Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

४१ पैकी फक्त सहा लाचखोरांना शिक्षा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अँटिकरप्शन ब्यूरोमार्फत (एसीबी) दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये गेल्या दहा महिन्यांत ४१ पैकी केवळ सहा लाचखोरांना शिक्षा झाली, तर तब्बल ३५ व्यक्ती निर्दोष सुटल्या. यामुळे मोबाइल, रेकॉर्डर किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या एसीबीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

समाजातील लाचखोरीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लाचखोरांचे दोषत्व कोर्टासमोर सिद्ध होणे आवश्यक आहे. शिक्षेचे प्रमाण वाढले तरच एसीबीबाबत सर्वसामान्यांच्या मनात संदेह राहणार नाही. मात्र, सापळ्यांमध्ये अटक केलेल्या व्यक्तींचे दोषत्व पुराव्यानिशी कोर्टात सिद्धच होत नाही. यंदा राज्यात गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. यंदा नाशिक कोर्टात एसीबीच्या एकूण ४१ खटल्यांचा निकाल लागला. यात अवघ्या सहा जणांविरोधात एसीबी सबळ पुरावे सादर करू शकली. उर्वरित ३५ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितले, की गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणजे तो पुरावा कोर्टाला मान्य होतोच असे नाही. एसीबीच्या पुरावा संकलन पद्धतीत काही आमूलाग्र बदल होत आहेत. गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी सरकारी वकील, कोर्ट, पैरवी अधिकारी, एसीबीचे अधिकारी यांच्यात समन्वय वाढवण्यावर भर दिला जातो आहे. अनेकदा यासंबंधी परिसंवाद आयोजित करण्यात येतात. कोर्टाने निर्दोष सोडलेल्या संशयितांविरोधात वरच्या कोर्टात अपील केले जात असल्याचा दावा उगले यांनी केला.

राज्यात २७२ लाचखोर निर्दोष

यंदा ३२० पैकी २७२ व्यक्ती निर्दोष सुटल्या आहेत. २०१६ मध्ये ४४७ पैकी ३५६ संशयितांची निर्दोष मुक्तता झाली, तर २० टक्क्यांच्या सरासरीने केवळ ९१ व्यक्तींना शिक्षा ठोठावण्यात आली होती. २०१५ मध्येही अवघ्या २३ टक्के म्हणजे ५२० पैकी १२१ जणांना शिक्षा झाली होती, तर ३९९ जणांना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फवारणीमुळे महिलेचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूची व्याप्ती वाढत असतानाच त्याचे लोण आता नाशिक जिल्ह्यातही पसरत आहे. सिन्नर तालुक्यात कीटकनाशक औषध फवारणी करताना ५५ वर्षीय शेतकरी महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केशरबाई लक्ष्मण गायकवाड (वय ५५, रा. मुसळगाव, ता. सिन्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे.

मुसळगाव येथील शेतात गायकवाड यांनी १७ ऑक्टोबर रोजी औषध फवारणी केली. मात्र, घरी परतल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. स्थानिक खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले असून, औषध फवारणीमुळे गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गायकवाड यांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, पोलिसांना वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणातच गुदमरतेय गोदा!

0
0

नाशिक : गोदावरी प्रदूषित आहे, हे वास्तव प्रांजळपणे मान्य करणाऱ्या राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच तिला प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प सोडला खरा; परंतु, तो अजूनही सिद्धीस जाऊ शकलेला नाही. प्रदूषणाच्या विळख्याने गोदावरीला घट्ट मिठी मारली असून, खळाळणारी स्वच्छ गोदावरी पर्यटकांबरोबरच नाशिककरांसाठी दिवास्वप्नच ठरले आहे.

विधानसभेपाठोपाठ झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांनी गोदा प्रदूषणाचा मुद्दा हा प्रचाराचे भांडवल केले. ‘जो गोदा की बात करेगा, वही नाशिकपे राज करेगा’ असा नाराही देण्यात आला. परंतु, राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेतल्यानंतर गोदावरी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता असून, महापालिकेतही भाजपला संधी दिल्यास गोदावरीला प्रदूषणमुक्त केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेतच दिली होती. परंतु, गोदावरीच्या निर्मळ रुपाचे दर्शन पर्यटक आणि नाशिककरांना अजूनही दुरापास्त ठरत आहे. गोदावरी स्वच्छतेबाबत हायकोर्टाने गेल्या पाच वर्षांत १०० हून अधिक आदेश दिले असून, यापैकी अनेक आदेशांची अंमलबजावणीच झाली नसल्याचा दावा पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. गोदावरी प्रवाहीत व्हावी, यासाठी तिला काँक्र‌िटमुक्त करण्याचा उपाय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी प्रकर्षाने मांडला. येथील प्राचीन कुंडांचे ऐतिहासिक संदर्भ जपले जावेत, यासाठीदेखील अभ्यासाद्वारे उपाययोजना सुचविण्यात आल्या. परंतु, या उपाययोजनांच्या अंमलबजावणीअभावी गोदावरी मूळ स्वरुपात पुनर्जीव‌ित करण्याच्या कार्यवाहीला ब्रेक लागल्याचे पहावयास मिळते आहे. स्वच्छता मोह‌िमांचे आयोजन, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, प्रदूषण करणाऱ्यांकडून दंड वसुली यांसारख्या काही उपाययोजना केल्या जात असल्या, तरी अजूनही प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कार्यवाहीची गरज आहे.

सिव्हेजचे ऑड‌िट गरजेचे

शहरात निर्माण होणारे १०० टक्के मलजल जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. परंतु, हे मलजल पुरासाठीच्या पाइपलाइनद्वारे गोदेच्या पाण्यात मिसळत असल्याने प्रदूषणात भर पडत असल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे. हायकोर्टाने सिव्हेजचे ऑडिट करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे नेमके लिकेजेस समजू शकणार आहेत. परंतु, अजूनही सिव्हेजच्या ऑड‌िटला गती मिळू शकलेली नाही.

आदेशांची अंमलबजावणी व्हावी

निरीच्या सूचना आणि हायकोर्टाचे आदेश अंमलात आणले, तरी गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटू शकतो, असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे. परंतु, या अंमलबजावणीबाबत प‍्रशासन उदासीन आहे. निरीने गोदा प्रदूषणावर प्रचंड अभ्यास केला असून, या संस्थेवर ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशांचा यंत्रणेने नीट अभ्यास केला नसल्यानेच प्रदूषणाच्या विळख्यातून गोदावरीची सुटका होत नसल्याचा दावाही अभ्यासकांकडून केला जाऊ लागला आहे.

