Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गाव जागवत आली, वासुदेवाची स्वारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर


कधीकाळी पहाटे पहाटे दारात येवून अभंग ओव्या गात दान मागणारा वासुदेव गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकनगरीत मतांचे दान मागताना दिसत आहे. शहरातील काही उमेदवारांनी प्रचारासाठी या ऐतिहास‌कि संवाददूताचा योग्यपद्धतीने वापर सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत का असेना मागे पडलेल्या या संवाददूताला पाहून भल्या पहाटे त्र्यंबक शहरातील मतदार तृप्त होत आहेत.

त्र्यंबक नगरपालिका निवडणूक प्रचार रंग अधिक गडद झाला आहे. भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत मतदारांचे उंबरठे झिजव‌ति आहेत. सकाळ उजाडताच वासुदेव दारात येऊन उभा राहतो आणि देवाची आळवणी करतांनाच तो उमेदवाराची आठवण करून देत आहे. त्याच्या खांद्यावर शिवसेनेचा दुपट्टा आहे. नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार धनंजय तुंगार यांनी चार वासुदेवाच्या पेहराव केलेले प्रचारक आणले आहेत. ते मतदारांचा जागर करीत आहेत. प्रचाराचा बॅनर असलेल्या तीन चाकी सायकली सध्या शहरात दाखल होत आहेत. तर काँग्रेस पक्षोने जादुगार आणला आहे. चौकाचौकात जादू करत हाताचा पंजा काढून दाखवत आहे. नांदेड महापालिका प्रचार यंत्रणेचा यशस्वी फंडा येथे राबविण्याचा प्रयोग होत असल्याची चर्चा आहे. सोशल मीड‌यिावर तर प्रचारपत्रकांचा भडीमार सुरू झाला आहे.

घरदार निघाले प्रचाराला

नारळ फोडून झाले की उमेदवार आणि समर्थक यांची प्रभागातून नमस्कारासाठी फेरी सुरू होते, तेव्हा परप्रांतीतून आलेले पर्यटक मात्र गोंधळात पडतांना दिसत आहेत. उमेदवार घरोघरी गाठीभेटी घेत प्रचार करीत आहेत. त्यांच्या घरातील ज्येष्ठ सदस्य स्वतंत्र व्यूव्हरचना राबवत आहेत. तर महिलादेखील स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबव‌ति आहेत.

आमदारांचा त्र्यंबकमध्ये

वाढला मुक्काम

नगराध्यक्ष आणि प्रभाग लढविणारे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी शहरात ठाण मांडून आहेत. सकाळ-संध्याकाळ रणनीती आखणाऱ्या बैठका सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंकलने मम्मी-पप्पाला रक्त लावले…

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘अंकलने पप्पा आणि मम्मीच्या अंगावर फटाके फोडले, रक्त लावले’ अशा शब्दात निरागस आर्यनने आपल्या आई-वडिलांवर झालेल्या हल्ल्याचे हृदयद्रावक वर्णन करताच जवान राजेश, त्याची पत्नी शोभा यांच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या समुदायाला अश्रू अनावर झाले. त्या प्रसंगाचे वर्णन करतांना साडेतीन वर्षांचा आर्यन पूर्णपणे भांबावलेला होता.

काश्मीरमध्ये हत्या झालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा जवान राजेश केकाणे आणि त्याची पत्नी शोभा यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजता चिंचोली येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर आई-वडिलांना चिमुरड्या आर्यनने अग्निडाग दिला, तेव्हा नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांना अश्रू अनावर झाले. राजेश आणि शोभाची मध्यरात्री त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली तेव्हा राजेशचा मुलगा आर्यन आणि मुलगी अनुष्का हे दोघेही घरातच होते. त्यावेळी आई-वडिलांवर बेतलेल्या प्रसंगाचे चिमुकल्या आर्यनने अडखळतच वर्णन केले.

इतिहासात प्रथमच पती-पत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने संपूर्ण चिंचोली गाव शोकसागरात बुडाले. सीआयएसफच्या सशस्त्र तुकडीने याप्रसंगी राजेश व शोभा यांना अखेरची मानवंदना दिली. सीआयएसफचे निरीक्षक धर्मपाल सोमकुवर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

काश्मीरमधील तुलस्ती (जिल्हा किश्तवाड) येथे राजेश आणि शोभा यांची गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री दोन वाजता त्यांचे पार्थिव नाशिकरोड येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या केंद्रावर आणण्यात आले. तेथून शनिवारी सकाळी साडेसात वाजता राजेश आणि शोभाचे पार्थिव चिंचोलीत आणताच कुटुंबियांनी आक्रोश केला. गावातील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या मैदानावर चिंचोलीकरांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार नितीन गवळी, उदय सांगळे, सीआयएसएफ दलाचे निरीक्षक धर्मपाल सोमकुंवर उपस्थित होते.

सोळा गोळ्या झेलल्या

रात्री दीड वाजता दरवाजाची बेल वाजल्यावर राजेशने दरवाजा उघडताच त्याचा मित्र सुरिंदरने हातातील रायफलने अवघ्या तीन फूट अंतरावरुन राजेशवर गोळ्या झाडल्या. आवाज ऐकून पत्नी शोभाही राजेशच्या मदतीला धावली. परंतु राजेशने तिला आपल्या पाठ‌ीशी घातले. तोपर्यंत सुरिंदरने राजेशवर तब्बल सोळा गोळ्या झाडल्या. यात शोभालाही गोळी लागल्याने तिचाही यात अंत झाला.

ऐसा दोस्त कहाँ मिलेगा…

चार सालसे रजेश और मैं एकसाथ थे. राजेश बहुत अच्छा दोस्त था, जम्मू काश्मीर मे काम करने के लिए उसे बहुत दिलचस्पी थी. ऐसा दोस्त हमे और हमारे बल को हमेशा के लिए छोड गया, अशा शब्दांत सब इन्स्पेक्टर बिपीनकुमार यांनी राजेश यांना श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरीवली होणार कनेक्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


पुण्यापाठोपाठ मुंबई मार्गावर एसटी महामंडळाच्या चार शिवशाही बसेस सोमवारपासून धावणार आहे. गेल्या आठवड्यात एसटीने या बसचे वेळापत्रक जाहीर केले होते. पण, आरटीओ पासिंग न झाल्याने या बस सुरू झाल्या नाही. आता या बस नाशिकमध्ये आल्या असून, त्यांचे वेळापत्रकही तयार आहे. नाशिक येथून सकाळी साडेपाच वाजेपासून या बस तासाभराच्या अंतराने सुटणार आहे. त्यानंतर दुपारी पुन्हा बोरीवली येथून या बसेस येतील.

गेल्या आठवड्यात जाहीर केलेले वेळापत्रक या बससाठी कायम ठेवण्यात आले आहे. सकाळी साडेपाच, साडेसहा, साडेसात, साडेआठ याप्रमाणेच दुपारी अडीच, साडेतीन व सायंकाळी साडेचार या वेळेतही या बस धावणार आहेत. बोरीवलीहून या बस सकाळी ९.५०, १०.५० ११.५० या वेळेत नाशिकसाठी सुटतील. तसेच दुपारी १२.५०, सायंकाळी ७ आणि रात्री ८ वाजताही बोरीवलीहून नाशिकसाठी बसेस असतील. यातील एक बस ठाण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

मुंबई मार्गावरील शिवशाही बसेसचे गेल्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर झाले. पण, बसेस न धावल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला होता. शिवशाही बस वातानुकूलित असूनही त्याचे भाडे परवडणारे असल्यामुळे राज्यभर या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक-पुणे या मार्गावर एसटीने याअगोदर १७ बसेस सुरू केल्या असून त्यात आता या चार बसेसची भर पडणार आहे.

