Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पारदर्शक कारभाराचे हेमंत शेट्टी लाभार्थी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याचे नगरसेवकपद वाचवण्यासाठी सत्ताधारी भाजपने मंगळवारी अपारदर्शक कारभाराचे दर्शन घडवले. विशेष म्हणजे महासभेच्या इतिहासात प्रथमच पोलिसांच्या साक्षीने महासभा चालविण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली आणि दत्तक नाशिककरांना भाजपने दाखवलेल्या या आगळ्यावेगळ्या अच्छे दिनाची चांगलीच चर्चा झडली. न्यायालयाच्या परवानगीने अखेर मंगळवारी शेट्टीने महासभेत हजेरी लावून आपले नगरसेवकपद वाचवले असून, चर्चांना पूर्णविराम दिला आहे, तर शेट्टीचे पद वाचविण्यासाठीच महापौरांनी सोमवारी महासभा रोखली होती, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

सोमवारी स्वीकृत सदस्यपदांची नियुक्ती घोषित केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी अचानकपणे मंगळवारपर्यंत महासभेचे कामकाज थांबवले. आनंदोत्सवाचा दाखला दिला असला तरी त्यामागे खरे कारण होते, ते खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले भाजप नगरसेवक शेट्टीला लाभ देण्याचे. प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक शेट्टी महासभेत अनुपस्थित राहिला असता तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ११ अन्वये त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरले असते. त्यामुळे शेट्टीला वाचवण्यासाठीची पटकथा वकिलांच्या सल्ल्याने लिहिली गेली. महासभेला हजर राहण्यासाठी शेट्टीने कारागृह प्रशासन, तसेच न्यायालयाकडून परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी मंगळवारची मिळाल्याने मग आंनदोत्सवाचा डाव रचत कामकाज थांबवून मंगळवारच्या दोन वाजेची वेळ ठरली. मंगळवारी शेट्टीला न्यायालयाने दोन तासांची परवानगी दिल्याने पोलिस बंदोबस्तात त्यांना महासभेत आणण्यात आले.

चार पोलिसांच्या गराड्यात शेट्टी महासभेत दाखल झाला. त्याने हजेरीपत्रकावर सही केल्यानंतर महासभेच्या कामकाजात सहभाग घेतला. महासभेत बसून पोलिसांनी शेट्टीवर वॉच ठेवला. शेट्टीला महासभेत बोलण्याचीही परवानगीही देण्यात आली. त्याचे पद रद्द होऊ नये यासाठी सत्ताधारी भाजपककडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, मनसेचे नगरसेवक योगेश शेवरे यांनी शेट्टीची आवभगत केली. गजानन शेलार यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शेट्टीचे उत्स्फूर्त स्वागत केले. तांत्रिकदृष्ट्या शेट्टीने महासभेत हजेरी लावल्याने आता त्याला दिलासा मिळाला असून, त्याचे पद वाचणार आहे.

विरोधकांकडून तांत्रिक कोंडी

महासभेच्या तहकुबीवरून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी महापौरांना तांत्रिक मुद्दे उपस्थित करत कोंडी केली. तहकुबीनंतर मंगळवारी होणाऱ्या महासभेतील विषयांच्या मंजुरीनंतर होणाऱ्या ठरावांच्या तारखेबाबत व नंबराबाबत प्रश्न उपस्थित करीत बजगुजर यांनी तांत्रिकतेचा मुद्दा उपस्थित केला. भाजपचा कारभार अपारदर्शक व बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला. अनिष्ट प्रथा पाडल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सभेचा क्रमांक कोणता असा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. तेव्हा महापौरांनी सभा तहकूब केली नसल्याचे सांगत धार्मिक स्थळांचा दाखला दिला. सत्ताधारी सदस्यांनी महापौरांच्या निर्णयाची पाठराखण केल्याने महापौरांनी विषय रेटून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्ली, बेंगळुरूसाठी विमानसेवा?

0
0

स्पाइस जेटचा पुढाकार; जानेवारीपासून सेवा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणावरून येत्या जानेवारीपासून नवी दिल्ली आणि बेंगळुरू या दोन शहरांसाठीची विमानसेवा देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात स्पाइस जेटने या दोन्ही हवाई मार्गांची मंजुरीही मिळविल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

ओझर येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) जागेत विमानतळ कार्यरत आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या एचएएलत्या वतीने या विमानतळावर विमानांची चाचणी घेतली जाते. हे विमानतळ प्रवासी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली झाल्या. त्यानुसार एचएएलच्याच जागेत अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकारण्यात आले आहे. मात्र, विविध कारणांमुळे हे टर्मिनल गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी ठोस पाठपुरावा केल्यानंतर येत्या १५ डिसेंबरपासून नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक या दोन सेवा केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत सुरू होणार आहेत. दक्षिण भारतातील एअर डेक्कन या कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने तशी लेखी माहिती खासदार गोडसे यांना दिली आहे. त्यामुळे येत्या १५ डिसेंबरपासून सेवा सुरू होणार असल्याच्या वार्तेने नाशकात आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आता ५ जानेवारी २०१८ पासून स्पाइस जेट या आघाडीच्या विमानसेवा कंपनीतर्फे नवी दिल्ली आणि बेंगळुरू या दोन शहरांसाठी नाशिकहून सेवा दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

हालचाली सुरू

उत्तर भारतात नवी दिल्ली आणि दक्षिण भारतातील बेंगळुरू या दोन शहरांसाठी सेवा सुरू केल्यास त्याला चांगला प्रतिसाद लाभेल, असे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन मार्गांवर सेवा देण्यासंदर्भात कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत. ५ जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून या सेवेसाठीचे बुकिंगही सुरू होईल, अशी दाट शक्यता आहे.

