Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सहस्रदीपांनी झगमगले इंद्रकुंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी इंद्रकुंड देवस्थानात सहस्रदीप प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे हा परिसर झगमगला होता. सनईचे मंजुळ स्वर, दिव्यांचे तेज, विलोभनीय रांगोळी, दरवळणारा अगरबत्तीचा सुवास यामुळे वातावरण भक्तिपूर्ण झाले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी शिव मंदिरात त्रिपूर वाती लावल्या जातात. मंदिरावर दिव्यांची रोषणाई करण्याचीही परंपरा आहे. यावेळी मंदिरासमोर असलेल्या दीपमालेच्या प्रकाशात मंदिर उजळून निघते.

नाशिक शहरात शुक्रवारी विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. मालेगाव स्टॅँड येथे असेल्या इंद्रकुंड परिसरात सकाळपासून दीपोत्सवाची तयारी करण्यात आली होती. परिसर स्वच्छ करण्यात आला. परिसरातील महिलांनी संपूर्ण मंदिराच्या आवारात रांगोळी रेखाटली होती. सायंकाळी सहानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली. येथील कार्यक्रमाची सुरुवात पंचवटी पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिनेश बर्डेकर, बीएपीएल स्वामी नारायण संस्थांनचे संत श्रुती वल्लभ स्वामी व गुरू मंगल स्वामी यांच्या हस्ते आरतीने करण्यात आली. संपूर्ण परिसरात दिवे लावण्यात आले होते. गुरुमित बग्गा, रवी कुलकर्णी, सागर जाधव, देवेंद्र पटेल, सुधाकर नेवे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

दरम्यान, मुरलीधर गल्लीत सिद्धेश्वर महादेव मंदिरात शंकराला अर्धनारी नटेश्वराचा मुखवटा लावून विविध फळे व फुलांची आरास करण्यात आली. धार्मिक विधी व दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. येथेही पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळशीविवाह थाटात

पंचवटी ः नवीन आडगाव नाका येथील युवक मित्रमंडळातर्फे स्वामिनारायणनगरमध्ये शुक्रवारी तुळशीविवाह सोहळा थाटात झाला. तुळशीविवाहाविषयी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त भाऊ पाटील यांचे प्रवचन झाले. या सोहळ्यास ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी, जनार्दन स्वामी आश्रमाचे संतोषगिरी महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तीचरणदास महाराज, लक्ष्मीनारायण मंदिराचे उमेश महाराज आदी उपस्थित होते. कपालेश्वर मंदिरात विष्णुयागाची सांगता झाली. आज, शनिवारी शंकर-पार्वतीच्या रुपात कपालेश्वराची पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी शौनकाश्रमात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झगमगले बालाजी मंदिर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात पणती पौर्णिमा ही पौर्णिमा नाशिकमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी नाशिकच्या गंगापूर गावात शंकराचार्य न्यास संचलित श्री बालाजी मंदिरात हजारो पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या निमित्त मंदिरातील बालाजीच्या मूर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली होती. सोमेश्वरनजीकचे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर शुक्रवारी हजारो दिव्यांनी उजळले होते.

उद्योजक लक्ष्मीदीदी गलाणी, तसेच हेमंत बक्षी यांच्या हस्ते प्रथम पणती उजळवण्यात आली. बालाजी मंदिराच्या स्थापनेपासून येथे अखंड समई तेवत आहे. या समईतून ज्योतीने ज्योत लावत पणत्या उजळवल्या जातात. लक्ष लक्ष पणत्यांनी हा परिसर उजळून निघतो. शिस्तबद्ध व्यवस्थेत प्रत्येकाने बालाजीचे दर्शन घेतले. बालाजी मंदिराच्या आवारात शहरातील प्रत्येक नागरिकाने किमान दहा पणत्या या ठिकाणी लावाव्यात, असे आवाहन शंकराचार्य न्यासतर्फे करण्यात आले होते. मंदिराबाहेरील गोशाळेपासून धबधब्याजवळील काही भागाभोवतीही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.

रोषणाई आणि लाखो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. मंदिरात बालाजीच्या दर्शनासाठी आणि पणत्या प्रज्वलित करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. दहा वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा होत असून, पहिल्या वर्षी फक्त ११०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, दहा वर्षांनंतर ही संख्या आता हजारोंच्या वर गेली आहे. त्यामुळे बालगोपालांसह अबालवृद्धांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला. गंगापूर रस्त्याकडून मंदिर रस्त्याकडे वळल्यानंतर डाव्या बाजूला मैदानात कार पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकीस्वारांसाठी मंदिर परिसरात कुठेही वाहन उभे करण्याची व्यवस्था असल्याने अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी यंदाही आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सेतू या संस्थेतर्फे पादत्राणे सेवा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुलसी विवाहातच झाले शुभमंगल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

वेळ सायंकाळची... रस्ते सडा व फुलांनी सजलेले... ग्रामीण वाद्याचा आवाज...भाविकांची गर्दी...अनेकजण बेभान होऊन नाचताहेत... बैलगाड्यांतून तुलसी व भगवान विष्णूची मिरवणूक निघालेली.. मिरवणूक आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबते...ब्राह्मवृंदाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंगलाष्टकाने आणि जनसमुदायाच्या हातातून अलगद बरसणाऱ्या फुलांच्या वर्षावात तुलसी विवाहसोहळा रंगतो... आणि...त्यानंतर लगेच एका तरुणाचा आणि तरुणीचा खरोखरचा विवाह पार पडतो. तुलसी विवाहातच सात जन्माची शपथ घेणाऱ्या जोडप्याचा विवाहसोळा पाहून अनेकांना सुखद धक्का बसतो... चित्रपटात शोभेल असा प्रसंग रुई (ता. निफाड) येथील रामकृष्ण साधना आश्रमात गुरुवारी सांयकाळी उभा राहिला.

विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून वैचारिक क्रांती घडावी या उद्देशाने दरवर्षी रुई येथे तुलसी विवाह सोहहा होतो. यावर्षीही हा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र यंदा त्यात एकलहरे येथील चि. दत्तू तुकाराम घुले व रुई येथील चि. सौ. कां. प्रियंका गोरख रोटे यांचा विवाह लावून ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला.