सोमवारपासून बोरीपवलीपर्यंत चार शिवशाही बससे धावणार आहे. गेल्या आठवड्यात आरटीओ पासिंगमुळे या बस आल्या नाही. आता या बस नाशिक डेपोत आल्या असून, पहिल्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. - राजेंद्र जगताप, जिल्हा वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पोलिसांची सरकारवाड्यात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुलकर्णी गार्डन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणाची शनिवारी सटाणा पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, त्यांच्या हाती फार काही लागले नाही. सटाणा शहरातील एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाखांची रोकड चोरी केली असून, पोलिस चोरट्यांच्या मागावर आहेत.

किरण रघूनाथ मोरे (वय २२ रा.कृष्णा हाईटस, शिवगंगानगर, दिंडोरीरोड) आणि अमित साहेबराव गवई (वय २४ रा. श्याम अपा. पीएनटी कॉलनी) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मोरे आणि गवई यांनी झटपट पैसे कमवण्याचा निर्णय घेतला होता. यू ट्युबवर चोरी करण्याच्या प्रकारांची माहिती घेऊन दोघांनी शुक्रवारी पहाटे कुलकर्णी गार्डनजवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा उद्योग सुरू असताना सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने दोघांना जेरबंद केले. नोकरी करतानाच बाहेरून शिक्षण घेत असलेल्या संशयितांनी काही दिवसांपूर्वीच चोरीची तयारी केली होती. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ते पोलिसांच्या हाती सापडले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अनिल बागुल म्हणाले, झपटप पैसे मिळवण्यासाठीच दोघांनी उद्योग केल्याचे दिसते. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे जाणवत नाही.गुरुवारी सटाणा येथे एक एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांच्या तपास पथकाने शनिवारी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून दोघा संशयितांची चौकशी केली. मात्र, त्यात फार काही स्पष्ट होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुणा’ला करायचेय देशभ्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिनाअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहास‌कि स्थळांपर्यंत जावून मन प्रसन्न करून येतात. मात्र, काही जण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइकसवारीच्या आवडीसाठी वयाची कुठलीही सीमा न बाळगता आनंद घेत असतात.

मनमाड येथील ६६ वर्षीय प्रकाश गोयल हे देखील अशाच अवलियांमधील एक. त्यांनी आपल्या बाइकवर आजपर्यंत १८ हजार किलोमीटर प्रवास केला असून, कोकण गोव्यासह, खजुराहो, ओंकारेश्वर, उज्जैनपर्यंत दुचाकीवर मजल मारली आहे. आता गोयल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी भारतभ्रमण करण्याचा चंग बांधला आहे.

त्याच्यातील उत्साह आणि भटकंतीची आवड पाहून शहर परिसरात त्यांच्या या धैर्याचे खूपच कौतुक होत ओहे. विशेष म्हणजे येथून पुढचा प्रवास ते ज्युपीटर या मोपेड दुचाकीवर करणार आहेत.

मनमाड येथील सराफ व्यावसायीक असलेल्या प्रकाश गोयल यांना लहानपणापासून भटकंतीचे वेड. तारुण्यात हातात दुचाकी आली आणि त्यांच्या आवडीला वेगाचे पंख मिळाले. वयाच्या १९व्या वर्षी हिरोहोंडावर मुंबई-कोल्हापूर ची वारी करणाऱ्या या दुचाकीवेड्याला आता भारतभ्रमणाचे वेध लागले आहेत. या प्रेमापोटीच काही वर्षांपूर्वी त्यांना अपघातालाही सामोरे जावे लागले. त्यात तब्बल दोन वर्ष त्यांनी बेडवर काढले. त्या अंधकारमय दिवसातही या ‘प्रकाश’ने स्वप्नांचा पिच्छा सोडला नाही. अपघातातून सावरल्यानंतर त्यांचे ही भटकंतीप्रेम अधिकच वाढले. गेली तब्बल पाच दशके गोयल यांची बाइकसफर अव्याहत सुरू आहे.

आजवर त्यांनी बाइकवर १८ हजार कि.मी. प्रवास केल्याचे ते सांगतात. नुकतेच सांची, खजुराहो येथे दुचाकीवर जाऊन आले. देवीची साडे तीन शक्ती पीठे, सोलापूर, अक्कलकोट, कास पठार, उज्जैन, अजमेर, मांडव गड, यासह मध्य प्रदेशातील इतरही प्रेक्षणीय स्थळांना गोयल यांनी बाइकवर भेट दिली आहे.

कुठेही जा, भारत समृद्ध वाटतो. विविध रिती परंपरा लक्ष वेधतात. कुठे आदिवासी भागातील दारिद्रय मन बेचैन करते. तर कुठे निसर्ग साद घालतो. त्यातून बाइक सफारीने जणू आयुष्याला नवसंजीवनी दिली आहे.

- प्रकाश गोयल, बाइकस्वार

सुरक्षित प्रवास

गोयल बाइकवर दरताशी ३५ कि.मी. व दिवसभरात २५० कि.मी. अंतर कापतात. दर ७० कि. मी. नंतर थोडासा आराम व सायंकाळी साडेसहानंतर प्रवास बंद आणि पोहचेल त्या ठिकाणी मुक्काम असे नियम त्यांनी घातले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचीदेखील या प्रवासाला साथ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्वप्रेमींची मांदियाळी

$
0
0

सारंगखेड्यात चेतक फेस्टिवलसह यात्रेला सुरुवात; पर्यटकांचा मुक्काम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला रविवारी (दि. ३) सुरुवात झाली. दुपारी चार वाजेच्या सुमारास पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, यात्रेचे आयोजक जसपालसिंह रावल आदींच्या उपस्थितीत यात्रोत्सवाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी देश-विदेशातील पर्यटकांनी यात्रेतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. घोडे दाखल झाल्यापासून यात्रेच्या पहिल्या दिवसापर्यंत घोडे खरेदी-विक्रीत २७ लाखांची उलाढाल झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

यात्रेच्या पहिल्याच दिवशी रविवार सुटीचा दिवस असल्याने दर्शनासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. दरम्यान, शेकडो भाविकांनी गूळ, साखर, पेढे, पैशांच्या नाण्यांची तुला करून नवस फेडण्यात आला. सूर्यकन्या तापी नदीच्या किनारी उंच डोंगरावर मंदिर असलेल्या एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली. या यात्रेसाठी गेल्या १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. दत्त जयंतीच्या मध्यरात्रीपासून सारंगखेडा येथील दत्ताच्या मंदिरात महाआरती व दत्तप्रभूंच्या पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सारंगखेडा नगरीत दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. ही ऐतिहासिक यात्रा असल्याने दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत असते. यावर्षीही यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एका लाखांपेक्षा जास्त भाविकांनी यात्रेला हजेरी लावल्याचे दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जून सोमजी पाटील, सचिव भिकन पाटील व शिरीष पाटील यांनी सांगितले.

