Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्वच्छता मोहिमेचा फार्स

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात डेंग्यूसह अन्य साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर आरोग्य सुधार समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमवेत थेट नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. रुग्ण आढळल्यानंतरही ठराविक भागातच स्वच्छता व औषध फवारणी होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

सिडकोत डेंग्यूसह अन्य साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत असतानाच तुळजाभवानी चौकात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने येथे उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिका, जिल्हा आरोग्य विभागातर्फे येथे जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्थितीची शहर आरोग्य सुधार समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक बंटी तिदमे, छाया देवांग, रुपाली निकुळे यांच्यासह आरोग्याधिकारी आर. एस. गायकवाड, विभागीय स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे, मलेरिया विभागाचे नदीम पठाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. सभापती कुलकर्णी यांनी नागरिकांशी संवाद साधला असता नागरिकांनी यापूर्वी या भागात महिन्यातून एकदाच औषध फवारणी होत असल्याचे सांगितले, तर सायंकाळची धूर फवारणी केवळ मुख्य रस्त्यावरच होत असल्याचे सांगितले. स्वच्छता होत असली, तरी या ठिकाणी असलेला पालापाचोळा किंवा रस्त्यांच्या कडेचा कचरा उचललाच जात नसल्याचेही सांगितले.

अचानकपणे झालेल्या या पाहणी दौऱ्यात व नागरिकांशी थेट संवाद साधल्याने खरी परिस्थिती समोर आली असली, तरी ही स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात सिडकोत राबविणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. कुलकर्णी यांनी सांगितले, की नागरिकांनीही याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. घरात पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक घरांच्या गच्चीवर नारळ, रिकामे डबे व बाटल्या आढळून आल्याने याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचनाही केली. सिडकोत आरोग्य विभागाकडून साफसफाई होत असली, तरी रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत, झुडपे काढण्यात येत नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. पुरेशा घंटागाड्यांअभावी रस्त्याच्या कडेला असलेले गवत व झुडपांमध्ये अनेकदा कचरा टाकला जात असल्याने डासांची उत्पत्ती होत असून, याबाबतही योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.

--

ठराविक भागातच मोहीम

काही दिवसांपासून सिडकोत साथींचे रुग्ण आढळून आल्याचे लक्षात आल्यावर गाजावाजा झाल्यानंतर आता ठराविक भागातच औषध फवारणी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वीच औषध फवारणी केली असती, तर अशी समस्या उद्‌भवलीच नसती अशा तक्रारीही केल्या. यावेळी सभापती कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना या भागातच नव्हे, तर संपूर्ण सिडको परिसरात दररोज औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. धूर फवारणी ही गल्लीबोळातही झालीच पाहिजे, असेही सांगितले.

--

पुरेशा मशिनचा अभाव

सिडकोत सध्या एक मोठे व पाच लहान धूर फवारणी मशिन्स असून, एक मशिन केवळ अर्धा तासच सुरू राहते. सिडकोची व्याप्ती पाहता या ठिकाणी अजून धूर फवारणी मशिनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सिडकोतील गल्लीबोळांत फवारणी करण्यासाठी लहान मशिनची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात येत आहे.

--

यापूर्वी परिसरात फवारणी दररोज होत नव्हती. आठ-पंधरा दिवसांतून एकदाच फवारणी होत होती. रुग्ण आढळल्यावर प्रशासनाला जाग आली आहे. ही धूर फवारणी व औषध फवारणी सातत्याने ठेवणे आवश्यक आहे.

-रुपाली पाटील, स्थानिक रहिवासी

--

सिडकोत नागरिकांनी यापूर्वी धूर फवारणी होत नसल्याचे सांगितले असून, संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. सायंकाळी सर्वत्र धूर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-सतीश कुलकर्णी, सभापती, आरोग्य सुधार समिती

--

धूर फवारणी ही प्रत्येक घरात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले असून, त्या पद्धतीनेच महापालिकेने करार केला. मात्र, ठेकेदार केवळ एकाच मुख्य रस्त्यावर ही धूर फवारणी करीत असल्याचा आरोप आहे.

-बंटी तिदमे, नगरसेवक, प्रभाग २४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ऑल सोल्स डे’निमित्त कॅम्पमध्ये मिसा अर्पण

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सर्वधर्मीय एकोप्याने नांदणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीने गुरुवारी ऑल सोल्स डे (आत्म्यांचा पवित्र दिवस) साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देवळालीतील सेंट पॅट्रिक्स दफनभूमी येथे आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा याकरिता त्यांच्या नातेवाइकांनी मिसा (प्रार्थना) अर्पण केली.

जगभरातील ख्रिस्तीबांधव दि. २ नोव्हेंबर रोजी आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा, या उद्देशाने हा विधी साजरा करतात. येथील सेंट पॅट्रिक्स दफनभूमी येथे देवळाली परिसरातील ख्रिस्तीबांधवांसह नाशिक, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवानी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ मिसा अर्पण करीत त्यांना स्वर्गलोक प्राप्त व्हावा, अशी मागणी ईश्वराकडे केली. फादर नॉलेस्को गोम्स यांनी धार्मिक विधी साजरे करीत पूर्वजांना स्वर्ग प्राप्त होण्यासाठी काय करावे, याचे विवेचन आपल्या संदेशातून केले. यावेळी परिसरातील पाच फादर, तसेच ख्रिस्ती समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ले. ज. आर. गोपाल यांची मुक्त विद्यापीठास भेट

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संरक्षण मंत्रालयाच्या मनुष्यबळ नियोजन व सुविधा विभागाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी नुकतीच येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी त्यांचे स्वागत केले.

