विभागाला सतावू लागला आहे.

राज्यात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून तिला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अगतिक झाले आहेत. सरकारने ही तूर खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हमीभावाने या तूरीची खरेदी केली. एकट्या राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २५ लाख २५ हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. ही तूर भरडण्यासही सरकारने परवानगी दिली. अशी भरडलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रास्त भावात विक्री करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून शिधापत्रिकाधारकांसाठी प्रतिकिलो ५५ रुपये दराने ही तूरडाळ देण्याचे निश्च‌ित करण्यात आले आहे. तूरडाळ विक्री करणाऱ्या रेशन दुकानदारांनी पॉईंट ऑफ सेल मशिनद्वारे तूरडाळ वितरित केल्यास दीड रुपया तर मशिन व्यतिरिक्त वाटप केल्यास ७० पैसे कमिशन दिले जाणार आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यासाठी नऊ हजार ७२१ क्विंटल, नाशिकसाठी चार हजार ९२७ क्विंटल, आणि सोलापूरसाठी दोन हजार ८४० क्विंटल नियतन मंजूर करण्यात आले आहे.

एकट्या नाशिक जिल्ह्यात एकूण सात लाख ५६ हजार ६२७ रेशनकार्डधारक आहेत. यात अंत्योदयचे एक लाख ७९ हजार ६२७, प्राधान्य कुटुंबाचे दोन लाख ८६ हजार ६२३ आणि केशरी रेशनकार्डधारक दोन लाख ९० हजार ३२८ एवढे आहेत. या लाभार्थींपैकी प्रत्येकाला किती तूरडाळ वितरित करावी असा पेच पुरवठा विभागापुढे निर्माण झाला आहे. उपलब्ध नियतनानुसार प्रत्येक ग्राहकाला साधारणत: अर्धा किलोच तूरडाळ देणे शक्य होणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली आहे.

रेशन दुकानदार अनभिज्ञ
पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या तूरडाळीची विक्री रेशन दुकानदारांनाच करावयाची आहे. परंतु, दुकानदारांना विक्रीसाठी किती तूरडाळ प्राप्त होणार आहे याची माहिती नाही. अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी, प्राधान्यक्रम यादीतील लाभार्थींनाच ही तूरडाळ विक्री केली जाण्याची शक्यता आहे. येवला येथील गोदामात एक किलोच्या पॅकिंगमध्ये ही तूरडाळ उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, डाळ विक्रीबाबतच्या सूचना अद्याप रेशन दुकानदारांना देण्यात आलेल्या नाहीत. बाजारात ६५ ते ७० रुपये किलोने चांगल्या दर्जाची तूरडाळ उपलब्ध आहे. त्यामुळे ५५ रुपये किलो दराने विकण्यात येणारी तूरडाळही चांगल्याच दर्जाची हवी, अशी रेशन दुकानदारांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक
- अंत्योदय : १,७९,६२७
- प्राधान्य कुटुंब : २,८६६२३
- केशरी : २,९०,३२८
एकूण रेशनकार्डधारक : ७,५६,६२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष निवड कार्यक्रम पुढील आठवड्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता येत्या आठवड्यात नव्या अध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विभागीय उपनिबंधकांनी पुणे येथील राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणला दराडे यांच्या राजीनाम्याची माहिती कळवल्यानंतर आता प्राधिकरण निवडणूक कार्यक्रम घोषित करणार आहे.

दराडे यांनी दिलेल्या राजीनाम्याने अनेक इच्छुकांची नावांची चर्चेत आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे पद घेण्यास फारसे इच्छुक नसल्याची गोष्टही पुढे आली आहे. बँकेची स्थिती अतिशय नाजूक असून ३६०० कोटीची वसुली करण्याचे आव्हान नव्या अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यातून बँकेला बाहेर काढणे सोपे नाही. त्यात बँकेच्या विविध प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यामुळे काटेरी खुर्चीवर बसण्यासाठी सर्वांना हात आखडता घेतला आहे. काही दिग्गज संचालकांनी यात रस दाखवला असला तरी त्यांची स्थिती तूर्त तळ्यात मळ्यात आहे. नोटाबंदीनंतर बँकेचे कंबरडे मोडले असून सरकाराचे धोरणही सहकार बँकेला अनुकूल नसल्याने या अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालावी की नाही याची चिंता वाढली आहे. दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही राजकायी घडामोडी अद्याप झालेल्या नाही. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर बघू असे मोघम उत्तर आता बँकेचे ज्येष्ठ संचालकही देऊ लागले आहे.

जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर ३ जून २०१५ रोजी नरेंद्र दराडे यांची अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेस बरीच रस्सीखेच झाली. या निवडीतच एक-एक वर्षाचा काळही निश्चित करण्यात आला होता. मात्र, पुढे दराडे यांनी राजीनामा दिला नाही. त्यांनी कुणाला जुमानलेही नाही. त्यामुळे तब्बल अडीच वर्षाहून अधिक काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले. पण, नोटाबंदीनंतर बँकेची स्थिती अधिकच खालावली. आता ती सावरण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अनुभवी व बँकाला सुस्थितीत आणणारा अध्यक्ष निवडणे गरजेचे आहे.

प्रत्येकाची सावध भूमिका

जिल्हा बँकेत १९ संचालक असून त्यात आता गट-तट राहिलेले नसले तरी पक्षाचे वर्चस्व असावे यासाठी रस्सीखेच सुरू आहे. पण, यात सावध भूमिका घेतली जात आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून माणिकराव कोकाटे, केदा आहेर, सीमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत असली तरी त्यांच्यापैकी कोणीही उघड बोलण्यास तयार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोट पेपरमिल नाशिकलाच देऊ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेस कामगारांना सुधारीत इन्सेन्टिव्ह स्कीम व प्रेसमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. मयत कामगारांच्या वारसांचा भरतीतील टक्का वाढविण्यात येईल. नवी नोट पेपरमिल नाशिकलाच देण्यात येईल, अशी आश्वासने प्रेस महामंडळाचे अध्यक्ष अनुराग अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल हे पेपरमिल प्लान्ट कमिटीचेही अध्यक्ष तसेच तसेच केंद्र सरकारच्या करन्सी अॅण्ड काइन्स विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी नाशिकरोड प्रेसला भेट दिली. यावेळी तांत्रिक संचालक अजय श्रीवास्तव, खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सीएनपीचे महाव्यवस्थापक एस. पी. वर्मा, उपमहाव्यवस्थापक मनीष शंकर, आयएसपीचे महाव्यवस्थापक सुधीर साहू, मजदूर संघाचे उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, नंदू पाळदे, संदीप बिश्वास आदी उपस्थित होते. पेपरमिलसाठी आंध्र प्रदेश तसेच ओडिशाही स्पर्धेत आहे. नाशिकला जागा, कच्चा माल, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा उत्तम असल्याने पेपरमील नाशिकलाच मिळावी, अशी मागणी प्रेस मजदूर संघाने केली. त्यावर अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नवी मशिनरी द्या

नोट प्रेसमधील मशिनरी १९८० मध्ये बसविण्यात आली आहे. ही मशिनरी नेहमी बिघडते. या मशिनरी दुरुस्तीपलिकडे गेल्या आहेत. त्यांचा ओव्हरहालिंगचा प्रस्ताव मार्गी लागावा, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली. चारही इन्टॅग्लीओ मशिनची स्थितीही दयनीय आहे. इन्टॅग्लिओ मशिनची कमी असल्यामुळे उत्पादनात कमतरता आहे. दर्जावर परिणाम होत आहे. दोन नवीन इन्टॅग्लिओ मशिन त्वरित द्यावे, या मागणीवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले. आयएसपी प्रेसमधीलल ई-पासपोर्ट करणाऱ्या मशिनरीही जुन्या झाल्या असून नवीन मिळाल्यास ई पासपोर्टचे उत्पादन चांगल्या पद्धतीने करता येईल. जुन्या मशिनरीचे आधुनिकीकरण केले तर ई-पासपोर्टचे प्रमाण व दर्जाही वाढेल. आठ कलर प्रिटिंग करणाऱ्या दोन मशिनरचीही मागणी यावेळी करण्यात आली.

नेहरूनगरला नवा चेहरा

प्रेसमधील संशोधन विभागाचे सक्षमीकरण करावे, नेहरूनगर कामगार वसाहतीमधील जुन्या इमारती पाडून बहुमजली इमारती उभारव्यात, येथे चांगले मैदान, गार्डन व मार्केट तयार करावे, अशी मागणी मजदूर संघाने केली. त्यावर अग्रवाल यांनी प्रस्ताव तयार करून मुख्यालयाला पाठविण्याची सूचना केली. प्रेस मेनगेटजवळील प्रेसच्या रिकाम्या जागेवर शासनाचा डोळा आहे. तेथे इनडोअर स्टेडियम प्रस्तावित होते. येथे कम्युनिटी हॉल उभारावा, अशी मागणी केली असता त्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी केली.