सारंगखेडा यात्रेत घोडे, बैल जोडी विक्रीसह विविध साहित्य विक्रीचा बाजार भरतो. घोडे बाजारात ज्याप्रमाणे कोटींची उलाढाल होते. त्यानुसारच संसारोपयोगी वस्तू, शेती अवजारे, विविध शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थांसह गरजेच्या वस्तू विक्रीसाठी येतात. यावर्षी यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने पूजेचे साहित्य विक्रीपासून ते सर्वच वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून सारंगखेडा यात्रेत रविवारी लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात्रा परिसरात मनोरंजनाची साधने व विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावर्षी सारंगखेडा यात्रेला नवा लूक देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग व चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून चेतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आनंद यात्रेकरूंना मिळणार असून, यंदा यात्रेत विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. या विदेशी पर्यटकांसोबत सेल्फी काढण्याची जणू काही स्पर्धाच लागली असून, या पर्यटकांसोबत सेल्फी काढून आनंद यात्रेकरू घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

सारंगखेडा यात्रेनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी दाखल झाले होते. रविवारी (दि. ३) सकाळी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात जावून एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते एकमुखी दत्तप्रभूंची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी पर्यटन विकास विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, उपअभियंता फारूक शेख, दशरथ मोठाड, महेश बागुल, सारंगखेड्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक मनोहर पगार आदी उपस्थित होते. त्यानंतर पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेंट सिटी, महिला कट्टा, घोडे बाजार, मंदिर परिसर, चेतक फेस्टिवल कार्यालयाची पाहणी केली. तसेच गेल्या वर्षीपेक्षा अतिशय नियोजनबद्ध व सुंदर अशा फेस्टिवलचे आयोजन केल्याने पर्यटन विभागाचा व चेतक फेस्टिवलचा खऱ्या अर्थाने उद्देश सफल झाल्याचे सांगून या महोत्सवामुळे देशी, विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही नमुद केले. पर्यटन विभागाकडून जास्तीत जास्त सहकार्य करून सारंगखेडा यात्रा जागतिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले.

घोडे विक्रीतून २७ लाखांची उलाढाल

सारंगखेडा यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असल्याने १५ दिवसांपूर्वीच देशातील कानाकोपऱ्यातून घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावर्षी यात्रेत सरकारकडून अश्व संग्रहालय उभारण्यात येणार असून, आणखीनच भर पडणार आहे. या सारंगखेड्यातील घोडे बाजारात एकूण २००० घोडे विक्रीसाठी आले असून, विविध प्रजातीचे घोडे असल्याने अश्वशौकिनांचे लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत ८६ घोड्यांची विक्री होऊन एकूण २६ लाख ८९ हजार ३०० रुपयांची उलाढाल घोडे बाजारात झाली आहे. रविवारी (दि. ३) यात्रेच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात ६४ घोड्यांची विक्री होवून २३ लाख ११ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली. यात उत्तरप्रदेशातील नबाबगंज (जि़बरेली) येथील अब्दूल रशीद अब्दूल समद यांच्याकडे असलेली घोडी ही सातारा जिल्ह्यातील कडेगाव येथील दिलीप नामदेव घाडगे यांनी दोन लाख ४० हजार रुपयांनी खरेदी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथके रवाना, पण गूढ उकलेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपासासाठी जोर लावला आहे. दुर्दैवाने दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची अद्याप ओळखच पटलेली नाही. तिचे मारेकरी मोकाटच असून, मृतदेह सापडून सोमवारी, ४ डिसेंबर रोजी आठ दिवस पूर्ण होतील.

आंबेगण येथील पाझर तलावात २७ नोव्हेंबर रोजी एका १६ ते १८ वयोगटातील मुलीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने मुलीची हत्या केली आहे. चेहऱ्याची ओळख पटू नये याची काळजी आरोपीने घेतली. यानंतर या मृतदेहाचे हातपाय बांधून तो एका गोणीत टाकला. गोणीत दगड भरून तो आंबेगण शिवारातील पाझर तलावत फेकून दिला होता. साधारणतः तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची गोणी तरंगत वर आली. त्यानंतर खुनाच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मात्र, मागील सात दिवसांत तपासात एकही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शहरसह ग्रामीण भागात महिला, तरुणी, तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण, शहर पोलिस, परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी बेपत्ता मुलींची माहिती घेतली. मात्र, ठोस काही हाती आले नाही. आता पोलिसांनी आपला मोर्चा शेजारील गुजरात राज्याकडे वळवला आहे. या ठिकाणी काही धागेदोरे मिळतात काय, याचा तपास पोलिस घेत आहेत. बेपत्ता मुलींची घेतली जाणारी माहिती आणि सापडलेला मृतदेह यांच्यात अद्याप साधर्म्य दिसून आलेले नाही. इतक्या दिवसांनंतरही मुलीचे पालक समोर आलेले नाहीत. त्यामुळे ऑनर किलिंगसारखा हा प्रकार असावा काय, याची शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांना ही माहिती कळवण्यात आली असून, त्यातून काही समोर येते काय याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी काही पथके तयार केली असून, तपासासाठी त्यांना गुजरातसह इतर जिल्ह्यांत पाठवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाहीचा प्रवास; आराम नव्हे त्रास!

$
0
0

एसी बंद, डिझेल भरण्यास विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रवाशांना लक्झरियस प्रवासाचा आनंद देण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा प्रवास सुखद ठरण्याऐवजी मनस्ताप देणाराच ठरत आहे. शनिवारी सकाळी पुण्याहून नाशिककडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचाच प्रत्यय आला. बंद एसी आणि दोन तासांच्या अपव्ययामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे शिवशाहीचा प्रवास, आराम नव्हे त्रास असे म्हणण्याची प्रवाशांवर वेळ आली आहे.

नाशिक-पुणे मार्गावरील निमआराम बससेवा कमी करून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी १५ ऑक्टोबरपासून शिवशाही ही लक्झरियस बससेवा सुरू केली. सुमारे साडेतीनशे रुपये प्रवासभाडे त्यासाठी आकारले जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांची पसंती मिळत असली तरी अजूनही ही बससेवा न रूळल्याने नागरिकांना गैरसोयीचाच अधिक सामना करावा लागत आहे. या बसेसला पुरेसा प‌िकअप नसल्याने त्या वेगाने धावत नाहीत, अशा प्रवाशांच्या आणि ‌चालकांच्या तक्रारी होत्या. बसमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा देऊनही त्यावर मोबाइल चार्ज होत नाही, असाही प्रवाशांचा अनुभव आहे. आता तर डिझेलअभावी एसी सुरू केला जात नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. शनिवारी काही प्रवाशांना याचा अनुभव आला.

सकाळी पुण्याहून नाशिककडे निघालेल्या प्रवाशांना प्रचंड गैरसोय आणि मनस्तापाला सामोरे जावे लागले. पुणे येथून सकाळी सहाच्या दरम्यान असलेली शिवशाही बस तब्बल वीस मिनिटे ते अर्धा तास उशिराने शिवाजीनगर बसस्थानकातून बाहेर पडली. या बसच्या काचा पूर्णत: बंद असल्याने त्यामध्ये एसी सुरू ठेवावा लागतो. परंतु, बस मार्गस्थ झाल्यानंतरही हा एसी बंदच होता. बसमध्ये हवा खेळती राहण्यास संधी नसल्याने प्रवाशांना विशेषत: लहान मुले आणि वृद्धांना त्याचा त्रास होऊ लागला. एसी सुरू करण्याची मागणी त्यांनी चालकाकडे केली. परंतु, बसमध्ये पुरेसे डिझेल नसल्याचे सांगत चालकानेही एसी सुरू ठेवण्याबाबत असमर्थता दर्शविली. नारायणगावमध्ये डिझेल भरून घेतल्यानंतर एसी सुरू केला जाईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. नारायणगाव आगारातील पंपावर ही बस पोहोचली. परंतु, तेथेही कर्मचाऱ्यांचा अभाव आणि तत्सम कारणांमुळे डिझेल भरण्यात तब्बल एक ते दीड तास खर्ची झाला. एवढा वेळ प्रवाशांना आगाराच्या परिसरात ताटकळत थांबावे लागल्याने प्रचंड मनस्ताप झाला. याबाबत नाशिकमधील महामंडळांच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता या प्रकाराबाबत प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहवेदीवरील क्षणांना ‘एव्हीआय’चा सोशल टच

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर.