नाशिकमध्ये बैठका

नाशिकमध्ये देशभरातील ट्रॅव्हल एजंटससाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे अधिकारीही सहभागी झाले होते. याचवेळी नाशिक विमानसेवेसंदर्भात बैठक झाली. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळेच विमानसेवा कंपन्यांना नाशिकच्या मागणी आणि क्षमतेविषयी विस्तृत माहिती मिळाली. त्यानंतर स्पाइस जेट कंपनीने विमानसेवेसाठी रस दाखविला. परिणामी, स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांनी नाशकात येऊन विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, एचएएलमध्ये जाऊन विमानतळाची आणि तेथील सुविधांचीही माहिती घेतली. गेल्या दीड-दोन महिन्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन ते तीनवेळा नाशिकला भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक, इगतपुरीकरिता आज अखेरची मुदत

0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक आणि इगतपुरी नगरपालिकांसाठी अर्ज भरण्याकरिता बुधवारी अखेरची मुदत आहे. त्र्यंबकमध्ये मंगळवारी नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ४८, तर थेट नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. एबी फॉर्मबाबत शाश्वती नसल्याने बहुतांश उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता प्रभागांसाठी ५१ तर नगराध्यक्षासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. एकाही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत अर्ज अद्याप

दिलेला नाही.

मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगर पालिका कार्यालयासमोर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी उसळली होती. प्रभाग पाचमधील अनुसुचित जाती उमेदवार अनिता शांताराम बागुल यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी नाशिक जिल्हा आरपीआय अध्यक्ष प्रकाश लोंढे उपस्थित होते. शहरातील भाजपा पदाधिकारी प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतांना उपस्थित होते.

भाजपकडे सर्वांचेच लक्ष

भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मागणी झालेली आहे. भाजप इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारांच्या नावाचे ए आणि बी फार्म देईल अशी शक्यता आहे.

इगतपुरीत ३० अर्ज

घोटी ः इगतपुरीसाठी मंगळवारपर्यंत ३० अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी फिरोज रमजान पठान व बद्रीनाथ सहदेव शर्मा यांचे अर्ज दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा अभाव अन् अस्वच्छताही

0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

मटा मालिका भाग ९

ठिकाण ः ब्रह्मा व्हॅली कॅम्पस

--

पाण्याचा अभाव अन् अस्वच्छताही



टीम मटा

त्र्यंबकरोडवरील ब्रह्मा व्हॅली कॅम्पसमध्ये तीन कॉलेजेस आहेत. या ठिकाणी पॉलिटेक्निक आणि इंजिनीअरिंग कॉलेजमधील महिला स्वच्छतागृहांची स्थिती चांगली असली, तरी फार्मसी कॉलेजच्या स्वच्छतागृहाची अवस्था वाईट असल्याची विद्यार्थिनींची तक्रार आहे. त्यामुळे अन्य दोन कॉलेजेसप्रमाणेच या कॉलेजलाही सुविधा देण्याची मागणी विद्यार्थिनींकडून होत आहे.

ब्रह्मा व्हॅली या नाशिक-त्र्यंबकरोडवरील एज्युकेशन कॅम्पसमध्ये गेल्या २० वर्षांपासून तंत्रशिक्षण दिले जात आहे. मोठे संकुल असलेल्या या ठिकाणी प्रत्येक इमारतीत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग आणि फार्मसी या कॉलेजमध्ये जवळपास ५०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींसाठी असलेल्या या स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी असल्याचे दिसून येते. येथे स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग नेमण्यात आलेला आहे. स्वच्छता होते की नाही याची दखल घेण्यासाठी सुपरवायझरदेखील आहेत. शिक्षणशास्त्र विभागाच्या स्वच्छतागृहांची स्थिती चांगली आहे. विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. येथे असलेल्या ज्युनिअर कॉलेजचे वर्ग दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले आहेत. त्यांच्यासाठी नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. या सर्व स्वच्छतागृहांमध्ये तुलना करावयाची झाल्यास इंजिनीअरिंग कॉलेजचे स्वच्छतागृह टापटीप असल्याचे दिसून येते.

--

पाण्याचा प्रश्न

फार्मसी कॉलेजच्या स्वच्छतागृहाची देखरेख चांगली आहे. मात्र, काही वेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. याबाबत विचारणा केली असता तेथील पाणीपुरवठा यंत्रणेत असलेले दोष दूर करण्याचे काम सुरू आहे व व्यवस्थापनाने याबाबत लक्ष घातले आहे, असे सांगितले जाते. याच सोबत काही टॉयलेटचे दरवाजे सडले आहेत, ते तातडीने दुरुस्तीची आवश्यकता विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

--

वेंडिंग मशिनची सुविधा

कॉलेज कॅम्पसमध्ये अत्यंत सुरक्षित वातावरण असल्याने वेळप्रसंगी इतर कॉलेजेसच्या स्वच्छतागृहांचा वापर विद्यार्थिनी करतात. ठिकठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमुळे सहसा अडचण येत नाही. विद्यापीठाच्या निर्देशानंतर येथे सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे. ते कार्यरतही आहे.

--

संस्था म्हणते...

कॅम्पसमधील सर्व कॉलेजेसच्या स्वच्छतागृहांची दिवसातून दोन वेळेस नियमित स्वच्छता होत असते. जेथे दुरुस्तीची गरज आहे त्या कामांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्यात येते. पाण्याची व्यवस्था सर्वत्र चांगली आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य, जंतुनाशक आदी बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास तातडीने तिचे निराकरण करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाथ बालकांचे फोफावतेय ‘पीक’

0
0

नाशिक : अनाथ मुलांच्या नावाखाली बालगृह संस्थाचालक उखळ पांढरे करीत असून, अहमदनगरसह नाशिकमध्ये हे पीक जोमात फोफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अवघी ५०० मुलांची असलेली संख्या तब्बल चार हजारांपर्यंत पोहोचली असून, यात नाशिकच्या बालकल्याण समितीसह विभागाचा कारभार संशयस्पद असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान परस्पर लाटण्यात येत आहे.