बीओडी लेव्हल २० हून अधिक

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार नदीमधील बीओडी लेव्हल ५ पेक्षा कमी हवी. परंतु, गोदावरीची बीओडी लेव्हल २० हून अधिक आहे. देशात सर्वाधिक प्रदूषित नद्या नाशिकमध्ये असून, गोदावरीचाही त्यामध्ये समावेश आहे. गोदावरीचे पाणी वापरासाठीसुद्धा अयोग्य असल्याचा निर्वाळा यापूर्वीच देण्यात आला असून, तसे फलक नदीपात्राजवळ लावण्याचे आदेशही हाय कोर्टाने दिले आहेत. परंतु, या आदेशाचेही तंतोतंत पालन झालेले नाही. एसटीपीचे अपग्रेडेशन करवून घेण्याची सूचनाही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि निरीने केली आहे. परंतु, या कामासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पैशांची मागणी केली असून, ती अद्याप पूर्ण झालेली नाही.

अतिक्रमणांमुळेही कोंडी

निरीने पर्यावरणीय प्रवाह ठरवून दिला असून, गोदावरी प्रवाहीत ठेवायला हवी, असे त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे. गोदेला अतिक्रमणाचादेखील सामना करावा लागत असून, निळ्या पूररेषेमधील १७८ बांधकामांना महापालिकेने नोट‌िसा दिल्या आहेत. अतिक्रमण आणि प्रदूषण अशा दोन्ही पातळ्यांवर गोदेला समस्यांचा सामना करावा लागतो आहे. एमआयडीसीचा स्वतंत्र मलजल ट्रिटमेंट प्लानच नसल्याने हे पाणी नाले, तसेच उपनद्यांद्वारे गोदावरीमध्ये मिसळते. त्यामुळे एमआयडीसीसाठी स्वंतत्र मलजल शुद्धिकरण प्रक्र‌िया प्रकल्प तयार करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाखारीच्या जवानावर आज अंत्यसंस्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वाखारी (ता. देवळा) येथील भारतीय सैन्यातील जवान रावसाहेब आनंदा सोनजे (वय ३४) यांचे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर कमान हॉस्पिटलमध्ये उजव्या पायावर उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या पा‌र्थिवावर आज (दि. २८) सकाळी ९ वाजता, त्यांच्या मूळगावी वाखारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यासाठी सर्व शासकीय यंत्रणेसह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

वाखारी येथील रावसाहेब सोनजे हे गेल्या १४ वर्षांपासून भारतीय सैन्याच्या ६९ आर्म्ड रेजिमेंटच्या चालकपदावर कार्यरत होते. मागील अडीच महिन्यांपूर्वी रावसाहेब एक महिन्याच्या सुटीवर वाखारी येथे आले होते. त्यानंतर सीमेवरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजर झाल्यानंतर त्यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झाली होती. तेव्हापासून त्यांना सैन्याच्या उधमपूर कमान इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दीपावलीनंतर सोमवारी (दि. २३) रावसाहेब सोनजे यांचे पत्नी आशाबाई यांच्याशी दूरध्वनीवरून अखेरचे बोलणे झाले होते. मंगळवारी (दि. २४) लहान बंधू श्रावण यांच्याशी रावसाहेब यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.

दरम्यान आज (दि. २८) सकाळी साडेआठ वाजता त्यांचे पार्थिव गावात आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून सजविलेल्या रथातून गावात अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. रावसाहेब सोनजे यांच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, पत्नी तसेच मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवी विष्णू थोरे यांची कविता चित्रपटात

0
0

नाशिक ः चित्रपटासाठी स्वतंत्र गाणी लिहिणं आणि एखाद्या कवितेचं गाणं होऊन ते चित्रपटात जाणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कथानक डोळ्यासमोर असलं की त्यावरून गाणं लिहिणं हे गीतकाराचं कसब असतं. परंतु, एखाद्या प्रसिद्ध कवितेचं गाणं होऊन चित्रपटात जाणं, याला नशिबच लागतं. चांदवडचे सुप्रसिद्ध कवी विष्णू थोरे यांची उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेली ‘इश्काच्या इलाजाची दवा मला पाज गं’ ही कविता रसिकांना आगामी मराठी चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.

अनेक कार्यक्रमांतून आपल्या कविता सादर करणारे कवी विष्णू थोरे हे गायक कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचा ‘गाव व्हिलेज झालंय’ हा कवितांचा कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यातून त्यांची ओळख सर्वदूर पोहोचली. कवितेचा अस्सल ग्रामीण बाज त्यांच्या शब्दातून येतो. ना. धों. महानोर, प्रकाश होळकर यांच्याच पठडीतला कवी म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच आपल्या पिढीतले कवी ऐश्वर्य पाटेकर, दिगंबर देवढे, संदीप जगताप यांच्यात ते आपल्या ग्रामीण कवितेच्या अस्सल रांगड्या शब्दांनी ठळक होतात. जेथेही कवितांचा कार्यक्रम होईल तेथे फर्माईश येणारी त्यांची ‘मनातल्या गुप‌िताचं खोल तू राज गं...इश्काच्या इलाजाची दवा मला पाज गं’ ही कविता आगामी मराठी चित्रपटातून येणार आहे. मालेगाव तालुक्यातील सोनज गावातील मोहन घोंगडे मुंबईला शिवमल्हार प्रॉडक्शन या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. त्यात ही कविता गाणं म्हणून घेण्यात आली आहे. प्रथितयश गायकाकडून ही कविता गाऊन घेण्यात येणार असल्याचे प्रॉडक्शनतर्फे सांगण्यात आले आहे.

कवी विष्णू थोरे यांनी ‘घाटी’ या आगामी मराठी चित्रपटासाठीदेखील गीते लिहिली असून ‘चिंगात चिंगली, भिंगात भिंगली, नशा पैशाची ही खोटी, मर्द खरा शोभतो हा घाटी’ हे ते गाणे असून ‘फडफड करतंय जीवाचं पाखरू, लागलंय रूप तुझं काळजाला पोखरू, चांद देखणार डोळ्यात गुतला, काटा इश्काचा रूतला’ हे गाणेदेखील चित्रपटातून लवकरच येत आहे.


कवितेचा शब्द खणखणीत असला की त्याचे गाणे होते. लय, मीटर, शब्दकळा या बाबी मागावून येतात. कवितेचे गाणे होणे ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. एक काळ असा होता की चित्रपटासाठी पैसे नसायचे. आज चित्रपटात आपले गाणे जातेय यापेक्षा मोठा गौरव तो कोणता?