लग्नाचा सिझन सध्या जोरात सुरू आहे. आयुष्याच्या साथीदारासोबत अग्नीच्या साक्षीने सप्तपदी घेत साजरा होणारा हा अविस्मरणीय सोहळा कॅमेराबद्ध करत जपून ठेवला जातो. या धामधुमीत खूप सारे फोटोज् आणि डीव्हीडी तयार करण्याची पद्धत आता कालबाह्य झाली आहे. या तुलनेत ऑडिओ आणि व्हिडिओ शॉट्स एकत्र करुन तयार केलेली एव्हीआय (AVI) हिट होत आहे.

लग्नाचा फोटोअल्बम हटके अन् अनोखा असावा असं आजच्या प्रत्येक नवीन जोडप्याला वाटत असतं. अपडेटेड कपल्सना त्याच त्या कॉमन पोज देऊन केलेलं लग्नाचं फोटोशूट नकोस वाटतंय. म्हणून सध्या पसंती मिळतेय ती फोटोशूटमधल्या ट्रेंडी कन्सेप्टला. लग्न ठरल्यापासून ते बिदाई किंवा सत्यनारायण पूजेपर्यंतचं फोटोशूट सध्या केलं जातं. या फोटोशूटचा प्रकारही बदलत आहे. खास प्रोफेशनल फोटोग्राफरकडून भन्नाट नव्या पोज, तसेच वेगवेगळे अँगल्स घेत फोटोशूट करून घेण्याकडे जोडप्यांचा कल जास्त आहे. फोटोशूटवर कितीही पैसे खर्च करायला लागले तरी चालेल, असे मत सध्याची कपल्स व्यक्त करतात.

फोटोशूटसोबतच लग्नात तयार होणारी डीव्हीडीदेखील आता कात टाकत आहे. सोशल आणि बिझी आयुष्यात दोन ते तीन तासांची डीव्हीडी तयार करण्यापेक्षा एव्हीआय तयार करण्यास पसंती दिली जातेय. एव्हीआय म्हणजे, ऑडिओ आणि व्हिडीओ शॉट्स एकत्रित करून तयार केलेली क्लिप. ही क्लिप साधारण १० ते १५ मिनिटांची तयार केली जाते. यात लग्न ठरल्यापासून तर सत्यनारायण पूजेपर्यंतचे सर्व फोटोंचे कलेक्शन केले जाते. सोबतच लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत कुठे डेटिंग, आउटिंगला कपल गेलंच तर त्या प्री-वेडिंग फोटोशूटचाही यात समावेश केला जातो. अर्थात कपलची जशी मागणी असेल तशी ती एव्हीआय तयार होते. एव्हीआयमध्ये फोटोंच्या स्लाइड शोबरोबरच रोमँट‌िक गाणी बॅकसाउंड देत असतात. या व्हिडिओमध्ये सर्व क्षण एका सिक्वेन्सने परफेक्ट बसवले जातात. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशिकमध्येही या एव्हीआय स्टाइलला कपल्सची पसंती वाढत आहे.

सोशल मीडियावर हिट

एव्हीआय व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला सोपी जाते. विशेष म्हणजे, सध्या लग्नपत्रिकादेखील प्री-वेडिंग फोटोशूट करीत एव्हीआयच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्या आप्तेष्टांना पाठविण्यात येते. एव्हीआयच्या रुपात लग्न समांरभास सोशल मीडियाचा नवा टच या माध्यमातून मिळत आहे. विवाहबद्ध जोडप्यांचे मित्र आणि नातेवाईक जर लग्नास आले नाहीत तर एव्हीआय त्यांना व्हॉटसअॅप करत लग्नाचा आनंद शेअर करता येतो. यामुळे एव्हीआय स्टाइल यंदाच्या लगीनघाईत हिट ठरत आहे.


अपडेटेड जनरेशनचा या एव्हीआय स्टाइल व्हिडिओकडे जास्त कल आहे. नाशिकमध्ये सुमारे ३० ते ५० टक्के कपल्स हा ट्रेंड फॉलो करत आहेत. हा ट्रेंड सध्या हिट होत असून रोमँटिक साँग व कपल्स साँग यासाठी वापरले जात आहेत. कपल्सला आपल्या आठवणी जपून ठेवायला आणि सोशल जगतात शेअर करायला आवडतात म्हणून याची मागणी सर्वाधिक आहे.

- यज्ञेश पोतदार, पोतदार लॅब, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याच्या दराबाबत मंगळवारी रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवून कांदा निर्यात बंद केली त्यामुळे कांद्याचे दर कोसळले होते. परिणामी येवला तालुक्यातील पुरणगाव येथील शेतकऱ्यांनी बाबासाहेब थेटे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव नेऊर येथील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर गेल्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमाव बंदीचा आदेश लागू असल्याने पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने हा रास्ता रोको रद्द करण्यात आला होता. मात्र आता या शेतकऱ्यांनी येत्या मंगळवारी (दि. ५) पुन्हा रस्त्यावर उतरत 'रास्ता रोको' करण्याचा इशारा दिला आहे.

कांद्यावरील निर्यातमूल्य केंद्र सरकारने त्वरित रद्द करावे यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी येवला तहसीलदारांना तालुक्यातील जळगाव नेऊर येथे रास्ता रोको करण्यासंदर्भात लेखी निवेदनही दिले होते. मात्र, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना समजावत जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश जारी असल्याने रास्ता रोको करू नका, असे सांगितले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा या शेतकऱ्यांनी कांद्याबाबत सरकारने न्याय न दिल्यास मंगळवारी (दि. ५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर व मंडल अधिकारी मंगेश धवन यांना देण्यात आले. सरकारने शेतकरी, शेतीमाल दराबाबत विरोधी धोरण स्वीकारल्यावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांद्याच्या निर्यातमुल्यात सरकारने हस्तक्षेप केला आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. या वेळी मच्छिंद्र ठोंबरे, सोपान ठोंबरे, माणिक ठोंबरे, वाळुबा सोनवणे, चिंधू वरे, प्रकाश शिंदे, लहानू मढवई, सर्जेराव सोनवणे, रावसाहेब घुले, सुरेश वाघ, ज्ञानदेव तिपायले, बंडू शिंदे, विजय जाधव, संदीप पगार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणमुक्त शहराचा सायकल रॅलीद्वारे संदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील द मॉडेल अकादमीच्या वतीने ग्रीन मालेगाव उपक्रमांतर्गत रविवारी (दि. ३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदूषणमुक्त मालेगाव शहर असावे या उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मान्यवर व कॉलेजियन तरुण-तरुणींनी यात उत्साहाने सहभाग घेतला.

द मॉडेल अकादमी या संस्थेच्या वतीने शहरातील मॉडेलिंग क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी रिअ‍ॅलिटी शोचे आयोजन करण्यात येत आहे. या शोच्या निमित्ताने सामाजिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे दिग्दर्शक समीर सोनी यांनी सांगितले. शहर पोलिस मुख्यालयापासून या सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार आसिफ शेख, महापौर रशीद शेख, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, मसगा कॉलेज उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम आदींसह शहरातील डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक यात सहभागी झाले होते. सुमारे ६० कॉलेजियन तरुण-तरुणी यात सामील झाल्या. यात मुन्ना सायकल शोरूमतर्फे सायकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रॅलीत पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला तसेच वृक्षारोपणदेखील करण्यात आले. भविष्यातदेखील शहराचे पर्यावरण सुरक्षित राहावे, यासाठी सायकलचा वापर करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन कामांचा शिक्षकांकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुरेशा तांत्रिक सुविधा, विजेची सोय नसतानाही ऑनलाइन कामांबाबत प्रशासनाकडून येत असलेल्या दबावाचा शिक्षकांनी निषेध केला आहे. ही कामे करणे शिक्षकांना शक्य नसून ऑनलाइन कामांवर बहिष्कार कायम असल्याची भूमिका जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मांडण्यात आली आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नदेखील अद्याप सोडविण्यात न आल्याने त्याविषयी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना समितीने निवेदन दिले आहे.