समाजातील निराधार, पालक जेलमध्ये असलेल्या किंवा पालकांना असहाय्य आजार असेल तर अशा बालकांना बालगृहात प्रवेश दिला जातो. कायद्यानुसार पालक असलेल्या मुलांना बालगृहात प्रवेश दिला जात नाही, तसेच सरकारी बालगृहात जागा नसेल तरच खासगी बालगृहामध्ये जिल्हा बालकल्याण समितीच्या मंजुरीने बालकांना प्रवेश दिला जातो. अहमदनगरमध्ये जवळपास ४२ बालगृहे असून, त्यात या वर्षी अडीच हजार बालकांना प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा चार हजारांच्या घरात होता. २०१२- १३ मध्ये ४,७७०, २०१३-१४ मध्ये ३,९८५ बालकांना बालगृहात समावून घेण्यात आले होते. १५ तालुके असलेल्या अहमदनगरमध्ये वर्षाकाठी चार हजार अनाथ मुले राहणे संशयास्पद ठरते. २०१४-१५ मध्ये अवघ्या ५३१ अनाथ मुलांना बालगृहाचे दरवाजे उघड करण्यात आले होते. यामुळे दरमहिना संस्थांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणे बंद झाले. या वर्षी अहमदनगरच्या बालकल्याण समितीने अचानक सर्व संस्थांची तपासणी करीत यातील भ्रष्टाचार उघड केला होता. यामुळे बालकल्याण समितीच्या सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. वेगवेगळे आंदोलने छेडण्यात आली. सरकारने संस्थाचालकांचे हित लक्षात घेता ही समितीच बरखास्त केली. सध्या ही जबाबदारी नाशिकच्या बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आली आहे. वास्तविक मुलांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात येते. एक सरकारी गृह चौकशी झाल्यानंतरच मुलास दाखला देण्यात येतो. मात्र, या प्रकरणात ही प्रक्रियाच बाद करण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

समितीचा अहवाल गुलदस्त्यात

अहमदनगरसह नाशिकमध्येही अनाथ मुलांची संख्या फुगवून दाखवून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू असल्याचा आरोप सातत्याने होतो आहे. यामुळे महिला व बालकल्याण विभागाने अहमदनगरचे जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे चंद्रशेखर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने नाशिकच्या पाचही सदस्यांची चौकशी केली. मात्र, चौकशीस दीड महिन्याचा कालावधी उलटला असून, अद्याप अहवाल समोर आलेला नाही.

अनुदान संस्थाचालकांच्या घशात

अनाथ मुलांच्या नावाखाली काही लोकांनी सरकारी अनुदान लाटण्याचा धंदाच चालवला आहे. अगदी २० मुले असताना १०० मुलांची नोंद केली जाते. यामुळे ८० मुलांचे अनुदान संस्थाचालकांच्या घशात जाते. याबाबत तक्रार केली असताना बालकल्याण समितीच बरखास्त करण्यात आली. काही ठिकाणी, तर एकाच मुलाची नोंद आदिवासी आश्रमशाळेसह बालगृहांमध्येदेखील होते.

- डॉ. राजेंद्र पवार, माजी सदस्य, बालकल्याण समिती, नगर

मला माहिती नाही!

समितीत पाच सदस्य असतात. पैकी तीन सदस्यांच्या मंजुरीनंतर कोणताही आदेश पारित होतो. अहमदनगरमधील बालगृहांमध्ये मुलांना प्रवेश कसे देण्यात आले, याबाबत मला माहिती नाही.

- अश्विनी न्याहरकर, सदस्या, बालकल्याण समिती, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दोन नाटके जाणार अंतिम फेरीत

0
0

नाशिक ः गेल्या अनेक वर्षांपासूनची रंगकर्मींची मागणी मान्य करीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आनंदाचा धक्का दिला आहे. राज्य नाट्य स्पर्धेत ज्या केंद्रांवर १५ पेक्षा जास्त प्रवेश आले असतील, त्यातून यंदा दोन नाटके अंतिम फेरीत जाणार आहेत. यापूर्वी प्रवेश कितीही असले तरी एकच नाटक अंतिम फेरीत जात होते.

सध्या राज्यभरात १९ राज्य नाट्य स्पर्धा केंद्रांवर सुरू आहेत. या स्पर्धेसाठी अनेक नियम व अटी असून, त्यापैकीच एक म्हणजे नाटके कितीही चांगली झाली, तरी अंतिम फेरीसाठी मात्र पहिले आलेले नाटकच पात्र ठरत होते. त्यामुळे केवळ एखाद्या-दोन गुणांनी मागे असलेले किंवा एखाद्या गटात कमी बक्षीसे मिळवल्याने मागे पडलेले नाटक मागेच राहून जात होते. पहिल्या नंबरच्या तोडीचे असूनही त्याला हवा तसा न्याय मिळत नव्हता. मात्र, दोनच दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी १५ पेक्षा जास्त प्रवेश आलेल्या केंद्राकडून दोन नाटके अंतिम फेरीत जाणार असल्याची घोषणा केल्याने रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक केंद्र तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून, येथे तब्बल २१ नाटके सादर होत आहेत. त्यामुळे यंदा अंतिम स्पर्धेत येथून दोन नाटके जाणार असल्याची चर्चा रंगकर्मींमध्ये आहे.


यंदा रंगणार खरी स्पर्धा

महाराष्ट्रात १९ केंद्र असून बहुतेक केंद्रांवर १५ पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या आहेत. अमरावती, नागपूर, मुंबई, पुणे, चंद्रपूर, नाशिक या केंद्रांवर ही संख्या १९ ते २१ च्या घरात आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांवरून पहिली दोन नाटके अंतिमला जाणार आहेत. नाटकांची संख्याही वाढणार असून खऱ्या अर्थाने स्पर्धेत रंगत येणार आहे.

अधिकाधिक नाटकांना आणि कलेला संधी देण्याच्या दृष्टीने ज्या नाट्य केंद्रावर नाट्य स्पर्धेसाठी १५ प्रवेशांपेक्षा अधिक नाट्य संस्थांचे प्रवेश आले असतील त्या नाट्य केंद्रावर अंतिम फेरीसाठी एक ऐवजी दोन नाटके निवडण्यात येतील.