-विष्णू थोरे, कवी व गीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मोसम खोऱ्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नामपूर-ताहाराबाद, नामपूर-मालेगाव हे रस्ते खड्ड्यांत हरवले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, वाहनधारकांना पाठदुखीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

नामपूर-ताहाराबाद रस्त्यावरच्या संपूर्ण साइडपट्ट्या उखडल्या आहेत. याच रस्त्यावर मांगी-तुंगी हे जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची संख्यादेखील रोडावली आहे. या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली. बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे ना अधिकाऱ्यांचे लक्ष, ना लोकप्रतिनिधिंचे.

मालेगाव रस्त्याचीही अवस्था बिकट झाली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता राज्यमार्ग आहे. नामपूर शहरातील बाह्य रस्त्यांचीदेखील परिस्थिती काही वेगळी नाही. चारफाटा ते बस स्टँड या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

नामपूर-ताहाराबाद रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडू.

- दीपक पगार,

स्वाभिमानी शेतकरी संघटना

नामपूरवरून रोज आसखेडा येथे नोकरीसाठी जातो. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, मला पाठीचे दुखणे लागले आहे.

- मेघदीप सावंत, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी निधीला ब्रेक

0
0

उधळपट्टीमुळे कामे संथगतीने; मार्चपर्यंत ७० कोटी देण्याचे आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीऐवजी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रस्ते विकासावर उधळपट्टी सुरू केल्याने स्मार्ट सिटीच्या निधीला ब्रेक लागला आहे. सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांसाठी एकीकडे तिजोरीतून २५७ कोटी रुपये खर्च करण्याचा अट्टहास धरला असताना स्मार्ट सिटीसाठी पालिकेचा हिस्सा देण्यास अडचण निर्माण झाली आहे. सप्टेंबरपर्यंत ५० कोटी देणे अपेक्षित असताना केवळ ३० कोटींचाच निधी कंपनीकडे वर्ग करण्यात आला असून, मार्चपर्यंत अजून ७० कोटी रुपये हस्तांतरीत करावे लागणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील उधळपट्टीमुळे स्मार्ट सिटीच्या योजनांना तसेच, अंमलबजावणीला खीळ बसण्याची शक्यता आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून रस्ते विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जात असताना दुसरीकडे स्मार्ट सिटी निधीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यांसाठी २५७ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जाणार असल्याने लेखा विभागाने अन्य विकासकामांसाठी निधी नसल्याने हात वर केले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला होता. त्याला आता सव्वा वर्षे पूर्ण झाले तरी, स्मार्ट सिटीच्या कामांना गती आलेली नाही. किरकोळ कामे वगळता ठोस काम अद्यापही समोर आलेले नाही.

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने ग्रीन फिल्ड, पॅनसिटी व रेट्रोफिटिंग या तीन प्रकल्पात ५१ प्रकल्प सुचविले आहेत. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून वर्षाला शंभर कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. राज्य सरकार व महापालिकेकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपये स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी गुंतविले जाणार आहेत. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटी स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीची स्थापना केली आहे. एसपीव्हीकडे आतापर्यंत एकूण ३१३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात केंद्र सरकारचे १९० कोटी, राज्य सरकारचे ९३ कोटी तर महापालिकेकडून ३० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पालिकेकडे अजूनही ७० कोटी रुपये येणे बाकी आहे. मार्चपर्यंत पालिकेने शंभर कोटी देणे अपेक्षित असताना ३० कोटीच दिल्याने निधी खर्चात अडथळा निर्माण झाला आहे.

कंपनीकडे स्टाफचा अभाव

स्मार्ट सिटीसाठी केंद्र व राज्याने तीनशे कोटींचा निधी दिला असला तरी या निधी खर्चाची यंत्रणाच कंपनीकडे नाही. सध्या कंपनीचे सीईओ, पाच जण आणि केपीएमजी कंपनीच्या भरवशावर काम सुरू आहे. परंतु, या सर्व कामावर निगराणी ठेवणारी तसेच, कामाचे अपडेट कळवणारी यंत्रणाच कंपनीकडे नाही. निवड होऊन सव्वा वर्षे झाले तरी, कंपनीकडे अधिकाऱ्यांसोबत काम करायला कर्मचारी वर्ग नाही. कंपनीचे कामकाज बघण्यासाठी असलेला स्टाफ मिळावा, यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला असला तरी, तो मंजूर झालेला नाही. त्यामुळे निधी आणि अधिकारी कंपनीला मिळाले असले तरी, स्टाफ नसल्याने कंपनीचे काम धिम्या गतीने सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकपुत्र अखेर तडीपार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुनाचा प्रयत्न, दंगा, वेश्या व्यवसाय अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा उर्फ साबळे (वय २५, रा. विनयनगर) याच्यावर पोलिसांनी शुक्रवारी तडीपारीची कारवाई केली. त्यास लागलीच कसारा येथे सोडण्यात आले आहे.

माजी नगरसेवक संजय साबळे यांचा मुलगा आकाशवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेषतः विनयनगर परिसरातील भारतनगर झोपडपट्टी येथील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर स्थानिक नागरिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आकाश पोलिसांच्या रडारवर आला. दरम्यान, आकाशवर खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आकाशला तडीपार करण्याच्या दृष्टीने प्रकरणाची चौकशी हाती घेतली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आकाशला शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर सचिवास चांदवडमध्ये अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या वॉटर प्रुफिंगचे काम पूर्ण केल्यानंतर ठेकेदारास बिलाचा चेक देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागून, लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या सचिवास अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाली.

गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे असे या सचिवाचे नाव आहे. ‘एसीबी’कडे तक्रार करणारा तक्रारदार ठेकेदार असून, त्याने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींगच्या कामाचे कंत्राट घेतले होते. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामांच्या बिलाचा चेक घेण्यासाठी तसेच कामाच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ठेकेदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संशयित आरोपी गांगुर्डे याने या कामासाठी २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ठेकेदारास पैसे देणे शक्य नसल्याने त्याने लागलीच नाशिक ‘एसीबी’ कार्यालयाशी संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी मागणीची पडताळणी करून लागलीच चांदवड कृषी बाजार समितीच्या सचिव कार्यालयात सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या गांगुर्डेस अटक करण्यात आली. ‘एसीबी’ कार्यालयाचा यंदाच्या वर्षातील हा १०१ वा यशस्वी सापळा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबईतील नोकरीने पावणे तीन कोटींचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुबई येथे महिना ५० लाख रुपये वेतनाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन काम करणाऱ्या भामट्यांनी एकाकडून तब्बल पाऊणे तीन कोटी रूपयांची रक्कम उकळली. पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्याने अखेर संबंधित व्यक्ती सायबर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. इतक्या मोठ्या फसवणुकीचे नाशिकमधील हे पहिलेच उदाहरण ठरू शकते.

