Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विरोधकांमुळे रखडला विकास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक महासभेने एकमताने मंजूर केल्यानंतर मदरसा, इदगाह व मुस्ल‌मि कब्रस्थानच्या नावाखाली पालिकेतील महागठबंधन आघाडीच्या नेत्यांनी शासनाची दिशाभूल करून अंदाजपत्रकास स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत. स्वतः सत्तेवर असताना काहीही विकासकामे करू न शकल्याने आता आम्ही करीत असलेल्या विकासकामना रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न केवीलवाणा आहे, असा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला.

येथील उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकास स्थगिती मिळाल्यापासून सत्ताधारी काँग्रेस व विरोधी महागठबंधन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विरोधकांच्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. शेख म्हणाले, विरोधकांनी मशिदीच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. मात्र त्यांचा हा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. महागठबंधनकडून जाहीर करण्यात आलेल्या ६५ मशिदीच्या यादीत १५ ते १६ मशीद अशा आहेत, जेथे कोणत्याही कामांची आवश्यकता नाही. या यादीतील अनेक मश‌दिी या विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील असून, इतके वर्ष त्यासाठी काहीच का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अंदाजपत्रक स्थगितीवर त्यांनी चर्चा केली. पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयास अहवाल पाठवला असून, अंदाजपत्रकात आपण प्रत्येक नगरसेवकास कायद्यानुसार योग्य निधी दिला आहे. शासन अंदाजपत्रकावरील स्थगिती हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेस काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.

विकासकामे झालीच नाहीत...

शेख यांनी माजी महापौर हाजी मोह. इब्राहीम व राष्ट्रवादीचे मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकाळात शहरात ६ ठिकाणी घाईघाईने दोन कोटीहून अधिक सहा विकास कामांचे उद्घाटन झालेत असे सांगितले. प्रत्यक्षात उद्घाटनाला आठ महिने उलटूनही कामांना सुरुवात झाली नाही. ही विकासकामेच न करता त्याची बिले काढण्याचा यांचा बेत होता का? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिझलर मेकिंगची सुसंधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ११) दुपारी ३ वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, त्र्यंबकरोड या ठिकाणी हे डेमो वर्कशॉप होईल.

अाबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेला पदार्थ म्हणजे सिझलर होय. हॉटेलमध्ये मिळणारे सिझलर्स आपल्यालाही बनविता आले पाहिजेत, असे अनेकांना वाटते. शनिवारी होणाऱ्या या वर्कशॉपमध्ये सर्वांना सिझलर्सचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळणार आहेल. यात प्रामुख्याने चाट सिझलर, इटालियन सिझलर, मेक्सिकन सिझलर अशा प्रकारांचा समावेश आहे. वंदना साधवानी या सिझलर्सचे विविध प्रकार शिकविणार आहेत.

--

रजिस्ट्रेशनसाठी साधावा संपर्क

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मेंबर्ससाठी शंभर रुपये, तर जे मेंबर्स नाहीत त्यांच्यासाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, तसेच ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com येथे संपर्क साधता येईल. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे कार्ड घरपोच दिले जाईल.

--


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरीकरणाच्या मापात पाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात २५७ कोटी रुपयांचे रस्ते विकासाच्या निधी वाटपात सत्ताधारी भाजपने मापात पाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपच्या प्रभागात भरघोस निधी देतानाच, सत्ताधाऱ्यांनी मात्र काँग्रेसबहुल नगरसेवक असलेल्या प्रभागांना क्षुल्लक निधी देऊन सुडाचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला. प्रत्येक प्रभागासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला असताना काँग्रेसबहुल प्रभाग क्र. १३मध्ये केवळ सव्वादोन कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या पारदर्शक कामकाजावर काँग्रेसने आक्षेप घेत, गावठाणातील विकासासाठी अन्य निधी देण्याची मागणी केली आहे. सोबतच शिवसेनेच्या भूमिकेवरही खैरे यांनी शंका उपस्थित केली असून, सेना भाजपला मिळाल्याचा आरोप केला आहे.

गेल्या महिन्यातील महासभेत भाजपने विनाचर्चा २५७ कोटी रुपयांचे रस्ते विकासाचे कामे मागच्या दाराने मंजूर केले होते. सहाशे किलोमीटरच्या रस्त्यांसाठी सर्व प्रभागांना समान निधी वाटप करण्याचे धोरण महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केले होते. परंतु, संकेतस्थळावर रस्ते विकासकामांची यादी जाहीर करताना प्रभाग क्रमांक १३ मध्ये फक्त दोन कोटी तेरा लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या प्रभागात भाजपचा एकही नगरसेवक नाही. चार नगरसेवकांमध्ये दोन काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांचा प्रभाग असतानाही निधीवाटपात अन्याय केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे संतप्त झाले. त्यांनी भाजपच्या पारदर्शी कारभारावरच संशय घेतला आहे. आमच्या प्रभागात रस्ते झाली असतील तर गावठाण विकासासाठी आम्हाला निधी द्या अशी मागणी करत, त्यांनी भाजप व सेनेविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय़ घेतला आहे.

शिवसेनेवर भरोसा नाय

पालिकेत शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष असला तरी सेनेचे भाजपबरोबरचे ‘घनिष्ठ’ संबंध पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेबाबत बुचकाळ्यात पडले आहेत. भाजप सेनेची मिलीजुली पाहता यापुढे प्रमुख विरोधक म्हणून शिवसेनेला मानायचे की नाही, या विचारापर्यंत काँग्रेस पक्ष आला आहे

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व अपक्षांना सोबत घेवून महापालिकेच्या सभागृहात मोट बांधली होती. परंतू गेल्या काही महासभांमध्ये शिवसेनेने सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी केलेले आंदोलन व शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाल्याने काँग्रेसला शिवसेनेच्या भूमिकेवर संशय येत असल्याचे काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनीसुद्धा सत्ताधारी भाजप व विरोधक शिवसेनेची मॅच फिक्‍सिंग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष मिळून प्रमुख विरोधकांच्या भूमिकेत येण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे प्रगतिपुस्तक- बागलाण, सिन्नर

$
0
0

आमदारांचे प्रगतिपुस्तक

--

मतदारसंघ ः बागलाण

--

प्रतिमा कार्यक्षम, विकास मात्र दूरच!


आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात आमदार दीपिका चव्हाण यांनी हक्काच्या आमदारनिधी खर्चात जिल्ह्यात आघाडी घेऊन एक कार्यक्षम आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे. मतदारसंघातील प्रश्नांबाबत नेहमीच जागरू राहून शासनदरबारी मतदारसंघाच्या व्यथा त्यांनी मांडल्या. विरोधात राहूनही निधी मिळवून आणला आहे. परंतु, आदिवासीबहुल मतदारसंघातील अनेक प्रश्न मात्र जैसे थेच आहेत. सिंचन, आरोग्य, रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आमदारांची प्रतिमा कार्यक्षम असली, तरी मतदारसंघाचा विकास मात्र अजून दूरच आहे.