मजदूर संघाचा विजय

पासपोर्टमधील एचएयूव्ही फिल्म बसविण्याचे काम परराष्ट्र मंत्रालयाने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांना दिल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. हे काम पूर्वीपासून नाशिकरोड प्रेसमध्ये कडेकोट सुरक्षेत होत आहे. त्यामुळे हे काम बाहेरील एजन्सीला देऊ नये, अशी मागणी मजूदर संघाने अनेकदा केली आहे. त्यावर अग्रवाल यांनी सांगितले, की मंत्रालयाने ही फिल्म बसविण्याच्याबाबत माघार घेतली असून हे काम नाशिकरोड प्रेसमध्येच सुरू राहील, असे अग्रवाल यांनी सांगितले. हा मजदूर संघाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ ला वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानुसार १५ डिसेंबरपर्यंत मतदारांकडून दावे-हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमातून अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदारयादी अचूक व्हावी, मतदानविषयक सुविधांची माहिती व्हावी यासाठी इगतपुरी मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणी, यादीत दुरुस्ती, स्थलांतर, अद्ययावतीकरण याबाबत आवश्यक पूर्तता करण्यात येणार आहे. याकामी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे, निवडणूक नायब तहसीलदार विलास साळवे यांनी केले आहे.

नवीन इच्छुक मतदारांना विहित नमुन्यात अर्ज दाखल करून मतदारयादीत नावे नोंदविता येणार आहेत. नव्याने नाव नोंदविण्यासाठी फॉर्म नंबर ६, अन्य तालुक्यात अथवा नाव कमी करण्यासाठी फॉर्म नंबर ७, नावात दुरुस्ती आणि नवीन मतदान ओळ्खपत्रासाठी फॉर्म नंबर ८, इगतपुरी तालुक्यांतर्गत नाव स्थलांतरीत करण्यासाठी फॉर्म नंबर ८ (अ) यामध्ये अर्ज करावा लागेल. विहित अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी १५ डिसेंबर या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी मार्गदर्शन करणार आहेत. यासह जानेवारी २०१९ मध्ये वयाची १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवा मतदारांची माहिती संकलित केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी बारावीबाबतचा ‘तो’ निर्णय बदलावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या परिक्षार्थींसाठी परीक्षा ठिकाणी उपस्थितीबद्दल नियम जाहीर केले आहेत. हे नियम कठोर व विद्यार्थी अहिताचे असल्याची भूमिका अध्यापक भारतीने मांडली आहे. हे अन्यायकारक नियम त्वरित रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी राज्य मंडळाकडे पत्रकाद्वारे केली आहे.

दैनंदिन प्रवासात दळण वळणाच्या साधनांची उपलब्धता, मानसिक वा शारीरिक, नैसर्गिक अडचणी आदी कारणांमुळे शहरी वा ग्रामीण परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर होऊ शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करून शहरात परीक्षांसाठी येत असतात. यामध्ये त्यांना काही अडचणींचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे अशा जाचक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागू शकते, अशी भीती विद्यार्थ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास काही कारणाने उशीर झाल्यास पूर्वीच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यास पेपर लिहू द्यावा, अशी मागणी अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ, प्रा. विनोद पानसरे, पालक प्रतिनिधी वनिता सरोदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी मुंबई नाका, पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

विनयभंगाची एक घटना मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील भाभानगर येथे घडली. शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास जेलरोड येथील संत नरहरीनगर परिसरात राहणाऱ्या काही नातेवाइकांनी घरात बळजबरीने प्रवेश केला. यामुळे वाद सुरू झाला. घरात पीडित महिलेचा नातू असून, त्यास घेऊन जाण्यास महिलेने नातेवाइकांना नकार दिला. यामुळे संशयित आरोपींनी महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून एका महिलेसह इतर तिघा संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पंचवटीतील कौशल्यानगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून संशयित आरोपी नितेश रमेश शिरसाठ (रा. घारपुरे घाट) याने विनयभंग केला. शुक्रवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयिताने थेट युवतीच्या घरात प्रवेश केला. यावेळी पीडितेच्या आईने मुलीस वाचवण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने दोघांनाही शिवीगाळ सुरू केली. ‘‘मी कोणाला घाबरत नाही, पुन्हा येईन आणि असाच त्रास देत राहीन’’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या महिलेचा घर खाली करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड येथील शांतीपार्क परिसरात ही महिला भाडेतत्वावर राहत आहे. ७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान, संशयित सिद्धार्थ पगारे, शोभा पगारे, मीनाक्षी पगारे (सर्व रा. शांतीपार्क) यांनी पीडितेला घर रिकामे करण्यावरून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच संशयित सिद्धार्थने भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

कुपन चोरी करून गैरवापर

नाशिक : ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइटवरून खरेदीनंतर मिळालेले कुपन चोरी करून संशयिताने त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जयंत दिनेश पाटील (२७, रा. कल्पतरूनगर) याने अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात चोरी, फसवणूक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्या कंपनीतील व्यवस्थापक उमेश तुपे यांना एका ऑनलाइन वेबसाइटच्या कंपनीकडून २० हजार रुपयांचे कुपन मिळाले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने कुपन चोरी करून त्याचा गैरवापर केला. संशयिताने कुपनचा वापर करताना जयंत पाटील यांच्या नावाचा तसेच त्यांच्या कंपनीच्या नावाचाही गैरवापर केला. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुख तपासणी मोहीम ३१ पर्यंत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, उद्‍भवणारे आजार याबद्दल जनजागृतीची मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी जाऊन तपासणी करणार आहे.

तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. याविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी मौखिक कर्करोग पूर्व अवस्थेत ओळखला तर तो कर्करोगापासून आपण वाचवू शकतो, यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अथवा असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद, आरोग्य विभाग नाशिक, सिव्हिल हॉस्पिटल, महापालिका व सामाजिक संस्था यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशा, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जावून तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या ३० वर्षांपुढील सर्व व्यक्तींची मुख स्वास्थ्य तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सर्व ग्रामीण भागात महापालिका क्षेत्रात, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय या सर्व स्तरावर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये मौखिक तपासणी करून तोंडाविषयी काही त्रास असल्यास, दात दुखणे, तोंडात १५ दिवसांपेक्षा जास्त जखम, तोंड उघडता न येणे, पांढरे चट्टे, गाठी याविषयी जनजागृती केली जाणार आहे. तसेच असा त्रास असलेल्या व्यक्तींना जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपली मौखिक तपासणी करून घ्यावी. तसेच लवकर निदान कसे करावे, याविषयी जनजागृती केली जाणार आहे. याबाबत सर्व नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला मौखिक आरोग्य तपासणीबाबत सहकार्य करावे व प्रत्येक ३० वर्षांवरील वयोगटातील व्यक्तीने आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरांचे चांगभलं!

$
0
0

‘एनए’ नोटिसांवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरसकट शेतीक्षेत्रालाही महसूल विभागाकडून बिनशेतीसाठीच्या (एनए) नोटिसा पाठविल्या जाऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होऊ लागला आहे. बिनशेती करणे सक्तीचे नाही असे जिल्हा प्रशासन सांगत असले तरी बांधकाम व्यावसायिक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

विकास आराखड्यात अंतर्भूत असलेल्या गावांमधील अद्याप ‘एनए’ न झालेल्या जमिनींची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आली असून, अशा शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणातही शेतकऱ्यांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवला आहे. या वडिलोपार्जित जमिनी कसण्याचाच शेतकऱ्यांचा मनोदय असला तरी जिल्हा प्रशासनाकडून बिगरशेतीबाबतच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या रहिवासी, निवासी आणि वाणिज्यक यासारख्या अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचे गट नंबर दर्शविणाऱ्या याद्या तलाठ्यांना देण्यात आल्या असून, ज्या जमिनी अद्याप बिगरशेती झालेल्या नाहीत त्यांची स्वतंत्र यादीदेखील तयार करण्यात आली आहे. अशा जमिनींचे स्थळ निरीक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. नाशिक तालुक्यातील सातपूर, अंबड, मोरवाडी, पिंपळगाव बहुला, यांसह अनेक गावांमधील शेतकरी नोटिसा स्वीकारण्यास नकार देत असून, त्यामुळे तलाठ्यांची डोकेदुखी देखील वाढू लागली आहे. आज ना उद्या या जमिनी ‘एनए’ होणार असल्याचे सांगत गृहप्रकल्पांसाठी किंवा प्लॉटिंगसाठी या जमिनींची शेतकऱ्यांकडे मागणी होऊ लागली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा कुटील डाव खेळत असल्याचा आरोप होत आहे.

‘एनए’ची सक्ती नाही

जिल्ह्यात सुमारे दीड लाख मिळकतधारकांना रुपांतरीत कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी त्या ऐच्छिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कुणाच्या कायदेशीर हक्कांवर बाधा येणार नाही याची काळजी प्रशासन घेत असल्याची माह‌तिी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी यासंदर्भात दिली. सक्तीने करवसुली करून शेतकऱ्यांच्या जमिनी ‘एनए’ करण्याचा प्रशासनाचा उद्देश नाही. तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यापासून देखील कुणीही रोखणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शंका असतील तर ते जिल्हाधिकारी कायार्लयात महसूलच्या स्वतंत्र कक्षात शंकांचे निरसन करवून घेऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’मध्ये आजपासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आज, मंगळवारी (दि. ५)पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या आवारात ९ तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात रबी शेतकरी संमेलन खास आकर्षण ठरणार आहे.

विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दर वर्षी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात कृषीविषयक चालू घडामोडींवर चर्चासत्र, शेतकऱ्यांच्या समस्या व उपाययोजना, कृषी प्रदर्शन व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर भेट अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. आमदार देवयानी फरांदे प्रमुख पाहुणे राहतील. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी राहतील. कृषी तंत्रज्ञान महोत्सवानिमित्त तज्ज्ञांचे व्याख्यान, तसेच केंद्रावर असलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उभारण्यात आलेले प्रकल्पांना भेटी यांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

--

तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शक या तंत्रज्ञान महोत्सवात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने ‘मृदा परीक्षण व जमीन आरोग्यपत्रिका : काळाची गरज’ या विषयावर डॉ. कोसर्डीकर, ‘निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन’ यावर कृषी सल्लागार मंगेश भास्कर, ‘महिलांसाठी कृषीपूरक प्रक्रिया उद्योग’ विषयावर कृषी शास्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, ‘सेंद्रिय शेती : वाव आणि प्रमाणीकरण’ यावर सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवडी, ‘फुले- जलप्रणाली’ यावर डॉ. सुनील गोरवंटीवार, ‘कृषी यांत्रिकीकरण’ यावर डॉ. तुळशीदास बस्तेवाड आदी मार्गदर्शन करणार आहेत.

--

योजनांची मिळणार माहिती

शेतकऱ्यांना विविध कृषी व संलग्न विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांची माहितीही प्रदर्शानाच्या माध्यमातून मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या मॉडेल फार्मवरील १०० एकरांवरील १५ विविध प्रकारच्या फळझाडांची प्रात्यक्षिके, अत्याधुनिक रोपवाटिका, सुसज्ज माती-पाणीपरीक्षण प्रयोगशाळा, जैविक कीड-रोगनाशक प्रयोगशाळा, गांडूळ खत युनिट, अत्याधुनिक सूक्ष्मसिंचन यंत्रणा, हरितगृहातील जरबेरा शेती, प्लांट लायब्ररी, अर्धबंदिस्त शेळीपालन, गिरिराजा व कडकनाथ कोंबडीपालन आदी अभ्यासण्याची संधी यानिमित्ताने शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांमध्ये रोखले एचआयव्ही संक्रमण

$
0
0

नाशिक : गर्भवतींमधील एचआयव्हीचे संक्रमण बालकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण शून्य झाले आहे. यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावी ठरत असून, यंदा एचआयव्हीग्रस्त गर्भवतींनी जन्म दिलेल्या एकाही नवजात अर्भकास या जीवघेण्या आजाराची लागण झालेली नाही.

प्रत्येक गर्भवतीची तपासणीदरम्यान एचआयव्ही टेस्ट केली जाते. महिलेला एचआयव्हीचे संक्रमण आढळून आल्यास गर्भवतीवर अँटिरेट्रोव्हायरल सेंटर्समध्ये (एआरटी) उपचार केले जातात. गर्भवतीच्या आहारात काही बदल करून तिला इतर संधिसाधू आजारांपासून वाचवले जाते. गर्भवतीने एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास संक्रमणाचा धोका ९५ टक्के कमी होतो. याबाबत बोलताना एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र, शहरी आरोग्य केंद्र, तसेच खासगी सरकारी तत्त्वावर सुरू असलेल्या हॉस्पिटलचे जाळे पसरले आहे. या प्रत्येक ठिकाणी गर्भवतींची मोफत रक्त तपासणी केली जाते. त्यात महिलांना एचआयव्ही संक्रमण आढळून आल्यास अशा महिलांना पुढील उपचारासाठी अँटिरेट्रोव्हायरल सेंटर्समध्ये (एआरटी) पाठवले जाते. अर्भक जन्माला आल्यानंतर दीड व सहा महिन्यांनी, त्यानंतर एक आणि दीड वर्षाने बालकाची तपासणी करूनच ते एचआयव्हीबाधित आहे किंवा नाही हे ठरवले जाते, असे परदेशी यांनी स्पष्ट केले. या आजाराबाबत होणारी जागृती, आजाराकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, तसेच प्रभावी उपचाराची पद्धत याचा हा परिणाम असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले. नवजात अर्भकांमधील एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी गर्भवतींना अँटिरेट्रोव्हायरल थेरपी महत्त्वाची ठरते. याबाबत बोलताना एआरटी सेंट्रर्सचे डॉ. सुनील ठाकूर यांनी सांगितले, की ही उपचारपद्धती प्रभावी ठरते आहे. काही वर्षांपूर्वी संक्रमण होण्याचा धोका २५ ते ३० टक्के होता. हळूहळू तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नाशिकमध्ये यंदा नवजात अर्भकांपैकी एकालाही संक्रमण झालेले नाही. पूर्वीच्या उपचारपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असून, त्यानंतर ही परिस्थिती सुधारत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले. उपचार सुरू झाल्यानंतर गर्भवतीने योग्य आहार घेतला, उपचाराचे नियम पालन केले तर संक्रमणाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एचआयव्ही संक्रमण काळात संधिसाधू आजार दूर राहणे महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने आरोग्य विभाग महिलेची व अर्भकाची योग्य काळजी घेत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

वर्षनिहाय बालकांची तपासणी (कंसात एचआयव्हीग्रस्त बालकांची संख्या)

२०१३-१४ ः ७८ (९), २०१४-१५ ः ८१ (७), २०१५-१६ ः ९४ (२), २०१६-१७ ः ६० (१), २०१७-१८ ः ५५ (०).