लष्करी जवानांना निवृत्ती नंतरही समाजात ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने त्यांच्यासाठी नोकरीच्या जागीच उच्च शिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात आली आहे. या संदर्भात अलीकडेच संरक्षण मंत्रालय आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या मनुष्यबळ नियोजन व सुविधांचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी काल मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले.या भेटीत त्यांनी विद्यापीठ परिसरातील यशवंतराव चव्हाण यांचे वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्र, कृषी प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे, संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक प्रा. माधव पळशीकर, ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील आणि जनसंपर्क विभाग प्रमुख संतोष साबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात महिन्यांपासून मिळेना परवाना

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आरटीओ कार्यालयात नूतनीकरणासाठी दिलेला वाहनपरवाना मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही गणेश शेलार यांना सात महिन्यांपासून परवाना मिळालेला नाही. आरटीओ कार्यालयाचे सात महिन्यांपासून ते उंबरठे झिजवत आहेत. फक्त तात्पुरत्या स्वरूपात माहिती-शिक्का असलेले पत्र कार्यालयाने दिले आहे. मात्र, वाहन परवाना कधी मिळणार, याची ठोस माहितीदेखील दिलेली नसल्याने शेलार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शेलार यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास असल्याने एका पायाने नीट चालताही येत नाही. त्यांनी वाहन परवाना नूतनीकरणासाठी २७ एप्रिल २०१७ रोजी सर्व कागदपत्रे आणि शुल्क यांची पूर्तता करून अर्ज केला होता. त्यांना अर्ज सादर करताना एक महिन्याच्या आत वाहन परवाना घरी पोस्टाने येईल, अशी माहितीदेखील दिली होती. मात्र, एक महिना उलटूनही आपला वाहन परवाना मिळाला नसल्याने कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी पोस्टात चौकशी, तुमचा पत्ता चुकलेला असेल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोस्ट ऑफिस व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी केली; पण तेथेही काहीही माहिती मिळाली नाही. त्यांनी वारंवार आरटीओ कार्यालयात चौकशी व लेखी स्वरूपात अर्ज करूनही कोणतीही ठोस उत्तरे मिळाली नाहीत.

त्यामुळे संतापलेल्या शेलार यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडे प्रिंटिंग ऑफ डी.एल. आणि केएमएसची अडचण असल्याने तुमचा परवाना तयार होत नाही आणि या अडचणींची आम्ही सोडवणूक करू शकत नाही, शिवाय अडचण कधी दूर होईल हेही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात एक्झॅक्ट कॉपी ऑनलाइन अर्ज करून घ्या, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी शिक्का मारून प्रत ताब्यात घेतली; पण परवाना कधी मिळेल या प्रश्नाचे ठोस उत्तर देण्यास आरटीओ कार्यालयाने टाळले.

तात्पुरती पावतीही झिजली...

आरटीओ कार्यालयाची पावती असल्याने सुरुवातीला पोलिसांकडून अडवणूक झाली नाही. मात्र, अनेक दिवस परवाना न मिळाल्याने पावती झिजून खराब झाली आणि मधल्या काळात वाहतूक पोलिसांची कडक मोहीम सुरू असताना अडवणूकही झाली. त्यांनी परवान्याचे कारण दिले असता परवाना मिळण्यासाठी इतके दिवस लागतात का? तुम्ही खोटं बोलतात, असे म्हणून दंडही वसूल करण्यात आल्याची कैफियत शेलार यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षण लांबले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे आरक्षण करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तब्बल तीन तास काथ्याकुट करुनही आरक्षणाचा प्राथामिक आराखडा तयार झाला नाही. आता मंगळवारी पुन्हा या प्रश्नावर बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे हा आरक्षण आराखडा अंत‌मि मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या पाण्याच्या आरक्षणाचा विषय यावर्षी फारसा गंभीर नसला, तरी काही धरणातील पाण्याच्या आरक्षणाबाबत वाद असल्यामुळे त्याबाबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.

या आढावा बैठकीत नाशिक महानगरपालिकेने वर्षभरासाठी चार हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याबाबत या बैठकीत आतापर्यंत उचलले पाणी व लोकसंख्येनुसार लागणारे पाणी याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यानंतर मंगळवारच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील नाक्यासाक्या व चणकापूर धरणाच्या आरक्षणावरही वाद असून, हा प्रश्न कसा सोडावा यावरही चर्चा करण्यात आली. इतर बहुतांश धरणाच्या आरक्षणाबाबत मात्र फारसे वाद नसल्यामुळे त्यावरील आरक्षणाचा अंत‌मि आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.बैठकीत जलसंपदासह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. पाण्याचा विषय नाजुक असल्यामुळे या बैठकीला माध्यमाच्या प्रतिनिधींनाही प्रवेश देण्यात आला नाही. आरक्षणाचा आराखडा मंजूर करण्याचा अधिकार पालकमंत्री यांचा असल्यामुळे या विषयावर प्राथमिक चर्चा आम्ही करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दरवर्षी असते आरक्षण

जिल्ह्यात सर्वच भागांना पाणी मिळावे यासाठी दरवर्षी या पाण्याचे आरक्षण केले जाते. यावर्षी सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरलेली आहेत. त्यामुळे आरक्षण करण्यात फारशी अडचण नाही. त्याचप्रमाणे काही धरणे वगळता इतर धरणावर कोणी अद्यापर्यंत जास्त पाण्याची मागणी केली नाही. त्यामुळे हा आराखड्याला तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मुबलक साठ्यामुळे दिरंगाई