- विनोद तावडे, राज्य सांस्कृतिक मंत्री

१५ पेक्षा जास्त प्रवेश असलेल्या केंद्रावरून अंतिम फेरीत दोन नाटके जातील, ही घोषणा सांस्कृतिक मंत्री यांनी केली आहे. मात्र, केंद्राकडे अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. एक-दोन दिवसांत ते प्राप्त होऊ शकते. अंतिम फेरीत दोन नाटके जाणार, ही आनंदाची बाब आहे.

-राजेश जाधव, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

नवीन विषय घेऊन नवे नाटक देणे हे रंगभूमीसाठी दिलेले योगदान आहे. राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत एकच नाटक जाते; परंतु ती दोन नाटके जावीत, अशी काही व्यवस्था करता येईल का याबाबत संजय पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. किमान दोन नाटके वर जावीत, त्यामुळे कलाकारांचा हुरूप वाढेल, असा तो प्रस्ताव होता. तो मान्य झाला ही आनंदाची बाब आहे.

-दीपक करंजीकर, अभिनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक परिवार एक व्यक्ती संकल्पनेला द्यावे बळ

0
0

दाद-फिर्याद

--

एक परिवार एक व्यक्ती संकल्पनेला द्यावे बळ


श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जैन समाजाच्या अनेक संस्था आहेत. या सर्व संस्थांवर एक परिवार एक व्यक्ती ही संकल्पना राबवायला हवी. त्यामुळे अनेक सदस्यांना समाजाची सेवा करून ऋण फेडण्याची संधी मिळेल. ज्यांना जैन स्थानकाची निवडणूक लढवायची असेल त्यांनी समाजाच्या इतर संस्थांतील पदांचे राजीनामे देऊन सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने पदावर राहावे. सर्व समाजबांधवांनी यासाठी सहकार्य करावे.

-दिलीप बोरा, मटा वाचक

--

ईपीएस पेन्शन नेमकी वाढणार तरी केव्हा?


निवडणुकीपूर्वी सरकारने ईपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. पण, ते पाळले गेले नाही. देशात ईपीएस पेन्शन घेणारे सुमारे दोन लाख पेन्शनधारक आहेत. इतर सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढविली जात असताना ईपीएस पेन्शनधारकांनीच काय पाप केले आहे? हल्ली मिळणारी पेन्शन वाढत्या महागाईच्या काळात मुळीच परवडणारी नाही. त्यामुळे सरकारने पेन्शन वाढवावी आणि ती पूर्वलक्षी प्रभावाने दिली जावी. वृद्ध दमदार लढा देऊ शकत नाहीत, याचा फायदा सरकारने घेऊ नये, असे एक ईपीएस पेन्शनधारक म्हणून मला वाटते.

-सुरेश देशपांडे, मटा वाचक

---

कर्मचारी संघटनांकडे सोपवावी सिटी बससेवा


नाशिकमधील सिटी बससेवा सुधारू शकत नाही, तसेच नफ्यातही येऊ शकत नाही, असा ठाम ग्रह एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. गेली काही वर्षे एसटी कशी तोट्यात येईल, असेच वर्तन प्रशासनाकडून सुरू असल्याचा संशय येतो. बससेवा कशी कार्यक्षम होईल याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, सर्व अधिकारी, कर्मचारी बससेवेसाठी मनापासून रस्त्यावर उतरले, तर ती निश्च‌ितच नफ्यात येऊ शकते. परंतु, काही अधिकारी व राजकारण्यांना ती खासगी संस्थेच्या दावणीला बांधायची घाई झाली आहे. महापालिकेने ती ताब्यात घ्यावी आणि नवीन बस व तत्सम खरेदीद्वारे काही मलई लाटता यावी, याकडे काहींचे लक्ष लागल्याची चर्चा वाहक आणि चालकांमध्ये रंगू लागली आहे. शहर बससेवा बळजबरीने महापालिकेच्या गळ्यात बांधण्यापेक्षा एसटीच्या कर्मचारी संघटनांकडे ती प्रायोगिक तत्त्वावर सुपूर्द केल्यास या बससेवेला ऊर्जितावस्था मिळू शकेल. यातून भाडेकपात होऊन प्रवाशांचाही फायदा होऊ शकेल.

-सुधीर पाटील, मटा वाचक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व महिला क्रीडा मार्गदर्शक, संघटकांना देण्यात येणाऱ्या जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

www.mumbaidivsports.com या संकेतस्थळावर ३० नोव्हेंबर २०१७ पूर्वी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ५ डिसेंबर २०१७ पूर्वी स्वयंसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावी. सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षांसाठी राज्यातील मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत आंतराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिला खेळाडू, कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदकविजेते, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते, महिला क्रीडा मार्गदर्शक, महिला संघटक-कार्यकर्ते यांनी अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी‌ अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, संबंधित विभागाचे क्रीडा व युवक सेवा विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

सन २०१४-१५ या वर्षातील पुरस्कारांसाठी ज्यांनी यापूर्वी अर्ज केले असतील त्यांनी नवीन नियमावलीनुसार नव्याने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) आणि एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या प्रकारांच्या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेगाब्लॉकमुळे कोलमडले नियोजन

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे मनमाड रेल्वे स्थानकात नवीन होणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाकरिता नवे लोखंडी गर्डर टाकण्यासाठी मंगळवारी मनमाड रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक घेण्यात आला. हे काम पूर्वनियोजीत असले तरी यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळपासूनच फलाट १ व २ वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले होते. काही पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या.

मंगळवारी सकाळी ७.४० ते दुपारी १२.३५ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला. काही गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. मुंबईकडे जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-इगतपुरी शटल, मनमाड-पुणे पॅसेंजर, साईनगर-जालना डेमो पॅसेंजर या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

फलाटावर पोलिस बंदोबस्त

दरम्यान रेल्वे पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. काम पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. रेल्वे सुरक्षा बल पोल‌सि निरीक्षक के. डी. मोरे व सहकाऱ्यांनी चोख पोल‌सि बंदोबस्त ठेवला.