सनई, चौघडा, संबळ आदी पारंपरिक वाद्यांसह सायंकाळी साडेपाच वाजता आश्रमातून सजवलेल्या बैलगाड्यांतून राधा-कृष्ण, शिवशंकर, राम-लक्ष्मण- सीता- हनुमान अशी वेगवेगळी वेशभूषा धारण केलेली बालके व विविध संत महात्म्यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. सुदाम महाराज ब्रह्मचारी बंगालीबाबा, नेमावर, मध्यप्रदेश, भास्करगिरी महाराज, मधूकर महाराज जोपुळकर, निवृत्ती महाराज चव्हाण, योगेश महाराज कुदळ, नामदेव शास्त्री अनारसे, सोपान महाराज पगार, दत्तूकाका राऊत, गजानन महाराज कवाडकर, उत्तम महाराज आरसोडे, पोपट महाराज जाधव, बाळकृष्ण महाराज नवले यांच्या उपस्थितीत भगवान विष्णूचे रूप घेतलेली खुशी रुकारी व तुळशीचे रूप घेतलेली स्वरा जोशी या बालिकांचा प्रतिकात्मक विवाहसोहळा जुन्या वैदिक पद्धतीने तुलसीविवाह झाला. त्यानंतर तेथेच दत्तू घुले व प्रियंका रोटे या उभयतांचा विवाह झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात फक्त २४७४ शिक्षक मतदार

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक असतानाही जिल्ह्यात ५३ हजार शिक्षकांपैकी केवळ २,४७४ शिक्षकांनीच मतदार नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी ६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, मतदार नोंदणी वाढली नाही तर निवडणूकप्रक्रिया कशी राबवायची, याची चिंता प्रशासनाला सतावू लागली आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रत्येक वेळी नवीन मतदारयादी तयार करावी लागते. गेल्या निवडणुकीत वापरलेली मतदारयादी सहा वर्षांनंतर रद्द ठरविण्यात येत असल्याने शिक्षकांनी पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करणे अनिवार्य आहे. याकरिता जिल्ह्यात ६ ऑक्टोबरपासून शिक्षक मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख अर्ज वितरित केले असताना अवघे १५,३९२ मतदारांचेच अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १२ हजार १२१ अर्ज पुरुष शिक्षकांचे तर ३,२६८ अर्ज महिला शिक्षिकांचे आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीच्या मोहिमेकडे शिक्षकांनीच पाठ फिरव‌िल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यातून अवघ्या २,७७४ शिक्षक मतदारांचीच नोंदणी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये १,८०८ पुरुष व ६६६ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांमध्ये नावनोंदणीबाबत अनास्था पाहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी पूर्वतयारी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत. मुंबईत याबाबतची बैठक होणार असून, तत्पूर्वी जिल्ह्यात अधिकाधिक जमीन संपादनाचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जमीन संपादनास शेतकऱ्यांची संमती मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. बैठकींद्वारे शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटींचा मोबदलाही देण्यात आला आहे. या महामार्गाला जिल्ह्यात अद्याप विरोध होत असून, काही शेतकऱ्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, हा लोकहिताचा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत न थांबव‌िण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. राज्यातील ३० तालुके आणि ३५५ गावांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांचे अर्थकारण बदलणार आहे. त्यामुळे विकासाचा दर वाढण्यास मदत होणार असून, २५ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलस, असा सरकारचा दावा आहे. या महामार्गाला पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अलीकडेच समृद्धीबाधितांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध नोंदवला. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. बैठकीला जाण्यापूर्वी अधिकाधिक भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गावोगावी बैठकी घेण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. नागपूर, वाशिम, बुलडाणा, जालना, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये १०० टक्के संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये वर्धा (९७ टक्के), अमरावती (८५ टक्के), औरंगाबाद (९७ टक्के) व नाशिक (८७ टक्के) या प्रमाणे संयुक्त मोजणीची कार्यवाही झाली आहे. उर्वरित ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याचाही आढावा या वेळी मुख्यमंत्री घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् गवसले ‘फेकलेले’ चौदा तोळे सोने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दिवाळीत घरात आवरसावर करून कचरा फेकताना चक्क चौदा तोळे सोने अन् ३४७ ग्रॅम दागिने असलेली पिशवीच फेकून दिल्याचा प्रकार सिडकोत घडला अन् संबंधित कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली...

अनेक दिवसांच्या घालमेलीनंतर कचरा वेचणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा अन् इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे हा एेवज संबंधितांना परत मिळाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.

शरद त्र्यंबक दळवी व त्यांच्या पत्नी सरिता यांनी दिवाळीत घराची साफसफाई केली. त्यावेळी लक्ष्मीपूजनासाठी सोन्या-चांदीचे दागिने लागतील म्हणून सरिता यांनी घरातील सर्व दागिने प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले. साफसफाई झाल्यावर सर्व केरकचरा फेकून देऊ या उद्देशाने शरद दळवी यांनी दागिने असलेली पिशवीदेखील कचऱ्यात टाकली व कचऱ्याची गोणी खत प्रकल्पाजवळील ढिगाऱ्यावर टाकून दिली.

--

दोघांनाही बसला धक्का

दळवी यांच्या मुलाने फटाके उडविण्यासाठी पणती मागितल्यावर पणती शोधण्याच्या नादात सोन्याचे दागिने असलेली पिशवी नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी सरिता यांनी या पिशवीबाबत विचारणा केली असता ती पिशवी कचऱ्याच्या गोणीत टाकल्याचा उलगडा झाला. त्यामुळे दोघांनाही धक्का बसला. गोणी ज्या ठिकाणी फेकली तेथे जाऊन पाहणी त्यांनी केली असता गोणी गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या दोघांनीही अंबड पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला.