पाण्याचे आरक्षण ३१ जुलैपर्यंत निश्चित केले जाते. १५ ऑक्टोबरपासून हे आरक्षण लागू होते. पण यावेळेस धरणात मुबलक साठा असल्यामुळे ही बैठकही लांबली व हे आरक्षण निश्चित झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरूपम यांच्या पुतळ्याला ‘जोडेमार’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्त नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निरुपम यांच्या होर्डिंगला जोडेमार आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मनसे महिला आघाडीतर्फे त्यांना बांगड्यांचा हार पाठविला आहे. या वेळी पोलिसांनी मनसैनिकांना अटक करून नंतर जाम‌निावर सुटका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या फेरीवाल्यांवरून परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. मुंबईतल्या मनसे निषेधाचे लोन नाशिकमध्ये पोहचले असून, काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या मनसे तसेच राज ठाकरे यांच्याविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी गुरूवारी संजय निरुपम यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या ठक्कर बाजार येथे निरूपम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारण्यात आले. यावेळी विभागप्रमुख अनंता सूर्यवंशी, महिला आघाडीच्या नेत्या हर्षा शिसोदिया यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अंकुश पवार, मनोज घोडके, रामदास दातीर, विक्रम कदम, सचिन भोसले, राम संधान, परशुराम पाटील निखिल सरपोतदार, हर्षा फिरोदिया, कामिनी दोंदे, देवयानी वाघ, आरती खिराडकर आदींसह मोठ्या

संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी अचानक आंदोलन केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची जाम‌निावर सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छानिवृत्तीची महापालिकेत लाट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अधिकाऱ्यांची गळती सुरूच असून, गौतम पगारे, बी. यू. मोरेंपाठोपाठ आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आहे. त्यांच्या अर्जाने अर्जाने खळबळ उडाली असून, पाठोपाठ दोन ते तीन अभियंतेही हाच मार्ग स्वीकारणार असल्याने पालिकेत स्वेच्छानिवृत्तीची लाटच आली आहे. सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अधिकारी हा मार्ग स्वीकारत असल्याने सत्ताधारी मंडळी तसेच आयुक्तांकडून याबाबत कोणतीही हालचाल केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अस्वस्थतेचे वातावरण आहे. काही पदाधिकाऱ्यांकडून थेट टार्गेट केले जात असल्याने अधिकारी धास्तावले आहेत. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता पगारे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे यांनीही तोच कित्ता गिरवला आहे. येत्या महासभेवर यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला येणार आहे. त्यानंतर आता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड यांनीही अर्ज सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना सोमवारपासून रोख ‌मोबदला

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून (दि.६) वजन मापानंतर रोख मोबदला मिळणार आहे. गुरुवारी व्यापारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने नोटाबंदी केल्याने उद्भवलेल्या परीस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बँकांमध्ये चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत शासनाने शेतमाल विक्रीची रक्कम धनादेश, RTGS/NEFT द्वारे अदा करणेबाबत बाजार समित्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून बाजार समितीच्या बाजार आवाराम शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर धनादेश, RTGS / NEFT सेवेद्वारे चुकवतीची रक्कम अदा करण्यात येत आहे.

२४ तासांत मिळणार पैसे

शेतकऱ्यांसह व्यावसाय‌किांच्या मागणीचा विचार करून बाजार समितीच्या बाजार आवारांवर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रोख स्वरूपात मोबदला देण्यासाठी गुरुवारी कांदा बाजार आवारावर कांदा व धान्य विभागातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत धान्य विभागातील व्यापाऱ्यानी सोमवारपासून भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत मर्चन्टस असोशिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, सचिनकुमार ब्रह्मेचा, संदीप दरेकर, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर, कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, ओमप्रकाश राका, अजित भंडारी उपस्थित होते.

कांद्याबाबत निर्णय

पुढील आठवड्यात

कांद्याची रक्कम रोख स्वरूपात किंवा NEFTेद्वारे करणेसंदर्भात व्यापारी वर्ग बँकांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याची माहिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आलिया आली अन् चिमुकल्यांत रमली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा आणि आपल्याला इतरांशी जोडणारा ध्वनीच नसेल तर... ही कल्पना श्रवणशक्ती मजबूत असलेल्या अनेकांना सतावल्याखेरीज राहत नाही. समाजात अशा व्यक्तींची संख्या लक्षणीय असून, ते दररोज जगण्याची लढाई लढतात. अशीच लढाई लढणारी शेकडो कर्णबधिर मुले शुक्रवारी सिनेअभिनेत्री आलिया भट हिच्या भेटीने हरखून गेली होती.

निमित्त होते सेवा ऑटोमोटिव्ह आणि श्रवणयंत्र निर्मिती करणाऱ्या स्टार की कंपनीच्या माध्यमातून आयोजित उपक्रमाचे. आलियाने या चिमुकल्यांसमवेत काही काळ घालवला. या उपक्रमांतर्गत पंधराशे कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे, तसेच भविष्यात असा रोल मिळाल्यास तो नक्की साकारणार असल्याचे आलियाने यावेळी सांगितले. समाजात कर्णबधिरांची संख्या लक्षणीय असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही आलियाने व्यक्त केले. शर्मिला राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नाशिक, नागपूर येथे पार पडलेल्या चार शिबिरांमध्ये आतापर्यंत साडेआठ हजार कर्णबधिरांना अगदी मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सेवा ऑटोमोटिव्हचे चेअरमन संजीव बाफना, आदित्य बाफना यांनी दिली. यंदा पंधराशे कर्णबधिरांची तपासणी करून यंत्रे वाटप करण्याचा मानस असल्याचे बाफना यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी सुरू झालेल्या शिबिरासाठी स्टारकी कंपनीचे चेअरमन बिल ऑस्टिन, संस्थापक टानी ऑस्टिन यांच्यासह अमेरिकेतील ४० डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे.

--

गरजू मुलांची होते निवड

पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ व ४ तारखेला कर्णबधिर मुलांची तपासणी करून त्यांना श्रवणयंत्रे बसवून देण्यात येणार आहेत. या श्रवणयंत्रांचे बाजारमूल्य १५ हजारांपासून दीड लाखांपर्यंत आहे. गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी दोन महिने अाधीच उत्तर महाराष्ट्रातील सर्व मूकबधिर शाळांमधून गरजू मुलांची तपासणी करून निवड करण्यात येते. त्यानुसार खास श्रवणयंत्रे तयार करून घेतली जातात.