(२०१७-१८मधील आकडेवारी ऑक्टोबरपर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न व्यावसायिक एफडीएच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अन्नातील भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत परवाना नसणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अन्न व्यावसायिकांनी नोंदणी करून परवाने घेणे गरजेचे आहे. यासाठी www.flrs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावे, असे आवाहनही सहआयुक्त उ. शं. वंजारी यांनी केले आहे.

हॉटेल, ढाबा, भगर-तांदूळ उत्पादक, मिरची-मसाले, खाद्यतेले, दूध व दुग्धजन्य पदार्थ आदींचे उत्पादक, किरकोळ व घाऊक विक्रेते, शासकीय व खासगी आश्रमशाळा, वसतिगृहे, महाविद्यालयीन कॅन्‍टीन, रेस्टॉरंट, भोजनालये, खानावळी व केटरिंग आदी १२ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनी नोंदणी करून परवाना घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. १२ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या पाणीपुरी, भेलपुरी, भाजीपाला, फळे, फिरते विक्रेते, चायनिज स्टॉल, लहान गृहउद्योग, किरकोळ अन्नपदार्थ विक्रेते आदी व्यावसायिकांनी योग्य ते शुल्क भरून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पण, यातील बहुतांश व्यावसायिक हे परवाणेच घेत नसल्यामुळे ही मोहीम असली तरी त्याला किती प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचे आहे.

असा आहे कायदा

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ हा राज्यामध्ये ५ ऑगस्ट २०११ पासून लागू करण्यात आलेला आहे. यानुसार विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. परवाना व नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपलेली असल्यास ३० दिवसांच्या आत नूतनीकरण करणे आवश्यक आहे.अन्नामधील भेसळीचे प्रमाण वाढले असून, अशी वर्षभर अशी मोहीम राबविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्यावर माझी भिस्त, कशी चालणार बेशिस्त!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ जाहीर कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी स्टेजवर झालेल्या गर्दी व गोंधळातही आठवले यांनी फटकेबाजी करीत कार्यक्रमात रंगत आणली. आठवले यांनी स्टेजवर बघून एवढी गर्दी, होईल सर्वांना सर्दी असे म्हणताच हशा पिकला. या सत्कार कार्यक्रमात त्यांनी कवितांचा पाऊस पाडला. तुमच्यावर आहे माझी भिस्त, कशी चालणार बेशिस्त ही कविता गोंधळ करणाऱ्यांना प्रेमाचा दम भरणारी ठरली.

रविवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड उत्साह असल्यामुळे कार्यकर्त्यांना रोखणे अवघड झाले होते. सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याचा मुद्दा उपस्थित करून सर्व गट एकत्र यायला हवे, त्यासाठी माझा गट कधीही बरखास्त करेल, असे सांगितले. यावेळी त्यांनी या ऐक्य झालेल्या गटाचा अध्यक्ष कुणालाही करा, कोणी होत नसेल तर मला करा असेही नमूद केले. तब्बल तासाभराहून अधिक काळ चाललेल्या या सत्कार कार्यक्रमात अनेक विषयांना हात घातल आठवले यांनी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली. या सभेत अनेक किस्से सांगत आठवले यांनी अधून-मधून कवितेची पेरणी केल्यामुळे त्यांचे भाषण कार्यकर्त्यांचे मनोरंजनही करून गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, तर प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब खांबाळकर, डॉ. विजय मोरे, नारायण गायकवाड, नगरसेविका दीक्षा लोंढे, दिनेश जाधव, सागर जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाईने दाखविली ‘सोशल’ भूतदया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

एखाद्या परिचिताचे निधन झाल्याची बाबही सहजतेने घेणाऱ्या सध्याच्या काळात एका श्वानाच्या मृत्यूनंतर तरुणाईला फुटलेला पाझर अन् सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी श्वानाचा अंतिम प्रवास सुखदायी केल्याची घटना हिरावाडीत घडली.