उद्या पुन्हा ‘ब्लॉक’

गुरुवारी (दि.२३) मनमाड रेल्वे स्थानकात अशाच प्रकारचा मेगा ब्लॉक ठेवण्यात येणार असल्याचे व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

बसेसला गर्दी

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचे प्रवाशांनी बसस्थानकांकडे मोर्चा वळविला. गाड्या रद्द झाल्यामुळे मनमाडहून सुटणाऱ्या काही बसेसला प्रचंड गर्दी होती. नाशिकरोड-भुसावळ, भुसावळ-नाशिकरोड या दोन्ही पॅसेंजर गाड्या रद्द असल्याने मनमाड-नाशिक दरम्यान निफाड-लासलगाव-कसबे-सुकेणे-नांदगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मेगा ब्लॉकमुळे विविध एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. महानगरी एक्स्प्रेससह काही गाड्या फलाट क्रमांक सहावरून रवाना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्डम, डीपीएस, जुन्नरेचा संघ विजयी

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१७-१८तील दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात विस्डम हायस्कूल आणि पुरुषोत्तम स्कूलच्या संघात झालेल्या सामन्यात विस्डम हायस्कूलने ३२ धावांनी विजय मिळविला. तर दुपारच्या सत्रात दिल्ली पब्लिक स्कूल आणि फ्रावशी अकॅडमी स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली स्कूल संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१७-१८चे आयोजन रासबिहारी इंटरनॅशनल शाळेकडून करण्यात आले आहे. सकाळ सत्रादरम्यान जी-१ मैदानावर पुरुषोत्तम स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विस्डम हायस्कूलने २० षटकांत सर्व गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रतिउत्तर देताना पुरुषोत्तमचा संघ १८ व्या षटकात ८६ धावांवर सर्व गडी गारद झाले. विस्डम हायस्कूलचा मास्टर साहिल पारीखला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ४ षटकात ४ बळी घेतले. या सामन्यासाठी विवेक केतकर आणि सतीश हांडोरे हे अंपायर होते.

दुसरीकडे जी-२ मैदानावर दुपारच्या सत्रात दिल्ली पब्लिक स्कूल आणि फ्रवशी अकॅडमी स्कूल या संघांमधे झालेल्या सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल संघाने ८ गडी राखून मोठ्या दिमाखात विजय मिळविला. दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फ्रवशीच्या संघ ७७ धावांतर गारद झाला. दिल्ली स्कूलच्या संघाने ११.४ षटकांत दोन गडी गमावून सामना जिंकला. दिल्ली स्कूल संघाचा शिवम

काकडे यास सामनावीर घोषित करण्यात आले. रंगुबाई जुन्नरे स्कूल आणि अशोका यूनिव्हर्सल स्कूल (चांदसी) संघांमधे झालेल्या चुरशीच्या सामन्यात
रंगुबाई जुन्नरे संघाने २५ धावांनी विजय मिळविला. रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूलने २० षटकात ५ बडी गमावून १२७ धावांचे केल्या. अशोकाचा (चांदसी) संघ २० षटकात १०८ धावाच करू शकला. जुन्नरे स्कूल संघाचा साहिल अखाडे यास सामनावीर घोषित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात आजपासून मिळणार दाखले

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शैक्षणिक कामासह जवळपास इतर सर्वच शासकीय योजनांच्या लाभासाठी महत्त्वाचा ठरणारा अन् गावोगावच्या सज्जावरील तलाठी तात्यांकडून तब्बल गेल्या दीड महिन्यांपासून देणेच बंद झालेला उत्पन्नाचा दाखला बुधवारपासून (दि.२२) मिळणार आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी अर्जदारांकडून स्वयंघोषणापत्रासह एका विशिष्ट नमुन्यात अर्ज भरून घेवून उत्पन्नाचा हा दाखला देण्याबाबत येवला तालुक्यातील तलाठी संघाने निर्णय घेतला. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची मोठी कोंडी तात्पुरती का होईना फुटली आहे.

तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला मिळव‌ण्यिासाठी आधी तलाठ्याकडील दाखला गरजेचा असतो. मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून तात्यांकडील दाखला कोंडीत सापडला आहे. यावर महाराष्ट्र टाइम्सने सोमवारच्या (दि.२०) अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर येवला तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तालुक्यातील तलाठ्यांशी याविषयावर चर्चा केली. त्यातून नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्रासह एका विशिष्ट नमुन्यात अर्ज भरून घेवून उत्पन्नाचा दाखला देण्याची भूमिका तलाठ्यांनी घेतल्याने उत्पन्नाच्या दाखल्यांचा विषर्य मार्गी लागणार आहे.

तहसील स्तरावर दिले जाणारे उत्पन्नाचे दाखले बंद नसून, तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला प्राप्त होताच तत्काळ दाखले देण्याची करण्याची कार्यवाही होईल.

- नरेशकुमार बहिरम, तहसीलदार, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यामुळे उत्पादकांना अच्छे दिन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सध्या सगळीकडे ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळले असले, तरी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळत आहे. मनमाड नांदगावसह चांदवड बाजार समितीत मंगळवारी कांद्याला तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चांदवड बाजार समितीत लाल कांद्याने थेट ३८१६ रुपयांपर्यंत मजल मारली.

लाल व उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चांदवड नांदगाव मनमाड व बोलठाण बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. चांदवड समिती खालोखाल नांदगाव बाजार समितीत मंगळवारी उन्हाळी कांद्याने चांगला भाव खाल्ला. तब्बल ३६१२ असा भाव मिळाल्याने शेतकरी खुशीत होते. मनमाडमध्ये कमाल ३३६० व बोलठाणमध्ये २९२० भाव मिळाला. नांदगावमध्ये लाल कांद्याची १७७ वाहने, मनमाडमध्ये ५०० वाहने असल्याचे प्रशासनाने सांगितले. बहुतांश समित्यांत कांदा तीन हजारांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके संकटात सापडली असली तरी घरात आलेला कांदा चांगला भाव देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कदमांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महावितरण, जलसंपदा विभाग आणि सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अनिल कदम यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांसह या अधिकाऱ्यांची पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली. या बैठकीत तीनही विभागाबाबात शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या.

पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांनी वीजेचे भारनियमन, गैरसोयीचे वेळापत्रक, पालखेड कालव्याचे आवर्तन, शिवार रस्ते आदी प्रश्नांबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अनिल कदम यांनी पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली.

वीजवितरण कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांच्या सोयीचे वेळापत्रक तयार करून व‌जिेचा दिवसा व अंखडीत पुरवठा करावा. तसेच कृषीपंपांचे वाजवी व निर्दोष बिले घ्यावे, असे फर्मान आमदार कदम यांनी काढले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच पालखेड कालव्याच्या आर्वतनाचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदारांसह शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

पालखेड, शिरवाडासह दावचवाडी, लोणवाडी परिसरात अनेक दिवसांपासून भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे आणि धोक्याचे आहे. तसेच वीजबिलातही तीन अश्वशक्तीच्या कृषी पंपास पाच अश्वशक्तीचे, तर पाच अश्व शक्तीच्या कृषीपंपास साडेसात अश्वशक्तीचे बिल आकारून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. आमदार कदम यांनी दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत पालखेड येथे शेतकरी दरबारच भरविला आणि सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अशोक आहेर, सभापती पंड‌तिराव आहेर, ज‌ि. प. सदस्य दीपक शिरसाठ, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, लोणवाडीचे सरपंच सुभाष चोपडे, पालखेडच्या सरपंच शकंतला जाधव आदींसह महावितरण, जलंसपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्वमेध स्पर्धेसाठी ८३ खेळाडूंची निवड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. विविध क्रीडा प्रकारांत सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम राखत बाजी मारली. सांघिकमध्ये विदर्भाने जोरदार लढत देत विजेतेपद पटकावले. दोन दिवस चाललेल्या एकूण १७ क्रीडा प्रकारांतून वैयक्तिक व सांघिक गटातून एकूण ८३ विद्यार्थ्यांची दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल विभागातर्फे आयोजित केंद्रीय क्रीडा महोत्सवाच्या मैदानी स्पर्धेत धावणे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५००० मीटर, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ४ x १०० रिले, ४ x ४०० या मैदानी स्पर्धा झाल्या.

विद्यार्थ्यांना धावपटू कविता राऊत, नाशिक ग्रामीणचे पोल‌िस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते सुवर्णपदक, रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निशिगंधा पाटील आणि स्नेहा राठोड यांनी परिचय करून दिला. डॉ. विजया पाटील यांनी आभार मानले.





विजेते संघ आणि प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१४ दरम्यान दापोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विविध स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –

वैयक्तिक खेळ :-

तिहेरी उडी (मुले) : निखील पावले (कोल्हापूर)

तिहेरी उडी (मुली) : शामल व्यवहारे (अमरावती)

थाळीफेक मुले : अभिनंदन पाटील (कोल्हापूर)

थाळीफेक मुली : मयुरी कदम (नांदेड)

भालाफेक मुले : धम्मराज परघरमोल (अमरावती)

भालाफेक मुली : कीर्ती दुकाने (कोल्हापूर)

लांब उडी मुले : धिरज पाटील (कोल्हापूर)

लांब उडी मुली : अश्विनी जगदाळे (पुणे)

उंच उडी मुले : वीरेंद्र उज्जैनकर (अमरावती)

४ x १०० मीटर मुले : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता नाशिक विभाग

४ x १०० मीटर मुली : कोल्हापूर विभाग प्रथम, उपविजेता पुणे विभाग

४ x ४०० मीटर मुली : पुणे विभाग प्रथम, उपविजेता कोल्हापूर विभाग

१०० मीटर मुले : धिरज पाटील (नाशिक)

१०० मीटर मुली : प्रियांका पवार (अमरावती)

२०० मीटर मुले : प्रकाश तनगे (कोल्हापूर)

२०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

४०० मीटर मुले : देवेंद्र वसावे (नाशिक)

४०० मीटर मुली : सिमरन शेख (कोल्हापूर)

८०० मीटर मुले : अमित भडकमकर

८०० मीटर मुली : शारदा धाड

१५०० मीटर मुले : सुमय्या अय्युब (अमरावती)

१५०० मीटर मुली : शारदा धाड (अमरावती)

५००० मीटर धावणे मुले : विशाल तामकर (कोल्हापूर)

५००० मीटर धावणे मुली : सुमय्या अय्युब (अमरावती)

सांघिक खेळ :-

खो-खो, मुले : नागपूर संघ विजयी, नाशिक उपविजेते

व्हॉलीबॉल, मुले : नांदेड विभागीय केंद्र विजयी, नाशिक विभागीय केंद्र उपविजेते

बास्केटबॉल, मुले : नांदेड संघाचा कोल्हापूरवर १९ गुणांनी विजय

कबड्डी - मुले : अमरावती विजयी, नाशिक उपविजेते जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवून क्रीडा क्षेत्रात कामगिरी केल्यास यश निश्चित मिळेल. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवे.- कविता राऊत, धावपटू


जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या कविता राऊत हिचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी.-- संजय दराडे, पोल‌िस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडाऊनसह घरे भस्मसात

0
0



म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरातील कोर्ट रोडवरील एका भंगार दुकानासह गोडाऊनला मंगळवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. गोडाऊनसह नजीकची काही घरे या आगीत जाळून खाक झाली. तब्बल साडेचार तासांपेक्षा अधिक वेळ धूसमुसणाऱ्या या आगीत भंगार दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच जवळच्या घरांमधील संसारोपयोगी साहित्यांसह एक दुचाकी आगीत जळाली.