--

या उपक्रमांतर्गत लाभार्थींची संख्या १५ हजारांच्या पुढे जावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तपासणीनंतर ही मुले जेव्हा प्रथमच आवाज ऐकतात, त्यामुळे त्यांना आनंद होतो. मुलांच्या चेहेऱ्यावरील आनंदाचे भाव पाहूनच खूप समाधान मिळते.

-शर्मिला राज ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन योजनेची चाचपणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धकाधकीच्या जीवनमानात अनेक व्यक्तींना आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धासाठी तजवीज करता येत नाही. ही बाब ओळखून केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यासाठी वयोमर्यादा वाढवून ६० वरून ६५वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयमुळे आता वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत पेन्शन योजनेंतर्गत खाते उघडता येणार आहे. त्यामुळे वय वर्षे ६० ते ६५ दरम्यानची कुणीही व्यक्ती ‘एनपीएस’मध्ये खाते उघडून सत्तराव्या वर्षापर्यंत त्याचा लाभ घेऊ शकणार आहे. ‘एनपीएस’मध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा वाढल्याने आता अतिज्येष्ठ नागरिकांनाही खाते उघडता येणार आहे.

‘एनपीएस’मध्ये रक्कम गुंतविल्यानंतर तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बाहेर पडण्याची मुभा संबंधितांना देण्यात आली आहे. मात्र, तसे करताना गुंतवणूकदाराला एकूण फंडातील रकमेच्या ८० टक्के अॅन्युटी खरेदी करावी लागणार आहे. उर्वरित २० टक्के रक्कम त्याला एकत्रित दिली जाईल. ‘एनपीएस’मधील गुंतवणुकीच्या कालावधीत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम वारसदाराला मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा जरी पेन्शन स्कीममध्ये पैसे टाकले, तरीही त्याचा वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत परतावा मिळणार आहे.

--

अनेकदा काही लोकांना काही कारणास्तव पेन्शन खाते उघडता येत नाही. त्यांच्यासाठी सरकारने चांगली सुविधा दिला आहे. यामुळे अनेकांना उशिरा का होईना खाते उघडता येणार आहे.

-अनंत घोलप, अध्यक्ष, फेस्कॉम

--

सरकारने सुरू केलेली योजना चांगली आहे. परंतु, त्याला कागदपत्रांची जास्त कटकट नको. नाही तर ६५ व्या वर्षी कागदपत्रांच्या कटकटीमुळे पेन्शनही नकोशी होईल.

-जनार्दन मराठे, ज्येष्ठ नागरिक

--

सरकारने फक्त घोषणा केली आहे. या योजनेत सहभागी व्हायचे असेल, तर काय करायला हवे याचा पूर्ण तपशील जनतेसमोर आणावा, तरच ही योजन जास्त लोकाभिमुख होईल.

-पांडुरंग करंजकर, ज्येष्ठ नागरिक

--

अनेक लोक यासाठी उत्सुक आहेत. परंतु, परतावा मिळण्यासाठी पोस्टासारख्या रांगा लावायला नको. नाही तर आपलेच पैसे आपल्याला मिळत नाहीत.

-एकनाथ जाधव, ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासभर व्हॉट्सअॅपची वटवट बंद

0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आजच्या तरुणाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे व्हॉट्सअॅप अचानक एक तास बंद झाल्यामुळे काही जण चिंतेत, तर काही निवांत झाल्याचे पाहायला मिळाले. अचानकपणे दुपारी व्हॉट्सअॅप बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काही तरुणांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर दिवसभर मात्र या बंदची खुमासदार सोशल चर्चा सुरू होती.

अचानक व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे त्याचे पडसाद इतर सोशल साइटवर उमटले आहेत. व्हॉट्सअॅप सतत सुरू असल्यामुळे दरवेळी मेसेज चेक करणे त्रासदायक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तासभर व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे अनेकांनी या काळात अन्य सोशल साइट्सचा आधार घेतल्याचे दिसून आले, तसेच व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे काही जणांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे काही महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी बहुतांश जणांनी अन्य सोशल मीडिया अथवा अन्य अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे दिसून आले आहे. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे एक तास शांततेत गेल्याचे मत अनेक जणांनी फेसबुक व अन्य सोशल साइटवर व्यक्त केले आहे.

आज दुपारपासून व्हॉट्सअॅपवरील कुठल्याच ग्रुपवर मेसेज जात नव्हते, तसेच पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीला मिळत नव्हता. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे हे होत असल्याचे आधी कोणालाच समजले नाही. इंटरनेट सेवा बंद असावी किंवा आपल्या मोबाइलमध्ये काही बिघाड झाला असावा, असे गृहीत धरून अनेकांनी आपले फोन बंद ठेवले. मात्र, इतर सर्व सुरळीत असूनही मेसेज येत नसल्याचे समजल्यानंतर ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून पडताळणी सुरू झाली. काही वेळानंतर #whatsapp down असा हॅशटॅग ट्विटरवर सुरू झाल्यावर खरोखरच व्हॉट्सअॅप बंद असल्याचे निश्चित झाल्यावर अनेकांनी इतर सोशल साइटना पसंती दिल्याचे दिसून आले. यामुळे यूजर्सची मोठ्या प्रमाणात घालमेल झाल्याचे दिसून आले. अखेरीस तासाभरानंतर मेसेज येऊ लागले.

