Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिडकोत स्वच्छतागृहांची वानवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात अनेक दिवसांपासून स्वच्छतागृहांची कमतरता असतानाच त्रिमूर्ती चौक व सावतानगर येथील स्वच्छतागृहे तोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना गैरसोय सहन करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे जाणाऱ्या नाशिकचाच एक भाग असलेल्या सिडकोत किमान ही सुविधा तरी महापालिकेने तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सिडको परिसरात सध्या शिवाजी चौक येथील भाजी मार्केटमध्ये महापालिकेने सुलभ शौचालय उभारले आहे. त्याव्यतिरिक्‍त उत्तमनगर येथे एक स्वच्छतागृह असून, पवननगर येथे एक सुलभ शौचालय आहे. पवननगर ते उंटवाडीपर्यंत म्हणजे जवळपास संपूर्ण सिडकोत एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते. यापूर्वी सावतानगर येथे खासगी जागेत एक स्वच्छतागृह होते. परंतु, या जागेवर नव्याने इमारत उभी राहत असल्याने हे स्वच्छतागृह पाडण्यात आले. त्याचप्रमाणे त्रिमूर्ती चौकातील भाजी मार्केटजवळसुद्धा स्वच्छतागृह होते. परंतु, तेदेखील काही दिवसांपूर्वी पाडण्यात आले. त्यामुळे आता या भागात स्वच्छतागृहच राहिले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अनेकांना अक्षरशः खुल्या जागेचा वापर करावा लागत आहे. सिडको प्रशासनाने सिडकोच्या कोणत्याही जागेवर स्वच्छतागृह उभारलेले दिसत नसल्याने सिडकोत स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत आहे. येथे पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांचीदेखील कुचंबणा होत अाहे. त्यामुळे महापालिका व सिडकोने तातडीने या भागात पुरेशा स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी हेात आहे.

--

राखीव भूखंडच नाही

नाशिक शहराची स्मार्ट सिटीत गणना झालेली असताना सिडकोतील साधी स्वच्छतागृहांची समस्या अद्याप सुटलेली दिसत नाही. त्यामुळे हे शहर स्मार्ट सिटीत कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडको प्रशासनाने महापालिकेकडे सर्व योजना हस्तांतर केल्या असल्या, तरी एकही भूखंड स्वच्छतागृहासाठी राखीव नसल्याचे समजते. सिडकोत दाट वस्ती झालेली असल्याने आता कोणत्‍याही ठिकाणी स्वच्छतागृह उभारताना नागरिकांचा विरोध होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.

--

भाजीविक्रेत्यांकडून साकडे

सिडकोतील त्रिमूर्ती चौक भागात असलेल्या भाजीविक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी परिसरातील भाजीविक्रेत्यांनी केली आहे. सिडकोने भाजीविक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून गाळे बांधून दिले असले, तरी त्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने ते उभारून द्यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना भाजीविक्रेत्यांनी दिले. यावेळी शीतल जाधव, अलका जाधव, कुसुम चव्हाण, मालती भावसार, कविता मोंढे, सुनीता गायकवाड, अनिता आहेर, प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक भाजीविक्रेते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नार-पार’च्या आराखड्यात बदल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नार-पार प्रकल्पाचा २०११ मधील आराखडा आणि नव्याने तयार केलेला आराखडा यात बदल आहेत. बदललेल्या आराखड्यात चणकापूर धरणापासून निघणारा प्रस्तावित डावा कालवा व उजवा कालव्याचे विस्तारीकरण रद्द करण्यात आले. यामुळे मालेगावसह कळवण, सटाणा या भागावर अन्याय होत आहे. या भागाला त्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत नागपूर अधिवेशनादरम्यान बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नार-पार प्रकल्पासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी भुसे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीत काँग्रेस आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण, शांताराम लाठर, बाळासाहेब शिरसाठ, रिपाइंचे दिलीप आहेर, दीपक निकम, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, मनोहर बच्छाव, रामा मिस्तरी, संजय दुसाने आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी भुसे यांनी नार-पार प्रकल्पाचा पूर्वीचा आराखडा व बदलेला आराखडा याबाबत नकाशाद्वारे प्रेझेन्टेशन दिले. बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बैठकीस उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्नांचे निरसन करण्यात आले. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण, काँग्रेस आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, शांताराम लाठर यांनी देखील गिरणा खोऱ्यास हक्काचे पाणी मिळावे यासाठी लढ्यात सहभागी असल्याची ग्वाही दिली.

भाजपची अनुपस्थिती?