विद्यमान सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघातील प्रलंबित कामे व निवडणूक कालावधीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तळमळीने शासनदरबारी प्रयत्नशील राहिले, तरीही सत्ताधारी आणि विरोधक यात फरक असतो याची जाणीव अशा मतदारसंघात हटकून येते. असे असले, तरी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा, अधिवेशन कालावधीत लक्षवेधी, तारांकित प्रश्नांच्या आयुधांचा वापर करून मतदारसंघातील प्रलंबित तळवाडे भामेर पोहोच कालवा, हरणबारी डावा उजवा कालवा, केळझर चारी क्रमांक आठ कामांसाठी विद्यमान शासनाकडून तब्बल ७५ कोटी रुपयांचा निधी आमदार चव्हाण यांनी मिळवून दिला आहे. सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठीदेखील तीन कोटी रुपयांहून अधिकचा निधी मिळवून दिल्याने आगामी काळात शहरातही विकासकामांची रेलचेल बघावयास मिळू शकेल.

४५ किलोमीटरचे रस्ते

मतदारसंघातील रस्त्यांची कामे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून माजी आमदार संजय चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. तुलनेने या तीन वर्षांत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तरीही आपण ५० कोटी रुपयांची कामे मतदारसंघात केली, असा दावा आमदार चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. आदिवासी मतदारसंघ असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी मतदारसंघातील सहा आश्रमशाळांच्या बांधकामासाठी आदिवासी विकास विभागातून तब्बल ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सुसज्ज आश्रमशाळा उभारल्या जात आहेत. अजमीर सौंदाणे येथे एकलव्य इंग्लिश मीडियम रेसिडेन्सी स्कूलकरिता सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज निवासी शाळा उभारण्यात येत आहे.

अप्पर पुनंदसाठी पाठपुरावा

बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अप्पर पुनंदसाठी अामदार चव्हाण आग्रही अाहेत. उंबरगव्हाण येथे अप्पर पुनंद बंधारा बांधून बोगद्याद्वारे हे पाणी आरम खोेऱ्यात खेळविण्याचेही त्यांचे ध्येय आहे. अवकाळी पाऊस व नुकसानीपोटी सुमारे ६५ कोटी रुपयांचा प्रलंबित निधी शेतकऱ्यांना प्राप्त करून देण्यातही त्यांना यश आले आहे. सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कळवण तालुक्यातील पुनंद धरणावर पहिले आरक्षण मंजूर करवून घेत पाण्याचा हक्क अबाधित केला आहे. शहरासाठी थेट धरणातून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत. शहरातील बायपासचा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने प्रलंबित आहे. शहरातून जाणारा महामार्ग आता राज्यऐवजी राष्ट्रीय महामार्ग झाल्याने प्रश्न केंद्र स्तरावर पोहोचला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा सुरू आहे.

या प्रश्नांकडे दुर्लक्ष

आदिवासीबहुल मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, बेरोजगारीचे प्रमाण कायम आहे. उद्योगवाढीसाठी फारसे प्रयत्न झालेले नसल्याने तरुणांच्या हाती काम नाही. सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व बायपास या समस्या शहरवासीयांसाठी जैसे थे आहेत. मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. पाणीपुरवठा योजनांकडे दुर्लक्ष झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. केळझर पाणी योजना पूर्णत्वास नेण्याची त्यांची इच्छाशक्ती नसल्याने तो प्रश्नही भिजत पडला आहे.

मार्गी लावलेली कामे

--

-सटाण्यातील विकासकामांसाठी ३ कोटी

-अवकाळी पाऊस नुकसानभरपाई ६५ कोटी

-आश्रमशाळांसाठी २५ कोटींचा निधी

-रस्ते डांबरीकरणासाठी ५० कोटी

-सिंचनासाठी ७५ कोटींचा निधी

-बागलाण शहराचा बायपास केला मंजूर

--

विधिमंडळात आवाज

विधानसभा अधिवेशनात जिल्ह्यातून सर्वाधिक तारांकित व लक्षवेधी प्रश्न आपण मांडलेले असल्याचा दावा आमदार दीपिका चव्हाण यांनी केला आहे. एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच जनतेच्या संपर्कात असल्याचा दावादेखील आमदार चव्हाण यांनी केलेला आहे. विधानसभा अध्यक्ष तालिकेवर कामकाजाची संधीही त्यांना मिळाली आहे.

--


आमदार म्हणतात...

--

आश्वासनांची करणार पूर्ती

बागलाण विधानसभा मतदारसंघातील जनतेने प्रथमच आमदाररुपाने महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपणास बहुमान मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहणे आपणास निश्चितच आवडणार आहे. येत्या दोन वर्षांत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

-दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

--

विरोधक म्हणतात...

--

मतदारसंघाच्या समस्या कायम

--

बागलाण विधानसभा मतदारसंघात गत तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. बागलाण हा आदिवासीबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे आहेत. आमदारनिधीतून होणारी कामे सालाबादाप्रमाणे सुरूच असतात. या विकासाची टिमकी आमदार चव्हाण यांनी वाजवू नये. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रतिनिधित्वामुळे बागलाणमधील विकासकामांना भाजपच्या राज्यात विकासची फळे येऊ लागली आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. गत दोन वर्षांतील आमदारांच्या निष्क्रिय कारभारामुळे सटाणा नगरपालिका मतदारांनी भाजपच्या ताब्यात दिली आहे. सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व बायपास या समस्या शहरवासीयांसाठी आजही जैसे थे आहेत. केळझर पाणी योजना पूर्णत्वास नेण्याची त्यांची इच्छाशक्ती नसल्याने तो प्रश्न त्यांनी भिजत ठेवला होता. मात्र, हे सर्व प्रश्न भाजप सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे सोडविण्यात येतील. यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे योगदान मोठे असणार आहे.

-साधना वसंत गवळी, जिल्हा परिषद सदस्या, भाजप


--

शब्दांकन ः कैलास येवला


-----------------


मतदारसंघ ः सिन्नर


कामाची तळमळ पण, पाणीप्रश्न जैसे थे


सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांना पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता आलेला नसला, तरी तीन वर्षांत टँकरमुक्ती करण्याच्या दिशेने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या तीन वर्षांत जलयुक्त शिवार व काही पाण्याच्या योजना मंजूर करून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याबरोबरच या मतदारसंघात रस्त्यांचा प्रश्नही कायम असून, तो सोडविण्यासाठी मात्र त्यांची दमछाक होत आहे. मतदारसंघातील इतर समस्या कायम असल्या, तरी त्यातील काही प्रश्न वाजे यांनी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उर्वरित दोन वर्षांत त्यांना अधिक काम करावे लागणार आहे.

सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात येवल्यापाठापोठ सिन्नरची निवडणूक चुरशीची व लक्षवेधी ठरली. राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या या मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांचे पक्षांतरही बरेच गाजले. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. तीनवेळा आमदार झालेल्या कोकाटे यांच्या विरोधात शिवसेनेने पराग ऊर्फ राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. कोकाटे यांचा अनुभव व त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा पराभव सोपा नव्हता. पण, मतदारांनी त्यांना नाकारले व वाजे निवडून आले. आता त्याला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत आमदार वाजे यांनी मतदारसंघात विविध कामे केली असली, तरी ती पुरेशी नाहीत.

पाणीप्रश्नाला प्राधान्य

विडी कारखानदारीमुळे सिन्नरचे नाव राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक उद्योगांनी येेथे पाय रोवले. आैद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या भागात पाणीप्रश्न मात्र नेहमीच विकासाला अडचणीचा विषय ठरला. आमदार वाजे यांनी तीन वर्षांत कडवा कॅनॉल दुरुस्तीच्या ५३ कोटी ३६ लाखांच्या योजनेला मंजुरी मिळविली. या योजनेतून चाऱ्यांमधून होणारी पाणीगळती थांबली. शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळू लागले. त्यात ३५ कोटींच्या आसपास काम झाले आहे, तरीसुद्धा या योजनेतून १४ दिवसांनी मिळणारे पाणी आता चार दिवसांत मिळू लागेल आहे. या योजनेबरोबरच जलयुक्त शिवार योजनेत राज्य सरकार, कृषी खाते, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकसहभागातून १३ कोटी ३९ लाखांचे काम करण्यात आले. त्यात ३८ गावांत १०१ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे ६४.५८ कोटी लिटर पाणीसाठा वाढला.

२२ गावांत जलयुक्त शिवार

२०१७-१८ मध्ये २२ गावांतील २८२ ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे होणार आहेत. जलयुक्त शिवाराबरोबरच १५ गावांत १२ लाख ९४ हजार रुपये खर्च करून २३ बंधारे बांधले. त्याचप्रमाणे स्थानिक विकासनिधीमधून बंधारे बांधकामास ६४ लाख ९९ हजार रुपये दिले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ७ कोटींची कामे व मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी २० कोटी ३४ लाखांची मंजुरी हीसुद्धा पाणीप्रश्न सोडविण्याच्या दिशेने उपयोगी ठरणार आहे. सिन्नर शहरातील गेल्या पंचवार्षिक योजनेला चालना देण्याचे काम वाजे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कोळओहळ नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पाणीप्रश्नाबरोबरच विजेचा प्रश्नही या मतदारसंघात मोठा आहे. या मतदारसंघातील शहा येथे २२० केव्ही, १०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्च दाब उपकेंद्राला मंजुरी दिल्यामुळे पूर्व भागात कमी दाबाने मिळणाऱ्या विजेचा प्रश्न सुटणार आहे. नवीन पाच उपकेंद्रांनाही मंजुरी देण्यात आली आहे. हे काम येत्या काही दिवसांत होईल.

या प्रश्नांकडे दुर्लक्ष

परिसरात ३० तलाठी कार्यालये व निवासी इमारत बांधकाम यासाठी ५ कोटी ७९ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. आरोग्य, रस्ते, यांसह या मतदारसंघात कामे आहेत. पण, तरीही अनेक गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी दोन वर्षांत विविध कामे करण्याचा आमदार वाजे यांचा संकल्प असला, तरी त्यात पाण्याचा प्रश्न हा मुख्य विषय आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्त करणे या विषयालाही प्राथमिकता देणार आहे. याबरोबरच मूलभूत प्रश्न सोडविण्यावरच भर राहणार आहे.

मार्गी लागलेली विकासकामे

--

-कडवा कॅनॉल दुरुस्तीसाठी ५३ कोटी ३६ लाख निधी

-जलयुक्त शिवार योजनेत १३ कोटी ३९ लाखांची कामे

-१५ गावांतील २३ बंधाऱ्यांसाठी १२ लाख ९४ हजार निधी

-बंधारे बांधकामास ६४ लाख ९९ हजार रुपये निधी

-मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ७ कोटींची कामे

-मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी २० कोटी ३४ लाखांची मंजुरी

--

विधिमंडळात आवाज

विधानसभेमध्ये शंभर टक्के उपस्थिती नोंदणारा आमदार म्हणून राजाभाऊ वाजे यांचा उल्लेख केला जातो. विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेणे, लक्षवेधी मांडणे, चर्चेत सहभागही ते घेत असतात. सिन्नर मतदारसंघातील विविध विकासकामांप्रश्नी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून, त्यामुळे या मतदारसंघातील विकासकामे वेळीच मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

--

आमदार म्हणतात...

--

महत्त्वाच्या कामांना देणार गती

तीन वर्षांत टँकरमुक्त मतदारसंघ व्हावा यासाठी प्रयत्न केले व त्याला यशही आले. तालुक्यातील पाण्याची समस्या मोठी आहे. त्या दिशेने जलयुक्त शिवारात मोठ्या प्रमाणात कामे घेतली. त्याचप्रमाणे अनेक योजनाही हाती घेतल्या. रस्त्यांचे मोठे जाळे असल्यामुळे शिवार रस्ता हा मोठा प्रश्न आहे. वीज उपकेंद्रांना मान्यता व विविध कामे झाली असली, तरी येत्या दोन वर्षांत महत्त्वाची कामे गतीने करणार आहे. औद्योगिक प्रश्न असो की रस्ते महामार्गाचे प्रश्न, त्यासाठी खासदारांबरोबर प्रयत्न केले व त्याला चालनाही मिळाली.

-राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर

--

विरोधक म्हणतात...

--

लोकाभिमुख कामांची वानवा

--

लोकांमध्ये राहणे म्हणजे लोकाभिमुख कामे केली असे होत नाही. त्यासाठी लोकांची कामे करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची एकही योजना सुरू नाही. जलयुक्त शिवारात जेथे कामे केली तेथे पाऊसच पडला नाही. माझ्या काळात ज्या योजना सुरू केल्या त्यांचा पाठपुरावा करून त्या सुरू करणे आवश्यक होते. त्यातून पाण्याचा प्रश्न सुटला असता. पण, त्याचा पाठपुरावा केला नाही. जलयुक्त शिवारातील कामातही गैरव्यवहार झाला. एकाच कामाचे बिल वेगवेगळ्या ठिकाणी काढल्याची तक्रार मी करणार आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे टँकरमुक्ती झाली असली, तरी ती तात्पुरती आहे. रस्त्यांच्या प्रश्नांबरोबरच विविध समस्या मतदारसंघात आहे. तीन वर्षांत त्यात काही बदल झाला नाही. सिन्नर नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यातही प्रश्न सोडविण्यात अपयश आले. सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाचे कामही केवळ ठेकेदाराने पाठपुरावा केल्यामुळेच पूर्ण होत आहे.