दीपक दिगंबर पाठक (रा. पिंपरीकर हॉस्पिटल जवळ, गोविंदनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुजरात येथील एका मल्टी नॅशनल कंपनीत ते कार्यरत आहेत. नाशिकशी संबंधित असलेल्या पाठक यांना दुबई येथे चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी देत असल्याची बतावणी करून ठकबाजांनी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधला. १६ मे ते ५ जुलै या काळात संबंधितांनी विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची ग्वाही दिली. तब्बल ५० लाख रुपये प्रतिमहिना वेतन मिळणार असल्याची बतावणी भामट्यांनी केली. तसेच यासाठी प्रारंभी काही रक्कम ऑनलाइन पाठविण्यास सांगण्यात आले. रक्कम हाती पडताच ठकबाजांनी पाठक यांच्या मेलवर नामांकित कंपनीचे बनावट अ‍ॅग्रीमेंट आणि अपॉइंटमेट लेटर पाठविले. तसेच जमा झालेल्या रक्कमेच्या पावत्याही मेलवर पाठवण्यात आल्या. त्यामुळे पाठक यांचा विश्वास बसला. यानंतर, संबंधित ठकबाजांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी पाठक यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. दुसरीकडे समोरील व्यक्तीकडून सर्व कागदपत्रे हाती पडत होते. त्यामुळे पाठक यांनी पैसे जमा करणे सुरू ठेवले. ठकबाज आणि पाठक यांच्यातील सर्व संवाद विविध ई-मेल अॅड्रेसवरून झाला. या काही महिन्यांच्या काळात भामट्यांनी पाठक यांच्याकडून तब्बल दोन कोटी ७८ लाख १० हजार ०५० रुपये उकळले. दरम्यान कागदपत्रांच्या पूर्ततेसह पैशांची मागणी पूर्ण करूनही नोकरी न मिळत नसल्याने पाठक यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास निरीक्षक बोरसे करीत आहेत.

फसवणुकीचा सर्वात मोठा प्रकार
ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होण्याचे प्रकार सतत घडतात. औषधांच्या नावाखाली तर कधी स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून आर्थिक लूट केली जाते. मात्र, नोकरी देण्यासाठी थेट पाऊणे तीन कोटी रुपये उकळण्याचा प्रकार दुर्मिळच असून, पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यांगणतर्फे आवर्तन संगीत समारोह

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे येत्या ३० व ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय आवर्तन संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे यंदाचे हे सलग चौथे वर्ष आहे.

कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता प. सा. नाट्यगृहात होणार आहे. सोमवारी (दि. ३) प्रथम पुष्पात नृत्यांगना सायली मोहाडकर आणि त्यांच्या विद्यार्थिनी ‘मल्हार’ हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. त्यानंतर द्वितीय पुष्पात नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका मधुरा बेळे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात तबल्यावर नितीन वारे, संवादिनीवर प्रशांत महाबळ हे साथसंगत करणार आहेत.
मंगळवार (दि. ३१) नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यप्रस्तुती सादर करणार आहेत. त्यानंतर द्वितीय पुष्पात पंडित मंजिरी देव यांच्या शिष्या निधी प्रभू यांचे कथक नृत्य सादर होणार आहे. त्यांना तबल्यावर पंडित मुकुंद देव, रोहित देव, संवादिनीवर श्रीरंग टेंबे हे साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नृत्यांगण संस्थेच्या कीर्ती भवाळकर आणि सायली मोहाडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा ‘गाव पाणलोट’वर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१७-१८ साठी निवड करण्यात आलेल्या २०० गावांचे आराखडे तयार करून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी यंत्रणेला दिले आहेत. यंदा ‘गाव पाणलोट’ हा घटक धरून जलयुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.

मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक झाली. यावेळी मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेली कामे यशस्वी ठरत असून मे गतवर्षी महिन्याअखेर असलेली टँकरची संख्या २५० वरून यंदा ७३ वर आली आहे. या अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यात २२९ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये एकूण आठ हजार ११० कामे पूर्ण झाली. त्यामध्ये सर्वाधिक कामे मजगी, वनतळे, सिमेंट बंधारा आणि विहीर पूनर्भरणाची आहेत. पेठसारख्या दुर्गम भागात मातीनाला बांधचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. जिल्ह्यात एका वर्षात जलयुक्तच्या कामांवर १८३ कोटी ४९ लाख रुपये खर्च करण्यात आले. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात २१८ गावांमध्ये १४१ कोटी ४२ लाखाची सहा हजारांहून अधिक कामे करण्यात आली. टंचाईग्रस्त चांदवड, सिन्नर, येवला, कळवण, दिंडोरी, मालेगाव आणि सटाणा या तालुक्यांमध्ये ही कामे झाली असून त्यामुळे तेथील टंचाईची तीव्रता कमी होऊ लागली आहे.

२०१७-१८ या वर्षासाठी अभियानांतर्गत २०० गावांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेच्या मान्यतेने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून एमआरसॅक आणि जीएसडीए तंत्रज्ञानाचा वापर करून क्षमता उपचार नकाशा (पोटेंशिअल ट्रिटमेट मॅप) तयार करण्यात आला आहे. राज्यभरात अशा ५ हजार नकाशांचे वाटप झाले असून कामाचे जीओ टॅगिंग करण्यास मदत होणार आहे. यावर्षी ‘गाव पाणलोट’ हा घटक धरून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्षमता पाणलोट आराखड्याचे क्षेत्र निश्चित केले जाणार आहे. गावाच्या ‘वॉटर बजेटिंग’वरही भर देण्यात येत असून सूक्ष्म नियेाजनामुळे या अभियानाची उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

पाणीपातळी वाढल्याने दिलासा
२०१५-१६ मध्ये गाळ काढण्याची ५९१ कामे करण्यात आली. त्यामध्ये ३६ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. २०१६-१७ या वर्षात ६२२ कामातून १४ लाख ५३ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जल व मृद संधारणाच्या कामांमुळे विहिरींच्या पाणी पातळीत सरासरी १ ते २ मीटरने वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अभियानाच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये ३७ हजार २८८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. एकूण ७४ हजार ५७६ हेक्टर एक पाळी संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. तर २०१६-१७ मध्ये २४ हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. परिसरातील विहिरींची पाणी पातळी सरासरी एक मीटरने वाढली असून ४८ हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रपटांचा आता चीनमध्येही डंका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या पुढाकाराने मराठी चित्रपट कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचले. एका बाजूला मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे जात असतानाच आता ते चीनमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयामार्फत ही प्रक्र‌िया सुरू करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सातत्याने विविध नवीन उपक्रम सुरू केले. याच उपक्रमांतर्गत गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट व कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे प्रमोशन आणि ब्रँडिंग व्हावे, या दृष्टीने निवडक मराठी चित्रपट व त्यांचे दोन प्रतिनिधी महोत्सवात पाठविण्यात आले. या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक यांच्याशी संवाद साधून देण्याचे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली करून देण्याचे काम शासनाने केले आहे.