गेल्या काही दिवसांपासून नार-पार प्रकल्पावरून भाजप व शिवसेनेत श्रेयवाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दादा भुसे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस भाजपच्या वतीने एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. या बैठकीबाबत भाजपला देखील आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नार-पारच्या प्रश्नी भुसे यांनी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला, तरी मालेगावी पार पडलेल्या बैठकीत भाजपची अनुपस्थीतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लाबोल मोर्चातून सरकारचा निषेध

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, युवकचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विष्णू अत्रे, डी. डी. गोर्डे, मेघा दराडे, आफरीन सैय्यद, निलीमा थोरात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावातील मोबाइल टॉवर पालिकेच्या रडारवर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील बेकायदेशीर मोबाइल टॉवरची चौकशी करून नोटिसा बाजावण्याचे आदेश येथील स्थायी समिती सभापती सलीम अन्वर यांनी दिले. महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक सभापती सलीम अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस डॉ. खालिद परवेज शेख, सुवर्णा शेलार, राजाराम जाधव, पुष्पा गंगावणे आदी स्थायी सदस्य उपस्थित होते.

शहरात विविध मोबाइल कंपन्यांच्या ८० टॉवरपैकी फक्त १४ टॉवरसाठी संबंधित कंपण्यांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे. तर ६६ टॉवर बेकायदेशीर आहेत. ज्या जागांवर टॉवर उभे आहेत, त्या मिळकत धारकांना वाणिज्य घरपट्टी अकारली जाते का? असा सवाल अन्वर यांनी केला.अनेक मिळकत धारकांची घरपट्टी थकीत असल्याचेही समोर आले. सर्व मिळकत धारकांसह टॉवरची चौकशी करून सविस्तर अहवाल पुढील स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात यावा. बेकायदा टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजवाव्यात, असे आदेश स्था अन्वर यांनी दिले. शहराची स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न विचारात घेता कंत्राटी पद्धतीने मजूर घेण्याच्या प्रस्ताव तहकूब करण्यात आला. ज्या ठेकेदारांच्या अनामत रकमा जप्त आहेत, त्या ठेकेदारांना रक्कम परत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांची नावे यादीतून कमी करण्याच्या प्रस्ताव तहकूब करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना त्याच दिवशी मिळणार मोबदल्याचा चेक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

नोटबंदीची तीव्रता आता कमी झाली असून, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचा मोबदला देताना व्यापाऱ्यांनी त्याच दिवसाचा धनादेश द्यावा, अन्यथा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी फारवेळ वाट पहावी लागणार नाही.

उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी, संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची ३० नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या कार्यालयात बैठक दि. आयोजित करण्यात आली होती. यावेळी करे बोलत होते. उमराणा बाजार समितीमधल्या काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे देणे थकवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अचानक जिल्हा उपनिबंधक करे यांनी उमराणा बाजार समितीला भेट दिली. ज्या शेतकऱ्यांचे शेतमाल विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले आहेत त्या व्यापाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची सर्व देणी चुकती करावीत, असेही निर्देश करे यांनी दिले. उमराणा बाजार समितीची नव्याने स्थापन झालेली असल्याने प्रशासन व्यवस्थेबाबत करे यांनी मार्गदर्शन केले. उमराणा बाजार समितीमध्ये शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी पं. स. सदस्य धर्मा अण्णा देवरे यांनी केली. यावेळी सभापती राजेंद्र देवरे, सहाय्यक निबंधक संजय गीते, संचालक विलास देवरे, महेंद्र आहेर, संचालक मिलिंद शेवाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८५ झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काचे घरकुल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाळदे शिवारातील प्रकल्पातून १८५ लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात येणार असल्याची महिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

या प्रकल्पाअंतर्गत लाभार्थ्यांचे स्थलांतरण करण्याबाबत आयुक्त धायगुडे यांच्यासह, आमदार आसिफ शेख, महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, शहर अभियंता सचिन मालवळ, कैलास बच्छाव, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, मक्तेदार आदींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष घरकुल योजनेच्या प्रकल्पास भेट देण्यात आली.