--

इंदिरानगर पोलिसांची तत्परता

ऐन दिवाळीत सोने कचऱ्यात फेकले गेल्याचा प्रकार घडल्यानंतर या सोन्याचा शोध कसा घ्यावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात खत प्रकल्प परिसरात गंगूबाई आसरुबा घोडे आणि त्यांच्या मुली सुनीता व मुक्ता या कचरा गोळा करीत असताना त्यांना ही सोने असलेली पिशवी आढळली. ऐन दिवाळीचे दिवस असल्याने त्यांनीही हे सोने घरीच ठेवले. याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाला मिळाली. पोलिसांनी गंगूबाईकडे विचारणा केली असता तिने हे सोने सापडल्याची कबुली दिली. सदरचे सोने पोलिसांनी हस्तगत केले.

--

अन् दागिने मिळाले परत

दरम्यान, गंगूबाईच्या मुलाने सोन्याच्या पिशवीतील बिलावरून दळवी यांना फोन लावून सोने सापडल्याचे सांगितले. दळवी यांनीही इंदिरानगर पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. त्यावेळी या सोन्याची खातरजमा केली असता हे सोने दळवी यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे व निरीक्षक के. बी. चौधरी यांच्या हस्ते दळवी यांना दागिने परत करण्यात आले. यावेळी दळवी यांनी गंगूबाईस दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले, तर पोलिसांनीही गंगूबाई व तिच्या मुलीचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छ भूखंडधारकांवर बडगा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होऊन हे भूखंड रोगराईला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा मोकळ्या अस्वच्छ भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, स्थायी समितीने यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत.

शहरातील अशा मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करून त्या स्वच्छतेचा खर्च व अस्वच्छतेबद्दलचा अतिरिक्त दंड हा भूखंडधारकांच्या घरपट्टीतून वसूल करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. यासंदर्भातील ठराव महापालिकेने अगोदरच पारित केला असून, त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. त्यामुळे मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई होऊन महापालिकेला दंडातून अतिरिक्त महसूलही मिळणार आहे.

सभापती गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर रिकामे भूखंड आहेत. बिल्डरांनी, तसेच जागामालकांनी अनेक वर्षांपासून या भूखंडांवर कोणतेही बांधकाम न करता निव्वळ त्यांचे दर वाढविण्यासाठी ते रिकामेच ठेवले आहेत. परंतु, या मोकळ्या भूखंडांवर गवत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने हे भूखंड कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट बनत चालले आहेत. या भूखंडांवर अस्वच्छता निर्माण होऊन परिसरात रोगराई वाढीस लागत आहे. शहरात सध्या डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यूने तर रेकॉर्ड तोडले असून, स्वाइन फ्ल्यूचे राज्यात सर्वाधिक बळी नाशिकमध्ये गेले आहेत. सदरील रिकामे प्लॉट हे खासगी मालकीचे असल्याने त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याची स्थिती आहे. खासगी जागामालकही नियमितपणे ही साफसफाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेने आता या भूखंडधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

भाजपचे सदस्य विशाल संगमनेरे यांनी प्रभागातील खासगी मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेचा प्रश्न मांडला. मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून, संबंधित जागामालकांकडून स्वच्छता केली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार संगमनेरे यांनी केली. यावर मोकळ्या भूखंडधारकांकडून वार्षिक दंडात्मक कर आकारणी करून महापालिकेच्या माध्यमातून सदर भूखंडांची स्वच्छता केली जावी. ही दंडवसुली घरपट्टीच्या माध्यमातून केली जावी, असे आदेशच सभापती गांगुर्डे यांनी दिले. त्या संदर्भातील ठराव या अगोदरच झाला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई होणार आहे.

---

‘पेस्ट कंट्रोल रद्द करा’

स्थायीच्या सभेत घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. स्थायीने आदेश देऊनही पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला नोटीस दिली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी संबंधित ठेकेदारास आतापर्यंत दोन वेळा नोटिसा दिल्या असून, गुरुवारी पुन्हा नोटीस दिल्याचा दावा केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनीही पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

---

निधीबाबत भेदभाव

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ मधील नागेश्वर क्रीडा संकुलातील महिला व पुरुष व्यायामशाळेसाठी क्रीडा साहित्य पुरविण्याच्या प्रस्तावावरून समिती सदस्य मुकेश शहाणे, भागवत आरोटे यांनी आक्षेप नोंदविला. निधीचे समान वाटप केले जात नाही, तसेच विशिष्ट प्रभागावरच क्रीडा, तसेच दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च केला जात असून, निधी वाटपाबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप या सदस्यांनी केला. सदर प्रस्ताव तहकूब ठेवत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गांगुर्डे यांनी दिले. निधीचे समान वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

---

पवार, हिरे यांना नोटिसा

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सभापती गांगुर्डे यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काम मिळण्यासाठी ठेकेदारांकडून कमी दराच्या निविदा भरल्या जातात. परंतु, त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. रस्त्यांची कामे नित्कृष्ट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी सभापती गांगुर्डे यांनी दिली. सभेत उशिरा हजर झाल्याबद्दल शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह अभियंता हिरे यांना नोटिसा बजावण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाकडून दारणा धरणातून उपलब्ध होणारे आरक्षित पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी मनपाने चेहेडी पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पंपिंग स्टेशनची क्षमता ५० वरून शंभर एमएलडी करण्यात येणार आहे. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत ५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यास मनपाला दारणातून पूर्णपणे आरक्षित पाणी उचलता येणार असून, नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

महापालिकेच्या वतीने शहराला गंगापूर धरण व दारणा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. आरक्षित पाणी उचलण्यासाठी महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण व चेहेडी येथे दारणा नदीकाठी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. चेहेडी पंपिंग स्टेशनची रोज पाणी उचलण्याची क्षमता ५० एमएलडी आहे. पाटबंधारेकडून मनपाला दारणामधून दरवर्षी चारशे दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्याच्या पंपिंग स्टेशनची क्षमता पूर्ण पाणी उचलण्याची नाही. त्यामुळे नाशिकरोड येथे पाणीटंचाई जाणवते. महापालिकेच्या चेहेडी पंपिंग स्टेशनची पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्यामुळे जेमतेम ३०० दक्षलक्ष घनफूट पाणी उचलता आले. क्षमता नसल्याने शंभर दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण वाया गेले. त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता चेहेडी पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सद्यःस्थितीतील पंपिंग स्टेशनची ५० एमएलडीवरून १०० एमएलडीपर्यंत क्षमतावाढ केली जाणार आहे. या संदर्भातील ५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव अमृत योजनेंतर्गत मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