शिक्षणविषयक विविध प्रकारची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यास राज्यभर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक ऑफलाइन पद्धतीने काम करतील. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण आणू नये, असे समितीच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक प्राथमिक शाळांमध्ये वीजबिल थकीत झाल्याने पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सरकारने वीजबिलासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश शालेय कामे खासगी इंटरनेट कॅफेत जाऊन शिक्षकांना करावी लागत आहेत. यात शिक्षकांचा वेळ जात असून, आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ऑफलाइन पद्धतीने काम करण्याची मुभा देण्याची मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे आनंदा कांदळकर, आर. के. खैरनार, सुभाष अहिरे, केदराज कापडणीस, राहुल सोनवणे, राजेंद्र दिघे आदींनी केली आहे.

प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

वैद्यकीय बिले निकाली काढावीत, बीएड परवानगी मंजूर करावी, वेतन दरमहा पाच तारखेच्या आत व्हावे, आदिवासी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, सहाव्या आयोगातील फंडाचा चौथा व पाचवा हप्ता जमा करण्यात यावा, आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण त्वरित करावे, डीसीपीएस कपातीचा हिशेब देण्यात यावा, चटोपाध्याय वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करावी, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करावी, असे विविध प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीची पेरणी ७५ टक्के

$
0
0

मालेगाव तालुक्यात पेरणी अंतिम टप्प्यात; हरभरा, गहू लागवड जोमात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

यंदाच्या मोसमात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातदेखील पाण्याची उपलब्धता झाल्याने पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने ८ हजार ५१० हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, नोव्हेंबर अखेर ७५ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

येत्या १५ डिसेंबरपर्यंत रब्बी हंगामातील पेरणीची कामे पूर्ण होतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसाच्या वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र निसर्गाने मेहरबानी केल्याने वातावरण निवळले असून, शेतकरी पुन्हा कामाला लागले आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकांची पेरणी वेगाने सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत ३ हजार ८२९ हेक्टरवर गहू तर १ हजार ३१८ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील शेतांमध्ये पिक उतरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


मजुरांचा भासतोय तुटवडा

गहू, हरभरा पाठोपाठ ज्वारी, मका, तृणधान्य यांचीदेखील पेरणी तालुक्यात सर्वत्र सध्या सुरू झालेली आहे. यासोबतच उन्हाळी कांदा लागवडीलादेखील शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, लाल कांदा काढणी व उन्हाळी कांदा लागवड यामुळे ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र यामुळे मजुरांची मागणीही वाढली आहे. परिणामी मजूर मिळणे जिकरीचे झालेले आहे. त्यातच आता पेरणीचे दिवस असल्याने साधारणत: दीडशे ते दोनशे रुपये रोज देऊन त्यांना शेतात कामावर येण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर तालुक्यात काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने त्यांचा तुटवडा भासतोय, असे चित्र आहे.

थंडीचा पिकांना फायदा

यासोबतच गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना या थंडीचा फायदा होण्यासाठी तालुक्यात पेरणीला वेग आला आहे. या थंडीने रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे आता शेतकरी या हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सरसावला आहे. यंदाच्या मोसमात समाधानकारक पाऊस झालेला असल्याने शेत शिवारातील विहिरी भरल्या असून, रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमुराद हसवणारे ‘विच्छा माझी पुरी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचा कारभार कितीही सुरळीत सुरू असला तरी प्रधान, कोतवालासारखी पदाधिकारी मंडळी मलिदा खातेच. मात्र, यात खरा पहारेकरी कसा नाडला जातो आणि त्याच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होताना किती अडचणी येतात हे गमतीदार प्रसंगांतून दाखविणारे विनोदी नाटक म्हणजे ‘विच्छा माझी पुरी करा.’

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे झालेल्या नाट्य स्पर्धेत देवळाली गाव कामगार कल्याण केंद्राच्या वतीने रविवारी वसंत सबनीसलिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटक सादर करण्यात आले. हवालदाराला मैनावती नावाची तमासगिरीण भावलेली असते. तिच्यासोबत लग्न करायचे, असा निश्चय त्याने केलेला असतो. मात्र, कोतवाल झाल्याशिवाय लग्न करणार नाही असेही त्याच्या मनात असते. अशातच कोतवाल आजारी पडतो. मग हवालदाराला वाटते, यात कोतवाल स्वर्गवासी झाला तर ती जागा आपल्यालाच मिळणार म्हणून तो मैनावतीला तसे सांगतो. मात्र, अशा खोट्या भूलथापा हवालदार नेहमीच देतो म्हणून मैनावती नाराज असते. तितक्यात कोतवालाचा मृत्यू झाल्याची बातमी येते. मात्र, प्रधानाच्या मनात त्याच्या बायकोच्या भावाला कोतवाल करायचे असते. त्यामुळे हवालदाराच्या इच्छेवर पाणी फेरले जाते. मग तो मैनावतीला कोतवालाला मोहिनी घालायला लावतो. तिच्या जाळ्यात कोतवाल फसल्यावर काही तरी शक्कल काढून राजाच्या मनातून त्याला उतरवायचे, असे हवालदाराच्या मनी असते. मात्र, अशातच कोतवाल राजाच्या छपरी पलंग चोरीमध्ये सापडतो आणि राजा हवालदारावर खूश होऊन त्याचे मैनेशी लग्न लावून देतो. अशा प्रकारे हवालदाराची इच्छा पुरी होते, असा कथानक असलेले हे नाटक होते.

निर्मिती अक्षरा थिएटरची होती. निर्माता, दिग्दर्शक प्रदीप देवरे, मॅनेजमेंट व नेपथ्य शुभम दाणी, संगीत भूषण भावसार, प्रकाशयोजना किरण नायभावे, वेशभूषा रूपाली यांची होती. या नाटकात प्रदीप देवरे, महेश खैरनार, सायली निकम, राजेंद्र भालेराव, सायली, पूजा, सिमरण, कैलास पाटील, योगेश सूर्यवंशी, सुधाकर बोडके, राजेंद्र महाले यांनी भूमिका केल्या.

‘उंच माझा झोका गं’

पंचवटी : समाजात वावरताना स्त्रियांची अनेकदा कुचंबणा होत असते. अनेक स्त्रिया अनेक अत्याचारांना बळी पडत असतात. अशा स्त्रीने समाजाला आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांना विचारलेल्या प्रश्नांचे चित्रण दाखविण्याचे काम ‘उंच माझा झोका गं’ या नाटकातून करण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या ६५ व्या नाट्यमहोत्सवात शनिवारी (दि. २) रोजी या नाटकाचा प्रयोग झाला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जळगाव येथील पिंप्राळा भागातील कामगार कल्याण मंडळाने सादर केलेल्या या नाटकाचे कथासूत्र असेत ः सध्याचे युग प्रचंड धकाधकीचे, त्याचबरोबर अत्यंत गतिमान आणि फॉरवर्ड होत चालले आहे. विज्ञानाने रोजच नव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. त्याने भौतिक प्रगती होत असल्याचे जाणवत आहे. त्या प्रगतीत स्त्री व पुरुष दोघांचाही मोठा हातभार आहे. असे असले तरी स्त्री व पुरुष यांच्यात समानता फक्त म्हणण्यापुरती आहे. स्त्रियांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. अशाच अत्याचार झालेल्या दोन मैत्रिणींची गोष्ट या नाटकातून मांडली आहे. एक स्त्री शहरात तर दुसरी खेड्यात राहणारी आहे. त्यांची जीवनपद्धती वेगळी असली तरी दोघी एकाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आहेत. एकीवर रेल्वेत सामूहिक बलात्कार होतो, तर दुसरीचे नवऱ्याव्यतिरिक्त कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींकडून लैगिंक शोषण होत असते. या दोघी लहानपणच्या मैत्रिणी असून, त्यांच्या जीवनाच्या मध्यापर्यंतच्या आठवणी, कटू प्रसंग, अत्याचार झाल्यानंतर त्यांच्या भावभावनांचे चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे.