इतर अॅपचा वापर

दुपारी एक तास व्हॉट्सअॅप बंद असल्यामुळे एक तास शांततेत गेला. व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, की प्रत्येकाला तो लगेच पाहण्याची सवय असते. मात्र, आज दुपारी व्हॉट्सअॅप बंद असल्यामुळे दिवसभरातील एक तास शांततेत गेल्याचे समाधान मिळाले. मात्र, कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर अॅप्लिकेशनचा वापर केला.
- प्रणव मंडलिक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णयांच्या माऱ्याने गुरुजी बेजार

0
0

मटा फोकस

संकलन ः अश्विनी कावळे

--

निर्णयांच्या माऱ्याने गुरुजी बेजार

--

पहिली ते दहावीच्या वर्गांच्या कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका ४८ वरून ४५ करण्यात आल्यानंतर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात हा निर्णय झाल्यानंतर शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला होता. तासिका कमी करण्यातून होणारे तोटेही प्रकाशझोतात आणण्यात आले होते. हा निर्णय मागे घेण्यासाठी शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यारही उपसले. या सर्वांनंतर आता पुन्हा सुधारित निर्णय झाला असून, कमी केलेल्या तासिका ४५ वरून पूर्वीप्रमाणे ४८ करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधानाची भावना असली, तरी सातत्याने विविध निर्णयांचा होणारा मारा शिक्षक, शिक्षकेतरांना कमालीचा अस्वस्थ करणारा ठरत आहे.

--

कला-क्रीडा शिक्षकांत नाराजी

कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आला होता. हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासूनच लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत यांच्या तासिका कमी झाल्याने हे विषय शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. कला, क्रीडा शिक्षकांची पदे अनेक शाळांमध्ये रिक्त असताना या निर्णयामुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवू शकण्याच्या भीतीनेही ग्रासले होते.

--

बदलत्या निर्णयांचा मारा

वेळोवेळी नवनवे निर्णय शिक्षकांसमोर धडकत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. आज तासिका कमी, उद्या पूर्ववत, सातत्याने नवनवीन येणारी पोर्टल्स, ऑनलाइन माहिती भरण्यासाठीच्या डेडलाइन्स, विविध दिवस साजरे करण्याच्या सूचना अशा कित्येक निर्णयांचा मारा शिक्षक, शिक्षकेतरांवर होत आहे. एकीकडे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे निर्णयांची अंमलबजावणी, अन्यायाची भावना यातच शिक्षकवर्ग अडकून पडत आहे. निर्णयांचा हा मारा असह्य होत असल्याने वर्षभरात कितीतरी आंदोलने झाली. तासिका कमी करण्याच्या निर्णयानेदेखील कला, क्रीडा विषयाच्या शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण केला.

--

शिक्षण खात्यावर रोष

सातत्याने निर्माण होणाऱ्या बदलत्या निर्णयांच्या परिस्थितीमुळे शिक्षण खात्याच्या कार्यपद्धतीवर शिक्षक, शिक्षकेतरांचा मोठा रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील मेसेजेसद्वारे शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा नाराज शिक्षकांकडून समाचार घेतला जात आहे. तासिका कमी करण्याच्या निर्णयाबाबत कला, क्रीडा संघटनांशी, तज्ज्ञ अभ्यासकांशी कोणतीही चर्चा केली गेली नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता. शिक्षण विभागाकडून शाळांसाठी घेण्यात येणारे निर्णय अनेकदा असफल ठरत असतानाही तासिका कमी करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न राज्यभरात उपस्थित करण्यात आला, तसेच या निर्णयाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी व हसत-खेळत शिक्षणासाठी आवश्यक असलेले विषय संपवून शिक्षण विभागाला काय मिळत आहे, असा जाबही आंदोलनांद्वारे शिक्षकांकडून विचारण्यात आला.

--

द्वितीय सत्रापासून तासिका पूर्ववत

या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तासिका कमी करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षकवर्गातून ओढावलेला रोष पाहता निर्णय बदलण्यात आला. द्वितीय सत्रापासून म्हणजे दिवाळीच्या सुटीनंतर पुन्हा जुन्या निर्णयानुसार तासिकांचे वेळापत्रक करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवार, शनिवारच्या तासिका कला, आरोग्य व शारीरिक शिक्षणासाठी देण्यात आल्या आहेत. दर शुक्रवारी आठ तासिकांऐवजी नऊ तासिका घेण्यात येणार असून, पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका तीस मिनिटांच्या असणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास मुख्याध्यापकांना तासिका विभागणीत लवचिकता ठेवण्याची मुभा महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. नव्या निर्णयात कला विषयासाठी तीन व क्रीडा विषयासाठी तीन तासिका मिळणार आहेत.

--

दुटप्पी भूमिकेने होरपळ

शिक्षण विभागाने गेल्या वर्षीच परिपत्रक काढून क्रीडा क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याबाबत निर्णय जाहीर केले होते. शास्त्रीय कला क्षेत्र यामध्ये गायन, वादन, नृत्य, लोककला प्रकारात लावणी, शाहिरी, भारुड, गोंधळ, नारदीय कीर्तन आदी, तसेच चित्रकला परीक्षेमध्ये ठराविक नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ मिळणार होता. नियमित विद्यार्थ्यांसाठी ही योजना आखण्यात आली. एकीकडे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे काही महिन्यांतच कलेच्या, क्रीडेच्या तासिका कमी करण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयांमध्ये कोणतेही तारतम्य नसल्याने शिक्षण विभाग टीकेचा धनी झाला.

--

आंदोलनाचा परिणाम

तासिका कपातीविरोधात राज्यातील शिक्षकांनी आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला. शिवाय, उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या विषयातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य-क्षमता खुंटली जात असल्याचे सांगण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत लोककलेच्या माध्यमातून शिक्षकांनी आंदोलनाद्वारे मागण्या मांडल्या. अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने राज्यभर शिक्षकांनी एकजुटीने केल्यानंतर हा निर्णय बदलण्यासाठी शिक्षण विभागाला भाग पडल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते.