यातील पुढचे पाऊल म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या प्रयत्नातून इतर देशात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. चीनसारख्या मोठ्या देशात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक बैठक पार पडली. केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयामार्फत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या दृष्टीने झालेल्या बैठकीत प्रथमत: काही मराठी चित्रपट सबटायटल्ससह तेथील आयोजक व वितरक यांना दाखविण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ते चीनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचा प्रत्यक्ष फायदा मराठी चित्रपट निर्माते, वितरक यांना होईल. या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्यास या माध्यमातून यापुढे अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नियोजन करण्यात येईल. या उपक्रमाचे मराठी चित्रपट जगतात स्वागत करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय दबावापोटी व्यंगचित्रकाराला मर्यादा

0
0

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांची खंत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्यंगचित्रकारांवरील राजकीय दबाव वाढत असून, त्याचे स्वातंत्र्य आता लयास गेले आहे. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. राजकीय पुढारी समजूतदार व कलेची कदर करणारे होते. आता मात्र व्यंगचित्रकारास मर्यादा आलेल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी केले.

‘कार्टुनिस्ट कम्बाईन’ या अखिल भारतीय व्यंगचित्रकारांच्या संघटनेच्यावतीने नाशिक येथे 'हास्यदीपावली २०१७' हे व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन झळके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकार हा चित्रकार व साहित्यिक या दोघांनी झिडकारलेला कलाकार असतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन तो देत असतो. व्यंगचित्रकाराला शासनाने पत्रकाराचा दर्जा दिला पाहिजे. व्यंगचित्रकार प्रसिद्धीपासूनही नेहमी दूर असतो. त्यामुळे ही कला जिवंत ठेवणाऱ्यांना रसिकांनी नेहमी भररभरून प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही झळके म्हणाले.

यावेळी विवेक मेहेत्रे, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, घनश्याम देशमुख, विनय चानेकर, रवींद्र बाळापुरे, अनंत दराडे, अवि जाधव, भटू बागले, दिनेश धनगव्हाळ, अरविंद गाडेकर, राजेंद्र सरग उपस्थित होते. तब्बल ५० व्यंगचित्रकारांची १७० व्यंगचित्रे, २५ हून अधिक व्यंगचित्रकारांचा प्रत्यक्ष सहभाग, नामवंत व्यंगचित्रकारांची भाषणे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन असा हा कार्यक्रम होता. यावेळी चार मार्गदर्शन सत्रे झाली. त्यात घनश्याम देशमुख, प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडीत, प्रभाकर झळके, अनंत दराडे यांच्या मार्गदर्शनाचा समावेश होता.

‘कार्टूनिस्ट कम्बाईन’ हे अखिल भारतीय व्यंगचित्रकारांचे व्यासपीठ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून व प्रभाकर ठोकळ, शि.द.फडणीस, वसंत सरवटे, श्याम जोशी, प्रभाकर झळके यांसारख्या मान्यवर व्यंगचित्रकारांच्या उपस्थितीत व्यंगचित्रकलेच्या संवर्धनासाठी या संस्थेची स्थापना झाली. नाशिक येथे संस्थेचे हे पहिलेच व्यंगचित्र प्रदर्शन आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शंभर खाटांच्या मह‌िला रुग्णालयाच्या जागेच्या वादावरून माजी आमदार वसंत गिते आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यातील संघर्षावर आता थेट पक्षाच्या नेत्यांनीही मौन धारण केले आहे. शहराध्यक्षांनी या वादापासून अंतर राखले असून, अन्य नेत्यांनी थेट कानावरच हात ठेवले आहेत.

या वादामुळे आता भाजपचीच अडचण झाल्याने रुग्णालयाच्या जागेचा चेंडू पुन्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे सोमवारी जनता दरबारासाठी येणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना जनता दरबार ऐवजी आधी भाजपचा तंटा दरबार भरवावा लागणार आहे.

शंभर खाटांच्या मह‌िला रुग्णालयावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापौरांनी भाभानगरच्या जागेचा ठराव दिला असतानाही, वसंत गितेंनी त्यास थेट विरोध केला आहे. त्यामुळे भाजपमधल्या या दोन बड्या नेत्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, या वादाने आता पक्षाचीच बदनामी सुरू झाली आहे. रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदारांमध्ये वाद सुरू असतानाच शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी मात्र या वादापासून अंतर राखले आहे. दोन्ही नेत्यांच्या वादामुळे भाजपची प्रतिमा मल‌िन होत असताना, बड्या नेत्यांना रोखायचे कसे असा प्रश्न अन्य नेत्यांपुढे उभा राहिला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशानंतरही वसंत गिते ऐकत नसल्याने स्थानिक नेते व महापौरांचीच पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे याबाबत काय तो फैसला वरिष्ठ नेतेच घेतील, अशी भूमिका सानप यांनी घेतली आहे. या नेत्यांशी संबंधित अन्य नेत्यांनी तोंडावर बोट ठेवत वादापासून अंतर राखले आहे. या दोन नेत्यांमधील तंटा आता पालकमंत्री गिरीश महाजनच सोडवतील, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये जनता दरबारासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच या दोन नेत्यांमधील वादावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे स्थानिक नेत्यांचे लक्ष लागून आहे.

मंत्र‌िपदाचे राजकारण?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयाच्या जागेचा वाद मिटेल अशी चर्चा होती. परंतु, दिवाळीनंतर मंत्र‌िमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होताच रुग्णालयाच्या वादाने पुन्हा उचल खाल्ली. मंत्रिपदासाठी तीनही आमदारांमध्ये मोठी स्पर्धा असून, एकमेकांना काटशह दिला जात आहे. त्यामुळे या वादामागेही मंत्र‌िपदाचे राजकारण असल्याची चर्चा आता भाजपच्याच नेत्यांमधे आहे. त्यामुळे या वादाला अधिक खतपाणी देऊन तो चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, या वादात मात्र पक्षाचे नुकसान होत आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीचीही उडी
शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात सुरू असलेल्या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात आपल्या आरोग्य राज्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतच खान्देश पॅकेजअंतर्गत या महिला रुग्णालयाला मंजुरी दिल्याचा दावा माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे. प्रस्तावित जागेत रुग्णालय उभे राहणार नसेल, तर सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेत हे रुग्णालय उभारले जावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे रुग्णालय वादाला नवीन ट्विस्ट मिळाले आहे.

शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणी आड आता आमदार फरांदे व गिते यांच्यातील राजकीय वैमनस्य पुढे आले आहे. भाभानगर येथील जागेतच हे रुग्णालय उभारले जावे, यासाठी आमदार फरांदे आग्रही आहेत, तर गिते यांचा या जागेवर रुग्णालय उभारणीस विरोध आहे. या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फरांदे यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, गिते यांनी तो अमान्य करीत विरोध कायम ठेवला. यातूनच गिते यांचे पुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासह महापालिकेत धडक देत स्वपक्षाच्या महापौरांनाच जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडी अध्यक्ष भामरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून, सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेत हे रुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा शासकीय व विभागीय संदर्भसेवा रुग्णालय आहे. त्याव्यतिरिक्त अनेक खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात या भागात आहेत. त्यामुळे शंभर खाटांचे महिला रुग्णालय सिडकोत महापालिकेच्या जागेवर किंवा पेलिकन पार्कच्या जागेवर करावे, अशी मागणी भामरे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे. योगायोगाने पेलिकन पार्कची जागा मोकळीच असल्याने जागेचा प्रश्न यानिमित्ताने सोडविला जाईल. सिडको भागामध्ये मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहसाठी आलेल्या खान्देशी भागातील नागरिकांचा समावेश आहे. खान्देश पकेज अंतर्गत रुग्णालय सिडको मंजूर झाल्यास खान्देश वासियांना निश्चितच आनंद होईल. कष्टकरी, श्रमजीवी, गरीब व सर्वसामान्य नागरिक या भागात मोठ्या प्रमाणात स्थायिक आहेत. शेजारी औद्योगिक वसाहत असलेले सातपूर व अंबड भागातील महिलांना या रुग्णालयाचा जवळ असल्याने फायदा होऊ शकतो असा दावाही त्यांनी केला आहे.

रुग्णालयाचा बळी नको

आपण आरोग्य राज्यमंत्री असताना २००९ मध्ये मंत्रिमंडळाची नाशिक येथे बैठक झाली होती. त्यावेळी मंत्रिमंडळाने खान्देश पॅकेजमध्ये नाशिकला शंभर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी या रुग्णालयासाठी आपण जुने नाशिक भागातील कथडा येथील जागा सुचविली होती. परंतु, तेथे पूर्वीच रुग्णालय असल्याने नवीन जागा शोधावी लागली. रुग्णालय मंजूर झाल्यानंतर वर्षभरात निवडणुकांची घोषणा झाली. आता आमदार प्रा. फरांदे या रुग्णालयासाठी पाठपुरावा करीत आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती भागातच रुग्णालय होणे गरजेचे आहे. जेणेकरून गरीब महिलांना त्याचा लाभ घेता येईल. राजकीय वादात रुग्णालयाचा बळी जायला नको, असे मत माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटीला मिळणार अद्ययावत नाट्यगृह

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक नाशिक हे नामाभिधान मिरवताना शहरामध्ये तशा सांस्कृतिक व्यवस्था आहे का हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. आजमितीला नाशिकमध्ये एका चांगल्या नाट्यगृहाची अत्यंत आवश्यकता होती. ही गरज पाहता महापालिकेतर्फे पंचवटी येथे अद्ययावत नाट्यगृह लवकरच उभे करून मिळणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तशी निविदा काढण्यात आली आहे.

तब्बल वीस कोटी रुपये खर्च करून हे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व्हे नंबर २११/१ पैकी मंजूर विकास योजनेमधील नाट्यगृहासाठी आरक्षित असलेले आरक्षण क्रमांक ११४ पैकी मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे सहा एकर जागेत हे नाट्यगृह बांधले जाणार आहे.

कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद करण्यात आल्यापासून नाटक पहायला कुठे जावे असा मोठा प्रश्न रसिकांसमोर उपस्थित झाला आहे. शहरात महापालिकेच्या अखत्यारीतील दादासाहेब गायकवाड सभागृह, महात्मा गांधी सभागृह, पंडित पलुस्कर सभागृह ही नाट्यगृहे आहेत. मात्र काही ना काही कारणाअभावी ती बंद आहेत. दादासाहेब गायकवाड सभागृहात तांत्रिक यंत्रणा काम करीत नाही, महात्मा गांधी सभागृह काही कारणाने बंद आहे तर पंडित पलुस्कर सभागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नसल्याने तेथे गर्दी होत नाही. अशावेळी पंचवटीसारख्या ठिकाणी नाट्यगृह होत असेल, तर ती नाशिककरांसाठी सुखावह बाब आहे असे रंगकर्मींचे मत असून, नवीन नाट्यगृह मिळणार म्हणून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नाट्यगृह उभे राहते ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु, जी आता सद्यस्थितीत आहे त्यांचीच देखभाल व्यवस्थित झाली तर ते अधिक योग्य होईल. नाहीतर पुन्हा एक नवी वास्तू इतकीच त्याची ओळख राहील. छोटी सभागृहे अनेक आहेत त्याकडे कलाकारांचे व कर्त्या लोकांचेही दुर्लक्ष झालेले आहे त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे असेही वाटते.

- प्रवीण काळोखे, दिग्दर्शक

पंचवटीत अद्ययावत नाट्यगृह उभे राहतेय ही चांगली बाब आहे. परंतु, आता आपण पहात आहोत की कालिदास नसल्याने किती अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक नाट्यगृहे शहरात असावीत. तसेच हे नाट्यगृह जेथे असेल तेथे वरच्या मजल्यावर मिनी थिएटरही असावे असे वाटते.

- प्राजक्त देशमुख, रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या देवी चौकातील सराफ व्यावसायिक राहुल बंडोपंत शहाणे (वय ३२) यांचे अपहरण केल्याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात आज रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तथापि, हैदराबादच्या रेल्वे पोलिसांनीच त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात असल्याने आजही संभ्रमाचे वातावरण कायम होते. नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व सहकारी रात्री उशिरापर्यंत हैदराबाद व सिंकदराबादच्या पोलिसांच्या संपर्कात होते.