मनपा आरक्षणावर ठाम

महापालिकेने यंदा गंगापूरमधून ४३०० आणि दारणातून तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच ४३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कायम ठेवण्याचे सूतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने पाणी आरक्षणाची मागणी करण्याचे फर्मान काढले आहे. मात्र, मनपा वाढीव पाणी आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. सद्यःस्थितीत दारणा धरणातून उपलब्ध पाणी आरक्षण उचलण्याची मनपाची क्षमता नाही. त्यामुळे दारणातून ४०० ऐवजी ३०० दशलक्ष घनफूट पाणी मनपासाठी आरक्षित केले जावे व येथील १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण गंगापूर धरणातून दिले जावे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाच टक्के वाढीव पाणी आरक्षणाची मनपाची मागणी रास्त असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गच्चीवरील बाग’ फुलविण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले घर, आजूबाजूचा परिसर सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला असावा, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, जागेअभावी व माहितीअभावी ही इच्छा अनेकदा पूर्ण होतच नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ५) एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे.

गावाकडील घर आणि घरासमोर असलेले मोठे अंगण आपल्याकडेही असावे असे शहरात राहणाऱ्यांना नेहमीच वाटते. किंबहुना अनेकांचे ते स्वप्नच असते. पण, शहरातल्या गर्दीमुळे किंवा जागेच्या वाढत्या किमतींमुळे ते स्वप्न साकार होणे दुरापास्त होते. मग गॅलरीत दोन-चार कुंड्या ठेवून किंवा अपार्टमेंटच्या गच्चीवर कुंड्या ठेवून बागेची हौस भागविली जाते. या हौसेला शास्त्रशुद्ध पद्धतीची जोड देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत उपलब्ध असलेल्या साधनात बाग कशी फुलवायची, या संदर्भातले प्रशिक्षण गच्चीवरील बाग या वर्कशॉपमधून देण्यात येणार आहे. संदीप चव्हाण हे डेमो वर्कशॉपद्वारे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. गच्चीत किंवा गॅलरीत बाग तयार करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भातही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. या डेमो वर्कशॉपसाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये, तर इतरांसाठी २०० रुपये नोंदणी फी आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड (फोन ः (०२५३) ६६३७९८७, मोबाइल ः ७०४०७६२२५४) येथे संपर्क साधावा.

--

प्रश्नांना मिळणार उत्तरे

झाडे लावणे, त्यासाठी आवश्यक खते, त्यातच गॅलरीत, कुंडीत झाडे लावणे, ती फुलविणे याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. परंतु, याविषयी उत्तरे मिळविण्याचा मार्ग सापडत नसल्याने अनेकांना गच्चीत बाग फुलविण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. आता या वर्कशॉपद्वारे सर्व प्रश्नांची, शंकांची उत्तरे मिळू शकणार आहेत.

--


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विद्यालयातून घरी परतताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात एक शिक्ष‌किेचा मृत्यू झाला. तर दुसरी शिक्षिका गंभीर जखमी आहे. गुरुवारी सायंकाळी खिरमाणी-सटाणा दरम्यान हा अपघात झाला. सरोज सोनवणे असे मयत शिक्ष‌किेचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालय खिरमाणी येथील शिक्षिका सरोज सोनवणे (वय ५०), व वाय. जी. अहिरे (वय ४८) या दोघी सटाणा येथे घरी परतत होत्या. कुपखेडा गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने शिक्षिका सरोज सोनवणे यांच्या अ‍ॅक्टिवाला धडक दिली. यामुळे सोनवणे व त्याच्या सोबत असलेल्या वाय. जी. अहिरे या दोघेही जम‌निीवर आदळल्या. सरोज सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.

अपघातातील जखमी शिक्षिका वाय. जी. अहिरे यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत शिक्षिका सरोज सोनवणे यांच्या पती अनाजी सोनवणे यांचे देखील काही वर्षापूर्वीच अपघातात निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू नानक जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

शहरातील गुरुद्वारांमध्ये शनिवारी (दि. ४) गुरू नानक जयंती उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार आहे. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारामध्ये जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून शिंगाडा तलाव परिसरातील गुरुद्वारामध्ये गुरूवार २ नोव्हेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दोन दिवसांपासून विशेष कीर्तन दिवाणचा लाभ भाविक भक्तांना मिळतो आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ४) सकाळी साडेसात ते रात्री सव्वा अकरा या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसात, सकाळी साडे अकरा आणि रात्री साडेदहा वाजता हरदीपसिंहजी यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांन मिळणार आहे. सकाळी पावणेनऊ, दुपारी दीड आणि रात्री सव्वानऊ वाजता लुधियाना येथील गुरूचरण सिंगजी रसिया यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२.२० आणि रात्री आठ वाजता फरीदकोट येथील गुरुमत विचार ग्यानी लखवीर सिंहजी यांच्या कीर्तनाचा आनंद भाविकांना मिळणार आहे. सायंकाळी साडेसहाला प्रार्थना होईल. त्यानंतर चिमुकल्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. भाविकांसाठी लंगरची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