--

तासिका पूर्ववत केल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, तासिका कमी केल्यानंतर झालेली आंदोलने, मानसिक त्रास यात नाहक वेळ खर्ची झाला. त्याऐवजी सुरुवातीलाच अभ्यासपूर्वक असे निर्णय घेतले गेल्यास शिक्षकांनाही विद्यार्थी विकासावर लक्ष देता येईल.

-योगेश रोकडे, कलाशिक्षक

--

शिक्षण विभागाने निर्णय देतानाच तो विचारपूर्वक देणे अपेक्षित आहे. कोणत्याही संघटना, तज्ज्ञ यांच्याशी संवाद न साधता थेट निर्णय जाहीर केले जात असल्याने असंतोष वाढतो. त्यामुळे हे सरकार शिक्षक, विद्यार्थीहिताचे निर्णय घेणार की नाही, अशी शंका उपस्थित होते.

-दत्तात्रय सांगळे, अध्यक्ष, व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटना

--

हल्ली नवनवीन निर्णय शिक्षण विभागाकडून दिले जातात आणि आंदोलनांनंतर ते मागेही घेतले जातात. यामध्ये शिक्षकांचा वेळ शिकवण्यापेक्षा इतर गोष्टींवर खर्च होत आहे. बदल करण्याच्या नावाखाली शिक्षण क्लिष्ट करू नये, असे वाटते.

-नितीन पाटील, मुख्याध्यापक, सुखदेव प्राथमिक विद्यामंदिर

--

शिक्षण क्षेत्रातील प्रयोग थांबविणे आवश्यक आहे. आज तासिका कमी, उद्या पूर्ववत यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. कला, क्रीडा हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय आहेत. शिवाय, स्वतंत्र व्यवसायाच्या दृष्टीनेदेखील हे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. चुकीच्या निर्णयांमुळे वेळ जाण्याशिवाय हाती काही पडत नाही.

-सतीश नाडगौडा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना

--

या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे वेळापत्रक तासिकांमुळे दोन वेळा बदलले. विद्यार्थी याविषयी घरी चर्चा करतात, तेव्हा त्यांच्यातही संभ्रम दिसतो. त्याचा अभ्यासावर परिणाम होत आहे. शिवाय, आमचाही गोंधळ उडतो. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना तरी हा बदल लक्षात येतो. परंतु, लहान मुलांना बदल स्वीकारण्यास वेळ जातो. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो.

-विकास जाधव, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यांमुळे हजारो हेक्टर सिंचनाखाली

0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना नाशिक जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रासाठी वरदान ठरू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचे लाभ घेतला. सर्वाधिक शेततळी चांदवड आणि सिन्नर या दुष्काळी तालुक्यांमध्ये झाली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पीक पद्धतीत वेगाने बदल घडत असून, शेततळ्यांमुळे यंदारब्बी हंगाम आणि उन्हाळी पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. गेल्या दीड-पावणे दोन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना २२ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. ५६७ शेततळीदेखील पूर्ण झाली असून, त्याचे अनुदानही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

चांदवड आणि स‌िन्नर तालुक्यात एक हजाराहून अधिक शेततळे तयार करण्यात आले आहेत. त्याखालोखाल येवला तालुक्यात ९८९, सटाण्यात ४८७, दिंडोरीत ४२१ शेततळी तयार झाली आहेत. विशेषत: टंचाईग्रस्त भागात शेततळ्याच्या माध्यमातून ‍सिंचनाची सुविधा झाल्याने शेतकरी बागायतीकडे वळू लागले आहेत.

ऑनलाइन अर्जानुसार १८,३४२ शेततळ्यांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभाग ग्रामसभांमधून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकऱ्यांना शेततळ्याबाबत माहिती देत असून, सोबत सूक्ष्म सिंचनाबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शाश्वत पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिकांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सामूहिक शेततळ्यांच्या माध्यमातूनदेखील काही शेतकरी बागायती शेती किंवा पॉलिहाऊसकडे वळले आहेत.

असे आहेत योजनेचे निकष

- शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्टर असावे

- गावात मागील पाच वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली असावी

- दारिद्र्यरेषेखालील किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्राधान्य

- शेततळ्यासाठी अर्ज http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा

- शेततळ्यांच्या आकारानुसार २२ ते ५० हजार रुपयापर्यंत अनुदान; शेतकऱ्याच्या बँक खात्यात केले जाते जमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिगर आद‌विासींचा कळवणमध्ये हिरमोड

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण नगरपंचायतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आरक्षण सोडत निघाली असून, नगराध्यक्ष पद आदिवासी राखीव झाले असल्याने बिगर आदिवासी समाजाच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

कळवण ग्रामपालिकेची नगरपंचायत झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना तसेच अपक्ष असा समन्वय साधत भाजपला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार यांनी आपल्या पत्नी सुनिता पगार यांना पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मिळवून दिला. राज्य व केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असतांना कळवण नगरपंचायत राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आणण्यात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांना यश आले.

उपनगराध्यक्षपदी रोटेशननुसार सहयोगी नगरसेवकांना संधी देण्यात आली. नगराध्यक्ष पद आरक्षणाने खुले मिळालेच तर स्वतःचा नंबर लावण्यासाठी कौतिक पगार तयारीत असतांना आरक्षण राखीव निघाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. मात्र नूतन नगराध्यक्ष निवडीसाठी त्यांनाच महत्त्व असल्याने ते कोणाची वर्णी लावतात याकडे लक्ष लागले आहे.

विकासकामांसाठी शेजारील मतदारसंघाचे अर्थात देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची मदत घेण्याची किमया राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. सत्ते शिवाय शहाणपण नसते याचा अनुभव नगरपंचायत घेत आहे. डॉ आहेर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी कळवण नगरपंचायतला मिळवून देत आहेत. त्यामुळे पुढचा नगराध्यक्ष कोण होईल? या प्रश्नाचे उत्तर आज तरी कुणाकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतारवादनाने नाशिककर तृप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘वैष्णव जन तो..’, ‘रघुपती राघव राजाराम..’ यांसारखी भजने, सतारवादनाने रसिक तृप्त झाले. निमित्त होते तीळभांडेश्वर लेनमधील दुर्गा मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. हरिहर भेट महोत्सवांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. प्रसाद रहाणे यांनी सतारवादन सादर केले.