-माणिकराव कोकाटे, माजी आमदार

---

शब्दांकन ः गौतम संचेती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांना कचरा कंपोस्ट सक्तीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील ७५ पेट्रोलपंपांवरील शौचालये सार्वजनिक केल्यानंतर महापालिकेने आता शहरातील हॉटेल्सकडे मोर्चा वळवला आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या शहरातील हॉटेलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांना आता हॉटेलमध्येच कचरा कंपोस्ट करावा लागणार आहे. त्यासाठी तेथेच प्रकल्प तयार करावा लागणार आहे. शहरातील १४६ हॉटेलांमधील कचरा महापालिका ३१ डिसेंबरपासून स्वीकारणार नसल्याने हॉटेलचालकांची पंचाईत होणार आहे.

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात आपले रँकिंग सुधारण्यावर भर दिला आहे. येत्या जानेवारीत पुन्हा रँकिंग होणार असल्याने पालिकेने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. पेट्रोलपंपांवरील शौचालये सार्वजनिक केल्यानंतर कचरा विलगीकरण आणि कचऱ्याच्या कंपोस्ट प्रकल्पावर पालिका भर देत आहे. कंपोस्टसाठी स्वच्छ भारत अभियानात पालिकेला २२ गुण मिळणार आहेत. त्यामुळे महापालिकेने बड्या बांधकाम प्रकल्पांसह आता शहरातील मोठ्या हॉटेलांनाही कचरा कंपोस्ट करण्यासाठी सक्ती केली आहे. महापालिकेने याबाबत सर्वेक्षण केले असून, त्यात शंभर किलोंपेक्षा जास्त कचरा दररोज निर्माण करणाऱ्या हॉटेल्सचा शोध घेतला आहे.

..तर कारवाई

सध्या पालिकेच्या घंटागाड्यांमधून हॉटेलांचा कचरा गोळा करून तो खत प्रकल्पावर नेला जातो. हॉटेलांचा ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या गोळा केला जातो. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १४६ हॉटेलांमध्ये शंभर किलोंपेक्षा जास्त कचरा संकलन केले जाते. त्यामुळे या हॉटेलचालकांना नोट‌िसा पाठवून ३१ डिसेंबरपर्यंत स्वतःचा घनकचरा प्रकल्प उभारा, अशा सूचना करण्यात येत आहेत. पालिका ३१ डिसेंबरपर्यंत कचरा स्वीकारणार असून त्यानंतर या हॉटेल्सनी अंमलबजावणी केली नाही तर कारवाई केली जाणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत कचरा कंपोस्ट प्रकल्प उभा करा, अन्यथा कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावा अशा नोट‌िसा पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे शौचालयांपाठोपाठ हॉटेल्सचाकांचीही कोंडी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार-सिम लिंकिंगचा जाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सरकारने डिजिटल इंडिया संकल्पनेतून गॅस, बँक खाते आदी सुविधांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य केले आहे. त्याच धर्तीवर मोबाइलधारकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाशी आधार लिंकिंग सक्तीचे केले गेले आहे. मात्र, सुसूत्रतेअभावी आधार-मोबाइल क्रमांक लिंकिंग जाचक ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

आधार-मोबाइल क्रमांक लिंकिंग करण्याबाबतचे संदेश सर्व मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून सध्या ग्राहकांना दिले जात आहेत. मात्र, आधार लिंकिंगमध्ये अनेक जणांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शिवाय मोबाइल कंपन्यांच्या अधिकृत सेवा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना या सेवेसाठी काही पैसे आकारून लुबाडले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारांमुळे नागरिकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे.

दहशतवादी कारवाया, तसेच सायबर क्राइमसंबंधी प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने मोबाइल क्रमांकाचे आधार लिंकिंग महत्त्वाचे ठरते. बोगस सिम कार्ड वापरण्यावर निर्बंध घालणे त्यामुळे शक्य होईल. याचबरोबर देशातील मोबाइल ग्राहकांची अचूक माहिती सरकारी यंत्रणांना उपलब्ध होईल, या उद्देशाने केंद्र सरकारने मोबाइल ग्राहकांना आपले मोबाइल क्रमांक आधार कार्डाशी जोडण्याचे आदेश दिले आहेत.

--

ठशांअभावी प्रतिज्ञापत्राची सक्ती

देशभरात मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून सर्व रिटेल आऊटलेटमध्ये आधार लिंकिंगची सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना याबाबतचे लेखी संदेश, तसेच ध्वनिफितीद्वारे सूचनाही दिल्या जात आहेत. या सूचनांचे पालन करीत मोबाइल ग्राहक मोठ्या संख्येने या सेवा केंद्रांमध्ये येऊ लागले आहेत. मात्र, अनेकांच्या बोटांचे ठसे पूर्वीच्या ठशांशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. वारंवार प्रयत्न करूनही हे जुळत नसल्यामुळे नागरिकांना चक्क प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले जाऊ लागले आहे.

--

सर्व्हिस चार्जच्या नावाखाली लूट

एकीकडे महसूल विभागासह अन्य शासकीय विभागांनी प्रतिज्ञापत्राची सक्ती बंद केली असून, त्याजागी स्वयं घोषणापत्राची अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना मोबाइलच्या आधार लिंकिंगसाठी ग्राहकांना प्रतिज्ञापत्रासाठी शेकडोंचा खर्च करावा लागत आहे. दुसरीकडे मोबाइल कंपन्यांच्या सेवा केंद्रांमध्ये आधार लिंकिंगसाठी ग्राहकांकडून प्रत्येकवेळी वीस रुपये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली उकळले जात आहेत. सुशिक्षित ग्राहकांकडून याबाबत खोलात विचारणा झाल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व गोष्टीला सर्वसामान्य ग्राहक मात्र, निमूटपणे बळी पडताना दिसत आहे. यासंदर्भात शहरातील एका मोबाइल विक्रेत्याने सांगितले की, आधार लिंकिंगची सुविधा पूर्णतः मोफत आहे. शासनाची योजना असल्यामुळे यात कुठलेही छुपे खर्च असण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही.

--

आधार लिंक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. तरीही यासंदर्भात अनेक वावड्या उठत आहेत. मात्र, परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

-अभिझर दानावाला, मोबाइल विक्रेता

--

काही विक्रेते आधार-मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी पैसे आकारत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड पडत आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी.

-प्रकाश पवार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीस देवस्थाने हटविली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सिडकोपाठोपाठ सातपूर व गंगापूर रोड भागात गुरुवारी सकाळी १० वाजेपासून अनधिकृत देवस्थाने हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभरात रस्त्यांना अडथळा ठरणारी एकवीस धार्मिक स्थळे हटविली गेली. चोख पोलिस बंदोबस्त व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून मंत्र घोषात मूर्ती उचलण्यात आल्या. देवस्थाने हटविताना भाविकांकडून तीव्र

नाराजी व्यक्त केली जात होती.