हिरावाडीमधील शक्तीनगर येथे परिसरातील तरुणांनी एसएफसी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. या फाउंडेशनमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. येथील येथील गणेश मंदिराशेजारील फाउंडेशनच्या कार्यालयात एका श्वानाचा सांभाळ करून कार्यकर्त्यांनी त्याला वाढविले. मात्र, रविवारी या खंड्यानामक श्वानाचा अपघातात मृत्यू झाला. सर्वांनाच लळा लावणाऱ्या या श्वानाचा अचानक मृत्यू झाल्याने तेथे उपस्थित कार्यकर्ते चांगलेच हेलावले. त्यांनी तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून फाउंडेशनच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनेचे गौरव गोवर्धने आणि इतर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली या श्वानाचा अंत्यविधी फाउंडेशनच्याच मैदानावर करण्यात आला. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी केले जातात असे सारे सोपस्कार यावेळी तरुणाईने पार पाडले. त्यामुळे ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली.

सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याची टीका होत असली, तरी या माध्यमाद्वारे चांगले काही करण्याची उर्मी बाळगणारे तरुणदेखील मोठ्या संख्येने असल्याची दिलासादायक बाब हिरावाडी परिसरातील घटनेने अधोरेखित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दिवसभर गारठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही झाला आहे. त्यामुळेच नाशिक शहर परिसरात सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. तसेच, दिवसभर गारठा असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला. किमान तापमानात वाढ होऊनही गारठा असल्याने ही बाब आरोग्यावर परिणाम करणारी ठरत आहे. म्हणूनच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

एक आठवडा थंडी, तर दुसरा आठवडा काहीसा गरम अशा बदलत्या वातवरणामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला. शहरात सोमवारी कमाल तापमान २८.३, तर किमान १६.१ अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबर अखेरपासून थंडीची चाहूल लागल्याने नाशिककर काहीसे सुखावले होते. परंतु, पुन्हा थंडी गायब झाली. थंडीचा कडाका अद्याप सुरू झाला नसला, तरी उष्णतेची तीव्रता मात्र कमी झाली आहे. सायंकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत थंडी आणि त्यानंतर ऊन असे दोन्ही बदल नाशिककर अनुभवत आहेत. गेल्या वर्षाची तुलना करता यंदाच्या डिसेंबर महिन्यातील थंडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र महिनाअखेरीस थंडी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमान २९.५, तर किमान १४.२ अंश एवढे होते. डिसेंबरच्या सुरुवातीला कमाल तापमान २७.७, तर १०.९ अंश एवढे होते, तर रविवारी कमाल २८.३ व किमान १६.१ अंश सेल्सियस होते. थंडीच्या आलेखात सतत चढ-उतार होत असल्याचे दिसते. थंडी कमी-अधिक होत असली, तरी वाढत्या थंडीमुळे चौकाचौकात शेकोट्या व गप्पांचे फड मात्र रंगू लागल्याचे दिसते आहे.

ढगाळ वातावरण

सोमवारी सकाळपासून वातावरणात आमूलाग्र बदल झाला. सकाळी पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सूर्योदयदेखील उशिराने पहायला मिळाला. यावेळी मात्र थंडीची तीव्रता अत्यंत कमी होती. दुपारीदेखील वातावरण ढगाळ होते. पावासाचा शिडकावा होईल असे वातावारण तयार झाले होते. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याचे समजते.

अवकाळीचे सावट

मुंबईच्या किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळाचा धोका असल्याने हवामान विभागाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासांत (५ डिसेंबर) पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळाचा प्रभाव कायम असून, उंच लाटांचा मारा किनारपट्टी भागास बसत आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होत असून, वातावरणातही बदल जाणवू लागले आहेत. केरळ, तमिळनाडूला तडाखा देऊन लक्षद्वीपच्या दिशेने सरकलेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकणच्या किनारपट्टी भागातही दिसू लागला आहे. मुंबईसह कोकण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवर वाहनचालकांची त्रेधातिरपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी कॉलेजरोडवर वाहन तपासणी करीत चारशेहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. विशेषतः हेल्मेटचा वापर न करणाऱ्या युवक आणि तरुणांकडे पोलिसांनी लक्ष दिले. अनेक दिवसांनंतर पोलिसांनी कॉलेजरोडवर कारवाई केल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली.

बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी सोमवारी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी तसेच गंगापूर आणि सरकारवाडा पोलिसांनी कॉलेजरोडवर नाकाबंदी केली. कॅनडा कॉर्नरपासून भोसला मिल‌िटरी स्कूलच्या गेटसमोरील सर्कलपर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी सुरू केली. हेल्मेट नसणे, ट्रिपलस‌ीट, लायसन्स नसणे, फ्रंट सीट वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे चारशेंहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले की, आजच्या कारवाईसाठी ५० ते ६० पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी हजर होते. वाहतूक शाखेचे चार युनिट्स असून, त्यातील कर्मचारी तसेच सरकारवाडा आणि गंगापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विविध कॉलेजेसला भेटी दिल्या. हेल्मेटसह वाहतूक नियमांचे पालन का करावे, याविषयी माहिती देण्यात आली. मात्र, जनजागृतीचा तितकासा परिणाम युवकांमध्ये दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी कॉलेजरोडवर कारवाई करण्यात आली.