रहाणे यांनी राग किरवाणीमध्ये आलाप, जोड, झाला, विलंबित तीनताल, मध्य लयीत झपताल, दृतलयीत बंदीश, राग हेमंत, लोकधून याचे सादरीकरण सतारवादनातून केले. त्यांनी स्वतः रचलेला विशालाक्षी रागही सादर केला. त्यानंतर सादर झालेल्या भजनांतून वातावरणात चैतन्य निर्माण झाले. गौरव तांबे यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन प्रियंका हातवळणे– दातार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारागृहातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी!

0
0

अभिमन बिरारी या कैद्यामुळे जेलमधील ५४ प्रकरणे मंजूर

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ५४ शेतकरी कैद्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कैद्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. उर्वरित ४६ कैद्यांचे नातेवाईक त्यांच्या पातळीवर तांत्रिक पूर्तता करणार आहेत. ज्याच्यामुळे हे घडले तो अर्धशिक्षित कैदी आहे, अभिमन जिभाऊ बिरारी. अधीक्षकांना तोडक्यामोडक्या भाषेत पत्र लिहिल्याने कारागृहातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणांना चालना मिळाली.

अभिमनच्या चिठ्ठीमुळे त्याला एक लाख तीस हजार रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्याच्या बँक खात्यात कांदा चाळीचे एक लाख पाच हजारांचे अनुदानही जमा झाले. त्यामुळेच त्याने सरकार, जिल्हा प्रशासन व जेल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना त्याने पत्र लिहिले असून, त्यात तो म्हणतो, ‘‘साहेब, आपण संकटकाळात केलेले उपकार मी व माझे कुटुंब या जन्मात विसरणार नाही. शेतकरी कर्जमुक्तीसाठी आपण कलेक्टरसाहेबांची अर्जंट परवानगी घेतल्याने शेतकरी कैद्यांचे आनलाइन फार्म भरता आले. जुने लोक जेल म्हणजे रावणाची बंदिशाळा समजतात. कारण रावणाच्या लंकेत रावणराजच चालायचे; पण नाशिकरोड जेलमधील रावणराज संपले आहे. लालगेट आफिस वैकुंठनगरी व टावर आफिस तर इंद्रनगरी झाली आहे.’’

शंभर कैद्यांची हजेरी!

राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी कैदी आहेत. नाशिकरोड कारागृहातील अभिमनने धीर करून कारागृह प्रशासनाला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली. अधीक्षक साळी यांनी नोटीस बोर्डावर नोटीस लावून कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची जेल सर्कलमध्ये बैठक बोलावली. त्याला शंभर शेतकरी बंदी हजर होते.

अशी केली पूर्तता!

नाशिकरोड कारागृहात तीन हजारांवर कैदी आहेत. शिक्षा झालेल्या (पक्के) आणि सुनावणी बाकी असलेल्या (कच्चे) अशा शेतकरी कैद्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले. काही कैद्यांकडे आधारकार्ड व अन्य कागदपत्रे होती. काहींकडे नव्हती. जेल प्रशासनाने टाटा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या कैद्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पूर्तता केली. यामुळे ५४ कैद्यांची कर्जमाफी मंजूर झाली. ४६ कैद्यांनी आपण नातेवाइकांमार्फत तांत्रिक पूर्तता करू, असे सांगितले. जेल प्रशासनाचीही कसरत झाली. कारागृहात निम्मा, तर संबंधित गावातील केंद्रांवर उर्वरित अर्ज भरून घेण्यात आला. कैद्यांच्या बोटांचे ठसे कारागृहात घेण्यात आले, तर कागदपत्रे टाटा संस्थेच्या मदतीने कैद्यांच्या घरून मिळवण्यात आली. प्रकरण मंजूर झाल्यानंतर अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवर्जून आभाराचे पत्र लिहिले.

जिल्हाधिकाऱ्यांची मदत

शेतकरी कैद्यांच्या वतीने साळी यांनी २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी शेतकरी कैद्यांच्या भावना व अडचणी नमूद केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी कमी वेळ असतानाही आपले दोन अधिकारी जेलमध्ये पाठवले. त्यांनी शेतकरी कैद्यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना योजना समजावून सांगत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रथोत्सवाचा झगमगाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

‘राजाधीराज त्र्यंबकराज भगवान की जय’, अशा जयघोषात श्री क्षेत्र त्र्यंबकेवर येथील शतकोत्तरी रथोत्सव शुक्रवारी आनंदात साजरा झाला. शतकांची परंपरा असलेल्या उत्सवात शहरातील नागरिक सहभागी झाले होते. विंचुरकर संस्थान‌ीक यांच्या वतीने मंदिर संस्थान हा रथोत्सव साजरा करीत असते. या

उत्सवासाठी विंचुरकर संस्थान यांचे वंशज उपस्थित होते. पौरोहित्य पंड‌ति रवींद्र अग्न‌हिोत्री यांनी केले. दिपमाळ प्रज्वलीत करतांना रूईकर यांच्या हस्ते पूजन झाले.

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या निम‌त्तिाने साजरा होत असलेल्या रथोत्सवात भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्णमुकुट सुमारे १५५ वर्षांपूर्वीच्या ३१ फूट उंच शिसवी लाकडापासून बांधलेल्या रथातून तीर्थराज कुशावर्ताकडे दुपारी चार वाजेच्या सुमारास निघाला. यावेळी भाविकांनी एकच जयघोष केला.