लाभार्थींना घरकुल देण्यापूर्वी शाळा, दवाखाना, भाजी बाजार, वाहतूक व्यवस्था यांसारख्या अत्यावश्यक सोई सुविधा कशाप्रकारे देता येतील, याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी पहिल्या टप्प्यातील १८५ लाभार्थ्यांना घरकुल देण्याबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

चार टप्प्यांत होणार वाटप

म्हाळदे शिवारात सुरू असलेल्या योजनेतून शहरातील १९९५ पूर्वीच्या विविध १७ झोपडपट्टीधारकांना ११ हजार घरकुल मिळणार आहेत. यातील ७ हजार घरांची निर्मिती जवळपास पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत घरकुलचा लाभ मिळण्यासाठी ९०९ लाभार्थ्यांनी शुल्क भरले आहे. पहिल्या टप्प्यात १८५ लाभार्थींना आपल्या हक्काचे घर लवकरच मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीच्या पेरण्या मंदावल्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळयात घसरलेले पर्जन्यमान, परतीच्या पावसाने दिलेला दगा अन् त्यातून शेतशिवारातील विहिरींमधील खालावलेला जलस्त्रोत यामुळे येवला तालुक्यात रब्बी हंगामातील पांभरीची गती मंदावली आहे. गत व यंदाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत तालुक्यात झालेल्या रब्बीच्या पेरण्यांवर नजर टाकली असता यंदा रब्बीच्या पेरणीचा आलेख हा ११ टक्क्यांनी घसरल्याचे दिसत आहे.

आजवरच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे ‘अवर्षणप्रवणग्रस्त’ अर्थातच दुष्काळी तालुका अशी ओळख निर्माण झालेल्या येवला तालुक्याची खरीप तसेच त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामातील कथा अन् शेतकऱ्यांची व्यथा न विचारता येण्यासारखीच. तीन वर्षांच्या भीषण टंचाईची दाहकता सोसताना गेल्या वर्षी तालुक्याच्या झोळीत पावसाचे बऱ्यापैकी दान पडल्याने खरीप अन् रब्बीचा रान फुलण्यास मदत झाली होती. गेल्या वर्षी तालुक्यात २८ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ५५ टक्क्यांपेक्षा अधिक रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदाच्या पावसाळ्यात मात्र गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात पावसाचा आलेख खाली आला. रब्बीसाठी आवश्यक असलेले पाणी म्हणावे तसे हाताशी नसल्यानेच तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अदयापही पेरणीची पांभर आपल्या खळ्यातून बाहेर काढली नाही. यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात केवळ ४४ टक्केच रब्बीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

पालखेडच्या आवर्तनाकडे नजरा

येवला तालुक्याचा पश्चिम-दक्षिण पट्ट्यातील पालखेड डावा कालव्याचा किरकोळ अपवाद वगळता तालुक्याचा उर्वरित उत्तर व पूर्व भाग अन् त्यातील असंख्य गावे म्हणजे पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला भाग. पावसाचे दान व त्यावर अवलंबून असलेला विहिरींचा जलस्त्रोत यातूनच या भागाचे शेतीचक्र फिरणारे. याच उत्तरपूर्व भागात यंदा म्हणावी तशी वरुणकृपा न झाल्याने विहिरींना जेमतेम पाणी आहे. उपलब्ध पाण्यावरच या भागातील शेतकऱ्यांनी रब्बीचा जुगार खेळला आहे. त्यामुळे पालखेड लाभक्षेत्रातील गावांच्या नजरा पालखेडच्या पाण्याकडे लागल्या आहेत. पालकमंत्र्यांनी येवला तालुक्यासाठी पालखेडची दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले आवर्तन कधी मिळते व मिळणाऱ्या या आवर्तनातून नेमके किती प्रमाणात पाणी शेतशिवारातील वाफ्यांमध्ये फिरते, यावरच या भागातील रब्बी हंगाम अवलंबून आहे.




अशी झाली पेरणी

रब्बीचे एकूण क्षेत्र- १३ हजार ४८६ हेक्टर.

त्यापैकी ५ हजार ८७२ क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

तालुक्यात आतापर्यंत रब्बीची ४४ टक्के पेरणी पूर्ण.

गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पेरण्या कमी

३३० हेक्टरवर रब्बी ज्वारी

२३३७ हेक्टरवर गहू

३२०२ हेक्टरवर हरभरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकन्यायालय प्रभावी संकल्पना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सद्यस्थितीत दहा लाख नागरिकांच्या मागे एकच न्यायाधीश असल्याने न्यायदानाला विलंब होतो. यासाठी लोकन्यायालय ही संकल्पना प्रभावी आहे. लोकन्यायालयाबाबत अधिक लोकजागृती होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले.

निफाड तालुका विधीसेवा समिती दिवानी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव (ब) वकिल संघ व ग्रामपालिका ओझर यांच्यातर्फे आयोजित लोकन्यायालय जनजागृती शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर पिपळगाव कोर्टाचे न्या. माणिकराव सातव, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुके, न्या. मोहबे, आमदार अनिल कदम, अॅड. दत्तात्रय लोंढे, उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, पिंपळगाव वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. जनार्दन देवरे आदी उपस्थित होते.