युवकांवर लक्ष

यावेळी हेल्मेटचा वापर न करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष देण्यात आले. चार युनिट्समधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची ही पहिली वेळ नसून, यापूर्वी नाशिकरोडला तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती, असे देवरे यांनी स्पष्ट केले. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, असेही देवरे यांनी सांगितले. यावेळी टवाळखोरांसह रोडरोमियोंविरोधातदेखील मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटांचा प्रश्न निकाली निघणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियम‌ित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे शहरातील कपाट प्रश्न बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेला आर्थिक पाठबळही मिळणार आहे. कपाटे नियम‌ितीकरणासाठी दंडात्मक आकारणीतून पालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटींच्या आसपास निधी मिळणार असल्याची शक्यता आहे. परंतु, दंडात्मक आकारणीमुळे बिल्डरांकडून त्याला किती प्रतिसाद मिळतो, याबाबत साशंकता आहे.

राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात जाहीर नोटीस काढत बांधकामे नियम‌ितीकरणासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या जास्त नसली तरी, कपाट प्रश्नामुळे निर्माण झालेली कोंडी या धोरणामुळे सुटणार आहे. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींमध्ये असलेला कपाटांचा प्रश्न सुटणार नसला तरी, नऊ मीटर रस्त्यावरील इमारतींच्या कपाटांचा प्रश्न मात्र निकाली निघण्याची शक्यता आहे. कपाटकोंडी झालेल्या इमारतींची संख्या सहा हजारांच्या आसपास आहे. त्यातील दीड ते दोन हजार इमारती या नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीवरील असून दंडात्मक आकारणी करून वाढीव एफएसआयने ही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जवळपास १८ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत दंडात्मक आकारणी केली जाणार आहे. हा दंड मात्र बिल्डरांना परवडणारा नाही. इमारतीचा पूर्ण नफा जरी बिल्डरांनी दंडात भरला तरी, त्यातून प्रश्न सुटणार नाही. एका इमारतीला १५ ते २५ लाखांपर्यंत दंडाची रक्कम जाणार आहे. त्यामुळे बिल्डरांकडून या योजनेला किती प्रतिसाद मिळतो, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे बिल्डरांच्या प्रतिसादाकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्यासह सर्वांचीच नार्को करा

$
0
0

आमदार गोटेंचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माझी आणि कैलास गौडा यांच्यातील संभाषणाची ध्वनीफित ऐकवून मांगले कुटुंबीयांना आमदार गोटे मदत करीत असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला गेला. मात्र हे आरोप खोटे असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. मी मांगले कुटुंबीयांना मदत केली मात्र मला मांगले कोण आहे, हे समजल्यानंतर त्याला हाकलून लावले, असेही आमदार गोटे सोमवारी (दि. ४) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह माझीदेखील नार्को टेस्ट करा म्हणजे त्यातून शहरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी गुड्ड्या खून प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांना तपासासाठी कामात येतील, असेही आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले.

शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे व खंडणीचा गुन्हा दाखल असलेले सतीश मांगले दाम्पत्य यांचे संबंध असल्याचा आरोप धुळे शहर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर या प्रकरणाला तोंड फुटले होते. याबाबत सोमवारी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. माझी व सतीश मांगलेचे संबंध आहेत याविषयी आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडे मी स्वत: करणार आहे, असे आमदार गोटे म्हणाले.

परंतु, त्याआधी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी आणि कुख्यात गुंड गुड्ड्या यांच्यात काय संबंध होते? खून प्रकरण घडण्याच्याआधी आदल्या दिवशी गुड्ड्याने सभापती चौधरी यांच्या कार्यालयाबाहेर शिवीगाळ केली. तर दुसऱ्या दिवशी शहरात खून प्रकरण झाले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादीने प्रश्नांची उत्तरे द्यावीत

धुळे शहरात जुलै महिन्यात झालेल्या गुड्ड्या खून प्रकरणाच्या आदल्यादिवशी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्या देवपूरातील कार्यालयाजवळ उभे राहून गुड्ड्याने शिवीगाळ केली, हे का केले? मनपा रेकॉर्ड विभागाला गेल्या काही वर्षांपूर्वी अग्निकांड प्रकरण झाले. त्यावेळी आरोपी गुड्ड्याला नाशिक येथील कारागृहात सभापती चौधरी भेटायला का जात होते? गुड्ड्याचा खून झाला त्यानंतर लगेचच ऐंशी फुटी रोडलगत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घराबाहेर २० ते २५ मोटारसायकल आणि चार-पाच कार सकाळी कशासाठी आल्या होत्या? यासर्व प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन द्यावी, असे आवाहन शेवटी आमदार गोटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images