मिरवणूक मार्गावर

फुलांचे गालीचे

मंगलवाद्यांच्या गजरात शंख तुतारीच्या निनादात अग्रभागी श्री त्र्यंबकराजाची पालखी होती. पालखीत चांदीचा मुखवटा ठेवलेला होता. पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. रथ मार्गावर नागरिकांनी फुलांचे गालीचे तयार केले होते. रथावर इमारतींच्या सज्जातून पुष्पवृष्टी केली जात होती. कुशावर्तावर विधीवत पूजा झाली. तेथे हजारो पणत्यांनी कुशावर्त उजळले होते. हा सोहळा शेकडो भाविकांनी डोळ्यात साठवला.

पूर्व दरवाजाजवळ दीपमाळ प्रज्वलीत

सायंकाळी सहावाजेच्या सुमारास रथ पुन्हा मंदिराकडे प्रस्थान झाला. तेव्हा विद्युत रोषणाईने झगमगणारा रथ विलोभनीय दिसत होता. पालखी आणि रथासोबत मंदिराचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, पोल‌सि अधिकारी आदींसह विविध राजकीय पक्ष, सामाज‌कि संस्था यांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. रथ मंदिरात परतल्या नंतर पूर्व दरवाजाची दीपमाळ प्रज्वलीत करण्यात आली तसेच मंदिर परिसरात त्रिपूर वाती लावण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण होते. त्र्यंबकेश्वर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्व परंपरेने साजरा होणारा हा सण अतिशय आनंदात साजरा झाला. कुशार्वत चौकात तसेच मंदिरात पेढे आणि लाडू वाटून नागरिकांनी आनंद साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोका बिल्डकॉनला पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अशोका बिल्डकॉनला डून अँड ब्रँडस्ट्रीट इन्फ्रा अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मुंबर्इत २ नोव्हेंबर रोजी हयात रिजेन्सी या हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोकाचे चेअरमन अशोक कटारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कंपनीचे संचालक मिलाप भन्साळी आणि दिलीप कोठारी या वेळी उपस्थित होते. अशोका बिल्डकॉनचे सध्या १३ राज्यांत काम सुरू आहे. आतापर्यंत सहा हजार किलोमीटरचे रस्ते व महामार्ग कंपनीने निर्माण केले आहेत. देशातील ३० हजार गावांमध्ये वीज वितरण करून कंपनी देशाच्या विकासात योगदान देत आहे. मालदीव येथेही कंपनीच्या वतीने विकासकामे करण्यात येत आहेत. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असून, देशाच्या विकासात आणखी वेगाने काम करण्याचा निर्धार कटारिया यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या एलएलएमच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत तोंडी परीक्षा न घेता परस्पर गुण देण्याचा गोंधळ एनबीटी लॉ कॉलेजमध्ये घडला होता. यामुळे अनेकांना कमी गुण देण्यात आले होते. परीक्षा न घेता गुणांकन केल्याच्या प्रकरणावर विद्यार्थी कृती समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न्यायासाठी धाव घेतली होती. यानंतर संबंधित प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनाच्या नव्या गुणपत्रिका येऊनही अद्याप प्रशासनावर कारवाई झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल विद्यार्थ्यांनी आता उपस्थित केला आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पदवीच्या परीक्षेत देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांमध्ये अन्याय झाल्याची दावा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केला होता. विद्यार्थ्यांना कॉलेजने अंतर्गत गुणदानात चेहरा पाहून गुणदान केल्याचे दाव्यात म्हंटले होते, तसेच गेली तीन ते चार वर्षे एलएलएमच्या विद्यार्थ्यांच्या गुणदानाचा एनबीटी कॉलेज दरवर्षी गोंधळ करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित प्राचार्य व प्रशासनावर कारवाई करू, असे विद्यापीठाने सांगितले होते. आता विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागले आहेत. मात्र, अद्याप कॉलेजवर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात राजकीय दबाव आणला जात असून, कॉलेजला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असेल तर विद्यार्थ्यांच्या समस्या कोण सोडवणार? तसेच कॉलेजच्या चुकांना जबाबदार कोण, असा संतापजनक सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पुन्हा विद्यार्थ्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र!

एनबीटी लॉ कॉलेजच्या संबंधित प्रकरणात लक्ष घालावे, तसेच विद्यार्थ्यांवर मुद्दाम अन्याय केला जात आहे. विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा. संबंधित कॉलेज प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी. दंड नको तर ठोस कारवाई असावी, अशी मागणी करणारे पत्र एनबीटी कॉलेजचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात अधिकारी जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

गोविंदनगर रस्त्यावरील तिडकेनगरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकीला झालेल्या अपघातात महापालिकेच्या शहर नियोजन विभागाचे अधिकारी प्रशांत पगार यांच्यासह एक जण जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली.

सिटी सेंटर मॉल सिग्नलकडून इंदिरानगरकडे जाणारे पगार यांच्या फोर्ड इको स्पोर्ट (एमएच १५/ एफएफ ६७८७) कारसमोर विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पगार यांचा कावरील ताबा सुटला. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर कार आदळून कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फूटपाथवर जाऊन उभी राहिली. अपघातात पगार व त्यांचा सहकारी जखमी झाला असून, जीवित हानी झालेली नाही. दोघांनाही सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकाचा खून

इंदिरानगर : वडाळा गावातून पायी जाणारे ज्येष्ठ नागरिक नामदेव कडाजी लाखे (वय ७०) यांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना लाखे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित गोरख पाराजी गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा गावातून नामदेव लाखे काठी घेऊन चालत होते. या वेळी गोरख गायकवाड याने लाखे यांना धक्‍का देऊन खाली पाडले. त्याच वेळी त्यांच्याजवळील काठीने डोक्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर जखमी झालेले लाखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरख गायकवाड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images