आमदार कदम म्हणाले, की लोकन्यायलय ही संकल्पना महत्त्वाकांक्षी आहे. नागरिकांनी या संकल्पनेला प्रतिसाद द्यावा. यावेळी अॅड. शामराव पगार यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमास ओझर ग्रामपालिकेच्या सरपंच जान्हवी कदम, निफाडच्या दिवानी न्यायाधीश रेणुका सातव, न्या. संग्राम काळे, न्या. दिनेश एंडाईत, न्या. पांडुरंग घुले, न्या. श्रीधर ढेकळे, न्या. मृदुला कोचर, न्या. पवन तापडिया, न्या. डी. एस. जाधव, न्या. विक्रम आव्हाड, न्या. स्वरा पारखे, न्या. प्रेरणा दांडेकर, न्या. स्वाती फुलबांदे, सरकारी वकील आबिद तडवी, प्रा. मनीष सोनवणे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी एन. के. चव्हाण, ओझरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैशाली भदाणे आदी उपस्थित होते. अॅड. भूषण जाजू आणि अॅड. सुभाष शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

समाज कर्तृत्वाची जाणीव हवी

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्या. शिंदे म्हणाले, की लोकन्यायालय संकल्पनेला उभ्या महाराष्ट्रात मागील वेळेस नाशिकला सर्वाधिक मोठे यश मिळाले. पाश्चिमात्य देशात जलद गतीने न्याय मिळतो. मात्र, आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या अतिशय कमी असल्याने न्यायप्रक्रियेस विलंब होतो. जन्माला येताच प्रत्येक नागरिकाला नैसर्गिकरीत्या हक्क मिळतात. जशी सहकार आणि शासकीय देणी प्रत्येकाला द्यावी लागतात तशीच समाजाची सुद्धा काही देणी असतात. समाजाच्या कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यू-ट्यूबवर घेतले एटीएम फोडण्याचे ‘मार्गदर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी सर्वसाधारण कुटुंबातील दोघा उच्चशिक्षित तरुणांनी यू-ट्यूबवर एटीएम फोडण्याची माहिती घेत तसा प्रयत्न केला. मात्र, तरुणाचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत दोघांना बेड्या ठोकल्या.

सटाणा येथील एटीएम फोडून २३ लाख रुपयांची लूट होण्याच्या घटनेत काही तास उलटत नाही, तोच शहरात ही घटना घडल्याने एटीएम सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. किरण रघूनाथ मोरे (२२, रा. कृष्णा हाईटस, शिवगंगानगर, दिंडोरीरोड) आणि अमित साहेबराव गवई (२४, रा. श्याम अपा. पीएनटी कॉलनी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. कोर्टाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी शुक्रवारी पहाटे पाऊणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील कुलकर्णी गार्डनलगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारण कुटूंबातील आणि उच्चशिक्षित असलेल्या संशयितांनी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात यू-ट्यूबवर एटीएम कसे फोडतात, याची माहिती घेतली. त्यानुसार बाजारातून छन्नी, कटावणी, हातोडा असे साहित्य खरेदी केले. गुरूवारी (दि. ३०) रात्री रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्यानंतर दोघेही एका पल्सरवर बाहेर पडले. संशयितांनी त्यांच्या दुचाकीची नंबर प्लेटही झाकून टाकली होती. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे एटीएम केंद्रावर गेले. पाहण्यासाठी कोणीही नाही, असे वाटून त्यांनी एटीएम फोडण्यास सुरुवात केली. पहाटेच्या शांततेत होणारा आवाज ऐकून जागरुक नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षास माहिती दिली. सरकारवाडा पोलिसांचे गस्ती पथक पाऊणेपाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. एटीएम फोडण्याच्या कामात गर्क असलेल्या दोघांना पोलिस आल्याची चाहूल लागली. दोघांपैकी एकाने पंडित कॉलनीच्या दिशेने धूम ठोकली. दुसरा पोलिसांच्या हाती लागला. पळ काढलेल्या संशयितास पंधरा मिनिटात अटक करण्यात आली. संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३९३, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अधिक तपास पीएसआय अनिल बागूल करीत आहे.