सकाळी १० वाजता सातपूरच्या महादेववाडीपासून अनधिकृत देवस्थानांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण मोहिमेसाठी महापालिकेचे शंभर कर्मचारी, सहा विभागांचे विभागीय अधिकारी, दोन अतिक्रमण उपायुक्त, पोलिसांचे ८५ कर्मचारी, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक, महापालिकेच्या व पोलिसांच्या मिळून ४० वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला होता. देवस्थानांच्या अतिक्रमण मोहिमेत महादेववाडीतील सप्तश्रुंगी मंदिर, विठ्ठल मंदिर, सातपूर कॉलनीतील म्हसोबा, खंडोबा व ओंकारेश्वर

महादेव मंदिर, वडाच्या वृक्षाखाली असलेली ५ लहान मंदिरे, तर श्रमिकनगर येथील शनी मंदिराचे अतिक्रमण महापालिकेने पोलिस बंदोबस्तात काढले.

कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतल्याचे पहायला मिळाले. भाविकांची गर्दी काही ठिकाणी झाली होती. परंतु, पोलिसांनी त्यांना अतिक्रमण मोहिमेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. काहींनी अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत १२ देवस्थानांची अतिक्रमणे महापालिकेने हटविली.

भाविकांची गर्दी

सातपूर कॉलनीतील खंडोबा, म्हसोबा, ओंकारेश्वर महादेव मंदिर व श्रमिकनगरचे शनी मंदिराचे अतिक्रमण काढताना भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु, पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने भाविकांना दूर उभे करण्यात आले होते. तसेच अतिक्रमण काढत असलेल्या ठिकाणचा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता.


अश्रूंचे फुटले बांध

वर्षानुवर्षे श्रद्धेने पूजा करीत असलेला देवच विस्थापित होत असल्याचे पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. खंडोबा महाराज मंदिराचे अतिक्रमण काढताना विश्वस्तांचे डोळे भरून आले होते. ओंकारेश्वर मंदिराचे अतिक्रमण

काढताना महिला भाविकांना अश्रू अनावर झाले. परंतु, न्यायालयाच्या आदेशावरूनच देवस्थानांची अतिक्रमणे काढली जात असल्याची समजूत महापालिका अधिकारी व पोलिसांकडून काढली जात होती.

महापालिकेचेच पुजारी

भाविकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये यासाठी प्रत्येक देवस्थानाचे ‌अतिक्रमण काढताना मूर्तीची यथोसांग पूजा केली जात होती. महापालिकेचे कर्मचारी असलेल्या विवेक जोशी यांनी पुजाऱ्याचे काम केले. प्रत्येक मूर्तीची विधीवत पूजा त्यांनी मूर्ती हलविल्या. लहान तसेच मोठ्या सर्वच देवस्थानांतील मूर्तींची त्यांनी पूजा केली. पुजेसाठीचे साहित्यही जोशी यांनी घरून आणले होते.

नगरसेवक शांत

देवस्थानांची अतिक्रमणे हटविली जात असताना मनसे गटनेता सलिम शेख व नगरसेवक शशिकांत जाधव यांनी मोहिमेच्या ठिकाणी हजेरी लावली. कुठलाही हस्तक्षेप न करता केवळ शांततेत उभे राहण्याची भूमिका दोघांनी घेतली.

भाविकांकडून प्रश्नांचा भड‌िमार मात्र नगरसेवकांना सहन करावा लागला.

ही मंदिरे हटविली

सप्तशृंगी मंदिर

विठ्ठल मंदिर

सातपूर कॉलनीतील म्हसोबा

खंडोबा मंदिर

ओंकारेश्वर

महादेव मंदिर

वडाच्या वृक्षाखाली असलेली ५ लहान मंदिरे

श्रमिकनगर येथील शनी मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वामनदादा कर्डक स्मारक टाकणार कात

$
0
0

मटा इम्पॅक्ट

--

वामनदादा कर्डक स्मारक टाकणार कात


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडचे वामनदादा कर्डक स्मारक आता कात टाकणार आहे. या स्मारकासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तीन महिन्यांत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच काम सुरू होईल, अशी माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी ‘मटा’ला दिली.

या स्मारकातील प्रस्तावित कामात तीनशे आसनांचे सभागृह, वामनदादांचा पुतळा राहणार आहे. दादासाहेब फाळके व कुसुमाग्रज स्मारकाप्रमाणे या स्मारकाला लूक दिला जाणार असल्याचे नगरसेविका मीरा हांडगे यांनी सांगितले. जेलरोडच्या स्मशानभूमीशेजारीच पावणेदोन एकर परिसरात असलेले हे खुले स्मारक दहा वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या स्मारकावरील डोमच काहीसा सुस्थितीत असून, येथे गाजरगवत, काटेरी झाडे वाढली आहेत. वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. स्मारकात दिवसा मोकाट जनावरे, भटकी कुत्री, तर रात्री मद्यपी, जुगारी येऊन बसतात. त्यामुळे स्मारकाची दुरवस्था दूर करून सुशोभीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. ‘मटा’ने या स्मारकाच्या दुरवस्थेचे वृत्त वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नगरसेविका मीरा हांडगे, नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे, सचिन हांडगे आदींनी पुढाकार घेऊन स्मारकाला झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

--

पुतळा अन् सभागृह उभारणार

मीरा हांडगे यांनी सांगितले, की स्मारकात मोठे ओपन थिएटर आहे. उर्वरित जागा पडून आहे. या जागेत प्रशस्त हॉल तयार केला जाणार आहे. त्याची क्षमता तीनशे आसनांची असेल. त्यामध्ये युवकांसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, बचतगटांचे मेळावे, प्रशिक्षण, व्याख्यान, सेमिनार घेतले जातील. दुसऱ्या जागेत वामनदाद कर्डक यांचा जीवनपट चित्ररुपाने येथे सादर केला जाईल. वामनदादांचा पुतळाही उभारला जाणार आहे.

--

विज्ञान आधारित खेळणी बसविणार

या स्मारकात विज्ञानावर आधारित खेळणी बसवून मुलांच्या बुद्धीला चालना दिली जाणार आहे. स्मारकाच्या आवारात वामनदादा कर्डक वाचनालय असून, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीच ते चालवितात. नोंदणी, शिस्त, स्वच्छता आदी कामे तेच करतात. नवीन सभागृह झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन मिळणार आहे.

सध्या स्मारकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. येथे स्वच्छतेसाठी महापालिकेचा कर्मचारी नाही. नव्या सभागृहात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतील.

--

जेलरोड येथील वामनदादा कर्डक स्मारकाच्या विकासासाठी पाच कोटी ४० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला अाहे. तो मंजूर करून तीन महिन्यांत स्मारकाचे काम सुरू कसे होईल, यासाठी पाठपुरावा करीत आहे. त्याचा सर्वच घटकांना उपयोग होईल.

-बाळासाहेब सानप, आमदार

--

वामनदादा कर्डक स्मारक सुस्थितीत आणून त्याला वेगळा लूक देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्मारकाचा वापर वाढला, तरच त्याची देखभाल-दुरुस्ती होईल. स्मारकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी लवकरच शोभेची झाडे, लॉन्स, पथदीप बसविले जाणार आहेत.