नाशिकरोडच्या देवी चौकात धनश्री ज्वेलर्सचे संचालक राहुल शहाणे यांचे शुक्रावारी अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. चोवीस तास झाले तरी त्यांना खऱ्या पोलिसांनीच चौकशीसाठी नेले की तोतया पोलिसांनी अपहरण केले, याचा खुलासा होत नव्हता. त्यामुळे आज राहुल शहाणे यांचे मेहुणे संतोष डहाळे (लोखंडे मळा, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. तक्रारीत नमूद केले आहे, की २८ ऑक्टोबरला दुपारी महिन्द्रा मॅक्स या गाडीतून हैदराबादचे कथित पोलिस शहाणे यांच्या दुकानात आले व त्यांना घेऊन गेल्याची माहिती देवी चौकातील व्यावसायिकांनी डहाळे यांना दिली. डहाळे यांनी राहुलचे दुकान बंद केले. शेजारील दुकानदारांच्या मदतीने राहुल शहाणे यांच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. त्यानंतर राहुल शहाणेंच्या फोनवरून प्रवीण जगताप यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. हिंदीमध्ये त्या व्यक्तीने सांगितले, की आम्ही राहुल शहाणेंना हैदराबादला घेऊन चाललो आहोत. चौकशीनंतर त्यांना सोडून देऊ. त्यानंतर डहाळे यांनी शहाणे यांच्या मोबाइलवर वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. अखेर शहाणे यांच्याशी डहाळे यांनी आपल्या मोबाइलवरून संपर्क साधला असता शहाणे यांनी सांगितले, की मला सिंकदराबाद येथे आणले आहे. त्यानंतर फोन कट झाला. वारंवार प्रयत्न करूनही शहाणे यांचा ठावठिकाणा कळत नसल्याने व संबंधित पोलिस ठाण्याचे नाव व पत्ता मिळत नसल्याने डहाळे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यात म्हटले आहे की, राहुल शहाणे यांना हैदराबाद पोलिस असल्याचे सांगून दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी काही तरी कारणास्तव नेले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करीत आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, नाशिकरोड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद दंडे, नाशिक सराफ संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवसे, प्रमोद कुलथे, सराफ राहुल महाले, केतन कुलथे, योगेश नागरे, विक्रम खरोटे, सुनिल माळवे, राहुल म्हसे, कैलास शहाणे, सागर कुलथे आदींसह पदाधिकारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आजही ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा येथील एका फ्लॅटमधून अटक करण्यात आलेल्या चन्या बेग गँगच्या सदस्यापैकी एकाने नाशिकमधील सहकाऱ्यासमवेत वर्षभरापूर्वी केलेल्या खूनाच्या घटनेचा उलगडा झाला आहे. क्राईम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने चौघांपैकी एकास अटक केली असून, दोघे फरार आहेत. यातील मुख्य संशयित नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून, त्यालाही लवकरच शहर पोलिस ताब्यात घेणार आहेत.

शहरात दिवाळीची धामधूम सुरू असताना २२ ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांनी मोठे ऑपरेशन राबवून इंदिरानगर परिसरातील आनंदनगर येथे छापा मारून शाहरूख रज्जाक शेख (वय २५, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर), सागर सोना पगारे (वय २२, रा. चितळी, ता. राहता) आणि बारकू सुदाम आंभोरे (वय २१, रा. चितळी, ता. राहाता) अशा तिघांना अटक केली होती. संशयित आरोपींकडून दोन गावठी पिस्टल, ४० काडतुसे, पाच मोबाइल फोन, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान, हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील चन्या बेग गँगचे सदस्य असून, त्यांचा शहरातील कोणत्या व्यक्तींशी संबंध आला, हे शोधून काढण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी दिले होते. त्यानुसार, क्राइम ब्रँचच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक माईनकर यांनी संशयित आरोपी शाहरूख रज्जाक शेख याच्याकडे चौकशी केली. त्यात नाशिकमधील काही व्यक्तींची नावे पुढे आली. त्यानुसार, क्राइम ब्रँचच्या योगेश सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २८) सापळा रचून निख‌िल संतोष गवळी (वय २५, हरसूल सोसा., अशोकनगर) यास अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण दोन साथीदार आणि शाहरूख शेख याच्या मदतीने आकाश सूर्यवंशी याचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत एसीपी अशोक नखाते यांनी सांगितले की, साधारण वर्षभरापूर्वी खून झाला होता. ठक्कर बाजार बस स्थानकाजवळ रात्रीच्या सुमारास संशयित उभे असताना सूर्यवंशी तिथे आला होता. सूर्यवंशी हासुद्धा पाकीटमारीचे काम करीत असे. तेथे संशयित आणि मयत यांच्यात वाद झाला. यावेळी शाहरूखने सूर्यवंशीला मारहाण केली. नंतर त्याला चारचाकी वाहनात बसवून ते गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील नदी किनारी पोहचले. तेथे शाहरूखने सूर्यवंशीवर वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणात संशयित निख‌िल गवळीला अटक झाली असून, त्याच्या दोन साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास नखाते यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शाहरूख शेख सध्या नगर पोलिसांच्या ताब्यात असून, त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येईल, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावावर संगीतोपचाराची मात्रा!

0
0

नाशिक : घर आणि भोवतालच्या विचारधारेबाबत टोकाच्या मतभेदांमुळे जीवनेच्छा संपलेल्या व्यक्तीला जीवनात केवळ संगीत थेरपीने पुन्हा नवे आयुष्य दिल्याचे वृत्त तुम्ही ऐकले तर कदाचित विश्वास बसणार नाही..! पण संगीतोपचाराने संपलेली जीवनेच्छा पुन्हा जागृत होऊन मोठी समाजोपयोगी कार्य अनेक जण करीत असल्याच्या उदाहरणांची कमतरता नाही.

‘मना सज्जना’ या वृत्तमालिकेस प्रतिसाद देताना विख्यात गीतकार संजय गिते यांनीही अशीच काही आश्चर्यकारक उदाहरणे ‘मटा’ च्या व्यासपीठावर मांडली. संगीत हे तुमची जीवन इच्छा पुन्हा जागवू शकते आणि बड्या ध्येयासाठी तुम्हाला कार्यरक करू शकते, असा दावा त्यांनी अनेक केस स्टडींच्या आधारावर केला आहे.