संशयित आरोपींनी यू-ट्यूबवर एटीएम मशिन कसे फोडायचे याची माहिती मिळावल्याचे पुढे येते आहे. दोघेही सुशिक्षित असून, खासगी ठिकाणी कामही करतात. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याचा शोध घेतला जाईल. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात नऊ गोवंशांची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरालगतच्या कंधाणे फाट्याजवळून पिक अप वाहनात कोंबून मालेगाव येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या आठ गायी आणि एका गोऱ्ह्याची सटाणा शहरात सुटका करण्यात आली. या प्रकरणी ‌तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

इस्तीयाद अहमद मुस्ताकी (रा. मुस्लिमनगर, मालेगाव), वसीम अहमद तडवी (रा. मालेगाव) आणि सलीम शेख (रा. आझादनगर, मालेगास) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहे. त्याच्याविरोधात सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कळवणहून सटाणा मार्गे मालेगाव येथे कत्तलीसाठी गायींनी भरलेली पिकअप गाडी जात असल्याची माहिती शहरातील काही तरुणांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी आठ-दहा युवक कंधाणे फाट्याजवळ दबा धरून बसले. त्यांनी येणारी एक पिकअप (एमएच १६ जी ८९२४) थांबविली. पिकअपमधील तिघांपैकी दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, चालक तरुणांच्या हाती लागला. त्याने गाडीत गायी असल्याची कबुली देताच संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करी पिकअपमधील आठ गायी आणि गोऱ्ह्याची सुटका केली. या घटनेची माहिती शहरात पसरताच शेकडोंचा जमाव घटनास्थळी दाखल झाला. पिकअपची तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील याच्यासह १५ ते २० पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

‘एसआरपी’ची तुकडी दाखल

गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीचालकाला बेदम चोप देण्यासह पिकअपची तोडफोड आणि आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सटाणा पोलिसांनी वेळीच जमावाला पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राज्य राखीव दलाची (एसआरपी) तुकडी सटाण्यात मागविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर रोखण्यासाठी मुख तपासणी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात मुख स्वास्थ तपासणी मोहीम म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील ३० वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून, शनिवारी (दि. २) मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

मुख स्वास्थ्य जीवनाचे गमक आहे. भारतात मुख कर्करोग हा प्राधान्याने आढळून येतो. पूर्वावस्थेत मुख कर्करोग ओळखला गेला तर त्यापासून वाचता येते. तंबाखूसह गुटखा, मशेरी सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच ३० वर्षांवरील व्यक्तींची मुख स्वास्थ तपासणी महत्त्वाची आहे. या अनुषंगाने संपूर्ण डिसेंबर महिन्यात तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, इतर खासगी संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय व्यावसायिक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ २ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून जनजागृतीसाठी विविध सरकारी कार्यालये, आशा सेविका यांचीही मदत घेतली जाते आहे.

याबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे दंतचिकित्सक तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दिनेश अशोक ढोले यांनी सांगितले, की ग्रामीणसह शहरी भागात गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांचे वय अगदी १४ वर्षांपासून सुरू होते. त्यामुळे या मोहिमेत अशा तरुणांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. आशा सेविकांना जनजागृतीसह तपासणी कार्यात सहभागी करून घेतले जाणार असल्याने त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील अधिकाधिक लोकसंख्या समावून घेता येईल यासाठी प्रयत्न असून, कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्या पेशंटवर उपचार सुरू करण्यात येतील, असे डॉ. ढोले यांनी स्पष्ट केले. संशयित पेशंट्सवर संदर्भासह टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्येही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सायखेडा (ता. निफाड) येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या तीन व्यक्तींवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. मटकाचालक फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायखेडा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती विशेष ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार, या विशेष पथकाने धाड टाकली. जुगार खेळणारे भाऊलाल नारायण मर्कड (रा. सायखेडा), राजू रियाज शेख (रा. चाटोरी) आणि चंद्रकांत रामभाऊ निकम (रा. ओढा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार ७० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. यावेळी मटकाचालक मतीन पटेल (रा. चाटोरी) हा पोलिस येण्यापूर्वीच पळून जाण्यात यशस्वी झाला.

सायखेडा येथेच गंगानगर भागातही जुन्या मंदिराच्या बाजूला धाड टाकून येथे मटका खेळणारे युनूस गफूर शेख (रा. सायखेडा), रवींद्र शिवाजी सोनवणे (रा. लासलगाव), पोपट लहानु मर्कड (रा. सायखेडा) यांना ६ हजार ३६० रुपये व जुगाराच्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. अर्जुन आढाव (रा. सायखेडा) याचा हा जुगार अड्डा असल्याचे समजते.