नाशिकरोडला उत्सव
नाशिकरोड : येथील गुरुद्वारामध्ये शनिवारी (दि.४) पहाटे साडेपाचपासून मुख्य कार्यक्रम होईल. यादिवशी धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतील. दुपारी लंगर अर्थात महाप्रसाद होईल. ३० ऑक्टोबरपासून रोज सकाळी नगर कीर्तन होत आहे. शीख बांधव भजन कीर्तन गात नाशिकरोडला प्रभातफेरी काढत आहे. शुक्रवारी गुरुद्वारापासून सुरू झालेली ही फेरी दत्तमंदिर, मोटवानीरोड, कोठारी कन्या शाळा मार्गे तेथील झुलेलाल मंदिरात गेली. तेथे ग्रंथसाहेबांची पूजा करून पुन्हा ही फेरी गुरुद्वारात आली. गुरुद्वारात भाविकांची गर्दी होणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धन धन बाबा दीपसिंग सोशिल ग्रुपतर्फे जेलरोडच्या सिंधी कालनीतील गुरुव्दारात शनिवारी व रविवारी सकाळी साडेदहा व रात्री साडेसातला बीबी परमजीत कौर यांचे कीर्तन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटमध्ये नाशिक राज्यात तिसरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले नाशिक हे क्रिकेट क्षेत्रातही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या क्रीडा कामगिरीत नाशिक हे तिसऱ्या क्रमांकावर असून, आजवर नाशिकने महाराष्ट्राच्या रणजी संघाला तब्बल १७ खेळाडू दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरातून रणजी सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

क्रिकेटने मुंबईमध्ये चांगलेच बस्तान जमवले पुणे, कोल्हापूर त्यानंतर नाशिक असा क्रम लागण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संघात सर्वात जास्त खेळाडू पुणे शहराने दिले खालोखाल कोल्हापूर जिल्हाने त्यानंतर नाशिक जिल्ह्याने तब्बत १७ खेळाडू दिले आहेत. नाशिकच्या जयंतीलाल यांनी सर्वप्रथम रणजी मध्ये पाऊल टाकले त्यानंतर जीभाऊ जाधव, प्रकाश माळवे यांच्या रुपाने शहरात चांगल्या प्रकारे क्रिकेट बहरत गेला. क्रिकेटमध्ये करिअर होत असल्याचे पाहून अनेक खेळाडू या खेळाकडे वळाले. ज्यांनी हा खेळ करिअर म्हणून पाहिला त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. अनेक खेळाडू अधिकारी पदावर कार्यरत आहे. शहरात सध्या क्रिकेटला चांगले दिवस असून नाशिक जिल्हा क्रिकेट अॅकेडमीच्या गोल्फ क्लब ग्राऊंडवर सध्या शेकडोच्या संख्येने खेळाडू खेळत आहेत.

नाशिकने आजवर दिलेले रणजी खेळाडू

जयंतीलाल, जीभाऊ जाधव, प्रकाश माळवे, राजू लेले, प्रशांत राय, भगवान काकड, शेखर गवळी, शेखर घोष, अमित पाटील, अविनाश आवारे, सुयश बुरकुल, अभिजीत राऊत, अशिष टिबरेवाल, साजीद सुरेशनाथ, मुर्तूजा ट्रंकवाला सलील आगारकर, सत्यजीत बच्छाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेक्कन’साठी सायकलिस्ट्स रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅम या अत्यंत प्रतिष्ठेच्या सायकलिंग स्पर्धेत पात्र ठरवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेसाठी नाशिक सायकलीस्टसचे सोलो गटात ६ सायकलीस्टस तर टीम ऑफ टू गटात दोन संघ शुक्रवारी (दि. ३) सकाळी रवाना झाले.

यात सोलो (वय ५० व अधिक) गटात नाशिकचे पोल‌सि आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, ६२ वर्षीय ज्येष्ठ सायकलीस्ट मोहिंदर सिंग भराज तर खुल्या गटात (वय १८ ते ५०) किशोर काळे, शुभम देवरे, संजय मोकल, संगमनेरचे विजय काळे यांचा सहभाग आहेत. तर टीम ऑफ टूमध्ये संगमनेरचे नीलेश वाकचौरे, संजय विखे आणि पिंपळगाव बसवंतचे अविनाश व विकास दवांगे यांचा सहभाग असणार आहे. स्पर्धा पुणे येथून शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता सुरू होऊन गोवा येथील बोग्मालो किनाऱ्यावर संपेल.

या सर्व स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यासाठी नाशिक सायकलीस्टसकडून सकाळी ६.३० वाजता सर्व सायकलीस्टसने मुंबई नाका येथे डेक्कन क्लिफहँगर स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, अॅड. वैभव शेटे, योगेश शिंदे, डॉ. मनीषा रौंदळ, राजेंद्र वानखेडे, तुकाराम नवले, मोहन देसाई, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, सचिव नितीन नागरे आदी उपस्थित होते.

पुणे ते गोवा अशी ४०० मैल म्हणजेच ६४३ कि.मी.च्या स्पर्धेसाठी नाशिकहून अनेक सायकलीस्टस सहभागी होत असतात. संपूर्ण भारतात विविध गटात रॅम स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सायकलीस्टसची संख्या सर्वात जास्त आहे. या आधी डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर, अमर मियाजी,अनिल कहार, आनंदा गांगुर्डे, चेतन अग्निहोत्री यांनी सोलो गटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

यापैकी डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर, तसेच डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. नितीन रौदळ, विलास इंगळे, शंकर दवांगे, राहुल ओढेकर, मिलिंद वाळेकर, डॉ. कुणाल गुप्ते, मिलिंद धोपावकर, ताहेर कांचवाला हे यावर्षीच्या स्पर्धकांसाठी क्र्यू मेंबर्स म्हणून जात असून यामुळे स्पर्धकांची ताकद व आत्मविश्वास वाढला आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांची नाशिकमधून सर्वाधिक असेल असा विश्वास
वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभानगरच योग्य!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाभानगर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून गिते पिता-पुत्रांनी बंडाचे निशाण फडकवले असताना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आता रुग्णालय भाभानगरलाच होणार असल्याचा दावा केला आहे. रुग्णालयाला आठ हजार स्केअरमीटर जागेची आवश्यकता असताना, टाकळी रोडवर केवळ दोन हजार स्वेअर मीटर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्‍्ट्या टाकळीरोडची जागा योग्य नसल्याचा खुलासा करत फरांदे यांनी रुग्णालय भाभानगरलाच होणार असे स्पष्टीकरण दिले. रुग्णालयाच्या कामात कुणीही राजकारण आणू नये, तरीही काहींनी विरोध झाल्यास महिला शक्ती दाखवून देवू, असा इशाराच फरांदे यांनी गितेंना दिला आहे.