अमोल जाधव यांची प्रकाशयोजना, सचिन भावसार यांचे नेपथ्य, तर योगेश लांबोळे यांची वेशभूषा व रंगभूषा आहे. शुभम सपकाळे व रवी परदेशी यांनी पार्श्वसंगीत दिले, नितीन पाटील यांची निर्मिती आहे. नाटकात अमृता भावे, अश्विनी कोल्हे, मोनाली नेमाडे, योजना वाणी, मयुरी सोनवणे, नम्रता मेटकर, याशिका कोल्हे, दीपक पाटील, गणेश सोनार, पुरुषोत्तम शेवाळे, पराग सोनवणे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त दिगंबरा या हो...

$
0
0

टीम मटा

दत्त दिगंबरा या हो.. स्वामी मला भेट द्या हो… अशा आर्ततने दत्तचरणी लीन होत आणि श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात शहर, परिसरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांची जयंती रविवारी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाले. विविध मंदिरांत पहाटेपासूनच लागलेल्या रांगा रात्रीपर्यंत कायम असल्याचे दिसून आले.

---

एकमुखी दत्त मंदिरात रांगा

गोदाकाठावरील एकमुखी दत्त मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सुवासिक फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भाविकांना यावेळी लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सव्वासहाला मंदिरांमध्ये दत्तजन्माचा सोहळा पार पडला. एकमुखी दत्त मंदिरात १६ डिसेंबरपर्यंत धार्मिक कार्यक्रम सुरूच राहणार आहेत. त्यामध्ये दत्तयाग, श्री दत्त पूर्णाहुती, सत्यदत्त महापूजा व गोपालकाला यांसारखे कार्यक्रम होणार आहेत.

--

ठिकठिकाणच्या मंदिरांत चैतन्य

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदाही दत्त जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांमधील मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दत्त मंदिरांचा परिसर भक्तिरसाने भारून गेला होता. दत्त जयंतीपूर्वी सात दिवसांपासूनच अनेक ठिकाणी भाविकांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले होते. पूर्ण आठवडा गुरुचरित्र सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. घरोघरी आणि मंदिरांमध्येदेखील गुरुचरित्राचे पारायण सुरू होते. या पारायणाची रविवारी सांगता झाली. विविध मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक, अभंगवाणी यांसारखे कार्यक्रम सुरू होते. ठिकठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांना सुंठवड्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

--

मैफल अन् रक्तदान शिबिर

इंदिरानगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीतील दत्त मंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. जास्वंदी ग्रुप आणि बागेश्री वाद्यवृंदातर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पूजा घ्या आपुल्या चरणावर या श्री दत्तवंदनेने मैफलीला सुरुवात झाली. त्यानंतर गायिका मंजुळा ग्रामोपाध्याय, नीलिमा जोशी, मीना गटणे यांनी दत्त भजने सादर केली. येतील गुरुराजे, दत्ता श्री अवधुता, दत्त दिगंबर दैवत माझे, गुरुदत्त पाहिले कृष्णातीरी, आली हो पालखी स्वामींची अशी भावमधुर गीते यावेळी सादर करण्यात आली. दरम्यान, सिडकोतील त्रिमूर्ती चौकाजवळील दत्त मंदिर परिसरात नंदकिशोर शैक्षणिक ट्रस्ट आणि अर्पण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

---

नाशिकरोडला दत्तनामाचा जयघोष

नाशिकरोड ः परिसरात दत्तनामाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांद्वारे भक्तिमय वातावारणात दत्त जयंती सोहळा पार पडला.

नाशिक-पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकातील मंदिराबाहेर सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. येथे विविध धार्मिक विधी झाल्यानंतर दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. मुक्तिधाममधील मंदिरातही दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. मुक्तिधामच्या प्रवेशद्वाशेजारील दत्त मंदिरात व्यापारी बांधवांनी महाप्रसादाचे वाटप केले. जगताप मळ्यात एकमुखी दत्त मंदिरातही विविध कार्यक्रम झाले. सिन्नर फाटा, जेलरोड, मोटवानीरोड, पंचक येथील मंदिर, उपनगरची पाण्याची टाकी येथील दत्त मंदिरांतही भजन, कीर्तन, प्रसादवाटप व अन्य कार्यक्रम झाले.

--

देवळालीगावात महाप्रसाद

देवळालीगावातील सोमवार पेठ येथून ढोल-ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक नेण्यात आली. सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाप्रसाद वाटप झाले. विजयनाथ भोई, उषामाई चव्हाण, आमदार योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सूर्यकांत लवटे, शांतारामबापू कदम, रुंजा पाटोळे, प्रदीप देशमुख, बाळनाथ सरोदे आदी उपस्थित होते. राजेंद्र चव्हाण, रवींद्र चौधरी, संदीप आहेर, हेमंत चौधरी, दीपक बोराडे, मयूर चौधरी आदींनी संयोजन केले. देवळालीगावातील अवधून चिंतन समितीतर्फे सात दिवसांपासून हरिनाम सप्ताह सुरू होता. त्याअंतर्गत गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी पारायण झाले.

--

नवग्रह मंदिरात दत्तयाग

विहितगाव परिसरातील श्री अण्णा गणपती नवग्रह मंदिरात अण्णा गुरुजी यांच्या हस्ते पूजाविधी झाले. दुपारी बाराला महाभिषेकानंतर भाविकांना प्रसादवाटप, तर दुपारी तीननंतर दत्तयाग व भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सहाला गुरुदत्त जन्म सोहळा साजरा झाला. शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, रवींद्र सुर्वे, आशुतोष घाडगे, पंकज कवळी, अशोक वर्मा, सुधीर अंबावणे, विनय जोशी, अविनाश त्रिपाठी, नितीन भोजने, शेखर नायडू आदी उपस्थित होते.

--

कॅम्प, भगूरला पारायण

देवळाली कॅम्प ः देवळाली कॅम्प, भगूर परिसरातील दत्त मंदिरांत पूजा, अभिषेक करीत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्तनामाच्या जयघोषात ठिकठिकाणी प्रसाद व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. येथील खंडोबा टेकडीवर दत्त मंदिरात अण्णाज् टेंपल हिल ग्रुपतर्फे महाआरती, प्रसादवाटप करण्यात आले. येथील पोलिस ठाणे, भगूरची पोलिस चौकी व भगूर येथील दत्त मंदिरात गुरुचरित्र पठण व पारायण आणि सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आल्याची माहिती नगरसेवक मोहन करंजकर यांनी दिली. मशीद स्ट्रीटवरील दत्त मंदिरात देवराज गुप्ता यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. गवळीवाडा येथील दत्त मंदिर, मोरे बंगला, मेढे मळा, पाटील सदन, मेनरोड हनुमान मंदिरासमोर दत्त मंदिरात पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप करण्यात आले.