सायखेडा येथे पोलिस स्टेशन आहे तरीही जुगार अड्डे राजरोसपणे सुरू असल्याने कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेला हे माहीत नव्हते याचा ‘अर्थ’ काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पोलिसांच्या विशेष पोलिस पथकाला ही कारवाई करायची वेळ येते. शिवाय या पोलिसांनाही मटका खेळणारे सापडतात आणि अड्डा चालवणारे पळून जातात हा प्रकारही कारवाईच्या बाबतीत संशयास्पद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर पोलिसांसाठी उद्यापासून शेल्टर प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना हक्काचे घर घेता यावे यासाठी शहर पोलिस आणि क्रेडाई यांच्यातर्फे शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या रविवारी (दि. ३) हस्ते होणार आहे.

पोलिस दलात होणाऱ्या बदल्या आणि कमी आर्थिक स्त्रोतांमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांना सेवाकाळात आपल्या घराचे स्वप्न साकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सिंगल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिस मुख्यालयातील बॅरक क्रमांक १७ मध्ये ३ आणि ४ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्‍घाटन सोहळा रविवारी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सचिव उमेश वानखेडे, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात शहरातील १५ नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी साकारलेल्या ५० गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष बांधकाम पाहण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गृहकर्ज तसेच इतर सर्व माहिती प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली असून, परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेगण शिवारात संशयास्पद वाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यातच गरूवारी (दि. ३० नोव्हेंबर) मध्यरात्री एक संशयास्पद चार चाकी वाहन या ठिकाणी आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली असून, लवकरच मृतदेहाची ओळख पटवण्यात यश येईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

आंबेगण शिवारातच २७ नोव्हेंबर रोजी एका १६ ते १८ वयोगटातील मुलीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने मुलीची निर्घुण हत्या केली. चेहऱ्याची ओळख पटू नये याची काळजी आरोपीने घेतली. यानंतर सदर मृतदेहाचे हातपाय बांधून तो एका गोणीत टाकला. या गोणीत दगड भरून तो आंबेगण शिवारातील पाझर तलावत टाकून दिला. साधारणतः तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची गोणी तरंगतवर आली. त्यानंतर खूनाच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे. घटनेच्या चार दिवसांनंतरही मृतदेहाची ओळख पटली नसून, मारेकरी मोकाट आहेत. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एक संशयित वाहन सदर परिसरात येऊन गेल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली आहे. एवढ्या रात्री सदर चारचाकी वाहन या ठिकाणी का होते, याचे उलगडा पोलिसांना झालेला नाही. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की एका चारचाकी वाहनाची मध्यरात्री संशयास्पद हालचाल झाल्याची बाब समजली आहे. मात्र, वाहनाचे वर्णन स्पष्ट नसून, या परिसरात सदर वाहनाचे व्हिडीओ फुटेज मिळण्याची शक्यता धूसर आहे. सदर मुलीची ओळख पटणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने चौकशी सुरू असल्याचे पीआय कर्पे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पोलिस पाटलांना संपर्क करण्यात आला असून, त्यांना मुलीचे वर्णन असलेले हॅण्ड बील देण्याचे काम सुरू झाले आहे. गावांमध्ये बेपत्ता असलेल्या मुलींची माहिती संकलित केली जात आहे.

मृतदेहावर ‘मविप्र’चा बेल्ट
मुलीच्या अंगावर ‘मविप्र’ संस्थेच्या शाळेचा लोगो असलेला बेल्ट मिळाला होता. त्यामुळे ही माहिती व्यापक अर्थाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये देण्याची विनंती संस्था चालकांना करण्यात येणार आहे. परिसरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकानाही संपर्क साधण्यात येत असल्याचे कर्पे यांनी सांगितले. दरम्यान, सदर मुलगी परजिल्ह्यातील असण्याचीही शक्यता आहे. आजुबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांकडूनही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मुलीची ओळख पटवण्याचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. मुलीची ओळख पटली की पुढील तपासास वेग मिळेल. ग्रामीणसह शहर आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातही चौकशी सुरू आहे. काही तरी धागे‌दोरे मिळण्याची अपेक्षा आहे.
- संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नांदगाव येथील बेरोजगार तरुणास पाच जणांनी मिळून तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला. पोलिसांनी यापैकी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, एका फरार संशयिताचा शोध सुरू आहे. कोर्टाने सर्व संशयितांना ५ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सोमनाथ विठ्ठल डाबल (३७, रा. शांतीनगर, मखमलाबादरोड), राजेश राम रोहिडा (४२ रा. दत्तनगर, पेठरोड), राजेंद्र सहदेव मोरे (४५ रा.लक्ष्मीनगर, नांदगाव) आणि हेमचंद्र विष्णू आहिरे (६२, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद) अशी अटक झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या टोळीतील साहेबराव रामभाऊ शेवाळे (रा. सौंदाणे, ता. नांदगाव) हा त्यांच्या साथीदार अद्याप फारार आहे. या प्रकरणी संदीप बाळू सानप (रा. कासारी, ता. नांदगाव) या तरुणाने तक्रार दिली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या संदीपची राजेंद्र मोरे या शिक्षकाशी ओळख झाली. आदिवासी विकास विभागात काही उच्च पदस्थ अधिकारी ओळखीचे असून, नोकरी मिळेल असे चित्र मोरेने उभे केले. त्याबदल्यात त्याने संदीपकडे साडेसात लाख रुपयांची मागणी केली. सुरुवातीस दीड लाख अन नोकरी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. संशयित आरोपींनी बनावट सही शिक्के तयार करून संदीपच्या नोकरीची ऑर्डर पोस्टाद्वारे पाठवून दिली. यामुळे संदीपचा संशयितांवरील विश्वास वाढला. त्यामुळे त्याने पुन्हा दीड लाख रुपये आरोपींच्या स्वाधीन केले.