भाभानगर येथे प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून सध्या आमदार फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गिते यांच्यात संघर्ष पेटला आहे. गिते यांनी या रुग्णालयाच्या जागेला प्रखर विरोध करत थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्याच्या आदेशानंतरही वसंत गिते आणि त्यांचे पुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांनी थेट पक्षालाच आव्हान दिले आहे. परंतु या प्रश्नावरून फरांदे यांनी मौन धारण केले होते. शनिवारी त्यांनी आपले मौन सोडत कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय भाभानगरलाच होणार, अशी भूमिका मांडली. गेल्या चार वर्षांपासून रुग्णालय मंजूर असून, निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर देवूनही काम सुरू होत नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी हे रुग्णालय प्रलंबित राहील्याचे त्यांनी सांगितले.

टाकळीची जागा अयोग्य

टाकळीची जागा तांत्रिकदृष्टया अयोग्य असल्याचे फरांदे यांनी सांगितले. रुग्णालयासाठी ८ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. टाकळी येथे मात्र १९ हजार ७२० चौ. मी. जागेपैकी १९२० चौ. म‌ी. जागा ही बांधकामासाठी उपलब्ध होत असून, ही जागा तीन ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहे. रस्त्यासाठीही पुरेशी जागा नाही. भाभानगर येथे सुमारे ९ हजार ६०० चौ.मी. आणि पार्किंगची अतिरिक्त ५०० चौ. मी. जागा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचा भूसंपादनाचा खर्चही वाचणार आहे. शिवाय हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सर्वांनाच ते सोयीचे ठरणार असल्याचे सांगून रुग्णालय या जागेवरच होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

…तर महिलाशक्ती दाखवू

रूग्णालयाच्या जागेला विरोध करणाऱ्यांना मीही उत्तर देउ शकते असा इशारा देत, पक्षशिस्त आणि हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने मी गप्प आहे. रुग्णालयावरून मला राजकारण करायचे नाही. भाभानगरची जागाच योग्य असल्याचा खुलासा मुख्यमंत्रयांनाही केला आहे. परंतु काही लोक हेतुतः नागरीकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. मात्र यापुढे विरोध केल्यास महिला शक्ती एकवटून रस्त्यावर उतरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे ४० एकर ऊस खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

चाटोरी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ४० एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विजेचे स्पार्किंग होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

चाटोरीच्या पश्चिमेला असलेल्या जुनी गंगावाडी भागात स्मिता पंकज पवार यांचा अडीच एकर, पंकज पवार यांचा नऊ एकर, अशोक काकडे यांचा अडीच एकर, युवराज अशोक काकडे, वृषाली युवराज काकडे यांचा अकरा एकर, शशिकला काकडे यांचा अकरा एकर, नजमाबी बाबू पटेल यांचा दीड एकर तर प्रभाकर शिंदे यांचा चार एकर असा एकूण चाळीस एकरच्या आसपास ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दोन महिन्यांत अनेक घटना

गत दोन महिन्यांत बेरवाडी येथील दत्तू बोराडे यांचा दीड एकर ऊस, चितेगाव येथील तानाजी लवांड, किसन गाडे यांचा सुमारे दोन एकर ऊस, खानगाव थडी येथील खंडू चकोर यांचा तीन एकर ऊस, चाटोरी येथील नारायण वरखेडे यांचे एक एकर ऊस क्षेत्र तर सोमनाथ खिंडे यांची द्राक्ष बाग होरपाळली होती. नागापूर येथे साहेबराव खालकर यांचा तीन एकर ऊस, तर पाच दिवसांपूर्वी तळवाडे येथे बाळासाहेब सांगळे यांचा एक एकर ऊस, तळवाडे येथील पोपट सांगळे तसेच सुकदेव सांगळे यांचा एकूण दीड एकर ऊस, शिंगवे येथे खंडेराव डेर्ले यांचा दोन एकर तर शुक्रवारी सरुबाई आव्हाड यांच्या अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना असतांना पुन्हा चाटोरीत शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसानीसह मोठा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज ‘गच्चीवरील बाग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किमान आपल्या कुटुंबासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली रसायनमुक्त फळे, भाज्या उपलब्ध व्हाव्यात, अशी हल्ली प्रत्येकाची इच्छा असते. यावर उपाय म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात सहजसोपी बाग फुलविणे आता सहजशक्य होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आज, रविवारी (दि. ५) ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे. आपले घर, आजूबाजूचा परिसर सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला असावा, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, जागेअभावी व माहितीअभावी ही इच्छा अनेकदा पूर्ण होतच नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. गावाकडील घर आणि घरासमोर असलेले मोठे अंगण आपल्याकडेही असावे असे शहरात राहणाऱ्यांना नेहमीच वाटते. किंबहुना अनेकांचे ते स्वप्नच असते. पण, शहरातल्या गर्दीमुळे किंवा जागेच्या वाढत्या किमतींमुळे ते स्वप्न साकार होणे दुरापास्त होते. मग गॅलरीत दोन-चार कुंड्या ठेवून किंवा अपार्टमेंटच्या गच्चीवर कुंड्या ठेवून बागेची हौस भागविली जाते. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत उपलब्ध असलेल्या साधनांत बाग कशी फुलवायची यासंदर्भातले प्रशिक्षण गच्चीवरील बाग या वर्कशॉपमधून देण्यात येणार आहे. संदीप चव्हाण हे डेमो वर्कशॉपद्वारे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

--

अडचणींसंदर्भातही मार्गदर्शन

गच्चीत किंवा गॅलरीत बाग तयार करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींसंदर्भातही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. या डेमो वर्कशॉपसाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये, तर इतरांसाठी २०० रुपये नोंदणी फी आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे अथवा (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! विनोदी लेखक होतोय हद्दपार...

$
0
0

मटा विशेष

--

लोगो : मराठी रंगभूमी दिन विशेष

--

सावधान! विनोदी लेखक होतोय हद्दपार...