सोनलला मिळाले नवजीवन

परंपरा आणि चौकटींच्या संस्कारात मोठी झालेली सोनल (नाव बदलले आहे) ही सामान्य कुटुंबातील मुलगी. तिची स्वत:ची वैचारिक क्षमता पूर्णत: विकसित झाल्यानंतर घर आणि भोवतालच्या समाजातून आलेल्या विचारधारेशी तिचे मतभेद होऊ लागले. परंपरागत चौकटी तिच्या मतांना कुठे स्थान देत नसल्याने ती काहीशी हिरमुसली. यामुळे सोनलने चक्क आत्महत्यचे प्रयत्नही केले. या घटनेने हादरलेल्या तिच्या कुटुंबीय आणि हितचिंतकांनी तिची हरतऱ्हेने समजूत घातली. पण सोनल ऐकेना. अखेरीला तिच्यावर गीतकार गिते यांनी त्यांच्याव्दारेच संशोधित ‘पर्सनलाइझ साऊंड थेरपी’ आणि इतर संगीतोपचारांचा प्रयोग केला. या प्रयोगाव्दारे तिचा आत्मसन्मान आणि स्वत:ची अस्तित्वाबद्दलचा आदर वाढविण्यास मोठी मदत झाल्याने अवघ्या तीन ते चार महिन्यांत सोनलने नैराश्याशी काडीमोड घेत नवे स्वप्न पाहिले. एक मोठा सामाजिक सेवेचा प्रकल्प हाती घेऊन ती अत्यंत संवेदशीलपणे मुक्या प्राण्यांची जीवापाड काळजी घेते आहे. शेकडो मुक्या प्राण्यांसाठी सोनल एक देवदूत बनण्याची किमया केवळ एका संगीत थेरपीतून घडल्याचे गीतकार गिते यांनी ‘मटा’ ला सांगितले.

रुग्णालयेही घेतात संगीताचा आधार

अनेकदा तुमचे आजार शरीरापेक्षा मनात अधिक असतात. मनोविश्लेषणाच्या अभ्यासाव्दारे यावर प्रकाश पडतो. अशा रुग्णांवर संगीत आणि नादांचे उपचार केल्यास रुग्णाच्या स्नायूंचा तणाव कमी होऊन स्वभाव उल्हासित राहतो. दिनचर्येत किमान २० ते ३० मिनिटे संगीत ऐकण्याचा सराव तुमची एकटेपणाची भावना दूर करू शकतो. अनेक रुग्णालयांमध्येही रुग्णांवरील नियमित उपचारांना संगीत उपचारांची साथ दिली जाते.

संगीत करते तणाव

अन् काळजी दूर

शरीर आणि मनात नकारात्मकता पसरविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रसायनांच्या असमतोलाचा प्रभाव संगीत नाहीसा करू शकते, असेही एक पाहणी सांगते.

वेदना कमी होतात

संगीतामध्ये मनासोबतच शरीराचेही दु:ख हलके करण्याची क्षमता आहे. एका पाहणीमध्ये असे आढळले आहे की, एका रुग्णास योग्य प्रकारचे संगीत ऐकविल्यानंतर वेदनांसंदर्भात तक्रार करण्याचा त्याचा प्रभाव कमी झाला.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

संगीताच्या श्रवणाने तुमच्य शरीरातील इम्युनोग्लोबुलीनमध्येही वृध्दी होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी या प्रक्रियेचा मोठा लाभ होतो, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

स्मरणशक्ती राहते मजबूत

मंद संगीतामुळे ऐकलेले आणि वाचलेले दीर्घकाळ स्मरणात राहते. अध्ययनाच्या प्रक्रियेला संगीत गती देते. डोपामाइन नावाचा शरीरातील घटक संगीत वाढविते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमुळे रस्त्यांवर पावलोपावली ‘ब्रेक’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या काही वर्षांत राज्यकर्त्यांकडून झालेली डोळेझाक, निधीबाबत एकदमच आखडता घेतलेला हात यातून येवला तालुक्यातील गावोगावच्या अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात दळणवळणातील धावणारी तालुक्याची गाडी पावलोपावली ‘ब्रेक’ दाबत चालल्याचे चित्र समोर आले आहे.

येवला तालुक्यातील कुठला रस्ता चांगल्या स्थितीत राहिला आहे, याचा विचार केला तर एखादा दुसरा अपवाद वगळता कुठलाच नाही हे उत्तर समोर येत आहे. तीन वर्षांपूर्वीचं चित्र गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या सातत्याने होत गेलेल्या दुरवस्थेमुळे बदललं आहे. गावोगावच्या रस्त्यांची गेल्या काही वर्षात झालेली दुरवस्था अन् अक्षरशः खड्ड्यात गेलेले रस्ते बघता मार्गक्रमण करणाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.

येवला शहरातील गंगादरवाजा ते येवला तहसीलकडे एन्झोकेम हायस्कूलच्या मागून जाणारा पोहोच रस्ता म्हणजे दोन राज्य महामार्गांना जोडणारा रस्ता. जवळचा मार्ग म्हणून सर्वच येवलेकर या मार्गाचा अवलंब करतात. सात वर्षांपूर्वी या रस्त्यांचे काम भुजबळांनी खास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करून घेतले होते. आता या रस्त्याला कुणीच वाली नसल्याने अवस्था न जाण्या-ेण्यासारखी झाली आहे. शहरानजीक असलेल्या लक्ष्मीआई मंदिर ते नागडदरवाजा या रस्त्याची अवस्था देखील दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येवला-पारेगाव रोडवरील लोणारी क्रीडा संकुलासमोरील तीन वर्षांपूर्वी सिमेंट क्राँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यात तर जागोजागी अगदी मोठे खड्डे पडल्याने अनेकदा अनेक नागरिकांना पाय अडकून चक्क दंडवत करण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा ते शेळकेवाडी या सात किमी रस्त्याची अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था चिंतेचा विषय बनला आहे. पाटोदा गावापासून पालखेड कॅनॉलपर्यंतचा अवघ्या अर्धा ते एक किमीचा काहीसा अपवाद वगळता पुढे शिरसगाव ते शेळकेवाडी माथापर्यंतचा रस्त्यावरही खड्डेच खड्डे पडल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

पूर्व भागातील रस्त्यांची चाळण

तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव ते सुरेगाव हा तीन किमीचा रस्ता, डोंगरगाव ते वाघाळे रस्ता, तळवाडे ते अंगुलगाव, गवंडगाव ते तारूर गेट या रस्त्यांची देखील अवस्था खड्ड्यांमुळे दयनीय झाली आहे. मनमाड-नगर राज्य महामार्गावरील ‘बीओटी’ तत्त्वावरील रस्ता असो, की येवला- वैजापूर रस्ता यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. गावोगावच्या रस्त्यांची होणारी चाळण बघता शासनकर्ते कधी गांभीर्याने घेणार?, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images