अन् फुटले बिंग

आदिवासी विकास विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी मुलाखत घेत रजिस्टरवर स्वाक्षरी घेतली. यानंतर वैद्यकीय चाचणीचे बनावट पत्र दिले. दरम्यान, आदिवासी विकास विभागाचा सुरक्षारक्षक राजेश रोहिडा यास अधिकारी असल्याचे भासविण्यात आल्याने या घटनेचे बिंग फुटले. नोकरी पक्की झाल्याच्या आविर्भावात तरुणाने आदिवासी विकास विभाग गाठले असता रोहिडा हा अधिकारी नसून सुरक्षारक्षक असल्याचे समोर आले. यानंतर संदीपने पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली. चौकशीत संदीप देण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनीषा घोडके करीत आहेत.

नेहमीच होतात प्रकार

आदिवासी विकास विभागाच्या नावाखाली बनावट नियुक्तपत्र देऊन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. विशेष म्हणजे संशयित आरोपी सतत या विभागात चकरा मारत असतात. विभागाच्या नावाखाली बनावट स्टॅम्प, कागदपत्रे तयार केली जातात. तेथील काही कर्मचारी यात सहभागी असतात. त्यामुळे विभागाच्या प्रमुखांनीही सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेणे गरजेचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दुचाकी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरट्यांनी हातोहात लांबवल्या. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