-मीरा हांडगे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेरॉक्स प्रतींवर परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेस यंदा दिवाळीनंतर का होई ना कसाबसा मुहूर्त लागला. पण यंत्रणेतील गलथान कारभारामुळे या परीक्षेत प्रश्नपत्रिकेच्या प्रतींची तूट शहरातील बड्या शाळांनाही जाणवली आहे. त्यामुळे ऐनवेळी गोपनीयतेचा मुद्दा झाकून ठेवत झेरॉक्स प्रतींवर चाचणी पार पाडण्याची वेळ शहरातील काही शाळांवर ओढवल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

अगोदरच या परीक्षेला उशीर झाल्याने दिवाळीतील सुट्यांनंतरचा मुहूर्त लागला. या परीक्षेसाठी मराठी व इंग्रजी या भाषांसह विज्ञान आणि गणित असे चार विषय देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत. ८ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही परीक्षा उद्या (११ नोव्हेंबर) पर्यंत सुरू राहणार आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

अंतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन धोरणानुसार ही संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा पार पडते आहे. एका शैक्षणिक वर्षात सुमारे तीन मूल्यमापन चाचण्या आयोजित करणे प्रशासनास अपेक्षित आहे. असे असतानाच अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर दिवाळीनंतर या परीक्षेचा मुहूर्त लागला. या चाचणीतील उत्तरपत्रिकांची तपासणी शालेय स्तरावर अपेक्षित आहे. शाळा यानंतर हे गुण शिक्षण विभागाकडे सादर करतील.

या अगोदर पायाभूत चाचणीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांच्या हाती लागल्याचे प्रकार उघडकीस आल्याने या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील गोपनीयतेचा मुद्दा अधोरेखीत झाला होता. या प्रसंगातून शहाणे होत प्राधिकरणने आता केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर जबाबदारी निश्चित करत प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना केल्या होत्या. या प्रकाराबद्दल पालकांमध्ये नाराजी आहे.

अगोदरच या परीक्षेला उशीर झाल्याने दिवाळीतील सुट्यांनंतरचा मुहूर्त लागला. मराठी व इंग्रजी या भाषांसह विज्ञान आणि गणित असे चार विषय आहेत. आता विद्यार्थ्यांच्या हाती झेरॉक्स प्रश्नप्रत्रिका पडल्यामुळे त्यांच्यासह पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.


जबाबदार कुणाला धरणार?

शिक्षकांची बाजू मांडताना महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नंदलाल धांडे यांनी सांगितले की, या प्रश्नाबाबत शिक्षण विभागाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी संकलित मुल्यमापन चाचणीसारखे प्रयोग राबविले जात आहेत. या योजना अत्यंत जबाबदारी आणि पारदर्शक पध्दतीने राबविले जाणे गरजेचे असताना यंत्रणेतील ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकांच्या संख्येची निर्माण होणारी तूट आणि त्यावर झेरॉक्ससारख्या विरोधाभासी उपायातून काढला जाणारा पर्याय नाहक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना न केलेल्या चुकीसाठी जबाबदार धरण्यास लावणारा आहे.


मटा भूमिका
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेंतर्गत शालेय शिक्षणाच्या धोरणात अनेक बदल केले गेले असले तरी त्याच्या काटेकोर अंमलबजावणीत मात्र शिक्षण विभागाचे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. प्रारंभी पायाभूत चाचणी परीक्षेचे पेपर फुटले, तर आता संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांच्या प्रतीच कमी पडल्या. हे सगळेच अनागोंदीचा कडेलोट झाल्याचे लक्षण आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा उद्देश यात असला तरी गलथान कारभारात सातत्य राहिल्याने शैक्षणिक प्रगतीऐवजी अधोगती झाली तर आश्चर्य वाटू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरीच्या विकासासाठी ‘संदीप’चा हातभार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अंजेनेरी गावाचा विकास आता संदीप फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून करण्यात येणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत संदीप फाउंडेशनचे उपकुलगुरू कर्नल रामाचंद्र यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन याबाबत माहिती दिली.

अंजेनेरी हे भारतीय संस्कृतीचा वारसा असलेले प्राच‌ीन नगर आहे. हे गाव ‘आदर्श-स्मार्ट गाव’ बनविण्यासाठी संदीप फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप झा यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू आहेत.

सौरउर्जा, लोकांच्या हाताला रोजगार, शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता या सोबत जलसंधारणचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अंजनेरीला देशातील आदर्श गाव करण्यात येणार असल्याचे संदीप फाउंडेशनचे रामाचंद्र यांनी अंजेनेरी बैठकीत स्पष्ट केले. त्यासाठी संदीप फाउंडेशन आपला सीएसआर फंड देणार असल्याचे त्यांनी सांग‌तिले. आदर्श ग्राम योजनेत शैक्षणिक संस्थाचा हातभार लावावा यासाठी एआयसीटीईच्या सूचनेने खासदार गोडसे यांनी दत्तक घेतलेले अंजेनेरी येथे संदीप फाउंडेशन ही शैक्षणिक संस्था काम करणार आहे. बुधवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मनपा नगरसेवक शशिकांत जाधव, प्राचार्य प्रशांत पाटील, आदर्श गाव सल्लागार रामशिष, सरपंच पुष्पा बदादे, उपसरपंच पंडित चव्हाण, गणेश चव्हाण, संपत चव्हाण आदी उपस्थित होते.

अंजनेरीच्या विकासासाठी गावातील लोकांनी सहभाग नोंदवावा. तसेच आजपर्यंत गावात ५० कामे झाली असून येणाऱ्या काळात गावाचा कायापालट झालेला दिसेल. गावाच्या विकासासाठी संदीप फाउंडेशन मदत होणार आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायऱ्यांवर अखेर मिळाले नेटवर्क

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाभार्थींच्या जाहिरातीची पोलखोल करून भाजप सरकारला धारेवर धरणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनाच मोबाइल नेटवर्कच्या (रेंज) लाभासाठी चक्क राष्ट्रवादी भवनाच्या पायऱ्यांवर बसावे लागले.

पत्रकार परिषद संपवून हॉलमध्ये फोनाफोनी करत असतांना त्यांना रेंजच मिळत नसल्यामुळे त्या वैतागल्या व त्यानंतर त्यांनी हॉलबाहेर येऊन पायऱ्यांवर बसून संवाद साधला.

लाभार्थी प्रकणावरुन आघाडी सरकारविरुध्द आक्रमक झालेल्या या महिला कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ होत्या. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या बाहेर आल्या त्यावेळेस त्यांच्या बरोबर नाशिकच्या कार्यकर्त्यांही होत्या. त्यांनाही हा रेंजचा प्रॅाब्लेम आाल्यामुळे त्यांनी पाय-यावर बसणे पसंद केले. या रेंजबद्दल त्यांनी आघाडी सरकारला मात्र दोष दिला नाही ही गोष्ट मात्र त्यात नवलाईची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज स्वागत; उद्या चर्चा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिकमधील मनसेच्या डॅमेजकंट्रोलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. शुक्रवारी ते नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले. सायंकाळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठाकरेंच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून, ते भाजपच्या गल्ली ते दिल्लीच्या कारभारावर तोफ डागण्याची शक्यता आहे. तसेच समृद्धी प्रकरणातील शेतकऱ्यांचीही ते भेट घेणार आहेत.