सुदैवाने या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी साडेतीन तास प्रयत्न करावे लागले. येवला शहरातील कोर्ट रोडवर तालुका पोल‌सि स्टेशनपासून काही अंतरावर तबरेज रसूल शेख यांचे भंगार दुकान व गोडाऊन आहे. जवळपास दोन गुंठे क्षेत्रातील या भंगार गोडाऊनला मंगळवारी पहाटे सव्वाचार साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही क्षणातच मोठा भडका घेतला. आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तासाने जागे झालेल्या तबरेज शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या परिसरात राहणारे नगरसेवक शफिकभाई शेख यांच्याकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. शफिकभाई यांनी तत्काळ येवला नगरपालिकेच्या दोनही अग्निशमन विभाग, पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ मनमाड व कोपरगाव नगरपालिकेशी संपर्क साधत तेथील अग्निशमन बंब बोलावले. अग्निशमन बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत भंगार गोडाऊन संपूर्ण जळून खाक झाले. गोडाऊनलगत असलेल्या संजय वरदे व फारुख शेख यांच्या घरांनाही मोठी झळ बसली. वरदे यांची दुचाकी यात भस्मसात झाली. त्यांच्या घराचेही आगीत नुकसान झाले. फारुख शेख यांचे घर या भीषण आगीच्या चपाट्यात सापडून घरातील संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.भंगार गोडाऊन मधील प्लास्टिक व फायबर कटिंगचे किंमती मशिन, तसेच रद्दी,प्लास्टिक,लोखंड आदी मोठया प्रमाणावर असलेले भंगार सामान असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात नाही

येवला पालिकेचे दोन, तर मनमाड व कोपरगाव नगरपालिकेचा प्रत्येकी एक अशा एकूण चार बंबांनी पाण्याचा जोरदार मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. त्यासाठी अग्निशमन बंबांना पाणी भरण्यासाठी येवला जलशुद्धीकरण केंद्रावर अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. अग्निशमन चालक तसेच इतर कर्मचाऱ्यांसह शफिकभाई शेख, निसारभाई शेख, अमजदभाई शेख या तिघा नगरसेवकांसह माजी नगरसेवक रिजवान शेख, निसारभाई निंबूवाले, निसारभाई भंगारवाले आदींसह परिसरातील नागरिकांनी मदत केली.

वरदे यांच्यामुळे टळली जीवितहानी

भंगार गोडाऊनला आग लागली तेव्हा नजीकच्या फारुख शेख यांच्या घरास फारुख शेख, त्यांची पत्नी, लहान मुले पहाटेच्या साखरझोपेत होते. आगीने शेख यांच्या घरास आगीने विळखा घातल्याचे लक्षात येताच जवळ राहणारे संजय वर्दे यांनी तत्काळ शेख यांच्या घराकडे धाव घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालत संजयने फारुख यांचे दार जोरजोरात वाजवत त्यांना जागे केले. तसेच त्यांना घराबाहेर काढण्यासही मदत केली. संजय वरदे यांच्या या समयसूचक पावलांमुळे जीवितहानी टळली. मात्र, या प्रयत्नात संजय वरदे यांचे हात भाजले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदूबाबाच्या कोठडीत सात दिवसांची वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे येथील भोंदू बाबा उद्यराज रामआश्रम पांडे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारी कोर्टाने सात दिवसांची वाढ केली. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील दोन तर नाशिकमधील एका सराफाकडील सोने हस्तगत करणे, ऑनलाइन बँकिंगमार्फत ट्रान्सफर झालेल्या पैशांचा शोध घेणे यासाठी सरकारी पक्षाने संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती.

मूळ उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर येथील भोंदूबाबा पांडेने ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे बस्तान बांधले होते. पाच मुले व पत्नी असलेल्या पांडेने धार्मिक पूजांच्या माध्यमातून भक्त परिवार जोडला. त्यात नाशिकमधील एक कुटुंब होते. या कुटुंबातील १८ वर्षाच्या मुलीला अर्धवट पूजा सोडल्याचा धाक दाखवत संशयित आरोपीने लाखो रुपये उकळले. अगदी या पीडित मुलीला दुसऱ्याच्या घरात चोरी करण्यास भाग पाडल्यानंतर पांडेचे भिंग फुटले. सरकारवाडा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी पांडेला बेड्या ठोकल्या होत्या. तपासासाठी कोर्टाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यास मंगळवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.

सराफांना विकले सोने

सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षक सारिका आहिरराव व त्यांच्या पथकाने मागील सात दिवसात जैनपूर येथे पोहचून २९ तोळे सोने जप्त केले. परतीच्या प्रवासात असताना पांडेने जौनपूर येथीलच आणखी दोन सराफांना सोने विकल्याची कबुली दिली. भोळ्या भक्तांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळणाऱ्या पांडेने जौनपूर येथे अलिशान बंगला असून, नातेवाइकांमार्फत अनेक आर्थिक व्यवहार पार पाडले आहेत.

नातेवाइकांच्या खात्यात पैसे वर्ग

संशयित पांडेने नाशिकमधील एका सराफास सोने विकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या पीडित मुलीने पांडेच्या बँक खात्यात एक लाख ३० हजार रुपये वर्ग केले होते. हे बँक खाते पांडेच्या नातेवाइकाचे असून, तोही जौनपूरचा रहिवाशी आहे. या सर्व घटनांचा तपास करण्यासाठी पांडेच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली असून, लवकरच सरकारवाडा पोलिसांचे एक पथक जौनपूरकडे रवाना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्या उद्‍घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी क्षेत्रात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला गुरूवारपासून (दि. २३) नाश‌िक येथे सुरुवात होते आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता ठक्कर डोम येथे या प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. राज्यातून आणि परराज्यांतून तब्बल अडीच लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतील असा विश्वास आयोजकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ह्यूमन सर्व्ह‌िस फाउंडेशन आणि मीडिया एक्झ‌िबिटर्स यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एबीबी सर्कल आणि सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रदर्शन होत असून प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, निर्मला गावीत, नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थ‌ित राहणार आहेत. प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची तयारी अंत‌िम टप्प्यात आल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर आणि साहिल न्याहारकर यांनी दिली.