शिगवे बहुला येथे श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे दत्त पालखी व जयंती सप्ताह सोहळा झाला. त्यात येथील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रविवारी गावातून टाळ-मुदंगांच्या गजरात श्री दत्त महाराजांची पालखी काढण्यात आली. दुपारी आरती करून श्री दत्त जयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

--

पंचवटीत पालखी मिरवणूक

पंचवटी ः नांदूर येथे श्री दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. जयंत दिंडे, नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे आदी उपस्थित होते. बाजीराव दिंडे, राजेंद्र दिंडे, भारत दिंडे यांनी आयोजन केले. पंचवटीतील एरंडवाडी, पेठरोड, म्हसरूळ, हिरावाडी आदी भागात गुरुदेव दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा सुरू असून, त्याअंतर्गत रविवारी अभिषेक करण्यात आला. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, दत्त महिला भजनी मंडळाच्या दत्त कवण, भजन व भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. पेठ फाट्यावरील एरंडवाडी येथील दत्त सेवक मित्रमंडळातर्फे ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

--

सातपूरला विधिवत पूजन

सातपूर ः परिसरातील मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत काही वृक्षांखालील दत्त मंदिरे महापालिकेने नुकतीच हटविली. अशा ठिकाणी दत्तांच्या प्रतिमेते पूजन करण्यात आले. परिसरात पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. लहान मुलींसह महिला व टाळ-मृदंगांच्या गजरात वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. त्यामुळे परिसरात चैतन्य पसरले होते. दिवसभर मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली.

--

इंदिरानगरला सांस्कृतिक कार्यक्रम

इंदिरानगर ः येथील राजीव टाऊनशिप परिसरात दत्त देवस्थानतर्फे दत्तगुरूंच्या पादुकांची पालखी काढण्यात आली. द्वारकामाई साईबाबा मंदिरातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त देवस्थानतर्फे येथे विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला परिसरातून दत्तमूर्ती व पादुकांची पालखी काढण्यात आली होती. रविवारी मंदिरात दत्तयागाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. श्री साईबाबा मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले. बच्चेकंपनीने येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत म्हणून विविध वस्तूंचे संकलन मंडळातर्फे करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कमोद यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन हजार रिक्षा एका क्लिकवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या, सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेल्या तब्बल तीन हजार ७०० रिक्षाचालकांची माहिती पोलिसांनी संकलीत केली आहे. शहर पोलिसांच्या वेबसाइटवर हा डेटा संग्रही असून, यामुळे अनेक लक्ष्य साध्य होत असल्याची प्रतिक्रिया शहर वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

शहरात आजमितीस १५ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. त्यातील बोटावर मोजता येतील अशा १० टक्के रिक्षाचालकांमुळे उर्वरित ९० टक्के रिक्षाचालक बदनामीस समोरे जातात. नागरिकांची ओरड सुरू झाली की पोलिस तपासणी मोहीम हाती घेतात. यामुळे हातावर प्रपंच असलेले रिक्षाचालक मेटाकुटीस येतात. पोलिस आणि रिक्षाचालकांमधील वाद टोकाला पोहचल्याच्या अनेक घटना शहराने अनुभवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतूक नियम पाळणाऱ्या, सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांची नोंद घेण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेतले. आतापर्यंत तीन हजार ७०० रिक्षाचालकांची माहिती संग्रही करण्यात आली असून, ती शहर पोलिसांच्या http://nashikpolice.com/ या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे म्हणाले की, पोलिसांच्या तपासणीनंतर त्या रिक्षाला एक स्टिकर लावण्यात येते. एखाद्या दिवशी तपासणी मोहीम सुरू असताना स्टिकर लावण्यात आलेल्या रिक्षाचालकांना थांबवून त्यांचा वेळ वाया घालवला जात नाही. यापूर्वी सर्व नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना सतत तपासणीला सामोरे जावे लागत होते. अनेक रिक्षाचालक वर्षानुवर्षे इमानेइतबारे काम करतात. या व्यवसायावर त्यांनी नेटाने आपला प्रपंच केला. मुलांना उच्चशिक्षीत केले. आता ६० वर्षांनंतरही ते सेवा देत आहेत. अशा रिक्षाचालकांची कोठेतरी दखल घेणे आवश्यक होते, असे देवरे यांनी स्पष्ट केले. तपासणीअंती स्टिकर देण्यात आलेल्या रिक्षाचालकांची माहिती पोलिसांकडे आहे. त्यात रिक्षा क्रमांक, बॅच क्रमांक, मोबाइल क्रमांकापासून त्यांच्या घराचा पत्ता, परवान्याची माहिती आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी ‘थर्ड आय’ या अॅप्लिकेशनवर रिक्षा क्रमांक अथवा स्टिकर क्रमांक नमूद केला की, सर्व माहिती समोर येते. सुरक्षेच्या दृष्ट‌िकोनातून अशी माहिती संकलीत होणे आवश्यक होते, असे एसीपी देवरे यांनी सांगितले.

महिलांसाठीही सुरक्षित

रिक्षाचालकांसंबंधी सर्वाध‌िक ओरड महिलावर्गाची असते. या पार्श्वभूमीवर रिक्षांवर असलेले वाहतूक पोलिसांचे स्टिकर महत्त्वाचे ठरते. रिक्षावर स्टिकर असल्यास या रिक्षाचालकाची तसेच रिक्षाची सर्व माहिती पोलिसांकडे नमूद आहे, हे लक्षात घ्यावे. यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांच्या रोजगारात वाढ होऊ शकते. तसेच नागरिकांच्या मनातदेखील सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल.

रजिस्ट्रेशनसाठी अवघा १५ मिनीटांचा कालावधी लागतो. हळुहळू रिक्षाचालकांचा आकडा वाढत असून, रिक्षांना स्टिकर नसल्यास कारवाई करण्यास सोपे होते. कारवाईदरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेल्या रिक्षाचालकांचा वेळ वाया जात नाही.

- अजय देवरे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराचे स्वप्न साकारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हक्काचे आणि तेही आर्थिक फायदा देणारे घर शोधण्यासाठी ही वेळ योग्य आहे. नाशिक शहर पोलिसच नाही तर विभागातील पाच जिल्हे आणि जवळच्या ठाणेसह मुंबई पोलिसांना याचा फायदा होणार आहे. दोन दिवसांत पोलिस कुटुंबांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि घराचे स्वप्न साकारावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना हक्काचे घर घेता यावे, यासाठी शहर पोलिस आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ३) सकाळी या प्रदर्शनाचे उदघाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विन‌िता सिंगल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सिंगल बोलत होते. पोलिस दलात सतत होणाऱ्या बदल्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यात बहुतांश कर्मचाऱ्यांना सेवाकाळात आपल्या घराचे स्वप्न साकारता येत नाही. निवृत्त झाल्यानंतर हे काम आणखीच कठीण ठरते. या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील बरॅक क्रमांक १७ मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. काल सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा आज समारोप होणार आहे. यावेळी प्रदर्शनाचे फायदे पोलिस आयुक्तांनी उपस्थितांना समजावून सांगितले. अगदी साडेनऊ लाखांपासून प्रदर्शनात घरे उपलब्ध होणार आहे. कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी बल्क बुकिंग केल्यास बिल्डर्सकडून मोठी आर्थिक सवलत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देखील जवळपास पावणेतीन लाख रुपये सवलत मिळणार आहे. सर्वार्थाने हा फायदा असून, सर्व पोलिसांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंगल यांनी केले. दरम्यान, या प्रदर्शनात शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी साकारलेल्या ५० पेक्षा अधिक गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष बांधकाम पाहण्याचीही व्यवस्था उपलब्ध असून, गृहकर्ज तसेच इतर सर्व माहिती प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी दिली. यावेळी एचडीएफसी बँकेचे संदीप कुलकर्णी, उमेश वानखेडे, अनिल आहेर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी केले, तर आभार माधुरी कांगणे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा जणांना कुत्र्याचा चावा

$
0
0

मनमाड : सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच नांदगाव शहरात कुत्र्याने धुमाकूळ घालत रविवारी (दि. ३) पहाटे ५ वाजेपासून १० जणांना चावा घेतला आहे.