--

नाशिक ः नाटकात समाजाचे प्रतिबिंब पडते असे म्हणतात आणि विनोद हा समाजाच्या स्वास्थ्याचा अविभाज्य घटक असताना नाटकातून मात्र विनोद हद्दपार होतोय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या हौशी, व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार विनोदी नाटकच सादर झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी विनोदी लेखकांचा तुटवडा हे प्रमुख कारण असून, लेखक मंडळी गंभीर नाटक करण्यातच धन्यता मानत आहे.

विनोद हा सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात मोठी भूमिका बजावतो. मनोरंजनाचे साधन म्हणून विनोदाकडे बघितले जाते. मात्र, असे असतानाही नाटक सादर करण्यासाठी विनोदी संहिताच मिळत नसल्याची ओरड सध्या होत आहे. हौशी कलाकारांच्या हक्काच्या राज्य नाट्य स्पर्धेत तर विनोदी संहिता औषधालाही सापडत नसल्याचे अनेक वर्षांचे निदान आहे. त्यामुळे नाटकातून विनोद हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.

राज्य नाट्य स्पर्धेचा इतिहास असा आहे, की येथे सर्व रसांचा आविष्कार करणारी नाटक सादर होतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या संहितांचा अभ्यास केला असता तेथे किमान चार ते पाच नाटके विनोदी असतात आणि ती दमदारपणे सादरही होतात. परंतु, नाशिक केंद्रावर मात्र विनोदी नाटक औषधालाही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

---

गतवर्षी एकच नाटक

गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत ‘लग्न नको पण पप्पा आवर’ हे एकमेव विनोदी नाटक सादर झाले होते. गेल्या वर्षीदेखील विनोदी नाटकांची वानवाच होती. विनोदी नाटक सादर केले तर गुणांवर परिणाम होतो, असा समज रंगकर्मींनी करून घेतल्याने या नाटकांकडे कुणी वळतच नाही. परंतु, त्यामुळे रसभंग होत असल्याचे रसिकवर्गाचे म्हणणे आहे. त्यांना सर्व गंभीर नाटकेच पाहावी लागतात, विनोदी नाटकेच सादर होत नाहीत, अशी ओरडही होत आहे.

--

विनोदी संहिता लिहिणारे नवे लेखकच नाहीत. त्यामुळे जुन्याच संहितांवर नाटक बसवावे लागते. यंदाही ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वसंत सबनीस यांचे नाटक बसविले आहे. नवे विनोदवीर तयार होणे काळाची गरज आहे.

-प्रदीप देवरे, दिग्दर्शक

--

विनोदी नाटकालादेखील गुण असतात. परंतु, ते सादर केले, तर आपल्याला परीक्षक गंभीरतेने घेणार नाहीत, असा समज झालेल्यांची संख्या वाढली आहे. त्यामानाने इतर केंद्रांवर सादर होणाऱ्या विनोदी नाटकांची संख्या जास्त आहे.

-राजेश जाधव, समन्वयक, नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मध्य रेल्वेच्या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे रेल्वेस्थानक अशी ओळख असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकांवर सिंहस्थादरम्यान उभारण्यात आलेल्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पूर्वेकडील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे झाली आहे.

दिवसभरात सुमारे ८० रेल्वे गाड्यांची रेलचेल नाशिकरोड रेल्वे स्थानकावर होत असते. या रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची चढउतार होत असते. दररोज लाखो रुपयांचा महसूल या रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रशासनाला प्राप्त होतो. या सर्व गोष्टी असूनही रेल्वेस्थानक प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाचे या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील चौथ्या प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. दिवसभरात या प्लॅटफॉर्मवर एकही सुरक्षा जवान फिरकताना दिसत नाही. रेल्वे स्थानक प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाची नजर संपूर्ण वेळ केवळ प्लॅटफॉर्म एक-दोनसह रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडे असते.

नाशिकरोड रेल्वे स्थानकांच्या पूर्व बाजूकडील प्रवेशद्वाराची सुरक्षा गेल्या दोन वर्षांपासून पूर्णतः रामभरोसे आहे. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी चौथ्या प्लॅटफॉर्मवर नियमित गस्त ठेवायला पाहिजे.

-सचिन चव्हाण

उपाययोजनांची वानवा

सिंहस्थ विकासकामात नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूचा विकास झाला. त्याठिकाणी नवीन प्लॅटफॉर्मसह, नवीन तिकिट बुकिंग ऑफिस, प्रवेशद्वार, रेल्वे स्थानक ते सिन्नर फाटा दुपदरी रस्ता, पार्किंग अशी भव्य सोय करण्यात आली. मात्र आता या प्लॅटफॉर्मचा व तिकिटघराचा वापर पूर्ण क्षमतेने होतच नाही. असे असले तरी या बाजूकडून सुरक्षा विषयक उपाययोजना करणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र अद्याप या बाजुस सुरक्षा भिंत नाही. प्रवेशद्वार सताड उघडे असते. विघातक प्रवृत्तींना आपली वाहने थेट प्लॅटफॉर्मजवळ आणणे यामुळे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांसह, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.


चोरवाटा कधी बंद करणार?

रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येणाऱ्या अनेक चोरवाटा आहेत. जुना रेल्वे पूल, सिन्नर फाटा, रेल्वे कॉलनी, दहा चाळ अशा अनेक बाजूंनी चोरवाटा या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येतात. आजही या वाटांचा वापर अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, फुकटे प्रवाशी करताना दिसून येते. या वाटांवरच मटका व जुगाराचे अड्डे दिवसाढवळ्या सुरू असतात. मात्र तरीही यांच्यावर रेल्वे पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या जागेवर संरक्षण म्हणून साधा सुरक्षा भिंतही उभारली गेली नसल्याने थेट प्लॅटफॉर्मपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावर याठिकाणा वाढला असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी उद्यान धूळ खात

$
0
0

कोट्यवधींच्या वस्तू चोरीला; अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दूर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत गोदावरी नदीचा परिचय पर्यटकांना व्हावा याकरीता कोट्यवधी रुपये खर्चून गोदावरी परिचय उद्यानाची उभारणी केली होती. परंतु, आजही गोदावरी उद्यान परिचयाविनाच धूळ खात पडून असल्याची स्थिती आहे. त्यातच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या गोदावरी परिचय उद्यानातील अनेक वस्तू चोरीला गेले असल्याने त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवसभर उद्यानात प्रेमीयुगल व जुगार खेळणाऱ्यांचा वावर असतो. तर रात्री मद्यपींच्या मैफली रंगत असल्याने महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानाला अवकळा आली आहे. विशेष म्हणजे सोमेश्वर धबधब्यावर पाणी असो अथवा नसो पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. फेरफटका मारण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उद्यानात जाण्यासाठी अनेक वर्षे रस्ताच नसल्याने बाहेरूनच पाहून निघून जावे लागत होते.