न्याहारकर म्हणाले, की निसर्गाचे दृष्टचक्र आणि तत्सम अनेक कारणांमुळे शेतकरी नाउमेद झाला आहे. त्याला उमेदीने उभे करण्याचे काम हे कृषिथॉन प्रदर्शन करेल. देशविदेशातील एकूण ३५० कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. शेतीसाठीची अवजारे, ट्रॅक्टर, सोलर याचे अनेक पर्याय येथे शेतकऱ्यांना पहावयास मिळतील. गेल्या वर्षी सुमारे पावणेदोन लाख नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यंदा अडीच लाख लोक प्रदर्शनाला भेट देतील, असा अंदाज साहिल न्याहारकर यांनी व्यक्त केला. शेती क्षेत्रातील चांगले प्रयोग जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शेळीपालन, कु्क्कुटपालन, शेत तळ्यांमध्ये मत्स्यपालन, अन्नप्रक्रिया उद्योग या सारख्या विविध पूरक व्यवसायांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी परिसंवाद, चर्चासत्रांचा लाभही या चार दिवसांत शेतकऱ्यांना घेता येणार आहे. दुग्ध उत्पादकांसाठी विशेष परिसंवाद होणार असून राज्यस्तरीय नर्सरी उद्योजकांची परिषद होणार आहे.

युवा शेतकऱ्यांचा होणार सन्मान

युथ इन अॅग्रीकल्चर ही संकल्पना आयोजकांकडून राबविली जात आहे. त्याअंतर्गत शेती क्षेत्रासाठी भरीव कार्य करणारा यशस्वी उद्योजक, यशस्वी संशोधक, यशस्वी युवा शेतकरी आणि एका महिला शेतकऱ्याला या प्रदर्शनामध्ये युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी अभ्यासक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या राज्यातील ३६ विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये गौरविण्यात येणार आहे. काही स्वयंसेवी संस्था तसेच गावांना जलसंवर्धक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी लवकरच कृषिथॉनतर्फे इ नियतकालिक तसेच नियतकालिक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही न्याहारकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

ऑनलाइन व्यवहारांत अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सायबर क्राइमकडे येत असतात. त्यातच फक्त भारतीय स्टेट बँकेच्याच ग्राहकांचे पैसै दुसऱ्या खात्यावर वळते झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे सरकारी बँकांतील ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. सदर प्रकार बँकेच्या क्लार्कच्या चुकीने घडल्याचे समोर आले.

मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले संजय पासी सातपूरच्या अशोकनगर भागात टेलरिंगचा व्यवसाय करतात. पासी यांना लग्न समारंभासाठी गावाकडे जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी बँकेतील शिल्लक तपासण्यासाठी एटीएम गाठले. बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्यांच्या खात्यातील वीस हजार रुपये एका खासगी फायनन्स कंपनीच्या खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी थेट स्टेट बँकेत धाव घेत खात्यातून पैसै अचानक दुसरीकडे गेल्याचे बँक

अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी संबंधित क्लार्कला याबाबत विचारणा केली. यात
क्लार्कने कबुली देत ग्राहकाचे पैसै दुसरीकडे वर्ग झाले असून, ४८ तासांच्या आता पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे सांगितले. दरम्यान केंद्र व राज्य सरकारने बँकेत खाते उघडणे अनिवार्य केले आहे. परंतु, ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा स्टेट बँकेचे अधिकारी कर्मचारी घेत नसतील तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हजारो ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षा यामुळे ऐरणीवर आली आहे. स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

खात्यातील शिल्लक चेक करण्यासाठी एटीएममध्ये गेलो. यावेळी खात्यातून २० हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळते झाल्याचे लक्षात आले. यानंतर बँकेत गेल्यावर संबंधित क्लार्कने ४८ तासांच्या आत पैसे पुन्हा खात्यात जमा करू असे सांगितले.
- संजय पासी, स्टेट बँक ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयात जुन्या वाहनांचे भंगार

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहरातील आर. टी. ओ. कार्यालयात जुन्या रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांचे भंगार गेल्या कित्येक दिवसांपासून पडलेले आहे. यामुळे या प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता हे प्रवेशद्वार खुले करण्यात येणार असल्याने त्यासाठी या भंगार तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतूक शाखेच्या कार्यालयाचे तिसरे प्रवेशद्वार काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे याकडे लक्ष जात नव्हते पण आता हे प्रवेशद्वार मोटर सायकल पार्किंगसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराजवळील जुन्या रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांचे भंगार हटविण्याची मागणी केली जात आहे. यामुळे या प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होईल. तरी ही समस्या सोडविण्याची मागणी वाहनचालकाकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृह मिळेना

0
0

मनपाच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाच्या घरात स्वच्छतागृह असावे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, असे असताना आजही अनेक घरांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याने उघड्यावर शौच करण्याची वेळ येत आहे. नाशिक महापालिकेत आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांनादेखील स्वच्छतागृहाची सुविधा मिळत नसल्याने चक्क कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्याची वेळ येते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांच्या या समस्येबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडेही महिला कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी मांडल्या. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत त्वरित ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानात जाहिरातींद्वारे सरकार प्रबोधन करताना दिसते. परंतु, दुसरीकडे आरोग्याचे काम करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या आयुक्तांनीच याकडे लक्ष देत शहरात गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.


रहिवाशी भागातही स्वच्छतागृहे उभारा

स्वच्छ भारत अभियानात केंद्र व राज्य सरकारनेच प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु, सार्वजनिक ठिकाणीही शौचालयांची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. शहरात मुख्य रस्त्यांवर सरकारकडून स्वच्छतागृहांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. परंतु, रहिवाशी भागातदेखील गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली जावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेच्या आरोग्य विभागात शेकडो महिला कर्मचारी काम करतात. आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे चित्र सध्याला तरी दिसू लागले आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्याची वेळ महिला कर्मचाऱ्यांवर येत असते. याबाबत अनेकदा महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे वरिष्ठ अधिकारीच लक्ष देत नसल्याने स्वच्छ आरोग्यासाठी झटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images