यामध्ये राहुल पवार, आनंदा दाभाडे, केवलबाई पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून, इतरही जखमी आहेत. राहुल पवार (१४), नीलेश वानखेडे (२७), आनंदा दाभाडे (६०), पुष्पा नागरे (४०), केवलबाई पाटील (६५), सारिका गुटेकर (३०), शीला पवार (३२), राजू थोरात (३५), प्रकाश जाधव (३०) आदींचा जखमीत समावेश आहे. चावा घेतलेले रुग्ण मल्हारवाडी, गांधीनगर, आनंद नगर, आंबेडकर नगर, रेल्वे गेट परिसरातील आहेत. तर १ तरुण पिंप्राळचा आहेे. तरी प्रशासनाने या कुत्र्याला पकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमधील २२ ‘भाईं’ना हलविणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड जेलमधील २२ स्थानिक कुख्यात कैद्यांना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयापुढे तसा प्रस्ताव देण्यात आला असून, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या भाईंची रवानगी अन्य कारागृहात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. पुढाऱ्यांच्या मदतीने जेलमधून सुटका करून घेण्याआधीच या गुंडांना अन्यत्र हलवून त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत.

कारागृह प्रशासनाने कारागृहातील स्थानिक २२ कुख्यात भाईंची नावे कोर्टाला सादर केलेली आहेत. त्यातील दोघांना शिक्षा झाली आहे. उर्वरित वीस भाई सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाची हवा खात आहेत. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेले हे भाई कारागृहात असूनही हस्तकांकरवी हप्तावसुली व गुंडगिरी करतात. कारागृहाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर या भाईंनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेलाही या भाईंमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने कोर्टासमोर स्थानिक गुन्हेगारांच्या स्थलांतराचा प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

इतर कैद्यांना संदेश

या माध्यमातून इतर कैद्यांनाही सुधारण्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे. राजकीय वरदहस्त असलेले कैदी जेलमध्ये मनाप्रमाणे सोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेल प्रशासनाने दबाव झुगारुन त्यांना वठणीवर आणले आहे. शिक्षा भोगत असणारे स्थानिक कुख्यात कैदी आणि खटले सुरू असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कच्चे कैदी इतर ठिकाणी स्थलांतरित केल्यास त्यांचे हस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नांदेड, नागपूर, वर्धा, अमरावती, जालना सातारा, सांगली आदी ठिकाणी या आधी येथील कैद्यांना स्थलांतरित करण्यात आले होते.

गुन्हेगारीला आळा?

या कैद्यांना स्थलांतरित केल्यास शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येईल. स्थानिक हप्ते वसुलीला आळा बसेल, असा कयास आहे. कारागृहात काही महिन्यांपूर्वी कैद्यांकडे मोबाइल सापडण्याचे प्रकार वाढले होते. तसेच कैद्यांच्या हाणामाऱ्याही होत होत्या. प्रशासनाने आपल्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करत काही कैद्यांना तळोजा व येरवडा कारागृहात हलविले होते. प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळेच कैद्यांकडे मोबाइल सापडणे, हाणामारी, कैदी पलायन आदी घटनांना आळा बसलेला आहे.

..यांना हलविणार

जेलच्या सूत्रांनी सांगितले की, नाशिकरोड जेलमध्ये कुख्यात टिप्पर गँगचा समीर पठाण, राकेश कोष्टी, व्यंटकेश मोरे, गणेश चांगले, गण्या कावळे, कुंदन परदेशी, शाम महाजन या सराईत गुन्हेगारांसह खून, खंडणी प्रकरणाताली भाई आहेत. यातील बहुतेकांना राजकीय समर्थन मिळत असल्याने ते जेलचे नियम तोडू पाहत आहेत. त्यामुळे इतर कैद्यांवरही वचक राहत नाही. बेशिस्तीचे वातावरण तयार होते. म्हणून अशा भाईंना अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भाईंमुळे शहरातही गुन्हेगारी, हाणामारी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शहर पोलिसांचीही त्यांना अन्यत्र हलविण्यास पाठिंबा आहे.

नाशिकरोड जेलमध्ये कच्च्या कैद्यांना कोर्टात ने-आण करण्यासाठी ७० पोलिस आहेत. जेलमध्ये ३३०० कैदी आहेत. सहा कैद्यांमागे एक सुरक्षा कर्मचारी असावा, असे शासनाचे पत्रक आहे. जेलमध्ये फक्त १९० कर्मचारी आहेत. त्यातच नामचीन गुंडांमुळे जेलची सुरक्षा, शिस्त धोक्यात आली असून, कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांना हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजवा कालवा बेपत्ता!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर अतिक्रमणांचा सिलसिला सुरू आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिकांसह अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. मात्र, जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या बाजूने जाणाऱ्या गंगापूर धरणाचा उजवा कालवा अचानक गायब झाला आहे. या कालव्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी हजारो एकर शेतजमिनी दिल्या होत्या. मात्र, शेतजमिनीही दिसेना आणि कालवाही गायब झाला आहे. या कालव्याच्या जागेवरच जलवाहिनी नेण्यात आली. तीही दिसेनाशी झाली आहे. तब्बल २३ किलोमीटरचा शहरातील हा उजवा कालवा नक्की गेला कुठे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. याकडे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीच लक्ष वेधावे, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

गंगापूर धरणाची उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, याकरिता उजवा व डावा कालवा काढण्यात आला होता. कालांतराने महापालिकेची स्थापना झाल्यावर शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढली. यामुळे शेतजमिनींच्या जागेवर लोकवस्ती उभी राहिल्याने उजवा कालवा जलसिंचन विभागाने बंद केला. यानंतर महापालिकेने बंद असलेल्या कालव्यावर गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याची अभिनव योजना तयार केली. जलसिंचन विभागानेदेखील महापालिकेच्या थेट पाइपलाइनसाठी बंद असलेल्या उजव्या कालव्याची जागा दिली होती. मात्र, यात महापालिका व जलसिंचन विभागाकडे संबंधित जागेची सुरक्षा राखण्याची जबाबदारी होती. शहराच्या वाढत्या लोकवस्तीत कालव्याकडे महापालिका व जलसिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणांचे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून कालव्यावर रोजच अतिक्रमण केले जात असल्याचे चित्र आहे. याकडे महापालिका व जलसिंचन विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शहरातून जाणारा कालवा गायब झाला कसा, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या मागून जाणारा कालवा अचानक गायब झाल्याने महापालिका व जलसिंचन विभागाने नेमकी काय कारवाई केली, असाही प्रश्न उभा राहतो. केवळ कागदी घोडे नाचवत महापालिका व जलसिंचन विभाग आपले काम करीत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून आर्थिक देवाणघेवाण करून शासकीय अधिकारी हात झटकत असल्याचा आरोपही आता होत आहे. २३ किलोमीटर असलेल्या कालव्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे झाली असल्याने तो गायब झाल्याचे चित्र आहे. मात्र, आजही ब्रिटिशकालीन भिंती उभ्या असल्याने कालव्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध करतात. सरकारकडून मात्र कालव्याला वाचविण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना आखली जात नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या रोजच वाढत चालली आहे.

पाइपलाइनही गायब!

महापालिकेला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्याची जागा देण्यात आली होती. मात्र, थेट पाइपलाइन योजनेत केवळ काही ठिकाणीच पाइपलाइन दिसत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने कालव्याबरोबरच आता पाइपलाइनही गायब झाल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images