या दौऱ्यात संघटनात्मक फेरबदलासह नाशकात मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस ते नाशकात मुक्काम ठोकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमदानानंतर काढले अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये सप्तशृंगी गड व नांदुरी येथे पूर्णतः प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सप्तशृंगी ग्रामस्थांसह तालुक्यातील ग्रामसेवक, शिक्षक आदींनी गडवार चार तास स्वच्छता, श्रमदान व जनजागृती केली. यावेळी गडावरील अतिक्रमण काढण्यात आले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील विभाग, वन विभाग, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, सप्तशृंग ट्रस्ट, ग्रामस्थ व व्यापारी असोसिएनच्या संयुक्त विद्यमाने गडावर स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी जनजागृती व स्वच्छता श्रमदान मोहीम हातात घेण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता कळवणचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमन कुमार मित्तल, प्रतीभा संगमनेरे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम आदींनी श्रमदान केले.

प्रशासनाची कारवाई

श्रमदानानंतर अनेक लोकांनी दुकानाबाहेर पत्र्याचे व प्लास्टिक शेड करून अतिक्रमण केले असल्याचे आढळले. हे सर्व अतिक्रमण उपजिल्हाधिकारी अमन कुमार मित्तल, तहसीलदार कैलास चावडे यांनी काढले. श्रमदानप्रसंगी स्वच्छ भारत समन्वयक सचिन मुठे, ग्रामसेवक रतिलाल जाधव, विजय वाघ, गणेश बर्डे , ग्रामस्थ संदीप बेनके , राहुल बेनके , तुषार बर्डे, अजय दुबे, राजू वाघ, नीलेश कदम, राहुल पोटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड-इंदूर मार्गाचे भिजत घोंगडे कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या व दोन्ही राज्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद तसेच वरिष्ठ पातळीवर हे सुरु करण्याबाबत घोषणा होऊनही प्रत्यक्षात मात्र या मार्गाचे भिजत घोंगडे आहे. दरम्यान हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून वर्षानुवर्षे आंदोलन करणाऱ्यांना किमान मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या. केंद्रीय पातळीवर रेल्वे मार्गाची दखल घेतली गेली ही बाब समाधान देणारी असली तरीही प्रत्यक्षात काम कधी होणार? हा प्रश्न आहेच.

मनमाड इंदूर रेल्वे मार्ग व्हावा यासाठी केंद्र शासन स्तरावर प्रयत्न झाले. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद देखील झाली. रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण मार्गाचा नकाशा या मार्गात कोणती व किती स्थानके असतील त्यातील जंक्शन स्थानक कोणते असेल हे निश्चित झाल्याचे सांगितले गेले. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने जुलै महिन्यात तात्कालिक रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रथमच धुळ्यात येऊन आढावा बैठक घेतली. भूमिपूजन काही महिन्यात होणार याची ग्वाही दिली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही मार्गाला ग्रीन सिग्नल असल्याचे सूतोवाच केले सकारात्मक धोरण असल्याचे सांगितल्याने सर्व तांत्रिक बाजू पूर्ण होऊन हा मार्ग लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप सर्वेक्षणानंतर भूमीग्रहण करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. या रेल्वे मार्गाकरिता भूमीग्रहण करण्यासाठीच वेळ लागत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रभू यांच्यानंतर पियुष गोयल या नव्या रेल्वे मंत्र्यांची नियुक्ती यामुळेही हे काम रखडल्याचे सांगितले जाते.
मनमाड इंदूर रेल्वे मार्ग हा हजारो कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सर्वेक्षण होऊनही मार्ग प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. या मार्गासाठी भूमीग्रहण हा मुद्दा कळीचा आहे. त्यामुळे विलंब होत असल्याचे दिसते.

- नितीन पांडे, पदाधिकारी, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला गुप्त खलबते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, निवृत्ती जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथे तळ ठोकला आहे. तसेच पालिका काबीज करण्याच्या इराद्याने काँग्रेस तयारीला लागली आहे.

शिवसेना त्र्यंबकमध्ये रुजविण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतलेल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या भावना जागविण्यात येत आहेत. विजय करंजकर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास मुळावर पाणी घालून बहर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे नोटबंदीने पर्यटन व्यवसायास झळ पोहचली. त्या पाठोपाठ येथील आयकर खात्याने चौकशी केल्यामुळे येथील पुरोहित धास्तावले असतांना थेट मातोश्रीवर याची वार्ता पोहचली होती. तेव्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन अन्यायकारक कारवाया थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. अन्यायाच्या विरूद्ध लढा देणाऱ्या शिवसेनेस या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक पसंती मिळेल, असा येथील शिवसैनिकांसह जिल्हा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच सरसावलेल्या शिवसेनेकडे उमेदवार आकृष्ट होत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या गोटात असेलेले गर्दीचे वातावरण आता सेनेत दिसायला लागले आहे.

सत्तेच्या दावेदारीत असलेल्या भाजपला सेनेबरोबर लस्त देतांनाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या अव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. शहरात वर्चस्व कोणत्या पक्षाचे राहणार या इराद्याने काँग्रेस तयारीला लागली आहे. नोटाबंदी वर्षपूर्ती काळा दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आवेशाने एकूण चित्र हळहळू स्पष्ट होत आहे. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप सहा दिवसांचा अवधी असतांना मार्चेबांधणी होत आहे. गुप्त खलबते आणि चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सदोष मनुष्यवधाचा संशयितांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावात धात्रक वस्तीवर झालेल्या विषबाधेप्रकरणी संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून सुनील वडजे, सीताराम वाकळे यांना अटक झाली आहे.

बायर सीडस् या बियाणे कंपनीने शेतकऱ्यांसाठी बुधवारी (दि. ८) ‘संकरीत टोमॅटो’ या विषायावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रानंतर कंपनीने दिलेल्या स्नेहभोजनानंतर सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. त्यात उमराळे येथील अतुल पांडुरंग केदार (४१) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच काही शेतकऱ्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागला. कार्यक्रमाचे आयोजक व केटरर्स सुनील पोपट वडजे (रा. मडकीजाम, ता. दिंडोरी) आणि जेवण बनविणारा आचारी सीताराम भिमा वाकळे (रा. इंदिरानगर, दिंडोरी) यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह कंपनीचे रिजनल क्रॉप मॅनेजर सुनील मुळे व इतर अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

८५ जणांवर उपचार

सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून, ८५ शेतकरी दिंडोरी आणि नाशिकमधील वेगवेगळ्या खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात १२ तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १३, उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ५ ,माहुली हॉस्पिटल, दिंडोरी येथे ४, क्षीरसागर हॉस्पिटल दिंडोरी येथे ९, नाशिक येथील साईसिद्दी हॉस्पिटल येथे १४ , अपोलो हॉस्पिटल ११, सिनर्जी हॉस्पिटल १०, संजीवनी हॉस्पिटल ३, मॅग्नम हॉस्पिटल २, यशवंत हॉस्पिटल ३ असे ८५ शेतकरी उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैधकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी दिली. आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी विविध रुग्णालयात जावून रुग्णांची विचारपूस केली.