देवळा येथील सागर दिलीप सोनगिरे ११ ऑगस्ट रोजी नातेवाइकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. शरणपूररोडवरील राज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे ते मुक्कामी थांबले होते. चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच ४१ एएफ ९५५५) चोरून नेली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत. सिन्नर येथील पोपट आनंदा कातकाडे यांची दुचाकी चोरट्यांनी हातोहात लांबवली. एका विवाहासाठी ते शुक्रवारी सांयकाळी गुरूदत्त लॉन्स येथे आले होते. लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५ सीए २९४५) चोरट्यांनी चोरी केली. आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. दरम्यान, मखमलाबादरोड परिसरातील सुनील बाबुराव धात्रक (रा. रामसृष्टी सोसा. स्वामी विवेकानंदनगर) यांची यामाहा (एमएच १५ एफसी २८३५) गुरूवारी (दि. २९) रात्री चोरी झाली. चोरट्यांनी धात्रक यांच्याच सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेली. घटनेचा अधिक तपास म्हसरूळ पोलिस स्टेशनचे हवालदार शेळके करीत आहेत. तसेच जेलरोड येथील त्रिमूर्तीनगर भागातील विनोद शिवराम गरूड यांची स्प्लेंडर (एमएच १५ डीडब्ल्यू ६६६८) रविवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी हातोहात लंपास केली. नाशिकरोड पोलिसस्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड न भरताच दाम्पत्याची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो-एन्ट्रीमध्ये दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अडवले. मात्र, आम्हालाच त्रास का देता? असे म्हणत पती पत्नीने पोलिसांनाच कायदा शिकवला. तसेच गर्दी जमवत धूम ठोकली. या दाम्पत्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. गेंगजे, एस. पी. सावळे आणि शिपाई असे एम. जी. रोड परिसरातील वकीलवाडी चौकात कर्तव्य बजावत होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास राँगसाईड जाणारी एक दुचाकी पोलिसांनी अडवली. वाहतूक नियमाचा भंग केला म्हणून पोलिसांनी दंडाची रक्कम मागितली. मात्र, दुचाकीवरील (एमएच १५, एडब्लू ३३०८) दाम्पत्याने पोलिसांशी वाद घालला. ‘नो-एन्ट्री’चा बोर्ड कोठे आहे? आम्हालाच का पकडता? असे म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घातला. पाहणाऱ्यांची गर्दी जमू लागल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधून मदत मागितली. आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता दिसताच संबंधित दाम्पत्याने पैसे भरण्यास सहमती दर्शवली. मात्र, ‘नो-एन्ट्री’चा फलक इतका मधे का लावला? असा प्रश्न करीत पुन्हा वाद घातला. पैसे देण्यासही नकार दिला. पोलिसांनी सदर दाम्पत्यास पोलिस स्टेशनला चला म्हणून सांगितले. मात्र, आम्ही काय चोर आहोत काय? असे म्हणत दाम्पत्याने आम्ही स्वतः पोलिस स्टेशनला हजर होतो, असे सांगितले. मात्र, सदर दाम्पत्य गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. ते पोलिस स्टेशनला पोहचलेच नाही. या प्रकरणात सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करावा, असा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, दाम्पत्याने दंडाची पावती तयार केल्यानंतर पलायन केले. यामुळे या प्रकरणी शहर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक के. व्ही. कासार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून परस्पर खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खाते व आधार कार्डची माहिती मिळवित चोरट्यांनी लागलीच ५० हजार रुपयांची परस्पर ऑनलाइन खरेदी केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेशकुमार रामचंद्र सिंग (रा. मीडियम बॅटरी स्कूल, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश सिंग यांना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ८६७७९३५०९८ या क्रमांकावरून फोन आला होता. संबंधिताने एसबीआयच्या मुंबई येथील मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगत सिंग यांच्या बँक खात्याची माहिती काढून घेतली. तसेच एटीएमकार्डाचा क्रमांक आणि आधारकार्डची माहिती घेण्यात चोरटा यशस्वी ठरला. यानतंर चोरट्याने लागलीच बँक खाते हॅक करून त्याआधारे अॅमेझॉन या ऑनलाइन खरेदी साईटवरून ५० हजार रुपयांची खरेदी केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच सिंग यांनी प्रथम बँकेत आणि तेथून थेट देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डौले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमसे मळ्यात गॅस चोरीचा गोरखधंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी छडा लावला. नांदूरनाका भागात पत्र्यांच्या शेडमध्ये हा उद्योग सुरू होता. या प्रकरणी दोघांविरुध्द आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, या कारवाईत ३२ सिलिंडर, चार चाकी टेम्पोसह लोखंडी पाइप आणि वजनकाटा जप्त करण्यात आला आहे.

मुकेश रामभाऊ पाथरे (रा. कमलवाडी, निमसेमळा) आणि राकेश सुभाष सोनवणे (रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गॅसचोरीचा उद्योग कमलवाडी येथील काशिनाथ निमसे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि आडगाव पोलिस संयुक्तरित्या तपास करीत ही कारवाई केली. पोलिसांनी बुधवारी (दि. २९) दुपारी छापा मारला. यावेळी अगदी सराईतपणे गॅस चोरी होत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध करीत आहेत. शेडमध्ये एमएच १५ बीजे ३८२१ या वाहनासह सुमारे दोन लाख ९७ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांविरूद्ध खंडणीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील सेंट्रल जेलमध्ये असलेल्या मित्राला सोडविण्यासाठी एका महिलेकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार जणांच्या टोळीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. २९) रात्री घडली.

पंचवटी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार आहे. शारदा संजय लिंगायत (४०, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, राधानगर, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी ऋषीकेश बापू पगारे (१९), विजय राजेश आमले (२२), आकाश रामपाल चव्हाण (२४, सर्व रा. शितळादेवी मंदिरामागे, काजीगढी, जुने नाशिक) आणि नरेश पाटील (रा. मनपा शाळा क्र. ५६ जवळ, फुलेनगर) यांनी लिंगायत यांच्या घरी येऊन दहा हजार रुपयांची मागणी केली. आमचा मित्र सागर कुमावत सेंट्रल जेलमध्ये आहे. त्याला सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे. पैसे दिले नाही तर मुलगा विशाल यास ठार मारू, अशी धमकी संशयितांनी दिली. गुन्हा दाखल करीत पोलिसांनी लागलीच तिघा संशयितांना ताब्यात घेतले. संशयित नरेश पाटील फरार झाला असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images