माजी नगरसेवक अरूण काळे यांच्या कार्यकाळात महापालिकेने गंगापूर गावाला लागून गोदावरी परिचय उद्यान व सोमेश्वर धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत गोदावरी परिचय उद्यानाचे काम महापालिकेने हाती घेत एका वर्षांत पूर्णही केले. परंतु, सोमेश्वर धबधब्याचे सुशोभीकरण मात्र महापालिकेकडून होऊ शकले नाही. गोदावरी परिचय उद्यान उभारल्यावर ते पर्यटकांसाठी खुले करण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना गोदावरी नदीचा उगमापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास कसा आहे, याबाबत सविस्तर माहिती चित्रांद्वारे दिली जाणार होती. यात गोदावरी नदीचा उगम तर सोडा कुठल्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. सहाजिकच महापालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आजही धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे.

अतिशय सुंदर संकल्पना घेऊन महापालिकेने उद्यान उभारले खरे, परंतु, उद्यान आजही पडून आहे. महापालिका प्रशासनाने उद्यानाची दुरूस्ती करत सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची गरज आहे.

-दीपक आरोटे, रहिवाशी

सोमेश्वर धबधब्याकडे जाताना सुंदर असे गोदावरी परिचय उद्यान महापालिकेने उभारले होते. परंतु, उद्यान खुलेच करण्यात आले नसल्याने नागरिक नाराज आहेत.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यटक

उद्यानाचा परिचय कधी?

अनेकदा पर्यटकांकडून उद्यान खुले करण्याबाबत महापालिकेकडे मागणीही करण्यात आली होती. याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने कोट्यवधींचे उद्यान टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. दिवसा प्रेमीयुगल व जुगारी तर रात्री मद्यपींचा अड्डा गोदावरी परिचय उद्यानात भरताना दिसतो. सद्यस्थिती केवळ वृक्षांची सावलीच उद्यानात राहिली असून, तयार करण्यात आलेल्या खोल्या घाण, कचऱ्याने भरल्या आहेत. महापालिकेचे प्रशासन गोदावरी उद्यानाचा परिचय पर्यटकांना कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जुगारी, मद्यपींचा अड्डा

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या गोदावरी परिचय उद्यानाला सुरक्षारक्षक नसल्याचे कारण सांगत खुले करण्यात आले नाही. परंतु, आजच्या स्थितीत जुगारी व मद्यपींनी उद्यानाचा ताबा घेतला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने गोदावरी उद्यानाची दुरूस्ती करत सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. गोदावरी परिचय उद्यानाला झाडा, झुडपांनी वेढले आहे. उद्यानाचे प्रवेशद्वारावरील लोखंडी गजही चोरट्यांनी चोरून नेले आहेत. अनेक वर्षांपासून उद्यानात गाजर गवत मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंपांवरची शौचालये खुली

$
0
0

मनपाने काढली अधिसूचना; पंपचालक करणार विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका हद्दीत असलेल्या शहरातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा अध्यादेश महापालिकेने काढला आहे. परंतु, या अध्यादेशावरून नवा वाद सुरू झाला असून, नाशिक जिल्हा पेट्रोल व डिलर्स असोसिएशनने हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्राहक नसलेल्या नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेली शौचालये सार्वजनिक शौचालय म्हणून पालिकेने घोषित केली आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपावर ग्राहक नसलेल्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर असलेली शौचालये वापरता येणार आहेत. शहरात जवळपास ६० पेट्रोलपंप असून ती नागरिकांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होवून रस्त्यावर होणारी अस्वच्छता दूर होणार आहे.

महापालिकेच्या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून स्वागत केले जात आहे. राज्यातील

अन्य नगरपालिकांनाही यासंदर्भात असा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. महापालिकेने हे चांगले पाऊल उचलले असले तरी पेट्रोलपंप चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पेट्रोलपंपावर असलेली स्वच्छतागृह व शौचालयांची क्षमता जास्त नसते. कर्मचारी व ग्राहकांपुरतीच त्यांची क्षमता असून, सिवेज टॅंकही त्याच क्षमतेचा असतो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विचार न करता घेतलेला हा तुघलकी निर्णय असल्याची टीका पेट्रोल डिलर्स असो.चे अध्यक्ष नितीन धात्रक यांनी केली आहे. पेट्रोलपंप झोपडपट्टीच्या जवळ असेल तर तेथील नागरिक पेट्रोलपंपावरच शौचास येतील. त्यामुळे पेट्रोपंपही चालवणे अवघड होईल असे सांगत, मनपाने सुविधा दिल्यास याबाबत विचार केला जावू शकतो. परंतु, विश्वासात न घेताच परस्पर जाहीर केलेल्या निर्णयाला पेट्रोलपंप चालकांना विरोध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासगी मालमत्तेमध्ये महापालिका सक्ती करू शकत नाही, असे सांगतानाच या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावरील शौचालचे जनतेस खुली करण्याचा विषय वादाचा ठरणार आहे.

पेट्रोलपंपांवरील शौचालयांच्या क्षमतेचा विचार न करता हा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी सरकारला खूश करण्यासाठी खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करीत असून, या निर्णयाला पेट्रोलपंप चालक संघटनेचा विरोध आहे.

- नितीन धात्रक, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिझेल असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images