मठ्ठा बेतला जिवावर!

विषबाधेने मृत्यूमुखी पडलेले पहिलवान अतुल केदार यांच्यांवर गुरुवारी उमराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. केदार हे कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. ते नावाजलेले पहिलवान होते. अतुल यांनी जेवण न करता फक्त मठ्ठा घेतल्याची चर्चा आहे. अतुल हे पांडुरंग केदार यांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांना १३ वर्षांची मुलगी व ११ वर्षांचा मुलगा आहे. घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. बाधित शेतकऱ्यांची भरपाई कंपनीने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूवर दंडाची मात्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूसह साथीच्या आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने आता रोगराई पसरवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

तुमच्या घरात डेंग्यू फैलावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास संबधित घरमालकाला पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच बांधकामांच्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकालाही पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय-आरोग्य समितीच्या येत्या सभेत मांडला जाणार असल्याची माहिती समिती सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिली.

शहरात डेंग्यूसह स्वाइन फ्लू आणि साथीच्या आराजांनी थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारीत डेंग्यू रुग्ण संख्या जेमतेम चार होती. ऑगस्टमध्ये हीच संख्या ९७ वर गेली. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली, तर ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतील डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या ऑक्टोबरचा उच्चांकही मोडीत काढते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. विविध उपाययोजना करूनही डेंग्यू नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. डेंग्यू फैलावणाऱ्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. घरातील फुलदाणी, फ्रीजमधील ट्रे, घराच्या परिसरातील नारळाच्या करवंट्या, अडगळीतील साहित्य तसेच निकामी टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची पैदास होते.

निरीक्षकांच्या बदल्या

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय नियुक्तीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षकांना चिरीमिरी देऊन सफाई कर्मचारी काम न करता गायब होत असल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत सहाही विभागीय स्वच्छता निरीक्षकांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार असल्याचे सभापती कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिककरांवर ठपका

महापालिकेच्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या घरभेटीत अनेक घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. बंदिस्त घरे व बांधकामांच्या ठिकाणी त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. डेंग्यू डासांच्या प्रादूर्भावास नागरिकच कारणीभूत ठरत असल्याने आरोग्यास बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दंडासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य समितीच्या येत्या सभापटलावर सादर केला जाईल, असे सभापती कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ शिक्षणाचे द्वार पोलिसांना खुले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना या प्रक्रियेत पोलिस कर्मचारी कुठेही मागे राहू नये आणि दैनंदिन जीवनात सामोरे जाव्या लागणाऱ्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विषयांत त्यांचे ज्ञान वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांसाठी आता नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यातील पोलिसांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, महाराष्ट्र पोलिस आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार केला.

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून २०१०मध्ये समाजातील विविध घटकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम सुरू करण्यात आले होते. पोलिसांबरोबर सामंजस्य करार करून त्यांना पोलिस प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांसाठी एमबीए हे शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान २०१५ मध्ये हा सामंजस्य करार संपुष्टात आल्यानंतर काही कारणाने त्याचे नुतनीकरण झाले नव्हते. प्रा. ई. वायुनंदन यांनी कुलगरुपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी मागील उपक्रमांची माहिती घेतली आणि विविध कारणांनी खंडित झालेले हे उपक्रम नव्याने सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. हा शिक्षणक्रम हवालदार, पोलिस नायक, यांच्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय, आयुक्तालय, बिनतारी संदेश आदी कर्मचाऱ्यांसाठी हा शिक्षणक्रम विकसित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे 'जमिनीवर'... कार्यकर्त्यांशी संवाद

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

गेल्या काही निवडणुकांमध्ये बसलेले पराभवाचे धक्के आणि पक्षाच्या शिलेदारांनी दिलेले 'नाराजी'नामे याची गंभीर दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज यांनी नाशिकमधील मनसैनिकांशी चक्क जमिनीवर बसून चर्चा केली.

महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यातील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. अलीकडेच मुंबईतील नगरसेवकांनीही मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. एकामागून एक शिलेदार 'साथ' सोडून गेले. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाला आलेली मरगळ झटकून नवी उभारी देण्यासाठी राज येत्या काळात राज्यभर दौरे करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते नाशिकच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास आठ महिन्यांनी त्यांनी नाशिकला भेट दिली आहे. नाशिकला पोहोचल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे 'मनसे' स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. जमिनीवर बसून त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, या दौऱ्यात ते समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येथील विश्रामगृहात कल्याण, शहापूर, इगतपुरी येथील शेतकरी त्यांनी भेट घेतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी स्मरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आदिवासी जातींत भांडणे लावण्यासह फोडा, झोडा अन् राज्य करा, असे इंग्रजांचे धोरण असल्याने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. त्यांनी समाजबांधवांना संघटित करतानाच जीवनभर इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे प्रतिपादन पुणे येथील शाहीर संदीप ढेंगळे यांनी केले.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २१२ वा जयंतीनिमित्त बोरखिंड, लहवितसह पंचक्रोशीतील विविध गावांतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी आदिवासी क्रांतिकारक एकलव्य, राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार राजाभाऊ वाजे, शिवाजीराव ढवळे, आदिवासी परिषदेचे लकी जाधव, नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेविका संगीता पिंपळे, नगरसेवक रुपेश मुडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

शाहीर ढेंगळे म्हणाले, की ग्रामीण भागात वाचनालय सुरू करून तेथे आदिवासी क्रांतिकारकांची पुस्तके वाचण्यास मिळाली पाहिजेत. राघोजी गुहा, औंढा डोंगर ते बोरखिंडदरम्यान मोटरसायकलवरून मशाल हाती घेत आदिवासी तरुणांनी महारॅली काढली सायंकाळी क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीसाठी नारायण पाडेकर, किसन कवटे, अर्जुन भांगरे, नागू वागळे, दामोदर खोकले, मुरलीधर पाडेकर, पंढरीनाथ डावखरे, श्रावण ठोंबरे, कैलास खोकले, बहिरू पाडेकर, शरद लहांगे यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा सिन्नर, एकलव्य संघटना, महादेव कोळी समाज संघटना, आदिवासी उत्सव समिती भगूर, आदिवासी युवा शक्ती लहवित, राया ठाकर ब्रिगेड, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे मंडळ धोंडबार, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड बोरखिंड आदी संघटना प्रयत्नशील होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images